Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

संमेलनाच्या व्यासपीठावर ‘नथुरामायण’

$
0
0

संमेलनाच्या व्यासपीठावर 'नथुरामायण'

म. टा. प्रतिनिधी,
ज्ञानोबा-तुकाराम साहित्यनगरी, पिंपरी
'देवेंद्र फडणवीस हे सत्तेचे, तर श्रीपाल सबनीस हे सत्याचे प्रतिक आहे. आमच्या भूमिकांमध्ये वाद नाही. विद्वान सत्तेच्या सोयीने सत्य मांडतील, अशी अपेक्षा राजकारण्यांनी करू नये, तशी व्यवस्था असू नये, ' असे स्पष्ट मत ८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांनी अध्यक्षीय भाषणांतून मांडले.
महापुरुष, संत व साहित्याच्या जातीनिहाय वाटणीमुळे महाराष्ट्राचे वाट्टोळे झाले असून दाभोलकर, पानसरे व कलबुर्गी यांची हत्या नथुरामच्या विचारसरणीच्या लोकांनी केली आहे, असा हल्लाबोल त्यांनी केला. येथे सहिष्णुता आहे पण असहिष्णुताही आहे, असेही त्यांनी नमूद केले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संदर्भातील वक्तव्यामुळे अडचणीत आलेले डॉ. सबनीस संमेलनाच्या अध्यक्षीय भाषणातून काय मांडणी करणार, याकडे साहित्य वर्तुळाचे व राजकीय क्षेत्राचे लक्ष लागले होते. डॉ. सबनीस यांनी वाद होईल, असे बोलणे कटाक्षाने टाळले असले, तरी त्यांनी आवेशपूर्ण भाषणातून आपली रोखठोक मते मांडली.
महापुरुषांची आपण जातीमध्ये विभागणी केली असून, साहित्यामध्ये अभिजन व बहुजन असा फरक केला आहे. संमेलनाच्या व्यासपीठामुळे अभिजन-बहुजन या दोन्ही परंपरा एकत्र आल्या आहेत, असे सांगून डॉ. सबनीस म्हणाले, 'साहित्य चावट असते या विचाराचा, तसेच अभिजन व बहुजन परंपरांचा गांभीर्याने विचार करायला हवा. साहित्य हे अभिजन व बहुजनांचे आहे. संवादी भूमिका महत्त्वाची असून जगात धर्मनिरपेक्षता नांदायला हवी.'
----------------------
पवारांचे आभार
एखादी व्यक्ती ३० वर्षे अभ्यास करते, संशोधन करते; पण संशयाच्या भूमिकेतून त्याला घेरले जाते, अशा शब्दांत डॉ. श्रीपाल सबनीस यांनी आपली वेदना प्रकट केली. माझ्या निवडीमागे शरद पवार नाहीत, हे खुद्द त्यांनीच स्पष्ट केल्याने या संशयाच्या वातावरणातून मुक्त करण्याची मोठी जबाबदारी पवार यांनी बजावल्याने सबनीस यांनी पवारांचे आभार मानले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


संमेलनाचे अध्यक्षपद ही मोठी जबाबदारी

$
0
0

संमेलनाचे अध्यक्षपद ही मोठी जबाबदारी

म. टा. प्रतिनिधी,
ज्ञानोबा-तुकाराम साहित्यनगरी, पिंपरी
'साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद ही खूप मोठी जबाबदारी असून, ती सांभाळताना अनेकदा स्वतःच्या स्वातंत्र्यावर काही बंधने आणावी लागतात, तर कधी वागण्या-बोलण्यातही आजूबाजूचे भान ठेवावे लागते,' अशा शब्दांत मावळते संमेलनाध्यक्ष डॉ. सदानंद मोरे यांनी अनुभवाचे बोल ऐकवत नूतन संमेलनाध्यक्षांना त्यांचे नाव न घेता मोलाचा सल्ला दिला.
संमेलनाच्या औपचारिक उद्घाटन समारंभात प्रमुख राजकीय वक्त्यांची भाषणे झाल्यानंतर डॉ. मोरे यांनी ८९ व्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांना सूत्रे प्रदान केली. ही सूत्रे प्रदान करतानाच, त्यांच्यावर असलेल्या संमेलनाध्यक्षपदाच्या जबाबादीरीची जाणीवही त्यांनी भाषणातून करून दिली.
'संमेलनाध्यक्षपदाची सूत्रे म्हणजे जबाबदारीची झूल आहे. अखिल भारतीय स्तरावर होणाऱ्या संमेलनाचे अध्यक्ष म्हणजे आपण राज्यातील आणि बृहन्महाराष्ट्रातील जनतेचे प्रतिनिधीच असतो. त्याचे भान ठेवून, अनेकदा स्वतःच्या वागण्या-बोलण्यात काही बदल करावे लागतात, तर स्वभावातील काही गुणधर्मांना मुरड घालावी लागते,' अशी टिप्पणी त्यांनी केली.
भाषणाचा समारोप करताना, डॉ. मोरे यांनी सहिष्णुतेवरही भाष्य केले. सहिष्णु असणाऱ्यांनी टीकेचा सामना करायला शिकले पाहिजे, असे मत व्यक्त करून, विचारसरणी, जात, धर्म यांचा अभिमान बाळगतानाच, सहिष्णूता टिकविता आली पाहिजे, असेही त्यांनी सांगितले.
................
विद्यापीठात मराठीचे अध्यासन
साहित्य संमेलनाचे आयोजन हे आमच्यासाठी केवळ चार दिवसांच्या सोहळ्यापुरते मर्यादित नाही, तर त्या पलीकडे मराठीच्या संवर्धनासाठी आणि प्रसारासाठी विद्यापीठात स्वतंत्र अध्यासन निर्माण करण्यात येणार असल्याची घोषणा स्वागताध्यक्ष डॉ. पी. डी. पाटील यांनी केली. मराठीवरील संशोधन, लेखन होण्यासाठी नवी पावले टाकण्याचा प्रयत्न असल्याचा उल्लेखही त्यांनी केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

देश सहिष्णू आहे, होता अन् राहील

$
0
0

देश सहिष्णू आहे, होता अन् राहील

ज्ञानोबा-तुकाराम साहित्यनगरी (पिंपरी)
देशात सहिष्णूता-असहिष्णूता याविषयी चर्चा होत असताना 'हा देश सहिष्णू आहे, होता आणि सहिष्णूच राहील,' अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी (१६ जानेवारी) येथे दिली.
अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या ८९ व्या संमेलनाच्या उद्घाटनप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. देशात असहिष्णूतेविषयीच्या चर्चेचा धागा पकडून मुख्यमंत्री म्हणाले, 'या देशाने जगाला सहिष्णूता शिकविली आहे. देशाचा मूळ विचारच सहिष्णूतेचा आहे. एकाच सत्याकडे जाण्याच्या विचाराने देश उभा राहिला आहे. जगाने बहिष्कृत केलेल्यांना या देशात जागा दिली आहे. त्यामुळे सहिष्णूता जिवंत राहीलच, असा विश्वास वाटतो. साहित्यिकांनी देशाच विचार प्रवर्तन करावे आणि दिशा द्यावी.'
या संमेलनाच्या निमित्ताने काय बोलावे, याबाबत मनात गोंधळ निर्माण झाला आहे, असे नमूद करून ते म्हणाले, 'हे व्यासपीठ दिशा दाखविणारे आहे. वैचारिक संक्रमण करून नवा विचार पोहोचविणारे आहे. अनेक वादविवाद होत असतात. हे संमेलन साहित्यातील वादासाठी जर प्रसिद्ध झाले, तर अधिक उत्तम आहे. इतर वादांपासून ते दूर असले पाहिजे.'
ते म्हणाले, 'वारीची व्यवस्था कितीही चांगली झाली तरी पांडुरंगाचे दर्शन उत्तमपणे होत नाही, तोपर्यंत वारकऱ्याला खरे समाधान मिळत नाही. हे दर्शन परिसंवाद, भाषणे, विचार, प्रकाशने याच्या माध्यमातून होणार आहे. ते दर्शन उत्तम प्रकारे झाले. तर आपल्याला निश्चित समाधान प्राप्त होईल. आपल्या साहित्य संमेलनांनी भौगोलिक सीमा ओलांडल्या. ते आपण देशात घेतले, इतर राज्यात घेतले. यशस्वीही केली. तरी आपल्या साहित्याने भौगोलिक सीमा पार केल्या पाहिजेत, अशी आपली सर्वांची इच्छा आहे. मराठी साहित्य वैश्विक झाले पाहिजे. त्या गोष्टी मराठी साहित्यात आहेत. त्याची नोंद जागतिक पातळीवर घेण्यासाठी साहित्याचा ठसा उमटविण्यात आपण कमी पडतो का? याचा विचार करण्याची गरज आहे.'
ते म्हणाले, 'संमेलनाची स्वरुपे अनेक आहेत. वर्षभर वेगवेगळ्या प्रकारची साहित्य संमेलने होत असतात; परंतु एवढे मोठे साहित्य संमेलन देशातील कोणत्याही भाषेचे होत नाही. याचा अभिमान आपल्याला आहे. ट्विटवर हे साहित्य विचार व्यक्त करीत आहे, हे महत्त्वाचे आहे. दुरावणाऱ्या पिढीलाही नव्या माध्यमांचा उपयोग करून जोडून घ्यायला हवे.'
ज्ञानोबा-तुकारामांचे साहित्य चिरंतन, चिरकाल आहे, असे नमूद करून ते म्हणाले, 'आजही अनेक प्रश्नांची उत्तरे ही त्याच साहित्यातून मिळतात. ज्ञानेश्वरांनी मागितलेले दान विश्वाकरिता मागितले आहे. या मराठीने वैश्विकतेचा विचार केला आहे. समाजाची आजची अवस्था पाहिल्यानंतर आज आपल्याला 'जे खळांची व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाढो' असेच दान मागण्याची गरज आहे. आजचा शेतकरी होरपळलेला आहे. 'वृक्षवल्ली आम्हा सोयरे, वनचरे' हे विसरल्यामुळे निसर्ग आपल्याला खेळ परत करीत आहोत. शेतकऱ्याची अवस्था अंतर्मुख होऊन विचार करायला लावणारी आहे. मंगेश पाडगावकरांनी म्हटलेले 'या जन्मावर, या जगण्यावर शतदा प्रेम करावे,' हे वाक्य शेतकऱ्यालाही खरे वाटले पाहिजे.
साहित्यातून प्रश्न निर्माण होण्याऐवजी त्यातून उत्तरेही मिळाली पाहिजेत, अशी अपेक्षाही फडणवीस यांनी या वेळी व्यक्त केली.
....
सीमावासीयांचा लढा चालू राहील
संमेलनाच्या उद्घाटनप्रसंगी महाराष्ट्र-कर्नाटक सीमावासीयांनी बेळगाव, कारवार, निपाणीसह संयुक्त महाराष्ट्र झाला पाहिजे, असे नारे दिले. त्याची दखल घेत मुख्यमंत्री म्हणाले, 'आम्ही सर्व मायमराठीचे सेवक आहोत. जोपर्यंत मराठीवर अत्याचार होतोय तोपर्यंत आम्ही शांतपणे झोपणार नाही. सीमावासियांच्या पाठिशी सरकार आणि समाज निश्चितपणे उभा राहील. मराठी माणूस जिवंत असेपर्यंत लढा सुरूच राहील.'
....
'बदनाम हुआ, नाम तो हुआ'
अलीकडच्या काळात प्रसिद्धीचा सोपा उपाय नकारात्मकता झाला आहे. ही बाब माध्यमांमध्ये देखील वेगाने येते आहे. हिंदी भाषेत सांगायचे झाल्यास 'बदनाम हुआ तो क्या हुआ नाम तो हुआ' अशा प्रकारची अवस्था समाजामध्ये पहायला मिळते. एखाद्या चांगल्या गोष्टीला प्रसिद्धी मिळत नाही; परंतु नकारात्मकता जास्त प्रसिद्धी पावते आहे. सकारात्मकता कुठेतरी पडद्याआड लपलेली आहे. समाजाची ही अवस्था बदलायची झाल्यास सकारातमकतेचा प्रचार अधिक प्रमाणात करायला हवा,' असे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अध्यक्ष निवड प्रक्रिया बदला

$
0
0

अध्यक्ष निवड प्रक्रिया बदला

ज्ञानोबा-तुकाराम साहित्यनगरी, पिंपरी
संमेलनाध्यक्षांच्या निवडीवरून होणारे वाद-विवाद कायमचे मिटविण्यासाठी पाच माजी अध्यक्षांची समिती नेमून त्यांच्यामार्फत नूतन अध्यक्षांची निवड केली जावी, असा सल्ला राष्ट्रवादीचे अध्यक्ष आणि माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी शनिवारी साहित्य महामंडळाला दिला. 'मते मागणे हे आमचे काम आहे. ती कशी मिळवावी लागतात, तो अधिकारही आमच्याकडे आहे. तुम्ही आमचा कित्ता गिरवू नका', अशा शब्दांत त्यांनी साहित्य महामंडळाचे कान टोचत, अध्यक्ष निवड प्रक्रियेत बदल करण्यासाठी मूलभूत विचार करावा, असे सुनावले.
पिंपरी-चिंचवड येथील ८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटन केल्यानंतर सविस्तर भाषणात पवार यांनी अध्यक्ष निवड प्रक्रियेत सुधारणा व्हावी, अशी अपेक्षा व्यक्त केली. 'निवडणूक प्रक्रियेत सहभागी होण्याविषयी आक्षेप असल्याने अनेक साहित्यिक आजवर संमेलनाध्यक्ष होऊ शकले नाहीत अथवा त्यांना निवडणुकीत पराभव पत्करावा लागला. संमेलनाध्यक्ष पदापासून अनेक महत्त्वाच्या लेखकांना दूर राहावे लागले. यंदाही संमेलनाध्यक्षांच्या निवडीवरून काही वाद झाले. त्यामुळे अध्यक्ष निवडीच्या प्रक्रियेचा महामंडळाने निश्चित पुनर्विचार करावा', असे त्यांनी सूचित केले. साहित्य संमेलनाच्या अध्यक्षांची निवड करण्यासाठी पाच माजी संमेलनाध्यक्षांची एकत्र समिती नेमावी आणि त्यांच्याकडे नव्या अध्यक्षांची निवड करण्याची जबाबदारी द्यावी. माजी संमेलनाध्यक्षांमार्फत नव्या अध्यक्षांची निवड होणार असल्याने संभाव्य वाद तरी कमी होतील, अशी भूमिका त्यांनी मांडली.

अध्यक्ष झाल्यावरच सबनीसांची भेट
संमेलनाध्यक्ष म्हणून डॉ. सबनीस यांची निवड होण्यामध्ये पवार यांचाच हात असल्याचा दावा काही विचारवंतांकडून मांडण्यात येत होता; परंतु संमेलनाध्यक्षपदी निवड झाल्यानंतरच डॉ. सबनीस यांना आपण पहिल्यांदा भेटलो, असा खुलासा पवार यांनी केला.
................
पाच माजी अध्यक्षांमार्फत निवड करा
संमेलनाध्यक्षांच्या निवडीसाठी निवडणूक प्रक्रियेऐवजी पर्यायी पद्धतीचा अवलंब करण्याची भूमिका मावळते संमेलनाध्यक्ष डॉ. सदानंद मोरे यांनी 'महाराष्ट्र टाइम्स'ला दिलेल्या मुलाखतीमध्ये मांडली होती. संमेलनाच्या उद्घाटन सोहळ्यात त्यांनी आवर्जून 'मटा'चा उल्लेख करत, पाच माजी अध्यक्षांमार्फत संमेलनाध्यक्षांची निवड केली जावी, असे मत मांडल्याचा पुनरूच्चार केला.
.................
पवारांचा सल्ला ऐकणार, की...
साहित्य संमेलनाप्रमाणेच नाट्य संमेलनाच्या अध्यक्षांची निवडदेखील काही वर्षांपूर्वीपर्यंत निवडणूक प्रक्रियेतून होत असे. या प्रक्रियेत बदल करण्याचा सल्ला पवार यांनीच नाट्य परिषदेला दिला होता. नाट्य परिषदेने त्यानुसार बदल करून निवडणुकीऐवजी एकमताने अध्यक्ष निवडण्याची पद्धत सुरू केली. त्यामुळेच आता साहित्य महामंडळही लवचिक भूमिका घेऊन, घटनेत आवश्यक बदल करणार, की निवडणूक प्रक्रियेचा आपला हेकाच कायम राखणार, हे येणाऱ्या काळात स्पष्ट होईल.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महापुरुषांची जातिनिहाय वाटणी घातक

$
0
0

प्रश्न खूप आहेत; पण मला आपल्याशी संवाद साधायचाय. आंतरराष्ट्रीय पातळीवर दहशतवादाचा नंगानाच सुरू आहे. लष्करे तय्यबा, आयसिस, मुजाहिदीन, अशा अनेक संघटनांमार्फत दहशतवाद चालू आहे. जगातला बगदादीसारखा एक चेहरा खरा इस्लाम हायजॅक करून राजरोस एका हातात कुऱ्हाड आणि दुसऱ्या हातात स्टेनगन घेऊन निरपराध्यांची हत्या करतोय. १३५ मुस्लिम विद्यार्थ्यांना ठार मारण्यात आलं. पॅरिसवर हल्ला करण्यात आला. हा इस्लाम खरा इस्लाम नसल्याची ग्वाही जगातल्या ३४ मुस्लिम देशांच्या महाआघाडीने दिली आहे. दहशतवाद नष्ट करण्याच्या बाबतीत भारतात अनेक पातळीवरील शांततावादी संघटना आणि राजकीय पक्षही भूमिका घेताना दिसतात. हिंदू धर्मातील सर्व दिशेने येणारे सामर्थ्य आपण स्वीकारले पाहिजे, हे सांगणारा वैदिक धर्मातील समानतावादाचा विचार उपनिषदातून येतो आहे. बुद्ध धर्मातील अहिंसा जगभर पसरली. महावीरांची अहिंसा मातीच्या कणाकणात रुजली. बुद्ध आणि महात्मा गांधींची अहिंसा जगाला आणि देशाला तारणार आहे. अशा प्रकारची भूमिका असताना आंतरराष्ट्रीय पातळीवर चालू असणारे क्रौर्य आपणाला नाकारायचे असेल, हे जर संपवायचे असेल, तर आमच्याकडे कोणत्या प्रकारची उपाययोजना राबवायची हा प्रश्न आहे.

साहित्य ही संकल्पना केवळ त्या कवितेपुरती, त्या प्रेमापुरती आणि चावट आविष्कारापुरती मर्यादित राहावी का, साहित्याची संकल्पना केवळ अभिजनांपुरती मर्यादित राहावी का, या प्रश्नांची उत्तरे आता गंभीरपणाने सोडवता आली पाहिजे. साहित्य अभिजनांचे जसे आहे तसे ते बहुजनांचेही आहे. माझा बहुजन माणूस, खेड्यापाड्यातील शेतकऱ्याचा पोरगा आता शेती-मातीची कविता लिहितो आहे. दुष्काळाच्या भेगांची कविता लिहितो आहे. शेतकऱ्याच्या जगण्याची-मरणाची कविता लिहितो आहे. ग. ल. ठोकळ, शंकर पाटील, रा . रं. बोराडे यांच्याबरोबर आजच्या काळातील मराठवाड्यातील आणि विदर्भातील कवी आजच्या सामा​जिक प्रश्नांची धुरा वाहताना दिसतात. दलित मुलगा, दलित कवी​, दलित साहित्यिक, आंबेडकरवादी विचार आपल्या परीने मांडण्याचा प्रयत्न करीत आहे.

मित्रहो, माझ्यासमोर काही प्रश्न आहेत. अध्यक्षीय निवडणुकीचा उल्लेख शरद पवार यांनी खूप चांगल्या प्रकारे केला. निवडणुकीच्या बाबतीत मी काही बोलणार नाही. तो व्यक्तिगत प्रश्न आहे. एक सत्यवादी अभ्यासक माणूस ३०-३० वर्षे अभ्यास करून सत्य मांडण्याचा प्रयत्न करतोय. संवाद आणि संघर्षाची भूमिका मांडतोय. आता त्याला संबंध आणि संशयाच्या गुन्हेगारीच्या भूमिकेत मीडिया मांडत असेल आणि बाकीची आमची जुनी शत्रू-मित्रमंडळी घेरत असतील, तर त्याच्यातून मुक्त करण्याची लोकनेत्याची जबाबदारी पवार साहेबांनी या ठिकाणी व्यक्त केली. त्याबद्दल मी जाहीर त्यांचे अभिनंदन करतो आणि आभार मानतो.

महाराष्ट्राचे मानदंड कोण?

मित्रहो, ज्या ज्ञानोबा, तुकारामांचा आपण उल्लेख केला, त्या दोन संतांचांच नव्हे तर ज्ञानेश्वरापासून चोखामेळ्यापर्यंतचा शेख महंमदपर्यंतचा कुठलाही संत या सबंध मालिकेमध्ये एकत्र जोडलाय. हा मातीचा गुणधर्म आहे देहूच्या परिसरातल्या. या वारकऱ्यांची दिंडी असेल किंवा महाराष्ट्रातील कुठलीही दिंडी असेल. ज्ञानोबा, तुकाराम हा जयघोष सगळीकडे गायला जातो. पण जे वारकऱ्यांना मान्य आहे, जे शिकलेल्या ज्ञानकऱ्यांना मान्य आहे, अशा प्रकारची मान्यता असलेल्या या दिंडीतील अशा प्रकारच्या प्रमेयाला धक्का देण्याचे काम काही विद्वान करताहेत. ज्ञानेश्वर ब्राह्मणाचा आणि तुकाराम मराठ्याचा म्हणून. ज्ञानदेवाच्या ऐवजी तिथे नामदेव लावा, असा विषारी प्रचार काही विद्वानांनी यापूर्वीही केला. हे आपल्या मराठी संस्कृतीला मान्य आहे का? महाराष्ट्राचे मानदंड कोण? काहींच्या मते ज्ञानेश्वर, काहींच्या मते तुकाराम. कोण फुले-शाहू-आंबेडकर म्हणतं आणि कोण गोळवलकर आणि सावरकर, विवेकानंद म्हणतं. नेमके महाराष्ट्राचे मानदंड कोण आणि किती? दोन, तीन मानदंड, चार-पाच मानदंड आपण मानत गेलो, तरी हरकत नाही; मात्र मानदंड आणि एक अस्मिता त्याभोवती निर्माण होते, एक अहंता निर्माण होते आणि महापुरुषांमध्ये आणि संतांमध्ये भांडणे लावली जातात. संतांच्या जातिनिहाय वाटणीमुळे महाराष्ट्राचं वाटोळं झालं.

महाराष्ट्राची आणि सबंध देशाची संस्कृती सहिष्णू आहे, हे मला मान्य आहे; मात्र अ​सहिष्णुतेच्या घटनाही आहेत. भारतीय परंपरेतील चातुर्वर्ण्य हे सहिष्णुतेचं मानणार का आपण? चातुर्वर्ण्याने ज्या दलित समाजाला वर्षानुवर्षं वेशीच्या बाहेर ठेवलं, मांजराला चांदीच्या वाटीत दूध पाजणारी संस्कृती हाडामासाच्या माणसाला युगायुगांचा अंधार पिऊन बसण्यासाठी एक दहशत बनली असेल, तर हे चातुर्वर्ण्य संस्कृतीचं आणि सहिष्णुतेचं उदाहरण कसं मानणार हा खरा प्रश्न आहे. मराठवाड्याच्या नामांतराचा प्रश्न असेल, गोधऱ्याचा प्रश्न असेल, इंदिरा गांधींची आणीबाणी असेल, ही सर्व वेगवेगळ्या सरकारच्या काळातील प्रकरणे आहेत. ही असहिष्णुतेची प्रकरणे म्हणता येत नाहीत. माणसामध्ये पशुत्व आहे आणि या पशुत्वावर मात करण्याची भूमिका संत घेतात, सुधारक घेतात. त्या संतांच्या मध्ये जर फूट पाडत असाल, तर संतांच्या आणि सुधारकांच्या मध्येही फूट पडते आहे.

ब्राह्मणी-अब्राह्मणी मूल्ये

आमच्याकडे प्रस्थापित साहित्याचा एक प्रवाह आणि विद्रोही साहित्याचा एक प्रवाह आहे. त्याच्यामध्ये मग महापुरुषांची वाटणी झालेली आहे. आणि या प्रस्थापित साहित्याला ब्राह्मणी साहित्य म्हटलं जातं. ब्राह्मणी साहित्यामध्ये सर्व ब्राह्मणांना कोंबण्याचा प्रयत्न केला जातो. ज्या माडगूळकरांच्या गीतांचा संदर्भ मराठी संस्कृतीमध्ये अवीट आहे, अजोड आहे. त्या गदिमांचे स्मारक आमच्या पवारसाहेबांच्या बारामतीला आहे, असं कुणीतरी मला सांगितलं. आपल्या मोरोपंताचंही​ स्मारक त्यांनी त्या ठिकाणी केलेलं आहे. मग मोरोपंत आणि गदिमा हे ब्राह्मण आहेत. आणि या ब्राह्मण लेखकांचं आणि प्रतिभावंतांचं स्मारक बहुजनांचा नेता असलेल्या पवारसाहेबांच्या बारामतीत त्यांच्या कल्पकतेतून आणि निष्ठेतून होत असेल, तर शरद पवार साहेबांना आपण ब्राह्मणी ठरवणार आहात का, प्रस्थापित ठरवणार आहात का, असा तो प्रश्न आहे. आणि म्हणून ब्राह्मणी असो की अब्राह्मणी असो, प्रस्थापित असो की विद्रोही असो, या सीमारेषा आपल्याला ओलांडता आल्या पाहिजेत. जर सबंध मराठी साहित्य तुम्ही प्रस्थापित म्हणत असाल, तर सानेगुरुजींच्या डोळ्यातील अश्रूंचे मूल्य ब्राह्मणी की अब्राह्मणी?

कुसुमाग्रजांची 'गर्जा जयजयकार' नावाची कविता असेल, विश्राम बेडेकरांची 'रणांगण' नावाची कादंबरी असेल, किंवा वामन बल्लाळ जोशी आणि डॉ. केतकरांचे कादंबरी वाङ्मय असेल. त्यांमधील स्त्रियांचा जो सुधारणावाद असेल, हा तुम्हाला सबंध विद्रोही परंपरेला अनुकूल वाटत नाही का? तेंडुलकरांची नाटकं असतील, वामन बल्लाळांचं वाङ्मय असेल किंवा 'इतर सर्व तुमच्या परी'सारखी कादंबरी असेल किंवा श्री. ना. पेंडसे असतील किंवा मार्क्सवादाला सामोरा जाणारा मर्ढेकरांसारखा एक अत्यंत अभिजात प्रकारचा कवी असेल, या सर्वांना तुम्ही प्रस्थापिताची शिक्षा देणार आहात का, हा प्रश्न विचारतो. मराठी संस्कृती, मानदंडांच्या अस्मिता व अहंकारात विभागली गेली, फाटली गेली, ती चिरली गेली. आमचा शिवाजी, ब्राह्मणांच्या घरात ठाकला, मुसलमानांच्या घरात थांबला. शिवाजीचं राज्य हे संबंध सर्व जातीचं, धर्मांचं होतं. हा इतिहास आपण कधी समजून घेणार आहोत, हा प्रश्न आहे. विद्वानांची जात ही त्याच्या संबंध बुद्धिमान पातळीवर येता कामा नये. जात संपली तोच विद्वान तटस्थ इतिहास लिहू शकतो.

हे व्यासपीठ एक सेक्युलर व्यासपीठ आहे. या व्यासपीठावर सर्व जातीधर्माचे लोक आहेत. अशा परिस्थितीमध्ये हे व्यासपीठ जर सेक्युलर असेल, तर माझ्या समोरचा जो श्रोता आहे. तो श्रोता सेक्युलर का नाही? माझा भारत सेक्युलर का नाही? माझा महाराष्ट्र संक्युलर का नाही? मग पानसरे असोत, दाभोलकर असोत, साने गुरुजी असोत, हमीद दलवाई असतील किंवा डॉ. गंगाधर पानतवणे असतील, राजन गवस, रंगनाथ पठारे अशाप्रकारची वेगवेगळ्या जातीधर्मातील माणसे, ही सर्व माणसे सेक्युलर जाणीवा जपताना दिसतायत. रा. ना. चव्हाण आणि यशवंतराव चव्हाणांपर्यंत फुले आंबेडकरांची परंपरा येऊन पोहोचते. या परंपरेमध्ये रानडे आहेत, आगरकर आहेत, आणि त्यांचे योगदान निश्चितपणे आहे.

सेक्युलर व्यासपीठ

ज्या रानडेंच्या ग्रंथसंमेलनाला महात्मा फुलेंनी शेतकरी नसल्याच्या कारणाने विरोध केला, ते संमेलन ८९व्या पातळीपर्यंत येत असताना येथे या व्यासपीठावर शेतकऱ्यांचीच मुले आहेत. संयोजनामध्ये किंवा पदाधिकाऱ्यांमध्ये पाटील, हे शेतकरी कुटुंबातील आहेत. मीही शेतकरी कुटुंबातील आहे. आणि मग अभिजनांची परंपरा आणि बहुजनांची परंपरा, शेतकऱ्यांची आणि ब्राह्मणांची परंपरा आता दोन राहिलेल्या नाहीत. या दोन्ही परंपरांच्या संयोगाने अशा प्रकारचा मिलाफ व्यासपीठावर झालेला आहे. त्यामुळे यापूर्वीची अखिल भारतीय साहित्य संमेलने आणि यानंतरची साहित्य संमेलने दोन्ही परंपरांना एकत्र करणारी आहेत. दोन्ही परंपरांमध्ये कुरूपता आहे. या दोन्ही परंपरांमध्ये काही​ असत्यं आहेत. अभिजनांना त्याबाबत माफ करण्याचे काही कारण नाही. आणि बहुजनांना माफ करण्याचे कारण नाही. कारण नथुराम गोडसेसारखा मारेकरी हा जेव्हा ब्राह्मण जातीत जन्मला, म्हणून सगळेच ब्राह्मण नथुराम गोडसे असतात का, हा प्रश्न कधीतरी विचारला गेला पाहिजे. आणि म्हणून या दोन परंपरा आम्ही जोडतो. पुरोगामी आणि प्रतिगामी म्हणतो. उजवा आणि डावा म्हणतो. त्याची रूपरेषा आपण समजावून घेतली पाहिजे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पाणीसमस्येने गाठला ‘कळस’

$
0
0

एक दिवसाआडचे पाणीही पुरेशा दाबाने नाही

म. टा. प्रतिनिधी, पुणे

धरणातील घटता पाणीसाठा लक्षात घेऊन उपलब्ध पाणीसाठ्याचे नियोजन करण्यासाठी महापालिकेने नागरिकांना एक दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचा निर्णय घेतला आहे; मात्र एक दिवसाआड दिले जाणारे पाणीदेखील योग्य प्रमाणात आणि पुरेशा दाबाने येत नसल्याने कळस, धानोरी भागातील नागरिक हवालदिल झाले आहेत. या भागात वर्षानुवर्षे वास्तव्याला असलेल्या नागरिकांनी पाण्याच्या नळाला थेट मोटारी लावल्याने कळस भागातील अनेक भागांत अत्यंत कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्याची तक्रार केली जात आहे.

पुणे महापालिका हद्दीच्या 'बाँड्रीलाइन'वरील भाग म्हणून धानोरी, कळस, लोहगाव हा भाग प्रसिद्ध आहे. महापालिका हद्दीत आल्यानंतरच्या अनेक वर्षांनंतरही या भागात भेडसावत असलेला पाण्याचा प्रश्न सुटलेला नाही. गेली अनेक वर्षे या भागातील नागरिकांना पाण्यासाठी झगडावेच लागत असल्याचे चित्र आजही पाहायला मिळत आहे. लोहगाव, धानोरी, भैरवनगरचा परिसर कमी-जास्त उंचीचा असल्याने या भागातील अनेक नागरिकांना कमी दाबाने पाणीपुरवठा केला जात आहे. लोहगाव, कलवड, भैरवनगर, धानोरी अशा अनेक भागांत ही पाण्याची समस्या भेडसावत असून, त्यावर महापालिका प्रशासनाने तातडीने उपाययोजना करावी, अशी मागणी केली जात आहे. कळस भागात अनेक सोसायट्यांमध्ये कमी दाबाने पाणी येत असल्याने हे पाणी प्रत्येक फ्लॅटधारकापर्यंत पोहचत नाही. काही भागांत पाण्याची परिस्थिती चांगली आहे. पालिकेने दिवसाआड पाणी देण्यास सुरुवात केल्याने एक दिवसानंतरच पाणी मिळणार आहे, याची सवयच नागरिकांनी करून घेतली आहे; मात्र अनेकदा पाइपलाइन दुरुस्तीमुळे ठरवून दिलेल्या दिवशी अचानक पाणीपुरवठा खंडित होत असल्याने कामगार वर्गाला त्रास होतो.

कळस भागात चाळ पद्धतीची अनेक घरे आहेत. या घरांमध्ये बाहेरगावावरून पोट भरण्यासाठी आलेले नागरिक भाडेकरू म्हणून राहतात. प्रत्येक चाळीसाठी पालिकेचा एकच सार्वजनिक नळ असल्याने नागरिकांना त्यावरच अवलंबून रहावे लागते. भाडेकरूंना स्वतंत्र नळ घेण्यासाठी मालक परवानगी देत नाही. स्वतंत्र नळजोडणी घेण्याचा प्रयत्न केल्यास भाडेकरूला त्रास दिला जातो. पालिकेचे पाणी दिवसाआड येत असल्याने पुरेसे आणि अधिक दाबाने पाणी मिळावे, म्हणून अनेक स्थानिक नागरिकांनी नळाला पंप लावले आहेत. यामुळे पंप लावणाऱ्यांना प्रेशरने पाणी मिळते, तर उर्वरित नागरिकांना उपलब्ध पाण्यावर अवलंबून राहावे लागते. येरवडा भागातही अशाच प्रकारची समस्या भेडसावते. पाणी सोडणाऱ्या व्हॉल्व्हमनला हाताशी धरून काही स्थानिक राजकीय मंडळी दमदाटी करतात. त्यामुळे काही भागांत मुबलक, तर काही भागांत कमी दाबाने पाणीपुरवठा केला जातो. काही ठिकाणी पाइपलाइन लीक असल्याने पाणीगळती होते. त्याबद्दलच्या तक्रारी अनेकदा प्रशासनाकडे करूनही कोणताही उपयोग होत नसल्याच्या तक्रारी नागरिकांकडून केल्या जात आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘शालाबाह्य’ सर्वेक्षणावर आक्षेप

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

स्वयंसेवी संस्थांच्या मदतीने राज्यात शुक्रवारपासून सुरू झालेल्या शालाबाह्य मुलांच्या सर्वेक्षणावर स्वयंसेवी संस्थांनीच आक्षेप घेतला आहे. याविषयी शिक्षणमंत्री विनोद तावडे यांना पत्र लिहून, अपूर्ण तयारीच्या आधारे सर्वेक्षण करण्यास स्वयंसेवी संस्था तयार नाहीत, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.

राज्यात शालाबाह्य मुलांच्या सर्वेक्षणासाठी गेल्या वर्षी राबवण्यात आलेल्या मोहिमेमध्ये अत्यल्प शालाबाह्य मुले आढळून आल्याची ओरड स्वयंसेवी संस्थांकडून करण्यात आली होती. त्या पार्श्वभूमीवर, या संस्थांना सोबत घेऊन, राज्यात व्यापक सर्वेक्षण करण्याचे निर्देश शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी दिले होते. त्यासाठी सरकारला मदत करू शकणाऱ्या राज्यभरातील स्वयंसेवी संस्थांची यादीही सरकारकडे सादर करण्यात आली होती. प्रत्यक्षात सर्वेक्षण सुरू होण्यास एक दिवस शिल्लक असताना शिक्षण खात्याने या संस्थांपैकी अगदी मोजक्या संस्थांशी संपर्क साधून, त्यांना गुरुवारी बैठकीसाठी बोलावण्यात आल्याची ओरड या संस्थांनी केली. या प्रकारामुळे चार जुलै, २०१५ रोजी झालेल्या सर्वेक्षणाप्रमाणेच शालाबाह्य मुलांचा अत्यल्प आकडा समोर येऊन, खरे गरजू सर्वेक्षणाबाहेरच राहण्याची भीती या संस्थांनी शुक्रवारी व्यक्त केली. असे होऊ नये, यासाठी सर्वेक्षकांना योग्य ते प्रशिक्षण देऊन, २६ ते ३१ जानेवारीदरम्यान हे सर्वेक्षण घेण्याची मागणी संस्थांनी केली आहे.

याविषयी 'सिस्टीम करेक्टिंग मूव्हमेंट'चे (सिस्कॉम) हेरंब कुलकर्णी म्हणाले, 'शिक्षणमंत्र्यांनी याविषयी पुढाकार घेतल्याने या वेळी आम्हाला शालाबाह्य मुलांची खरी आकडेवारी समोर येण्याबाबत विश्वास होता; मात्र गेल्या आठवड्यापर्यंत या सर्वेक्षणासाठी कोणतीही हालचाल झाली नाही. मंत्र्यांनीच व्हिडिओ कॉन्फरन्सिंग घेतल्यानंतर या तयारीने जोर पकडला. सर्वेक्षणासाठी राज्यभरातील जवळपास साडेआठशे स्वयंसेवी संस्थांची माहिती सरकारकडे पाठवली होती. त्यापैकी मोजक्यांना शिक्षण खात्याने घाईघाईने बैठकीसाठी बोलावले. राष्ट्रीय सेवा योजनेच्या (एनएसएस) स्वयंसेवकांची मदत घेण्याचे स्वागतार्ह पाऊल उचलले असताना, या स्वयंसेवकांना सर्वेक्षणाचे प्रशिक्षण न देण्याचा प्रकारही घडला. त्यामुळेच आम्ही हे सर्वेक्षण पुढे ढकलण्याची मागणी करत आहोत.'

'एनएसएस'चे स्वयंसेवक होणार शिक्षणमित्र

या सर्वेक्षणासाठी मदत करणारे राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक यापुढील काळात शालाबाह्य मुलांसाठी शिक्षणमित्र म्हणून काम करणार असल्याची माहितीही आतार यांनी दिली. हे शिक्षणमित्र संबंधित शालाबाह्य मुलांना शाळेत दाखल केल्यानंतर त्यांच्या प्रगतीचा सातत्याने आढावा घेणार असल्याचे त्यांनी सांगितले.

पुण्यात ३५ शालाबाह्य मुले

पुण्यात शुक्रवारी झालेल्या सर्वेक्षणातून ३५ शालाबाह्य मुले सापडल्याची माहिती जिल्हा परिषदेचे माध्यमिक शिक्षणाधिकारी हरून आतार यांनी दिली. सर्वेक्षणामध्ये सहभागी होण्याची इच्छा असलेल्यांनी जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाकडे संपर्क साधावा, असे आवाहनही त्यांनी केले.

......................
मागच्या वेळच्या एक दिवसाच्या सर्वेक्षणाच्या तुलनेत या वेळी पंधरा दिवस सर्वेक्षण चालणार आहे. त्यासाठी एनएसएस समन्वयक आणि स्वयंसेवी संस्थांच्या प्रतिनिधींशी या पू्र्वीच औरंगाबादमध्ये सविस्तर चर्चा झाली होती. त्यासाठीची माहितीही या संस्था आणि 'एनएसएस'च्या पदाधिकाऱ्यांपर्यंत पोहोचवण्यात आली आहे. त्यामुळे सर्वेक्षण पुढे ढकलावे वा त्या विषयीचा बाऊ करावा, अशी कोणतीही गरज नाही.

- डॉ. पुरुषोत्तम भापकर, शिक्षण आयुक्त

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मुलाखतीचा ‘गुलजार’ उजाडच

$
0
0

Kedar.Wagh@timesgroup.com

ज्ञानोबा-तुकोबा साहित्यनगरी, पिंपरी

हिंदी सिनेमाला कवितांच्या स्वरूपातील गाणी स्वीकारायला लावून त्यात स्वतःचे अढळ स्थान निर्माण करणारे प्रख्यात कवी-गीतकार-लेखक गुलजार यांची मुलाखत अपेक्षेइतकी न रंगल्याने रसिकांचा हिरमोड झाल्याचे चित्र साहित्य संमेलनात पाहायला मिळाले. मुलाखतीतून फारसे व्यक्त न झालेल्या गुलजार यांनी काही कविता सादर करून मुलाखत रंगतदार करण्याचा प्रयत्न केला; पण नावीन्याअभावी तोही तितका यशस्वी ठरला नाही.

संमेलनाच्या मुख्य मंडपात सायंकाळी साडेचार वाजता ही मुलाखत होणार होती. परंतु संमेलनाचा उद्घाटनसोहळाच लांबल्यामुळे मुलाखत सुमारे तासभर उशिराने सुरू झाली. गुलजार यांना ऐकण्यासाठी रसिकांनी मोठी गर्दी केली होती. साहित्यिक, पत्रकार अंबरीश मिश्र यांनी गुलजार यांची मुलाखत घेतली.

एकसे घर है सभी, एकसे बाशिंदे है

अजनबी लगता नही कोई, एकसे लगते है सभी

अशी नज्म ऐकवतच मिश्र यांनी मुलाखतीला सुरुवात केली. कवीची परीक्षा कशी होते, या पहिल्याच प्रश्नावर गुलजार यांनी, 'कवी नेहमीच परीक्षेसाठी तयार असतो,' असे सांगून, 'तुम्ही समीक्षक किंवा वाचक हेच आमचे परीक्षक असतात,' असे सांगितले. 'कवीला जे सांगायचे आहे, ते लोकांपर्यंत पोहोचते की नाही, यावर कवीचे यश अवलंबून असते. मी जे सांगतो ते फक्त मलाच कळत असेल, तर ते माझे (कवीचे) अपयश आहे,' असे सांगितले.

'लोकप्रियता हा कवीच्या यशाचा मापदंड नाही,' असे सांगून गुलजार म्हणाले, 'कवितांच्या तुलनेत सिनेमातील गीते जास्त लोकप्रिय होतात. कवितेला तशी लोकप्रिय होण्याची गरज नसते.'

'मनात अर्धवट राहिलेल्या कवितेचे काय होते,' असा प्रश्न मिश्र यांनी विचारला. त्यावर गुलजार उत्तरले, 'कविता मनातच राहिली, तर ती तुम्हाला अस्वस्थ करत राहते. ती बाहेर पडेपर्यंत तुम्हाला अस्वस्थ करते. कविता बाहेर पडल्यानंतर मी तिला स्वतःपासून दूर करून तिचे परीक्षण करतो, की, मला जे म्हणायचे होते ते हेच आहे का?'

कुसुमाग्रज, विंदा करंदीकरांसह अनेक मराठी कवी आणि ३२ भाषांतील २७२ कवींच्या कवितांचा अनुवाद केल्याचे सांगून गुलजार म्हणाले, 'अनुवादात मूळ कवितेच्या तुलनेत थोडा कमीपणा येतोच. इत्र थोडा उड जाता ही है. कुसुमाग्रज आपल्या छोट्या छोट्या कवितांतून जो मूड पकडतात, ज्या भावना व्यक्त करतात, ते हिंदीत गेले पाहिजे, असे वाटल्याने त्यांच्या कवितांचा अनुवाद केला,' असेही गुलजार यांनी आवर्जून सांगितले. 'कणा'सह (अनुवादित) कुसुमाग्रजांच्या काही अनुवादित कविता आणि स्वरचित नज्मही गुलजार यांनी सादर केल्या. पहाड, सेल्फ मेड आदी कवितांना रसिकांनी उत्स्फूर्त दाद दिली.

किताबे झाँकती है बंद अलमारीसे, बहुत दिन हुए अब मुलाकाते नहीं होती

अशा शब्दांत त्यांनी आजकाल लिखाणाची आणि वाचनाचीही सवय कमी झाल्याची खंत व्यक्त केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


ब्रह्मांड शांत होईल, लेखक नाही

$
0
0

ख्यातनाम गीतकार गुलजार यांच्या भावना

Chintamani.Patki@timesgroup.com

ज्ञानोबा-तुकाराम साहित्यनगरी (पिंपरी)

'ब्रह्मांड की आवाज चूप हो सकती है, मगर लेखक की नहीं....' गेल्या काही काळातील असहिष्णुतेचा वाद, पुरस्कारवापसीसारख्या मार्गांनी साहित्यिकांनी उठवलेला आवाज आणि त्यावरून उभ्या राहिलेल्या वादळाच्या पार्श्वभूमीवर ख्यातनाम कवी-गीतकार गुलजार यांनी साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावर या भावना मांडल्या आणि कोणताही थेट उल्लेख नसतानाही रसिकांनी त्यातील मर्म ओळखून त्यांना टाळ्यांनी दाद दिली.

'मराठी और मराठी के दोस्तो, आप दोनों को सलाम...महाराष्ट्र में रहते रहते मेरी भाषा पे मराठी का नमक लग गया है...' अशा शब्दांनी गुलजार यांनी मराठीजनांना शनिवारी जिंकून घेतले. 'भाषिक संमेलने गल्लोगल्ली होतात; पण भारतातील सर्व भाषांचे एकत्रित संमेलन होत नाही,' अशी खंत व्यक्त करून 'या संमेलनासाठी महाराष्ट्रातील साहित्यिक-रसिकांनी पुढाकार घ्यावा,' असे आवाहन त्यांनी केले.

८९व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या उद्घाटनसोहळ्याचे आकर्षण ठरले ते गुलजार यांचे भाषण. सध्याच्या असहिष्णुतेच्या विषयावर भाष्य करताना गुलजार यांनी 'लेखकांची जीभ कापली, तरी तो बोलतच राहील,' असे खास आपल्या मुक्तशैलीत कथन केले. 'सर्व भाषांमध्ये लिहिले जाते; पण असे संमेलन कोणत्याच भाषेत होत नाही. आपल्या भाषेचे प्रेम आणि संमेलनाची ओढ फक्त मराठी लोकांमध्ये आहे. मराठी भाषेचे संमेलन पाहून एक इच्छा वाटते, की देशातील सर्व भाषांचे एक संमेलन असावे. प्रयत्न करूनही ही इच्छा पूर्ण झालेली नाही. संमेलने गल्लोगल्ली होतात; पण सर्व भारतीय भाषांचे एकत्रित संमेलन होत नाही. या संमेलनासाठी महाराष्ट्राने पुढाकार घ्यावा. सर्व भाषेतील लेखकांनी एकत्र यावे, त्यांच्यात संवाद घडावा, यासाठी एक व्यासपीठ निर्माण व्हावे,' अशी अपेक्षा गुलजार यांनी व्यक्त केली. 'भारतात मराठी, बंगाली व मल्याळम या तीन भाषांमध्येच बालसाहित्य निर्माण होत आहे,' असे गुलजार म्हणाले.

..............

कालिदास का शिकवला जात नाही?

'इंग्रजीला विरोध नाही. इंग्रजी महत्त्वाची आहेच; पण आपल्याकडे फक्त शेक्सपिअर शिकवला जातो, कालिदास का शिकवला जात नाही,' असा सवाल गुलजार यांनी उपस्थित केला. 'मराठीतील किती साहित्य दुसऱ्या भाषेत जाते आणि दुसऱ्या भाषेतील किती साहित्य मराठीमध्ये येते, याची समीक्षा होणे गरजेचे आहे,' असे मत त्यांनी मांडले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

संवादी भूमिकेची गरज

$
0
0

संमेलनाध्यक्षांनी व्यक्त केली संघर्ष आणि संवाद यातून निवडीची गरज

म. टा. प्रतिनिधी, ज्ञानोबा-तुकोबा साहित्यनगरी (पिंपरी)

'धर्म गळून पडला, तरच माणूस टिकेल. संघर्ष की संवाद यापैकी नेमके काय हे ठरवण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी संवादी भूमिका असावी,' असे मत ८९व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांनी व्यक्त केले.

मध्यंतरी गाजलेला सहिष्णुता आणि असहिष्णुता वाद आणि अनेक वादग्रस्त मुद्द्यांना डॉ. सबनीस यांनी आपल्या मुलाखतीदरम्यान स्पर्श केला. 'सहिष्णुता, असहिष्णुता एकाच वेळी समाजात वावरत असतात. त्या बऱ्या-वाईट अशा नसतात. लेखकाने आपल्या स्वातंत्र्याचा पुरेपूर वापर करून घ्यायला पाहिजे. लेखकांच्या पुरस्कार परत करण्याच्या भूमिकेविषयी मला आदर आहे; पण हा काही विरोधाचा मार्ग असू शकत नाही. लेखकांनी शक्यतो लेखणीतूनच विरोध करावा. त्यातूनही काही साध्य न झाल्यास वेगळ्या पद्धतीनेही निषेध नोंदवता येऊ शकतो,' असे सबनीस यांनी पुरस्कार परत करणाऱ्या साहित्यिकांना सुनावले.

राजकारणातील आगमनाविषयी विचारले असता, 'मी सध्या साहित्यकारणात आहे, तर माझी धिंड, प्रेतयात्रा काढली जाते. 'सनातन'च्या गोळ्या खाव्या लागतात. माझ्याइतका अव्यवहार्य, सत्यवचनी आणि वेडा माणूस राजकारणात टिकू शकणार नाही,' असे उत्तर सबनीस यांनी दिले. 'विद्रोही, कार्यकर्त्यांविषयी माझ्या मनात कमालीचा आदर आहे. असे असले, तरी आजच्या काळात सततचा विद्रोह शक्य आहे, का याचा विचार करण्याची आवश्यकता आहे,' असेही ते म्हणाले.

..

'शेतमालाला भाव मिळावा'

'शेतकऱ्यांच्या मालाला सध्या भाव मिळत नाही, ही माझी खंत आहे. मी शेतकरी कुटुंबातील असल्याने ही वेदना मीदेखील सहन केली आहे. त्यामुळे शेतमालाला योग्य भाव मिळण्यासाठी सरकारने अॅग्रीकल्चर ट्रिब्युनलची स्थापना करावी. या माध्यमातून शेतकऱ्यांच्या घामाला योग्य भाव मिळावेत,' अशी भावना सबनीस यांनी व्यक्त केली.

..

'सदाशिव पेठेचे आभार मानतो'

'मी सदाशिव पेठेत जन्माला आलो असतो, तर माझी भूमिका समाजासमोर मांडूच शकलो नसतो. कदाचित संघातही गेलो असतो. त्यामुळे मी सदाशिव पेठेत जन्माला आलो नाही, या बाबत या ठिकाणाचे आभारच मानतो,' असेही सबनीस म्हणाले.

...

आपल्याकडील आदिवासी, मुस्लिम, दलित, ग्रामीण या घटकांचे मराठी साहित्य खूपच समृद्ध, श्रीमंत आहे; मात्र मराठी माणूस खूपच गरीब आहे. या गरीब माणसासाठी लेखक, कलावंत, राजकारणी काय करणार, हा माझ्या चिंतनाचा प्रश्न आहे.
- डॉ. श्रीपाल सबनीस, संमेलनाध्यक्ष

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

संवादाचे धुमारे नष्ट होऊ शकत नाहीत

$
0
0

माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांचा विश्वास

sunil.landge@timesgroup.com

ज्ञानोबा-तुकाराम साहित्यनगरी (पिंपरी)

'सहजीवन, सुसंवाद आणि स्वानंद ही साहित्य निर्मितीला प्रेरणा देणारी सूत्रे असताना साहित्य कृतीतून उधळणारे संवादाचे धुमारे कोणी नष्ट करू शकणार नाही,' अशी अपेक्षा माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी शनिवारी व्यक्त केली.

अखिल भारतीय मराठी महामंडळाच्या ८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, ज्येष्ठ गीतकार गुलजार, बिहारचे माजी राज्यपाल डॉ. डी. वाय. पाटील, महापौर शकुंतला धराडे, माजी संमेलनाध्यक्ष डॉ. सदानंद मोरे, पालकमंत्री गिरीश बापट, रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष रामदास आठवले व्यासपीठावर होते. ज्ञानपीठ पुरस्कार विजेते सत्यव्रत शास्त्री, रेहमान राही, सीताकांत महापात्रा, डॉ. प्रतिभा राय यांचा विशेष सत्कार या वेळी करण्यात आला.

सारस्वतांचा सोहळा पिंपरी-चिंचवडच्या औद्योगिकनगरीत होत असल्याचा विशेष आनंद व्यक्त करीत पवार म्हणाले, 'साहित्यकृती कुठेही जन्म घेते. तिला दलित, आदिवासी, मुस्लीम, जैन असे कोणतेही लेबल लावा. त्याचे जन्मजात तेज लपून राहणार नाही. ते व्यक्तच होत राहणार आहे. त्यामुळे संवादाचे धुमारे कोणीही नष्ट करू शकणार नाही. ते निर्माण होतच राहतील. भेदाभेदाचे तण समाजात अधूनमधून उगवले, तरी त्याचा वणवा पेटणार नाही, असा विश्वास वाटतो.'

दुष्काळाने साहित्याला खूप काही दिले आहे, असे नमूद करून पवार म्हणाले, 'देशात १६३० मध्ये पडलेल्या महाभयंकर दुष्काळात संत तुकाराम महाराजांचे कुटुंब देशोधडीला लागले होते. दुष्काळातील हालअपेष्टा पाहून, सहन करून विरक्त झालेल्या तुकोबांच्या मुखातून अभंगरुपी निखारे पाहिर पडले. त्यामुळे अभंगगाथेचे भांडार साहित्य जगतापुढे आले. दुष्काळात महात्मा फुले यांची लेखणी प्रस्थापित व्यवस्थेवर प्रहार करू लागली. १८९० मध्ये शेतकरी कुटुंबांची व्यथा ह. ना. आपटे यांनी मांडली. आता कला, साहित्य जगताना दुष्काळ निवारण्यासाठी काहीतरी चांगले काम करण्याची वेळ आली आहे. या अनुषंगाने अभिनेते नाना पाटेकर, मकरंद अनासपुरे यांच्या 'नाम' संस्थेने नवा सामाजिक पायंडा निर्माण केला आहे. लेखणीच्या अंगी बळीराजासाठी झटण्याचे बळ आले आहे, असे वाटते.'

महानुभव पंथ, वारकरी संप्रदायाने मराठी साहित्याचा पाया रचला आहे. त्या मराठी भाषेचे संवर्धन करणे काळाची गरज आहे, असे आवाहन त्यांनी केले. चिरतरुण कवी मंगेश पाडगावकर यांचे निधन मनाला चटका लावून जाणारे आहे; तसेच नामदेव ढसाळ, प्रा. मधुकर हातकणंगलेकर, सदाशिव खोत यांना पवार यांनी शब्दरुपी आदरांजली वाहिली.

दुष्काळग्रस्तांच्या मुलांसाठी सुमारे एक कोटी रुपयांचा निधी या वेळी देण्यात आला. प्रास्ताविक डॉ. माधवी वैद्य यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुबोध भावे आणि सोनाली कुलकर्णी यांनी केले.

.....

चौकट

तरुण लेखक घडताहेत...

संत ज्ञानेश्वर महाराजांच्या वैभवशाली परंपरेचे जागतिकीकरण आजच्या साहित्यिकांनी समर्थपणे स्वीकारलेले दिसते, असे नमूद करून शरद पवार म्हणाले, 'ज्वलंत विषयावर लिहिण्याची तयारी आजच्या तरुण लेखकांमध्ये प्रकर्षाने आढळते. त्यामध्ये आसाराम लोमटे, विश्राम गुप्ते, अवधूत डोंगरे, किरण गुजर, बालाजी इंगळे, मीरा राठोड, वैभव खरात, कविता मेहंदळे, सचिन फल्ले यांचा विशेष उल्लेख करता येईल. हे लेखक घडत असल्याची बाब मराठी साहित्याच्यादृष्टीने आनंदाची आहे.'

.....

चौकट

सर्जनशील मनांचा महोत्सव

या संमेलनाच्या माध्यमातून साहित्य क्षेत्रात अनेक नवे विक्रम निर्माण झाले आहेत. साहित्य संमेलन हा शब्दांचा, साहित्यांचा आणि साहित्य निर्माण करणाऱ्या सर्जनशील मनांचा महोत्सव आहे. तो आनंदाने, उत्साहाने साजरा होणे गरजेचे आहे. पत्रिकेतील कार्यक्रम भरगच्च, दर्जेदार आहेत. त्याचा आस्वाद रसिकांनी घ्यावा, असे आवाहन पवार यांनी केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

संमेलनामुळे हॉटेल व्यवसाय तेजीत

$
0
0

Rohit.Athavale@timesgroup.com

ज्ञानोबा-तुकाराम साहित्यनगरी, पिंपरी

पिंपरी येथे सुरू असलेल्या ८९व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात सारस्वतांना साहित्याची अनोखी मेजवानी उपलब्ध झाली असतानाच संमेलनामुळे शहरातील हॉटेल व्यवसायाला चालना मिळाली आहे. शहरातील सुमारे २०० ते २५० रूम निमंत्रितांसाठी स्वागताध्यक्षांनी बुक केल्या आहेत. जेवणाची व्यवस्था संमेलनस्थळीच असली, तरी शहरासह आसपासच्या परिसरातून येणाऱ्यांची पावले व्हेज हॉटेलकडे वळत आहेत.

स्वागताध्यक्षांनी डॉ. डी. वाय. पाटील युनिव्हर्सिटीच्या वेगवेगळ्या इमारतींमध्ये अनेकांच्या निवासाची व्यवस्था केली आहे. संमेलनासाठी राज्यासह देशातील अनेक ठिकाणांहून लोक आले आहेत. अनेक व्हीआयपी आणि व्हीव्हीआयपींसाठी शहरातील पंचतारांकित हॉटेलसह चेन मार्केट असलेल्या, तसेच लहान-मोठ्या हॉटेलमध्ये आमंत्रितांच्या राहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. प्रामुख्याने पिंपरी चौकाच्या आसपास आणि वल्लभनगर येथील अनेक हॉटेल बुक आहेत.

संमेलनाला शनिवारी (१६ जानेवारी) सहकुटुंब भेट देणाऱ्यांची संख्या लक्षणीय होती. एच. ए. कंपनीच्या मैदानावर हा सोहळा होत असून, शहराच्या मध्यवर्ती भागात हे मैदान असल्याने गर्दीत भरच पडत आहे. त्यामुळे या परिसरातील लहान-मोठ्या हॉटेलमध्ये गर्दी झाल्याचे चित्र होते.

पिंपरी-चिंचवड हॉटेल असोसिएशनचे अध्यक्ष पद्मनाभ शेट्टी म्हणाले, 'नाशिकफाटा ते मोरवाडी चौक या दरम्यान रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या अनेक हॉटेलमध्ये गेल्या पाच दिवसांपासून रूम बुक करण्यात आल्या आहेत. संमेलनस्थळी भोजनाची व्यवस्था आहे. मात्र, शहरातून आणि पुण्यातून संमेलनासाठी आलेल्यांपैकी अनेकांनी शहरातील व्हेज हॉटेलमध्ये जेवण्यासाठी येत आहेत. यातून लॉजिंग आणि व्हेज हॉटेल व्यवसायाला चालना मिळाली आहे.'

..................

कॅब आणि रिक्षाचालकांनाही रोजगार

संमेलनस्थळी येण्यासाठी स्वागताध्यक्षांनी पीएमपीच्या काही बस मोफत उपलब्ध करून दिल्या आहेत. शहरातील अनेक मार्गावरून या बस सुटत आहेत. तरी देखील अनेकांकडून कॅब आणि रिक्षांमधून प्रवास करण्यास पसंती दिली असून, यातून कॅब आणि रिक्षा चालकांना देखील रोजगार उपलब्ध झाला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

थंडीचा कडाका ओसरला

$
0
0

पुणे : बाष्पयुक्त वाऱ्यांमुळे राज्यातील तापमानात वाढ झाली असून, थंडीचा कडाका कमी झाला आहे. पुण्यात किमान तापमान १५.३ अंशांवर पोहोचले आहे. पुढील दोन दिवस अशीच परिस्थिती राहण्याची शक्यता असून, विदर्भात सोमवारी तुरळक ठिकाणी गारांसह पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

मध्य प्रदेशाच्या नैऋत्य भागात वातावरणाच्या वरच्या थरात हवेची चक्राकार स्थिती आहे. त्यामुळे या भागात बाष्प जमा झाले असून, पुढील दोन दिवसांत या भागात पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. त्याचा परिणाम विदर्भातही जाणवणार आहे. विदर्भात रविवारी तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाची, तर रविवारी विदर्भात तुरळक ठिकाणी गारांसह पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

शनिवारी पुण्यात २८.९ अंश सेल्सिअस इतके कमाल, तर १५.३ अंश सेल्सिअस इतके किमान तापमान नोंदले गेले. किमान तापमान सरासरीपेक्षा तब्बल चार अंशांनी अधिक असल्याने शहरातून थंडी जणू गायब झाली होती. राज्यातही अनेक ठिकाणी अशीच परिस्थिती होती. राज्यातील सर्वात नीचांकी तापमान जळगाव येथे (१२.२ अंश सेल्सिअस) नोंदले गेले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘कट्यार’चा शंभरावा प्रयोग

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

काही कट्यारी अशा असतात, ज्या काळजात घुसतात; पण रक्त सांडत नाहीत. या कट्यारी असतात, सुरांच्या! सुरांनी रंगलेल्या 'वसंतोत्सवा'त शनिवारी अशीच एक स्वरकट्यार घुसली थेट रसिकांच्या काळजात आणि एकच उद्गार उमटला, 'गाते रहो!'...

'कट्यार काळजात घुसली' या नाटकाचा नव्या कलाकार संचातील शंभरावा प्रयोग 'वसंतोत्सवा'त शनिवारी रंगला, तो सुमारे दहा हजार रसिकांच्या साक्षीने न्यू इंग्लिश स्कूल, रमणबाग प्रशालेच्या मैदानावर. वसंतोत्सवाच्या दुसऱ्या दिवसाचे मुख्य आकर्षणही अर्थातच हा नाटकाचा प्रयोग होता. खाँसाहेबांच्या भूमिकेत राहुल देशपांडे, सदाशिवच्या भूमिकेत महेश काळे आणि कविराजाच्या भूमिकेत सुबोध भावे अशी तगडी 'स्टारकास्ट' असलेल्या या प्रयोगाने एक वेगळीच उंची गाठली.

मराठी संगीत नाटकाचा प्रयोग ओपेरा शैलीत खुल्या मैदानात सादर होण्याची ही एक अपवादात्मक घटना असावी. नेत्रदीपक नेपथ्य, उत्तम ध्वनिव्यवस्था आणि कलाकारांची उत्स्फूर्त अदाकरी यामुळे नाटकात अनोखे रंग भरले. पुरुषोत्तम दारव्हेकरांचे शब्द, पं. जितेंद्र अभिषेकी यांचे संगीत आणि डॉ. वसंतराव देशपांडे यांनी अजरामर केलेली खाँ साहेबांची भूमिका यामुळे 'कट्यार काळजात घुसली' या नाटकाला मराठी रसिकांच्या हृदयात एक वेगळे स्थान आहे. नव्या पिढीतील कलाकारांनी पुन्हा या नाटकाचे प्रयोग सुरू केल्यानंतरही रसिकांची तितकीच दाद मिळाल्याने या संचातील प्रयोगांनीही शंभरी गाठली आणि या शंभराव्या प्रयोगानेही लोकप्रियतेचे शिखर सर केले. रसिकांनी प्रयोग संपल्यावर कलाकारांना 'स्टँडिंग ओव्हेशन' दिले.

चार फेब्रुवारी २०१० रोजी नव्या संचातील पहिला प्रयोग झाला होता. त्यानंतर सहा वर्षांतच नाटकाचे शंभर प्रयोग झाले आहेत. 'घेई छंद', 'सुरत पिया की', 'मुरलीधर श्याम', 'या भवनातील गीत पुराणे' अशा एकाहून एक सरस पदांना तितकात उत्स्फूर्त प्रतिसाद आणि 'वन्स मोअर'ही मिळाले. अस्मिता चिंचाळकर, दीप्ती माटे, सौरभ काडगावकर, भूषण नेहेरे, प्रशांत तपस्वी, रवी बापट आदी कलाकारांनीही नाटकात रंग भरले. आदित्य ओक, राहुल गोळे, निखिल फाटक, भूपाल पणशीकर, ओंकार दळवी, नीलेश देशपांडे यांनी वाद्यसाथ केली. पहिल्या सत्रात मीरा प्रसाद यांचे सतारवादन झाले. त्यांनी राग यमन कल्याण सादर केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पदव्यांच्या ‘दुकानां’वर कारवाई

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

मुंबई हिंदी विद्यापीठाच्या नावाचा गैरवापर करून पुण्यात पदव्यांची दुकाने चालवणाऱ्यांवर कडक कारवाई करणार असल्याचे विद्यापीठाकडून शनिवारी सांगण्यात आले. विद्यापीठाच्या पदव्या या केवळ समकक्षतेसाठी विचारात घेणे योग्य असल्याने महापालिकांसारख्या सरकारी यंत्रणांनी या पदव्या नियमित पदवी पात्रतेच्या ठिकाणी विचारात घेऊ नयेत, असे आवाहनही विद्यापीठाने केले.

विद्यापीठाच्या नावाचा वापर करत पुण्यात दोन ठिकाणी चुकीच्या पद्धतीने पदव्यांचे वाटप केले जात असल्याची बाब 'मटा'ने शनिवारी उघड केली. या माध्यमातून पैशांच्या बळावर अक्षरश: पदव्या वाटणारी दुकानेच पुण्यात थाटली गेल्याची बाबही प्रकाशात आली. हे वृत्त प्रकाशात आल्यानंतर विद्यापीठानेही या केंद्रांची चौकशी सुरू केली आहे. याविषयी विद्यापीठाचे प्रधानमंत्री एस. जी. कादरी म्हणाले, 'विद्यापीठाने पुण्यात केवळ डॉ. कानडे एज्युकेशनल फाउंडेशनमधील केंद्रालाच अधिकृत दर्जा दिला आहे. वारजे चौकातील विजया अॅकॅडमीमधील केंद्र अनधिकृत आहे. या अनधिकृत केंद्रामधून भरले जाणारे अर्ज नेमके कोणत्या अधिकृत केंद्रामार्फत विद्यापीठाकडे येतात, याची तपासणी आम्ही करणार आहोत. तेथून आतापर्यंत भरले गेलेले अर्ज, त्याद्वारे दिलेली प्रमाणपत्रे यांची माहिती गोळा केली जाणार आहे. तेथील पदवी प्रमाणपत्रांची वैधताही आम्ही तपासणार आहोत.'

'डॉ. कानडे एज्युकेशनल फाउंडेशनमधील प्रवेशप्रक्रिया, तेथून दिली जाणारी प्रमाणपत्रे यांची वैधताही विद्यापीठ तपासणार आहे. तेथून चुकीच्या पद्धतीने प्रमाणपत्रे दिली गेल्याचे सिद्ध झाल्यास हे केंद्र बंद केले जाईल. त्याविषयीचा ठराव विद्यापीठाच्या व्यवस्थापन मंडळासमोर ठेवणार आहे,' असेही कादरी यांनी शनिवारी स्पष्ट केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


‘लिजंड, पंडित शब्द कुणासाठीही’

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, पुणे

'लिजंड' आणि पंडित हे शब्द खूप स्वस्त झाले असून, कोणासाठीही वापरले जात आहेत. त्याचा अर्थदेखील त्यांना कळत नसेल,' अशी खंत ज्येष्ठ संतूरवादक पं. शिवकुमार शर्मा यांनी शनिवारी व्यक्त केली. 'ओ. पी. नय्यर यांचे भारतीय संगीत क्षेत्रात योगदान अतुलनीय आहे. आजवर कोणत्याही संगीतकाराने तशी कामगिरी केलेली नाही, त्यांचे संगीत अमर आहे,' असेही ते म्हणाले.

ओ. पी. नय्यर फाउंडेशनतर्फे दिला जाणारा 'ओ. पी. नय्यर अॅवॉर्ड ऑफ एक्सलन्स' पं. शिवकुमार शर्मा यांना ज्येष्ठ सारंगीवादक पं. राम नारायण यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. या वेळी ते बोलत होते. फाउंडेशनचे विश्वस्त नंदू बेलवलकर, रोहन पुसाळकर व शिरिष कौलगुड या वेळी उपस्थित होते. 'मटा' या कार्यक्रमाचा मीडिया पार्टनर होता.

'पं. राम नारायण हे खऱ्या अर्थाने 'लिजंड' आहेत. त्यांची संगीत क्षेत्रातील तपश्चर्या, त्यांनी दिलेले योगदान मोठे आहे. आताच्या पिढीतील कलाकारांनी ते समजून घेतले पाहिजे,' असे मत शर्मा यांनी व्यक्त केले. चित्रपट संगीतात सारंगीचा वापर केला जाऊ शकतो, असा विचार इतर संगीतकारांनीही केला नसेल, तेव्हा ओपींनी त्यांच्या सर्व प्रकारच्या गीतांमध्ये सारंगीचा यथोचित वापर केला,' असेही शर्मा यांनी सांगितले.

'सारंगी, संतूर आणि बासरी या वाद्यांचा चित्रपट संगीतात वापर करणारे ओपी हे एकमेव संगीतकार होते. त्यांचे योगदान हे न भूतो न भविष्यती आहे,' असे रामनारायण यांनी सांगितले. सृष्टी संस्थेतर्फे नय्यर यांच्या गीतांच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये जवानिया ये मस्त मस्त, बाबूजी धीरे चलना, जाता कहाँ है दिवाने, आपके हसीन रुख पे आदी सदाबहार गीतांचे सादरीकरण झाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘ट्विटर’वरही होतोय मायमराठीचा जागर

$
0
0

Chinmay.Patankar@timesgroup.com

पुणे : पिंपरी-चिंचवड येथे मराठी भाषा आणि वाङ्मयाचा मेळा भरलेला असतानाच तंत्रज्ञानाची कास धरून भाषेला जागतिक व्यासपीठावर नेणाऱ्या पहिल्या ट्विटर मराठी भाषा संमेलनालाही उत्स्फूर्त प्रतिसादात प्रारंभ झाला. संमेलनाच्या पहिल्या दीड दिवसात सुमारे एक हजार जणांनी संमेलनात सहभाग नोंदवला असून, संमेलनासंबंधित तब्बल साडेपाच हजार ट्विट्स करण्यात आली.

'मराठी वर्ड' या ट्विटर हँडलचे संचालक स्वप्नील शिंगोटे यांनी ट्विटर संमेलनाची संकल्पना प्रत्यक्षात आणली. पिंपरी-चिंचवड येथे भरलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्याच काळात १५ ते १८ जानेवारीदरम्यान पहिले ट्विटर मराठी भाषा संमेलन होणार असल्याचे जाहीर करण्यात आले. ट्विटरवरील भाषाप्रेमींनी या संकल्पनेचे स्वागत करत ती उचलून धरली. गेले दहा दिवस या संमेलनाविषयी ट्विटरवर उत्सुकता होती आणि चर्चा करण्यात येत होती. संमेलनात चर्चा करण्यासाठी बारा हॅशटॅगही तयार करण्यात आले.

अनेक कवींच्या कविता, आवडती पुस्तके, लेखकांविषयी माहिती, मराठीला झालेला तंत्रज्ञानाचा स्पर्श, कविता, कथा, ब्लॉग आदी विषयांवर संमेलनात चर्चा करण्यात येत आहे. अनेकांनी आपले ब्लॉग, आपले भाषेसंदर्भातले वेगळे उपक्रम यांची माहिती ठरावीक हॅशटॅग वापरून शेअर केली. ब्लॉगच्या माध्यमातून लिहिलेल्या नव्या कथा, कविता असे साहित्य समोर आले आहे. अत्यंत मोकळेपणाने, संवादी भूमिकेतून हे संमेलन रंगत आहे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे, तरुणाईचा मराठी भाषेविषयीचा हुंकार या संमेलनाच्या निमित्ताने अनुभवायला मिळत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

...तरी लेखक बोलणारच!- गुलजार

$
0
0

अ.भा. मराठी साहित्य संमेलन उद्घाटनात असहिष्णुतेवर प्रहार

म. टा. प्रतिनिधी, ज्ञानोबा-तुकाराम साहित्यनगरी, पिंपरी

सहिष्णू-असहिष्णू वादाचा, तसेच अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा मुद्दा ऐरणीवर आणत, विविध वादांनी गाजत राहिलेल्या ८९व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलाचे उद्‍घाटन शनिवारी येथे झाले. राजकीय नेत्यांपासून ते आजी-माजी संमेलनाध्यक्षांपर्यंत आणि गुलजार यांच्यासारख्या विशेष निमंत्रितांनी त्याविषयी भाष्य केल्याने उद्घाटनाचे सत्र चांगलेच रंगले. 'लेखकाची जीभ कापली, तरी तो बोलतच राहणार', असे सूचक वक्तव्य गुलजार यांनी केले; तर 'संत आणि महापुरुषांची जातिनिहाय विभागणी झाल्याने महाराष्ट्राचे वाट्टोळे झाले', असे मत संमेलनाध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांनी मांडले.

पिंपरी-चिंचवड येथील मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटन शनिवारी झाले. देशातील वाढत्या असहिष्णू वातावरणामुळे अनेक लेखक-कलावंतांनी पुरस्कार परत करण्यास सुरुवात केली होती. त्याचे पडसाद मराठी भाषेच्या साहित्याच्या सर्वांत मोठ्या उत्सवात पडतील, अशी शक्यता होती अन् घडलेही तसेच. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, संमेलनाध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस, माजी संमेलनाध्यक्ष डॉ. सदानंद मोरे आणि प्रसिद्ध कवी आणि गीतकार गुलजार या पाचही प्रमुख वक्त्यांनी आपल्या मनोगतामध्ये सहिष्णू-असहिष्णू यांसह प्रस्थापित-पुरोगामी याचे आवर्जून दाखले दिले

सर्वप्रथम, गुलजार यांनी, 'ब्रह्मांड की आवाज चूप हो सकती है, मगर लेखक की नहीं,' असे सूचक वक्तव्य केले. त्यानंतर, शरद पवार यांनी, धर्मनिरपेक्षता, सहिष्णुता या शब्दांचा अर्थ आणि व्याप्ती खूप मोठी असून, त्या आचरणात आणणे अत्यंत कठीण असल्याचा उल्लेख केला. सामाजिक समता, पुरोगामी परंपरा आणि फूले-शाहू-आंबेडकर यांचा वारसा यामुळे महाराष्ट्रात भेदाभेदाचे तण उगवले, तरी वणवा पेटणार नाही, अशी ग्वाही त्यांनी दिली. 'सामाजिक जीवनात अनेक संक्रमणे येत असली, तरी विचारांना कोणी संपवू शकणार नाही,' असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. हा देश सहिष्णूच आहे, सहिष्णू होता आणि सहिष्णूच राहील, अशी ठाम भूमिका त्यांनी व्यक्त केली.
................

लेखक गप्प बसणार नाही

गावातील हमरस्त्यावरील चौकात

उभा ठाकला होता एक माणूस...

मुका.

त्रास होत असावा त्याला

कसलासा,

कारण,

खोकत होता तो अधेमधे,

आणि खोकताक्षणी बाहेर पडायचे

काय काय शब्द त्याच्या तोंडातून,

हे काय अघटित?

तर मग कळलं...

लेखक होता तो,

हासडून टाकली होती जीभ

कुणीतरी त्याची,

मग खोकला की

बाहेर पडायचे

शब्दच त्याच्या तोंडातून,

तर

म्हणजे...

होवो काहीही,

लेखक बोलणारच,

बोलत राहणारच,

गप्प नाही बसणार,

होवो काहीही...

(साहित्य संमेलन उद‍्घाटन कार्यक्रमात कवी गुलजार यांनी मांडलेल्या हिंदी कवितेचा स्वैर अनुवाद)

.....................
* 'आणीबाणी, गोध्रा ही असहिष्णुताच'

'मांजरास चांदीच्या वाटीत दूध पाजणारी संस्कृती हाडामासाच्या माणसाला युगायुगांचा अंधार पिऊन बसण्यासाठी दहशत बनली असेल, तर हे चातुर्वर्ण्य संस्कृतीचे, सहिष्णूतेचे उदाहरण कसे मानणार? मराठवाडा विद्यापीठ नामांतर असेल; गोध्रा असेल, इंदिरा गांधींची आणीबाणी असेल... ही सहिष्णुतेची प्रकरणे नाहीत', असे संमेलनाध्यक्ष श्रीपाल सबनीस यांनी अध्यक्षीय भाषणात नमूद केले.

* मुख्यमंत्र्यांकडून औचित्यभंग?

डॉ. सबनीस यांचे भाषण सुरू होण्याआधीच मुख्यमंत्री नियोजित कार्यक्रमासाठी बाहेर पडले. आपल्या भाषणात सबनीस मुख्यमंत्र्यांचे नाव घेण्यास विसरले होते; त्यांची आठवण करून देताच त्यांनीच मुख्यमंत्री पुढील कार्यक्रमाला गेल्याचे जाहीर केले. तसा निरोप त्यांनी आपल्याला दिल्याचेही ते म्हणाले. मात्र मुख्यमंत्र्यांनी औचित्यभंग केल्याची चर्चा संमेलनस्थळी रंगली होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अपूर्व संगीतानुभवाने वसंतोत्सवाची सांगता

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

भजनांपासून ते जॅझपर्यंत वैविध्यपूर्ण प्रकार... संगीतातून मिळालेला अपूर्व आनंद अन् रसिकांकडून मिळालेले स्टँडिंग ओवेशन...

निमित्त होते वसंतोत्सवाचे. दशकपूर्ती साजरी करणाऱ्या वसंतोत्सवाचा रविवारी समारोप झाला. ज्येष्ठ तबलावादक पं. अरविंद मूळगावकर यांना संगीत संशोधक पुरस्कार, पं. सुरेश सामंत यांना पं. वसंतराव देशपांडे स्मृती सन्मान आणि नागेश आडगावरकर यांना उदयोन्मुख कलाकार पुरस्कार प्रदान करण्यात आला. पं. कुमार बोस, सचिन कुलकर्णी, विशाल गोखले, शरद देशपांडे यांच्या हस्ते पुरस्कार देण्यात आले.

समारोपाच्या दिवसाच्या पहिल्या सत्रात गायक प्रल्हाद तिपानीया यांनी कबीरवाणी सादर केली. कबीरांच्या रचना त्यांनी अतिशय उत्तमरित्या गायल्या. त्यानंतर ज्येष्ठ तबलावादक पं. कुमार बोस यांनी त्रिताल, पं. किशन महाराज यांच्या व स्वरचित रचना सादर केल्या. अत्यंत स्वच्छ आणि जोरकस वादन हे बोस यांच्या वादनाचे वैशिष्ट्य होते. लयीशी खेळत त्यांनी रसिकांना तबल्याच्या नादमाधुर्याचा प्रत्यय दिला.

ज्येष्ठ सॅक्सोफोनवादक जॉर्ज ब्रुक्स व राहुल देशपांडे यांनी फ्युजन मैफलीने महोत्साचा सुरेल समारोप केला. राहुल यांनी जिया मोरा आणि रागेश्री राग सादर केला. त्यानंतर ब्रुक्स यांनी जॅझ या संगीतप्रकारातील स्वरचित रचना सादर केली. दिल की तपीश है आफताब हे सध्या गाजणारे गीत आणि सॅक्सोफोन यांचा अप्रतिम मिलाफ केला. भाषेच्या आणि प्रदेशाच्या पलीकडे असलेल्या संगीताचा रसरशीत अनुभव या निमित्ताने रसिकांना अनुभवता आला. या दोघांना तबल्याची साथ निखिल फाटक, की बोर्डची साथ ओसान जोदीन आणि ड्रम्सची साथ संजीव पांडकर यांनी केली.

..................

वसंतोत्सवासाठी पुन्हा पुण्यात येणे ही पर्वणी आहे. कट्यार काळजात घुसली पाहिले. फारच अप्रतिम अनुभव होता. असे नाटक पुन्हा करणे नक्कीच प्रेरणादायी आहे.

जॉर्ज ब्रुक्स

यंदाचा महोत्सव खास होता. महोत्सवाचे एकंदरीत दहावे आणि पुण्यातील नववे वर्ष होते. या औचित्याने विनामूल्य महोत्सव करण्याची कल्पना होती. एका दिवसात दहा हजार प्रवेशिका संपणे हा सुखद धक्का होता. वसंतराव देशपांडे यांच्या घराण्यात जन्माला आलो हे भाग्य. ते व्यक्ती म्हणून किती मोठे होते ते अनेकांकडून कळते. ते कधीच नाट्यसंगीतापुरते मर्यादित नव्हते. त्यांनी कायम सर्व प्रकारच्या संगीतावर प्रेम केले. मराठवाडा, विदर्भातील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांना मदत करणे महत्त्वाचे आहे. पुढील वर्षीचा वसंतोत्सव विनामूल्य केला जाणार आहे.

- राहुल देशपांडे

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बुक बँकेतून वाचनाची ‘गुंतवणूक’

$
0
0

Chintamani.Patki
@timesgroup.com

ज्ञानोबा-तुकाराम साहित्यनगरी, पिंपरी

शंभर पुस्तकांच्या पंचवीस पेट्या..., अशी तब्बल दीड हजार पुस्तके..., ग्रामीण भागातील चौदा शाळा..., हजारो नवे विद्यार्थी वाचक... याद्वारे ग्रामीण भागांत वाचन चळवळ निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे अन् तो ही माजी राष्ट्रपती डॉ. अब्दुल कलाम यांच्या नावाने. 'डॉ. अब्दुल कलाम बुक बँके'मुळे ग्रामीण भागातील शाळांमध्ये वाचनाचा तास रंगू लागला आहे. चौदा शाळेतील हजारो विद्यार्थी वाचन परंपरा जपत साहित्याचा वारसा जपत आहेत.

पुण्यातील सरस्वती मंदिर संस्थेच्या पं. दीनदयाळ सेंटर फॉर करिअर डेव्हलपमेंट अँड रिसर्चने डॉ. अब्दुल कलाम बुक बँक अर्थात डॉ. अब्दुल कलाम फिरती पुस्तक योजना ही वाचन चळवळ सुरू केली आहे. डॉ. कलाम यांची जयंती वाचक प्रेरणा दिन म्हणून साजरे करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतल्यानंतर अॅड. विनायक आंबेकर यांच्या कल्पनेने ही योजना सुरू झाली. त्यांच्यासह डॉ. दीपक पाटील व प्रा. श्याम कांबळे ही साहित्यवेडी प्राध्यापक मंडळी कामाला लागली. ग्रामीण भागातील ज्या शाळांमध्ये ग्रंथालय नाही अशा शाळा हेरून तिथे चळवळ सुरू करण्याचे ठरले.

शिक्रापूर केंद्रांतर्गत १४ शाळा निवडल्या गेल्या. स्वत:कडील पाचशे पुस्तकांपासून या तिघांनी ही चळवळ सुरू केली. या अभिनव उपक्रमाचे खास अनुभव प्रा. श्याम कांबळे यांनी 'मटा'ला सांगितले. 'शंभर-शंभर पुस्तकांच्या २५ पेट्या तयार करण्यात आल्या आहेत. एक पेटी शाळेला तीन महिन्यांसाठी दिली जाते,' असे प्रा. कांबळे म्हणाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images