Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

‘एमडी’ प्रवेशात फसवणूक

$
0
0

विद्यार्थिनीकडून घेतले ५२ लाख
म. टा. प्रतिनिधी, पुणे
पिंपरी येथील डी. वाय. पाटील मेडिकल कॉलेजमध्ये एमडीला प्रवेश मिळवून देण्याच्या आमिषाने एका तरुणीची ५२ लाखांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी बंडगार्डन पोलिस ठाण्यात तिघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत शायना पटेल (२६, रा. बिलासीस रोड, मुंबई) यांनी तक्रार दिली आहे. त्यावरून नवल किशोर शिंदे (रा. रेंजहिल खडकी), आदित्य देशमुख, उन्मेश निलफवार यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पटेल यांना एमडीसाठी प्रवेश हवा होता. त्याची चौकशी करत असताना एका ओळखीच्या व्यक्तीमार्फत आरोपींची त्यांना माहिती मिळाली. त्यानुसार आरोपींनी त्यांना पिंपरी येथील डी. वाय. पाटील मेडिकल कॉलेजमध्ये एमडीला प्रवेश मिळवून देण्याचे आश्वासन दिले. त्यासाठी आरोपींनी त्यांच्याकडून एका नामांकित हॉटेलमध्ये भेट घेऊन ९० लाख रुपये घेतले. पण, त्यांना एमडीला प्रवेश न मिळवून दिला नाही. त्यामुळे पटेल यांनी आरोपींकडे पैशाची मागणी केली. त्या वेळी त्यांनी सुरुवातीस ३८ लाख रुपये दिले. उर्वरित रक्कम काही दिवसांनी देतो, असे सांगितले.
पटेल यांनी अनेक वेळा त्यांच्याकडे पैशाची मागणी केली. पण, त्यांना आरोपींनी उर्वरीत ५२ लाख रुपये दिले नाही. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर पटेल यांनी बंडगार्डन पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. या प्रकरणी सहायक पोलिस निरीक्षक एस. एम. पवार हे अधिक तपास
करत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


प्रवेश घेताना दलालांपासून सावध

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
कॉलेजमध्ये प्रवेश मिळवून देण्याच्या आमिषाने अनेकांची फसवणूक झाल्याच्या घटना घडल्या आहेत. आता प्रवेशप्रक्रिया सुरू होत असल्यामुळे पालक व विद्यार्थ्यांनी प्रवेश घेताना काळजी घ्यावी. तसेच, प्रवेश मिळवून देण्यासाठी पैसे मागत असतील तर, अशा लोकांची पोलिसांना माहिती द्यावी, असे आवाहन आर्थिक गुन्हे शाखेकडून करण्यात आले आहे. पुणे शहरात एमबीए, इंजिनीअरिंग, मेडिकल यासारख्या उच्च शिक्षणासह अन्य अभ्यासक्रमांना संपूर्ण देशभरातून विद्यार्थी येताता. पुण्यातील प्रतिष्ठित महाविद्यालयांमध्ये प्रवेश मिळावा यासाठी पालकांची पैसे देण्याचीही तयारी असते. त्यामुळे अनेक दलालांचे फावत आहे. उच्च शिक्षणासाठी प्रवेश घेण्यासाठी शिक्षण संस्थांकडूनच याचा बाजार मांडला जात आहे. त्यासाठी त्यांनी नेमलेले दलाल संस्थेच्या डोनेशनसह सर्व खर्चासाठी लाखो रुपये पालकांकडून उकळतात. या प्रकारचे अनेक गुन्हे पोलिसांकडे दाखल असून, त्यामध्ये लाखोंची फसवणूक झाली आहे. दलालाच्या आमिषाला अनेक पालक व विद्यार्थी बळी पडले आहेत. त्यामुळे आर्थिक फसवणूक होऊ नये म्हणून काळजी घ्यावी. दलालांच्या भुलथापांना पालकांनी बळी पडू नये. तसेच, पैसे मागून कोणी प्रवेश मिळवून देण्याचे सांगत असेल तर पोलिसांकडे संपर्क साधावा, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.
00

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मराठा लाइट इन्फंट्रीत सहा जूनपासून भरती

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
सेवारत सैनिक, माजी सैनिक, विधवा, युद्ध विधवांच्या पाल्यांसाठी; तसेच वीरमरण आलेल्यांची सख्खी भावंडे व खेळाडूंसाठी मराठा लाइट इन्फंट्रीमध्ये काही पदांची भरती करण्यात येणार आहे. बेळगाव (कर्नाटक) येथील इन्फंट्री बटालियनच्या शिवाजी स्टेडियम येथे सहा जूनपासून ही प्रक्रिया सुरू होईल.
सोल्जर जीडी, सोल्जर ट्रेडसमन आणि सोल्जर क्लार्क (एसडी) या पदांसाठी युनिट सैन्य भरतीचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी कर्नल बिपीन शिंदे (निवृत्त) यांनी दिली.
सहा जून रोजी सोल्जर जीडी, आठ जून रोजी सोल्जर ट्रेडमन व नऊ जून रोजी सोल्जर क्लार्क (एसडी) या पदांसाठी भरती होणार आहे. १३ ते २८ जून दरम्यान कागदपत्रांची पडताळणी आणि वैद्यकीय तपासणी होणार आहे.
अर्जासोबत शाळा सोडल्याचा दाखला, शैक्षणिक कागदपत्रे, तहसीलदार किंवा उपायुक्तांनी स्वाक्षरी केलेले अधिवास प्रमाणपत्र व डोमिसाइल सर्टिफिकीट, गॅझेटेड ऑफिसरच्या स्वाक्षरीसह फोटो लावलेला परमनंट रेसिडेंसी दाखला, कंडक्ट प्रमाणपत्र, रिलेशन अथवा अविवाहीत प्रमाणपत्र, जातीचे प्रमाणपत्र, एनसीसी प्रमाणपत्र आदी कागदपत्रे जोडणे आवश्यक आहे. अर्जासोबत १५ रंगीत छायाचित्रे व गावच्या सरपंचांच्या स्वाक्षरीसह मूळ कुटुंबाचे छायाचित्र नाव व नात्यासह जोडणे आवश्यक आहे. भरतीसाठी अर्जासोबत मूळ कागदपत्रे जोडणे आवश्यक आहे. मूळ कागदपत्रांच्या सांक्षाकीत दोन प्रती जोडणे आवश्यक आहे. जिल्ह्यातील पात्र उमेदवारांनी पात्रतेनुसार आवश्यक कागदपत्रांसह उपस्थित रहावे, असे आवाहन करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी ०२०-२६१२२२८७ या क्रमांकावर संपर्क साधावा.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मराठी चित्रकोष लवकरच इंग्रजीत

$
0
0

पुणे : महाराष्ट्रातील चित्रकला आणि शिल्पकलेची परंपरा, दृश्यकलेचा २०० वर्षांचा इतिहास, महाराष्ट्राच्या चित्रकलेच्या परंपरेत महत्त्वपूर्ण योगदान देणारे चित्रकार यांची दखल आंतरराष्ट्रीय स्तरावर घेतली जावी, यासाठी मराठी चित्रकोष इंग्रजीत अनुवादित करण्यात येणार आहे. या प्रकल्पामुळे महाराष्ट्रातील चित्रकला आणि शिल्पकलेचा प्रसार जगभर होण्यास मदत होणार आहे.
२०१३ साली प्रसिद्ध चित्रकार सुहास बहुलकर यांच्या प्रयत्नांनी मराठी चित्रकोष तयार करण्यात आला. त्यामध्ये चित्रकला आणि शिल्पकलेत महत्त्वपूर्ण योगदान दिलेल्या ३०५ हून अधिक निवडक कलावंतांची निवड करण्यात आली. या कलावंतांच्या कार्याविषयी आणि त्यांनी काढलेल्या चित्रांविषयी माहिती चित्रकोषात देण्यात आली आहे. चित्रकलेची पंढरी असलेल्या बॉम्बे स्कूलचे चित्रकलेतील योगदान यावर देखील चित्रकोषामध्ये महत्त्वपूर्ण लेखन करण्यात आले आहे. महाराष्ट्रामध्ये या चित्रकोषाव्यतिरिक्त चित्रकला आणि शिल्पकलेच्या इतिहासाविषयी फारसे लेखन झालेले नाही. त्यामुळे या कोषाचे इंग्रजीमध्ये भाषांतर करण्यात यावे, अशी मागणी सातत्याने केली जात होती. शिवाय आंतरराष्ट्रीय स्तरावर या चित्रकोषाची दखल घेतली जावी, देश-परदेशातील कलेच्या अभ्यासकांना त्याचा उपयोग व्हावा, यासाठी मराठीतील चित्रकोषाचे इंग्रजीमध्ये भाषांतर करण्याचा निर्णय घेण्यात आला असून, त्याचे काम सुरू झाले आहे. मराठी चित्रकोषामध्ये आढळलेल्या त्रुटी दूर करून इंग्रजी भाषेतील चित्रकोष तयार होणार आहे. महाराष्ट्रामध्ये असलेल्या संस्थानिकांनी चित्रकलेचा विस्तार व्हावा, यासाठी अनेक संग्रहालये उभारली आहेत. यापलीकडे राज्यभरात चित्रकला आणि शिल्पकलेसाठी फारशी संग्रहालये नाहीत. याउलट परदेशामध्ये प्रत्येक शहरात एक संग्रहालय आहे. तेथील चित्रकलेच्या विविध परंपरांवर आधारलेले विपुल लेखन करण्यात आले आहे. त्याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्राच्या कलाकारांची ओळख जगभरात होण्यासाठी हा प्रकल्प अत्यंत महत्वाचा ठरणार आहे. देशातील इतर भाषिकांना देखील प्रकल्पाच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या कला वैभवाची ओळख होणार आहे. पुढील वर्षभरात हा प्रकल्प पूर्ण करण्यात येणार असून, त्यानंतर त्याचे प्रकाशन करण्यात येईल.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दशक्रिया विधी बँकेच्या दारात

$
0
0

बँकेने तगादा लावल्याने आत्महत्या केल्याचा आरोप
म. टा. वृत्तसेवा, बारामती
बँकेने कर्जवसुलीसाठी लावलेल्या तगाद्याने कंटाळून आर्थिक अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्याने आत्महत्या केली असा आरोप स्वाभिमानी संघटनेने आणि संबंधित शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांनी केला आहे. त्यानंतर संबंधित बँक अधिकाऱ्यांवर खुनाचा गुन्हा दाखल करावा, या मागणीसाठी शुक्रवारी मृत शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांनी बारामतीत बँक शाखेसमोरच दशक्रिया विधी करून अनोखे आंदोलन केले.
वायनरी कंपनीने कराराद्वारे द्राक्ष खरेदीचे आमिष दाखवल्याने कर्ज काढून द्राक्षांचे उत्पादन घेतले. मात्र, नंतर संबंधित कंपनीने माल खरेदीस नकार दिल्यामुळे खचून गेलेल्या काझड येथील शेतकऱ्याने जीवापाड जपलेली द्राक्षबाग तोडून टाकली. आर्थिक विवंचनेत अडकेल्या या शेतकऱ्याकडे बँकेने कर्जवसुलीसाठी तगादा लावल्यामुळे संबंधित शेतकऱ्याने आत्महत्या केली,' असा आरोपही स्वाभिमानी संघटनेने आणि शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांनी केला आहे.
सन २००६ मध्ये युको बँक, छोटू इंडिया (नारायणगाव) या वाइन उत्पादक कंपनीने करारान्वये काझड (ता. इंदापूर) भागातील अनेक शेतकऱ्यांना अर्थसाह्य देऊन द्राक्ष उत्पादनासाठी प्रोत्साहित केले. वायनरीला द्राक्षाची विक्री केल्यानंतर शेतकरी बँकेचे हप्ते फेडणार होते. यापैकी अल्पभूधारक शेतकरी नामदेव लक्ष्मण झगडे (रा. काझड) याने देखील बँकेच्या कर्जातून आपल्या शेतात वायनरी द्राक्षांची लागवड केली. मात्र, एकदाच वायनरी द्राक्ष घेतलेल्या सदर कंपनीने पुन्हा मात्र खरेदी करण्यास नकार दिला. कर्ज काढून जगवलेली वायनरी द्राक्षे कोणी विकत घेणार नाही, असे वाटून त्यांनी द्राक्षाची बाग तोडली. त्यामुळे थकित कर्ज फेडणे त्यांना शक्य झाले नाही. नंतर पिकवलेल्या उसाचे पैसेही बँकेने कर्जाची परतफेड म्हणून कापून घेतले. त्यामुळे आर्थिक ओढाताण होऊ लागली. युको बँकेच्या वसुली एजंटनी पैसे वसुलीसाठी दमदाटी केल्याचा आरोप नामदेव यांच्या कुटुंबीयांनी केला आहे. याच वैफल्यातून त्याने २५ मे रोजी विष घेऊन नामदेव यांनी आत्महत्या केल्याचे त्यांच्या कुटुंबीयांनी सांगितले आहे. बँक अधिकाऱ्यांच्या निषेधार्थ शुक्रवारी नामदेव यांच्या मुलांनी व संघटनेच्या कार्यकर्त्यांनी नामदेव यांच्या दशक्रियाविधीचा कार्यक्रम चक्क बँकेच्या दारात केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विद्यार्थी सहायक समितीतर्फे मुलाखती

$
0
0

पुणे ः पुण्यात येणाऱ्या दुष्काळग्रस्त भागातील गरीब व होतकरू विद्यार्थ्यांना अल्पदरात निवास आणि भोजन मिळावे, यासाठी विद्यार्थी सहायक समिती गरजू विद्यार्थ्यांच्या मुलाखती घेऊन त्यांना निवासाची सोय उप्लब्ध करून देणार आहे.
पुण्यात उच्चशिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या ३०० ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना वसतिगृहासाठी प्रवेश देण्यात येणार आहे. समितीमार्फत सर्व कागदपत्रे तपासून त्यानंतर मुलाखत घेतली जाणार आहे. याशिवाय प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांना कमवा व शिका योजनेत सहभागी होणे, संस्थेसाठी आठवड्यातून एक दिवस काम करणे, विद्यार्थी विकास केंद्रांच्या उपक्रमांध्ये सहभाग घेणे असे उपक्रम अनिवार्य असणार आहेत. या सर्व अटी मंजूर असलेल्या विद्यार्थ्यांनाच प्रवेश देण्यात येणार आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन विद्यार्थी सहायक समितीच्या वतीने करण्यात आले आहे. अधिक माहितासाठी संपर्क ः २५५३३६३१ अथवा www.samiti.org

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘आयओटी’मुळे नागरिकांना फायदा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
स्मार्ट सिटीमध्ये इंटरनेट ऑफ थिंग्जच्या (आयओटी) वापरामुळे महापालिकेला नागरिकांसाठी विविध नागरी सुविधा राबविणे आणि नागरिकांना त्यांचा वापर करणे ही दोन कामे अत्यंत सोपी होणार आहेत. केंद्र सरकारने आखून दिलेल्या आराखड्यानुसार पुण्यासोबतच देशातील इतर स्मार्ट सिटीत निवड झालेल्या शहरांनी आयओटी यंत्रणा राबविल्यास पुढील दोन वर्षात त्यातून फायदा होण्यास मदत होईल,' अशी माहिती आयटी-आयओटी पॅनेलचे सदस्य मोहन राजू यांनी खास 'मटा'ला रविवारी दिली.
दी इन्स्टिट्यूशन ऑफ इंजिनीअरिंग अॅँड टेक्नॉलॉजी (आयईटी) पुणे शाखेच्या वतीने 'आयओटी-स्मार्ट सिटी' या विषयावर शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयात (सीओईपी) एकदिवसीय कार्यशाळा घेण्यात आली. 'केपीआयटी'चे अमित चितळे यांनी कार्यशाळेचे उद‍्घाटन केले. प्रमुख पाहुणे म्हणून राजू, आयबीएमचे वैभव दंताळे, एरिस कम्युनिकेशन्सचे पराग फलटणकर, पुणे शाखेच्या अध्यक्षा डॉ. माधुरी जोशी, सचिव वैभव वैजापूरकर, प्रा. यु. एम. चासकर, प्रा. शिल्पा मेटकर आदी उपस्थित होते. या वेळी राजू यांनी 'मटा'शी संवाद साधला.
राजू म्हणाले, 'स्मार्ट सिटीमध्ये वाहतूक, कचरा, पाणीपुरवठा आदी समस्या मोबाइल आणि कम्प्युटर प्रणालीवर चालणाऱ्या अॅप्लिकेशन सॉफ्टवेअरच्या माध्यमातून सोडवता येतील. त्यामध्ये आयओटी तंत्रज्ञानाची प्रमुख भूमिका असणार आहे. नागरिकांसाठी ई-गव्हर्नन्सची प्रणाली विकसित करायची झाल्यास ती आयओटीचा उपयोग करून करता येईल. नागरिकांना घरबसल्या विविध प्रकारच्या नागरी सुविधांचा लाभ घेता येण्यासाठी महापालिका ई-गव्हर्नन्सची प्रणाली विकसित करते. मात्र, ती प्रणाली नागरिकांना किती सोयीची आहे, त्यात फायदा किती लोकांना होईल, त्या प्रणालीचा नागरिक किती उपयोग करतील याचा विचार न करताच तयार करण्यात येते. त्यामुळेच त्या प्रणालीला नागरिकांकडून अल्प प्रतिसाद मिळतो. मात्र, असा प्रकारच्या प्रणाली नागरिकांना विचारून आणि त्यांच्या आवश्यतेनुसार तयार केल्यास त्याचा उपयोग नागरिकांकडून केला जातो.'
आयओटी तंत्रज्ञानाचा नागरी सुविधांमध्ये अधिकाधिक उपयोग होण्यासाठी कॉलेजमधील विद्यार्थी, विविध प्रकारच्या उद्योगातील तज्ज्ञ आणि महापालिकेच्या प्रशासनाने एकत्रित येऊन आराखडा तयार केला पाहिजे. या दृष्टीने देशातील सर्व २० स्मार्ट सिटीमध्ये आयओटी तंत्रज्ञानाचा नागरी सुविधांमध्ये वापर होण्यासाठी बंगळूर येथे ६ ते ८ सप्टेंबर दरम्यान 'आयईटी- आयओटी काँग्रेस' ही परिषद होणार आहे, अशी माहितीही राजू यांनी दिली. आयओटी पॅनेलमध्ये शैक्षणिक व उद्योग क्षेत्रातील एकूण ३२ सदस्य असून, ऋषी भटनागर हे अध्यक्ष आहेत. रियंका भगत आणि सोनल कडू या विद्यार्थीनींनी आयओटी तंत्रज्ञानावर आधारित प्रकल्प सादर केले.
..
आयओटी म्हणजे काय?
आयओटी तंत्रज्ञानात इलेक्ट्रॉनिक्स, सॉफ्टवेअर, सेन्सर्स आणि नेटवर्क आदींची एकमेकांशी तांत्रिक जोडणी केली असते. तांत्रिक जोडणीत असणाऱ्या या वस्तू एकमेकांशी माहितीचे व सूचनांचे आदानप्रदान करीत असतात. आयओटीद्वारे विविध उपकरणे एकमेकांशी जोडून संवाद साधू शकतात. कोणत्याही हस्तक्षेपाशिवाय आयपी कनेक्टिव्हिटिच्या माध्यमातून सर्व उपकरणे जोडली जातात. उदाहरणार्थ, सध्या वाहतूककोंडीची सूचना किंवा माहिती वाहनचालकाना वाहतूककोंडीत सापडल्यावरच होते. मात्र, आयओटी तंत्रज्ञानामुळे वाहनचालकाला वाहनात असलेल्या प्रणाली आणि रस्त्यांवर असलेल्या सेन्सर्ससारख्या उपकरणातून वाहनातच आधीच मिळेल

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

स्पीडब्रेकरवर बस आदळून मायलेकी जखमी

$
0
0

मणक्यांना फ्रॅक्चर; नगर रोड बीआरटी मार्गावरील अपघातांची मालिका कायम
म. टा. प्रतिनिधी, येरवडा
नगर रोड बीआरटी मार्गातून कात्रजच्या दिशेने भरधाव वेगाने जाणारी बस स्पीडब्रेकरवर जोरात आदळल्याने बसमधील आई-मुलगी गंभीर जखमी झाल्या. स्पीडब्रेकरवर जोरदार आदळल्याने दोघींच्या कंबरेला जोराचा मार लागला आहे. दोघीही जणींच्या मणक्याला अनेक ठिकाणी फ्रॅक्चर झाले आहे. त्या दोघींवरही खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. ही घटना शनिवारी दुपारी नगर रोड क्षेत्रीय कार्यालयासमोर दुपारी एकच्या सुमारास घडली. या घटनेमुळे नगर रोड बीआरटी मार्गाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
शीला भाऊराम मेश्राम (५८) आणि मोहिनी महाजन (३६, दो. रा. नागपूर) अशी स्पीडब्रेकरच्या अपघातात जखमी झालेल्या प्रवाशांची नावे आहेत. नगर रोड बीआरटी २८ एप्रिल रोजी खुली झाल्यापासून वारंवार अपघातांची मालिका सुरूच आहे. राम मेश्राम त्यांच्या पत्नी शीला,मुलगी मोहिनी आणि दोन नातवंडे असा परिवार घेऊन काही दिवसांपूर्वी पुण्यात चंदननगरमधील मुलाकडे राहण्यास आले होते. शनिवारी त्यांनी कात्रज सर्पोद्यानात जाण्याचा बेत आखला होता. त्यासाठी त्यांनी चंदननगर येथे बस पकडली. चंदननगर बस थांबा सोडल्यानंतर बस भरधाव वेगात निघाली. बीआरटी मार्गावरील स्पीडब्रेकरवर बसचा वेग कमी न करता भरधाव वेगाने बस गेल्याने बस जोरात आदळली. त्यामुळे बसमधील प्रवाशांना मोठा दणका बसला. या वेळी शीला आणि मोहिनी या दोघी जोरात आदळून पुन्हा सीटवर बसल्याने त्यांच्या कमरेला जोरात मार बसला. त्याच्या मुलाच्या डोक्याल बसचे छत लागले, अशी माहिती प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. त्यानंतर मेश्राम यांच्या पत्नी आणि मुलीला खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


टँकरची संख्या वाढली

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
पाणी टंचाई केवळ ग्रामीण भागापुरती मर्यादित न राहता ती आता पुणे शहरात देखील अधिक तीव्रतेने जाणवू लागली आहे. गेल्या एप्रिल आणि मे या दोन महिन्यांत पुणे शहराच्या विविध भागात पाणी पुरवठा करणाऱ्या टँकरच्या फेऱ्यांच्या संख्येत कमालीची वाढ झाली आहे. गेल्या वर्षी याच दोन महिन्यांच्या तुलनेत ७ हजार ८०३ टँकरच्या जादा फेऱ्या या वर्षीच्या एप्रिल आणि मे महिन्यात झाल्या आहेत.
पुणे महापालिकेच्या माहितीनुसार गेल्या काही वर्षांमध्ये एप्रिल आणि मे महिन्यात पाणी पुरवठा करण्यासाठी टँकरच्या सुमारे ३० हजारच्या आसपास फेऱ्या झाल्या आहेत. मात्र, या वर्षी या दोन महिन्यात ३८ हजार ६८ एवढ्या प्रचंड झाल्या आहेत. पुणे शहरामध्ये विविध ठिकाणी नागरिकांकडून टँकरमार्फत पाणी पुरवठा करण्याची मागणी सप्टेंबर २०१५ पासून वाढली. त्यानंतर शहराला एक दिवसाआड पाणी पुरवठा सुरू झाल्याने या मागणीमध्ये कमालीची वाढ झाली.
शहरातील हडपसर, बाणेर, धायरी, विश्रांतवाडी या भागांमध्ये पाणीटंचाई अधिक प्रमाणात असल्याने या भागांत मोठ्या प्रमाणात टँकरच्या फेऱ्या होत आहेत. अशी परिस्थीती असताना देखील पाणी पुरवठा करण्यासाठी पुणे महापालिकेकडे स्वत:च्या मालकीचे केवळ १५ टँकर असून ३५ टँकर हे करारानुसार सेवेत घेण्यात आले आहे. मात्र, या तुलनेत शहरात सुमारे ४५० खासगी टँकर कार्यरत आहेत. पुणे शहरामध्ये टँकरची मागणी मोठ्या प्रमाणात वाढल्याने आमच्या कामात भरपूर वाढ झाली आहे. त्यामुळे प्रत्येकाला पाणी पुरविणे कठीण काम झाले असल्याचे पुणे टँकर असोशिएशनचे सचिव अप्पासाहेब निकम यांनी सांगितले.
महसूल विभागाच्या माहितीनुसार पुणे महसूल विभागात येणाऱ्या एकूण पाच जिल्ह्यांमध्ये पाणी टंचाई वाढल्याने टँकरच्या फेऱ्यांच्या संख्येत कमालीची वाढ झाली आहे. या विभागामध्ये पाण्याची पातळी कमालीची खोल गेली आहे. या विभागात नागरिकांना पिण्याचे पाणी ४४६ टँकरमार्फत पुरविण्यात येत आहे. या टँकरच्या पाण्यावर ४५५ गावे आणि सुमारे २६०० खेड्यातील नागरिक अवलंबून आहे. पुणे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात टँकरांमार्फत बारामती, इंदापूर, पुरंदर आणि दौंड या तालुक्यांमध्ये पिण्याचे पाणी पुरविल्या जात आहेत.
..........
शहरातील नागरिकांकडून मोठ्या प्रमाणात टँकरच्या मागणीमध्ये वाढ झाली आहे. उपनगरांमधून ही मागणी अधिक आहे. त्यामुळे महापालिकेच्या आणि खासगी टँकरमार्फत नागरिकांना पाणी पुरविण्यात येत आहे.
- व्ही.जी. कुलकर्णी, प्रमुख, पाणी पुरवठा विभाग, पुणे महापालिका
.................
टँकरच्या फेऱ्यांमध्ये वर्षांप्रमाणे एप्रिल व मे महिन्यात झालेली वाढ
................
वर्ष - टँकरच्या फेऱ्या
२०१२- १३ - ३०७१२
२०१३ -१४ - २८३०५
२०१४ -१५ - ३०९६९
२०१५ -१६ - ३०२६५
२०१६ -१७ - ३८०६८

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वाहनकरात वाढ

$
0
0

येत्या सात जूनपासून वाढीव कराची अंमलबजावणी
म. टा. प्रतिनिधी, पुणे
दुचाकींच्या वाहनकरात सुधारणा करून त्यामध्ये सुमारे एक ते तीन टक्क्यांची वाढ करण्यात आली आहे. यापूर्वी सर्व प्रकारच्या दुचाकीसाठी किमतीच्या सात टक्के कर आकारण्यात येत होता. मात्र, करात वाढ झाल्याने आता वाहन कर हा आठ ते १० टक्के झाला आहे. हा वाढीव कर येत्या मंगळवार ७ जूनपासून लागू होणार असल्याची माहिती प्रादेशिक परिवहन कार्यालयाने दिली. या वाढलेल्या करामुळे वाहन चालकांच्या खिशाला आर्थिक भुर्दंड बसणार आहे.
महाराष्ट्र मोटार वाहन कर अधिनियम १९५८ मधील अधिनियम ६५ च्या कलम तीन व दुसऱ्या अनुसूचीमधील वाहनकरामध्ये सुधारणा करण्यात आली आहे. या सुधारणेनुसार दुचाकीच्या करात एक ते तीन टक्क्यांपर्यंत वाढ होणार आहे. यापूर्वी सर्व प्रकारच्या दुचाकीसाठी सात टक्के कर आकारला जात होता. मात्र, नवीन नियमानुसार दुचाकीच्या इंजिनक्षमतेनुसार कर आकारण्यात येत आहे.
त्यामुळे ५० हजार किमतीची दुचाकी वापरणाऱ्या वाहन चालकांना आता चार ते पाच हजार रुपये इतका कर भरावा लागणार आहे. ज्या दुचाकीची इंजिन क्षमता ९९ सीसीपर्यंत आहे, अशा दुचाकींच्या किमतीच्या आठ टक्के कर आकारण्यात येईल. दुचाकींची इंजिन क्षमता ९९ सीसी पेक्षा जास्त व २९९ सीसीपेक्षा कमी असणाऱ्या दुचाकींना त्याच्या किंमतीच्या ९ टक्के कर लागेल. ज्या दुचाकींची इंजिन क्षमता २९९ सीसीपेक्षा अधिक आहे, अशा दुचाकींच्या किंमतीच्या १० टक्के कर आकारण्यात येणार आहे.
.................
वाहनाची इंजिन क्षमता : वाहनकर किमतीच्या टक्क्यांमध्ये
९९ सीसीपर्यंत : ८
९९ ते २९९ सीसीपर्यंत : ९
२९९ सीसीपेक्षा अधिक : १०

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वाकडमध्ये तरुणीवर प्राणघातक हल्ला

$
0
0

वाकडमध्ये तरुणीवर प्राणघातक हल्ला
पिंपरी : उसने पैसे परत मागितल्याच्या कारणावरून तरुणीच्या डोक्यावर लोखंडी रॉडने मारहाण करून तिला जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना वाकडमध्ये घडली. मारहाण करणाऱ्या तरुणाला वाकड पोलिसांनी अटक केली आहे. हा प्रकार शुक्रवारी (तीन जून) दुपारी एकच्या सुमारास वाकड येथील म्हातोबा नगर येथे घडला. लक्ष्मी भंडारी (वय ३०, रा. वाकड) असे जखमी तरुणीचे नाव आहे. या प्रकरणी विशाल राजाभाऊ विनकर (वय २०, रा. म्हातोबा नगर, वाकड) याला अटक करण्यात आली आहे. महादेवी भंडारी (वय ५०, रा. वाकड) यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आणि आरोपी एकमेकांच्या ओळखीचे असून फिर्यादी यांनी आरोपीच्या आईला उसने पैसे दिले होते. फिर्यादी यांची मुलगी लक्ष्मीने आरोपीच्या आईकडे पैशासाठी तगादा लावला होता. शुक्रवारी दुपारी एकच्या सुमारास लक्ष्मी पैसे मागण्यासाठी गेली असता विशालने तिला लोखंडी रॉडने मारहाण केली.


मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गिब्सनच्या कर्तृत्वस्मृतींचा जुन्नरला दरवळ

$
0
0

गिब्सनच्या कर्तृत्वस्मृतींचा जुन्नरला दरवळ

धर्मेंद्र कोरे, जुन्नर

झाडे, झुडपांच्या संवर्धनासाठी आयुष्य समर्पित केलेले भारताचे पहिले वनसंरक्षक डॉ. अलेक्झांडर गिब्सन यांच्या कर्तृत्वस्मृतींचा वारसा त्यांनीच उभारलेल्या जुन्नरजवळील गिब्सन पार्कमध्ये संग्रहित करण्यात आला आहे.
ब्रिटन, स्कॉटलंडपासून, पुण्यातील दापोडी गार्डन, जुन्नरचे हिवरे गार्डन येथे त्यांनी वनस्पती उद्याने उभारली होती. निष्णात वैद्यकीय सर्जन असूनही झाडाझुडपांवर प्रेम करत त्यांच्या संवर्धनासाठी गिब्सन यांनी आयुष्य व्यतीत केले. इस्ट इंडिया कंपनीसोबत भारतात आल्यानंतर १८४६ मध्ये ब्रिटिशांनी त्यांची भारताचे पहिले वनसंरक्षक म्हणून नियुक्ती केली होती. त्यांच्या कार्यावर बायोग्राफी लिहिणारे स्कॉटलंडच्या रॉयल बोटॅनिकल गार्डनचे सदस्य हेन्री नॉल्टी यांनी हिवरेसह त्यांनी काम केलेल्या
जगभरातील इन्स्टिट्यूटला भेटी दिल्या, तर वनविभागाच्या वतीने त्यांच्या कर्तुत्वस्मृतींचे संग्रहालय उभारण्यासाठी इला फाउंडेशनच्या वतीने पक्षीतज्ज्ञ डॉ. सतीश पांडे यांनी विशेष परिश्रम घेऊन हे संग्रहालय उभारले आहे.
याबाबत जुन्नर वनविभागाचे उपवनसंरक्षक विठ्ठल धोकटे यांना विचारले असता, गिब्सन यांची जगभरातून संग्रहित केलेली संग्राहिका उभारण्यासाठी २७ लाख रुपये खर्च करण्यात आल्याची माहिती त्यांनी 'मटा'ला दिली. ही माहिती संग्रहित करण्यासाठी ५८ फलक बनविण्यात आले आणि ते गिब्सन यांचे अतिथीगृह असलेल्या विविध दालनांमध्ये लावण्यात आले आहेत. यासाठी सरकारच्या कॅंपा योजनेतून निधी उपलब्ध झाला होता, असेही त्यांनी सांगितले.
त्यांच्या कार्याची दखल घेणारी एक फिल्मदेखील महाराष्ट्र स्टेट फॉरेस्ट डिपार्टमेंटने तयार केली आहे. ही फिल्म संग्रहालय पाहण्यासाठी येणाऱ्या निसर्गप्रेमींसाठी उपलब्ध करण्यात आली आहे.
.................
शेकडो मैलांचा प्रवास
भारतातील जंगल वाचविण्यासाठी भिल्ल लोकांना आपलेसे करत शेकडो एकरवरील वृक्षराजी जपण्यासाठी केलेले गिब्सन यांचे कार्य अतुलनीय समजले जाते. दख्खनच्या पठारावरील जंगल वाचविण्यासाठी स्वतः घोडेस्वारी करून डॉ. गिब्सन यांनी शेकडो मैलांचा प्रवास केला होता, तर हिवरे येथे वनस्पती उद्यानात उभारलेल्या १८० वृक्षांच्या रेखाकृती साकारून त्यांचा पुस्तकी ठेवा आजही स्कॉटलंडच्या बोटॅनिकल गार्डनमध्ये पहावयास मिळतो. भारतीय शेतीत वापरली जाणारी औजारेदेखील त्यांनी या संग्रहालयात १८४० मध्ये नेऊन ठेवली आहेत. ही सर्व माहिती हिवरे येथील संग्रहालयात लावण्यात आली आहे. याची सर्व देखभाल वनविभागाचे वनरक्षक एस. डी. भुजबळ करत आहेत. गिब्सन यांनी लिहिलेली बॉम्बे फ्लोरा आणि फॉरेस्ट ट्रीज ऑफ इंडिया ही पुस्तके वनस्पतीशास्त्रातले संदर्भग्रंथ समजले जातात.
...................
दीडशे एकरचे हिवरे गार्डन
गिब्सन यांचे कर्तृत्वस्मृती संग्रहालय उभारण्यात आले ते हिवरे गार्डन वनविभागाच्या अखत्यारित असलेल्या १५० एकर जागेवर आहे. त्यापैकी पाच एकर जागेवर वनस्पतींच्या लागवडी गिब्सन यांच्या काळात झाल्या होत्या. त्यांनी लावलेला महोगनी वृक्ष आजही येथे पहायला मिळतो, तर त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ असलेला एक स्तंभही येथे आहे. आपल्या वनस्पती संशोधनाबरोबर आवड म्हणून गिब्सन यांनी तीन कुत्री पाळली होती. टीपू, लेझीओयन नावे असलेल्या या कुत्र्यांच्या स्मृतीदेखील येथे समाधीस्थळाच्या रुपात उपलब्ध आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

संवादिनीच्या स्वरांची पुणेकरांवर मोहिनी

$
0
0

संवादिनीच्या स्वरांची
पुणेकरांवर मोहिनी

म. टा. प्रतिनिधी, पुणे
गर्द ढगांच्या दाटीतून डोकावणारा संधीप्रकाश, दिवस रात्रीच्या खेळात बहरणारी संध्याकाळ अशा मोहक वातावरणात संवादिनीच्या स्वरांनी चढवलेला स्वरसाज पुणेकरांना मोहवून टाकणारा ठरला. प्रसिद्ध संवादिनीवादक सीमा शिरोडकर यांच्या संवादिनीवर फिरणाऱ्या जादुई बोटांनी शनिवारी पुणेकरांना मंत्रमुग्ध केले.
गानवर्धन संस्थेच्या वतीने ज्येष्ठ संवादिनीवादक पं. अप्पासाहेब जळगावकर यांच्या स्मृत्यर्थ देण्यात येणारा स्वर-लय-रत्न पुरस्कार ज्येष्ठ गायिका पद्मा तळवलकर यांच्या हस्ते सीमा शिरोडकर यांना प्रदान करण्यात आला. त्या वेळी आयोजित केलेल्या मैफलीत संवादिनी वादन करून शिरोडकर यांनी प्रेक्षकांना सूरमयी प्रवास घडवला. गानवर्धनचे अध्यक्ष कृ. गो. धर्माधिकारी, मोहन शिरोडकर, पं. विश्वनाथ शिरोडकर आदी या वेळी उपस्थित होते.
शिरोडकर यांनी विलंबित झपतालातील 'झिंजोटी' रागाने वादनास सुरुवात केली. त्यांचे पती पं. विश्वनाथ शिरोडकर यांची तबल्यावरची साथसंगत म्हणजे दुग्धशर्करा योग होता. शिरोडकर यांनी रागाचे विस्तारीत रूप सादर केले. त्यानंतर त्यांनी वाजवलेल्या 'याद पिया की आये' या बंदिशीला उपस्थित रसिकांनी टाळ्यांच्या कडकडाटात दाद दिली.
'वैयक्तिक वादन आणि साथसंगत करणे यामध्ये मोठा फरक आहे. प्रत्येक कलाकाराची गायकी वेगळी असते. त्याच्याशी समन्वय साधत साथसंगत करणे, हे तसे अवघड काम. ते सोपे करून नामवंत कलाकारांना साथ देऊन सीमा शिरोडकर यांनी विलक्षण किमया साधली आहे,' अशा भावना पद्मा तळवलकर यांनी व्यक्त केल्या. 'संगीत हा अत्यंत कठीण प्रांत आहे. त्यामध्ये प्रस्थापित होऊन उभे राहणे अत्यंत अवघड आहे. अशा वेळी शिरोडकर यांनी निर्माण केलेली ओळख उल्लेखनीय आहे,' असे तळवलकर यांनी नमूद केले.
कार्यक्रमाच्या उत्तरार्धात कस्तुरी दातार-अत्रावलकर यांनी शास्त्रीय गायन सादर केले. त्यांनी राग मियाँ मल्हार मधील बंदिश, कलावती रागातील 'कजरी', भैरवातील भजन सादर करून रसिक प्रेक्षकांची उत्स्फूर्त दाद मिळवली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शिक्षण धोरण जाहीर करा

$
0
0

शिक्षण धोरण जाहीर करा

म. टा. प्रतिनिधी, पुणे
केंद्र सरकारच्या नव्या शैक्षणिक धोरणाबाबत माजी कॅबिनेट सचिव टी. एस. आर. सुब्रह्मण्यन समितीने सादर केलेला अहवाल तातडीने खुला करण्याची मागणी शिक्षण क्षेत्रातून होत आहे. राज्यांकडून प्रतिसाद मिळाल्याखेरीज अहवाल जाहीर न करण्याच्या मनुष्यबळ विकासमंत्री स्मृती इराणी यांच्या भूमिकेवर शिक्षणतज्ज्ञ प्रश्न उपस्थित करीत आहेत.
शिक्षण हक्क कायद्यानुसार विद्यार्थ्यांना सध्या आठवीपर्यंत नापास करता येत नाही. हे धोरण बदलून पाचवीपासून पूर्वीप्रमाणे पास-नापासाची पद्धत सुरू करावी, भारतीय प्रशासकीय सेवेच्या धर्तीवर अखिल भारतीय शैक्षणिक सेवा सुरू करावी, विद्यापीठ अनुदान आयोग, अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषद आदी शिखर नियामक संस्थांत बदल करावेत आदी विविध शिफारशी सुब्रह्मण्यन समितीने आपल्या अहवालाद्वारे केल्या आहेत. या समितीने दोनशे पानांचा अहवाल गेल्या आठवड्यात सरकारला सादर केला आहे. मात्र, त्याचा संपूर्ण तपशील अद्याप जाहीर न झाल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. खुद्द सुब्रह्मण्यन यांनीही अहवाल जाहीर करण्याची मागणी केली आहे. सरकारने तसे न केल्यास आपण तो जाहीर करू, असेही त्यांनी म्हटले आहे. मात्र, सरकारने त्यांची मागणी फेटाळली आहे.
'देशभरातील शिक्षणाशी संबंधित विविध घटकांकडून सूचना मागवून धोरण आखण्याची प्रक्रिया सरकारने राबविली असली, तरी या घटकांना अहवालाचा तपशील का सांगितला जात नाही हे कळत नाही. तातडीने अहवाल खुला करायला हवा,' अशी मागणी शिक्षणतज्ज्ञ करीत आहेत. 'राज्यांना अहवाल देऊन त्यांच्याकडून प्रतिक्रिया येईपर्यंत थांबण्याचे काही कारण नाही. उलट आता अहवाल जाहीर झाल्यास त्यावर प्रतिक्रिया देण्यासाठी लोकांना अधिक वेळ मिळेल. त्यामुळे अहवालाचा तपशील जाहीर करायला हवा,' असे शिक्षणशास्त्राचे अभ्यासक किशोर दरक यांनी सांगितले. धोरण तयार करण्यासाठी सरकारकडे लाखो सूचना आल्या आहेत. या सूचना कोणी केल्या हे जाहीर केले जाऊ नये. मात्र, त्या सूचना कोणत्या आहेत, हे जाहीर केले जावी, अशी मागणीही दरक यांनी केली.
अहवाल खुला होण्याबाबत सुब्रह्मण्यन यांच्यासह अनेकांकडून मागणी होत असली, तरी सरकार त्यासाठी वेळ घेत आहे. 'शिक्षण धोरण ही देशातील एक लाख दहा हजार गावांची, पाच हजार गटांची, पाचशे जिल्ह्यांची आणि वीस राज्यांची मालमत्ता आहे. या सर्वांमधील लोकांच्या सूचनांच्या साह्याने धोरण केले जात आहे. त्यामुळे धोरणाचा तपशील आधी त्यांना दाखविला जाईल आणि मग मसुदा तयार केला जाईल. हा अहवाल आधी राज्यांना दिला जाईल, त्यांच्याकडून प्रतिक्रिया मागविल्या जातील आणि मगच तो खुला केला जाईल,' असे इराणी यांनी शुक्रवारी राजधानीत पत्रकारांशी बोलताना सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘उद्योगी’ संशोधकांमुळे आंबोली धोक्यात

$
0
0

'उद्योगी' संशोधकांमुळे आंबोली धोक्यात

म. टा. प्रतिनिधी, पुणे
निसर्ग सहली आणि संशोधनासाठी येणाऱ्या काही उद्योगी संशोधकांमुळे आंबोलीतील दुर्मीळ जैववैविध्य धोक्यात आले आहे. गावकऱ्यांना अंधारात ठेवून आणि वन विभागाच्या दुर्लक्षाचा गैरफायदा घेत ही मंडळी जंगलातून दुर्मीळ बेडूक, लहान कीटक, कोळी, सरडे, आणि वनस्पती तथाकथित संशोधनासाठी शहरात घेऊन जात आहेत. एवढेच नव्हे, तर काही उपद्रवी फोटोग्राफर चांगले फोटो मिळविण्यासाठी या वन्यप्राण्यांचा खेळ करीत आहेत.
पश्चिम घाटातील जैववैविध्याने समृद्ध आणि संवेदनशील ठिकाण म्हणून प्रसिद्ध असलेले आंबोलीचे वनक्षेत्र संशोधकांसाठी नैसर्गिक प्रयोगशाळा म्हणून ओळखले जाते. निसर्गशास्त्राचा अभ्यास करणारा प्रत्येक अभ्यासक आंबोलीत अभ्याससाठी येतोच. याशिवाय नेचरवॉक आणि निसर्ग पर्यटनासाठीदेखील वर्षभर निसर्गप्रेमींच्या वाऱ्या सुरू असतात. मात्र, अलीकडे अभ्यासक आणि हौशी निसर्गप्रेमींसाठी आंबोलीचे जंगल म्हणजे जैवविविधता उपसण्याचे हक्काचे ठिकाण बनले आहे. गावकऱ्यांना अंधारात ठेवून, तर कधी त्यांना संशोधन करीत असल्याचे भासवून उपद्रवी अभ्यासक जंगलातील जैवविविधतेची लूट करीत आहेत. धक्कादायक बाब म्हणजे यामध्ये पुणे मुंबईतील जैवविविधतेचा अभ्यास करणाऱ्या नामांकित संस्थेचे संशोधक, फोटोग्राफर आणि नेचर टूर कंपन्यांचा सहभाग आहे.
संशोधनासाठी आलो आहोत, असे भासवून ही मंडळी तेथील बेडूक, साप, कोळी, लहान प्राणी, वनस्पती आणि फुले तोडून शहरातील प्रयोगशाळेत घेऊन जातात. संशोधन नक्की कोणत्या विषयावर आहे, हा अभ्यास कोणासाठी सुरू आहे, त्यातून निघालेले निष्कर्ष... या संदर्भातील कोणतीही माहिती ते गावकऱ्यांना सांगत नाहीत. वन विभागाची परवानगी घेतली का, जैवविविधता मंडळाचे ना हरकत प्रमाणपत्र घेतले आहे का, अशी विचारणा गावकऱ्यांनी केल्यास अभ्यासक त्यांना उडवाउडवीची उत्तरे देतात. धक्कादायक बाब म्हणजे स्थानिक वन कर्मचारीदेखील अभ्यासक जंगलात काय करतात, याकडे लक्ष देत नाहीत. परिणामी संशोधकांवर कोणाचेही नियंत्रण राहिलेले नाही. छायाचित्रकारांच्या बाबतीतही हीच परिस्थिती असून चांगले फोटो मिळविण्यासाठी ते छोट्या वन्यजीवांबरोबर वाट्टेल त्या पद्धतीने खेळत असल्याची गावकऱ्यांची तक्रार आहे.
'अनेकदा अभ्यासकांकडे संशोधनाची परवानगी असते; पण प्रत्यक्षात नियोजित कामाऐवजी ते दुसऱ्याच घटकांवर प्रयोग करीत असल्याचे दिसते. काम झाले की ते पुन्हा गावकऱ्यांशी संपर्कदेखील साधत नाहीत, त्यामुळे संशोधन अहवालामध्ये नेमके काय लिहिले जाते हेच कळत नाही,' असे भिसे यांनी सांगितले.
'संशोधकांनी स्थानिक जैवविविधता व्यवस्थापन समितीच्या पदाधिकाऱ्यांना आणि वन विभागाच्या अधिकाऱ्यांना संशोधनासंदर्भातील सविस्तर माहिती दिली पाहिजे. काम पूर्ण झाल्यावर गावातील समितीलाही अहवालाची प्रत देणे आवश्यक आहे,' असे मलबार नेचर कॉन्झर्व्हेशन क्लबच्या साइली पलांडे दातार यांनी सांगितले.
................................
संशोधक कोळी घेऊन पसार
'काही महिन्यांपूर्वीच एक तथाकथित संशोधक टॅरॅटुला नावाचे कोळी घेऊन पसार झाला. या संशोधकाने गावकऱ्यांना विश्वासात घेऊन हे कोळी कोठे आढळतात, याची माहिती घेतली आणि स्थानिकांच्या नकळत त्याने कोळी गोळा केले. तो कशासाठी आला होता, कोणत्या विषयावर संशोधन करीत होता, याची माहिती त्याने आम्हाला दिली नाही. गेल्या काही वर्षात संशोधनासाठी येणाऱ्यांची संख्या वाढली असून उपद्रवी लोकांमुळे पश्चिम घाटातील जैवविविधतेचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते आहे,' असे आंबोलीतील जैवविविधता व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष महादेव भिसे यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


तीन एकरांचा भूखंड भोवला

$
0
0

तीन एकरांचा भूखंड भोवला

म. टा. प्रतिनिधी, पुणे
महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळने (एमआयडीसी) भोसरी येथे उद्योगासाठी संपादित केलेल्या जमिनीपैकी तीन एकरांचा भूखंड खरेदी करण्याचे प्रकरण महसूलमंत्री एकनाथ खडसे यांना भोवले. पुण्यातील बांधकाम व्यावसायिक हेमंत गावंडे यांनी या प्रकरणी बंडगार्डन पोलिस ठाण्यात तक्रार अर्ज दिल्यानंतर चक्रे फिरली आणि अखेर खडसे यांना राजीनामा द्यावा लागला. मात्र, या प्रकरणी अद्याप गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही.
गेल्या काही दिवसांमध्ये कथित स्वीय सहायकाने ३० लाख रुपयांची लाच मागितल्याचे प्रकरण, डॉन दाऊद इब्राहिम फोन प्रकरण असे आरोप खडसे यांच्याविरूद्ध करण्यात आले. मात्र, त्यामध्ये भोसरी येथील जमीन खरेदी प्रकरणातील आरोप महत्त्वाचे ठरले आणि खडसे यांची मंत्रिमंडळातून गच्छंती झाली. त्यामुळे या प्रकरणाभोवती सर्वांचे लक्ष केंद्रीत झाले.
खडसे यांनी भोसरी एमआयडीसीचा हा भूखंड तीन कोटी ७५ लाख रुपयांना खरेदी केला आहे. हा व्यवहार खडसे यांच्या पत्नी मंदाकिनी खडसे व जावई गिरीश चौधरी यांच्या नावे झाला आहे. या भूखंडाची किंमत ४० कोटी रुपयांपेक्षा जास्त असताना त्याचे बाजारमूल्य कमी दाखविण्यात आल्याचा मुद्दा गावंडे यांनी तक्रार अर्जात उपस्थित केला. नव्या जमीन अधिग्रहण कायद्यानुसार या जमिनीचे मूल्य दुप्पट म्हणजे ८० कोटी रुपये झाले आहे. याचा फायदा घेण्याचा प्रयत्न खडसे कुटुंबीयांनी केल्याचे तक्रार अर्जात म्हटले आहे. हे प्रकरण समोर आल्यानंतर खडसे यांनी रेडीरेकनर व स्टँप ड्युटी भरून ही जमीन खरेदी केल्याचा खुलासा केला होता. मात्र, त्यानंतर उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी ही जमीन एमआयडीसीची असल्याचे सांगितले. त्यामुळे या प्रकरणातील संशयाचे धुके अधिकच गडद झाले. या प्रकरणी एमआयडीसीने अद्याप तक्रार दिलेली नाही, त्यामुळे आपण तक्रार करीत आहोत, असे गावंडे यांनी म्हटले आहे.
------------
केवळ आरोप नव्हेत; गुन्हाच
एकनाथ खडसे यांनी नैतिकतेच्या मुद्द्यावर राजीनामा दिला आहे. समाजाला भ्रष्टाचाराची कीड लागली आहे. त्यातून खडसेंसारख्या प्रवृत्ती तयार झाल्या आहेत. त्यांना तातडीने बाजूला सारून सरकारने चांगला आदर्श जनतेसमोर ठेवला आहे. एकंदरीत महाराष्ट्रातील वातावरण चांगले असून, येथे सामान्य जनतेला एका मंत्र्याविरोधात आवाज उठविण्याची मुभा आहे. भोसरी एमआयडीसी भूखंड प्रकरण म्हणजे केवळ आरोप नसून तो गुन्हा आहे. यातील सर्व कागदपत्रे समोर आणली आहेत, अशी प्रतिक्रिया तक्रारदार हेमंत गावंडे यांनी दिली.
...........
काय आहे प्रकरण?
भोसरी येथे सर्व्हे क्र. ५२ हिस्सा २ अ/२ या मिळकतीवरील २१ आर या जमिनीची मूळ मालकी अब्बास रसुलभाई उकानी (रा. कोलकता) यांच्या नावाने आहे. यामध्ये सलमा सौफुद्दीन वाना, बानुबेन फिरोजभाई पटेल, मुस्लिम फक्रुद्दीन उकानी, नफीसा लियाकत काथवाला, मारिया मुस्तफा लकडावाला, साकीना नजीमुद्दीन उकानी, इन्सीया मुर्तुझा बादलावाला व इतर वाटेकरी आहेत. सुमारे ४० वर्षांपूर्वी उकानी यांची जमीन एमआयडीसीने संपादित केली. ती परत मिळावी, म्हणून उकानी यांनी आठ सप्टेंबर २०१५ मध्ये हायकोर्टात याचिका केली. मात्र, हायकोर्टाने ती फेटाळून लावली होती. त्यानंतर उकानी यांनी एमआयडीसीला न कळविताच ही जमीन खडसे कुटुंबीयांना विकली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आरोपांची चौकशी करा : धनंजय मुंडे

$
0
0

आरोपांची चौकशी करा : धनंजय मुंडे

म. टा. प्रतिनिधी, पुणे
माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे यांचा केवळ राजीनामा पुरेसा नाही, तर त्यांच्यावरील सर्व आरोपांची सखोल चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी शनिवारी केली. खडसे यांच्यासह मंत्रिमंडळातील अन्य भ्रष्टाचारी मंत्र्यांवरही कारवाईची मागणी त्यांनी केली.
नैतिकतेच्या मुद्द्यावर खडसे यांना राजीनामा द्यायचा होता, तर इतका विलंब का झाला, असा सवाल करून मुंडे म्हणाले, 'प्रथमदर्शनी खडसे दोषी आहेत, हे स्पष्ट झाले होते. मुख्यमंत्री राजीनामा घेतात आणि दानवे खडसे यांना पाठिंबा देतात, यावरून भाजपची दुटप्पी भूमिका दिसून येत आहे.' खडसे यांना क्लिन चिट देऊन भाजप भ्रष्टाचाराला राजाश्रय देत असल्याचा आरोपही मुंडे यांनी केला. या प्रकरणी भ्रष्टाचारासह अन्यही गंभीर आरोप झाले आहेत. त्याचे समर्थन कसे करणार, असाही प्रश्न त्यांनी विचारला. खडसे यांच्याप्रमाणेच भाजपने इतर भ्रष्ट मंत्र्यांचे राजीनामे घेण्याची हिंमत दाखवावी, असे आव्हानही मुंडे यांनी दिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जैववैविध्याची यादी अद्ययावत

$
0
0

Chaitrali.Chandorkar
@timesgroup.com

पुणे : निसर्ग साखळीत महत्त्वाची भूमिका बजावणारे वन्यजीव आणि वनसपंदेची यादी अपडेट करण्याची मोहीम राज्य जैवविविधता मंडळाने सुरू केली आहे. यामुळे गेल्या काही वर्षांत नव्याने सापडलेले वन्यजीव आणि वनस्पतींना शासनमान्यता मिळणार आहे. मोहिमेच्या निमित्ताने सोळा वर्षांनी राज्यातील जैवविविधतेची नवीन यादी निसर्ग अभ्यासकांसमोर येणार आहे.

राज्यामध्ये विविध प्रकारच्या परिसंस्थांमध्ये वास्तव्यास असलेल्या सर्व प्रकारचे वन्यप्राणी; तसेच वनस्पतींची यादी वन विभागातर्फे दर काही वर्षांनी सुधारित रुपात प्रकाशित केली जाते. यामध्ये नव्याने शोध लागलेल्या घटकांचा समावेश आणि धोक्यात आलेल्या प्राण्यांच्या यादीतही बदल केले जातात. मात्र, गेल्या सोळा वर्षांत ही यादी अपडेट झाली नव्हती. या काळात अधिवास नष्ट झाल्याने तस्करी; तसेच इतर काही कारणांमुळे संकटात सापडलेल्या वन्यप्राण्यांची संख्या वाढली आहे. पण सरकारच्या शेड्युल्ड लिस्ट वन (संकटग्रस्त वन्यजीवांच्या) यादीत त्यांचा समावेश नसल्याने त्यांना कायदेशीर संरक्षण देताना मर्यादा येत आहेत. वनस्पतींच्या बाबतीत देखील हीच परिस्थिती आहे.

दरम्यान, गेल्या वीस वर्षांत संशोधकांनी केलेल्या सर्वेक्षणादरम्यान अनेक नवीन प्रजातींचा शोध लागला. नामांकित शोधप्रबंधांमध्ये त्यांच्या नोंदी झाल्या. या सर्व घटनांचा आढावा घेऊन राज्यातील जैवविविधतेची सद्यस्थिती मांडण्यासाठी मंडळ यादी अपडेट करणार आहे.

इंटरनॅशनल युनियन फॉर नेचर कॉन्झर्व्हेशनतर्फे (आययूसीएन) दरवर्षी जगभरातील अभ्यासकांकडून अहवाल मागवून नष्ट होण्याच्या मार्गावर असलेल्या; तसेच संकटग्रस्त वन्यप्राण्यांची यादी प्रसिद्ध केली जाते. मात्र, राज्याच्या नियमांनुसार या यादीला कायदेशीर अस्तित्व मिळत नाही. या धर्तीवर आम्ही करीत असलेल्या यादीमुळे वन्यजीवांच्या संवर्धनासाठी व्यापक नियोजन आणि परिणामकारक पावले उचलता येतील, अशी माहिती राज्याच्या जैवविविधता मंडळाचे अध्यक्ष विलास बर्डेकर यांनी दिली.

राज्यातील शैक्षणिक विद्यापीठे, वन्यजीव अभ्यासक, संशोधकांना गेल्या वीस वर्षांत केलेल्या संशोधनात आढळलेल्या वनस्पती, विविध प्रकारच्या वन्यजीवांची माहिती पाठविण्याचे आवाहन आम्ही केले आहे, असे बर्डेकर म्हणाले.

१६१ वनस्पतींना हवे संरक्षण

विविध कारणांमुळे राज्यातील अनेक महत्त्वपूर्ण; तसेच प्रदेशनिष्ठ वनस्पतींचे अस्तित्व गेल्या दोन दशकात धोक्यात आले आहे. त्यांच्या संवर्धनासाठी योजनांबरोबरच कायदेशीर संरक्षण मिळणेदेखील आवश्यक आहे. मात्र, बोटॅनिकल सर्व्हे ऑफ इंडियाने यापूर्वी जाहीर केलेल्या यादीमध्ये मोजक्या झाडांचा समावेश होता. काळाची गरज ओळखून मंडळाने अभ्यासकांच्या सहभागातून धोक्यात आलेल्या १६१ वनस्पतीची यादी तयार केली आहे. या वनस्पतींचे महत्त्व आणि अधिवासाची माहिती देणारा अहवाल राज्य सरकारमार्फत केंद्रीय जैवविविधता मंडळाला पाठवला आहे. पुढील काही दिवसांत त्यावर शिक्कामोर्तब होईल. यामुळे या वनस्पतींच्या गैरवापरावर बंधने घालणे शक्य होणार आहे, असे बर्डेकर यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जबरी घरफोड्यांचे सत्र पुण्यात सुरूच

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
जबरी मारहाण करून घरफोडी करण्याचे सत्र पुण्यात सुरूच असून, शुक्रवारी रात्री कोंढवे धावडे येथील एका बंगल्यात घुसून ३४ तोळे सोन्याचे दागिने व एक लाख रुपये चोरट्यांनी पळविले. त्यांना पकडण्याचा प्रयत्न करणाऱ्या व्यक्तीच्या डोक्यात जबर मारहाण करण्यात आली आहे. तसेच, या ठिकाणाचे आणखी दोन फ्लॅट फोडण्याचा प्रयत्न चोरट्यांनी केला आहे.

याप्रकरणी उत्तमनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून मनीषा मोरे (वय ४६, रा. कोंढवे धावडे, ता. हवेली) यांनी तक्रार दिली आहे. या घटनेत त्यांचे पती भगवान मोरे जखमी झाले आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भगवान मोरे यांचा एनडीए बहुली रोडवर दत्तफुला नावाचा दोनमजली बंगला आहे. शुक्रवारी रात्री पहिल्या मजल्यावर मोरे यांच्या पत्नी, मुलगा झोपले होते. मोरे खालच्या मजल्यावर झोपले होते. पहाटे तीनच्या सुमारास त्यांना काही तरी वाजल्याचा आवाज आला. पहाटे चारच्या सुमारास मोरे यांना पत्नीच्या ओरडण्याचा आवाज आला. त्यामुळे ते धावत वर जाऊ लागले. त्यावेळी चोरटे जिन्यातून खाली पळत येत होते. त्या वेळी चोरट्याने त्यांच्या डोक्यात लोखंडी पाइप घातला. त्यामध्ये मोरे जखमी झाले.

चोरट्यांनी मनीषा मोरे यांचे सासरे दत्तात्रय मोरे यांच्या हॉटेलमध्ये घरफोडी करण्याचा प्रयत्न केला. तसेच, काही अंतरावर असलेल्या रामभाऊ सोपान मोरे यांचे धान्याचे दुकान फोडण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी पोलिस निरीक्षक व्ही. एस. देशमुख हे तपास करत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जबरी घरफोड्यांचे सत्र पुण्यात सुरूच

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

जबरी मारहाण करून घरफोडी करण्याचे सत्र पुण्यात सुरूच असून, शुक्रवारी रात्री कोंढवे धावडे येथील एका बंगल्यात घुसून ३४ तोळे सोन्याचे दागिने व एक लाख रुपये चोरट्यांनी पळविले. त्यांना पकडण्याचा प्रयत्न करणाऱ्या व्यक्तीच्या डोक्यात जबर मारहाण करण्यात आली आहे. तसेच, या ठिकाणाचे आणखी दोन फ्लॅट फोडण्याचा प्रयत्न चोरट्यांनी केला आहे.

याप्रकरणी उत्तमनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून मनीषा मोरे (वय ४६, रा. कोंढवे धावडे, ता. हवेली) यांनी तक्रार दिली आहे. या घटनेत त्यांचे पती भगवान मोरे जखमी झाले आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भगवान मोरे यांचा एनडीए बहुली रोडवर दत्तफुला नावाचा दोनमजली बंगला आहे. शुक्रवारी रात्री पहिल्या मजल्यावर मोरे यांच्या पत्नी, मुलगा झोपले होते. मोरे खालच्या मजल्यावर झोपले होते. पहाटे तीनच्या सुमारास त्यांना काही तरी वाजल्याचा आवाज आला. पहाटे चारच्या सुमारास मोरे यांना पत्नीच्या ओरडण्याचा आवाज आला. त्यामुळे ते धावत वर जाऊ लागले. त्यावेळी चोरटे जिन्यातून खाली पळत येत होते. त्या वेळी चोरट्याने त्यांच्या डोक्यात लोखंडी पाइप घातला. त्यामध्ये मोरे जखमी झाले.

चोरट्यांनी मनीषा मोरे यांचे सासरे दत्तात्रय मोरे यांच्या हॉटेलमध्ये घरफोडी करण्याचा प्रयत्न केला. तसेच, काही अंतरावर असलेल्या रामभाऊ सोपान मोरे यांचे धान्याचे दुकान फोडण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी पोलिस निरीक्षक व्ही. एस. देशमुख हे तपास करत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images