Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

‘एसपीव्ही’त अधिकारांवर गदा नको

$
0
0

'स्मार्ट सिटी'बाबत शरद पवार यांची भूमिका

म. टा. प्रतिनिधी, पुणे

स्मार्ट सिटी योजनेच्या अंमलबजावणीसाठी 'स्पेशल पर्पज व्हेइकल'ची (एसपीव्ही) स्थापना करताना महापालिका तसेच लोकप्रतिनिधींच्या अधिकारावर कोणतीही गदा येता कामा नये, अशी स्पष्ट भूमिका मांडून, एसपीव्हीतील लोकप्रतिनिधींचे प्रतिनिधित्व वाढविण्यासाठी केंद्रीय नगरविकासमंत्र्यांशी चर्चा करू, अशी ग्वाही राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी रविवारी दिली. एसपीव्हीमार्फत केल्या जाणाऱ्या सर्व प्रकल्पांची माहिती समजावून घेण्याचा अधिकारही लोकप्रतिनिधींकडेच हवा, असा आग्रहही पवार यांनी धरला.

केंद्र सरकारच्या स्मार्ट सिटी योजनेत पुणे शहराचा देशात दुसरा क्रमांक आला. त्याच्या अंमलबजावणीसाठी पालिकेला एसपीव्हीची स्थापना करणे बंधनकारक आहे. या कंपनीला भाजप वगळता सर्वच राजकीय पक्षांचा विरोध आहे. या कंपनीमुळे पालिकेच्या अधिकारांवर गदा येणार असल्याचा आरोप केला जात आहे. त्यामुळे, स्मार्ट सिटी योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी पालकमंत्री ‌गिरीश बापट यांनी सर्व पक्षांचे आमदार, खासदार, महापौर, पालिकेतील गटनेते यांची बैठक सर्किट हाउस येथे घेतली. माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार, खासदार अनिल ‌शिरोळे, राष्ट्रवादीच्या शहराध्यक्षा खासदार वंदना चव्हाण, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह शहरातील आमदार या बैठकीला उपस्थित होते.

एसपीव्हीमुळे लोकप्रतिनिधींचे अस्तित्व धोक्यात येऊन पालिकेच्या स्वायत्ततेवर बंधने येणार आहेत, अशी भूमिका सर्वच लोकप्र‌तिनिधींनी या बैठकीत मांडली. त्याचा संदर्भ घेऊन, पवार यांनी एसपीव्हीमुळे लोकप्रतिनिधींच्या अधिकारावर कोणतीही गदा येता कामा नये, असे निक्षून सांगितले. या कंपनीमार्फत केल्या जाणाऱ्या कामांची माहिती लोकप्रतिनिधींना दिलीच पाहिजे, अशी सूचनाही त्यांनी केली. एसपीव्हीच्या सध्याच्या रचनेत सहाच लोकप्रतिनिधींना स्थान देण्यात आले आहे. त्याऐवजी आठ लोकप्रतिनिधींना स्थान दिले जावे, या मुद्द्यावर सर्वपक्षीयांचे एकमत झाले. एसपीव्हीबाबतच्या सर्व सूचनांबाबत केंद्रीय नगरविकासमंत्री नायडू यांच्याशी चर्चा करण्याचे संकेतही पवार यांनी दिले. राज्य पातळीवरील अडचणी सोडविण्यासाठी पालकमंत्री बापट यांनी पुढाकार घेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करावी, अशी सूचनाही या बैठकीत करण्यात आली.

पुण्यासाठी नियमबदल अवघड

एसपीव्हीच्या रचनेत आठ लोकप्रतिनिधींचा समावेश करण्याबाबत रविवारच्या बैठकीत आग्रह धरण्यात आला आहे. त्याबाबत, केंद्रीय नगरविकासमंत्र्यांशी चर्चा करण्याची तयारी शरद पवार यांनी दाखविली असली, तरी केवळ पुण्यासाठी केंद्राच्या नियमांमध्ये बदल केला जाण्याची शक्यता धूसर आहे. तसेच, चालू वर्षासाठी केंद्राचे अनुदान मिळविण्यासाठी कंपनीची स्थापना तातडीने होण्याची आवश्यकता आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


पार्टीनंतर तरुणीवर बलात्कार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे/हडपसर

'व्हॅलेंटाइन डे' च्या निमित्ताने फ्लॅटमध्ये आयोजित केलेल्या पार्टीनंतर झोपलेल्या तरुणीवर बलात्कार केल्याची घटना रविवारी पहाटे अमनोरा पार्क परिसरातील सोसायटीमध्ये घडली. या प्रकरणी हडपसर पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. याबाबत संबधीत तरुणीने हडपसर पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी फिरोज महंमद शेख (वय २२, रा. मंगळवार पेठ) याला अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित तरुणी तिच्या तीन मैत्रिणींसह अमनोरा पार्क परिसरातील एका हाय प्रोफाइल सोसायटीत राहते. पीडित तरुणी व तिच्या मैत्रिणी यांनी मगरपट्टा परिसरातील एक जिम जॉइन केली होती. त्या जिममधील प्रशिक्षक आणि त्याचा मित्र शेख या दोघांची या तरुणींशी ओळख झाली. याच ओळखीतून त्यांनी 'व्हॅलेनटाईन डे' च्या दिवशी पार्टी करण्याचे ठरविले. त्यानुसार शनिवारी रात्री जिम प्रशिक्षक आणि त्याचा मित्र शेख तरुणींच्या फ्लॅटवर आले. रात्री उशिरापर्यंत त्यांची पार्टी सुरू होती. पार्टी संपल्यानंतर तीन मुली एका रूममध्ये झोपायला गेल्या. पीडित तरुणी एका रूममध्ये एकटीच झोपली होती.

रात्री उशीर झाल्यावर जिम प्रशिक्षक आणि शेख या दोघांनी तरुणींच्या फ्लॅटवर राहण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर दोघेही हॉलमध्ये झोपले. त्याच वेळी पहाटेच्या सुमारास शेख याने एकट्या झोपलेल्या तरुणीच्या रूममध्ये घुसून तिच्यावर बलात्कार केल्याचे संबंधित तरुणीने फिर्यादीत म्हटले. घटनेनंतर तिने तिचा मित्र व मैत्रिणींना माहिती दिली. त्यानंतर पोलिस नियंत्रण कक्षाला फोन करून घटनेची माहिती देत पोलिस मदतीची मागणी केली. घटनेची माहिती मिळताच हडपसर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पीडित तरुणी मूळची ही कलकत्ता येथील असून तिने एमबीएचे शिक्षण पूर्ण केले आहे. ती सध्या एका मॉलमध्ये असिस्टंट मॅनेजर म्हणून काम करते. तिच्या रूममधील दोघी मैत्रिणी महाविद्यालयीन शिक्षण घेत आहेत, तर एक तरुणी आयटी कंपनीत कामाला आहे. या प्रकरणी सहायक पोलिस निरीक्षक आर. एस. माळी अधिक तपास करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘मी नथुराम...’ नाटकाचा आवाज कायमचा बंद

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

आंदोलने, धमक्या व न्यायालयीन लढाई अशा प्रखर विरोधानंतरही रसिकांच्या गर्दीने हाउसफुल ठरलेल्या 'मी नथुराम गोडसे बोलतोय' या नाटकाला अंतर्गत वादाचा फटका बसला आहे. नाटक बंद पाडण्यासाठी झालेला विरोध झुगारून दिमाखात झालेले प्रयोग नाट्यनिर्माता व प्रमुख अभिनेते यांच्यातील वादामुळेच आता थांबले आहेत. वादामुळे नाटकाचे प्रयोग बंद करण्यात आल्याची घोषणा निर्मात्यांनी केल्याने एक हजार प्रयोगांचे स्वप्न भंगले आहे. तर दुसरीकडे नाटकावर कायमचा 'पडदा' पडल्याचे नाट्यवर्तुळात बोलले जात आहे.

प्रदीप दळवी लिखित व विनय आपटे दिग्दर्शित 'मी नथुराम गोडसे बोलतोय' या नाटकाची निर्मिती माउली प्रॉडक्शनची आहे. हे नाटक १९९७ मध्ये रंगभूमीवर आले. त्यानंतर नाटकाला विरोध होऊ लागल्याने न्यायालयीन लढाई लढावी लागली. उच्च न्यायालय, सर्वोच्च न्यायालयाने नाटकाच्या बाजूने निकाल दिला. त्यानंतरही नाटकाची बस जाळणे, धमक्या असे प्रकार सुरू होते. अशा विरोधाला झुगारून नाटकाचे गेली १४ वर्षे प्रयोग सुरू होते. एक हजार प्रयोगाचे लक्ष ठेवण्यात आले होते, पण त्याआधीच ८१७ प्रयोगानंतर नाटकावर पडदा पडला आहे. 'नाटक करण्यामागचा विचार वेगळा होता. गांधीहत्येचे समर्थन मी किंवा नाटकाने कधी केले नाही. त्या पलीकडचा नथुराम समजून सांगण्याचा हा प्रयत्न होता, पण निर्मात्यांच्या व्यावसायिक दृष्ट‌िकोनामुळे नाटकामध्ये काम करणे अवघड झाले. नाटक हजाराचा टप्पा गाठत असल्याने विद्यार्थ्यांसाठी सवलतीच्या दरात हे प्रयोग व्हावेत आणि नथुरामची भूमिका पोहचावी, असा माझा विचार होता; पण निर्मात्यांना हे मान्य नसल्याने त्यांनी नाटकाचे प्रयोग बंद केले. मला हे दुसऱ्या कलाकारांकडून समजले', अशी भूमिका प्रसिद्ध अभिनेते शरद पोंक्षे यांनी 'मटा'कडे मांडली.

याबाबत निर्माते उदय धुरत यांच्याशी संपर्क केला असता, प्रयोग थांबविण्यात आल्याच्या माहितीला त्यांनी दुजोरा दिला. आत्तापर्यंतचे सर्व प्रयोग शरद पोंक्षे यांनीच केले आहेत. कलाकार बदलण्यासाठी प्रयोग थांबविण्यात आलेले नाहीत. भविष्यात प्रयोग होतील, असे स्पष्टीकरण त्यांनी दिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कारच्या धडकेत तरुणीचा मृत्यू

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, येरवडा दुचाकीला मागून धडक दिल्याने एका कोल्हापूरकर डॉक्टर तरुणीला आपला जीव गमवावा लागल्याची घटना येरवड्यात घडली. पाठीमागून येणाऱ्या कारच्या धडकेत जखमी झालेल्या तरुणीला डोक्याला मार लागल्याने जीव गमवावा लागला. डॉ. कल्पना शंकरराव घोरपडे (वय ३२, सध्या रा. सोमवार पेठ, पुणे, मूळ. रा. गडहिंगल्ज जि.कोल्हापूर) असे अपघातात मृत्यू झालेल्या तरुणीचे नाव आहे. कल्पना ही मागील पाच दिवसांपासून मृत्यूशी झुंज देत होती. अखेरीस सोमवारी सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास उपचारादरम्यान मृत्यू झाला. मागील आठवड्यात गुरुवार ११ फेब्रुवारी रोजी सकाळी साडे नऊच्या सुमारास तिचा नगर रोडवर अपघात झाला होता. या प्रकरणी कारचालक श्रद्धा दिनेश देवयानी (२१, रा. बोटक्लब रोड, पुणे) हिच्यावर येरवडा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. वरीष्ठ पोलिस निरीक्षक संजय पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, कल्पना घरून दुचाकीवरून (एमएच ०९ डीएल ८५४३)कामाला जात असताना येरवड्यातील गुंजन चौक सोडून पुढे गेल्यानंतर नगर रोडवरील एन्फिल्ड बुलेट शोरूमसमोर पाठीमागून येणाऱ्या अल्टो कारने (एमएच १२ सीडी ७८९४) धडक दिल्याने ती जोरात घसरून पडली. कल्पनाच्या डोक्याला जोराचा मार लागल्याने शोरूमच्या काही कर्मचाऱ्यांनी तिला तत्काळ जवळच्या खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल केले. डोक्याला जबर मार लागल्याने मागील पाच दिवसांपासून तिच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू होते. अखेरीस सोमवारी सकाळी नऊच्या सुमारास उपचार सुरू असताना तिचा मृत्यू झाला. कल्पना ही मुळची कोल्हापूरची असून, मागील पाच वर्षांपासून ती पुण्यात राहत होती. तिचे शिक्षण बीएएमएसपर्यंत झाले असून एका खासगी कंपनीत कामाला होती. तिच्या मागे आई, वडील आणि एक भाऊ व बहीण असा परिवार आहे. कल्पनाच्या मूळ गावी अंत्यसंस्कार केले जाणार असल्याची माहिती तिच्या नातेवाइकांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अवैध दारु‘बंदी’साठी प्रस्ताव

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, येरवडा येरवडा भागातील गावठी दारूचे धंदे कायमचे बंद करण्यासाठी येरवडा पोलिसांनी पुढाकार घेतला असून मुंबई दारुबंदी अधिनियमानुसार कार्यवाही करण्यासाठीचा प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठविला आहे. हा प्रस्ताव मान्य झाल्यास दारू विक्री होण्याच्या ठिकाणी चोवीस तास पोलिस बंदोबस्त राहणार असून, या काळात कोणी दारू विक्रीचा प्रयत्न केल्यास त्यांच्याकडून सरकार नियमाप्रमाणे सक्तीने कर वसूल केला जाणार आहे. येरवड्यातील कंजारभाट वस्ती, पांडू लमाण वस्ती, नाईक नगर, कामराज नगर भाग हा गावठी दारू बनवून त्यांची विक्री करण्यासाठी प्रसिद्ध आहे. शहरात कुठेही गावठी दारू नसली तरी या भागात हमखास दारू मिळते. पोलिसांच्या भीतीने या भागात दारूची विक्री लपूनछपून केली जाते. राज्य उत्पादन शुल्क आणि येरवडा पोलिसांकडून वारंवार संबंधित ठिकाणी छापे टाकून व्यावसायिकांविरोधात गुन्हे दाखल केले जातात; पण उदरनिर्वाहाचे दुसरे साधन नसल्यामुळे पुन्हा दारू विक्री केली जाते. यावर कायमचा उपाय शोधण्यासाठी येरवडा पोलिस ठाण्याचे वरीष्ठ पोलिस निरीक्षक संजय पाटील यांनी पुढाकार घेतला आहे. कंजारभाट वस्ती, पांडू लमाण वस्ती, नाईक नगर, कामराज नगरमध्ये दारू विक्री करणाऱ्या महिला आणि व्यावसायिकांना या व्यवसायातून बाहेर काढण्यासाठी समाजातील सुशिक्षित लोक आणि सरकारच्या अधिकाऱ्यांशी चर्चा व बैठक घेण्यात आली. त्यामध्ये निराधार महिला, पुरुष यांचा दारुविक्रीचा पारंपरिक व्यवसाय बंद झाल्यानंतर उपजीविकेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी सरकारकडून विविध योजनांचा लाभ देण्यात येणार आहे. यामध्ये श्रावणबाळ योजना, राज्य निवृत्ती योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्ती अशा विविध योजना मिळवून देण्यासाठी पोलिस सरकारच्या सहकार्याने मदत करणार आहे. येरवडा पोलिसांचा प्रस्ताव सरकारस्तरावर मंजूर झाल्यास दारुविक्री पूर्णपणे बंद होण्यासाठी परिसरात कायमचा आणि चोवीस तास पोलिस बंदोबस्त राहणार आहे. दोन सहायक निरीक्षक, सात पोलिस हवालदार आणि २४ कर्मचारी दिवस-रात्र उपलब्ध राहतील. या दरम्यान जर कोणी दारू बनविताना अथवा विक्री करताना दिसून आल्यास त्यांच्यावर गुन्हे दाखल करून वेळोवेळी सरकार नियमाप्रमाणे सक्तीने कर वसूल केले जाणार आहे. त्यामुळे येरवडा भागातून गावठी दारुविक्री कायमची बंद होण्यास मदत होणार आहे, असे येरवडा पोलिस ठाण्याचे वरीष्ठ पोलिस निरीक्षक संजय पाटील यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पुण्यातील विद्यार्थिनीचा रशियातील आगीत मृत्यू

$
0
0

पुण्यातील विद्यार्थिनीचा रशियातील आगीत मृत्यू

म. टा. प्रतिनिधी, पुणे
रशियामधील स्मोलेन्स्क स्टेट मेडिकल युनिव्हर्सिटीच्या होस्टेलला लागलेल्या आगीत पुण्यातील २२ वर्षीय करिष्मा उदय भोसले या विद्यार्थिनीचा मृत्यू झाला.
लक्ष्मीनगरमधील महाराष्ट्र हाउसिंग बोर्ड कॉलनीमधील रहिवासी असलेली करिष्मा एमबीबीएसच्या तिसऱ्या वर्षाला शिकत होती. रविवारी रात्री या युनिव्हर्सिटीच्या होस्टेलला लागलेल्या आगीत तिचा मृत्यू झाला. करिष्माचे काका, कोंडीराम मालुसरे यांनी सोमवारी तिच्या आठवणींना उजाळा दिला.
'करिष्मा खूप हुशार होती. रशियात एमबीबीएसला गेल्यावरही कॉलेजमध्ये ती पहिल्या तीन विद्यार्थ्यांमध्ये होती. व्हेलेंटाइन डे निमित्ताने तिने आईसाठी पर्स वगैरे खरेदी केली होती. घरच्यांना व्हेलेंटाइनच्या शुभेच्छा देऊन, अभ्यास करून ती झोपली होती. पण रविवारी दुपारी ती गेल्याचा फोन आला अन् तिच्या त्या शुभेच्छा शेवटच्याच ठरल्या...' करिष्माचे काका सांगत होते.
करिष्मा मुकुंदनगरमधील कटारिया हायस्कूलची माजी विद्यार्थिनी होती. दहावी आणि बारावीच्या परीक्षेमध्येही तिने चमकदार कामगिरी नोंदविली होती. डॉक्टर व्हायचे स्वप्न घेऊनच ती रशियाला गेली होती. तिथे एमबीबीएसच्या शिक्षणासाठी तिला स्कॉलरशिपही मिळाली होती. एमबीबीएसच्या आत्तापर्यंतच्या तिन्ही वर्षांमध्ये तिने चमकदार कामगिरी नोंदविल्याची माहिती मालुसरे यांनी दिली. 'व्हेलेंटाइन डेला रात्री उशिरापर्यंत तिने घरच्यांशी गप्पा मारल्या. आईसाठी एक पर्स खरेदी केल्याचे सांगितले. नंतर नेहमीप्रमाणेच रात्री उशिरापर्यंत अभ्यास करणार असल्याचे सांगून कॉल कट केला. रविवारी उशिरापर्यंत आराम करणे शक्य असल्याने ती नेहमी असे करत असे. आता यापुढे मात्र तिच्याशी कोणताही संवाद होणार नाही...' अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या. भोसले कुटुंबीय आता तिच्या पार्थिवाची वाट पाहत आहे.

मुंबईची पूजा कल्लुरही
आगीत मृत्युमुखी पडलेल्या विद्यार्थ्यांमध्ये नवी मुंबईच्या पूजा कल्लुरचाही समावेश आहे. आग लागली तेव्हा पूजा आणि करिष्मा एकाच खोलीत होत्या. आगीमुळे झालेल्या धुरात गुदमरून त्यांचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात येत आहे. पूजाने आपले शिक्षण वाशी येथील फादर अग्नेल हायस्कूल आणि ज्युनिअर कॉलेजमध्ये पूर्ण केले होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

उपनगरीय रेल्वेला ३८० कोटी

$
0
0

उपनगरीय रेल्वेला ३८० कोटी

म. टा. प्रतिनिधी, पुणे
पुणे ते लोणावळा आणि पुणे ते दौंड या उपनगरीय रेल्वेमार्गासाठी ३८० कोटी ४९ लाख रुपयांचा हिस्सा देण्यास पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (पीएमआरडीए) सोमवारी मंजुरी दिली. या रेल्वेमार्गावरील स्थानांतर व पुनर्वसनाच्या कामासाठी पीएमआरडीएच्या नियुक्तीचा प्रस्तावही मान्य करण्यात आला.
या दोन्ही मार्गांवर उपनगरीय रेल्वे सुरू करण्याचा मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशनचा प्रस्ताव आहे. त्यासाठी भूसंपादन वगळता २,३०६ कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. या खर्चाचा ५० टक्के भार केंद्र सरकार व उर्वरित १,१५३ कोटी रुपयांचा खर्च राज्य सरकार उचलणार आहे. या रेल्वेमार्गाच्या उभारणीसाठी राज्य सरकारच्या वतीने पीएमआरडीए, पुणे महापालिका व पिंपरी-चिंचवड महापालिका खर्च करणार आहे. त्यानुसार पीएमआरडीए ३८० कोटी ४९ लाख रुपये, पुणे महापालिका ३९२ कोटी रुपये व पिंपरी-चिंचवड महापालिका ३८० कोटी रुपये देणार आहे.
पुणे ते लोणावळा आणि पुणे ते दौंडदरम्यान अतिरिक्त रेल्वे रूळ टाकण्यात येणार आहेत. पुणे ते लोणावळा दरम्यान ७० किलोमीटर लांबीचे रेल्वे रूळ टाकावे लागणार आहेत; तसेच साधारणतः ५८ हेक्टर जमीन संपादित करावी लागणार आहे.
पीएमआरडीएच्या बैठकीत ३८० कोटी रुपयांचा हिस्सा देण्याचा प्रस्ताव चर्चेला आला. पीएमआरडीएचे अध्यक्ष व पालकमंत्री गिरीश बापट यांनी पीएमआरडीएचा हा हिस्सा देण्यास संमती दिली. रेल्वेमार्गावरील स्थानांतर व पुनर्वसनाचे काम मुंबई नागरी परिवहन प्रकल्पाकडे (एमयूटीपी) आहे. त्याच धर्तीवर स्थानांतर व पुनर्वसनाचे काम करण्यास पीएमआरडीएची नियुक्ती करण्याचा प्रस्तावही बैठकीत मंजूर करण्यात आला.
पीएमआरडीएने आपल्या वाट्याचा हिस्सा देण्याची तयारी दर्शविल्यामुळे या दोन्ही उपनगरीय रेल्वेच्या मार्गाला गती मिळण्यास मदत होणार आहे. पुणे महापालिका व पिंपरी-चिंचवड महापालिकेने त्यांच्या वाट्याचा हिस्सा लवकर दिल्यास उपनगरीय रेल्वेचे काम मार्गी लागणार आहे.
....................

अनधिकृत बांधकामांना पायबंद
पुणे : पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (पीएमआरडीए) कार्यक्षेत्रातील अनधिकृत बांधकामांकडून आकारण्यात येणाऱ्या दंडामध्ये वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. अनधिकृत बांधकामांना पायबंद बसावा, यासाठी दंडाच्या रकमेत वाढ करण्यात आली आहे.
पीएमआरडीएच्या सभेमध्ये अनधिकृत बांधकामांच्या दंडामध्ये वाढ करण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला होता. या प्रस्तावाला चर्चेअंती मंजुरी देण्यात आली आहे. हा प्रस्ताव मंजूर झाल्यामुळे बांधकामांची जोते तपासणी न करणे, चटईक्षेत्राचे उल्लंघन करून बांधकाम करणे; तसेच पूर्णत्वाचा दाखला न घेणे अशा प्रकारांच्या दंडामध्ये वाढ होणार आहे.
ग्रामीण भागाच्या नियोजनबद्ध विकासासाठी पीएमआरडीएची नव्याने स्थापना झाली आहे. या क्षेत्रातील बांधकाम नकाशांना पीएमआरडीएकडून मंजुरी देण्यात येते. बांधकाम मंजुरी मिळाल्यानंतर जोते तपासणी होते. त्यानंतर इमारतींच्या पुढील बांधकामाला परवानगी मिळते. मात्र, अनेक बिल्डर्स जोते तपासणी न करता बांधकाम करतात. तसेच काही बिल्डर्स जोते तपासणी झाल्यानंतर मंजूर चटईक्षेत्रापेक्षा अधिक बांधकाम करतात. बेकायदा बांधकाम केल्यामुळे काही बिल्डर्स पूर्णत्वाचा दाखला घेण्यासाठी टाळाटाळ करतात. पीएमआरडीए अशा अनधिकृत बांधकामांवर दंडाची कारवाई करते. ही दंडाची रक्कम अत्यल्प आहे. त्यामुळे बेकायदा बांधकाम करण्याची प्रवृत्ती वाढते. त्याला पायबंद घालण्यासाठी ही दंडाची रक्कम वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
जोते तपासणीचा दाखला न घेता बांधकाम केल्यास संबंधित बांधकाम व्यावसायिकाकडून रेडी रेकनरच्या दराच्या प्रती चौरस मीटर १५० रुपये दंड आकारण्यात येत होता. यापुढे मात्र एकूण बांधकामावर प्रती चौरस फूट दीडशे रुपये प्रमाणे दंड आकारणी होणार आहे. बांधकाम तडजोड शुल्क आकारणी करताना बांधकाम निवासी असेल, तर रेडी रेकनरमधील बांधकाम दराच्या ७.५ टक्के आणि बिगरनिवासी बांधकामासाठीर दहा टक्के शुल्क आकारले जात होते. त्यात शंभर टक्के वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आलाआहे.
याशिवाय पीएमआरडीएच्या क्षेत्रातील निवासी बांधकामासाठी रेडी रेकनरच्या पंधरा टक्के आणि बिगरनिवासी बांधकामासाठी तीस टक्के दराने शुल्क आकारण्यास मान्यता देण्यात आली आहे. पूर्णत्वाचा दाखला न घेतलेल्या बांधकामांच्या दंडातही वाढ करण्यात आली आहे. यापूर्वी सदनिकेच्या पूर्णत्वाचा दाखला घेण्यासाठी पाच हजार रुपये; तसेच बिगरनिवासी बांधकामाचा दाखला घेण्यासाठी प्रती शंभर चौरस मीटरसाठी एक हजार रुपये शुल्क आकारण्यात येत होते. हा दर आता सदनिकांसाठी रेडिरेकनरमधील बांधकाम दराच्या अडीच टक्के व बिगरनिवासी बांधकामासाठी दहा टक्के प्रमाणे घेण्यात येणार आहे.
......................
पीएमआरडीएचे कार्यालय येरवड्यात
पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (पीएमआरडीए) क्षेत्रातील उद्योगवाढीसाठी परकीय गुंतवणूक विभाग, येरवडा येथे मुख्यालय बांधण्यासाठी राज्य सरकारला १४ कोटी रुपये देण्याबरोबच प्रादेशिक योजनेतील प्रस्तावित रिंगरोडचे विकसन करण्याचा निर्णय पीएमआरडीएच्या बैठकीत सोमवारी घेण्यात आला.
पीएमआरडीएची पाचवी बैठक यशदा येथे पालकमंत्री व पीएमआरडीएचे अध्यक्ष गिरीश बापट यांच्या उपस्थितीत झाली. या बैठकीला महापौर दत्ता धनकवडे, लोणावळ्याचे नगराध्यक्ष अमित गवळी, आळंदीचे रोहिदास तापकीर, सासवडच्या नगराध्यक्षा आनंदीकाकी जगताप, शिरूरच्या नगराध्यक्षा मनिषा गावडे, चाकणच्या नगराध्यक्षा पुष्पा कड, राजगुरूनगरचे नगराध्यक्ष बापूसाहेब थिगळे; तसेच पीएमआरडीएचे सीईओ महेश झगडे, जिल्हाधिकारी सौरभ राव, पिंपरी प्राधिकरणाचे सीईओ सुरेश जाधव आदी उपस्थित होते.
या बैठकीत पीएमआरडीएच्या २०१५-१६ च्या सुधारित व २०१६-१७ या वर्षाच्या अर्थसंकल्पास मंजुरी देण्यात आली. खासगी व थेट परकीय गुंतवणूक विभागाची निर्मिती करण्यासही मान्यता देण्यात आली. या विभागामध्ये तज्ज्ञांची नियुक्ती करण्याची सूचना बापट यांनी या वेळी केली. पुणे प्रादेशिक योजनेतील प्रस्तावित रिंगरोड विकसित करण्यासंदर्भातही बैठकीत चर्चा झाली. हा रिंगरोड रद्द करण्यात यावा, अशी मागणी रस्ते विकास महामंडळाने केली होती; परंतु हा रिंगरोड रद्द झाल्यास विकासाला खीळ बसेल, अशी भीती बैठकीत व्यक्त करण्यात आली. हा रिंगरोड रद्द न करता तो ११० मीटर रूंद करून विकसित करण्याचा निर्णय घेण्यात आला.


मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मद्यपींच्या हल्ल्यात दुकानदाराचा मृत्यू

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पिंपरी

दुकानाच्या दारात लघुशंका करणाऱ्यांना हटकले म्हणून मद्यपी टोळक्याने दोघांना बेदम मारहाण केली. मारहाणीत विकी परमार (२०, रा. डांगे चौक, थेरगाव) जबर जखमी झाला. ताथवडे येथे रविवारी (१४ फेब्रुवारी) सायंकाळी ही घटना घडली होती. सोमवारी पहाटे विकी याचा मृत्यू झाला. या हल्ल्याच्या निषेधार्थ डांगे चौकातील व्यापाऱ्यांनी बंद पाळला. पोलिसांनी या प्रकरणी पाच जणांना अटक केली आहे.

विशाल वाघमारे, दीपक अवतारे, रोहन कोळी, अमोल पवार आणि प्रशांत माने अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. सर्जेराव देवकर, बाबू भोंडवे उर्फ प्रशांत केदारी, संकेत खेंगरे व त्यांचे इतर तीन ते चार साथीदार अद्याप फरारी आहेत. त्यांच्याविरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बंडू नाईकनवरे ताथवडे येथे वॉशिंग सेंटरमध्ये गाडी धुण्याचे काम करतो. विकी परमार हा बंडूच्या वॉशिंग सेंटरच्या शेजारी असलेल्या बिअर शॉपीत काम करतो. बंडू गाडी धूत असताना बाजूला काही महिला उभ्या होत्या. त्याच दरम्यान आरोपी तेथे गेले. महिलांच्या बाजूलाच ते लघुशंका करू लागले. त्यामुळे बंडूने त्यांना हटकले. त्यावरून आरोपींपैकी तिघांनी बंडूच्या डोक्यात बिअरच्या बाटल्या फोडल्या. त्यामुळे तो तसाच पळत जवळील हॉटेलमध्ये गेला. त्यामुळे आरोपी निघून गेले.

त्यानंतर सायंकाळी सातच्या सुमारात आरोपी पुन्हा साथीदारांसह धारदार हत्यार घेऊन तेथे आले. शेजारी उभ्या असणाऱ्या विकीवर त्यांनी हल्ला चढविला. धारदार शस्त्रे, बिअरच्या बाटल्या, काठीच्या मदतीने त्यांनी विकीला बेदम मारहाण केली. यामुळे परिसरात एकच गोंधळ उडाला. दुपारी झालेल्या हल्ल्यात जखमी झालेल्या बंडूला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. त्यानंतर विकीलादेखील हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान विकीचा मृत्यू झाला.

या घटनेमुळे व्यापारी चांगलेच संतप्त झाले. डांगे चौकात व्यापाऱ्यांनी बंद पाळला. विकीचा मृतदेह दुकानासमोर आणून ठेवला. सर्व आरोपींना अटक होत नाही तोपर्यंत मृतदेह घटनास्थळावरून हलविणार नसल्याचा पवित्रा व्यापाऱ्यांनी घेतला. खासदार श्रीरंग बारणे आणि वाकड पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक एन. जे. शेख, हिंजवडी पोलिस ठाण्याचे निरीक्षक अरुण वायकर यांनी व्यापाऱ्यांची समजूत काढल्यावर व्यापाऱ्यांनी विकीचा मृतदेह त्याच्या मूळ गावी राजस्थान येथे पाठविला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


शैक्षणिक प्रयोगांची दखल घ्या

$
0
0

सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांची अपेक्षा

म. टा. प्रतिनिधी, पिंपरी

'भारताची नवी शिक्षणनीती ठरविताना ठिकठिकाणी होणाऱ्या प्रयोगांची दखल घेण्याची गरज आहे,' असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी केले.

चिंचवड येथील क्रांतिवीर चापेकर स्मारक समितीच्या पुनरुत्थान समरसता गुरुकुलमच्या एकादश प्रारंभ सिंहावलोकन महोत्सवाअंतर्गत प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात सोमवारी झालेल्या कार्यक्रमात डॉ. भागवत बोलत होते. शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या डॉ. नरेंद्र जाधव, इंदुमती काटदरे, महेश शर्मा, सुनील देशपांडे, डॉ. प्रभाकर मांडे, रमेश पतंगे, हेमेंद्रभाई शहा, लक्ष्मीबाई गोरडे, शशिकला मेहता तसेच गणेशशास्त्री द्रविड, रवींद्र शर्मा, इंद्रजित उईके, शांतिलाल मुथा यांचा त्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. वामनराव गोगटे लिखित 'अभिनव शैक्षणिक प्रयोग - सिंहावलोकन' या पुस्तकाचे प्रकाशन या वेळी झाले.

पारंपरिक आणि आजची शिक्षण पद्धती याविषयी सरसंघचालकांनी विस्तृत विवेचन केले. ते म्हणाले की,' शिक्षणाचा उद्देश नुसते जगणे नसून, माणसाला माणसारखे जगायला शिकविणे होय. आजच्या शिक्षणातून जगण्याची कला, विजिगिषु, प्रतिभा, संवेदना या गोष्टींबरोबरच आत्मगौरव मिळायला हवा. या पाच गोष्टींच्या माध्यमातून मिळणारे शिक्षण माणसांच्या मुलांची अनिवार्य गरज आहे; मूलभूत हक्क आहे, याची जाणीव ठेवायला हवी. शिक्षणाच्या प्रक्रियेतून बाहेर पडलेला पदवीधर होऊ शकेल. परंतु, तो स्वतःच्या पायावर खंबीरपणे उभा राहील, याविषयीचा आत्मविश्वास निर्माण होणे गरजेचे आहे. सगळ्याच शिक्षण संस्था व्यापारी नाहीत. समाजाविषयी कळकळ असणाऱ्या संस्था अजूनही देशात कार्यरत आहेत. त्यांच्यामार्फत वेगवेगळे प्रयोग होत आहेत. त्याविषयीच्या चिंतनातून मिळालेल्या गोष्टी जमिनीवर पडताळून पाहायला हव्यात. ज्ञानाबरोबरच जगण्यासाठी भाकरी कशी मिळेल, याचा विचार व्हायला हवा.'

कार्यक्रमाचे प्रास्ताविक समितीचे अध्यक्ष गिरीश प्रभुणे यांनी केले. कार्यवाह अँड. सतीश गोरडे यांनी आभार मानले.

फिनलंडचे दिले उदाहरण

डॉ. भागवत म्हणाले, की 'पुढारलेल्या देशांमध्ये फिनलंडचा समावेश होतो. या ठिकाणी स्पर्धा परीक्षेतील मूल्यांकनावर विश्वास ठेवला जात नाही. तरीही तेच यशाच्या शिखरावर असतात. त्या देशात जीवनात उभे राहण्याचे, जीवनसंघर्षात जिंकण्याचे शिक्षण दिले जाते. आठवीपर्यंत मातृभाषेतून शिक्षण दिले जाते. याच अनुषंगाने आपल्या देशातही अनेक प्रयोग होत आहेत. वंचित मुलांना शिक्षणप्रक्रियेत सामावून घेण्याचे प्रयत्न होत आहेत. या कामाची दखल घेऊन त्यातील निष्कर्ष काढून योग्य प्रयत्न व्हावेत. त्यातून आपण जगात मान उंच करून निश्चित खंबीरपणे उभे राहू शकतो.'

'जातीसंस्थेला विकृतीचे ग्रहण'

पिंपरी-चिंचवड शहरातील क्रांतिवीर चापेकर समितीतर्फे चालविल्या जाणाऱ्या पुनरुत्थान समरसता गुरुकुलम् शाळेला डॉ. मोहन भागवत यांनी भेट दिली. 'आपल्या देशाची मूळ संस्कृती जात-पात मानणारी नव्हती. वैदिक काळात व्यवसायांवर जातीची निर्मिती झाली. त्यानंतर जातीसंस्थेला विकृतीचे ग्रहण लागले. आजची जातीव्यवस्था त्याचेच पाप असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. या वेळी डॉ. प्रभाकर मांडे, डॉ. विनय सहस्त्रबुद्धे, रमेश पतंगे, विश्वेश्वरशास्त्री द्रवीड, इंदुमती काटदरे, सुनील देशपांडे, सर्जेराव ठोंबरे, वा.ना. अभ्यंकर, संस्थेचे अध्यक्ष गिरीश प्रभुणे, कार्यवाह अॅड. सतीश गोरडे, सदस्य रवींद्र नामदे, नितीन बारणे, गतिराम भोईर, मिलिंद देशपांडे, संदीप जाधव, दिलीप कंद, प्राधानाचार्य पूनम गुजर व वेग-वेगळ्या क्षेत्रातील तज्ज्ञ उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पिंपरीत जल्लोषाचे वातावरण

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पिंपरी

स्वच्छ आणि सुंदर शहरांच्या यादीत पहिल्या 'टॉप टेन'मध्ये पिंपरी-चिंचवडचा समावेश झाल्याचे केंद्र सरकारकडून जाहीर होताच आनंद व्यक्त करण्यात आला. स्वच्छ भारत मिशन अंतर्गत सर्वेक्षणात देशात नववा आणि महाराष्ट्रातून प्रथम क्रमांक म्हणून शहराची निवड झाली आहे.

केंद्र सरकारतर्फे स्वच्छ आणि सुंदर शहरांच्या यादीत देशात नववा क्रमांक मिळविलेल्या पिंपरी-चिंचवडला दोन हजारपैकी एक हजार ५६४ गुण मिळाले आहेत. तसेच औद्योगिक हबमधील सर्वोत्कृष्ट कामगिरी करणारे शहर म्हणूनही गौरविण्यात आले. या निवड प्रक्रियेसाठी दहा लाखांपेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या सर्व शहरांचा समावेश होता. त्यामध्ये वैयक्तिक शौचालय, सार्वजनिक शौचालय, कचरा व्यवस्थापन या निकषांच्या आधारे गुण देण्यात आले. दोन हजार गुणांपैकी एक हजार गुण महापालिकेच्या स्वच्छताविषयक कामकाजांना, पाचशे गुण शहराच्या पाहणीला आणि पाचशे गुण नागरिकांच्या प्रतिक्रियांना दिले जाणार होते. त्यातील मूल्यांकनानुसार निवड करण्यात आली. याशिवाय महापालिकेने नागरिकांमध्ये जनजागृतीसाठी शहरात ठिकठिकाणी पथनाट्यांचे आयोजन केले होते. शिवाय या अभियानासाठी खेलरत्न आणि अर्जुन पुरस्कार विजेत्या अंजली भागवत यांची ब्रँड अँम्बॅसिडर म्हणून नियुक्ती केली आहे. त्याचाही विचार करण्यात आल्याची असे स्पष्ट करण्यात आले.

हा पुरस्कार केंद्रीय नगरविकास मंत्री एम. व्यंकय्या नायडू यांच्या हस्ते महापौर शकुंतला धराडे, आयुक्त राजीव जाधव यांनी स्वीकारला. या वेळी पक्षनेत्या मंगला कदम, माहिती-तंत्रज्ञान अधिकारी नीळकंठ पोमण उपस्थित होते.

..
स्वच्छतेच्या बाबतीत महाराष्ट्रात प्रथम आणि देशात नववा क्रमांक मिळाला, ही माझ्यासाठी आणि शहरवासीयांसाठी अभिमानाची गोष्ट आहे. हे यश नागरिक, अधिकारी, लोकप्रतिनिधी यांचे आहे. निवड प्रक्रियेसाठी केंद्रीय समिती शहरात आली होती. त्यांनी पाहणी केली. ज्येष्ठ नागरिकांशी संवाद साधला. त्यानंतर शहराला गुण दिले. त्यामुळे पिंपरी-चिंचवड किती स्मार्ट आहे हे सिद्ध झाले आहे. हे यश कायम ठेवून अधिक चांगले काम करण्याचा आमचा प्रयत्न राहील.

- शकुंतला धराडे, महापौर

...

महाराष्ट्रात प्रथम क्रमांक मिळाल्याचा आनंद आहे. या यशामध्ये शहरातील सर्वांचाच वाटा आहे. कारण, शहर स्वच्छ ठेवण्यासाठी राबविलेल्या मोहिमा, होत असलेले प्रयत्न यामध्ये प्रत्येकाने सहभाग घेतला आहे. त्यांच्या प्रयत्नांना यश आले आहे. हा लौकिक कायम ठेवून यापुढील काळातही अधिक जोमाने काम करण्याचा प्रयत्न राहील. तुलना करण्यापेक्षा आपले शहर कसे चांगले राहील, यासाठी प्रत्येक शहरवासियाने प्रयत्न करायला हवेत, हीच अपेक्षा.

- राजीव जाधव, आयुक्त

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

स्वच्छ सर्वेक्षणात पुणे अकरावे

$
0
0

पिंपरी-चिंचवडने पटकाविले नववे स्थान

म. टा. प्रतिनिधी, पुणे

केंद्र सरकारच्या 'स्वच्छ भारत' योजनेअंतर्गत देशातील ७३ मोठ्या शहरांमधील सर्वाधिक स्वच्छ १० शहरांमध्ये पिंपरी-चिंचवडने नववे स्थान पटकाविले आहे. तर, बृहन्मुंबईच्या तुलनेत केवळ एक गुण कमी असल्याने पुण्याला अकराव्या स्थानावर समाधान मानावे लागले आहे. मात्र, गेल्यावर्षीच्या सर्वेक्षणात ३१व्या स्थानावर असलेल्या पुण्याने ११व्या स्थानापर्यंत झेप घेतली आहे.

केंद्रीय नगरविकासमंत्री वेंकय्या नायडू यांनी सर्वेक्षणाचे सविस्तर निकाल सोमवारी जाहीर केले. गेल्या महिन्यात १५ दिवस शहराच्या विविध भागांतील स्वच्छतेचे परीक्षण करण्यासाठी केंद्रीय समितीची स्वतंत्र टीम कार्यरत होती. घनकचरा व्यवस्थापन, स्वच्छता आणि सार्वजनिक व वैयक्तिक शौचालयांची उपलब्धता, अशा विषयांवर सर्वेक्षणात भर देण्यात आला होता. तसेच, हेल्पलाइनच्या माध्यमातूनत थेट नागरिकांचा शहराच्या स्वच्छतेबद्दलचा प्रतिसाद नोंदविण्यात येत होता. पहिल्या दहा शहरांमध्ये पिंपरी-चिंचवड (नवव्या), तर बृहन्मुंबई (दहाव्या) स्थानावर आहे. तर, पुणे अकराव्या स्थानावर आहे. 'कचऱ्याच्या समस्येवर मात करण्यासाठी पुणे महापालिकेने गेल्या काही दिवसांत शहराच्या विविध भागांत छोट्या स्वरूपाचे कचरा प्रक्रिया प्रकल्प उभारले. सार्वजनिक शौचालयांची परिस्थिती आणि उपलब्धता सुधारण्यासाठी सध्या प्रयत्न सुरू असून, वैयक्तिक शौचालये बांधण्याचे काम महापालिकेने हाती घेतले आहे. यामुळे शहराने स्वच्छतेच्या उपाययोजनांबाबत मोठी मजल मारली आहे,' अशी माहिती घनकचरा विभागाचे सहआयुक्त सुरेश जगताप यांनी दिली.


मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शुल्कवाढीचा पीएमपीलाही फटका

$
0
0

शुल्कवाढीचा पीएमपीलाही फटका

म. टा. प्रतिनिधी, पुणे
प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनांच्या परवाना नूतनीकरण शुल्कात करण्यात आलेल्या वाढीचा पुणे महानगर परिवहन महामंडळ (पीएमपी) व राज्य परिवहन महामंडळाला (एसटी) फटका बसणार आहे. पीएमपी व एसटीकडून दिली जाणारी सेवा टप्पे वाहतुकीत मोडत असून, यासाठीच्या परवाना नूतनीकरणाचे शुल्क ४०० रुपयांवरून एक हजार रुपये करण्यात आले आहे. या दोन्ही संस्था तोट्यात आहेत. त्यांच्याकडून एक-एक पैसा जमविण्यासाठी प्रयत्न केले जात असताना, अशा पद्धतीने खर्चाचा भार वाढणे त्यांना परवडणारे नाही.
गृह विभागाने महाराष्ट्र मोटार वाहन नियम १९८९, नियम ७५ मधील परवाना शुल्कात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. परिवहन विभागाने राज्यभरात त्याची अंमलबजावणी करण्यात सुरुवात केली आहे. प्रवासी मोटार वाहनांसाठी नवीन परवाने, परवाना नूतनीकरण, राष्ट्रीय परवाना, पर्यटक परवाना, तात्पुरता परवाना आदींच्या दरात वाढ करण्यात आली आहे, तर वाहन परवाना नूतनीकरणास विलंब झाल्यास दंडाच्या रकमेतही पन्नास पटीने वाढ केली आहे. विविध रिक्षा संघटना, प्रवासी व मालवाहतूकदार संघटनांनी त्या विरोधात आंदोलनाचा इशारा दिला आहे. मात्र, या निर्णयाचा पीएमपी व एसटीलाही तोटा सहन करावा लागणार आहे. या दोन्ही संस्थांच्या प्रत्येकी १२०० बसची नोंदणी पुणे प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडे केली जाते; तसेच या वाहनांनाही काही ठरावीक कालावधीनंतर वाहन परवाना नूतनीकरण करून घेणे बंधनकारक आहे.
पीएमपीच्या मालकीच्या तब्बल १२०० बस आहेत. या बसच्या परवाना नूतनीकरणासाठी यापूर्वी एका बसला ४०० रुपये खर्च येत होता. म्हणजेच बाराशे बससाठी चार लाख ८० हजार रुपये खर्च येत होता. आता नवीन नियमानुसार पीएमपीला १२ लाख रुपये मोजावे लागणार आहेत, तर एसटीच्या पुणे विभागात ११५० बस आहेत. या बसच्या परवाना नूतनीकरणासाठी आता साडेअकरा लाख रुपये मोजावे लागणार आहेत.
प्रवासी मोटार वाहनांसाठी नवीन परवाने, परवाना नूतनीकरण, राष्ट्रीय परवाना, पर्यटक परवाना, तात्पुरता परवाना आदींच्या दरात वाढ करण्यात आल्याने ही वाढ झाल्याचे सांगण्यात येत असले, तरी त्यातून सार्वजनिक वाहतूक व्यवस्थांना वगळण्यात यावे, अशी मागणी या प्रशासकीय यंत्रणांनी केली आहे.


मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘सेट’चे ऑनलाइन फॉर्म भरण्याची प्रक्रिया सुरू

$
0
0

'सेट'चे ऑनलाइन फॉर्म भरण्याची प्रक्रिया सुरू

म. टा. प्रतिनिधी, पुणे
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या सेट विभागातर्फे येत्या २९ मे रोजी ३२ व्या सेट परीक्षेचे महाराष्ट्र आणि गोव्यात आयोजन केले जाणार आहे. या परीक्षेसाठीचे ऑनलाइन फॉर्म भरण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.
या विषयी सेट विभागाने आपल्या अधिकृत वेबसाइटवरून या परीक्षेविषयीची सर्व माहिती जाहीर केली आहे. त्यानुसार मुंबई, पुणे, कोल्हापूर, सोलापूर, नगर, नाशिक, धुळे, जळगाव, औरंगाबाद, नांदेड, अमरावती, नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली आणि पणजी (गोवा) या केंद्रांवरून ही परीक्षा घेतली जाणार आहे. त्यासाठीची सविस्तर माहिती आणि ऑनलाइन अर्ज www.setexam.unipune.ac.in या लिंकवरून उपलब्ध करून देण्यात आली आहे.
उमेदवारांना येत्या ११ मार्चला सायंकाळी सहा वाजेपर्यंत हे ऑनलाइन अर्ज भरता येतील. ऑनलाइन अर्ज भरून ते ऑनलाइनच सादर करणे गरजेचे आहे. उमेदवारांनी त्याची प्रिंट काढून ते स्वतःजवळ ठेवावेत. ही प्रिंट सेट समन्वयक केंद्राकडे वा सेट विभागाकडे पाठविण्याची कोणतीही गरज नाही. परीक्षेसाठी खुल्या गटातील उमेदवारांसाठी ५५० रुपये, तर आरक्षित गटासाठी ४५० रुपये फी भरावी लागणार असल्याचेही या माहितीद्वारे स्पष्ट करण्यात आले आहे.


मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

लोणावळ्यात विद्यार्थ्याची आत्महत्या

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, लोणावळा

लोणावळ्याजवळील कुसगाव बुद्रुक येथील सिंहगड कॉलेजमध्ये इंजिनीअरिंगच्या दुसऱ्या वर्षात शिकणाऱ्या एका विद्यार्थ्याने कॉलेजच्या वसतिगृहातील खोलीत गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना रविवारी रात्री दहा वाजता घडली असून, आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही; मात्र घटना व्हॅलेंटाइन दिनी घडल्याने प्रेमप्रकरणातून घडली असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

रोहित मारुती जाधव (२०, रा. मूळ तासगाव, सांगली) असे आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे. लोणावळा ग्रामीण पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रोहित कुसगाव बुद्रुक येथील सिंहगड एज्युकेशन सोसायटीच्या इंजिनीअरिंग शाखेत शिकत होता. तो कॉलेजमधील सिंधुदुर्ग वसतिगृहातील तिसऱ्या क्रमांकाच्या खोलीत राहत होता. रविवारी रात्री साडेनऊ त्याचे मित्र वाजता जेवणासाठी गेले होते. तो मागेच थांबला आणि त्याने खोलीतील पंख्याच्या हूकला नायलॉन दोरी बांधून गळफास घेऊन आत्महत्या केली. मित्र परत आल्यानंतर त्यांना रोहित लटकलेल्या अवस्थेत दिसला. त्यांनी तात्काळ कॉलेज प्रशासनाला या घटनेची माहिती दिली. त्याचा उपचारापूर्वींच मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली, तेव्हा रोहितने लाल रंगाने खोलीच्या भिंतीवर एका मुलीचे नाव लिहिले असल्याचे पोलिसांना निदर्शनास आले. त्यामुळे पोलिस सर्व शक्यता तपासून पाहत आहेत. या घटनेचा पुढील तपास लोणावळा ग्रामीण पोलिस करत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पाणीपट्टीवाढ किती?

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे शहराच्या सर्व भागांत समान पाणीपुरवठा (२४ * ७) करण्यासाठी पाणीपट्टीत सलग ३० वर्षे वाढ करण्याच्या आयुक्तांच्या प्रस्तावाला आज, मंगळवारी होणाऱ्या सर्वसाधारण सभेत मान्यता मिळणार, की तीव्र विरोधामुळे संभाव्य दरवाढ रद्दच होणार, याबाबत पुणेकरांमध्ये उत्सुकता आहे. राष्ट्रवादी-भाजप हा पालिकेतील नवा 'पॅटर्न' पाणीपट्टी वाढ पूर्ण रद्द करण्याऐवजी मर्यादित ठेवण्यासाठी अनुकूल असल्याने नागरिकांवर बोजा पडण्याची टांगती तलवार कायम आहे. शहरात सर्वत्र २४ तास पाणीपुरवठा करण्यासाठी पाणीपट्टीत पुढील पाच वर्षे १२ ते १५ टक्के आणि त्यानंतर २०४७ पर्यंत पाच टक्के वाढ करण्यास स्थायी समितीने मंजुरी दिली होती. राष्ट्रवादीने भाजपच्या साथीने पुणेकरांवर करवाढ लादल्याचा आरोप करत काँग्रेससह मनसे आणि शिवसेनेनेही त्याविरोधात तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला. राष्ट्रवादी काँग्रेसमध्येच पाणीपट्टी वाढीवरून दोन गट पडले असून, पुणेकरांमध्येही दरवाढीवरून नाराजी पसरली असल्याची सार्वत्रिक भावना आहे. परिणामी, ३० वर्षांच्या करवाढीऐवजी मध्यम मार्ग काढणे शक्य आहे का, याची चाचपणी राष्ट्रवादीने सुरू केली. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, पालकमंत्री गिरीश बापट, महापौर दत्तात्रय धनकवडे, राष्ट्रवादीच्या शहराध्यक्षा वंदना चव्हाण, सभागृहनेते बंडू केमसे, भाजपचे पालिकेतील गटनेते गणेश बीडकर आणि महापालिका आयुक्त कुणाल कुमार यांच्यात रविवारी सायंकाळी उशिरा बैठक झाली. या बैठकीमध्ये राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेतृत्वाने पाणीपट्टीवाढीच्या विरोधातच भूमिका मांडली. मात्र, पालिका आयुक्त कुणाल कुमार यांनी दरवाढ केली नाही, तर समान पाणीपुरवठ्याच्या टेंडरला अपेक्षित प्रतिसाद मिळणार नाही, असा दावा केला. तसेच, सरसकट ३० वर्षे मंजुरी देता येणार नसेल, तर किमान पाच वर्षांसाठी तरी दरवाढ करण्यास मंजुरी द्यावी, असा आग्रह धरला. भाजपच्या नेत्यांनीही आयुक्तांची बाजू लावून धरत, पुणेकरांच्या हितासाठीच ही योजना असल्याने करवाढीशिवाय पर्याय नाही, असे समर्थन केले. अखेरीस, राष्ट्रवादीच्या नेतृत्वाने काहीशा नाखुशीनेच दरवाढीला संमती दिल्याचे समजते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


परभणीच्या सुमंतचे‘आयएफएस’मध्ये यश

$
0
0


पुणे ः परभणी जिल्ह्यातील सुमंत सुभाषराव सोळंके यांनी केंद्रीय लोकसेवा आयोगातर्फे (यूपीएससी) २०१५मध्ये घेण्यात आलेल्या भारतीय वनसेवा परीक्षेमध्ये (आयएफएस) देशात तिसरे येण्याचा बहुमान पटकावला आहे. आयोगाने आपल्या वेबसाइटवरून जाहीर केलेल्या निकालामधून सोळंके यांची ही कामगिरी जाहीर झाली आहे. मूळ परभणी जिल्ह्यातील कुपटा गावचे रहिवासी असलेल्या सुमंत यांनी शालेय जीवनापासूनच उल्लेखनीय कामगिरी नोंदवित उच्च ध्येय समोर ठेवून आपली वाटचाल ठेवली होती. सुरुवातीला जिल्हा परिषदेच्या शाळेमधून मराठी माध्यमातून शिक्षण घेतल्यानंतर शारदा हायस्कूलमधून त्यांनी दहावीपर्यंतचे शिक्षण घेतले. दहावीला ९० टक्के, तर बारावी सायन्सला ९२ टक्के मिळविल्यानंतर त्यांनी सांगलीच्या वालचंद कॉलेजमधून इंजिनीअरिंगचे शिक्षण पूर्ण केले. बी. टेक. पूर्ण केल्यानंतर २०१२ मध्ये त्यांनी एका खासगी कंपनीमध्ये नोकरीला सुरुवात केली. त्यानंतरच्या टप्प्यात त्यांनी स्पर्धा परीक्षांची तयारी सुरू केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शहीद सूर्यवंशींना मानवंदना

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे जगातील सर्वांत उंच युद्धभूमी असलेल्या सियाचिनमध्ये सेवा बजावताना शहीद झालेल्या सुनील सूर्यवंशी यांना सोमवारी लष्करातर्फे पुण्यात मानवंदना देण्यात आली. 'नॅशनल वॉर मेमोरिअल' येथे मानवंदना दिल्यानंतर सजवलेल्या ट्रकमधून त्यांचे पार्थिव साताऱ्याला रवाना करण्यात आले. मंगळवारी माण तालुक्यातील त्यांच्या मूळ गावी सूर्यवंशी यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहेत. सियाचिन येथील लष्करी तळावर तीन फेब्रुवारी रोजी पहाटे झालेल्या हिमस्खलनामुळे लष्कराचे १० जवान बर्फाच्या ढिगाऱ्याखाली गाडले गेले. त्यात सूर्यवंशी यांचा समावेश होता. हवामान अनुकूल नसल्याने त्यांचे पार्थिव खाली आणणे शक्य झाले नव्हते. अखेरीस रविवारी त्यांचे पार्थिव लेह येथे आणण्यात आले. सोमवारी नवी दिल्ली व तेथून खास विमानाने सोमवारी सायंकाळी त्यांचे पार्थिव लोहगाव विमानतळावर आणण्यात आले. त्यानंतर 'नॅशनल वॉर मेमोरिअल' येथे त्यांना लष्करी इतमामात मानवंदना देण्यात आली. लष्कराच्या दक्षिण मुख्यालयाच्या प्रमुखांतर्फे मेजर जनरल दीपक कालरा, दक्षिण महाराष्ट्र सब एरियाचे प्रमुख ब्रिगेडिअर ए. के. त्यागी, ४१० फिल्ड अॅम्ब्युलन्सतर्फे नायब सुभेदार भवर, तहसीलदार दशरथ काळे, पोलिस उपायुक्त सुधीर हिरेमठ, ब्रिगेडिअर अनुराग भसीन आदींनी पार्थिवावर पुष्पचक्र अर्पण करून आदरांजली वाहिली.

मितभाषी आणि मनमिळाऊ

सूर्यवंशी हे लष्करात शिपाई-नर्सिंग असिस्टंट म्हणून कार्यरत होते. सूर्यवंशी यांचा जन्म २५ मे १९९१ रोजी सातारा जिल्ह्यातील मसकरवाडी येथे झाला. दहिवडी येथून शालेय शिक्षण पूर्ण केल्यानंतर सायन्सची आवड असलेल्या सूर्यवंशी यांची ३० सप्टेंबर २०१० रोजी लष्कराच्या मेडिकल कोअरमध्ये असिस्टंट म्हणून निवड झाली. आर्मी मेडिकल कोअर सेंटर अँड कॉलेजमधील प्राथमिक प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर ९ एप्रिल २०११ रोजी त्यांची पहिली नेमणूक लष्कराच्या पूर्व मुख्यालयाच्या कमांड हॉस्पिटलमध्ये झाली होती. त्यानंतर शिपाई नर्सिंग असिस्टंट म्हणून २९ जून २०१३ मध्ये ते ४१० फिल्ड हॉस्पिटलमध्ये कायम पदावर रूजू झाले. ऑपरेशन मेघदूत दरम्यान त्यांनी मेडिकल इन्स्पेक्शन रूमची जबाबदारी समर्थपणे सांभाळली होती. मितभाषी, मनमिळाऊ, उमद्या स्वभावाचे सूर्यवंशी आपल्या तुकडीत लोकप्रिय होते. विविध क्रीडाप्रकार आणि सांस्कृतिक उपक्रमातही ते हिरिरीने सहभाहगी होत. त्यांच्या मागे आई-वडिल,पत्नी आणि मुलगी असा परिवार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आखाती देशांतील तरुणांकडे लक्ष

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे पुणे, दिल्लीसह भारतातील प्रमुख शहरांमध्ये शिक्षण; तसेच व्यवसायाच्या निमित्ताने आलेल्या आखाती देशांतील काही तरुणांवर गुप्तचर यंत्रणांनी आपले लक्ष केंद्रीत केले आहे. या तरुणांच्या हालचाली संशयित असल्याचा अहवाल अमेरिकेच्या गुप्तचर यंत्रणेकडून मिळाल्यानंतर स्थानिक गुप्तचर यंत्रणा खडबडून जाग्या झाल्या आहेत. पुणे पोलिस आणि गुप्तचर यंत्रणेने एका विद्यार्थ्याची नुकत्याच सखोल चौकशी केली आहे. या विद्यार्थ्याचा लॅपटॉप आणि त्याच्या हालचाली तपासल्या जात आहेत. हा विद्यार्थी आखाती देशातील असून तो उच्च शिक्षणासाठी भारतात आला आहे. अमे​रिकन गुप्तचर यंत्रणेने सोशल मीडिया; तसेच ​'सायबर सर्व्हेलन्स'च्या माध्यमातून भारतात घडणाऱ्या काही घटनांची माहिती गुप्तचर यंत्रणेला दिली आहे. त्या माध्यमातून पुणे, दिल्लीसह इतर काही शहरांतील संशयितांवर लक्ष ठेवण्यात येत आहे. या परदेशी तरुणांना पुन्हा त्यांच्या देशात पाठवायचे,की त्यांच्यावर कारवाई करायची, याबाबत विचारविनमय करण्यात येत आहे. पुण्यात चौकशी करण्यात आलेला तरुण हा एका वर्षापासून उच्च शिक्षणासाठी आलेला आहे. गुप्तचर यंत्रणा आणि पोलिसांनी त्याची तीन दिवस कसून चौकशी केली. या तरुणाचा लॅपटॉप, त्याच्याशी संबंधित इतर ​विद्यार्थी, मित्र तसेच इतर राज्यांत शिक्षण घेणाऱ्या संबंधितांबाबत माहिती घेण्यात आली आहे. भारतातील 'इस्लामिक स्टेट'चे (आयएस) आकर्षण वाढल्यानंतर यंत्रणांकडून प्रत्येक संशयित हालचाल तपासली जात आहे. त्याच माध्यमातून महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथक (एटीएस), राष्ट्रीय तपास यंत्रणा (एनआयए) आणि दिल्ली पोलिसांनी देशभरात अनेक ठिकाणी छापे घालून संश​यितांची धरपकड केली आहे. दिल्ली पोलिसांनी 'अल-कायदा'शी संबंधित दहशतवाद्यांना गजाआड केले आहे. या अटक करण्यात आलेल्या दहशतवाद्यांकडून अनेक संशयितांबद्दल माहिती मिळवण्यात येत आहे. त्याशिवाय इतर देशातील गुप्तचर यंत्रणांही भारताला गोपनीय माहिती पुरवत आहेत. या पार्श्वभूमीवर आखाती देशातील संशयितांवर यंत्रणांनी आपले लक्ष्य केंद्रीत केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

एक हजार कोटींचा टप्पा पार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे नागरिकांना त्यांच्या मिळकत कराची माहिती एसएमएसच्या माध्यमातून देणे, क्षेत्रिय कार्यालयांसह विविध बँकांमध्ये मिळकत कर भरण्याची सोय उपलब्ध करून देणे, थकबाकी वसुलीसाठी राबविण्यात आलेली अभय योजना आणि त्याला नागरिकांनी दिलेला मोठा प्रतिसाद यांमुळे गेल्या दहा महिन्यांत एक हजार कोटी रुपयांचा टप्पा मिळकतकर विभागाने ओलांडला आहे. वेगवेगळ्या माध्यमातून नागरिकांनी भरलेला सुमारे एक हजार कोटी रुपयांचा महसूल पालिकेच्या तिजोरीत जमा झाला आहे. महापालिकेला मिळकत करातून मोठ्या प्रमाणात उत्पन्न मिळावे, यासाठी विशेष आराखडा मिळकत कर विभागाने तयार केला आहे. महापालिका आयुक्त यांच्या पुढाकारातून हा आराखडा तयार करण्यात आला असून नागरिकांना आपल्या घराजवळच मिळकत कर भरता यावा, यासाठी केंद्रांचे विकेंद्रीकरण करण्यात‌ आले आहे. शहरातील पंधरा क्षेत्रिय कार्यालयांमध्ये मिळकत कर भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्याबरोबरच अनेक बँका, नागरिक सुविधा केंद्र यांच्यामध्ये ही सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. तसेच, ऑनलाइन पद्धतीनेही मिळकतकर भरण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे. शहरात सर्वसाधारण मिळकत कर भरणाऱ्यांची संख्या आठ लाख इतकी आहे. या सर्व मिळकतदारांचे मोबाइल क्रमांक घेऊन त्यांना दिलेल्या मुदतीत टॅक्स भरावा, असे एसएमएस करण्यात आले. मोबाइलच्या माध्यमातून मिळकत कराची रक्कम किती आहे याची माहिती देण्यात आली. मिळकतकराची थकबाकी वसुल करण्यासाठी पालिकेने सुरू केलेल्या अभय योजनेच्या माध्यमातून एका महिन्यात तब्बल १८५ कोटी रुपयांचा महसूल पालिकेने गोळा केल्याचे मिळकतकर विभागाचे प्रमुख उपायुक्त सुहास मापारी यांनी सांगितले. या योजनेला नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळत असल्याने या योजनेची मुदत २९ फेब्रुवारीपर्यंत वाढविण्यात आली आहे. महापालिकेने केलेल्या जनजागृतीमुळे गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा मिळकत कर भरणाऱ्यांची संख्या एक लाखाने वाढल्याचे मापारी यांनी स्पष्ट केले. गेल्या वर्षी म्हणजे २०१४-१५ या वर्षात ९१५ कोटी रुपयांच्या करसंकलनाचे उद्दिष्ट विभागाने साध्य केले होते. तर २०१५-१६ या वर्षासाठी १२०४ कोटी रुपयांचे उद्दिष्ट आहे. मिळकतकर विभागाकडे या वर्षी १०३७ कोटी रुपयेच जमा होतील, असा प्रशासनाचा सुरवातीचा अंदाज होता. प्रत्यक्षात मिळकतकर विभागाने थकबाकी वसुलीवर लक्ष केंद्रित केले. तसेच, अभय योजनेचाही प्रचार आणि प्रसार चांगला केल्याने महापालिकेच्या तिजोरीत एक हजार कोटी १० लाख रुपये जमा झाल्याचे त्यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दरोड्याच्या घटनेतील ११ लाखांचा माल जप्त

$
0
0



म. टा. प्रतिनिधी, पुणे शुक्रवार पेठेतील कुरिअर कंपनीच्या कार्यालयावर दरोडा टाकून रोकड लुटणाऱ्या दरोडेखोरांकडून अकरा लाख रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. या दरोड्याच्या गुन्ह्यात ३६ लाख रुपयांची रोकड लुटल्याचे समोर आले आहे. दरोड्यामध्ये कंपनीच्या कार्यालयात काम करणाऱ्या दोघांचा समावेश असून याप्रकरणी सहा जणांस अटक केली आहे. आंबादास तायप्पा पवार (वय २५, रा. मु.पो. चिखली, ता. इंदापूर), अजित उर्फ समीर दादासाहेब चांदगुडे (वय २५, रा. तांदुळवाडी रोड, ता. बारामती), सचिन ज्ञानदेव जाधव (वय २७, रा. मु.पो. जोगवडी, ता. बारामती), किरण राजेंद्र पिसाळ (वय १९, रा. तांदुळवाडी रोड, बारामती), संभाजी रामदास भोसले (वय ३५, रा. मु.पो. जोगवडी, ता. बारामती), विठ्ठल अनिल जाधव (रा. मु.पो. सोनगाव, ता. बारामती) आणि बापु रामदास मळेकर (रा. मु.पो. सोनगाव, ता. बारामती) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत, अशी माहिती गुन्हे शाखेचे अतिरिक्त पोलिस आयुक्त सी. एच. वाकडे व उपायुक्त पी. आर. पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली. गुन्हे शाखेच्या युनिट तीनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सिताराम मोरे आणि त्यांच्या पथकाने ८ फेब्रुवारी रोजी अंबादास पवार आणि त्याच्या दोन साथीदारांना बेकायदा पिस्तुले बाळगल्याप्रकरणी अटक केली होती. त्यांच्याकडून पाच पिस्तुले आणि सात जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली होती. या प्रकरणाचा तपास करीत असताना अंबादासने त्याच्या इतर साथीदारांच्या मदतीने शुक्रवार पेठेतील एका कुरिअर कंपनीच्या कार्यालयावर दरोडा टाकून मोठया प्रमाणात रोकड लुटल्याची माहिती समोर आली. दरम्यान, आंबादासच्या इतर साथीदारांना खडक पोलिसांनी अटक केली. खडक पोलिसांना आरोपी उपायुक्त माहिती देत नव्हते म्हणून त्यांना गुन्हे शाखेच्या ताब्यात देण्यात आले. गुन्हे शाखेच्या पोलिसांनी तपास केल्यानंतर आरोपींनी लुटलेल्या रकमेची वाटणी करून घेतल्याचे समोर आले. त्या पैशातून काही दागिने खरेदी केल्याचे सांगितले. तर पाच लाख रुपये अंबादासकडे ठेवल्याचे सांगितले. आरोपींनी खरेदी केलेले २८४ ग्रॅम सोन्याचे दागिने आणि तीन लाख ३६ हजार रुपये असा एकूण ११ लाख ७४ हजार रूपयांचा ऐवज जप्त करण्यात आला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images