Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

पालिकेची दिवसभर अतिक्रमण कारवाई

0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

शहरातील अतिक्रमणे आणि अनधिकृत बांधकामांविरोधात पालिकेने गुरुवारी पौड रस्ता आणि परिसरात दिवसभर कारवाई केली. अतिक्रमण विभाग, बांधकाम विभाग आणि आकाशचिन्ह विभागातर्फे घेण्यात आलेल्या संयुक्त कारवाईत बोर्ड, बॅनर, फेरीवाले यांच्यासह अनधिकृत बांधकामांवरही हातोडा पडला.

गेल्या काही दिवसांपासून शहराच्या विविध भागांतील अतिक्रमणांविरोधात पालिकेतर्फे कारवाई सुरू आहे. येरवड्यात गेल्या मंगळवारी झालेल्या कारवाईत महापालिकेच्या अधिकाऱ्यांना मारहाण झाली. तरीही, कारवाईचा जोर थंडावणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले होते. बुधवारी वारजे-कर्वेनगर क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीतील अतिक्रमणे आणि अनधिकृत बांधकामांवर कारवाई झाली. तर, गुरुवारी कोथरूड क्षेत्रीय कार्यालयांतर्गत पौड रोड, कर्वे रोड आणि डीपी रोडवर धडक कारवाई करण्यात आली.

कोथरूड क्षेत्रीय कार्यालयातर्फे गुरुवारी १७ पथारी, १९ शेड्स, २ हातगाडी आणि इतर अशा ४० पथारी व्यावसायिक, फेरीवाल्यांवर कारवाई केली गेली. तर, आकाशचिन्ह विभागातर्फे बोर्ड, बॅनर, पोस्टर, झेंडे अशा दीडशेहून अधिक वस्तू काढण्यात आल्या. बांधकाम विभागाने फ्रंट आणि साइड मार्जिनअंतर्गत कारवाई करून २० हजार स्क्वेअरफूट क्षेत्र मोकळे केले. पौड रस्त्यावरील अनेक प्रसिद्ध व्यावसायिकांवरही पालिकेने कारवाई केली. या संपूर्ण कारवाईसाठी कारवाईत १५ पोलिस, १८ बिगारी, जेसीबी आणि पालिकेचे अधिकारी-कर्मचारी सहभागी झाले होते, अशी माहिती कोथरूड क्षेत्रीय कार्यालयाचे सहाय्यक आयुक्त जयंत भोसेकर यांनी दिली.

दरम्यान, महापालिकेतर्फे अतिक्रमणांविरोधात केली जाणारी कारवाई म्हणजे निव्वळ फार्स असल्याचा आरोप भारतीय जनता पक्षाचे सरचिटणीस संदीप खर्डेकर यांनी केला आहे. पालिकेतर्फे कारवाई केली जात असली, तरी काहीच दिवसांत पुन्हा त्या ठिकाणी बांधकाम केले जाते अथवा फेरीवाले, पथारी व्यावसायिकांचा व्यवसाय सुरू होतो. त्यामुळे, पालिकेची कारवाई निव्वळ दिखाऊ आहे, अशी टीका त्यांनी केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


हजारो बालके कुपोषित

0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

पुणे शहरातील महापालिकेच्या शाळेतच हजारो बालके कुपोषित असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. पालिकेच्या शिक्षण मंडळाच्या बालवाडीत शिकणारी साडेचार हजार बालके कुपोषित असल्याचे दिसून आले आहे.

दीपक फाउंडेशन या संस्थेने केलेल्या पाहणीत ही बाब उघड झाली आहे. मोठ्या प्रमाणात कुपोषित बालके आढळल्याने पालिकेत खळबळ उडाली आहे. सार्वजनिक आरोग्य प्रशिक्षण संस्थेचे काम करणाऱ्या दीपक फाउंडेशन आणि पालिकेचे शिक्षण मंडळ यांच्यामध्ये सामंजस्य करार झाला आहे. या करारानुसार संस्थेने जुलै ते सप्टेंबर २०१५ या कालावधीत शिक्षण मंडळाच्या बालवाडी वर्गांना प्रत्यक्ष भेटी देऊन केलेल्या पाहणीत ही माहिती पुढे आली आहे. पालिकेच्या सर्व माध्यमांच्या बालवाडीमध्ये सुमारे १५ हजार बालके शिक्षण घेतात. त्यापैकी ४,४७० मुले कुपोषित आढळून आली. संस्थेने शिक्षण मंडळाच्या २६१ शाळांमधील ५०१ बालवाड्यांची आरोग्य तपासणी केली. त्यामध्ये २,०३४ विद्यार्थ्यांमध्ये प्रथिने आणि उर्जेचे प्रमाण कमी आढळले. ३९५ बालकांमध्ये रक्ताचे प्रमाण कमी आढळले असून, २,१७५ विद्यार्थ्यांचे वजन कमी असल्याचे आढळून आले आहे. विविध आजारांची लक्षणे आढळून आलेल्या मुलांची संख्या दोन हजार आहे.

संस्थेने दिलेल्या अहवालाची माहिती घेऊन यावर तातडीने उपाय करावेत, यासाठी शिक्षण मंडळाच्या अध्यक्षा वासंती काकडे, उपाध्यक्ष नुरुद्दीन सोमजी यांनी आयुक्त कुणाल कुमार यांची भेट घेतली. या वेळी सदस्य प्रदीप धुमाळ, बाळासाहेब जानराव, शिक्षणप्रमुख बबन दहिफळे उपस्थित होते. आवश्यक त्या उपाययोजना करण्याचे आदेश कुमार यांनी अतिरिक्त आयुक्त राजेंद्र जगताप यांना दिले. त्यानंतर जगताप यांनी तातडीने नागरवस्ती विभागातील अधिकारी, पालिकेचे आरोग्य प्रमुख यांची बैठक घेऊन सर्व मुलांना अतिरिक्त पोषण आहार देण्याच्या सूचना केल्या. बालकांना आवश्यक पोषण आहार पुरविण्याबरोबरच कुपोषणातून त्यांना बाहेर काढण्यासाठी विशेष प्रयत्न करण्याच्या सूचनाही जगताप यांनी दिल्या.

सध्याचा पोषण आहार

बालवाडीमधील बालकांना पालिकेच्या वतीने शेंगदाणा लाडू, कडधान्याची उसळ, पुलाव, राजगीरा लाडू, मुरमुरे, पंढरपुरी डाळीचा लाडू पोषण आहार म्हणून दिला जातो. हा आहार देण्यासाठी प्रती विद्यार्थी दररोज सहा रुपये खर्च केला जातो. वर्षाला पोषण आहारासाठी सुमारे दोन कोटी रुपये खर्च केले जातात.

नवा पोषण आहार

खबरदारीचा उपाय म्हणून सर्व बालकांना तातडीने अतिरिक्त पोषण आहार पुरविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामध्ये उकडलेली अंडी, चिक्की, केळी, आवळापाक अशा गोष्टी दिल्या जाणार आहेत. प्रत्येक विद्यार्थ्यांवर केला जाणारा खर्च सहा रुपयांवरुन दहा रुपयांपर्यंत वाढविण्यात येणा आहे. त्यामुळे पालिकेला अतिरिक्त तीन कोटी रुपये खर्च करावे लागणार आहेत.

अहवालातील निरीक्षणे

८० टक्के विद्यार्थ्यांना जंताचे औषध देण्यात आले.

कानात मळ असलेली २,१७५ मुले

दातांची समस्या असलेली ५६९ मुले

मुलांमध्ये वैयक्तिक स्वच्छतेचा अभाव

एका विद्यार्थ्यावर दैनंदिन ६ रुपये खर्च

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘मार्ड’चे डॉक्टरही ‘ट्विटर’वर

0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

पुणे पोलिसांप्रमाणे आता राज्यातील चौदा सरकारी मेडिकल कॉलेजमधील निवासी वैद्यकीय अधिकारीदेखील (मार्ड) 'ट्विटर'वर येणाऱ्या पेशंटच्या वैद्यकीय समस्येचे तातडीने निवारण करणार आहेत. पेशंटांना तातडीने उपचार मिळवून देण्यासाठी 'मार्ड'ही आता 'ट्विटर'वर आले आहेत. या उपक्रमासाठी राज्यातील २५० डॉक्टर कार्यरत राहणार आहेत.

काही आठवड्यांपूर्वीच केंद्रीय रेल्वे मंत्र्यांना एका प्रवाशाने थेट 'ट्विटर'वरून मदतीसाठी साकडे घालून आपल्या तान्हुल्यासाठी दूध उपलब्ध करून देण्याची विनंती केली होती. त्यानंतर काही वेळातच सुरेश प्रभू यांनी रेल्वे कर्मचाऱ्यांमार्फत दूध उपलब्ध करून दिले होते. असाच प्रयोग राज्यातील 'मार्ड'च्या डॉक्टरांनी मकरसंक्रांतीच्या मुहूर्तावर सरकारी मेडिकल कॉलेजमध्ये पेशंटच्या सोयी सुविधांसाठी 'ट्विटर' अकाउंट सुरू केले. या संदर्भात 'मार्ड'चे राज्य शाखेचे अध्यक्ष डॉ. सागर मुंदडा यांनी 'मटा'ला माहिती दिली.

'ट्विटरसारख्या सोशल मीडियाच्या माध्यमातून विविध प्रश्न मांडण्याचा सध्या प्रयत्न केला जात आहे. मार्डच्या ट्विटर अकाउंटवर सरकारी मेडिकल कॉलेजमध्ये उपचार घेणाऱा कोणताही पेशंट टॅग करून आपली समस्या मांडू शकतो. पेशंटांना वेळेवर उपचार मिळत नाहीत, उपचारासाठी पैशांची मागणी केली जाते. सरकारी हॉस्पिटलमधील लालफितीचा कारभार, राजीव गांधी जीवनदायी योजनेंतर्गत पेशंटांना येणाऱ्या अडचणी, तसेच डॉक्टरांवर होणारे हल्ले, या बाबत ट्विटर अकाउंटवर ट्विट केल्यास तक्रारीची दखल घेतली जाईल,' अशी माहिती डॉ. मुंदडा यांनी दिली.
..

तक्रार येथे नोंदवा

पेशंटांच्या तक्रारी सोडविण्यासाठी प्रत्येक सरकारी मेडिकल कॉलेजच्या प्रत्येक विभागाचा एक असे २५० डॉक्टर या उपक्रमात सहभागी होणार आहेत. 'ट्विटर'वर तक्रार येताच संबंधित मेडिकल कॉलजेच्या प्रतिनिधीकडे तक्रार सोपविली जाईल. ३१ जानेवारीपर्यंत हा प्रयोग सुरू राहील. पेशंटांनी @mard2016 या अकाउंटवर तक्रार नोंदवावी, असे आवाहनही डॉ. मुंदडा यांनी केले.
..

सद्यस्थितीत डॉक्टर-पेशंटमध्ये संवाद कमी होत चालला आहे. ट्विटरच्या माध्यमातून हा संवाद कायम सुरू राहावा, या साठी प्रयत्न सुरु केला आहे. पेशंटांच्या तक्रारी मेडिकल कॉलेजच्या अधिकाऱ्यांच्या विरोधात असतील, तर वैद्यकीय शिक्षण संचालकांकडे तक्रार केली जाईल. तेथेही प्रश्न सुटला नाही तर वैद्यकीय शिक्षणमंत्र्यांकडे तक्रार पोहोचविण्याचा आमचा प्रयत्न राहील.

डॉ. सागर मुंदडा

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महिला ​चालकांसाठी नव्या रंगसंगतीची रिक्षा

0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

काळ्या-पिवळ्या रंगाची रिक्षा आणि खाकी कपडे परिधान केलेल्या चालकांबरोबरच वेगळ्या रंगाची रिक्षा अन् विविधरंगी साड्या नेसलेल्या महिला, असे चित्रही लवकरच पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरात पाहायला मिळणार आहे.

प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून सुरू असलेल्या नवीन परवाना वाटप प्रक्रियेत ५८ महिलांनीअर्ज केले असून, या महिला प्रवासी वाहतूक करताना दिसतील. तसेच, महिला अर्जदारांच्या रिक्षांचा रंगही बदलण्यात येणार आहे. परिवहन विभागाच्या निर्णयानुसार पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिका क्षेत्रासाठी ३,२०८ रिक्षा परवान्यांचे नव्याने वाटप केले जाणार आहे. त्यासाठी ऑनलाइन अर्ज स्वीकृती झाली असून, लॉटरी सोडतही काढण्यात आली. त्यामध्ये पात्र ठरलेल्या अर्जदारांची कागदपत्रे येत्या एक फेब्रुवारीपर्यंत स्वीकारण्यात येणार आहे. त्यानंतर कागदपत्रांची पडताळणी करून संबंधितांची मुलाखत होऊन त्यांना परवाना वाटप केला जाणार आहे, अशी माहिती प्रादेशिक परिवहन अधिकारी जितेंद्र पाटील यांनी दिली.

पुणे शहरासाठी १६, ९३५, तर पिंपरी-चिंचवडसाठी ३,६२० अर्ज प्राप्त झाले होते. त्यामध्ये ५८ महिलांचा समावेश आहे. नियमाप्रमाणे महिलांसाठी १६० जागा राखीव आहेत. त्यामुळे अर्ज केलेल्या महिलांची कागदपत्रे योग्य असल्यास त्यांना परवाना दिला जाईल, असेही पाटील यांनी सांगितले.

..

महिला वाहकांच्या रिक्षांची रंगसंगती बदलण्याबाबत परिवहन आयुक्तालयाकडून सूचना केल्या जातील. त्यांच्या आदेशाप्रमाणे रंगसंगती निश्चित केली जाणार आहे.

जितेंद्र पाटील

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मल्टिप्लेक्स चालकांवर महसूलमंत्र्यांचा वरदहस्त

0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

करमाफी असतानाही प्रेक्षकांकडून ६८.६५ कोटी रुपयांचा बेकायदा करमणूक कर वसूलणाऱ्या शहरातील सहा मल्टिप्लेक्स थिएटर्सवरील कारवाईला महसूल मंत्र्यांनी स्थगिती देऊन आता दीड वर्षांचा कालावधी उलटला आहे. यासंबंधी निर्णय घेण्याबाबत विभागीय आयुक्तांनी राज्य सरकारला स्मरणपत्र पाठविल्याचे विश्वसनीय सूत्रांकडून सांगण्यात आले.

मल्टिप्लेक्समध्ये सिनेमासाठी आकारण्यात येणाऱ्या तिकिटावर राज्य सरकारने करमाफी जाहीर केली होती. मात्र, या कालावधीत शहरातील सिटी प्राइड, ई-स्वेअर, आयनॉक्स, गोल्ड अॅडलॅब, मंगला आणि गोल्ड बिग सिनेमा या मल्टिप्लेक्सच्या मालकांनी प्रेक्षकांकडून हा कर वसूल केला.या पार्श्वभूमीवर मल्टिप्लेक्स मालकांनी बेकायदा करमणूक कर आकारल्याचा प्रकार 'मटा'ने सर्वप्रथम उघडकीस आणला.

हा प्रकार निदर्शनास आणल्यानंतर या मल्टिप्लेक्सनी नेमका किती करमणूक कर गोळा केला, याची माहिती घेण्यासाठी थिएटर्सचे दैनंदिन तिकीट विक्री अहवाल (डीसीआर) ताब्यात घेण्यात आले. या नोंदीच्या आधारे तत्कालीन करमणूक कर अधिकारी गीतांजली शिर्के यांनी मल्टिप्लेक्सना ६८.६५ कोटींच्या वसुलीच्या नोटिसा बजावल्या. या नोटिशीला मल्टिप्लेक्स मालकांनी अतिरिक्त जिल्हाधिकारी आणि विभागीय आयुक्तांपर्यंत आव्हान दिले. मात्र, या दोन्ही ठिकाणी मल्टिप्लेक्स मालकांचे अपील फेटाळण्यात आले. त्या विरोधात मल्टिप्लेक्स मालकांनी महसूल मंत्र्यांकडे धाव घेतली. त्यानंतर महसूल मंत्र्यांनी या वसुलीला स्थगिती गेली. ही स्थगिती देऊन जवळपास दीड वर्षे होत आले तरी, त्यावर कोणताही निर्णय झालेला नाही. त्यासंदर्भात विभागीय आयुक्तांनी राज्य सरकारला स्मरणपत्र पाठविले असल्याचे सांगण्यात आले. मुंबईतील काही मल्टिप्लेक्स थिएटर्सनेही करमाफी असतानाही प्रेक्षकांकडून करमणूक कर आकारला. त्यासंदर्भात हायकोर्टात दावे दाखल झाले होते. त्या दाव्यामध्ये हायकोर्टाने संबंधित मल्टिप्लेक्सकडून हा कर वसूल करून गोरगरीबांच्या योजनांसाठी खर्च करण्याचे आदेश दिले होते.

...

मल्टिप्लेक्सनी आकारलेला बेकायदा करमणूक कर

सिटी प्राइड २२.३४ कोटी रुपये

(कोथरूड व सातारा रस्ता)

ई-स्वेअर २१.९२ कोटी रुपये

आयनॉक्स ९.९४ कोटी रुपये

गोल्ड अॅडलॅब ७.३२ कोटी रुपये

मंगला ६.४६ कोटी रुपये

गोल्ड बिग सिनेमा ६४.७१ लाख रुपये

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘पिफ’चा सुरेल प्रारंभ

0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

'पुणे आणि संगीत हे समीकरणच आहे. पुण्याचा रसिक हा अस्सल आहे,' अशी भावना व्यक्त करून ज्येष्ठ संगीतकार उत्तमसिंग यांनी व्हायोलिनवादन आणि 'चिठ्ठी ना कोई संदेस'हे गाणे गाऊन पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचा सुरेल प्रारंभ केला.

राज्य सरकार आणि पुणे फिल्म फाउंडेशन यांच्यातर्फे आयोजित पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात उत्तमसिंग यांना 'सचिनदेव बर्मन इंटरनॅशन अवॉर्ड फॉर क्रिएटिव्ह म्युझिक अँड साउंड' हा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. ज्येष्ठ दिग्दर्शक श्याम बेनेगल यांना 'लाइफ टाइम अचिव्हमेंट अॅवॉर्ड फॉर आउटस्टँडिंग कॉन्ट्रिब्युशन टू इंडियन सिनेमा' या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. शिवाय ज्येष्ठ अभिनेते सौमित्र चॅटर्जी आणि ज्येष्ठ अॅनिमेटर राम मोहन मोहन यांनाही सन्मानित करण्यात आले.

महोत्सवाचे संचालक डॉ. जब्बार पटेल, ज्येष्ठ क्रिकेटपटू चंदू बोर्डे, ज्येष्ठ बॅडमिंटनपटू नंदू नाटेकर, परीक्षक मंडळाचे सदस्य गोविंद निहलानी, मलाया गोस्वामी, फाब्रिझियो फेरारी, पाब्लो सिसर, नेनाद ड्युकिक, नील्स मालम्रोस, डॅनियल राइस, रेझा डोर्माशिअन आदी या वेळी उपस्थित होते. सौमित्र चॅटर्जी आणि राम मोहन प्रकृती अस्वास्थ्यामुळे उपस्थित राहू शकले नाहीत. त्यांनी व्हिडिओद्वारे आपली भावना व्यक्त केली. 'पुण्याने अनेक कलावंत घडवले आहेत. या शहरात होणाऱ्या महोत्सवात पुरस्कार स्वीकारताना विशेष आनंद होतो,' असे चॅटर्जी यांनी सांगितले.

उत्तमसिंग यांनी संगीतकार सचिनदेव बर्मन यांच्या आठवणींना उजाळा देताना व्हायोलिनवादकांच्या ग्रुपमधून मुख्य व्हायोलिनवादक बर्मन यांनीच केल्याचे सांगितले. खांद्याला दुखापत झाल्यामुळे गेली तीन वर्षे व्हायोलिनवादनापासून ते दूर होते. त्यांनी केलेल्या वादनाला उपस्थितांनी भरभरून दाद दिली. 'धर्मग्रंथ वाचताना कधी कंटाळा येत नाही. कारण ते देवांनी, ऋषीमुनींनी तयार केलेले असतात. चित्रपटसंगीताच्या क्षेत्रात सचिनदेव बर्मन, मोहम्मद रफी, नौशाद, मदनमोहन हे ऋषीसमानच आहेत,' अशी भावना त्यांनी व्यक्त केली. 'गेल्या साठ वर्षांत अॅनिमेशनने खूप मोठी झेप घेतली आहे. अत्याधुनिक तंत्र विकसित झाले आहे. येत्या काळात पुणे अॅनिमेशन हब होणार आहे. अॅनिमेशनपटातूही खूप समृद्ध आशयाची मांडणी करता येते, 'अशी भावना राम मोहन यांनी व्यक्त केली.

..

जीवन गौरव पुरस्कार स्वीकारताना मनात वेगळेच विचार येतात. आता आपले काम करणे संपले की काय असे वाटू लागते. मात्र, माझ्याबाबतीत तसे काही होणार नाही. पुरस्कारामुळे आपल्या योगदानाची दखल घेतल्याचा आनंद वाटतो.

श्याम बेनेगल

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘पानिपत युद्धाकडे डोळसपणे बघावे’

0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

'युद्धासाठी सैन्य आणि सामग्रीबरोबरच जनतेचा भक्कम पाठिंबा असणे आवश्यक आहे. पानिपतचे युद्ध हे आजच्या तरुणांसाठी स्फूर्तिस्थान आहे. मात्र, या इतिहासाकडे केवळ अभिमानाने बघण्यापेक्षा डोळसपणे बघण्याची गरज आहे,' असे मत मत लेफ्टनंट जनरल अशोक जोशी (निवृत्त) यांनी गुरुवारी व्यक्त केले.

पानिपत स्मृती समितीतर्फे २५५व्या पानिपत स्मृती दिनानिमित्त लेखक डॉ. उदय कुलकर्णी यांना 'सदाशिवराव भाऊ पेशवे पानिपत स्मृती पुरस्कार' जोशी यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. यावेळी पेशव्यांचे वंशज उदयसिंह पेशवा, भारत इतिहास संशोधक मंडळाचे सचिव डॉ. श्री. मा. भावे, डॉ. सदाशिव शिवदे, डॉ. विजय बापये आणि पांडुरंग बलकवडे उपस्थित होते.

'विजयाला पर्याय नाही, हे कायम लक्षात ठेवावे. रक्षण म्हणजे ईश्‍वरभाव आहे. पानिपतच्या युद्धाकडे योग्य पद्धतीने बघितले पाहिजे. युद्धाचे स्मरण ठेवतानाच पराभवाची सलदेखील आपल्याला जाणवली पाहिजे. युद्धासाठी सैन्य आणि सामग्रीबरोबरच सैन्याला जनतेचा भक्कम पाठिंबा असणे आवश्यक आहे, हीच सामरिक संस्कृती आपल्या समाजात निर्माण होण्याची गरज आहे,' असेही जोशी म्हणाले. पानिपतच्या युद्धापूर्वीच्या पार्श्‍वभूमीपासून ते पानिपतच्या रणांगणातील महत्त्वाच्या घडामोडींचा ऐतिहासिक प्रवास डॉ. कुलकर्णी यांनी मनोगतातून उलगडला. डॉ.भावे यांनीही मनोगत व्यक्त केले. डॉ.शिवदे यांनी मानपत्र वाचन केले आणि बलकवडे यांनी प्रास्तविक केले.

..................

हिंदुस्तानवर सत्ता काबीज करणाऱ्या मराठ्यांनी दिल्लीचा बादशाह बदलण्याचे आणि ठरविण्याचे कामही केले. पानिपतच्या युद्धात आपण जिंकलो नाही. त्यानंतर मराठ्यांनीच अब्दालीला पुन्हा हरविले. माधवराव पेशव्यांच्या कारकिर्दीत दिल्लीचे तख्त मराठ्यांनी ताब्यात घेतले. पानिपतचे युद्ध राष्ट्राच्या संरक्षणासाठीचे होते. जे लोक इतिहास वाचत नाहीत, ते राष्ट्र घडवू शकत नाहीत.

डॉ. उदय कुलकर्णी, लेखक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शहर प​रिसरात तापमानात वाढ

0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

शहर आणि परिसरातील तापमानात काहीशी वाढ झाली आहे. पुढील दोन दिवस अशीच परिस्थिती राहण्याची शक्यता आहे. १६ तारखेनंतर उत्तरेकडील राज्यातील तापमानात घट होण्याची शक्यता आहे. त्यानंतर तेथून राज्याकडे वाहणाऱ्या थंड व कोरड्या वाऱ्यामुळे पुण्यासह राज्यात तापमानात घट होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

शहरात गुरुवारी ११.८ अंश सेल्सिअस इतके किमान तर, ३०.७ अंश सेल्सिअस इतके कमाल तापमान नोंदले गेले. राज्यातील सर्वात नीचांकी किमान तापमान जळगाव येथे (१०.२ अंश सेल्सिअस) नोंदले गेले. अहमदनगर येथे १०.६, नाशिक येथे १०.६, सांताक्रूझ येथे १८.४, औरंगाबाद येथे १४.६, नांदेड येथे १२ तर नागपूर येथे १२.६ अंश सेल्सिअस इतके किमान तापमान नोंदले गेले. पुढील दोन दिवसात राज्यात विदर्भ वगळता अन्यत्र तापमानात किंचित वाढ होण्याची शक्यता आहे. तर विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


हडपसर पालिकेला मुहूर्त कधी?

0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

राज्य सरकारने अंबरनाथ-बदलापूर आणि पनवेलसाठी नवी महापालिका स्थापन करण्याच्या निर्णयावर गुरुवारी शिक्कामोर्तब केले. तरी देखील पुण्यालगतच्या नव्या पालिकेचा निर्णय केव्हा होणार, अशी विचारणा हडपसर आणि परिसरातील नागरिकांकडून होत आहे. गेल्या दीड वर्षांहून अधिक काळ नव्या पालिकेबद्दल निव्वळ आश्वासने दिली जात असून, अंबरनाथ, पनवेलप्रमाणे मुख्यमंत्र्‍यांनी पुण्याच्या नव्या पालिकेचा निर्णय त्वरेने घ्यावा, अशी अपेक्षा आहे.

पुणे शहराची वाढती लोकसंख्या आणि नागरी सुविधा पुरविताना येणारा ताण लक्षात घेऊन पूर्व पुण्यासाठी स्वतंत्र महापालिका स्थापन करावी, अशी मागणी सातत्याने होत आहे. हडपसर आणि त्यालगतच्या परिसराचा त्यामध्ये समावेश केला जावा, असे सुचविण्यात आले आहे. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि शिवसेनेचे माजी आमदार महादेव बाबर यांनी त्यासाठी पाठपुरावा केला होता. राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना यांच्यासह भारतीय जनता पक्ष आणि काँग्रेसचे स्थानिक नेतृत्त्वही नव्या पालिकेसाठी अनुकूल आहे. तरीही, त्याबाबत निर्णय घेण्यात टाळाटाळ केली जात आहे.

पुणे महापालिकेच्या हद्दीत शहरालगतची आणखी ३४ गावे समाविष्ट करण्यासाठीची प्रक्रिया काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडी सरकारने सुरू केली होती. या गावांच्या समावेशानंतर पालिकेची हद्द बृहन्मुंबई महापालिकेपेक्षाही अधिक झाली असती. अशावेळी, नागरी सुविधा पुरविताना, पालिकेच्या सर्व यंत्रणेवरच ताण वाढण्याची भीती होती. म्हणूनच, नव्या पालिकेच्या दृष्टीने सर्वपक्षीय नेतेमंडळींनी पुढाकार घेतला होता. विधानसभेत त्याबद्दल प्रश्न उपस्थित केला गेला. त्यादृष्टीने, चाचपणी सुरू असल्याचेही सांगितले गेले. प्रत्यक्षात, आघाडी सरकारने निर्णय घेतलाच नाही.

भाजप-शिवसेनेच्या युती सरकारने गावांच्या समावेशाचा आणि नव्या पालिकेचा निर्णयही प्रलंबित ठेवला आहे. हडपसरचे आमदार योगेश टिळेकर यांनी नव्या पालिकेबाबत प्रश्न उपस्थित केला होता. छोट्या पालिकांच्या माध्यमातून नागरी सुविधांचे व्यवस्थापन अधिक नीटनेटके होऊ शकते, असे वारंवार सिद्ध झाले आहे. त्याचदृष्टीने, सरकारने अंबरनाथ आणि पनवेलसाठी नव्या पालिकांची निर्मिती करण्यास हिरवा कंदील दिला आहे. त्याच धर्तीवर, हडपसर आणि त्यालगतच्या गावांचा समावेश करून पुण्यासाठी नवी पालिका स्थापन करण्याचा निर्णय फडणवीस सरकारने लवकरात लवकर घ्यावा, असा आग्रह धरला जात आहे.

..................

तीन महिने विषय रखडला

पुण्यालगत स्वतंत्र महापालिका स्थापन करण्याबाबत नगरविकास विभागाने पुणे महापालिकेच्या सर्वसाधारण सभेचा अभिप्राय मागविला होता. राजकीय वादामुळे सर्वसाधारण सभेत त्याविषयी कोणताच निर्णय अद्याप घेण्यात आलेला नाही. सर्वसाधारण सभेपुढे तीन महिन्यांहून अधिक काळ हा विषय रखडला असल्याने नगरविकास विभागातर्फे आता त्याबाबत कोणती भूमिका घेतली जाणार, याविषयी औत्सुक्य आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

लष्करी सरावाची तयारी अंतिम टप्प्यात

0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

भारतीय लष्कराच्या इतिहासात पहिल्यांदाच १८ देशांचा सहभाग असलेल्या आणि पुण्यात होणाऱ्या संयुक्त लष्करी सरावाची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. या सरावात ४०० हून अधिक जवान-अधिकारी सहभागी होतील. या सरावामध्ये भुसुरूंग नष्ट करणे आणि शांतता मोहिमेदरम्यान करण्यात येणाऱ्या कारवायांचा सराव करण्यात येणार आहे, अशी माहिती लष्करातर्फे पत्रकार परिषदेत देण्यात आली.

लष्कराच्या आंतरराष्ट्रीय सहकार्य विभागाचे उपमहासंचालक मेजर जनरल अशोक नरूला यांनी ही माहिती दिली. या सरावाचे उद् घाटन लष्कराच्या दक्षिण क्षेत्राच्या प्रमुखांच्या हस्ते होईल. समारोपप्रसंगी लष्करप्रमुख आणि संरक्षणमंत्री उपस्थित राहतील. या सरावाच्या तयारीसंदर्भात गेल्या दोन वर्षांत दिल्ली, कंबोडिया, पुणे आणि ब्रुनेई येथे काही बैठका झाल्या. त्यानंतर १२ ते १४ जानेवारी दरम्यान पुण्यात या सरावासंदर्भातील अंतिम बैठक पार पडली. या बैठकीसाठी या सर्व १८ देशांच्या लष्कराचे ७५ हून अधिक वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

'अनेक आशियान देशांमध्ये अजूनही भुसुरूंग पेरलेले आहेत. त्याचा स्फोट होऊन अनेक निरपराध नागरिक मृत्युमुखी पडतात किंवा त्यांना अपंगत्व येते. त्यामुळे या भुसुरूंगांचा शोध घेण्याचे नवे तंत्रज्ञान, त्याचा योग्य वापर याबाबतचा सराव यात करण्यात येईल. संयुक्त राष्ट्रांतर्फे आयोजित शांतता मोहिमेत भारतीय लष्कर अनेकदा सहभागी झाले आहे. भारतीय लष्कराने जवळपास दोन लाखांहून अधिक सैन्य अशा मोहिमांसाठी पाठवले आहे. भारतीय लष्कराकडे शांतता मोहिमांचा मोठा अनुभव असून, या अनुभवाचा फायदा इतर देशांच्या लष्करांना करून देण्यात येईल,' असे नरूला यांनी सांगितले.

लष्करी अभियांत्रिकी महाविद्यालय सीएमई ही लष्करातील इंजिनीअरिंग कोअरची मुख्य प्रशिक्षण संस्था आहे. लष्करासाठी शत्रूने पेरलेल्या भुसुरूंगाचा शोध घेणे, ते नष्ट करण्याचे काम इंजिनीअरिंग कोअरचेच अधिकारी करतात. सीएमई व इंजिनीअरिंग कोअरमधील अधिकाऱ्यांच्या मार्फत हे प्रशिक्षण दिले जाईल, असेही या वेळी सांगण्यात आले.

..

असा असेल सराव

दोन ते आठ मार्च दरम्यान औंध येथील लष्करी परिसरात (औंध मिलिटरी स्टेशन) होणाऱ्या या सरावाला 'एक्सरसाइज फोर्स एटीन' हे सांकेतिक नाव देण्यात आले आहे. या सरावासाठी दोन गट तयार करण्यात आले आहेत. भारत आणि व्हिएतनामचे लष्करी पथक भुसुरूंगाबाबत सराव करणाऱ्या गटाचे नेतृत्व करेल, तर कंबोडिया आणि कोरियाचे पथक शांतता मोहिमेबाबत सराव करणाऱ्या गटाचे नेतृत्व करेल.

..

सहभागी देश

इंडोनेशिया, मलेशिया, फिलिपिन्स, सिंगापूर, थायलंड, ब्रुनेई, बर्मा, कंबोडिया, लाओस, व्हिएतनाम या आशियान देशांसह अमेरिका, जपान, चीन, रशिया, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड आणि दक्षिण कोरिया

..

पुण्याची निवड का?

पुणे आणि परिसरात असलेल्या अनेक लष्करी संस्था, सरावासाठी भरपूर व बंदिस्त मोकळी जागा, उत्तम पायाभूत सुविधा उपलब्ध आहेत. वर्षभर उत्तम हवामान असलेल्या पुण्यात मार्चमध्येही आल्हाददायक वातावरण असते. या गोष्टी लक्षात घेऊन सरावासाठी पुण्याची निवड करण्यात आल्याचे लष्करातर्फे स्पष्ट करण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

राष्ट्रीय सर्वेक्षण नाहीच

0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

'असर'च्या अहवालासाठी यंदा राष्ट्रीय पातळीवर सर्वेक्षण झाले नसल्याचे 'प्रथम'चे संस्थापक माधव चव्हाण यांनी गुरुवारी स्पष्ट केले. त्याचवेळी महाराष्ट्र आणि पंजाब या दोन राज्यांसाठी शैक्षणिक सर्वेक्षण झाले असून, त्या विषयीचे अहवाल संबंधित राज्य सरकारांना सुपूर्द केल्यानंतर ते सर्वांसाठी वेबसाइटवरून खुले केले जातील, असेही त्यांनी सांगितले.

'असर''च्या गेल्या दहा वर्षांच्या अहवालांवर आक्षेप घेऊन रणजितसिंह डिसले या प्राथमिक शिक्षकाने अहवालांमध्ये त्रुटी असल्याचे आरोप केले आहेत. त्या पाठोपाठ केंद्रीय मनुष्यबळविकास मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांकडून देशभरातील राज्यांमध्ये 'असर'च्या सर्वेक्षणांपेक्षा राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेमार्फत केल्या जाणाऱ्या 'एनएएस'च्या सर्वेक्षणांमधील निकालांकडे अधिक लक्ष देण्याच्या सूचना देण्यात आल्याची बाबही समोर आली. त्या पार्श्वभूमीवर 'असर'चा यंदाचा अहवाल आणि अहवालांवर घेण्यात येणाऱ्या आक्षेपांबाबत 'मटा'ने गुरुवारी चव्हाण यांच्याशी संवाद साधला. त्यावेळी चव्हाण यांनी वरील बाबी स्पष्ट केल्या.

चव्हाण म्हणाले, की 'मुळातच राज्याच्या वा केंद्राच्या शिक्षण खात्याने प्रथम वा असर काय सांगते, याकडे कधीही लक्ष दिलेले नाही. त्यामुळे तो प्रश्नच येत नाही. यंदा राष्ट्रीय पातळीवरील सर्वेक्षण झालेले नाही. मात्र महाराष्ट्र आणि पंजाबमध्ये झालेल्या सर्वेक्षणाची माहिती लवकरच प्रसिद्ध केली जाईल. या पुढे असे सर्वेक्षण करायचे नाही असे ठरविले असले, तरी लाखात एक अशी मोहीम उघडली जाणार आहे. त्या माध्यमातून देशात दीड लाख गावांमध्ये आणि वस्त्यांमध्ये तरुण-तरुणींनी आपापल्या गावांमध्ये चाचण्या केल्या आहेत. येत्या १७ जानेवारीपासून यापैकी २५ ते ३० हजार गावांमध्ये वाचन सप्ताह पाळला जाणार आहे. महाराष्ट्रात जवळपास साडेअकरा हजार गावांमध्ये ही मोहीम राबविली आहे. प्रत्येक जिल्ह्यात सरासरी साडेचारशे गावांमध्ये, आणि मोठ्या शहरांमध्ये चार हजार झोपडपट्ट्यांमधून ही मोहीम राबविली जाणार आहे,' असेही चव्हाण म्हणाले.

..

'आरोपांमध्ये नवे काही नाही'

डिसले यांनी केलेल्या आरोपांमध्ये नवे काहीच नसल्याचे चव्हाण यांनी स्पष्ट केले. 'डिसले यांच्या सर्व प्रश्नांची उत्तरे सर्वेक्षणाच्या अहवालात आहेत. त्यामुळे उगीचच शंका-कुशंका काढण्यात अर्थ नाही. 'ईजीआरए'चेच निकष आम्ही पाळतो, असे काहीही नाही. हे निकष शाळांमधील चाचण्यांसाठी आहेत. असरच्या चाचण्या घरांमध्ये करतो हा मूलभूत फरक आहे. आम्ही शाळांमध्ये मुलांची चाचणी करण्यासाठी जात नाही. सर्वेक्षण आणि निरीक्षण हे वेगळे. शाळांमधून आम्ही पायाभूत सुविधा पाहतो. गावांची निवड करताना लोकसंख्येच्या प्रमाणात निवड केली जाते. त्यानुसार चाचणी केली जाते. नॅशनल सॅम्पल सर्व्हेसाठी विचारात घेतल्या जाणाऱ्या सॅम्पल साइजच्या तिप्पट संख्या आम्ही विचारात घेतला जातो. त्यामुळे सॅम्पल साइज कमी आहे असे नाही. आमचे सगळेच बरोबर आहे, असा आमचा दावा नाही. मात्र, आमच्यावर टीका करणाऱ्यांनी, परिस्थितीचा विपर्यास करतो असे म्हणणाऱ्यांनी खरी परिस्थिती दाखवून द्यावी,'असेही ते म्हणाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पुणे: चोरीच्या संशयावरून पेटवलेल्या मुलाचा मृत्यू

0
0

मटा ऑनलाइन वृत्त । पुणे

गाडीची बॅटरी चोरत असल्याच्या संशयावरून अंगावर पेट्रोल ओतून जिवंत पेटवून देण्यात आलेल्या पुण्यातील अल्पवयीन मुलाचा अखेर मृत्यू झाला आहे. सावन राठोड असं त्याचं नाव असून त्याच्यावर ससून रुग्णालयात उपचार सुरू होते.

पुण्यातील कसबा पेठ परिसरात ही भयंकर घटना घडली होती. सावन हा एका गाडीच्या कडेला लघवी करत असताना काही लोकांनी त्याला हटकले. तो गाडीच्या बॅटरी चोरणारा असल्याचा संशय घेऊन त्याला बेदम मारहाण करण्यात आली. एवढ्यावरच न थांबता, काही नराधमांनी त्याच्या अंगावर पेट्रोल ओतून त्याला पेटवून दिलं. यात सावन ६५ टक्के भाजला होता. त्याच्यावर ससून रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र, उपचारादरम्यान आज त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणी फरासखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

सावन हा मूळचा सोलापूरचा असून अत्यंत गरीब कुटुंबातील असल्याची माहिती समोर आली आहे. त्याच्या मृत्यूला जबाबदार असलेल्या तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणी अधिक चौकशी सुरू आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ढिसाळ नियोजनामुळे ग्रंथदिंडीत वाहतुकीची कोंडी

0
0

म. टा. प्रतिनिधी, ज्ञानोबा-तुकाराम साहित्यनगरी (पिंपरी)

पिंपरी येथे ८९व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनास शुक्रवारी सुरुवात झाली. शुक्रवारी आयोजित ग्रंथदिंडीच्या ठिकाणी पुणे पोलिसांच्या वाहतूक विभागाच्या ढिसाळ नियोजनामुळे काही वाहने या दिंडीत घुसली. पुणे-मुंबई जुन्या महामार्गावरही अनेक ठिकाणी कोंडी झाली होती.

पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या मुख्य इमारतीमधून दिंडीला दुपारी सुरुवात झाली. त्यानंतर दिंडी महामार्गावर आली, तेव्हा वाहतूक सुरू होती. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पूर्णाकृती पुतळ्याला पुष्पहार अर्पण केल्यानंतर दिंडी पुढे मार्गस्थ झाली; पण तोपर्यंत पिंपरी चौकात वाहतूक पोलिसच उपलब्ध नव्हते.

आयुक्तालयात बसून केवळ चौकांमधील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे चित्रीकरण पाहून वाहतूक नियोजन करणाऱ्या अधिकाऱ्यांमुळे वाहनांचा नाहक त्रास सारस्वतांना सहन करावा लागला. दिंडी पिंपरी चौकातून काही अंतर पुढे जाताच वाहने सोडण्यात आली. त्यामुळे पिंपरी चौक आणि संमेलनस्थळी जाणाऱ्या रस्त्यावर वाहतूक कोंडी झाली.

दरम्यान, बॅरिकेड्स उशिरा टाकल्यामुळे पिंपरी चौकापासून काही किलोमीटर लांब असलेल्या आकुर्डी खंडोबामाळ चौकापर्यंत कोंडी झाली होती. पोलिस उपायुक्त डॉ. बसवराज तेली व सहायक आयुक्त मोहन विधाते यांनी केलेल्या नियोजनामुळे संमेलनस्थळी अथवा दिंडीच्या सुरुवातीला कोणतीही अडचण झाली नाही; पण वाहतूक विभागाचे नियोजन नसल्याने पोलिस ठाण्यातील कर्मचाऱ्यांना अनेक ठिकाणी वाहतूक सुरळीत करण्याची वेळ आली. पिंपरी-चिंचवड शहरातील वाहतुकीचा दररोजच बोजवारा उडालेला असतो. किमान साहित्य संमेलनासाठी तरी शहरातील वाहतूक नियोजन योग्य असायला हवे होते, अशी किमान अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त झाली.

अवैध वाहतुकीमुळे कोंडीत भर

शहरातील विविध चौकांमध्ये रिक्षांमधून अवैध प्रवासी वाहतूक सुरू असते. दररोजचा हा प्रकार शुक्रवारीदेखील सुरूच होता. या रिक्षांमुळे कोंडीत आणखी भर पडली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

घुमला मायबोलीचा गजर

0
0

ग्रंथदिंडीने झाली ८९व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाची नांदी

Suneet.Bhave@timesgroup.com

ज्ञानोबा-तुकोबा साहित्यनगरी, पिंपरी

वारकऱ्यांपासून आयटीतील कर्मचाऱ्यांपर्यंत आणि पारंपरिक वेशभूषेतील सहभागी महिलांपासून ते कॉलेजवयीन युवक-युवतींपर्यंत सर्वांच्या एकत्रित सहभागातून शुक्रवारी दुपारी मायबोलीचा गजर घुमला अन् साहित्य संमेलनाची ग्रंथदिंडी अपूर्व उत्साही वातावरणात संमेलनस्थळी दाखल झाली. पिंपरी-चिंचवडकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद आणि तरुणाईची लक्षणीय उपस्थिती, हे यंदाच्या ग्रंथदिंडीचे वैशिष्ट्य ठरले.

संमेलनाच्या ग्रंथदिंडीला दुपारी दोन वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकापासून सुरुवात होणार असली, तरी दुपारी १२ वाजल्यापासूनच आसपासच्या परिसरात गर्दी जमायला सुरुवात झाली होती. ग्रंथदिंडीत सहभागी होणाऱ्या विविध दिंड्या पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या आवारात जमल्या होत्या. याच ठिकाणी पिंपरी-चिंचवडच्या महापौर शकुंतला धराडे, पालिका आयुक्त राजीव जाधव, संमेलनाचे स्वागताध्यक्ष डॉ. पी. डी. पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत ग्रंथपूजन झाले. त्यानंतर डॉ. आंबेडकरांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला आणि ग्रंथदिंडीला सुरुवात झाली.

ढोल आणि तुतारीच्या निनादात दुपारी दोनच्या सुमारास ही दिंडी संमेलनस्थळाच्या दिशेने मार्गस्थ झाली. ज्ञानोबांची आळंदी आणि तुकोबांच्या देहूवरून आलेल्या वारकऱ्यांच्या दिंड्या आणि आषाढी वारीप्रमाणे ग्रंथदिंडीतही सादर केल्या जाणाऱ्या त्यांच्या पारंपरिक खेळांना उत्स्फूर्त दाद दिली जात होती. दिंडीतील अनेक लहानग्यांचा उत्साहामुळे दिंडीतील युवक-युवती आणि आसपासचे नागरिकही त्यांच्याबरोबर आनंदाने फेर धरत होते. वारकऱ्यांप्रमाणेच आयटी दिंडी, पर्यावरण दिंडी, मंगळागौरीचे खेळ करणाऱ्या महिला, पारंपरिक अब्दागिरी पथक, आणि वेशभूषेत सजलेल्या महिला आणि लहान मुले आणि चित्ररथावर विविध राष्ट्रपुरुषांच्या वेशात त्यांचे चरित्र सांगणारी लहान मुले, अशी विविध पथके ग्रंथदिंडीमध्ये सहभागी झाली होती. हा सर्व लवाजमा पुणे-मुंबई रस्त्यावर येताच, त्याला भव्य स्वरूप प्राप्त झाले. त्यामुळे, वाहतुकीची काही काळ कोंडी झाली; पण क्वचितच होणाऱ्या साहित्य उत्सवासाठी नागरिकांनी त्याबद्दल तक्रारही केली नाही.


संमेलनात आज (शनिवार - १६ जानेवारी २०१६)

सकाळी १० : उद्घाटनाचा मुख्य कार्यक्रम - हस्ते शरद पवार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अन्य मान्यवर

दुपारी २.३० : परिसंवाद - माध्यमातील स्त्री-प्रतिमा आणि भारतीय संस्कृती (उपमंडप)

दुपारी २.३० : अभिजात कथावाचन (आचार्य अत्रे नाट्यगृह)

सायंकाळी ४.३० : गीतकार गुलज़ार यांची मुलाखत (मुख्य मंडप)

सायं. ६ : संमेलनाध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांची मुलाखत (मुख्य मंडप)

सायं. ७.३० : निमंत्रितांचे कविसंमेलन (मुख्य मंडप)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

संमेलनासाठी मोफत बससेवा

0
0

म. टा. प्रतिनिधी, ज्ञानोबा-तुकाराम साहित्यनगरी, पिंपरी

मराठी भाषेचा उत्सव असलेल्या साहित्य संमेलनाचा आस्वाद घेता यावा, यासाठी पिंपरी येथे संमेलनस्थळापर्यंत मोफत बससेवेची व्यवस्था डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठाच्या वतीने करण्यात आली आहे.

या संमेलनासाठी साहित्य, समाजकारण आणि राजकारणातील अनेक दिग्गज, तसेच देशाच्या आणि राज्याच्या कानाकोपऱ्यांतून अनेक साहित्यिक व रसिक उपस्थित राहणार आहेत. १६ ते १८ जानेवारीच्या दरम्यान ही बससेवा सकाळी आठ वाजता ठेवण्यात आली असल्याचे संमेलनाचे स्वागताध्यक्ष डॉ. पी. डी. पाटील यांनी सांगितले. पिंपरीतील हिंदुस्थान अँटिबायोटिक कंपनीच्या मैदानावर भरवण्यात आलेल्या संमेलनस्थळी जाण्यासाठी पुढील ठिकाणांहून ही सेवा उपलब्ध करून देण्यात येत आहे.

पुण्यातील काँग्रेस भवन येथून एकंदर सहा बस सुटतील, तर पुढील ठिकाणांहून प्रत्येकी एक बस निघेल. त्यामध्ये तळेगाव (जुना मुंबई-पुणे महामार्ग येथून देहूरोड व निगडीमार्गे), देहू गाव (तळवडे व निगडीमार्गे), आळंदी (भोसरीमार्गे), मोशी (इंद्रायणीमार्गे), रावेत (डांगे चौक, काळेवाडी चौक, औंध, सांगवी, नाशिकफाटा मार्गे) आणि येरवडा (विश्रांतवाडी, दिघी, भोसरीमार्गे) या भागाचा समावेश आहे. या बसमध्ये स्वयंसेवक व बसची ओळख पटण्यासाठी प्रत्येक बसवर संमेलनाचा फलक बसवण्यात येणार आहे, असेही डॉ. पाटील यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


अनिल गोटेंनी दिले सबनीसांना आव्हान

0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

'अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांना मनोविकृतीमुळे धुळ्यातून पलायन करावे लागले होते. आदिवासी महिलेच्या मृत्यूला जबाबदार असल्याने त्यांची धुलाई झाली होती,' असे आरोप धुळ्याचे आमदार अनिल गोटे यांनी केले आहेत. 'हे आरोप कबूल करा,' असे आव्हान आमदार गोटे यांनी दिले आहे.
'सबनीस यांना धुळ्यातून काही तरुणांनी धमकीचा फोन केला असल्याचे समजले. सबनीस यांची विकृती आणि मनोविकृतीची पूर्ण माहिती असल्यानेच काही तरुणांनी हे धाडस केले असावे,' असे आमदार गोटे यांनी सांगितले.
'सबनीस हे धुळे येथे प्राचार्य असताना त्यांनी गुण उधळल्यामुळे त्यांना पलायन करावे लागले. सबनीसांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा एकेरी उल्लेख केला; मात्र माफी न मागता दिलगिरी व्यक्त केली आहे. तरीही पुण्यातील विद्वान त्यांच्या रक्षणासाठी पुढे आले आहेत,' असे आमदार गोटे म्हणाले.
'माझी तेलगीशी मैत्री होती, हे विधानसभेत आणि हायकोर्टातही निर्भीडपणे सांगितले. सबनीसांनी सत्याची थोडीशी चाड असेल, तर हे आरोप कबूल करावेत. अन्यथा माझ्यावर अब्रुनुकसानीचा खटला भरावा,' असे आव्हान आमदार गोटे यांनी दिले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

निवड सोपी, वाटचाल कठीण

0
0

sunil.landge@timesgroup.com

पिंपरी : केंद्र आणि राज्यापाठोपाठ पिंपरी-चिंचवड महापालिकेतही सत्ता हस्तगत करण्याचे ध्येय भारतीय जनता पक्षाने बाळगले आहे. त्यासाठी पक्षाने शहराध्यक्षपदाची धुरा आमदार लक्ष्मण जगताप यांच्या खांद्यावर दिली आहे. ते पक्षबांधणीसाठी सक्षम असल्यामुळे त्यांची पदावर अगदी सहज झाली. परंतु, एकेकाळच्या राजकीय गुरूला (माजी उपमुख्यमंत्री अजित पवार) आव्हान देण्याची शिष्याची वाटचाल खूप कठीण आहे, ही बाब अगदी स्पष्ट आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस ते भारतीय जनता पक्षाचे शहराध्यक्ष (व्हाया शेकाप) अशी जगताप यांची राजकीय पार्श्वभूमी आहे. ते भाजपचा शहराध्यक्षपदाचा एकमेव पर्याय आहेत, अशी चर्चा गेल्या काही दिवसांपासून होती. सुरुवातीला नको म्हणणाऱ्या जगताप यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री गिरीश बापट आणि प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांचे आदेश पाळणे भाग पडले. त्यामुळे निवडणूक निरीक्षक खासदार दिलीप गांधी यांनी जगताप यांचे नाव जाहीर केले. त्या वेळी महापालिकेच्या निवडणुकीसाठी इच्छुक असलेल्या कार्यकर्त्यांमध्ये 'अब आएगा मजा' अशी प्रतिक्रिया उमटली.

राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्षपद भूषविलेल्या जगताप यांच्या नेतृत्त्वगुणाची ओळख राजकीय कार्यकर्त्यांना माहीत आहे. नगरसेवक, स्थायी समितीचे अध्यक्ष, महापौर, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष, एकदा विधानपरिषद आणि दोनदा विधानसभा असा प्रदीर्घ राजकीय अनुभव असलेल्या जगताप यांच्यावर भाजपने पूर्ण विश्वास दाखविला आहे. त्याला तडा जाऊ देणार नाही, असे आश्वासन जगताप यांनी दिले आहे. शहराध्यक्षपदासाठी कागदावर अनेक नावे असली, तरी सक्षम शहराध्यक्ष म्हणून जगताप यांचेच एकमेव नाव होते. त्यानुसार त्यांची निवड अगदी सहजरित्या झाली. त्याला विरोध होण्याची कणभरही शक्यता उरली नाही. त्यामुळे पक्षामध्ये नवचैतन्य निर्माण झाल्याचे वातावरण आहे.

वास्तविक, महापालिकेच्या २०१२च्या निवडणुकीत भाजपला १२८ पैकी केवळ तीन जागांवर समाधान मानावे लागले आहे. त्यानंतर विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीत पक्षाच्या मतांमध्ये वाढ झाली, तरी यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी लाटेचा प्रभाव आहे. त्यामध्ये पक्षाच्या स्थानिक नेत्यांचा वाटा अल्पच राहिलेला आहे. महापालिका निवडणुकीला जेमतेम वर्षाचा कालावधी शिल्लक आहे. सध्या राष्ट्रवादी काँग्रेसची एकहाती सत्ता आहे. त्यांच्याकडे माजी उपमुख्यमंत्री अजित पवारांसारखे अनुभवी नेतृत्त्व आहे. या परिस्थितीत भाजप कितपत टक्कर देऊ शकेल? याविषयी तूर्तास तरी शंका आहे. परंतु, जगताप यांनी बेरजेचे राजकारण करून काही राजकीय खेळ्या केल्यास, मित्रपक्ष सोबत घेऊन योग्य मोट बांधल्यास आगामी निवडणुकीत चुरस निर्माण होऊ शकते. तशी मानसिकता ठेवायची किंवा नाही, हे जगतापांनीच ठरवायचे आहे.

'राष्ट्रवादी'च्या बालेकिल्ल्याला सुरूंग लावणे सोपे नाही. त्यासाठी विरोधी पक्षांना खूप तयारी करावी लागणार आहे. परंतु, भाजप-सेना-आरपीआय आणि प्रसंगी अन्य विरोधकांना एकत्र घेऊन संघटन केल्यास पवारांच्या पॉवरबाज साम्राज्याला धक्का देण्याची ताकद नक्कीच निर्माण होऊ शकते. अर्थात, या सर्व बाबी त्या-त्या पक्षांच्या श्रेष्ठींवरही अवलंबून आहेत. भाजपच्या किंवा शिवसेनेच्या इच्छेला त्यांच्या वरिष्ठांकडून कशी साथ मिळते, यावर पुढील राजकीय गणिते स्पष्ट होतील. केवळ पिंपरी-चिंचवडचा विचार करता प्रबळ राष्ट्रवादी काँग्रेसला धक्का द्यायचा असल्यास अन्य विरोधकांची एकजूट महत्त्वाची राहील, अशी आजची परिस्थिती आहे. त्यामुळे महापालिकेच्या निवडणुका नजरेसमोर ठेवून निवड केलेल्या जगताप यांची भविष्यातील वाटचाल खूप कठीण आहे, असेच म्हणता येईल.

पवारांविरोधात भूमिका घेऊन त्यांना आव्हान देणे तितके सोपे नाही ही बाब खरी असली, तरी ते अशक्यही नाही. ही बाब लक्षात घेऊनच भाजपला रणनीती आखावी लागणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सचिन करणार समुपदेशनाची ‘बॅटिंग’

0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

आधी मैदानावर आणि आता मैदानाबाहेर नवोदित खेळाडूंना क्रिकेटचे धडे देणारा मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर, यापुढे जेलमध्ये जाऊन कैद्यांना समुपदेशन करताना दिसणार आहे. जेलमधील कैद्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणून, त्यांनी पुन्हा वाममार्गाला न जाता सन्मानाने आयुष्य जगावे, यासाठी येरवडा तुरुंगात 'प्रेरणा पथ' हा उपक्रम राबविला जाणार आहे.

अपर पोलिस महासंचालक व कारागृह महानिरीक्षक कार्यालय व भोई प्रतिष्ठान यांच्यावतीने हा उपक्रम राबविण्यात येत आहे. या उपक्रमात सहभागी होण्याबाबत सचिनने सहमती दर्शविली असून, तो कोणत्या दिवशी येरवडा जेलमध्ये येणार आहे, त्याची तारीख येणे बाकी आहे. त्याबरोबरच शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे, ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. जयंत नारळीकर, डॉ. रघुनाश माशेलकर, भारताचे माजी कर्णधार चंदू बोर्डे, डॉ. विकास बाबा आमटे, अभिनेते नाना पाटेकर, अर्थतज्ज्ञ डॉ. नरेंद्र जाधव, ज्येष्ठ व्यंगचित्रकार मंगेश तेंडुलकर, ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले, उद्योजक डी. एस. कुलकर्णी, अभिनेत्री अलका कुबल, संगीतकार आंनदजी व प्यारेलाल यांच्यासह २७ व्यक्ती या उपक्रमात सहभागी होणार आहेत. त्याची सुरुवात २५ जानेवारीपासून होणार आहे, अशी माहिती अपर पोलिस महासंचालक व कारागृह महानिरीक्षक डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांनी पत्रकार परिषदेत दिली. करागृह उप महानिरीक्षक स्वाती साठे, येरवडा मध्यवर्ती कारागृहाचे अधिक्षक यु. टी. पवार, भोई प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. मिलिंद भोई, अॅड. प्रताप परदेशी, उदय जगताप व शिरीष मोहीते आदी या वेळी उपस्थित होते.

कैद्यांमध्ये सुधारणा होण्यासाठी त्यांचे मानसिक परिवर्तन झाले पाहिजे. पुराणात वाल्याचा वाल्मिकी झाला, तो परिवर्तनामुळेच झाला होता. या परिवर्तनासाठी समाजाच्या विविध क्षेत्रातील मान्यवर व्यक्तींची मदत घेतली जाणार आहे. त्या व्यक्ती कैद्यांशी संवाद साधणार असून त्यामुळे त्यांचे मन परिवर्तन होईल, अशी अपेक्षा डॉ. उपाध्याय यांनी व्यक्त केली. शिक्षा भोगून झाल्यानंतर कैद्यांचे योग्य पुनर्वसन न झाल्यास ते पुन्हा गुन्हेगारीकडे वळण्याची शक्यता असते. त्यामुळे त्यांचे पुढचे जीवन सुखकर व्हावे, समाजाने त्यांचा स्वीकार करावा, यासाठी हा उपक्रम फायदेशीर ठरेल, असे साठे यांनी सांगितले.

मानसोपचार तज्ज्ञांचे मार्गदर्शन

या प्रकल्पामध्ये मान्यवरांच्या समुपदेशनाबरोबरच मानसोपचार तज्ज्ञही कैद्यांना मार्गदर्शन करणार असून त्यांच्या मानसिकतेचे मूल्यमापनही करणार आहेत. मान्यवरांच्या समुपदेशानंतर कैद्यांना काय वाटले आणि भविष्यात कोणत्या मान्यवर व्यक्तींना आमंत्रित करायचे, यासाठी 'फीडबॅक फॉर्म' भरून घेतला जाणार आहे. त्याद्वारेही त्यांचे मूल्यमापन केले जाणार आहे, असे डॉ. मिलिंद भोई यांनी सांगितले.

या प्रकल्पाला कसा प्रतिसाद मिळतो, हे पाहून हा प्रकल्प इतर कारागृहात राबविण्यासाठी राज्य आणि केंद्र सरकारकडे प्रस्ताव पाठविला जाईल.

डॉ. भूषणकुमार उपाध्याय, अपर पोलिस महासंचालक व कारागृह महानिरीक्षक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चोरीच्या संशयावरून पेटविलेल्यातरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू

0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

कसबा पेठेत दुचाकीची बॅटरी चोरल्याच्या संशयावरून अंगावर पेट्रोल टाकून पेटवून दिलेल्या तरुणाचा शुक्रवारी पहाटे सहाच्या सुमारास ससून रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. या प्रकरणी अटक केलेल्यांवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कोर्टाने त्यांना २१ जानेवारीपर्यंत पोलिस कोठडी ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

सावन धर्मा राठोड (वय १७) असे या मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. या प्रकरणी इब्राहिम मेहबूब शेख (वय ३५, रा. ७२६, कसबा पेठ), जुबेर इक्बाल तांबोळी (वय २९), इमरान तांबोळी (वय ३०, दोघेही रा. फातिमानगर) यांना अटक करण्यात आली आहे. सावन हा मूळचा सोलापूर जिल्ह्यातील राहणारा असून तो कचरा वेचून उदरनिर्वाह करत होता. कसबा पेठेतील पवळे चौकात बुधवारी दुपारी तीनच्या सुमारास या तीन तरुणांनी त्याला अडवून चोरीच्या संशयावरून त्याला मारहाण केली. तेथील एका गल्लीत नेऊन त्याच्या अंगावर पेट्रोल टाकून त्याला पेटवून दिले होते. यामध्ये तो सुमारे ७० टक्के भाजला होता. पोलिसांनी त्याला ससून रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते. मात्र, उपचारादरम्यान त्याचा शुक्रवारी पहाटे मृत्यू झाला. या प्रकरणी अटक केलेल्या तरुणांवर खुनाचे कलम वाढविण्यात आले आहे. त्यांना कोर्टात हजर केले असता पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला.

सावन राठोड याच्या घरची परिस्थिती अतिशय हलाखीची आहे. त्याच्या आईचेही निधन झाले असून त्याचे वडील सोलापूर येथे वीटभट्टीवर मजुरी करतात. १५ दिवसांपूर्वी त्याचे वडिलांशी भांडण झाल्याने तो रागाच्या भरात पुण्यात निघून आला होता. टिळक चौकातील फुटपाथवर तो रहात होता. शहरात पडलेला काच, पत्रा गोळा करुन त्यावर तो पोट भरत होता. फुटपाथवर रहाणारे काही जण त्याच्या ओळखीचे झाले होते. फुटपाथवर सोबत राहणाऱ्या मित्रांनी त्याला जळालेल्या अवस्थेमध्ये पाहून पोलिस चौकीत आणले होते. सावन याचा मृतदेह त्याच्या वडिलांकडे सुपूर्त केला आहे, अशी माहिती पोलिस निरीक्षक (गुन्हे) ज्ञानेश्वर भोसले यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शहरहितासाठी पालिकेचेपादचारी, पार्किंग धोरण!

0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

नागरिकांना रस्त्यावरून सुरक्षितपणे चालता यावे यासाठी 'पादचारी धोरणाचा' आराखडा, तर खासगी वाहनांना आळा बसून शहरातील चौकाचौकात होणारी वाढती वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी सार्वजनिक वाहनतळ धोरणाचा (पार्किंग पॉलिसी) आराखडा महापालिकेने तयार केला आहे. शहराच्या हितासाठी तयार केलेले हे दोन्ही आराखडे नागरिकांसमोर ठेवून त्यावर नागरिकांकडून हरकती सूचना मागविण्यात येणार असल्याचे महापालिका आयुक्त कुणाल कुमार यांनी शुक्रवारी सांगितले.

पालिकेने तयार केलेल्या या आराखड्यावर नागरिकांनी नोंदविलेल्या हरकती सूचनांचा अभ्यास करून त्यानंतर हे दोन्ही धोरणांचे आराखडे सर्वसाधारण सभेसमोर मंजुरीसाठी ठेवण्यात येणार आहेत. गेल्या काही वर्षां‌‌त शहराचा विस्तार चारही दिशांना प्रचंड वेगाने होत असल्याने रस्ते कमी पडू लागले आहेत. वाढत्या शहरीकरणामुळे वाहनांच्या संख्येतही मोठी वाढ झाली असून एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाताना पादचाऱ्यांना असुरक्षित वाटत आहे. पादचाऱ्यांना सुरक्षितपणे चालता यावे; तसेच रस्ता ओलांडता यावा, यासाठी महापालिका प्रशासनाने पादचारी पॉलिसी तयार केली आहे. ही पॉलिसी अंतिम टप्प्यात आली आहे. पालिकेने तयार केलेली पॉलिसी नागरिकांना पाहण्यासाठी

www.punecorporation.org या वेबसाइटवर उपलब्ध करून देण्यात येणार आहे. या आराखड्यांचा संपूर्ण अभ्यास करून नागरिकांनी त्यावर आपल्या हरकती आणि सूचना पालिकेकडे नोंदवायच्या आहेत. सर्वसामान्य नागरिकांनी पादचारी धोरणाबाबत नोंदविलेल्या हरकती, सूचनांचा समावेश या आराखड्यात करून नवीन पादचारी धोरण तयार केले जाणार आहे. त्यानंतर पालिकेच्या सर्वसाधारण सभेत हे धोरण ठेवून त्याला सभागृहाची मान्यता घेतली जाईल, असे आयुक्त कुमार यांनी स्पष्ट केले. पालिकेच्या सर्वसाधारण सभेने मंजुरी दिल्यानंतर या धोरणाची अंमलबजावणी केली जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

असे आहे पादचारी धोरण...

सुरक्षितपणे रस्ता ओलांडण्यासाठी झेब्रा कॉसिंग तयार करणे

शहरातील काही रस्ते केवळ चालण्यासाठीच राखीव ठेवणे

पादचाऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी दिशादर्शक फलक, सूचनांचे फलक लावणे

आयआरसीच्या नियमानुसार फूटपाथ उभारणे

प्रत्येक रोडवर ठराविक उंचीचे फूटपाथ असावे.

लहान मुले, ज्येष्ठ नागरिक यांच्यासह विशेष व्यक्तींनाही फूटपाथचा वापर करता यावा, यासाठी रॅम्पची सुविधा उपलब्ध करुन देणे

फूटपाथची उंची १५० मिमी पेक्षा जास्त नसावी.

कमीत कमी वेळात नागरिकांना रस्ता ओलांडता येइल, असे क्रॉसिंग असावे

बसस्टॉप फूटपाथवर न करता फूटपाथ जवळ करावेत

अरुंद रस्त्यावर वाहने उभी करण्यास परवानगी दिली जाणार नाही.

फूटपाथ तसेच पादचारी क्रॉसिंग करण्याच्या ठिकाणी पुरेसा उजेड असावा.

फूटपाथची दररोज स्वच्छता झाली पाहिजे.

पादचाऱ्यांसाठी आवश्यक तेथे उड्डाणपूल, भुयारी मार्ग बांधावे

रहदारीच्या रस्त्यांवर वाहनांचा वेग कमी करण्यासाठी नियमाप्रमाणे स्पीडब्रेकर्स लावणे

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images