Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

माधवराव पेशव्यांचे चित्र आले उजेडात

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

इतिहास आणि ऐतिहासिक ठेव्याबाबत नवी पिढी उदासीन असल्याची टीका होते. नोकरीनिमित्त परदेशी असलेल्या तरुणाच्या इतिहासप्रेमामुळे नुकतेच थोरल्या माधवराव पेशव्यांचे अप्रकाशित चित्र उजेडात आले आहे. मनोद दाणी यांना येल विद्यापीठाच्या संग्रहात हे चित्र आढळून आले. चित्राच्या मागे माधवरावांचे तसेच, चित्रकाराचेही नाव असल्याने चित्र माधवरावांचेच असल्याचे स्पष्ट झाले आहे.

दाणी हे मूळचे फलटणचे आहेत. त्यांचे शिक्षण पुणे आणि नगर येथे झाले आहे. सध्या ते कॅलिफोर्नियामध्ये सिनिअर आयटी मॅनेजर म्हणून कार्यरत आहेत. त्यांना आढळून आलेल्या चित्राच्या मागे 'माधवराव बालाजीराव, चित्रकार भोज राज' अशी नोंद आहे. त्यामुळे इतिहासाचा हा अज्ञात ठेवा पुन्हा प्रकाशात आला आहे. त्याबाबत बोलताना दाणी म्हणाले, 'भोज राज हा चित्रकार मूळचा राजस्थान-जयपूर या भागातील. शनिवारवाड्याच्या भित्तीचित्रांच्या संदर्भात त्याचे नाव जुन्या कागदपत्रांमध्ये आहे. थोरल्या माधवरावांच्याच शैलीचे परंतु, सवाई माधवराव दर्शवणारे एक उत्तरकालीन चित्र ब्रिटिश लायब्ररीत आहे. त्यावरूनही असे दिसते की, ही चित्रे एकाच शैलीचा भाग आहेत.'

हे चित्र जेम्स वेल्स याच्या संग्रहातील आहे. १७९१ मध्ये जेम्स वेल्स हा होतकरू चित्रकार नाव कमावण्याच्या हेतूने इंग्लंडमधून भारतात (मुंबईत) आला. १७९२ मध्ये त्याची भेट सर चार्ल्स मॅलेट या सवाई माधवराव पेशव्यांच्या दरबारी असलेल्या इंग्रज वकिलाशी झाली. मॅलेटने वेल्सला पुण्याला यायचे आमंत्रण दिले. वेल्सचा उद्देश हा पेशव्यांना काही चित्रे विकणे अथवा ते न जमल्यास ती चित्रे युरोपात विकून प्रसिद्ध चित्रकार बनण्याचा होता. वेल्सने गंगाराम तांबट-नवगिरे या मराठी चित्रकाराची काही चित्रे आणि हे भोज राजचे थोरल्या माधवरावांचे चित्र पुणे भेटीत मिळवले आणि ते १७९७ साली मॅलेट पुणे सोडून लंडनला परतल्यावर त्याच्याबरोबर परदेशी गेले. वेल्सचा सहकारी मेबॉन याने काढलेली रेखाचित्रे आणि वेल्सची डायरी व चित्रसंग्रह १९२९ च्या सुमारास येल विद्यापीठास, पॉल मेलन यांनी भेट दिला. मेलन हे अमेरिकेतील धनाढ्य गृहस्थ होते. त्यांनी हा वेल्सचा संग्रह मिळविला होता. या संग्रहातच हे भोज राजचे थोरल्या माधवरावांचे चित्रही आहे, असेही दाणी म्हणाले.

'ते चित्र माधवरावांचेच'

माधवरावांचे हे अज्ञात चित्र प्रकाशात आल्याने इतर चित्रांमधील व्यक्ती कोण आहेत, ते स्पष्ट होण्यास मदत होईल. चित्राच्यामागे नोंद असणे ही महत्वाची गोष्ट असून, चित्राच्या मागे माधवराव पेशवे आणि चित्रकाराचे नाव असल्याने हे माधवरावांचेच असल्याचे स्पष्ट होते, असे मत इतिहास या विषयातील तज्ज्ञ डॉ. श्रीकांत प्रधान यांनी या चित्राबाबत व्यक्त केले.

ब्रिटिशांनी भारतातून अनेक मौल्यवान वस्तू, कागदपत्रे, चित्रे आणि पोथ्या नेल्याचे बोलले जाते. अशा अनेक वस्तू आजही अज्ञातात आहेत. नोकरीनिमित्त बाहेर असलेल्या युवकांनी इतिहासाबाबत जागरूकता दाखविल्यास असे अनेक दुवे उजाडात येतील.

- मंदार लवाटे, इतिहास अभ्यासक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


प्रायोजकांसाठी बोर्ड अधिकाऱ्यांची पळापळ

$
0
0

खडकी : खडकी कॅटोन्मेंट बोर्डाने आयोजित केलेल्या मिनी मॅरेथाॅनसाठी अवघे दोन दिवस शिल्लक राहिले आहेत. मात्र, प्रायोजक मिळत नसल्याने, काही शर्यतींची पारितोषिके अद्याप निश्चित झालेली नाहीत. प्रायोजक मिळविण्यासाठी नगरसेवक आणि अधिकारी धावपळ करत असल्याचे चित्र खडकी बोर्ड आॅफिसमध्ये दिसत आहे.

संरक्षण मंत्रालयाच्या आदेशानुसार, खडकी कॅटोन्मेंट बोर्डाने रविवारी मिनी मॅरेथाॅन आयोजित केली आहे. मात्र, बोर्डाची आर्थिक परिस्थिती खराब असल्याने बोर्ड या शर्यतीसाठी एकही रूपया खर्च करणार नाही. सर्व खर्चासाठी प्रायोजक शोधण्याचे निर्देश देण्यात आले. त्यामुळे २५ लाखाच्या खर्चाचे नियोजन केलेल्या या शर्यतीच्या प्रत्येक खर्चासाठी वेगवेगळे प्रायोजक शोधण्यासाठी धावपळ सुरू आहे. मॅरेथाॅनमध्ये भाग घेणा-या पहिल्या सात हजार धावपटूंसाठी टी-शर्ट आणि टोपी देण्यासाठी एक मुख्य प्रायोजक बोर्डाला मिळाला आहे. तर, प्रेसिडेंन्ट रेस साठीच्या पहिल्या, दुस-या आणि तिस-या क्रमांकासाठीच्या २५, १५ आणि १० हजार रूपयांचे पारितोषिक बोर्डाचे नगरसेवक देणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शुद्धीकरणाचा ‘अशुद्ध’ कारभार

$
0
0

Sunil.Landge@timesgroup.com

पिंपरी : पाणी प्रदूषण रोखण्याबाबत उपाययोजना करीत असल्याचा दावा पिंपरी-चिंचवड महापालिका करीत असले तरी शुद्धीकरणाच्या नावाखाली प्रशासन बेधुंद कारभार करीत असल्याचे स्पष्ट होत आहे. पवना, इंद्रायणी आणि मुळा नद्यांमध्ये थेट सांडपाणी मिसळले जात असून, नाल्यांची अवस्था अक्षरशः तुंबलेल्या गटारांसारखी झाली आहे.

नदी प्रदूषणाबाबत महापालिकेचे आयुक्त राजीव जाधव तसच काही पर्यावरण क्षेत्रातील तज्ज्ञांनी नुकतीच चिंता व्यक्त केली असून, खबरदारीचे आवाहन केले आहे. त्याकडे शहर हिताच्या दृष्टीने दुर्लक्ष करून चालणार नाही. बदलत्या काळाची गंभीर पावले तातडीने ओळखली नाही तर भविष्यातील वाटचाल भयंकर असणार आहे. त्यातून भावी पिढीला तीव्र समस्यांना सामोरे जावे लागणार आहे. त्याचा दोष विद्यमान लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाच्या माथी येणार आहे.

गाव ते मॉडेल सिटीचा प्रवास करणाऱ्या पिंपरी-चिंचवडचा विकास बाह्यरंगाने थक्क करणारा असला तरी शहराचे अंतरंग शुद्ध राहण्याकडे गांभीर्याने पाहिले गेले नाही, हे सत्य लक्षात येते. अद्यापही सुमारे ६० ते ७० दशलक्ष लिटर सांडपाणी रोज विनाप्रक्रिया नद्या, नाल्यांमध्ये बिनदिक्कतपणे मिसळत असल्याचे निरीक्षण नोंदविले आहे.

शहर वाढीला चालना देणाऱ्या घटकांमुळे पर्यावरणाचा सातत्याने ऱ्हास होत आहे. त्यामध्ये प्रामुख्याने लोकसंख्येतील बेसुमार वाढ, झोपडपट्ट्यांची वाढती संख्या, खासगी वाहनांच्या संख्येत होणारी लक्षणीय वाढ, नैसर्गिक साधनांचा अमर्याद वापर, औद्योगिक सांडपाण्याचे वाढलेले प्रमाण यांचा उल्लेख करता येईल. या स्थितीत केवळ पर्यावरण सद्यःस्थिती अहवाल तयार करून उपयोग होणार नाही. तर, तातडीने उपाययोजना हाती घेणे क्रमप्राप्त होणार आहे.

शहरातील कत्तलखाने, रुग्णालयांमधून पडणारा कचरा घातक आहे. त्यामध्ये टायफॉइड, कॉलरा, अतिसार रोग पसरविणारे जीवजंतू असतात. त्यामुळे साथीचे रोग पसरवू शकतात. त्यामध्ये कॉलरा, अतिसार, जुलाब, उलट्या या रोगांचा समावेश आहे. याशिवाय दूषित पाणी पिण्यामुळे डायरिया, रोटाव्हायरस डायरिया होतो. शिवाय मान्सूनच्या काळात मलेरिया, चिकनगुणिया, डेंगीच्या रोग्यांमध्ये वाढ होते. साठलेल्या पाण्यामुळे डासोत्पत्तीबरोबरच या माध्यमातून होणारे मलेरिया, यलोफिवर, डेंगी होण्याची शक्यता बळावते. गेल्या दोन वर्षांत शहरात डेंगीच्या रुग्णांमध्ये वाढ होत असल्याचेही उपलब्ध आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे. सांडपाण्याची निर्मिती अधिक होत असल्यामुळे मलशुद्धीकरण केंद्रावर जास्त ताण निर्माण होत आहे.

यावर उपाय म्हणून नद्यांचा विकास नैसर्गिकरित्या आकर्षक पद्धतीने करून पर्यटन स्थळ विकसित करण्यासाठी पवना आणि मुळा नद्यांचा प्राथमिक अहवाल तयार करण्यात आला आहे. तो केंद्र सरकारकडे अनुदान प्राप्त करून घेण्यासाठी पाठविला आहे. मात्र, त्याला अद्यापही मंजुरी मिळालेली नाही. त्यामुळे प्रशासनही हाताची घडी, तोंडावर बोट ठेवून गप्प आहे.

केवळ अहवाल आणि प्रस्ताव तयार करून चालणार नाही. त्यासाठी योग्य पाठपुरावा किंवा स्थानिक पातळीवर उपाययोजना आवश्यक आहे. सक्षम प्रशासन गरजेचे आहे. ते नसेल तर सर्वेक्षण करणे, प्रश्नावली भरून घेणे, सल्लामसलत करणे, नोटीसा बजावणे, सांडपाण्याचे नमुने घेणे आणि अहवाल देणे ही जुजबी उपाययोजना करून चालणार नाही. आत्ताच योग्य दखल घेऊन नद्या श्वासमुक्त करायला हव्यात. नाले खळाळते ठेवायला हवेत. तरच स्वच्छ-सुंदर पिंपरी-चिंचवडला खरा अर्थ प्राप्त होईल, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचार

$
0
0

पिंपरी : अल्पवयीन मुलीवर चिंचवड येथे कारमध्ये आणि नर्सरीत सामूहिक बलात्कार केल्याप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे. तर त्यांच्या एका साथीदाराला देखील ताब्यात घेण्यात आले आहे. ओळखीचा गैरफायदा घेत आरोपींनी हे कृत्य केल्याचे चौकशीत समोर आले आहे.

याप्रकरणी १४ वर्षीय पीडितेने चिंचवड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तर सागर उर्फ दाद्या सिद्धू रांजणगे (वय १९) व कुमार उर्फ पप्पू कल्याण कांबळे (वय २२, दोघेही रा. वाल्हेकरवाडी) या दोघांना अटक करण्यात आली आहे. तर एका अल्पवयीन मुलाला चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडिता आणि आरोपींची काही दिवसांपूर्वी शाळेत जाताना ओळख झाली होती. त्यानंतर ६ जानेवारीला पीडितेवर चिंचवड पवनाघाटाजवळील एका नर्सरीत अत्याचार करण्यात आले. त्यानंतर १४ जानेवारी पुन्हा या पीडितेवर एका कार मध्ये अत्याचार करण्यात आले. दरम्यान, १४ तारखेला पीडिता आणि तिची आई यांच्यामध्ये भांडणे झाली होती. त्यातून पीडिता पोलिसांकडे आली होती.

आईबरोबर पटत नसल्याचे सांगितल्याने तिला पोलिसांनी निरीक्षण गृहात ठेवले होते. तेथील अधीक्षिकेने पीडितेवर चौकशी केल्यावर गुरूवारी (२१ जानेवारी) तिने घडलेला प्रकार सांगितला होता. त्यानंतर संबंधित अधीधिकेने पोलिसांशी संपर्क केल्यावर हा प्रकार उघडकीस आला. सुरवातीला पीडितेने तक्रार देण्यास नकार दिला होता.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

समस्यांच्या विरोधात लघुउद्योजकांचा टाहो

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पिंपरी

पिंपरी-चिंचवड लघुउद्योग संघटनेच्या शिष्टमंडळाने उद्योगमंत्री सुभाष देसाई, उर्जामंत्री चंद्रशेखर बानकुळे यांची नुकतीच मुंबई मधील गेस्ट हाऊसवर भेट घेतली. यावेळी एम. आय. डी. सी. संदर्भात निर्माण होणाऱ्या विविध समस्यांबाबत निवेदन दिले.

यावेळी संघटनेचे अध्यक्ष संदीप बेलसर, सचिव जयंत कड, उपाध्यक्ष संजय जगताप, विनोद नाणेकर, प्रसिद्धी प्रमुख विजय खळदकर, संचालक संजय सातव, विनोद मित्तल, नवनाथ वायाळ, हर्षल थोरवे, प्रवीण लोंढे आदी उपस्थित होते. तसेच 'जागतिक मराठी चेंबर ऑफ कॉमर्स अॅन्ड इंडस्ट्रीज'चे गोविंद पानसरे हे उपस्थित होते.

एम. आय. डी. सी ने ७ जानेवारी २०१६ पासून औद्योगिक वसाहतीमधील भूखंडांच्या दरात ३० ते ३५ टक्के दरवाढ करण्याचा निर्णय जाहीर केला असून, वाढत्या विजेचा दर परवडत नसल्याने राज्यातील उद्योग इतर राज्यात स्थलांतरित होत आहे. औद्योगिक क्षेत्र मंदीचा सामना करीत असताना त्यांना राज्य सरकारकडून कोणतेही सहाय्य नसताना ही वाढवलेली दरवाढ उद्योगांना मारक आहे. याचा फटका गुंतवणुकीवर पडून गुंतवणूक लांबणीवर पडणार आहे.

२०१० मधील एम. आय. डी. सी. ने चाकणमध्ये औद्योगिक भूखंडासाठी ऑनलाइन अर्ज मागविले होते. या अर्जासमवेत रुपये तीन हजार चे डी. डी. जमा करण्यात आले होते. मात्र एम. आय. डी. सी. ने नवीन भूखंड उपलब्ध नाहीत, हे कारण देत सर्व प्रतीक्षा यादी रद्द केली. याबाबत त्वरित निर्णय देऊन चाकण येथील एम. आय. डी. सी. उद्योजकांना भूखंड द्यावे किंवा पैसे सव्याज परत करावेत, अशी मागणी यावेळी करण्यात आली.

एम. आय. डी. सी मध्ये लघुउद्योगांसाठी २५ टक्के भूखंड राखीव ठेवावे तसेच लघुउद्योगांसाठीच्या भूखंडांचे क्षेत्रफळ ५०० स्क्वेअर मीटर पासून पुढे असावे. पिंपरी चिंचवड औद्योगिक परिसर हा टाऊनशिप जाहीर करुन या परिसराचा विकास करावा.

अनेक दिवसांपासून प्रलंबित पडलेली पिंपरी-चिंचवड भोसरी एम. आय. डी. सी. परिसरातील भुयारी गटार योजना त्वरित राबवावी. वाढीव पाणीदर व वाढीव जमीन हस्तांतरण शुल्क रद्द करावे, पाण्यासंबंधीच्या इतर समस्या, परिसरात वाढत असलेल्या झोपडपट्टीमुळे निर्माण होणाऱ्या समस्यांवर कायमस्वरूपी उपाययोजना, भोसरी येथील टी ड २०१ पुर्नवसन प्रकल्पातील विलंब शुल्क एम. आय. डी. सी. ने तातडीने पूर्णपणे माफ करावे इत्यादी मागण्यादेखील निवेदनात करण्यात आल्या.

उद्योजकांच्या मागण्या

विजेच्या तक्रारींबाबत बावनकुळे यांची भेट घेऊन, त्यांना जुन्या इन्फास्ट्रक्चरमुळे खंडित होणारा विजपुरवठा, डी.पी. फिडर बॉक्सची झाकण गायब झाल्याने होणारे अपघात, विजबिलाचे हप्ते करून मिळणे, बिलाचा चेक बाऊन्स झाला तर चेकने पैसे स्वीकारण्याच्या सवलती बंद न करणे, कर्मचाऱ्यांना योग्य ते साहित्य पुरविणे, विजचोरी आदींबाबत निवेदन देण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चहा विकता विकता सोमनाथ झाला सीए

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

पुण्यात येतानाच बहुतांश तरुणांच्या डोळ्यासमोर पुण्यातल्या मोठ्या शैक्षणिक संस्था आणि करिअरच असते. सोलापूरच्या करमाळा तालुक्यातील सोमनाथ बळिराम गिरमची परिस्थिती मात्र याला अपवाद होती. विद्येच्या माहेरघरात येताना त्याला आपल्या घरच्यांच्या पालनपोषणाची चिंताही सतावत होती. सुरुवातीला पार्ट टाइम नोकरी आणि नंतर चहाच्या स्टॉलवर काम करतानाही शिक्षणाविषयीची ओढ त्याला स्वस्थ बसू देत नव्हती. नुकत्याच लागलेल्या सीएच्या निकालाने मात्र त्याला आजपर्यंत मिळाली नव्हती एवढी स्वस्थता दिली. चहावाला ते सीए हा त्याचा प्रवास आता त्याच्यासारख्याच अनेकांना प्रेरणादायी ठरत आहे.

सीए फाउंडेशनच्या परीक्षांचे निकाल नुकतेच जाहीर झाले. या निकालांमध्ये सोमनाथ सीए झाल्याचे स्पष्ट झाले. सदाशिव पेठेतील पेरूगेटजवळ चहा विकून कुटुंबीयांना मदत करणारा सोमनाथ आता सीए झाला आहे. आपल्या या यशाचे सर्व श्रेय मित्रांना आणि आपल्या चहाच्या टपरीला जाते, अशी प्रतिक्रिया तो या निमित्ताने नोंदवीत आहे. करमाळ्यासारख्या दुष्काळी भागातून पुण्यात आलेल्या सोमनाथच्या घरची परिस्थिती अत्यंत हलाखीची असल्याने, त्याला पुण्यात येऊन काम करण्याशिवाय पर्याय नव्हता. त्यामुळेच बारावी पूर्ण झाल्यावर तो नोकरीच्या शोधात पुण्यात आला. पुण्यात येतानाच त्याच्या डोक्यात काम करत करतच शिक्षण सुरू ठेवण्याचा विचार होता. त्यासाठी त्याने पुण्यात अक्षरशः रात्रीचा दिवसही केला. सोमनाथचे आई-वडील दोघेही शेतात मजुरी करतात. करमाळा तालुक्यातील जेऊर गावात भारत हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजमध्ये त्याने बारावीपर्यंत शिक्षण घेतले. त्याननंतर तो पुण्यात आला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सनातन संस्थेचे लोक चिडले होते

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

'गोविंद पानसरे हत्याप्रकरणात कोर्टात दाखल करण्यात आलेल्या आरोपपत्रात सनातन संस्थेचे लोक त्यांच्यावर चिडलेले होते, असे नमूद करण्यात आले आहे. पानसरेंविरुद्ध गोवा येथे 'सनातन'तर्फे दिवाणी आणि फौजदारी दावा दाखल करण्यात आला होता; तसेच बार कौन्सिलकडेही त्यांच्याविरुद्ध तक्रार दाखल करण्यात आली होती,' अशी माहिती विशेष सरकारी वकील अॅड. हर्षद निंबाळकर यांनी शनिवारी दिली.

पानसरे हत्या प्रकरणात समीर गायकवाडवर पोलिसांनी कोर्टात आरोपपत्र दाखल केले असून, २५ जानेवारी रोजी त्याच्या जामीन अर्जावर सुनावणी होणार आहे. त्याच्याविरुद्ध परिस्थितीजन्य पुरावे असून, त्याला कोर्टात ​जामीन मिळू नये यासाठी आपण प्रयत्न करणार आहोत, असे निंबाळकर यांनी सांगितले.

सरकारतर्फे विशेष सरकारी वकील म्हणून अॅड. हर्षद निंबाळकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या संदर्भात शनिवारी पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिली. 'पानसरे हत्याप्रकरण अत्यंत संवेदनशील आहे. सरकारतर्फे २० जानेवारी रोजी आपली विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्वतः या केसमध्ये लक्ष घालत आहेत,' असे निंबाळकर यांनी सांगितले.

'पानसरे हत्या प्रकरणात समीर गायकवाडवर पोलिसांनी कोर्टात ४२५ पानांचे आरोपपत्र (चार्जशीट) दाखल केले आहे. पानसरे हत्या प्रकरणात त्याचा थेट सहभाग नाही. मात्र, या प्रकरणात त्याचा हात असल्याचे पुरावे आहेत. या प्रकरणी तपासी अधिकारी, पोलिस अधीक्षक यांच्याबरोबर चर्चा करून केसची मांडणी ठरविण्यात येईल,' असे अॅड. निंबाळकर यांनी सांगितले. गायकवाडच्या घरात बरेच मोबाइल सापडले होते. त्याचे टेलिफोनवरील संभाषण, मेसेज पोलिसांकडे आहेत. त्याच्या आवाजाचा नमुना चाचणीसाठी पाठविण्यात आला आहे. 'सनातन'चे लोक पानसरेंवर चिडून होते, असे आरोपपत्रात नमूद करण्यात आले आहे.

अनेक मोठ्या केसेसमध्ये थेट पुरावा नसतो. परिस्थितीजन्य पुराव्याच्या आधारे केस मांडता येते. गायकवाडविरुद्ध परिस्थितीजन्य पुरावा असून त्याबाबत साक्षीदार आहे. त्यामुळे कोर्टात केस सिद्ध करता येईल, असे निंबाळकर यांनी सांगितले. आरोपपत्रानुसार रुद्र पाटील आणि गायकवाड यांचे घनिष्ठ संबंध होते असे लक्षात येते, असे निंबाळकर यांनी सांगितले. कोल्हापूर येथून ही केस दुसरीकडे वर्ग करण्यात यावी, अशी मागणी करण्यात येते आहे. त्या संदर्भात हायकोर्टात अपील प्रलंबित आहे.

सहा खटल्यांत विशेष सरकारी वकील

बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवाच्या अध्यक्षपदी असलेले अॅड. हर्षद निंबाळकर यांची सरकारकडून आतापर्यंत सहा केसेसमध्ये विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. त्यातील तीन केसेसमध्ये आरोपींना कोर्टाने शिक्षा सुनावली आहे. पुण्यातील नयना पुजारी खून खटल्यात अॅड. निंबाळकर विशेष सरकारी वकील म्हणून काम पाहत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गणपती मंदिरात चोरी करणाऱ्याला अटक

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

लोहियानगर येथील गणपती मंदिरातील दानपेटी चोरणाऱ्या सराईत गुन्हेगाराला खडक पोलिसांनी चोवीस तासात अटक केली आहे. त्याच्याकडून दानपेटी, रोख रक्कम आणि समई असा एकूण साडेसात हजार रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे.

अस्लम ऊर्फ बटल्या युसुफ खान (वय १९, रा. लोहियानगर) असे अटक केलेल्याचे नाव आहे. याप्रकरणी अनिल मोतीलाल कल्याणकर (वय ३६, रा. महात्मा फुले पेठ) यांनी तक्रार दिली आहे. अखिल लोहियानगर मित्र मंडळाच्या गणपती मंदिराचा दरवाजा तोडून शुक्रवारी रात्री चोरट्याने दानपेटी चोरून नेली होती. यामुळे काही वेळ परिसरात तणाव निर्माण झाला होता. त्यामुळे खडक पोलिसांनी आरोपीचा शोध सुरू केला. त्यावेळी पोलिस कर्मचारी अमोल पवार यांना बटल्या खान यानेच दानपेटी चोरल्याची माहिती मिळाली. त्यानुसार खडक पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक रघुनाथ जाधव, फौजदार संजय गायकवाड, अशोक वाघ, महेंद्र पवार, अमोल पवार यांच्या पथकाने खान याला भवानी पेठेतून ताब्यात घेतले. त्याच्याकडे चौकशी केल्यानंतर त्याने मंदिरात चोरी केल्याचे सांगितले. त्याच्याकडून चोरीचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. अल्पवयीन असताना त्याने वाहनचोरीचे चार गुन्हे केले असून घरफोडीचा एक गुन्हाही त्याच्यावर दाखल झालेला आहे. खान याला कोर्टात हजर केले असता २७ जानेवारीपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश कोर्टाने दिला.

तडीपार गुंडाला पकडले

दरम्यान, खडक पोलिसांनी तडीपार गुंड विनायक बंडू कराळे (वय २०,रा. राजीव गांधी कॉम्प्लेक्स, कासेवाडी, भवानीपेठ) याला अटक केली आहे. त्याच्याकडून एक कोयता जप्त करण्यात आला आहे. कराळे विरोधात चोरी, मारामारी, दंगल, घातक शस्त्र बाळण्याचे एकूण पाच गुन्हे दाखल आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


घाऊक विक्रेत्यास ५० हजारांचा दंड

$
0
0

मार्केट यार्डात किरकोळ विक्रीप्रकरणी कारवाई

म. टा. प्रतिनिधी, पुणे

मार्केट यार्डातील भुसार विभागातील घाऊक विक्रेत्यांना किरकोळ विक्रीस मनाई असतानाही विक्रेत्याकडून किरकोळ विक्री सुरू असल्याचे आढळून आले. या प्रकरणी जसराज चौधरी या विक्रेत्याकडून पन्नास हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.

घाऊक विक्रेत्याकडून किरकोळ विक्री सर्रास सुरू होती. या संदर्भात मार्केट यार्डात किरकोळ विक्री करणाऱ्या घाऊक विक्रेत्यांविरोधात मोठी आंदोलने उभारण्यात आली. अखेर राज्याच्या पणन मंत्र्यांनी किरकोळ विक्री करण्यास मनाईचे आदेश जारी केले. त्यानंतरही घाऊक विक्रेत्यांकडून चोरी छुपे स्वरूपात किरकोळ विक्री सुरू असल्याच्या तक्रारी येत होत्या. या तक्रारीमध्ये तथ्य असल्याचे या प्रकारावरून स्पष्ट झाले.

घाऊक विक्रेत्यांनी व्यापार करताना घाऊक शेतीमालाचे विक्रीचे परिमाण ठरवून दिले आहे. त्यापेक्षा कमी वजनाची शेतीमालाची विक्री ही किरकोळ विक्री समजण्यात येईल असे बाजार समितीने यापूर्वीच स्पष्ट केले होते. यासंदर्भात १४ ऑक्टोबर रोजी बाजार समितीने स्वतंत्र परिपत्रक काढून व्यापाऱ्यांनाकळविले होते.

काही दिवसांपूर्वी बाजार समितीच्या प्रशासकीय मंडळाचे संचालक अॅड. अण्णा शिंदे यांनी बाजार आवाराची पाहणी केली. त्यावेळी चौधरी यांच्या बालाजी ट्रेडर्स या दुकानात घाऊक विक्रीच्या बिलात शेंगदाणा, तांदूळ हे शेतीमाल ठरवून दिलेल्या विक्रीच्या परिमाणापेक्षा कमी वजनात विक्री होत असल्याचे त्यांना आढळून आले. त्यामुळे चौधरी यांनी अटी व नियमांचा भंग केल्यामुळे त्यांना ५० हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला. यासंदर्भात दंडाची रक्कम चौधरी यांच्याकडून वसूल करण्यात आल्याचे भुसार विभागाचे प्रमुख देवीदास शेवाळे यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बॉम्बच्या बोगस फोनमुळे धावपळ

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

पुणे रेल्वे स्टेशन बॉम्बस्फोटाने उडवून देण्याच्या फोनमुळे शनिवारी पहाटे सुरक्षा यंत्रणांची झोप उडाली. फोन करणाऱ्या व्यक्तीला पकडल्यानंतर त्याने भुवनेश्वर-मुंबई विमानात बॉम्ब ठेवल्याचे सांगितले. त्यामुळे तपास यंत्रणा आणखीनच कामाला लागल्या. भुवनेश्वर येथून उड्डाण केलेले विमान नागपूरला विमान थांबवून तीन तास कसून तपासणी केली. त्यामध्ये काहीही आक्षेपार्ह न आढळल्याने सर्वांनीच सुटकेचा निश्वास सोडला. मानसिक स्थिती बिघडलेल्या एका व्यक्तीमुळे पोलिस यंत्रणा कामाला लागल्या होत्या. अखेर पोलिसांनी फोन करणाऱ्या व्यक्तीला अटक केली आहे.

संजयकुमार मिश्रा (वय ३५, रा. धायरी, मूळ -ओडिशा) असे अटक केलेल्याचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुणे शहर पोलिस नियंत्रण कक्षाला शनिवारी पहाटे तीन वाजून दहा मिनिटांनी एक फोन आला. 'पुणे रेल्वे स्टेशन येथे बॉम्ब ठेवला असून पुणे स्टेशन बॉम्बने उडवून देण्यात येणार आहे,' असे सांगून त्या व्यक्तीने फोन ठेवून दिला. शहर पोलिसांनी ही माहिती रेल्वे नियंत्रण कक्षाला कळविली. २३ जानेवारीला देशात अलर्ट असल्यामुळे पोलिस यंत्रणांनी तत्काळ पुणे स्टेशनकडे धाव घेतली. बॉम्ब शोधक व नाशक पथक (बीडीडीएस), श्वान पथक, शीघ्र कृती दल यांच्या पथकासह दहशतवाद विरोधी पथकाचे सहायक पोलिस आयुक्त भानुप्रताप बर्गे यांची टीम घटनास्थळी पोहचली. पहाटे सव्वा तीन ते सकाळी सहा वाजेपर्यंत सर्व अधिकारी रेल्वे स्थानकात तळ ठोकून होते. रेल्वे स्टेशनचा कसून शोध घेतल्यानंतरही काही आक्षेपार्ह न आढळल्याने तपास यंत्रणांनी सुटकेचा निश्वास सोडला.

एटीएसने फोन करणाऱ्या व्यक्तीची माहिती काढण्यास सुरुवात केली. मोबाइल क्रमांकावरून शोध घेतला असता तो फोन धायरी येथून आल्याचे लक्षात आले. धायरी येथील पत्त्यावर जाऊन पाहणी केली असता संबंधित व्यक्ती मोटारीने ओडिशाला सोलापूर रोडने निघाल्याची माहिती मिळाली. त्यामुळे एटीएसने पुणे ग्रामीण पोलिसांना घटनेची माहिती दिल्यानंतर दौंड पोलिसांनी मिश्रा याला साडेसहाच्या सुमारास दौंडजवळ पकडले. त्याच्याकडे चौकशी केल्यानंतर त्याने आणखीच धक्का देणारी माहिती दिली.

भुवनेश्वरहून मुंबईला येणाऱ्या विमानात बॉम्ब ठेवला आहे. त्यामुळे पोलिस यंत्रणांनी तत्काळ त्याची माहिती भुवनेश्वर येथे दिली. त्यावेळी विमानाने उड्डाण केले होते. सव्वा नऊच्या सुमारास हे विमान नागपूर एअरपोर्टवर उतरविण्यात आले. या ठिकाणी तीन तास विमानाची तपासणी करण्यात आली. पण, त्यामध्ये काहीही अक्षेपार्ह आढळून न आल्यामुळे सुटकेचा निश्वास टाकला. गेल्या तीन वर्षांपासून मिश्रा हा पुण्यातील धायरी परिसरात राहत असून तो अॅनिमेशनचा स्टुडिओ चालवितो. त्याच्याकडे चौकशी केल्यानंतर कौटुंबिक कारणामुळे मानसिक स्थिती व्यवस्थित नसल्याचे आढळून आले. त्याच्यावर यापूर्वी मुंबई एअरपोर्टच्या बाहेर बॉम्ब ठेवल्याचा बोगस फोन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल आहे. या सर्व प्रकारामुळे तपास यंत्रणा चांगल्याच कामाला लागल्या.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

एक्स्प्रेस-वेवर बुधवारी १५ मिनिटांचा ब्लॉक

$
0
0

लोणावळा : मुंबई-पुणे एक्स्प्रेस-वेवर बुधवारी (२७ जानेवारी) खंडाळ्यातील (बोरघाट) अमृतांजन पुलाजवळील अमृतांजन टेकडीच्या सैल दरडी काढण्यासाठी, तसेच संरक्षक लोखंडी जाळ्या बसविण्याच्या कामासाठी १५ मिनिटांचा ब्लॉक करण्यात येणार आहे. मुंबई-पुणे एक्स्प्रेस-वे आणि जुन्या राष्ट्रीय मार्गावर एकाचवेळी हा ब्लॉक असणार आहे, अशी माहिती रस्ते विकास महामंडळाचे मुख्य कार्यकारी अभियंता संजय गांगुर्डे यांनी दिली.

पुणे-मुंबई एक्स्प्रेस-वेवर १९ जुलैला आडोशी, तर २२ जुलैला खंडाळा बोगद्याजवळ मोठ्या दरडीच्या दुर्घटना घडल्या होत्या. यामध्ये आडोशी बोगद्याजवळ कोसळलेल्या दरडीच्या दुर्घटनेत तीन प्रवाशांचा मृत्यू झाला होता. खंडाळा बोगदा ते आडोशी बोगदा या आठ किलोमीटरर अंतरावर एका महिन्यात पाच वेळा दरडीच्या घटना घडल्या होत्या. यामुळे एक्स्प्रेस-वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना सुरक्षित प्रवास करणे धोकादायक बनले होते. भविष्यात पुन्हा दरडीचा धोका निर्माण होऊ नये यासाठी राज्य सरकार व रस्ते विकास महामंडळाच्या वतीने खंडाळा बोगदा ते आडोशी बोगद्यापर्यंत आठ ठिकाणच्या दरड प्रवण क्षेत्रातील दरडी रोखण्यासाठी, तसेच सैल दरडी काढण्याच्या कामाला २७ जुलैला सुरुवात केली आहे. या कामासाठी पुणे व रायगड जिल्हाधिकारी व पोलिस अधीक्षकांशी चर्चा करून बुधवारी (२७ जानेवारी) येथील काम यंत्रसामग्री, तसेच मनुष्यबळासह करण्यात येणार आहे. बुधवारी दुपारी १२ ते ४ याकालावधीत काम करण्यात येणार असून, दोन्ही मार्गावर १५ मिनिटांचा ब्लॉक असेल.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ज्येष्ठ शिल्पकार खटावकर कालवश

$
0
0

पुणे : प्रसिद्ध शिल्पकार, चित्रकार, मूर्तिकार दत्तात्रय श्रीधर तथा डी. एस. खटावकर (८६) यांचे वृद्धापकाळाने शनिवारी सायंकाळी चारच्या सुमारास राहत्या घरी निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, दोन मुलगे, एक मुलगी आणि नातवंडे असा परिवार आहे. वैकुंठ स्मानशानभूमीत रात्री त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

रात्री साडेसातच्या सुमारास खटावकर यांचे पार्थिक मंडईतील तुळशीबाग गणेश मंडळाजवळ आणण्यात आले होते. त्यानंतर वैकुंठ स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. या वेळी सामाजिक, राजकीय, साहित्य, कला व शैक्षणिक क्षेत्रातील मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होती. त्यांचे मरणोत्तर नेत्रदान करण्यात आले.

खटावकर यांचा जन्म चार एप्रिल १९२९ रोजी पुण्यात झाला. त्यांना शालेय शिक्षणात फारसा रस नव्हता. कलेच्या उच्च शिक्षणासाठी 'इन्स्टिट्यूट ऑफ मॉडर्न आर्ट'मध्ये, म्हणजे आताच्या अभिनव महाविद्यालयात प्रवेश घेतला. तसेच, त्यांनी दिल्लीला आर्ट टीचर्स कोर्स आणि मुंबईला सर जे. जे. स्कूल ऑफ आर्ट येथूनही कलाविषयक अभ्यासक्रम पूर्ण केला. त्यांनी कलाशिक्षक, उपप्राचार्य व प्राचार्य ही पदे सांभाळली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

हवालदाराची मुलगी २२ व्या वर्षी ‘सीए’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

पुण्यातील एका पोलिस हवालदाराची मुलगी जबरदस्त इच्छाशक्तीच्या जोरावर अवघ्या २२ व्या वर्षी सनदी लेखापाल (चार्टर्ड अकाउंटंट-सीए) झाली आहे. 'विद्यार्थीदशेत सीए होण्याचे स्वप्न बाळगले होते. सातत्याने केलेला अभ्यास आणि आई-वडिलांच्या प्रोत्साहनामुळे हे यश मिळू शकले,' अशा भावना तिने व्यक्त केल्या.

रुपाली तुकाराम नाळे (वय २२) असे या मुलीचे नाव आहे. तिचे वडील तुकाराम दत्तू नाळे गुन्हे शाखेत पोलिस हवालदार आहेत. कुटुंबासह ते गोखलेनगर पोलिस वसाहतीतील दोन खोल्यांमध्ये राहतात. विशेष म्हणजे रुपालीची आई रंजना यादेखील गेल्याच वर्षी पदवीधर झाल्या आहेत. हवालदार नाळे बारावीत असताना १९८७ मध्ये पोलिस दलात भरती झाले. रुपालीने महाराष्ट्र विद्या मंडळाच्या रामचंद्र राठोड विद्यालयात दहावीपर्यंत शिक्षण घेतले आहे. तिने अभ्यासात चुणूक दाखवत दहावीत ९३ टक्के गुण मिळवले. त्यानंतर बृहन्महाराष्ट्र वाणिज्य महाविद्यालयात (बीएमसीसी) तिने वाणिज्य शाखेत प्रवेश घेतला. सनदी लेखापाल होण्याचा निर्णय तिने विद्यार्थिदशेतच घेतला होता. त्यामुळे तिने बारावीपासून तयारी सुरू केली. प्रतिकूल परिस्थितीवर मात करत ती मे २०१५ मध्ये झालेल्या सीएच्या परीक्षेत उत्तीर्ण झाली.

हवालदार तुकाराम नाळे यांनी सांगितले, की पोलिस खात्याचा व्याप सांभाळताना मुलांच्या शैक्षणिक प्रगतीकडे दुर्लक्ष होऊ नये, याची नेहमीच काळजी घेतली. पोलिस वसाहतीतील वातावरणात राहून मुलांनी शैक्षणिक प्रगतीचा आलेख चढता ठेवला याचाही अभिमान वाटतो.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

देशात असहिष्णूता नाही : प्रकाश झा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

'देशात असहिष्णूता असल्याचे मलातरी दिसत नाही. परंतु, कोणी नाराज असेल तर त्यांना तसे मतप्रदर्शन करण्याचा अधिकार असून त्याचा आदर केला पाहिजे,' असे मत दिग्दर्शक प्रकाश झा यांनी शनिवारी व्यक्त केले.

पुणे दहशतवाद विरोधी पथकाच्या (एटीएस) कार्यालयात 'जय गंगाजल' या चित्रपटाचे प्रमोशन शनिवारी करण्यात आले. त्यावेळी झा यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. याप्रसंगी एटीएसचे सहायक पोलिस आयुक्त भानुप्रताप बर्गे, चित्रपटाचे सहदिग्दर्शक मिलिंद दबके व एटीएसचे इतर अधिकारी उपस्थित होते.

पुणे एटीएसचे काम चांगले असल्यामुळे या ठिकाणी चित्रपटाचे प्रमोशन करण्यासाठी आल्याचे सांगून झा म्हणाले, 'दहशतवाद्यांकडून समाजाच्या मानसिकतेवर केले जाणारे अतिक्रमण दूर करण्याचे काम एटीएसकडून केले जात आहे. एटीएसचे काम रस्त्यावरील पोलिसांचे नाही. समाजासाठी पोलिसांचे काम महत्त्वपूर्व आहे. परंतु त्यांच्या कामाची राजकारणी, समाज आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांकडूनही दखल घेतली जात नाही. सर्वांनीच खाकीची प्रतिष्ठा राखणे आवश्यक आहे. या चित्रपटात प्रियांका चोप्रा हिने एका प्रामाणिक आयपीएस अधिकाऱ्याची भूमिका केली असून हा चित्रपट सर्व तरुणांनी पाहावा, असे आवाहन त्यांनी केले.

देशात सहिष्णूता राहिली नसल्याचे मतप्रदर्शन दिग्दर्शक करण जोहर यांनी नुकतेच व्यक्त केले. त्यावर बोलताना झा म्हणाले, 'वैयक्तिक पातळीवर मला देशात असहिष्णूतेचा अनुभव आलेला नाही. करण जोहर यांनी त्यांना झालेला त्रास बोलून दाखवला असेल. कोणी नाराज असेल तर त्यांना तसे मतप्रदर्शन करण्याचा अधिकार असून त्याचा आदर केला पाहिजे. सेन्सॉर बोर्डाने चित्रपटातील अनेक दृष्यांवर कात्री चालवली होती. परंतु, अपिलामध्ये केवळ दोन सेकंदाचे दृष्य आणि एक शब्द वगळून चित्रपट प्रदर्शनास परवानगी मिळाली, असेही त्यांनी सांगितले.

बर्गे यांनी एटीएसच्या कामाची माहिती दिली. एटीएसने केलेल्या कामामुळे मुस्लिम समाजामध्ये एटीएसबाबत विश्वास निर्माण झाल्याचे त्यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अस्वस्थ वाटल्याने पवार हॉस्पिटलमध्ये

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, पुणे

राष्ट्रवादी कॉँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांना अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांना रविवारी सायंकाळी रुबी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. त्यांची प्रकृती स्थिर असून, चिंता करण्याचे कारण नसल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

'शरद पवार यांच्या शरिरातील द्रव पदार्थांचा समतोल बिघडल्याने त्यांना अस्वस्थ वाटू लागले. त्यामुळे रविवारी सायंकाळी त्यांना रुबी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. त्यांचा रक्तदाब स्थिर आहे. तसेच शरिरातील द्रव पदार्थांचा बिघडलेला समतोल साधण्यासाठी प्रयत्न सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर आहे. त्यांना दोन दिवस वैद्यकीय निरीक्षणाखाली ठेवण्यात येईल. डॉक्टरांची एक टीम त्यांच्या प्रकृतीकडे लक्ष ठेऊन आहे. त्यामुळे चिंता करण्याचे कारण नाही', अशी माहिती रुबी हॉस्पिटलचे संचालक डॉ. परवेज ग्रँट यांनी 'मटा'ला दिली. पवार यांच्यासोबत हॉस्पिटलमध्ये राष्ट्रवादीचे नेते अजित पवार, मित्र विठ्ठल मणियार तसेच कुटुंबीय उपस्थित होते.

दरम्यान, पवार यांना सततच्या दौऱ्यांमुळे थकवा जाणवत आहे. त्यामुळे तपासणीसाठी रुबी हॉलमध्ये दाखल केले आहे. डॉक्टरांनी तपासणी करून प्रकृती उत्तम असल्याचे सांगितले असून, सोमवारी सकाळी पवार मुंबईला जातील असे राष्ट्रवादीचे प्रवक्ते अंकुश काकडे यांनी कळविले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


पवारांना पक्षापेक्षा देशहित महत्त्वाचे

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

'सध्याचे राजकीय पक्ष देशाचा विचार न करता राजकारण करताना दिसतात; पण शरद पवार हे पक्षापेक्षा देशाचा विचार करतात. त्यांना जाणता राजा का म्हणतात, हे काही अनुभवांतून दिसून आले,' असे प्रांजळ मत माजी वित्त सचिव विजय केळकर यांनी व्यक्त केले.

शरद क्रीडा व सांस्कृतिक प्रतिष्ठानच्यावतीने प्रकाशित 'सुशासन आणि संवाद' या पुस्तकाचे प्रकाशन केळकर यांच्या हस्ते बालगंधर्व रंगमंदिर येथे झाले. त्यावेळी ते बोलत होते. व्यासपीठावर पद्मश्री प्रतापराव पवार, महापौर दत्तात्रय धनकवडे, प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष लक्ष्मीकांत खाबिया आणि अध्यक्ष राहुल देशपांडे आदी उपस्थित होते.

'माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या सरकारचा पाठिंबा अखिल भारतीय अण्णा द्रविड मुनेत्र कळघमने (एडीआयएमके) काढला होता. यशवंत सिन्हा देशाचे अर्थमंत्री होते. ते बजेट सादर करणार होते. त्यावेळी पवार लोकसभेतील विरोधी पक्षनेते होते. वाजपेयी यांनी पवारांशी संपर्क साधून बजेटला विरोध न करण्याची विनंती करण्याचे काम माझ्यावर सोपविले होते. तेव्हा पवार यांनी पक्षाचा विचार न करता, देशाचा विचार करून ही विनंती मान्य केली होती' असा अनुभव केळकर यांनी सांगितला. 'सध्या राजकीय पक्ष देशाचा विचार करण्यापेक्षा राजकारण करताना दिसतात. मात्र, पवार देशाचाच विचार करत असतात. त्यामुळेच त्यांना जाणता राजा असे म्हटले जाते.' असेही केळकर यांनी नमूद केले. 'भविष्यात ते देशाचे पंतप्रधान होतील.' अशी पुस्तीही त्यांनी जोडली.

'पवार यांच्याविषयी समजऐवजी गैरसमज जास्त आहेत. राजकारणात असे गैरसमज पसरविले जात असतात. मात्र, पवार यांनी आपल्या विरोधकांबाबतही कटूता बाळगली नाही.' असे प्रतापराव पवार म्हणाले. पवार यांचे स्वीय सहायक म्हणून काम करताना येत असलेले अनुभव सनदी अधिकारी सतीश राऊत यांनी सांगितले. 'सुशासन आणि संवाद' या पुस्तकामध्ये पवार यांच्याबरोबर काम केलेल्या ४० सनदी अधिकाऱ्यांचे अनुभनकथन आहे' असे खाबिया म्हणाले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रणित कुलकर्णी यांनी केले. नीलेश जेधे यांनी आभार मानले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कॉल सेंटर कर्मचाऱ्यांची २८ लाखांची फसवणूक

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

कॉल सेंटरमध्ये नोकरीला असलेल्या ६० ते ७० कर्मचाऱ्यांनी केलेल्या कामाचा मोबदला न देताच २८ लाखांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी स्वारगेट पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कॉल सेंटरचे मालक अमितेश देशमुख (वय ३५, रा. राजयोग सोसायटी, सिंहगड रोड) यांनी फिर्याद दिली आहे. फिर्यादीवरून नवीन शंकर आणि तेजस (पूर्ण नाव पत्ता माहीत नाही) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शंकरशेट रोडवरील वेगा सेंटर येथे देशमुख यांचे अनिकेत आय. टी. सर्व्हिसेस नामक कॉल सेंटर आहे. आरोपी केसांसाठी उपयुक्त औषधाची विक्री करणाऱ्या कंपनीचे संचालक आणि मार्केटिंग मॅनेजर आहेत. त्यांना कंपनीच्या उत्पादनाची विक्री करण्यासाठी लोकांची नेमणूक करायची होती. त्यासाठी त्यांनी देशमुख यांच्यासोबत बोलणी केली. त्याप्रमाणे देशमुख यांनी त्यांच्या कंपनीतील ६० ते ७० कर्मचाऱ्यांना त्यांच्याकडे काम करण्यासाठी पाठविले. त्याप्रमाणे सप्टेंबर ते नोव्हेंबर असे तीन महिने देशमुख यांच्या कर्मचाऱ्यांनी आरोपींच्या कंपनीत काम केले. मात्र, त्यांनी केलेल्या कामाचा मोबदला आरोपींनी त्यांना दिला नाही. या बाबत देशमुख यांनी आरोपींकडे तशी मागणी केल्यानंतरही काहीच प्रतिसाद मिळाला नाही.

पोलिस उपनिरीक्षक पी. जी. पालांडे हे अधिक तपास करत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘बीएसएनएल’चा वेग वाढणार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

'पुणे व अन्य काही शहरात भारत संचार निगम लिमिटेडच्या (बीएसएनएल) इंटरनेट कनेक्टिव्हिटीसाठी लवकरच ऑप्टिकल ट्रान्सपोर्ट नेटवर्क आणि पॅकेट डेटा पद्धतीचा वापर करण्यात येणार आहे. त्यामुळे एखादी ऑप्टिकल फायबर केबल तुटली तरीही इतर नेटवर्कमधून ग्राहकांना इंटरनेट कनेक्टिव्हिटी मिळू शकणार आहे. तसेच इंटरनेटचा वेगही वाढेल', अशी माहिती बीएसएनएलचे मुख्य महाप्रबंधक एम. के. जैन यांनी दिली.

एका कार्यक्रमानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. 'बीएसएनएलची राज्यातील सध्याची कनेक्टिव्हिटी इलेक्ट्रिकल माध्यमातून केली जाते. परंतु, आता ऑप्टिकल ट्रान्सपोर्ट नेटवर्कच्या माध्यमातून ही कनेक्टिव्हिटी फायबर टू फायबर पद्धतीने होणार आहे. त्यासाठी संपूर्ण देशात पुण्यासह ४४ शहरांची निवड करण्यात आली आहे. नागपूरला केंद्रस्थानी ठेवून तेथून विविध दिशांना हे नेटवर्क उभारण्यात येणार आहे. मार्चअखेर हे काम पूर्ण होईल', असे जैन यांनी सांगितले.

'नेटवर्क उभे राहिल्यानंतर त्यातून १०० गिगाबाइट (जीबी) प्रति सेकंद इतक्या प्रचंड वेगाने डेटा पाठवता येणे शक्य होणार आहे. त्याचबरोबर एखाद्या नेटवर्कमध्ये बिघाड झाल्यास अन्य नेटवर्कद्वारे डेटाची देवाणघेवाण करणे शक्य होणार आहे,' असेही जैन यांनी स्पष्ट केले. त्याचबरोबर देशभरात गुगलच्या धर्तीवर पॅकेट डेटाच्या माध्यमातून डेटा ट्रान्स्फर करण्याची यंत्रणाही लवकरच कार्यान्वित करण्यात येणार आहे. त्यासाठी सध्या टेंडरची प्रक्रिया सुरू आहे. यामुळे कोणत्याही मार्गाने डेटा कनेक्टिव्हिटी शक्य असून, अधिक वेगाने इंटरनेटचा वापर करणे शक्य होणार आहे. त्याचबरोबर पुण्यासह पश्चिम महाराष्ट्रात १७ एज (ईडीईजी) राउटर्स बसवून त्या माध्यमातून अधिक वेगवान इंटरनेट पुरवण्यात येईल', असेही त्यांनी स्पष्ट केले.

..तर बीएसएनल फायद्यात येईल

बीएसएनएलकडे प्रचंड मोठ्या प्रमाणावर पायाभूत सुविधा व ग्राहकसंख्या आहे. इच्छाशक्ती, एकत्रित प्रयत्न, दर्जात्मक सुधारणा, साधनांचा पुरवठा केल्यास बीएसएनएल पुन्हा फायद्यात येऊ शकेल. इतकेच नव्हे तर देशातील सर्वात आघाडीची मोबाइल व इंटरनेट सेवा पुरवठादार बनू शकेल, असा सूर संचार निगम एक्झिक्युटिव्ह संघटनेच्या राज्यस्तरीय अधिवेशनात व्यक्त झाला. बीएसएनएलचे मुख्य महाप्रबंधक एम. के. जैन, पुण्याचे प्रधान महाप्रबंधक डॉ. पी. के. होता, महाप्रबंधक (प्रशासन) संदीप अग्रवाल, महाप्रबंधक नितीन महाजन आदींनी मार्गदर्शन केले. संघटनेचे चेअरमन जी. एल. जोगी, अध्यक्ष ए. ए. खान, सरचिटणीस के. सॅबेस्टियन, संयुक्त सचिव राकेश मेहता, महाराष्ट्र परिमंडळ सचिव एम. एस. अडसूळ, नागेश नलावडे, भरत सोनावणे आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सिंहगड रस्त्याची दुरुस्ती आवश्यक

$
0
0

Chaitrali.Chandorkar@timesgroup.com

पुणे : सिंहगडाच्या खडतर रस्त्यावरून वाट काढताना गेल्या तीन महिन्यांमध्ये तीन गाड्या दरीत पडल्याच्या घटना ताज्या असतानाच वन विभागाने अजूनही रस्त्याच्या दुरूस्तीकडे दुर्लक्षच केले आहे. शनिवारपासून (२३ जानेवारी) मंगळवारपर्यंत (२६ जानेवारी) मिळालेल्या सलग सुट्ट्यांमुळे हजारो पर्यटक बोचऱ्या थंडीचा अनुभव घेण्यासाठी गडावर जाण्याची शक्यता आहे. याची दखल घेऊन वनविभागाने तातडीने रस्त्याची दुरूस्ती आणि वाहतुकीचे नियोजन करण्याची गरज आहे.

सुट्टी आणि सिंहगड हे जणू समीकरणच जुळले आहे. पावसाळा आणि थंडीच्या हंगामात सुट्ट्यांच्या दिवशी गडावर पर्यटकांची जणू जत्राच भरलेली असते. पण, गेल्या वर्षभरापासून सिंहगडाचा रस्ता म्हणजे पर्यटकांसाठी खडतर आणि जीवघेणा प्रवास ठरला आहे. प्रवेशशुल्क भरल्यानंतर काही मीटर अंतर चकाचक रस्त्याचा आनंद घ्यायचा आणि पुढे गेल्यावर खड्डे चुकवत जीव मुठीत धरून गाडी चालविण्याशिवाय दुसरा पर्यायच राहिलेला नाही. दोन वर्षांपूर्वीपर्यंत गडावरील वाहतुकीच्या कोंडीने गंभीर समस्येचे रूप धारण केले होते. पर्यटकांना तासन्तास रांगेत अडकावे लागत होते. पण, संयुक्त वन व्यवस्थापन समितीच्या स्वयंसेवकांनी गडाच्या पायथ्याला आणि गडावरील पार्किंगचे चांगले नियोजन केले. त्यामुळे सध्या कोंडीची टळली असली तरी, खड्ड्यांची समस्या कायम आहे.

वर्षभरापूर्वी या मार्गावर दोन ठिकाणी मोठी दरड पडली होती, समितीच्या कार्यकर्त्यांनी तेथील काही मुरूम गडावर नेऊन पार्किंगची क्षमता वाढवली. पण, अजूनही त्या ठिकाणी धोकादायक वळणांवर मोठे दगड आणि मातीचे ढिगारे साठले असून रस्त्यावर मुरूम पसरला आहे. या वळणावर अनेकदा दुचाकी गाड्या घसरतात. काही ठिकाणचे सुरक्षा कठडे मोडकळीस आले आहेत. स्थानिकांनी ही बाब वनाधिकाऱ्यांच्या वारंवार निदर्शनास आणून दिली आहे. या नादुरुस्त रस्त्यांवर दोन महिन्यांपूर्वी नियंत्रण सुटून खासगी कार अडीचशे फूट खोल दरीमध्ये कोसळली होती. गेल्या महिन्यात एक डंपर आणि काही दिवसांपूर्वी एक कार याच मार्गावर दरीत पडली होती. अपघात झालेली ही वळणे अत्यंत अवघड आहेत. रस्त्यांवरील खड्डे चुकवत वाहने चढविणे अनेकांना अवघड जाते. सुट्टीच्या दिवशी शेकडो चार चाकी आणि हजारांच्या संख्येने दुचाकी गाड्या गडावर ये-जा करतात. दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये अवघ्या तीन दिवसात पन्नास हजार पर्यटकांनी सिंहगडाला भेट दिली होती. वन विभागाने पर्यटकांची सुरक्षितता लक्षात घेऊन तातडीने रस्त्याची दुरूस्ती करावी, अशी मागणी स्थानिक जीपचालक आणि नागरिक सातत्याने करीत आहेत. मात्र, रस्ता दुरूस्ती ही आमची जबाबदारी नसून सार्वजनिक बांधकाम विभागाला हे काम सोपविण्यात आले आहे. यासाठी वेळोवेळी त्यांना कोट्यवधी रुपयांची रक्कमही देण्यात आली आहे. त्यामुळे त्यांनीच रस्ता दुरूस्त करावा, अशी भूमिका वन विभागाने स्वीकारली आहे.

अधिकाऱ्यांची टोलवाटोलवी

जिल्हाधिकारी कार्यालय आणि सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी काही महिन्यांनी घाटरस्त्याची पाहणी करून आणि लवकरच काम पूर्ण होईल अशी आश्वासने देत आहेत. प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या या वादामध्ये पर्यटक आणि स्थानिक गावकरी मात्र भरडले गेले आहेत. एकीकडे पर्यटकांकडून आकारण्यात येत असलेल्या टोलमधून प्रत्येक आठवड्याला लाखाच्या घरात प्रवेश शुल्क जमा होत असताना खड्ड्यांमुळे चाळणी झालेला घाट रस्ता वनाधिकाऱ्यांना दिसत नाही का, असा सवाल नागरिक उपस्थित करीत आहेत. एकूणच काय तर सिंहगडावरील सुशोभिकरणासाठी कोट्यवधी रुपये खर्च करणाऱ्या प्रशासनाने गडावर पोहोचण्याचा मार्ग देखील सुखकर करण्यास प्राधान्य देण्याची गरज आहे. गडावर निसर्गसौंदर्य, ऐतिहासिक वास्तू बघण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांचा प्रवास सुरळित होणे महत्त्वाचे आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘लोकशाही उत्सवा’चे मंगळवारपासून आयोजन

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

लोकशाही उत्सव समितीतर्फे उद्यापासून ३० जानेवारीपर्यंत 'लोकशाही उत्सव' आयोजित करण्यात आला आहे. ध्वजवंदन, काव्यवाचन-मुशायरा, चित्रपट, नाटक, लघुपट प्रदर्शन, परिसंवाद आदी कार्यक्रमांचे आयोजन उत्सवात करण्यात येणार आहे.

कष्टकरी महिला सुलोचना कांबळे यांच्या हस्ते मंगळवारी (ता. २६) सकाळी साडेआठ वाजता नवी पेठेतील एस. एम. जोशी फाउंडेशन येथे ध्वजवंदन करून महोत्सवाचे उदघाटन होणार आहे. डॉ. मनीषा गुप्ते यावेळी उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती लोकशाही उत्सव समितीच्या मिलिंद चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत दिली. 'जीवनोत्सव' या खादी आणि ग्रामोद्योगातील वस्तूंच्या प्रदर्शनाचे उदघाटनही मंगळवारी होणार आहे. सकाळी साडेदहा वाजता काव्यवाचन व मुशायऱ्याचा कार्यक्रम होईल. दुपारी दोन वाजता 'तुह्या धर्म कोंचा?' हा चित्रपट दाखविण्यात येणार आहे. यावेळी चित्रपटाचे दिग्दर्शक सतीश मन्वर, अभिनेते उपेंद्र लिमये, विभावरी दशपांडे यांच्याशी संवाद साधला जाणार आहे. त्यानंतर बुधवारी, एफटीआयआयच्या विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या लघुपटांचे प्रदर्शन करण्यात येणार आहे.

गुरुवारी (२८ जानेवारी) रात्री साडेनऊ वाजता टिळक स्मारक मंदिर येथे 'टेंगशेच्या स्वप्नात ट्रेन' या नाटकाचा प्रयोग केला जाणार आहे. शुक्रवारी, सायंकाळी सहा वाजता महर्षी कर्वे विद्याविहार येथे 'लोकशाही संगीत मैफली'चे आयोजन केले आहे. शनिवारी (३० जानेवारी) सकाळी साडेदहा वाजता बुधवार पेठ येथील मजूर अड्डा येथे 'हुतात्म्यांना अभिवादन' करण्यात येणार आहे. सायंकाळी सहा वाजता भारत इतिहास संशोधन मंडळात 'शाश्वत विकासाचे वाटाडे' या पुस्तकाचे प्रकाशन केले जाणार आहे. या वेळी 'आणीबाणी-राजकीय, आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक' या विषयावरील परिसंवाद होणार आहे. या परिसंवादात डॉ. किरण मोघे, डॉ. श्रुती तांबे, डॉ. सुहास पळशीकर सहभागी होणार आहेत, असे चव्हाण यांनी सांगितले. या महोत्सवातील नाटक व चित्रपट वगळता सर्व कार्यक्रम विनाशुल्क आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images