Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

पुण्‍यात हेल्मेटसक्ती राहणारच

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

राजकीय साठमारीतून पुणेकरांच्या माथी मारली गेलेली हेल्मेटसक्ती यापुढच्या काळात आहे तशीच कायम राहणार असल्याचे रविवारी स्पष्ट झाले. परिवहनमंत्र्यांनी या निर्णयाची जबाबदारी थेट मुख्यमंत्र्यांवर ढकलून हा निर्णय पूर्ण राज्यासाठी घेण्यात आल्याचे स्पष्ट करताना त्यामध्ये कोणतीच सवलत देणे शक्य नसल्याचे स्पष्ट केले. त्यामुळे आता ही सक्ती येत्या काळात कायम राहणार आहे. पुणे पोलिस याच्या अंमलबजावणीमध्ये किती रस घेतात यावरच आता या कारवाईचे स्वरूप अवलंबून असेल.

राज्यातील विविध महापालिका आणि नगरपालिका क्षेत्रांमध्ये हेल्मेटसक्ती जाहीर करून राज्याच्या परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी खळबळ उडवून दिली होती. हायकोर्टामध्ये सुरू असलेल्या याचिकांच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला असल्याचे स्पष्टीकरण त्यांनी दिले असले तरीही त्यामागे भाजप आणि शिवसेना या दोन पक्षातील संघर्षही कारणीभूत होता. पुण्यामध्ये या कारवाईच्या विरोधात पडसाद उमटल्यानंतर या दोन्ही पक्षांच्या स्थानिक नेत्यांमध्येच यावरून कलगीतुरा रंगला होता. एकूणच ही कारवाई अंगलट येणार हे लक्षात आल्यानंतर शिवसेनेच्या नेत्यांनी रविवारी तातडीने रावते यांना पुण्यात पाचारण करून या कारवाईतून पुणेकरांची सुटका करण्यासाठी आपण प्रयत्नशील असल्याचे दाखविले. त्यांच्या आग्रहावरून रावते पुण्यात आले; पण त्यांनी हा निर्णय फक्त माझा नाही तर थेट मुख्यमंत्र्यांनाही याबाबत पुरेशी माहिती असल्याचे सांगून, याबाबत कोणतीही घोषणा करण्यास नकार दिला. कोणतीही सवलत तातडीने देणे शक्य नसल्याने फार तर याबाबत सचिवांशी चर्चा करू, एवढे आश्वासन रावते यांनी पुणेकरांना दिले.

या बैठकीवरूनही भाजपचे पालकमंत्री गिरीश बापट, खासदार अनिल शिरोळे यांच्यामध्ये संगीत मानापमान रंगले. अशी कारवाई करताना पोलिसांनी मला विश्वासातच घेतले नाही, असे हास्यास्पद स्पष्टीकरण देताना बापट यांनी आपल्याला या निर्णयापासून दूर ठेवणे पसंत केले. शिरोळे यांनीही थेट विरोधात भूमिका घेतल्यानंतर रावते यांनी थेट त्यांना कायद्यात सुधारणा करण्यासाठी आवश्यक विधेयक मांडण्याचा सल्ला देऊन त्यांची बोळवण केली. शनिवारी रावते यांचा राजीनामा मागणाऱ्या मेधा कुलकर्णी यांनाही रावते यांनी शालजोडीतले आहेर देत, आपल्या भूमिकेवर आपण ठाम आहोत हेच दाखवून दिले. त्यामुळे आता ही कारवाई किती सक्तीने करायची याची सर्वस्वी जबाबदारी पुणे पोलिसांवर येऊन पडली आहे.

मते देताना डोके नव्हते का?

लोकसभा व विधानसभा निवडणुकीत पुणेकरांनी शंभर टक्के यश दिलेल्या भाजपला हेल्मेटसक्तीचा हा झटका जोरात बसणार असल्याचीच चिन्हे आहेत. भाजपच्या नेत्यांनाही ते जाणवले असून त्यातून आता मार्ग निघू शकत नसल्याने त्यांची अवस्था 'इकडे आड अन् तिकडे विहीर' अशी झाली आहे. त्यातच सोशल मीडियावर भाजपला मत देताना डोके वापरले असते, तर आज हेल्मेट घालण्याची वेळ आली नसती, येथपासून पुणेरी मेसेज फिरू लागल्यानंतर भाजपचे नेतृत्व चांगलेच अस्वस्थ झाले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


जलपर्णीमुळे डासांचा त्रास

$
0
0

म. टा. प्रतिनिधी खडकी
पवना आणि मुळा नदीमध्ये वाढलेल्या जलपर्णीमुळे या भागात डास वाढले आहेत. पुणे, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका आणि खडकी कँटोन्मेंट बोर्डाच्या हद्दीत राहणाऱ्या नागरिकांना या डासांचा त्रास वाढला आहे.
पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या हद्दीतील दापोडी, सांगवी, बोपखेल, पुणे महापालिका हद्दीतील औंध, बोपोडी, बोपोडी गावठाण, तसेच खडकी कँटोन्मेंट परिसर हे पवना आणि मुळा नदीकाठावर वसलेली गाव आहेत. या दोन्ही नद्या सध्या जलपर्णीने व्यापल्या आहेत. संपूर्ण नदीपात्र जलपर्णीमुळे हिरवेगार झाले आहे. या जलपर्णीमुळे नदीपात्रात मोठ्या प्रमाणात डासांची पैदास वाढत आहे. त्यामुळे डासांपासून होणाऱ्या आजारांचे प्रमाण या परिसरात वाढले आहे. अनेक हॉस्पिटलमध्ये डेंगी, मलेरिया, हिवतापाच्या पेशंटची संख्या वाढली आहे.

पालिकांमध्ये वाद

नदीपात्रातील जलपर्णी कोणी काढायच्या यावरून दोन्ही महापालिकांमध्ये वाद सुरू आहे. हा वाद गेल्या अनेक वर्षांपासून असला तरी या दोन्ही महापालिकांनी गेल्या दहा वर्षांत नदीतील जलपर्णी काढण्यासाठी लाखो रुपये खर्च केले आहेत. मात्र, नागरिकांनी आवाज उठवल्यानंतर प्रशासनाला जाग येत असल्याचे चित्र आहे.

पालिकेचा पैसा पाण्यात

नदीपात्रात जलपर्णी वाढण्यास सुरवात झाल्याबरोबर त्या काढण्यापेक्षा, जलपर्णी पुर्णपणे वाढेपर्यंत पालिका वाट पाहते. त्यानंतर जलपर्णी काढण्यासाठी निविदा काढल्या जातात. या प्रक्रियेला मे महिना उजाडतो आणि मे महिन्याच्या अखेरपर्यंत जलपर्णी वाढण्यास सुरुवात होते. मात्र, त्यानंतर काही काळाने पावसाला सुरवात होते आणि ती सर्व जलपर्णी वाहून पुढे जाते. या सर्व प्रकारामुळे पालिकेने केलेला सर्व खर्च पाण्यातच जातो, असे या परिसरातील नागरिकांनी सांगतात. दरम्यान, खडकी कँटोन्मेंट बोर्डाने जलपर्णी काढण्यास सुरुवात केली आहे. यासाठी निविदा काढली असून, दहा कर्मचारी एका जेसीबीद्वारे काम केले जात आहे, अशी माहिती बोर्डाचे आरोग्य अधीक्षक विलास खांदोडे यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘भुजबळ कंपनीनंतर तटकरे, पवारांचा नंबर’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, लोणावळा
'युती शासनाने राबविलेल्या जलयुक्त शिवार योजनेच्या माध्यमातून राज्यात २४ टीएमसी पाणी अडविले आहे. मात्र, काँग्रेस व राष्ट्रवादी आघाडी सरकार १५ वर्षांत हजारो कोटी रुपये खर्चून एक टीएमसी पाणी अडवू शकले नाही. भ्रष्टाचारामुळे भुजबळ कंपनी जेलची हवा खात असून, अशोकराव मार्गावर आहेत. त्यानंतर लवकरच सुनील तटकरे आणि अजित पवारांचा नंबर आहे,' अशी टीका सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग राज्यमंत्री दिलीप कांबळे यांनी केली.

लोणावळा नगरपरिषदेच्या वतीने आयोजित भांगरवाडी ते बाजारपेठ प्रभागातील विविध कामांच्या भूमिपूजन व उद्घाटनप्रसंगी कांबळे बोलत होते. या वेळी माजी आमदार दिगंबर भेगडे, आरपीआयचे जिल्हाध्यक्ष सूर्यकांत वाघमारे, मुख्याधिकारी गणेश शेटे, माजी नगराध्यक्षा सुरेखा जाधव, नगरसेवक श्रीधर पुजारी, सुनील इंगूळकर, जयश्री काळे, शकुंतला इंगुळकर, जयश्री इंगुळकर, भाजपाचे माजी तालुका युवाध्यक्ष रवींद्र भेगडे, टाटा कंपनीचे मुख्य व्यवस्थापक अश्विनकुमार पाटील, सहायक व्यवस्थापक के. बी. गंगाधर उपस्थित होते.

नगरसेवकांची दांडी

दिलीप कांबळे यांचे हस्ते होणाऱ्या विविध विकास कामांचे उद्घाटन व भूमिपूजनाचा कार्यक्रम हा माझ्या व सभागृहाच्या परवानगीशिवाय करण्यात येत आहे, तसेच कार्यक्रमपत्रिकेत शासकीय प्रोटोकॉल पाळण्यात आला नाही. पत्रिकेवरून नगरसेवकांमध्ये नाराजी आहे. हा कार्यक्रम अत्यंत छोटा असून, या कार्यक्रमाला काही जण जाणून बुजून राजकीय हेतूने मोठे स्वरूप देण्याचा प्रयत्न करत आहेत. हा कार्यक्रम प्रोटोकॉलनुसार नसल्याने रद्द करण्यात आल्याचा दावा नगराध्यक्ष अमित गवळी यांनी केला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘ज्येष्ठांचे मार्गदर्शन हवे’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पिंपरी
भाजपच्या शहराध्यपदाची धुरा हाती घेतल्यानंतर आमदार लक्ष्मण जगताप यांनी शनिवारी पक्षाच्या जुन्या-जाणत्या ज्येष्ठ कार्यकर्त्यांची बैठक घेतली. आगामी महानगरपालिका निवडणुकीत पक्ष बांधणी आणि संघटना वाढीसाठी ज्येष्ठांचे मार्गदर्शन आवश्यक असल्याचे आमदार जगताप यांनी या वेळी सांगितले. शहराध्यक्ष झाल्यानंतर घेतलेल्या या बैठकीमुळे 'आयात आणि निष्ठावंत' हा वाद काही अंशीतरी मिटेल, अशी आशा पदाधिकाऱ्यांना वाटत आहे.

आमदार जगताप यांच्या पिंपळेगुरव येथील निवासस्थानी पक्षाच्या ज्येष्ठ कार्यकर्त्यांची ही बैठक झाली. बैठकीला मधू जोशी, मामनचंद आगरवाल, माणिकराव अहिरराव, निवृत्ती राऊत, बाळकृष्ण नाईक, अप्पा मनोरे, अशोक पारखी, डॉ. प्रतिभा लोखंडे, अनंतराव कुलकर्णी, अशोक देवचक्के, पंडित दाभाडे, बाजीराव पगरे, गोपी कवडे, अ. रा. वैद्य, वसंत वाणी, डॉ. गीता आफळे, तुकाराम जवळकर, वसंत भावे, वसंत शेवडे, ज्ञानेश्वर शेडगे, अॅड. एस. बी. चांडक आदी उपस्थित होते.

'जगताप यांच्या नेतृत्वाखाली महापालिकेवर भाजपचा झेंडा फडकेल,' असा विश्वास या वेळी मधू जोशी यांनी व्यक्त केला. 'शहराध्यक्ष जगताप यांनी पक्षाच्या प्रत्येक कार्यकर्त्याशी संवाद साधावा. लोकसभा व विधानसभा निवडणुकीपेक्षा महापालिका निवडणूक कठीण असते. त्यासाठी पक्षातील सर्वांनी संघटित होऊन काम करण्याची गरज आहे,' असेही जोशी म्हणाले.

डॉ. गीता आफळे यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपमध्ये समन्वय साधण्याचे आवाहन केले. एस. बी. चांडक यांनी शहरातील विविध प्रलंबित प्रश्न सोडविण्यासाठी पक्षाने पुढाकार घेण्याची गरज व्यक्त केली. वसंत शेवडे यांनी अशा प्रकारच्या बैठकांमुळे संवाद निर्माण होऊन त्याचा आगामी महापालिका निवडणुकीत तसेच पक्षवाढीसाठी उपयोग होईल, असे सांगितले. पक्षाची नवीन कार्यकारिणी जुन्या व नव्या कार्यकर्त्यांमध्ये समतोल साधणारी असावी, अशी मागणी वसंत भावे यांनी केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सीएमईमधील गार्डचा मृतदेह आढळला

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
लष्करी अभियांत्रिकी महाविद्यालय (सीएमई) येथे गार्ड म्हणून नेमणुकीस असलेल्या जवानाचा मृतदेह वारजे येथील डुंक्कर खिंड परिसरात जळालेल्या अवस्थेत रविवारी सकाळी आढळून आला. याप्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

बाजीराव बाळू पवार (वय २५, रा. कस्पटे वस्ती, वारजे. मूळ - बीड) असे मृतदेह सापडलेल्या गार्डचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पवार हा सीएमईमध्ये गार्ड म्हणून नेमणुकीस होता. शनिवारी दुपारी अडीचच्या सुमारास तो कामावर गेला होता. मात्र, तो परत आलाच नाही. पुणे-बंगळुरू बायपास रोडवरील डुक्कर खिंड परिसरात रविवारी सकाळी नागरिकांना जळालेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला. त्यांनी घटनेची माहिती पोलिसांना दिली. त्यानुसार वारजे पोलिस घटनास्थळी पोहचले. पोलिसांनी मृतदेहाची ओळख पटवून तो शवविच्छेदनासाठी पाठविला आहे. पवार हा मूळचा बीड जिल्ह्यातील असून तो पत्नीसोबत पुण्यात राहत होता. त्याची आई बीड येथे असते. त्याला सहा महिन्याचा मुलगा आहे. पवार याची माहिती सीएमईकडून घेण्यात येत असून त्याच्या मृत्यूचे कारण शोधण्याचे काम सुरू असल्याचे वारजे पोलिसांनी सांगतिले. पवार याचे कोणाशीही वैर नव्हते. तसेच त्याच्याजवळील वस्तू चोरीला गेलेल्या नसल्याचे आढळून आले आहे. दरम्यान, सीएमईकडून पोलिसांना तपासासाठी मदत केली जाईल, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर पुढील कारवाई केली जाईल, असे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अनुजा देशमाने सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘महिलांचे सक्षमीकरण आवश्यक’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

'भारतीय समाजात महिलांना कायमच पुरुषांची सावली म्हणूनच पाहिले जाते. मात्र, देशाच्या विकासाचा विचार करता महिलांचे सक्षमीकरण होणे, ही अत्यंत महत्त्वाची बाब आहे. त्यामुळेच महिलांनी आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र आणि वैचारिकदृष्ट्या प्रगल्भ होणे महत्त्वाचे आहे,' असे मत अॅक्सिस बँकेच्या असोसिएट व्हाइस प्रेसिडेंट अमृता फडणवीस यांनी रविवारी व्यक्त केले. तसेच, पुरस्कार जबाबदारीची जाणीव करून देणारे असल्याने ते परत करणे व्यक्तिशः पटणारे नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

बँकिंग क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानासाठी फडणवीस यांना सूर्यदत्ता इन्स्टिट्यूटतर्फे राष्ट्रीय पुरस्काराने गौरविण्यात आले. पुरस्कार प्रसादासारखे असतात. प्रसाद परत केला जात नाही. त्यामुळेच देशात इतरत्र पुरस्कार परत करण्याचे प्रकार होत असले, तरी आपण हा पुरस्कार कोणत्याही परिस्थितीत परत करणार नसल्याचे श्रीमती फडणवीस यांनी स्पष्ट केले.

या वेळी आचार्य ब्रह्मऋषी गुरुवानंद स्वामी यांना 'सूर्यरत्न - आधुनिक युगाचे संत' पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. तसेच डॉ. सत्यव्रत शास्त्री, निवृत्त न्यायमूर्ती पी. बी. सावंत, संगीत दिग्दर्शक प्यारेलाल शर्मा, पंडित राजन, साजन मिश्रा, डिझायनर दिलीप छाब्रिया, दूरचित्रवाणी पत्रकार डॉली ठाकोरे, गायक उदित नारायण, व्यावसायिक मोतीलाल ओसवाल यांना जीवन गौरव पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले. भाजपचे राष्ट्रीय उपाध्यक्ष श्याम जाजू, ऑल इंडिया अँटिटेररिस्ट फ्रंटचे अध्यक्ष मनिंदरसिंग बिट्टा आदी या वेळी उपस्थित होते. इन्स्टिट्यूटतर्फे विविध क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या तेरा व्यक्तींचाही सन्मान करण्यात आला. संचालक डॉ. संजय चोरडिया यांनी प्रास्ताविक केले. जयकिशन शर्मा यांनी सूत्रसंचालन केले.

सौ. सीएमनाही बाबाजींचा प्रसाद!

राज्यात एकीकडे बुवाबाजी प्रतिबंधक कायद्याच्या अंमलबजावणीचे प्रयत्न होत असताना, दुसरीकडे खुद्द मुख्यमंत्र्‍यांच्या पत्नीलाही हातचलाखीचा प्रसाद मिळाल्याचेही कार्यक्रमात अनुभवायला मिळाले. या कार्यक्रमासाठी आचार्य गुरुवानंद स्वामी प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते. यावेळी उपस्थित भक्तगणांकडून 'बाबाजीकी जय हो'चे नारे दिले गेले. जवळपास सर्वच पुरस्कारार्थींनी त्यांच्यासमोर नतमस्तक होणे पसंत केले. नतमस्तक होणाऱ्यांना बाबाजींनी आशीर्वाद दिले. आशीर्वाद देताना त्यांनी काहींना हवेतून माळा काढून दिल्या, तर काहींना मणी- खडे काढून दिले. अमृता फडणवीस यांनी कार्यक्रमात उपस्थितांच्या आग्रहाखातर 'अच्युतम् केशवम्' हे भजन सादर केले. त्यानंतर आपल्या जागी परतणाऱ्या फडणवीस यांनाही बाबाजींनी आशीर्वादपर माळ दिली. त्यानंतर उपस्थित भक्तगणांनी पुनश्च 'बाबाजी की जय हो'चा नारा दिला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अठरा लाचखोर पोलिसांना शिक्षा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
पुणे विभागात गेल्या वर्षी लाचखोरीच्या ४५ खटल्यांमध्ये ५३ आरोपींना शिक्षा झाली आहे. त्यामध्ये सातारा येथील महिला तहसीलदारासह १८ पोलिसांचा समावेश आहे. पोलिसांना एवढ्या मोठ्या प्रमाणात शिक्षा होण्याची ही पहिलीच वेळ असल्याचे सांगण्यात येत आहे. शिक्षा झालेल्या बहुतांश लाचखोरांना सेवेतून काढून टाकण्यात आले आहे.

लाचलुचपत प्रतिबंधक ​विभागाच्या पुणे विभागाने पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर आणि सोलापूर या जिल्ह्यांतील लाचखोरांवर कारवाया केल्या आहेत. या लाचखोरांवर कोर्टात खटले चालवण्यात आले आहेत. गेल्या वर्षी या पाचही जिल्ह्यांमध्ये ४५ खटल्यांमध्ये लाचखोरांना शिक्षा झाली आहे. त्यात पुण्यातील २५ खटल्यांचा समावेश आहे, अशी माहिती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अधीक्षक शिरीष सरदेशपांडे यांनी दिली.

​शासन निर्णयानुसार लाचखोरी प्रकरणी कारवाई तसेच गुन्हा दाखल झालेल्या सरकारी कर्मचाऱ्यांचे निलंबन करण्याचे, तसेच कोर्टात शिक्षा लागल्यानंतर त्यांना बडतर्फ करण्यात येते. अनेकदा लाचखोरांना पाठिशी घालण्याच्या घटनाही घडतात. मात्र, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लाचखोरांविरुद्ध कारवाईचा धडाका लावला आहे. त्याचे परिणामस्वरुप शिक्षा झालेल्या बहुतांश लाचखोरांना बडतर्फ करण्यात आले आहे, तर काही लाचखोरांना बडतर्फ करण्याची प्रक्रिया सुरू आहे. सातारा येथील तत्कालीन तहसीलदार सुप्रिया बागवडे यांच्यावर २०११मध्ये लाचप्रकरणी कारवाई झाली होती. त्यांना गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये तीन वर्षे सक्तमजुरीची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. बागवडे या निलंबित आहेत. कोथरूड पोलिस ठाण्यात सहायक निरीक्षक गुलाब दस्तगीर रमजान इनामदार यांच्यावर २०१२ मध्ये कारवाई झाली होती. त्यांना कोर्टाने दोन वर्षांच्या कारावसाची शिक्षा ठोठावण्यात आली. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून शिक्षेचे प्रमाण वाढवण्यासाठी कसून प्रयत्न करण्यात येत आहेत. त्यासाठी साक्षीदार तसेच तांत्रिक पुराव्याचा योग्य पद्धतीने वापर करण्यात येत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

परिवहनमंत्र्यांचा पालकमंत्र्यांना आहेर

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

हेल्मेट सक्तीचे पाप शिवसेनेच्या गळ्यात मारण्याच्या प्रयत्नात असणारे पालकमंत्री ​गिरीश बापट आणि आमदार मेधा कुलकर्णी यांना परिवहन मंत्री दिवाकर रावते यांना सव्याज घरचा आहेर दिला. हेल्मेट सक्तीचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विचारून घेतल्याचे सांगून रावतेंनी चांगलीच कोंडी केली.

रावते यांनी हेल्मेट सक्तीचा आदेश दिल्यानंतर पुण्यात वाहतूक पोलिसांनी कारवाईची मोहीम तीव्र केली होती. कारवाईच्या विरोधात सेना-भाजपच्या पदाधिकाऱ्यांसह हेल्मेट सक्तीविरोधी कृती समिती रिंगणात उतरली होती. आमदार कुलकर्णी यांनीही सेनेवर शरसंधान साधत थेट रावते यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती.

पुण्यात झालेल्या बैठकीदरम्यान रावते यांनी कुलकर्णी यांना टोला लगावण्याची संधी सोडली नाही. 'कुलकर्णी यांनी माझ्या राजीनाम्याची मागणी केली आहे. मात्र, हा निर्णय काही एका दिवसात झालेला नाही. मुख्यमंत्र्यांना याची कल्पना होती. कुलकर्णी यांनी माझा राजीनामा मागितला म्हणून मला वाईट वाटले नाही, कारण त्या माझ्या बहिणीसारख्याच आहेत,' असे म्हणून मंत्र्यांनी भापजच्या आंदोलनातील हवाच काढली. दरम्यान, पालकमंत्री गिरीश बापट, दिलीप कांबळे, खासदार अनिल शिरोळे यांच्यासह बहुतांश पदाधिकाऱ्यांनी वाहतूक पोलिसांनी केलेल्या कारवाईला विरोध दर्शवला. गृहखाते भाजपकडे असल्याने पोलिसांनी केलेल्या कारवाईबाबत त्यांनी प्रश्नचिन्ह निर्माण केले. हेल्मेट सक्ती हा निव्वळ सेनेचा म्हणजेच रावते यांचा निर्णय असल्याचे ठसवण्याचा प्रयत्न या वेळी झाला.

पोलिसांच्या खांद्यावर बंदूक

परिवहन विभागाने ३१ डिसेंबर रोजी हेल्मेट न वापरणाऱ्या चालकां​विरुद्ध कारवाई करण्याचे आदेश परिपत्रकाद्वारे दिले. त्यानंतर रावते यांनी औरंगाबाद येथे कारवाईचा शुभारंभही केला आ​णि पुण्यातहीही कारवाईचे सूतोवाच केले. रावतेंच्या आदेशानुसार पुण्यात वाहतूक पोलिसांनी कारवाई सुरू केली. वाहतूक पोलिसांच्या तीन दिवसांच्या कारवाईनंतर त्यांच्या विरोधात वातावरण तापले. त्यानंतर कारवाई थंडावली आणि पोलिसांच्या खांद्यावर बंदूक ठेऊन सेना-भाजपने हेल्मेट सक्तीचे राजकारण केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


‘हेल्मेट सक्तीची कल्पना नाही’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

'शहरात हेल्मेट सक्तीची अंमलबजावणी करण्यासंदर्भात पोलिस अधिकाऱ्यांनी आपल्याशी कोणतीही चर्चा केली नाही. पालकमंत्री या नात्याने त्यांनी माझ्याशी चर्चा करणे अपेक्षित होते,' असा खुलासा पालकमंत्री गिरीश बापट यांनी रविवारी केला. दरम्यान, शहराच्या मध्यवस्तीतील छोट्या रस्त्यांवर हेल्मेटची कारवाई न करता, मोठे रस्ते व महामार्गांवर कारवाई करावी, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

हेल्मेट सक्तीबाबत परिवहन मंत्री दिवाकर रावते यांच्या उपस्थितीत या विषयी झालेल्या बैठकीत बापट बोलत होते. 'शहरात हेल्मेट सक्ती करण्याबाबत आणि दंड वसुलीबाबत पोलिसांनी माझ्याशी कोणताही संपर्क साधला नाही. अर्थात, त्यांनी कायद्याची अंमलबजावणी केली. मात्र, अशा प्रकारच्या गोष्टी कळविणे आवश्यक आहे,' असे बापट म्हणाले. वाहनचालकांच्या सुरक्षिततेसाठी हेल्मेट आवश्यक आहे. मात्र, हेल्मेट न वापरणाऱ्यांवरील कारवाई महत्वाची की, दारू पिऊन वाहन चालविणाऱ्यांवरील कारवाई महत्वाची हे लक्षात घेतले पाहिजे, असेही ते म्हणाले.

विद्यार्थीही बेशिस्त

शहरातील प्रत्येक रस्त्यावर विद्यार्थ्यांकडून अतिवेगात वाहन चालविणे, वाहतूक नियमांचे पालन न करणे आदी प्रकार घडतात. प्रामुख्याने हे विद्यार्थी परगावातील असतात. वाहन कसेही चालविले, कसेही वर्तन केले तरी विचारण्यासाठी कोणी नसल्याने त्यांचा बेशिस्तपणा वाढला आहे. या विद्यार्थ्यांमध्ये वाहतुकीच्या नियमांबाबत जनजागृती केली पाहिजे, असे बापट यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

न्यायविभागाशी चर्चा करू

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

हेल्मेट सक्ती न लादण्याच्या नागरिकांच्या मागणीसंदर्भात विधी आणि न्याय विभागाशी चर्चा करून त्यावर मार्ग काढता येईल का, याची चाचपणी केली जाईल असे आश्वासन राज्याचे परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी रविवारी दिले. दरम्यान, हेल्मेटचा कायदा बदलण्याचा अधिकार राज्याला नसल्याने या बाबत केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्याशी चर्चा करणार असल्याचे रावतेंनी स्पष्ट केले.

हेल्मेट सक्ती विरोधी कृती समितीकडून गेल्या दोन दिवसांपासून हेल्मेट सक्तीला तीव्र विरोध केला जात आहे. त्या पार्श्वभूमीवर रावते यांनी रविवारी कौन्सिल हॉल येथे कृती समितीचे पदाधिकारी व विविध संस्था, संघटनाच्या प्रतिनिधींसोबत बैठक घेतली. पालकमंत्री गिरीश बापट, जलसंधारण राज्यमंत्री विजय शिवतारे, सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे, खासदार अनिल शिरोळे, आमदार डॉ. नीलम गोऱ्हे, माधुरी मिसाळ, मेधा कुलकर्णी, लक्ष्मण जगताप, योगेश टिळेकर, जगदीश मुळीक, बैठकीस पोलिस आयुक्त के. के. पाठक, पोलिस अधीक्षक जय जाधव, वाहतूक विभागाचे उपायुक्त सारंग आवाड यांच्यासह प्रादेशिक परिवहन विभागाचे अधिकारी, शिवसेना शहरप्रमुख विनायक निम्हण, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते अंकुश काकडे, समितीचे अध्यक्ष सूर्यकांत पाठक, भाजपचे शहर सरचिटणीस संदीप खर्डेकर यांच्यासह कृती समितीचे सदस्य यावेळी उपस्थित होते.

'मोटार वाहन कायदा केंद्र सरकारच्या अखत्यारित असलेला विषय आहे. त्यामध्ये थेट बदल करण्याचा अधिकार राज्य सरकारला नाही. सुप्रीम कोर्टाच्या निर्देशानुसारच राज्यात सर्वत्र हेल्मेट वापराबाबतचे नियम लागू करण्यात आले आहेत. तसेच, हेल्मेट सक्तीबाबत सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार त्रिसदस्यीय समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीला रस्ते सुरक्षिततेबाबत काय उपाययोजना केल्या जातात, त्याचा वेळोवेळी अहवाल सादर करावा लागतो. त्यामुळे कोर्टाचे आदेशाचे पालन करणे अत्यावश्यक होते,' असे रावते यांनी स्पष्ट केले.

अपघाताचे वाढते प्रमाण पाहता हेल्मेट आवश्यक आहे. मात्र, सक्ती करण्यापूर्वी प्रबोधन करण्याची आवश्यकता आहे. शहराच्या मध्यवस्तीतील लहान रस्त्यांऐवजी मोठे रस्ते, राज्य आणि राष्ट्रीय महामार्गावरून दुचाकी वाहन चालवताना हेल्मेट वापरणे बंधनकारक करायला हवे, असे मत बापट यांनी व्यक्त केले.

------

मंत्र्यांसमोर पुणेकरांचे सवाल

विविध कारणांमुळे लहान मुलांना घराबाहेर घेऊन पडणाऱ्या महिलांनी मुलांना सांभाळायचे की हेल्मेट सांभाळायचे, शहरात सकाळी दुधविक्रेते, वृत्तपत्र विक्रेते आणि डबेवाल्यांची वर्दळ असते, त्यांनी त्यांचे सामान घ्यायचे की, हेल्मेट वागवायचे, तसेच हेल्मेटमुळे उद्भवणाऱ्या व्याधींना जबाबदार कोण, असे प्रश्न पुणेकरांनी दिवाकर रावते यांच्यापुढे उपस्थित केले.

-----------

'दारू पिऊन चालवणारे अधिक घातक'

एकूण अपघातांमध्ये दाऊ पिऊन गाडी चालविल्याने होणाऱ्या अपघातांचे प्रमाण अधिक असेल. मात्र, आपल्याकडे केवळ ३१ डिसेंबरच्या रात्री वाहन चालक दारू प्यायला आहे का, त्याची तपासणी केली जाते. हेल्मेट न वापरणाऱ्यांपेक्षा दारू पिऊन गाडी चालविणारे अधिक घातक आहेत. सरकार या विरोधात कठोर भूमिका का घेत नाही, असा प्रश्न विवेक वेलणकर यांनी रावतेंना विचारला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मोगुबाईंच्या नावाचा पुरस्कार हा आशीर्वाद

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

'पुरस्कार खूप मिळतात, पण तो कोणाच्या नावे मिळतो याला महत्त्व आहे. मोगुबाई कुर्डीकर यांच्या नावे मिळणारा पुरस्कार हा आशीर्वाद आहे', अशी भावना प्रख्यात बासरीवादक पं. हरिप्रसाद चौरसिया यांनी रविवारी व्यक्त केली.

नाट्यसंपदा प्रतिष्ठान आयोजित गानसरस्वती महोत्सवात पं. चौरसिया यांना गानसरस्वती किशोरी आमोणकर यांच्याहस्ते गानतपस्विनी मोगुबाई कुर्डीकर पुरस्कार प्रदान करण्यात आला. त्यावेळी पं. चौरसिया यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. या प्रसंगी हार्मोनियम वादक सुयोग कुंडलकर यांना गानसरस्वती किशोरी आमोणकर संगतकार पुरस्कार प्रदान करण्यात आला. 'एवढ्या मोठ्या व्यक्तीच्या नावे पुरस्कार मिळणे ही खूप मोठी गोष्ट आहे. मी मुंबईत नवीन होतो; तेव्हा मोगुबाईंकडे नेहमी जात असे. त्या मला बासरी वादनासाठी नेहमी आग्रह करायच्या', अशी आठवण चौरसिया यांनी बोलून दाखवली. 'किशोरीताईंनी १५ वर्षे साथसंगत करण्याची संधी दिली, हाच मोठा पुरस्कार आहे. त्यांच्या नावे दिलेला पुरस्कार हा आशीर्वाद आणि प्रसाद आहे,' या शब्दांत सुयोग कुंडलकर यांनी कृतज्ञता व्यक्त केली. दरम्यान, महोत्सवात रविवारच्या सायंकाळच्या सत्रात विशाल कृष्णन यांचे कथक नृत्य रंगले. तीन ताल विलंबित लयीमध्ये गंगा ही रचना त्यांनी सादर केली. लहेजा असलेली तिहाई, मयूरगत, थाळीवरील नृत्य याबरोबरच राधा-कृष्णाच्या लीलेचे वर्णन असलेल्या संत सूरदासांच्या प्रथम स्नेहलीला या रचनांनी रसिकांच्या मनाचा ठाव घेतला. तबल्यावर कुशल कृष्ण, बासरीवर रोहित वानकर व गायन साथ मनोज देसाई यांनी केली.

पं. रघुनंदन पणशीकर यांच्या गायनालाही रसिकांची उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. येरी याली, मोहे लगन लागी, गानसरस्वती को भजे हम, या रचना त्यांनी सादर केल्या. मोगुबाई कुर्डीकरांची मान रे मान रे पिया मोरे ही बंदिश आणि किशोरीताईंच्या बोलावा विठ्ठल या अभंगाने रसिकांना मंत्रमुग्ध केले. तबलाल्यावर भरत कामत, हार्मोनियमवर सुयोग कुंडलकर, तानपुऱ्यावर सौरभ काडगावकर, देवकी पणशीकर यांनी सुरेख साथसंगत केली.

..

स्वरानुभवाची अनोखी अनुभूती

मैफलीचा उत्तरार्ध पं. हरिप्रसाद चौरसिया यांच्या मनमोहक बासरी वादनाने रंगला. राग झिंझोटीमध्ये त्यांनी स्वरानुभवाची अनुभूती दिली. तबल्यावर विजय घाटे आणि पखवाजवर भवानीशंकर यांनी सुरेख साथसंगत केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

टीडीआर धोरणाच्या चौकशीची मागणी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

राज्य सरकारचे नवे टीडीआर धोरण शहराच्या विकासाला मारक आहे. त्यामुळे सोसायट्यांचा पुनर्विकास ठप्प होणार आहे. पुण्यात पूर्वी काम केलेल्या अधिकाऱ्यांनीच नगररचना विभागात मुख्य पदावर असताना असा निर्णय कसा घेतला, याची चौकशी झाली पाहिजे. तसेच हे धोरण रद्द झाले पाहिजे, असा सूर शिवसेनेतर्फे रविवारी आयोजित चर्चासत्रात व्यक्त झाला.

शिवसेनेतर्फे नवीन 'टीडीआर धोरण- शहराला तारक की मारक' या विषयावर आयोजित चर्चासत्रात शिवसेनेचे शहरप्रमुख विनायक निम्हण, सजग नागरिक मंचाचे विवेक वेलणकर, मराठी बांधकाम व्यावसायिक संघटनेचे सुधीर दरोडे, नितीन देशपांडे, नंदू घाटे, पुणे जिल्हा गृहनिर्माण महासंघाचे अध्यक्ष सुहास पटवर्धन, क्रेडाईचे अश्विन त्रिमल, सुधीर ऊर्फ काका कुलकर्णी, नगररचनातज्ज्ञ रामचंद्र गोहाड, अॅड. वसंतराव कर्जतकर आदी सहभागी झाले होते. संयोजक श्याम देशपांडे यांनी प्रास्ताविक आणि सूत्रसंचालन केले.

'सरकारच्या या निर्णयाने नागरिकांचे कंबरडे मोडले आहे. मध्यमवर्ग कधीही रस्त्यावर उतरत नाही. परंतु, या निर्णयामुळे त्यांनाही आंदोलन करावे लागेल, अशी परिस्थिती आहे. शहरातील हजारो सोसायट्यांचा पुनर्विकास करणे अत्यंत आवश्यक असून, त्याला या निर्णयामुळे खीळ बसली आहे. हा निर्णय रद्द व्हावा, यासाठी शिवसेनेतर्फे आंदोलन करण्यात येईल', असे निम्हण यांनी सांगितले. 'टीडीआर धोरण मान्य झाल्यानंतर एका दिवसात अध्यादेश निघाला, याचाच अर्थ कुठेतरी पाणी मुरते आहे. लोकसहभाग डावलून निर्णय घेण्याच्या प्रवृत्तीला विरोध करणे आवश्यक आहे', असे वेलणकर यांनी सांगितले.

'टीडीआर बाबतचा अध्यादेश एका दिवसात निघण्यामागे मुख्य नगर सचिवांचा हात आहे. त्यांची चौकशी होऊन त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे', असे सुधीर कुलकर्णी यांनी सांगितले. 'शहरातील अनेक सोसायट्या ३० वर्षांपेक्षाही जुन्या आहेत. त्यांचा पुनर्विकास ही काळाची गरज आहे. त्यांना टीडीआरचा फायदा होणार होता. मात्र, प्रस्तावित धोरण आणि मूळ अध्यादेशात तफावत आहे. यामुळे सोसायट्यांची पुनर्बांधणी होऊ शकणार नाही. यावर चर्चा करून मार्ग काढता आला असता', अशा आशयाचे मत धंगेकर, दरोडे, कांबळे, पटवर्धन, देशपांडे, त्रिमल आदींनी व्यक्त केले. 'हा निर्णय घटना आणि नगर रचना कायद्यातील तरतुदींच्या विरोधातील आहे. या निर्णयामुळे विकासाला खीळ बसणार असून या विरोधात कोर्टात गेले पाहिजे', असे गोहाड यांनी सांगितले.

नागरिकांचाही संताप

'आमची सोसायटी ३० वर्षांहून जुनी असून पुनर्विकासाबाबतची बोलणी अंतिम टप्प्यात होती. वाढीव टीडीआरच्या आधारेच ही बोलणी सुरू होती. नेमक्या याच टप्प्यावर अध्यादेश आल्याने आमची स्वप्ने धुळीस मिळाली आहेत', असे श्रीराम रहाळकर यांनी सांगितले. 'पुनर्विकासासाठी आम्हाला विस्थापित केल्यानंतर बिल्डिंग पाडण्यात आली. आणि आता हा अध्यादेश आल्याने विकसकाने काम थांबवले आहे. आमची अवस्था 'ना घर का ना घाट का', अशी झाली आहे. शहरातील खासदार आणि आठ आमदार काय करताहेत, असा सवाल गुजरात कॉलनीतील रहिवासी वामन शिंदे यांनी उपस्थित केला. 'जे राजकीय पक्ष या पक्षाच्या आंदोलनाला पाठिंबा देणार नाहीत. त्यांना महापालिका निवडणुकीत धडा शिकवू', असे मनोहर गोखले यांनी सांगितले. वर्षा जोशी, संदीप वाळिंबे, दीपक कुदळे आदींनीही मनोगत व्यक्त केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तिसरी लाइन अंतिम टप्प्यात

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, पुणे



पुणे-लोणावळ्यादरम्यान गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित तिसऱ्या लाइनचा प्रस्ताव अंतिम टप्प्यात आला आहे. हा प्रस्ताव केंद्र सरकारच्या आर्थिक सल्लागार समितीपुढे (पीआयबी) मांडण्यात आला असून, येत्या १५ दिवसांत त्यावर निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे. या प्रकल्पासाठी ९४३.६० कोटींचा खर्च अपेक्षित आहे.



गेल्या वर्षी केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी सादर केलेल्या रेल्वे बजेटमध्ये तिसऱ्या लाइनसाठी ८०० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली होती. मात्र, रेल्वे बोर्डाकडून प्रकल्पासाठी मंजुरी न मिळाल्याने गेल्या वर्षभरात एक पैसाही खर्च न करण्यात आला नाही. आता आर्थिक सल्लागार समितीच्या बैठकीत मंजुरी मिळाल्यास हा प्रस्ताव मार्गी लागण्याची शक्यता आहे.



सध्या पुणे ते लोणावळा मार्गावर केवळ दोन लाइन आहेत. त्यामुळे लांब पल्ल्यांच्या गाड्या आणि लोकल यांच्या वेळापत्रकाची सांगड घालताना, लोकलच्या फेऱ्यांवर परिणाम होत आहे. तसेच, गाडी क्रॉसिंगच्यावेळी अनेक गाड्यांना थांबवले जाते. त्यामुळे अनेक गाड्यांच्या नशिबी प्रतीक्षाच येते. या समस्या सोडविण्यासाठी तिसरी लाइन टाकण्याचा प्रस्ताव मध्य रेल्वेने रेल्वे बोर्डाकडे या पूर्वीच पाठविला आहे. मात्र, रेल्वे बोर्डाच्या मंजुरीअभावी अद्याप तो प्रश्न मार्गी लागलेला नाही.



तिसरी लाइन अस्तित्वात आल्यानंतर, पुणे ते लोणावळा या मार्गावर धावणाऱ्या लोकलची संख्या वाढविण्यास मदत होईल. तसेच, लोकलसहीत लांब पल्ल्याच्या गाड्यांचा वेग वाढविणे शक्य होणार आहे. पुणे-मुंबई दरम्यान रस्ते वाहतुकीवरील ताण कमी करण्याच्या उद्देशाने रेल्वे गाड्यांची संख्या वाढविणेही शक्य आहे. तसेच, येत्या वर्षांत पुण्यासाठी लोकलच्या चार गाड्या (रेक) वाढविण्यात येणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे. त्यामुळे गाड्या वाढल्यानंतरही, प्रत्यक्ष मार्गावरील फेऱ्यांची संख्या वाढविताना दोनच लाइन असल्याने काही मर्यादा येतील, असे तज्ज्ञांकडून सांगितले जात आहे.


मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

प्रसिद्धीचा हव्यास उपमहापौरांच्या अंगलट

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

येत्या वर्षभरात पुणे महापालिकेची निवडणूक होणार असल्याने राजकीय श्रेयवादातून एकमेकांवर कुरघोडी करण्याच्या प्रयत्नांना वेग आला आहे. या प्रकारांतून पदाधिकाऱ्यांची फजिती कशी होऊ शकते, याचा इरसाल नमुना नुकताच पेश झाला. शहरातील वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी 'हाय कपॅसिटी मास ट्रान्झिट रूट' (एचसीएमटीआर) कार्यान्वित करण्यासाठी स्वतंत्र कक्ष स्थापन करून अधिकारी निश्चित करण्यात आल्याचे प्रसिद्धीपत्रक उपमहापौरांनी पाठविले खरे; पण पालिका आयुक्तांनी या कक्षातील अधिकाऱ्यांची अदलाबदल केल्याने प्रसिद्धीचा सोस उपमहापौरांच्या चांगलाच अंगलट आला.

महापालिकेच्या १९८७ च्या विकास आराखड्यापासून 'एचसीएमटीआर' प्रकल्प प्रलंबित आहे. गेल्या काही वर्षांपासून हा प्रकल्प मार्गी लागावा, या साठी उपमहापौर आबा बागूल सातत्याने पाठपुरावा करत आहेत. या संपूर्ण मार्गाचे सर्वेक्षण पूर्ण झाले असून, त्याला आता वेगही आला आहे. प्रकल्पाचे काम आणखी त्वरेने व्हावे, यासाठी स्वतंत्र कक्ष स्थापन करण्याची मागणी त्यांनी केली होती. आयुक्तांनी त्याला पाठिंबा दर्शवून स्वतंत्र कक्षाची जबाबदारी अधीक्षक अभियंता प्रवीण गेडाम यांच्याकडे दिल्याचे निवेदन उपमहापौरांनी पाठविले. यामध्ये, इतरही काही अधिकाऱ्यांची नावे होती. वास्तविक, संबंधित अधिकाऱ्याची नियुक्ती करण्याचा प्रस्ताव शहर अभियंत्यांनी आयुक्तांकडे पाठविला होता. शहर अभियंता कार्यालयाने सुचविलेल्या अधिकाऱ्यांकडे सध्या पालिकेच्या विविध प्रकल्पांची जबाबदारी आहे. त्यामुळे, आयुक्त कुमार यांनी त्यांच्याकडे आणखी जबाबदारी देण्यापेक्षा पथ विभागाच्या अधिकाऱ्यांकडेच 'एचसीएमटीआर' कक्षाची धुरा सोपविली. शनिवारी रात्री उशिरा आदेश देण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

परिणाम हवे आहेत; तर पाच वर्षे थांबा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे


'मेक इन इंडिया, डिजिटल इंडिया, स्कील इंडिया यासारख्या घोषणा पूर्वीच्या सरकारने केल्या नसल्याने पंतप्रधान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना कराव्या लागल्या. या घोषणांची अंमलबजावणी झाल्याचे पाहायचे असेल, तर पाच वर्षे थांबा,' असे आवाहन केंद्रीय अवजड उद्योगमंत्री अनंत गीते यांनी व्यक्त केले. 'जनतेने आमच्या हातात पाच वर्षे सत्ता दिली आहे. त्यामुळे आम्ही केलेल्या घोषणांना त्यांनीही स्वीकारले आहे. जनतेची मानसिकता बदलण्यात आम्ही यशस्वी होत आहोत. त्यामुळे केलेल्या घोषणांचे परिणाम ​दिसण्यासाठी पाच वर्षे थांबावे लागेल,' असेही गीते यांनी स्पष्ट केले.

सर परशुरामभाऊ कॉलेजच्या शताब्दी महोत्सवांतर्गत कॉमर्स असोसिएशनच्या तीन दिवसीय उद्योजक विकास कार्यक्रमांच्या उदघाटन गीते यांच्या हस्ते झाले. कार्यक्रमानंतर पंतप्रधानांच्या घोषणेबाबत त्यांनी भूमिका मांडली. व्यासपीठावर शिक्षण प्रसारक मंडळीचे पदाधिकारी अॅड. जयंत शाळिग्राम, कॉलेजचे प्राचार्य दिलीप शेठ उपस्थित होते.


'सध्या आपल्या बाजारपेठा चीनने काबीज केल्या आहेत. अमेरिकेतील स्वातंत्र्यदेवीच्या मूर्तीपासून ते महाराष्ट्रातील गणपतीच्या मूर्तीपर्यंत सर्वच वस्तू मेड इन चायना आहेत. चीनचे बाजारपेठेतील वर्चस्व कमी करण्यासाठी तप्रधान नरेंद्र मोदी यांनी मेक इन इंडिया, डिजिटल इंडिया, स्कील इंडिया आदी उपक्रमांची घोषणा केली आहे. उद्योजकांना बळ देण्यासाठी केंद्राने पावले उचलली आहेत. नव्या पिढीत उद्योग निर्मितीचे वातावरण तयार कऱण्यासाठी केंद्र प्रयत्न करीत आहे,' असेही गीते म्हणाले.


..


तरुणांनो, उद्योगांत उतरा


सद्यस्थितीत अनेक उद्योग अडचणीत आहेत. मात्र, सेवा क्षेत्र जोरात सुरु आहे. सध्या उद्योगांसाठी अनुकूल काळ असून, आताच तरुणांनी उद्योगांत उतरावे, असे आवाहनही त्यांनी केले. पूर्वीच्या सरकारने अशा कोणत्याही घोषणा केल्या नसल्याने अखेर मोदी सरकारला घोषणा कराव्या लागल्याचा खुलासाही गीते यांनी केला.


मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


‘ज्येष्ठांची तळमळ आम्हाला जाणवली’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे 'समाजातील सर्वांत महत्त्वाचा घटक असलेल्या ज्येष्ठ नागरिकांच्या गेल्या चौदा वर्षांपासून रेंगाळलेल्या समस्या यापूर्वीच सोडविणे आवश्यक होते. पण या पूर्वीच्या राज्यकर्त्यांच्या महत्वाकांक्षेमध्येच कदाचित अभाव होता. आम्हाला या ज्येष्ठांची तळमळ जाणवली म्हणूनच त्यांच्याच्या सुखकर आयुष्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत,' असे मत सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांनी व्यक्त केले. ज्येष्ठ नागरिकांच्या प्रश्नाला न्याय मिळवून दिल्याबद्दल बडोले यांचा आमदार मेधा कुलकर्णी आणि विविध ज्येष्ठ नागरिक संघटनांतर्फे नागरी सत्कार करण्यात आला. या वेळी ज्येष्ठ नागरिकांच्या फेस्कॉम संघटनेचे अध्यक्ष दत्तात्रय चौधरी, पुण्याचे अध्यक्ष श्रीराम बेडकीहाळ, महासचिव अरुण रोडे, अॅस्कॉपचे डॉ. आर. टी. वझरकर आदी उपस्थित होते. ज्येष्ठ नागरिकांकडे अनुभवाचे गाठोडे असते, प्रशासनाच्या कामात त्याचा उपयोग करून घेण्यासाठी आम्ही त्यांचे सहकार्य घेणार आहोत. याशिवाय, राज्यातील वृद्धाश्रमांच्या अनुदानात आम्ही वाढ केली असून विमा योजनाही अद्ययावत करण्यात येणार आहे. याशिवाय, नोकरदार महिलांच्या वसतिगृहांची संख्याही लवकरच वाढविणार आहे. ज्येष्ठ नागरिकांच्या सर्व मागण्यांची अंमलबजावणी होण्यासाठी प्रयत्नशील राहणार आहे, असे आश्वासन बडोले यांनी दिले. कुलकर्णी यांनी मनोगतामध्ये ज्येष्ठ नागरिकांच्या समस्यांसाठी केलेल्या पाठपुराव्याची माहिती दिली. चौधरी यांनी ज्येष्ठ नागरिकांची संस्था स्थापनेपासून ते आजपर्यंतचा प्रवास मनोगतातून उलगडला.

'मेधा कुलकर्णींना मंत्रिपद द्या'

मुख्यमंत्र्यांसह विविध पातळ्यांवर ज्येष्ठ नागरिकांच्या वयाचा नियम तसेच इतर समस्या तळमळीने मांडणाऱ्या मेधा कुलकर्णी यांची धडपड आम्ही पाहिली आहे. त्यांच्या प्रयत्नांमुळे चौदा वर्षांचा आमच्या लढ्याला योग्य दिशा मिळाली. या कार्याची दखल घेऊन त्यांना मंत्रिपद द्यावे, अशी मागणी या वेळी सर्व ज्येष्ठ नागरिक संघांनी केली. ज्येष्ठ नागरिकांचा प्रशासनाच्या कामात सहकार्य घेणार आहोत. वृद्धाश्रमांच्या अनुदानात वाढ केली असून विमा योजना अद्ययावत करणार आहोत. ज्येष्ठांच्या सर्व मागण्यांची अंमलबजावणी होण्यासाठी प्रयत्नशील राहणार आहे, असे आश्वासन बडोले यांनी दिले. कार्यक्रमाच्या उत्तरार्धात बालगंधर्व रसिक मंडळातर्फे 'संत कान्होपात्रा' हे संगीत नाटक सादर करण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

२८५ कोटींची एफआरपी थकित

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
राज्यातील ३७ साखर कारखान्यांकडे सुमारे २८५ कोटी रुपयांची रास्त आणि किफायतशीर भाव (एफआरपी) रक्कम थकित आहे. त्यामध्ये राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या भाऊराव चव्हाण सहकारी साखर कारखाना, माजी सहकार राज्यमंत्री जयप्रकाश दांडेगावकर यांच्या पूर्णा सहकारी कारखानासह नांदेडमधील सहा कारखाने आहेत. या कारखान्यांच्या थकित 'एफआरपी'च्या रकमेबाबतची सुनावणी आता १८ फेब्रुवारीला होणार आहे. नांदेडमधील कारखान्यांच्या थकित 'एफआरपी' आणि देय असलेल्या रकमेवर व्याज आकारणीसाठी साखर आयुक्त विपिन शर्मा यांच्यासमोर गुरुवारी सुनावणी घेण्यात आली. याबाबत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नांदेड जिल्हाध्यक्ष प्रल्हाद इंगोले यांनी हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठाकडे याचिका दाखल केली आहे. भाऊराव चव्हाण सहकारी साखर कारखाना, पूर्णा, सिद्धी शुगर, रेणुका शुगर, विठ्ठलसाई सहकारी साखर कारखाना आणि भीमाशंकर कारखाना यांच्याकडे 'एफआरपी'ची थकबाकी आहे. या कारखान्यांच्या थकित 'एफआरपी'च्या रकमेबाबत १८ फेब्रुवारीला सुनावणी घेण्यात येणार आहे. 'कोर्टाने २५ ऑगस्ट २०१५ रोजी दिलेल्या निर्देशानुसार १२ आठवड्यांत कारवाई पूर्ण करणे आवश्यक होते. मात्र, साखर आयुक्तलयाकडून प्रक्रिया पूर्ण करण्यात येत नाही.' असा आरोप याचिकाकर्ते इंगोले यांनी केला. 'राजकीय पाठबळ नसलेल्या साखर कारखान्यांवर जप्तीची कारवाई साखर आयुक्तांकडून करण्यात आली. मात्र, बड्या नेत्यांच्या साखर कारखान्यांवर कारवाई न करता सुनावणीसाठी वेगवेगळ्या तारखा देण्यात येत आहेत.' असे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रवक्ते अॅड. योगेश पांडे यांनी सांगितले. 'स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पाठपुराव्यामुळे गेल्या गाळप हंगामातील सुमारे ९५ टक्के देय रक्कम शेतकऱ्यांना मिळाली आहे. उशीरा देण्यात येत असलेल्या देय रकमेवर व्याज वसुलीसाठी खासदार राजू शेट्टी यांच्या मार्गदर्शनाखाली पाठपुरवा सुरू आहे.' असे पांडे यांनी स्पष्ट केले. दरम्यान, राज्यातील ३७ साखर कारखान्यांपैकी ११ कारखाने बंद झाले आहेत. त्यांच्याकडे सुमारे १०४ कोटी रुपये थकबाकी आहे. अन्य २६ कारखान्यांकडे सुमारे १८१ कोटी रुपयांची थकबाकी आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

निकूच्या आजोबांची दिल्ली पोलिसांवर टीका

$
0
0



म. टा. प्रतिनिधी, हडपसर दिल्ली पोलिसांनी वेळीच तपास केला असता, तर माझा नातू आज जिवंत असला असता, असे वक्तव्य मयत निकोलसच्या आजोबांनी सोमवारी केले. जन्मदात्या आईनेच प्रियकराच्या मदतीने निकोलसचा खून करून त्याला जमिनीखाली पुरले होते. खुनाची घटना रविवारी सकाळी उघडकीस आली होती. पोलिसांनी तहसीलदार, डॉक्टर यांच्यासमक्ष निकूचा मृतदेह घरातील किचनमधील जमिनीखालून बाहेर काढला. पोलिसांच्या उपस्थितीत सोमवारी फातिमानगर येथे त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. या वेळी निकोलसचे आजोबा जोसेफ जॉन यांनी दिल्ली पोलिसांच्या तपासावर टीका केली. नातवाशी झालेल्या संभाषणातून तो अतिशय चिंताग्रस्त असल्याचे त्यांनी सांगितले. ते म्हणाले, 'दिल्ली पोलिसांनी केलेल्या निष्काळजीपणामुळे नातू गेला. जेव्हा त्याला फोन केला होता, तेव्हा तो खूप चिंतेत होता. दिल्ली पोलिसांचा तपास धीम्या गतीने चालला होता. यामुळे ही अपहारणाची केस सीबीआयकडे तपासण्यास द्यावी. खऱ्या आरोपीला अटक करावी, अशी याचना दिल्ली पोलिस आयुक्ताकडे दिलेल्या पत्रामध्ये व्यक्त केली होती. दिल्ली पोलिसांनी वेळीच तपास केला असता तर माझा नातू जिवंत असता.'

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आंदोलनांचा सामना करणारे पोलिस ठाणे

$
0
0



पोलिस ठाण्याच्या हद्दीत कशा स्वरूपाची गुन्हेगारी आहे? शिवाजीनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत एसटी व रेल्वे स्थानक, शिवाजीनगर कोर्ट हा परिसर येतो. या ठिकाणाहून वाहनचोरीच्या घटनांची संख्या जास्त आहे. तसेच, काही प्रमाणात पाकीटमारीचे गुन्हे घडतात. प्रवासी येथे आल्यानंतर त्यांना त्यांच्या वस्तू चोरीला गेल्याचे लक्षात आल्यानंतर तक्रार देतात. या गुन्ह्यातील काही सराईतांना पकडून हे गुन्हे कमी करण्याचा प्रयत्न सुरू आहे. तसेच, सोनसाखळी चोरी व घरफोडीचे गुन्हे होऊ नये म्हणून विविध पद्धतीने काळजी घेतली जाते. या ठिकाणी दाखल होणारे फसवणुकीचे गुन्हे बाहेर घडलेले असतात. फक्त कोर्टात एखादा कागद खोटा सादर केला असतो किंवा महापालिकेत खोटा दस्ताऐवज केलेला असतो. अशा स्वरूपाचे फसवणुकीचे गुन्हे दाखल होतात. साखर संकुल व महापालिका भवन येथे बऱ्याचदा आंदोलने असतात. अशा वेळी तुमचे नियोजन कसे असते? शिवाजीनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत दिवसाला एक ते दोन आंदोलने असतात. या ठिकाणी होणारी आंदोलने ही दोन प्रकारची असतात. एक म्हणजे परवानगी घेऊन केली जाणारी आंदोलने आणि दुसरी अचानक केली जाणारी आंदोलने. आंदोलनाची परवानगी घेतली असेल त्याचे अगोदरच नियोजन करण्यात येते. यासाठी परिमंडळ एकच्या पोलिस उपायुक्तांकडून अतिरिक्त बंदोबस्त मागविला जातो. बॅरिकेटिंग करून आंदोलकांना मुख्य इमारतीच्या काही अंतरावरच थांबविले जाते. शिवाजीनगरच्या साखर संकुल येथे आंदोलनाचा बंदोबस्त करताना काळजी घ्यावी लागते. महापालिकेसमोर कोणीही आंदोलन करीत असते. परवानगी न घेता आंदोलन झाले, तर धावपळ उडते. त्यामुळे एलआयबीच्या पथकामार्फत आंदोलनाची अगोदर माहिती काढली जाते. बंदोबस्ताची तयारी नेहमीच ठेवली असते. आंदोलक व अधिकारी यांच्यात चर्चा घडवून आणण्यासाठी पोलिसांकडून प्रयत्न केले जाता. त्यामुळे आंदोलन शांततेत पार पडते. तंत्रज्ञानाचा वापर कशा पद्धतीने केला जातो? शिवाजीनगर पोलिस ठाण्यात सीसीटीएनएसद्वारे ऑनलाइन एफआयआर नोंदविली जाते. पोलिस ठाण्यात दाखल झालेल्या सर्व तक्रारी सीसीटीएनएसमध्ये शंभर टक्के नोंदविल्या जातात. त्यामुळे पोलिस आयुक्तांकडून सीसीटीएनएसचा पुरस्कार देखील शिवाजीनगर पोलिस ठाण्याला मिळाला आहे. तसेच, सर्व पोलिस अधिकाऱ्यांना ईमेल आयडी देण्यात आले असून त्याच्या माध्यमातून संवाद साधला जाते. त्याबरोबरच व्हॉट्स अॅपचा वापर पोलिसींगसाठी केला जातो. ईमेलवर तक्रारी येण्याचे प्रमाण कमी आहे. पोलिस ठाण्यासमोर अडचणी व आव्हाने कोणती आहेत? पोलिस ठाण्याकडे खूपच कमी मनुष्यबळ आहे. आंदोलनांचे नियोजन करताना त्यामुळे बऱ्याच अडचणी येतात. हाताशी पुरेशे मनुष्यबळ असेल, तर आंदोलकांना थोपवू शकतो. बाहेरून बंदोबस्त येईपर्यंत वेळ जातो. बंदोबस्तासाठी अधिक मनुष्यबळ द्यावे लागते. सध्या शंभरपेक्षा जास्त पोलिस मित्र असून त्यांची पोलिसिंगच्या कामात मदत घेतली जाते. पोलिसांच्या प्रकृतीची कशी काळजी घेतली जाते? पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांचे 'फिटनेस' चांगले असेल तर ते अधिक चांगले काम करू शकतात. त्यामुळे दोन महिन्यांनी पोलिसांसाठी 'मेडिकल कॅम्प' आयोजित केले जातात. त्यामध्ये पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या सर्व तपासण्या केल्या जातात. तसेच, ताण-तणाव कमी करण्यासाठी शिबिरे घेतली जातात.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सिलिंडर स्फोटात चौघी गंभीर जखमी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पिंपरी
गॅस सिलेंडरचे रेग्युलेटर बंद न केल्यामुळे झालेल्या गॅस गळतीनमुळे मोठा स्फोट होऊन दोन महिलांसह, दोन चिमुकल्या मुली गंभीर जखमी झाल्या आहेत. ही दुर्घटना सोमवारी (८ फेब्रुवारी) सकाळी सातच्या सुमारास पिंपळेगुरवमधील कृष्णा निवास येथे घडली. वर्षा विशाल शिंदे (२७), छकुली विशाल शिंदे (२), योगिता राहुल लांडगे, प्रियांका (पूर्ण नाव व वय समजू शकले नाही, सर्व रा. कृष्णा निवास, पवानानगर) अशी जखमी झालेल्यांची नावे आहेत.
सांगवी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पवनानगर येथील कृष्णा इमारतीमध्ये वर्षा शिंदे आपल्या कुटुंबीयांसोबत राहतात. रविवारी रात्री वर्षा रेग्युलेटर बंद करायला विसरल्या. गॅसमधून थोडा गॅस बाहेर येत होता. मात्र, बंद खिडक्या दारांमुळे गॅस बाहेर जाऊ शकला नाही. सोमवारी सकाळी सातला वर्षा यांनी गॅस सुरू केल्यानंतर मोठा स्फोट झाला. हा स्फोट इतका मोठा होता, की घराचा दरवाजा, खिडक्या तुटून पडल्या. पाणी भरण्यासाठी शिंदे यांच्या दरवाज्यासमोरून जाणाऱ्या योगिता यांनाही स्फोटाची झळ बसली. तर घरात झोपलेल्या प्रियांका आणि वर्षा यांची दोन वर्षांची मुलगीही भाजली आहे. या सर्वांवर खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images