Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

पाणीकपात राहणार ‘जैसे थे’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

शहरातील पाणीकपात सोमवारपासून (१८ जुलै) रद्द करण्याचा निर्णय महापौरांनी जाहीर केला असला, तरी सद्यस्थितीत ही कपात मागे घेतली जाणार नसल्याचे रविवारी स्पष्ट झाले. पाणीकपात रद्द होण्यासाठी धरणे भरण्याची प्रतीक्षा पुणेकरांना करावी लागणार असून, पुढील काही दिवसांत त्यावरून राजकारण तापण्याची दाट चिन्हे आहेत. भाजपवगळता इतर सर्वच पक्षांनी पाणीकपात रद्द करण्याची मागणी लावून धरली आहे.

ग्रामीण भागाला पाणी सोडण्यासाठी पुणेकरांवरील पाणीकपातीचे संकट जाणीवपूर्वक निर्माण केले जात असल्याचा आरोप महापौर प्रशांत जगताप यांनी केला, तर 'पाणीकपातीचा निर्णय रद्द करण्याचा अधिकार महापौरांना नाही,' अशा शब्दांत पालकमंत्री गिरीश बापट यांनी महापौरांवर पलटवार केला. शहरात सोमवारपासून रोज पाणीपुरवठा करण्याची महापौरांनी केलेली घोषणा सोमवारी तरी प्रत्यक्षात येण्याची शक्यता नाही. तरीही, पाणीकपात रद्द करण्याचा निर्णय घेण्यासाठी सर्व पक्ष एकवटले आहेत. आज, सोमवारी दुपारी महापौरांनी सर्व पक्षनेत्यांची बैठक आयोजित केली असून, त्यामध्ये याबाबत निर्णय घेण्यात येईल, असे संकेत दिले; तसेच 'आयुक्तांनी कोणत्याही दबावाखाली काम न करता, पुणेकरांच्या हिताचा निर्णय घ्यावा,' असे आवाहन त्यांनी केले.

पुणेकरांवरील पाणीकपात रद्द केली नाही, तर पालकमंत्री आणि राज्य सरकारच्या विरोधात रस्त्यावर उतरण्याचा इशारा देण्यात आला आहे. पुणेकरांची पाणीकपात मागे न घेता, दौंड-इंदापूरला चार टीएमसी पाणी सोडण्याचा घाट पालकमंत्री घालत असल्याचा आरोप महापौरांनी केला. दरम्यान, 'पाणीकपातीचा निर्णय महापालिका घेऊ शकत नाही,' असे स्पष्ट करून, 'धरणे पूर्ण क्षमतेने भरल्यानंतर सर्व संबंधित घटकांशी चर्चा करून पाणीपुरवठ्याचा निर्णय घेतला जाईल,' अशी माहिती पालकमंत्री गिरीश बापट यांनी दिली; तसेच ग्रामीण भागांतही सध्या पाऊस सुरू असल्याने धरणातून पाणी सोडण्याची गरज नसल्याचे सांगत त्यांनी महापौरांचे आरोप फेटाळून लावले.

पुण्यातील पाणीकपात कायम ठेवून ग्रामीण भागात पाणी सोडण्याची तयारी सुरू आहे. पालकमंत्री आणि शहरातील आमदारांना याचा जाब पुणेकर विचारतील.

- प्रशांत जगताप, महापौर

पुणेकरांच्या पाणीपुरवठ्यात सध्या कोणताही बदल केला जाणार नाही. पावसाचा अंदाज आणि धरणांची क्षमता याचा आढावा घेऊन शहर आणि जिल्ह्यातील सर्व आमदारांशी चर्चा करून निर्णय घेण्यात येईल.

- गिरीश बापट, पालकमंत्री

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


फुगेंच्या खुनानंतर सोन्याचा शर्ट गायब

$
0
0

मटा ऑनलाइन वृत्त । पिंपरी

साडेतीन किलो सोन्याचा शर्ट... किंमत कोटींच्या घरात...या शर्टामुळंच दत्तात्रेय फुगे यांची ओळख गोल्डमॅन म्हणून झाली. पण त्यांच्या हत्येनंतर हा सोन्याचा शर्ट गायब झाल्याचं समजतं. विशेष म्हणजे या शर्टाबाबत फुगेंच्या कुटुंबीयांनाही काही माहिती नाही.

फुगे यांची १४ जुलैला त्यांच्या मित्रांनीच दगडाने ठेचून निर्घृणपणे हत्या केली. त्यांच्या मुलासमोरच हे भयानक हत्याकांड घडले. पोलिसांनी आरोपींना अटक केली आहे. हत्या कोणत्या कारणांतून झाली, याचा तपास सुरु आहे. त्यात आता फुगेंचा साडेतीन किलोचा सोन्याचा शर्ट गायब झाल्याचं समोर आलं आहे. याबाबत कुटुंबीयांनाही माहिती नसल्याचं कळतं. तो शर्ट चिंचवडमधील ज्वेलर्सकडे ठेवला होता, असं त्यांचा मुलगा शुभमनं पोलिसांना सांगितलं. पण तो तयार केल्यापासून फुगेंनी तो कधीच आमच्याकडे आणला नाही, असं ज्वेलर्सकडून सांगण्यात आल्याचं सूत्रांकडून समजतं. आर्थिक अडचणींमुळं फुगेंनी सोन्याचा शर्ट विकला असावा, अशी चर्चा सुरु आहे.

दोन वर्षांपूर्वी फुगेंनी घातला होता सोन्याचा शर्ट!

फुगे उद्योजक होते. चिटफंडचा त्यांचा व्यवसाय होता. त्यांचे लाखो गुंतवणूकदार होते. या व्यवसायात ते कर्जबाजारी झाले होते. त्यामुळेच त्यांनी तो सोन्याचा शर्ट विकला असावा, अशी दाट शक्यता आहे, असे बोलले जाते. तर शहरात फिरताना त्यांच्या अंगावर सोन्याचा शर्ट कधीच पाहिला नाही, असे काहींचे म्हणणे आहे. पण दोन वर्षांपूर्वी त्यांनी एका कार्यक्रमात सोन्याचा शर्ट घातला होता, असं कुटुंबीयांकडून सांगण्यात येतं.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

'जात हा कॉलम काढायला हवा'

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

'कोपर्डीसारख्या घटनांचा समाजातील तरुणांनी प्रतिकार करायला हवा. माझ्यासोबत असे कोणी वागले असते, तर मी स्वसंरक्षणासाठी मारले असते,' अशी प्रतिक्रिया ज्येष्ठ अभिनेता नाना पाटेकर यांनी सोमवारी पुण्यात नोंदविली. या घटनेनंतर जातीवादी भाष्य करणाऱ्यांचा निषेध करताना पाटेकर यांनी आपल्याकडचा 'जात' हा कॉलमच काढून टाकायला हवा, असे मतही मांडले.

पुण्यात एका समारंभाच्या निमित्ताने आलेल्या पाटेकर यांना कोपर्डी घटना आणि त्यानंतर सुरू झालेल्या जातीय आरोप-प्रत्योरापांविषयी पत्रकारांनी प्रश्न विचारले. त्या वेळी पाटेकर यांनी आपली या घटनेविषयी, तसेच जातीवादाविषयीची भूमिका मांडली. पाटेकर म्हणाले, 'मी जातीय रंगांच्या विरोधात आहे. समाजातील तरुणांनीही अशा प्रकारांचा प्रतिकार करायला हवा. आपल्या घरातील महिलांबाबत असा प्रकार घडला असता, तर आपण शांत बसलो असतो का, याचा विचार अशा वेळी करायला हवा. प्रत्येकाने समाजामध्ये वावरत असताना आपली जात घरात ठेवायला हवी. रस्त्यावर आपण भारतीय म्हणून वावरलो तरच समाज म्हणून आपली प्रगती शक्य आहे.'

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पवना धरण निम्मे भरले

$
0
0

पवना धरण निम्मे भरले

पिंपरी ः पिंपरी-चिंचवडला पाणीपुरवठा करणारे पवना धरण निम्मे भरले असून, त्यातील पाणीसाठा ५०.२३ टक्के झाला आहे. त्यामुळे पुढील सहा ते सात महिने पाणी पुरेल, असे महापालिका प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
पवना धरण आणि परिसरात यंदाच्या हंगामात सुमारे एक हजार मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. सोमवारी (१८ जुलै) दहा मिलिमीटर पाऊस झाला. त्यामुळे धरणात आता ४.२७६ टीएमसी पाणीसाठा उपलब्ध आहे. दरम्यान, असे असले तरी शहरात दिवसाआड पाणीपुरवठा करण्याच्या धोरणात तूर्तास कोणताही बदल केला जाणार नाही, असे महापालिका आयुक्त दिनेश वाघमारे यांनी सांगितले आहे. पुढील १५ दिवसांनी आढावा घेतल्यानंतरच पाणीकपात मागे घेण्याबाबतचा अंतिम निर्णय घेतला जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे सद्यःस्थितीतील पाणीकपात कायम राहणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अॅड. सुधाकर आव्हाड, अनिल अवचट यांना पुरस्कार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्तमंदिर ट्रस्टतर्फे देण्यात येणारा गुरुमहात्म्य पुरस्कार प. पू. स्वामी स्वरूपानंद सरस्वती (फुलगांव), ज्येष्ठ समाजसेवक डॉ. अनिल अवचट आणि ज्येष्ठ विधीज्ञ डॉ. सुधाकर आव्हाड यांना प्रदान करण्यात येणार आहे.
दत्तजयंतीचे निमित्त साधून शुक्रवार, दिनांक ९ डिसेंबर २०१६ रोजी आयोजित सप्तस्वरोत्सवात हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार असून सन्मानचिन्ह, महावस्त्र व रुपये २५ हजार असे पुरस्काराचे स्वरूप आहे, अशी माहिती ट्रस्टचे अध्यक्ष अ‍ॅड. एन. डी. पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली. कार्यकारी विश्वस्त युवराज गाडवे, उत्सवप्रमुख अंकुश काकडे, उपउत्सवप्रमुख चंद्रशेखर हलवाई, खजिनदार बी. एम. गायकवाड, विश्वस्त उल्हास कदम, शिरीष मोहिते, अ‍ॅड. शिवराज कदम जहागिरदार, नंदकुमार सुतार आदी उपस्थित होते. दर वर्षी सामाजिक, धार्मिक अशा विविध क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्यांना या पुरस्काराने गौरविण्यात येते.
वैदिक पद्धतीने गुरुकुल शिक्षण देऊन भारतीय परंपरा जपण्याचे कार्य प. पू. स्वामी स्वरूपानंद सरस्वती यांनी केले आहे. लाखो व्यसनाधीन तरुणांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणत व्यसनमुक्तीच्या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणा-या ज्येष्ठ समाजसेवक डॉ. अनिल अवचट यांना तसेच विधी क्षेत्रात ३५ वर्षे कार्यरत राहून १० हजार विद्यार्थी आणि एक हजार न्यायाधीश घडविणाऱ्या डॉ. सुधाकर आव्हाड यांच्या कार्याचा गौरव केला जाणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चूक महापालिकेची, शिक्षा मात्र नागरिकांना

$
0
0

शिवणे रस्त्याची कोंडी
म. टा. प्रतिनिधी, पुणे
शिवणे औद्योगिक वसाहतीकडे जाणारा जोडरस्ता राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीने (एनडीए) बंद केल्यामुळे शिवणेकरांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. महापालिका व लोकप्रतिनिधींच्या दुर्लक्षामुळे नवीन रस्ता नियोजित वेळेत पूर्ण न झाल्याने सामान्य नागरिकांना त्याची शिक्षा भोगावी लागत आहे. यातून तातडीने मार्ग न काढल्यास आंदोलन करण्याचा इशारा शिवणेकरांनी दिला आहे.
शिवणे औद्योगिक वसाहतीमधील शेकडो कामगार कुटुंबे आणि विशेषतः शाळकरी मुलांना याचा त्रास सहन करावा लागत आहे. शि‍वणे औद्योगिक वसाहतीमध्ये जाण्यासाठी एनडीएच्या मालकीच्या जागेतून वहिवाटीचा रस्ता होता. मात्र, एनडीएने भिंत बांधून हा वहिवाटीचा जोडरस्ता नुकताच बंद केला आहे. हा रस्ता बंद करण्यापूर्वी शिवणे औद्योगिक वसाहतीत जाण्यासाठी पर्यायी रस्ता तयार करावा आणि त्यासाठी महापालिकेला सहा महिन्यांची मुदतही एनडीएने दिली होती.
शिवणे औद्योगिक वसाहतीत जाणाऱ्या पर्यायी रस्त्यासाठी पावणेदोन कोटी रुपये निधी मंजूर झाला. त्यानंतर या रस्त्याचे कामही सुरू झाले. आता हे काम थांबले असून ते कधी पूर्ण होणार याची शाश्वती कोणालाही नाही. या रस्त्याच्या कामासाठी खोदकाम केल्यामुळे वाहने चालविणे कठीण झाले आहे. या औद्योगिक वसाहतीत सुमारे साडेपाचशेहून अधिक छोट्या-मोठ्या कंपन्या आहेत. शेकडो कामगार तेथे काम करतात. या भागात लोकवस्तीही मोठी आहे. या भागातील मुले शिक्षणासाठी अहिरे गावात येतात. एनडीएने रस्ता बंद केल्यामुळे मुलांना अहिरे गावातील शाळेत जाण्यासाठी दोन ते अडीच किलोमीटरचा वळसा मारून यावे लागते. त्यामुळे नागरिकांना त्रास होत असल्याचे चित्र आहे.
सध्याचा रस्ता पावसामुळे चिखलमय झालेला आहे. खाचखळगे आणि तुंबलेल्या पाण्यामुळे खड्ड्यांचा अंदाज येत नसल्याने अपघातही होत आहेत. त्यामुळे या रस्त्याचे काम तातडीने पूर्ण करण्यात यावे आणि हे काम होईपर्यंत तरी एनडीएचा रस्ता खुला करावा, अशी मागणी शिवणेकरांनी केली आहे. प्रसंगी त्यासाठी आंदोलन करण्याची तयारी शिवणेकरांनी दाखविली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रस्ते होणार मोठे

$
0
0

इमारतींचे नकाशे मंजूर करण्यापूर्वीच रुंदीकरणाचे क्षेत्राचा ताबा
म. टा. प्रतिनिधी, पुणे
इमारतींचे बांधकाम नकाशे मंजूर करण्यापूर्वीच तेथील रस्ता रुंदीकरणाचे क्षेत्र ताब्यात देण्याची सुविधा पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणामार्फत (पीएमआरडीए) उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्यामुळे प्राधिकरणाच्या कार्यक्षेत्रातील रस्त्यांचा विकास गतीने होण्यास मदत होणार आहे.
विकासाचा मार्ग हा नियोजबद्ध रस्त्यांच्या जाळ्यांमधून जातो, हाच मंत्र प्राधिकरणाच्या विकासासाठी यापुढे राबविला जाणार आहे. प्रचलित पद्धतीनुसार बांधकाम व्यावसायिकाने इमारतीचे नकाशे सादर केल्यानंतर त्यास मंजुरी दिली जाते. हे नकाशे मंजूर झाल्यावर रस्ता रुंदीकरणाचे क्षेत्र ताब्यात देण्यासंदर्भातील प्रस्ताव प्राधिकरणाकडे सादर केला जातो. हा प्रस्ताव मंजूर झाल्यानंतर संबंधित रस्त्याचे चटईक्षेत्र निर्देशांक (एफएसआय) मिळेल, असे गृहीत धरून बांधकाम व्यावसायिकांकडून बांधकामाचे फेरनकाशे सादर केले जातात.
या फेरनकाशांना प्राधिकरणाकडून मंजुरी मिळाल्यावर हस्तांतरित केलेल्या संबंधित रस्त्याचा 'एफएसआय' बांधकामामध्ये वापरता येतो. मात्र, प्रचलित पद्धतीत रस्त्यांचे क्षेत्र ताब्यात येण्यास विलंब होतो. तसेच नकाशांच्या फेरमंजुरीस विलंब लागत असल्यामुळे बांधकाम व्यावसायिकाचेही आर्थिक नुकसान होते. हा विलंब टाळण्यासाठी तसेच प्राधिकरणाच्या कार्यक्षेत्रातील रस्ते गतीने विकसित व्हावेत, यासाठी ही प्रचलित पद्धत रद्द करण्याचा निर्णय 'पीएमआरडीए'चे आयुक्त महेश झगडे यांनी घेतला आहे.
'इमारतींचे बांधकाम नकाशे मंजूर करण्यापूर्वी रस्ता रुंदीकरणात येणारे क्षेत्र प्रथम ताब्यात घेण्यात यावे आणि त्याचा मान्य एफएसआय ग्राह्य धरूनच बांधकाम नकाशे सादर करावेत,' असे आदेश झगडे यांनी दिले आहेत. या आदेशांमुळे फेरनकाशे तयार करून त्यास पुन्हा मान्यता घेण्याची गरज राहणार नाही आणि रस्ता रुंदीचे क्षेत्र ताब्यात आल्यामुळे त्या परिसरातील रस्ते विकसित करण्याचा मार्गही मोकळा होणार आहे. दरम्यान, 'पीएमआरडी'च्या कार्यक्षेत्रातील दहा किलोमीटरच्या परिसरात महापालिकेची बांधकाम नियमावली (डीसी रूल्स) लागू आहे. त्यामुळे या कार्यक्षेत्रापुरतेच हे आदेश लागू होणार आहेत. या सुविधेचा लाभ घेण्याचे बंधन बांधकाम व्यावसायिकांवर राहणार नाही तर ते ऐच्छिक ठेवण्यात आले आहे.
....
'इमारतींचे बांधकाम नकाशे मंजूर करण्यापूर्वी रस्ता रुंदीकरणात येणारे क्षेत्र प्रथम ताब्यात घेण्यात यावे आणि त्याचा मान्य एफएसआय ग्राह्य धरूनच बांधकाम नकाशे सादर करावेत.
- महेश झगडे, आयुक्त, पीएमआरडीए

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘एकच बेटरमेंट’ अन्यायकारक

$
0
0

चांगले कॉलेज न मिळाल्याचा पालक आणि विद्यार्थ्यांचा आरोप
म. टा. प्रतिनिधी, पुणे
अकरावी प्रवेशासाठी यंदा एकच बेटरमेंट देण्याचा अकरावीच्या केंद्रीय प्रवेश समितीचा निर्णय गुणवत्ताधारी विद्यार्थ्यांसाठी अन्यायकारक ठरल्याची ओरड पुढे आली आहे. एकच बेटरमेंटची संधी मिळाल्याने तुलनेत चांगल्या टक्केवारीच्या विद्यार्थ्यांना कमी टक्केवारी मिळालेल्या विद्यार्थ्यांच्या तुलनेत बऱ्या कॉलेजांवरच थांबावे लागल्याने ही ओरड पुढे आली आहे. त्यामुळे संतप्त पालक आता, 'आमच्या पाल्यांनी आणखी किती टक्के मिळवून दाखवायचे म्हणजे चांगले कॉलेज देणार,' असा सवाल उपस्थित करत आहे.
अकरावीच्या केंद्रीय प्रवेश नियंत्रण समितीने सुरुवातीलाच जाहीर केल्यानुसार, यंदा प्रक्रियेत सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्यांना बेटरमेंटची एकच संधी मिळली. त्यानुसार पहिल्या फेरीत प्रवेशित विद्यार्थ्यांना दुसऱ्या वा तिसऱ्या फेरीत, तर दुसऱ्या फेरीत प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांना तिसऱ्या वा चौथ्या फेरीत बेटरमेंटची एक संधी मिळणे शक्य झाले. त्यानुसार पहिल्या फेरीतील प्रवेश निश्चितीनंतर दुसऱ्या फेरीत बेटरमेंट मिळाल्यास, दुसऱ्याच फेरीत विद्यार्थ्यांनी प्रवेश अंतिम करणे गरजेचे होते. पहिल्या फेरीत अशी बेटरमेंट न मिळालेल्या, तसेच दुसऱ्या फेरीतून पहिल्यांदाच प्रवेशाची संधी मिळालेल्या अनेक विद्यार्थ्यांना पहिल्या फेरीत थेट प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांच्या तुलनेत कमी टक्केवारी आहे. कमी टक्केवारी असतानाही अशा विद्यार्थ्यांना मात्र बेटरमेंटच्या आधारे रिक्त जागांवर त्यांच्या प्राधान्यक्रमामध्ये वरची आणि तुलनेने चांगली समजली जाणारी कॉलेजे मिळाल्याचे तिसऱ्या फेरीतून अनुभवायला मिळाले. चौथ्थ्या फेरीमधून पहिल्यांदा बेटरमेंट मिळालेल्या विद्यार्थ्यांच्या बाबतीतही असाच प्रकार घडल्याचे सोमवारी स्पष्ट झाले.
समितीने प्रत्येक फेरीमध्ये गुणवत्तेचा निकष पाळला असला, तरी इतर फेऱ्यांशी तुलना होत असताना हा निकष मागे पडल्याचे निरीक्षणही समितीतील जाणकारांनीच 'मटा'शी बोलताना नोंदविले. त्यामुळे समितीने आपले निकष काटेकोरपणे पाळल्याचे एकीकडे दिसत असताना, दुसरीकडे तुलनेने चांगली टक्केवारी मिळविणारे विद्यार्थी, तुलनेने बऱ्या कॉलेजांमध्येच प्रवेशित झाली आहेत.
या विषयी समितीमधील तज्ज्ञांशी चर्चा केली असता, तिसऱ्या फेरीमध्येच हा प्रकार अनुभवायला मिळाल्याची नोंद या तज्ज्ञांनी केली. पालक आणि विद्यार्थ्यांच्या या विषयीच्या आक्षेपांमध्ये तथ्य असले, तरी समितीने सरकारी निर्णयानुसारच ही प्रक्रिया राबविली असल्याने सध्या त्यामध्ये काहीही ढवळाढवळ करणे शक्य नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. यापूर्वीच्या काळात समितीने विद्यार्थ्यांना एकूण प्रवेशफेऱ्यांच्या संख्येपेक्षा एकने कमी एवढ्या संख्येने बेटरमेंटची संधी दिली होती. त्यामुळे तुलनेने चांगल्या टक्केवारीच्या विद्यार्थ्यांना प्रवेश वर सरकणे शक्य झाले असले, तरी प्रवेशच न मिळणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या मोठी राहत होती. यंदा सरकारी आदेशामध्येच केवळ एका बेटरमेंटचा विचार झाल्याने, प्रवेशच न मिळालेल्या विद्यार्थ्यांची संख्या मर्यादित राहिल्याचे निरीक्षणही या तज्ज्ञांनी नोंदविले.
...
तक्रारीत तथ्य, सरकारकडे प्रस्ताव
या विषयी अकरावी केंद्रीय प्रवेश नियंत्रण समितीचे अध्यक्ष आणि पुणे विभागीय शिक्षण उपसंचालक दिनकर टेमकर यांना विचारले असता, या तक्रारीमध्ये तथ्य असल्याचे सांगण्यात आले. टेमकर म्हणाले, 'एकच बेटरमेंट देण्याच्या निकषामुळे ही अडचण उद्भवत आहे. अशा तक्रारींसोबतच लांब कॉलेज मिळाल्याच्या तक्रारी आणि अद्यापही प्रवेशच न मिळालेल्या विद्यार्थ्यांसाठीची प्रवेशनिश्चिती या विषयीही समितीकडे तक्रारी मिळाल्या आहेत. अशा तक्रारींवर मार्ग काढण्यासाठी समितीने सरकारकडे एक प्रस्ताव पाठविण्याचा निर्णय घेतला आहे. त्या विषयी समितीमध्ये चर्चा झाली आहे.'

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


पंधरा हजार विद्यार्थी अकरावीपासून दूरच

$
0
0

केंद्रीय समितीने मागवले सरकारकडून मार्गदर्शन

म. टा. प्रतिनिधी, पुणे
अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेच्या चार फेऱ्या झाल्यानंतरही यंदा जवळपास पंधरा हजार विद्यार्थी प्रवेशापासून दूरच आहेत. प्रवेशासाठी मिळालेल्या कॉलेजवर न गेलेल्या हजारो विद्यार्थ्यांसह, चार फेऱ्यांनंतरही कोणत्याही कॉलेजमध्ये प्रवेशनिश्चिती न झालेल्या १४२ विद्यार्थ्यांचा त्यामध्ये समावेश आहे. अशा सर्व विद्यार्थ्यांच्या प्रवेशांबाबत अकरावीच्या केंद्रीय प्रवेश समितीने राज्य सरकारकडून मार्गदर्शन मागविले आहे.
समितीने सोमवारी चौथ्या फेरीची प्रवेशनिश्चिती जाहीर केली. त्यानुसार, या फेरीतून एकूण ११ हजार ४३२ विद्यार्थ्यांचा प्रवेश निश्चित झाला. त्यात प्रथमच कॉलेजनिश्चिती मिळालेल्या पाच हजार ६७८ विद्यार्थ्यांसह बेटरमेंटची एक संधी मिळालेल्या पाच हजार ७५४ विद्यार्थ्यांचा समावेश आहे. कॉलेजांचे प्राधान्यक्रम चुकल्याने सायन्सला प्रवेश घेऊ इच्छिणारे १०७, तर कॉमर्समध्ये इंग्रजी माध्यमातून शिकण्याची इच्छा असलेल्या ३५ विद्यार्थ्यांना प्रवेश मिळाले नसल्याचे सोमवारी स्पष्ट झाले. चौथ्या फेरीतून प्रवेश मिळालेल्या सर्व विद्यार्थ्यांना सोमवारीच संपूर्ण फी भरून प्रवेश निश्चित करण्याचे निर्देश समितीने दिले होते.
या फेरीनंतर यंदा अकरावी प्रवेशाच्या एकूण दहा हजार ५९४ जागा रिक्तच राहिल्याचे समितीने सोमवारी जाहीर केले. रिक्त राहिलेल्या जागा आणि प्रवेश न मिळालेले विद्यार्थी यांचा मोठा आकडा विचारात घेता, अशा सर्व विद्यार्थ्यांना पुन्हा प्रक्रियेमधून रिक्त जागांवर गुणवत्तेनुसार प्रवेश देता येतील काय, या बाबत अकरावीच्या केंद्रीय प्रवेश नियंत्रण समितीच्या बैठकीमध्ये चर्चा झाल्याची माहिती अधिकृत सूत्रांकडून मिळाली. गुणवत्तेशी कोणतीही तडजोड न करता, रिक्त राहिलेल्या सर्व जागांवर योग्य पद्धतीने प्रवेश देण्यासाठी नेमकी काय प्रक्रिया राबविता येईल, या विषयी समितीने सरकारकडे एक प्रस्ताव सादर केला आहे. एकाच बेटरमेंटमुळे तुलनेने बऱ्या कॉलेजमध्ये प्रवेशनिश्चिती करावी लागलेल्या विद्यार्थ्यांबाबतही काही निर्णय घेता येईल का, या विषयीही या प्रस्तावामध्ये मार्गदर्शन विचारण्यात आल्याची माहिती सूत्रांनी 'मटा'ला दिली. समितीने सरकारचे सर्व नियम काटेकोर पाळले असले, तरी गुणवत्ताधारी विद्यार्थ्यांबाबत निर्माण झालेल्या समस्यांचा विचार करत समितीने ही पावले उचलल्याचेही या सूत्रांनी सोमवारी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ऑगस्ट- सप्टेंबरमध्येही मोठ्या पावसाचा अंदाज

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

'आतापर्यंत देशभरात समाधानकारक पाऊस झाला असून, ला निनाची सध्यस्थिती पाहता ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये सरासरीपेक्षा जास्त पावसाची शक्यता आहे,' अशी माहिती केंद्रीय भूविज्ञान मंत्रालयाचे सचिव डॉ. एम. राजीवन यांनी दिली.

इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ट्रॉपिकल मेट्रिओलॉजी (आयआयटीएम) येथे 'हवामान बदलांचा दक्षिण आशियावर परिणाम' या विषयावर आयोजित परिषदेचे उदघाटन डॉ. राजीवन यांच्या हस्ते झाले. या वेळी पत्रकारांशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली. डॉ. राजीवन म्हणाले,'एल निनोचा प्रभाव मान्सूनच्या सुरुवातीच्या काळात जाणवला होता. यंदा प्रशांत महासागरात ला निनाची स्थिती असल्यामुळे त्याचा अनुकूल परिणाम मान्सूनवर होईल अशी अपेक्षा होती. मात्र, यंदाच्या मान्सूनवर ला निनाचा म्हणावा तसा प्रभाव अद्याप जाणवलेला नसून, ऑगस्टपासून तो जाणवेल असे अंदाज आहेत. त्यामुळे ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये सध्यापेक्षा आणखी चांगल्या पावसाची शक्यता आहे. यंदा मान्सूनचा प्रवाह तीव्र असल्यामुळे त्यासोबत येणाऱ्या बाष्पामुळे देशभरात सर्वत्र चांगला पाऊस झाला आहे.' स्थानिक हवामान बदलांचा नेमका अंदाज घेऊन हवामान अंदाजांमध्ये त्यानुसार सुधारणा करण्याची आवश्यकता असल्याचे मत डॉ. राजीवन यांनी व्यक्त केले. स्थानिक पातळीवरील हवामानातील बदल टिपण्यासाठी भूविज्ञान मंत्रालयातर्फे लवकरच देशभरात पन्नास ठिकाणी अत्याधुनिक निरीक्षण यंत्रणा लावण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जादा आडत घेणाऱ्यांवर कारवाई

$
0
0

बाजार समिती प्रशासनाचा इशारा

म. टा. प्रतिनिधी, पुणे
खरेदीदारांकडून आडत वसूल करण्याचा निर्णय असल्याने त्याचा गैरफायदा घेऊन मार्केट यार्डातील व्यापाऱ्यांकडून जादा आडत वसुलण्यात येत आहे. नियमापेक्षा जादा आडत घेणाऱ्या व्यापाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल, असा इशारा पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीने व्यापाऱ्यांना दिला आहे. सहा टक्केच आडत घेण्यात यावी, अशी सूचनाही त्यांनी केली.
शेतकऱ्यांऐवजी खरेदीदारांकडून आडत घेण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. किरकोळ विक्रेत्यांकडून सहा टक्के आडत घेण्याचा नियम आहे. परंतु, मार्केट यार्डातील बड्या व्यापाऱ्यांनी याचा फायदा गैरफायदा घेऊन सहा टक्क्यांपेक्षा अधिक आडत घेण्यास सुरुवात केली आहे. त्याविरोधात किरकोळ विक्रेत्यांनी बाजार समिती प्रशासनाकडे तक्रार केली होती. त्या तक्रारीचा संदर्भ घेऊन बाजार समितीने मार्केट यार्डातील व्यापाऱ्यांना कारवाईचा इशारा दिला आहे.
'व्यापाऱ्यांनी किरकोळ विक्रेत्यांकडून सहा टक्के आडडत घेण्याचा नियम आहे. प्रत्यक्षात मात्र, व्यापारी १० ते १५ टक्के आडत वसूल करत आहेत. अशाप्रकारे बेकायदा आडत वसूल करणाऱ्यांना योग्य समज देण्यात येईल. जादा आडत घेण्याचे निदर्शनास आल्यास संबंधित व्यापाऱ्यावर निलंबनाची कारवाई करण्यात येईल,' असा इशारा पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती दिलीप खैरे यांनी दिला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ग्राहकांची प्रचंड गैरसोय

$
0
0

भाजीची आवक घटली; चढ्यादराने खरेदीची वेळ

म. टा. प्रतिनिधी, पुणे
आडत देणार नसल्याचे कारण पुढे करून किरकोळ विक्रेत्यांनी दुसऱ्या दिवशी बंद पुकारल्याने शहरातील विविध मंडईत सोमवारी शुकशुकाट होता. त्यामुळे भाजीपाला खरेदीसाठी मंडईत जाणाऱ्या ग्राहकांची निराशा झाली. नाईलाजास्तव हातगाड्यावर छोट्या प्रमाणात विक्री करणाऱ्या विक्रेत्यांकडून त्यांना चढ्या दराने भाजीखरेदी करण्याची वेळ आली.
शेतकऱ्यांऐवजी खरेदीदारांकडून आडत घेण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला. मार्केट यार्डातील व्यापाऱ्यांनी या निर्णयाची अंमलबजावणी सुरू केली आहे. निर्णयाला विरोध करण्यासाठी मार्केट यार्डातील विक्रेत्यांनी शेतीमालाची खरेदी थांबवली. त्यामुळे शेतकऱ्यांचा माल पडून राहिला. परिणामी, त्यांचे मोठे नुकसान झाले. भाजीविक्री बंदमुळे शहरातील विविध भागातील मंडईमध्ये शुकशुकाट होता. भाजीपाला विक्री बंद केल्यामुळे किरकोळ विक्रेत्यांनी दुकानाला टाळे लावून बसणे पसंत केले. त्यामुळे मंडईत खरेदीसाठी येणाऱ्या ग्राहकांना मात्र हात हलवत परतण्याची वेळ आली.
'पुण्याजवळच्या शेतकऱ्यांनी सोमवारी मार्केट यार्डात मोजकाच शेतीमाल आणला. येथे खरेदी बंद असल्याच्या पार्श्वभूमीवर बहुतांश शेतकऱ्यांनी माल मुंबईला पाठविला. त्यामुळे आम्ही शेतकऱ्यांना माल न आणण्याचे आवाहन केले होते. माल खरेदी होणार नसल्याने शेतकऱ्यांचे नुकसान होऊ नये, असा त्यामागील आमचा हेतू आहे. मात्र, शिल्लक राहिलेल्या मालाची विक्री आम्ही सुरू केली आहे,' अशी माहिती भाजीविक्रेते विलास भुजबळ यांनी दिली.
'किरकोळ भाजीपाला विक्रेत्यांच्या बंदमुळे सोमवारी बाजारात शेतमालाची आवक घटली. केवळ ४० टक्केच मालाची आवक झाली. पिंपरी उपबाजारात १६.७ टक्के, मोशी उपबाजारात २९.३ टक्के, मांजरी उपबाजारात ७२ टक्के शेतीमालाची आवक झाली. बाजार समिती प्रशासनाची पणन मंडळ आणि महापालिका प्रशासनाबरोबर आज, मंगळवारी सकाळी साडेनऊ वाजता बैठक होणार आहे. बैठकीत शहरात विविध २० ठिकाणी विविध शेतमाल विक्री स्टॉल उभारण्याबाबत नियोजन करण्यात येईल. तसेच, पणनचे शेतकरी आठवडी बाजार नियमित सुरू करण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहेत,' अशी माहिती पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती दिलीप खैरे यांनी दिली.
..
आडत देण्याला विरोध करण्यासाठी शहर, पिंपरी-चिंचवड आणि जिल्ह्यातील एकूण ३४ भाजीपाला मंडईतील विक्रेत्यांनी शनिवारपासून बंद पाळला. आडत देण्यासंदर्भात बाजार समिती प्रशासनाने चर्चा करून तोडगा न काढल्यास भाजीपाला विक्रेत्यांचा कायम राहील.
संजय यादव, खरेदीदार, महात्मा फुले मंडई
..
कामगारांचे आज उपोषण
आडत वसुलीच्या निर्णयामुळे हमाल, तोलणार, स्त्री कामगार, टेम्पो चालक आणि हातगाडीवाल्यांना त्रास सहन करावा लागत आहे. सरकारच्या या निर्णयाचा निषेध करण्यासाठी अंगमेहनती कष्टकरी संघर्ष समिती आणि श्री छत्रपती शिवाजी मार्केटयार्ड कामगार युनियन यांच्यातर्फे आज, मंगळवारी सकाळी ९ ते सायंकाळी ५ दरम्यान, मार्केट यार्डातील शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर लाक्षणिक उपोषण करण्यात येणार आहे, अशी माहिती युनियनचे अध्यक्ष डॉ. बाबा आढाव, कामगार युनियनचे सचिव संतोष नांगरे यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अपघाती मृत्यूप्रकरणी अभ्यंकरांना जामीन

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

दुचाकीला पाठीमागून कारने जोरात धडक दिल्यामुळे झालेल्या अपघातात महिला मृत्यूमुखी पडल्याप्रकरणी अटक करण्यात आलेले कॉसमॉस बँकेचे मानद अध्यक्ष डॉ. मुकुंद अभ्यंकर यांची कोर्टाने १५ हजार रुपयांच्या जामिनावर सुटका केली. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी व्ही. बी. गुळवे पाटील यांच्या कोर्टाने हा आदेश दिला.
भांडारकर रोड येथे रविवारी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास झालेल्या अपघातात अरुंधती हसबनीस (वय २९) यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी डेक्कन पोलिसांनी अभ्यंकर यांना अटक करून कोर्टात हजर केले होते. विक्रम सुशील धूत (३५, रा. इंद्रजीत अपार्टमेंट, शिवाजीनगर) यांनी फिर्याद दिली आहे. अरुंधती या पंजाब नॅशनल बँकेमध्ये नोकरी करत होत्या. त्यांचे पती एका कंपनीमध्ये नोकरी करतात. त्यांना अडीच वर्षांचा मुलगा आहे. रविवारी दुपारी अरुंधती दुचाकीवरून भांडारकर रोडवरून मैत्रिणीकडे निघाल्या होत्या. लॉ कॉलेज रोडकडून गुडलक हॉटेलच्या दिशेने जात असताना अभ्यंकर यांच्या कारने धडक दिल्याने झालेल्या अपघात त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी डेक्कन पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

साडेतीनशे कोटींच्या वर्गीकरणाला मान्यता

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे शहरात स्मार्ट सिटी योजनेच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या समान पाणीपुरवठा योजना, जायका प्रकल्प, बीआरटी यांसह ५१ प्रकल्प पूर्ण करण्यासाठी बजेटमध्ये भांडवली कामांसाठी प्रस्तावित केलेल्या निधीला १५ टक्के कात्री लावून ३५० कोटी रुपये देण्याचे मान्य करण्यात आले. सोमवारी झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत महापालिका आयुक्त कुणाल कुमार यांनी ठेवलेल्या प्रस्तावाला मान्यता देण्यात आली. शहरातील विविध भागांत पुढील काही दिवसांत पालिका प्रशासनाकडून लहान मोठ्या स्वरूपाचे ५१ प्रकल्प राबविले जाणार आहेत. यामध्ये वारजे येथे जलशुद्धीकरण केंद्राची उभारणी, खडकवासला येथे नव्याने जॅकवेल, राष्ट्रीय नदी सुधारणा योजनेअंतर्गत मुळा-मुठा नदीकाठ सुधारणा कार्यक्रम, समान पाणीपुरवठा, एचसीएमटीआरसाठी भूसंपादन, सिंहगड रस्त्याला पर्यायी रस्ता म्हणून कॅनॉल रस्त्याची बांधणी, विविध भागांत उड्डाणपुलांची उभारणी, उड्डाणपुलांची अपूर्ण कामे, लाइट हाउस, फूटपाथ, बीआरटी मार्ग, वैयक्तिक शौचालये, महापालिकेची नवीन इमारत ही कामे केली जाणार आहेत. शहरातील विविध भागांत हे प्रकल्प राबविण्यासाठी सुमारे ४३० कोटी रुपये खर्च येणार आहे. या प्रकल्पांसाठी केंद्र आणि राज्य सरकारकडून अनुदान स्वरूपात ८० कोटी रुपये पालिकेला मिळणार आहेत. त्यामुळे उर्वरित साडेतीनशे कोटी रुपये भांडवली खर्चातून देण्याचा प्रस्ताव पालिका प्रशासनाने ठेवला होता. स्थायी समितीच्या मागील दोन बैठकांमध्ये हा प्रस्ताव पुढे ढकलण्यात आला होता. मात्र सोमवारी हा प्रस्ताव मंजूर करण्यात आला. त्यामुळे स्मार्ट सिटी प्रकल्पासाठी ३५० कोटी रुपये उपलब्ध होणार आहेत. समि‌तीच्या बैठकीत हा प्रस्ताव मान्य करण्यात आल्याचे समितीचे अध्यक्ष बाळासाहेब बोडके यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चित्रसृष्टीत लवकरच वेतनवाढ

$
0
0

चित्रपट महामंडळाचा निर्णय; कलाकारांच्या वेतनात २५ ते ३० टक्के वाढ

Aditya.Tanawade@timesgroup.com

पुणे : चित्रपटसृष्टीत काम करून पोट भरणाऱ्या हजारो कामगारांच्या किमान वेतनामध्ये वाढ करण्याचा निर्णय चित्रपट महामंडळाने घेतला आहे. त्यामुळे चित्रसृष्टीत काम करणाऱ्या तंत्रज्ञ आणि कलाकारांचे लवकरच 'अच्छे दिन' येणार आहेत. लेखक, दिग्दर्शक आणि तंत्रज्ञ यांच्या किमान वेतनात २५ ते ३० टक्क्यांची वाढ होणार आहे.
चित्रपट महामंडळाकडून १० वर्षांपूर्वी कर्मचाऱ्यांच्या किमान वेतन श्रेणीमध्ये बदल करण्यात आले होते. तेव्हापासून आजपर्यंत कलाकारांचे किमान मानधन ठरवण्यासाठी १० वर्षांपूर्वीचीच श्रेणी वापरली जाते. मात्र, सध्याची वस्तुस्थिती लक्षात घेता तत्कालीन वेतन श्रेणी अत्यंत कमी आहे. त्यामुळे त्यामध्ये वाढ करण्याचा निर्णय सध्याच्या चित्रपट महामंडळाच्या कार्यकारिणीने घेतला असून, येत्या ३० ऑगस्ट रोजी होणाऱ्या बैठकीत किमान वेतनाची श्रेणी ठर‍वण्यात येणार असून, वेगवेगळ्या विभागांनुसार वेतनश्रेणीत वाढ करण्यात येणार आहे.
चित्रपट सृष्टीमध्ये तंत्रज्ञ, लाइटमन, स्पॉट बॉय, मेकअप आर्टिस्ट, कॉस्च्युम, सेट डिझायनर, प्रॉडक्शन मॅनेजर, सहायक दिग्दर्शक, ध्वनिरेखन, कला दिग्दर्शक, गीतकार, संगीतकार, कथाकार, पटकथाकार, संहिता लेखक, दिग्दर्शक, संकलन, कलाकार, ज्युनिअर आर्टिस्ट अशा विविध विभागांमध्ये चित्रपटासाठी काम करणाऱ्या कलाकार आणि तंत्रज्ञांना किमान वेतन किती मिळावे, या संदर्भात चित्रपट महामंडळाकडून नियमावली तयार करण्यात आली आहे. या नियमावलीत १० वर्षांपूर्वी बदल करून किमान वेतनाची पुनर्रचना करण्यात आली होती. त्यानुसार वेतन देणे चित्रपट निर्मात्यांना बंधनकारक होते. आता मात्र या नियमावलीत बदल करून किमान वेतनाची रक्कम महामंडळाच्या संचालकांकडून वाढवण्यात येणार आहे.
सध्या नियमावलीनुसार चित्रपटाच्या दिग्दर्शकाला २ लाख ५० हजार एवढे किमान वेतन देणे बंधनकारक आहे. त्याच प्रमाणे लेखकांसाठी ३५ हजार, गीतकारांसाठी १० हजार (एका गाण्यासाठी), संकलनासाठी ७० हजार, नृत्य दिग्दर्शकाला २५ हजार, रंगभूषाकार ४ हजार (एका दिवसासाठी),सहायक अभिनेता ५ हजार (एका दिवसासाठी) अशी वेतन श्रेणी ठरवण्यात आली आहे. मात्र, सद्य परिस्थिती पाहता कोणताही कलाकार एवढ्या कमी पैशांमध्ये काम करत नाही. त्यामुळे बऱ्याचदा निर्माते आणि कलाकारांमध्ये होणाऱ्या कंत्राटामध्ये वेतन श्रेणीनुसार रक्कम नमूद करण्यात येते आणि प्रत्यक्षात मात्र कलाकारांना जास्त पैसे द्यावे लागतात. यातून अनेकदा निर्माते आणि कलाकार, तंत्रज्ञ यांच्यामध्ये वाद निर्माण होतात. या सर्व बाबी लक्षात घेता, किमान वेतनाच्या रकमेत वाढ करण्याचा निर्णय चित्रपट महामंडळाने घेतला आहे. सेट उभारणाऱ्या कामगारापासून ते थेट दिग्दर्शकापर्यंत सर्वांच्या वेतन श्रेणीत वाढ करण्यात येणार आहे.
..
गेल्या दहा वर्षांत किमान वेतन श्रेणीमध्ये वाढ करण्यात आलेली नाही. त्यामुळे महामंडळाच्या कार्यकारिणीवर आल्यानंतर वेतनवाढीचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार साधारणतः २५ ते ३० टक्क्यांची वाढ करण्यात येणार आहे. महामंडळाकडून हा ठराव झाल्यानंतर पुढील सर्व चित्रपटांसाठी निर्मात्यांना नव्या श्रेणीनुसार वेतन देणे बंधनकारक राहील. कलाकार आणि तंत्रज्ञांच्या दृष्टीने महामंडळाने महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे.
मेघराज राजेभोसले, अध्यक्ष, अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


नवीन बसखरेदीसाठी स्थायी समितीची मान्यता

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे शहरातील सार्वजनिक वाहतूक अधिक सक्षम व्हावी, यासाठी पुणे महानगर परिवहन महामंडळ लिमिटेडसाठी (पीएमपीएमएल) नवीन १ हजार ५५० बस खरेदी करण्याचा प्रस्ताव सोमवारी स्थायी समितीच्या बैठकीत मान्य करण्यात आला. पुणे महापालिका, पिंपरी चिंचवड महापालिका, वित्तीय संस्थांकडून कर्ज घेऊन तसेच 'असोसिएशन ऑफ स्टेट रोड ट्रान्स्पोर्ट अंडरटेकिंग' (एसआरटीओ) या राज्य सरकारच्या संस्थेकडून या बसची खरेदी केली जाणार आहे. पीएमपीएमएलसाठी खरेदी केल्या जाणाऱ्या पाचशे बस पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिकेच्या बजेटमधून, पाचशे बस विविध संस्थांकडून कर्ज घेऊन, तर उर्वरित साडेपाचशे बस राज्य सरकारच्या 'असोसिएशन ऑफ स्टेट रोड ट्रान्स्पोर्ट अंडरटेकिंग' (एएसआरटीयू) या संस्थेकडून भाडेतत्त्वावर घेतल्या जाणार आहेत. शहराचा होत असलेला वाढता विस्तार लक्षात घेता सार्वजनिक वाहतुकीचे तीन तेरा वाजलेले आहेत. शहरातील वाहतुकीच्या दृष्टीने 'पीएमपी'ला ३१०० बसची आवश्यकता आहे. त्यापैकी २१०० बस 'पीएमपी'कडे आहेत. यापैकी केवळ १५०० बस या रस्त्यावर धावण्याच्या स्थितीत असल्याने प्रवाशांना चांगली सेवा मिळत नाही. बस वेळेत मिळत नसल्याने इच्छा नसतानाही नागरिकांकडून दुचाकी आणि चारचाकी वाहनांचा वापर केला जातो. शहरातील सार्वजनिक वाहतूक सक्षम करण्यासाठी काही बस विकत, तर काही बस भाडेतत्त्वावर घेण्याचा प्रस्ताव बैठकीत मांडण्यात आला होता. त्याला मान्यता देण्यात आल्याचे समितीचे अध्यक्ष बाळासाहेब बोडके यांनी सांगितले.

'आयटीडीपी'सोबत होणार करार वाहतूक क्षेत्रातील प्रकल्पांसाठी कोणतेही शुल्क न घेता काम करणाऱ्या 'आयटीडीपी' या वाहतूक क्षेत्रातील तज्ज्ञ स्वयंसेवी संस्थेबरोबर करार करण्यास सोमवारी मान्यता देण्यात आली. या संस्थेबरोबर करार करण्याचा प्रस्ताव यापूर्वी मंजूर झाला होता. परंतु, गेल्या आठवड्यात पुन्हा नामंजूर करून तो दफ्तरी दाखल करण्यात आला होता. सोमवारी झालेल्या बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपच्या एकूण आठ सदस्यांनी कराराच्या बाजूने तर, काँग्रेस, मनसे आणि शिवसेनेच्या एकूण सात सदस्यांनी विरोधात मतदान केले. त्यामुळे आठविरुद्ध सात मतांनी हा प्रस्ताव मंजूर झाला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मुस्तफा आतार यांना देवर्षी नारद पुरस्कार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
विश्वसंवाद केंद्र आणि डेक्कन एज्युकेशन सोसायटीतर्फे पत्रकारितेसाठी दिला जाणारा देवर्षी नारद युवा पत्रकार पुरस्कार 'महाराष्ट्र टाइम्सचे' पत्रकार मुस्तफा आतार यांना जाहीर झाला आहे. त्याचबरोबर ज्येष्ठ पत्रकार दिलीप धारूरकर, छायाचित्रकार गणेश कोरे, शेफाली वैद्य यांनाही पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे. येत्या शनिवारी (२३ जुलै) सकाळी १०.३० वाजता फर्ग्युसन महाविद्यालयाच्या अॅम्फी थिएटर येथे होणाऱ्या कार्यक्रमात भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस राम माधव यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान केले जाणार आहेत.
विश्व संवाद केंद्राचे अध्यक्ष मनोहर कुलकर्णी आणि डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे शरद कुंटे यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. अभय कुलकर्णी, रवींद्र घाटपांडे, मिलींद कांबळे आदी या वेळी उपस्थित होते. पत्रकारिता क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरीसाठी हा पुरस्कार प्रदान केला जातो. यंदाच्या पुरस्कारार्थींनीही निःपक्षपातीपणे सामान्य नागरिकांच्या समस्यांना वाचा फोडली आहे, असे कुलकर्णी यांनी सांगितले.
देवर्षी नारद पुरस्काराचे यंदाचे हे ६ वे वर्ष असून, ज्येष्ठ पत्रकार, युवा पत्रकार, छायाचित्रकार आणि सोशल मीडिया आदी चार विभागांमध्ये पुरस्कार देण्यात येतात. यापूर्वी ज्येष्ठ पत्रकार राजीव खांडेकर, उदय निरगुडकर, 'महाराष्ट्र टाइम्स'च्या पुणे आवृत्तीचे संपादक पराग करंदीकर, किरण ठाकूर यांना या पुरस्काराने गौरविण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रस्ते दुरुस्त न केल्याने महामंडळावर कारवाई

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे स्वारगेट चौकातील रस्त्याची देखभाल दुरुस्तीची जबाबदारी योग्य पद्धतीने पार न पडल्याने राज्य रस्ते विकास महामंडळावर (एमएसआरडीसी) दंडात्मक कारवाई करण्याचे आदेश महापौर प्रशांत जगताप यांनी सोमवारी दिले. स्वारगेट जवळील जेधे चौकातील उड्डाणपुलाच्या आजूबाजूला पडलेले खड्डे तातडीने बुजविण्याच्या सूचना महापौरांनी एमएसआरडीसीला दिल्या आहेत. शहरातील रस्त्यांवर पडलेले खड्डे बुजविण्याचे आदेश महापौर प्रशांत जगताप यांनी पालिका प्रशासनाला दिले होते. स्वारगेट चौकात उभारण्यात आलेल्या उड्डाणपुलाच्या खाली मोठ्या प्रमाणात खड्डे पडल्याने वाहनचालकांना त्रास होत होता. या रस्त्याच्या देखभाल दुरुस्तीची जबाबदारी एमएसआरडीसीची असल्याने त्यांनी तातडीने हे खड्डे बुजवावेत, असे आदेश महापौरांनी त्यांना दिले होते. मात्र, अद्यापही हे खड्डे बुजविले गेले नसल्याचे समोर आल्याने त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात येणार असल्याचे जगताप यांनी स्पष्ट केले. शहरातील विविध भागांतील रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांचा अहवाल पालिकेच्या पथ विभागाकडून मागविण्यात‌ आला आहे. विविध रस्त्यांवर पडलेले खड्डे बुजविण्यासाठी सोमवारपर्यंतची (१८ जुलै) मुदत पालिका प्रशासनाने दिली होती. मात्र या मुदतीनंतरही ज्या रस्त्यावरील खड्डे बुजविले गेले नाहीत, त्याचा सविस्तर अहवाल देण्याच्या सूचना जगताप यांनी केल्या आहेत.

भाजपतर्फे आंदोलन शहराला खड्ड्यात घालण्यात पालिकेतील सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेस आणि पालिका प्रशासन जबाबदार असल्याचा आरोप करत सोमवारी सर्वसाधारण सभेत आंदोलन करण्यात आले. भारतीय जनता पक्षाच्या सभासदांनी हे आंदोलन केले. या वेळी राष्ट्रवादी काँग्रेस, पालिका प्रशासन यांच्या धिक्काराच्या घोषणा देत सभागृहात निषेध करण्यात आला. हातात निषेधाचे फलक घेऊन भाजपचे गटनेते गणेश बीडकर यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

लोकमान्यांच्या घोषणेच्या शतकपूर्तीनिमित्त कार्यक्रम

$
0
0

मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत शनिवारी प्रारंभ

म. टा. प्रतिनिधी, पुणे
लोकमान्य टिळकांनी 'स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे, आणि तो मी मिळवणारच' अशी सिंहगर्जना करून देशभरातील स्वातंत्र्यसैनिकांमध्ये क्रांतीची ज्योत पेटवली. या घोषणेच्या शतकपूर्तीवर्षाला सुरुवात होत आहे. त्या निमित्त लोकमान्य टिळक विचारमंच आणि पुणे इंटरनॅशनल सेंटरतर्फे वर्षभर विविध उपक्रम राबवण्यात येणार असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या उपक्रमांना प्रारंभ करण्यात येणार आहे.
येत्या शनिवारी (२३ जुलै) सकाळी ११ वाजता टिळक स्मारक मंदिरात होणाऱ्या कार्यक्रमात मुख्यमंत्री विविध उपक्रमांचा शुभारंभ करणार असल्याची माहिती नगरसेविका मुक्ता टिळक यांनी पत्रकार परिषदेत दिली. लोकमान्य विचार मंचाचे अध्यक्ष शैलेश टिळक या वेळी उपस्थित होते. डॉ. रघुनाथ माशेलकर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असून, पालकमंत्री गिरीश बापट, डॉ. विजय केळकर यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.
मुक्ता टिळक म्हणाल्या, '१९१६मध्ये ब्रिटिश राजवटीविरोधात लोकमान्यांनी सिंहगर्जना करून देशभरात क्रांतीची मशाल पेटवली. ही एक ऐतिहासिक घटना होती. याच वर्षात ब्रिटिशांविरोधात अनेक बंड करण्यात आले. लोकमान्यांच्या सिंहगर्जनेचा संपूर्ण देशावर परिणाम झाला. या घोषणेच्या शतकपूर्ती वर्षानिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. उपक्रमाच्या शुभारंभाच्या कार्यक्रमात 'टिळक इन अवर टाइम्स'या पुस्तकाचे तसेच, लोकमान्यांवर आधारित फोटोबायोग्राफीच्या पुस्तकाचेही प्रकाशन करण्यात येणार आहे. डॉ. माशेलकर, ज्येष्ठ पत्रकार दिलीप पाडगांवकर यांनी पुस्तकाचे संपादन केले आहे. डॉ. माशेलकर, खासदार अनु आगा, बाबा कल्याणी, इन्फोसिसचे नारायणमूर्ती आदींच्या लेखांचा पुस्तकात समावेश करण्यात आला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘मंथली मेस’चा वाढता जोर

$
0
0

मध्यवर्ती पेठांमधील घरगुती चवीला विद्यार्थ्यांची पहिली पसंती

Kuldeep.Jadhav@timesgroup.com

पुणे : शहराच्या मध्यवस्तीपासून अगदी उपनगरांपर्यंत सर्वच ठिकाणी हॉटेल व्यवसाय वाढीस लागला आहे. त्यामुळे गेल्या एक ते दीड दशकांपूर्वी अस्तित्वात असलेल्या खानावळी किंवा 'मंथली मेस'ची संख्या खूपच कमी होत आहे. मात्र, या उलट परिस्थिती सदाशिव आणि नारायण या पेठांमध्ये पाहायला मिळत आहे. गेल्या काही वर्षांत येथील 'मंथली मेस'चे प्रमाण वाढले असून, सातत्याने त्यात वाढ होत असल्याचे चित्र आहे.
शिक्षणासाठी किंवा स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी लाखो विद्यार्थी दरवर्षी बाहेरगावहून पुण्यात दाखल होतात. त्यांच्यापैकी शहराच्या मध्यवस्तीत राहणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रमाण अधिक आहे. मध्यवस्तीत विशेषतः सदाशिव पेठ, नारायण पेठ, शनिवार पेठ आणि कसबा या पेठांमधील खासगी वसतिगृहांमध्ये तसेच, खोल्या भाड्याने घेऊन किंवा कॉट बेसिसवर राहणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या अधिक आहे. त्यामुळे दोन वेळच्या जेवणासाठी या विद्यार्थ्यांना मेस किंवा घरगुती डब्यांची गरज भासते. या पार्श्वभूमीवर या पेठांमध्ये भाजी-पोळी केंद्रे, मेस किंवा घरगुती खानावळींची संख्या अधिक आहे.
शहरात हॉटेल व्यवसाय वाढण्यापूर्वी मंथली मेस, घरगुती पद्धतीचे जेवण देणारी हॉटेल, खानावळी किंवा डबेवाल्यांची संख्या अधिक होती. त्यानंतर कालांतराने याचे प्रमाण कमी होत गेले. मात्र, मध्यंतरी शहरात स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या वाढू लागली. त्यातच स्पर्धा परीक्षांसाठी मार्गदर्शन करणाऱ्या आणि क्लासेस घेणाऱ्या संस्थाही शहराच्या मध्यवस्तीतच सुरू झाल्या. त्यामुळे अन्य कोणत्याही भागाच्या तुलनेत शहराच्या मध्यवस्तीत राहणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रमाण खूप जास्त आहे. यातील बहुसंख्य विद्यार्थी कमावते नसल्याने मुबलक दरात जेवण मिळविण्यासाठी त्यांची धडपड सुरू असते. मध्यवर्ती भागातील पेठांमध्ये मंथली मेसच्या व्यवसायासाठी पोषक वातावरण निर्माण झाले. या ठिकाणी पोळी भाजीपासून संपूर्ण घरगुती थाळी किंवा डबा उपलब्ध होतो.
मंथली मेस किंवा डबेवाल्यांकडे अगदी ४० रुपयांपासून एकवेळचा डबा किंवा थाळी उपलब्ध आहे. सदाशिव पेठेत नागनाथ पार येथून पुणे विद्यार्थीगृहाकडे जाणाऱ्या रस्त्यावर, रेणुकास्वरुप शाळेजवळ, ज्ञानप्रबोधिनीजवळ, गांजवे चौक आदी ठिकाणी मंथली मेस आहेत. गोगटे प्रशालेजवळ, ओंकारेश्वर मंदिर, नवीन मराठी शाळा, रमणबाग प्रशाला या परिसरातही मेसची संख्या अधिक आहे.
-------
नोकरदारांचाही मेसकडे ओढा
नियमित विद्यार्थ्यांचा मंथली मेसला चांगला प्रतिसाद मिळतो. त्याबरोबरच बाहेरगावहून नोकरीसाठी पुण्यात स्थायिक झालेल्या तरुणांकडून त्याचा लाभ घेतला जातो. मार्केटिंग किंवा फिरतीची नोकरी करणारे अनेक तरुण थाळी पद्धतीच्या मेस किंवा हॉटेलमध्ये रांग लावून बसलेले असतात.
------
पाच रुपयांपासून चंगळ
सध्या सर्वत्र महागाईची चर्चा ऐकायला मिळते. 'पाच, दहा रुपयांमध्ये काय मिळते,' हा संवाद तर सर्रास कानी पडतो. मात्र, या मध्यवर्ती पेठांमध्ये अगदी पाच रुपयांपासून नाष्ट्याची सोय उपलब्ध आहे. पाच रुपयात वडापाव आणि दहा रुपयात उपीट, पोहे, खिचडी, शिरा असे पदार्थ मेन्यू कार्डवर दिसून येतात. या ठिकाणीही विद्यार्थी ग्राहकांचेच प्रमाण सर्वाधिक असते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images