Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

दुचाकी जळीतकांड; तरुणाला अटक

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे उत्तमनगर परिसरातील शिवणे येथील सोसायटीतील दुचाकींचे जळीतकांड वादातून घडल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी या प्रकरणी एकाला अटक केली असून, दीर-भावजयीच्या भांडणात हा प्रकार घडला आहे. उत्तमनगर पोलिसांनी अवघ्या १२ तासांत घटनेचा छडा लावून आरोपीला अटक केली आहे. रमेश मधुकर शिंदे (वय ३२, रा. राऊतवाडी, कोथरूड) असे अटक केलेल्याचे नाव आहे. या प्रकरणी राधिका शिंदे (वय ३१, रा. शिवणे) यांनी फिर्याद दिली होती. पोलिसांच्या माहितीनुसार, शिंदे फिर्यादींचा दीर आहे. फिर्यादीचे पती घरकाम करतात, तर कर्वे रस्त्यावरील मृत्युंजय मंदिराजवळ फुल व हारांची रमेश विक्री करतो. फिर्यादी व आरोपी यांच्यात वाद सुरू आहेत. फिर्यादी राधिका या शिवणे येथील पोकळेनगर येथे राहण्यास आहेत. रमेशने एक महिन्यापूर्वी राधिका यांची अॅक्टिव्हा गाडी जाळण्याचा प्रयत्न केला होता. त्यावेळी नागरिकांनी सतर्कतेने आग आटोक्यात आणली होती. त्यात एक दुचाकी जळाली होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


पुणेकरांनी लुटला अक्षयखरेदीचा आनंद

$
0
0

सोन्याबरोबरच गृहप्रवेश आणि वाहनखरेदीला उधाण
म. टा. प्रतिनिधी, पुणे
इलेक्ट्रॉनिक वस्तू, वाहनांच्या खरेदीबरोबरच गृहप्रवेश करून, नव्या घराचे बुकिंग करून शहर आणि परिसरातील नागरिकांनी सोमवारचा अक्षय तृतीयेचा मुहूर्त साधला. पावसाची शक्यता असतानाही संध्याकाळी ग्राहकांमुळे बाजारपेठा फुलल्या होत्या. गुढीपाडव्याला सराफांचा बंद असल्यामुळे सोने खरेदीला मुरड घालण्याची वेळ आलेल्यांनी अक्षय सोनेखरेदीचा आनंद लुटला.
साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या अक्षय तृतीयेला सोन्याबरोबरच नवी वस्तू खरेदी करण्याची परंपरा अनेक घरांमध्ये पाळली जाते. त्यामुळे सोमवारी सकाळापासूनच सराफांच्या दुकानांबरोबरच, इलेक्ट्रॉनिक वस्तू आणि वाहनांच्या दालनांमध्येही ग्राहकांची वर्दळ पाहायला मिळाली. दुपारनंतर अचानक ढगाळ वातावरण निर्माण झाले तरी, संध्याकाळी खरेदीसाठी बाहेर पडणाऱ्यांची संख्या मोठी होती. रात्री उशिरापर्यंत मध्यवर्ती पुण्यातील बाजारपेठांमध्ये नागरिकांची गर्दी होती.
अक्षय्य तृतीया सोनेखरेदीसाठी उत्तम मुहूर्त समजला जातो. या दिवशी घेतलेले सोने अक्षय राहते आणि वृद्धिंगत होते, असा विश्वास आहे. नागरिकांनी सोन्याच्या वेढण्या आणि दागिन्यांची खरेदी केली. या वर्षी गुढीपाडव्याला सराफांची दुकाने बंद होती, त्यामुळे त्या दिवशीची खरेदी अनेकांनी सोमवारी केली.
सणानिमित्त काही सराफ व्यावसायिकांनी घडणावळीवर आकर्षक सूट, सोन्यावर चांदी मोफत अशा सवलतीही देऊ केल्या होत्या. काही व्यावसायिकांनी वेढणी खरेदीसाठी वेगळी व्यवस्था केली होती. त्यामुळे दुकानांच्या बाहेरही रांगा दिसत होत्या. सोनेखरेदीबरोबरच अनेकांनी टीव्ही, लॅपटॉप, फ्रीज, एसी, ओव्हन यांसह इलेक्ट्रॉनिक वस्तूंची खरेदी केली. साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या या सणाचे औचित्य साधून घरांचे बुकिंगही केले. दरम्यान, अक्षय तृतीयेनिमित्त श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टतर्फे गणपतीला आंब्याची आणि सारसबागेजवळील श्री महालक्ष्मी मंदिरामध्ये मोगऱ्याच्या फुलांची आकर्षक आरास करण्यात आली होती.
देवदर्शन आणि आरास बघण्यासाठी भक्तांची दिवसभर मंदिरात वर्दळ होती. बहुतांश घरांमध्ये महिलांनी चैत्रगौरीची पूजा करून हळदीकुंकू समारंभ आयोजित केला होता. या वेळी चैत्रगौरीला कैरीची डाळ, पन्हे आणि आंब्याचा नैवेद्य दाखविण्यात आला. अनेक महिलांनी देवळात जाऊन देवीचे दर्शन घेतले. कार्यालयीन सुट्टी नसल्याने बहुतांश घरात दुपारऐवजी रात्रीच्या जेवणात कैरीची डाळ आणि आमरास असा बेत निश्तिच झाला होता.
.....................................
वाहनखरेदीत वाढ
अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर वाहन खरेदीला नेहमीच चांगला प्रतिसाद मिळतो. यंदाही वाहन खरेदीत किंचित वाढ झाल्याचे पाहायला मिळाले. प्रादेशिक परिवहन कार्यालयात सोमवारी ६७१ नवीन वाहनांची नोंदणी झाली. दररोज सरासरी साडेपाचशे ते सहाशे वाहनांची नोंदणी होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दुरुस्ती करताना हवे सुरक्षेचे भान

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे आगामी पावसाळ्यापूर्वी रस्त्यांची दुरुस्ती, डागडुजी कशा पद्धतीने केली जावी, यासह रस्त्यांची कामे करताना घ्याव्या लागणाऱ्या सुरक्षेच्या उपाययोजनांचे काटेकोर पालन करण्याची अपेक्षा 'रस्ते विकसन आणि दुरुस्ती समिती'च्या अंतरिम अहवालात व्यक्त करण्यात आली आहे. समितीचा अंतिम अहवाल ३१ जुलैपूर्वी सादर केला जाणार आहे. गेल्या काही महिन्यांपासून शहराच्या विविध भागांत मोठ्या प्रमाणात सुरू असलेल्या रस्ते खोदाईमुळे नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागला. त्यावरून नगरसेवकांनीही प्रशासनावर जोरदार टीका केली. त्यामुळे रस्ते विकसन आणि दुरुस्तीविषयक धोरण ठरविण्यासाठी स्थायी तांत्रिक सल्लागार समितीच्या (स्टॅक कमिटी) अध्यक्षांच्या नेतृत्वाखालीच नऊ सदस्यीय समिती नेमण्यात आली. या समितीने ३० एप्रिलपर्यंत अहवाल देण्याचे आदेश महापालिका आयुक्त कुणाल कुमार यांनी दिले होते. रस्ते विकसन आणि दुरुस्तीबाबतचा सविस्तर अहवाल सादर करण्यास वेळ अपुरा असल्याने समितीने तूर्तास केवळ पावसाळापूर्व कामांच्या दुरुस्ती, डागडुजीबद्दलचा अंतरिम अहवाल महापालिका आयुक्तांना सादर केला आहे. या अहवालामध्ये येणाऱ्या पावसाळ्यापूर्वी खोदलेल्या रस्त्यांच्या दुरुस्तीची कामे योग्य पद्धतीने पूर्ण केली जावी, अशी सूचना करण्यात आली आहे. पावसाळ्यामध्ये कोणत्याही रस्त्यांवर खड्डे पडू नयेत, या दृष्टीने केवळ वरवरची मलमपट्टी न करता, व्यवस्थित काळजी घेऊनच रस्त्यांचे पुनर्डांबरीकरण केले जावे, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे. रस्ते विकसनाबाबत सर्वंकष धोरण ठरविण्यासाठी समितीने आणखी वेळ मागितला असून, त्यानुसार अंतिम अहवाल ३१ जुलैपूर्वी सादर करण्याचे आदेश आयुक्तांनी दिले आहेत. 'समितीने केलेल्या शिफारसींनुसार रस्ते दुरुस्ती करताना, योग्य खबरदारी घेतली जात आहे. पावसाळापूर्व रस्त्यांच्या दुरुस्तीची कामे मुख्य विभागासह क्षेत्रीय कार्यालयांच्या माध्यमातून यापूर्वीच सुरू केली असून, २५ मेपर्यंत ही कामे पूर्णत्त्वास नेण्याचे उद्दिष्ट आहे,' अशी माहिती पथ विभागप्रमुख राजेंद्र राऊत यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

माहितीपुस्तिकेसाठी हवे दहावीचे हॉलतिकीट

$
0
0

केंद्रीय प्रवेशसमितीचे अजब तर्कट; पालकांमध्ये संताप
म. टा. प्रतिनिधी, पुणे
शहरातील शाळांमधून विद्यार्थ्यांना अकरावीची ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेची माहिती पुस्तिका देताना, दहावीचे हॉलतिकीट दाखविण्याची सोमवारी सक्ती करण्यात आली. कोणत्याही पूर्वसूचनेशिवाय करण्यात आलेली ही सक्ती अतिरेकी असल्याची ओरड पालकांनी केली असून, प्रक्रियेविषयी पूर्वसूचना दिल्यानंतरच निर्णयांची अंमलबजावणी करण्याची मागणी करण्यात आली आहे.
अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेमध्ये सहभागी होणाऱ्या शहरातील विद्यार्थ्यांसाठी अकरावीच्या ऑनलाइन केंद्रीय प्रवेश समितीने माहिती पुस्तिका उपलब्ध करून दिल्या आहेत. विद्यार्थ्यांना आपापल्या शाळांमधून या पुस्तिका उपलब्ध करून देण्यात आल्या. शहरातील बहुतांश शाळांमधून सोमवारी या पुस्तिकांचे वाटप सुरू झाल्यानंतर हा प्रकार समोर आला. त्यामुळे माहिती पुस्तिका घेण्यासाठी शाळांमधून गेलेल्या अनेक विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांना पुस्तिकेशिवाय घरी परतावे लागले. 'दहावीच्या परीक्षेनंतर अनेकांना आपल्या हॉलतिकिटाची नेमकेपणाने कल्पना नसते. त्यातच अनेक विद्यार्थी सुट्टीनिमित्त परगावी गेल्याने, या प्रक्रियेसाठी बहुतांश वेळा पालकच शाळेत जाऊन पुस्तिका विकत घेत आहेत. मात्र, आता कोणतीही पूर्वसूचना न देता अगदी अनपेक्षितपणे सक्ती होत असल्याने संताप व्यक्त करण्याशिवाय पर्यायच राहिला नाही,' अशी प्रतिक्रिया पालकांनी 'मटा'कडे नोंदविली.
पुस्तिकेच्या वाटपाबाबत समितीने शाळांना दिलेल्या सूचनेनुसार शाळांमधून हॉलतिकिटाची सक्ती केली जात असल्याचे समितीच्या सचिव मीनाक्षी राऊत यांनी स्पष्ट केले. एकाच विद्यार्थ्याकडून दोन वा तीन पुस्तिका विकत घेण्याचे प्रकार यापूर्वी निदर्शनास आले होते. असे प्रकार टाळण्यासाठी समितीने शाळांना हॉलतिकीट सक्ती करण्याच्या सूचना दिल्याचे त्यांनी सांगितले.
..
अकरावीसाठी यंदा ७३,००० प्रवेश
यंदा पुण्यात अकरावीच्या ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेसाठी ७३ हजार ३८५ प्रवेश उपलब्ध असल्याची माहिती समितीने सोमवारी जाहीर केली. शहरातील ५३१ ज्युनिअर कॉलेजांमधून या जागा उपलब्ध होणार आहेत. या जागांसाठी सरकारी नियमांना धरून ही ऑनलाइन केंद्रीय प्रवेश प्रक्रिया सुरू होत असल्याचेही समितीने जाहीर केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विमानतळ परिसरातील १५० बांधकामे पाडणार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे लोहगाव विमानतळाजवळ केंद्र सरकारच्या विविध अधिसूचनांचा भंग करत नियम डावलून बांधण्यात आलेली १५० बांधकामे पाडून टाकण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला आहे. ही सर्व बांधकामे २००३ नंतर करण्यात आली‌ असून हाय कोर्टाने दिलेल्या आदेशानुसार, या सर्व बांधकामांवर हातोडा मारला जाणार आहे. या बांधकामांवर कारवाई करण्यासाठी पुरेसा पोलिस बंदोबस्त उपलब्ध करुन द्यावा, अशी मागणी पालिकेने पोलिस खात्याकडे केली असून पुढील पंधरा दिवसात ही बांधकामे पाडली जाण्याची शक्यता आहे. लोहगाव विमानतळापासून ठराविक अंतरावर कोणत्याही प्रकारचे बांधकाम करण्यास हवाई दलाने मज्जाव केलेला आहे. याबाबतच्या अधिसूचना देखील केंद्र सरकारने वेळोवेळी प्रसिद्ध केल्या आहेत. बेकायदा पद्धतीने करण्यात आलेल्या बांधकामांमुळे विमानतळाची सुरक्षितता धोक्यात आली असून त्यावर कोणतीही कारवाई केली जात नसल्याची जनहित याचिका हायकोर्टात दाखल करण्यात आली होती. त्याची दखल घेत कोर्टाने हवाई दलाने मनाई केलेल्या हद्दीत बांधकाम झालेल्या मिळकतींवर तातडीने कारवाई करावी, असे आदेश दोन वर्षांपूर्वी (जून २०१४) महापालिकेला दिले होते. या बांधकामाचे सर्वेक्षण करून एका वर्षाच्या आत बेकायदा पद्धतीने उभारण्यात आलेली आणि सुरक्षिततेसाठी धोकादायक ठरणारी ही सर्व बांधकामे पाडून टाकण्याच्या सूचना कोर्टाने दिल्या आहेत. या बांधकामांची पाहणी करण्यासाठी कोर्टाने महापालिका, जिल्हा प्रशासन (पीएमआरडीए) तसेच हवाई दलाच्या अधिकाऱ्यांची समिती नेमून कारवाई करण्यास सांगितले होते. पुणे महापालिकेने यासाठी नेमलेल्या समितीने संपूर्ण पाहणी करून आपला अहवाल तयार केला होता. नियमांचे उल्लंघन करणारी ८३८ बांधकामे या भागात झाल्याचे समोर आले होते. ही सर्व बांधकामे विमानतळापासून शंभर आणि नऊशे मीटर अंतरापर्यंत असल्याने पालिकेने त्यांना नोटीस बजावून खुलासा मागविला होता. बाधित मिळकतधारकांना नोटीस दिल्यानंतर बाजू मांडण्यासाठी १५ दिवसाची मुदत देण्यात आली. त्यानंतर त्याची सुनावणी घेऊन तोंडी आदेश देण्यात आले होते. मिळकतधारकांना त्यांची अंतीम बाजू मांडण्यासाठी १५ दिवसांची मुदत देण्यात आली होती. यामध्ये २००३ सालानंतर झालेल्या १५० बांधकामांचा समावेश असल्याने ही सर्व बांधकामे पाडली जाणार असल्याचे पालिकेचे अधिक्षक अभियंता नरेंद्र साळुंके यांनी सांगितले. या बांधकामांवर कारवाई करताना स्थानिक नागरिकांचा विरोध होण्याची मोठी शक्यता असल्याने कोर्टाच्या आदेशाची अंमलबजावणी करण्यासाठी पुरेसा पोलिस बंदोबस्त उपलब्ध करुन देण्याचे पत्र पालिकेने पोलिस आयुक्तांना पाठविले आहे. पोलिसांनी मनुष्यबळ उपलब्ध करुन दिल्यानंतर पुढील पंधरा दिवसात ही सर्व बांधकामे पाडली जातील, असे साळुंके यांनी सांगितले. भागाचे नाव झालेली बेकायदा बांधकामे

खेसे पार्क २० कलवड १० नगर रोड ०१ खुळेवाडी गावठाण २४ फॉरेस्ट पार्क ०६ खुळेवाडी, झोपडपट्टी ८९

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पोषण आहार खरेदीची चौकशी

$
0
0

घोटाळ्याच्या तक्रारींनंतर शिक्षण आयुक्तांचा आदेश

Yogesh.Borate@timesgroup.com

पुणे : राज्यातील शालेय पोषण आहार योजनेच्या गेल्या वर्षभरातील खरेदीच्या व्यवहारांच्या चौकशीचा आदेश शिक्षण आयुक्तांनी दिला आहे. यामुळे वर्षाला जवळपास सोळाशे कोटी रुपयांचे बजेट असलेली ही योजना वादात सापडली आहे.

याविषयी आयुक्त कार्यालयाने राज्याच्या प्राथमिक शिक्षण संचालकांना लिहिलेले पत्र 'मटा'च्या हाती लागले आहे. या पत्रामध्ये असलेल्या उल्लेखानुसार, शैक्षणिक वर्ष २०१५-१६मध्ये प्राथमिक शिक्षण संचालनालयाने विविध योजनांखाली राज्य पातळीवर खरेदी करण्यात आलेल्या संचिकांबाबतची माहिती आयुक्त कार्यालयाकडे सादर करण्याचे आदेश कार्यालयाने दिले आहेत. शालेय पोषण आहाराची माहिती खास दूतामार्फत सादर करण्याचे आदेश या पत्राद्वारे देण्यात आले आहेत. याविषयी अधिक माहिती घेण्यासाठी शिक्षण आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर, तसेच पोषण आहार योजनेची जबाबदारी सांभाळणारे उपसंचालक महेश पालकर यांच्याशी संपर्क साधला असता, ते उपलब्ध होऊ शकले नाहीत.

राज्यातील सरकारी आणि अनुदानित शाळांमधील योजनेच्या अंमलबजावणीच्या टप्प्यावर गेल्या काही वर्षांमध्ये अनेक वादग्रस्त निर्णय झाल्याची ओरड केली जात होती. या योजनेतून आदिवासी भागातील विद्यार्थ्यांना होणारे 'मायक्रोन्यूट्रिएंट्स'चे वाटप, स्टेशनरीची खरेदी, तांदूळ वाहतूक, पाठ्यपुस्तकांची वाहतूक, धान्यादी पुरवठा, भांडी खरेदी, किचन शेड उभारणी आणि त्यांचे बांधकाम आदी टप्प्यांवर या ना त्या प्रकाराने मोठ्या प्रमाणावर आर्थिक गैरव्यवहार होत असल्याची ओरड प्राथमिक शिक्षण संचालनालयामधून सातत्याने केली जात होती. गेल्या वर्षभरामध्ये या योजनेतून झालेल्या आर्थिक व्यवहारांसाठी राज्याच्या शिक्षण आयुक्त कार्यालयाच्या परोक्ष थेट मंत्रालयामधून मान्यता घेण्याचे प्रकारही समोर आले होते. त्या पार्श्वभूमीवर आयुक्त कार्यालयाने हा चौकशीचा आदेश दिल्याचे सोमवारी उघड झाले. (क्रमशः)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दारूच्या नशेत गुन्ह्याचा उलगडा

$
0
0

पुणे : वीज बिल भरणा केंद्रातील रक्कम जमा करणाऱ्या व्यक्तीच्या वाहनावरील चालकास आपल्यात सामील करून दोन गुन्हेगारांनी २५ लाखांच्या रकमेची लूट केली. त्यानंतर मिळालेल्या पैशांची वाटणी करत असताना त्या चालकाचाही खून केला. अडीच वर्षांपूर्वी घडलेल्या या लुटीच्या आणि खुनाच्या गुन्ह्याचा उलगडा नाट्यपूर्ण पद्धतीने झाला. दोघांपैकी एका गुन्हेगाराने दारुच्या नशेत असताना आपल्या मित्राला या कृत्याची माहिती दिली. गुन्हा केल्यानंतर आरोपी फार काळ लपून राहू शकत नसल्याचे यामुळे पुन्हा सिद्ध झाले आहे. या गुन्ह्याप्रकरणी विशाल लक्ष्मण भोले (वय २३, रा. ताडीवाला रोड) आणि त्याचा साथीदार रोहित चंद्रकांत गद्रे (रा. दापोडी) अशी अटक केलेल्या दोघांची नावे आहेत. वीज बिल भरणा केंद्रातील रक्कम जमा करण्याचे काम बाबूराम भय्याराम अग्रवाल करत होते. ऑक्टोबर २०१३ मध्ये ते चालक रमेश चौहानसोबत रोकड घेऊन जात असताना येरवड्यातील जाईजुई शासकीय वसाहत येथे त्यांना लुटण्यात आले. अग्रवाल यांच्या डोळ्यांत मिरचीची पूड टाकून २५ लाखांची रक्कम लुटण्यात आली होती. या घटनेतनंतर अग्रवाल यांच्या कारवरील चालक गायब होता. या प्रकरणी स्थानिक व गुन्हे शाखेच्या पोलिसांनी कसून तपास केला. पण, आरोपींचा माग लागला नाही. या गुन्ह्यात अटक केलेल्या भोलेकडे चौकशी करण्यात आली. पण, त्याने गुन्ह्याची कबुली दिली नव्हती. अखेर या गुन्ह्याचा उलगडा झाला तो पाच-सहा महिन्यांपूर्वी. भोले व त्याचा एक मित्र दारू पित बसले होते. त्यावेळी नशेत असलेल्या भोले याने आपण २५ लाखांची लूट करून चालकाचाही खून केल्याची माहिती त्याच्या मित्राला दिली. गुन्हे शाखा युनिट एकचे पोलिस निरीक्षक रघुनाथ फुगे व सहायक पोलिस निरीक्षक महेंद्र जाधव यांच्या पथकाने एका आर्म अॅक्टच्या गुन्ह्यात भोलेच्या मित्राला अटक केली होती. त्या वेळी त्याने भोलेने केलेल्या गुन्ह्याची माहिती पोलिसांनी दिली. त्यानुसार पोलिसांनी भोलेची माहिती काढून गुन्ह्याचा तपास सुरू केला. त्या वेळी त्याने २५ लाख लुटल्याचे आढळून आले. त्यापैकी पंधरा लाख त्याने घेतले तर, दहा लाख साथीदाराला दिले होते. मिळालेल्या पैशांतून त्याने घर आणि गाडी घेतली होती. हा गुन्हा करण्यासाठी दोघांनी अग्रवाल यांच्या कारवरील चालक चौहान याची मदत घेतली होती. घटनेच्या ठिकाणी गतिरोधकावर कारचा वेग कमी झाल्यानंतर चौहान याने कारच्या खिडकीच्या काचा खाली केल्या. त्यावेळी दबा धरून बसलेल्या आरोपींनी अग्रवाल यांच्या डोळ्यांत मिरचीची पूड टाकून रक्कम लुटली. संध्याकाळी लुटीच्या पैशांची वाटणी करत असताना चौहानचाही खून करून त्याचा मृतदेह कोंढवा येथे टाकून दिल्याचे समोर आले. अडीच वर्षांपासून हा गुन्हा उघडकीस आलेला नव्हता. पण, पोलिसांनी कौशल्यपूर्वक तपास करून या गुन्ह्याचा तपास केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आगीत ५० झोपड्या जळाल्या

$
0
0

मंगळवार पेठेतील घटनेत चार जण जखमी; बारा सिल‌िंडरचे स्फोट म. टा. प्रतिनिधी, पुणे मंगळवार पेठेतील भीमनगरमध्ये सोमवारी दुपारी लागलेल्या आगीमध्ये ५० झोपड्या जळून खाक झाल्या. आगीमध्ये बारा सिल‌िंडरचे स्फोट झाल्यामुळे आग भडकली. मोलमजुरी करून झोपडपट्टीत राहणाऱ्या नागरिकांचे संसार त्यांच्या डोळ्यांदेखत आगीत जळून खाक झाले. एका बाजूने तारेचे कुंपण तर दुसऱ्या बाजूने चिंचोळ्या गल्ल्या त्यामुळे अग्निशमन दलास मदतकार्यात अडथळा आला. अडीच तासाच्या प्रयत्नानंतर आग आटोक्यात आली. या आगीत चार जण जखमी झाले आहेत. आगीचे कारण समजू शकलेले नाही. भीमनगरमधील दाट झोपडपट्टीमध्ये दुपारी पावणे दोनच्या सुमारास पवार नावाच्या व्यक्तीच्या घरात अचानक आग लागली. एकमेकांना चिकटून असलेल्या पत्र्यांच्या झोपड्यांमुळे आग वेगाने पसरली. आग लागल्याची माहिती कळताच नागरिकांची धावपळ उडाली. महिला, लहान मुले गल्लीबोळातून सैरवैर धावत सुरक्षित ठिकाणी जाण्याचा प्रयत्न करत असल्याने एकच गोंधळ उडाला. काही नागरिकांनी आगीचे गांभीर्य ओळखून घरातील सिल‌िंडरबाहेर काढण्यास सुरूवात केली. तेवढ्यात एका झोपडीतील सिल‌िंडरचा स्फोट झाला. त्यामुळे परिसरातील अनेक झोपड्यां आगीमध्ये सापडल्या. नागरिकांनी आगीची माहिती अग्निशमन दलास दिली. परंतु, कसबा पेठेतील गाडी दुरूस्तीसाठी व्हेईकल डेपोमध्ये पाठविण्यात आली होती. त्यामुळे शेजारी एका मिनिटाच्या अंतरावर अग्निशमन केंद्र असताना वेळेवर मदत मिळाली नाही. मदत कार्यासाठी पहिली गाडी भवानी पेठेतील मुख्य केंद्रातून सोडण्यात आली. ही गाडी घटनास्थळी पोहोचण्यात सुमारे आठ मिनिटांचा अवधी लागला. त्यादरम्यान आणखी तीन ते चार सिल‌िंडरचा स्फोट झाल्याने आगीने रौद्र रूप धारण केले होते. भीमनगर झोपडपट्टीमध्ये अग्निशमन दलाचे बंब जाण्यासाठी जागा नसल्याने काही बंब शिवाजी आखाड्याच्या बाजूने पाणी मारत होते. परंतु, आगीवर त्याचा फारसा परिणाम होत नव्हता. काही वेळानंतर एक बंब भीमनगर येथून नागझरी नाल्यामध्ये उतरून झोपडपट्टीजवळ आला. पण, तेथे उंच भिंत व तारेचे कुंपण असल्याने तसेच सिल‌िंडरचा स्फोट होण्याची शक्यता असल्याने लांबूनच पाणी मारावे लागत होते. त्याचदरम्यान आणखी दोन सिल‌िंडर फुटले. त्यातील एका सिल‌िंडरचा तुकडा हवेमध्ये उंच उडून नागझरी नाल्याच्या पलीकडे पडून तेथे आग लागली. आगीमुळे मोठ्या प्रमाणात धूर पसरला होता. आगीचे लोट निघत असल्यामुळे दूर अंतरावरूनही धूर दिसत होता. एकामागे एक १२ सिल‌िंडरचे स्फोट झाल्यामुळे झोपड्या जळून खाक झाल्या. संसारोपयोगी साहित्य नष्ट झाले. नागरिकांचे संसार डोळ्यांसमोर जळत असल्यामुळे त्यांना अश्रू रोखता आले नाहीत. अग्निशमन दलाने अडीच तास प्रयत्न करून आग आटोक्यात आणली. अग्निशमन दलाच्या जवानांसह तेथील नागिरकांनीही आग विझवण्यासाठी मदत केली. याबाबत सहायक पोलिस आयुक्त किशोर नाईक यांनी सांगितले, की या आगीत १५ झोपड्या पूर्ण जळाल्या आहेत. तर ४० झोपड्यांना आगीची झळ बसली आहे. यामध्ये चार नागरिक किरकोळ जखमी आहेत. त्यांना कमला नेहरू हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले आहे. आगीत घरे जळालेल्या नागिरकांची बारणे स्कूल येथे राहण्याची व्यवस्था केली आहे. अग्निशमन दलाचे विभागीय अधिकारी सुनील गिलबिले, केंद्रप्रमुख प्रभाकर उमरटकर, राजेश कांबळे, पंढरीनाथ उभे, राहुल नलावडे, किशोर मोहिते, विजय भिलारे, मधुकर मते आणि शत्रुघ्न वाझे या जवानांनी आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रयत्न केले. आग विझत आल्यानंतर तीन वाजण्याच्या सुमारास पावसाला सुरुवात झाली. त्यामुळे थोडासा दिलासा मिळाला.

बघ्यांच्या गर्दीचा त्रास भीमनगर येथे लागलेली आग दूर अंतरावरावरून दिसत होती. आग लागल्याची माहिती मिळताच ती पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. बघ्यांच्या गर्दीमुळे मदतकार्यात अडचणी आल्या. शेवटी मोठ्या प्रमाणात पोलिसांचा फौजफाटा मागविण्यात आला. पोलिसांनी बघ्यांना 'प्रसाद' दिल्यानंतर गर्दी कमी झाली. पोलिसांनी जुन्या बाजाराकडे जाणारे रस्ते बंद केले होते.

पाण्याचा तुटवडा एकीकडे पुणे महापालिका आपत्ती व्यवस्थापनासाठी सज्ज असल्याचे मिरवत असले, तरी आज हा दावा फोल ठरला. तब्बल १५ अग्निशमन दलाच्या गाड्या आग नियंत्रित करत असताना त्यांना पुरेसा पाणीपुरवठा करण्यात आला नाही. पाण्याचा तुटवडा निर्माण झाल्याने जवानांनी नागझरी नाल्याचे पाणी अडवून मोटारीने ते खेचून आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला.

सुट्टीवरचा कर्मचारी मदतकार्यात मुख्य अग्निशमन केंद्रात काम करणारे फायरमन अनिल कांबळे यांनी रात्रपाळी केली होती. त्यांना आग लागल्याचे समजताच ते घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी मदतकार्यास सुरुवात केली. तसेच, काही झोपड्यामध्ये घुसून त्यांनी सहा सिल‌िंडर बाजूला काढले. त्यांनी पुढाकार घेतल्यानंतर इतरही कर्मचाऱ्यांनी काही झोपडपट्ट्यांमधील सिलेंडर बाजूला काढले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


दुसऱ्या लग्नाची फसलेली गोष्ट

$
0
0

तरुणीच्या पालकांच्या सतर्कतेमुळे घटना उघडकीस; नवरोबा गजाआड

म. टा. प्रतिनिधी, पुणे

तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून लग्नाच्या तयारीत असलेल्या दोन मुलांच्या पित्याचा डाव मुलीच्या पालकांच्या सतर्कतेने उघडकीस आला. या प्रकरणी संबंधितावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करून कोथरूड पोलिसांनी त्याला अटक केली.

नवनाथ केरबा पवार (वय ३१, रा. जवणगाव, ता. मावळ) असे अटक केलेल्याचे नाव आहे. या प्रकरणी २१ वर्षीय तरुणीने तक्रार दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित तरुणी खासगी कंपनीत नोकरीला आहे. तसेच, ती विमा एजंटही आहे. विमा पॉलिसी काढण्याच्या निमित्ताने तिची पवार सोबत ओळख झाली. त्यानंतर पवार वेगवेगळी कारणे काढून तिच्या घरी येऊ लागला. 'माझे तुझ्यावर प्रेम आहे,' असे सांगून पवारने तरुणीला लग्नाची मागणी घातली. तरुणीने त्याच्या आई-वडिलांची भेट घ्यायची असल्याचे सांगितले.

परंतु, तरुणी भेटल्यानंतर तिला आपल्या पहिल्या लग्नाची माहिती कळू नये, म्हणून त्याने अखेरपर्यंत पालकांची भेट टाळली. काही दिवसांपूर्वी पवार दोन मित्रांसोबत संबंधित तरुणीच्या घरी गेला. तिच्या आई-वडिलांशी लग्नाची बोलणी केली. त्यानुसार सोमवारी तिच्या वडिलांनी आळंदी येथे लग्न लावून देण्याची तयारी केली. परंतु, लग्नाची तारीख जवळ आली तरी पवारच्या नातेवाइकांचा पत्ता नव्हता. त्यामुळे मुलीच्या पालकांनी लग्नाची तयारी जाणून घेण्यासाठी पवारला फोन केला. त्याचे बोलणे संशयास्पद वाटल्याने मुलीचा भाऊ आणि अन्य एक नातेवाइक पवारच्या पिरंगुट येथील घरी गेले. त्यावेळेस तेथे उपस्थित असलेल्या महिलेला पवारबाबात विचारणा केली. त्यावेळी तिने आपण पवारची पत्नी असून आपल्याला दोन मुले असल्याचे सांगितले. ते ऐकून मुलीच्या भावाला आणि नातेवाइकाला धक्काच बसला. त्यांनी ही बाब मुलीच्या वडिलांना सांगितली. वडिलांनी थेट कोथरूड पोलिस ठाण्यात तक्रार दिली. या प्रकरणी पोलिस उपनिरीक्षक जोगदंड अधिक तपास करत आहेत.

शहरात अशाप्रकारच्या फसवणुकीच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. या पार्श्वभूमीवर उपवर तरुणींनी भावी जोडीदाराची सर्व माहिती मिळवावी. त्यानंतरच विवाहाचा निर्णय घ्यावा, असे आवाहन शहर पोलिसांतर्फे करण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रानडे इन्स्टिट्यूटमध्ये लेटरबॉम्ब

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

'फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया'च्या (एफटीआयआय) संचालकांना स्फोटकांचे पार्सल मिळाल्याची घटना ताजी असतानाच सोमवारी रानडे इन्स्टिट्यूटच्या आवारातील वृत्तपत्रविद्या विभागाच्या प्रमुखांनाही स्फोटकांचे पार्सल आणि धमकीचे पत्र मिळाले. या पार्सलमध्ये एक डिटोनेटर, स्फोटकासारखी दिसणारी पावडर आणि धमकीचे पत्र आहे. कन्हैयाकुमारला पाठिंबा दिल्यामुळे स्फोटके पाठवत असल्याचे या धमकीच्या पत्रात म्हटले आहे.

'एफटीआयआय'ला ज्या दिवशी पार्सल मिळाले त्याच दिवशी रानडे इन्स्टिट्यूटमध्ये पार्सल पाठवण्यात आले; मात्र विभागप्रमुख माधवी रेड्डी यांच्या नावे पार्सल असल्याने ते सोमवारी शिपायामार्फत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील रेड्डी यांच्या कार्यालयात पाठवण्यात आले. दुपारी रेड्डी यांनी हे पार्सल पाहिले. त्या वेळी त्यांना त्यात स्फोटके व धमकीचे पत्र असल्याचे आढळून आले. त्यानंतर विद्यापीठाचे सुरक्षा अधिकारी मारुती चव्हाण यांनी डेक्कन पोलिसांना घटनेची माहिती दिली.

याबाबत पोलिस उपायुक्त सुधीर हिरेमठ यांनी सांगितले, 'हे पार्सलही 'एफटीआयआय'मध्ये आलेल्या पार्सलसारखेच आहे. यामध्ये फक्त नाव बदलण्यात आले आहे. पार्सलमधील मजकूरही सारखाच आहे. धमकीचे पत्र इंग्लिशमध्ये असून, टाइप करण्यात आलेले आहे. या प्रकरणी डेक्कन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.'

'एफटीआयआय'चे पार्सल पुण्यातूनच

'एफटीआयआय'मध्ये आलेले पार्सल पुणे शहरातूनच आल्याचे प्राथमिक चौकशीत दिसून आल्याचे पोलिस उपायुक्त सुधीर हिरेमठ यांनी सांगितले. या प्रकरणी तपासासाठी पोस्ट विभागाची मदत घेतली जात असल्याचे त्यांनी नमूद केले.

रानडे इन्स्टिट्यूटमध्ये आलेले पार्सलही 'एफटीआयआय'मध्ये आलेल्या पार्सलसारखेच आहे. यामध्ये फक्त नाव बदलण्यात आले आहे. मजकूरही सारखाच आहे.

- सुधीर हिरेमठ, पोलिस उपायुक्त

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तोकडे कपडे घातल्यामुळे तरुणीची छेड

$
0
0

पाच जणांविरुद्ध गुन्हा, तिघांना अटक

म. टा. प्रतिनिधी, पुणे

'तू एवढे तोकडे कपडे कसे काय घालू शकतेस?, एवढ्या रात्री दोन पुरुषांसोबत तू काय करतेयस?', असे प्रश्न विचारत तरुणीची छेड काढल्याची आणि तिच्या​ मित्रांना मारहाण केल्याची धक्कादायक घटना महाराष्ट्र दिनी (एक मे) पहाटे पाचच्या सुमारास कोंढवा येथे घडली. पोलिसांनी सुरुवातीला ही घटना अदखलपात्र गुन्हा म्हणून नोंदवली होती. मात्र, तरुणीने या घटनेची तक्रार वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे केल्यानंतर विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला आहे.

या प्रकरणी जाहिरात व्यवसायातील २२ वर्षांच्या तरुणीने पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार अमित अशोक मुकेडकर (वय ३५), शुभम शशी गुप्ता (वय १९, रा. हाईड पार्क, मार्केटयार्ड), योगेश राजकृष्णात चौगुले (वय २६, रा. अरण्येश्वर) असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. तर, राज आणि इतर एका तरुणाचा या गुन्ह्यांत शोध सुरू आहे.

तरुणी ही रविवारी पहाटे पाचच्या सुमारास आपल्या दोन मित्रांसमवेत कारमधून सॅलसबरी पार्क येथून लुल्लानगरकडे घरी जात होती. त्यांची कार लुल्लानगर चौकात पोहोचली असता, दुसरी एक कार त्यांच्याजवळ आली होती. त्या कारमध्ये असलेल्या तरुणांनी त्यांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. कारच्या पाठीमागील सीटवर बसलेल्या तरुणीच्या मित्राने दुसऱ्या कारमधील तरुणांना शिवीगाळ का करता, अशी विचारणा केली होती. परंतु, कारमधील तरुणांनी त्याच्याकडे लक्ष न देता कार तरुणीच्या दिशेने नेली आणि तिची छेडछाड काढण्याचा प्रयत्न केला.

हा सर्व प्रकार सुरू असताना तरुणीची कार तिच्या लुल्लानगर येथील सोसायटीत पोहोचली होती. त्यापाठोपाठ तिची छेड करणारे तरुणही त्यांच्याकारमधून तेथे पोहोचले होते. यावेळी कारमध्ये पाचजण असल्याचे त्यांच्या लक्षात आले. या तरुणांनी तरुणीच्या दोघा ​मित्रांना मारहाण केली. तिला कारमधून खाली खेचले आणि तिचे कपडे फाडले. तिलाही बेदम मारहाण केल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

तिने या घटनेची माहिती पोलिसांना तसेच तिच्या मित्रांना लगेचच दिली होती. कोंढवा पोलिसांनी सुरुवातीला या घटनेची नोंद अदखलपात्र गुन्ह्यांत केली होती. मात्र, तरुणीने हा प्रसंग वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांना सांगितल्यावर विनयभंग तसेच मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला तर तिघा आरोपींना अटक करण्यात आली. दरम्यान, तिने दाखल केलेल्या तक्रारीत कमी कपड्यांचा उल्लेख नाही.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पिक्चर पाहणाऱ्या सात महिलांना नोटीस

$
0
0





म. टा. प्रतिनिधी, येरवडा कार्यालयात 'ऑन ड्युटी' असताना सैराट चित्रपट पाहण्यास गेलेल्या सात महिलांना कारणे दाखवा नोटीस बजाविण्यात आली असून, खुलासा सादर करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच, संबंधित महिलांचे एक दिवस विनावेतन करण्याचे आदेश उपसंचालकांनी अधीक्षकांना दिले आहे. येरवडा मेंटल हॉस्पिटलमधील प्रशासकीय विभागातील सात महिला अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी शुक्रवारी (६ मे) 'ऑन ड्युटी' असताना सैराट चित्रपट पाहण्यास गेल्याचा धक्कादायक प्रकार घडला होता. कामावर असताना प्रशासकीय विभागातील अनेक महिला कर्मचारी एकाच वेळी चित्रपट पाहण्यास गेल्याने संपूर्ण कार्यालय ओस पडले होते. याबाबतचे वृत्त 'मटा'ने रविवारी प्रसिद्ध केल्यानंतर आरोग्य विभागात खळबळ उडाली होती. त्यानंतर प्रशासनाकडून संबंधित महिलांना कार्यालयातून गायब झाल्याप्रकरणी नोटीस बजावून खुलासा मागितला. प्रशासकीय विभागात काम करणाऱ्या सात महिला अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी दैनंदिन कामे सोडून शुक्रवारी कार्यालयीन वेळेत (ऑन ड्युटी) थेट नगर रोडवरील मल्टीप्लेक्समध्ये सैराट चित्रपट पाहण्याचे धाडस केले. यामध्ये एकूण सात महिला अधिकारी व कर्मचारी असून त्यामध्ये कार्यालयीन अधीक्षकांचा देखील समावेश होता. मशिनवर पंचिंग आणि हजेरीपत्रकावर सह्या केल्यानंतर सकाळी साडे अकराच्या सुमारास महिला कार्यालयातून बाहेर पडल्या आणि थेट नगर रोडवरील मल्टीप्लेक्समध्ये चित्रपट पाहण्यास गेल्या. सुमारे पावणेतीन तासानंतर या सर्व महिला साडेचार वाजण्याच्या सुमारास कार्यालयात दाखल झाल्या. याबाबत प्रभारी अधीक्षक डॉ. मधुमिता बहाले म्हणाल्या, 'कार्यालयीन वेळेत एकाच वेळी अनेक महिला गैरहजर (गायब) दिसल्याने संबंधित महिलांना कारणे दाखवा नोटीस बजाविण्यात आली आहे. त्यावर खुलासा सादर करण्यास सांगितले असून, प्रशासनाकडून केलेल्या कारवाईचा अहवाल उपसंचालकांना सादर करणार आहे. उपसंचालकांच्या आदेशानुसार सात महिलांचे एक दिवस विनावेतन करण्यात येणार आहे. नियम धाब्यावर बसवून कार्यालयीन वेळेत चित्रपट पाहायला गेलेल्या महिलांचे एका दिवस विनावेतन करण्याचे आदेश अधीक्षकांना दिले आहे. प्रशासनाकडून संबंधित महिलांवर काय कारवाई केली. याचा अहवाल सादर करण्यास सांगितले आहे, असे पुणे विभागाचे उपसंचालक डॉ. हनुमंत चव्हाण यांनी सांगितले. आरोग्य विभागाची परवानगी न घेता येरवडा मेंटल हॉस्पिटलमध्ये झालेल्या चित्रपटाच्या शुटिंगचा अहवाल तयार करण्याचे आदेश अधीक्षकांना दिले आहेत. अधीक्षकांनी आपल्या अधिकाराचा वापर करून बेकायदा शुटिंग करण्यास परवानगी दिल्याची माहिती आरोग्य संचालकांनी मागवली आहे. प्रभारी अधीक्षकांकडून अहवाल प्राप्त झाल्यानंतर दोषींवर कडक कारवाई केली जाईल, अशी माहिती उपसंचालक डॉ. हनुमंत चव्हाण यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

इंदापूरला कालवा फुटला

$
0
0



म. टा. वृत्तसेवा, दौंड इंदापूर शहरातील नागरिकांसाठी सोडलेले पाणी तरंगवाडी तलावात सोडण्यात आल्यानंतर हा कालवा मंगळवारी सकाळी नऊ वाजण्याच्या दरम्यान (खमगळवाडी ता. इंदापूर) फुटल्याने १० ते २० क्युसेस पाणी वाया गेले. खडकवासला धरणातून इंदापूर आणि दौंडला सोडण्यात आलेल्या एक टीएमसी पिण्याच्या पाण्याचे नियोजन पाटबंधारे विभागाचे अधिकारी करत असतानाच; दुसरीकडे मात्र या पाण्याचा अपव्यय होताना दिसत आहे. दौंड, इंदापूरला सोडण्यात आलेल्या पाण्यावरून वाद होत असतानाच जलसंपदा विभागाच्या हालगर्जीपणामुळे पाणी वाया जात आहे. सरकारने पाणीगळती आणि चोरी या गोष्टी रोखण्यासाठी जलसंपदा विभागाचे अधिकारी, महसूल विभागाचे अधिकारी, पोलिस कर्मचारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. असे असूनही पाणीगळती होत असल्याने नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. फेब्रुवारी महिन्यात खडकवासला धरणातून आवर्तन दिले होते. त्यावेळीही याच परिसरात कालवा फुटला होता आणि ऐन उन्हाळ्यात लाखो लीटर पाणी वाया गेले होते. पाटबंधारे विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या हलगर्जीपणा आणि दुर्लक्षामुळे लाखो लीटर पाणी वाया गेले आहे. पाटबंधारे विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी युद्धपातळीवर काम करून फुटलेला कालवा बुजवला आहे. तरंगवाडी तलाव भरल्यानंतर 'टेल टू हेड' या नियमानुसार दौंड तालुक्यातील जनतेला पाणी देण्यात येणार आहे. पाण्याचा अपव्यय झाल्यास दौंडच्या वाट्याचे पाणी वाया जाणार आहे. यामुळे इंदापूरमधील तलाव भरत असताना पाण्याचा अपव्यय होऊ नये, याकडे गांभीर्याने लक्ष देणे गरजेचे आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘तैयबाचे अतिरेकी पुण्यात घुसलेत’

$
0
0

माथेफिरूने केली पुणे पोलिसांची मस्करी; अखेर गजाआड
म. टा. प्रतिनिधी, पुणे
'लष्करे तैयबा'चे सात दहशतवादी पुण्यात घुसले आहेत... पुणे स्टेशन, काही हॉटेल्स, मॉल तसेच मुंबईत दहशतवादी हल्ला करणार आहेत... मला पश्चाताप होत असल्याने ही माहिती देत आहे... वाचवू शकत असाल तर वाचवा...' असा धमकीचा फोन पोलिस नियंत्रण कक्षाला करणाऱ्या माथेफिरूला गजाआड करण्यात आले.
विशेष म्हणजे या माथेफिरूने जानेवारी महिन्यांतही असाच 'उद्योग' करून नागपूरला जाणाऱ्या विमानात बॉम्ब असल्याचा कांगावा केला होता. पोलिसांनी त्याही गुन्ह्यांत त्याला अटक केली होती. तो १९ मार्च रोजी जामिनावर सुटला. त्यानंतर लगेचच त्याने पुन्हा दहशतवादी हल्ल्याची धमकी देऊन पोलिसांची तारांबळ उडवली.
संजीवकुमार नकुल मिश्रा (वय ३९, रा. भुवनेश्वर, ओडशा) असे अटक केलेल्याचे नाव आहे. मिश्रा अॅनिमेशनचा व्यवसाय करत होता. पुण्यात पत्नी आणि मुलीसह राहण्यास होता. तो जानेवारीमध्ये भुवनेश्वरवरून मुंबईला विमानाने येत होता. विमानात त्याच्याकडील चहा महिलेच्या अंगावर सांडला होता. या वेळी झालेल्या वादातून त्याच्याकडे चौकशी झाली होती. मुंबई विमानतळावर पार्क केलेली त्याची कार घेऊन तो पुण्याला येत होता. त्याने वाहतुकीचे नियम मोडल्यामुळे त्याच्यावर पोलिसांनी कारवाई केली होती. त्रागलेल्या मिश्राने पुण्यात पोहोचल्यानंतर मुंबई आणि पुणे पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला फोन करून मुंबई-नागपूर विमानात बॉम्ब ठेवल्याचे सांगितले. त्यावेळी त्याला अटक झाली होती. या घटनेनंतर त्याची पत्नी आणि मुलगी त्याला सोडून गेली होती. तो १९ मार्च रोजी जेलमधून बाहेर आला होता.
तो सध्या कात्रज परिसरात लॉजमध्ये राहत होता. त्याने सोमवारी पुणे नियंत्रण कक्षाला फोन करून पाकिस्तानातून लष्करे तैयबाचे सात दहशतवादी पुण्यात घुसल्याची माहिती दिली. 'मला पश्चाताप झाला असल्याने मी माहिती देत आहे. पुणे स्टेशन, हॉटेल सन अॅण्ड सॅण्ड, फिनिक्स मॉल, मुंबई विमानतळ, रेल्वे स्टेशन या ठिकाणी दहशतवादी हल्ला होणार आहे,' असे त्याने सांगितले.
पुणे पोलिस दलातील वरिष्ठ पोलिस निरीक्षक धनंजय धुमाळ यांच्या पथकाने तत्काळ कारवाई करून मिश्राला अटक केली. त्याच्याकडे केलेल्या चौकशीत त्याने यापूर्वीही गुन्हा केल्याची कबुली दिली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कचराडेपोंच्या जागा ताब्यात मिळाव्यात

$
0
0

मुख्यमंत्र्यांकडून सहकार्याची पालिकेला अपेक्षा
म. टा. प्रतिनिधी, पुणे
शहरातील कचऱ्याच्या समस्येवर मात करण्यासाठी विविध उपाययोजना केल्या जात असल्या, तरी प्रक्रिया प्रकल्पासाठी आवश्यक जागांचा ताबा महापालिकेला प्राप्त झालेला नाही. त्या संदर्भातील अंतिम निर्णय राज्य सरकारकडे प्रलंबित असून, मुख्यमंत्र्‍यांनी त्याला हिरवा कंदील द्यावा अशी अपेक्षा केली जात आहे.
शहरातील कचऱ्याच्या समस्येवर मात करण्यासाठी गेल्या वर्षी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली होती. त्यानंतर, बायोगॅस प्रकल्प, कम्पोस्टिंग; तसेच इतर विविध उपाययोजनांच्या माध्यमातून कचऱ्याची समस्या सोडविण्यासाठी महापालिकेचे प्रयत्न सुरू आहेत. सरकारने महापालिकेला दिलेल्या वढू-तुळापूर येथील जागेला विरोध असल्याने त्याऐवजी पिंपरी-सांडस येथील जागा देण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला होता. त्याला, राज्य सरकारसह केंद्र सरकारने मान्यता दिली आहे. जागा ताब्यात घेण्यासाठीचे शुल्कही पालिकेने जमा केले आहे. तरीही, ही जागा पालिकेला हस्तांतरित झालेली नाही. पिंपरी-सांडस येथील जागेच्या बदल्यात वढू-तुळापूर येथील जागा वनविभागाला देण्यास पालिकेने तयारी दर्शविली आहे. परंतु, शिवसेनेचे खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी पिंपरी-सांडस येथील जागा पालिकेला देण्यास विरोध केला असल्याने त्याबाबत अंतिम निर्णय झालेला नाही. येत्या शुक्रवारी होणाऱ्या बैठकीत त्यावर मुख्यमंत्री सकारात्मक निर्णय घेतील, अशी अपेक्षा आहे.
शहराची वाढती गरज लक्षात घेऊन मोशी येथील पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या कचरा डेपोशेजारील जागेची मागणीही पुणे महापालिकेने कचरा प्रक्रिया प्रकल्पासाठी केली होती. त्यासाठीचा, रितसर प्रस्ताव विभागीय आयुक्तांमार्फत सरकारला पाठविण्यात आला आहे. ही जागा पुणे महापालिकेच्या कोणत्याही कचरा प्रकल्पासाठी देण्यात येऊ नये, असा ठराव पिंपरी-चिंचवड महापालिकेने केला आहे. त्यामुळे, ही जागा महापालिकेला मिळण्यातही अडचणी निर्माण झाल्या असून, त्या सोडविण्यासाठी मुख्यमंत्र्‍यांनीच पुढाकार घ्यावा, अशी मागणी केली जात आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


योगेश कुंभेजकर राज्यात पहिला

$
0
0

'यूपीएससी'त राज्याची 'शंभर नंबरी' कामगिरी

म. टा. प्रतिनिधी, पुणे

मूळचा सोलापूरचा असलेला योगेश विजय कुंभेजकर याने केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (यूपीएससी) राष्ट्रीय पातळीवरील गुणवत्ता यादीत आठवा क्रमांक पटकावून, राज्यातील विद्यार्थ्यांमधून पहिला येण्याचा मान मिळवला. दिल्लीची टीना दाबी देशात पहिली आली आहे. पहिल्याच प्रयत्नात तिने हे यश मिळवले आहे. जम्मू-काश्मीरच्या अतहर आमिरचा देशात दुसरा क्रमांक आला आहे.

या परीक्षेमध्ये अधिकारी होण्यासाठी निवड झालेल्या १०७८ उमेदवारांची यादी आयोगाने मंगळवारी सायंकाळी जाहीर केली. राज्याच्या उमेदवारांसाठी यंदाचे वर्ष चांगले असले, तरी त्यामध्ये अधिक सुधारणा होणे शक्य असल्याचेच हा निकाल दर्शवत असल्याच्या प्रतिक्रिया या निकालानंतर तज्ज्ञांकडून नोंदविण्यात आल्या. यंदाच्या निकालात शंभरहून अधिक मराठी उमदेवारांनी यश संपादित केले असले, तरी पहिल्या शंभरात येणाऱ्या उमेदवारांचे प्रमाण वाढण्याची गरज असल्याचेही हा निकाल स्पष्ट करत आहे.

आयोगाने जाहीर केलेल्या यादीमध्ये खुल्या गटातील ४९९, इतर मागासवर्गातील ३१४, अनुसूचित जातींमधील १७६ आणि अनुसूचित जमातींमधील ८९ उमेदवारांची शिफारस करण्यात आली आहे. एकूण यशस्वी उमेदवारांपैकी ५२ उमेदवार शारीरिक विकलांग असल्याचेही हा निकाल सांगत आहे.

कुंभेजकर सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातील कुंभेज येथील आहेत. त्यांनी २०१४च्या परीक्षेत १४३वा क्रमांक पटकावला होता. त्या वेळी त्यांना भारतीय पोलीस सेवेत नियुक्ती मिळाली होती. सध्या ते हैदराबाद येथे प्रशिक्षण घेत आहेत. योगेश कुंभेजकर यांनी 'आयआयटी मुंबई'मधून बी. टेक. पदवी संपादन केली आहे. कुंभेजकर यांच्यासह राज्यातील श्रीकांतनाथ पांचाळ यांनी देशातून १६व्या तर, हनुमंत झेंडगे यांनी देशातून ५०व्या क्रमांकावर येण्याची कामगिरी नोंदवली आहे.

दिल्लीची टीना दाबी देशात पहिली

दिल्लीची टीना दाबी देशात पहिली आली आहे. पहिल्याच प्रयत्नात तिने हे यश मिळवले आहे. आईमुळेच आपल्याला हे यश मिळाल्याचे टीनाने सांगितले. बारावीनंतरच 'यूपीएससी'ची तयारी सुरू केल्याचेही तिने स्पष्ट केले. 'यूपीएससी'मध्ये पहिल्याच प्रयत्नात घवघवीत यश मिळवण्याचा प्रयत्न करणाऱ्या अनेक मुलींसाठी रोल मॉडेल ठरण्याची इच्छा असल्याची भावना तिने व्यक्त केली आहे. देशात दुसरा आलेला जम्मू-काश्मीरचा अतहर आमीर सध्या भारतीय रेल्वे सेवेमध्ये आहे. त्याचा हा दुसरा प्रयत्न होता.


रिक्षाचालकाचा मुलगा आयएएस

मूळचा जालना जिल्ह्यातील शेलगावच्या असलेल्या अन्सार शेखने राष्ट्रीय पातळीवरील गुणवत्ता यादीत ३६१वे स्थान मिळवल्याचे स्पष्ट झाले. मराठवाड्यातून आलेल्या अन्सारचे वडील रिक्षाचालक आहेत. दहावीपर्यंतचे शिक्षण जिल्हा परिषदेच्या शाळेतून घेतलेल्या अन्सारने बारावीनंतर शिक्षणासाठी पुणे गाठले. गेल्या वर्षी फर्ग्युसन कॉलेजमधून बीए केल्यानंतर लगेचच त्याने 'यूपीएससी'ची परीक्षा दिली. वयाच्या २१व्या वर्षी आयएएस होण्यात यश मिळवलेल्या अन्सारला नागरी सेवांच्या माध्यमातून हिंदू-मुस्लिम एकता, महिला सबलीकरण, ग्रामविकास आदी मुद्द्यांवर काम करण्याची इच्छा आहे.

................

या यशाचा खूप आनंद झाला आहे. गेल्या वर्षी १४३वा क्रमांक मिळाल्याने 'आयपीएस'साठी निवड झाली होती. त्या यशाचाही अभिमान आहे; मात्र आताच्या यशामुळे प्रशासकीय सेवेत काम करण्याची संधी मिळणार असल्याने हा आनंद अधिक मोठा आहे. हा माझा तिसरा प्रयत्न होता.

- योगेश कुंभेजकर, राज्यात पहिला, देशात आठवा

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

योजनेत घोटाळ्यांचे ‘पोषण’

$
0
0

आक्षेपांना सारून सुधारणांकडे दुर्लक्षच; दोषींवर कारवाईचा आयुक्तांचा इशारा
Yogesh.borate@timesgroup.com
पुणे : शालेय पोषण आहारातून चालणाऱ्या वेगवेगळ्या उपक्रमांमधील गैरव्यवहारांबाबत शिक्षण संचालक कार्यालयातील वित्त अधिकाऱ्यांनी तीव्र आक्षेप घेतल्याची माहिती समोर आली आहे. असे असूनही संचालनालयातील अधिकाऱ्यांनी संगनमताने या आक्षेपांना बाजूला सारून पोषण आहार योजनेतील व्यवहार तशाच पद्धतीने सुरूच ठेवल्याचे आरोप होत आहेत.
शालेय पोषण आहार योजनेच्या गेल्या वर्षभरातील खरेदीच्या व्यवहारांची आयुक्त कार्यालयाने चौकशी लावल्याची बाब 'मटा'ने सोमवारी उघड केली. त्या पार्श्वभूमीवर शिक्षण संचालक कार्यालयातील या योजनेच्या अंमलबजावणीच्या दृष्टीने चालणाऱ्या व्यवहारांचीही 'मटा'ने माहिती घेतली. त्यातून वित्त अधिकाऱ्यांनी घेतलेले आक्षेप समोर आले आहेत. मुळात राज्यातील शालेय पोषण आहार योजनेची पाहणी करण्यासाठी आलेल्या केंद्रीय समितीने मार्च २०१५मध्ये या योजनेतील चुकीच्या बाबींवर बोट ठेवून त्यामध्ये कालसुसंगत बदल होण्याची गरज अधोरेखित केली होती. दोन निवृत्त आयएएस अधिकाऱ्यांच्या या समितीने राज्यात या योजनेतून पुरविल्या जाणाऱ्या सुविधा मागासच असल्याचा शेरा मारला होता. योजनेच्या अंमलबजावणीसाठी स्वतंत्र यंत्रणा उभारण्यासोबतच, अद्ययावत वेबसाइट आणि हेल्पलाइन सुरू करण्याचे निर्देशही या समितीने दिले होते. वर्षभराच्या काळानंतरही निर्देश राज्यात दुर्लक्षितच राहिल्याचे स्पष्ट होत आहे.
पोषण आहार योजनेमध्ये किचनशेड उभारण्यासाठी भरीव निधीची तरतूद आहे. त्यासाठी वर्ष २०१५ दरम्यान, जवळपास तीनशे कोटी रुपयांचे टेंडर काढण्यात आले होते. संबंधित काँट्रॅक्टरने त्यासाठीची प्रक्रिया सुरू केली असली, तरी किचनशेडचे बांधकाम वेळेत पूर्ण केले नाही. या मुद्द्यावर आक्षेप घेऊन संबंधित काँट्रॅक्टरकडून जवळपास दोन कोटी रुपयांची वसुली करण्यात आली होती. ही वसुली टाळण्यासाठी संबंधित काँट्रॅक्टरसोबतच शिक्षण संचालनालयामधील काही अधिकाऱ्यांनीही प्रयत्न केले होते. मात्र, वित्त विभागाने कायदेशीर पद्धतीने हा दंड परस्पर वळती करून घेतल्याने, वसुली झाली होती. अन्यथा दोन कोटींचा हा निधी कधीही सरकार दरबारी जमा झाला नसता, अशी माहिती संचालनालयामधून मिळाली.
अशाच एका प्रकरणामध्ये या योजनेच्याच माध्यमातून वित्त विभागाच्या मान्यतेशिवाय १९२ कोटी रुपयांचे अग्निशमन यंत्रे खरेदीचे टेंडर काढण्यात आले होते. राज्य सरकारच्या अतिशय उच्च दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या पातळीवरून ही खरेदी थांबविण्यात आल्याची खात्रीशीर माहितीही याच निमित्ताने उघड झाली आहे.
000
शालेय पोषण आहार योजनेतील आक्षेपार्ह बाबी कानावर आल्याने आयुक्तालयाने या प्रकारांची पडताळणी करण्यासाठी म्हणून कागदपत्रे सादर करण्याचे आदेश दिले आहेत. यात गैरव्यवहार आढळून आल्यास संबंधितांवर कायदेशीर कडक कारवाई करण्यात येईल. त्यामध्ये कोणाचीही हयगय केली जाणार नाही.
डॉ. पुरुषोत्तम भापकर, शिक्षण आयुक्त, महाराष्ट्र

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मेडिकल प्रवेश राज्यातील यादीनुसारच

$
0
0

खासगी, अभिमत विद्यापीठांमधील प्रवेश केंद्रीय स्तरावरून

म. टा. प्रतिनिधी, पुणे

राज्यात 'नीट' परीक्षेच्या आधारे वैद्यकीय शिक्षणासाठीचे प्रवेश देताना, राज्य पातळीवर तयार होणाऱ्या स्वतंत्र यादीतून ८५ टक्के जागा भरल्या जाणार असल्याचे राज्य वैद्यकीय शिक्षण संचालनालयाने मंगळवारी स्पष्ट केले. अभिमत आणि खासगी विद्यापीठांमध्ये मात्र राष्ट्रीय पातळीवरील यादीनुसारच प्रवेश होणार असल्याचेही संचालनालयाकडून सांगण्यात आले. त्याचप्रमाणे बीएचएमएस, बीएएमएस, फिजिओथेरपी आणि नर्सिंग या अभ्यासक्रमांचे प्रवेश 'एमएचटी-सीईटी'च्या गुणांच्या आधारेच होणार आहेत.

मेडिकलच्या प्रवेशांसाठी राज्य पातळीवरील प्रवेश परीक्षा नव्हे, तर राष्ट्रीय पातळीवरील 'नीट' ही परीक्षाच ग्राह्य धरली जाणार असल्याचे सुप्रीम कोर्टाने सोमवारी स्पष्ट केले. त्यानुसार प्रवेश प्रक्रिया राबवण्याचे आदेशही कोर्टाने संबंधित यंत्रणांना दिले आहेत. त्यानुसार प्रवेश होताना, राज्याच्या पातळीवर नेमके काय चित्र असेल, याविषयी 'मटा'ने राज्याच्या वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालयाचे संचालक डॉ. प्रवीण शिनगारे यांच्याशी संवाद साधला. त्या वेळी डॉ. शिनगारे यांनी या बाबी स्पष्ट केल्या.

डॉ. शिनगारे म्हणाले, ''नीट'च्या आधारे प्रवेशाबाबतच्या सर्व प्रक्रियेमध्ये पूर्ण स्पष्टता आहे. राज्यातील सरकारी आणि खासगी कॉलेजांमध्ये 'नीट'मधील गुणवत्ता यादीनुसार प्रवेश होणार आहेत. 'नीट'चा निकाल जाहीर झाल्यानंतर राष्ट्रीय पातळीवरील गुणवत्ता यादीतून राज्यातील विद्यार्थ्यांची स्वतंत्र गुणवत्ता यादी तयार केली जाणार आहे. त्यातील क्रमांकांनुसार विद्यार्थ्यांना राज्यातील मेडिकल कॉलेजांमधून प्रवेश दिले जाणार आहेत. त्यासाठीची सर्व प्रक्रिया राज्याच्या सीईटी सेलमार्फत केली जाईल.' अभिमत मेडिकल कॉलेजांमधील प्रवेश प्रक्रियेसाठी राष्ट्रीय पातळीवरील गुणवत्ता यादीतील कामगिरीनुसार प्रवेश दिले जाणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, मेडिकल सीईटी यापूर्वीच पार पडल्याने महाराष्ट्राला 'नीट'मधून वगळावे, अशी मागणी करणारी पुनर्विचार याचिका महाराष्ट्राने सुप्रीम कोर्टात दाखल केली आहे. त्यावरील सुनावणीबाबत आ​ज, बुधवारी निर्णय होणार आहे. शिक्षणतज्ज्ञांशी झालेल्या चर्चेअंती महाराष्ट्र तीन मुद्द्यांवर सुप्रीम कोर्टात लढणार असून, यातील एका मुद्द्यावर जरी कोर्टाने सकारात्मक निर्णय दिला, तरी महाराष्ट्रातील परीक्षार्थींना दिलासा मिळण्याची चिन्हे आहेत. पात्रता चाचणीतून महाराष्ट्राला पूर्णपणे वगळावे; स्थानिक भाषांत उत्तरे देण्याची सुविधा मिळावी आणि सगळ्यात कमी का​ठिण्यपातळीची प्रश्नपत्रिका असावी असे ते तीन पर्याय आहेत. दरम्यान, २४ जुलै रोजी होणाऱ्या 'नीट'च्या तयारीसाठी विद्यार्थ्यांना कशी मदत करता येईल, या संदर्भात शिक्षणतज्ज्ञांसोबत नुकतीच एक बैठक झाली. '६० दिवसांच्या अवधीत सीबीएसई अभ्यासक्रमाची कशा प्रकारे तयारी करता येऊ शकेल, तसेच दूरदर्शनच्या सह्याद्री किंवा इतर वाहिनीच्या मदतीने दुपारच्या वेळी सर्वच विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन वर्ग घेता येतील काय, यावर आम्ही विचार करत आहोत,' असेही शिक्षणमंत्री तावडे यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चार वॉर्डांच्या प्रभागावर शिक्कामोर्तब?

$
0
0

पालिका निवडणुकीतील रचनेबाबत निर्णय झाल्याची चर्चा

म. टा. प्रतिनिधी, पुणे

लोकसभा आणि विधानसभेपाठोपाठ राज्यातील प्रमुख महापालिकांमध्येही सत्ता आणण्याचे हिशेब मांडत भारतीय जनता पक्षाने या निवडणुकांमध्ये चार सदस्यांचा प्रभाग आणण्याचे धोरण मंत्रिमंडळाच्या उंबरठ्यावर पोहोचवले आहे. पुण्यासह राज्यातील दहा महापालिकांमध्ये पुढील वर्षी होणाऱ्या निवडणुकांसाठी चार सदस्यांचा एक प्रभाग हीच रचना असेल, असे मंगळवारी स्पष्ट झाले. मंत्रिमंडळाच्या बैठकीत त्याबाबत अधिकृत निर्णय झाल्याची उलटसुलट चर्चा दिवसभर रंगली होती. त्याबाबतची औपचारिक घोषणा लवकरच केली जाण्याची शक्यता आहे.

महापालिकेच्या निवडणुकांमध्ये 'कमळ' चिन्हाचा फायदा उठवण्यासाठी भाजपने ही राजकीय चाल खेळल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे. राज्यातील महापालिकांच्या आगामी निवडणुका प्रभाग पद्धतीने घेण्यासह त्यात सर्वाधिक यश मिळवण्यासाठी भाजपचे प्रयत्न सुरू आहेत. त्या दृष्टीने चार सदस्यांचा प्रभाग लाभदायक ठरेल, असे स्पष्ट झाल्याने त्यानुसार पक्षाने सर्व तयारी केली आहे. गिरीश महाजन, चंद्रकांत पाटील आणि गिरीश बापट या तीन मंत्र्यांची उपसमिती नेमून त्याद्वारे या निर्णयावर जवळपास एकमत घडवून आणण्यात आले आहे. त्यावर मंत्रिमंडळाच्या मान्यतेची औपचारिक मोहोर उमटणे बाकी असले, तरी चार सदस्यांचा प्रभाग असेल, अशी महत्त्वपूर्ण शिफारस उपसमितीने केली आहे. पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांनीही मंगळवारी त्याला दुजोरा दिला. 'चार सदस्यांच्या प्रभागाबाबत निर्णय झाला आहे. लवकरच त्याविषयी अधिकृत घोषणा होईल,' अशी माहिती त्यांनी दिली.

...............

पुण्यात प्रभाग किती?

महापालिका निवडणुका चार सदस्यीय प्रभागाद्वारे घेण्याचा निर्णय जवळपास नक्की झाला असल्याने शहर भाजपने तर त्यानुसार किती प्रभाग असतील, त्यामध्ये राखीव जागा किती असतील, खुल्या जागा किती असतील, याचाही लेखाजोखा मांडला आहे. १५२ सदस्यांच्या महापालिकेत चार सदस्यांचा प्रभाग झाल्यास ३८ प्रभाग होतील, असा दावा केला जात आहे. त्यामध्ये ओबीसींसाठी ४२ जागा, तर एससी, एसटी आणि एनटी यांच्यासाठी ३३ जागा राखीव होतील. खुल्या प्रवर्गासाठी ७६ जागा (प्रत्येकी ३८ महिला व पुरुष) उपलब्ध राहणार आहेत. त्यामुळे प्रत्येक प्रभागात पुरुष व महिलांसाठी प्रत्येकी एक जागा खुल्या प्रवर्गासाठी असेल, अशी शक्यता भाजपचे प्रवक्ते उज्ज्वल केसकर आणि माजी नगरसेवक सुहास कुलकर्णी यांनी व्यक्त केली.

...........

नगराध्यक्ष थेट निवडणार

नगर परिषदांच्या निवडणुका दोन सदस्यांच्या प्रभागाने घेण्यासह नगराध्यक्षांची निवड थेट नागरिकांमधून करण्याचा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंगळवारी घेण्यात आला. त्यासोबत महापालिका निवडणुकांसाठी चार सदस्यीय प्रभागाचा निर्णयही झाल्याची चर्चा वेगाने पसरली. महापालिकेतील राजकीय पक्षांमध्ये तर त्या दृष्टीने पुढील आखणी कशी असावी, याबाबतही तर्कवितर्क सुरू झाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दुचाकीची क्षमता वाढवून साखळीचोरी

$
0
0

दोन सराईत चोरट्यांना अटक; दहा लाखांचे दागिने जप्त
म. टा. प्रतिनिधी, पुणे
चोरी करून आल्यापावली विनाअडथळा आणि सुरक्षित पोबारा करता यावा या हेतूने चोरट्यांनी दुचाकीच्या क्षमतेत वाढ केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. 'हायप्रोफाइल' चोरीवर आधारित एका बॉलिवूडपटात वापरलेली क्लृप्ती प्रत्यक्षात आणून सराईत चोरट्यांनी सोनसाखळी चोरी केल्याचे समोर आले आहे. या चोरट्यांना गजाआड करण्यात प्रॉपर्टी सेलला यश आले आहे.
हैदर सलीम इराणी (वय १९), समीर शब्बीर इराणी उर्फ समीर संपत भंडारी (वय १९, दोघेही रा. लोणीकाळभोर) असे अटक केलेल्यांची नावे आहेत, अशी माहिती गुन्हे शाखेचे पोलिस उपायुक्त पी. आर. पाटील यांनी दिली. सोनसाखळी चोरी केल्यानंतर वेगात पळून जाता यावे, हैदर आ​णि समीरने बजाज पल्सरच्या सीसी क्षमतेमध्ये वाढ केली. हा 'प्रताप' करून त्यांनी शहरात २४ सोनसाखळी चोरीचे गुन्हे केल्याचे समोर आले आहे. या दोघांना प्रॉपर्टी सेलने अटक करून त्यांच्याकडून दहा लाख ५० हजार रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने जप्त केले आहेत.
पोलिस निरीक्षक सुषमा चव्हाण यांच्या पथकाने गंगाधाम चौकात सापळा रचून या दोघांना दुचाकीवरून जाताना ताब्यात घेतले. दुचाकीच्या कागदपत्रांबाबत चौकशी केली असता, संबंधित दुचाकी वर्षभरापूर्वी मुंब्रा परिसरातून चोरल्याचे कबूल केले. चोरलेली दुचाकी १८० सीसीची असून आरोपींनी त्यामध्ये घटपट करून ती २२० सीसीमध्ये रुपांतरीत केली. या चोरीच्या दुचाकीवरून त्यांनी सहकारनगर, बिबवेवाडी, सिंहगड रोड, हडपसर, भारती विद्यापीठ, स्वारगेट, खडक, विश्रामबाग, मार्केटयार्ड, वानवडी, डेक्कन पोलिस ठाण्याच्या हद्दीत २४ सोनसाखळी चोरीचे गुन्हे केल्याचे कबूल केले. या गुन्ह्यातील १० लाख ५० हजार रुपये किमतीचे ३५ तोळे सोने पोलिसांनी जप्त केले आहे. या दोघांवर पूर्वीचे चार गुन्हे दाखल आहेत.
..
चोरीचे सोने परस्पर विकले
आरोपी लोणीकाळभोर परिसरात राहून पुण्यात येऊन चोरीचे गुन्हे करत होते. चोऱ्या करताना सहकारनगर परिसरातील दोन सीसीटीव्हीमध्ये चोरटे कैद झाले. चोरलेला सोन्याचा ऐवज त्यांनी लोणीकाळभोर येथील हॉटेलचालक रमेश संभाजी काळभोरला विक्री केल्याचे आढळून आले. काळभोर अद्याप फरारी आहे. चोरट्यांनी त्याला १७ तोळे दागिन्यांची विक्री केली आहे. पोलिस त्याचा शोध घेत आहेत, असे पाटील यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images