Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

व्यसनमुक्ती संमेलनात मोठा गैरव्यवहार

$
0
0

लोकसेवा संघाचा आरोप; मुख्यमंत्र्यांना निवेदन

म. टा. प्रतिनिधी, पुणे

राज्य सरकारच्या वतीने गोंदिया येथे नुकतेच झालेले व्यसनमुक्ती साहित्य संमेलन; तसेच पुरस्कार वितरण कार्यक्रमाच्या खर्चात गैरव्यवहार झाला आहे, असा आरोप आचार्य विनोबा लोकसेवा संघाने केला आहे. यापूर्वी पुणे आणि मुंबई शहरात झालेल्या संमेलनाच्या खर्चापेक्षा हा खर्च दुपटीपेक्षा अधिक असून, तो एक कोटी ४२ लाख २५ हजार ५६ रुपये इतका झाल्याचे माहिती अधिकारातून उघडकीस आले आहे.

संघाचे दीपक निकम यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. व्यसनमुक्ती संमेलन आणि महात्मा गांधी व्यसनमुक्ती सेवा पुरस्कार वाटपात घोटाळा झाला. पुण्यात ५१ लाख, नागपूरला ५८ लाख ८५ हजार, मुंबईत ६६ लाख २६ हजार रुपयांचा खर्च संमेलनासाठी झाला. पुणे, नागपूर, मुंबई शहराच्या तुलनेने छोट्या व मागासलेल्या गोंदिया जिल्ह्यातील संमेलनात मात्र एक कोटी ४२ लाख २५ हजार ५६ रुपयांचा खर्च झाला. त्यापैकी मुंबईच्या एका जाहिरात कंपनीला एक कोटी २१ लाख ५१ हजार ८८६ रुपयांची रक्कम देण्यात आली आहे. त्याबाबत निकम यांनी संशय व्यक्त केला आहे. संमेलनात प्रस्ताव न देणाऱ्या व्यक्तींनाही पुरस्कार देण्यात आल्याचा आरोप केला.

'नाना पाटेकर, मकरंद अनासपुरे हे दोघेही दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी धावून आले आहेत. मात्र, संमेलनात गायनासाठी अवधूत गुप्ते यांनी अडीच लाख, तर अभिनेता देवदत्त नागे यांनी ७५ हजार रुपयांचे मानधन स्वीकारले. संमेलनाच्या खर्चाबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना निवेदन पाठविले आहे. त्याबाबत प्रतिसाद मिळालेला नाही. या संदर्भात लवकरच आंदोलन करण्यात येईल,' असा इशाराही त्यांनी दिला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


‘विदर्भवासीयांनाही वेगळे राज्य नको’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

'मी संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत काम केले आहे. महाराष्ट्र एकसंध राहावा, अशी माझी इच्छा आहे. तशीच इच्छा विदर्भातील नागरिकांचीही आहे. वेगळा विदर्भ व्हावा, अशी विदर्भातील नागरिकांची भावना नाही. गैरसमज पसरवून तेथील नागरिकांमध्ये वेगळ्या विदर्भाची भावना निर्माण करण्याचे काम केले जात आहे,' अशा शब्दांत ज्येष्ठ समाजवादी नेते भाई वैद्य यांनी वेगळ्या विदर्भासाठी सुरू असलेल्या राजकारणावर रविवारी शरसंधान साधले.

वक्तृत्वोत्तेजक सभेच्या वतीने आयोजित वसंत व्याख्यानमालेच्या १४२व्या ज्ञानसत्रात महाराष्ट्र दिनानिमित्त 'संयुक्त महाराष्ट्राचे भवितव्य' या विषयावर ते बोलत होते. या वेळी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. कुमार सप्तर्षी यांचेही व्याख्यान झाले.

'मी स्वतः संपूर्ण विदर्भ फिरलो आहे. स्वतंत्र विदर्भ व्हावा, अशी तेथील लोकांची इच्छा नाही. काही लोक तेथील नागरिकांमध्ये गैरसमज पसरवून त्यांच्यामध्ये स्वतंत्र विदर्भाची भावना निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. सध्या स्वतंत्र विदर्भासंदर्भात निर्माण केले जाणारे वातावरण कृत्रिम स्वरूपाचे आहे. त्यामुळे एकसंध महाराष्ट्राची भावना असलेल्या नागरिकांनी सावध राहणे गरजेचे आहे,' असा इशारा वैद्य यांनी दिला.

'विदर्भाच्या विकासाचा अनुशेष भरून काढल्यास अनेक समस्या मार्गी लागतील. विकासाचा अनुशेष भरून काढल्यानंतर विदर्भवाद्यांचे आरोप आपोआप खोडून निघतील. त्यांच्याकडे वेगळ्या विदर्भासाठी मुद्दे राहणार नाहीत,' याकडे त्यांनी लक्ष वेधले. सूत्रसंचालन डॉ. मंदार बेडेकर यांनी केले. नेहा देसाई हिने आभार मानले.

'संविधान बदलासाठी...'

'विदर्भवाद्यांच्या मागणीनुसार विदर्भ वेगळा केला, तरी तो आर्थिकदृष्ट्या सक्षम होणार नाही. वेगळ्या विदर्भासंदर्भात वेळोवेळी पिल्लू सोडले जाते. छोटी राज्ये झाल्यावर भविष्यात संविधान बदलणे सोपे जावे, यासाठी भाजप ही नीती आखत आहे,' असा गंभीर आरोप डॉ. कुमार सप्तर्षी यांनी केला. 'लहान राज्ये झाल्यास संविधान बदलण्यास राज्यांची परवानगी घेणे सोपे जाईल, असे भाजपला वाटते. भविष्यात मतांच्या दृष्टीने हे केले जात आहे,' अशा शब्दांत त्यांनी टीकेची झोड उठवली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘कोलाज’ने जोडा आनंदक्षण

$
0
0

'मटा किड्स कार्निव्हल'ला आजपासून सुरुवात

म. टा. प्रतिनिधी, पुणे

पूर्वी शाळेमध्ये सर्रास घोटीवकाम शिकवले जायचे. कार्यानुभवच्या तासामध्ये घोटीव कागदापासून विविध कल्पक चित्रे तयार करून ती पुठ्ठ्यावर चिकटवलेली अनेकांना आठवत असतील. हीच कला मुलांना शिकण्याची संधी 'महाराष्ट्र टाइम्स किड्स कार्निव्हल'मध्ये मिळणार आहे. आज, गुरुवारी 'कट कोलाज' कार्यशाळेपासून कार्निव्हलची सुरुवात होत असून, ११ मेपर्यंत कुकिंग फॉर किड्स, पपेट मेकिंग, थ्रीडी ओरिगामी आदी प्रकार त्यात शिकवले जाणार आहेत.

निखळ मनोरंजन आणि मुलांनी त्यातून काहीतरी शिकावे या हेतूने 'किड्स फेस्टिव्हल'चे आयोजन करण्यात आले आहे. कर्वे रोडवरील पुणे सेंट्रल मॉलमध्ये दररोज दुपारी तीन ते सायंकाळी सहा या वेळेत हे वर्ग भरतील. यासाठी वयोमर्यादा सहा ते १६ वर्षे अशी असून, इच्छुकांना संपूर्ण फेस्टिव्हलसाठी किंवा कोणत्याही एका वर्गासाठीही नाव नोंदवता येणार आहे. पुणे सेंट्रल या कार्निव्हलचा 'व्हेन्यू पार्टनर' आहे.

'पपेट मेकिंग'मध्ये ते बनवण्याचे कौशल्य, तसेच त्यांचा वापर याविषयी मार्गदर्शन केले जाईल. गॅसचा वापर न करता, तसेच घरात सहज उपलब्ध असलेल्या साहित्यापासून मुले फावल्या वेळात कोणत्या रेसिपी बनवू शकतात हे शिकण्याची संधी 'कुकिंक फॉर किड्स'मध्ये आहे. राजा-राणी-राक्षस-प्राणी-पक्षी यांच्या गोष्टी म्हणजे मुलांचा जिव्हाळ्याचा विषय. ती सांगण्याची एक कला असते, तशीच ती लिहिण्याचीही असते. अशा गोष्टी लिहिणे, सांगणे याबाबतच्या टिप्स 'स्टोरी टेलिंग' कार्यशाळेत मुलांना मिळतील. 'कार्निव्हल'साठी मर्यादित जागा राहिल्या असल्याने अजिबात वेळ न घालवता आपल्या पाल्याचे नाव नोंदवा आणि रंगू द्या हा धमाल-मस्तीचा टेन्शन फ्री क्लास!

वर्गासाठी लागणारे साहित्य आमच्याकडून विद्यार्थ्यांना पुरवण्यात येणार आहे. त्यांनी फक्त कंपास बॉक्स, कात्री, फेव्हिकॉल, स्केचपेन, पेंट ब्रश, वॉटर कलर इत्यादी साहित्य सोबत आणणे आवश्यक आहे. अधिक माहिती आणि नावनोंदणीसाठी संपर्क : ९८२३९८२५६९, ९७६२११५८१४.

..............
'मटा किड्स कार्निव्हल'मध्ये आज काय?

कट कोलाज कार्यशाळा

कुठे : पुणे सेंट्रल, कर्वे रोड

किती वाजता : दुपारी तीन ते सायं. ६

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आजारपणाच्या खर्चाला कंटाळून आजीनेच केला नातीचा खून

$
0
0





म. टा. प्रतिनिधी, हडपसर आजारपणाच्या खर्चाला कंटाळून आजीनेच आपल्या तीन महिन्यांच्या नातीला पाण्याच्या बॅरेलमध्ये बुडवून खून केल्याची घटना उंड्री परिसरात उघडकीस आली आहे. याप्रकरणी कोंढवा पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करत आजीला अटक केली आहे. खून केलेल्या तीन महिन्यांच्या मुलीचे अद्याप नावही ठेवलेले नव्हते. सुशीला संजय तारू (वय ५०, रा. अतुलनगर सोसायटी, उंड्री, कोंढवा) असे अटक केलेल्या आजीचे नाव आहे. याप्रकरणी सहायक पोलिस निरीक्षक किरण भारत पावसे यांनी तक्रार दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत मुलीची आई मोनिका व वडील राजू यांचे एक वर्षांपूर्वी लग्न झाले होते. मुलाला पहिली मुलगी झाली. जन्मतःच नातीच्या बेंबीतून रक्त येत होते. त्यामुळे तिला हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते. उपचारानंतर तिला घरी सोडण्यात आले होते. मात्र, तिचा आजार बरा झाला नाही. तिला पुन्हा हॉस्पिटलमध्ये दाखल केले. मात्र, पुन्हा उपचार करून घरी सोडण्यात आले. तरीही नात सारखी रडत होती. तिच्या आजाराला दीड लाख रुपये खर्च झाला होता. लग्नाचे कर्ज झाले होते, त्यात पहिली मुलगी झाली आणि जन्मतःच हॉस्पिटलचा खर्च सुरू झाल्याने आणि खर्चाचे ओझे न झेपल्याने आजीने तिला नातीला पाण्यात बुडवून खून केला. त्यासाठी आजीने मंगळवारी सकाळी मुलगा बाथरूममध्ये आणि सून मोनिका मुलीला पाळण्यात झोपवून बाहेर गेल्या होत्या. त्यावेळी आजीने झोपलेल्या नातीला उचलून पाण्याने भरलेल्या बॅरलमध्ये बुडवले. मुलीची आई बाहेरून आल्यानंतर मुलगी पाळण्यात नसल्याचे दिसले. मुलीची शोधाशोध सुरू केली असता ती न दिसल्याने मोनिका यांनी आरडाओरड केली. आवाज ऐकून आजी व इतर नातेवाइक पळत आले. आजुबाजूला मुलीचा शोध घेतला तरीही मुलगी सापडली नाही. बराच वेळ शोध घेतल्यानंतर बेडरूममधील पाण्याने भरलेल्या बॅरलमध्ये मुलगी तरंगत असल्याचे दिसले. याप्रकरणी कोंढवा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. तपास केल्यानंतर आजीनेच नातीचा खून केल्याचे समोर आले. सहायक पोलिस निरीक्षक व्ही. पी. दळवी हे अधिक तपास करत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दौंड व इंदापूरसाठी पाणी सोडण्यास सुरुवात

$
0
0





म. टा. प्रतिनिधी, पुणे खडकवासला धरणातून दौंड व इंदापूर शहराला पिण्यासाठी बुधवारी दुपारपासून कालव्याद्वारे सहाशे क्युसेकने पाणी सोडण्यास सुरुवात झाली. हे पाणी इंदापूरला पोहोचेपर्यंत बारा ते पंधरा दिवसांचा कालावधी लागणार आहे. बुधवारी धरणातून एक अब्ज घनफूट (टीएमसी) पाणी सोडल्यानंतर सुमारे ०.२५ टीएमसी पाणी वहननाशामुळे वाया जाणार आहे. पुणेकरांना अंधारात ठेवून दौंड व इंदापूरला पाणी सोडण्याच्या निर्णयावरून शहरामध्ये राजकीय वातावारण पेटले आहे. या विरोधाला डावलून अखेर बुधवारी दुपारी एक वाजता धरणातून कालव्यात पाणी सोडण्यास सुरुवात करण्यात आली. कालव्याचे दरवाजे उघडल्यानंतर तीनशे ते चारशे क्युसेकने पाणी सोडण्यात आले. त्यानंतर यामध्ये वाढ करण्यात आली. सायंकाळी सहाशे क्युसेकने कालव्यातून पाणी वाहत होते. त्यात आणखी वाढ करून अकराशे क्युसेक करण्यात येणार आहे. धरणातून सोडलेले हे पाणी फक्त पिण्यासाठी वापरण्यात येणार आहे. या पाण्याची चोरी होऊ नये याची पुरेपूर दक्षता घेण्यात आली आहे. २२० किमी लांबीच्या या कालव्यावर अहोरात्र गस्त राहणार आहे. त्यासाठी सात गस्ती पथके नेमण्यात आली आहे. पाणीचोरी होण्याची शक्यता असलेल्या सात ठिकाणांवर धडक कृती दल तैनात करण्यात आले आहे. कालव्यावरील लघु वितरिका बंद करतानाच शेतपंपांचे वीज कनेक्शन तोडण्यात आले आहे. कोरड्या कालव्यात पाणी सोडल्यामुळे तो फुटून वाया जाऊ नये यासाठी पाच दुरुस्ती पथकेही सज्ज ठेवण्यात आली आहेत. खडकवासला धरणातून सोडलेले पाणी इंदापूरपर्यंत पोहोचण्यास बारा ते पंधरा दिवसांचा कालावधी लागणार आहे. या कालावधीत हा बंदोबस्त चोख राहणार आहे. कालव्यातून सोडलेले ०.३० टीएमसी पाणी इंदापूरच्या तरंगवाडी तलावापर्यंत पोहोचल्यावर दौंडमधील तलाव भरण्यात येणार आहे. दौंडमध्ये साधारणतः ०.४२ टीएमसी पोहोचेल असा अंदाज आहे. एक टीएमसी पाणी सोडल्यावर प्रत्यक्षात ०.७५ टीएमसी पाणी पिण्यासाठी मिळणार आहे. उर्वरित ०.२५ टीएमसी पाणी वहननाशामुळे वाया जाणार आहे. पाणी पोचण्यास बारा ते पंधरा दिवस लागणार असून, या काळात २२० किमी लांबीच्या या कालव्यावर अहोरात्र गस्त राहणार आहे. त्यासाठी सात गस्ती पथके नेमण्यात आली आहे. पाणीचोरी होण्याची शक्यता असलेल्या सात ठिकाणांवर धडक कृती दल तैनात करण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ऑनलाइन वीजबिल भरण्यात पुणेकर आघाडीवर

$
0
0



म. टा. प्रतिनिधी, पुणे महावितरणचे संकेतस्थळ आणि मोबाइल अॅपद्वारे वीजबिले भरण्यात राज्यामध्ये पुणेकर प्रथम स्थानावर असून, गेल्या वर्षभरात पुणेकरांनी सुमारे ८६० कोटी रुपये ऑनलाइन भरले आहेत. पुण्यानंतर भांडूप आणि कल्याण विभाग अनुक्रमे दुसऱ्या आणि तिसऱ्या स्थानावर आहेत. वीजग्राहकांनी ऑनलाइन भरणा करण्यास पसंती दिल्यामुळे गेल्या वर्षभरात राज्यात सुमारे ३४८२ कोटी ५८ लाख रुपयांचा ऑनलाइन भरणा झाला आहे. वीजबिलाच्या ऑनलाइन भरणा करणाऱ्यांमध्ये पुणे आघाडीवर आहे. पुण्यात गेल्या वर्षभरात ८६० कोटी रुपये, भांडूपमध्ये ७४७ कोटी रुपये, तर कल्याणमध्ये ५५१ कोटी रुपयांचा भरणा झाला आहे. याव्यतिरिक्त नाशिक परिमंडलामध्ये २७१ कोटी रुपये, नागपूरमध्ये ११८ कोटी रुपये, कोल्हापूरमध्ये १३५ कोटी रुपये, बारामतीत १५१ कोटी रुपये आणि औरंगाबादमध्ये १२५ कोटी रुपयांच्या वीजबिलांचा भरणा करण्यात आला आहे. वीजग्राहकांनी २०१४-१५ मध्ये १९२० कोटी ८८ लाख रुपयांचा ऑनलाइन भरणा केला होता. त्यातुलनेत २०१५-१६ मध्ये ३४८२ कोटी ५८ लाख रुपये भरण्यात आले आहेत. त्यामुळे गेल्या वर्षभरात ऑनलाइन वीजबील भरणामध्ये सुमारे १५६१ कोटी ७० लाख रुपयांनी वाढ झाली आहे. छापील कागदाऐवजी गो-ग्रीन अंतर्गत वीजबिलाच्या ई-मेलचा पर्याय स्वीकारल्यास दरमहा तीन रुपये सूट देण्यात येत आहे; तसेच छापील कागदासह ई-मेलद्वारेही वीजबील मिळविण्याची सोय उपलब्ध आहे. वीजबिलाचा ऑनलाइन भरणा करण्यासाठी क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड किंवा नेटबँकिंगचा पर्याय उपलब्ध असून, वीजबिल भरण्याची मुदत संपल्यानंतरही विलंब शुल्काच्या रकमेसह बिल ऑनलाइन भरणाची सोय उपलब्ध आहे. वीजग्राहकांना www.mahadiscom.in या वेबसाइटवर ऑनलाइन वीजभरणा करण्याची व्यवस्था आहे. ग्राहकांनी त्याचा लाभ घेण्याचे आवाहन महावितरणने केले आहे. महावितरणने गेल्यावर्षी मोबाइल अ‍ॅपची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. त्याचा ग्राहकांनी लाभ घेतला. राज्यभरात सुमारे दोन लाखांपेक्षा अधिक यूजर्सनी हे अ‍ॅप डाउनलोड केले. त्याद्वारे सुमारे १९ कोटी रुपयांहून अधिक रुपयांची वीजबिले भरण्यात आली असल्याचे महावितरणकडून सांगण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शॉर्टसर्किटमुळे लागली ‘एनसीएल’मध्ये आग

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
पाषाण येथील राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेच्या (एनसीएल) प्रमुख प्रयोगशाळेमध्ये शॉर्टसर्किट होऊन आग लागल्याची घटना मंगळवारी मध्यरात्री घडली. अग्निशमन दलाच्या जवानांनी त्वरीत मदतकार्य करून ज्वलनशील पदार्थ, रसायने बाजूला करून आग आटोक्यात आणल्याने मोठी दुर्घटना टळली.
'एनसीएल'च्या प्रयोगशाळेत सोडियम, पोटॅशियम, हायड्रोजन यांसारखी अनेक रसायने आहेत. प्रयोगशाळेतील रसायने थंड राहावीत यासाठी फ्रीज आहे. फ्रीजमध्ये शॉर्टसर्किट झाल्याने आग लागल्याची माहिती अग्निशमन दलाच्या जवानांनी दिली. मंगळवारी रात्री साडेबाराच्या सुमारास आग लागल्यानंतर येथील कर्मचाऱ्यांनी तत्काळ अग्निशमन दलास माहिती दिली.
प्रयोगशाळेच्या काचांवर पाणी मारून त्या फोडण्यात आल्या. त्यानंतर प्रयोगशाळेत प्रवेश करून आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. तसेच, तेथे ठेवलेले विविध प्रकारची ज्वलनशील रसायने बाजूला काढली. त्यामुळे मोठी दुर्घटना टळली. प्रयोगशाळेतील सोडियमच्या प्रकल्पाला आग लागली असती तर, मोठी जीवितहानी झाली असती. रात्री प्रयोगशाळेत २० जण कार्यरत होते. आगीची माहिती मिळाल्यानंतर प्रयोगशाळेच्या संचालक डॉ. अश्विनी गोयल यांनी भेट दिली. या कारवाईत अग्निशमन दलाचे जवान शत्रुघ्न वाजे, मधुकर मते, पुष्पराज, सुभाष हंडाळे, मुंजाळ, साळवे सहभागी झाले होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दोन दिवसांमध्ये पावसाची शक्यता

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
शहर आणि परिसरातील कमाल तापमानात बुधवारी मंगळवारच्या तुलनेत काहीशी घट झाली. बुधवारी शहरात ३९.४ अंश सेल्सिअस कमाल तापमान नोंदले गेले. पुढील दोन दिवसात शहराच्या काही भागात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे.
शहरात मंगळवारी उच्चांकी ४१ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली होती. बुधवारी मात्र, या तापमानात घट झाल्याने पुणेकरांना काहीसा दिलासा मिळाला. कमाल तापमानात घट झाली असली, तरी किमान तापमानात मात्र वाढ होऊन तापमान १९.८ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचले. पुण्यातील किमान तापमान राज्यातील सर्वांत कमी किमान तापमान होते. मात्र, हवेतील दमटपणा वाढल्याने उकाडा नकोसा वाटत होता. लोहगाव येथे ४०.७ अंश सेल्सिअस कमाल तर, २२.६ अंश सेल्सिअस किमान तापमान नोंदले गेले.
पुण्याबरोबरच राज्यातही काही ठिकाणी तापमानात घट झाली. तरीही उकाडा कायम होता. बुधवारी राज्यातील सर्वाधिक कमाल तापमान मालेगाव येथे (४४.५ अंश सेल्सिअस) नोंदले गेले. पुढील दोन दिवसात मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात काही तर विदर्भात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे. पुण्यात शहराच्या काही भागात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


विद्यमान खूश तर; इच्छुक चिंताक्रांत

$
0
0

पुन्हा भाजप-सेना युतीचे संकेत
म. टा. प्रतिनिधी, पुणे
आगामी महापालिका निवडणुकीसाठी चार सदस्यीय प्रभागासह भारतीय जनता पक्ष-शिवसेनेत युती होण्याचे संकेत मिळत असल्याने विद्यमान नगरसेवक खूश झाले असून, इच्छुकांना चिंतेने ग्रासले आहे. त्यामुळे, युती होणार की स्वतंत्र लढणार, याचा अंतिम निर्णय होईपर्यंत सर्वच इच्छुकांमध्ये धाकधूक राहील, हे निश्चित...
आगामी पालिका निवडणूक चार सदस्यांचा एक प्रभाग, या पद्धतीने घेण्यावर जवळपास सर्व पक्षांचे एकमत झाले आहे. सुरुवातीला त्याला विरोध करणाऱ्या शिवसेना नेतृत्वाची समजूत काढण्यात भाजपलाही यश आल्याचे समजते. त्याशिवाय, काही ठिकाणी पूर्वीप्रमाणेच युती करून लढण्यात येणार असल्याचेही संकेत दिले जात आहेत. भाजप-सेना युती झाल्यास दोन्ही पक्षांमध्ये काही प्रभागांची वाटणी होण्याची चिन्हे आहेत. अशा परिस्थितीत बहुतेकवेळा सर्व विद्यमान नगरसेवकांना पुन्हा संधी दिली जाते. त्यामुळे, आगामी निवडणुकीमध्येही आपल्याला पुन्हा संधी मिळणार, असे आडाखे विद्यमान नगरसेवकांकडून बांधले जात आहेत. चार सदस्यांचा प्रभाग झाला, तर त्याचे क्षेत्रफळ आणि लोकसंख्याही मोठ्या प्रमाणात वाढणार असल्याने युतीचा फायदा होण्याची शक्यता विद्यमानांकडून वर्तविली जात आहे.
दुसरीकडे विधानसभा निवडणुकीत युती तुटल्यामुळे महापालिका निवडणूकही स्वबळावरच लढल्यास मित्रपक्षाला सोडाव्या लागणाऱ्या जागेवरून आपल्याला संधी मिळेल, अशी अनेक इच्छुकांची अपेक्षा होती. त्यादृष्टीने, गेल्या काही दिवसांपासून जनसंपर्क वाढविण्यासह विविध कार्यक्रम आणि उपक्रमांद्वारे नाव चर्चेत राहील, याची काळजी अनेकांनी घेतली होती. परंतु, युतीमुळे अशा इच्छुकांच्या साऱ्या आशा-अपेक्षांवर पाणी पडण्याची शक्यता आहे. स्वतः लढण्याऐवजी पुन्हा मित्रपक्षातील उमेदवारालाच पाठिंबा देण्याची वेळ येऊ नये, यासाठी आता अशा इच्छुकांनी युती होऊच नये, यासाठी देव पाण्यात घातले असल्याची चर्चा आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नक्षलवादी अँजेलाला अखेर जामीन मंजूर

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) पौड परिसरातून अटक केलेली नक्षलवादी अँजेला सोनटक्के उर्फ श्रद्धा ऊर्फ राही उर्फ इशराका (वय ४२) हिला सुप्रीम कोर्टाने बुधवारी जामीन मंजूर केला. कोर्टाच्या या निर्णयामुळे अँजेलाचा जेलमधून बाहेर पडण्याचा रस्ता मोकळा झाला आहे. अँजेला ही गडचिरोलीच्या जंगलात असलेला नक्षलवादी मिलिंद तेलतुंबडे याची पत्नी आहे.
'एटीएस'ने २०११ मध्ये अँजेलाला पौड परिसरातून अटक केली होती. कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया (माओवादी) या संघटनेच्या गोल्डन कॉरिडॉर कमिटीची ती सचिव होती. तसेच, पश्चिम महाराष्ट्रासह 'गोल्डन कॉरिडॉर'मध्ये संघटनेची प्रसार करण्याची जबाबदारी तिच्यावर टाकण्यात आल्याचा दावा, तपास यंत्रणांनी केला होता. ती गेल्या पाच वर्षांपासून जेलमध्ये होती. अँजेलासोबत पुण्यातील कबीर कला मंचच्या काही सदस्यांवर अटकेची कारवाई झाली होती.
''एटीएस'ने यावेळी दाखल केलेल्या गुन्ह्यांमध्ये कबीर कला मंचच्या सहा सदस्यांवर कारवाई करण्यात आली होती. त्यातील तिघांना कोर्टाने जामीन मंजूर केला आहे तर इतर तिघे जेलमध्ये आहेत. या तिघांच्या सुटकेसाठी संघटनेकडून कायदेशीर लढाई लढण्यात येत आहे,' अशी माहिती दीपक ढेंगळे यांनी दिली.
अँजेलावर राज्यभरात १८ गुन्हे दाखल होते. त्यातील १४ गुन्ह्यांत ती जामिनावर सुटली आहे तर, दोन गुन्ह्यांत तिला वगळण्यात आले आहे. उर्वरित दोन गुन्ह्यांपैकी एका गुन्ह्यात तिला यापूर्वी जामीन मिळाला आहे. उर्वरित एका गुन्ह्यांत कोर्टाने बुधवारी तिला जामिनावर सोडले. कोर्टाच्या या निर्णयानुसार अँजेलाचा जेलमधून बाहेर पडण्याचा रस्ता मोकळा झाला असल्याची माहिती 'एटीएस'च्या अधिकाऱ्यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सहकार खाते घेणार दिग्गजांची सुनावणी

$
0
0

हायकोर्टाचे आदेश; अजित पवारांचाही समावेश
म. टा. प्रतिनिधी, पुणे
बरखास्त केलेल्या सहकारी बँकांमधील संचालकांना अन्य कोणत्याही सहकारी बँकेचे संचालक म्हणून निवडीला दहा वर्षे प्रतिबंध घालण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयावर हायकोर्टाने संबंधित संचालकांच्या सुनावणीचे आदेश दिले आहेत. त्यामुळे माजी मुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह राज्यातील दिग्गज नेत्यांना सहकार खात्याच्या सुनावणीला सामोरे जावे लागणार आहे. या सुनावण्यांचा अहवाल सादर झाल्यानंतर कोर्टाकडून पुढील आदेश दिले जाणार आहेत.
हायकोर्टाच्या आदेशानुसार खात्याने सुनावणींची तयारी सुरू केली असल्याचे सहकार खात्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.
राज्य सरकारच्या निर्णयानुसार २१ जानेवारी २००६नंतर राज्यात ६० नागरी सहकारी बँका, पाच जिल्हा बँका आणि राज्य बँक अशी ६६ संचालक मंडळे बरखास्त झाली आहेत. त्यामध्ये माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह माजी मंत्री हसन मुश्रीफ, खासदार विजयसिंह मोहिते पाटील; तसेच मधुकर चव्हाण, दिलीप सोपल, राहुल मोटे, जयप्रकाश दांडेगावकर या राष्ट्रवादीच्या, तर विजय वडेट्टीवार, माणिकराव कोकाटे, बाळासाहेब सरनाईक या काँग्रेसच्या नेत्यांचा समावेश आहे. शिवाय शिवसेनेचे आनंदराव अडसूळ, भाजपचे पांडुरंग फुंडकर, शेकापचे जयंत पाटील, मीनाक्षी पाटील यांचा समावेश आहे.
कोल्हापूर, सांगली, नाशिक, धुळे-नंदूरबार, आणि बीड या पाच जिल्हा बँकांची संचालक मंडळे दहा वर्षांत बरखास्त झाली आहेत. त्या संचालक मंडळातील अनेक संचालक अन्य बँकांवर कार्यरत आहेत. त्यांनाही सुनावणीच्या प्रक्रियेला सामोरे जावे लागणार असल्याचे सहकार खात्याकडून स्पष्ट करण्यात आले. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या (आरबीआय) निर्देशांनुसार बरखास्त केलेल्या सहकारी बँकांमधील संचालकांना पुन्हा कोणत्याही सहकारी बँकेचे संचालक म्हणून निवडीला दहा वर्षे प्रतिबंध घालण्याचा अध्यादेश राज्य सरकारने काढला आहे. संबंधित संचालकांना सहकार खात्याकडून नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. या निर्णयाविरूद्ध काही संचालकांनी कोर्टात याचिका दाखल केल्या आहेत. कोर्टाने सुनावणीची प्रक्रिया पूर्ण करण्याचे आदेश राज्य सरकारला दिले ओहत. त्यानुसार सहकार खात्याकडून सुनावण्याची प्रक्रिया राबवली जाणार आहे. ही सुनावणी राज्य, विभागीय आणि जिल्हा पातळीवर होणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

डाळ नियंत्रण कायदा रद्द करण्याची मागणी

$
0
0

राज्यातील व्यापाऱ्यांची परिषदेत एकमुखी भूमिका
म. टा. प्रतिनिधी, पुणे
राज्यात डाळींचा तुटवडा असतानाही किमतीवर नियंत्रण आणणारा कायदा आणल्याने राज्यात आणखी तुटवडा निर्माण होण्याची शक्यता आहे. व्यापाऱ्यांना विश्वासात न घेता केलेला कायदा राज्य सरकारने रद्द करण्याची मागणी व्यापाऱ्यांनी केली आहे.
राज्यात डाळींचा तुटवडा निर्माण झाल्याने भाव गगनाला भिडले आहेत. त्यामुळे राज्य सरकारने डाळ किंमत नियंत्रण कायदा आणला. या कायद्याविरोधात व्यापाऱ्यांनी संताप व्यक्त केला. या संदर्भात राज्यातील विविध व्यापाऱ्यांची परिषद 'द पूना मर्चंट्स चेंबर'तर्फे आयोजिण्यात आली होती. परिषदेला फेडरेशन ऑफ असोसिएशन ऑफ महाराष्ट्रचे (फॅम) अध्यक्ष विनेश मेहता, राज्य खाद्यतेल व्यापारी संघाचे शंकर ठाकूर, तरुण जैन, किर्ती राणा, पूना मर्चंट्स चेंबरचे अध्यक्ष प्रवीण चोरबेले, माजी अध्यक्ष पोपटलाल ओस्तवाल, वालचंद संचेती, राजेश बाठिया यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.
'राज्य सरकारने डाळ किंमत नियंत्रण कायदा करण्यापूर्वी व्यापाऱ्यांना विश्वासात घ्यायला हवे होते. व्यापाऱ्यांची भूमिका समजून घ्यायला हवी होती. परंतु, कायदा व्यापाऱ्यांविरोधी आहे. ग्राहकांना स्वस्तात माल मिळावा अशी भूमिका आहे. त्यामुळे राज्य सरकारने आणलेला डाळ किंमत नियंत्रण कायदा रद्द करावा. वायदे बाजारातून सर्व जीवनावश्यक वस्तू वगळण्यात याव्यात. जीवनावश्यक वस्तू कायदा कालबाह्य झाल्याने तो कायदा रद्द करण्यात यावा,' अशी मागणी द पूना मर्चंट्स चेंबरचे अध्यक्ष प्रवीण चोरबेले यांनी केली.
राज्यातील सर्व व्यापाऱ्यांची भूमिका एकत्रितरित्या सरकारकडे मांडण्यासाठी व्यापारी संघटनांची समिती स्थापन करण्याचा निर्णय परिषदेत घेण्यात आला. समितीमार्फत राष्ट्रपती, राज्याचे मुख्यमंत्री, अन्न व नागरी पुरवठा मंत्री यांना निवेदन देऊन दाद मागणार असल्याचे सांगण्यात आले. मागणी आणि पुरवठ्यावर वस्तूंचे दर निश्चित होतात. राज्य सरकारने डाळींचा पुरवठा करावा. त्यानंतर डाळींची योग्य दरात विक्री केली जाईल. डाळींचा पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी व्यावसायिकाला कोणत्याही परवान्याशिवाय एका महिन्याच्या उलाढालीच्या प्रमाणात साठा ठेवण्याची परवानगी असावी, अशीही मागणी व्यापाऱ्यांनी केली. 'डाळ नियंत्रण कायद्याचा व्यापाऱ्यांना त्रासच होणार आहे. त्यामुळे कायदा करताना व्यापाऱ्यांना विश्वासात घ्या आणि मगच कायदे करा,' असा सल्ला विनेश मेहता यांनी दिला.
..
डाळींचा तुटवडा झाल्याने त्यांचे दर गगनाला भिडले आहेत. त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी जसा कायदा आणला तसाच कांदा, टोमॅटोसाठीही कायदा करावा. कायद्यामुळे डाळींचा मोठा तुटवडा होणार आहे.

राजेश फुलफगर, अध्यक्ष, राष्ट्रवादी व्यापारी सेल, पुणे शहर

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रवींद्र धंगेकरांसहआठ जणांना जामीन

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
सिंचन भवनामधील कार्यालयाची तोडफोड केल्याप्रकरणी अटक केलेले महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) नगरसेवक रवींद्र धंगेकर यांच्यासह आठ जणांस कोर्टाने बुधवारी जामीन मंजूर केला.
रवींद्र हेमराज धंगेकर (वय ४५), सागर शशिकांत पांगारे (वय ३०), आशिष शरद देवधर (वय ३५), सुधीर शिवाजी धावडे (वय ३५), अजय बबन शिंदे (वय ४२), संजय बबन भोसले (वय ४५), गणेश सोमनाथ भोकरे (वय २९) आणि सागर लक्ष्मण अफुवाले (वय ३४) अशी जामीन मिळालेल्यांची नावे आहेत. सिंचन भवनमधील कर्मचारी आंबटकर यांनी समर्थ पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती. ३ मे रोजी सकाळी साडेअकराच्या सुमारास ही घटना घडली. खडकवासला धरणामधून दौंड आणि इंदापूरला पिण्यासाठी एक टीएमसी पाणी देण्याचा निर्णय घेण्यात आला. या निर्णयाच्या निषेधार्थ सिंचन भवनातील साहित्याची तोडफोड करण्यात आली होती.
सरकारी कामात अडथळा आणून सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान आणि सुरक्षारक्षकांना धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणी धंगेकर यांच्यासह आठ जणांना अटक करण्यात आली. त्यांना कोर्टात हजर करण्यात आले. कोर्टाने त्यांची जामिनावर मुक्तता केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

समृद्ध पाककलेचा वारसा उलगडणार

$
0
0

खवय्यांसाठी 'पुणेरी फेस्टिव्हल'चे आयोजन
म. टा. प्रतिनिधी, पुणे
मराठमोळ्या लोककलेवर आधारित सांस्कृतिक कार्यक्रम, कलाविष्काराने सजलेली प्रदर्शने अन् महाराष्ट्राच्या पाककलेचा समृद्ध वारसा उलगडणारा पुणेरी फेस्टिव्हल येत्या ६ ते ८ मे दरम्यान आयोजित करण्यात आला आहे. म्हात्रे पुलाजावळील शुभारंभ लॉन्समध्ये हा महोत्सव होणार असून, या खाद्य जत्रेबरोबरच अनेक कार्यक्रमांची रेलचेल पुणेकरांना अनुभवायला मिळणार आहे.
'महाराष्ट्र टाइम्स' या महोत्सवाचा मीडिया पार्टनर आहे. डॉ. ओंकार माळी यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या या पुणे फेस्टिव्हलमध्ये कला, करमणूक, व्यवसाय आणि मराठमोळ्या संस्कृतीचे पैलू उलगडणार आहेत. 'ठेवा लोककलेचा; वारसा पाककलेचा' ही महोत्सवाची संकल्पना आहे. यामध्ये खवय्यांसाठी खाद्य पदार्थांचे अनेक पर्याय उपलब्ध असतीलच, शिवाय गोंधळी, वासुदेव यांसह पारंपरिक लोककलाकारांचा कलाविष्कारही 'मदारी' या रॉकबँड मधून अनुभवायला मिळणार आहे.
लहान मुलांसाठी खास 'भातुकली'चे आकर्षण असणार असून, सुमारे तीन हजार भातुकलींच्या खेळण्यांचे सुसज्ज दालन महोत्सवात उपलब्ध करण्यात येणार आहे. येथे लहान मुलांना खेळण्याचीही संधी देण्यात येणार आहे. याशिवाय विविध प्रजातींच्या शेकडो आकर्षक माशांचे अॅक्वेरियम देखील असणार आहे. खाद्य पदार्थांच्या स्टॉलवर गावरान चुलीवरचे मटण, खर्डा, भाकरी, मासवड्या आणि इतर वैविध्यपूर्ण पदार्थ उपलब्ध असणार आहेत. या शिवाय साड्या, लाकडी वस्तू, फॅशन ज्वेलरी, गृहपयोगी आणि गृह सजावटीचेही स्टॉलही उपलब्ध असणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

एकाच विषयातून ‘सेट’

$
0
0

मास कॉपी टाळण्यासाठी विद्यापीठाची शक्कल; तिन्ही पेपरसाठी चार संच
Yogesh.Borate@timesgroup.com
पुणे : एकदा एका विषयातून राज्यस्तरीय प्राध्यापक पात्रता परीक्षा (सेट) उत्तीर्ण झालेल्या उमेदवाराला त्यानंतरच्या काळात त्याच विषयातून 'सेट' देता येणार नाही, अशी महत्त्वाची तरतूद सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने केली आहे. तसेच, सेटच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या पेपरसाठीही प्रश्नपत्रिकांचे चार सेट करण्याचा निर्णय विद्यापीठाने घेतला आहे. राज्यभरात येत्या २९ मे रोजी होणाऱ्या परीक्षेपासून हे बदल लागू होणार आहेत.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या सेट विभागावर महाराष्ट्र आणि गोवा राज्यामध्ये ही परीक्षा घेण्याची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. प्राध्यापक होण्यासाठीची महत्त्वाची पात्रता असलेल्या या परीक्षेमध्ये मोठ्या प्रमाणात कॉपी झाल्याची माहिती समोर आली होती. विद्यापीठाने ६ सप्टेंबरला राज्यभरात घेतलेल्या सेटमध्ये ही परीक्षा मुळातच उत्तीर्ण असलेल्या उमेदवारांनी पुन्हा परीक्षा देऊन मास कॉपीसाठी हातभार लावल्याची बाब 'मटा'ने उघड केली होती. विविध जिल्ह्यांमधील विद्यार्थ्यांनी एका विशिष्ट केंद्राची निवड करून हा प्रकार केला होता. ही परीक्षा उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांवर कोणतेही निर्बंध नसणे आणि प्रश्नपत्रिकांचे संच नसल्याने मास कॉपीसारख्या गैरप्रकारांना चालना मिळाल्याची बाबही याच निमित्ताने अधोरेखित झाली होती. हा प्रकार उघड झाल्यानंतर कुलगुरू डॉ. वासुदेव गाडे यांनी या पुढील काळात असे प्रकार घडूच नयेत, यासाठी पावले उचलण्याचे आश्वासन दिले होते. त्यानुसार विद्यापीठाने आगामी सेटच्या परीक्षेपासून हे बदल केल्याचे स्पष्ट झाले आहे.
कुलगुरू डॉ. वासुदेव गाडे यांनी बुधवारी 'मटा'ला ही माहिती दिली. डॉ. गाडे म्हणाले, 'सेटच्या परीक्षेत मास कॉपीसारखे प्रकार होऊ नयेत, यासाठी विद्यापीठाने काही काटेकोर पावले उचलली आहेत. या पुढे एका विषयातून सेट झालेल्या उमेदवाराला पुढच्या वेळी त्याच विषयातून सेट देता येणार नाही. त्याने इतर विषयातून सेट दिल्यास, तशी संधी उमेदवाराला असेल. परीक्षेच्या तिन्ही पेपरमध्ये या पुढे प्रश्नपत्रिकांचे संच असतील. या माध्यमातून या परीक्षेतील गैरप्रकारांना निश्चितच आळा बसेल, अशी आमची खात्री आहे.'
..
ऑनलाइन ओळखपत्र १९पासून
दरम्यान, येत्या २९ मे रोजी होणाऱ्या सेट परीक्षेसाठी राज्यभरातील जवळपास ८५ हजार उमेदवारांनी अर्ज भरले आहेत. या विद्यार्थ्यांना १९ मे पासून आपली ओळखपत्रे ऑनलाइन उपलब्ध होणार आहेत. तसेच, विभागाने ही परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांची यादी आपल्या पोर्टलवर टाकली आहे. परीक्षेसाठी अर्ज भरल्यानंतरही ज्या विद्यार्थ्यांची नावे या यादीमध्ये आली नसतील, अशा विद्यार्थ्यांनी विभागाकडे संपर्क साधावा, असे आवाहनही सेट विभागाने केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


‘कोकणचा राजा’ हिरमुसला

$
0
0

अद्याप सामान्यांच्या आवाक्यात नाहीच; दरांअभावी आवक घटली

म. टा. प्रतिनिधी, पुणे

अवघ्या काही दिवसांवर अक्षयतृतीया येऊन ठेपली असतानाही 'कोकणचा राजा' सामान्यांच्या आवाक्यात आलेला नाही. शुभ मुहूर्तामुळे मागणी भरपूर असूनही दर मिळत नसल्याने हापूस आंब्याने पुणेकरांकडे पाठ फिरविली आहे. त्यामुळे मार्केट यार्डातील आवकही घटली आहे.

'गुलटेकडी मार्केट यार्डात बुधवारी रत्नागिरीहून पाच हजार पेटी हापूस आंब्याची आवक झाली. कर्नाटकातूनही सुमारे १५ ते २० हजार पेट्यांची आवक झाली आहे. एप्रिल महिन्यात मोठ्या प्रमाणात आंब्याची आवक होणे अपेक्षित होते. मात्र, अद्याप पुरेशी आवक झालेली नाही. 'दरवर्षी मे महिन्याच्या पहिल्या दिवशी मोठी आवक होते. परंतु, रत्नागिरीहून अद्याप म्हणावी तितकी आवक झालेली नाही. आवक कमी झाल्याने परिणामी शहरात दर स्थिर आहेत. पुणेकरांना सणासुदीच्या पार्श्वभूमीवर स्वस्तात हापूस हवा आहे. मात्र, पुण्यात दर मिळत नसल्याने आंबा उत्पादकांनी मुंबईच्या बाजारपेठेवर लक्ष केंद्रीत केले आहे. बाजारपेठेतील आवक घटल्याने अद्याप पुण्यात आंबा सामान्यांच्या आवाक्यात आला नाही,' असे आंब्याचे व्यापारी करण जाधव यांनी सांगितले.

गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा आंब्याची आवक कमी आहे. सध्या शेवटच्या टप्प्यातील कच्च्या आंब्याची आवक होत आहे. पुणेकरांना आंबा स्वस्त देण्याची तयारी असली तरी, आवक घटल्याने दर कमी होत नाहीत, असेही जाधव म्हणाले. 'अक्षय्यतृतीयेला मोठ्या प्रमाणात आंबाखरेदीची परंपरा आहे. त्यामुळे सध्या मागणीत वाढ होत आहे. सध्या बाजारात १२५ ते ३५० ग्रॅम वजनाचे फळ उपलब्ध आहे. फळाच्या आकारानुसार दर मिळत असून, हा हंगाम आणखी २० ते २५ दिवस चालेल,' अशी माहिती व्यापारी अरविंद मोरे यांनी दिली.


आंब्याचे दर

प्रकार दर (रुपयांत)

रत्नागिरी हापूस (कच्चा) ४ ते ८ डझन ८०० ते २२००

रत्नागिरी हापूस (तयार) ४ ते ८ डझन १००० ते २५००

कर्नाटक हापूस (कच्चा) ४ ते ५ डझन ८०० ते १२००

कर्नाटक हापूस (तयार) ४ ते ५ डझन १००० ते १४००

कर्नाटक पायरी (कच्चा) ४ ते ५डझन ६०० ते ८००

कर्नाटक पायरी (तयार ) ४ ते ५ डझन ७०० ते १०००

लालबाग कच्चा (प्रतिकिलो) २५ ते ३५

लालबाग तयार (प्रतिकिलो) ३० ते ४०

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

राज्यात आज होणार सीईटी परीक्षा

$
0
0

पुणेः गेल्या आठवडाभरापासून 'सीईटी' आणि 'नीट' परीक्षेविषयी सुरू असलेल्या उलटसुलट चर्चांच्या पार्श्वभूमीवर राज्यातील एकूण ४ लाख ९ हजार ९४० विद्यार्थी आज 'सीईटी' परीक्षा देणार आहेत. ही परीक्षा सुरू असतानाच, सुप्रीम कोर्टाने 'सीईटी' की 'नीट' या विषयीचा निर्णय जाहीर होण्याची शक्यताही व्यक्त केली जात असल्याने, 'सीईटी'वरच लक्ष केंद्रीत करण्यासाठी विद्यार्थ्यांना मोठी कसरत करावी लागल्याचे बुधवारी अनुभवायला मिळाले.

शहरात एकूण ४४ हजार ३०३ विद्यार्थी आज होणारी 'सीईटी' देत आहेत. राज्य वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनलयाचे संचालक डॉ. प्रवीण शिनगारे यांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्यात ३६ मुख्य जिल्हा केंद्रांर्तगत एकूण एक हजार ५४ शाळांमधून ही परीक्षा घेतली जाणार आहे. राज्यभरातील चार लाखांवर विद्यार्थ्यांसाठी एकूण १७ हजार १०६ वर्गांमधून परीक्षा देण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. मेडिकल ग्रुपसाठी एकूण १ लाख ४१ हजार १४, तर इंजिनीअरिंग ग्रुपसाठी एकूण १ लाख २५ हजार ९८१ विद्यार्थ्यांनी या परीक्षेसाठी नोंदणी केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

प्रसंगी पुण्याला मिळणार अचल साठ्यातून पाणी

$
0
0

नागरिकांच्या रोषानंतर जिल्हाधिकाऱ्यांचे आश्वासन

म. टा. प्रतिनिधी, पुणे

पुण्याच्या हक्काच्या पाण्यावर गदा आणून दौंड आणि इंदापूर शहरांना कालव्यातून पाणी सोडण्याच्या निर्णयावर तीव्र रोष निर्माण झाल्याने, खडकवासला धरणातील एक अब्ज घनफूट (टीएमसी) अचल पाणीसाठा वेळप्रसंगी पुण्याला देण्याचे आश्वासन जिल्हाधिकारी सौरव राव यांनी बुधवारी दिले. या अचल साठ्यामुळे पुण्याला आता पुरेसा पाणीसाठा असल्याची सारवासरव करून पालकमंत्री गिरीश बापट यांनी घेतलेल्या पाणी सोडण्याच्या निर्णयाचे समर्थनही त्यांनी केले.

पुणेकर आणि महापालिकेला अंधारात ठेवून खडकवासला प्रकल्पातील एक टीएमसी पाणी सोडण्याचा निर्णय बापट यांनी घेतला. या निर्णयावरून गेले काही दिवस शहरातील वातावरण पेटले असताना जिल्हाधिकारी व जलसंपदा विभागाला बुधवारी अचानक साक्षात्कार झाला. खडकवासला धरणामध्ये एक टीएमसी अचल पाणीसाठा आहे आणि १५ जुलैनंतर पाण्याची परिस्थिती कठीण झाल्यास पुण्यासाठी हे पाणी वापरणे शक्य आहे, असे जिल्हाधिकारी राव यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.

खडकवासला धरणामध्ये एक टीएमसी अचल पाणीसाठा आहे, तर यापूर्वीच त्याची माहिती का दिली गेली नाही, असा सवाल यामुळे उपस्थित होतो. खडकवासला प्रकल्पातील पाणीसाठ्याचे नियोजन करण्यासाठी कालवा समितीची १ मे रोजी झालेल्या बैठकीमध्ये अचल पाणीसाठ्याचा विषय चर्चेलाही आला नाही. महापौर आणि महापालिकेच्या आयुक्तांनाही ही माहिती दिली गेली नाही. या पाण्याविषयी इतकी गुप्तता का पाळण्यात आली असा प्रश्नही विचारला जात आहे.

खडकवासला धरणामध्ये पुण्याला १५ जुलैपर्यंत पुरेल एवढा २.७५ टीएमसी पाणीसाठा ठेवण्यात आला आहे. १५ जुलैपर्यंत पाऊस न झाल्यास अचलसाठ्यातील एक टीएमसी पाणी पुण्यासाठी वापरता येऊ शकेल याची मात्र कोणतीही कल्पना महापालिका वा महापौरांना दिली गेली नाही. पाणी सोडण्याच्या निर्णयावरून शहरामध्ये पालकमंत्र्यांच्या विरोधात मोठ्या प्रमाणावर रोष निर्माण झाल्यामुळे अखेर अचल पाणीसाठा शहरासाठी वापरता येईल, अशी मखलाशी जिल्हाधिकारी राव यांनी केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सैराटच्या पायरसीवरून पहिला गुन्हा दाखल

$
0
0

मटा प्रतिनिधी, पुणे

सध्या गाजत असलेल्या 'सैराट' या चित्रपटाची पायरसी करणाऱ्या एका युवकावर स्वागरेट पोलिसांनी बुधवारी गुन्हा दाखल केला. कासम दस्तगीर शेख (वय २३ रा. इंदिरानगर) या युवकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी 'प्रायव्हेट आय' कंपनीच्या राहुल मानकर यांनी तक्रार दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 'जेधे चौकातील एच. के. जी. एन. मोबाइल शॉपी या दुकानातून 'सैराट' चित्रपटाची पायरसी होत असल्याची माहिती मिळाल्यानंतर मानकर यांनी स्वारगेट पोलिसांशी संपर्क साधला. त्यानंतर पोलिसांनी पंचांसह दुकानावर छापा टाकला. बनावट ग्राहक पाठवला असता, कासम शेख याने १०० रुपयांत 'सैराट'ची प्रत 'पेन ड्राइव्ह'वर ट्रान्सफर करून दिली. त्यानंतर पंचनामा करून गुन्हा दाखल करण्यात आला. परवानगी नसताना सिनेमाची कॉपी बाळगणे आणि प्रसारित करणे याबद्दल कॉपीराइट कायद्यांतर्गत कासम शेखवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे; तसेच सीपीयू आणि पेन ड्राइव्ह असे साहित्यही जप्त करण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जैन यांच्याविरुद्धचा खटला अण्णांकडून मागे

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे आणि माजी मंत्री सुरेशदादा जैन यांच्यात सुरू असलेल्या वादावर १३ वर्षांनी गुरुवारी पडदा पडला. हजारे यांची बदनामी केल्याप्रकरणी जैन यांच्याविरुद्ध दाखल केलेला खासगी खटला काढून टाकण्यात यावा, असा अर्ज हजारे यांनी गुरुवारी कोर्टात सादर केला. या अर्जानुसार कोर्टाने खटला काढून टाकण्याचे आदेश दिले.

जैन यांनी पुण्यात ९ मे २००३ रोजी पत्रकार परिषदेत हजारे यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले होते. या आरोपांविरोधात हजारे यांनी २३ जून २००३ रोजी शिवाजीनगर कोर्टात जैन यांच्याविरुद्ध बदनामीचा खटला दाखल केला होता. या खटल्याची सुनावणी प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी शीतल एस बांगड यांच्या कोर्टात सुरू होती. अॅड हर्षद निंबाळकर, अॅड मिलिंद पवार आणि देवेंद्र वैद्य यांनी हजारे यांच्यावतीने खटला मागे घेत असल्याचा अर्ज कोर्टात दाखल केला होता.

'जैन यांनी माझ्याविरुद्ध ज‍ळगाव येथे बदनामीचा खटला दाखल केला होता. तो खटला त्यांनी स्वतःहून काढून घेतला आहे. जैन सध्या जळगाव येथील घरकुल घोटाळा प्रकरणात अटक आहेत. ते गेली तीन वर्ष जेलमध्ये आहेत. कोर्टाने त्यांचा जामीन अर्जही फेटाळला आहे. ते जेलबाहेर येण्याची शक्यता वाटत नाही, तसेच ते आजारी असल्याचे कळते आहे. त्यामुळे मानवतेच्या दृष्टीने विचार करता बदनामीचा खटला पुढे चालू ठेवणे हजारे यांना योग्य वाटत नाही. म्हणून त्यांनी खटला मागे घेण्यासाठी अर्ज केला. हजारे यांनी दाखल केलेल्या अर्जावर कोर्टाने निकाल देत खटला मागे घेत असल्याचा आदेश दिला आहे,' अशी माहिती पवार यांनी दिली.

'हजारे हे मोठे भ्रष्टाचारी व ढोंगी आहेत. त्यांच्याविरुद्ध माझ्याकडे भ्रष्टाचाराचे भरपूर पुरावे आहेत,' असे जैन यांनी पत्रकार परिषदेत जाहीर केले होते. या बातम्या वर्तमानपत्रात प्रसिद्ध, तसेच वृत्तवाहिन्यांवरून त्याचे प्रेक्षपण झाले होते. त्यानंतर १७ मे २००३ मध्ये एका वर्तमानपत्राला मुलाखत देताना जैन यांनी, हजारे यांचे पद्मश्री, पद्मभूषण सन्मान काढून घेतले पाहिजेत. ते भ्रष्टाचारी, मेंटल असून त्यांना वेड्यांच्या इस्पितळात दाखल केले पाहिजे, असे आरोप केल्याचा दावा हजारे यांच्याकडून करण्यात आला होता. या आरोपांविरोधात कोर्टात खटला करण्यात आला होता.

या खटल्याच्या सुनावणीसाठी हजारे यांची साक्ष नोंदवण्यात आली होती. पुण्यातील विविध वर्तमानपत्रांच्या पाच प्रतिनिधींची साक्ष नोंदविल्या गेल्या. तसेच, जैन यांनी हजारे यांची नाहक बदनामी केली असून त्यांनी सकृतदर्शनी बदनामीचा गुन्हा केल्याचे सिद्ध होत आहे, व त्यांच्यावर दोषारोप ठेवण्याचे आदेश नुकतेच कोर्टाने दिले होते, असे पवार म्हणाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images