Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

पीएमपी सावरणार?

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

पुणे शहराचा वाढता विस्तार आणि उपलब्ध बससंख्येवर येणारा ताण लक्षात घेऊन पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपी) ताफ्यात नव्या बस उपलब्ध व्हाव्यात, या साठी राज्य सरकारही पावले उचलणार आहे. नव्या पाचशे बस खरेदीच्या पीएमपीच्या प्रस्तावाला वित्तीय संस्थांकडून अर्थसाह्य मिळवून देण्यासाठी सरकारतर्फे मदत केली जाण्याचे संकेत गुरुवारी देण्यात आले.

पीएमपीचे विविध प्रस्ताव राज्य सरकारकडे प्रलंबित असून, त्याबाबत माहिती घेण्यासाठी पालकमंत्री गिरीश बापट यांनी अधिकाऱ्यांसमवेत आढावा बैठक घेतली. या बैठकीला पीएमपीचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक अभिषेक कृष्णा यांच्यासह सर्व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. पीएमपीच्या ताफ्यात सध्या मालकीच्या आणि भाडेतत्त्वावरील अशा सुमारे दोन हजार बस आहेत. शहर आणि पिंपरी-चिंचवडच्या लोकसंख्येचा विचार करता, या बसची संख्या अपुरी असून नव्या बस खरेदीसाठी पीएमपीतर्फे प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी, वित्तीय संस्थांकडून हप्तेबंद पद्धतीने (डिफर्ड पेमेंट) बस खरेदी करण्याचा पीएमपीचा विचार आहे. त्यासाठी, वित्तीय संस्थांकडून आलेले व्याजदर अधिक असल्याने त्यामध्ये हस्तक्षेप करून पीएमपीला मदत करण्याची सरकारची भूमिका असेल अशी ग्वाही बापट यांनी दिल्याची माहिती कृष्णा यांनी दिली.

राज्य सरकारने जकात बंद केल्यापासून पुणे व पिंपरी-चिंचवडमधील जकातनाके ओस पडले आहेत. या जकातनाक्यांच्या जागा पीएमपीला बस स्थानके आणि आगारासाठी उपलब्ध व्हाव्यात, अशी मागणी दोन्ही महापालिकांकडे केली जात आहे. पुणे महापालिकेने पीएमपीला काही जकातनाक्यांच्या जागा उपलब्ध करून दिल्या असला, तरी पिंपरी-चिंचवड महापालिकेने अद्याप एकही जागा पीएमपीला दिलेली नाही. ही बाब पालकमंत्र्यांच्या निदर्शनास आणून देण्यात आली असून, त्याबाबतही पाठपुरावा करण्याचे आश्वासन त्यांनी दिल्याचे कृष्णा यांनी सांगितले.

पाचशे बसवर फुली?

केंद्र सरकारच्या जवाहरलाल नेहरू राष्ट्रीय नागरी पुनर्निर्माण योजनेंतर्गत (जेएनएनयूआरएम) पाचशे बस खरेदीचा प्रस्ताव पीएमपीने पाठविला होता. त्या अंतर्गत पुणे महापालिका ३५०, तर पिंपरी-चिंचवड महापालिका १५० बस खरेदी करणार होती. सुरुवातीला पीएमपीच्या अधिकाऱ्यांनी हा प्रस्ताव केंद्राकडे सादर करण्यास उशीर केला. तर गेल्यावर्षी केंद्रात झालेल्या सत्तांतरानंतर मोदी सरकारने तर 'जेएनएनयूआरएम'ची योजनाच गुंडाळली. योजनेंतर्गत काही योजनांना निधी देण्याचे सरकारने मान्य केले होते. त्यातून, पाचशे बस खरेदीसाठीही अनुदान मिळण्याची दाट शक्यता होती. परंतु, केंद्र सरकारकडून त्याबाबत कोणत्याच हालचाली दिसत नसून, या बस खरेदीच्या प्रस्तावावर आता पूर्णतः फुलीच मारली गेल्याचे स्पष्ट होत आहे.

...........

केंद्राच्या योजनेतून बस खरेदी शक्य नसल्याने हप्तेबंद पद्धतीने बस खरेदी करण्याचा प्रस्ताव पीएमपीने मांडला आहे. या प्रस्तावाला मान्यता मिळून, इतर सर्व प्रक्रिया पूर्ण होऊन प्रत्यक्षात बस पीएमपीच्या ताफ्यात दाखल होईपर्यंत किमान वर्षभराचा कालावधी लागण्याची शक्यता आहे. वाढत्या लोकसंख्येच्या तुलनेत आत्ताच पीएमपीच्या ताफ्यातील बससंख्या अपुरी आहे. लोंबकळत, धक्के खात लाखो पुणेकर आजही पीएमपीने प्रवास करत आहेतच; या पार्श्वभूमीवर त्यांच्या सहनशक्तीचा किती अंत पाहणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


साहित्य संमेलन १५ जानेवारीपासून

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

पिंपरी-चिंचवड येथे होणारे आगामी ८९ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन १५ ते १८ जानेवारीदरम्यान रंगणार आहे. संमेलनात साहित्य रसिकांना आठ परिसंवाद, निमंत्रितांची दोन कवी संमेलने, एक बहुभाषिक कवी संमेलन, तीन मुलाखती आणि तीन सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी मिळणार आहे.

अखिल भारतीय साहित्य महामंडळाच्या अध्यक्षा डॉ. माधवी वैद्य यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत संमेलनाच्या तारखा आणि संमेलनाची रूपरेषा जाहीर केली. डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठ सोसायटी या संमेलनाचे आयोजन करणार आहे. महामंडळाचे उपाध्यक्ष भालचंद्र शिंदे, कोषाध्यक्ष सुनील महाजन, सदस्या शुभदा फडणवीस, आयोजक संस्थेचे समन्वयक सचिन इटकर या वेळी उपस्थित होते.

घुमान येथे झालेल्या ८८व्या संमेलनाचे अध्यक्ष डॉ. सदानंद मोरे यांच्या हस्ते १५ जानेवारी रोजी ग्रंथदिंडीचे उद्घाटन होणार आहे. त्यानंतर ग्रंथ प्रदर्शनाचेही उद्घाटन केले जाणार आहे. संमेलनाच्या उद्घाटनाचा मुख्य कार्यक्रम १६ जानेवारीला होणार आहे.

नोंदणी एक डिसेंबरपासून

साहित्य संमेलनाच्या ग्रंथ प्रदर्शनातील स्टॉल व परगावच्या साहित्यरसिकांची नोंदणी एक डिसेंबरपासून सुरू होणार आहे. प्रतिनिधींसाठी बाराशे रुपये आणि दोन हजार रुपये असे शुल्काचे दोन पर्याय ठेवण्यात आले आहेत. नोंदणीसाठीचे अर्ज महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे, डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठ येथील संमेलनाचे संपर्क कार्यालय आणि विदर्भ साहित्य संघ येथे उपलब्ध करण्यात येणार आहेत. ३१ डिसेंबर ही नावनोंदणी करण्याची अंतिम मुदत आहे. ग्रंथ प्रदर्शनात पाचशे स्टॉल उपलब्ध करून दिले जाणार आहेत, अशी माहिती इटकर यांनी दिली.

परिसंवादांमध्ये असहिष्णुतेचा मुद्दा टाळला

असहिष्णुतेच्या मुद्द्यावरून देशभरात गदारोळ सुरू असताना ८९ व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनात या बाबत चर्चा करण्यासाठी अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळ 'असहिष्णू' असल्याचे स्पष्ट झाले आहे. संमेलनातील परिसंवादांमध्ये असहिष्णुता हा विषय टाळण्यात आला आहे. पिंपरी-चिंचवड येथे होत असलेल्या या साहित्य संमेलनाच्या कार्यक्रमाची प्राथमिक रुपरेषा गुरुवारी जाहीर करण्यात आली. सध्या देशात असहिष्णुता या विषयावरून रान पेटले आहे. त्या विरोधात मान्यवर साहित्यिकांनी पुरस्कारही परत केले. या पार्श्वभूमीवर, साहित्य संमेलनात त्याचे प्रतिबिंब उमटावे अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती. मराठी लेखक पुरस्कार परत करत असताना साहित्य महामंडळाच्या अध्यक्षा डॉ. माधवी वैद्य यांनी सद्यस्थितीचे प्रतिबिंब संमेलनात उमटेल, असे सांगितले होते. मात्र, संमेलनात समावेश असलेल्या आठ परिसंवादांमध्ये असहिष्णूता या विषयाचा विचार करण्यात आलेला नाही. परिसंवादांमध्ये 'वाङ्मय पुरस्कारांचे सांस्कृतिक व सामाजिक स्थान' असा एक विषय आहे. त्याला पुरस्कारवापसीची पार्श्वभूमी असल्याचे महामंडळाचे म्हणणे आहे. 'आम्ही जाणीवपूर्वक हा विषय निवडला आहे. त्यातील चर्चेत वक्ते त्यांना हवा त्या पद्धतीने विषयाची मांडणी करू शकतात,' असे स्पष्टीकरण दिले.

निवडणुका होणारच

'साहित्य महामंडळाच्या घटनेत बदल गरजेचा असला, तरी संमेलनाध्यक्षासाठी होणारी निवडणूक पद्धत ही सध्या तरी योग्य आहे. त्यामुळे यापुढे निवडणुका होणारच,' अशा शब्दांत 'कौल' देत साहित्य संमेलनाच्या तीन अध्यक्षांनी गुरुवारी 'संमेलनाध्यक्षाच्या निवडणुकीच्या' पारड्यात आपले एकमत टाकले. 'संवाद पुणे'तर्फे ८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात साहित्यिकांच्या एकमताचा योग जुळून आला. फ. मुं. शिंदे, डॉ. सदानंद मोरे व डॉ. श्रीपाल सबनीस हे तीन संमेलनाध्यक्ष, तर विजय कोलते, भारत देसडला व डॉ. पी. डी. पाटील या तीन स्वागताध्यक्षांची प्रकट मुलाखत या वेळी रंगली. 'संवाद'चे प्रमुख सुनील महाजन, निकीता मोघे याप्रसंगी उपस्थित होते. ज्येष्ठ नेते उल्हास पवार अध्यक्षस्थानी होते. सुधीर गाडगीळ यांनी अडचणीत टाकणाऱ्या प्रश्नांतून सहा जणांना बोलते केले. 'महामंडळाची घटना बदलणे गरजेचे असले, तरी तो बदल ठोस कारणातून व्हावा. निवडणूक पद्धत योग्यच आहे,' अशी भूमिका तीन संमेलनाध्यक्षांनी मांडली. साहित्यिकांनी उदारपणा दाखवला, तर निवडणूक होणार नाही, असे मत डॉ. मोरे यांनी व्यक्त केले, तर घरीही माघार, बाहेरही माघार घ्यायची असेल तर अ‍वघड आहे, असे आपल्या नर्मविनोदी शैलीत फिरकी घेत निवडणूक पद्धत राहणारच, असे शिंदे यांनी ठासून सांगितले. 'संमेलन उत्सवी व मार्गदर्शन करणारे असावे,' असे मत तीन स्वागताध्यक्षांनी व्यक्त केले. मनोरंजनाचे कार्यक्रम वाढत आहेत, पण संमेलन यशस्वी होण्याचा गर्दी हाच एकमेव निकष झाल्याने गर्दी जमविण्यासाठी मनोरंजनाचे कार्यक्रम घ्यावे लागतात, अशी कबुली त्यांनी दिली.

अध्यक्षांचा मान राखावा

संमेलनाध्यक्षांचा अपमान होऊ नये याची काळजी घ्यायला हवी. अध्यक्षाचा योग्य तो मान राखायला हवा. राजकीय नेत्यांनी व्यासपीठावर यावे; पण त्यांच्या कार्यकर्त्यांनी किती घुसखोरी करावी, याचे भान राखावे, असा चिमटा काढत उल्हास पवार यांनी राजकीय नेत्यांना घरचा आहेर दिला.

ग्रंथ प्रदर्शनातील स्टॉलभाडे एक हजार रुपयांनी वाढले

पिंपरी-चिंचवड येथे होत असलेल्या ८९व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनातील ग्रंथ प्रदर्शनातील स्टॉलचे भाडे एक हजार रुपयांनी वाढवण्यात आले आहे. भाडेवाढ आणि ग्रंथ प्रदर्शनाचे नियोजन करताना साहित्य महामंडळ व आयोजकांनी विश्वासात न घेतल्याने मराठी प्रकाशक परिषदेची नाराजी आहे.

घुमानच्या साहित्य संमेलनावेळी ग्रंथ प्रदर्शनावरून साहित्य महामंडळ व मराठी प्रकाशक परिषद यांच्यात वाद झाला होता. त्यानंतर प्रकाशक परिषद आणि साहित्य महामंडळामध्ये चर्चा झाली होती. ग्रंथ प्रदर्शनातील असुविधा दूर कराव्यात, प्रकाशक परिषदेच्या दोन सदस्यांना ग्रंथ प्रदर्शनाच्या नियोजन समितीत स्थान मिळावे आदी मागण्या साहित्य महामंडळाने मान्य करून त्याबाबतचे पत्रही दिले होते. मात्र, पिंपरी-चिंचवडच्या संमेलनातील ग्रंथ प्रदर्शनाच्या नियोजनात प्रकाशकांना स्थान देण्यात आले नाही; तसेच ग्रंथ प्रदर्शनातील स्टॉलचे भाडे चार हजारावरून पाच हजार करण्याचा निर्णय घेण्यात आला. ग्रंथ प्रदर्शनातील येणारे भाडे दुष्काळग्रस्तांना देण्याचे आयोजकांनी जाहीर केले आहे.

'भाढेवाढ करताना प्रकाशकांना विश्वासात घ्यायला हवे होते. ग्रंथ प्रदर्शनातील स्टॉल भाड्याचा निधी दुष्काळग्रस्तांना देण्याचा आयोजकांचा निर्णय स्वागतार्हच आहे. मात्र, साहित्य महामंडळ व आयोजकांनी प्रकाशकांशी संवाद साधणे आवश्यक होते,' असे कार्यवाह अनिल कुलकर्णी म्हणाले. 'भाडेवाढीबाबत आयोजकांनी चर्चा करण्याची तयारी दर्शवली आहे. त्यामुळे चर्चा करून याबाबत मार्ग निघेल अशी अपेक्षा आहे,' अशी भूमिका मराठी प्रकाशक परिषदेचे कार्याध्यक्ष अरुण जाखडे यांनी मांडली.

साहित्य संमेलनातील ग्रंथ प्रदर्शनाचे भाडे वाढवताना प्रकाशकांना काय सुविधा दिल्या जाणार आहेत हे त्यांना नक्की समजावून दिले जाईल; तसेच हे प्रदर्शन कसे वेगळ्या पद्धतीने करण्यात येणार आहे, याबाबत प्रकाशकांशी सविस्तर चर्चा करण्यात येईल. प्रकाशक नाराज राहणार नाहीत, याची खात्री आहे. - सचिन इटकर, समन्वयक, डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठ सोसायटी

लेखक ह. ना. आपटे यांनी लिहिलेल्या पहिल्या मराठी कथेच्या रौप्य महोत्सवी वर्षाची दखल या संमेलनात घेतली जाणार आहे. संमेलनातील कथाकथनाचा कार्यक्रम ह. ना. आपटे यांना समर्पित करण्यात येणार असून, कथेविषयीचा एक परिसंवादही होणार आहे. कथेच्या शतकोत्तर रौप्य महोत्सवाचा विसर पडल्याची बातमी 'मटा'ने सर्वप्रथम प्रसिद्ध केली होती; तसेच मान्यवर कथाकारांनीही साहित्य संमेलनात या औचित्याची दखल घेण्याची अपेक्षा व्यक्त केली होती.

कार्यक्रमांचे विषय

मराठी समीक्षा किती संपन्न, किती थिटी?

मराठी वाङ्मय पुरस्कारांचे सांस्कृतिक व सामाजिक स्थान

१९८०नंतरची कविता स्त्रीकेंद्रीत

मराठी भाषेत व्यवहार, व्यवहारात मराठी भाषा

अभिरुची संपन्न विनोद आणि आजचे साहित्य

माध्यमांतील स्त्री प्रतिभा व भारतीय संस्कृती

आजची तरुणाई काय वाचते, काय लिहिते?

श्रमिक महिलांच्या व्यथा आणि लेखकांच्या कथा

ह. ना. आपटे यांना समर्पित कथाकथन कार्यक्रम

ज्ञानपीठप्राप्त साहित्यिकांशी संवाद

उद्योग जगताचे चित्र आणि महाराष्ट्रातील उद्योजक

बालसाहित्य आणि बालरंगभूमी सकस आहे का?

अभिजात कथांचे वाचन

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

खरेदीची रक्कम देण्यास टाळाटाळ

$
0
0

मालकाला कोर्टाचा दणका; विक्री न करण्याचे आदेश

म. टा. प्रतिनिधी, पुणे

दुकान खरेदी करूनही खरेदीची रक्कम मालकाला देण्यास वारंवार टाळाटाळ करणाऱ्याला कोर्टाने दणका दिला आहे. किंमत न चुकवताच मिळकतीची पुन्हा विक्री करण्याचा घाट घातल्यावर मूळ मालकाने कोर्टात धाव घेतली. मूळ मालकाच्या मिळकतीची कोणत्याही प्रकारे विक्री करू नये, असा आदेश कोर्टाने दिला आहे. सहदिवाणी न्यायाधीश, वरिष्ठ स्तर एम. एम. राव यांच्या कोर्टाने आदेश दिला.

या प्रकरणी अमित काळोखे (नाव बदलले आहे) यांनी दिवाणी न्यायालयात दावा दाखल केला होता. हवेली कार्यक्षेत्रातील एका सहकारी गृहरचना संस्थेतील एकूण २८५ चौरस फुटांचे दुकान त्यांनी विकत घेतले होते. सदर मिळकतीची रीतसर नोंद करण्यात आलेली आहे. मिळकतपत्र, लाइट बिल, कर पावतीवर सरकार दप्तरी नोंद आहे. संबंधित अर्जदाराने ही मिळकत विक्रीला काढली होती. या दाव्यात प्रतिवादी असलेल्या दोघांना ११ लाख ५० हजार रुपयांमध्ये दुकान विकण्याचे ठरले. प्रतिवादी यांनी त्यांना पाच लाख ५० हजार रुपये आणि सहा लाख रुपये असे मिळून अकरा लाख ५० हजार रुपयांचे दोन चेक व्यवहारापोटी दिले. त्यांनी धनादेश दस्त नोंदविण्याच्या वेळी दाखविले. ते धनादेश निश्चित वटतील अशी हमी त्यांना देण्यात आली. मात्र, अर्जदाराला नमूद रक्कम आजपर्यंत मिळाली नाही.

त्यांनी संबंधितांकडे याबाबत विचारणा केली असता धनादेशाऐवजी रोख रक्कम देतो, असे सांगण्यात आले. त्यानंतर आपला व्यवसाय नीट चालत नाही. सदर व्यवसाय व्यवस्थित चालू झाल्यावर रक्कम देऊ, असे आश्वासन देण्यात आले. मात्र, पैशांची वारंवार मागणी केल्यानंतर प्रतिवादींनी आपला फ्लॅट तुझ्या नावावर करुन देतो असे सांगितले. मात्र त्यांना रक्कम दिली नाही. आपली फसवणूक केली जात असल्याचे अर्जदाराच्या लक्षात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महापालिका प्रशासनाचा धिक्कार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

पूर्वसूचना न देता अतिक्रमणाची कारवाई आणि कोर्टाने स्थगिती दिलेली असतानाही स्टॉलवर कारवाई करणाऱ्या महापालिका प्रशासनाचा शुक्रवारी धिक्कार करण्यात आला. गोखलेनगर जनवाडी सार्वजनिक गणेश मंडळ समितीने शुक्रवारी घोलेरोड क्षेत्रीय कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले. अतिक्रमण विभागप्रमुखांच्या मनमानी कारभाराचा निषेध करून महाआरतीही या वेळी करण्यात आली.

जनवाडी भागात अतिक्रमण कारवाई करताना कोणतीही पूर्वसूचना न देता महापालिका थेट कारवाई करत आहे. या भागातील मंदिरावर देखील अशाच पद्धतीने प्रशासनाने कारवाई केली आहे. रस्त्यावर बसून व्यवसाय करणाऱ्या पथारी व्यावसायिकांची नोंदणी पूर्ण करून महापालिका प्रशासन त्यांना परवाने तसेच बसण्यासाठी जागा देणार नाही, तोपर्यंत त्यांच्यावर कारवाई करु नये, असे आदेश कोर्टाने दिलेले आहेत. मात्र याकडे दुर्लक्ष करून पालिकेच्या अतिक्रमण विभागातील अधिकारी सर्वसामान्य विक्रेत्यांवर कारवाईचा बडगा उगारत असल्याची तक्रार केली जात आहे. घोलेरोड क्षेत्रीय कार्यालयाचे क्षेत्रीय अधिकारी माधव जगताप यांच्याकडेच अतिक्रमण विभागाच्या प्रमुखांचा अतिरिक्त कार्यभार आहे. त्यामुळे त्यांना काम करताना अडचणी येतात. एकाच वेळी दोन जबाबदाऱ्या सांभाळणे जगताप यांना शक्य होत नसल्याने महापालिका आयुक्त कुणाल कुमार यांनी तातडीने त्यांच्याकडे असलेला अतिरिक्त कार्यभार काढून घ्यावा, अशी मागणी रहिवाशी समितीतर्फे करण्यात आली. पालिका प्रशासनाने केलेल्या अतिक्रमण कारवाईच्या निषेधार्थ घोले रोड क्षेत्रीय कार्यालयावर धरणे आंदोलन करून महाआरती करण्यात आली.

पालिकेच्या अतिक्रमण कारवाईमध्ये या भागात असलेल्या झाडांचे मोठ्या प्रमाणात नुकसान करण्यात आल्याचा आरोप आंदोलकांनी केला. कोर्टाचा आदेश असतानाही त्याकडे दुर्लक्ष करत कोर्टाचा अवमान करणाऱ्या अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात यावे, अशी मागणी या वेळी करण्यात आली. स्था‌निक नागरिकांवर होत असलेल्या अन्यायाविरोधात राष्ट्रवादीचे नेते अजित पवार, महापौर दत्तात्रय धनकवडे उपायुक्त सुनील केसरी यांना देण्यात आले.

आयुक्तांशी चर्चा करणारः पवार

एकाच व्यक्तीकडे असलेल्या दोन जबाबदाऱ्यांबाबत पालिका आयुक्तांशी चर्चा केली जाइल, असे आश्वासन अजित पवार यांनी दिले. नगरसेवक बाळासाहेब बोडके, शारदा ओरसे, नीलीमा खाडे, माजी नगरसेवक निलेश निकम, विनोद ओरसे या वेळी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

प्रसूतिगृह बंद; महिलांची गैरसोय

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, हडपसर

मगरपट्टा येथील अण्णासाहेब मगर हॉस्पिटलमध्ये गरीब महिलांसाठी गेल्या ५० वर्षांपासून सुरू असलेले प्रसूतिगृह बंद असल्याने गरोदर महिलांची गैरसोय होत आहे. हॉस्पिटलमधील प्रसूतिगृह पुन्हा सुरू करण्याची मागणी करण्यात आली आहे.

हडपसर उपनगरात मध्यवर्ती ठिकाणी महापालिकेचे अण्णासाहेब मगर हॉस्पिटल आहे. प्रसूतिगृह या मुख्य आरोग्य सेवेने सुरू केलेल्या हॉस्पिटलमधील प्रसूतिगृह मागील दोन वर्षापासून बंद आहे. त्यामुळे गरोदर महिलांची गैरसोय होत आहे. येथे प्राथमिक आरोग्य तपासणी, लसीकरण, महिलांची तपासणी, लहान मुलांची तपासणी, रेबीजवर प्राथमिक उपचार करण्याची व्यवस्था केली जाते. पुणे शहरतील महापालिकेच्या पहिल्या चार दवाखान्यांमध्ये मगरपट्टा दवाखान्याचा क्रमांक लागतो. दिवसाला किमान ३०० पेशंट हॉस्पिटलमधील ओपीडीमध्ये येतात. हडपसर उपनगरातील मध्यवर्ती ठिकाणी हॉस्पिटल असल्याने गरीब नागरिकांना याचा फायदा मिळत आहे. मात्र, गेल्या काही वर्षांपासून बंद असलेले प्रसूतिग्रह मागील दोन वर्षापासून बंद झाल्याने गरोदर महिलांची गैरसोय होत आहे.

दीड वर्षांपूर्वी हॉस्पिटलचे नूतनीकरणाचे काम सुरू होते. त्यामुळे येथील प्रसूतिगृह बंद करण्यात आले होते. लवकरच पुन्हा प्रसूतिगृह पुन्हा चालू करण्यात येणार आहे.

- डॉ. सोमनाथ परदेशी, महापालिका आरोग्य प्रमुख

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

धरणग्रस्तांकडून कार्यालयाला टाळे

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, भोर

पाटबंधारे विभागाकडून धरणग्रस्तांच्या प्रलंबित मागण्यांची पूर्तता करण्यात येत नसल्यामुळे नीरा देवघर धरणग्रस्त पुर्नवसन विकास शेतकरी समितीच्या कार्यकर्त्यांनी शुक्रवारी सांगवी येथील कार्यालयास टाळे ठोकले. 'पाणी आमच्या हक्काचे, नाही कोणाच्या बापाचे. कोण म्हणत देणार नाही, घेतल्याशिवाय राहणार नाही,' अशा घोषणा देऊन कार्यकर्त्यांनी परिसर दणाणून सोडला.

समितीचे ६० ते ७० कार्यकर्ते निरादेवघर कार्यालयात जमा झाले. कार्यकारी अभियंता बी. आर. पवार आणी तेथील कर्मचाऱ्यांना कार्यालयाबाहेर बोलावून घेतले. त्यानंतर मुख्य प्रवेशद्वाराला कुलूप लावून पायरीवर ठिय्या आंदोलन केले. मागण्या मान्य झाल्याशिवाय धरणातील पाणी खाली सोडू देणार नाही व कालव्याचे कामही सुरू करू देणार नाही, अशी भूमिका धरणग्रस्तांनी घेतली आहे. तीन तासानंतर अधिकाऱ्यांनी विनंती केल्यामुळे कार्यालयाचे कुलूप काढण्यात आले. येत्या २ डिसेंबर रोजी जिल्हाधिकाऱ्यांसोबत धरणग्रस्तांची बैठक घेणार असल्याचे कार्यकारी अभियंता पवार यांनी सांगितले. या वेळी बाळासाहेब मालुसरे, नथू दिघे, धोंडिबा मालुसरे, चिमणराव शिरवले, संतोष शिंदे, बापू शिरवले व इतर कार्यकर्ते उपस्थित होते. या आंदोलनाची पोलिसांना कल्पना न दिल्यावरून समितीचे काही कार्यकर्ते व पोलिस निरीक्षक श्रीधर खोत यांच्यात जोरदार शाब्दिक चकमक झाली. त्यामुळे कार्यकर्ते अधिकच चिडले होते.

धरणग्र्रस्तांच्या मागण्या

सन २००० च्या अधिसूचनेप्रमाणे मृत वारसांच्या २९८ खातेदारांना फायदा मिळावा.

निगुडघर गाव पुनर्वसनासाठी पात्र धरावे.

ज्या धरणग्रस्तांची गोला पेमेंटप्रमाणे ६५ टक्के रक्कम कापून गेली नाही त्यांची रक्कम कापून घेण्यासाठी अधिसूचना काढावी.

प्रकल्पबाधित खातेदारांना धरणग्रस्त दाखले द्यावेत.

आराखड्याप्रमाणे नवीन पुनर्वसित गावठाणांत १४ नागरी सुविधा अपूर्ण आहेत, त्यांची पूर्तता करावी.

नीरा देवघरसाठी संपादित केलेल्या जमिनी धोम बलकवडी, उरमोडी धरणग्रस्तांना दिल्यामुळे झालेला अन्याय दूर व्हावा.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

येरवड्यात अतिक्रमण

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, येरवडा

येरवड्यातील शांतीरक्षक सोसायटीसमोरील मोकळ्या जागेत परिसरातील नागरिकांकडून अनधिकृत लोखंडी टपऱ्या उभारण्याचे काम जोरात सुरू आहे. रस्त्याच्या कडेला दुकानाचे लोखंडी सापळे रचून टपऱ्याचे अतिक्रमण होत असूनही पालिकेकडून याकडे दुर्लक्ष होत असल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे.

येरवड्यात अनेक ठिकाणच्या रस्त्यावर, चौकाचौकात अनधिकृत फ्लेक्स, हातगाड्या, टपऱ्या उभारून अतिक्रमणे मोठ्या प्रमाणवर होत आहेत. या अतिक्रमणाकडे सर्रासपणे डोळेझाक केली जात आहे. महाराष्ट्र हौसिंग बोर्डाजवळ असणाऱ्या शांतीरक्षक सोसायटीसमोरील एका सोसायटीच्या मोकळ्या जागेवर रस्त्याच्या कडेला अनेकांनी लोखंडी टपऱ्या उभारून अनधिकृत दुकाने थाटली आहेत. तर उर्वरित मोकळ्या जागेवर टपऱ्यांचे सांगाडे उभारण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे परिसरात अतिक्रमणांची संख्या वाढत आहे. परिणामी स्थानिक नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे.

रस्त्याच्या कडेला उभारण्यात येणारी बहुतांश दुकाने चायनीज खाद्यपदार्थांची आहेत. चायनीज पदार्थ खाण्याचे बहाणा करून रात्रीच्या वेळेस अनेक जण या भागात दारू पीत बसतात. त्यामुळे मोठ्या आवाजात बोलणे, शिवीगाळ करणे आणि प्रसंगी वादावादी होऊन भांडणाचे प्रकार येरवड्यात अनेक हॉटेलवर घडत आहेत. शांतीरक्षक सोसायटीसमोरील आजू बाजूच्या रस्त्यावर बहुतांश चायनीजच्या टपऱ्या अधिक आहेत. या टपऱ्यांवर रात्री उशीरापर्यंत अनेक उद्योग सुरू असतात. पोलिसांचेही याकडे दुर्लक्ष आहे. रस्त्यालगत मोठ्या प्रमाणावर अनधिकृत टपऱ्या उभारत असताना पालिकेकडून कोणतीही कारवाई होत नसल्याची तक्रार स्थानिक नागरिकांनी केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कंटेनर-दुचाकीचा अपघात; दोघांचा मृत्यू

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, लोणावळा

जुन्या पुणे-मुंबई राष्ट्रीय मार्गावर कंटेनर आणि मोटारसायकलच्या विचित्र अपघातात तिघांचा मृत्यू झाला असून, दोघे गंभीर जखमी झाले आहे. हा अपघात शुक्रवारी पहाटे पावणेचारच्या सुमारास कामशेत जवळील पाथरगावच्या हद्दीतील मावळमाची ढाब्याजवळ झाला. अपघातानंतर अपघातग्रस्त दुचाकी जळून खाक झाली.

अपघातात मोटार सायकलवरील गोपीनाथ महादू पवार (वय २२, रा. नायगाव, मावळ), भुऱ्या मुकणे (रा. कर्जत, रायगड) आणि ट्रकचा चालक उस्मान मगदूमसाहब मुजुमदार (वय २५, रा. कर्नाटक) यांचा मृत्यू झाला असून, जखमींमध्ये संजय बंडू वाघमारे (रा. खांडशी, मावळ) आ​णि राजनअप्पा नागेंद्रअप्पा शेरेकर (वय २५, रा. कर्नाटक) यांचा समावेश आहे.

कामशेत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गोपीनाथ पवार, भुऱ्या मुकणे आणि संजय वाघमारे त्यांच्या दुचाकीवरून नातेवाइकाच्या लग्नाला उपस्थित राहून घरी परतत होते. कामशेतजवळील पाथरगाव गावच्या हद्दीतील मावळमाची ढाब्याजवळ रस्ता ओलांडत असताना कर्नाटक येथून मुंबईला जाणाऱ्या कंटेनरने (केए २८ बी ६५६६) मोटारसायकलला धडक दिली. या धडकेत मोटारसायकल लांब फेकली गेली आणि कंटेनर मार्गालगत उलटला. यात दुचाकीवरील पवार आणि ट्रकच्या चालकाचाही जागीच तर, मुकणे यांचा उपचारारम्यान मृत्यू झाला. अपघातानंतर दुचाकी जळून खाक झाली. अपघात घडला त्या ठिकाणी मुंबईकडे जाताना चढानंतर लगेच उतार वळण असल्याने वाहनचालकांना लगेच अंदाज बांधता येत नाही.

कंटेनरचालकाने समोरून अचानक दुचाकी जात असल्याचे लक्षात येताच ब्रेक लावण्याचा प्रयत्न केला. मात्र, येथील उतार व वळणावर ब्रेक न लागल्याने अपघात झाल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. या घटनेचा पुढील तपास कामशेत पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरिक्षक एस. पी. गजभीव हे करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


वाहने तोडफोडीमुळे शहर हादरले

$
0
0

आनंदनगर, मोहननगर परिसरात दहशत

म. टा. प्रतिनिधी, पिंपरी

रस्त्यावर लावलेल्या वाहनांची तोडफोड करून दहशत निर्माण करण्याचे प्रकार पिंपरी-चिंचवडमध्ये पुन्हा सुरू झाले आहेत. गुरुवारी रात्री (२६ नोव्हेंबर) चिंचवड येथील आनंदनगर परिसरात तडीपार गुंडाने वाहनांची तोडफोड केली. मोहननगर येथे दोन दुचाकी जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला. एकाच रात्रीत दोन घटना घडल्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.

स्थानिकांनी आणि पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थानिक नेत्याचा नातेवाइक असणारा तडीपार गुंड अविनाश पवार याची दोन दिवसांपूर्वी घरगुती कारणावरून येथे भांडणे झाली होती. पवार याच्यावर हाणामारी-खुनाचा प्रयत्न आदी स्वरूपाचे आठ गुन्हा दाखल आहेत. पवार याने गुरुवारी रात्री दहाच्या सुमारास आनंदनगर झोपडपट्टीत साथीदारांच्या मदतीने धुडगूस घालण्यास सुरुवात केली.

काही वेळात टोळक्याने या ठिकाणी पाच दुचाकी व तीन चारचाकींचे नुकसान केले. तसेच, घरात घुसून टीव्ही आणि कपाटांची तोडफोड केली. या प्रकारानंतर सुरवातीला रहिवाशांमध्ये एकच गोंधळ उडाला. मात्र, त्यानंतर संतापलेल्या रहिवाशांनी थेट जुना पुणे-मुंबई महामार्ग रोखण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे पिंपरी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन रस्ता रहदारीसाठी मोकळा केला. तसेच, चिंचवड पोलिसांनी झोपडपट्टीत जाऊन परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला.

परिस्थितीचे गांभीर्य वेळीच ओळखून पोलिसांनी अतिरिक्त कुमक घटनास्थळी तैनात केली. सहायक पोलिस आयुक्त मोहन विधाते, पिंपरीचे वरिष्ठ निरीक्षक सैफन मुजावर, चिंचवडचे वरिष्ठ निरीक्षक चंद्रकांत सांगळे यांच्यासह पथकाने घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. दरम्यान, आनंदनगर येथे हा प्रकार झाल्यानंतर घटनास्थळी पोलिसांनी धाव घेतली. त्याच वेळेस मोहननगर येथे माजी नगरसेवक हिरामण पवार यांच्या घरासमोर उभ्या केलेल्या दोन दुचाकी अज्ञातांनी पेटवून दिल्या. शहरात काही दिवसांपूर्वी अशाच प्रकारचे गुन्हे वाढल्याने टोळक्यांवर वचक मिळविण्यासाठी पोलिसांनी मोक्का अंतर्गत अनेकांनी कारवाई केली. मात्र, शहरातील रस्त्यावरील गुन्हेगारी रोखण्यात पोलिसांना अद्याप यश आलेले नाही.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शटल गाड्यांची दरवाढ मागे घ्या

$
0
0

लोकलना वगळल्याने अन्याय होत असल्याचा प्रवाशांचा दावा

म. टा. प्रतिनिधी, पुणे

प्लॅटफॉर्म तिकिटाऐवजी लोकल किंवा शटल गाड्यांचे कमीत कमी रुपयांचे तिकीट काढणाऱ्यांना चाप लावण्यासाठी रेल्वेने पॅसेंजर, शटल गाड्यांचे तिकीट पाच रुपयांवरून १० रुपये केले. मात्र, लोकल गाड्यांना या दरवाढीतून वगळले आहे. त्यामुळे शटल गाड्यांच्या तिकीट दरवाढीचा हेतूच साध्य होत नाही. परिणामी, पॅसेंजर, शटल गाड्यांची केलेली दरवाढ अन्यायकारक असल्याचे प्रवाशांचे मत असून ती तातडीने मागे घ्यावी, अशी मागणी ते करीत आहेत.

रेल्वे स्टेशनमध्ये प्लॅटफॉर्म तिकीट किंवा रेल्वेगाडीचे तिकीटधारक असलेल्या व्यक्ती अधिकृतपणे प्रवेश करू शकतात. रेल्वेच्या प्लॅटफॉर्म तिकिटाची किंमत १० रुपये असून, एका तिकिटावर एक व्यक्ती दोन तास स्टेशनवर थांबू शकते. लोकल गाड्यांच्या तिकिटाची वैधता एक तासाची आहे. लोकल, पॅसेंजर व शटल गाड्यांचे कमीत कमी तिकीट पाच रुपये आहे. त्यामुळे अनेक व्यक्ती फ्लॅटफॉर्म तिकिट काढण्याऐवजी लोकल किंवा पॅसेंजरचे पाच रुपयांचे तिकीट काढून स्टेशनमध्ये प्रवेश करतात. या प्रकाराला आळा घालण्यासाठी रेल्वे प्रशासनाने लोकल, पॅसेंजर व शटल गाड्यांचे कमीत कमी तिकीट पाच रुपयांवरून १० रुपये करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, मूठभर लोकांसाठी लाखो प्रवाशांना तिकीट दरवाढीचा भुर्दंड सहन करायला लागणार असल्याचे वृत्त 'मटा'मध्ये प्रसिद्ध झाल्यानंतर त्याची दखल घेऊन रेल्वे प्रशासनाने या दरवाढीतून लोकलला वगळण्याचा निर्णय घेतला. आता सध्या पॅसेंजर व शटल गाड्यांना ही दरवाढ लागू झाली आहे.

पुण्यातून दौंड व बारामती या मार्गावर दिवसभरात तीन व पुणे-सातारा मार्गावर २२ पॅसेंजर व शटल गाड्या धावतात. दौंड, पाटस, केडगाव, यवत, लोणी, फुरसुंगी या ठिकाणांवरून नोकरीनिमित्त पुण्यात येणाऱ्यांची संख्या अधिक आहे. या सर्वांना रेल्वेने केलेल्या तिकीट दरवाढीचा फटका बसणार आहे. ही दरवाढ रेल्वे बोर्डाने सरसकट सर्व गाड्यांसाठी केलेली नाही; तर केवळ फ्लॅटफॉर्म तिकिटाचे पाच रुपये वाचविणाऱ्यांना आळा घालण्यासाठी करण्यात आलेली आहे. त्यामुळे शटल व पॅसेंजर गाड्यांच्या प्रवाशांमध्ये त्यांच्यावर अन्याय झाल्याची भावना आहे. लोकलचे तिकीटदर पूर्वीप्रमाणेच ठेवण्यात आलेले आहेत. रेल्वे प्रशासनाने ज्या उद्देशाने शटल-पॅसेंजर गाड्यांची तिकीट दरवाढ केली, तो उद्देशच साध्य होत नसल्याची टीका प्रवाशांनी केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सिंहगडची वाट बनली बिकट

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

वन डे पिकनिक स्पॉट म्हणून पुणेकरांसाठी जिव्हाळ्याचे ठिकाण असलेला सिंहगड सर करणे आता सोपे राहिलेले नाही. ठिकठिकाणी पडलेल्या दरडी आणि रस्त्यावरील खड्यांमुळे गडावर जाण्याची वाट खडतर झाली आहे. पर्यटकांकडून दर महिन्याला लाखांत प्रवेश शुल्क गोळा जमा होत असताना रस्त्यांवरील खड्डे दुरुस्त करण्यासाठी वन विभागाकडे निधी नाही.

शहरापासून जवळ अंतरावर असल्याने सुट्टीच्या दिवशी हजारांच्या संख्येने पर्यटक सिंहगडवर जातात. पर्यटकांच्या सोयीसाठी वन विभागाने दोन वर्षांपूर्वी घाटाचे काम करून संपूर्ण रस्ता चकाचक केला होता. दुतर्फा असलेली हिरवाई आणि डोंगर-दऱ्यांमधून गाडी चालविण्याचा आनंद लुटण्यासाठी हा नवा पर्याय मिळाला. पण शहरातील इतर रस्त्यांप्रमाणेच अवघ्या वर्षभरात या रस्त्याला नजर लागली. वन विभागाच्या सांगण्यांनुसार पावसामुळे या रस्त्याला ठिकठिकाणी खड्डे पडायला सुरुवात झाली. त्यातच वर्षभरापूर्वी दोन मोठ्या दरड या घाट रस्त्यात कोसळल्या. त्यानंतर रस्त्यांचे चित्रच बदलले आहे.

प्रवेश शुल्क भरल्यानंतर काही अंतर चकाचक रस्त्यावरून गाडी चालवताना पर्यटक सुखावतात आणि चढाबरोबरच वाट खडतर होते. सिंहगडावर पोहोचेपर्यंत अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात खड्ड्यांमुळे रस्त्याची चाळण झाली आहे. एका खड्ड्याला चुकवताना दुसरा खड्डा समोर... अशा परिस्थितीत पर्यटक कसरत करीत गाडी चालवत आहेत. दरड पडलेल्या वळणांवर दगड आणि मातीचे ढिगारे साठले असून मुरूम रस्त्यावर पसरला आहे. त्यामुळे वळणावर गाड्या घसरत आहेत. स्थानिक जीपचालकांनीदेखील ही बाब वनाधिकाऱ्यांच्या वारंवार निदर्शनास आणून दिली आहे. अनेक ठिकाणचे कठडेदेखील तुटलेले आहेत, तर काही ठिकाणी कठडे मोडकळीस आले आहेत. याबाबत वन संरक्षण समितीच्या प्रतिनिधींनी वारंवार पाठपुरावा करूनही वनाधिकारी दुर्लक्ष करीत आहेत. एकीकडे लाखो रुपयांचा निधी प्रवेश शुल्कातून वसूल होत असताना वन विभागाला रस्त्याची देखभाल देखील करता येत नाही का, असा सवाल पर्यटक उपस्थित करीत आहेत. काही दिवसांपूर्वीच पुण्याच्या जिल्ह्याधिकाऱ्यांनी देखील महिनाभरापूर्वी घाटरस्त्याची पाहणी केली होती. पण, पर्यटकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने ठोस निर्णय घेण्यात आलेले नाहीत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

डॉ. कंटक यांची चित्रे लिम्का बुकमध्ये

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

कराड येथील डॉ. राजेंद्र कंटक यांनी काढलेल्या शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या १०१ भावमुद्रांचा समावेश लिम्का बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये झाला आहे. शिवसेनेच्या सुवर्णमहोत्सवी वर्षात हे रेकॉर्ड झाले असून, त्याची नोंद पुढील वर्षी प्रकाशित होणाऱ्या पुस्तकात करण्यात येणार आहे.

शिवसेनाप्रमुखांना आदरांजली म्हणून डॉ. कंटक यांनी २५ नोव्हेंबर २०१२ ते १४ सप्टेंबर २०१३ या काळात शिवसेनाप्रमुखांच्या या भावमुद्रा रेखाटल्या आहेत. त्यात शिवसेनाप्रमुखांच्या विविध वयांतील मुद्रांचाही समावेश आहे. ही चित्रे पेन्सिलने रेखाटली आहेत. प्रत्येक चित्रावर संबंधित भावाचे वर्णन असून, प्रत्येक चित्राखाली शिवसेनाप्रमुखांचा एक विचारही उद्धृत करण्यात आला आहे. त्यामुळे ही चित्रे पाहताना त्यातील भाव जागृत झाल्याचा अनुभव येतो.

डॉ. कंटक व्यवसायाने बीएएमएस डॉक्टर आहेत. कराडमधील सोमवार पेठेत त्यांचा दवाखाना आहे. दवाखान्यातच फावल्या वेळात चित्रे काढण्याचा त्यांचा छंद आहे. या छंदातूनच त्यांनी गणपतीची विविध अक्षरांतील चित्रे काढण्याचा उपक्रम राबवला. शिवसेनाप्रमुखांविषयीच्या आदरापोटी डॉ. कंटक यांनी त्यांची अनेक चित्रे काढली. आतापर्यंत शिवसेनाप्रमुखांची ३०० चित्रे कंटक यांनी काढली असून, शिवसेनाप्रमुखांच्या वाढदिवशी त्यांचे प्रदर्शनही कराडला भरवले होते. त्यांच्या विविध चित्रांची प्रदर्शने आतापर्यंत मुंबई, पुण्यासह कोल्हापूर, कराड, ओगलेवाडी, सुपने आदी ठिकाणी भरविण्यात आली आहेत.

त्यांच्या नावावर पाच रेकॉर्ड

डॉ. कंटक यांच्या नावे पाच रेकॉर्डची नोंद आहे. त्यात एकाच नावातून १०८ प्रकारचे गणपती साकारणे, ८.८ गुणिले ९ मिलिमीटर आकाराचे सन २०१४चे कॅलेंडर तयार करणे, १.५ ग्रॅम वजन असलेली भगवद्गगीतेची प्रत तयार करणे आदींचा समावेश आहे. सर्वांत छोट्या कॅलेंडरची आणि भगवद््गीतेच्या प्रतीची नोंद इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड आणि असिस्ट वर्ल्ड रेकॉर्डमध्ये झाली आहे.

शिवसेनाप्रमुखांच्या नावाबरोबर माझे नाव रेकॉर्डमध्ये समाविष्ट झाल्याचा आनंद मोठा आहे. शिवसेनाप्रमुखांवरील श्रद्धेपोटी मी ही चित्रे रेखाटली आहेत. ते हयात असताना त्यांच्यापर्यंत ती पोहोचविण्याचे स्वप्न अधुरे राहिले. किमान उद्धव ठाकरेंनी तरी ही चित्रे पाहावीत, अशी माझी इच्छा आहे.

- डॉ. राजेंद्र कंटक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

संगीतवेड्या केशवलाल यांचा जीवनपट ‘हिट’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

हातात हार्मोनिअम आणि कंठातून सुरांची मुक्त उधळण करीत शहरातील गल्लीबोळात आपल्या पत्नीसमवेत फिरणारे संगीतवेडे केशवलाल यांना गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांनी हक्काचे घर मिळवून दिल्यानंतर त्यांच्यावर तयार करण्यात आलेला 'ए बोहिमिअन म्युझिशियन' हा लघुपट सध्या भारतभर गाजतो आहे. देशात पहिल्या तीन क्रमांकात हा लघुपट असून, विविध पुरस्कारही या लघुपटाला मिळाले आहेत.

मुंबई आणि चित्रपटाच्या झगमगाटाला केशवलाल यांनी राम राम ठोकला आणि ते पुण्यात आले. ना घर ना खायला अन्न अशी त्यांची अवस्था झाली. संगीतालाच आयुष्याचे सर्वस्व मानणाऱ्या या गायकाला गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांनी पुण्यात हक्काचे घर मिळवून दिले आणि हा त्यांचा संपूर्ण जीवनपट कॅमेराबद्ध झाला. केशवलाल यांच्या आयुष्यावर एफटीआयआयचा विद्यार्थी रोचक साहू याने लघुपटाची निर्मिती केली. हा लघुपटच सध्या देशभर चर्चेचा विषय ठरला आहे.

व्ही. शांताराम यांच्या नागिन या चित्रपटातील प्रसिद्ध धूनमधील हार्मोनिअमचे जादुई सूर केशवलाल यांचेच. महेंद्र कपूर यांच्या वाद्यवृंदामध्येही त्यांनी काम केले आहे. गेल्या ३० वर्षांपासून पुण्यातील रस्त्यांवर जुन्या हिंदी चित्रपटांमधील गीतांचे सादरीकरण करून ते लोकांचे मनोरंजन करीत आहेत. संगीतासाठी आयुष्य समर्पित करणाऱ्या या संगीतवेड्याची कहाणी रोचक याने कॅमेराबद्ध केल्यानंतर ही कहाणी खऱ्या अर्थाने जगासमोर आली.

या लघुपटाविषयी रोचक याने 'मटा'शी बोलताना सांगितले की, केशवलाल यांचे जीवन पाहिल्यावर त्यावर तसेच त्यांच्या कलेवर लघुपट करावा असे वाटले. एफटीआयआयमध्ये शिकत असल्यामुळे ही संधी मिळाली. परिस्थिती हालाखीची असतानाही केशवलाल व त्यांच्या पत्नीमधील प्रेमाचे जे नाते आहे, ते अधिक भावले. हे प्रेम मला जास्त संवेदनशील वाटल्याने, त्या पद्धतीने लघुपट तयार केला. हा लघुपट देशात सध्या गाजत असून विविध महोत्सवांमध्ये त्यास दहापेक्षा जास्त पारितोषिक मिळाले आहेत, तर वीसपेक्षा जास्त महोत्सवांमध्ये तो दाखविण्यात आला आहे. देशाबाहेरही लघुपटाला यश मिळाले आहे. विविध महोत्सवांमध्ये या लघुपटाने पहिल्या तीन क्रमांकामध्ये जागा पटकावली आहे.

'मन डोले मेरा तन डोले' या गाण्यातील धून मी वाजवली आहे. पुण्यात घर नव्हते. गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांमुळे हक्काचा निवारा मिळाला. लघुपटामुळे आमचे जीवन समोर आले. त्यानंतर बीबीसीनेही आमच्या जीवनावर माहितीपट तयार केला. संगीताबरोबर प्रवास सुरू आहे.

- केशवलाल

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सेन्सॉर बोर्डाने सहिष्णू व्हावे

$
0
0

जावेद अख्तर, राजकुमार हिरानी यांची अपेक्षा

म. टा. प्रतिनिधी, पुणे

'सेन्सॉर बोर्डाने चित्रपटांवर सेन्सॉरशिप लादता कामा नये. चित्रपटाबाबत रेटिंग असायला हरकत नाही. मात्र, चित्रपटातील भाग कापण्याचाच विचार करत राहणे योग्य नाही. चित्रपटांबाबत सेन्सॉर बोर्डाने सहिष्णू झाले पाहिजे,' अशी अपेक्षा ज्येष्ठ लेखक, गीतकार जावेद अख्तर आणि दिग्दर्शक राजकुमार हिरानी यांनी व्यक्त केली.

एका कार्यक्रमासाठी अख्तर व हिरानी शुक्रवारी पुण्यात आले होते. त्या वेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. भाजप सरकारने पुनर्रचित केलेले सेन्सॉर बोर्ड सातत्याने वादाच्या भोवऱ्यात सापडत आहे. अध्यक्ष पहलाज निहलानी यांनी चित्रपटात वापरू नयेत, अशा वीस शब्दांची यादी केली होती. त्यावरून वाद झाला होता. अलीकडेच स्पेक्टर या बाँडपटातील चुंबनदृश्याला वीस सेकंदाने कात्री लावल्यामुळेही वाद झाला होता. या पार्श्वभूमीवर, अख्तर आणि हिरानी यांनी त्यांची सेन्सॉर बोर्डाबाबत असलेली भूमिका मांडली.

'चित्रपटांबाबत सेन्सॉर बोर्डाकडे निश्चित असे धोरणच नाही. सेन्सॉर बोर्डाने केवळ मार्गदर्शक तत्त्वे पाळून काही होणार नाही. बोर्डात नेमलेले सदस्य कोण आहेत, हेही महत्त्वाचे आहे. या सदस्यांना कलेची जाण असली पाहिजे, ते संवेदनशील असायला हवेत. तसे झाल्यास वाद होण्याचे कारणच उद्भवणार नाही. महत्त्वाचे म्हणजे, चित्रपटांतून सामाजिक संदेश, संस्कार देण्याची अपेक्षा बोर्डाने ठेवू नये,' असे अख्तर म्हणाले. चित्रपटांना रेटिंग असायला हरकत नाही. मात्र, सेन्सॉरशिप लादली जाऊ नये, असे हिरानी यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

युद्धशास्त्रात पुण्याचे महत्त्व कायम

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

'मराठ्यांच्या युद्धशास्त्राच्या इतिहासामध्ये पुण्याला ऐतिहासिक महत्त्व आहे. पुण्यातच स्थापन झालेल्या राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या (एनडीए) माध्यमातून आधुनिक युद्धशास्त्राच्या इतिहासातही पुण्याचे हे स्थान कायम राहील,' असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी व्यक्त केला. 'एनडीए'मध्ये शिकून सैन्यात अधिकारी होणाऱ्या नव्या दमाच्या उमेदवारांनी या पुढील काळात मानवतेच्या रक्षणासाठीच्या युद्धामध्ये अशीच अढळ कामगिरी करण्याची अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

'एनडीए'चा १२९ वा पदवीदान समारंभ मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत शुक्रवारी झाला. 'एनडीए'च्या हबीबुल्लाह सभागृहामध्ये झालेल्या या कार्यक्रमात फडणवीस यांच्या उपस्थितीत ३३३ विद्यार्थ्यांना त्यांच्या पदव्यांनी सन्मानित करण्यात आले. तसेच जितेंदरकुमार शर्मा, राकेश कादयान आणि अभिषेक कुंडलिया या विद्यार्थ्यांना कमांडंट सिल्व्हर मेडल देऊन सन्मानित करण्यात आले. जितेंद्रकुमार याला सर्व विद्यार्थ्यांमधून प्रथम आल्याबद्दल विशेष सन्मानचिन्हाने गौरविण्यात आले. या वेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना फडणवीस यांनी एनडीए आणि तेथील विद्यार्थ्यांविषयी आपल्या भावना व्यक्त केल्या. मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेले संदीप उन्नीकृष्णन आणि सीमेवर नुकतेच शहीद झालेले संतोष महाडिक यांच्या विषयीही त्यांनी गौरवोद्गार काढले.

फडणवीस म्हणाले, 'सध्या जगात भारताकडे युवकांचा देश या नजरेने पाहिले जाते. देशातील युवा पिढी हिच देशाची एक शक्ती म्हणून विचारात घेतले जात आहे. असे असताना तरुण पिढीवरही तितकीच जबाबदारी आहे. एनडीएमध्ये दिल्या जाणाऱ्या शिक्षणाच्या माध्यमातून ही जबाबदारी पेलणारी नवी पिढी तयार केली जात आहे. असे शिक्षण देशातील सर्वच शैक्षणिक संस्थांमधून दिले गेल्यास, देशाची प्रगती निश्चितच होईल. तंत्रज्ञानाच्या विकासासोबतच युद्धाच्या पद्धतीही बदलत आहेत. तसेच, देशांतर्गत आणि अखिल मानवतेला आव्हान देणाऱ्या कारवायाही वाढू लागल्या आहेत. या परिस्थितीमध्ये देशाचे आणि मानवतेचे रक्षण करण्यासाठी नव्या पिढीला काम करावे लागणार आहे.'

जगाला शांतीचा संदेश देणाऱ्या भारताकडे इतर देशही मोठ्या अपेक्षेने पाहत आहेत. त्यामुळेच जगात शांतता प्रस्थापित करण्यासाठी देशालाही त्याच ताकदीने जगासमोर जावे लागणार आहे. अशा परिस्थितीमध्ये एनडीएमधून पुढे जाणाऱ्या अधिकाऱ्यांना महत्त्वाची भूमिका बजवावी लागणार असल्याचेही त्यांनी या निमित्ताने सांगितले.

'एनडीए'चे कमांडंट व्हॉइस अॅडमिरल जी. अशोककुमार यांनी स्वागत केले. प्राचार्य प्रोफेसर डॉ. ओमप्रकाश शुक्ला यांनी संस्थेच्या कामगिरीची माहिती दिली. पदवीदान समारंभानंतर मुख्यमंत्र्यांनी 'एनडीए'मधील स्मरण कुटीला भेट देऊन संस्थेमधून उत्तीर्ण होत सैन्यामध्ये भरती झालेल्या आणि नंतर युद्धात शहीद झालेल्या अधिकाऱ्यांच्या स्मृतींनाही मानवंदना दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


सोन्याची नाणी नेणारा ‘सीसीटीव्ही’त कैद

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

दिवाळीनिमित्त कंपनीतील कर्मचाऱ्यांना सोन्याची नाणी भेट द्यायची असल्याचे सांगून सराफ व्यावसायिकास ३२ लाख रुपयांचा गंडा घालणारी व्यक्ती सीसीटीव्हीत कैद झाली. त्यावरून पोलिसांनी आरोपीचा शोध सुरू केला असला, तरी पोलिसांच्या हाती काहीच धागेदोरे लागलेले नाहीत.

खराडी येथील रिगस ऑरगॉन टेक वर्ल्ड सेंटर युऑन आयटी पार्क येथे गुरुवारी ही घटना घडली होती. चंदननगर पोलिस आणि गुन्हे शाखेचे पोलिस आरोपीचा शोध घेत आहेत. याबाबत परमेश्वर मोहन खैरे (वय २४, रा. खराडी) यांनी तक्रार दिली आहे. आरोपीने गोवर्धनदास संतोष नावाने कोरेगाव पार्क परिसरात एका पंचतारांकित हॉटेलमध्ये खोली भाड्याने घेतली होती. त्यानंतर त्याने ऑनलाइन कार भाड्याने मागविली होती. त्याने चालकाला आपले नाव पियूष संतोष असल्याचे सांगून त्याने सराफ दुकानाबाबत विचारपूस केली. सराफाला आठ ते दहा ग्रॅम वजनाच्या सोन्याच्या नाण्यांची ऑर्डर देण्यात आली. त्यानंतर फिल्मीस्टाइल वापरून त्याने ३२ लाख रुपयांची नाणी घेऊन पोबारा केला. गुरुवारी रात्री उशिरा चंदननगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिस अधिक तपास करत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तरुणाच्या मृत्यूप्रकरणी पालकांना दहा लाख

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

तीन वर्षांपूर्वी स्वारगेट स्थानकातून बस चोरून ती बेदरकारपणे चालवून अनेकांचे जीव घेणाऱ्या संतोष माने प्रकरणात मृत्युमुखी पडलेल्या एका तरुणाच्या आई-वडिलांना दहा लाख १९ हजार रुपये घटनेपासून नऊ टक्के व्याजाने द्यावेत, असा आदेश मोटार अपघात न्यायप्राधिकरणाचे सदस्य ए. जी. बिलोलीकर यांनी दिला आहे.

रामललित रमाशंकर शुक्ला (वय २३) या तरुणाचा मृत्यू झाला होता. रामललित २५ जानेवारी २०१२ ला सकाळी नऊ वाजता पुणे स्टेशन येथून कोंढव्याकडे जात होता. त्या वेळी संतोष मानेच्या एसटीने त्याच्या दुचाकीला पाठीमागून धडक दिली. त्यात तो गंभीर जखमी झाला होता. त्याला तातडीने ससून रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता. रामललित याची आई उर्मिलादेवी (वय ३६), वडील रमाशंकर (वय ४०, रा. उत्तर प्रदेश) यांनी बारा लाख रुपये नुकसानभरपाई मिळावी, यासाठी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाविरोधात १६ एप्रिल २०१२ रोजी दावा दाखल केला होता.

रामललितचे मृत्यू वेळी वय २३ वर्षे होते. तो अॅल्युमिनियम खिडक्या, दरवाजाचे पार्टिशन्स बनवण्यात तरबेज होता. त्याला दरमहा तेरा हजार रुपये पगार होता. रामललित याच्या अकाली निधनाने कुटुंबीयांचे कधीही न भरून येणारे नुकसान झाले. या पार्श्वभूमीवर बारा लाख रुपये नुकसानभरपाई मिळावी, अशी मागणी पालकांनी केली होती. त्याला एसटी महामंडळाचे वकील अतुल गुंजाळ यांनी विरोध केला. रामललितला मृत्यूच्या वेळी तेरा हजार पगार नव्हता. तो दरमहा आठ हजार रुपये कमवत असल्याचे अॅड. गुंजाळ यांनी कोर्टाच्या निदर्शनास आणले. या सर्व गोष्टी गृहित धरून कोर्टाने रामललितच्या कुटुंबीयांना दहा लाख १९ हजार रुपये देण्याचा आदेश एसटी महामंडळाला दिला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पुणेकरांच्या खिशाला चाट?

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

पुणे मेट्रोचा खर्च आठ हजार कोटी रुपयांवरून थेट १२ हजार कोटी रुपयांपुढे पोहोचल्याने हा प्रकल्प पूर्ण होईपर्यंत मेट्रोतून प्रवास करताना, पुणेकरांच्या खिशालाही वाढीव भार सहन करावा लागणार आहे; तसेच आता पुणे मेट्रोला पुढील सहा महिन्यांत अंतिम मंजुरी मिळाली नाही, तर खर्चाचे आकडे आणखी वाढण्याची भीती आहे.

मेट्रो भुयारी हवी की एलिव्हेटेड यावर अनेक वर्षे केवळ चर्चा करत राहिल्याने मेट्रोचा खर्च किमान दीडपटीने वाढला आहे. खर्चाचा वाढता भार पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिकेला सहन करावा लागणार आहेच; पण त्याचा बोजा नागरिकांवरही पडण्याची शक्यता आहे. प्राथमिक नियोजनानुसार मेट्रो २०१८-१९ पर्यंत कार्यान्वित झाल्यास किमान तिकीट १३ रुपये असेल, असे गृहित धरण्यात आले होते. आता महिन्याभरात २०१६ हे वर्ष सुरू होणार असून, एलिव्हेटेड मार्ग सुरू होण्यास किमान चार वर्षांचा अवधी लागण्याची शक्यता असते, तर भुयारी मार्गांसाठी पाच वर्षांहून अधिक काळ लागू शकतो. म्हणजेच शहरातील मेट्रो मार्ग पूर्णतः कार्यान्वित होण्यासाठी २०२०-२१ उजाडण्याची शक्यता आहे. त्यामुळे किमान तिकीट दरांमध्येही वाढ होण्याची शक्यता असून, ते २० रुपयांच्या जवळपास पोहोचतील अशी चिन्हे आहेत.

शहरातील पिंपरी-चिंचवड ते स्वारगेट आणि वनाज ते रामवाडी या दोन मेट्रो मार्गांसाठी दिल्ली मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनने (डीएमआरसी) सर्वप्रथम सादर केलेल्या प्रकल्प अहवालात सात हजार ९६० कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित धरण्यात आला होता. डीएमआरसीने हा अहवाल २००९ मध्ये पालिकेला सादर केला होता. त्यानंतर महापालिका, राज्य सरकार आणि केंद्र सरकार अशा विविध टप्प्यांवर मंजुरीचे सोपस्कार पूर्ण करताना, पुणे मेट्रो प्रकल्पात अनेक अडथळे निर्माण झाले. त्यामुळे मेट्रोचा खर्च वाढून १० हजार १८३ कोटी रुपयांवर पोहोचला होता. केंद्रातील तत्कालीन आघाडी सरकारने मेट्रोला तत्त्वतः मान्यता दिली होती. त्यानंतर मोदी सरकारही मेट्रोला मंजुरी देईल, अशी शक्यता वर्तविली जात होती. मात्र, शहराचे खासदार अनिल शिरोळे आणि काही स्वयंसेवी संस्थांनी वनाज ते रामवाडी मार्ग भुयारीच करा, अशी आग्रही मागणी सातत्याने लावून धरल्याने नागपूरच्या मेट्रोचे भूमिपूजन झाले; पण पुणे मेट्रो रखडली. मेट्रोबाबत सातत्याने निर्माण होणाऱ्या वादावर पडदा टाकण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पालकमंत्री गिरीश बापट यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली. या समितीने सविस्तर अहवाल सादर केल्यानंतरही मेट्रोबाबत अंतिम निर्णय घेण्यात चालढकल केली जात होती. अखेर केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी गेल्या सप्टेंबरमध्ये नवी दिल्लीत घेतलेल्या बैठकीत बापट समितीच्या शिफारसींनुसार मेट्रो मार्गात बदल करण्यास मान्यता दिली. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनीही नायडू यांची भेट घेत, मेट्रोला चालना देण्याची मागणी केली. आता या सुधारित अहवालावर केंद्र सरकार त्वरेने निर्णय घेणार का, यावर मेट्रोचे पुढील भवितव्य अवलंबून असेल.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

झाकीर हुसेन करणार नाट्यसंगीताला साथ

$
0
0

पुणे : 'सा' व 'नी' सूरसंगीत संस्थेतर्फे सहा डिसेंबर रोजी आयोजित मैफलीतून पुणेकरांना अनोखा अनुभव मिळणार आहे. या मैफलीत उस्ताद झाकीर हुसेन एकल तबला वादनासह प्रथमच नाट्यसंगीतालाही संगत करणार आहेत. गणेश कला क्रीडा मंच येथे सायंकाळी सहा वाजता ही मैफल होणार आहे.

संस्थेचे सुरेंद्र मोहिते यांनी ही माहिती दिली. या मैफलीत गायक राहुल देशपांडे, शौनक अभिषेकी, मंजूषा पाटील गाणार आहेत. साबीर खान सारंगी आणि राहुल गोळे ऑर्गनची साथ करणार आहेत. कार्यक्रमाच्या उत्पन्नातील काही रक्कम डॉ. अपर्णा देशमुख यांच्या 'आभाळमाया' या वृद्धाश्रमाला दिली जाणार आहे.

'नाट्यसंगीताला तबलासाथ करण्याची इच्छा उस्तादजींनी प्रकट केली होती. त्यामुळे या खास मैफलीचे आयोजन करण्यात आले आहे. सुमारे पन्नास वर्षांपूर्वी उस्तादजींनी नाट्य संगीताला तबलासाथ केली होती. त्या आठवणींना उजाळा या मैफलीद्वारे मिळणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विश्वकोश ‘युजर फ्रेंडली’

$
0
0

नव्या रूपातील वेबसाइट महिन्याभरात दाखल होणार

Chinmay.patankar@timesgroup.com

पुणेः 'अ'पासून 'ज्ञ'पर्यंत सर्व माहिती एकत्रित करणाऱ्या मराठी विश्वकोशाची वेबसाइट आता इंटरअॅक्टिव्ह होणार आहे. विश्वकोशाच्या वीस खंडांसाठी सर्च इंजिन, विषयानुरूप शोध आणि सूची पद्धत या तिन्ही पद्धतींचा वापर वेबसाइटवर करता येणार असून, अद्ययावतीकरणामुळे विश्वकोश युजर फ्रेंडली होणार आहे.

राज्य सरकारच्या विश्वकोश निर्मिती मंडळाने तयार केलेल्या विश्वकोशाचे वीस खंड ऑनलाइन उपलब्ध करण्यात आले आहेत. मात्र, या कोशातील माहिती शोधणे हे कठीण काम आहे. हव्या असलेल्या माहितीचा खंड, त्याचे अक्षर अशा पद्धतीने माहिती शोधावी लागत असल्याने बराच वेळ जातो. ही उणीव दूर करून सोप्या पद्धतीने विश्वकोशातील माहिती सर्वसामान्यांना उपलब्ध करून देण्यासाठी विश्वकोश निर्मिती मंडळाने वेबसाइट अद्ययावत करण्याचा निर्णय घेतला.

सी-डॅकच्या माध्यमातून गेल्या दोन महिन्यांपासून वेबसाइटच्या अद्ययावतीकरणाचे काम सुरू आहे. त्यासाठीचे सिक्युटिरी ऑडिटही करण्यात आले. वेबसाइट अद्ययावत करताना आधीची कोणतीही माहिती बदलली जाणार नाही.

येत्या महिन्याभरात नव्या स्वरुपात विश्वकोश उपलब्ध होईल, असे मंडळाचे सदस्य आणि विषयतज्ज्ञ अजिंक्य कुलकर्णी यांनी 'मटा'ला दिली. वेबसाइट अद्ययावत करताना त्यात तीन पद्धती वापरल्या जाणार आहेत. पारंपरिक सूची पद्धत कायम ठेवण्यात येईल. त्यानंतर एखादे अक्षर किंवा शब्द टाइप करून सर्च इंजिनाच्या माध्यमातून माहिती उपलब्ध होईल. अद्ययावतीकरणातील ही सर्वांत उपयुक्त पद्धत ठरणार आहे. सध्याच्या गुगल सर्च इंजिनप्रमाणेच विश्वकोशापुरते हे खास सर्च इंजिन असेल. त्यानंतर विषयानुरुपही माहिती शोधता येईल, असेही त्यांनी सांगितले.

वेग वाढणार

विश्वकोशाची वेबसाइट सध्या मंदगतीचे चालत आहे. स्टेट डेटा सेंटरवर या वेबसाइटसाठी जागा उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली आहे. या सेंटरवर जागा मिळाल्यास या वेबसाइटचा वेगही वाढू शकणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images