Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

‘एचए’च्या कर्मचाऱ्यांना २० महिन्यांचा पगार

$
0
0

अर्थमंत्री जेटलींनी दिली मान्यता

म. टा. प्रतिनिधी, पिंपरी

पिंपरी येथील हिंदुस्तान अँटिबायोटिक्स (एचए) कंपनीच्या कर्मचाऱ्यांचा २० महिन्यांचा पगार देण्यास केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी मान्यता दिली आहे. तसेच कंपनी खासगी उद्योगांशी भागीदारीत (पीपीपी) चालू केली जाणार असल्याची माहिती खासदार श्रीरंग बारणे यांनी दिली.

एचए कंपनीच्या कामगारांच्या समस्येवर तोडगा निघावा यासाठी शरद पवार यांच्या नवी दिल्लीतील निवासस्थानी गुरुवारी शरद पवार, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, खासदार श्रीरंग बारणे यांच्यात बैठक झाली. या वेळी खासदार अरविंद सावंत, 'केमिकल फर्टिलायझर'चे जॉइंट सेक्रेटरी सुधांशू पंत, नगरसेवक व एचए युनियनचे उपाध्यक्ष अरुण बोऱ्हाडे, सुनील पाटसकर व 'एचए'चे कामगार प्रतिनिधी उपस्थित होते.

याविषयी माहिती देताना खासदार बारणे म्हणाले, 'गेल्या अनेक दिवसांपासून एचए कंपनीच्या कामगारांचा प्रश्न प्रलंबित होता. त्यासाठी मी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, अर्थमंत्री अरुण जेटली यांच्याशी सतत पाठपुरावा करत होतो. शेवटी या कामाला यश आले व अर्थमंत्र्यांनी कामगारांचा २० महिन्यांचा थकीत पगार देण्याचे मान्य केले. त्यासाठी ३० कोटींचा प्रस्तावही त्यांच्याकडे पाठवण्यात आला आहे. तसेच ही कंपनी पुढे पीपीपी तत्त्वावर चालू करण्याचा विचार सरकार करत आहे. त्या संदर्भात मी, गडकरी आणि शरद पवार येत्या काही दिवसांत पुन्हा अर्थमंत्र्यांची भेट घेणार आहोत.'

बोऱ्हाडे म्हणाले, 'हा कामगारांचा व त्यांच्या सहनशीलतेचा विजय आहे. कारण गेल्या २० महिन्यांपासून कामगारांना पगार नव्हता. त्यामुळे त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली होती. सरकारचा हा निर्णय म्हणजे आमच्यासाठी खूप आनंदाची गोष्ट आहे व म्हणून आम्ही या निर्णयावर खूप समाधानी आहोत.'

'एचए'च्या सुमारे ११०० कामगारांचा पगार २० महिन्यांपासून थकला होता. यासाठी कामगारांनी वेळोवेळी उपोषणे, आंदोलने केली होती. त्यामुळे सरकारच्या या निर्णयामुळे म्हणजे कामगारांच्या गोटात आनंदाचे वातावरण आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


विविध मागण्यांसाठी पथारीवाल्यांचा मोर्चा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पिंपरी

पथारीधारकांच्या विविध मागण्यांसाठी टपरी, पथारी, हातगाडी पंचायतीतर्फे पिंपरी येथील शगुन चौकात गुरुवारी मोर्चा काढण्यात आला. या वेळी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांचे पोलिसांशी काही वेळ वाद झाले. त्यामुळे आंदोलकांनी चौकात 'रास्ता रोको'चा प्रयत्न केला. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी चौकशी करून दोषींवर कारवाईचे आश्वासन दिल्यावर आंदोलकांनी मोर्चा महापालिकेवर वळवला. शगुन चौकातील मोठे व्यापारी दुकानासमोरील जागा बेकायदेशीररीत्या भाड्याने देतात. शगुन चौक येथे हॉकर्स झोन व्हावा, यासह अन्य मागण्यांसाठी संघटनेतर्फे मोर्चा काढण्यात आला होता.

महापालिकेच्या घरकुलधारकांना घरकुल प्रकल्पात घरे द्या, या मागणीसाठी पिंपरी महापालिकेवर मोर्चा काढण्यात आला. या वेळी कार्यकर्त्यांनी 'आम्हाला घर मिळालेच पाहिजे, फक्त आश्वासने नकोत,' अशी मागणी केली. 'अधिकाऱ्यांनी आता घरे द्यावीत, अन्यथा खुर्च्या खाली कराव्यात' अशी मागणीही या वेळी करण्यात आली.

'या आधीही घरकुलधारकांनी महापालिकेवर मोर्चे काढले होते; मात्र 'घरकुल प्रकल्प थांबला असून, आता ज्यांना घरे मिळाली नाहीत, त्यांनी पंतप्रधान आवास योजनेत अर्ज भरावेत, त्यामध्ये त्यांना पात्रतेनुसार घरे मिळतील,' असे आश्वासन महापालिका आयुक्तांनी त्यांना दिले होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गर्दीचा फायदा घेऊन आरोपीचे पलायन

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, पुणे

चोरीच्या गुन्ह्यात कोर्टात हजर केलेला आरोपी कोर्टातील गर्दीचा फायदा घेऊन पळून गेला. बुधवारी दुपारी शिवाजीनगर कोर्टात ही घटना घडली. संतोष चंद्रकांत ढेरे (४०, रा. ससाणेनगर रोड, काळेपडळ, हडपसर) असे पळून गेलेल्या आरोपीचे नाव आहे. या प्रकरणी शिवाजीनगर पोलिस स्टेशनमध्ये फिर्याद दाखल करण्यात आली आहे. पोलिस कर्मचारी बी. डी. वाघ यांनी फिर्याद दाखल केली आहे.

आरोपी ढेरेला बुधवारी कोर्टात हजर करण्यात आले होते. त्याच्यावर शिवाजीनगर पोलिस स्टेशनमध्ये भारतीय दंडविधान कायदा कलम ३७९नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याला कोर्टात हजर करण्यात आले असता कोर्टाने त्याला न्यायालयीन कोठडी सुनावली. त्याला येरवडा जेलमध्ये दाखल करण्यासाठी आवश्यक असलेल्या रिमांड वॉरंटवर सही घेत असताना तो कोर्टातील गर्दीचा फायदा पळून गेला, अशी फिर्याद दाखल करण्यात आली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

संशयास्पद स्थितीत कामगाराचा मृतदेह

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पिंपरी

चार दिवसांपासून बेपत्ता असलेल्या माथाडी कामगाराचा अर्धवट जळालेल्या अवस्थेतील मृतदेह गुरुवारी आढळून आला. भोसरी-एमआयडीसी येथील सेक्टर क्रमांक सात येथील झुडपांत त्याचा मृतदेह आढळून आला असून, त्याचा खून झाल्याचा संशय नातेवाइकांनी व्यक्त केला आहे. या प्रकरणी भोसरी-एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते.

नामदेव रावसाहेब हाके (३५, रा. आदर्शनगर, मोशी) असे कामगाराचे नाव आहे. हाके एमआयडीसी परिसरात माथाडी कामगार होता आणि सिमेंटच्या गोणी उचलण्याचे काम तो करत होता. सोमवारी सायंकाळी हाके कामावरून घरी आला आणि दहा मिनिटांत बाहेर जाऊन येतो, असे सांगून घराबाहेर पडला; मात्र तो पुन्हा घरी परतला नाही. दरम्यान, गुरुवारी सकाळी एमआयडीसी येथील सेक्टर क्रमांक सात, टॉवर नंबर चारच्या परिसरातील झाडाझुडपांमध्ये अर्धवट जळालेल्या स्थितीतील मृतदेह पोलिसांना आढळून आला. त्याची ओळख पटली नसल्याने पोलिसांनी तो पिंपरीतील वायसीएम हॉस्पिटलमध्ये नेला. त्याच्या अंगावर जखमा असल्याने पोलिसांनीही खुनाचा संशय व्यक्त केला.

दरम्यान, हाके यांचा मेव्हणा त्याला शोधत एमआयडीसी पोलिस ठाण्यात गेला असता पोलिसांनी त्याला परिसरात शोध घेण्यास सांगितले. तो वायसीएम हॉस्पिटलमध्ये गेला, तेव्हा त्याला तेथील पोलिसांनी संबंधित मृतदेहाबाबत सांगितले. त्याचे कपडे आणि वर्णनावरून मृतदेहाची ओळख पटली. भोसरी-एमआयडीसी पोलिस अधिक तपास करत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

हरहुन्नरी अभिनेते नंदू पोळ यांचे निधन

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे गेल्या अर्धशतकाहून अधिक काळ चित्रपट, रंगभूमीला मोलाचे योगदान देणारे ज्येष्ठ अभिनेते नंदू पोळ (वय ६८) यांचे गुरुवारी निधन झाले. त्यांच्या पश्चात मुलगा आणि मुलगी असा परिवार आहे. वैकुंठ स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. पोळ यांच्यावर नुकतीच हृदयशस्त्रक्रिया झाली होती. गेल्या दहा दिवसांपासून एका खासगी हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू होते. प्रकृती गंभीर झाल्याने त्यांना कृत्रिम श्वासोच्छवासावर ठेवण्यात आले होते. अखेर उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. गेल्या अर्धशतकाहून अधिक काळ चित्रपट, रंगभूमीला मोलाचे योगदान देणाऱ्या पोळ यांची एकाकी 'एक्झिट' चित्रपट, नाट्य वर्तुळास चटका लावून गेली. रंगभूमी, चित्रपट, दूरचित्रवाणी मालिका आणि ध्वनिमुद्रण अशी त्यांची चौफेर वाटचाल होती. 'श्री गणराय नर्तन करी' या घाशीराम कोतवाल नाटकाच्या नांदीवर पदन्यास करणाऱ्या कलाकारांच्या रांगेतील सर्वाधिक लक्ष वेधून घेणारी वामनमूर्ती, 'सामना'मधील मास्तरांना सेवा देणारा वेटर, 'गाढवाचं लग्न' चित्रपटातील राजा, छोट्या पडद्यावरील 'नाजूका' मालिकेद्वारे 'धर्म्या'अशा विविध भूमिकांमधून त्यांनी अभिनयाची छाप पाडली. या भूमिकांसह गणपती मंडळांच्या देखाव्यांमागचे शब्द-सूर ध्वनीमध्ये बांधण्यासाठी रात्र-रात्र जागविणारा तंत्रज्ञ तसेच तरुण कलावंतांसाठी हक्काचा मार्गदर्शक अशी त्यांची ओळख होती. थिएटर अ‍ॅकॅडमीचे ते संस्थापक-सदस्य होते. शास्त्रीय संगीताच्या मैफली, जुनी हिंदी चित्रपटगीते याविषयी रात्री कट्ट्यावर भरभरून गप्पांचा फड रंगविणारा रसिकराज म्हणून ते विशेष लोकप्रिय होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘धडपडणारा कलावंत गमावला’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे ज्येष्ठ अभिनेते नंदू पोळ यांच्या निधनाने प्रसन्न व विलक्षण व्यक्तिमत्त्व, तरुण कलाकारांसाठी हक्काचा मार्गदर्शक आणि त्यांच्यासाठी धडपडणारा कलावंत गमावल्याची भावना चित्रपट व नाट्य वर्तुळात गुरुवारी व्यक्त झाली.

नंदूशी अवघ्या पुण्याच्याच आठवणी आहेत. घाशीराम कोतवाल नाटकामध्ये त्याचे विशेष कौतुक झाले. 'एफटीआयआय'ने त्याच्यावर माहितीपट केला होता. त्याने प्रत्येकाशी आत्मीयतेने नाते जोडले होते. नाटकांच्या दौऱ्यामध्ये कलाकारांना मदत करत राहणे, हा त्याचा स्वभाव होता. स्वतःचा मार्ग आखत गेलेला तो मनस्वी कलावंत होता. - डॉ. मोहन आगाशे, ज्येष्ठ अभिनेते

चित्रपट व नाट्यसृष्टीत नंदूला पर्याय नव्हता. घाशीराम कोतवाल नाटकावेळेस धमाल असायची. नृत्य, गाणे, अभिनय, ध्वनिमुद्रण असा त्याचा चौफेर संचार असायचा. नाटकामध्ये गणपती म्हणून यायचा व विराजमान व्हायचा तेव्हा प्रत्यक्षात गणपतीची प्राणप्रतिष्ठा झाली, असे वाटायचे. ध्वनिमुद्रणाच्या कामात त्याचा हिरीरीने सहभाग होता. तरुण कलाकारांसाठी सतत मदत करत राहणारे व्यक्तित्व पडद्याआड गेले आहे. - डॉ. जब्बार पटेल, ज्येष्ठ दिग्दर्शक

आमचा अनेक वर्षांचा ऋणानुबंध होता. प्रत्येकाच्या आत संवेदना व सौंदर्य असते; पण नंदू सर्वांपेक्षा वेगळा होता. प्रसन्न व्यक्तिमत्त्व आणि त्याचे असणे हाच जीवनाचा मूलमंत्र होता. कलेमध्ये स्वतःची जाणीव, संवेदना नंदूने ओतली. व्यापक स्नेही परिवार जोडला. बी. जे. मेडिकल, नाट्य संस्था, तरुण कलावंत व गणपती मंडळ या सर्व घटकांशी त्याचे जिवाभावाचे नाते होते. - समर नखाते, ज्येष्ठ समीक्षक

नंदूने माझ्या 'महानिर्वाण'मध्ये काम केले होते. तीन पैशाचा तमाशा, बेगम बर्वे, पडघम या नाटकात ध्वनिमुद्रण व पार्श्वसंगीताची भूमिका तो चोख बजावत असे. त्याने स्वतःचे स्थान निर्माण केले होते. संगीताची उत्तम जाण व उत्तम बासरी वादन हे त्याच्या व्यक्तित्वाचे वेगळे पैलू होते. त्याने अनेक तरुण कलावंतांना पुढे आणले. - प्रा. सतीश आळेकर, ज्येष्ठ नाटककार

माझा नंदू पोळ यांच्याबरोबर ३० वर्षांपेक्षा जास्त काळ सहवास होता. ८० च्या दशकात गणेशोत्सवात देखाव्यांना द्यावा लागणारा आवाज, त्याचे ध्वनिमुद्रण यानिमित्ताने आमची मैत्री बहरली. ती शेवटपर्यंत टिकून होती. नंदू यांच्या 'मी नंदू पोळ' या आत्मचरित्राचे प्रकाशनदेखील माझ्या हस्ते एस. एम. जोशी सभागृहात झाले होते. नंदूकडून मला खूप शिकायला मिळाले. अत्यंत लाघवी, मनस्वी असा मित्र मी गमावला आहे. - राहुल सोलापूरकर, अभिनेते व निवेदक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विद्यार्थी हरवले पुस्तकविश्वात

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे बुधवारची दुपार विद्यार्थ्यांसाठी खासच होती. पुस्तके होती; पण शाळा नव्हती. पुस्तकांशी गट्टी जमवणारा वर्ग भरला होता. पुस्तकांच्या विश्वात विद्यार्थी हरखून गेले होते. साठ हजार ग्रंथ आणि पन्नास विद्यार्थी हे चित्र नयनरम्य वाटावे असेच होते. माजी राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांचा १५ ऑक्टोबर हा जयंती दिन 'वाचक प्रेरणा दिन' म्हणून साजरा केला जात असला तरी, या दिवसाची वाट न पाहता डॉ. कलाम यांना त्यांच्या पुण्यतिथीदिनी विद्यार्थ्यांनी पुस्तकांशी मैत्र जोडून अनोखे अभिवादन केले. पुणे नगर वाचन मंदिरात हा सोहळा रंगला. पीयूष शहा यांच्या पुढाकाराने बुधवार पेठेतील साईनाथ मंडळ ट्रस्टतर्फे पुणे नगर वाचन मंदिरात डॉ. कलाम यांच्या प्रथम स्मृतिदिनानिमित्त शालेय विद्यार्थ्यांकरीता ग्रंथालय भेट आयोजित करण्यात आली होती. नूतन समर्थ, सेठ हिरालाल, आयडियल या शाळेच्या विद्यार्थ्यांनी उपक्रमात सहभाग घेतला. शालेय विद्यार्थ्यांना वाचनाची आवड निर्माण व्हावी, याकरीता या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी वाचनालयाचे अरविंद रानडे, ग्रंथपाल सविता गोकुळे, मंडळाचे अध्यक्ष पीयूष शहा, बापूसाहेब दामोदरे, नितीन पंडित, प्रतीक निंबाळकर, गंधाली शहा, अक्षदा व्यास, मोनिका शर्मा आदी उपस्थित होते. महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांनी विद्यार्थ्यांना पुस्तकांच्या विश्वात नेले. 'प्रत्येक विद्यार्थ्याने डॉ. कलाम यांचे चरित्र व पुस्तके वाचली पाहिजेत. डॉ. कलाम यांनी प्रतिकूल परिस्थितीवर मात करीत केवळ बुद्धिमत्तेच्या जोरावर आपले जीवन यशस्वी केले. त्यांच्या यशस्वी प्रवासात पुस्तकांचा अतिशय मोठा आणि महत्त्वाचा वाटा होता. त्यामुळे त्यांचा आदर्श समोर ठेवून विद्यार्थ्यांनी अधिकाधिक वाचन करायला हवे. भारत महासत्ता बनविण्याचे स्वप्न डॉ. कलामांनी देशाला दाखविले असून हे स्वप्न तरुणाईला पूर्ण करायचे आहे', अशा शब्दांत प्रा. जोशी यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सासवड स्थानक बकाल

$
0
0


म. टा. वृत्तसेवा, सासवड

सासवड एसटी बस स्थानक हे अस्वच्छता आणि गैरसोयींनी पुरते ग्रासले असून आगारातील व्यवस्थापनच त्यास जबाबदार आहे, अशी उद्विग्न प्रतिक्रिया नियमित प्रवास करणाऱ्या विद्यार्थी, नोकरदार प्रवाशांनी व्यक्त केली आहे.

नऊ एकर एवढी प्रशस्त स्वतःची जागा असलेले हे आगार असूनही अत्यंत गलिछ झाले आहे. मोकळ्या पडीक जागा, त्यावर अस्ताव्यस्त पडलेला केरकचरा यामुळे हे आगार बकाल वाटू लागले आहे. नुकतेच नव्याने नियुक्तीवर आलेले आगार व्यवस्थापक भुताळे यांनीही याची काही दखल घेतलेली दिसत नाही. ४ जुलैपासून या स्थानक परिसरात रात्रीच्या वेळी २० ते २२ दिवस अंधाराचेच साम्राज्य होते. २५ जुलै रोजी पुन्हा वीजपुरवठा सुरू झाल्याने रात्रीचा प्रवास करणारे प्रवासी, महिला आणि अपंग निराधार आश्रितांना, भिकाऱ्यांना झोपण्याचे हे हक्काचे ठिकाण कायम असुरक्षित आहे. वाहतूक पोलिस यंत्रणा केवळ दिवसा स्थानकाबाहेर काहीतरी गोळा करण्यासाठी, बेकायदा व अनधिकृत प्रवासी वाहतूक करीत असलेल्या लोकांशी हुज्जत घालण्यासाठी तत्परता दाखवतात; पण याच रस्त्यावर रोज होणारी वाहतूक कोंडी, अनधिकृत वाहने पार्किंग करणे रस्त्यात भांडणे-मारामारी, छेडछाडीचे, भुरट्या चोरीचे प्रकार, याकडे सोयीस्करपणे दुर्लक्ष करीत असल्याने वयोवृद्ध नागरिक महिला आणि शालेय-महाविद्यालयीन मुलींना याचा त्रास होतो आहे.

जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे यांचे निवासस्थान व कार्यालय याच परिसरात हाकेच्या अंतरावर असूनही या बस स्थानकाची दुरवस्था आणि बकालपणा काही कमी होत नाही, याचे नवल नागरिक व्यक्त करीत आहेत. सासवड हे पुरंदर तालुक्याचे मुख्यालय असून येथे तालुक्यातील हजारो लोकांचा व शालेय विद्यार्थी महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा मोठा वावर आहे.

नियमित ये-जा करणाऱ्या बस फेऱ्यांचे वेळापत्रक कोलमडले असून पुणे येथे जाण्यासाठी बाहेरून येणाऱ्या बसची तासन् तास वाट पाहावी लागणे, हे नित्याचे झाले आहे. हडपसर-पुणे या शटल सेवा आणि लांब पल्ल्याच्या अनेक गाड्या बंद केल्याने आणि नादुरुस्त बस संख्येने अधिक असल्याने प्रवासी आणि अपुऱ्या कर्मचाऱ्यांना याचा फटका बसत असून विद्यार्थ्यांना मासिक पास सवलत देण्यात हलगर्जीपणा वाढत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


शिक्षिकांच्या त्रासामुळे आत्महत्येचा प्रयत्न

$
0
0

राजगुरूनगर ः पानमळा येथील राजमाता जिजाऊ कन्या माध्यमिक शाळेतील इयत्ता दहावीच्या वर्गात शिकणाऱ्या मुलीने शिक्षिकांच्या वारंवार होणाऱ्या छळाला व जाचाला कंटाळून स्वतःच्या घरी विषारी औषध पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. मयुरी किसन साबळे (वय १६, राहणार गणपती मंदिर, राक्षेवाडी, खेड) असे या मुलीचे नाव असून सध्या ती राजगुरूनगर येथे एका खासगी हॉस्पिटलमध्ये 'आयसीयू'त उपचार घेत आहे. तिची प्रकृती चांगली आहे. या प्रकरणी मुलीने पोलिसांना दिलेल्या जबाबात वर्गशिक्षिका प्रमिला गुरव व वासंती गुंजाळ या दोन शिक्षिकांना जबाबदार धरण्यात आले आहे. डी. जे. केम्ब्रिज इंटरनॅशनल स्कूल अंतर्गत ही शाळा चालवली जाते. ही संस्था खेड पंचायत समितीच्या शिवसेनेच्या सदस्या अमृता गुरव यांची असून आरोपी प्रमिला गुरव या त्यांच्या जवळच्या नातेवाइक आहेत. याबाबत खेड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वरील दोन्ही शिक्षिका गुरव आणि गुंजाळ विद्यार्थ्यांच्या खासगी ट्युशन घेतात, अशी माहिती मयुरी मुख्याध्यापिकांना सांगते, असा दोन्ही शिक्षिकांचा गैरसमज झाला होता. या कारणास्तव त्या दोघी मयुरीला त्रास देऊन तिचा मानसिक छळ करत असत. तसेच वर्गातील इतर मुलींशी देखील तिला बोलू दिले जात नव्हते, असे मयुरीने सांगितले. या दोन शिक्षिकांच्या सांगण्यावरून वर्गातील अन्य पाच मुलीदेखील तिला सारखे घालून पाडून बोलत असत. त्यामुळे त्यांच्या सर्वांच्या त्रासाला कंटाळून औषध पिऊन आत्महत्या करण्याचा निर्णय तिने घेतला. दरम्यान असे समजते की दोन दिवसांपूर्वी मयुरी वगळता दहावीच्या दोन्ही वर्गातील सर्व मुलामुलींना चेतना या प्रश्नसंचाचे वाटप करण्यात आले होते. तिला हा प्रश्नसंच न मिळाल्यामुळे ती नाराज होती. तसेच मयुरीचे वडील शाळेच्या मुख्याध्यापिकांना भेटण्यासाठी शाळेतदेखील गेले होते. परंतु त्या भेटल्या नाही. मयुरीचे पालक शाळेत आल्याचे समजल्यावर संबंधित शिक्षिकांनी 'पालकांना परत शाळेत बोलावत जाऊ नकोस,' असे बजावून सांगितले होते. याबाबत शाळेशी संपर्क साधला असता त्यांची प्रतिक्रिया मिळू शकली नाही. तसेच शाळेतील अन्य शिक्षिकादेखील याविषयी अधिक बोलण्यास तयार नव्हत्या.

मारणाऱ्या शिक्षिकेवर गुन्हा राजगुरुनगर : राजगुरुनगर येथील खेड तालुका एज्युकेशन सोसायटी संचलित शेठ केशरचंद पारख शाळेतील तिसरीच्या वर्गात शिकणाऱ्या ओम कृष्णा भांबुरे (वय ८) यास शाळेतील एका शिक्षिकेने बेदम मारहाण केल्याप्रकरणी खेड पोलिस ठाण्यात संबंधित शिक्षिकेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुलाचे आजोबा मारुती तुकाराम भांबुरे (रा. भांबुरवाडी, ता. खेड) यांनी याबाबत फिर्याद दाखल केली आहे. ही घटना गेल्या मंगळवारी घडली. याबाबत खेड पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, ओम भांबुरे हा विद्यार्थी शाळेत बडबड, गोंधळ करत होता. हर्षदा रोकडे या शिक्षिकेने त्यास सांगून ऐकले नाही या कारणावरूनपायावर मारहाण केली. या मारहाणीचे वळ संबंधित विद्यार्थ्याच्या पायावर उमटले आहेत.

मारहाण करून तरुणाचा खून हडपसर ः कोंढवा खुर्द येथे एका तरुणाच्या डोक्यात लाकडी दांडक्याने जबर मारहाण करून खून केल्याची घटना मंगळवारी सकाळी उघडकीस आली. या प्रकरणी अज्ञात व्यक्तीवर कोंढवा पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मूर्तझा युसफ लोखंडवाला (वय २९, रा. राजगार्डन सोसायटी, कोंढवा खुर्द) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. या प्रकरणी मयताचे भाऊ हकीम युसूफ लोखंडवाला यांनी तक्रार दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमाजी अली बस स्टॉपसमोरील श्री सदगुरू हॉटेलच्या टेरेसवर मूर्तझाचा मृतदेह आढळून आला. सोमवारी रात्री नऊ ते मंगळवारी सकाळी आठ वाजण्याच्या दरम्यान हॉटेलच्या मागे कोणीतरी अज्ञात आरोपीने मूर्तझाला प्लायवूडच्या साहायाने डोक्यावर जबर मारहाण करून खून केला. त्यानंतर हॉटेलच्या टेरेसवर नेऊन मृतदेह टाकण्यात आला. खुनाचे कारण व खून कोणी केला याचा तपास लागलेला नाही, अशी माहिती कोंढवा पोलिस ठाण्याच्या पोलिस निरीक्षक वर्षाराणी पाटील यांनी दिली. मूर्तझा याला दारूचे व्यसन होते. तसेच, तो काहीही कामधंदा करत नव्हता. या प्रकरणी सहायक निरीक्षक वळवी हे तपास करत करत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘त्या’ कर्मचाऱ्यांवर कारवाई

$
0
0

म .टा. प्रतिनिधी, येरवडा येरवडा प्रादेशिक मनोरुग्णालयातून कार्यालयीन वेळेत सैराट चित्रपट पाहण्यास गेलेल्या आस्थापना विभागातील सहा महिला कर्मचाऱ्यांवर दोन महिन्यानंतर विनावेतन आणि शिस्तभंगाची कारवाई करण्यात आली. मनोरुग्णालयातील अधिकारी, कर्मचाऱ्यांकडून भविष्यात पुन्हा काही गैरवर्तन घडल्यास कठोर कारवाई करू, असा इशारा आरोग्य उपसंचालक डॉ. एच. एच. चव्हाण यांनी दिला आहे. येरवडा प्रादेशिक मनोरुग्णालयातील प्रशासकीय विभागातील सात महिला अधिकारी आणि कर्मचारी शुक्रवारी (६ मे) 'ऑन ड्युटी' असताना 'सैराट' चित्रपट पाहण्यास गेल्याचा धक्कादायक प्रकार घडला होता. कामावर असताना प्रशासकीय विभागातील अनेक महिला कर्मचारी एकाच वेळी चित्रपट पाहण्यास गेल्याने संपूर्ण कार्यालय ओस पडले होते. याबाबतचे वृत्त 'मटा'ने प्रसिद्ध केल्यानंतर आरोग्य विभागात खळबळ उडाली होती. त्यानंतर प्रशासनाकडून संबंधित महिलांना कार्यालयात अनुपस्थित असल्याप्रकरणी नोटीस बजावून खुलासा मागितला होता. प्रशासकीय अधिकारी कमल घोटकर यांची चौकशी अधिकारी नेमणूक केली होती. घोटकर यांनी सात महिलांची चौकशी करून मागील महिन्यात प्रभारी वैद्यकीय अधीक्षक डॉ. मधुमिता बहाले यांच्यामार्फत उपसंचालकांकडे अहवाल सादर केला होता. आस्थापना विभागातील आपल्या सहकरी महिलांना वाचविण्यासाठी चौकशी अधिकारी कमल घोटकर यांनी जुजबी आणि असमाधानकारक अहवाल सादर केल्याचे उपसंचालकांच्या तपासांती निदर्शनास आले. त्यामुळे उपसंचालक डॉ. चव्हाण यांनी संबंधित अहवाल मनोरुग्णालयाकडे परत पाठविला आणि अधीक्षकांनी पुन्हा नव्याने अहवाल तयार करण्याची सूचना केली आहे. त्यानुसार गेल्या आठवड्यात अधीक्षकांनी उपसंचालकांना अहवाल सादर केला. 'मटा'ने सातत्याने या प्रकरणाचा पाठपुरावा केल्यामुळे आरोग्य विभागाला कारवाई करणे भाग पडले. याबाबत डॉ. चव्हाण म्हणाले, 'कार्यालयीन वेळेत एकाच वेळी सहा महिला कर्मचारी गायब झाल्याप्रकरणी संबंधिताना खुलास सादर करण्यास सांगितले होते; पण कर्मचाऱ्यांचे खुलासे असमाधानकारक दिसून आले. या प्रकरणी अधीक्षकांना सविस्तर अहवाल सादर करण्यास सांगितले होते. अहवालानुसार महिला दोषी आढळून आल्याने सहा महिला कर्मचाऱ्यांवर एका दिवसाचे विनावेतन आणि शिस्तभंगाची कारवाई करण्यात आली आहे. मनोरुग्णालयात भविष्यात कुठलेही गैरवर्तन सहन केले जाणार नाही. अन्यथा कठोर कारवाई केली जाईल.'

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सेनेत खदखद; भाजप नाराज

$
0
0

सेनेत खदखद; भाजप नाराज

म. टा. प्रतिनिधी, पुणे
महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षांतराला सुरुवात झाल्याने शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष या दोन्ही पक्षांमधील नाराजीनाट्य समोर आले आहे. कोथरूड परिसरातील काही शिवसैनिकांनी संघटनेतील नाराजीतून 'जय महाराष्ट्र्' केल्याने शिवसेनेतील खदखद उघड झाली आहे, तर बाहेरून येणाऱ्या कार्यकर्त्यांमुळे निवडणुकीतील आपली संधी हुकण्याच्या भीतीने भाजपमधील नाराजीला तोंड फुटले आहे.
भारतीय जनता पक्षाच्या कोथरूड विभागाच्या वतीने आज (शुक्रवारी) महापालिका निवडणुकीच्या तयारीसाठी कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजिण्यात आला आहे. प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे आणि आमदार मेधा कुलकर्णी यांच्या उपस्थितीत हा मेळावा होणार आहे. या मेळाव्यात दानवे यांच्या उपस्थितीत कोथरूड विभागाची कार्यकारिणीही जाहीर करण्यात येणार आहे; तसेच यामध्ये शिवसेनेतील बाळासाहेब टेमकर, नंदुकमार घाटे, राजू हुलावळे, राजीव कुलकर्णी अशा प्रमुख नेत्यांसह इतर कार्यकर्तेही भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. यातील काही जण गेल्या पालिका निवडणुकीत शिवसेनेचे उमेदवार होते. या कार्यकर्त्यांना प्रवेश दिल्याने कोथरूड परिसरात भाजपची ताकद वाढेल, असा दावा एका गोटातून करण्यात येत आहे. मात्र, बाहेरील कार्यकर्त्यांना प्रवेश दिल्याने या परिसरातील भाजपच्या निष्ठावंतांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे. या नव्या कार्यकर्त्यांपैकी काही जण कोथरूड-कर्वेनगर आणि भुसारी कॉलनी या परिसरातून महापालिका निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक आहेत. या भागातून निवडणुका लढविण्यासाठी भाजपमध्ये निष्ठावानांपैकी इच्छुकांची संख्याही मोठी आहे. त्यात हे नवे स्पर्धक तयार झाल्याने निष्ठावान मंडळींमध्ये नाराजीचे वातावरण आहे.
दुसरीकडे हे शिवसैनिक पक्षातील गटबाजीला कंटाळून भाजपमध्ये प्रवेश करीत असल्याचे बोलले जात आहे. कोथरूड परिसरातील पक्ष संघटनेतील काही नियुक्तींवरून यापूर्वीच पक्षात वाद झाले होते. त्या पार्श्वभूमीवर यापैकी अनेकजण शिवसेनेला सोडचिठ्ठी देत असल्याचे एका गोटातून सांगण्यात येत आहे. त्यामुळे या पक्षांतर प्रकरणाने शिवसेनेतील खदखदही समोर आली आहे.

नवा वाद रंगणार
येत्या काही काळात शहराच्या अन्य भागांमध्येही अशीच घाऊक पक्षांतराची लाट येईल, असा दावा करण्यात येत आहे. मात्र, त्यामुळे विविध पक्षांमधील निष्ठावान आणि बाहेरचे असा नवा वाद रंगण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अकरावीसाठी एकत्रित फेरी

$
0
0

अकरावीसाठी एकत्रित फेरी

म. टा. प्रतिनिधी, पुणे
अकरावीच्या ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेतील या पूर्वीच्या नियोजित पाचव्या आणि त्या पुढील विशेष फेऱ्यांसाठीची प्रवेश निश्चिती आता एकाच वेळी जाहीर करण्याचा निर्णय ऑनलाइन प्रवेश नियंत्रण समितीने गुरुवारी रात्री उशिरा जाहीर केला. या एकत्रित फेरीचे वेळापत्रक शुक्रवारी जाहीर करणार असल्याचे समितीकडून सांगण्यात आले.
'पालकांकडून मागणी होत असल्याने समितीने हा निर्णय घेतला आहे. या एकत्रित फेरीसाठी विद्यार्थ्यांना पाच कॉलेजांचे प्राधान्यक्रम नोंदविण्याची सुविधा नव्याने उपलब्ध करून दिली जाईल. त्या आधारे या फेरीतून कॉलेज निश्चिती दिली जाईल,' असे प्रवेश समितीचे अध्यक्ष आणि शिक्षण उपसंचालक दिनकर टेमकर यांनी सांगितले.
लांबचे कॉलेज मिळाल्याची तक्रार असणारे, बेटरमेंटच्या एकाच संधीमुळे चांगल्या कॉलेजांपासून वंचित राहिल्याची तक्रार असणारे, अद्याप प्रवेशाची संधीच न मिळालेले, शाखा बदलून हवे असलेले आदी गटांमधील विद्यार्थ्यांना या प्रक्रियेमध्ये सहभागी होणे शक्य असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मोतेवारांचे दागिने चोरणारे गजाआड

$
0
0

मोतेवारांचे दागिने चोरणारे गजाआड

पुणे : 'समृद्ध जीवन'चे महेश मोतेवार यांचे सोन्याचे दागिने चोरणाऱ्या दोघा आरोपींना गुन्हे शाखेने गजाआड केले. या आरोपींकडून चोरीतील तीन किलो दागिने जप्त करण्यात आले आहेत. मोतेवार यांच्यावर अटकेची कारवाई झाली होती. त्या वेळी हे दागिने त्यांच्या पत्नीने आपल्या चालकाच्या घरी ठेवले होते.
नीलेश भाऊसाहेब कोळपे (वय ३१), वाल्मिक बिरा कोळपे (वय ३०, दोघे रा. तुकारामनगर, शिवाजी चौक, वाल्हेकरवाडी) अशी चोरट्यांची नावे आहेत, तर व्यंकटेश उर्फ पप्पू तुळशीदास दहीवाळ (वय ३२, रा. गणेश कॉलनी, थेरगाव), प्रदीप उर्फ बाळू येसू गायकवाड (वय ४५, रा. मु. पो. बलवडी, ता. खानापूर, जि. सांगली. सध्या रा. रविवार पेठ) आणि भारत ज्ञानदेव पडळकर (वय ३७, रा. मु. पो. म्हसवड, शिक्षक कॉलनी, ता. माण, जि. सातारा) अशी अटक केलेल्या सराफांची नावे आहेत, अशी माहिती गुन्हे शाखेचे उपायुक्त पी. आर. पाटील यांनी दिली.
मोतेवार यांची पत्नी लीना मोतेवार यांनी त्यांच्याकडील सोन्याचे दागिने चालक नरहरी देवराम घरत (रा. भालके कॉलनी, वाल्हेकरवाडी, चिंचवड) यांच्या घरी ठेवले होते. ही माहिती कोळपे आणि त्याच्या साथीदारांना समजली होती. आरोपींनी घरत यांना मारहाण करत सोन्याचा डबा चोरून नेला. त्यामध्ये चार किलो दागिने होते. घरत यांनी त्याबाबत लीना मोतेवार यांना कल्पना दिली. मात्र, त्यांनी पोलिसांकडे तक्रार केली नाही.
या आरोपींना गुन्हे शाखेने हिंजवडी आणि वाकड पोलिस ठाण्यात दाखल असलेल्या जबरी चोरीच्या गुन्ह्यांत अटक केली होती. या वेळी आरोपींनी घरत यांच्या घरात लूटमार केल्याची कबुली दिली. वरिष्ठ निरीक्षक लक्ष्मण बोराटे, सहायक निरीक्षक नितीन भोयर, गणेश पाटील, अन्सार शेख, फौजदार विलास पालांडे, कर्मचारी प्रमोद वेताळ, संतोष बर्गे यांच्या पथकाने ही कारवाई केली.


मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सायन-पनवेल मार्गाच्या निविदेत घोटाळा

$
0
0

Dhananjay.Jadhav @timesgroup.com

पुणे : दिल्लीतील महाराष्ट्र सदनमधील आर्थिक घोटाळा चर्चेत असतानाच, कोट्यवधी रुपये खर्चून केलेल्या सायन-पनवेल आणि ठाणे जिल्ह्यातील चिंचोटी-अंजूरफाटा या राज्यमार्गांच्या निविदांमध्ये 'गोलमाल' झाल्याचे उघडकीस आले आहे. सार्वजनिक बांधकाम खात्यातील या कामांच्या निविदा प्रक्रियेवर 'कॅग'ने ठपका ठेवला असून राज्य सरकारवरही ताशेरे ओढले आहेत.

सार्वजनिक बांधकाम खात्यामधील कंत्राटांमध्ये आर्थिक गैरव्यवहार झाल्याची अनेक प्रकरणे प्रकाशात आली आहेत. या गैरव्यवहारांमध्ये तत्कालीन सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ यांना अटक करण्यात आली आहे. हे प्रकरण ताजे असतानाच आता सायन-पनवेल विशेष राज्यमार्गाच्या निविदा वाटपातच गैरप्रकार झाल्याचे 'कॅग'च्या तपासणीत निदर्शनास आले आहे.

सायन-पनवेल या विशेष राज्यमार्गाच्या १,२२० कोटी रुपयांच्या बीओटी तत्त्वावरील कामाची निविदा बांधकाम खात्याकडून फेब्रुवारी २००९ मध्ये काढण्यात आली. ही निविदा 'आयव्हीआरसीएल' या कंपनीला देण्यात आली. या कामाची निविदा भरण्याची तयारी गॅमन इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड, रिलायन्स इन्फ्रा, महावीर रोडस अॅण्ड इन्फ्रास्ट्रक्चर व प्रतिभा इंडस्ट्रीज या चार नामांकित कंपन्यांनी केली होती. मात्र त्यांना निविदा अर्जांपासूनच दूर ठेवण्याची व्यवस्था केली गेली. या कंपन्यांना निविदा अर्ज न मिळाल्यामुळे ते प्रक्रियेत सहभागी होऊ शकले नाहीत.

या चार कंपन्यांना निविदा प्रक्रियेत सहभाग घेता येऊ नये यासाठी त्यांना निविदा अर्ज खरेदी करता येणार याची दक्षता घेण्यात आली. ही निविदा देणारे कार्यकारी अभियंता व टेंडर क्लार्क कामावर गैरहजर राहिले. त्यामुळे या कामाच्या स्पर्धात्मक निविदांना प्रतिबंध घातला गेल्याचा ठपका 'कॅग'ने ठेवला आहे. या चार कंपन्यांनी हा प्रकार राज्य सरकारच्या निदर्सनास आणला. त्यावर सरकारने चार कंपन्यांनी निविदा प्रक्रियेतून माघारीचे पत्र दिल्याचे उत्तर सरकारने दिले आहे. प्रत्यक्षात यातील एकाच कंपनीने असे पत्र दिल्याचे स्पष्ट करताना सरकारने चुकीचे उत्तर दिल्याचे ताशेरे 'कॅग'ने ओढले आहेत.

सायन-पनवेल विशेष राज्यमार्गाची निविदा विशिष्ट कंत्राटदार कंपनीला मिळावी यादृष्टीने पात्रतेचे निकष ठरविले गेले. या राज्यमार्गाच्या कामाचा पहिला प्रकल्प खर्च ८४५ कोटी रुपये होता. त्यानुसारच पात्रतेचे निकष निश्चित करण्यात आले. त्यानंतर ही निविदा १,२२० कोटी रुपयांपर्यंत वाढविण्यात आली. परंतु, ही निविदा मंजूर करताना पात्रतेचे जुनेच निकष कायम ठेऊन संबंधित कंत्राटदारावर मेहेरनजर दाखविण्यात आली.

'कॅग'चे ताशेरे

- सायन-पनवेल राज्यमार्गाच्या निविदांमध्ये घोळ
- विशिष्ट कंपनीवर मेहेरनजर दाखविण्यासाठी निविदा देणारे कार्यकारी अभियंता गैरहजर
- निविदा विक्रीबाबत राज्य सरकारने केलेले स्पष्टीकरण चुकीचे
- ८५५ कोटी रुपयांचे काम १,२२० कोटी रुपयांवर; कंत्राटदाराच्या कामाची पात्रता मात्र जुन्याच निकषांवर
- संरक्षक भितींच्या ६५ कोटी रुपयांच्या कामामध्ये गुणवत्तेचा उल्लेखच नाही.
- सेवा रस्ता २६.८१ किमीवरून ८.१४ किमीपर्यंत कमी करण्यात आला.
- कामाच्या देखरेखीसाठी (सुपरव्हिजन) अधीक्षक अभियंत्यांची नियुक्ती नाही.
- योग्य देखरेख नसल्याने रस्त्याच्या कामाचे रेकॉर्ड उपलब्ध नाही.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

डॉ. मुजुमदार यांना कलाम अॅवॉर्ड

$
0
0

डॉ. मुजुमदार यांना कलाम अॅवॉर्ड

म. टा. प्रतिनिधी, पुणे
'सिम्बायोसिस'चे संस्थापक अध्यक्ष डॉ. शां. ब. मुजुमदार यांना डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम सेंटरतर्फे 'डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम मेमोरिअल अॅवॉर्ड फॉर डिस्टिंग्विश सर्व्हिसेस'ने नुकतेच सन्मानित करण्यात आले.
लखनौ येथे झालेल्या कार्यक्रमात उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री अखिलेश यादव यांच्या हस्ते डॉ. मुजुमदार यांना हा पुरस्कार देण्यात आला. 'डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम मेमोरिअल यूथ कॉन्क्लेव्ह ऑन क्रिएटिंग लिवेबल प्लॅनेट अर्थ २०१६' या उपक्रमांतर्गत या पुरस्काराचे वितरण करण्यात आले. शैक्षणिक आणि युवकांच्या विकासासाठी केलेल्या उल्लेखनीय कार्यासाठी डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम सेंटरतर्फे डॉ. मुजुमदार यांना हा सन्मान देण्यात आला.


मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


छोटा राजन टोळीतील हस्तकाला अटक

$
0
0


छोटा राजन टोळीतील हस्तकाला अटक
पुणे : बांधकाम व्यावसायिकांना धमकाविणाऱ्या छोटा राजन टोळीतील हस्तकाला गुन्हे शाखेच्या दरोडा प्रतिबंधक पथकाने अटक केली. या हस्तकाकडून पिस्तूल आणि काडतुसे जप्त केली आहेत.
प्रशांत भगवान वनशिव (वय २८, रा. धायरी गाव) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याच्याविरुद्ध भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल आहे. त्याशिवाय अवैधरित्या शस्त्र बाळगल्याप्रकरणी कारवाई झाली आहे. त्याच्याकडे पिस्तूल असून तो धायरेश्वर मंदिराजवळ येणार असल्याची माहिती पोलिस कर्मचारी शैलेश जगताप यांना मिळाली होती.
वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजेंद्र कदम, जगताप, संतोष पागार, नीलेश पाटील, अशोक आटोळे, राहुल घाडगे, विनायक जोरकर, प्रमोद गायकवाड, परवेज जमादार आणि धनाजी पाटील यांच्या पथकाने वनशिवला ताब्यात घेतले. त्याच्याकडील एक पिस्तूल आणि दोन काडतुसे जप्त केली आहे. वनशिव हा राजन टोळीतील काही जणांशी थेट संपर्कात होता, अशी माहिती पोलिस उपायुक्त पी. आर. पाटील यांनी दिली.


मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सिलिंडरचे वजन करण्याचे आदेश

$
0
0

सिलिंडरचे वजन करण्याचे आदेश

म. टा. प्रतिनिधी, पुणे
घरगुती गॅस सिलिंडरचे वजन कमी भरल्याबद्दल राज्यभरातील १३७ गॅस वितरकांवर खटले दाखल करण्याची कारवाई करण्यात आली असून, सिलिंडरचे वजन न करता त्यांचे वितरण करणाऱ्यांवर खटले दाखल करण्याचे आदेश ग्राहक संरक्षण मंत्री गिरीश बापट यांनी दिले आहेत.
घरगुती गॅस सिलिंडरच्या वजनातील फसवणूक टाळण्यासाठी वैधमापनशास्त्र यंत्रणेने राज्यातील ३२५ गॅस वितरक कंपन्यांची तपासणी केली. त्यामध्ये सिलिंडरचे वजन कमी भरलेल्या १३७ वितरकांवर कारवाईचा आसूड उगारण्यात आला आहे. गॅस सिलिंडर विक्रेत्यांकडून ग्राहकांची फसवणूक होत असल्याच्या तक्रारी ग्राहक संरक्षण मंत्री बापट यांच्याकडे आल्या होत्या. या तक्रारींची दखल घेऊन बापट यांनी वैधमापन यंत्रणेचे नियंत्रक अमिताभ गुप्ता यांना वितरकांची तपासणी करण्याच्या सूचना दिल्या. त्यानंतर ही कारवाई करण्यात आली.
या तपासणीमध्ये सिलिंडरमध्ये गॅसचे वजन कमी भरल्याप्रकरणी; तसेच वितरण करणाऱ्या कर्मचाऱ्याकडे वजन काटा उपलब्ध नसल्याबद्दल आणि वजनमापन उपकरणांची नियतकालिक पडताळणी व मुद्रांकन न केल्यामुळे कारवाई करण्यात आली. दरम्यान, एलपीजी सिलिंडरमधून मिळणारा गॅस १४.२ किलो आहे, याची खात्री करून घ्यावी. त्यासाठी सिलिंडर घेताना त्याचे वजन करून घ्यावे. त्यात गैरप्रकार आढळल्यास वैधमापन शास्त्र यंत्रणेस कळवावे, असे आवाहन बापट यांनी केले आहे.


मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

स्टोन क्रशरची वीजचोरी उघड

$
0
0

स्टोन क्रशरची वीजचोरी उघड

म. टा. प्रतिनिधी, पुणे
चऱ्होली बुद्रुक येथील 'दीपाली स्टोन क्रशर' या सिमेंटचे ब्लॉक बनवणाऱ्या कारखान्यामध्ये सुमारे सहा लाख रुपयांची वीजचोरी 'महावितरण'ने उघडकीस आणली आहे. या प्रकरणी स्टोन क्रशरचा मालक सचिन तानाजी खांदवे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
चऱ्होली बुद्रुकमधील निगुर्डी-लोहगाव रस्त्यावर असलेल्या या कारखान्याला 'महावितरण'ने औद्योगिक वीजजोडणी दिली आहे. या कारखान्यातील वीजवापराबाबत संशय निर्माण झाल्याने 'महावितरण'कडून वीजमीटरच्या यंत्रणेची तपासणी करण्यात आली. कारखान्याच्या जवळच असलेल्या फीडर पिलरला थेट केबल जोडून वीजचोरी होत असल्याचे आढळून आले. त्याद्वारे सुमारे सहा लाख एक हजार ४१० रुपयांची वीजचोरी झाल्याचे निदर्शनास आले.
मुख्य अभियंता रामराव मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली या कारवाईत अधीक्षक अभियंता महेंद्र दिवाकर, कार्यकारी अभियंता सुनील शिंदे, अतिरिक्त कार्यकारी अभियंता अनिल वरपे, सहायक अभियंता रमेश सूळ, तंत्रज्ञ अजित मस्के, विजयकुमार गलांडे, बाळासाहेब तापकीर, सतीश राख, रविकिरण मुंडे, किरण शिंदे, राहुल पाठक आणि प्रमोद डगवार आदी सहभागी झाले होते.


मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मुलाला वडिलांना भेटू दिले नाही

$
0
0

मुलाला वडिलांना भेटू दिले नाही

Vandana.Ghodekar@timesgroup.com
पुणे : पती-पत्नीत झालेल्या वादात बहुतांश खटल्यांमध्ये मुलांचा ताबा आईकडे दिला जातो. तिने मात्र पती चांगला सांभाळ करील म्हणून मुलाचा ताबा त्याच्याकडे दिला. काही दिवसांनंतर पुन्हा कोर्ट-कचेरी करून मुलाचा ताबा मिळवला. त्यानंतर मात्र तिने मुलाला त्याच्या वडिलांना भेटूच दिले नाही. त्याला त्याच्या वडिलांना भेटू द्यावे, असा आदेश कोर्टाने वारंवार दिला; मात्र तिने दुर्लक्ष केले. अखेर या मुलाला पित्याच्या मायेपासून वंचित ठेवणाऱ्या आईला कोर्टानेच दणका दिला. या पत्नीने पतीला १६ हजार रुपयांची नुकसानभरपाई द्यावी, असा आदेश प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी मकरंद अदवंत यांच्या कोर्टाने दिला.
मीनल आणि प्रदीप (दोघांची नावे बदलली आहेत) हे दोघेही सॉफ्टवेअर कंपनीत कामाला होते. त्यांना सहा वर्षांचा एक मुलगा आहे. एकमेकांबरोबर वाद होत असल्यामुळे त्यांनी वेगळे राहण्यास सुरुवात केली. मुलाचा ताबा मिळावा म्हणून कोर्टात दाखल केलेल्या दाव्यात तिने मुलाचा ताबा पतीकडे दिला. मुलाला आपल्यापेक्षा त्याचे वडील जास्त चांगले सांभाळू शकतात, असे सांगून तिने आधी मुलाचा ताबा पतीकडे देण्याची तयारी दर्शविली; मात्र काही दिवसांतच तिने पुन्हा मुलाचा ताबा मिळावा म्हणून कोर्टात दावा दाखल केला. मुलगा वडिलांकडे चांगला राहत नाही, त्याला त्यांची भीती वाटते, असे तिने कोर्टाला सांगितले. अखेर कोर्टानेही तिला मुलाचा ताबा दिला. मात्र, ताबा तिला दिल्यानंतर त्याने मुलाला भेटू द्यावे म्हणून कोर्टाकडे अर्ज केला. तो अर्ज मंजूर करून कोर्टाने वारंवार आदेश देऊनही तिने त्याला भेटू दिले नाही. त्याने अॅड. देवानंद ढोकणे यांच्यामार्फत कोर्टात दावा दाखल केला होता. मुलाचा ताबा आपल्याकडे असताना तो चांगला राहिला होता, त्याला कोणताही त्रास देण्यात आलेला नव्हता. वडिलांबरोबर राहताना मुलगा आनंदी होता, असे त्यांनी कोर्टात सांगितले. त्याचे पुरावेही कोर्टात सादर करण्यात आले. मात्र, कोर्टाने आदेश देऊनही सलग आठ तारखांना त्याला मुलाला भेटू देण्यात आले नाही. शेवटी कोर्टाने तिच्यावर कारवाई करावी, अशी मागणी अॅड. ढोकणे यांनी कोर्टात केली.
या प्रकरणात निर्णय देताना कोर्टाने प्रत्येक तारखेला दोन हजार रुपयांची नुकसानभरपाई, अशी एकूण आठ तारखांची १६ हजार रुपयांची नुकसानभरपाई पत्नीने पतीला द्यावी, असा आदेश दिला.
................
कोर्टात दाखल असलेल्या पती-पत्नीच्या खटल्यांत मुलांकडे दुर्लक्ष होऊ नये याची काळजी घेणे आवश्यक आहे; तसेच मुलांवर भांडणाचा परिणाम होणार नाही याची दक्षता घेणे आवश्यक आहे.
- अॅड. देवानंद ढोकणे

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दिशा परिवार देणार कोटीची शिष्यवृत्ती

$
0
0


दिशा परिवार देणार कोटीची शिष्यवृत्ती

म. टा. प्रतिनिधी, पुणे
उच्च शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या ग्रामीण भागातील ५४३ विद्यार्थ्यांना दिशा परिवारातर्फे शिष्यवृत्ती देण्यात येणार आहे. उद्या, शनिवारी सायंकाळी पाच वाजता बालगंधर्व रंगमंदिरात होणाऱ्या कार्यक्रमात विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती प्रदान करण्यात येणार असल्याची माहिती 'दिशा परिवार'चे कार्याध्यक्ष राजाभाऊ चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत दिली.
संस्थेतर्फे देण्यात येणाऱ्या शिष्यवृत्तीचे हे दहावे वर्ष आहे. यंदा तब्बल एक कोटी पाच लाख रुपयांच्या शिष्यवृत्तीचे वितरण करण्यात येणार आहे. कार्यक्रमाला महापौर प्रशांत जगताप, उद्योजक बाळासाहेब साळके, अशोक येनपुरे, शिव अगरवाल, अंकुश काकडे आदी मान्यवर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.
यंदाची शिष्यवृत्ती ग्रामीण भागातून आलेल्या आणि उच्च शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना देण्यात येणार आहे. आर्ट्स, कॉमर्स, सायन्स, इंजिनीअरिंग, वैद्यकीय अशा विभागांमध्ये उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना ही शिष्यवृत्ती प्रदान केली जाईल. महाराष्ट्राच्या ३० जिल्ह्यांतील ५४२ विद्यार्थ्यांची यासाठी निवड करण्यात आली असल्याचे चव्हाण यांनी सांगितले. शिक्षणाची ओढ असलेल्या शेतमजूर आणि कष्टकरी वर्गातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेण्यासाठी दर वर्षी ही शिष्यवृत्ती दिली जाते. यंदा संस्थेची दशकपूर्ती होत असल्याने शिष्यवृत्तीचे वाटप करण्यात येणार असल्याचे चव्हाण यांनी सांगितले.


मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images