Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

मार्गदर्शन सत्रामध्ये उलगडल्या करिअरसंधी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे इयत्ता दहावी आणि बारावीनंतरच्या करिअरसंधी आणि त्यासाठी उपलब्ध असलेल्या विविध अभ्यासक्रमांची माहिती विद्यार्थ्यांना नुकतीच मिळाली. निमित्त होते 'करिअर कॉर्नर' संस्थेतर्फे आयोजित 'एन्लाइट २०१६' या करिअर मार्गदर्शन सत्राचे. सुमारे ३०० विद्यार्थ्यांनी या सत्राचा लाभ घेतला. 'महाराष्ट्र टाइम्स' या सत्राचा मीडिया पार्टनर होता. 'एफटीआयआय'चे माजी अधिष्ठाता प्रा. समर नखाते यांनी चित्रपट, दूरचित्रवाणी आणि माध्यमांतील करिअरबाबत मार्गदर्शन केले. 'या क्षेत्रात येण्यापूर्वी आपला सर्जनशीलतेकडे कल आहे का, हे नीट तपासा,' असे आवाहन त्यांनी केले. 'भाऊ इन्स्टिट्यूट'चे सहसंस्थापक संजय इनामदार यांनी सातारा जिल्ह्यातील खटावसारख्या छोट्या गावापासून अमेरिकेतील हार्वर्ड विद्यापीठापर्यंत झालेला त्यांचा करिअर प्रवास कथन केला. 'आपल्या क्षमतांवर विश्वास ठेवा,' असे त्यांनी सांगितले; तसेच उद्योजकतेबाबतही मार्गदर्शन केले. उपनिबंधक डॉ. अमोल शिंदे यांनी नागरी सेवांमधील करिअरची माहिती दिली. 'यूपीएससी आणि एमपीएससीसारख्या स्पर्धा परीक्षांसाठी आधीपासून आणि मन लावून तयारी करा,' अशी सूचना त्यांनी केली. महिंद्रा इकोल सेंट्रालचे डॉ. पलाश रॉय चौधरी यांनी योग्य इंजिनीअरिंग कॉलेज कसे निवडायचे, याबाबत मार्गदर्शन केले. 'इकोल इन्स्टिट्यूट ऑफ डिझाइन'च्या पल्लवी लाला यांनी डिझाइनमधील करिअरसंधींबाबत माहिती दिली. गोव्याच्या व्ही. एम. साळगावकर इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंटच्या एड्ना नऱ्होना यांनी हॉटेल मॅनेजमेंटमधील करिअरची माहिती दिली. 'करिअर कॉर्नर'चे व्यवस्थापकीय संचालक हृषिकेश हुंबे आणि आर्मी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीचे प्रा. मनोज खळदकर यांनी विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना उत्तरे दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


बाजार समितीच्या उत्पन्नात सहा कोटींची वाढ

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे प्रादेशिक आणि हवेली बाजार समितीच्या विलिनीकरणानंतर पुणे प्रादेशिक बाजार समितीचे उत्पन्न एका वर्षात सुमारे सहा कोटी रुपयांनी वाढले. बाजार, परवाना शुल्क, स्थावर तसेच इतर उत्पन्नामुळे सहा कोटींची रक्कम वाढल्याने समितीची यंदाची वार्षिक उलाढाल ही सुमारे ५६ कोटी रुपयांच्या घरात पोहोचली आहे. राज्य सरकारने पुणे प्रादेशिक बाजार समितीवर प्रशासकीय मंडळाची नियुक्ती केली. त्याची वर्षपूर्ती झाल्यानिमित्ताने बाजार समितीचे मुख्य प्रशासक दिलीप खैरे यांनी पत्रकार परिषद घेऊन कामकाजाचा आढावा घेतला. त्या वेळी उप मुख्य प्रशासक भूषण तुपे, गोरख दगडे, अॅड. अण्णा शिंदे, मंगेश मोडक तसेच आडते असोसिएशनचे अध्यक्ष शिवलाल भोसले, समितीचे सचिव धनंजय डोईफोडे उपस्थित होते. 'पूर्वी हवेली आणि प्रादेशिक अशा दोन बाजार समित्या कार्यरत होत्या. काही महिन्यांपूर्वी सरकारने दोन्ही बाजार समित्यांचे विलिनीकरण केले. त्यानंतर पुणे प्रादेशिक बाजार समिती अस्तित्वात आली. दोन्ही बाजार समित्या असताना समितीची ५० कोटी २ लाख ५ हजार ८०४ रुपयांचे उत्पन्न होते. विलीनीकरणानंतर पुणे प्रादेशिक बाजार समितीचे उत्पन्न सुमारे ५ कोटी ८२ लाख ४५ हजार ७३० रुपयांनी वाढले. त्यामुळे एकूण उत्पन्न हे ५५ कोटी ८४ लाख ५१ हजार ५३४ रुपये एवढे झाले,' अशी माहिती मुख्य प्रशासक दिलीप खैरे यांनी दिली. मार्केट यार्डाच्या पुनर्विकासाचा प्रस्ताव मार्केट यार्डातील फळे, पालेभाज्या फळभाज्या विभागांचा पुनर्विकासाचा प्रस्ताव सध्या बाजार समितीने पुढे आणला आहे. त्या विभागातील सर्व गाळे मोडकळीस आले आहेत. वाहतुकीचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे नव्याने त्याचा विकास करून तेथे वाढीव गाळ्यांची क्षमता असलेले संकुल उभारण्याचा प्रस्ताव आहे. याबाबत 'मटा'ने सर्वप्रथम वृत्त दिले होते. सध्या व्यापाऱ्यांना प्रत्येकी २४० स्क्वेअर फूट एवढी जागा मिळाली आहे. त्यात वाढ करून आणखी जागा कशी उपलब्ध करता येईल याबाबत चर्चा सुरू आहे. त्या संदर्भात पणनमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याशी झालेल्या बैठकीतील चर्चेनुसार अंदाजित ७५२ कोटी रुपयांचा पुनर्विकासाचा प्रस्ताव सरकार दफ्तरी तत्त्वतः मान्यतेसाठी पाठविला आहे. शेतकरी निवास, बँका, पतसंस्थांसाठी स्वतंत्र जागा, एटीएमची सुविधांचा त्यात समावेश आहे. पुनर्विकासाचे काम सुरू असताना जनावरांच्या बाजारात तात्पुरते बाजार उभारण्यासाठी ३२ कोटी रुपयांचा प्रस्ताव पणन संचालकांकडे पाठविण्यात येणार आहे.

आंबा पिकविण्यासाठी कॅल्शिअम कार्बाईडचा वापर करण्यास मनाई आहे. त्यामुळे व्यापाऱ्यांच्या मागणीनुसार रायपनिंग चेंबरची उभारण्यात करण्यात येत आहे. त्यात दहा ट्रक एवढ्या क्षमतेच्या आंब्याच्या पेट्या एकाचवेळी पिकविता येणार आहे. त्यामुळे ही सुविधा लवकरच उपलब्ध होईल. - दिलीप खैरे, मुख्य प्रशासक, पुणे प्रादेशिक बाजार समिती

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भूपेंद्र कँथोला ‘एफटीआयआय’च्या संचालकपदी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

भूपेंद्र कँथोला यांनी राष्ट्रीय चित्रपट आणि दूरचित्रवाणी संस्थेच्या (एफटीआयआय) संचालकपदाची सूत्रे अखेर मंगळवारी स्वीकारली. त्यामुळे संस्थेला जवळपास आठ-नऊ महिन्यांनी पूर्णवेळ संचालक मिळाला आहे.

'एफटीआयआय'च्या नियामक मंडळाच्या अध्यक्षपदी गेल्या वर्षी गजेंद्र चौहान यांची नियुक्ती झाली. त्यांच्यासह इतर सदस्यांच्या नियुक्तीविरोधात विद्यार्थ्यांनी आंदोलन छेडले होते. आंदोलनादरम्यान तत्कालीन संचालक डी. जे. नारायण पदमुक्त झाल्याने, वातावरण अधिक चिघळू नये यासाठी पत्र-माहिती कार्यालयाचे (पीआयबी) संचालक प्रशांत पाठराबे यांच्याकडे 'एफटीआयआय'चे प्रभारी संचालकपद सोपवण्यात आले होते. त्यानंतर आठ-नऊ महिन्यांनी भूपेंद्र कँथोला यांची संचालकपदी नियुक्ती झाल्याचा आदेश कोणताही गाजावाजा न करता 'डायरेक्टोरेट ऑफ पर्सोनेल ट्रेनिंग'कडून (डीओपीटी) गेल्या महिन्याच्या अखेरीस जारी करण्यात आला. त्यानुसार कँथोला यांनी मंगळवारी पदभार स्वीकारला.

कँथोला हे १९८९च्या बॅचचे आयएसएस (भारतीय माहिती सेवा) अधिकारी आहेत. त्यांनी मुंबई विद्यापीठातून 'पॉलिटिकल सायन्स आणि इंटरनॅशनल रिलेशन्स' या विषयात पदव्युत्तर पदवी संपादन केली असून, त्यांनी सुवर्णपदक मिळवले होते. दूरदर्शनच्या दिल्ली येथील मुख्यालयात ते १९९० ते २००४पर्यंत कार्यरत होते. विशेष म्हणजे, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 'मन की बात' कार्यक्रमाच्या प्रक्षेपणाच्या व्यवस्थापनाची जबाबदारीही ते पाहत होते. 'डायरेक्टोरेट ऑफ फिल्म फेस्टिव्हल्स'च्या माध्यमातून त्यांनी राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार आणि चित्रपटांच्या संदर्भातील 'इंडियन पॅनोरमा' विभागाचे, तसेच लोकसभा टीव्हीचे कामही त्यांनी पाहिले आहे.

.....................
चित्रपटनिर्मिती आणि दूरचित्रवाणी या क्षेत्रामध्ये जाऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांच्या कौशल्याला आकार देण्याचे भरीव कार्य 'एफटीआयआय' ही संस्था करत आहे. संस्थेचे हे वैभव अबाधित ठेवण्याचा मी नक्कीच प्रयत्न करीन. मी कोणत्याही पूर्वग्रहदूषित विचारांनी नव्हे, तर खुल्या मनाने संस्थेत प्रवेश केला आहे. विद्यार्थी, प्राध्यापक आणि कर्मचारी यांचे सर्वतोपरी सहकार्य मिळेल याची मला खात्री आहे.

- भूपेंद्र कँथोला, संचालक, एफटीआयआय

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आजची गाणी उद्या आठवत नाहीत

$
0
0

भारतीय संगीताचा सुवर्णकाळ आपल्या गिटारवादनातून आणखी समृद्ध केलेले आणि अनेक गीतांमधील गिटारच्या सुरांतून आपल्याला भेटत राहिलेले प्रख्यात गिटारवादक गोरख शर्मा यांनी बऱ्याच वर्षांनी पुण्याला भेट दिली. त्या वेळी चिंतामणी पत्की यांनी त्यांच्याशी साधलेला संवाद.

.............

- संगीताचा सुवर्णकाळ तुम्ही अनुभवला आहे. त्याबद्दलच्या कोणत्या आठवणी आहेत?

- प्रख्यात संगीतकार प्यारेलाल शर्मा हे माझे बंधू. लक्ष्मीकांत-प्यारेलाल, ज्यांना आम्ही 'एलपी' असे संबोधतो, त्यांच्यासह सर्व संगीतकारांबरोबर मला काम करायला मिळाले. लक्ष्मीकांत-प्यारेलाल यांच्या पहिल्या चित्रपटापासून मी त्यांच्याबरोबर होतो. नौशाद, सी. रामचंद्र, एस. डी. बर्मन, मदनमोहन, रवी, चित्रगुप्त, शंकर-जयकिशन यांच्यापासून अलीकडच्या नदीम-श्रवण अशा सगळ्या संगीताकारांबरोबर खूप सुंदर गाणी करता आली. या प्रवासात मी जवळपास ५०० ते ६०० चित्रपटांसाठी काम केले असेन. भारावून टाकणारा काळ होता हा.

- तुम्हाला संगीताचा वारसा घरातूनच मिळाला. त्याविषयी काय सांगाल?

- आमच्या घरात एकूणच संगीताचे वातावरण होते. वडिलांनी आम्हा सगळ्यांना संगीताचे धडे दिले. पाश्चात्य स्वरमालेवर कॅथलिक लोकांची हुकूमत असे. व्हायोलिन हे वाद्यही त्यांच्यापुरतेच होते. वडिलांनी ते चित्र बदलले. व्हायोलिन सगळ्यांपर्यंत पोहोचवले. बालवयातच वडिलांनी माझ्या हातात मेंडोलिन दिले. मेंडोलिन शिकलो. त्यानंतर गिटार शिकलो. हॅनिमल कॅस्ट्रो हे माझे गिटारचे गुरू, तर वडील पं. रामप्रसाद शर्मा हे आमचे संगीताचे गुरू होते. त्यांच्यामुळेच मला संगीताची आवड निर्माण झाली.

- तुमचा पहिला चित्रपट कोणता?

- वयाच्या १४ व्या वर्षी मी लक्ष्मीकांत-प्यारेलाल यांच्या 'छैला बाबू' चित्रपटासाठी वादन केले; मात्र आधी प्रदर्शित झालेला 'पारसमणी' हा या जोडीचा पहिला चित्रपट ठरला.

- आपण संगीतकार व्हावे, असे तुम्हाला कधी वाटले नाही का?

- काम खूप होते. त्यामुळे संगीत दिग्दर्शक व्हायला वेळच मिळाला नाही. वादक कलाकार म्हणूनच मी कामामध्ये इतका अडकलो होतो, की स्वतंत्ररीत्या संगीतकार व्हावे असा विचार कधी मनात आलाच नाही.

- बदलत्या संगीताकडे आपण कसे पाहता?

- पूर्वीची गाणी आणि आताची गाणी यांची तुलना करता येणार नाही. पूर्वीच्या गाण्यांच्या शब्दाला अर्थ होता. संगीतामध्ये माधुर्य होते. आताची गाणी आज ऐकली, की उद्या आठवत नाहीत. पूर्वी असे होत नव्हते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

खर्चाच्या शंका मिटल्या?

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे कार्यालय तीन वर्षांसाठी विदर्भ साहित्य संघाकडे गेले असले, तरी पिंपरीच्या साहित्य संमेलनाचे 'कौतुक' अद्याप संपलेले नाही. पिंपरीच्या संमेलनाच्या खर्चावरून आणि हिशेब मागण्यावरून बरीच चर्चा झाली होती; मात्र संमेलनाचा बँक खात्यातील व्यवहार दफ्तरी दाखल करून घेताना मात्र कोणीच शंका उपस्थित केली नाही. 'तेरी भी चूप और मेरी भी चूप' असे म्हणत हा विषय गुलदस्त्यातच ठेवण्यात आल्याने साहित्य वर्तुळात आश्चर्य व्यक्त होत आहे.

अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे कार्यालय आता तीन वर्षांसाठी विदर्भ साहित्य संघाकडे गेले आहे. रविवारी झालेल्या बैठकीत नवीन कार्यकारिणी ठरवण्यात आली. त्याआधी कार्यालय महाराष्ट्र साहित्य परिषदेकडे होते व प्रमुख कार्यवाह प्रकाश पायगुडे यांच्याकडे हंगामी कार्यभार सोपवण्यात आला होता. यादरम्यान, 'पिंपरी येथे झालेल्या ८९व्या साहित्य संमेलनाच्या खर्चाचा अहवाल द्यावा,' असे पत्र पायगुडे यांनी स्वागताध्यक्ष डॉ. पी. डी. पाटील यांना पाठवले होते. त्यावर 'कोणाकडूनही एका रुपयाचे अनुदान घेतलेले नाही. सरकारचे २५ लाख रुपये संमेलनाच्या समारोपावेळी महामंडळाला परत दिले आहेत. त्यामुळे साहित्य महामंडळाला हिशेब देण्याचा प्रश्नच येत नाही. त्यांचे पैसे वापरलेच नाहीत, तर हिशेब कशाचा देणार,' अशी भूमिका डॉ. पाटील यांनी घेतली. 'संमेलनाच्या खर्चाचा अहवाल आयोजक संस्थेने देणे बंधनकारक असून, अहवाल महामंडळाला द्यावाच लागेल,' अशी ठाम भूमिका अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाने घेतली.

संमेलनाच्या खर्चाचा वाद विकोपाला गेला असतानाच डॉ. पाटील यांनी महामंडळाला खर्चाचा अहवाल दिला; पण सर्वाधिक श्रीमंत संमेलन अशी चर्चा असलेल्या संमेलनाचा खर्च सव्वा कोटी रुपये इतकाच दाखवण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त केले जात होते. स्वागताध्यक्षांनी संपूर्ण संमेलनाचा खर्च न दाखवता साहित्य संमेलनाच्या नावाने सुरू केलेल्या बँक खात्यातील माहिती महामंडळाला दिली. संमेलनाचा खर्च स्वत: केल्याने खर्चाचा अहवाल देण्याचा प्रश्नच येत नाही, ही स्वागताध्यक्षांची भूमिका कायम होती.

या पार्श्वभूमीवर, महामंडळाच्या बैठकीमध्ये या विषयाचे काहीच पडसाद न उमटल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. 'महामंडळाच्या बैठकीत अहवाल सादर करण्यात आला व दफ्तरी दाखल करून घेण्यात आला. बरेच दिवस गाजलेल्या या विषयाचे कोणतेच पडसाद बैठकीत उमटले नाहीत. प्रत्यक्षातील खर्च व अहवालातील माहिती यावर सर्वांनीच मौन बाळगले,' अशी माहिती सूत्रांनी दिली.

.....................

२५ लाख रुपयांचा निधी कोणाचा किंवा त्या निधीचे काय करायचे याबाबत महामंडळाच्या आधीच्या अध्यक्षांनी निर्णय घेऊन निधी बँक खात्यामध्ये जमा केला आहे. यामुळे हा मुद्दा निकाली निघाला आहे. २५ लाख रुपयांचा निधी आमच्याकडे महामंडळाच्या खात्यामध्ये सुरक्षित आहे.

- डॉ. श्रीपाद जोशी, अध्यक्ष, अ. भा. मराठी साहित्य महामंडळ

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘आयटीआय’मध्ये होणार सुधारणा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

'जागतिक पातळीवर एका इंजिनीअरमागे चार डिप्लोमाधारक आणि 'आयटीआय'च्या आठ विद्यार्थ्यांची आवश्यकता असते. राज्यात मात्र आठ इंजिनीअरमागे चार डिप्लोमाधारक आणि 'आयटीआय'चा एक विद्यार्थी अशी परिस्थिती आहे. ही परिस्थिती बदलण्यासाठी कालसुसंगत अभ्यासक्रम सुरू करण्याबरोबरच खासगी उद्योगांच्या सहकार्याने 'आयटीआय'च्या विद्यार्थ्यांना सिम्युलेटरही पुरवण्यात येतील,' अशी माहिती कौशल्यविकास व गृहराज्यमंत्री रणजित पाटील यांनी दिली.

जनजागर प्रतिष्ठान, नॅशनल युवा को-ऑपरेटिव्ह सोसायटी आणि व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण विभागातर्फे मंगळवारी दिवंगत नेते प्रमोद महाजन यांच्या स्मृतिदिनानिमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी पाटील यांच्यासह प्रतिष्ठानचे अध्यक्ष व भारतीय जनता पक्षाचे प्रवक्ते माधव भांडारी, महापालिका आयुक्त कुणाल कुमार, भाजपचे शहराध्यक्ष योगेश गोगावले, महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे रवींद्र वंजारवाडकर, नगसेविका मुक्ता टिळक आदी मान्यवर उपस्थित होते. विभागाचे सहसंचालक चंद्रकांत निनाळे यांनी प्रास्ताविक केले. विजय बोऱ्हाडे, बाळकृष्ण सुर्वे, नजमा शेख या शिक्षकांचाही या वेळी सत्कार करण्यात आला.

'भारताला लोकसंख्येच्या लाभांशाचा फायदा घेण्यासाठी आयटीआय व एमसीव्हीसी अभ्यासक्रम अधिक सक्षम करणे आवश्यक आहे. इंजिनीअरिंगच्या विद्यार्थ्यांचा काळ आता मागे पडत चालला आहे. येत्या काळात आयटीआय व किमान कौशल्यावर आधारित अभ्यासक्रमाच्या (एमसीव्हीसी) विद्यार्थ्यांसाठी प्रचंड संधी उपलब्ध असतील. त्या दृष्टीने आयटीआय व 'एमसीव्हीसी'च्या अभ्यासक्रमात कालसुसंगत बदल करणे आवश्यक आहे. अनावश्यक किंवा कालबाह्य अभ्यासक्रम बंद करून कालसुसंगत, रोजगाराभिमुख छोटे अभ्यासक्रम राबवणे गरजेचे आहे,' असे पाटील यांनी सांगितले.

'आयटीआयचा कारभार फक्त लेथ मशिनवर चालू शकणार नाही. त्यांना आधुनिक तंत्रज्ञान उपलब्ध होणे गरजेचे आहे. काही खासगी कंपन्यांना 'आयटीआय'चे पालकत्व देण्यात आले आहे. या कंपन्यांमार्फत आयटीआय आणि 'एमसीव्हीसी'च्या वर्गात सिम्युलेटर बसवण्यात येतील,' असेही पाटील यांनी सांगितले.

......................

येत्या काळात कौशल्याला अधिक महत्त्व प्राप्त होणार आहे. कोणत्या क्षेत्रात किती संधी उपलब्ध आहेत व त्यासाठी किमान पात्रता काय आहे, याची माहितीच विद्यार्थ्यांकडे उपलब्ध नाही. त्यासाठी कौशल्य विकास योजनेमार्फत विविध उपक्रम राबवण्यात येत आहेत.

- माधव भांडारी, भाजप प्रवक्ते

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सिंहगड, मुळशीला वणव्यांचा विळखा

$
0
0

Chaitrali.Chandorkar@timesgroup.com

पुणे : उत्तराखंडमधील श्रीनगरमध्ये वणव्यामुळे मोठ्या प्रमाणावरील वनक्षेत्र खाक झाले असतानाच, पुण्यातील वनक्षेत्रदेखील सध्या वणव्याच्या कचाट्यात सापडले आहे. सिंहगड, मुळशी, ताम्हिणी भागातील रान पेटले असून, काही डोंगरांवरील वनसंपदा या आगीने जळून गेली आहे. वन कर्मचारी मात्र सध्या इतर कामांत व्यग्र असल्याने त्यांना वणव्याकडे लक्ष देण्यास वेळ नाही.

सिंहगडाला लागून असलेल्या वनक्षेत्रामध्ये गेल्या तीन वर्षांत वणव्यांचे प्रमाण लक्षणीयरीत्या घटले होते. वन विभागाने संयुक्त वन व्यवस्थापन समितीअंतर्गत तीस कर्मचाऱ्यांना वणवा विझवण्याचे प्रशिक्षण देऊन सिंहगडाच्या सभोवताली असलेल्या वनक्षेत्रात गस्त घालण्याची जबाबदारी दिली होती. जाळपट्टे आणि इतर खबरदारीही घेण्यात आली होती. त्यामुळे वणवे पेटल्यावर कमी वेळेत कार्यकर्त्यांनी घटनास्थळी पोहोचून ते विझवल्याने नुकसान कमी झाले; मात्र या वर्षी वन समितीच्या कामगारांना स्थानिक वनाधिकाऱ्यांनी गस्त घालण्याऐवजी खड्डे खणणे आणि इतर कामांमध्ये अडकवले आहे. पर्यायाने गेल्या दोन वर्षांच्या तुलनेत यंदा गस्त घातली गेलेली नसल्याने एप्रिलमध्येच अनेक ठिकाणी आगी लावण्यात आल्याने त्यांचे वणव्यांत रूपांतर झाले आहे.

आतकरवाडी, डोणज्यातील सीताबाईचा दरा, थोपटेवाडी, मोरदरी, तसेच आर्वी, नांदोशी गावाच्या हद्दीतील जंगल मोठ्या प्रमाणात जळले आहे. गेल्या वर्षी वणव्यात पाच ते सात टक्के जंगल जळले होते. या वर्षी एप्रिल महिन्यातच ४० टक्के जंगल वणव्यांमुळे संपले आहे. वन विभागाचे अधिकारी, कर्मचारी आणि ग्रामस्थांमध्ये समन्वय नसल्याने या गैरप्रकारांना आळा घालण्यास कोणीही पुढे येण्यास तयार नाही. 'पुढच्या वर्षी गुरांना खाण्यासाठी गवत चांगले यावे, या कारणाने सध्या आगी लावल्या जात आहेत. सिंहगडाला लागून असलेल्या गावांमध्ये वन विभागाने संयुक्त वनव्यवस्थापन समित्यांमार्फत एलपीजी कनेक्शन दिल्यामुळे वृक्षतोडीचे प्रमाण घटले आहे,' अशी माहिती घेरा सिंहगड समितीच्या एका पदाधिकाऱ्याने दिली.

सहायक वनसंरक्षक महेश भावसार यांनी मात्र या माहितीला विरोध दर्शवला. 'गेल्या आठवड्यातच स्थानिक वनाधिकाऱ्यांबरोबर माझी बैठक झाली असून, वणवे टाळण्यासाठी नियोजन केले आहे. सिंहगड परिसराला लागून दोन हजार हेक्टरमध्ये वनक्षेत्र असून, सगळा डोंगराळ भाग आहे. त्यामुळे वणवा लागल्याची माहिती मिळाल्यावरदेखील घटनास्थळी पोहोचण्यासाठी वेळ लागतो. तरीही आमचे सुरक्षारक्षक नियमितपणे गस्त घालत आहेत. मे महिना अधिक दक्षतेचा आहे. त्यामुळे आम्ही सतर्क राहणार आहोत,' असे भावसार यांनी सांगितले.

...

वणव्यांसाठी अगरबत्तीचा वापर

स्थानिक लोक वणवा लावण्यासाठी सध्या अगरबत्तीचा वापर करतात. अगरबत्तीच्या चार-पाच काड्या एकत्र पेटवून त्या झुडपाला अडकवून ठेवतात. अगरबत्ती जशी संपत जाते तसे शेजारचे गवत पेट घेते, साधारणतः तासाभरात वणवा लागतो. गस्त घालणाऱ्या स्थानिक कार्यकर्त्यांना अनेकदा गवतात अशा जळणाऱ्या अगरबत्त्या सापडल्या आहेत.

..........

अतिक्रमणांसाठी वणव्याचा वापर

सिंहगड परिसरातील आगी अतिक्रमणासाठी लावल्या जात नसल्या, तरी मुळशी परिसरात शासकीय आणि खासगी वनक्षेत्रात अतिक्रमण करण्याच्या उद्देशानेच आगी लावल्या जात आहेत. टेकड्यांना लागून असलेल्या वनक्षेत्रात रो-हाउस आणि इतर प्रकल्पांना रान मोकळे करण्याच्या उद्देशाने झाडे जाळली जात असल्याचे स्थानिक लोक सांगत आहेत.

...............

'पंधरा दिवसांत अहवाल द्या'

उत्तराखंडमधील वणव्यांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील वन क्षेत्रात खबरदारीचा उपाय म्हणून वणवा विझवण्यासाठी कोणती अत्याधुनिक यंत्रणा वापरता येईल, याचे सर्वेक्षण करण्याच्या सूचना वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी राज्यातील वनाधिकाऱ्यांना दिल्या आहेत. जागतिक पातळीवर यशस्वी ठरलेल्या अशा प्रकारच्या यंत्रणांची माहिती मिळवून पंधरा दिवसांत अहवाल सादर करावा, असे त्यांनी अधिकाऱ्यांना सांगितले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘आम्रानंदा’ने खुलले चेहरे

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

वंचित विशेष मुलांसाठी निरंजन सेवाभावी संस्थेतर्फे आंबे खाण्याची स्पर्धा शुभारंभ लॉन्स येथे आयोजित करण्यात आली होती. सामाजिक कार्यकर्ते अनराज सोलंकी, रमेश सोलंकी, संध्या झंवर, स्थायी समिती अध्यक्ष बाळासाहेब बोडके, ज्ञानेश्वर मोळक, श्यामसुंदर मुंदडा, शुभारंभ लॉन्सचे आदित्य शर्मा, संस्थेचे जगदीश मुंदडा आदी उपस्थित होते. चिमुकल्यांना विविध भेटवस्तू आणि आकर्षक बक्षिसे देण्यात आली.

स्पर्धेचे यंदा सहावे वर्ष होते. दत्ता जाधव, विजय गायकवाड, मनीषा काळे, आशा लोखंडे यांनी विशेष पारितोषिक पटकावले. माहेर, लोकमंगल, घरटे, बचपन वर्ल्ड, नूतन विद्यालय, आयडेंटिटी फाउंडेशन आदी संस्थांतील २५०पेक्षा अधिक विशेष मुले यामध्ये सहभागी झाली होती. स्पर्धेमध्ये मुलांनी खालेल्या आंब्यांच्या पंधराशे कोयी संस्थेचे कार्यकर्ते राजगड-वेल्हे परिसरात पेरणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


रिंग रोडचे सर्वेक्षण ‘ड्रोन’द्वारे

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

पुणे व पिंपरी-चिंचवडसह ग्रामीण भागातील वाहतुकीची कोंडी सोडवण्यासाठी प्रस्तावित असलेल्या रिंग रोडच्या सर्वेक्षणाचे शेतकऱ्यांच्या विरोधामुळे थांबलेले काम 'ड्रोन'चा वापर करून पूर्ण करण्यास राज्य सरकारने हिरवा कंदील दाखवला आहे. त्यामुळे या मार्गाच्या सर्वेक्षणातील अडथळा दूर होण्यास मदत होणार आहे.

रिंग रोडच्या सर्वेक्षणातील अडथळ्यासंदर्भात अतिरिक्त जिल्हाधिकारी प्रदीप पाटील यांच्याकडे मंगळवारी बैठक झाली. शेतकऱ्यांच्या विरोधामुळे दहा किलोमीटर अंतराचे सर्वेक्षण होऊ शकत नसल्याचा मुद्दा या बैठकीत चर्चिला गेला. त्यात या कामासाठी संबंधित भागातील तहसीलदार व उपविभागीय अधिकारी यांची नियुक्ती करण्याचा निर्णय घेण्यात आला. या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये हे काम पूर्णत्वाला नेण्यात येणार आहे.

शहरामध्ये होणारी वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी रिंग रोड करण्याचा निर्णय २००७मध्ये घेण्यात आला. हा प्रस्ताव आल्यानंतर त्याच्या आखणीवरून मतभिन्नता होती. त्यामुळे ही आखणी किमान चार वेळा बदलावी लागली. त्यावर अंतिम तोडगा निघाल्यानंतर महाराष्ट्र राज्य विकास महामंडळाने रिंग रोडच्या सर्वेक्षणाचे काम निविदेद्वारे एइकॉम एशिया लिमिटेड या कंपनीला दिले. या कंपनीने प्राथमिक सर्वेक्षणाचा अहवाल महामंडळाला सादर केला. परंतु त्यात प्रस्तावित करण्यात आलेल्या रिंग रोडमध्ये अतिक्रमण झाल्याचे निदर्शनास आले. परिणामी, या आखणीनुसार मार्ग करणे शक्य नसल्याचे कळवले होते. त्याऐवजी काही अंतरावरून नव्याने रिंग रोडची आखणी करावी, अशी सूचनाही या कंपनीने केली होती. त्यानुसार सर्वेक्षणाचे काम नव्याने हाती घेण्यात आले होते.

हे काम सुरू असताना खेड आणि अन्य तालुक्यातील शेतकऱ्यांनी या सर्वेक्षणाला विरोध केला. या संदर्भात रस्ते विकास महामंडळ व जिल्हाधिकारी यांची एक बैठक झाली होती. या बैठकीत संबंधित कंपनीने शेतकऱ्यांकडून होणाऱ्या विरोधाकडे लक्ष वेधले होते. तेव्हा पोलिस संरक्षण घेऊन हे काम मार्गी लावावे, अशा सूचना संबंधित कंपनीला करण्यात आली. त्यानुसार पोलिस संरक्षणामध्ये ९६ किलोमीटर लांबीच्या रस्त्याच्या सर्वेक्षणाचे काम झाले आणि दहा किलोमीटर मार्गाचे सर्वेक्षण थांबले. हे काम मार्गी लावण्यासाठी ड्रोनचा वापर करण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी महामंडळाकडून करण्यात आली. त्याला राज्य सरकारने मान्यता दिल्याचे सांगण्यात आले.

बैठक रद्द

रिंग रोडची आखणी, त्यासाठी लागणारा निधी आणि संभाव्य अडचणी या संदर्भात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत मंग‍ळवारी मुंबई बैठक होणार होती. गडकरी मुंबईमध्ये दाखल झाले. परंतु ही बैठक होऊ शकली नाही. याविषयी लवकरच स्वतंत्र बैठक घेण्याचे आश्वासन गडकरी यांच्याकडून देण्यात आल्याचे समजते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पाण्यावरून मनसेचे ‘खळ्ळ खट्याक’

$
0
0







म. टा. प्रतिनिधी, पुणे पुण्याच्या हक्काचे पाणी दौंड व इंदापूर शहराला सोडण्याच्या पालकमंत्र्यांच्या निर्णयाचा रोष महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने सिंचन भवनातील अधीक्षक अभियंत्याच्या कार्यालयाची तोडफोड करून मंगळवारी काढला. मनसेच्या दहा-बारा कार्यकर्त्यांनी अधीक्षक अभियंत्याच्या कार्यालयात शिरून काचेचा मुख्य दरवाजा, कम्प्युटर आणि फर्निचरची मोडतोड केली. या प्रकारामुळे सिंचन भवनामध्ये मोठा गोंधळ उडाला. याप्रकरणी मनसेचे नगरसेवक रवींद्र धंगेकर यांच्यासह १२ जणांवर गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पुणे शहरामध्ये गेली आठ महिने पाण्याची कपात सुरू असताना खडकवासला प्रकल्पातील एक अब्ज घनफूट (टीएमसी) पाणी दौंड व इंदापूरला सोडण्याचा निर्णय पालकमंत्री गिरीश बापट यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत सोमवारी घेण्यात आला. इंदापूरला सोडण्यात येणारे पाणी वहननाशामुळे वाया जाणार असल्याने तेथे पाणी देऊ नये, अशी भूमिका मनसेने घेतली. सकाळी साडेअकराच्या सुमारास मनसेचे नगरसेवक रवींद्र धंगेकर व अन्य दहा-बारा कार्यकर्त्यांनी आपला मोर्चा मंगळवार पेठेतील सिंचन भवनाच्या कार्यालयाकडे नेला. सिंचन भवनात दुसऱ्या मजल्यावर असलेल्या अधीक्षक अभियंता अतुल कपोले यांच्या कार्यालयात मनसेच्या कार्यकर्त्यांनी धडक मारली. कपोले यांच्या कार्यालयाचा मुख्य दरवाजा फोडून कार्यकर्ते आत शिरले आणि त्यांनी संगणक, खुर्च्या व फर्निचरचा अक्षरशः चक्काचूर केला. कार्यालय फोडताना मनसेच्या कार्यकर्त्यांनी पालकमंत्र्यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. 'पुण्याचे पाणी पळवू देणार नाही', 'पालकमंत्री मुर्दाबाद' अशा घोषणा देत त्यांनी पुण्याचे पाणी ग्रामीण भागात देण्यास विरोध केला. कपोले यांच्या कार्यालयावर अचानक हल्ला झाल्याने सिंचन भवनामध्ये मोठा गोंधळ झाला. ही तोडफोड सुरू असताना कपोले हे कार्यालयामध्ये उपस्थित नव्हते. या तोडफोडीनंतर घोषणाबाजी करीत मनसेचे कार्यकर्ते निघून गेले. या प्रकारानंतर समर्थ स्टेशनचे पोलिस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी तोडफोडीमुळे झालेल्या नुकसानीचा पंचनामा केला. त्यानंतर जलसंपदा विभागाचे संतोष अंबडकर यांनी या प्रकरणी पोलिसांमध्ये तक्रार दाखल केली. या तक्रारीवरून मनसेचे नगरसेवक धंगेकर आणि त्यांच्या दहा ते बारा कार्यकर्त्यांवर समर्थ पोलिसांनी गुन्हा दाखल केला. मनसेच्या कार्यकर्त्यांनी सिंचन भवनातील सुरक्षारक्षकांना धमकी दिल्याचेही तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. सार्वजनिक मालमत्ता नुकसान अधिनियम तसेच क्रिमिनल लॉ अमेंडमेंट १९३२ नुसार हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.



मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पुण्याचे पाणी पेटले

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

पुणेकर आणि महापालिकेला अंधारात ठेवून कालव्यातून पाणी सोडण्याच्या निर्णयामुळे मंगळवारी शहरात जोरदार राजकारण पेटले. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी याविरोधात सिंचन भवनात तोडफोड केली. याच विषयावरून महापालिकेची मुख्य सभा तहकूब करून महापौरांसह सर्व पक्षनेत्यांनी जिल्हाधिकारी कार्यालय गाठून या निर्णयास जोरदार विरोध केला. मात्र, पुणेकरांच्या या विरोधाकडे पाठ फिरवून आज, बुधवारी (४ मे) पाणी सोडण्याचा आदेश काढण्यात आला आहे.

धरणांतील पाणीसाठे आटल्यामुळे गेले अनेक महिने पुणेकरांनी दिवसाआड पाणी घेऊन मोठी बचत केली. त्या काळात कालव्यातून मोठ्या प्रमाणात पाणी सोडण्यात आले. मात्र, त्याचा वापर कोठे झाला, हे गुलदस्त्यातच ठेवून पुन्हा दौंड आणि इंदापूरसाठी एक अब्ज घनफूट (टीएमसी) पाणी सोडण्याचा निर्णय पालकमंत्री गिरीश बापट यांनी घेतला. त्याचे जोरदार पडसाद मंगळवारी पुण्यात उमटले. मनसेच्या कार्यकर्त्यांनी सिंचन भवनात अधीक्षक अभियंत्यांच्या कार्यालयात शिरून तोडफोड केली. तसेच महापालिकेतही भाजप वगळता सर्व पक्षांनी तीव्र विरोध केला. या गदारोळात पाणी सोडण्याच्या मुद्द्यावर मुख्य सभा तहकूब झाली आणि महापौरांसह सर्वपक्षीय नेत्यांनी जिल्हाधिकारी सौरव राव यांची भेट घेऊन पाणी सोडण्यास विरोध केला; तसेच स्वयंसेवी संघटनांनीही बापट यांच्यावर टीकास्त्र सोडले. मात्र,त्यानंतरही आजपासून धरणातून पाणी सोडण्याचा निर्णय घेण्यात आला. खडकवासला धरणातून बुधवार सकाळी ४०० क्युसेकने कालव्यात पाणी सोडण्यास सुरुवात होईल आणि त्यानंतर हा वेग टप्प्या-टप्प्याने वाढवून ११०० ते १२०० क्युसेक करण्यात येणार आहे. हे पाणी पहिल्या तीन दिवसांत दौंड शहरामध्ये आणि त्यानंतरच्या तीन दिवसांत इंदापूरमध्ये पोहोचणार आहे.

पाणी फक्त पिण्यासाठी

खडकवासला प्रकल्पातून फक्त पिण्यासाठी पाणी सोडण्यात येणार आहे. शेतीसाठी हे पाणी उचलू नये याची पूर्ण दक्षता घेण्यात येणार आहे. त्यासाठी कालव्यावर सहा दिवस पोलिस बंदोबस्त असणार आहे. खडकवासला धरण ते इंदापूर हे कालव्याचे अंतर साधारणतः २२० किमी आहे. या संपूर्ण कालव्यावरील शेतीपंप काढून टाकण्यात आले आहे. कालव्या लगतच्या भागातील वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे. तसेच दीडशे पोलिस या कालव्यावर गस्त घालणार असून धडक कृती दलाची पाच पथके कालव्यातील पाण्याचे संरक्षण करणार आहेत. पाणी सोडल्यानंतर त्याचे व्हिडीओ रेकॉर्डिंग करण्यात येणार आहे; तसेच तहसीलदार व उपविभागीय दर्जाचे अधिकारी त्यावर देखरेख ठेवणार आहेत. मुठा कालवा गेल्या आठ महिन्यांपासून कोरडा आहे. कालव्याला पाण्याअभावी काही ठिकाणी भेगाही पडलेल्या आहेत. पाणी सोडल्यानंतर कालवा फुटू नये याची दक्षता घेताना मॅकॅनिकल इंजिनीअरची पाच पथके सज्ज ठेवण्यात आली आहेत.

आणखी कपात नाही

पुणे शहराला ३१ जुलैपर्यंत पुरेल एवढा पाणीसाठा खडकवासला प्रकल्पात आरक्षित ठेवण्यात आला आहे. पुण्याच्या पाणीपुरवठ्यामध्ये कोणतीही नवी कपात न करता दौंड व इंदापूर शहराला पिण्यासाठी पाणी सोडण्यात येत आहे. हे पाणी बुधवारी सकाळपासून सोडण्याचे आदेश काढले असल्याचे जिल्हाधिकारी सौरव राव यांनी 'मटा'ला सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पालिका निवडणुकीत चार सदस्यांचा प्रभाग?

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

पुढील वर्षी होणाऱ्या महापालिका निवडणुकांसाठी चार सदस्यांचा एक प्रभाग करण्यावर भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेमध्ये एकमत झाले असून, शक्य तिथे युती करण्यावरही दोन्ही पक्ष अनुकूल असल्याचे समजते. राज्य सरकारमध्ये असूनही विरोधी भूमिका घेणाऱ्या शिवसेनेला त्यासाठी राजी करण्यात यश आल्याचे भाजपच्या गोटातून सांगण्यात येत आहे.
आगामी वर्षाच्या सुरुवातीलाच मुंबई, ठाणे, पुणे, नागपूर, नाशिक, पिंपरी-चिंचवड यांसह राज्यातील दहा महापालिकांच्या निवडणुका होणार आहेत. महापालिकांच्या २०१२ मध्ये झालेल्या निवडणुका द्विसदस्यीय पद्धतीने झाल्या होत्या. केंद्र आणि राज्यात सत्तांतर घडविण्यात यशस्वी ठरल्यानंतर महापालिकांमध्येही सत्ता प्राप्त करण्यासाठी चार सदस्यांचा प्रभाग फायदेशीर ठरू शकतो, अशी चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू होती. त्यासाठी भाजपने विविध पातळ्यांवर चाचपणी केली असून, त्याद्वारे चार सदस्यांचा प्रभागच सर्वाधिक फायदेशीर ठरू शकतो, असा कल पुढे आला आहे. चार सदस्यीय प्रभागाला मित्रपक्ष शिवसेनेसह इतर पक्षांकडूनही विरोध होण्याची शक्यता होती. त्यात, शिवसेनेचे मन वळविण्यात भाजपच्या वरिष्ठ नेत्यांना यश मिळाल्याचे सांगितले जात आहे. तसेच, इतर पक्षही त्याला अनुकूल असल्याने चार सदस्यांचा प्रभाग होण्यातील अडचणी दूर झाल्याचे समजते.

समितीने दिला अहवाल

चार सदस्यीय प्रभाग रचनेसाठी अन्न व नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट यांच्या नेतृत्वाखाली एका समितीची नियुक्ती करण्यात आली होती. या समितीने चार सदस्यांचा प्रभागच अनुकूल राहील, असा अहवाल मंगळवारी दिल्याचे समजते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

प्रदर्शनातील फोटोवरून तरुणीचा शोध

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
हरवलेल्या आणि मृत अनोळखी व्यक्तींचा शोध घेण्याच्या उद्देशाने पुणे ग्रामीण पोलिस मुख्यालयात सुरू असलेल्या फोटोच्या प्रदर्शनाला नागरिक व पोलिस दलाकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. या प्रदर्शनात लावलेल्या फोटोमुळे हरवलेल्यांपैकी एका तरुणीसह चौघांचा शोध लागला आहे.
या प्रदर्शनात ठेवलेल्या फोटोवरून पुणे ग्रामीणमधील हरवलेल्या एका तरुणीची माहिती कुटुंबीयांना मिळाली. सध्या ही तरुणी लोणावळा परिसरात सुखरूप असल्याचे समजल्यानंतर कुटुंबीयाच्या चेहऱ्यावर एक वेगळेच समाधान दिसले. तसेच, पुणे ग्रामीण मधील रांजणगाव व जुन्नर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील तीन हरवलेल्या व्यक्तींचा शोध लागला. पुणे ग्रामीण पोलिसांकडून प्रत्येक पोलिस ठाण्यातील तीन तपासी अंमलदार व हरवलेल्या व्यक्तींच्या नातेवाइकांना प्रदर्शनला भेट देण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. नागरिकांनी प्रदर्शनाला भेट देऊन येथील फोटो आणि इतर माहितीच्या आधारे कोणाची ओळख पटली, तर त्याबाबत पोलिसांना कळवावे, असे आवाहन ग्रामीणचे पोलिस अधीक्षक डॉ. जय जाधव यांनी केले आहे.
हरवलेल्या व मयत झालेल्या व्यक्तींच्या फोटोचे प्रदर्शन पुरंदर बहुउद्देशीय केंद्रात सुरू आहे. आतापर्यंत शंभरपेक्षा जास्त नागरिकांनी प्रदर्शनास भेट दिली आहे. तसेच, इतर जिल्ह्याच्या पोलिस दलातील तपास अधिकाऱ्यांनी प्रदर्शनाला भेट देऊन त्यांच्याकडे नोंद असलेल्या हरवलेल्या व अकस्मात मयतांची माहिती घेतली आहे. या प्रदर्शनात पुणे शहर, अहमदनगर, ठाणे, रायगड, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, पुणे लोहमार्ग, पुणे ग्रामीण, नवी मुंबई आणि सोलापूर शहर येथील २००९ ते मार्च २०१६ दरम्यान हरविलेल्या आणि अनोळखी मयतांचे २५ हजार फोटो व त्यांची माहिती ठेवली आहे. यामध्ये हरवलेले १९ हजार, अकस्मात मयत अनोळखीचे साडेसहा हजार आणि खून झालेले अनोळखी मृतदेहाचे ८० फोटो ठेवण्यात आले आहेत. हे प्रदर्शन आणखी दोन दिवस चालणार असून, जास्तीत जास्त नागरिकांनी भेट द्यावी, असे आवाहन अतिरिक्त पोलिस अधीक्षक राजकुमार शिंदे यांनी केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अंदमानमध्ये मान्सून वेळेत दाखल होणार

$
0
0

मयुरेश प्रभुणे, पुणे

मान्सूनच्या आगमनाबाबत अनेक तर्क-वितर्क लढवण्यात येत असताना पुण्यातील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ट्राॅपिकल मेट्रीओलॉजीने (आयआयटीएम) दिलेल्या अंदाजानुसार मे महिन्याच्या मध्यात मान्सून हिंदी महासागरात सक्रिय होण्याची शक्यता आहे. आयआयटीएमच्या 'क्लायमेट फोरकास्ट सिस्टीम मॉडेल व्हर्जन २'च्या (सीएफएस व्ही २) आगामी २० दिवसांच्या अंदाजानुसार १७ मेच्या आसपास नैऋत्य मोसमी वाऱ्यांचा प्रवाह मान्सूनच्या प्रगतीसाठी अनुकूल होणार असून, २० मेच्या दरम्यान म्हणजेच सर्वसाधारण तारखेला अंदमानच्या समुद्रात मोठ्या पावसाला सुरुवात होण्याची शक्यता आहे.

देशात दुष्काळाच्या झळा तीव्र होत असताना, मान्सूनच्या आगमनाच्या वार्तेकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे. येत्या काही दिवसांत भारतीय हवामानशास्त्र विभागाचा (आयएमडी) मान्सूनच्या आगमनाचा अंदाज येणे अपेक्षित आहे. मात्र, त्याआधीच आयआयटीएमतर्फे आगामी २० दिवसांच्या देण्यात येणाऱ्या पावसाच्या अंदाजामधून हिंदी महासागरात मान्सूनचे वेळेत आगमन होण्याचे संकेत स्पष्टपणे दिसून येत आहेत. दोन मे रोजी जारी झालेल्या अंदाजानुसार दहा मेनंतर भारताच्या दक्षिणेकडे हिंदी महासागरात पावसाचे प्रमाण वाढायला सुरुवात होण्याची शक्यता आहे. मात्र, हिंदी महासागरात नैऋत्य मोसमी वाऱ्यांचा प्रवाह १७ मेपासून अनुकूल होण्याची शक्यता असून, बंगालच्या उपसागरातील मान्सूनची शाखा अपेक्षेप्रमाणे अधिक सक्रिय असणार आहे. २० मेच्या दरम्यान (सर्वसाधारण तारखेच्या दरम्यान) अंदमानच्या समुद्रात मोठ्या पावसाला सुरुवात होणार असून, याच काळात आग्नेय आशियातील पावसाचे प्रमाणही वाढेल. दरम्यान, २० मे च्या आसपास केरळच्या दक्षिण भागात पूर्वमोसमी पावसाच्या सरींना सुरुवात होण्याची शक्यताही आयआयटीएमच्या अंदाजामधून दिसून येत आहे.

आगामी २० दिवसांचा पुढील अंदाज ७ मे रोजी जाहीर होणार असून, त्या वेळी मान्सून आगमनाचे चित्र अधिक स्पष्ट होईल, असे हवामानतज्ज्ञांचे म्हणणे आहे. मान्सून काळात यंदा सरासरीपेक्षा अधिक पावसाची शक्यता सर्वच अंदाजांमधून वर्तवण्यात आली आहे. मात्र, देशभरात त्याचे नेमके प्रमाण कसे राहील याचा प्राथमिक अंदाज अमेरिकेच्या क्लायमेट प्रेडिक्शन सेंटरने (सीपीसी) 'क्लायमेट फोरकास्ट सिस्टीम मॉडेल व्हर्जन २' (सीएफएस व्ही २) याच मॉडेलच्या आधारे दिला आहे. या अंदाजानुसार दुष्काळाच्या तीव्र झळा बसलेल्या भागांमध्ये पावसाचे प्रमाण यंदा सरासरीपेक्षा जास्त असेल. सीपीसीच्या अंदाजानुसार मे ते जुलै या तीन महिन्यांच्या कालावधीत पश्चिम किनारपट्टी आणि मध्य भारताच्या काही भागांत एक ते दोन मिलीमीटर प्रतिदिन या प्रमाणात सरासरीपेक्षा जास्त पावसाची शक्यता आहे. जून ते ऑगस्ट या कालावधीत संपूर्ण पश्चिम किनारपट्टी आणि लगतच्या भागात, तसेच महाराष्ट्र, मध्य प्रदेशचा बहुतांश भाग, उत्तर प्रदेश, बिहार आणि पश्चिम बंगालच्या अनेक भागांत पावसाचे प्रमाण सरासरीपेक्षा एक ते दोन मिलीमीटर प्रतिदिन इतके जास्त राहील. तसेच ऑगस्ट ते ऑक्टोबरमध्ये पश्चिम, पूर्व किनारपट्टी, महाराष्ट्रासह मध्य भारत आणि गंगेच्या मैदानी प्रदेशात पावसाचे प्रमाण सरासरीपेक्षा एक ते दोन मिलीमीटर प्रतिदिन इतके अधिक राहण्याची शक्यता आहे. या अंदाजानुसार देशाच्या इतर भागांत पावसाचे प्रमाण मात्र सरासरीइतके असेल.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पुण्यात पारा ४१ अंशावर

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

पुण्यातील उन्हाळ्याची तीव्रता वाढत असून, मंगळवारी पारा ४१ अंश सेल्सिअसपर्यंत वर गेला होता. पुढील दोन दिवसांत हीच स्थिती कायम राहण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे. पुण्याबरोबरच राज्यातही अनेक ठिकाणी कमाल तापमानात वाढ झाली आहे.

पुण्यात मंगळवारी गेल्या दोन वर्षांतील मे महिन्यातील उच्चांकी ४१ अंश सेल्सिअस (सरासरीपेक्षा ३.३ अंश अधिक) इतके कमाल तर १८.८ अंश सेल्सिअस इतके किमान तापमान नोंदले गेले. कमाल आणि किमान तापमानात तब्बल २२ अंशांचा फरक होता. शहरात मंगळवारी आकाश निरभ्र असल्याने सकाळपासूनच उन्हाचा चटका जाणवत होता. दुपारी गरम हवेच्या झोतांमुळे उन्हाची तीव्रता आणखी वाढली. परिणामी दिवसभर हवेतील उकाडा कायम राहिला. बुधवारी मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे, असे हवामान विभागातर्फे सांगण्यात आले.

राज्यातील सर्वाधिक कमाल तापमानांची नोंद परभणी येथे (४४.५ अंश सेल्सिअस) झाली. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात सर्वत्र कमाल तापमान ४० अंशांपेक्षा अधिक होते. मराठवाड्यात किमान तापमानातही मोठी वाढ झाली होती. बीड येथे ३१ अंश सेल्सिअस तर औरंगाबाद येथे २६.४ अंश सेल्सिअस इतके किमान तापमान नोंदले गेले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


निष्काळजी शिक्षकाचे निलंबन; मुख्याध्यापकाची बदली

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, येरवडा
येरवड्यातील पुणे महानगर पालिकेच्या नेताजी सुभाषचंद्र बोस शाळेत दहावी आणि बारावीची परीक्षा देणाऱ्या १३८ बहिस्थ विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क वेळेत न भरल्याने आणि कामात हलगर्जीपणामुळे केल्याप्रकरणी एका शिक्षकाला निलंबित केले असून मुख्याध्यापकाची बदली करण्यात आली आहे.
अशोक शिवराम सांगडे असे निलंबित केलेल्या शिक्षकाचे नाव आहे, तर कामात हलगर्जीपणा केल्यामुळे शाळेचे मुख्याध्यापक दामोदर उंडे यांची रामवाडी येथील सुभेदार रामजी मालोजी आंबडेकर शाळेत नुकतीच बदली करण्यात आली.
राज्य माध्यमिक आणि उच्च शिक्षण मंडळाची इयत्ता बारावीची परीक्षा १८ फेब्रुवारीपासून, तर दहावीची १ मार्चपासून सुरू होणार होती. दहावी आणि बारावीत नापास झालेल्या विद्यार्थ्यांना अशा वेळी नापास झालेल्या विषयांची परीक्षा देता येते. त्यानुसार बारावीच्या बहिस्थ किंवा रीपिटर परीक्षा देणाऱ्या ६२ आणि दहावीच्या ७६ विद्यार्थ्यांनी नोव्हेंबर महिन्यात परीक्षेचे शुल्क नेताजी सुभाष चंद्र बोस शाळेतील शिक्षक सांगाडे यांच्याकडे जमा केले होते. मात्र, सांगाडे यांनी विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क आणि इतर शुल्क बोर्डाकडे वेळेवर जमाच केले नव्हते.
बारावी परीक्षेची तारीख जाहीर होऊनही विद्यार्थ्यांना शाळेतून परीक्षा प्रवेशपत्र न मिळाल्याने विद्यार्थी हवालदिल झाले होते. त्यामुळे विद्यार्थ्यांनी शाळेतील मुख्याध्यापक दामोदर उंडे यांच्याकडे धाव घेतली होती. त्यानंतर परीक्षाशुल्काची रक्कम सांगडे यांनी भरलेली नसल्याचे उघडकीस आले होते. सांगाडे पंधरा दिवसांपासून शाळेत हजर नसल्याचे पुढे आले होते. ऐन परीक्षेच्या तोंडावर विद्यार्थी परीक्षेपासून वंचित राहू नयेत यासाठी मुख्याध्यापक उंडे यांनी १३८ विद्यार्थ्यांच्या परीक्षाशुल्कापोटी पन्नास हजार रुपये आणि विलंबशुल्क म्हणून वीसपट दंड भरला होता. त्यामुळे शाळेला अकरा लाख रुपयांचा भुर्दंड पडला होता. महापालिकेच्या इतिहासात पहिल्यांदाच परीक्षा शुल्कावर अतिविलंब दंड म्हणून अकरा लाख रुपये भरण्याचा प्रसंग ओढावला होता. याबाबत माध्यमिक विभागाच्या शिक्षणाधिकारी मीनाक्षी राऊत यांनी नोटीस पाठवून शाळेकडून खुलासा मागितला होता. त्यानंतर शिक्षण विभागाकडून सांगडे यांच्यावर निलंबनाची, तर मुख्याध्यापक उंडे यांच्यावर बदलीची कारवाई केली गेली .
...
दहावी आणि बारावीची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क वेळेवर न भरल्याप्रकरणी शाळेला वीस पट दंड भरावा लागला होता. त्यामुळे मुख्याध्यापकांना नोटीस बजाविले होते.त्यानंतर बदलीची कारवाई केली.
- मीनाक्षी राऊत,शिक्षणाधिकारी, माध्यमिक व उच्च माध्यमिक विभाग

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गुन्हेगारांची गय नाही

$
0
0

- परिमंडळ चारच्या हद्दीत मोठ्या प्रमाणवर झोपडपट्टीचा समावेश असल्याने गुन्हेगारी आणि गुन्हेगारांची संख्या अधिक आहे, यावर काय योजना आहे?
बारवकर : शहराच्या पोलिस उपायुक्तपदी प्रथमच काम करीत असल्याने सर्वप्रथम हद्दीतील माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न राहणार आहे. त्यानंतर प्रत्येक पोलिस ठाण्यातील सराईत गुन्हेगारांची यादी माहिती घेऊन कारवाई केली जाईल. सार्वजनिक शांतता भंग करून कायदा हातात घेणाऱ्या कोणाचीही गय केली जाणार नाही.

- पुणे शहरात सोन साखळी चोऱ्या, घरफोड्यांची संख्या वाढत आहे, हे रोखण्यासाठी काय उपाय योजना आखल्या आहेत?
बारवकर : परिसरातील विविध बाजारपेठा, भाजी मार्केट, मॉल, मंगल कार्यालये अशा ठिकाणी स्थानिक पोलिसांकडून गस्त वाढविली जाणार असून, संशयास्पद आढळून येणाऱ्या नागरिकांची चौकशी केली जाईल. महिलांनी देखील विविध कार्यक्रमात अंगावरील दागिने सांभाळून वापरायला हवे. सोनसाखळी चोरांची यादी आणि सीसीटीव्ही कॅमरेच्या मदतीने त्यांच्यावर लक्ष ठेवले जाईल.

- सराईत गुन्हेगारांवर मोक्का, तडीपारीची कारवाई करणार का ?
बारवकर : सार्वजनिक ठिकाणी शांतता भंग करणे, सामन्य नागरिकांना धमकावून पैसे, खंडणी वसूल करणाऱ्या गुन्हेगारांची अजिबात गय केली जाणार नाही. रेकॉर्ड वरील सराईत गुन्हेगारांवर कडक कारवाई करण्यासाठी मोक्का आणि तडीपारीची कारवाई तीव्र करणार आहे. परिमंडळ कार्यालयात अनेक मोक्का आणि तडीपारीची प्रकरणे प्रलंबित आहेत. ती तातडीने मार्गी लावण्याचा प्रयत्न असणार आहे.

- महिला अधिकारी म्हणून महिलांच्या सुरक्षेसाठी काय उपाय योजना करणार आहे ?
बारवकर : विद्यार्थी आणि तरुणीची छेडछाड रोखण्यासाठी परिसरातील सर्व शाळा आणि कॉलेजच्या आवारात आणि बाहेर पोलिसांची गस्त वाढवली जाईल. साध्या वेशातील पोलिस देखील परिसरावर नजर ठेवतील. शाळेच्या बाहेर, मार्केट अथवा रस्त्यावर मुली, महिलांची छेडछाड करताना कोणी आढळून आल्यास त्याच्यांवर कडक कारवाई केली जाईल.

- भंडारा पॅटर्न पुण्यात राबविणार का ?
बारवकर : भंडारा पॅटर्न नक्कीच राबविणार आहे. या पॅटर्नमुळे महिलांना कायद्याची माहिती होते. भंडारा जिल्ह्यात असताना अनेक ज्युनियर आणि सीनियर कॉलेजच्या विद्यार्थिनींना महिला कायदेविषयक प्रशिक्षण, मार्गदर्शन कार्यशाळा घेऊन जनजागृती केली आहे. समाजातील महिलांना स्त्रियांसाठी असणाऱ्या कायद्यांचे ज्ञान मिळणे आवश्यक आहे. त्यामुळे पुण्यात देखील कायदेविषयक कार्यशाळा घेण्याचा प्रयत्न करणार आहे परिसरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी मी नक्कीच प्रयत्नशील राहणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रस्ता रुंदीकरणाचे काम सुरू

$
0
0

नगर रोड बीआरटीवर उर्वरित कामे होणार लवकरच पूर्ण
म. टा. प्रतिनिधी, येरवडा
नगर रोड बीआरटीचे घाईगडबडीत उद्‍घाटन केल्यानंतर आता उर्वरित कामे पूर्ण करण्याची घाई प्रशासनाकडून केली जात आहे. ही कामे नागरिकांच्या सुरक्षेसाठी केली जात असल्याचा दावा पालिकेने केला आहे. या कामांतर्गत वडगांव शेरी, टाटा गार्ड रूम चौकातील संरक्षण विभागाची सीमा भिंत पाडण्यात येणार असून, त्या द्वारे रस्ता रुंदीकरणाचा मार्ग मोकळा करण्यात आला आहे. त्याचप्रमाणे वाहतुकीला अडथळा ठरणारे नगर रोडवरील काही रस्ता दुभाजक बंद करण्यात येणार आहेत.
नगर रोड वर उभारण्यात आलेल्या बहुचर्चित बीआरटी मार्गाचे उद्घाटन २८ एप्रिल रोजी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते झाले. या बीआरटी मार्गावरील अनेक कामे अर्धवट स्थितीत असल्याने हा मार्ग सुरू करण्यास अनेकांनी विरोध दर्शविला होता.
पुरेसे पादचारी मार्ग, पादचाऱ्यांसाठी पूल, भुयारी मार्ग, गैरसोयीच्या ठिकाणी रस्ता दुभाजक आदी गोष्टींमुळे हा रस्ता धोकादायक बनला आहे. सोमवारी बीआरटी मार्गावर चार विविध ठिकाणी झालेल्या अपघातांमध्ये चार जण गंभीर जखमी झाले आहेत. नगर रोड वरील टाटा गार्डरूम चौकातील रस्ता संरक्षण विभागाच्या आडमुठ्या भूमिकेमुळे अरुंद बनला आहे. त्यामुळे चंदननगरमधून पुण्याकडे येणाऱ्या बीआरटी मार्गातील बस चालकांना टाटा चौकात वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागत होते.
यावर तातडीने तोडगा काढण्याची मागणी परिसरातील नागरिकांकडून होत होती. त्यामुळे पालिकेकडून मंगळवारी संरक्षण विभागाची रस्त्याच्या कडेला असणारी सीमा भिंत, सुरक्षा केबिन आणि काही पक्के बांधकाम मदतीने जमीनदोस्त करण्यात आले. रस्ता रुंदीकरणाचे काम गुरुवारपासून अधिक वेगाने सुरू करणार असल्याची माहिती अधीक्षक अभियंता नामदेव बारापात्रे यांनी दिली.
००
टाटा गार्ड चौकातील रस्ता रुंदीकरणाचे सुरू केले आहे. त्यानंतर नगर रोडवरील काही दुभाजक बंद करण्यात येणार आहेत. या नागरिकांचा विरोध असल्याने हे दुभाजक बंद करण्यास अडथळा येत आहे. मात्र, रस्ता सुरक्षेचा विचार लक्षात घेऊन वेळ पडल्यास पोलिसांची मदत घेऊन दुभाजक बंद केले जातील.
- नामदेव बारापात्रे, अधीक्षक अभियंता, पथविभाग, पुणे महापालिका

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘चासकमान’चे अस्तरीकरण रखडलेलेच

$
0
0

ठेकेदारावर मेहरनजर; कामासाठी पाचव्या मुदतवाढीचा प्रस्ताव
म. टा. वृत्तसेवा, राजगुरुनगर
चार वेळा मुदतवाढ आणि कोट्यवधींचा विशेष निधी मिळाल्यानंतरही चासकमान धरणाच्या अस्तरीकरणाचे काम अद्यापही रखडलेलेच आहे. अस्तरीकरणाच्या कामाची चौथी मुदतवाढ संपल्यानंतरही कामात कोणतीही प्रगती न झाल्यामुळे चासकमान पाटबंधारे प्रकल्प विभागाने पाचव्या मुदतवाढीचा प्रस्ताव सरकारकडे पाठविला आहे. यामुळे अस्तरीकरणाचे काम केव्हा पूर्ण होणार असा प्रश्न लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांना पडला आहे.
अस्तरीकरणाच्या कामासाठी दोन वर्षांचा का‍ळ निर्धारित केला गेला होता. निर्धारित काळात काम न झाल्याने या कामासाठी चार वेळा मुदतवाढ देण्यात आली. त्याचप्रमाणे कोट्यवधींचा विशेष निधीही देण्यात आला होता. मात्र, तरीही हे काम रखडल्याने या कामाचा खर्च मोठ्या प्रमाणात वाढला आहे. पाटबंधारे विभागाचे अधिकाऱ्यांनी संबंधित ठेकेदारावर मेहरनजर दाखवल्यानेच अस्तरीकरणाचे काम रेंगाळल्याचा आरोप परिसरातील शेतकऱ्यांनी केला आहे.
गेल्या दहा वर्षात चासकमान डाव्या कालव्याच्या ० ते ७२ किमी इतक्या अंतरातील अस्तरीकरणाच्या कामापैकी फक्त १९ किलोमीटर अस्तरीकरणाचे काम झाले आहे. कामाचा दर्जाही सुमार असल्याचे समोर आले आहे. अनेक ठिकाणी पाण्याची गळती सुरू आहे.
डाव्या कालव्याची लांबी १४४ किमी आहे. पाण्याची गळती रोखण्यासाठी चासकमान धरणाच्या डाव्या कालव्याच्या ० ते ७२ किमी दरम्यानचे अस्तरीकरण व मजबुतीकरणास २००६ मध्ये मंजुरी मिळाली होती. सुरुवातीला सुमारे ५८ कोटी रुपये इतकी प्रशासकीय किंमत असलेल्या या अस्तरीकरणाचे काम ४० टक्के इतक्या वाढीव दराने म्हणजेच ८१ कोटी रुपयांना पी. व्ही. आर प्रोजेक्ट् कंपनीला देण्यात आले होते. या कामासाठी २४ महिन्यांची मुदत देण्यात आली होती. एप्रिल २००८ पर्यंत हे काम पूर्ण करायचे होते. मात्र आठ वर्ष होऊनही संबधित कंपनीने अस्तरीकरणाचे काम पूर्ण केलेले नाही.
कंपनीने अस्तरीकरणाचे काम एकाच वेळी विविध टप्प्यात सुरू केले होते. मात्र, ठेकेदाराने खोटी कारणे सांगून जून २००९मध्ये पहिली मुदतवाढ मागितली होती. त्यानंतरही काम अपूर्ण राहिल्याने जलसंपदा खात्याच्या मुख्य अभियंत्यांनी काही अटी घालून जून २०१०पर्यंतची मुदतवाढ दिली. तसेच २००९-१० मध्ये सुमारे तीन कोटी व २०१०-११ मध्ये पावणेतीन कोटी असा सुमारे पावणेसहा कोटी रुपयांचा विशेष निधी मंजूर करण्यात आला. मात्र, तरीही काम पूर्ण करण्यात ठेकेदाराला यश आले नाही. त्यामुळे २०१२ पर्यंत आणखी दोन वर्षाची मुदतवाढ दिली गेली. या दोन वर्षाच्या अतिरिक्त अवधीतही अस्तरीकरण पूर्ण झाले नाही. पावसाळा व पाण्याचे आवर्तन यांची सांगड घालूनच अस्तरीकरणाचे काम संबधित कंपनीला देण्यात आले होते. कालव्याला सतत पाणी असल्याने काम करता येत नाही असे कारण काम अपूर्ण राहिल्याबद्दल कंपनीने दिले होते, अशी माहिती अधिकृत सूत्रांनी दिली आहे.
..
कामाचा दर्जा निकृष्ट
डाव्या कालव्याच्या ज्या भागाचे अस्तरीकरण झाले आहे, त्या ठिकाणी पाण्याची गळती अद्यापही सुरू असल्याचे निदर्शनास आले आहे. नोव्हेंबर २००८मध्ये तत्कालीन अधीक्षक अभियंता, (पुणे) यांनी या कामाची पाहणी केली होती. त्या वेळी कामाचा दर्जा निकृष्ट असल्याने ते काम ठेकेदाराकडून पुन्हा करून घेण्याचे आदेश दिले होते. असे असूनही केवळ ठेकेदाराच्या फायद्यासाठी त्याला चार मुदतवाढी देण्यात आल्या आहेत.
..
कारवाई का नाही?
काही अधिकारी व राजकारणी यांच्याशी असलेल्या अर्थपूर्ण संबंधामुळेच संबंधित ठेकेदारावर कारवाई होत नसल्याचा आरोप परिसरातील नागरिकांनी केला आहे. निकृष्ट दर्जाचे बांधकाम करूनही मुदतवाढ का दिली गेली याबाबतही प्रश्नचिन्ह आहे.
...
अस्तरीकरणाचे काम रखडलेले काम पुन्हा केव्हा सुरू होईल, ही गोष्ट आमच्या अखत्यारित येत नाही. याबाबत वरिष्ठ पातळीवरून निर्णय घेतले जातात. त्यामुळे याबाबत काही सांगू शकत नाही.
- एस. जी. शहापुरे, सहायक अभियंता, चासकमान धरण प्रकल्प
०००
अस्तरीकरणाच्या कामाचे टप्पे
- चासकमान डाव्या कालव्याची लांबी - १४४ किमी
- पाणीगळती रोखण्यासाठी कालव्याच्या ० ते ७२ किमीचे अस्तरीकरण करण्याचा निर्णय
- पी. व्ही. आर. प्रोजेक्ट प्रा. लिमिटेड कंपनीला हे काम ४० टक्के वाढीव दराने म्हणजेच ८१ कोटींना देण्यात आले.
- कामासाठी २४ महिन्यांची म्हणजे एप्रिल २००८पर्यंत मुदत देण्यात आली होती.
- जून २००९मध्ये पहिली मुदतवाढ
- काम अपूर्ण राहिल्याने काही अटी घालून जून २०१०पर्यंत पुन्हा मुदतवाढ दिली.
- २००९-१० मध्ये सुमारे तीन कोटी व २०१०-११ मध्ये पावणेतीन कोटींचा विशेष निधी मंजूर
- काम अपूर्ण राहिल्याने २०१२ पर्यंत आणखी दोन वर्षाची मुदतवाढ.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दरीपुलाजवळ घडलेल्या विचित्र दुर्घटनेत पाच वाहनांचे नुकसान

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

मुंबई-बेंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर पुणे शहराजवळच्या दरीपुलाजवळ बुधवारी अपघात होऊन रस्त्यावर ऑइल सांडले आणि त्यानंतर तीन वाहनांमध्ये विचित्र अपघात झाला. त्यात दोन ट्रकच्या मध्ये सापडलेल्या टँकरच्या केबिनला आग लागून त्यामध्ये चालकाचा होरपळून मृत्यू झाला. काही वेळाच्या अंतराने झालेल्या दोन अपघातांमध्ये एकूण पाच वाहनांचे नुकसान झाले. महामार्गावर नवले पूल ते दरीपूल या ठिकाणांदरम्यान स्वामिनारायण मंदिराजवळ पहाटे साडेपाच ते साडेसहा वाजण्याच्या दरम्यान हे अपघात झाले.

औरंगजेब खान (२२) असे मृत्यू झालेल्या चालकाचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कोंबड्यांची वाहतूक करणाऱ्या ट्रकला पहाटे साडेपाचच्या सुमारास एका वाहनाने धडक दिली. त्यामुळे रस्त्यावर मोठ्या प्रमाणात ऑइल सांडले होते. अग्निशमन दलाला अपघाताची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी घटनास्थळी येऊन रस्त्यावर माती टाकली. केबिनमध्ये अडकलेल्या चालकाला पोलिसांच्या मदतीने बाहेर काढले. त्यानंतर अग्निशमन दलाचे जवान निघून गेले. कोंबड्यांचा ट्रक क्रेनच्या साह्याने बाजूला काढण्याचे काम सुरू असताना साखरेची पोती घेऊन साताऱ्याकडून मुंबईच्या दिशेने जाणारा भरधाव ट्रक अपघातग्रस्त ट्रकवर आदळणार होता. परंतु ट्रकचालकाने प्रसंगावधान राखून ट्रक बाजूला घेतला. तरीही नियंत्रण सुटल्याने तो डोंगराला जाऊन धडकला. या अपघातात ट्रकचालक जखमी झाला. रस्त्यावरून हा ट्रक बाजूला घेण्याचे काम सुरू असल्याचे दिसल्यामुळे टपाल कार्यालयाच्या वाहतूक करणाऱ्या ट्रकने वेग कमी केला. या गोष्टीचा अंदाज त्याच्या पाठीमागून आलेल्या दुधाच्या टँकरच्या चालकाला आला नाही. त्यामुळे दुधाचा टँकर पुढील ट्रकला जोरात धडकला. त्यानंतर लोखंडाची वाहतूक करणारा कंटेनर दुधाच्या टँकरवर जोराने आदळला. दुधाचा टँकर दोन ट्रकच्या मध्ये अडकल्याने केबीनचे दार लॉक झाले आणि चालकाला बाहेर पडता येत नव्हते. त्याच वेळी या टँकरच्या केबिनला आग लागली. टँकरचालकाने बाहेर पडण्यासाठी धडपड करून मदतीसाठी आक्रोश केला; पण दार लॉक झाल्याने त्याला बाहेर पडता आले नाही. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी आग विझवून चालकाला बाहेर काढले; पण तोपर्यंत त्याचा आगीत होरपळून मृत्यू झाला होता. पोलिसांनी ट्रकचालकाची ओळख पटवली असून, त्याचे नाव औरंगजेब खान असल्याचे सांगितले. या प्रकरणी भारती विद्यापीठ पोलिस अधिक तपास करत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images