Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

पिंपरी पालिकेत धन्वंतरी योजनेचा बोजवारा

$
0
0



म. टा. प्रतिनिधी, पिंपरी पिंपरी-चिंचवड महापालिकेतर्फे महापालिका कर्मचाऱ्यांच्या वैद्यकीय खर्चासाठी धन्वंतरी ही योजना राबविली जाते. योजनेसाठी चालू आर्थिक वर्ष २०१६-१७ साठी ९ कोटींची तरतूद करण्यात आलेली आहे. मात्र, केवळ सहा महिन्यांतच योजनेच्या तरतुदींपेक्षा दीड कोटी रुपयांचा अधिक बोजा महापालिकेला उचलावा लागणार असल्याचे धन्वंतरी योजनेच्या लेखापरीक्षण अहवालातून सामोर आले आहे. पिंपरी-चिंचवड महापालिकेने 'धन्वंतरी स्वास्थ्य योजना' १ सप्टेंबर २०१५ पासून लागू केली. यासाठी महापालिका आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली १३ सदस्यीय समिती नेमण्यात आली आहे. या योजनेमध्ये महापालिकेच्या सेवेतील ६ हजार ८९० अधिकारी, कर्मचारी तसेच ८८३ सेवानिवृत्त असा एकूण ७ हजार ७७३ कर्मचाऱ्यांना योजनेत समाविष्ट करून घेण्यात आले आहे. त्यासाठी शहरातील १२० खासगी हॉस्पिटलशी करार केले. मात्र, कालांतराने त्यातील २० हॉस्पिटल वगळण्यात आले असून, यानुसार कर्मचाऱ्यांच्या वैद्यकीय खर्चाचा काही वाटा महापालिका भरते. धन्वंतरी योजनेचे मागील दोन अठवड्यांपासून लेखापरीक्षण चालू होते. त्यानुसार धक्कादायक अहवाल समोर आला आहे. चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या सहा महिन्यांतच एकूण कर्मचाऱ्यांपैकी केवळ १५ टक्के कर्मचाऱ्यांवर साडे दहा कोटी रुपये खर्च झाला आहे. आम्ही केलेल्या लेखापरीक्षणानुसार ही योजना महापालिकेने कर्मचाऱ्यांसाठी पुढे तशीच चालू ठेवावी. मात्र, त्यासाठी या योजनेच्या खर्चावर काही नियंत्रण आणणे गरजेचे आहे. कारण महापालिकेला जुलै महिन्यातच एक कोटी ६० लाख रुपये अधिकचे द्यावे लागणार आहेत. त्यात ८ हजार कर्मचाऱ्यांपैकी १५ कर्मचाऱ्यांनीच आत्तापर्यंत या योजनेचा लाभ घेतला आहे. त्यामुळे पुढील सहा महिन्यांसाठी महापालिका एवढा पैसा कोठून आणणार, असा सवाल मुख्य लेखापाल पद्मश्री तळदेकर यांनी या संदर्भात माहिती देताना केला. दरम्यान, अहवालात पुढील बाबी नमूद करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. या योजनेसाठी विशेष अशा तज्ज्ञ डॉक्टरांची समिती तयार करा, जी या स्वतः हॉस्पिटलला भेट देईल. तसेच, मागणी केलेल्या आजारांनुसार तेवढा खर्च करणे गरजेचे आहे का, कोणत्या उपचारावर किती खर्च व्हावा याचे निकष ठरवले जातील. सध्याच्या नियमांनुसार छोट्या आजारालाही किती खर्च करावा याचे नियंत्रण नव्हते. त्यामुळे बऱ्याचवेळा याचा गैरफायदाही घेतला जाऊ शकतो. तसेच, या योजनेत जे कर्मचाऱ्यांच्या कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीमागे २० लाख रुपये दिले जातात, तेवढे देणे खरेच योग्य आहे का, याची खातर जमा करणे गरजेचे आहे. अशा काही सूचना किंवा ठळक गोष्टी सांगितल्या आहेत. धन्वंतरी ही योजना चांगली आहे; मात्र तिला काही नियम व नियंत्रण असणे गरजेचे आहे, असेही तळदेकर यांनी सांगितले.

१०० हॉस्पिटलची १८०० बिले सध्या योजनेतील १०० हॉस्पिटलची १८०० बिले प्रलंबित आहेत. यातील थेरगाव आणि निगडी-चिंचवडमधील प्रत्येकी एका हॉस्पिटलची सर्वाधिक बिले आहेत. या योजनेत खासगी हॉस्पिटल व महापालिका प्रशासन यांच्यातील समन्वयाचा अभाव उघड झाला आहे. तसेच, निधी खर्च होत असताना कोणाचेच लक्ष या प्रकाराकडे का गेले नाही, याबाबत देखील उलट-सुलट चर्चा सध्या सुरू आहे. महिन्याला ७० लाख खर्च करणे अपेक्षित असताना सव्वा ते दीड कोटी रुपये खर्च केला गेल्यानेच हा बोजा महापालिकेवर पडणार असल्याचे देखील बोलले जाते.



मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


‘अॅबॅकस’साठी बोडकेंचे साकडे

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

महापालिकेच्या शाळेतील विद्यार्थ्यांना 'अॅबॅकस'चे प्रशिक्षण देण्यासाठी तीन वर्षांत चार कोटी रुपये खर्च करण्यास राष्ट्रवादी काँग्रेस वगळता पालिकेतील सर्वच पक्षांनी विरोध केला आहे. मात्र, याकडे दुर्लक्ष करून प्रस्ताव मान्य करावा असे आवाहन स्थायी समितीचे अध्यक्ष बाळासाहेब बोडके यांनी केले आहे. अॅबॅकसचे मोफत प्रशिक्षण देण्याचा कोणताही प्रस्ताव कोणत्याही संस्थेने शिक्षणमंडळाला दिलेला नसल्याने विद्यार्थ्यांच्या हितासाठी हा प्रस्ताव मान्य करावा, असे आवाहनही बोडके यांनी केले आहे.
गेल्या आठवड्यात झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत अॅबॅकसचे प्रशिक्षण देण्यासाठी ३.९० कोटी रुपये खर्च करण्याचा प्रस्ताव मान्य करण्यात आला आहे. मोठ्या प्रमाणात निधीची उधळपट्टी करण्याबाबतच्या बातम्या प्रसिद्ध झाल्याने शहरातील स्वंयसेवी संस्थांसह, काँग्रेस, मनसे आणि भाजपच्या सभासदांनी या प्रस्तावाचा फेरविचार करू विषय दफ्तरी दाखल करण्याचा ठराव स्थायी समितीकडे दिला आहे. राष्ट्रवादी वगळता पालिकेतील सर्वच पक्षांनी या प्रस्तावाला विरोध केल्याने पालिकेच्या मुख्य सभेत हा प्रस्ताव मंजूर होणे अशक्य आहे. मात्र, असे असतानाही स्थायी समितीचे अध्यक्ष बोडके यांनी हा प्रस्ताव मान्य करावा, असे आवाहन केले आहे.
विद्यार्थ्यांना अॅबॅकसचे मोफत प्रशिक्षण देण्यासाठी एक संस्था तयार असल्याचे मनसे तसेच काँग्रेसकडून स्पष्ट करण्यात आले होते. मात्र, शिक्षणमंडळाकडे अद्यापही असे मोफत प्रशिक्षण देण्याचा प्रस्ताव कोणत्याही संस्थेने दाखल केला नसल्याचे बोडके यांनी स्पष्ट केले. शिक्षणमंडळाच्या शाळांमधील विद्यार्थ्यांना स्वयंसेवी संस्थाकडून जे प्रशिक्षण दिले जाते, त्यासाठी मानधन घेतले जात असल्याचे त्यांनी सांगितले. पुणे सिटी कनेक्ट या संस्थेने शिक्षण मंडळाच्या १५ शाळांमधून विज्ञान, गणित व अन्य विषय शिकविण्यासाठी तसेच मॉडेल स्कूलमध्ये मार्गदर्शन करण्यासाठी २५ लाख रुपयांची मागणी केली असल्याचे त्यांनी सांगितले. अॅबॅकस प्रशिक्षण विद्यार्थ्यांसाठी महत्वाचे असल्याने हा प्रस्ताव मान्य करावा, असे अवाहन बोडके यांनी केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अविनाश भोसले यांच्यावर कोर्टाच्या आदेशाने गुन्हा

$
0
0

जमिनीचे बेकायदा हस्तांतरण प्रकरण म. टा. प्रतिनिधी, पुणे शिवाजीनगरच्या यशवंत घाडगेनगरमधील जमीन बेकायदा हस्तांतरित केल्याच्या आरोपावरून प्रसिद्ध बांधकाम व्यवसायिक अविनाश भोसले यांच्यासह सहा जणांच्या विरोधात चतुःश्रृंगी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत दाखल झालेल्या खासगी फौजदारी खटल्यात कोर्टाच्या आदेशनानुसार मंगळवारी हा गुन्हा दाखल झाला. रणजित मोहिते (वय ५५, रा. आयव्हरी इस्टेट, बाणेर रोड, पाषाण), अविनाश भोसले (वय ५४), अमित अविनाश भोसले (वय ३५, दोघे रा. यशवंत घाडगेनगर, रेंजहिल्स कॉर्नर), रवींद्र धोंडीराम शिंदे, रामसीता भुवनेश्‍वरी (दोघे रा. यशवंत घाडगेनगर, रेंजहिल्स कॉर्नर) आणि स्वप्नील देशपांडे (वय ३०, रा. सक्सेस चेंबर, आपटे रोड) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणी राजेश बजाज यांनी तक्रार दिली आहे. शिवाजीनगर येथील सर्व्हे क्रमांक १३२ ब येथे भोसले यांची 'एबीआयएल हाऊस' इमारत आहे. मोहिते यांचे आजोबा राजपत्रित अधिकारी होते. १२ जून १९५१ च्या शासन निर्णयानुसार ही जागा राजपत्रित अधिकाऱ्यांच्या घरांसाठी दिलेली होती. या निर्णयानुसार ती हस्तांतरित होऊ शकत नाही. २००७ मध्ये मोहिते यांनी पुणे महालिकेकडे या जागेवरील जुने घर पाडून नवीन घर बांधण्यासाठी परवानगी मागितली. त्यानंतर ऑक्टोबर २०१२ मध्ये मोहिते यांच्याकडून भोसले आणि इतरांनी रजिस्टर्ड सेल डीड करून घेतले. त्यासाठी शासनाची परवानगी न घेता अटी व शर्तीचा भंग करून फसवणूक केली, असे तक्रारीत म्हटले आहे. या प्रकरणी राजेश खैरातीलाल बजाज यांनी केलेल्या खटल्यात गुन्हा दाखल करून तपासाचे आदेश दिले होते. या प्रकरणी सहायक निरीक्षक संदेश केंजळे तपास करत आहेत.

'परवानगीनंतरच खरेदी' आम्हाला अद्याप कोर्टाची व एफआयरची प्रत मिळालेली नाही. दोन्ही प्रती मिळाल्यानंतर त्याचा अभ्यास करून पुढे काय कार्यवाही करायची, हे ठरविण्यात येईल. तसेच, सर्व परवानगी घेऊन सदरची जमीन खासगी विक्रेत्याकडून विकत घेतली आहे, अशी माहिती एबीआयएलचे एमडी अमित भोसले यांनी कळविली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पंचवीस कोटींचे अंमली द्रव्य जप्त

$
0
0

सीमाशुल्क विभागाचा कुरकुंभ एमआयडीसीत छापा

म. टा. प्रतिनिधी, पुणे
पुणे शहर आणि परिसरातील रासायनिक उद्योगांवर केंद्रीय सीमाशुल्क विभागाने (कस्टम) आपली नजर वळवली आहे. कुरकुंभ औद्योगिक वसाहतीतील (दौंड) कंपनीवर छापा मारून विभागाने २५ कोटी रुपये किमतीचा 'म्यावम्याव' हा अंमली पदार्थ जप्त केला आहे. या प्रकरणी ब्रि​टिश नागरिकासह चौघांना अटक करण्यात आली आहे. दरम्यान, कंपनीत तयार करण्यात येणाऱ्या अंमली पदार्थांची परदेशात तस्करी करण्यात येत असल्याचे उघडकीस आले आहे.
सीमाशुल्क विभागाने कुरकुंभ येथील मेसर्स समर्थ लॅबोरेटरीज कंपनीतून १५९.१० किलो वजनाचा 'मेफेड्रोन हायड्रोक्लोराइड' हा अंमली पदार्थ जप्त केला. या प्रकरणी चौघांना अटक करण्यात आली असून, त्यांना बुधवारी कोर्टात हजर केले जाणार आहे, अशी माहिती सीमाशुल्क विभागाचे उपायुक्त के. शुभेंद्रा यांनी दिली.
'मेफेड्रोन हायड्रोक्लोराइड' हा अंमली पदार्थ जागतिक बाजारपेठेत 'म्यावम्याव' या नावाने ​परिचित आहे. या अंमली पदार्थाला जगभरातील तस्करांकडून मोठ्या प्रमाणात मागणी असते. सीमाशुल्क विभागाने अटक केलेला ब्रिटिश नागरिक पाटण्यात राहत होता. तो कुरकुंभ येथील कंपनीला 'म्यावम्याव'ची ऑर्डर देत होता. या कंपनीतून 'म्यावम्याव'ची खरेदी केल्यानंतर त्याची तस्करी करण्यात येत होती. गेल्या सहा महिन्यांपासून ही कंपनी सुरू आहे, अशी माहिती सीमा शुल्क विभागाकडून देण्यात आली आहे. पुण्याच्या आजुबाजूला मोठ्या प्रमाणात औद्योगिक वसाहती असून तेथे मोठ्या प्रमाणात रासायनिक कंपन्या आहेत. या कंपन्यांवर सीमा शुल्क विभागाने आपली नजर वळवली आहे. शहर आणि परिसरात 'मेफेड्रोन हायड्रोक्लोराइड' बनवले जात असल्याची माहिती कस्टम्सला प्राप्त झाली होती. त्यानुसार ​ब्रिटिश नागरिकाला ताब्यात घेतल्यानंतर कुरकुंभ येथील प्रकार उघडकीस आला.
..
तीन स्थानिकही​ अटकेत
पोलिसांनी तिघा स्थानिकांना अटक केली आहे. त्यांच्याकडून 'मेफेड्रोन हायड्रोक्लोराइड'ची निर्मिती करण्यात येत होती. सीमा शुल्क विभागाकडून त्यांची कसून चौकशी करण्यात येत असून, आतापर्यंत किती अंमली पदार्थाची निर्मिती केली, त्याची विक्री किती ठिकाणी करण्यात येत होती, त्याचे किती पैसे मिळाले आदींची उत्तरे मिळविण्यात येत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वर्षभरात २२ जणांना हृदयदान

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे अवयवदान चळवळीला वेग येण्यास कारणीभूत ठरलेल्या हृदय प्रत्यारोपणाच्या घटनेला आज (३ ऑगस्ट) एक वर्ष पूर्ण होत असून वर्षभरात महाराष्ट्रात २२ जणांना हृदय देण्याची किमया अवयवदात्यांमुळे साधली गेली. हृदय प्रत्यारोपणाच्या प्रक्रियेमुळे अवयवदान चळवळीला गती आली असली तरी 'ग्रीन कॉरिडॉर'च्या प्रयोगालादेखील यामुळेच पुण्यात प्रारंभ झाल्याने घटनेला विशेष महत्त्व दिले जात आहे. अवयव दान केल्याने अनेकांना जीवदान मिळू शकते, असा संदेश सर्वत्र देण्याचा प्रयत्न गेल्या कित्येक वर्षांपासून होत आहे. मात्र त्याला फारसा प्रतिसाद मिळत नसल्याचे वारंवार आढळून आले. १९६८ साली हृदय प्रत्यारोपणाचा पहिला प्रयत्न मुंबईत झाला होता. मात्र तो अयशस्वी ठरला. त्यानंतर गेल्या वर्षी ३ ऑगस्टला पुण्यातील एका 'ब्रेनडेड' महिलेचे हृदय दान करण्याची तयारी तिच्या नातेवाइकांनी दाखविली आणि अवयवदान चळवळीतील नव्या क्रांतीला सुरुवात झाली. गेल्या वर्षी तीन ऑगस्टला जहांगीर हॉस्पिटलमध्ये ती महिला 'ब्रेनडेड' असल्याचे घोषित झाले. हृदय मिळण्याच्या प्रतीक्षेत असलेल्या मुंबईच्या एका २२ वर्षाच्या मुस्लिम युवकाला तिचे हृदय देण्यात आले. त्याकरिता ग्रीन कॉरिडॉरचा प्रयोगदेखील राबविण्यात आला. 'हृदय दान करता येते' हा संदेश 'ग्रीन कॉरिडॉर' आणि माध्यमांमुळे सर्वत्र पोहोचला गेला. अवयवदान चळवळीला खऱ्या अर्थाने वेग येण्यास सुरुवात झाल्याचा विश्वास या क्षेत्रातील जाणकार व्यक्त करीत आहेत. 'पुण्यातील जहांगीर हॉस्पिटलमधील असलेल्या एका पंजाबी महिलेचे हृदय काढण्याची प्रक्रिया ही पश्चिम भारतातील पहिलीच घटना होती. त्या घटनेला एक वर्ष पूर्ण होत आहे. गेल्या एका वर्षात महाराष्ट्रात २२ जणांवर हृदय प्रत्यारोपणाच्या प्रक्रिया मुंबईत यशस्वी झाल्या. एका महिलेने हृदय दिल्याने त्यामुळे मूत्रपिंड, यकृतासारखे अवयव देखील दान करण्यास पेशंटचे नातेवाइक पुढे येत आहेत, ही समाधानाची बाब आहे. त्याशिवाय त्याच महिन्यात गेल्या वर्षी तीन हृदयदान करण्यात आले. हृदय प्रत्यारोपणाच्या या मोहिमेचे खरे श्रेय हे त्या पंजाबी महिलेला जाते', अशी प्रतिक्रिया जहांगीर हॉस्पिटलचे हृदय प्रत्यारोपण तज्ज्ञ डॉ. संजीव जाधव यांनी दिली. गेल्या वर्षभरात शहरातून चार वेळा हृदय मुंबई, दिल्लीला पाठविण्यात आले. तर यकृत, मूत्रपिंडासाठी ११ वेळा ग्रीन कॉरिडॉर पुण्यात राबविण्यात आले. रुबी हॉस्पिटलमधून दोनदा मुंबईच्या फोर्टिस हॉस्पिटलला हृदय पाठविले. त्यानंतर रुबीमधूनच दिल्लीच्या एम्स हॉस्पिटलला हृदय पाठविण्यात आले. त्याशिवाय एक हृदय जहांगीर हॉस्पिटलमधून पाठविण्यात आले. यामुळे ग्रीन कॉरिडॉरचा प्रारंभ झाला, अशी माहिती प्रादेशिक प्रत्यारोपण समन्वय समितीच्या समन्वयक आरती गोखले यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘कास’वर आता मर्यादित प्रवेश

$
0
0

दररोज तीन हजार पर्यटकांनाच एंट्री; १० ऑगस्टपासून अंमलबजावणी

Chaitrali.Chandorkar@timesgroup.com
पुणे : जागतिक वारसास्थळ असलेल्या कास पठारावरील पर्यटकांच्या अनियंत्रित संख्येला लगाम घालण्यासाठी वन विभागाने कंबर कसली असून, दररोज केवळ तीन हजार पर्यटकांनाच प्रवेश मिळणार आहे. एवढेच नव्हे, तर प्रत्येक पर्यटकाकडून सुट्टीच्या दिवशी शंभर रुपये पर्यावरण शुल्क आणि कॅमेरा असल्यास शंभर रुपये उपद्रव शुल्क आकारण्यात येणार आहे. १० ऑगस्टपासून या निर्णयाची अंमलबजावणी होणार आहे.
जैवविविधतेने समृद्ध असलेल्या कास पठारावरील फुले फुलण्यास जुलै अखेरपासून सुरुवात होते. साधारणतः ऑगस्टच्या दुसऱ्या आठवड्यात पठार फुलांनी बहरते. त्यामुळे दर वर्षी ऑगस्टमध्ये पर्यटकांची गर्दी वाढते. जागतिक वारसास्थळाचा दर्जा मिळाल्यानंतर कास पठारावरील पर्यटकांच्या गर्दीत आणखी वाढ झाली. सुट्टीच्या दिवशी ५० हजार ते ६० हजार पर्यटकांची पठारावर जत्राच भरलेली असते. वाढत्या मानवी हस्तक्षेपामुळे पठारावरील जैवविविधता धोक्यात आली असून, प्लास्टिक कचरा आणि प्रदूषणातही वाढ होत आहे. क्षमतेपेक्षा अधिक संख्येने येणाऱ्या पर्यटकांमुळे नैसर्गिक साधनसंपत्तीवर ताण येत असून, तो कमी करण्यासाठी वन विभागाने पर्यटकांच्या प्रवेशावर बंधने घालण्याचा निर्णय घेतला आहे.
कास पठाराचा पर्यटन हंगाम सुरू होत असल्याने पठाराच्या शाश्‍वत संवर्धनाबाबत पर्यावरणवादी संस्थांच्या प्रतिनिधींची बैठक वन विभागाच्या कार्यालयात आयोजित करण्यात आली होती. यामध्ये हा निर्णय घेण्यात आला. 'सुट्टीच्या दिवशी पर्यटक मोठ्या संख्येने पठारावर येतात. त्यांची संख्या कमी करण्यासाठी आम्ही शनिवार आणि रविवारी पर्यटकांकडून प्रत्येकी शंभर रुपये पर्यावरण शुल्क आकारणार आहोत. पठारावर प्रवेशासाठी ऑनलाइन नोंदणीही आवश्यक करण्यात आली आहे. सुट्ट्या सोडून इतर दिवशी पर्यटकांनी पठारावर यावे, असा उद्देश आहे. येत्या १० ऑगस्टपासून निर्णयाची अंमलबजावणी होणार आहे. सकाळी सात ते दहा, दहा ते एक, दुपारी एक ते दुपारी चार आणि चार ते सायंकाळी सात या चार टप्प्यांत प्रत्येकी ७५० पर्यटकांनाच पठारावर प्रवेश देण्यात येणार आहे. प्रवेशासाठी ऑनलाइन नोंदणी आवश्‍यक राहील' अशी माहिती सातारा वन विभागाचे उपवनसंरक्षक अ. मो. अंजनकर यांनी दिली.
..
अशी आहे नवीन नियमावली
- सुट्टीच्या दिवशी प्रतिपर्यटक १०० रुपये पर्यावरण शुल्क
- सोमवार ते शुक्रवार प्रतिपर्यटक ५० रुपये पर्यावरण शुल्क
- फोटोग्राफीसाठी १०० रुपये उपद्रव शुल्क
- दहा पर्यटकांसाठी एका तासासाठी १०० रुपयांत प्रशिक्षित गाइड
- वाहनाच्या प्रकारानुसार १० रुपये ते १०० रुपयांपर्यंत वाहनतळ शुल्क
- १२ वर्षे वयापर्यंतचे विद्यार्थी आणि ६५ वर्षांपुढील ज्येष्ठांना शुल्क माफ
- http://www.kas.ind.in/ या वेबसाइटवर प्रवेशासाठी नोंदणी आवश्यक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

स्लॅब कोसळल्याप्रकरणी चौघांच्या कोठडीत वाढ

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे बालेवाडी येथील पार्क एक्स्प्रेस या इमारतीच्या चौदाव्या मजल्याचा स्लॅब टाकताना हलक्या प्रतीचे सेंट्रींगचे साहित्य वापरण्यात आले असून स्लॅब टाकण्यासाठी आवश्यक असलेले परवाने न घेता बांधकाम केल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले आहे. याप्रकरणी चतुःश्रृंगी पोलिसांनी अटक केलेल्या चौघा आरोपींच्या पोलिस कोठडीत चार ऑगस्टपर्यंत वाढ करण्यात आली आहे. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एन. एस. सराफ यांच्या कोर्टाने हा आदेश दिला. दरम्यान या प्रकरणी गुन्हा दाखल असलेल्या चौघांनी कोर्टात अटकपूर्व जामीन मिळावा म्हणून दाखल केलेल्या अर्जावर बुधवारी सुनावणी होणार आहे. पार्क एक्स्प्रेस या इमारतीचा स्लॅब कोसळून नऊ जण ठार झाले. या प्रकरणी पोलिसांनी भाविन हर्षद शहा (वय ३४, रा. कोंढवा), संतोष सोपान चव्हाण (३५, रा. आकुर्डी), ज्ञानेश्वर लक्ष्मण चव्हाण (३५, रा. नवी सांगवी), श्रीकांत किसन पवार (४४, रा. कात्रज) या चौघांच्या पोलिस कोठडीची मुदत संपल्यामुळे त्यांना कोर्टात हजर करण्यात आले होते. या आरोपींकडे अधिक तपास करण्यासाठी त्यांची पोलिस कोठडी मिळावी, अशी मागणी सरकारी चैत्राली पणशीकर यांनी कोर्टात केली. अटक आरोपींकडे पोलिस कोठडीत करण्यात आलेल्या तपासात चौदावा स्लॅब टाकताना सेट्रींगचे साहित्य हलक्या प्रतीचे वापरल्याचे निष्पन्न झाले आहे. तसेच स्लॅब टाकताना आवश्यक असलेले परवाने न घेता कामगार आणि मजुरांच्या सुरक्षेविषयी काळजी घेतली नसल्याचे निष्पन्न झाले आहे. या प्रकरणी अधिक तपास करण्यासाठी आरोपींची पोलिस कोठडी देण्यात यावी, असा युक्तिवाद सरकारी वकिलांनी कोर्टात केला. कोर्टाने त्यांच्या पोलिस कोठडीत वाढ करण्याचा आदेश दिला. दरम्यान याप्रकरणी अटकपूर्व जामीन मिळावा म्हणून चौघांनी दाखल केलेल्या अर्जावर बुधवारी कोर्टात सुनावणी होणार आहे. अरविंद प्रेमचंद जैन (वय ४४, रा. प्राइड पॅराडाईज, मॉडेल कॉलनी, शिवाजीनगर), श्रवण देवकीनंदन अगरवाल (वय ४५, पाषाण), शामकांत जगन्नाथ वाणी शेंडे (सणस मेमरीज, शिवाजीनगर) आणि कैलास बाबूलाल वाणी (गोपाळ पार्क, एरंडवणे) यांनी अर्ज दाखल केला आहे. अरविंद जैन व श्रवण अगरवाल यांच्या वतीने अॅड. एस. के. जैन, अॅड. अमोल डांगे, अॅड. जॅ​​किंता डेव्हीड यांनी अर्ज दाखल केला आहे, तर शामकांत वाणी शेंडे व कैलास वाणी यांच्या वतीने अॅड. एस. टी. अगरवाल यांनी अर्ज दाखल केला आहे. बुधवारी कोर्टात या अर्जावर सुनावणी होणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ग​णिताची गोडी वाढविणार

$
0
0

राज्यातील शिक्षकांनी उघडली आघाडी; विशेष प्रशिक्षणास सुरुवात

Yogesh.Borate@timesgroup.com
पुणे : तळागाळातील शालेय विद्यार्थ्यांमध्ये गणिताची गोडी निर्माण करण्यासाठी राज्यभरातील शिक्षक कामाला लागले आहेत. राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेने (एससीईआरटी) विकसित केलेल्या प्रशिक्षण अभ्यासक्रमाच्या मदतीने हे शिक्षक अमूर्त स्वरुपातील गणित मूर्त स्वरुपात आणून ते विद्यार्थ्यांसमोर मांडण्याचे धडे गिरवू लागले आहेत. या पुढील टप्प्यात राज्यभरातील इतर शिक्षकांनाही अशाप्रकारचे प्रशिक्षण देणार आहेत.
राज्यातील शालेय विद्यार्थ्यांची गणितामधील खालावलेली कामगिरी गेल्या काही काळापासून चर्चेचा विषय ठरली होती. 'एससीईआरटी'ने केलेल्या संपादणूक सर्वेक्षणामध्येही ही बाब अधोरेखित झाली होती. ही कामगिरी सुधारण्यासाठी शिक्षण खात्यामध्ये वरिष्ठ पातळीवरूनच शिक्षकांच्या माध्यमातून प्रयत्न करण्याचे धोरण निश्चित करण्यात आले होते. शिक्षण खात्याचे प्रधान सचिव डॉ. नंदकुमार यांच्या मार्गदर्शनाखाली त्यासाठीची तत्त्वे पुढे आली आहेत. त्या आधारे गणित कसे शिकवावे, यासाठीचा विशेष अभ्यासक्रम 'एससीईआरटी'ने तयार केल्याची माहिती संस्थेचे संचालक गोविंद नांदेडे यांनी 'मटा'ला दिली. संस्थेच्या गणित विभाग प्रमुख अनुपमा तावशीकर, सहायक चंदन कुलकर्णी यांनी हा अभ्यासक्रम तयार केला आहे.
या अभ्यासक्रमाविषयी तावशीकर म्हणाल्या, 'इयत्ता पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांना सहज सुलभ गणित शिकविण्यासाठीचा हा अभ्यासक्रम आहे. विद्यार्थ्यांमध्ये संख्याज्ञान विकसित करण्यासाठी गणितीय संबोधाच्या मूलभूत संकल्पना त्यांना समजून सांगणे हा या अभ्यासक्रमाचा हेतू आहे. गणिताच्या मूलभूत क्रिया शिकण्यासाठी आवश्यक सर्व बाबींचा यात विचार करण्यात आला आहे. सुरुवातीच्या टप्प्यामध्ये प्रत्येक जिल्ह्यातील चारशे नवोपक्रमशील शिक्षकांना हे प्रशिक्षण दिले जाणार आहे. त्यातील १७ जिल्ह्यांचा टप्पा नुकताच पूर्ण झाला आहे.' पहिल्या टप्प्यातील या प्रशिक्षणाला शिक्षकांकडूनही चांगला प्रतिसाद मिळाल्याचे तावशीकर यांनी नमूद केले.
...
ग​णितासाठी सहा प्रकारच्या भाषा
अभ्यासक्रमामध्ये समाविष्ट बाबींविषयी कुलकर्णी म्हणाले, 'रोजच्या व्यवहारात वापरले जाणारे आणि गणितासाठीही उपयुक्त असे लहान, मोठा, खर्च, खुटला, कमी, जास्त आदी दोनशे निवडक शब्द आम्ही काढले आहेत. तसेच डॉ. नंदकुमार यांनी गणितासाठी सहा प्रकारच्या भाषा प्रस्तावित केल्या आहेत. त्यात बोटांची, कृतीची, वस्तुंची, चित्रांची आणि ध्वनीची भाषा समाविष्ट आहे. या प्रत्येक भाषेच्या आधारे गणित कसे शिकवावे, याचा विचार या अभ्यासक्रमात झाला आहे.' राज्यभरातील १४ हजार उपक्रमशील शाळांमधील शिक्षकांना या प्रशिक्षणाचा लाभ घेता येणार असल्याचेही त्यांनी नमूद केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


न्यूक्लिअस मॉलच्या कामगाराची आत्महत्या

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे पुणे स्टेशन परिसरातील न्यूक्लिअस मॉलच्या सहाव्या मजल्यावर कामगाराने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार मंगळवारी सकाळी उघडकीस आला. मॉलमध्ये त्रास दिला जात असल्यामुळे आत्महत्या केल्याचा आरोप कामगाराच्या नातेवाइकांनी केला आहे. आप्पाराव संभाजी बनसोडे (वय ५१, रा. मरकळ, मूळ उस्मानाबाद) असे आत्महत्या केलेल्याचे नाव आहे. या प्रकरणी बंडगार्डन पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, न्यूक्लिअस मॉलच्या मालकांची मरकळ येथे रवीन केबल कंपनी आहे. या कंपनीत बनसोडे हे वीस वर्षांपासून नोकरी करत होते. गेल्या दोन वर्षांपूर्वी न्यूक्लिअस मॉलमध्ये त्यांची बदली करण्यात आली आहे. ते साफसफाई व इतर कामे करत होते. बनसोडे यांना दोन मुली व एक मुलगा असून ते मरकळ येथे राहण्यास होते. दररोज मरकळ ते पुणे ये-जा करत होते. मॉलच्या चाव्या त्यांच्याकडेच असतात. सोमवारी रात्री ते घरी आले नाहीत. त्यामुळे त्यांच्या नातेवाइकांनी शोध घेतला. तसेच, मॉलच्या सुरक्षारक्षकाजवळ रात्री येऊन विचारपूस केली. मात्र, त्यांनी बनसोडे यांची माहिती नसल्याचे सांगितले. मॉलमधील इतर कर्मचाऱ्यांकडेही नातेवाइकांनी संपर्क साधून माहिती घेतली. बनसोडे यांना उलट्या झाल्या होत्याऽ त्यामुळे ते सहा वाजता निघून गेले, अशी माहिती त्यांनी दिली. मंगळवारी सकाळी नऊच्या सुमारास मॉलमधील इतर कामगार आले. त्यांनी वर जाऊन पाहिले असता बनसोडे यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे आढळून आले. कर्मचाऱ्यांनी तत्काळ पोलिसांना घटनेची माहिती दिली. या प्रकरणी बंडगार्डन पोलिस अधिक तपास करत आहेत.

त्रासाला कंटाळून आत्महत्या केल्याचा आरोप ऑफिसमधील व्यक्तीकडून त्रास दिला जात असल्याचे बनसोडे यांनी पत्नीला सांगितले होते. मात्र, मॉलच्या मालकाच्या कारवरील चालक असणारी व्यक्ती त्रास देत होती. त्यामुळे त्यांची आत्महत्या केली, असा आरोप बनसोडे यांचे नातेवाइक विकास सोनटक्के यांनी केला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गणेश मंडळांसाठी आचारसंहिता

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे पुण्याचा गणेशोत्सव १२५ व्या वर्षात पदार्पण करत असताना गणेशोत्सव आदर्श पद्धतीने साजरा करण्यासाठी 'आदर्श आचारसंहिता' तयार करण्यात येणार आहे. श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टच्या पुढाकारातून आखण्यात येणाऱ्या आचारसंहितेसाठी सर्व गणेश मंडळांनी होकार दिला आहे. पुण्यातील गणेशोत्सवाचे वेगळेपण आणि लौकिक पाहून या उत्सवादरम्यान राज्यातूनच तसेच देशातून असंख्य भाविक पुण्यात येतात. हा जरी दहा दिवसांचा उत्सव असला तरी तो कशा पद्धतीने साजरा करायचा? त्याची रूपरेषा कशी असावी? त्यामध्ये सुसूत्रता कशी आणता येईल? त्याचे नियोजन कसे करावे? या विचारातून पुण्यातील सर्व गणेश मंडळांनी एकत्र येऊन मंडळांसाठी एक 'आदर्श आचारसंहिता' तयार करण्याचा निर्णय घेतला आहे. श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टच्या पुढाकारातून झालेल्या गणेश मंडळांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. पुण्याच्या गणेशोत्सवाची परंपरा जुनी आहे. मात्र, ज्या उद्देशाने हा उत्सव सुरू झाला तो उद्देश हरवत झाल्याची भावना व्यक्त होत आहे. या पार्श्वभूमीवर विधायक स्वरूपाची मांडणी करत गेल्या काही वर्षांमध्ये गणेश मंडळे सामाजिक उपक्रम राबविण्यावरही मोठ्या प्रमाणावर भर देत आहेत. त्यांच्या कामांचे राज्यात सर्वत्र 'ब्रँडिंग' व्हावे व वाईट प्रकार कमी व्हावेत, सर्व गणेश मंडळांनी एकत्र येऊन ही ऊर्जा कशा पद्धतीने वाढविली पाहिजे यावर बैठकीमध्ये चर्चा झाली. आगामी वर्ष हे सार्वजनिक गणेशोत्सवाचे १२५ वे वर्ष आहे. सद्यस्थितीत गणेशोत्सव साजरा करणे एवढीच ओळख मर्यादित न ठेवता अनेक गणेशोत्सव मंडळांनी सामाजिक आणि विधायक उपक्रमांची मुहूर्तमेढ रोवली आहे. त्यांच्या या कामाचे ब्रँडिंग करण्याबरोबरच गणोशोत्सवात सुसूत्रता आणण्यासाठी मंडळांसाठी एक आदर्श आचारसंहिता तयार करण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला असल्याची माहिती श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टचे कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी यांनी दिली.

गणेश मंडळांचे वेबपोर्टल गणेश मंडळांवर सातत्याने टीका होत असते. त्यांच्या कामांची चांगली बाजू समोर येण्याबरोबरच गणेश मंडळांचा एकत्रित 'डाटा' तयार करण्याच्या दृष्टीने मंडळांचे 'वेबपोर्टल' तयार करण्याचे ठरविण्यात आले आहे. आषाढीवारीदरम्यान प्रशासनाने स्वच्छता मोहीम राबविली होती. त्याच धर्तीवर गणेशोत्सवामध्येही शहर स्वच्छ असले पाहिजे, यासाठी पावले उचलली जावीत. उत्सवादरम्यान शहरात ठिकठिकाणी स्वच्छतागृहांची सुविधा उपलब्ध करून द्यावी आणि त्याचे काम हाऊस कीपिंग कंपनीला देण्यात यावे, अशा सूचना बैठकीत मांडण्यात आल्या. आठवडाभर आधी अर्ज करूनही परवानग्या मिळायला अडचणी येतात. यासाठी मंडळांना ऑनलाइन परवानग्या मिळण्याची सोय उपलब्ध व्हावी; तसेच एक समिती स्थापन करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वेग नियंत्रकाला मुहूर्त नाहीच

$
0
0

वाहनांच्या वेगाला लागणार ३१ ऑक्टोबरनंतर ब्रेक

म. टा. प्रतिनिधी, पुणे
वाहनांच्या वेगाला लगाम घालण्यासाठी साडेतीन टनांपेक्षा अधिक वजन असलेल्या प्रवासी बस आणि अवजड वाहनांना वेग नियंत्रक बसविण्याचा निर्णय केंद्रीय परिवहन मंत्रालयाने एक ऑक्टोबर २०१५ रोजी घेतला. पण, तेव्हापासून आतापर्यंत वेग नियंत्रक बसविण्याला तीनवेळा मुदतवाढ देण्यात आली आहे. आता नव्याने ३१ ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ दिल्याने अवजड वाहनांना अद्याप ब्रेक लागणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे.
केंद्र सरकारने १ ऑक्टोबर २०१५ रोजी नव्याने नोंदणी केल्या जाणाऱ्या वाहनांना वेग नियंत्रक (स्पीड गव्हर्नर) बसविणे बंधनकारक केले होते. मालवाहतूकदार संघटनांनी या निर्णयाविरोधात आंदोलन पुकारल्याने प्रवासी वाहतूक करणाऱ्या लक्झरी बस आणि साडेतीन टनांच्या आतील टेम्पोला वेग नियंत्रक बसविण्याच्या बंधनातून वगळले होते. एक एप्रिल २०१६ पर्यंत त्या निर्णयाला स्थगितीही देण्यात आली होती. त्यानंतर पुन्हा ३१ जुलैपर्यंत स्थगिती देण्यात आली. मात्र, ३१ जुलैची मुदत संपल्याने एक ऑगस्टपासून वेग नियंत्रक बसविणे बंधनकारक होणे अपेक्षित होते. मात्र, केंद्रीय परिवहन मंत्रालयाने त्यास पुन्हा मुदतवाढ दिली.
केंद्रीय परिवहन मंत्रालयाच्या आदेशानुसार प्रवासी बस किंवा अवजड वाहनांची निर्मिती करतानाच त्यांना वेग नियंत्रक बसविणे बंधनकारक करण्यात आले आहे. वेग नियंत्रकामु‍ळे वाहनांचा वेग मंदावून वाहतुकीवर आणि पर्यायाने व्यवसायावरही परिणाम होईल या भीतीने माल वाहतूकदारांनी या आदेशाला विरोध केला आहे.
---------
केंद्राच्या उद्देशाला फासला हरताळ
वाढते अपघात रोखण्यासाठी आणि बेदरकारपणे वाहने चालवणाऱ्यांना ब्रेक लावण्यासाठी केंद्रीय परिवहन मंत्रालयाने वेग नियंत्रक लावण्याचा निर्णय घेतला. यामध्ये सर्व प्रकारच्या दुचाकी, तीन चाकी वाहने, चारचाकी वाहने (हलकी), आठ प्रवाशी आणि सामानासह साडेतीन हजार किलोपेक्षा कमी वजन असलेली वाहने, अॅम्ब्युलन्स आणि फायर ब्रिगेडची वाहने वगळता सर्व प्रकारच्या प्रवासी वाहनांना व अवजड वाहनांचा समावेश आहे. मात्र, गेल्या वर्षापासून त्यास मुदतवाढ दिली जात असल्याने केंद्र सरकारचाही हेतू साध्य होत नसल्याची चर्चा आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पुजारी खूनप्रकरणी उलटतपासणी पूर्ण

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे सॉफ्टवेअर इंजिनिअर नयना पुजारी खून प्रकरणातील तपासी अधिकाऱ्याची उलटतपासणी गुरुवारी कोर्टात पूर्ण झाली. सरकार पक्षातर्फे तपासी अधिकाऱ्याची काही मुद्द्यांवर फेरसाक्ष नोंदविण्यात येणार आहे. विशेष न्यायाधीश एल. एल. येनकर यांच्या कोर्टात या केसची सुनावणी सुरू आहे. या केसची पुढील सुनावणी सहा ऑगस्ट रोजी होणार आहे. सॉफ्टवेअर इंजिनिअर नयना पुजारी हिच्यावर सामूहिक बलात्कार करून तिचा खून करण्यात आला होता. या प्रकरणाची सुनावणी गेली पाच वर्षे कोर्टात सुरू आहे. या प्रकरणातील तपासी अधिकारी तत्कालीन पोलिस निरीक्षक दीपक सावंत यांची उलटतपासणी बचाव पक्षातर्फे मंगळवारी पूर्ण करण्यात आली. सरकार पक्षातर्फे यापूर्वी सावंत यांची साक्ष नोंदविण्यात आली आहे. मात्र, काही मुद्द्यांवर पुन्हा त्यांची पुढील सुनावणीत फेरसाक्ष नोंदविण्यात येणार आहे, अशी माहिती विशेष सरकारी वकील अॅड. हर्षद निंबाळकर यांनी दिली. तपासी अधिकारी दीपक सावंत यांची उलटतपासणी घेण्यास बचाव पक्षाकडून आतापर्यंत १७ तारखा घेण्यात आल्या होत्या. मंगळवारी ही उलटतपासणी पूर्ण झाली. आरोपींतर्फे अॅड. बी. ए. आलूर, अॅड. रणजित ढोमसे पाटील, अॅड. जे. आर. जहागिरदार काम पाहत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पाणीकपात होणार रद्द?

$
0
0

पालिकेच्या आजच्या सर्वसाधारण सभेत चर्चा शक्य

म. टा. प्रतिनिधी, पुणे
शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या चारही धरणातील पाणीसाठा १८.५ टीएमसीपर्यंत पोहचल्याने गेल्या अकरा महिन्यापांसून पाणीकपात सहन करणाऱ्या पुणेकरांना दिलासा देण्याविषयी सर्वसाधारण सभेत चर्चा होण्याची शक्यता आहे. आज, बुधवारी होणाऱ्या पालिकेच्या सर्वसाधारण सभेत पाणीकपात रद्द करण्यावर सकारात्मक निर्णय होण्याची शक्यता आहे.
गेल्या दोन दिवसांपासून पुण्यासह राज्यातील विविध शहरांमध्ये पावसाने चांगलीच हजेरी लावली आहे. शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला, पानशेत, वरसगाव, टेमघर या चारही धरणांच्या पाणलोट क्षेत्रांत संततधार पाऊस पडत असल्याने पाणीसाठ्यात चांगलीच वाढ झाली आहे. गेल्या आठवड्यात पंधरा टीएमसीवर असणारा पाणीसाठा आता अंदाजे १८.५ टीएमसीपर्यंत जाऊन पोहचला आहे. पुढील काही दिवस पावसाचा जोर कायम राहील, असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. धरणातील पाणीसाठ्यात पुरेशी वाढ झाल्याने नागरिकांना दररोज किमान एकवेळ तरी पाणी देऊन दिलासा देण्याची मागणी विविध राजकीय पक्षांनी केली आहे.
धरणातील पाणीसाठा वाढत असल्याने जुलैमध्ये महापौर प्रशांत जगताप यांनी नागरिकांना नियमित पाणी देण्यास सुरुवात करण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्या होत्या. मात्र, त्यानंतर पावसाने घेतलेल्या विश्रांतीमुळे हा निर्णय होऊ शकला नाही. धरणातील पाणीसाठ्यात वाढ झाल्यानंतर पुढील निर्णय घ्यावा, अशी एकमुखी मागणी सभासदांनी केल्याने पावसाची वाट पाहण्यात आली. गेल्या पंधरा दिवसांपासून गायब झालेल्या पावसाने रविवारपासून पुन्हा जोरदार हजेरी लावली आहे. त्यामुळे धरणांतील पाणीसाठा १८.५ टीएमसीपर्यंत गेला आहे. त्यामुळे आता तरी शहरातील नागरिकांना त्यांच्या हक्काचे पुरेसे आणि नियमित पाणी मिळावे, अशी मागणी होत आहे.
महापालिकेची सर्वसाधारण सभा आज, बुधवारी (३ ऑगस्टला) होत आहे. सभेत धरणातील उपलब्ध पाणीसाठ्याबाबत चर्चा होऊन अनेक महिने सुरू असलेली पाणीकपात रद्द होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
०००००००००
पाऊस वाढल्यास विसर्गाची वेळ
मंगळवारी (२ ऑगस्ट) सकाळी सहा ते सायंकाळी पाच या काळात वरसगाव येथे ३७ मिलीमीटर, टेमघर येथे १९, पानशेत ३५ आणि खडकवासला येथे ४ मिलीमीटर पावसाची नोंद झाली. सध्या खडकवासला धरणात १.२९ टीएमसी, वरसगावमध्ये ७.६२, टेमघरमध्ये १.८० तर पानशेत धरणात ७.७९ टीएमसी पाणीसाठा जमा झाला आहे. पुढील काही दिवस पावसाचा जोर कायम राहिल्यास खबरदारीचा उपाय म्हणून खडकवासला धरणातून कालव्याद्वारे काही प्रमाणात विसर्ग करावा लागण्याची शक्यता असल्याचे पालिकेतील अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

धरणांमधील पाणीसाठा साडेअठरा टीएमसीवर

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

पावसाचा जोर पुन्हा वाढल्याने पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमधील साठा वाढू लागला आहे. खडकवासला, पानशेत, वरसगाव आणि टेमघर या धरणांमध्ये साडेअठरा टीएमसी, म्हणजेच ६३ टक्के इतका उपयुक्त साठा जमा झाला आहे.
दरम्यान, खडकवासला धरण भरत आल्याने कालव्यातून एक हजार क्युसेक इतक्या वेगाने पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. दोन दिवसांपासून पुन्हा पावसाला सुरुवात झाली. मंगळवारी पावसाचा जोर आणखी वाढला. शहर आणि परिसराप्रमाणेच धरणांच्या पाणलोटक्षेत्रातही पावसाचा जोर वाढला आहे. गेल्या दोन दिवसांत टेमघरच्या पाणलोटक्षेत्रात ८८ मिलीमीटर, पानशेतमध्ये ५४ आणि वरसगावच्या क्षेत्रात ५५ मिमीमीटर इतका पाऊस झाला. त्यामुळे टेमघर धरणात १.८० टीएमसी, पानशेतमध्ये ७.८९ टीएमसी, वरसगावमध्ये ७.६२ टीएमसी आणि खडकवासला धरणात १.२९ टीएमसी असे एकूण साडेअठरा टीएमसी उपयुक्त पाणीसाठा जमा झाला आहे. चारही धरणांची क्षमता २९.१५ टीएमसी इतकी आहे.
..

पुण्याच्या धरणांमधील उपयुक्त साठा
धरण उपयुक्त साठा (टीएमसी) टक्केवारी
टेमघर १.८० ४८.६१
पानशेत ७.८९ ७३.१२
वरसगाव ७.६२ ५९.४०
खडकवासला १.२९ ६५.४८
..
जिल्ह्यातील धरणांमधील उपयुक्त साठा
पवना ५.५१ ६४.६९
मुळशी १४.०९ ७६.२६
भाटघर ५५.२३ ६४.७९
वीर ५.४२ ५७.५८

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तरुण-तरुणींची यंदा ढोलपथकांकडे पाठ

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे गणेशोत्सवातील मिरवणुकीमध्ये मोठ्या संख्येने सहभागी होणाऱ्या ढोल-ताशा पथकांमधील तरुण-तरुणींची संख्या घटली असून, एरवी हजारोंच्या संख्येने सहभागी होणाऱ्या तरुणाईने यंदा पथकांकडे पाठ फिरवल्याचे चित्र समोर आले आहे. दर वर्षी पुण्यातील बहुसंख्य पथकांमध्ये तरुणाई वादनाचा आनंद घेण्यासाठी सहभागी होते. गेल्या काही वर्षांचा आकडा लक्षात घेतला, तर शहरातील वादकांची संख्या २५ हजार एवढी होती. यंदा मात्र त्यामध्ये मोठ्या प्रमाणावर घट झालेली आहे. करिअर आणि इतर जबाबदाऱ्यांमुळे वादक कमी झालेच; तसेच दर वर्षी नव्याने दाखल होणाऱ्या वादकांचीही नोंदणी अत्यंत कमी झाली असल्याचे आढळून आले आहे. आतापर्यंत पथकांमध्ये ३०० हून अधिक तरुण-तरुणींची नवी नोंदणी होत होती. या वर्षी हा आकडा निम्म्यापेक्षा कमी झाला आहे. तरुणाईचे आकर्षण बदलत चालल्याने आणि काही बाबतीत पथकांमध्येदेखील राजकारण शिरल्याने पथक संस्कृतीकडे तरूणाई पाठ फिरवताना दिसत आहे. काही चांगल्या आणि विधायक कार्य करणाऱ्या पथकांकडील संख्या अद्यापही कमी झालेली नाही. मात्र बहुतांश पथकांना यंदा संख्येमुळे त्यांचे गट कमी करावे लागणार, असे निदर्शनास आले आहे. गेल्या ५ वर्षांमध्ये पथकांमध्ये वादन करणे हा तरूणांसाठी फॅशन ट्रेंड झाला होता. मोठ्या आणि नामवंत पथकात वादन करत असल्यामुळे मित्रांमध्ये 'स्टेटस' म्हणून मिरवण्याचा हा ट्रेंड होता; पण सध्या हा ट्रेंड बदलला असल्यामुळे केवळ स्वतःला मिरवून घेणारे वादक आता पथकाकडे फिरकत नसून फक्त ज्यांना खरच ढोल-ताशाविषयी प्रेम आहे, असे वादक सरावाला नियमितपणे जात आहे. दुसरीकडे काही पथकांमध्ये होत असणाऱ्या राजकारणामुळे देखील तरुणाईचा सहभाग कमी झाला आहे. ढोल-ताशा महासंघाचे अध्यक्ष पराग ठाकूर म्हणाले, 'गेल्या ५ वर्षांमध्ये पुण्यातील पथक संस्कृतीला एक प्रकारे सूज आली असल्याचे जाणवत होते, यंदाच्या वर्षी ही सूज उतरायला लागली असून, केवळ 'पॅशन' म्हणून ढोल-ताशा वाजवणारे वादक आता पथकांमध्ये राहिले आहेत. या वर्षी नव्याने नोंदणी करणाऱ्या पथकांची संख्या हाताच्या बोटांवर मोजण्याइतकी आहे. याशिवाय काही जुन्या पथकांचे सराव वादकांअभावी अद्याप सुरू झालेले नाहीत. शहरातील पथकांमध्ये हा मोठा बदल घडत आहे. यापुढे या संस्कृतीचा फारसा त्रास लोकांना होणार नाही. तरुणाईची आवड कायम बदलत राहते. त्यामुळे त्यांचा पथकात यंदा कमी प्रमाणात सहभाग असल्याचे नाकारता येत नाही.'

नोंदणी आणि हिशोबासाठी आग्रही मिरवणुकीत वर्षानुवर्षे वाजवणाऱ्या पथकांची धर्मादाय आयुक्तांकडे नोंदणी केली जात नाही, असा आरोप पथकांवर कायम होतो. काही अंशी ते खरेदेखील आहे. त्यामुळे यंदाच्या वर्षी सर्व पथकांनी नावनोंदणी करून घ्यावी आणि त्यामार्फत जमाखर्चाचा हिशोब ठेवावा, असा आग्रह महासंघाच्या वतीने सगळ्या पथकांकडे धरण्यात आला आहे. त्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे, असे पराग ठाकूर यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


‘महिला बदलल्या, तर देश बदलेल’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे 'प्रत्येक घरातील महिलेने ठरविले तर कोणत्याही घरात भ्रष्ट पैसा येणार नाही. आपल्या हिमतीवर महिलांनी आपले कर्तृत्व गाजवावे. महिलांवर होणाऱ्या अत्याचारांविरोधात त्यांनी स्वतःच प्रतिकार केला पाहिजे. महिला बदलल्या, तर देश बदलेल', असे प्रतिपादन ज्येष्ठ कृषितज्ज्ञ प्रा. डॉ. बुधाजीराव मुळीक यांनी मंगळवारी केले. अखिल म्हसोबा उत्सव मंडई ट्रस्टच्या म्हसोबा उत्सवांतर्गत आयोजित भूषण पुरस्कार कार्यक्रमात ते बोलत होते. ज्येष्ठ संगीतकार पं. हृदयनाथ मंगेशकर, अभिनेत्री हर्षदा खानविलकर, रांका ज्वेलर्सचे संचालक ओमप्रकाश रांका, 'प्रवीण मसालेवाले'चे संचालक विशाल चोरडिया, खारवडे म्हसोबा देवस्थानच्या अध्यक्षा मधुरा भेलके-मारणे आणि पत्रकार सुनील जगताप यांना भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. डॉ. सतीश देसाई, हुकमीचंद चोरडिया, मधुबाला चोरडिया, गणेश भिंताडे, नगरसेविका रूपाली पाटील-ठोंबरे, अनिल दिवाणजी, विकास पाटील, सायली देवधर, ट्रस्टचे निवृत्ती जाधव, राहुल सूर्यवंशी, भोला वांजळे, गोविंद वांजळे, प्रियेश सरोदे, दिनेश पिसाळ, तुषार रायकर, सुधीर साकोरे, योगेश निकम आदी या वेळी उपस्थित होते. 'मंडईमध्ये ज्या भागात आमचे वडील पं. दीनानाथ मंगेशकर व कुटुंबीय राहत होते आणि ज्या ठिकाणी वडिलांनी अखेरचा श्वास घेतला, त्या भागातील संस्थेकडून पुरस्कार मिळणे ही माझ्यासाठी अत्यंत हृद्य गोष्ट आहे. हा सन्मान केवळ माझा नव्हे; तर माझ्या वडिलांचा आणि माझ्या मंगेशकर कुटुंबीयांचा आहे. आमच्या सातही भावंडानी मोठी कीर्ती प्राप्त केली, हे तुमच्या प्रेमामुळेच शक्य झाले,' अशी भावना पं. मंगेशकर यांनी व्यक्त केली. अश्विनी जोग यांनी सूत्रसंचालन केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सात मिनिटांनंतरच पार्किंग शुल्क देय

$
0
0

विमानतळ संचालकांचे स्पष्टीकरण; तक्रार करण्याचे आवाहन

म. टा. प्रतिनिधी, पुणे

लोहगाव विमानतळाच्या आवारात वाहनाने प्रवेश केल्यापासून ते वाहन बाहेर पडेपर्यंत सात मिनिटांपेक्षा अधिक वेळ लागल्यास पार्किंगचे शुल्क देय राहील. मोफत कालावधी सात मिनिटांपुरताच मर्यादित आहे. पाच मिनिटांनंतर जर कोणाकडून पार्किंग शुल्क वसूल केले जात असल्यास विमानतळ प्रशासनाकडे तक्रार करावी, असे आवाहन विमानतळ संचालक अजय कुमार यांनी केले.

विमानतळाच्या गेटमध्ये वाहनाने प्रवेश केल्यापासून सात मिनिटांऐवजी पाच मिनिटांपेक्षा अधिक वेळ लावणाऱ्या वाहन चालकांकडून पार्किंगचे शुल्क आकारून लूट करण्यात येत असल्याचा प्रकार 'मटा'ने मंगळवारी उघडकीस आणला. त्यावर भाष्य करताना कुमार यांनी मोफत कालावधी हा पाच मिनिटे नसून सात मिनिटांचा असल्याचे नमूद केले. तसेच, पाच ते सात मिनिटे वेळ लागल्यास पार्किंग शुल्क वसूल करणाऱ्यांची तक्रार प्राप्त झाल्यास संबंधितांवर कारवाईचे आश्वासनही त्यांनी दिले.

विमानतळाच्या दोन्ही प्रवेशद्वारांवर (इन-आउट) 'सात मिनिटांच्या' वेळेबाबत बोर्ड लावण्याची सूचना संबंधित ठेकेदाराला केली आहे. तसेच, ठेकेदाराकडून दिल्या जाणाऱ्या पावतीवरही त्याचा उल्लेख असतो. त्यामुळे नागरिकांनी सात मिनिटे किंवा त्यापेक्षा कमी वेळ झाल्यास पार्किंगचे शुल्क देऊ नये. त्यानंतरही जबदरस्तीने शुल्क वसूल करण्याचा प्रयत्न झाल्यास त्याबाबत विमानतळ प्रशासनाकडे तक्रार करावी, असेही कुमार म्हणाले.

सात मिनिटांचा कालावधी कॅब वाहनांसाठी असल्याचे येथील कंत्राटदाराचे कर्मचारी सांगतात. तसेच, पाच मिनिटांनंतर शुल्क वसुली करण्यात येईल, अशा आशयाचा एक बोर्ड तेथे आहे, तो देखील प्रवाशांना दाखवितात. प्रत्यक्षात, यो योजनेच्या सुरुवातीच्या काळात पाच मिनिटांचा कालावधी निश्चित करण्यात आला होता. त्यानंतर त्यात वाढ करून तो सात मिनिटे करण्यात आला. मात्र, संबंधित कंत्राटदार अद्याप जुनाच बोर्ड दाखवून नागरिकांची लूट करीत असल्याचे विमानतळ संचालकांनी दिलेल्या माहितीवरून स्पष्ट होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘पुरुषोत्तम’चे मुंबई केंद्र बंद

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

पुण्यातील कॉलेजांचा जीव असलेल्या पुरुषोत्तम करंडक स्पर्धेचे मुंबई केंद्र बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पुरुषोत्तम म्हणजे 'कल्ला', असे मानले जात असले तरी पुरुषोत्तम करंडक स्पर्धा म्हणजे 'शिस्त' अशीही एक ओळख आहे. मुंबई केंद्रातील विद्यार्थ्यांनी 'पुण्याची शिस्त' न पाळल्याने मुंबई केंद्र बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे पुरुषोत्तम महाकरंडक स्पर्धेमध्ये यंदा मुंबईतील कॉलेजचे संघ नसतील.

पुण्याबाहेरच्या कॉलेजवयीन तरुणांना स्पर्धेचे व्यासपीठ उपलब्ध व्हावे. यासाठी महाराष्ट्रीय कलोपासक संस्थेतर्फे पुणे, जळगाव, नागपूर, रत्नागिरी, कोल्हापूर आणि मुंबई या ठिकाणी केंद्र सुरू करण्यात आले. पुण्यातील स्पर्धा आटोपल्यानंतर डिसेंबरमध्ये पुरुषोत्तम महाकरंडक स्पर्धा घेतली जाते. गेल्या तीन-चार वर्षांत मुंबई येथील संघांचा विचित्र अनुभव आल्यानंतर 'कलोपासक'ने मुंबई केंद्र बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. 'यंदाच्या वर्षीपासून मुंबई केंद्र बंद करण्यात आले आहे,' असे संस्थेचे राजेंद्र ठाकूरदेसाई यांनी 'मटा'ला सांगितले. 'ही स्पर्धा गरजू कलाकारांसाठी आहे, ज्यांना स्पर्धेची गरज नाही त्यांच्यासाठी ही स्पर्धा भरविण्याची आमची इच्छा नाही. त्यांच्यासाठी वेळ आणि पैसा खर्च करणार नाही. मुंबई केंद्रातील विद्यार्थ्यांचा खूप वाईट अनुभव आल्यामुळे हे केंद्र बंद करण्यात आले आहे,' असे ठाकूरदेसाई यांनी सांगितले. 'गेल्या तीन-चार वर्षांतील मुंबई येथील संघांचा अनुभव अत्यंत वाईट आहे.

मुंबईमधील विद्यार्थ्यांना कसलेही नियम पाळायचे नसतात. गेल्या वर्षी महाअंतिम फेरीसाठी सदाशिव पेठेतील फडके हॉल येथे विद्यार्थ्यांच्या मुक्कामाची सोय करण्यात आली होती. एका संघातील मुले-मुली एक रात्र गायब होते. येणाऱ्या विद्यार्थ्यांची जबाबदारी संस्थेवर असल्याने काही नियम करण्यात आले आहेत. अशा प्रकारांत कोणाला काही झाले तर जबाबदारी कोण घेणार,' असा सवाल ठाकूरदेसाई यांनी केला. 'विद्यार्थ्यांच्या गैरवर्तनातून काही झाले, तर आमच्या गळ्याला फास लागेल,' अशी टिप्पणी त्यांनी केली. 'संघाबरोबर प्राध्यापक असणे आवश्यक करण्यात आले आहे. स्पर्धेचे नियम पाळावेच लागतील. यंदाची महाकरंडक स्पर्धा डिसेंबरमध्ये होणार असून मुंबईतील संघ त्यामध्ये नसतील. तोरा असणाऱ्या विद्यार्थ्यांपेक्षा गरजू विद्यार्थ्यांवर वेळ आणि पैसा खर्च करू,' अशी भूमिका त्यांनी मांडली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पुण्याला हवे ‘अमृत’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

केंद्र सरकारच्या अमृत योजनेतून राज्यातील अनेक शहरांना मोठ्या प्रमाणावर निधी प्राप्त झाला असताना, पुणे महापालिकेला मात्र त्यासाठी अद्याप प्रतीक्षाच करावी लागणार आहे. गेल्या वर्षी अतिशय तुटपुंजी रक्कम मिळालेल्या महापालिकेला यंदाही अपेक्षित निधी मिळणार नसल्याचे संकेत मिळत आहेत. त्यामुळे 'अमृत'च्या माध्यमातून आखलेल्या योजनांच्या खर्चाचा भार पुन्हा महापालिकेला उचलावा लागण्याची चिन्हे आहेत. केंद्र सरकारने स्मार्ट सिटीसह अमृत योजना जाहीर केली होती. एक लाखांपेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या शहरांचा यात समावेश असल्याने पुण्यालाही अमृत योजनेत स्थान मिळाले. त्यानुसार पाणीपुरवठा आणि मलनिस्सारण योजनांचा अहवाल पाठवण्यात आला.

दुर्दैवाने पायाभूत सुविधांची कमतरता असलेल्या भागाला प्राधान्य देण्याची भूमिका राज्य सरकारने घेतल्याने पुण्याला गेल्या वर्षी तुरळक निधी प्राप्त झाला. मात्र, पिंपरी-चिंचवड, नागपूर, अमरावती, नवी मुंबई यासारख्या मोठ्या महापालिकांचे प्रकल्प मंजूर होऊन त्यांना निधीही प्राप्त झाला असताना, पुण्याकडे डोळेझाक करण्यात आली आहे. शहराच्या पूर्व भागात पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी जलवाहिन्यांचे जाळे निर्माण करण्याची योजना महापालिकेने आखली होती. अमृत योजनेतून उपनगरांमध्ये मोठ्या प्रमाणावर पाणीपुरवठ्याच्या पायाभूत सुविधांची कामे केली जाणार होती. परंतु, पालिकेला त्यासाठीचा निधीच प्राप्त न झाल्याने ही कामे करण्यासाठी आता अतिरिक्त तरतूद करावी लागणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नागपूरमध्ये अमृत योजनेतून सुमारे दोनशे कोटी रुपयांची कामे सुरू झाली असताना, पुणे महापालिकेला डावलण्यात आले आहे. केंद्राच्या योजनेतून देशभरातील अनेक मोठ्या शहरांना कोट्यवधी रुपयांचा निधी प्राप्त होत असताना, 'स्मार्ट सिटी'त दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या पुण्याला केंद्राचा निधी मिळवून देण्यात राज्य सरकारची भूमिका अडचणीची ठरली आहे. पाणीपुरवठा आणि इतर प्रकल्पांमध्ये पुण्यात पायाभूत सुविधा यापूर्वीच उपलब्ध असल्याचे त्यांना अखेरच्या दोन वर्षी निधी द्यावा, अशी भूमिका राज्य सरकारमधील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घेतल्याचे समजते. पुण्याला चालू आर्थिक वर्षात एक रुपयाचाही निधी मिळण्याची शक्यता नाही. तरीही, शहरातील भाजपचे आमदार आणि खासदार त्याविरोधात आवाज उठविण्यास तयार नाहीत, असा आरोप विरोधी पक्षाकडून केला जात आहे.

२५० कोटींवर पाणी?

'अमृत' योजनेंतर्गत महापालिकेने पाठवलेल्या प्रकल्पांमधून यंदाच्या आर्थिक वर्षात सुमारे अडीचशे कोटी रुपये प्राप्त होतील, अशी अपेक्षा धरण्यात आली होती. महापालिकेच्या अर्थसंकल्पामध्येही हा निधी येईल, असे गृहित धरण्यात आले होते. दुर्दैवाने अडीचशे कोटी रुपयांपेकी गेल्या चार महिन्यांत एक रुपयाही पालिकेला प्राप्त झालेला नाही. त्यामुळे या अडीचशे कोटी रुपयांवरही पालिकेला पाणी सोडावे लागण्याची चिन्हे आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मुंबईच प्राचीन कोकणाची राजधानी?

$
0
0

मुंबई शहरच 'पुरी' असल्याचा अभ्यासक सोष्टेंचा दावा

Prasad.Pawar@timesgroup.com

पुणे : हॅप्टेनेशिया, पुरी, कपर्दीद्विप, बिंबस्थान, भिमपुरी, मानबाई, यमपुरी, बॉम्बे आणि मुंबई... काळानुरूप बदलत गेलेली ही मायानगरीची नावे. देशाची आर्थिक आणि ग्लॅमरची राजधानी असलेली मुंबईच प्राचीन कोकणाची राजधानी 'पुरी' असल्याचा दावा अभ्यासक सिद्धार्थ सोष्टे यांनी केला आहे. सोष्टे यांनी 'मुंबईचा अज्ञात इतिहास' या पुस्तकाच्या माध्यमातून दावा केला आहे. त्यासाठी मुंबईच्या प्राचीनत्वाचे दाखले देणाऱ्या पुराव्यांची संदर्भासह मांडणीही पुस्तकात केली आहे.

प्राचीन कोकणची राजधानी 'पुरी' या नावाने ओळखली जात होती. ही 'पुरी' नेमकी कोणती यावर अभ्यासकांचे आजही एकमत नाही. त्याबाबत विविध मतमतांतरे आहेत. मुंबई शहर हीच 'पुरी' असल्याचा निष्कर्ष या पुस्तकात मांडण्यात आला असून, त्यासंबंधीचे ऐतिहासिक व भौगोलिक संदर्भ देण्यात आले आहेत. मुंबईतील प्राचीन वारसास्थळांची शहानिशा या पुस्तकात करण्यात आली आहे. परकीय राजवटींमध्ये या वारसास्थळांचे नुकसान अथवा स्थलांतर कशाप्रकारे करण्यात आले आणि त्यामुळे मुंबईची प्राचीन ओळख कशी नष्ट झाली हे मांडण्याचा प्रयत्न सोष्टे यांनी केला आहे. प्राचीन ते आधुनिक प्रवासात मुंबई बेटाला मिळालेली विविध नावे आणि त्या नावांमागील कारणे स्पष्ट करणारी माहितीही त्यांनी दिली आहे.

त्याबाबत बोलताना सोष्टे म्हणाले, 'इसवी सनाच्या सुरुवातीपासून ते मुंबईची बेटे ब्रिटिशांच्या ताब्यात जाईपर्यंत ज्या ऐतिहासिक घडामोडी घडल्या त्या सर्वांचा परामर्ष या पुस्तकात घेतला आहे. प्राचीन ते आधुनिक मुंबईची अनेक स्थित्यंतरे यात संक्षिप्तपणे दिली आहेत. नागस्थान ते नागोठणे या पुस्तकासाठी संशोधन करत असताना उत्तर कोकणाचा इतिहास मी अभ्यासला. त्याचे संदर्भ शोधताना कोकणची प्राचीन राजधानी असलेल्या पुरीचे उल्लेख वाचायला मिळाले. पुरी या ठिकाणाची ठाम स्थलनिश्चिती अजूनही झालेली नाही. पुरीचे संदर्भ जसजसे मिळत गेले तसतसे स्पष्ट होत गेले की, मुंबई हीच पुरी आहे. हाच धागा पकडून पुस्तकाची निर्मिती केली आहे.'

वाळकेश्वराचे मूळ मंदिर नष्ट करण्यात आले. सध्याचे मंदिर लक्ष्मणेश्वराचे आहे. शिवडीचा किल्ला शिवमंदिर ध्वस्त करून बांधण्यात आला; तर मुंबादेवीचे मूळ मंदिरही ब्रिटिशकाळात किल्ल्याचे बांधकाम वाढवण्यासाठी नष्ट करून स्थलांतरित करण्यात आले होते. महालक्ष्मीची मूर्ती या समुद्रात पडलेल्या होत्या. वरळीचा बांध बांधताना त्या आढळून आल्या. याचा अर्थ हे मंदिर पूर्वी अस्तित्त्वात होते आणि नंतर ते नष्ट करण्यात आले. टॉलेमीने इसवी सनाच्या दुसऱ्या शतकात मुंबईला हॅप्टेनेशिया संबोधले. त्यानंतर चौथे शतक ते शिलाहार राजवटीचा शेवट होईपर्यंत मुंबई बेटेच पुरी म्हणून ओळखली जात होती. गुजरातच्या सुलतानाच्या काळात ती मानबाई झाली. या बेटांवर अराजक माजल्यावर ब्रिटिश येण्यापूर्वी तिला यमपुरी असे संबोधत असत. मुंबईत आजही प्राचीन वारसा जपणारी स्थळे आहेत; ज्यांच्यावर सखोल संशोधन होण्याची गरज आहे. अशा स्थळांची माहितीही या पुस्तकात मी संदर्भांसह दिली आहे,' असेही सोष्टे म्हणाले.

'गिनीज बुका'त नोंद

सिद्धार्थ सोष्टे यांची 'स्वप्नभूमी कोकण व पश्चिम घाट', 'नागस्थान ते नागोठणे' अशी पुस्तके प्रकाशित झाली आहेत. २००७ मध्ये राजा शिवाजी डॉट कॉमतर्फे आयोजित 'फोर्ट् स ऑफ किंग शिवाजी' या पुण्यात झालेल्या गडांच्या छायाचित्र प्रदर्शनाची नोंद गिनीज बुकमध्ये झाली. त्यात सोष्टे यांची तीनशेहून अधिक छायाचित्रे होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images

<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>
<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596344.js" async> </script>