Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

देव यांच्या आत्महत्येचे गूढ कायम

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पिंपरी

चिंचवड देवस्थानचे मुख्य विश्वस्त सुरेंद्र महाराज धरणीधर देव (वय ६३) यांनी रविवारी (१७ जानेवारी) मंगलमूर्ती वाड्यात गळफास घेऊन आत्महत्या केली होती. चार दिवसानंतर देखील देव महाराजांच्या आत्महत्येचे गूढ कायम असून, त्यांच्या आत्महत्येचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

महाराज राहत असलेल्या मंगलमूर्ती वाड्यात योगसाधनेच्या खोलीत त्यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे रविवारी सकाळी उघडकीस आले होते. या धक्कादायक घटनेनंतर शहरात एकच खळबळ उडाली होती. सोमवारी त्यांच्यावर अंत्यविधी करण्यात आले. त्यावेळेस सर्वच क्षेत्रातील मान्यवर आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

देवस्थानच्या परंपरेनुसार २००१ सालापासून महाराजांकडे मुख्य विश्वस्तपदाची धुरा आली होती. देवस्थानच्या अनेक जमीनी त्यांनी गेल्या काही वर्षांमध्ये शहराच्या विकासासाठी उपलब्ध करून दिल्या होत्या. देवस्थानाचा उत्सव मोठ्या स्वरूपात आणि नवनव्या कल्पकतेने करण्याकडे महाराजांना नेहमी कल असे. पण मध्यंतरीच्या काळात देवस्थानच्या ठराविक जमिनी बळकविण्याचा प्रयत्न देखील शहरातील काही बिल्डरांनी केला होता.

महाराजांनी पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेची १९९२ ला निवडणूक लढविली होती. त्यानंतर पुढील पंचवार्षिकला त्यांची स्वीकृत म्हणून देखील निवड झाली होती. शिक्षण मंडळाचे सभापती म्हणून देखील त्यांनी काही काळ काम पाहिले आहे. महाराजांवर मध्यंतरी गुडघा प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया करण्यात आली होती. त्यामुळे ते जाहीर कार्यक्रमांपासून काहीसे दूर असल्याचे सांगितले जाते.

त्यामुळे त्यांच्या आत्महत्येचा वरील सर्व घटना आणि इतिहासाचा काही संबंध आहे का याची चाचपणी करण्यात येत असल्याचे पोलिसांनी मटाशी बोलताना सांगितले. सध्यातरी महाराजांच्या आत्महत्येबाबत ठोस काहीच हाती लागलेले नाही. मात्र, सर्व शक्यता पडताळून पाहण्यात येत असल्याचेही उच्चपदस्थ पोलिस अधिकाऱ्यांनी या वेळी नमूद केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


डॉ. सबनीस यांचं उपोषणास्त्र!

$
0
0

मटा ऑनलाइन वृत्त । पुणे

संमेलनाध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस आणि अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळातील वाद अधिकच चिघळण्याची शक्यता असून २६ जानेवारीपर्यंत आपलं भाषण जसंच्या तसं न छापल्यास २७ जानेवारीपासून उपोषणाला बसण्याचा इशारा सबनीस यांनी दिला आहे.

पिंपरी-चिंचवड येथे झालेल्या ८९व्या साहित्य संमेलनात सबनीस यांच्या भाषणाची छापील प्रत साहित्य महामंडळाने दिली नव्हती. यंदा प्रथमच संमेलनाध्यक्षांचे भाषण साहित्य रसिकांना उपलब्ध होऊ शकलं नाही. महामंडळाने अध्यक्षीय भाषण न छापल्याने उद्घाटनादिवशी संमेलनाध्यक्षांनी स्वतःच भाषण छापून त्याच्या प्रती संमेलनात वितरित केल्या. या पार्श्वभूमीवर, सबनीस यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत आपली भूमिका मांडली व साहित्य महामंडळावर तीव्र शब्दांत आसूड ओढले. सबनीस तेथेच थांबलेले नसून आता तर त्यांनी आपल्या भाषणावरील 'सेन्सॉर' हटावं म्हणून आंदोलनाचं हत्यार उपसण्याचं ठरवलं आहे.

महामडंळाच्या प्रतिसादाची मी २६ जानेवारीपर्यंत वाट पाहणार आहे. तोपर्यंत माझं भाषण छापलं गेलं नाही तर २७ जानेवारीपासून मी पत्नीसह साहित्य महामंडळाच्या कार्यालयाबाहेर उपोषणास बसेन, असा इशारा आज सबनीस यांनी दिला. सबनीस यांच्या या पवित्र्यामुळे साहित्य वर्तुळात एका नव्याच वादाला तोंड फुटलं आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बेळगावच्या कलाकारांचं प्रदर्शन

$
0
0

पुणे टाइम्स टीम

चैतन्य कुबल, सुनील कांबळे, विनायक छत्रे आणि आतेश पाटील या बेळगावच्या नवोदित कलाकारांच्या कलाकृतींचं 'ब्रेक थ्रू म्हणजेच कोशभेद' हे चित्रप्रदर्शन आजपासून (दि. २३) सुरू होत आहे. प्रदर्शनादरम्यान कलाशिक्षणाशी संबंधित 'रसिकसंवादी चित्रकला आणि कोशभेदाची दुनिया' या रवी परांजपे लिखित लेखाचं अभिवाचन होणार आहे. चैतन्य यांचं स्थिर चित्र प्रात्यक्षिकाचं आयोजनही या दरम्यान करण्यात आलं आहे. रवी परांजपे आर्ट गॅलरी, मॉडेल कॉलनी इथं ३० जानेवारीपर्यंत सकाळी ११ ते संध्याकाळी सहा या वेळेत हे प्रदर्शन सर्वांसाठी खुलं राहील.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

परमीट रुमसाठी पोलिस परवान्याची गरज नाही

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

हॉटेल, बिअर बार, परमीट रुम आणि लॉज सुरू करण्यासाठी आता पोलिस परवाना घेण्याचा अडथळा कायमचा दूर होणार आहे. पोलिस परवाना असला पाहिजे, ही पोलिस खात्याची मागणी राज्य सरकारने फेटाळून लावली असल्याने या व्यवसायांसाठी पोलिस परवान्याची गरज नसल्याच्या निर्णयावर शिक्कामोर्तब झाले आहे.

राज्य सरकारने याबाबतचा अध्यादेश काढून त्याची प्रत पोलिस आणि संबंधित खात्यांकडे पाठविली आहे. पोलिस परवान्याची सक्ती रद्द केल्यास कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, असा दावा पोलिसांनी केला होता. मात्र, पोलिसांचे म्हणणे अमान्य करण्यात आल्याचे सांगण्यात आले.

हॉटेल, बिअर बार, परमीट रुम आणि लॉज सुरू करण्यासाठी आतापर्यंत वेगवेगळ्या विभागांकडून परवाने घ्यावे लागतात. त्यामध्ये दुकान परवाना, अन्न आणि औषध प्रशासनाचा परवाना घेणे अत्यावश्यक आहे. बिअर बार आणि परमीट रुम सुरू करायचे असल्यास राज्य उत्पादन शुल्क विभाग आणि पोलिस खात्याचा परवाना लागतो. या चारही विभागांकडून परवाना देताना आणि देण्यात आल्यानंतर एकाच प्रकारचे काम करण्यात येते. कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतो का यापासून ते अन्नपदार्थांचा दर्जा तपासणे, ​दिलेल्या वेळेतच व्यवसाय करण्यात येत आहे का हे पाहिले जाते. त्यामुळे राज्य सरकारने त्यापैकी पोलिस परवाना घेण्याची अट रद्द करण्याचा निर्णय घेतला होता. या निर्णयामुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल, असे पोलिसांचे म्हणणे होते. मात्र, राज्य सरकारने पोलिस खात्याचे म्हणणे अमान्य करून निर्णयावर शिक्कामोर्तब केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दहा वर्षांपासून पुण्यात राहणारा इराणी ताब्यात

$
0
0

दहा वर्षांपासून पुण्यात राहणारा इराणी ताब्यात

म. टा. प्रतिनिधी, पुणे
व्हिसाची मुदत संपल्यानंतरही दहा वर्षे पुण्यात वास्तव्य करणाऱ्या एका इराणी व्यक्तीला गुन्हे शाखेच्या दहशतवादविरोधी पथकाने (पीएटीसी) ताब्यात घेतले आहे. त्याला परत इराणला पाठवून दिले जाणार आहे; तसेच तो राहत असलेल्या घरमालकावर गुन्हा दाखल करण्यात येणार आहे, अशी माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक धनंजय धुमाळ यांनी दिली.
मोहंमद उदेजउल्ला ताकीजादे (वय ४१, रा. विश्रांतवाडी, मूळ रा. शिरा, इराण) असे ताब्यात घेतलेल्या इराणीचे नाव आहे. ताकीजादे याने २००१ मध्ये तेहरान येथे बीएस्सीचे शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर तो २००२ मध्ये एमएस्सी करण्यासाठी पुण्यामध्ये आला होता. यासाठी त्याने पुणे विद्यापीठात प्रवेश घेतला होता. त्याला शिक्षणासाठी २००६ पर्यंतचा व्हिसा देण्यात आला होता. मात्र, व्हिसाची मुदत संपल्यानंतरही तो पुण्यात एका मित्रासोबत राहत होता. त्यानंतर त्याने रिफ्युजी व्हिसासाठी तीन वेळा प्रयत्न केला. परंतु तो मंजूर करण्यात आला नाही.
मोहंमदला व्हिसाची मुदत वाढवून मिळालेली नसतानाही तो विश्रांतवाडी येथील गंधमनगर सोसायटीमध्ये राहत होता. पुण्यात राहणाऱ्या इराणी विद्यार्थ्यांना हवालाच्या माध्यमातून आलेले पैसे पोहोचविण्याचे काम तो करत होता. त्यासाठी त्याला एका मित्राने मदत केली. पण, त्याच्या मित्राला पोलिसांनी २०१३ मध्ये इराणला पाठवून दिले. त्यानंतर तो एकटाच राहत होता. त्याच्याबाबत पुणे पोलिसांना माहिती मिळाल्यानंतर तो दहशतवादी कारवायांमध्ये सहभागी आहे का, यासाठी दोन महिने त्याच्यावर 'वॉच' ठेवण्यात आला. त्याची संपूर्ण माहिती काढल्यानंतर तो दहशतवादी कारवायांमध्ये नसल्याचे स्पष्ट झाले. पण त्याच्या व्हिसाची मुदत दहा वर्षांपूर्वीच संपल्याचे समोर आल्यानंतर त्याला ताब्यात घेण्यात आले आहे. विश्रांतवाडी पोलिसांच्या ताब्यात दिले जाणार आहे. त्यानंतर त्याला इराणला पाठवून दिले जाईल, असेही धुमाळ यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

उजनीत पोहोचले फक्त पाऊण टीएमसी पाणी

$
0
0

उजनीत पोहोचले फक्त पाऊण टीएमसी पाणी

म. टा. प्रतिनिधी, पुणे
महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाच्या आदेशावरून पुण्यातील धरणांतून सोडण्यात आलेल्या पाण्यापैकी फक्त ०.७५ अब्ज घनफूट (टीएमसी) पाणी उजनी धरणात पोहोचले आहे. उजनीसाठी सोडलेले जवळपास दीड टीएमसी पाणी 'वहननाशा'मुळे वाया गेल्याचे स्पष्ट झाले आहे.
पुण्यातील धरणांमधून उजनी धरणात येत्या रविवारपर्यंत पाणी सोडण्यात येणार आहे. या काळात आणखी सुमारे ०.२५ टीएमसी पाणी उजनीत पोहोचेल, असा जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांचा अंदाज आहे. पुण्यातील धरणांतून सोडलेल्या पाण्याचा सोलापूरच्या शेतीला कितपत उपयोग होईल याबाबत शंका उपस्थित केली जात आहे.
पुण्यातील चासकमान व भामा-आसखेड धरणांमधून उजनी धरणात तीन अब्ज घनफूट (टीएमसी) पाणी सोडण्याचा आदेश महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाने दिला आहे. या निर्णयाची जलसंपदा विभागाने अंमलबजावणी करण्यास सुरुवात केली आहे. चासकमान व भामा-आसखेड धरणांचे दरवाजे उघडून आतापर्यंत सुमारे सव्वादोन टीएमसी पाणी नदीत सोडण्यात आले आहे. नदीत सोडलेल्या या पाण्यापैकी फक्त पाऊण टीएमसी पाणी उजनी धरणात पोहोचले आहे.
सोलापूरसाठी सोडलेल्या या पाण्याचा अन्य कोणी शेती व विहिरी भरण्यासाठी उपयोग करू नये, याची काळजी घेण्यात आली होती. त्यासाठी नदीच्या दोन्ही तिरांवरील पाण्याच्या मोटारी बंद करण्याबरोबरच विद्युत पुरवठाही खंडीत करण्यात आला होता. तसेच पोलिस बंदाबस्तामध्ये हे पाणी सोडण्यात आले. मागील आठवड्यात हे पाणी सोडल्यानंतर त्यातील सुमारे सव्वा ते दीड टीएमसी पाण्याचा वहननाश झाला. त्यामुळे उजनीमध्ये प्रत्यक्षात खूपच कमी पाणी पोहोचले, असे जलसंपदा खात्यातील सूत्रांकडून सांगण्यात आले. जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाच्या आदेशाप्रमाणे तीन टीएमसी पाणी सोडायचे आहे. येत्या रविवारपर्यंत (२४ जानेवारी) हे पाणी सोडण्यात येणार आहे, असेही सांगण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भूजल वापरावर आणणार निर्बंध

$
0
0

भूजल वापरावर आणणार निर्बंध

म. टा. प्रतिनिधी, पुणे
बेसुमार पाणी उपशामुळे पुणे जिल्ह्यातील पाणलोट क्षेत्रांचे शोषण होत असून जिल्ह्यातील १३० गावांमधील लघुपाणलोटांचे अतिशोषण झाले आहे. या अतिशोषित पाणलोट क्षेत्रातील दुष्परिणाम रोखण्याबरोबरच टंचाईकाळात पाण्याचे स्रोत बळकट करण्यासाठी या गावांत भूजल वापरावर निर्बंध लागू करण्यात येणार आहेत.
भुजलाचा वापर आणि शोषित पाणलोटाचे नियमन, त्याचे दुष्परिणाम, तसेच लोकसहभागातून भूजल व्यवस्थापन करण्यासंदर्भातील दृष्टीनिबंध भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणेने तयार केला आहे. त्यामध्ये पाणलोट क्षेत्रात होणारा भूजलाचा अतिरेकी वापर, भूजलाची स्थिरता, विहिरींमधील कमी झालेले पाणी, सिंचन क्षेत्रात झालली घट यावर प्रकाशझोत टाकण्यात आला आहे.
जिल्ह्यातील पाणलोट क्षेत्राच्या पाच वर्षांपूर्वी केलेल्या पाहणीत ७१ पाणलोट क्षेत्रांपैकी सात पाणलोट क्षेत्रे अतिशोषित होती. १२ अंशत: शोषित, तर ५२ सुरक्षित होती. त्यानंतर झालेल्या एका पाहणीत सुरिक्षत पाणलोट क्षेत्रांची संख्या ४८ वर आली. दिवसेंदिवस भुजलाचा वापर वाढत आहे. विंधन विहिरी अधिकाधिक खोल करून पाण्याचा उपसा केला जात आहे. परिणामी संपूर्ण जिल्ह्याची भूजल विकासाची स्थिती ७३ टक्क्यांपर्यंत म्हणजे धोक्याच्या पातळीपर्यंत पोहोचली आहे. जिल्ह्यातील २७ टक्के क्षेत्र भूजल अतिशोषणाच्या छायेत आले आहे. दरवर्षी भूजल पातळी ०.१५ ते २.०० मीटरने घटत आहे. सिंचन विहिरींद्वारे भिजणारे क्षेत्र कमी झाले आहे. तसेच भूजल पातळी खोल गेल्यामुळे पाण्याच्या गुणवत्तेवर परिणाम होत आहे.
भूजल पातळीचा होत असलेल्या ऱ्हास रोखण्यासाठी जिल्ह्यातील काही पाणलोटांचे लघु-पाणलोट अधिसूचित करण्यात येणार आहेत. त्यामध्ये शिरूर, पुरंदर, खेड, बारामती, इंदापूर व आंबेगाव या तालुक्यातील १३० गावांचा समावेश आहे. बारामतीमधील सर्वाधिक ३७ गावे भूजल उपशासाठी अधिसूचित करण्यात येणार आहेत. तसेच शिरूरमधील १८, पुरंदर १८, जुन्नर २०, इंदापूर १५ व खेडमधील चार गावे अधिसूचित क्षेत्रात आहेत.
.....................
अधिसूचित गावांत येणारे निर्बंध
दोनशे फुटांपेक्षा खोल विंधन विहीर खोदण्यास मनाई
सर्व विहीरमालक, रिग व खोदाई यंत्रणा मालकांची नोंद
अनधिकृत खोदाई करणाऱ्यांवर कारवाई
साठ मीटरपेक्षा खोल विहिरींवर उपकर
भूजल प्रदूषण रोखताना प्रभावक्षेत्र जाहीर करणार
वार्षिक भूजल आराखडा लोकसहभागातून करणार
कमी पाणी लागणाऱ्या पिकांची लागवड
भूजल पुनर्भरणासाठी वाळू उत्खननाचेही नियमन होणार

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

संमेलनाध्यक्षांचे उपोषणास्त्र

$
0
0

संमेलनाध्यक्षांचे उपोषणास्त्र

म. टा. प्रतिनिधी, पुणे
पिंपरी-चिंचवड येथे झालेल्या ८९व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस आणि अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळ यांच्यातील वाद चिघळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. साहित्य महामंडळाने २६ जानेवारीपर्यंत आपले भाषण न छापल्यास २७ जानेवारीपासून पत्नीसह उपोषणाला बसण्याचा इशारा सबनीस यांनी दिला.
साहित्य संमेलनात सबनीस यांच्या भाषणाची छापील प्रत साहित्य महामंडळाने उपलब्ध करून दिली नव्हती. यंदा प्रथमच संमेलनाध्यक्षांचे भाषण साहित्य रसिकांना मिळू शकले नाही. महामंडळाने अध्यक्षीय भाषण न छापल्याने उद्घाटनादिवशी संमेलनाध्यक्षांनी स्वतःच भाषण छापून त्याच्या प्रती संमेलनात वितरित केल्या. या पार्श्वभूमीवर, सबनीस यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत आपली भूमिका मांडली व साहित्य महामंडळावर खरमरीत टीका केली होती. साहित्य महामंडळाचे सेन्सॉर बोर्ड कधी झाले, असा सवाल त्यांनी उपस्थित केला होता. महामंडळावर केवळ टीका न करात सबनीस यांनी भाषणावरील 'सेन्सॉर' हटवण्यासाठी आंदोलन करण्याचा पवित्रा घेतला आहे.
'साहित्य महामडंळाकडून २६ जानेवारीपर्यंत प्रतिसाद मिळण्याची वाट पाहणार आहे; तसेच दिलीपराज प्रकाशनाने छापलेल्या प्रतींचे बिलही महामंडळाने भरावे. या दरम्यान भाषण छापले न गेल्यास पत्नीसह साहित्य महामंडळाच्या कार्यालयाबाहेर उपोषणास बसण्याचा निर्णय घेतला आहे,' अशा शब्दांत त्यांनी महामंडळाला इशारा दिला. एकीकडे, सबनीस यांनी छापलेल्या प्रतींचे बिल देण्याची मागणी महामंडळाकडे केली असली, तरी बिलाची नेमकी रक्कम त्यांनी नमूद केलेली नाही.
................

सबनीस यांनी त्यांच्या भाषणाची प्रत महामंडळाला उशीरा दिली. महामंडळाने भाषण सेन्सॉर करण्याचा प्रश्नच नाही. महामंडळ नेहमीच अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा पुरस्कार करते. अध्यक्षांचे भाषण छापण्याची महामंडळावर कोणतीही सक्ती नाही. तसा घटनेतही उल्लेख नाही. महामंडळाची आगामी बैठक मार्चमध्ये आहे. त्या बैठकीत सबनीस यांनी मागणी केलेले बिल देण्याबाबतचा विषय ठेवला जाईल. त्यामुळे २६ जानेवारीच्या आत सबनीस यांची मागणी पूर्ण करणे शक्य नाही. सबनीस यांनी उपोषण करू नये. महामंडळ त्यांच्याशी संवाद साधण्यास तयार आहे.
डॉ. माधवी वैद्य, अध्यक्षा, अखिल भारतीय साहित्य महामंडळ
..................
संस्थांचा सबनीस यांना पाठिंबा
संमेलनाच्या इतिहासात प्रथमच अध्यक्षीय भाषण न छापल्याची घटना घडल्याने नाराज झालेल्या डॉ. श्रीपाल सबनीस यांना साहित्य वर्तुळातील काही संस्थांनी पाठिंबा दिला आहे. भाषाप्रेमी अनिल गोरे (मराठीकाका), नेताजी खंडागळे यांची सह्याद्री फाउंडेशन आणि कैलास भिंगारे यांची साहित्यवेध प्रतिष्ठान यांनी साहित्य महामंडळाला पत्र लिहून सबनीस यांचे भाषण प्रसिद्ध करण्याचे निवेदन दिले आहे. सबनीस यांनी मांडलेल्या भूमिकेलाही पाठिंबा देण्यात आला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


शिक्षणशास्त्र कोर्ससाठी एनसीटीई देणार प्रोत्साहन

$
0
0

शिक्षणशास्त्र कोर्ससाठी एनसीटीई देणार प्रोत्साहन

पुणे : पारंपरिक शैक्षणिक अभ्यासक्रम चालविणाऱ्या कॉलेजांना शिक्षणशास्त्राचे अभ्यासक्रम सुरू करण्यासाठी राष्ट्रीय शिक्षक शिक्षण परिषद (एनसीटीई) या पुढील काळात प्रोत्साहन देणार आहे. त्या आधारे नियमित कॉलेजांमधून चार वर्षे कालावधीचे बीएबीएड आणि बीएस्सीबीएड हे एकत्रित अभ्यासक्रम सुरू होणार आहेत. इतर व्यावसायिक अभ्यासक्रमांप्रमाणेच शिक्षकांसाठीच्या व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठीही या पुढे 'कॅच देम यंग' हे सूत्र पाळतानाच गुणवत्तावृद्धीसाठी प्रयत्न होणार असल्याचे 'एनसीटीई'कडून स्पष्ट केले जात आहे. 'एनसीटीई'चे अध्यक्ष प्रोफेसर संतोष पांडा यांनी 'मटा'ला 'एनसीटीई'च्या त्याविषयीच्या प्रयत्नांची माहिती दिली. बीएबीएड किंवा बीएस्सीबीएड या चार वर्षांच्या अभ्यासक्रमांचा देशभरात प्रसार आणि प्रचार करण्यासाठी 'एनसीटीई'ने व्यापक धोरणे योजली आहेत. नव्या शैक्षणिक धोरणाच्या माध्यमातूनही त्यासाठीचा पाठपुरावा करण्यात आल्याचे त्यांनी शुक्रवारी पुण्यात 'मटा'ला दिलेल्या सविस्तर मुलाखतीमध्ये सांगितले.
प्रोफेसर पांडा म्हणाले, 'देशभरातील डीएड, बीएड, एमएड अभ्यासक्रमांचा दर्जा आणि शिक्षकांच्या गुणवत्तेमध्ये सुधारणा करण्यासाठी न्यायमूर्ती वर्मा समितीने सादर केलेल्या अहवालामधील सूचनांचा विचार करून आम्ही पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. त्यातूनच या इंटिग्रेटेड अभ्यासक्रमांची सुरुवात झाली आहे. सध्या नियमित शिक्षणशास्त्राचे शिक्षण देणाऱ्या संस्थांमधून हे अभ्यासक्रम सुरू झाले आहेत. मात्र, या अभ्यासक्रमांना आवश्यक असणाऱ्या बी एस्सी, बीए या अभ्यासक्रमांमधील विषयज्ञानाच्या पूर्ततेचा विचार करता, हे अभ्यासक्रम नियमित कॉलेजांमधून सुरू होणे रास्त आहे. त्याचाच विचार करून आम्ही नियमित कॉलेजांना त्यासाठी प्रोत्साहन देणार आहोत.'
ज्या कॉलेजांमधून यापूर्वीच शिक्षणशास्त्र शिकविले जात आहे, त्या कॉलेजांना नियमित बीए, बीएस्सीचे अभ्यासक्रम सुरू करण्याच्या सूचनाही करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. 'एनसीटीई'च्या माध्यमातून येत्या काही काळात प्रसिद्ध होणाऱ्या जाहिरातींमधूनही या बाबीचा पाठपुरावा केला जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. या पुढील काळात राष्ट्रीय पातळीवरूनच बीएस्सीबीएडच्या अभ्यासक्रमाला अधिक चालना दिली जाणार आहे. हे अभ्यासक्रम पूर्ण करणाऱ्यांना संस्था मदत करणार आहे. या अभ्यासक्रमांच्या विद्यार्थ्यांना काही संस्था स्टायपेंड देण्यासाठीही तयार आहेत; तसेच या अभ्यासक्रमानंतर विद्यार्थ्यांना एमएस्सीकडे जाण्याचीही संधी उपलब्ध करून दिली जात आहे. या अभ्यासक्रमाची पहिली बॅच देशभरात सुरू आहे. या पुढील काळात मिळणारा प्रतिसाद लक्षात घेत, बीएडचे अभ्यासक्रम सुरू ठेवायचे की नाही, याचा विचार करता येणार असल्याचेही प्रोफेसर पांडा यांनी सांगितले.
................
बीटेक, बीईवाल्यांनाही संधी
विज्ञान आणि गणिताच्या शिक्षकांची देशभरात असणारी कमतरता दूर करण्यासाठीही या एकत्रित अभ्यासक्रमांमधून प्रयत्न होणार आहेत. त्याचाच एक भाग म्हणून या पुढील काळात इंजिनीअरिंग विद्याशाखेतून बीटेक, बीई पदवी मिळविणारे उमेदवारही बीएडला प्रवेश घेऊ शकतील. त्यासाठीही विशेष धोरणे योजली जात असल्याचे प्रोफेसर पांडा यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वाळूचोरांच्या बोटी जिलेटीनने उडवल्या

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

उजनी धरणाच्या जलाशयातून बेकायदा वाळू उपसा करणाऱ्या चाळीस बोटी महसूल प्रशासनाने शुक्रवारी जिलेटीनने उडवून दिल्या. वाळूमाफियांवर जरब बसविण्यासाठी प्रशासनाने प्रथमच एवढी मोठी कारवाई केली.

उजनी धरणाच्या बॅक वॉटरमध्ये इंदापूरमधील पळसदेव डाळज भागात बेकायदा वाळू उपसा सुरू असल्याची तक्रार विभागीय आयुक्त एस. चोक्कलिंगम यांच्याकडे आली होती. त्या अनुषंगाने विभागीय आयुक्तांनी बारामती प्रांत तसेच, गौण खनिज विभागाच्या अधिकाऱ्यांचे पथक तेथे पाठविण्याच्या सूचना दिल्या होत्या. बारामती प्रांत अधिकारी संतोष जाधव यांच्या पथकाने वाळूउपसा सुरू असलेल्या ठिकाणी धडक मारली आणि वाळू उपसा रोखला. वाळू उपसण्यासाठी जलाशयात चाळीस बोटी सोडण्यात आल्या होत्या. या बोटी पथकाने ताब्यात घेतल्या. या सर्व बोटी प्रांत अधिकारी जाधव यांनी जिलेटीनने उडवून दिल्या. या बोटींची किमत साधारणतः दोन कोटी रुपये आहे.

वाळूचोरी करणाऱ्यांवर कठोर कारवाईचे पाऊल उचलण्यात आले आहे. वाळूमाफियांना मोक्का लावण्यापासून वाहने जप्त करून त्यांचे लिलाव करण्यापर्यंत कारवाई करण्यात येत आहे. परंतु राजकीय वरदहस्तामुळे वाळूमाफिया प्रशासनाला जुमानत नसल्याचे चित्र आहे. वाळूचोरी रोखण्यास गेलेल्या तलाठ्यांसह तहसीलदारांवर हल्ले करण्यापर्यंत त्यांची मजल गेली आहे. त्यामुळे वाळूमाफियांवर जरब बसविण्यासाठी त्यांच्या बोटी जिलेटीनने नष्ट करण्याची कडक कारवाई करण्यात आली. दरम्यान, वाळूचोरी करणाऱ्या माफियांवर यापुढे अशीच कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचे अतिरिक्त जिल्हाधिकारी प्रदीप पाटील यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शहराचा डीपी रद्द करा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

शहराच्या जुन्या हद्दीच्या विकास आराखड्यासाठी (डीपी) सरकारने नेमलेल्या त्रिसदस्यीय समितीने केलेल्या शिफारसी पुणेकरांसाठी हितावह नाहीत. त्यामुळे, मुंबईच्या डीपीप्रमाणेच पुण्याचा डीपीही रद्दच केला जावा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेससह शहरातील स्वयंसेवी संस्था-संघटना आणि नगररचना तज्ज्ञांनी शुक्रवारी केली. डीपीतील त्रुटींकडे लक्ष वेधण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे हजारोंनी पत्रे पाठविण्याचा निर्णयही घेण्यात आला.

शहराच्या डीपी राज्य सरकारने पालिकेकडून ताब्यात घेतल्यानंतर त्याची उर्वरित प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी विभागीय आयुक्त एस. चोक्कलिंगम यांच्या अध्यक्षतेखाली त्रिसदस्यीय समिती नेमली होती. या समितीने केलेल्या शिफारसी शहरासाठी घातक असल्याने पालिकेतील राष्ट्रवादी आणि काँग्रेसने त्याविरोधात आंदोलन सुरू केले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने शुक्रवारी त्या संदर्भात एक चर्चासत्र आयोजित केले होते. त्यामध्ये, स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी, नगररचना तज्ज्ञ, अभ्यासक, पर्यावरणप्रेमी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. डीपीच्या मूळ प्रा-रूप आराखड्यापासून ते सरकारनियुक्त समितीने केलेल्या बदलांपर्यंतच्या अनेक गोष्टी शहराच्या भवितव्याच्या दृष्टीने अपायकारक आहेत. त्यामुळे, त्यात पुन्हा-पुन्हा बदल करण्याऐवजी हा सर्व डीपीच रद्द करून पुन्हा नव्याने आराखडा मांडण्यात यावा, असा सूर या चर्चासत्रात व्यक्त झाला.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या माजी महापौर राजलक्ष्मी भोसले यांनीच डीपी रद्द करण्याचा विषय सर्वप्रथम मांडला. मुंबईचा डीपी ज्या मुद्द्यांवर रद्द करण्यात आला, त्याचप्रमाणे पुण्याचा डीपीही रद्द केला जावा, अशी भूमिका त्यांनी व्यक्त केली. तर, अनिता गोखले-बेनिंजर यांनीही त्रिसदस्यीस समितीने केलेल्या अहवालाला केराची टोपली दाखविण्याची गरज आहे, असे मत व्यक्त केले. 'आधीच खूप वेळ गेला आहे म्हणून आता फक्त दुरुस्ती करणेच योग्य ठरेल, हा दावाच चुकीचा आहे. पुणेकरांच्या माथी सदोष आराखडा मारण्यापेक्षा सर्व प्रक्रिया नव्याने करणेच सोयीस्कर ठरेल. सरकारनियुक्त त्रिसदस्यीय समितीनेच नाही, तर त्यापूर्वीच्या समितीनेही डीपीत अनेक चुका केल्या आहेत', अशा शब्दांत परिसरचे सुजित पटवर्धन आणि सजग नागरिक मंचाचे विवेक वेलणकर यांनी डीपीवर टीका केली. तसेच, तो रद्द करण्याचा पुनरूच्चार केला.

'मूळ आराखडाच चुकीचा'

डीपीवरील हरकती-सूचनांची सुनावणी घेण्यासाठी नेमलेल्या समितीमध्ये पर्यावरत तज्ज्ञ सारंग यादवाडकर यांचा समावेश होता. परंतु, यादवाडकर यांनीही डीपीचा मूळ आराखडाच चुकीचा असल्याची कबुली देऊन त्यात सुधारणा करून चालणार नाही, असा दावा केला. हा डीपी रद्द करण्यासाठी मुख्यमंत्र्‍यांची भेट घेणे; अथवा मुख्यमंत्र्यांना हजारो पत्रे पाठविणे, असे यावेळी ठरविण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शिवसृष्टीवरून रंगली शेरेबाजी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

कोथरूड येथील कचरा डेपोच्या जागेवर प्रस्तावित शिवसृष्टी प्रकल्पाच्या बजेटमधील काही निधी प्रभागातील क्रिकेट मैदानासाठी देण्याच्या प्रस्तावावरून शुक्रवारी सर्वसाधारण सभेत राजकीय शेरेबाजी रंगली. प्रस्तावाला मान्यता देताना पालिकेत सत्ताधारी असलेल्या काँग्रेस, राष्ट्रवादीमध्येच काही वेळ शाब्दिक युद्ध रंगले. शिवसेना, भाजपसह मनसेच्या सभासदांनी हा निधी वळविण्यास विरोध केल्याने मतदान घेऊन हा विषय मान्य करण्यात आला. दरम्यान, शिवसृष्टीसंदर्भात रखडलेली बैठक आठवडाभरात घेण्याचे आश्वासन पुन्हा एकदा महापौर दत्तात्रय धनकवडे यांनी सभागृहात दिले.

कोथरूड येथील कचरा डेपोच्या जागेवर शिवसृष्टी आणि मेट्रो रेल्वेचे स्टेशन प्रस्तावित आहे. या जागेत नक्की काय करायचे, हा निर्णय पालिकेकडून लांबणीवर टाकला जात आहे. बजेटमध्ये शिवसृष्टीसाठी ठेवण्यात आलेल्या दोन कोटी रुपयांचे वर्गीकरण याच भागात शिवछत्रपती क्रिकेट स्टेडियम बांधण्यासाठी करावे, असा प्रस्ताव दीपक मानकर, सचिन दोडके यांनी दिला होता. याला शिवसेनेचे पृथ्वीराज सुतार यांनी आक्षेप घेऊन या जागेत शिवसृष्टी करायची की मेट्रो स्टेशन याचा निर्णय महापौर घेत नसल्याबद्दल टीका केली. हे वर्गीकरण म्हणजे या जागेवर शिवसृष्टी होणार नसून, मेट्रो स्टेशनच होणार असल्याचा संकेत असल्याची भूमिका विरोधी पक्षनेते अरविंद शिंदे यांनी मांडली. त्यावर माजी सभागृह नेते सुभाष जगताप यांनी काँग्रेसचे तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी प्रस्तावावर वेळेत सही न केल्याने ही स्थिती निर्माण झाल्याची टीका केली. आमच्या पक्षाचा विकासकामांना पाठिंबाच आहे. मुख्यमंत्र्यांचा निर्णय योग्यच होता. त्यांचे नाव घेऊ नका, मी तत्कालीन उपमुख्यमंत्र्यांचे नाव घेतले तर तुम्हाला मिरची झोंबेल या शब्दात शिंदेंनी जगताप यांना प्रत्युत्तर दिले.

'निधीच्या वापराअभावी वर्गीकरण प्रस्ताव'

निधीचा वापर होणार नसल्याने या वर्गीकरणाला अनुमोदन दिल्याचे मानकर यांनी स्पष्ट केले. महापौरांनी तातडीने बैठक घेऊन शिवसृष्टीबाबत निर्ण‍य घ्यावा, अशी मागणी मानकर यांनी केली. ज्या प्रभागात हे वर्गीकरण केले जात आहे, तेथे मनसेच्या नगरसेविका असूनही त्यांचे नाव प्रस्तावात नाही. त्यामुळे महाराजांचा उदार दृष्टिकोन सभागृह नेते तुम्ही स्वीकारा, असे किशोर शिंदे यांनी सुनावले. अखेर मतदान घेऊन हा विषय मान्य करण्यात आला. दरम्यान, पुढील आठवड्यात शिवसृष्टीची बैठक घेण्याचे आश्वासन महापौर दत्तात्रय धनकवडे यांनी दिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आयुक्तांचा जपान दौरा वादात सापडणार?

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

महापालिका आयुक्त कुणाल कुमार यांचा जपान दौरा वादात सापडण्याची शक्यता आहे. कुमार यांच्या अंगलट दौरा येण्याचे संकेत शुक्रवारी महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत सभासदांनी दिले. आयुक्तांचे बजेट स्थायी समितीला सादर करण्याचे वेळापत्रक बदलण्यास मान्यता देण्याचा विषय सभागृहात मान्यतेसाठी ठेवण्यात आला होता. त्यावेळी या विषयाचे निमित्त करून आयुक्तांच्या दौऱ्याबद्दल अनेक प्रश्न सभागृहात उपस्थित करण्यात आले. आयुक्त उपस्थित असताना त्यांना प्रश्न विचारून अडचणीत आणण्याचे संकेत सभासदांनी दिले.

पालिका आयुक्त कुमार पालकमंत्री गिरीश बापट, पीएमआरडीएचे सीईओ यांच्याबरोबर जपान दौऱ्यावर गेले आहेत. आयुक्त दौऱ्यावर जाणार असल्यानेच त्यांचे बजेट सादर करण्यास जानेवारीचा शेवटचा आठवडा उजाडला आहे. पालिकेतील पदाधिकाऱ्यांना विश्वासात न घेता आयुक्तांनी हा दौरा निश्चित केल्याने नाराजी आहे. आयुक्तांचे बजेट स्थायी समितीसमोर सादर करण्यासाठी मुदतवाढ मिळावी, असा प्रस्ताव प्रशासनाने सभेच्या मंजुरीसाठी ठेवला होता. हा प्रस्ताव चर्चेसाठी आला असताना विरोधी पक्षतेने अरविंद शिंदे यांनी आयुक्तांच्या दौऱ्याबद्दल काही प्रश्न उपस्थित केले. जपान दौऱ्याचे आमंत्रण आयुक्तांना कुणी दिले, केंद्र सरकारने की राज्य सरकारने असे प्रश्न शिंदे यांनी विचारले. आयुक्तांना कुणाचे निमंत्रण होते, याची कोणतीही माहिती सध्या आपल्याकडे नसल्याचे अतिरिक्त‌ आयुक्त ओमप्रकाश बकोरिया यांनी स्पष्ट केले. आयुक्त कोणाच्या परवानगीने दौऱ्यावर गेले, असा प्रश्नही शिंदे यांनी उपस्थित केला.

भाजपचे गटनेते गणेश बीडकर यांनी आयुक्त नसताना त्यांच्याबाबतचे प्रश्न विचारू नयेत असे सांगून शिंदे यांना थांबवण्याचा प्रयत्न केला. तरीही शिंदे यांनी मुख्य सभेने मान्य केलेले अंदाजपत्रकाचे वेळापत्रक का बदलायचे अशी विचारणा केली. आयुक्त नसतील तर, त्यांच्या प्रस्तावाला मान्यताही ते आल्यावरच देऊ असे ते म्हणाले. काही सदस्यांनी त्यांना अनुमोदन दिले. बीडकर यांनी सामोपचाराची भूमिका घेऊन चर्चा नको, विषय मंजूर करा अशी विनंती केली. त्याला मान्यता देऊन पुढचे प्रश्न आयुक्त आल्यावर त्यांनाच विचारू असे म्हणत त्यांचा दौरा वाऱ्यावर सोडणार नाही, असे सभासदांनी स्पष्ट केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पालिका सल्लागाराचा आराखडाच अंतिम

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

चांदणी चौकातील प्रस्तावित दुमजली उड्डाणपुलासाठी महापालिकेच्या सल्लागाराने तयार केलेला आराखडा कायम ठेवण्याचा निर्णय, भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या शुक्रवारी झालेल्या आढावा बैठकीत घेण्यात आला. या बैठकीत सर्व तांत्रिक बाबींची चर्चा करण्यात झाली असून, त्याचा अहवाल १५ फेब्रुवारीपर्यंत 'एनएचएआय'च्या केंद्रीय कार्यालयाला पाठविला जाणार आहे.

चांदणी चौकात प्रस्तावित असलेल्या दुमजली उड्डाणपुलाबाबत आढावा बैठक आयोजिण्यात आली होती. भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाची (एनएचएआय) तांत्रिक टीम, पुणे महानगरपालिकेच्या कन्सल्टंटची तांत्रिक टीम, 'एनएचएआय'चे प्रकल्प संचालक प्रफुल्ल दिवाण, प्रकल्प व्यवस्थापक मिलिंद वाबळे, आमदार मेधा कुलकर्णी, आमदार भीमराव तापकीर या वेळी उपस्थित होते.

'हा उड्डाणपूल तीन टप्प्यात होणार आहे. यासाठी अडीच वर्षांचा कालावधी लागण्याची शक्यता आहे. मात्र, येथे उड्डाणपूल व रस्ता रुंदीकरणासाठी डिफेन्स, वन विभाग व महापालिकेच्या हद्दीतील जागा लागणार आहे. या जागांचे भूसंपादन लवकर झाल्यास, काम लवकर सुरू होऊन नियोजित कालावधीत पूर्ण होईल, असे कुलकर्णी यांनी यांनी सांगितले. तसेच, यासंबंधी गरज पडल्यास गडकरींसोबत दिल्लीला विशेष बैठक आयोजित केली जाईल,' असे कुलकर्णी यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, साताऱ्याकडून येणाऱ्या व कोथरूडकडे जाऊ इच्छिणाऱ्या वाहनांना मोठा वळसा मारावा लागू नये. आणि मुळशीकडून येणाऱ्या वाहनांना कोथरूडकडे येण्यासाठी विनाअडथळा येता यावे, यासाठी तरतूद करण्याची कुलकर्णी यांनी केलेली मागणी 'एनएचएआय' मान्य केली. हे काम सुरू केल्यानंतर वाहतूक नियोजन करणे, हे यंत्रणांच्या दृष्टीने महत्त्वाचे ठरणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पुण्यातील तरुण ‘आयएस’च्या गळाला

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

पुण्यात गेली पाच वर्षे वास्तव्यास असलेला काश्मिरी तरुण इस्लामिक स्टेटच्या (आयएस) जाळ्यात अडकल्याचे उघडकीस आले आहे. दहशतवाद विरोधी पथकाकडून (एटीएस) गेल्या तीन दिवसांपासून या तरुणाकडे कसून चौकशी करण्यात आली. सोशल नेटवर्किंग साइटच्या माध्यमातून हा तरुण 'आयएस'च्या संपर्कात आला होता.

'एटीएस'ने सोशल नेटवर्किंग साइटवर आपले लक्ष केंद्रीत केले होते. त्यातील एका साइटच्या माध्यमातून हा तरुण 'आयएस'च्या संपर्कात असल्याचे उघडकीस आले होते. 'एटीएस'ने गेली तीन दिवस त्याच्याकडे कसून चौकशी केली. या प्रकरणी 'एटीएस'चे सहायक आयुक्त भानुप्रताप बर्गे यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी या कारवाईबाबत माहिती देण्यास नकार दिला.

दरम्यान, या तरुणाकडील चौकशीत त्याच्याकडून फारशी काही गंभीर माहिती हाती लागली नाही. त्यामुळे त्याला समज देऊन सोडून देण्यात आले. एका व्यक्तीच्या संपर्कातून तो 'आयएस'च्या नेटवर्कमध्ये ओढला गेल्याचे उघडकीस आले आहे. तो कोंढवा परिसरात राहत असून, गेली पाच वर्षे तो पुण्यात शिक्षण घेत आहे. सध्या तो मॅनेजमेंटचे शिक्षण घेत असून, त्याच्याशी संबंधित अनेकांकडे चौकशी करण्यात आल्याचे उच्चपदस्थ सूत्रांनी सांगितले. पुण्यात अकरावीत शिकणाऱ्या सोळा वर्षांच्या मुलीला 'आयएस' या दहशतवादी संघटनेत जाण्यापासून रोखण्यात 'एटीएस'ला यश आले होते. ही मुलगी सोशल नेटवर्किंग साइटद्वारे सौदी अरेबिया, केनिया, दुबई, ब्रिटन या देशांतील 'आयएस'शी संबंधित सुमारे दोनशे जणांच्या संपर्कात होती. याच संश​यितांच्या संपर्कात हा तरुण होता. या तरुणाचेही समुपदेशन करण्यात आले असून, त्याच्यावर तपास यंत्रणांनी नजर ठेवल्याचे सूत्रांनी सांगितले.

'एनआयए'च्या कारवाईला वेग

राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) देशभरात कारवाई करून 'आयएस'शी संबंधित काही तरुणांना ताब्यात घेतले आहे. या कारवाईसाठी विविध राज्यातील तपास यंत्रणांची मदत घेण्यात आली. पुण्यातील 'एटीएस'च्या अधिकाऱ्यांना मदतीसाठी थांबवण्यात आले होते. दरम्यान, 'एटीएस'च्या मुंबई आणि पुणे येथील कार्यालयाला तसेच बर्गे यांना धमकी देणारी दोन पत्रे प्राप्त झाली आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


सत्ताधाऱ्यांची उधळपट्टी सुरूच

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

मिळणारे उत्पन्न आणि तुलनेत होणाऱ्या खर्चात मोठी तफावत निर्माण होत असल्याने महापालिकेचे बजेट कोलमडून पडत असतानाच पालिकेतील सत्ताधाऱ्यांनी मात्र उधळपट्टी सुरूच ठेवली आहे. कोणत्याही संस्थेला तीन लाख रुपयांची आर्थिक मदत देण्याचे बंधन पालिकेवर असताना, 'द मीडिया रुटस' या संस्थेला कृषी सन्मान पुरस्कार देण्यासाठी पाच लाख रुपयांच्या वर्गीकरणाला शुक्रवारी सर्वसाधारण सभेत एकमताने मंजुरी ‌देण्यात आली.

या प्रस्तावावर कोणतीही चर्चा न करता हा प्रस्ताव तातडीने मंजूर करण्यात आला. विशेष म्हणजे हा प्रस्ताव मान्य होण्यापूर्वी राजा दिनकर केळकर संग्रहालयाला एक लाख रुपये देणगी देण्याचा प्रस्ताव सत्ताधाऱ्यांनी महिनाभर पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. कृषी सन्मान पुरस्कार देण्यासाठी तीन लाख रुपयांची देणगी मीडिया रुटस या संस्थेला देण्याचा प्रस्ताव मुख्य सभेसमोर मांडण्यात आला होता. कृषी पुरस्काराने गौरवण्यात येणाऱ्या ३० पुरस्कार्थींना प्रत्येकी पाच हजार रुपये, दे‍ण्यात यावे असा प्रस्ताव ठेवण्यात आला होता. यामध्ये देणगी, मानचिन्ह, पुष्पगुच्छ, शाल यांचा समावेश आहे.

कोणत्याही संस्थेला पालिकेला तीन लाख रुपयांपर्यंत आर्थिक मदत करण्याचे अधिकार आहेत. या पुरस्कारांच्या माध्यमातून वाढीव दोन लाख रुपयांच्या मदतीची पळवाट शोधण्यात आली आहे. पालिकेच्या नियमांना डावलून ही वाढीव मदत कशासाठी? स्थायीपाठोपाठ सर्वसाधारण सभेने त्याला मान्यता कशी दिली? पुरस्कारांच्या धनादेशाची रक्कम आणि इतर खर्चही पालिकेकडून वसूल करण्याचे कारण काय? असे आक्षेप घेण्यात येत आहेत. यापूर्वी तीन लाखांपेक्षा अधिक आर्थिक मदत करण्यावरून यापूर्वी बराच गदारोळ झाला आहे. कायद्याचे उल्लंघन करून अशी मदत पालिकेला करता येणार नाही, असे वेळोवेळी तत्कालीन पालिका आयुक्तांनी स्पष्ट केले आहे. तरीही हा प्रस्ताव मंजूर केला आहे. या प्रस्तावाची पालिका प्रशासन अंमलबजावणी करणार का असा प्रश्न विचारला जात आहे. राजा दिनकर केळकर संग्रहालयाला देणगी म्हणून एक लाख रुपये देण्याचा प्रस्ताव सत्ताधारी असलेल्या काँग्रेस, राष्ट्रवादीच्या सभासदांनी पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला, मग खासगी संस्थेला कृषी पुररस्कारासाठी पाच लाख रुपये वर्गीकरणाचा प्रस्ताव मान्य करण्याचा हट्ट का? असा प्रश्नही विचारला जात आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आपटे रोडवरील सोसायटीत घरफोडी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

आपटे रोडवरील उच्चभ्रू अशा धनंजय सोसायटीतील बंद फ्लॅट फोडून चोरट्यांनी सोन्याचे दागिने आणि डॉलर असा सव्वा लाखांचा ऐवज चोरून नेल्याची घटना शुक्रवारी सकाळी उघडकीस आली. सुरक्षारक्षक आणि सीसीटीव्ही असतानाही कारमधून आलेल्या चोरट्यांनी चोरी केल्याचे दिसून आले. चोरी करताना चोरट्यांनी चेहऱ्यावर मास्क लावले होते. या प्रकरणी डेक्कन पोलिस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कौशिक कानुभाई पटेल (वय ५३ रा. धनंजय सोसायटी, मूळ रा. आनंद, गुजरात) यांनी तक्रार दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कौशिक पटेल आणि त्यांची पत्नी गुजरातमधील आनंद येथे रहातात. या ठिकाणी ते वसतीगृह चालवितात. त्यांना दोन मुले असून, दोघेही अमेरिकेत नोकरीला आहेत. पटेल दोन ते तीन महिन्यातून पुण्यात राहण्यासाठी येत आहेत. रोज त्यांच्या फ्लॅटची साफसफाई करण्यासाठी कामगार येऊन जातात. २० जानेवारी रोजी सकाळी पटेल यांच्या फ्लॅटचा दरवाजा शेजारच्यांना उघडा दिसला. त्यामुळे पटेल पुण्यात आले असतील, असा अंदाज त्यांनी बांधला. परंतु, दिवसभर घरातून कोणीच बाहेर पडले नाही. त्यामुळे शेवटी शेजाऱ्यांनी याबाबत सोसायटीच्या अध्यक्षांना माहिती दिली. त्यांनी पटेल यांच्याशी संपर्क साधल्यानंतर घरामध्ये चोरी झाल्याचे स्पष्ट झाले.

निरोप मिळाल्यानंतर पटेल शुक्रवारी सकाळी पुण्यात आले. त्यानंतर त्यांनी डेक्कन पोलिसांमध्ये तक्रार नोंदवली. पोलिसांनी धनंजय सोसायटीमधील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता, २० जानेवारी रोजी पहाटे चार ते पाच दरम्यान मोटारीतून चोरटे आतमध्ये गेल्याचे निदर्शनास पडले. त्यांनी चेहऱ्याला मास्क लावले आहे. चोरट्यांनी फ्लॅटच्या दरवाजाचा कडी-कोयंडा उचकटून आत प्रवेश केला. घरातील सात ते आठ तोळे सोन्याचे दागिने, ४२ डॉलर असा एकूण सव्वा लाख रूपयांचा ऐवज लंपास केला. सोसायटीच्या प्रवेशद्वारावर दोन सुरक्षारक्षक असून, तेथे सीसीटीव्ही लावण्यात आले आहेत. सीसीटीव्हीत चोरटे कैद झाले असले तरी, त्यांचे चेहरे स्पष्ट दिसत नाहीत. तसेच, कॅमेऱ्यासमोर त्यांनी तोंड झाकल्याचे आढळून आले आहे. या प्रकरणी डेक्कन पोलिस अधिक तपास करत आहेत.

हॉटेल कोहिनूर चोरीचा तपास लागेना

आपटे रोडवरील धनंजय सोसायटीपासून काही अंतरावरच असलेल्या हॉटेल कोहिनूरच्या तिजोरीतील ३६ लाख रुपये चोरून नेल्याच्या घटनेला आता दोन महिने उलटले आहेत. तरीही या गुन्ह्यातील आरोपींना पकडण्यात पोलिसांना अद्याप यश आलेले नाही. पोलिसांनी आपटे रोड परिसरातील सीसीटीव्ही ताब्यात घेऊन चौकशी केली. मात्र, काहीही हाती लागलेले नाही. तसेच, आपटे रोड परिसरात पोलिसांवर गोळी झाडणारा आरोपीही अद्याप पोलिसांना सापडलेला नाही.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

थोरल्या माधवरावांचे अप्रकाशित चित्र उजेडात

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

इतिहास आणि ऐतिहासिक ठेव्याबाबत नवी पिढी उदासीन असल्याची टीका होते. नोकरीनिमित्त परदेशी असलेल्या तरुणाच्या इतिहासप्रेमामुळे नुकतेच थोरल्या माधवराव पेशव्यांचे अप्रकाशित चित्र उजेडात आले आहे. मनोद दाणी यांना येल विद्यापीठाच्या संग्रहात हे चित्र आढ‍ळून आले. चित्राच्या मागे माधवरावांचे तसेच, चित्रकाराचेही नाव असल्याने चित्र माधवरावांचेच असल्याचे स्पष्ट झाले आहे.

दाणी हे मूळचे फलटणचे आहेत. त्यांचे शिक्षण पुणे आणि नगर येथे झाले आहे. सध्या ते कॅलिफोर्नियामध्ये सिनिअर आयटी मॅनेजर म्हणून कार्यरत आहेत. त्यांना आढळून आलेल्या चित्राच्या मागे 'माधवराव बालाजीराव, चित्रकार भोज राज' अशी नोंद आहे. त्यामुळे इतिहासाचा हा अज्ञात ठेवा पुन्हा प्रकाशात आला आहे. त्याबाबत बोलताना दाणी म्हणाले, 'भोज राज हा चित्रकार मूळचा राजस्थान-जयपूर या भागातील. शनिवारवाड्याच्या भित्तीचित्रांच्या संदर्भात त्याचे नाव जुन्या कागदपत्रांमध्ये आहे. थोरल्या माधवरावांच्याच शैलीचे परंतु, सवाई माधवराव दर्शवणारे एक उत्तरकालीन चित्र ब्रिटिश लायब्ररीत आहे. त्यावरूनही असे दिसते की, ही चित्रे एकाच शैलीचा भाग आहेत.'

हे चित्र जेम्स वेल्स याच्या संग्रहातील आहे. १७९१ मध्ये जेम्स वेल्स हा होतकरू चित्रकार नाव कमावण्याच्या हेतूने इंग्लंडमधून भारतात (मुंबईत) आला. १७९२ मध्ये त्याची भेट सर चार्ल्स मॅलेट या सवाई माधवराव पेशव्यांच्या दरबारी असलेल्या इंग्रज वकिलाशी झाली. मॅलेटने वेल्सला पुण्याला यायचे आमंत्रण दिले. वेल्सचा उद्देश हा पेशव्यांना काही चित्रे विकणे अथवा ते न जमल्यास ती चित्रे युरोपात विकून प्रसिद्ध चित्रकार बनण्याचा होता. वेल्सने गंगाराम तांबट-नवगिरे या मराठी चित्रकाराची काही चित्रे आणि हे भोज राजचे थोरल्या माधवरावांचे चित्र पुणे भेटीत मिळवले आणि ते १७९७ साली मॅलेट पुणे सोडून लंडनला परतल्यावर त्याच्याबरोबर परदेशी गेले. वेल्सचा सहकारी मेबॉन याने काढलेली रेखाचित्रे आणि वेल्सची डायरी व चित्रसंग्रह १९२९ च्या सुमारास येल विद्यापीठास, पॉल मेलन यांनी भेट दिला. मेलन हे अमेरिकेतील धनाढ्य गृहस्थ होते. त्यांनी हा वेल्सचा संग्रह मिळविला होता. या संग्रहातच हे भोज राजचे थोरल्या माधवरावांचे चित्रही आहे, असेही दाणी म्हणाले.

'ते चित्र माधवरावांचेच'

माधवरावांचे हे अज्ञात चित्र प्रकाशात आल्याने इतर चित्रांमधील व्यक्ती कोण आहेत, ते स्पष्ट होण्यास मदत होईल. चित्राच्यामागे नोंद असणे ही महत्वाची गोष्ट असून, चित्राच्या मागे माधवराव पेशवे आणि चित्रकाराचे नाव असल्याने हे माधवरावांचेच असल्याचे स्पष्ट होते, असे मत इतिहास या विषयातील तज्ञ डॉ. श्रीकांत प्रधान यांनी या चित्राबाबत व्यक्त केले.

ब्रिटिशांनी भारतातून अनेक मौल्यवान वस्तू, कागदपत्रे, चित्रे आणि पोथ्या नेल्याचे बोलले जाते. अशा अनेक वस्तू आजही अज्ञातात आहेत. नोकरीनिमित्त बाहेर असलेल्या युवकांनी इतिहासाबाबत जागरूकता दाखविल्यास असे अनेक दुवे उजाडात येतील‍.

मंदार लवाटे, इतिहास अभ्यासक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वर्धापनदिनी उघडले शनिवारवाड्याचे दरवाजे

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

रंगीबेरंगी रांगोळीने शनिवारवाड्यापुढील पटांगण खुलले होते... कार्यकर्त्यांची गडबड सुरू होती... इंग्रजांनी बंद केलेला शनिवारवाड्याचा मुख्य दरवाजा उघडला गेला अन् इतिहासप्रेमींनी मुख्य दरवाजातून वाड्यात प्रवेश केला.

निमित्त होते शनिवारवाड्याच्या २८४व्या वर्धापनदिनाचे. बाजीराव पेशवे प्रतिष्ठानतर्फे आयोजित कार्यक्रमात शनिवारवाड्याचे मुख्य दरवाजे अनेक वर्षांनी उघडण्यात आले होते. नानासाहेब पेशव्यांच्या हस्ते २२ जानेवारी १७३२ रोजी शनिवारवाड्याची वास्तूशांत झाली होती. त्यामुळे २२ जानेवारी हा दिवस शनिवारवाड्याचा वर्धापन दिन म्हणून साजरा करण्यात येतो. प्रतिष्ठानचे कुंदन साठे, हरिभाऊ चितळे, अनिल गानू, माधव गांगल, श्रीकांत नगरकर, चिंतामणी नगरकर आदी या वेळी उपस्थित होते.

ब्रिटिशांनी भारत सोडताना शनिवारवाड्याचे दरवाजे बंद केले होते. एरवी १५ ऑगस्ट, २६ जानेवारी आणि १ मे या तीन दिवशी ध्वजवंदनासाठी वाड्याचे दरवाजे उघडण्यात येतात. मात्र, त्यावेळी पर्यटकांना प्रवेश दिला जात नाही. हा अपवाद वगळता इतरवेळी वाड्याचे दरवाजे कायमस्वरूपी बंद असतात. वादाच्या भोवऱ्यात सापडलेल्या बाजीराव मस्तानी चित्रपटामुळे शनिवारवाड्याला भेट देणाऱ्या पर्यटकांची संख्या बरीच वाढली आहे. प्रतिष्ठानने आयोजित केलेल्या कार्यक्रमाला सुमारे तीनशे इतिहासप्रेमी उपस्थित होते. त्यामुळे उघडलेल्या दरवाजातून वाड्यात प्रवेश करण्याची ही दुर्मिळ संधी घेऊन इतिहासप्रेमींनी वेगळ्या नजरेने शनिवारवाडा अनुभवला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वाड्याचे दरवाजे पर्यटकांसाठी खुले

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

रंगीबेरंगी रांगोळीने शनिवारवाड्यापुढील पटांगण खुलले होते... कार्यकर्त्यांची गडबड सुरू होती... इंग्रजांनी बंद केलेला शनिवारवाड्याचा मुख्य दरवाजा उघडला गेला अन् इतिहासप्रेमींनी मुख्य दरवाजातून वाड्यात प्रवेश केला.

निमित्त होते शनिवारवाड्याच्या २८४व्या वर्धापनदिनाचे. बाजीराव पेशवे प्रतिष्ठानतर्फे आयोजित कार्यक्रमात शनिवारवाड्याचे मुख्य दरवाजे अनेक वर्षांनी उघडण्यात आले होते. नानासाहेब पेशव्यांच्या हस्ते २२ जानेवारी १७३२ रोजी शनिवारवाड्याची वास्तूशांत झाली होती. त्यामुळे २२ जानेवारी हा दिवस शनिवारवाड्याचा वर्धापन दिन म्हणून साजरा करण्यात येतो. प्रतिष्ठानचे कुंदन साठे, हरिभाऊ चितळे, अनिल गानू, माधव गांगल, श्रीकांत नगरकर, चिंतामणी नगरकर आदी या वेळी उपस्थित होते.

ब्रिटिशांनी भारत सोडताना शनिवारवाड्याचे दरवाजे बंद केले होते. एरवी १५ ऑगस्ट, २६ जानेवारी आणि १ मे या तीन दिवशी ध्वजवंदनासाठी वाड्याचे दरवाजे उघडण्यात येतात. मात्र, त्यावेळी पर्यटकांना प्रवेश दिला जात नाही. हा अपवाद वगळता इतरवेळी वाड्याचे दरवाजे कायमस्वरूपी बंद असतात. वादाच्या भोवऱ्यात सापडलेल्या बाजीराव मस्तानी चित्रपटामुळे शनिवारवाड्याला भेट देणाऱ्या पर्यटकांची संख्या बरीच वाढली आहे. प्रतिष्ठानने आयोजित केलेल्या कार्यक्रमाला सुमारे तीनशे इतिहासप्रेमी उपस्थित होते. त्यामुळे उघडलेल्या दरवाजातून वाड्यात प्रवेश करण्याची ही दुर्मिळ संधी घेऊन इतिहासप्रेमींनी वेगळ्या नजरेने शनिवारवाडा अनुभवला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images