Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

साहित्यिकांची मांदियाळी व्यासपीठावर

$
0
0

माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या हस्ते माजी संमेलनाध्यक्षांचा सत्कार
ज्ञानोबा-तुकोबा साहित्यनगरी, पिंपरी
'साहित्यिक मजेदार लोक असतात. कधी हसवतील, कधी रडवतील. शाब्दिक फटका मारून वादळही निर्माण करतील. काही सांगता येत नाही परंतु, चूक सुधारून पुढे जाणे हीच साहित्य शारदेची खरी सेवा होय,' असा चिमटा माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी येथे काढला.
अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या ८९ व्या साहित्य संमेलनात माजी संमेलनाध्यक्षांचा सत्कार शिंदे यांच्या हस्ते झाला. त्या वेळी ते बोलत होते. डॉ. सदानंद मोरे, प्रा. फ. मुं. शिंदे, डॉ. नागनाथ कोत्तापल्ले, मधु मंगेश कर्णिक, डॉ. यु. म. पठाण, डॉ. द. भि. कुलकर्णी, विश्व संमेलनाचे माजी अध्यक्ष गंगाधर पानतावणे, शेषराव मोरे व्यासपीठावर होते.
'पिंपरी-चिंचवड औद्योगिक नगरीत संमेलन होणे म्हणजे लक्ष्मी निर्माण करणाऱ्या नगरीत सरस्वतीला आणल्यासारखे आहे,' असे नमूद करून शिंदे म्हणाले, 'आजच्या मराठी साहित्याचा प्रवाह बदलता असला पाहिजे. समाजाच्या मनाप्रमाणे साहित्य देऊ देऊ शकलो नाही, तर काही उपयोग नाही. संमेलनाच्या माध्यमातून उच्च विचार, प्रतिभा, कर्तृत्व आणि भाषेची पताका अशीच फडकत राहो. मराठीला राज्य आणि राष्ट्रीय स्तरावर नवा सन्मान मिळावा. तेव्हाच सर्वांना सोबत घेऊन जाणारा समाज निर्माण होईल.'
कर्णिक म्हणाले, 'माय माउली मराठीचा आणि महाराष्ट्राचा सांस्कृतिक महोत्सव आपण निष्ठेने साजरा करीत आहोत. ज्ञानोबा-तुकोबांच्या परिसरात संमेलन होत असल्याचा मोठा आनंद आहे. हा महोत्सव एकात्मतेच्या दृष्टीने समृद्धीसाठी उपयुक्त ठरावा.'
साहित्य संमेलनाचा अध्यक्ष अडीच दिवसांचा गणपती असतो, ही टीका निरर्थक असून अध्यक्षांना वर्षभर चांगले काम करता येऊ शकते, अशी अपेक्षा पठाण यांनी व्यक्त केली. संमेलनातून वाङ्मयीन सूरच उमटला पाहिजे, असे स्पष्ट करून पानतावणे यांनी संमेलनात वाचकांसाठी स्वतंत्र मंच उपलब्ध करून देण्याची सूचना केली.
प्रा. शिंदे यांनी 'कधीही असे घडले नाही, जिथे दुःख भेटले नाही,' कविता सादर केली. डॉ. मोरे यांनी 'ऑल इन वन' अशा शब्दांत संमेलनाची स्तुती केली. सबनीस यांनी भव्यता आणि दिव्यता सिद्ध करणारे ऐतिहासिक संमेलन असल्याचे गौरवोद्गार काढले. द. भि. कुलकर्णींनी सत्ता आणि साहित्य यामध्ये उचित अंतर असावे, अशी अपेक्षा व्यक्त केली. शेषराव मोरे यांनी संमेलनाच्या भरगच्च उपस्थितीबद्दल आश्चर्य व्यक्त केले. शिवसेनेच्या उपनेत्या डॉ. नीलम गोऱ्हे, खासदार अमर साबळे, माजी आमदार उल्हास पवार यांनीही मनोगते व्यक्त केली. उद्धव कानडे यांनी सूत्रसंचालन केले.
'महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीवेळी बेळगाव, निपाणी, भालकी, बिदर हे भाग कर्नाटकव्याप्त करण्यात आले आहेत. त्यामुळे मराठी भाषिकांवर अन्याय झाले आहेत. हा लढा सुप्रिम कोर्टात प्रलंबित आहे. या प्रश्नात केंद्र आणि राज्य सरकारने लक्ष घालून सुप्रिम कोर्टात योग्यप्रकारे बाजू मांडून सीमावासियांना महाराष्ट्रात समाविष्ट करून घेण्यासाठी निर्णायक पाऊले उचलली पाहिजेत. आम्ही ग्वाही देत आहोत की लाखो मराठी भाषिक सीमावासियांसोबत आहोत व यापुढेही कायम राहतील, असा ठराव या ८९व्या अखिल भारतीय मराठी साहित्य साहित्य संमेलनात एकमताने मंजूर करावा,' अशी विनंती शिवसेनेच्या उपनेत्या डॉ. नीलम गोऱ्हे यांनी संमेलनाध्यक्ष श्रीपाल सबनीस आणि स्वागताध्यक्ष डॉ. पी. डी. पाटील यांना शुक्रवारी (१५ जानेवारी) केली.
शैक्षणिक, कृतज्ञता निधी
'राज्यातील दुष्काळग्रस्तांच्या मुलांच्या मदतीसाठी सुमारे ७० लाख रुपयांचा निधी 'नाम' फाउंडेशनला देण्यात येणार आहे. तसेच अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या हयात असलेल्या सर्व माजी संमेलनाध्यक्षांना प्रत्येकी एक लाख रुपयांचा निधी देण्यात येईल,' असे स्वागताध्यक्ष डॉ. पी. डी. पाटील यांच्यावतीने या वेळी जाहीर करण्यात आले.
साहित्य संमेलनात माजी अध्यक्षांचा स्वतंत्रपणे सत्कार होण्याची कदाचित ही पहिलीच वेळ असावी, अशी खात्री व्यक्त करीत डॉ. नागनाथ कोत्तापल्ले म्हणाले, 'माजी अध्यक्षांना संमेलनाची साधी निमंत्रण पत्रिकासुद्धा मिळत नाही. परंतु, स्वागताध्यक्षांनी स्वतः निमंत्रण दिले, ही बाब उल्लेखनीय म्हणता येईल.'

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


भाषेच्या सोहळ्यात रंगले परदेशी विद्यार्थी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, ज्ञानोबा-तुकाराम साहित्यनगरी, पिंपरी
साहित्य संमेलन अखिल भारतीय असले तरी परदेशी पाहुण्यांना या संमेलनाने भुरळ घातली आहे. संमेलनाच्या दिमाखदार आयोजनाची चर्चा पिंपरी-चिंचवडकरांमध्ये असतानाच, परदेशी विद्यार्थ्यांनाही मराठी भाषेच्या या उत्सवाबद्दल आत्मीयता वाटू लागली आहे. साहित्याच्या उत्सवातून भारतीय संस्कृतीचेच दर्शन घडत असल्याची प्रतिक्रिया अनेक परदेशी विद्यार्थ्यांनी व्यक्त केली.
साहित्यिकांबरोबर इराक, दुबईकरांनाही मराठीच्या उत्सवाची ओढ असल्याचे शुक्रवारी जाणवले. पिंपरी-चिंचवडसह आसपासच्या परिसरातून आलेल्या विद्यार्थ्यांची लक्षणीय उपस्थिती शुक्रवारी लक्ष वेधून घेत होती. त्याचप्रमाणे, दुबई, इराकवरून आलेल्या विद्यार्थी-नागरिकांनीही संमेलनात आवर्जून हजेरी लावली आहे. इराकचे ओमारू वाहतिक, अब्दुला चरान, दुबईचे अब्दुला वाहतिक हे आपल्या अरबी पारंपरिक वेशभूषेत संमेलनात सहभागी झाले आहेत. मूळचा इराकचा पण सध्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात इंग्रजीचे शिक्षण घेणारा नासर इदांत याने सर्वांना संमेलनाची सैर घडवली आणि संमेलनाची भव्यता व भाषेचा सोहळा पाहून ही मंडळी अवाक झाली. संमेलननगरी आणि ग्रंथप्रदर्शन त्यांना भावले. मराठी साहित्याची ओळख करून घेण्यासाठी या सर्वांनी आता पिंपरीत मुक्काम ठोकला असून भारतीय व त्यातून मराठमोळ्या संस्कृतीविषयी वाटणारे आकर्षण त्यांच्या बोलण्यातून जाणवले. एखाद्या भाषेचा सोहळा इतका रम्य असू शकतो, यावर विश्वास बसत नसल्याची भावना या सर्वांनी 'मटा'शी बोलताना व्यक्त केली.
सह्याद्री वाहिनीवरून थेट प्रक्षेपण
साहित्य संमेलनाचे आज (शनिवारी) होणारे उद्घाटन सह्याद्री वाहिनीवरून थेट पाहता येणार आहे. गेल्या वर्षी झालेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर आयोजकांनी मुंबई दूरदर्शन केंद्राकडे ठराविक रक्कम जमा केल्याने साहित्याचे संमेलनाचे थेट प्रक्षेपण करण्यात येणार आहे. उद्घाटन सोहळ्याचे सकाळी १० ते दुपारी २ पर्यंतचे प्रक्षेपण रसिकांना घरबसल्या पाहता येईल. तसेच सोमवारी सायंकाळी ५ ते ७ या वेळेत होणारा समारोपही पाहता येईल, असे दूरदर्शनचे निर्माता जयू भाटकर यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भक्तीचा जागर अन् संस्कृतीचा आदर

$
0
0

ज्ञानोबा-तुकोबा साहित्यनगरी (पिंपरी)
टाळमृदंगाच्या गजरात ज्ञानोबा-तुकारामांची भजने आणि 'साहित्य पंढरीचे, आम्ही वारकरी' अशा टोप्या परिधान केलेले युवक, 'मोरया-मोरया, मंगलमूर्ती मोरया' असा जयघोष यामुळे ८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनानिमित्त निघालेल्या ग्रंथदिंडीतून भक्तीचा जागर घडला. शिवाय महिलांच्या पारंपरिक वेशभूषा आणि खेळांमुळे यानिमित्ताने मराठमोळ्या संस्कृतीविषयीचा आदरही व्यक्त झाला.
संमेलनानिमित्त निघालेली ग्रंथदिंडी नेत्रदीपक आणि भव्य होती. विशेषतः शिक्षणानिमित्त पिंपरी-चिंचवडमध्ये आलेल्या देशविदेशातील विद्यार्थ्यांचा पारंपरिक पोषाखातील सहभाग लक्षवेधी होता. या माध्यमातून संत आणि पंत परंपरेचे दर्शन घडले. टाळ मृदंगाच्या गजर करीत वारकऱ्यांनी 'ज्ञानोबा-तुकोबा'च्या नामघोषाचा जागर केला. चिंचवड देवस्थानच्या दिंडीतील भाविकांनी गळ्यात उपरणे घालून 'मोरया-मोरया'चा जयघोष केला. अब्दागिऱ्या, केशरी फेटा घातलेले युवक-युवती यामुळे वातावरण भक्तिमय झाले होते. परिसराला साहित्य पंढरीचे स्वरूप प्राप्त झाले होते. अनेक संतांचा वेष परिधान केलेली चित्ररथावरील चिमुकली मुले आनंदाने भारावून गेली होती. तसेच ढोल-ताशा आणि हलगीच्या तालावर नृत्य करून तरुणाईने जल्लोषही केला.
सनई-चौघडा वादनाने वातावरण निर्मितीत भर घातली. वासुदेवाच्या वेषातील कलाकारांनी 'तुळस वंदावी, वंदावी'सारखी लोकगीते सादर केली. महिलांनी नऊवारी साडी, नाकात नथ आणि पारंपरिक दागिने घालून मंगळागौरीचे खेळ खेळले. या मराठमोळ्या संस्कृतीचे दर्शन घडवित दिंडी सोहळा संमेलनस्थळी पोहचताच आनंदाने जयघोष झाला आणि उद्योगनगरीत मराठीच्या लोकोत्सवाने अप्रतिम रंग भरले. शहराच्या इतिहासात प्रथमच देखणा सोहळा अनुभवास मिळावा, यासाठी संमेलनस्थळ पहिल्याच दिवशी गर्दीने फुलून गेल्याचे दिसून आले. कळतनकळत रसिकांची पाऊले साहित्यनगरीच्या दिशेने वेगाने पडत असल्याचे प्रकर्षाने जाणवले. संमेलनस्थळी साकारण्यात आलेल्या कलाकृतींसमोर उभे राहून सेल्फी आणि फोटो काढून घेण्याचा मोह अनेकांना आवरला नाही.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

संमेलनाची ग्रंथदिंडीने सुरुवात; आज उद्घाटन

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, ज्ञानोबा-तुकाराम साहित्यनगरी (पिंपरी)

उद्योगाची पंढरी बनून कामगारांना भाकरीचा चंद्र देणाऱ्या पिंपरी-चिंचवडने शुक्रवारी ग्रंथदिंडीद्वारे मराठीची पताका आणि साहित्याचा ध्वज डौलाने मिरवित उद्योगनगरीत भरत असलेल्या ८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाची द्वाही मोठ्या उत्साहाने फिरवली. या संमेलनाचे आज, शनिवारी सकाळी औपचारिक उदघाटन होणार असून, या सोहळ्यातच ज्ञानपीठ पुरस्कारप्राप्त साहित्यिकांचा सन्मान केला जाणार आहे.

वारकऱ्यांपासून कामगारांपर्यंत आणि अधिकाऱ्यांपासून आयटीतील कर्मचाऱ्यांपर्यंत; तसेच पारंपरिक वेशभूषेतील सहभागी महिलांपासून ते कॉलेजमधील युवक-युवतींपर्यंत सर्वांच्या सहभागाने शुक्रवारी ग्रंथदिंडी निघाली आणि उद्योगनगरीला खऱ्या अर्थाने साहित्यनगरीचा साज चढला. गेले काही दिवस साहित्यबाह्य कारणांमुळे निर्माण झालेले वादही ग्रंथदिंडीच्या उत्साहात मागे पडले. वाहनांपासून रसायनांपर्यंतच्या विविध उद्योगांत रममाण होणाऱ्या या नगरीतील सर्वसामान्य कमालीच्या उत्साहाने ग्रंथदिंडीत सहभागी झाले होते.

तरुणाईच्या सहभागामुळे दिंडी अतिशय लक्षणीय ठरली. ग्रंथप्रदर्शन आणि माजी संमेलनाध्यक्षांच्या सत्कारालाही मोठा प्रतिसाद लाभला. साहित्य महामंडळ आणि डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठातर्फे आयोजित साहित्य संमेलन शुक्रवारी औपचारिकपणे सुरू झाले. आज (शनिवारी) होणाऱ्या संमेलनाच्या उद्घाटन सोहळ्याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, प्रसिद्ध गीतकार गुलजार यांच्यासह नियोजित संमेलनाध्यक्ष श्रीपाल सबनीस, संमेलनाध्यक्ष डॉ. सदानंद मोरे, पिंपरी-चिंचवडच्या महापौर शकुंतला धराडे यांच्या प्रमुख उपस्थितीत उद्घाटन कार्यक्रम होणार आहे. या समारंभात महामंडळातर्फे लेखक प्रा. के. रं. शिरवाडकर आणि प्रकाशक येशू पाटील यांचा विशेष सत्कार केला जाणार आहे. त्याशिवाय, सत्यव्रत शास्त्री, रेहमान राही, केदारनाथ सिंह आणि सीताकांत महापात्रा या ज्ञानपीठ पुरस्कारप्राप्त लेखकांना सन्मानित करण्यात येणार आहे. साहित्य संमेलनात प्रथमच संमेलनाध्यक्षांच्या सविस्तर मुलाखतीचा कार्यक्रम शनिवारी सायंकाळी होणार आहे. नियोजित संमेलनाध्यक्ष सबनीस यांनी संमेलनापूर्वीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविषयी अनुद्गार काढून वाद ओढवून घेतला होता. त्यामुळे, संमेलनातील त्यांच्या मुख्य भाषणासह मुलाखतीमध्ये सबनीस काय बोलणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

प्रेमत्रिकोणातून युवतीचा खून

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

प्रेयसीच्या अपहरणाच्या गुन्ह्यात जामिनावर सुटल्यानंतर तरुणाने आपल्या मित्राकडे तिच्याच खुनाची कबुली दिली आणि अवघ्या चोवीस तासांत पुन्हा तो पोलिसांच्या जाळ्यात अडकला. चतुःश्रृंगी पोलिसांनी केलेल्या कौशल्यपूर्ण तपासानंतर प्रेमाच्या त्रिकोणातून झालेला खून उघडकीस आला.

लक्ष्मी ऊर्फ भारती काळे (वय १७, रा. औंध) असे खून झालेल्या तरुणीचे नाव आहे. या प्रकरणी तिचा प्रियकर संतोष बाबर (वय २६, रा. खडकी) याला ताब्यात घेण्यात आले. लक्ष्मीचे अपहरण झाल्याची तक्रार पोलिस ठाण्यात दाखल झाली होती. पोलिसांचा संतोषवर संशय होता. त्यानुसार त्याला अपहरणाच्या गुन्ह्यांत अटकही करण्यात आली. मात्र, दहा दिवसांच्या पोलिस कोठडीनंतरही त्याने खुनाची माहिती पोलिसांना दिली नव्हती, अशी माहिती चतुःश्रृंगी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अरुण सावंत यांनी दिली.

कोर्टाने संतोषची जामिनावर सुटका केल्यानंतर त्याने लक्ष्मीचा खून केल्याची माहिती आपल्या मित्राला दिली. पोलिसांना खबऱ्यांकडून ही माहिती समजली. त्यानंतर लगेचच सहायक निरीक्षक शैलजा सावंत-बोबडे यांच्या पथकाने संतोषला ताब्यात घेतले आणि त्याच्याकडे तपास केला. संतोषने दिलेल्या माहितीनुसार लक्ष्मीच्या मृतदेहाचा सांगाडा खडकी परिसरात मिळाला. त्या सांगड्याची 'डीएनए' तपासणी करण्यात येणार आहे. घटनास्थळी लक्ष्मीचे कपडे मिळाले आहेत. पोलिसांनी संतोषला खुनाच्या गुन्ह्यांत अटक करण्याची परवानगी कोर्टाकडे मागितली आहे.

संतोष व्यसनी असून, मजुरीचे काम करतो. लक्ष्मी ही दहावीत शिकत होती. त्या दोघांचे दोन वर्षांपासून प्रेमसंबंध होते. मात्र, दरम्यानच्या काळात लक्ष्मीचे दुसऱ्या तरुणासोबत प्रेमसंबंध असल्याचा संशय संतोषला होता. त्यामुळे त्याने ३० डिसेंबर २०१५ रोजी लक्ष्मीला तिच्या घरातून दुचाकीवर बसवून खडकी परिसरात नेले आणि तेथे तिचा खून केला.

लक्ष्मी घरातून गायब झाल्यानंतर तिचा शोध घेतला. मात्र, ती न सापडल्यामुळे पोलिसांकडे तक्रार देण्यासाठी गेले. त्यावेळी कुटुंबयांनी संतोषनेच लक्ष्मीचे अपहरण केल्याची तक्रार २ जानेवारी २०१५ रोजी चतुःश्रृंगी पोलिसांकडे दिली. त्यानुसार त्याला अटक केली. त्याला कोर्टाने दहा दिवस पोलिस कोठडी सुनावली. तो व्यसनी असल्यामुळे पोलिस कोठडीतील चार दिवस त्याच्यावर ससून हॉस्पिटलमध्ये उपचार करण्यात येत होते. त्याने तपासात कोणतेही सहकार्य केले नाही.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सुफी संगीताने बहरला ‘वसंतोत्सव’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

गारव्याच्या मंद झुळूकेप्रमाणे रसिकमनाला अलगद स्पर्शून गेलेले सतारवादन, शास्त्रीय संगीत अन् भावपूर्ण अभंग गायकीने आणलेली रंगत या सगळ्यावर बहारदार सुफी संगीताने चढविलेला कळस, पेशवाई वाड्याच्या भव्य पार्श्वभूमीवर सजलेला रंगमंच अशा उत्साही वातावरणात शुक्रवारी वसंतोत्सवाचे उद्घाटन झाले. प्रसिद्ध संतूरवादक पं. सतीश व्यास, प्रसिद्ध गायक महेश काळे आणि राहुल देशपांडे तसेच वडाळी ब्रदर्स या कलावंतांना रसिकांची उत्स्फूर्त दाद मिळाली.

डॉ. वसंतराव देशपांडे प्रतिष्ठानतर्फे न्यू इंग्लिश स्कूल, रमणबाग येथे महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. 'वसंतोत्सवाला मिळणारी दाद ही रसिकांचे आजोबांवर असणारे प्रेम आहे,' अशी विनम्र भावना आयोजक राहुल देशपांडे यांनी व्यक्त केली. पहिल्या सत्राचा श्रीगणेशा पं. सतीश व्यास यांनी राग मधुवंतीने केला. त्यानंतर त्रितालात राग किरवानी त्यांनी सादर केला. संतूरच्या मधूर सुरावटींवर व्यास यांनी अलगद छेडलेल्या रागसौंदर्याने उपस्थितांना मुग्ध केले. ओजस अठिया (तबला) आणि जसराज शिंत्रे (तानपुरा) यांनी त्यांना साथसंगत केली.

त्यानंतर सर्वांना वेध लागले ते किराणा घराण्याचे प्रसिद्ध गायक आनंद भाटे यांच्या गायकीचे. प्रकृतीच्या कारणास्तव भाटे महोत्सवात त्यांची कला सादर करू शकणार नाहीत, त्यांच्याऐवजी गायक आणि मित्र महेश काळे गाणार असल्याचे देशपांडे यांनी जाहीर करताच उपस्थितांनी टाळ्यांच्या गजरात त्यांचे स्वागत केले. वसंतोत्सवाच्या व्यासपीठावर गायला मिळणे हे माझे भाग्य, अशी भावना व्यक्त करून काळे यांनी राग शुद्धकल्याण सादर केला. 'ला दे सैय्या चुनरिया' या रचनेने मैफलीची रंगत वाढविली. त्यानंतर दमदार आवाजात त्यांनी सादर केलेल्या 'हे सुरांनो चंद्र व्हा' या रचनेलाही दाद मिळाली. अभंग गायकीला सुरुवात करण्यापूर्वी काळे यांनी राहुल देशपांडे यांना सोबत करण्याची विनंती केली. त्यानंतर दोघांनी मिळून सादर केलेल्या अवीट गोडीच्या अभंगांना रसिकांनी दाद देऊन डोक्यावर घेतले.

'प्रथम तुला वंदितो', 'पंढरीचा वास, चंद्रभागे स्नान', 'आम्हा न कळे ज्ञान' या अभंगांनी मैफलीत जान आणली. 'तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल' या दोघांनी एकत्रित गायलेल्या अभंगांना उपस्थितांनी टाळ्यांची साथ दिली. निखिल फाटक (तबला), चैतन्य कुंटे (संवादिनी), ऋषिकेश पाटील, राजस जोशी (तानपुरा) आणि नारायण खिल्लारी (टाळ) यांनी साथसंगत केली.

..

'पुणेकर रसिक सुननेवाले लोग'

पहिल्या दिवसाचे शेवटचे सत्र गाजविले पुरणचंद आणि प्यारेलाल या वडाळी बंधूंनी. सुफी संगीतातून संतवचने रसिकांपर्यंत पोहोचविताना त्यांनी मांडलेला सर्वधर्म समभावाची भावना उपस्थितांच्या काळजाला स्पर्शून गेली. पुणेकर रसिक हे 'सुननेवाले लोग' आहेत त्यामुळे त्यांच्यासमोर कला सादर करणे गौरवाची बाब आहे, असे सांगत शायराना अंदाजात वडाळी बंधूंनी गायकीला सुरूवात केली. 'आज की बात फिर नही होगी', 'तुझे तकेया तो लगा मुझे ऐसे, जैसे मेरी ईद हो गई' अशा सुफी रचना सादर करत त्यांनी पहिल्या दिवसाचा दमदार समारोप केला.

..

नानांचा महोत्सव आणि निधी

वसंतोत्सवाबाबत बोलताना वसंतोत्सव हा नानांचा आहे, अशी भावना व्यक्त करून राहुल देशपांडे यांनी उपस्थितांशी संवाद साधला. या महोत्सवात नाना पाटेकर यांचे मोठे योगदान आहे. डॉ. वसंतराव देशपांडे यांचा स्मृती महोत्सव, समारोह झाला पण वसंतोत्सवाची संकल्पना सुचली तेव्हा माझ्या वडिलांसोबत नाना उभे राहिले. त्यांनी तन, मन, धन अर्पण केल्याने या महोत्सवाला आजचे स्वरूप आले आहे. हा महोत्सवासाठी प्रवेश 'मोफत' नसून रसिकांना मी आमंत्रित केले आहे, त्यामुळे महोत्सवातून जमा होणारा निधी नाना आणि मकरंद अनासपुरे यांच्या 'नाम' फाउंडेशनला वंचितांच्या मदतीसाठी देण्यात येईल, असेही देशपांडे यांनी यावेळी जाहीर केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

संभाजी महाराजांचा आज राज्याभिषेक सोहळा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा आज, शनिवारी (१६ जानेवारी) तुळापूर येथे साजरा करण्यात येणार आहे. या सोहळ्यासाठी पीएमपीएमएलने खास बसची सोयही केली आहे. राजगडावर साजरा करण्यात येणाऱ्या शिवराज्याभिषेकाप्रमाणे हा सोहळा असणार आहे.

शिवपुत्र शंभुराजे राज्याभिषेक ट्रस्टचे कार्याध्यक्ष धनंजय जाधव यांनी ही माहिती दिली. या सोहळ्यात ढोल-ताशांच्या गजरामध्ये प्रदक्षिणा पालखी सोहळा निघणार आहे. तसेच, शिवयोद्धा मर्दानी आखाडे, शाहिरी पोवाडे आणि शंभुराज्याभिषेकावर व्याख्यान होणार आहे. शिवस्पर्शाने पावन झालेल्या सप्तनद्यांमधील पाण्याने शंभुराजांच्या पुतळ्याला जलाभिषेक घालण्यात येणार आहे. या राज्याभिषेकास निंबाळकर राजघराण्याचे वंशज शिवरूपराजे खर्डेकर, आमदार नीतेश राणे, महेश लांडगे, बाबुराव पाचर्णे, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष प्रदीप कंद, संभाजी ब्रिगेडचे प्रदेश उपाध्यक्ष विकास पासलकर आदी उपस्थित राहणार आहेत, असेही जाधव यांनी सांगितले. या राज्याभिषेक सोहळ्याच्या निमित्ताने पीएमपीएमएलमार्फत पुणे स्टेशन येथून खास दोन बस सोडण्यात येणार आहेत. पहिली बस सकाळी ७.३० वा आणि दुसरी बस सकाळी ८.३० वाजता सोडण्यात येणार आहे, असेही त्यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘असर’वरील आक्षेपांचा ‘प्रथम’ने खुलासा करावा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

'असर'ची सर्वेक्षणाची कार्यपद्धती आणि विश्वासार्हतेविषयी नुकत्याच उपस्थित करण्यात आलेल्या प्रश्नांचा 'प्रथम'ने खुलासा करावा, अशी मागणी प्रयोगशील शिक्षक आणि महाराष्ट्र अॅक्टिव्ह टीचर्स फोरमचे संयोजक भाऊसाहेब चासकर यांनी केली आहे.

'प्रथम' या स्वयंसेवी संस्थेच्या माध्यमातून गेल्या दहा वर्षांपासून 'असर' हा शैक्षणिक अहवाल दर वर्षी प्रसिद्ध केला जातो. या अहवालाविषयी सरकारी शाळांतील शिक्षक, अभ्यासक, कार्यकर्ते आणि शिक्षणतज्ज्ञांनी यापूर्वीही जोरदार हरकती घेतल्या होत्या. रणजितसिंह डिसले या शिक्षकाने 'असर'च्या विश्लेषणाच्या आधारे काही तीव्र आक्षेप नोंदविले आहेत. त्या पार्श्वभूमीवर चासकर यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात 'असर'विषयी निरनिराळे मुद्दे उपस्थित करण्यात आले आहेत.

महाराष्ट्र आणि पंजाब वगळता इतर राज्यांसाठी यंदा 'असर'चे सर्वेक्षण आणि अहवाल प्रसिद्ध होणार नसल्याचे समजते. राज्याच्या शिक्षण विभागाच्या एका महत्त्वाकांक्षी कार्यक्रमाचाही एक मुख्य आधार असलेला 'असर'चे राष्ट्रीय पातळीवरील सर्वेक्षण यंदा अचानकपणे का थांबवले गेले, याविषयी शिक्षणविश्वात मोठी उत्सुकता आहे. तसेच, पंजाब आणि महाराष्ट्र वगळता देशभरातल्या अन्य राज्यांत 'असर'साठीचे सर्वेक्षण का थांबविले आहे, यामागील कारण 'प्रथम'ने जाहीरपणे सांगायला हवे, असे चासकर यांनी म्हटले आहे.

...

वधवांच्या भूमिकेविषयी 'प्रथम'चे मत काय?

'असर'मुळे गेल्या दहा वर्षांपासून सरकारी शाळा आणि खासगी शाळांमध्ये अपरिहार्यपणे तुलना होत आहे. त्यातून सरकारी शाळा आणि तिथे शिकवणारे शिक्षक यांच्या एकूण कामकाजाविषयीच अनेक प्रश्न, शंका उपस्थित केल्या जात. त्यामुळे सरकारी शाळांवरही ताशेरे ओढण्यात येत आहेत. 'खासगी आणि सरकारी शाळांची परिस्थिती संपूर्णपणे भिन्न असल्याने अशी तुलना करणे गैर आहे, किंबहुना अशी तुलना सरकारी शाळांवर अन्यायकारक ठरेल', असे मत 'असर''च्या संचालक नीलिमा वधवा यांनी म्हटलेले अलिकडेच एका वृत्तपत्रातून समोर आले. या विषयी 'प्रथम'ची भूमिका काय आहे, याचाही खुलासा करण्याची मागणी चासकर यांनी या निमित्ताने केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


विविध अपघातांत दोन तरुणांचा मृत्यू

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

भरधाव टँकरने दिलेल्या धडकेत बेकरीतील केकची डिलिव्हरी देण्यासाठी निघालेल्या तरुणाचा मृत्यू झाला. तर, त्याच्या सोबत असणारी व्यक्ती किरकोळ जखमी झाली आहे. खराडी येथील क्लस्टर सी इमारतीजवळ गुरुवारी सकाळी साडेनऊच्या सुमारास हा अपघात झाला.

या प्रकरणी चंदनगर पोलिस ठाण्यात टँकर चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सरताज वली मलिक (वय २०, रा. टीव्हीएस शोरूमजवळ, चंदननगर) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. अपघातात अफजल अन्सारी किरकोळ जखमी असून, त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून टँकरचालक सिद्धार्थ शरणप्पा केरबार (वय २२, रा. पाटीलबुवा नगर, खराडी) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अन्सारी आणि मलिक खराडी येथील एका बेकरीत कामाला आहेत. गुरुवारी सकाळी साडेनऊ वाजता केक पोहोचविण्यासाठी दुचाकीवरून जात होते. त्यावेळी खराडीतील क्लस्टर सी इमारतीवळ त्यांच्या दुचाकीला टँकरने धडक दिली. त्यामध्ये मलिक याचा मृत्यू झाला. पोलिस उपनिरीक्षक साळुंखे अधिक तपास करत आहेत.

दुसरा अपघात गणेश खिंड रस्त्यावर गुरुवारी मध्यरात्री झाला. भरधाव वेगाने चाललेला दुचाकीस्वार पुलाच्या कठड्यास धडकून मृत्युमुखी पडला. अन्य एक जण जखमी असून, त्याच्यावर उपचार सुरू आहेत. लक्ष्मण गोपाळसिंग गुस्वाई (वय १९, रा. साईनाथनगर) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. अजय पनपाटील (रा. पाषाण) हा अपघातात जखमी झाला. वीरेंद्रसिंग राणा (वय २९, रा. मुंढवा) यांनी या संदर्भात फिर्याद दिली आहे. लक्ष्मण आणि अजय दोघे दुचाकीवरून जात होते. गणेशखिंड येथे गर्व्हन्मेंट पॉलिटेक्निकल कॉलेजच्या पुलावरून जात असताना भरधाव वेगातील दुचाकी घसरली. त्यामुळे पुलाच्या कठड्याला धडकून लक्ष्मणचा मृत्यू झाला. याप्रकरणी फौजदार ए. एस. मोरे अधिक तपास करत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तीन घरफोड्यांमध्ये आरोपीला सक्तमजुरी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

शहरात विविध ठिकाणी घरफोड्या करणाऱ्याला तीन गुन्ह्यांमध्ये एक वर्ष सक्तमजुरी आणि शंभर रुपये दंडाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी शीतल बांगड यांच्या कोर्टाने हा निकाल दिला.

हर्षद श्याम देवधर (३२, रा. धायरी) असे आरोपीचे नाव आहे. या प्रकरणी सरकारी पक्षातर्फे सहायक सरकारी अभियोक्ता उज्ज्वला पवार यांनी काम पाहिले. पुष्कराज टाकळकर, अजय देशपांडे आणि नीलेश गाडगीळ यांच्या भागीदारीत असणारी इझीट्राय सिस्टीम प्रा. लि. ही कंपनी जोशी चालवितात. १६ मार्च २०१५ रोजी कंपनी बंद करून गेल्यानंतर आरोपीने खिडकीचा गज कापून कंपनीत प्रवेश केला. दोन कम्प्युटर, एक डिजिटल मल्टिमीटर तसेच विविध टुल्स त्याने चोरले. या प्रकरणी सिंहगड रोड पोलिस स्टेशनमध्ये दोन वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले होते.

दरम्यान अॅक्विलाइन कंट्रोल अँड सिस्टीम या कंपनीचे कडीकोयंडे तोडल्याचा प्रकार घडला होता. तेथून दोन लॅपटॉप, डीव्हीआर असा ४४ हजार ५०० रुपयांचा ऐवज चोरून नेण्यात आला होता. या प्रकरणीही सिंहगड रोड पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्हात आरोपी हर्षद देवधर याला अटक करण्यात आली. उज्ज्वला पवार यांनी केलेल्या युक्तिवादानंतर या घरफोड्या आरोपीनेच केल्याचे सिध्द झाले. देवधर याला हृदयविकाराचा आजार असल्याने न्यायालयाने त्याला दया दाखवत तिन्ही गुन्ह्यांमध्ये प्रत्येकी एक वर्षाची शिक्षा सुनावली. दरम्यान, तो सुटल्यानंतर त्याचे पुनर्वसन करण्याचे तोंडी निर्देषही पोलिसांना कोर्टाने दिले आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अॅक्रेलिक रंगांची कॅनव्हासवर उधळण

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

कॅन्व्हासवर अॅक्रेलिक रंगांच्या माध्यमातून कल्पकता आणि सौंदर्यदृष्टी काय कमाल करू शकते याचा सुखद प्रत्यय घ्यायचा असेल, तर 'झेप' या प्रदर्शनाला भेट द्यायला हवी. 'वुमन्स आर्टिस्ट ग्रुप'च्या १६ सदस्यांनी चित्रे, शिल्पे, पॉटरी या कलांचे सादरीकरण या प्रदर्शनामध्ये केले असून, शुक्रवारी व्यंगचित्रकार मंगेश तेंडुलकरांच्या हस्ते त्याचे उद्घाटन झाले.

या वेळी चित्रकार आशा किर्लोस्करही उपस्थित होत्या. १७ जानेवारीपर्यंत घोले रस्त्यावरील राजा रविवर्मा कलादालनात सकाळी १० ते रात्री ८ यावेळेत हे प्रदर्शन पाहण्यासाठी खुले आहे. कलेचे केवळ औपचारिक शिक्षण घेतलेल्या महिला कलाकारच या प्रदर्शनामध्ये सहभागी झालेल्या नाहीत, तर हौशी चित्रकार, शिल्पकार यांनीही आपली अभिव्यक्ती सादर केली आहे. व्यवसायाने डॉक्टर, वकील असलेल्या महिला कलाकारांची चित्रे आवर्जून पाहण्यासारखी आहेत. पेपर क्वीलिंग ऑफ कॅन्व्हास, वारली पेंटिंग, कर्नाटकमधील आदिवासींची 'छित्तारा' ही कला, कॉफी पेटिंग ही 'झेप'ची वैशिष्ट्ये सांगता येतील.

'फ्रेमिंग'च्या वेगळ्या शैलीने प्रदर्शनातील अनेक चित्रांची शोभा वाढवली आहे. वापरलेले रंगही सुखद असल्याने प्रत्येक चित्र उठावदार झाल्याचे आवर्जून जाणवते. चेतना सुदामे यांच्या 'सेलिब्रेशन' आणि 'हळद' ही चित्रे सुरुवातीलाच स्वागत करतात. नेहा गुदगे यांची 'नंदी', 'बारीश', 'बर्ड्', 'बुद्धा' आणि 'सनराइज' ही चित्रे सुखद भासतात. श्रेया आपटे यांनी 'ट्रायबल आर्ट ऑफ कर्नाटक' म्हणून 'छित्तारा'चे चित्र रेखाटले आहे. कॅन्व्हासवर लाटांच्या विविध छटा रेखाटण्यात स्वाती गोडबोलेंचा हातखंडा असल्याचे जाणवते.

काळ्या खडकात फुललेला पांढराशुभ्र जास्वंदही त्यांची अफाट सौंदर्यदृष्टी दाखवतो. दर्शना शहा यांनी पेपर क्वीलिंग या कलेच्या फ्रेम साकारल्या असून, त्यापैकी 'ट्री' हे त्यांना विशेष जमले आहे. प्रियांका जगनगाडाचे 'कॉफी पेटिंग' प्रदर्शनाचे वेगळेपण आणखीच ठसवते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जोशी पुरस्काराचे सोमवारी वितरण

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

प्रसाद प्रकाशन आणि प्रसाद ज्ञानपीठ यांच्यातर्फे येत्या सोमवारी (१८ जानेवारी) मंजिरी मनोहर जोशी स्मृतिगौरव पुरस्काराचे वितरण आणि प्रसाद प्रकाशनच्या नव्या दोन पुस्तकांचे प्रकाशन करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या संस्कृत प्राकृत भाषा निवृत्त विभागप्रमुख डॉ. सरोजा भाटे उपस्थित राहणार आहेत. या वेळी स्वामी श्रीसवितानंद आणि डॉ. प्र. ल. गावडे हे उपस्थित राहणार आहेत. प्रसादचे प्रकाशक मनोहर य. तथा बापूसाहेब जोशी यांच्या पत्नी आणि 'प्रसाद'च्या लेखिका मंजिरी जोशी यांच्या प्रथम स्मृतीदिनानिमित्त या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

मंजिरी जोशी स्मृतिगौरव पुरस्कार डॉ. श्री. द. देशमुख आणि प्रा. व. कृ. नूलकर यांना प्रदान करण्यात येणार आहे. या कार्यक्रमात मंजिरी जोशी लिखित पातंजल योगसूत्रे, प्रा. व. कृ. नूलकर लिखित भट्टीकाव्यम या दोन पुस्तकांचे प्रकाशन करण्यात येणार आहे. एस. एम. जोशी सभागृह येथे हा कार्यक्रम होणार आहे, अशी माहिती प्रसाद प्रकाशन आणि प्रसाद ज्ञानपीठचे संपादक उमा बोडस यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पार्किंगचे शुल्क चारपट करणार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी‌, पुणे

शहरातील रस्त्यांवर होणारी वाढती वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी रस्त्यावर वाहने पार्किंग करणाऱ्या वाहनचालकांकडून चारपट पार्किंग शुल्क वसूल करण्याची शिफारस महापालिका आयुक्त कुणाल कुमार यांनी केली आहे. गावठाण भागात दुचाकी पार्किंगसाठी तासाला ५ रुपयांऐवजी २० रुपये तर चारचाकी वाहनांसाठी २० रुपयांऐवजी ७० रुपये घ्यावे, असे आयुक्तांनी म्हटले आहे.

शहरातील वाहतुकीचा प्रश्न सोडविण्यासाठी आणि अधिकाधिक नागरिकांनी सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा वापर करावा, या उद्देशाने महापालिका प्रशासनाने शहराची पार्किंग पॉलिसी (सार्वजनिक वाहनतळ धोरण) तयार केली आहे. त्यामध्ये आयुक्त कुमार यांनी ही शिफारस केली आहे. शहरातील नागरिकांनी अधिकाधिक सार्वजनिक वाहनांचा वापर करावा, यासाठी अनेक कठोर भूमिका घेण्याची गरज आहे. त्यासाठी प्रशासनाने तयार केलेल्या पार्किंग धोरणामध्ये भर देण्यात आला आहे. प्रत्येक छोट्या मोठ्या कामासाठी नागरिक दुचाकी आणि चारचाकी वाहनांचा वापर करतात. त्यामुळे गेल्या काही वर्षात वाहनांची संख्या झपाट्याने वाढली असून प्रत्येक रस्त्यावर वाहतुकीचा खेळखंडोबा झाल्याचे चित्र पहायला मिळते. रस्त्यावर होणारी वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी खासगी वाहनांचा वापर करणाऱ्या नागरिकांकडून पार्किंग शुल्कापोटी अधिक रक्कम घेणे गरजेचे आहे. पार्किंगचे दर वाढविल्यास नागरिक आपोआपच सार्वजनिक वाहतुकीचा वापर करतील, असे त्यांनी सांगितले.

शहरातील वाहतुकीचा गंभीर झालेला प्रश्न सोडविण्यासाठी केवळ वाढीव पार्किंगची व्यवस्था उपलब्ध करून देणे गरजेचे नाही, तर नागरिकांनी खासगी वाहनांचा वापर कमी केला पाहिजे. एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी अधिकाधिक लोकांनी पीएमपीएमएलसारख्या सार्वजनिक वाहतुकीचा वापर करणे गरजेचे आहे. यासाठी शहराचे चार भाग करण्यात आले आहेत. ज्या भागात कमी रुंदीचे रस्ते आहेत आणि जेथे सतत वाहतुकीची कोंडी होते, अशा भागात पार्किंगसाठी नागरिकांकडून जादा शुल्क, तर मोठे रस्ते आणि वाहतूक कमी असलेल्या रस्त्यांवर पार्किंग करणाऱ्या वाहनचालकांकडून कमी पार्किंग शुल्क घेण्याची शिफारस आयुक्तांनी तयार केलेल्या पार्किंग पॉलिसीमध्ये करण्यात आली आहे. वाहनतळावर पार्किंग करणाऱ्या वाहनांकडून कमी शुल्क तर रस्त्यावर वाहने पार्किंग करणाऱ्यांकडून जादा शुल्क आकारल्यास आपोआप नागरिक रस्त्यावर वाहने न लावता वाहनतळावर लावतील, यामुळे वाहतुकीची कोंडीही होणार नसल्याचे आयुक्त कुमार यांनी सांगितले.



रस्त्यावर लाण्यात येणाऱ्या वाहनांचे नवीन पार्किंग शुल्क

वाहनाचा प्रकार सध्याचे दर (रुपये) अ झोन ब झोन क झोन ड झोन

दुचाकी ५ २० १५ १० ०५

चारचाकी २० ७० ५० ३५ ३०

खासगी बस १०० ३५५ २५० १७५ १५०

मिन‌ीबस ४० १४० १०० ७० ६०

ट्रक ५५ १९५ १३५ ९५ ८५

टेम्पो २५ ९० ६० ४५ ४०



नागरिकांकडून हरकती-सूचना मागवणार

महापालिकेने तयार केलेली पार्किंगची पॉलिसी पालिकेच्या

www.punecorporation.org या वेबसाइटवर प्रसिद्ध करण्यात येणार आहे. यामध्ये नागरिकांकडून हरकती सूचना मागविल्या जाणार असून यासाठी पंधरा दिवसांची मुदत दिली जाणार आहे. या कालावधीत नागरिकांना त्यांच्या सूचना, शंका, मत पालिकेकडे नोंदविता येणार आहे. वाहतुकीच्या कोंडीला आळा घालण्यासाठी पार्किंगच्या दरात वाढ करून जी रक्कम वसूल केली जाणार आहे. त्यासाठी स्वतंत्र खाते उघडून या जमा होणाऱ्या पैशातून सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. नागरिकांच्या हितासाठी ही रक्कम वापरली जाणार असल्याचे पालिका आयुक्त कुणाल कुमार यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कृषी विद्यापीठांचे अभ्यासक्रम बदलणार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

राज्यातील कृषी विद्यापीठांचे पारंपरिक अभ्यासक्रम बदलून उद्योग, संशोधनाला चालना देणारे आणि सरकारच्या योजनांची माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवून विद्यापीठ आणि शेतकऱ्यांमधील दरी कमी करणारे नवीन अभ्यासक्रम तयार करण्यात येणार आहेत.

'राज्यातील चार विद्यापीठांमध्ये शिक्षण, संशोधन आणि विस्तार शिक्षणाचे काम केले जाते. मात्र, विद्यापीठांनी केलेले संशोधन, नवीन जातींचे वाण शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यात आपण कमी पडत आहोत. विद्यापीठांमधून पारंपरिक पद्धतीने अभ्यासक्रम शिकविण्यात येत आहेत. त्यामुळे विद्यापीठ आणि शेतकरी यांच्यातील दरी कमी करणारे; तसेच सरकारच्या योजना शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविणारे अभ्यासक्रम तयार करण्यात येणार आहे,' अशी माहिती महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेचे उपाध्यक्ष डॉ. राम खर्चे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

उद्योग आणि व्यवसायाला चालना देणारे अभ्यासक्रम तयार करण्याचे नियोजन आहे. त्यामध्ये शेतकऱ्यांच्या कंपन्या स्थापन करणे आणि त्याद्वारे मालाची विक्री करणे, शेतकऱ्यांचे गट स्थापन करून मूल्यवर्धन करणे आदी बाबींचा समावेश असेल. सेंद्रीय शेती, हवामान बदल, पीक बदल या विषयांमध्ये नवीन संशोधन करण्याच्यादृष्टीने अभ्यासक्रमांची आखणी केली जाणार असल्याचे डॉ. खर्चे यांनी स्पष्ट केले. शेतकरी मेळावे, पिकांची प्रात्यक्षिके, शेतकरी सहली यावर भर दिला गेल्यास विद्यापीठ आणि शेतकरी यांच्यातील दरी कमी होऊ शकेल, असेही डॉ. खर्चे म्हणाले.

काढणी पश्चात व्यवस्थापन, कृषी पणन, उत्पादकता याबाबतीत सुधारणा करण्याच्यादृष्टीने नवीन अभ्यासक्रम तयार करण्यात येणार असल्याचेही डॉ. खर्चे यांनी नमूद केले. प्राध्यापकांच्या गुणवत्ता वाढीसाठीही विशेष प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्याची योजना आहे. त्यामध्ये नवीन तंत्रज्ञान विकास, नावीन्यपूर्ण बाबी यावर कार्यशाळा आणि परिसंवाद आयोजित केले जाणार आहेत, डॉ. खर्चे यांनी सांगितले.

..

पदवीच्या निकालपद्धतीत बदल

कृषी विद्यापीठांतील पदवी अभ्यासक्रमांच्या निकालाच्या पद्धतीत बदल करण्यात आला आहे. यापूर्वी विद्यार्थांना उत्तीर्ण होण्यासाठी लेखी आणि प्रात्यक्षिक परीक्षांमध्ये संयुक्तरित्या किमान ५५ टक्के गुण मिळविण्याची अट होती. ही अट रद्द करून लेखी आणि प्रात्यक्षिक परीक्षांसाठी प्रत्येकी ४० गुण आणि अंतर्गत २० गुण देण्याची पद्धत अवलंबण्यात येणार असल्याचे डॉ. खर्चे यांनी सांगितले.

.................

राज्यातील चार कृषी विद्यापीठांकडे सुमारे १५ हजार हेक्टर जमीन आहे. त्यापैकी सुमारे २५ टक्के जमिनीचा वापर होत नाही. या जमिनींचा वापर होण्यासाठी आणि विद्यापीठे ही आर्थिकदृष्ट्या स्वयंपूर्ण करण्यासाठी विद्यापीठांच्या जमिनींवर शेततळी तयार करण्याची योजना आहे. त्यामुळे या जमिनींवर पाणी उपलब्ध होऊन पिके घेता येतील.

डॉ. राम खर्चे

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पुण्यातही येणार ‘ट्रेंचलेस पॉलिसी’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

नवी दिल्ली, बेंगळुरू आदी मोठमोठ्या शहरांमध्ये खासगी केबल कंपन्यांपासून ते पाणीपुरवठा, ड्रेनेज अशा अत्यावश्यक सेवांसाठी राबविण्यात येणारी 'ट्रेंचलेस पॉलिसी' येत्या काही दिवसांत पुणे महापालिकेतर्फेही अंमलात येण्याची शक्यता आहे. पालिकेच्या पथ विभागाने प्रायोगिक स्वरूपात काही चौकात 'क्रॉस कट' न घेता त्याची नुकतीच सुरुवात केली आहे. पुढील आर्थिक वर्षात या नव्या तंत्रज्ञानाचा अधिक फायदा करून घेण्याच्या दृष्टीने चाचपणी केली जात आहे.

शहराच्या कोणत्याही भागांत सध्या खासगी केबल कंपन्या अथवा पालिकेच्या विभागांतर्फे मोठ्या प्रमाणावर खोदाई सुरू आहे. या खोदाईमुळे शहरातील रस्त्यांची दुरवस्था होत असून, नागरिक आणि वाहनचालकांना गैरसोयीला तोंड द्यावे लागत आहे. त्यामुळेच, दिल्ली, बेंगळुरू यासारख्या मोठमोठ्या शहरांमध्ये राबविण्यात येणाऱ्या तंत्रज्ञानाचा पालिकेत वापर करता येऊ शकतो का, यादृष्टीने पालिकेने पुढाकार घेतला आहे. कोणत्याही सुविधा पुरविण्यासाठी रस्त्यांवर खोदाई आवश्यकच असल्याचे सांगितले जात असले, तरी या शहरांमध्ये खोदाईवर पूर्णतः बंदी आहे. त्याऐवजी ठरावीक अंतरावर काही 'डक्ट' करून सर्व सेवा-सुविधा त्या माध्यमातूनच पुरविल्या जातात. पाणीपुरवठा, ड्रेनेजपासून ते खासगी केबल कंपन्यांपर्यंत सर्वांनाच त्याच सुविधेचा वापर करावा लागतो. पालिका आयुक्त कुणाल कुमार त्यासाठी विशेष आग्रही असून, खोदाईच्या धोरणामध्येच त्याचा अंतर्भाव करण्यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू आहेत.

सेवा-सुविधा पुरविण्यासाठी खड्डेविरहीत तंत्रज्ञान वापरण्याच्या दृष्टीने पालिकेने नुकतीच सुरुवात केली आहे. दाजीकाका गाडगीळ चौक (एस. पी. कॉलेज) आणि दांडेकर पुलाच्या चौकात संपूर्ण रस्त्यावर 'क्रॉस कट' न घेता सेवा पुरविण्याचा प्रयोग पालिकेने यशस्वीरित्या पूर्ण केला आहे. हे तंत्रज्ञान मोठ्या प्रमाणात उपलब्ध होण्यासाठी त्याचा अधिकाधिक वापर वाढण्याची गरज आहे, असे सांगितले जात आहे.

रस्तेदुरुस्तीचा खर्च वाचणार

मोठ्या महापालिकांमध्ये वापरल्या जाणाऱ्या या नव्या तंत्रज्ञानामध्ये ड्रेनेजलाइन नव्याने टाकण्यासाठीही रस्ता संपूर्ण खोदण्याची गरज नसते. तर, केवळ 'चेंबर टू चेंबर' अंतर्गतरित्या पाइपलाइन बदलण्याचे काम केले जाते. पालिकेने या तंत्रज्ञानाचा वापर वाढविल्यास, रस्ते दुरुस्तीसाठी होणारा पालिकेचा खर्चही कमी होण्याची शक्यता आहे.

खोदाईत 'रिलायन्स' अव्वल

शहरातील नागरिकांना अद्ययावत इंटरनेट आणि पाइपलाइनद्वारे गॅस पुरवठा व्हावा, यासाठी रिलायन्स आणि महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेड यांच्यातर्फे सध्या सर्वाधिक खोदाई केली जात आहे. या दोन्ही कंपन्यांनी पुणे-कोल्हापूर दरम्यानच्या अंतराएवढ्या (सुमारे २३० किमी) रस्त्यांची खोदाई केली आहे. खोदाईनंतर रस्ते दुरूस्तीसाठी पालिकेला मोठ्या प्रमाणावर खर्च करावा लागतो.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


पुण्यात पदव्यांची दुकाने

$
0
0

Yogessh.Borate @timesgroup.com

पुणे : मुंबई हिंदी विद्यापीठाच्या नावाखाली दहावी- बारावी नापासांनाही थेट पदवी मिळवून देण्याचे 'उद्योग' पुण्यात दोन 'दुकानां'मधून अगदी बिनदिक्कत सुरू आहेत. काही हजार रुपयांच्या मोबदल्यात, घरी बसून वा त्रयस्थ रायटरच्या मदतीने परीक्षा देऊन पदवीधर होण्याची संधी देणाऱ्या या उद्योगांचा लाभ महापालिकेच्या अधिकाऱ्यांसह अनेकांनी घेतल्याचे स्पष्ट झाले आहे. वारजे नाका परिसरातील विजया एज्युकेशन अॅकॅडमीमध्ये, तसेच बावधन येथे डॉ. कानडे एज्युकेशनल फाउंडेशनच्या कार्यालयात अशा पदव्यांसाठीची केंद्रे आहेत. 'मटा प्रतिनिधी'ने त्यांना भेट देऊन पदवी मिळविण्यासाठीच्या प्रक्रियेची माहिती जाणून घेतली. नववी नापास असणाऱ्या आणि कोणतीही अधिकृत कागदपत्रे हाती नसणाऱ्यांनाही पदवी मिळवून देण्याचे आश्वासन तिथे दिले जात असल्याचे अनुभवायला मिळाले. प्रत्यक्षात या विषयी विद्यापीठाकडे चौकशी केली असता, पुण्यात बावधनमध्येच विद्यापीठाचे अधिकृत केंद्र असून, दुसरे कोणतेही केंद्र अस्तित्वात नसल्याचे सांगण्यात आले. विजया एज्युकेशन अॅकॅडमीमध्ये मिळालेल्या माहितीनुसार, अॅकॅडमीच्या माध्यमातून वर्षातून दोनदा परीक्षा घेतल्या जातात. दहावी नसलेल्या उमेदवारांना दहावी, बारावी आणि मग पदवी अशा टप्प्यांमधून पदवी मिळविण्यासाठी एकूण अडीच वर्षांचा कालावधी लागतो. फेब्रुवारी- मार्चच्या परीक्षेत दहावी, तर ऑगस्ट-सप्टेंबरमधील परीक्षेत बारावी आणि त्यानंतरच्या दीड वर्षांत पदवी मिळविणे शक्य असल्याचे सांगितले जाते. गरजूंना एका वर्षातही पदवी मिळवून देण्याचा दावा अॅकॅडमीमधून केला जात आहे. परीक्षेला स्वतः बसणे शक्य नसेल, तर प्रत्येक पेपरसाठी पाचशे रुपये भरल्यास रायटर उपलब्ध करून देण्याची सुविधाही (!) या केंद्रावरून पुरविली जाते. बावधनमधील केंद्रावर मात्र परीक्षा देण्यासाठी रायटर उपलब्ध नाही. महापालिकेच्या अग्निशमन दलातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने या केंद्रातून पदवी मिळविली असून, महापालिकेनेही त्यांना बढती दिल्याची माहिती या केंद्रामधून दिली जाते. दहावी, बारावी, बीए अशा सर्वच परीक्षांसाठी केंद्रामधून नोट्स पुरविल्या जातात. त्या जशाच्या तशा उतरून काढल्या की तुम्ही बिनदिक्कत पदवीधर होता. मुंबई हिंदी विद्यापीठाला सरकारची मान्यता आणि पदवीची समकक्षता असल्याचा पुरावा म्हणून २८ फेब्रुवारी २००७ चा एक सरकारी निर्णय दाखविला जातो. त्यानुसार या विद्यापीठाची उत्तमा परीक्षा ही दहावी, भाषारत्न ही परीक्षा बारावी, तर साहित्य सुधाकर ही परीक्षा 'बीए'शी समकक्ष म्हणून विचारात घेण्यास राज्य सरकारची मान्यता आहे. मात्र, हा दर्जा हिंदीच्याच विषयापुरता मर्यादीत असेल, संपूर्ण पदवी परीक्षेच्या बरोबर त्याला मान्यता मिळणार नाही, असे सरकारच्याच १४ जून, १९९९ च्या सरकारी निर्णयात स्पष्ट करण्यात आले आहे. 'मुंबई हिंदी विद्यापीठ केवळ हिंदीशी संबंधित अशीच पदवी देते. त्याला बीए समकक्ष दर्जा आहे,' असे स्पष्टीकरण विद्यापीठाचे अधिकारी शौकत जी. कादरी यांनी दिले. 'विद्यापीठाचे पुण्यात केवळ एकच अधिकृत केंद्र असून, दुसऱ्या केंद्राविषयी कल्पना नाही. विद्यापीठाची पदवी ही पूर्णवेळ पदवी नाही. परीक्षेमध्ये गैरप्रकार होत असतील, तर त्याची जबाबदारी संबंधित केंद्राची आहे. अशी केंद्रे आम्ही तातडीने बंद करू,' असेही त्यांनी स्पष्ट केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

साहित्य संमेलनाचे आज उद्घाटन

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

​उद्योगाची पंढरी आणि कामगारांना भाकरी देणाऱ्या पिंपरी शहराने शुक्रवारी मराठीची पताका आणि साहित्याचा ध्वज डौलाने मिरविला अन् साहित्य संमेलन उद्घाटनाच्या पूर्वसंध्येला या औद्योगिक नगरीला खऱ्या अर्थाने साहित्यनगरीचा साज चढला. ८९व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे औपचारिक उद्घाटन आज, शनिवारी सकाळी होणार आहे. संमेलनाच्या उद्घाटन सोहळ्यातच ज्ञानपीठ पुरस्कारप्राप्त साहित्यिकांचा सन्मान केला जाणार आहे.

साहित्य महामंडळ आणि डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठातर्फे आयोजित साहित्य संमेलनाला शुक्रवारपासून सुरुवात झाली. पिंपरी-चिंचवडकरांच्या अपूर्व उत्साहामुळे ग्रंथदिंडीला लक्षणीय गर्दी झाली होती. आज (शनिवारी) होणाऱ्या संमेलनाच्या उद्घाटन सोहळ्याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, प्रसिद्ध गीतकार गुलजार यांच्यासह नियोजित संमेलनाध्यक्ष श्रीपाल सबनीस, संमेलनाध्यक्ष डॉ. सदानंद मोरे, पिंपरी-चिंचवडच्या महापौर शकुंतला धराडे यांच्या प्रमुख उपस्थितीत उद्घाटन कार्यक्रम होणार आहे.

नियोजित संमेलनाध्यक्ष सबनीस यांनी संमेलनापूर्वीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविषयी अनुद्गार काढून वाद ओढवून घेतला होता.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

'पुरोगामी विचारवंतांचे मारेकरी नथुराम परंपरेचे'

$
0
0

मटा ऑनलाइन वृत्त । पिंपरी-चिंचवड

नरेंद्र दाभोलकर, गोविंद पानसरे आणि कलबुर्गी यांच्या हत्येचा निषेध नोंदवताना या पुरोगामी विचारवंतांचे मारेकरी नथुराम गोडसेच्या विचारसणीचे आहेत, असा थेट आरोप आज ८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष श्रीपाल सबनीस यांनी केला. दरम्यान, मुख्यमंत्री संमेलनाध्यक्षांच्या भाषणाआधीच संमेलनातून निघाल्याने त्याची चर्चा संमेलनस्थळी होती.

८९ व्या मराठी साहित्य संमेलनाचं आज जल्लोषात उद्घाटन झालं. अनेक वादांची पार्श्वभूमी पाहता संमेलनाचे अध्यक्ष श्रीपाल सबनीस यांच्या भाषणाकडे सर्वांचंच लक्ष लागलं होतं. सबनीस यांनी अत्यंत सावध शब्दांत भाषण केलं. सबनीस यांच्या भाषणाआधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस निघून गेले. व्यस्त कार्यक्रमांमुळे निघावं लागत असल्याचं सागून मुख्यमंत्र्यांनी निरोप घेतला. सबनीस यांनी तसं आपल्या भाषणात सांगितलंच शिवाय मुख्यमंत्र्याचं भरभरून कौतुकही केलं.

सबनीस यांनी छापील भाषण न वाचता अर्धा तास मराठी साहित्याच्या विविध अंगांना स्पर्श करणारं भाषण केलं. संताना जातीनिहाय विभागलं गेल्याने त्याचे काय परिणाम झाले, यावर सबनीस यांनी सडेतोड भाष्य केलं. साहित्याला सीमारेषा नसतात. साहित्य हे मर्यादित नाही. अभिजनांप्रमाणे ते बहुजनांचेही आहे. शेतात राबणारा मुलगाही आज कविता लिहिणारा आहे, असे सबनीस म्हणाले.

सबनीस यांनी यावेळी मीडियावरही टीका केली. मीडिया हा लोकशाहीचा चौथा खांब आहे की तिरडीचा?, असा सवाल सबनीस यांनी उपस्थित केला.

पवार काय म्हणाले?

मतं मागणं हे राजकारण्यांचं काम आहे. साहित्यिकांनी त्याचा कित्ता गिरवू नये. यापुढे पाच माजी संमेलनाध्यक्षांची एक समिती बनवून साहित्य संमेलनाचा अध्यक्ष निवडावा, असा सल्ला यावेळी शरद पवार यांनी दिला.

मुख्यमंत्री काय म्हणाले?

एका सत्याकडे जात असताना विचार भीन्न असले तरी संघर्ष होण्याचे कारण नाही. साहित्यिकांनी समाजाला, आम्हाला विचार आणि दिशा देण्याचे कार्य करावे. साहित्य हे केवळ प्रश्न निर्माण करणारं राहू नये, त्यातून समाजातील प्रश्नांची उत्तरं मिळावी, असं आवाहन यावेळी मुख्यमंत्र्यांनी केलं. हा देश सहिष्णू होता, आहे आणि राहील. देशाचा मूळ विचार हा सहिष्णूच आहे, असंही यावेळी मुख्यमंत्र्यांनी निक्षून सांगितलं.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

असे संमेलन इतर कोणत्याही भाषेत नाही: गुलजार

$
0
0

मटा ऑनलाइन वृत्त। पिंपरी-चिंचवड

सुप्रसिद्ध कवी, लेखक गुलजार यांनी अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावरून मराठी भाषा, साहित्य, लेखक आणि वाचकांचे कौतुक केले आहे. भारतात अनेक भाषांमध्ये संमेलनं होत असतात, परंतु ज्या प्रकारे मराठी भाषेत संमेलन होते असे संमेलन आपण भारतात अन्य कोणत्याही भाषेत पाहिले नाही असे गौरवोद्गार गुलजार यांनी काढले आहेत.

आपल्या भाषेवर प्रेम करणे आणि अशा प्रकारे मोठ्या संख्येने एकत्र येणे हे चित्र आपल्याला केवळ महाराष्ट्रातच पहायला मिळाले असेही ते आवर्जून म्हणाले. मराठी भाषकांच्या या उल्लेखनीय साहित्यप्रेमाबद्दल त्यांनी उपस्थितांबरोबर आयोजकांचेही अभिनंदन केले. ज्या प्रकारे मराठी भाषेत साहित्य संमेलन भरवले जाते अशाच प्रकारे विविध भाषा आणि लेखकांना एकाच व्यासपीठावर आणणारे अखिल भारतीय पातळीवर सर्वभाषिक साहित्य संमेलन व्हायला हवे अशी इच्छाही त्यांनी यावेळी व्यक्त केली.

महाराष्ट्रात राहिल्यामुळे इथल्या हवेचे मीठ माझ्या भाषेला लागलल्याचे सांगत त्यांनी मराठी भाषेबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. कुसुमाग्रजांच्या काव्याचा अनुवाद करण्याची संधी मला मिळाली याबाबत मी स्वत:ला भाग्यवान समजतो असेही गुलजार म्हणाले. अशा अनेक साहित्यिकांच्या पायाजवळ बसून मी अनुवाद करण्याचे काम केले, अशा अनेक मराठी साहित्यिकांचे आशिर्वाद आपल्याला मिळाल्याचा उल्लेखही त्यांनी आवर्जून केला.

राष्ट्रभाषा हिंदी आणि अन्य भारतीय भाषांमध्ये बालसाहित्याची वानवा असताना मराठी भाषेत मात्र विपुल प्रमाणात बालसाहित्य सापडते. यावेळी त्यांनी कवीवर्य मंगेश पांडगावकर यांनी मुलांसाठी कविता लिहिल्याचा आवर्जून उल्लेख केला. एकवेळ ब्रह्मांडाचा आवाज बंद होऊ शकतो परंतु लेखक कधीही गप्प बसत नाही असे म्हणत त्यांनी आपल्या भाषणाचा समारोप कवितेने केला.

गुलजार म्हणाले,

गुंगा है कौन? खाँसता है तो शब्द उडते है, उसके मुँह से शहरों को साफ रखना और मुश्किल हो गया है, चौराहे पर बात चल रहीं है के लेखक होगा, अदिब होगा किसीने पुँछी थी उसकी राय और जबाँ काट ली थी उसकी वह जबाँ कांटने के बाद भी बोलता रहता है और बोलता ही रहेगा.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दुष्काळग्रस्तांसाठी एक कोटींचा निधी

$
0
0

दुष्काळग्रस्तांसाठी एक कोटींचा निधी

म. टा. प्रतिनिधी,
ज्ञानोबा-तुकाराम साहित्यनगरी, पिंपरी

पिंपरीतील ८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाची भव्यता आणि त्याच्या आयोजनावर होणाऱ्या खर्चाची चर्चा सुरू असतानाच, राज्यातील दुष्काळग्रस्तांसाठी तब्बल एक कोटी रुपयांचा निधी देत, संमेलन आयोजकांनी सामाजिक बांधिलकीचा संदेशही दिला.

डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठ हे संमेलनाचे मुख्य संयोजक आहेत. पिंपरीतील या संमेलनाची भव्यता ग्रंथदिंडी आणि त्या पाठोपाठ शनिवारी झालेल्या संमेलनाच्या उद्घाटन समारंभातून अधोरेखित झाली. राज्यावरील दुष्काळाचे सावट अधिक गहिरे होत असताना, साहित्य संमेलनाच्या उत्सवासाठी मोठा खर्च करण्याची गरज काय, अशी चर्चा केली जात आहे. या चर्चेला पूर्णविराम देण्यासाठी स्वागताध्यक्ष डॉ. पी. डी. पाटील यांनी दुष्काळी भागांतील शेतकऱ्यांसाठी काम करणाऱ्या नाना पाटेकर आणि मकरंद अनासपुरे यांच्या 'नाम फाउंडेशन'ला तब्बल एक कोटी रुपयांचा निधी शनिवारी सुपूर्त केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्या हस्ते नाम फाउंडेशनच्या पिंपरीतील प्रतिनिधींकडे हा धनादेश सुपूर्त केला गेला.

नाम फाउंडेशनला दिलेल्या देणगीव्यतिरिक्त दुर्गम भागांतील शाळांमध्ये विद्यार्थ्यांना मराठीची गोडी लागावी, यासाठी मोठ्या प्रमाणावर पुस्तके भेट देण्यात आली आहेत. तसेच, साहित्य संमेलनाच्या ग्रंथप्रदर्शनातून येणारा निधीही दुष्काळग्रस्तांसाठी देण्याची तयारी आयोजकांनी दर्शविली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images