Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

विद्यार्थ्यांसाठी ‘ग्लोबल रीच’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

देशभरातील सरकारी शैक्षणिक संस्थांमधील विद्यार्थ्यांनाही आंतरराष्ट्रीय दर्जाचे अभ्यासक्रम उपलब्ध करून देण्यासाठी केंद्रीय मनुष्यबळविकास मंत्रालयाने विशेष पावले उचलली आहेत. मंत्रालयाने त्यासाठी जगभरातील चांगल्या दर्जाच्या विद्यापीठांमधील तज्ज्ञांची मदत घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी काही विद्यापीठांसोबत शैक्षणिक करार झाल्याची माहिती केंद्रीय मनुष्यबळविकासमंत्री स्मृती इराणी यांनी शुक्रवारी दिली.
राष्ट्रीय उच्चतर शिक्षा अभियानांतर्गत (रुसा) देशभरातील विविध विद्यापीठे आणि उच्च शैक्षणिक संस्थांमधील दहा निवडक प्रकल्पांचे औपचारिक उद् घाटन इराणी यांच्या हस्ते झाले. यानिमित्त इराणी यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील डिजिटल क्लासरूम आणि ई-कंटेंट लर्निंग मॉड्युल्सचे व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे उद् घाटन केले. या कार्यक्रमामध्ये इराणी यांनी मंत्रालयाच्या विविध योजनांची माहिती दिली. तसेच, काही नव्या उपक्रमांच्या घोषणाही केल्या.
मंत्रालयाने 'रुसा'च्या माध्यमातून देशभरातील विद्यापीठांना पायाभूत सुविधांच्या विकासासाठी भरीव आर्थिक निधी उपलब्ध करून दिला आहे. या पुढील टप्प्यात मंत्रालयाने शैक्षणिक अभ्यासक्रमांच्या विकासावर भर दिला आहे. त्यासाठी मंत्रालयाने आंतरराष्ट्रीय पातळीवर नावाजलेल्या केंब्रिज युनिव्हर्सिटी, पेनसेल्व्हानिया युनिव्हर्सिटी, जॉर्जिया टेक युनिव्हर्सिटी आदी विद्यापीठांसोबत करार केले आहेत. त्यानुसार या विद्यापीठांमधील तज्ज्ञ भारतातील विद्यापीठांच्या अभ्यासक्रम निर्मितीसाठी मदत करू शकतील. त्याद्वारे सरकारी संस्थांमधील विद्यार्थ्यांना खासगी संस्थांमधील अभ्यासक्रमांच्या तोडीचे अभ्यासक्रम शिकण्याची संधी उपलब्ध होणार असल्याचे इराणी यांनी शुक्रवारी स्पष्ट केले.

शिक्षणमंत्री अनुपस्थित

पुणे विद्यापीठात झालेल्या या कार्यक्रमासाठी शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्यासह खासदार अनिल शिरोळे, पालकमंत्री गिरीश बापटही उपस्थित राहणार होते. मात्र, तावडे यांच्यासह इतर लोकप्रतिनिधींनी या कार्यक्रमाकडे पाठ फिरविली. इतर राज्यांमधून त्या त्या राज्यांच्या वरिष्ठ लोकप्रतिनिधी आणि शिक्षण खात्याशी संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या कार्यक्रमाला हजेरी लावली होती. विद्यापीठात इतर विद्यापीठांचे कुलगुरू उपस्थित असताना, तावडे यांची अनुपस्थिती मात्र इराणी यांनाही जाणवली. कार्यक्रमाच्या अखेरीस इराणी यांनी सर्वांचे आभार मानतानाच, तावडे यांनाही माझा नमस्कार सांगा, असा निरोप उपस्थितांना दिला. पक्षामध्ये तावडे आपल्यासाठी वरिष्ठ मार्गदर्शक असल्याची नोंद इराणी यांनी या निमित्ताने केली. लाइव्हलिहूड कॉलेजेस...
देशभरातील १० उच्च शैक्षणिक संस्थांमध्ये विद्यार्थ्यांसाठी १० स्टार्टअप्स लवकरच सुरू करण्यात येणार असल्याची माहितीही इराणी यांनी दिली. विद्यार्थ्यांमध्ये कौशल्यविकासासाठी देशभरात प्रत्येक राज्यात एक, अशी एकूण ३५ लाइव्हलिहूड कॉलेज मंत्रालयामार्फत सुरू केली जातील. तसेच, उच्च शिक्षणात स्थानिक भाषांचे महत्त्व वाढविण्यासाठी प्रत्येक राज्यात एक 'मॉडेल लँग्वेज लॅब' सुरू करण्यायत येणार आहे.
विद्यार्थ्यांच्या नवकल्पनांना चालना
विद्यार्थ्यांच्या नवकल्पनांना चालना देण्यासाठी मंत्रालय एक विशेष उपक्रम सुरू करणार आहे. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय शैक्षणिक संस्थांमधील विद्यार्थ्यांचे आदान-प्रदान हा त्यातील एक उपक्रम असेल. त्यासाठीचे बोधचिन्ह आणि नाव सुचविण्यासाठी देशभरातील विद्यार्थ्यांसाठी एक स्पर्धा त्यांनी जाहीर केली. त्यासाठी येत्या १५ जुलैपर्यंत मंत्रालयाकडे प्रवेशिका पाठवाव्यात. १५ ऑगस्टला या योजनेचे नाव आणि स्पर्धेतील विजेत्यांची घोषणा केली जाईल. या स्पर्धेत विजेत्या विद्यार्थ्यांना सरकारी खर्चाने १४ दिवसांचा परदेश दौरा करण्याची संधी दिली जाईल. या दौऱ्यात परदेशातील चांगल्या दर्जाच्या शिक्षणसंस्थांना भेट देण्याचे अनोखे पारितोषिक विद्यार्थ्यांना देण्यात येणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


मंत्र्यांचे विद्यार्थ्यांना दिल्लीचे निमंत्रण

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
प्रश्न : आमच्याकडे अनेक कल्पना आहेत. त्यासाठी तुम्ही 'टेड टॉक'सारखं काही सुरू करणार आहात का ? उत्तर : तुमची कल्पना खूपच चांगली आहे. तुम्ही तुमचा प्रकल्प बनवा आणि दिल्लीला या. तुम्हाला पुढच्या आठवड्यात शक्य आहे? या दिल्लीला... प्रश्न : आम्ही आमचे प्रकल्प सरकारी यंत्रणांच्या मदतीसाठी कसे पाठवू शकतो? उत्तर : तुम्ही प्रकल्प आराखडा तयार करा. मला भेटायला या. तुमच्या कल्पना देशाच्या विकासासाठी वापरण्याचा आपण नक्कीच प्रयत्न करू.
विद्यापीठातील एखादा विद्यार्थी असा काहीसा प्रश्न विचारतो आणि देशभरातील सर्व विद्यापीठांवर नियंत्रण ठेवणाऱ्या यंत्रणेचा मंत्री सरळ या विद्यार्थ्याला दिल्लीत सादरीकरणासाठी बोलावतो, असे आपण फार तर एखाद्या सिनेमात पाहिले असेल. पण, शुक्रवारी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात आयोजित एका कार्यक्रमात उपस्थितांना असाच अनुभव घेतला.
विद्यापीठाच्या डिजिटल क्लासरूमचे केंद्रीय मनुष्यबळविकासमंत्री स्मृती इराणी यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे शुक्रवारी उद् घाटन केले. उद् घाटनानंतर इराणी यांनी उपस्थित विद्यार्थ्यांशी संवाद साधला. त्या वेळी विद्यापीठात शिकणाऱ्या शंतनू जोशी, श्वेता जोगळेकर या विद्यार्थ्यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांना उत्तर देताना इराणी यांनी त्यांना थेट दिल्ली भेटीचेच आमंत्रण दिले.
व्हिडिओ कॉन्फरन्सिंगदरम्यान इराणी यांनी देशभरातील दहा निवडक ठिकाणच्या शैक्षणिक संस्थांमधील विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधून, त्यांच्या प्रश्नांना उत्तरे दिली. गडचिरोलीच्या मयुरी मडाले हिने या वेळी दुर्गम भागातील विद्यार्थ्यांसाठी केंद्र सरकार नेमकी काय मदत करणार आहे, असा प्रश्न इराणी यांना केला. तर, मृणालिनी टेकाम हिने विद्यार्थ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी सरकार काय करत आहे, याची विचारणा केली. दुर्गम भागातील विद्यार्थी आणि सर्वसामान्य नागरिकांसाठी लवकरच सुरू होणाऱ्या 'स्वयम्' या यंत्रणेची इराणी यांनी माहिती दिली. 'स्वयम्'च्या आधारे दुर्गम भागातील नागरिक आपल्या मोबाइलवरून इयत्ता नववी ते बारावीचे अभ्यासक्रम, काही डिप्लोमा अभ्यासक्रम असे एकूण पाचशे अभ्यासक्रम शिकू शकतील. येत्या काही महिन्यांत ही यंत्रणा कार्यान्वित होणार असल्याचे इराणी यांनी सांगितले. तसेच, विद्यार्थ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी सरकार समुपदेशनाच्या सुविधा उपलब्ध करून देत आहे. पालकांनीही आपल्या पाल्यांवर अपेक्षांचे दडपण न टाकता, त्यांना त्यांच्या कलाने शिकू देण्याचे आवाहन इराणी यांनी केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पेपरतपासणी बंधनामुळे विद्यापीठाचे निकाल वेळेत

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने यंदा विविध परीक्षांच्या पेपर तपासणीसाठी संबंधित प्राध्यापकांना उपस्थित राहण्याचे बंधन घातल्याने संबंधित परीक्षांचे निकाल वेळेत जाहीर होत आहेत. विद्यापीठाने आत्तापर्यंत एकूण २० परीक्षांचे निकाल जाहीर केले असून, बीए, बीकॉम आणि इंजिनीअरिंगचे निकालही लवकरच जाहीर होण्याची शक्यता आहे.
विद्यापीठाने यंदा पेपर तपासणीच्या सुरुवातीच्या टप्प्यापासूनच काही कडक निकष पाळले होते. पेपर तपासणीमध्ये टाळाटाळ करणाऱ्या प्राध्यापकांना; तसेच पेपर तपासणीसाठी प्राध्यापकांना न पाठविणाऱ्या कॉलेजांविरोधात विद्यापीठाने सौम्य कारवाईची भूमिका घेतली होती. अशा कॉलेजांच्या उत्तरपत्रिका कॉलेजकडे परत पाठविण्याचा इशाराही विद्यापीठाने दिला होता. त्यामुळे यंदा कॉलेजचे निकाल अडकून राहण्याच्या भीतीपोटी बहुतांश कॉलेजांमधून प्राध्यापकांनी परीक्षा विभागाच्या गरजेनुसार पेपर तपासणीसाठी वेळेत हजेरी लावल्याची माहिती परीक्षा विभागातून मिळाली. विद्यापीठाचे परीक्षा नियंत्रक डॉ. अशोक चव्हाण म्हणाले, 'विद्यापीठाने पेपर तपासणीसाठी काही विशिष्ट धोरण योजले होते. परिणामी आम्ही आत्तापर्यंत २० विविध अभ्यासक्रमांचे निकाल जाहीर केले आहेत. त्याची माहिती विद्यार्थ्यांना विद्यापीठाच्या वेबसाइटवर उपलब्ध आहे. बीए आणि बीकॉमचे निकाल येत्या आठ दिवसांत जाहीर होण्याची शक्यता आहे.' विद्यापीठासाठी दर वर्षी महत्त्वाचा विषय ठरणारा इंजिनीअरिंगचा निकालही यंदा तुलनेने वेळेत, या महिना अखेरीपर्यंत जाहीर होण्याची शक्यता असल्याचे डॉ. चव्हाण यांनी नमूद केले.
पुनर्मूल्यांकनातील बदलांचे प्रमाण कमी
ऑक्टोबर-नोव्हेंबर २०१५च्या परीक्षेत पुनर्मूल्यांकनासाठी एकूण २१ हजार ५५२ विद्यार्थ्यांनी विद्यापीठाकडे अर्ज केले होते. या विद्यार्थ्यांनी एकूण ३७ हजार ७३७ उत्तरपत्रिकांची मागणी केली होती. त्यापैकी केवळ ५४६ उत्तरपत्रिकांच्या बाबतीत निकालात बदल झाल्याचे डॉ. चव्हाण यांनी सांगितले. इंजिनीअरिंग विद्याशाखेच्या संदर्भाने १३ हजार ७८३ उत्तरपत्रिकांपैकी केवळ २६३ उत्तरपत्रिकांमध्ये बदल दिसला. एकूण विद्यार्थ्यांच्या तुलनेत हे प्रमाण केवळ १.९१ टक्के इतके आहे. इंजिनीअरिंग वगळता इतर शाखांच्या बाबतीत निकालात बदल होण्याचे प्रमाण १.१८ टक्के इतके असल्याचे डॉ. चव्हाण यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘शेकरूंच्या जंगला’त घरट्यांच्या नोंदी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
झुपकेदार शेपूट अन् मखमली तांबूस रंगाने प्रत्येक निसर्गप्रेमीचे लक्ष वेधणाऱ्या शेकरूची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी भीमाशंकर अभयारण्यामध्ये शेकरूंची गणना सुरू आहे. जीपीएस प्रणालीच्या माध्यमातून जंगलाचे झोन तयार केले असून वन कर्मचारी या यंत्रणेबरोबरच शेकरूंच्या घरट्यांच्याही नोंदी घेत आहेत.
राज्याचे मानचिन्ह असलेले शेकरू या मोठ्या खारीचे भीमाशंकर अभयारण्यामध्ये वास्तव्य आहे. वन्यप्राणी अभ्यासक या अभयारण्याला शेकरूंचे जंगल असेही म्हणतात. बुद्धपौर्णिमेला झालेल्या वन्यप्राणी गणनेच्यापाठोपाठ वनाधिकाऱ्यांनी आता शेकरूंच्या गणनेला सुरुवात केली आहे. साधारणतः पावसाळ्यापूर्वी काही दिवस शेकरू नवीन घरटे बनवितात. याची नोंद घेऊनच मे महिन्याच्या अखेरीस शेकरूंची गणना केली जाते. शत्रूला चुकविण्यासाठी प्रत्येक शेकरू स्वसंरणार्थ सहा ते सात घरटी बनवते. कोणाचीही चाहूल लागल्यास पटकन जवळच्या घरट्यात लपते. त्यामुळे वन कर्मचारी घरट्यांच्या नोंदी मिळाल्यानंतर त्याला सहाने भागून शेकरू वास्तव्यास असल्याचा निष्कर्ष काढला जातो. यातून अचूक आकडे मिळत नसले, तरी ढोबळ चित्र पुढे येते. यंदाही भीमाशंकर अभयारण्याचे विविध भाग पाडून प्रत्येक कर्मचाऱ्याला वाटून देण्यात आले आहेत. वनकर्मचारी घरटे शोधून त्या झाडाखाली उभे राहून त्याची 'जीपीएस'मध्ये नोंद करीत आहे. यामध्ये दिनांक, शेकरूंचे घरटे असलेले ठिकाण, घरटे असलेल्या झाडाचे नाव, घरटे नवे आहे, की जुने, याची नोंद वेळ, घरट्यांची संख्या याच्या नोंदी घेणार आहेत, अशी माहिती अभयारण्यातील वन परिक्षेत्र अधिकारी तुषार ढमढेरे यांनी दिली.
यंदा संख्या वाढणार

भीमाशंकर अभयारण्यामध्ये गेल्या वर्षी झालेल्या गणनेमध्ये १९८५ शेकरू आढळून आले. गणनेमध्ये ११ हजार ९१५ घरट्यांची नोंद झाली होती. घरट्यांची सरासरी काढून वन विभागाने शेकरूंची संख्या जाहीर केली होती. विशेष म्हणजे दोन वर्षांच्या तुलनेत शेकरूंची संख्या १२९ने वाढली होती. सध्या सुरू असलेल्या मोजणीदरम्यान घरट्यांची संख्या समाधानकारक असून चांगले आकडे समोर येतील, असे वनाधिकाऱ्यांचे मत आहे.

सुगरण पक्ष्यांची पहिल्यांदाच गणना

पुणे : 'अरे खोप्यामधी खोपा, सुगरणीचा चांगला...' बहिणाबाई चौधरी यांनी कवितेतून केलेल्या सुरेख वर्णनामुळे घराघरात पोहोचलेल्या सुगरण पक्ष्यांची पहिल्यांदाच गणना करण्यात येणार आहे. पर्यावरण दिनानिमित्त 'बॉम्बे नॅचरल हिस्टरी सोसायटी'तर्फे (बीएनएचएस) ही गणना करण्यात येणार आहे. सुंदर घरटी बांधण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या सुगरण पक्ष्यांचे अधिवास, त्यांची वसतिस्थाने आणि सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी हा उपक्रम आयोजित करण्यात आला आहे.

पूर्वी मोठ्या प्रमाणात शहरांमध्ये, गावांमधील मोकळ्या जागांवरील ठराविक झाडांवर सहजगत्या आढळणाऱ्या सुगरण पक्ष्यांची संख्या गेल्या काही वर्षांत वेगाने कमी झाली असल्याचे पक्षी अभ्यासकांच्या निदर्शनास आले आहे. शहरीकरण आणि माणसाच्या बदलत्या राहणीमानामुळे या पक्ष्यांचा अधिवास कमी होत असल्याचे त्यांचे मत आहे. या धर्तीवर सोसायटीतर्फे येत्या ५ आणि १२ जून रोजी गणना होणार आहे. यामध्ये पक्षीप्रेमी, पक्षीतज्ज्ञ, स्वयंसेवी संस्था आणि नागरिकांनी सहभागी व्हावे, त्यांची निरीक्षणे नोंदवावीत, असे आवाहन करण्यात आले आहे. सुगरणींची मोजणी फक्त दोन दिवस होणार नसून टप्प्याटप्प्याने येत्या काही वर्षांत केली जाणार आहे. त्यांच्या संख्येवरून बदलत्या पर्यावरणाचा अभ्यास करता येईल, असे सोसायटीचे प्रसिद्धी अधिकारी बिलवदा काळे यांनी सांगितले.
मोजणी कशी होणार...
गणनेत सहभागी होऊ इच्छिणारे नागरिक स्वतःच्या आवडीचे कोणतेही ठिकाण निवडू शकतात. वेळ निश्चित करून संबंधित जागेवर दिसणाऱ्या सुगरणींची त्यांना नोंद करायची आहे. ठिकाण आणि तिथे दिसलेल्या सुगरणींची माहिती www.bnhs.org या वेबसाइटवर अथवा ibabnhs@gmail.com या ई-मेलवर पाठवावी, असे आवाहन असे आवाहन बीएनएचएसने केले आहे. अधिक माहितीसाठी संपर्क : डॉ. रजत भार्गव ९८३७१२२३७३, सिद्धेश सुर्वे ९९३०५७०३६५

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

संस्कृततज्ज्ञ भुस्कुटे यांचा आदर्श पुरस्काराने गौरव

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

ज्येष्ठ संस्कृततज्ज्ञ माधव भुस्कुटे यांना टिळक महाराष्ट्र विद्यापीठाच्या कै. ल. वि. आगाशे आदर्श शिक्षक पुरस्काराने गुरुवारी गौरविण्यात आले. विद्यापीठाच्या श्री बालमुकुंद लोहिया संस्कृत आणि भारतीय विद्या अध्ययन केंद्रात सुरू असणाऱ्या शालेय संस्कृत शिक्षकांच्या वासंतिक वर्गाच्या समारोपप्रसंगी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. दीपक टिळक यांच्या हस्ते भुस्कुटे यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

हा पुरस्कार म्हणजे आपले गुरू आणि विद्यार्थ्यांचा सन्मान असल्याची भावना भुस्कुटे यांनी पुरस्काराला उत्तर देताना व्यक्त केली. संस्कृत भाषेची पाठ्यपुस्तके तयार करणाऱ्या समितीच्या माध्यमातून भुस्कुटे यांनी उल्लेखनीय कामगिरी केली. तसेच, संस्कृत व्याकरणासाठी त्यांनी लिहिलेल्या पुस्तकांच्या आधारे विद्यार्थ्यांना अगदी हसत खेळत संस्कृत व्याकरण समजून घेणे शक्य झाल्याचे गौरवोद्गार विद्यापीठाचे संस्कृत विभागप्रमुख डॉ. श्रीपाद भात यांनी या वेळी काढले. कोणत्याही सरकारी योजनेचा लाभ घेणारे अनेक लोक असतात. मात्र, अतिशय प्रामाणिकपणे आणि संपूर्ण महिनाभर पुण्यात येऊन शिकण्याचे काम संस्कृतचे शिक्षकच करतात, असे मत डॉ. टिळक यांनी व्यक्त केले. प्रा. विनया देव यांनी भुस्कुटे प्रास्ताविक केले. डॉ. अंबरीष खरे यांनी आभार मानले. डॉ. मंजिरी भालेराव यांनी सूत्रसंचालन केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जुन्या वाहनांसाठी एक्स्चेंज स्कीम

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

हवा प्रदूषणात भर घालणाऱ्या जुन्या वाहनांना सेवेतून बाद करण्यासाठी केंद्र सरकारने एक अभिनव 'एक्स्चेंज' ऑफर प्रस्तावित केली आहे. दहा वर्षांपेक्षा जुनी असलेली वाहने सरकार दफ्तरी जमा करून, त्याबदल्यात वाहन मालकाला नवीन वाहन खरेदी करताना जुन्या गाडीच्या मोबदल्यासह विशेष सूट देण्याची तरतूद करण्यात आली आहे.

केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालयाने 'ऐच्छिक - वाहन वेगवान आधुनिकीकरण कार्यक्रम' आखला आहे. या अंतर्गत वाहन मालकाला ३१ मार्च २००५पूर्वीचे वाहन जमा करता येणार आहे. परिवहन विभागाच्या आकडेवारीनुसार या योजनेअंतर्गत दोन कोटी ७० लाख वाहने सेवेतून बाद करणे शक्य आहे. मात्र, ही योजना ऐच्छिक असणार आहे. त्याचे परिपत्रक नुकतेच प्रसिद्ध करण्यात आले आहेत. या योजनेविषयी नागरिकांनी त्यांच्या सूचना js-tpt@gov.in या ई-मेलवर येत्या १४ दिवसांत पाठविण्याचे आवाहन मंत्रालयाने केले आहे.

सरकारकडून ठिकठिकाणी वाहनाची कागदपत्रे जमा करण्याची केंद्रे नेमली जाणार आहेत. या ठिकाणी कागदपत्रे गोळा केल्यानंतर परिवहन विभागाच्या प्रणालीमार्फत त्या कागदपत्रांची पडताळणी केली जाणार आहे. त्यानंतर संबंधिताचे वाहन ताब्यात घेऊन, त्यास वाहने जमा केल्याचे प्रमाणपत्र दिले जाईल. तसेच, त्या वाहनाची रक्कम वाहन मालकाला दिली जाणार आहे. यामध्ये वाहन मालकाला जुन्या वाहनाची किंमत, नवीन वाहन खरेदी करताना विक्रेत्याकडून विशेष सूट आणि उत्पादन शुल्कात ५० टक्क्यांपर्यंत सूट, असा तिहेरी फायदा होणार आहे.

या अंतर्गत जमा होणाऱ्या जुन्या वाहनांची विल्हेवाट लावण्याच्या दृष्टिने किंवा त्या वाहनांचा, वाहनांच्या सुट्या भागांचा पुनर्वापर करण्याच्या दृष्टिने प्रक्रिया केली जाणार आहे. सध्या वाहनांची विल्हेवाट लावण्यासाठी किंवा पुनर्वापर प्रक्रिया करणारे उद्योग असंघटित आहेत. या योजनेसाठी केंद्र सरकारच्या मान्यतेने 'पुनर्वापर व विल्हेवाट' लावण्याची केंद्रे संघटित केली जाणार आहेत.

विषारी वायूंमध्ये वाहनातून उत्सर्जित होणाऱ्या वायूंचे प्रमाण ३२ टक्के आहे. त्यामध्ये कार्बन डायऑक्साइडचे प्रमाण सर्वाधिक असून, त्यामुळेच वैश्विक तापमानात वाढ होत आहे. तसेच, प्रदूषणामुळे विविध आजारांना सामोरे जावे लागत आहे. या पार्श्वभूमीवर भारताने २०३०पर्यंत ३० ते ३५ टक्क्यांनी प्रदूषणाचे प्रमाण कमी करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. या पार्श्वभूमीवर सरकारने ही योजना आखली आहे.



उत्पादन शुल्कात ५० टक्के सूट

या योजने अंतर्गत वाहने जमा केल्यानंतर सामान्य वाहन मालकांना उत्पादन शुल्कात ५० टक्के सूट दिली जाणार आहे. मात्र, राज्य परिवहन महामंडळे व स्थानिक स्वराज्य संस्थाच्या प्रवासी वाहतुकीच्या बससाठी उत्पादन शुल्क माफ शंभर टक्के माफ केले जाणार आहे.





या योजनेचे अपेक्षित फायदे

दहा वर्षांपेक्षा जुनी वाहने, वाहतुकीतून बाद झाल्यास २५ ते ३० टक्क्यांनी प्रदूषण कमी होईल.

ट्रक व बसमुळे १७ टक्के कार्बन, १८ टक्के हायड्रोकार्बन व नायट्रोजन ऑक्साईडचे उत्सर्जन कमी होईल.

नवीन वाहनांच्या इंधन क्षमतेमुळे एका वर्षात ३२० कोटी लीटर ऑइलची बचत

वाहनांवर प्रक्रिया केल्यानंतर साडेअकरा हजार कोटी किमतीचे स्टील उपलब्ध होईल



या योजनेविषयी नागरिकांकडून सूचना मागविल्या आहेत. नागरिकांच्या सूचना प्राप्त झाल्यानंतर योजनेला अंतिम स्वरूप दिले जाईल.

अभय दामले (सहसचिव, केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालय)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जात पडताळणी समित्यांचा मार्ग सुकर

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

जात प्रमाणपत्र पडताळणीच्या जिल्हावार समित्या कार्यान्वित करण्यासाठी आवश्यक अधिकारी व कर्मचाऱ्यांची पदनिर्मिती करण्याचा आदेश राज्य सरकारने काढला आहे. त्यामुळे दोन वर्षांपासून भिजत घोंगडे असलेल्या जात पडताळणी समित्यांचा मार्ग सुकर झाला आहे. दरम्यान, या समित्यांच्या अध्यक्षपदावरून गेल्या काही काळात सुरू असलेल्या वादावरही राज्य सरकारने तोडगा काढला आहे.

जिल्हावार जात पडताळणी समित्या स्थापन करण्याचा निर्णय जून २०१४मध्ये घेण्यात आला होता. तेव्हा समाजकल्याण विभागाच्या अधिकाऱ्यांनी अध्यक्षपदाच्या मागणीवरून बंड पुकारल्याने, तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी त्या निर्णयाला स्थगिती दिली होती. त्यानंतर राज्यात नव्याने सरकार स्थापन करून मुख्यमंत्रिपदी विराजमान झालेल्या देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा जिल्हावार समित्यांची घोषणा केली. मात्र, तेव्हापासून आजपर्यंत या समित्या अस्तित्वात आल्या नव्हत्या. त्याबरोबरच जिल्हावार समित्यांच्या स्थापनेनंतर आवश्यक मनुष्यबळ उभे करण्याचाही प्रश्न निर्माण होणार होता. या पार्श्वभूमीवर सामाजिक न्याय व विशेष साह्य विभागाने नव्याने पदनिर्मितीचा निर्णय घेतला. त्यामुळे या समित्या आता लवकरच स्थापन होतील, अशी आशा निर्माण झाली आहे.

सध्या राज्यात १५ विभागीय जात पडताळणी समित्या आहेत. या समित्यांसाठी ३१२ पदे मंजूर आहेत. त्यातील ७६ पदे नवीन निर्णयामध्ये रद्द करण्यात आली आहेत. तर, ११५ पदांची नव्याने निर्मिती केली आहे. जिल्हावार समित्यांसाठी एकूण ३३८ पदे व मुख्यालयात १३ पदांना मान्यता देण्यात आली आहे. दरम्यान, राज्य सरकारने या नवीन आदेशात सध्या कार्यरत असलेले ११ जनसंपर्क अधिकाऱ्यांची पदे रद्द केली आहेत. त्यामुळे या जनसंपर्क अधिकाऱ्यांनी समाजकल्याण आयुक्त व डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्थेच्या महासंचालकांना पुनर्विचार करण्याबाबतचे निवेदन सादर केले.

अध्यक्षांबाबतही निर्णय

जिल्हानिहाय जात पडताळणी समित्यांच्या अध्यक्षांची पदे अतिरिक्त जिल्हाधिकारी (निवडश्रेणी), सामाजिक न्याय विभागाचे अतिरिक्त आयुक्त आणि मंत्रालयीन विभागातील सहसचिव दर्जाच्या अधिकाऱ्यांतून भरण्याचा निर्णय झाला आहे. त्यामुळे या समित्यांच्या अध्यक्षपदाची संधी मिळावी, यासाठी सामाजिक न्याय विभागाच्या अधिकाऱ्यांनी पुकारलेल्या लढ्याला यश आल्याची भावना अधिकाऱ्यांमध्ये आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पुण्यात ३८ हॉस्पिटलमध्ये अनधिकृत बांधकाम

$
0
0






म. टा. प्रतिनिधी, पुणे

महापालिकेच्या बांधकाम नियंत्रण नियमावलीचे उल्लंघन करून शहरातील अनेक प्रमुख हॉस्पिटल्सतर्फे अनधिकृत बांधकाम करण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. हॉस्पिटलमधील जेमतेम १० ते १२ टक्के अनधिकृत बांधकामांवर पालिकेने कारवाई केली असून, गेल्या दोन वर्षांपासून उर्वरित बांधकामांकडे डोळेझाकच केल्याचे स्पष्ट होत आहे. शहरातील विविध हॉस्पिटलना महापालिकेने दिलेल्या परवानगीपेक्षा अधिक बांधकाम केल्याचे; तसेच पार्किंग आणि इतर जागांचा वापर वेगळ्या कारणांसाठी होत असल्याकडे सर्वसाधारण सभेत लक्ष वेधण्यात आले होते. त्यानुसार, सर्व हॉस्पिटलचा सविस्तर अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आले होते. परंतु, हा अहवाल सर्वसाधारण सभेसमोर मांडण्यात आला नाही. यासारख्या इतर प्रलंबित अहवालांवर पुढील आठवड्यात खास सभा होणार आहे. त्यामुळे, प्रशासनाने हॉस्पिटलवरील कारवाईचा सर्व तपशील अहवालात मांडला आहे. त्यातच, शहरातील प्रमुख ६३ हॉस्पिटल्सची तपासणी करण्यात आली असून, २५ हॉस्पिटलमध्ये कोणत्याही स्वरूपाचे अनधिकृत बांधकाम आढळून आले नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. मात्र, उर्वरित ३८ हॉस्पिटलची सविस्तर कुंडलीच मांडण्यात आली आहे. संबंधित हॉस्पिटलमध्ये करण्यात आलेले अनधिकृत बांधकामाचे क्षेत्रफळ किती, त्यांना नोटीस बजावण्यात आल्याची तारीख, बांधकाम काढून घेण्यासाठी दिलेली मुदत, त्यानंतर केलेल्या कार्यवाहीचा तपशील, अशी माहिती देण्यात आली आहे. सामासिक अंतरावरील शेड्स, टेरेस व पार्किंगमधील शेड्स आणि संबंधित जागेचा दुसऱ्याच कारणांसाठी उपयोग, अशा स्वरूपाचा अनधिकृत वापर होत असल्याचे नोंदवण्यात आले आहे. तसेच, काही हॉस्पिटलवर कारवाई केली जात असून, उर्वरित हॉस्पिटल्सवर एका महिन्यात कारवाई करण्याचे आश्वासन २०१४ मध्येच देण्यात आले होते. दुर्देवाने, आजपर्यंत त्यावर पालिकेने कोणतीच कार्यवाही केलेली नाही. या हॉस्पिटलच्या यादीमध्ये पुण्यातील प्रख्यात सह्याद्री हॉस्पिटल, पूना हॉस्पिटल, दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल, शाश्वत हॉस्पिटल, कृष्णा हॉस्पिटल अशा मोठ्या हॉस्पिटलपासून अनेक लहान-लहान हॉस्पिटलचाही समावेश आहे. महापालिकेने पाहणी केलेल्या हॉस्पिटलमध्ये तब्बल ७१ हजार स्क्वेअर फूट अनधिकृत बांधकाम झाले असल्याचे उघड झाले आहे. त्यापैकी जेमतेम ८ हजार स्क्वेअर फूट बांधकामावर महापालिकेने कारवाई केली आहे. उर्वरित बांधकामांवर कारवाई करण्याचे निव्वळ आश्वासन देण्यात आले असले, तरी गेल्या दोन वर्षांमध्ये त्यासाठी महापालिकेला पुरेसा वेळ मिळाला नाही का, अशी विचारणा केली जात आहे. ------

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


मदत करणाऱ्या पीएमपी कर्मचाऱ्यांचा सत्कार

$
0
0



म. टा. प्रतिनिधी, पुणे पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या बसमध्ये गर्भवती महिलेला वेदना होऊ लागल्याने प्रसंगावधान दाखवित बसच्या ड्रायव्हर आणि कंडक्टरने महिलेच्या प्रसूतीसाठी मदत केल्याची घटना गेल्या महिन्यात घडली. या कामगिरीबद्दल ड्रायव्हर मुकुंद सुगंधे आणि कंडक्टर मनीषा रोकडे यांचा पीएमपीचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक अभिषेक कृष्णा यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. मे महिन्यात १७ तारखेला सुगंधे आणि रोकडे हे मनपा ते भोसरी या मार्गावर संचलन करीत होते. त्या वेळी सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास बसमधील प्रवासी मैना भांडेकर यांना प्रसूती वेदना होऊ लागल्या. सुगंधे यांनी बस तत्काळ जवळ्या खडकी कँन्टोन्मेंटच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर हॉस्पिटलकडे नेण्यात आली. परंतु, वाटेतच त्यांची प्रसूती झाली. महिला कंडक्टर रोकडे तसेच इतर प्रवासी महिलांच्या मदतीने भांडेकर यांची प्रसूती करण्यात आली. महिलेने एका मुलाला जन्म दिला. त्यानंतर महिला व अर्भकाला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. या कामगिरीबद्दल कृष्णा यांनी सुगंधे व रोकडे यांचे अभिनंदन केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वारज्यात टायरच्या दुकानाला आग

$
0
0



म. टा. प्रतिनिधी, पुणे मुंबई- बेंगळुरू मार्गावर वारजे येथे एका टायरच्या दुकानाला शुक्रवारी पहाटे भीषण आग लागून दुकान जळून खाक झाले. दुकानातील दोन हजार टायर जळाल्यामुळे परिसरात मोठ्या प्रमाणात धूर पसरला होता. या आगीत लाखो रुपयांचे नुकसान झाले असून, अग्निशमन दलाच्या जवानांनी एक तासाच्या अथक प्रयत्नानंतर आग आटोक्यात आणली. या अगीत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. आगीचे कारण समजू शकलेले नाही. वारजे येथे विनायक हॉस्पिटलच्या समोर रामसुरत शामलाल जयस्वाल यांचे जयस्वाल टायर वर्कशॉप हे दुकान आहे. ही इमारात दोन मजली असून, ती शारदा देशमुख यांच्या मालकीची आहे. दुसऱ्या मजल्यावर युवराज पाटील यांचे व्हाइट डेटा सोल्यूशन प्रायव्हेट लिमिटेड हे लॅपटॉपचे दुकान आहे. जयस्वाल व पाटील यांनी भाड्याने गाळे घेऊन दुकाने थाटली होती. शुक्रवारी पहाटे साडेपाच वाजण्याच्या सुमारास जयस्वाल टायर या बंद दुकानामध्ये आग लागली. काही वेळातच आग मोठ्या प्रमाणात भडकली. नागरिकांनी तत्काळ याची माहिती अग्निशमन दलास कळविले. दरम्यान, या आगीने रौद्र रूप धारण केले होते. ती इमारतीच्या दुसऱ्या मजल्यापर्यंत पोहचली. अग्निशमनच्या जवानांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. कोथरूड, सिंहगड रोड, एरंडवणे आणि कात्रज अशा चार फायरब्रिगेडच्या गाड्या व दोन टँकरच्या साह्याने फायर ब्रिगेडच्या जवानांनी आग नियत्रंणात आण्याचे प्रयत्न सुरू केले. आगीमुळे शेजारील इमारतीमधील नागरिकही उकाड्यामुळे बाहेर पडले होते. आगीमध्ये दुकानातील टायर जळाल्यामुळे परिसरात धुराचे साम्राज्य पसरले होते; तर दुसऱ्या मजल्यावरील लॅपटॉपच्या दुकानाला आगीची झळ बसून मोठे नुकसान झाले आहे. एक तासाच्या अथक प्रयत्नानंतर अग्निशमन दलास आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले. मात्र, टायर अधूनमधून पेट घेत होते. त्यामुळे सुमारे दीड तासानंतर आग आटोक्यात आली. या आगीत इमारतीला भेगा पडल्या आहेत; तर ग्राउंड फ्लोअरच्या छतालाही तडे गेले आहेत. या इमारतीमधील इलेक्ट्रीकल बॉक्सध्ये आगीमुळे स्फोट झाला. त्या ठिकाणचे नागरिक वेळीच बाहेर आल्याने मोठा अनर्थ टळला. परंतु या आगीचे नेमके कारण समजू शकलेले नाही. तसेच, टायरचे दुकान पूर्णपणे जळाले असून, लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे, अशी माहिती कोथरूड अग्निशमन केंद्राचे प्रमुख गजानन पात्रुरडकर यांनी दिली. अग्निशमन दलाचे अधिकारी सुनील गिलबिले, पात्रुरडकर, जवान राहुल इथापे, पंढरीनाथ उभे, विजय सुतार यांच्यासह २५ ते ३० जवानांनी ही आग आटोक्यात आणली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

खडसें विरोधात पुरावे आल्यावर भूमिका घेऊ : अण्णा हजारे

$
0
0



म. टा. प्रतिनिधी, पिंपरी 'राज्याचे महसूल मंत्री एकनाथ खडसे यांच्यावर होत असलेल्या आरोपांबाबत आणि जमीन व्यवहारांबाबत कागदपत्रांसह पुरावे समोर आल्यावर त्याचा अभ्यास करून भूमिका स्पष्ट करणार,' असे प्रतिपादन ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी केले. पिंपरीतील सामाजिक कार्यकर्ते मारुती भापकर व नंदकुमार सातुर्डेकर यांनी गुरुवारी (२ जून) राळेगणसिद्धी येथे अण्णा हजारे यांची भेट घेतली. या वेळी दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या शेतमालाला हमीभाव, लोकपाल नियुक्त्यांबाबत अण्णांनी राष्ट्रीय स्तरावर जनआंदोलन उभे करावे, अशी विनंती अण्णांना करण्यात आली. या वेळी उद्योजक भगवानराव पठारे, शिवचरित्रकार प्रा. नामदेवराव जाधव आदी उपस्थित होते. तसेच, राज्याचे महसूलमंत्री एकनाथ खडसे यांच्या संदर्भातील तक्रारींकडेही अण्णांचे लक्ष वेधले. 'दाऊदचे फोन प्रकरण, भोसरी एमआयडीसीतील जमीन खरेदी प्रकरण उघड झाले असूनही खडसे राजीनामा देत नाहीत. अण्णांनीच आता यात लक्ष घालून जनतेच्या लढ्याचे नेतृत्व करावे,' अशी मागणी या वेळी करण्यात आली. त्यावर 'या प्रकरणी पुरावे समोर आल्यावरच भूमिका घेऊ,' असे हजारे यांनी स्पष्ट केले. तसेच, 'सरकारने राज्यातील महापालिका निवडणुकीसाठी पॅनेल पद्धतीचा अवलंब केल्याने सर्वसामान्य कार्यकर्ता हद्दपार होणार आहे. त्यामुळे मनी आणि मसल पॉवरचा वापर पक्षीय वर्चस्वाचीच शक्यता आहे. एकूणच मतपत्रिकेवरील चिन्ह हा प्रकार घटनाबाह्य आहे. त्यामुळे जनतेने इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रावरील मतपत्रिकेवरील असलेले चिन्ह हटविण्याचा आग्रह धरावा. मतपत्रिकेवर उमेदवाराचे नाव व फोटो असावा. निवडणूक चिन्ह हटवावे. तरच खऱ्या अर्थाने जनतेचे प्रतिनिधी निवडून जातील. पक्ष व पार्टीतंत्र कमजोर होईल. लोकशाहीच्या सक्षमीकरणासाठी हा बदल आवश्यक आहे,' असे मत अण्णांनी व्यक्त केले.



मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘सर्वप्रकारचे गायन ही काळाची गरज’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
'रसिकांची अभिरूची बदलली आहे. अशा काळात गायकांचा फक्त भावगीत, नाट्यगीत किंवा थिरकणारी गाणी म्हणून टिकाव लागणार नाही. गायक म्हणून सिद्ध व्हायचे असेल तर सर्व प्रकारचे गायन ही काळाची गरज आहे. एकाच प्रकारात अडकणे गायकाला मारक ठरेल,' असे स्पष्ट मत प्रसिद्ध पार्श्वगायिका वैशाली सामंत यांनी शुक्रवारी व्यक्त केले.
सामंत म्हणाल्या, 'पूर्वी भावगीत, नाट्यगीत अशा ठरावीक प्रकारची गाणी म्हणून अनेकांनी आपली कारकिर्द घडवली. पण, आता रसिक वेगवेगळ्या प्रकारचे संगीत ऐकतात. जागतिक संगीत त्यांना उपलब्ध असते. त्यामुळे गायकांना विविध प्रकारची गाणी गाता आली पाहिजेत. सध्या संगीत क्षेत्रात भरपूर काम होत आहे. त्यामुळे रसिक एकाच गाण्यावर स्थिर राहत नाहीत. चांगले संगीत रसिकांच्या कायम स्मरणात राहते. मराठी-अमराठी लोक मराठी चित्रपटांना आणि संगीताला डोक्यावर घेत आहेत. हा सकारात्मक बदल आहे.'
संगीतकार म्हणून केलेल्या कामाविषयी सामंत म्हणाल्या, 'आत्तापर्यंत एकूण ८ चित्रपटांना मी संगीत दिले आहे. गायिका आणि संगीतकार या दोन्ही भूमिका एकमेकांच्या आड मी येऊ देत नाही. संगीतकार म्हणून काम करताना गाण्याविषयी सुधारणेला वाव असतो. गायिका म्हणून स्वत:ला हिंदीमध्ये सिद्ध करायचे आहे.'
--------------------
लतादीदी, आशाताई एकत्र?
'क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्यावरील चित्रपटाला मी संगीत दिले आहे. या चित्रपटामध्ये एकूण चार गाणी असून, त्यातील एक गाणे लतादीदींनी गायले आहे. त्यांनी गाणे स्वीकारणे माझ्यासाठी स्वप्नवत आहे. या चित्रपटातील एक गाणे आशा भोसले यांनी गावे यासाठी मी प्रयत्नात आहे. तसे झाल्यास लतादीदी आणि आशाताईंची जोडी खूप वर्षांनी एकत्र येईल,' असे सामंत म्हणाल्या.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बेकायदा शुल्कवसुली; शिरूरच्या कॉलेजला नोटीस

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
बेकायदा तुकडी चालविण्यापासून ते विद्यार्थ्यांकडून बेकायदा शुल्क उकळल्याप्रकरणी पुणे विभागीय शिक्षण उपसंचालकांनी शिरूरमधील एका बड्या कॉलेजला शुक्रवारी नोटीस बजावली. उपसंचालकांनी ही नोटीस बजावल्याने, केवळ मोठ्या शहरांमधूनच नव्हे तर छोटी शहरे आणि ग्रामीण भागातूनही ज्युनिअर कॉलेजांमधून विद्यार्थ्यांकडून पैसे उकळण्याचे धंदे सर्रास सुरू असल्याचे स्पष्ट होत आहे.
या विषयी मिळालेल्या माहितीनुसार 'सिस्टीम करेक्टिंग मूव्हमेंट'च्या (सिस्कॉम) वैशाली बाफना यांनी या कॉलेजविरोधात उपसंचालक कार्यालयाकडे तक्रार दाखल केली होती. त्यांच्या तक्रारीवरून उपसंचालक कार्यालयाने या कॉलेजची चौकशी सुरू केली होती. चौकशीदरम्यान कॉलेजमधील आक्षेपार्ह कारभार समोर आल्यावर अखेर शुक्रवारी नवनियुक्त शिक्षण उपसंचालक दिनकर टेमकर यांनी या कॉलेजला आक्षेपार्ह कारभाराबाबत खुलासा करण्याची नोटीस बजावली.
नोटिशीत नमूद मुद्द्यांनुसार, या कॉलेजमध्ये ३ अनुदानित आणि १ विनाअनुदानित तुकडीला मान्यता आहे. प्रत्यक्षात माहिती अधिकारातून कॉलेजने १ जास्तीची विनाअनुदानित तुकडी चालविल्याचे समोर आले आहे. कॉलेजमधील अनुदानित आणि विनाअनुदानित वर्गांची जाहीर केलेली फी आणि प्रत्यक्षात विद्यार्थ्यांकडून घेतलेली फी यामध्येही मोठा फरक दिसून आला आहे. कॉलेजने सामाजिक आरक्षणांमधील विद्यार्थ्यांकडूनही फी आकारली आहे. या सर्व मुद्द्यांबाबत उपसंचालकांनी कॉलेजकडून खुलासा मागविला आहे.
उपसंचालकांनी कॉलेजच्या गेल्या पाच वर्षांच्या विद्यार्थी संख्येविषयी खुलासा मागविला आहे. कॉलेजच्या विद्यार्थ्यांसाठी समाजकल्याण विभागाकडून आलेल्या शिष्यवृत्ती वाटपाबाबतही उपसंचालकांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. या शिष्यवृत्ती वाटपासाठीच्या रजिस्टरमध्ये विद्यार्थ्यांच्या सह्या नसल्याची बाब उपसंचालकांनी आपल्या नोटिशीमध्ये नमूद केली आहे. कॉलेजमध्ये बेकायदा चालणारी शैक्षणिक साहित्याची विक्री थांबविण्याचे आदेशही उपसंचालकांनी दिले आहेत.
000
सरकारची भूमिका काय ?
यंदा पुण्यात अकरावीच्या केंद्रीय प्रवेश नियंत्रण समितीने ज्युनिअर कॉलेजांच्या फी विषयी कडक धोरण अवलंबले आहे. सरकारी नियमांना धरून जाहीर केलेल्या फीच्या रक्कमेपेक्षा अधिक फी घेणाऱ्या कॉलेजांवर कारवाई करण्याचा इशाराही समितीने आणि पर्यायाने शिक्षण उपसंचालकांनी दिला आहे. तसेच, यंदा बेकायदेशीररीत्या फी वाढविणाऱ्या कॉलेजांची फी कमी करण्याचे आदेशही उपसंचालकांनी नुकतेच दिले आहेत. त्या पार्श्वभूमीवर समोर आलेले शिरूरच्या कॉलेजमधील हे प्रकार केवळ शहरातील मोजक्या कॉलेजांच्याच नव्हे, तर सर्वच कॉलेजांच्या तपासणीची गरज स्पष्ट करणारे ठरत आहेत. तसेच, शिक्षण खात्याने आत्तापर्यंत अशा प्रकारांकडे केलेल्या दुर्लक्षामुळेच, गेल्या काही वर्षांपासून असे प्रकार सर्रास होत असल्याचेही या निमित्ताने स्पष्ट होत आहे. अशा प्रकारांमधून शिक्षण क्षेत्रात वाढत चाललेला भ्रष्टाचारही उघड होत चालला आहे. गेल्या काही काळात राज्य सरकारने भ्रष्टाचार आणि त्यामध्ये सामील असलेल्यांविरोधात कारवाई करण्याचा पवित्रा घेतला आहे. त्यामुळे अशा कॉलेजांविषयी शिक्षण खाते आणि पर्यायाने राज्य सरकार नेमकी काय भूमिका घेणार, असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

स्पर्धा परीक्षांची तयारी जाणून घेण्याची संधी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
'स्पर्धा परीक्षांसाठी कशी तयारी करायची?' या विषयावर आज आणि उद्या (शनिवारी आणि रविवारी) दोन वेगवेगळ्या सत्रांत मार्गदर्शन करण्यात येणार आहे. 'एमपीएससी' आणि 'यूपीएससी'सह विविध स्पर्धा परीक्षा देऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना हे सत्र उपयुक्त ठरू शकेल.
'इंग्लिश लँग्वेज टीचिंग इन्स्टिट्यूट ऑफ सिम्बायोसिस'च्या (एल्टिस) 'डॉ. बाबासाहेब आंबेडकर लायब्ररी ऑफ सिम्बायोसिस'ने 'महाराष्ट्र टाइम्स'च्या सहकार्याने हे सत्र आयोजित केले असून, ते विद्यार्थी आणि पालकांसाठी विनामूल्य खुले आहे. 'महाराष्ट्र टाइम्स'मध्ये 'यशाचा मटामार्ग' हे सदर लिहिणारे, राज्य सरकारच्या स्पर्धा परीक्षा संस्थेतील प्राध्यापक भूषण देशमुख या दोन्ही सत्रांमध्ये मार्गदर्शन करणार आहेत. प्रत्येकी एक तास ४० मिनिटे या कालावधीची ही दोन सत्रे असतील. प्रत्येक सत्रानंतर थेट प्रश्न विचारण्याचीही संधी विद्यार्थ्यांना उपलब्ध होणार आहे.
स्पर्धा परीक्षांची तयारी करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनी शक्यतो या दोन्ही सत्रांना उपस्थित राहावे. स्पर्धा परीक्षांचा अभ्यास कसा करायचा, त्यासाठीचे तंत्र कसे आत्मसात करायचे, याबाबत या सत्रांमध्ये मार्गदर्शन करण्यात येईल. त्याचप्रमाणे या परीक्षांचे स्वरूप, त्यांच्या अभ्यासासाठी वापरली जाणारी संदर्भ पुस्तके याबाबतही माहिती देण्यात येईल.
000
वेळापत्रक
सेमिनार : स्पर्धा परीक्षांसाठी कशी तयारी करायची?
तारीख : शनिवार, ४ जून
वेळ : सायंकाळी ६ ते ८
स्थळ : सिम्बायोसिस विश्व भवन, सेनापती बापट रस्ता
..
तारीख : रविवार, ५ जून
वेळ : सकाळी ९.३० ते ११.३०
स्थळ : सिम्बायोसिस विश्व भवन, सेनापती बापट रस्ता
अधिक माहितीसाठी संपर्क : (०२०) २५६६२८२२, २५६७७४३१/२

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

धरणांनाही प्रतीक्षा मान्सूनची

$
0
0

राज्यातील धरणांनी गाठला तळ; दहा टक्केच पाणीसाठा
म. टा. प्रतिनिधी, पुणे
राज्यातील प्रमुख धरणांचा पाणीसाठा आता केवळ दहा टक्क्यांवर आला असून, ती भरण्यासाठी आता मान्सून बरसण्याची आवश्यकता आहे. मान्सूनची चाहूल लागली असली तरी, धरणे भरण्यास काही अवधी लागणार असल्याने उर्वरित पाणीसाठा आणखी काही दिवस काटकसरीने वापरण्याची कसरत करावी लागणार आहे.
कमी पाऊस आणि धरणांतील अपुरा पाणीसाठा यामुळे राज्यात पाणीटंचाईचे मोठे संकट निर्माण झाले आहे. मराठवाडा, विदर्भासह नशिक, अमरावती आणि पुणे विभागात पाणीटंचाईने उग्र रुप धारण केले आहे. मराठवाड्यात तर रेल्वेने पाणी पुरविण्याची वेळ प्रशासनावर आली. हे संकट अद्याप कायम असून, त्याच्या निवारणासाठी पावसाची आवश्यकता आहे.
राज्यातील अडीच हजार लघु, मध्यम व मोठ्या धरणांमध्ये सद्यस्थितीत केवळ १३५ अब्ज घनफूट (टीएमसी) म्हणजे जेमतेत दहा टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. त्यातही मराठवाड्यातील धरणांची स्थिती अतिशय बिकट असून, या धरणांमध्ये केवळ २.३६ टीएमसी म्हणजे एक टक्काच उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे. पुणे विभागातील धरणांमध्ये आठ टक्के, नाशिकमधील धरणांत दहा, अमरावती विभागातील धरणांत ११ टक्के पाणीसाठा उरला आहे. नागपूर विभागातील धरणांत १९ टक्के पाणी आहे.
मराठवाड्यातील जायकवाडी, पूर्णा येलदरी, सिद्धेश्वर, माजलगाव, मांजरा, तेरणा, मनार, विष्णूपुरी आणि सीना कोळेगाव या धरणांतील पाणीसाठा संपला आहे. केवळ निम्न दुधना आणि पेनगंगा या धरणांत अल्प पाणीसाठा शिल्लक आहे. पुणे विभागातील पिंपळगावजोगे, माणिकडोह, डिंभे, घोड, गुंजवणीदुधगंगा, वारणा या धरणांतील उपयुक्त पाणीसाठा शून्यावर आला आहे. पानशेत धरणात ११ टक्के, वरसगाव चार टक्के, टेमघर दोन टक्के आणि खडकवासला धरणात ४६ टक्के पाणीसाठा आहे. चासकमान, निरा देवघर, भाटघर, धोम, बलकवडी, राधानगरी, कण्हेर या धरणांनी आधीच तळ गाठला आहे.
नाशिक विभागातील दारणा, कडवा, मुकणे, भावली, ओझरखेड, तिसगाव, पुणेगाव, गिरणा, भंडारदरा, हातनूर ही धरणेही तळाला गेली आहेत. वैतरणा, मुकणे, निळवंडे, वाघूर या धरणांतील पाणीसाठाही खालावला आहे. अमरावती विभागातील पूस, अरुणावती, काटेपूर्णा, नळगंगा, पेनटाकळी व खडकपूर्णा या धरणांचा उपयुक्त साठा संपला आहे. राज्यातील सर्व धरणांमध्ये पाण्याचा खडखडाट आहे. गतवर्षी प्रमुख धरणांमध्ये याच काळात १८ टक्के पाणीसाठा होता. ही धरणे पुन्हा भरण्यासाठी आता मान्सूनच्या आगमनाची प्रतीक्षा आहे.
..
विभागनिहाय धरणांचा पाणीसाठा
कोकण- ३१ टक्के
मराठवाडा- १ टक्का
नागपूर- १९ टक्के
अमरावती- ११ टक्के
नाशिक- १० टक्के
पुणे- ८ टक्के
..
पुण्याला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांतील साठा
खडकवासला ४६ टक्के
पानशेत ११ टक्के
वरसगाव ४ टक्के
टेमघर २ टक्के

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


बहुसदस्यीय पद्धतीवर अजित पवारांचे ‘चिंतन’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
महापालिकेची आगामी निवडणूक बहुसदस्यीय प्रभाग पद्धतीने (चार सदस्यांचा एक प्रभाग) होणार असल्याने त्याविषयी सविस्तर चर्चा करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार येत्या सोमवारी (६ जून) नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली आहे. नगरसेवकांनी केलेल्या कामांचा आढावा घेण्यासह निवडणुकीसाठी पक्षाची दिशाही या बैठकीत स्पष्ट केली जाण्याची शक्यता आहे.
राज्य सरकारने गेल्या महिन्यात पालिकेची निवडणूक बहुसदस्यीय प्रभाग पद्धतीने घेण्यासाठी अधिसूचना काढली. या पद्धतीला भारतीय जनता पक्ष वगळता इतर सर्वच पक्षांचा तीव्र विरोध आहे. तरीही, राज्य सरकार आपल्या निर्णयावर ठाम आहे. त्यामुळे, या नव्या पद्धतीला सामोरे जाण्यासाठीची पूर्वतयारी कशी असेल, यावर सविस्तर चर्चा करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. पवार यांच्या उपस्थितीत होणाऱ्या बैठकीत पालिकेतील कामकाजाचाही आढावा घेतला जाण्याची शक्यता आहे.
आगामी काळात शहरातील कोणत्या प्रकल्पांना प्राधान्य देण्याची गरज आहे, प्रभागातील कोणत्या विकासकामांवर अधिक लक्ष द्यायला हवे, याबाबत मार्गदर्शन करण्यासह नगरसेवक, पदाधिकाऱ्यांच्या कामगिरीचे मूल्यमापनही पवार यांच्याकडून करण्यात येईल, अशी अपेक्षा आहे. पुढच्याच आठवड्यात पक्षाचा वर्धापनदिन असल्याने त्याबाबतही कार्यक्रम, मेळावे, उपक्रम घेण्याबाबत पवार यांच्याकडून सूचना करण्यात येतील, असे समजते. घोले रस्त्यावरील पं. जवाहरलाल नेहरू सांस्कृतिक भवन येथे ही बैठक बोलाविण्यात आली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘FTII’मध्ये राजीनामा सत्राला प्रारंभ

$
0
0

टॉम अल्टर यांनी सोडला 'अभिनया'चा पदभार; संस्थेत मौन

म. टा. प्रतिनिधी, पुणे

ज्येष्ठ अभिनेते टॉम अल्टर यांनी राष्ट्रीय चित्रपट व दूरचित्रवाणी संस्थेमधील (एफटीआयआय) अभिनय विभागाच्या प्रमुखपदाचा राजीनामा दिला आहे. संस्थेत नवीन नियामक मंडळ आल्यानंतर विद्यार्थ्यांच्या विरोधाबरोबरच राजीनामा सत्र सुरू असून, त्यामध्ये अल्टर यांची भर पडली आहे. या नाराजीनाम्यावर संस्थेतील कोणीही अधिकारी बोलण्यास तयार नसून, संचालकांनीही मौन बाळगणे पसंत केले आहे.

अल्टर यांनी नोव्हेंबर २०१४मध्ये अभिनय विभागप्रमुखाचा पदभार स्वीकारला. इतर कामातील व्यस्ततेमुळे आपण संस्थेला वेळ देऊ शकत नाही, असे कारण अल्टर यांनी संस्थेला केलेल्या ई-मेलमध्ये दिले आहे. परंतु, विद्यार्थ्यांशी पटत नसल्यामुळे त्यांनी राजीनामा दिला असल्याची चर्चा संस्थेत आहे. विद्यार्थ्यांच्या संपाच्या पार्श्वभूमीवर सोसायटीच्या तसेच नियामक मंडळाच्या सदस्यपदाचा प्रख्यात दिग्दर्शक जाहनू बरुआ, अभिनेत्री पल्लवी जोशी आणि प्रख्यात सिनेमॅटोग्राफर संतोष सिवन यांनी राजीनामा दिला. या मंडळींमध्ये आता अल्टर यांचा समावेश झाला आहे.

विद्यार्थ्यांनी संस्थेच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष गजेंद्र चौहान आणि इतर सदस्यांच्या निवडीविरोधात आंदोलन पुकारले होते. या दरम्यान, अल्टर यांनी विद्यार्थ्यांची भेट घेऊन त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला होता. पण विद्यार्थ्यांनी अल्टर यांच्या आवाहनाला काहीच प्रतिसाद दिला नाही. तेंव्हापासून विद्यार्थी आणि त्यांच्यात अंतर निर्माण झाल्याची चर्चा आहे. अल्टर यांनी राजीनामा परत घ्यावा यासाठी प्रशासनाकडून त्यांचे मन वळवण्याचा प्रयत्न सुरू आहे. याबाबतीत संस्थेचे संचालक भूपेंद्र कँथोला यांच्याशी संपर्क केला असता, त्यांनी प्रतिक्रिया देण्यास असमर्थता व्यक्त केली. तर अल्टर यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पदवीविना प्रॅक्टिस करणाऱ्याविरोधात गुन्हा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

कोणतीही वैद्यकीय पदवी नसतानाही शहरातील खासगी हॉस्पिटलमध्ये डॉक्टर म्हणून मिरविणाऱ्याच्या विरोधात डेक्कन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी महापालिकेने तक्रार दाखल केली आहे.

घोले रोड क्षेत्रीय कार्यालयातील वैद्यकीय अधिकारी डॉ. संतोष मुळे यांनी तक्रार दाखल केली आहे. अशोक भगवान घोणे (सह्याद्री हॉस्पिटल, कर्वे रोड) यांच्या विरोधात महाराष्ट्र मेडिकल प्रॅक्टिशनर्स अ‍ॅक्ट नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, घोणे यांनी कौन्सिल ऑफ अल्टरनेटिव्ह मेडिसिन्स, नवी दिल्ली येथून 'बॅचलर ऑफ अल्टरनेटिव्ह सिस्टीम ऑफ मेडिसिन्स' ही पदवी घेतली. परंतु, या पदवीला भारतीय चिकित्सा परिषद, महाराष्ट्र वैद्यकीय परिषद, महाराष्ट्र समचिकित्सा परिषद, महाराष्ट्र दंतवैद्य परिषद यापैकी एकाही संस्थेची मान्यता नसल्याने त्यांना डॉक्टर म्हणून सेवा बजावता येत नाही. तरीही घोणे यांनी स्वत:च्या नावापुढे डॉक्टर लावून कायद्याचा भंग केला आहे.

त्यांच्या या फसवणुकीच्या कृत्याविषयी सामाजिक कार्यकर्ते गणेश बोऱ्हाडे यांनी महापालिकेच्या आरोग्य विभागाकडे तक्रार केली होती. त्यानुसार महापालिकेच्या बोगस वैद्यकीय व्यवसाय शोधक समितीने तपासणी केली असता, घोणे यांचे पितळ उघडे पडले. समितीने घोणे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची शिफारस केली होती. मात्र, काही अधिकाऱ्यांकडून टाळाटाळ केली जात होती. याबाबत महापालिका आयुक्त कुणाल कुमार यांच्याकडे तक्रार केल्यानंतर त्यांनी गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार डॉ. मुळे यांनी तक्रार दिली आहे.

अशोक घोणे डॉक्टर नाहीत. हृदयरोग तज्ज्ञ डॉ. सुनील साठे यांच्याकडे येणाऱ्या पेशंटना मदत करण्याचे काम ते करतात. करतात. हॉस्पिटलच्या पेरोलवर नसल्यामुळे त्यांचा आणि वैद्यकीय व्यवसायाचा काहीही संबंध नाही. त्यांच्याविरोधात तक्रार नोंदविण्यात आली असले, तर आपल्याला त्याविषयी मा​हिती नाही.

सोहम भाटवडेकर, सिनिअर मॅनेजर, सह्याद्री हॉस्पिटल

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जेजुरी गडावर दुष्काळनिवारणार्थ गोंधळ

$
0
0

राज्यभरातील गोंधळी समाजाच्या पुढाकाराने झाला कार्यक्रम

म. टा. प्रतिनिधी, पुणे

सामाजिक भान जपत गोंधळी समाजातर्फे जेजुरीगडावर आयोजित उपक्रमांना राज्यभरातील भाविकांचा प्रतिसाद मिळाला. दुष्काळ निवारणासाठी खंडेरायाला साकडे घालण्यापासून गडाच्या परिसरात वृक्षारोपण करण्यापर्यंत विविध उपक्रम या निमित्त राबविण्यात आले.

'आम्ही गोंधळी गोंधळी' या व्हॉटसअॅप ग्रुपच्या माध्यमातून ही मंडळी एकत्र आणण्यात ग्रुपचे बलराज काटे यांचा मोठा वाटा आहे. राज्यभर विखुरलेल्या गोंधळी समाजाला एकत्र आणण्यासाठी काही दिवसांपूर्वी व्हॉट्सअॅपवर 'आम्ही गोंधळी गोंधळी' हा ग्रुप तयार करण्यात आला. या ग्रुपमधील तरुणांची संख्या दिवसेंदिवस वाढत होती. अगदी बडोद्यापासून ते कोकण किनारपट्टीपर्यंत आणि धुळ्यापासून ते कर्नाटक सीमेपर्यंत वास्तव्यास असणाऱ्या गोंधळी समाजातील तरुणांचा ग्रुपमध्ये सक्रिय सहभाग होता. त्यातूनच, राज्याचे प्रश्न मार्गी लागण्यासाठी एकत्रितरित्या एखादा उपक्रम घेण्याचे निश्चित करण्यात आले. त्यातून, जेजुरीतच सर्वांचा मिळून जागरण-गोंधळाचा कार्यक्रम घेण्याचे ठरले.

या उपक्रमातून व्हॉट्सअॅप ग्रुपचे दीडशे कार्यकर्त्यांनी सहकुटुंब या उपक्रमात सहभागी होऊन गडावर हजेरी लावली. ग्रुपतर्फे गडाची स्वच्छता आणि रांगोळ्या काढण्यात आल्या. गड चढताना विविध वृक्षांच्या आणि फूलझाडांच्या बिया पेरण्यात आल्या. संबळ, टाळ, तुणतुणे, खंजिरी या वाद्यांच्या गजरात मंदिराला प्रदक्षिणा घालण्यात आली. व्यसनमुक्ती या विषयावर शाहीर शिवाजीराव थिटे यांनी, शिक्षण, पालक, स्त्रीभ्रूण हत्या या विषयांवर प्रा. संतोष अटक यांनी मार्गदर्शन केले. प्रभाकर पाचंगे, सुधीर पाचंगे, विकास जाधव यांनी खंडेरायाचे जागरण आणि देवीची कथा सांगितली. काटे यांच्यासह ग्रुपचे चंदन पाचंगे, सागर गरूड, सागर काटे, प्रवीण काटे, सुरज काटे, मनोज मोहिते यांनी कार्यक्रमाच्या आयोजनात महत्त्वाची भूमिका बजावली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

येत्या चार दिवसांत मान्सून केरळमध्ये

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

येत्या तीन ते चार दिवसांत नैर्ऋत्य मोसमी पाऊस (मान्सून) केरळमध्ये पोहोचण्याची सुखद वार्ता भारतीय हवामानशास्त्र विभागाने (आयएमडी) दिली आहे. मान्सूनने शुक्रवारी बंगालच्या उपसागराचा आणखी काही भाग व्यापला असून, श्रीलंकेच्या उंबरठ्यापर्यंत धडक दिली आहे.

गेल्या काही दिवसांपासून अंदमानमध्येच तळ ठोकून बसलेल्या मान्सूनने दोन दिवसांत बंगालच्या उपसागरापर्यंत वाटचाल केली आहे. उपसागराच्या ईशान्य आणि वायव्य अशा दोन्ही दिशांनी मान्सून अंशतः पुढे सरकला आहे. तसेच, मान्सूनच्या पुढील वाटचालीसाठी अनुकूल वातावरण तयार झाले असून, केरळमध्ये तीन ते चार दिवसांत मान्सून दाखल होईल, असे संकेत हवामान विभागाने दिले आहेत. सर्वसाधारणपणे केरळमध्ये एक जूनला मान्सून दाखल होतो. परंतु, यंदा त्याचे आगमन काहीसे उशिराने होण्याची शक्यता असून, सात जूनला तो केरळमध्ये पोहोचेल, अशी शक्यता यापूर्वीच वर्तविण्यात आली होती. हवामान विभागाने दिलेल्या संकेतांनुसार मान्सून त्याच सुमारास केरळमध्ये दाखल होण्याची चिन्हे आहेत.

पुढील दोन दिवस राज्यात दक्षिण मध्य महाराष्ट्राच्या काही भागांत, तर त्यानंतर संपूर्ण राज्यात तुरळक स्वरूपाचा पाऊस होईल, असा अंदाजही वर्तविण्यात आला आहे.

पारा थेट ३८.७ अंशांवर

मान्सूनच्या प्रतीक्षेत असणाऱ्या पुणेकरांना मात्र शुक्रवारी उन्हाच्या तीव्र झळांनी घामाघूम केले आहे. दिवसभरात पारा थेट ३८.७ अंशांवर पोहोचल्याचा अनुभव पुणेकरांनी घेतला. शहरातील सरासरी कमाल तापमानापेक्षा शुक्रवारचे तापमान ३.४ अंशांनी अधिक होते. तसेच, गेल्या दहा वर्षांतील जूनमध्ये नोंदला गेलेला हा दुसऱ्या क्रमांकाचा सर्वांत उष्ण दिवस ठरला. दोन वर्षांपूर्वी दोन जूनलाच पाऱ्याने चाळिशी ओलांडली होती. गेल्या वर्षीही चार जूनला ३८ अंश सेल्सियस तापमानाची नोंद वेधशाळेत झाली होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images