Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

आईनेच रचला अपहरणाचा बनाव

$
0
0

दोन लाखांसाठी दिले मावशीच्या ताब्यात

म. टा. प्रतिनिधी, पुणे

कोथरूड परिसरातून दोन महिन्यांच्या बाळाच्या अपहरणाचा गुन्हा अवघ्या काही तासांतच उघडकीस आणण्यात गुन्हे शाखेच्या पोलिसांना यश आले आहे. बाळाची आई आणि मावशी यांनी अपहरणाचा बनाव रचल्याचे समोर आले आहे. दोन लाख रुपयांसाठी आईनेच स्वतःचे बाळ बहिणीकडे औरंगाबादला सुपूर्द केले होते. खंडणी विरोधी पथकाने कौशल्यपूर्वक तपास करून गुन्हा उघडकीस आणला आहे. या प्रकरणी बाळाची आई आणि मावशीला ताब्यात घेण्यात आले आहे.

अर्चना मुकेश सोनवणे (वय २६, रा. कोथरूड) असे आईचे आणि सविता सोनाजी संकपाळ (वय २८, रा. मुकुंदवाडी, स्टेशनजवळस सिडको, संभाजीनगर) असे मावशीचे नाव आहे. पौड रस्त्यावर गुरुवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास अर्चना या मुलास शाळेत सोडण्यासाठी बाळाला घेऊन जात होत्या. त्यावेळी मोटारीतून आलेल्या चौघांनी आपल्या हातातील बाळ हिसकावून पळवून नेल्याची तक्रार त्यांनी कोथरूड पोलिस ठाण्यात नोंदवली.

गुन्हे शाखेचे अतिरिक्त पोलिस आयुक्त सी. एच. वाकडे यांच्या आदेशानुसार गुन्हे शाखेच्या पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन तपास सुरू केला. घटनास्थळाची पाहणी करण्यात आली. अर्चना हिच्याकडे चौकशी केल्यानंतर तिच्या बोलण्यात विसंगती आढळून आली. त्यामुळे हा काही तरी वेगळाच प्रकार असल्याच पोलिसांचा संशय बळावला. तसेच, बाळाची मावशी सविता ही पुण्यात येऊन गेल्याची माहिती अर्चनाने लपवली. त्यामुळे खंडणी विरोधी पथकाचे पोलिस निरीक्षक अनिल पाटील यांनी सहायक पोलिस निरीक्षक विठ्ठल शेलार यांच्या पथकाला तत्काळ औरंगाबाद येथे बाळाच्या शोधासाठी पाठविले.

या पथकाने औरंगाबाद येथे जाऊन सविताचा शोध घेतला. त्यावेळी अर्चना हिनेच आपल्याला बाळ सांभाळण्यासाठी दिल्याचे तिने सांगितले. सविताने तिच्या ओळखीच्या भीमा कोरे नावाच्या व्यक्तीकडे बाळाला ठेवले होते. पोलिसांनी त्याच्याकडून बाळ ताब्यात घेतले. त्यानंतर सविता आणि अर्चन यांची अधिक चौकशी केली असता, हा प्रकार बनाव असल्याचे उघड झाले. अशी माहिती गुन्हे शाखेचे पोलिस उपायुक्त पी. आर. पाटील आणि सहायक पोलिस आयुक्त राजेंद्र जोशी यांनी दिली.

अर्चना यांचे पती छोटी-मोठी कॉन्ट्रक्टची कामे करतात. मात्र, त्यांच्यात पटत नसल्यामुळे अर्चना वेगळी राहणार होती. तिच्या बहिणीला आधीच दोन मुली असल्यामुळे त्यांना मुलगा दत्तक हवा होता. पण, मुकेश सोनवणेंचा बाळ दत्तक देण्यास विरोध होता. म्हणूनच अर्चनाने बहिणीला पुण्यात बोलावून बाळ तिच्या ताब्यात दिले. त्या बदल्यात सविता अर्चनाला दोन लाख रुपये देणार होती.

आईच्या चेहऱ्यावर भीतीचा लवलेशही नाही

बाळाचे अपहरण झाल्यानंतर एखाद्या आईची किती गंभीर अवस्था होऊ शकते, याची कोणालाही कल्पना येऊ शकते. मात्र, अर्चना यांच्या चेहऱ्यावर बाळ हरवल्याचे दुःख दिसत नव्हते. पोलिसांनी विचारलेल्या प्रश्नांना ती व्यवस्थित उत्तरे देत होती. त्यामुळे पोलिसांचा तिच्यावरच संशय बळावला. तिच्याकडे चौकशी केल्यानंतर बोलण्यातही विसंगती आढळून आली. त्यामुळे अधिक तपास केल्यानंतर बाळाच्या अपहरणाचा बनाव रचल्याचे समोर आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


स्मार्ट सिटीचा अहवाल वेबसाइटवर

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

केंद्र सरकारच्या स्मार्ट सिटी योजनेचा अखेरचा टप्पा सुरू झाला असून, महापालिका प्रशासनाने स्मार्ट सिटीचा अंतिम आराखडा तयार केला आहे. प्रशासनाने तयार केलेल्या आराखड्यातील महत्त्वाच्या प्रकल्पांचा सारांश पालिकेने स्मार्ट सिटीसाठी सुरू केलेल्या वेबसाइटवर टाकण्यात येणार आहे. त्यावर नागरिकांकडून प्रतिसाद मागवला जाणार असल्याचे महापालिका आयुक्त कुणाल कुमार यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत सांगितले. डिसेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात पालिकेने तयार केलेला स्मार्ट सिटीचा संपूर्ण आराखडा आणि त्यावर नागरिकांनी दिलेला प्रतिसाद याचा अहवाल केंद्र सरकारकडे पाठविला जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

केंद्र सरकारने जाहीर केलेल्या स्मार्ट सिटी स्पर्धेच्या माध्यमातून शहराला विकास करण्यासाठी केंद्र सरकारचा निधी मिळावा, यासाठी महापालिकेच्या वतीने विविध टप्पे पार पाडण्यात आले आहेत. स्मार्ट सिटीचा अंतिम आराखडा तयार करण्याचे काम ९० दिवसांपासून सुरू आहे. या स्पर्धेत पुणे शहराला स्थान मिळावे, या साठी प्रशासनाला विविध माध्यमातून नागरिकांपर्यंत पोहोचण्यात यश आल्याचे कुमार यांनी स्पष्ट केले. यापूर्वीच्या टप्प्यात महापालिकेने शहराला स्मार्ट बनविण्यासाठी नक्की कोणत्या उपाययोजना केल्या पाहिजेत, यावर नागरिकांकडून माहितीपत्रक भरून घेऊन त्यानुसार शहराला स्मार्ट करण्यासाठी कोणते प्रकल्प केले पाहिजेत, याला प्राधान्य दिले आहे. नागरिकांनी केलेल्या सूचना, उपाययोजना या सर्वांचा विचार करून स्मार्ट सिटीचा अंतिम आराखडा तयार करण्यात आला आहे.

प्रशासनाने तयार केलेल्या आराखड्यातील महत्वाच्या बाबींचा सारांश वेबसाइटवर टाकून त्या आराखड्याबाबत नागरिकांकडून पुन्हा मते मागविली जाणार आहेत. यासाठी पालिकेने फॉर्म तयार केला असून, शहरातील ७ लाख नागरिकांकडून हा अर्ज भरून घेण्याचा प्रयत्न राहणार असल्याचे आयुक्तांनी स्पष्ट केले. नागरिकांनी सुचविलेल्या उपाययोजनानुसारच आराखडा तयार करावा लागणार असल्याने पालिकेने तयार केलेल्या आराखड्याला नागरिकांचा प्रतिसाद मिळणे महत्त्वाचे आहे, असेही कुमार म्हणाले.

वेबसाइटसह सोशल मीडियावरही उपलब्ध

स्मार्ट सिटीच्या स्पर्धेसाठी प्रशासनाने तयार केलेल्या आराखड्याला अधिकाधिक नागरिकांचा प्रतिसाद मिळावा, यासाठी प्रशासनाने कंबर कसली आहे. स्मार्ट सिटीसाठी पालिकेने नव्याने सुरू केलेल्या www.punesmartcity.in या वेबसाइटसह फेसबुक आणि @SmartPune या ट्विटर हँडलवर जाऊनही नागरिकांना प्रतिसाद नोंदविता येणार आहे. तसेच, ९७६७३००१११ या क्रमांकावर मिस कॉल देऊनही प्रतिसाद नोंदविता येईल. शिवाय ९६८९९००००३ या क्रमांकावर व्हॉट्सअॅपच्या माध्यमातूनही प्रतिसाद देता येणार असल्याचे आयुक्त कुणाल कुमार यांनी स्पष्ट केले.

इनोव्हेशन लॅबची गरज

शहरातील वाहनांची वाढती संख्या लक्षात घेता वाहतुकीचा गंभीर प्रश्न सोडविण्यासाठी संशोधन करून उपाययोजना करण्याची गरज आहे. यासाठी अर्बन इनोव्हेशन लॅबची गरज आहे. अशा लॅबची उभारणी करण्याविषयी आमचा विचार सुरू असल्याचे आयुक्त कुमार यांनी सांगितले. स्मार्ट सिटीसाठी पुणेकरांनी भरभरून दिलेला प्रतिसाद पाहता, न्यूयॉर्कमधील ब्यूमबर्ग फिलॉसॉफी संस्थेने पुण्याचा अभ्यास करण्याचा निर्णय घेतला आहे. या अनोख्या उपक्रमाचा केस स्टडी म्हणून या संस्थेच्यावतीने अभ्यास केला जाणार असल्याचेही कुमार म्हणाले.

प्रशासनाने तयार केलेल्या आराखड्यातील महत्वाच्या बाबींचा सारांश वेबसाइटवर टाकून त्या आराखड्याबाबत नागरिकांकडून पुन्हा मते मागविली जाणार आहेत.

- कुणाल कुमार, पालिका आयुक्त

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पुणे मेट्रोचा खर्च १२ हजार कोटींवर

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

राजकीय नेतेमंडळींची अपुरी इच्छाशक्ती आणि स्वयंसेवी संस्थांनी उभी केलेली नकारात्मक प्रतिमा, यामुळे चर्चेत अडकून पडलेल्या मेट्रोचा खर्च तब्बल १२ हजार कोटी रुपयांच्या पुढे गेल्याचे शुक्रवारी स्पष्ट झाले. दिल्ली मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनने (डीएमआरसी) पालिकेला मेट्रो प्रकल्पाचा सुधारित अहवाल सादर केला असून, मेट्रो कार्यान्वित होण्याची डेडलाइनही दोन वर्षांनी पुढे गेली आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात केंद्रीय नगरविकास मंत्री व्यंकय्या नायडू यांची भेट घेतल्यानंतर मेट्रोचा सुधारित अहवाल तातडीने सादर करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार, 'डीएमआरसी'ने मेट्रोचा सविस्तर अहवाल पालिकेला सादर केला आहे. या अहवालानुसार मेट्रोच्या दोन्ही मार्गांचा खर्च ११ हजार ५२२ कोटी रुपयांवर पोहोचला आहे. प्रकल्प पूर्ण होईपर्यंत विविध करांसहित सर्व खर्च १२ हजार २९८ कोटी रुपयांवर पोहोचण्याची शक्यता आहे.

पिंपरी-चिंचवड ते स्वारगेट या भुयारी आणि एलिव्हेटेड मार्गासाठी सात हजार ६२८ कोटी रुपये, तर वनाज ते रामवाडी या संपूर्णतः एलिव्हेटेड मार्गासाठी तीन हजार ८९४ कोटी रुपये खर्च येणार आहे. मेट्रोचे दोन्ही मार्ग २०१८-१९ पर्यंत कार्यान्वित होण्याची शक्यता होती. नव्या नियोजनानुसार मेट्रो पूर्ण होण्यासाठी २०२०-२१ उजाडण्याची शक्यता आहे. वनाज-रामवाडी मार्गावर बापट समितीने सुचवलेल्या शिफारशींनुसार बदल केला असल्याने या मार्गाची लांबी तीनशे मीटरने घटली आहे.

मेट्रोचा सुधारित प्रकल्प अहवाल सोमवारी राज्य सरकारला सादर करण्यात येईल. सरकारमार्फत हा अहवाल केंद्राकडे गेल्यानंतर मेट्रोच्या मान्यतेची पुढील प्रक्रिया मार्गी लागू शकेल.

- कुणाल कुमार, आयुक्त, पुणे महापालिका

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अरुंधती रॉय यांची हिंदुत्ववाद्यांवर टीका

$
0
0

मटा ऑनलाइन वृत्त । पुणे

'देशात सध्या जे चाललंय, त्याचं वर्णन करण्यास असहिष्णुता शब्द अपुरा आहे. माणसांच्या हत्या करणं, त्यांना जिवंत जाळणं यासाठी काहीतरी वेगळा शब्द शोधला पाहिजे,' अशा परखड शब्दांत ज्येष्ठ लेखिका अरुंधती रॉय यांनी आज केंद्र सरकारवर हल्ला चढवला.

पुण्यातील फुले वाड्यात झालेल्या एका कार्यक्रमात रॉय यांना आज महात्मा फुले समता पुरस्कारानं गौरवण्यात आलं. त्यावेळी त्या बोलत होत्या. देशातील सध्याच्या घडामोडींच्या अनुषंगानं त्यांनी हिंदुत्ववाद्यांवर हल्ला चढवला. 'सरकार चालवणारे देशाला हिंदूराष्ट्र म्हणत आहेत. फक्त म्हणतच नाहीत तर त्यासाठी कारवाया केल्या जात आहेत. इतिहास पुन्हा लिहिण्याचे प्रयत्न सुरू आहेत, वेगवेगळ्या संस्थांमध्ये त्यांच्या-त्यांच्या लोकांना नेमलं जात आहे. देशात जिकडेतिकडे हिंदुत्वाचे भाट तयार झाले आहेत. दलित, मुस्लिम, आदिवासी, ख्रिश्चनांना दहशतीखाली जगण्यासाठी भाग पाडलं जात आहे,' असा आरोप रॉय यांनी केला.

'घरवापसी'साठी आरक्षणाचे लालूच!

डॉ. आंबेडकरांनी हिंदू धर्माचा त्याग केला होता. हिंदू धर्मात दलितांवर केल्या जाणाऱ्या अन्यायामुळे आंबेडकरांनी धर्मांतर करण्यास सांगितले. मात्र, आता त्यांचंच हिंदूकरण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. दलितांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आंबेडकरांनी आरक्षणाची तरतूद केली. आज त्याच आरक्षणाचं लालूच दाखवून घरवापसी केली जात आहे.' असा घणाघाती आरोपही रॉय यांनी यावेळी केला.

अभाविपची निदर्शनं, घोषणाबाजी

फुले वाड्यात अरुंधती रॉय यांना पुरस्कार दिला जात असताना वाड्याबाहेर अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्याविरोधात जोरदार निदर्शनं केली. काही कार्यकर्त्यांनी कार्यक्रमात गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला. समता परिषदेच्या कार्यकर्त्यांनीही घोषणाबाजी करत त्यांना विरोध करण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी तातडीनं हस्तक्षेप करून अभाविपच्या कार्यकर्त्यांना बाहेर काढले.

भुजबळ म्हणाले...

'अभाविपच्या कार्यकर्त्यांनी घातलेल्या गोंधळाचं वाईट वाटतं. हा कार्यक्रम रॉय यांचा नाही. महात्मा फुलेच्या १२५व्या पुण्यतिथीचा कार्यक्रम आहे. यात गोंधळ घालण्याची काही गरज नव्हती. फुले, आंबेडकरांचं नाव घ्यायचं, अन् असा गोंधळ घालायचा हे चुकीचं आहे. अरुंधती रॉय यांना पुरस्कार त्यांच्या लिखाणासाठी देण्यात आलाय. कोणाला त्रास देण्यासाठी नाही. अभाविपचं निषेधाचं निवेदन कार्यक्रमापूर्वीच स्वीकारलं होतं. त्यानंतरही रॉय यांचं भाषण होऊ न देण्यासाठी गोंधळ घालणं ही कसली सहिष्णुता,' असा सवाल समता परिषदेचे प्रमुख, आमदार छगन भुजबळ यांनी केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

धुक्यातही दिमाखदार दीक्षान्त संचलन

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

धुक्याची चादर लपेटलेल्या वातावरणात राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या कॅडेट्सच्या दिमाखदार दीक्षान्त संचलनाची शान शनिवारी अनेकांनी अनुभवली. पहाटेच्या दाट धुक्यामुळे संचलन पाहण्यात अडथळे आले, तरीही अशा वातावरणातील संचलन हा उपस्थितांसाठी वेगळाच अनुभव ठरला.

राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या (एनडीए) १२९ व्या तुकडीसाठीच्या पासिंग आउट परेडचे शनिवारी सकाळी एनडीएमध्ये आयोजन करण्यात आले होते. नौदलप्रमुख अॅडमिरल आर. के. धवन या परेडचे निरीक्षण करण्यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहाणार असल्याने परेडच्या मैदानावर तशी पहाटेपासूनच वर्दळ सुरू झाली होती. एनडीएमधील आपला अभ्यासक्रम पूर्ण करून पदवी मिळविणाऱ्या कॅडेट्सच्या कुटुंबीयांसोबत ही परेड पाहण्यासाठी जमलेल्या इतर नागरिकांनीही परेड ग्राउंडवर गर्दी केली होती. मात्र, परेडच्या सुरुवातीचा काही काळ हा केवळ धुक्यानेच भारावून टाकणारा ठरला.

याही परिस्थितीत कॅडेट्सनी संचलनाच्या वेळापत्रकानुसार वेळेत संचलनाला सुरुवात केली. बँडच्या तालावर सुरुवातीला वाजलेली 'ओम जय जगदीश हरे'ची धून परडेसाठीचे वातावरण काहीसे हलके करण्यालाही हितावह ठरली. त्याच बँडच्या तालावर वर्दीमधील कॅडेट्स धुक्यातून हळूहळू समोर अवतरू लागल्यावर उपस्थित प्रत्येकानेच त्यांच्या सादरीकरणाला टाळ्यांच्या गजरामध्ये दाद दिली. कदम कदम बढाये जा..., सारे जहाँसे अच्छा... सारख्या देशभक्तिपर गीतांच्या तालावर तितक्याच लयबद्ध पद्धतीने या कॅडेट्सनी केलेल्या परेडने उपस्थितांची मने जिंकून घेतली. पीओपीच्या निमित्ताने सर्वांसाठी एक महत्त्वाचे आकर्षण ठरणारे सुखोई विमानांची नेत्रदीपक उड्डाणेही यंदा धुक्यात हरवली. यंदा तीन वेळा विमानांचे उड्डाण झाल्यानंतरही प्रेक्षकांना या उड्डाणांचा कोणताही अंदाज आला नाही. कॅडेट्सनी परेडची पाळलेली वेळ आणि विमानांच्या उड्डाणांसाठी प्रत्नशील एनडीेए प्रशासनाने केलेल्या प्रयत्नांमुळे उपस्थित प्रत्येकानेच 'एनडीए'चे कौतुक केले.

नौदलप्रमुख धवन यांनी आपल्या मार्गदर्शनामधून 'एनडीए'चे वेगळेपण स्पष्ट करतानाच प्रशिक्षण पूर्ण करणाऱ्या कॅडेट्सना या पुढील काळामध्येही चांगल्या प्रयत्नांच्या आधारे सतत प्रगतीपथावर राहाण्याचे आवाहन केले. कॅडेट्सच्या संचलनाइतक्याच दिमाखदार एक्झिटने या परेडची सांगता झाली.

कॅडेट पी. के. मोहंतीला प्रेसिडेंट्स गोल्ड मेडल

या वेळी धवन यांच्याहस्ते कॅडेट पी. के. मोहंती याला प्रेसिडेंट्स गोल्ड मेडल देऊन सन्मानित करण्यात आले. अभिषेक कुंडलिया याला सिल्व्हर मेडल; तर अनमोल रावत याला ब्राँझ मेडलने गौरविण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बालकांना नव्या वर्षात मोफत चार लसी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

इंद्रधनुष्य योजनेंतर्गत सात लसी सरकारी आरोग्य केंद्रामधून दिले जात असताना बालमृत्यू रोखण्यासाठी गोवर, जर्मन गोवर (रुबेला) रोटाव्हायरस आणि जापनीज बी एनसेफेलायटिससारख्या चार लसी येत्या जानेवारीपासून बालकांना मोफत देण्यात येणार आहे. तसेच, देशात लसीकरणाचे प्रमाणही वाढविण्यात येणार आहे, अशी घोषणा केंद्रीय आरोग्यमंत्री जे. पी. नड्डा यांनी पुण्यात केली.

शारदा शक्तीच्यावतीने आयोजित महिलांच्या आरोग्याविषयी दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे उदघाटन केल्यानंतर ते बोलत होते. अखिल भारतीय आर्युविज्ञान संस्थेचे डॉ. रमा जयसुंदर,डॉ. विजय भटकर, सिरम इन्स्टिट्यूटचे कार्यकारी संचालक अदर पूनावाला, ए. जयकुमार, जयश्री फिरोदिया, सुखिता भावे, डॉ. सुधा तिवारी, डॉ. विजय डोईफोडे आदी उपस्थित होते.

'देशात माता मृत्यू, बालमृत्यू रोखण्यासाठी सरकारी आरोग्यसंस्थांमध्ये मोफत डिलीव्हरी करण्यात येत आहे. आता बालमृत्यू रोखण्याचे देशापुढे आव्हान आहे. त्याकरिता सात प्रकारच्या लसींचा समावेश असलेली 'इंद्रधनुष्य' ही योजना सध्या कार्यरत आहे. त्यानंतर आता नव्याने गोवर, जर्मन गोवर, रोटाव्हायरस, जापनीज बी एनसेफेलायटिस या चार लसी येत्या जानेवारी महिन्यापासून सरकारी आरोग्य केंद्रामध्ये प्रत्येक बालकाला मोफत दिली जाणार आहे,' अशी माहिती नड्डा यांनी दिली. गर्भवती माता आणि मुलींप्रमाणेच मुलांनाही लोहयुक्त गोळ्या देण्यात येणार आहेत. 'इंद्रधनुष्य' कार्यक्रमांतर्गत देशात ५० टक्के लसीकरण झालेल्या २५० जिल्ह्यांमध्ये लसीकरण पूर्ण करणार असून त्यातील उर्वरित आणखी दोनशेहून जिल्ह्यांमध्ये दुसरा टप्पा राबविणार आहोत. देशात सध्या ६५ टक्के लसीकरण झाले असून त्यात वर्षभरात पाच टक्क्यांनी वाढ झाली आहे. येत्या तीन वर्षात ९०-९५ टक्क्यांपर्यंत प्रमाण वाढविण्याचा आमचा प्रयत्न आहे, असेही जे. पी. नड्डा यांनी सांगितले. डॉ. माया तुळपुळे यांनी प्रास्तविक; तर डॉ. लिना बावडेकर यांनी आभार मानले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आरटीओ बोगस अपॉइंटमेट तपास सुरूच

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

प्रादेशिक परिवहन कार्यालयात (आरटीओ) लायसन्स काढण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नावे बोगस अपॉइंटमेंट घेणाऱ्यांचा शोध पोलिसांकडून तपास अद्यापही सुरूच आहे. बोगस अपॉइंटमेट घेणाऱ्यांची महत्त्वाची माहिती उपलब्ध करून दिल्यानंतरही अद्याप या प्रकरणी कोणाला अटक का करण्यात आली नाही, असा प्रश्न आरटीओचे अधिकारी उपस्थित करीत आहेत.

आरटीओकडे मोदी, गडकरी व फडणवीस यांच्या नावे बोगस अपॉइंटमेंट घेतल्याचा प्रकार काही महिन्यांपूर्वी उघडकीस आला होता. त्या प्रकरणी सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी सर्जेराव पवार यांनी दिलेल्या फिर्यादीवरून बंडगार्डन पोलिस स्टेशनमध्ये अज्ञात व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर या प्रकरणाचा तपास शहर पोलिसांच्या सायबर गुन्हे शाखेकडे सोपवण्यात आला होता. आरटीओने 'नॅशनल इन्फॉर्मेटिक्स सेंटर'कडून (एनआयसी) प्राप्त झालेला तपशील सादर केला, त्यामध्ये अपॉइंटमेंट घेण्यासाठी वापरलेले चार मोबाइल क्रमांकही पोलिसांना दिला होता. मात्र, अद्याप या प्रकरणातील गुन्हेगारांचा शोध लागलेला नाही.

सायबर गुन्हे शाखेच्या तत्कालीन निरीक्षक सुषमा चव्हाण यांच्याकडे त्या प्रकरणाचा तपास होता. 'एनआयसी'ने दिलेल्या मोबाइल क्रमांकांद्वारे काही व्यक्तींची नावे समोर आली असून याच्या सूत्रधाराची ओळखही पटली असल्याचे त्यांनी सांगितले होते. मात्र, त्यानंतर त्यांची सायबर गुन्हे शाखा विभागातून अन्य विभागात बदली झाली. त्यानंतर सायबर विभागात त्यांच्या जागी आलेले ए. एस. वायकर यांच्याकडे या प्रकरणाबाबत चौकशी केली असता, गुन्हेगारांवर कारवाई करण्यासाठी आणखी १५ दिवस लागतील, असे त्यांनी सांगितले.

'कारवाई करणार'

सायबर क्राइम विभागाचा पदभार स्विकारल्यानंतर या केसची सर्व कागदपत्रे पडताळली. त्यानंतर अधिक तपास करून केला. आणि आता तपास पूर्ण झाला असून येत्या आठ ते १५ दिवसांत संबंधितांवर कारवाई केली जाईल, असे ए. एस. वायकर यांनी स्पष्ट केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पत्त्याच्या क्लबवर कारवाई; १२ अटकेत

$
0
0

पुणेः वानवडी पोलिस ठाण्याच्या हद्दीमध्ये छुप्या पद्धतीने चालणाऱ्या पत्त्याच्या बेकायदा क्लबवर पोलिस सहआयुक्त सुनील रामानंद यांच्या आदेशावरून स्वारगेट व विशेष शाखेच्या पथकाने छापा टाकून बाराजणांना अटक केली आहे.

दीपक रामचंद्र परब (वय ४३, रा.पर्वती), मधुकर केशव ढवळे (५४, रा. हडपसर), अर्जुन कुमार पासवान (२६, रा. वानवडी), रमेश नागेश पुजारी (२८ , रा. अनुष्का बिल्डींग, वानवडी), आसिफ याकुब खान (४७, रा. नाना पेठ), विकास शंकर महाडीक (४८, रा. शेवाळवाडी, कोदरेवस्ती), चौला सोमर पंडित (४०, रा. रामनगर वस्ती, येरवडा), दीपक राजेंद्र उपाध्याय (२०, रा. म्हस्के हाउस, वानवडी), समीर लतिफ खान (४२), मेधराज ठाकूर (३०, रा. ग्रीनपार्क सोसायटी, कोंढवा), आजीम अब्दुल रेहमान शेख (२६, रा. ए. पी. लोहियानगर), रूपेश राजेश परदेशी (३२, रा. रवी पार्क, वानवडी गाव) अशी अटक आरोपींची नावे आहेत. या प्रकरणी पोलिस हवालदार डी. एस. मते यांनी फिर्याद दिली आहे. वानवडी येथील हॉटेल समृद्धीजवळ एका घरात बेकायदेशीरपणे पत्त्यांचा क्लब सुरू असल्याची माहिती पोलिस सहआयुक्तांना मिळाली होती. त्यांच्या आदेशानुसार विशेष शाखेचे पोलिस निरीक्षक जरग, सहायक निरीक्षक करे यांच्यासह सहायक निरीक्षक संदेश केंजळे, सहायक फौजदार एस. बी. जगताप यांनी कारवाई केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


सरकारने गुंडांना पाठीशी घालू नये : अजित पवार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पिंपरी

'पिंपरी-चिंचवड शहरात वाढलेल्या गुन्हेगारीला प्रशासन व पोलिस जबाबदार आहेत. पोलिसांचे गुन्हेगारीवर नियंत्रण राहिलेले नसून याला सत्ताधारी सरकार जबाबदार आहे. वाढलेल्या गुन्हेगारीबाबत मुख्यमंत्र्यांना पत्र देऊनही शहरामध्ये तोडफोड सुरू आहे. सरकारने गुंडाना पाठीशी घालू नये,' असे आवाहन माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.

कै. कृष्णाजी लक्ष्मण चिंचवडे-पाटील शैक्षणिक संकुलातील स्पर्धा केंद्र व अभ्यासिकेचे उद्‌घाटन पवार यांच्या हस्ते शनिवारी त्या वेळी ते पत्रकारांशी बोलत होते. या वेळी शहरातील, राज्यातील आणि देशातील विविध प्रश्नांसदर्भात त्यांनी मत व्यक्त केले.

'शहरात नागरिकांच्या सुरक्षेला प्राधान्य देणे गरजेचे आहे. शहरामध्ये पोलिस यंत्रणा चांगलीच असायला पाहिजे. जो कोणी नागिरकांच्या मनात भीती निर्माण करेल त्यांच्यावर कडक कायदेशीर कारवाई केली जाईल. राज्यातील वर्धा आणि चंद्रपूर जिल्ह्यात दारुबंदी आहे. तिथे चोरून दारू विकली जातेच. आधी तिथे कडक अंमलबजावणी करा, मग राज्यात दारुबंदीचा निर्णय होईल. आम्ही सत्तेत असताना आम्ही मुंबईतील सगळ्या डान्सबारवर बंदी आणली होती. आता ही बंदी उठवली गेली, हे केवळ भाजप सरकारचे अपयश आहे,' असाही आरोप पवार यांनी या वेळी केला.

नाशिक फाटा ते वाकड बीआरटी सुरू

पिंपरी-चिंचवडमधील नाशिक फाटा ते वाकड या नवीन बीआरटी मार्गाचे उद्‌घाटन माजी उपमुख्यमंत्री अजित पवार हस्ते शनिवार (२८ नोव्हेंबर) करण्यात आले. या वेळी महापौर शकुंतला धराडे, खासदार श्रीरंग बारणे, अमर साबळे, आमदार लक्ष्मण जगताप, अॅड. गौतम चाबुकस्वार, महेश लांडगे, उपमहापौर प्रभाकर वाघेरे, स्थायी समिती सभापती अतुल शितोळे, सत्तारुढ पक्षनेत्या मंगला कदम, आयुक्त राजीव जाधव आदी उपस्थित होते. नाशिक फाटा ते वाकड कॉरिडोरला भोसरी ते हिंजवडी माण फेज ३ येथून सुरुवात करण्यात आली. दर दहा मिनिटांनी फिडर बस सुरू करण्यात आली आहे. हा मार्ग आठ किमीचा आहे. पिंपरी-चिंचवड महापालिका आणि पीएमपीएमएलद्वारा हा बीआरटी मार्ग सुरू करण्यात आला आहे. अजित पवार यांच्या हस्ते सांगवी फाटा 'सब-वे'चे उद्‌घाटन झाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बीआरटीमुळे पालिका अडचणीत

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या जलद बस वाहतूक योजनेच्या (बीआरटी) दुसऱ्या मार्गाला शनिवारी मुहूर्त मिळाला असताना, पुणे महापालिकेच्या नगर रोडवरील बीआरटी येत्या वर्षात सुरू होण्याची चिन्हे नाहीत. आळंदी रोडवरील बीआरटी सुरू होऊन तीन महिने होत आले, तरी पालिकेला नगर रोड बीआरटीसाठी मुहूर्त मिळत नसून, टर्मिनलशिवाय बस धावणार नाहीत, असा पवित्रा पुणे महानगर परिवहन महामंडळाने (पीएमपी) घेतल्याने पालिकेसमोरच्या अडचणींत वाढच झाली आहे.

आळंदी रोडवर विश्रांतवाडी येथे महापालिकेने तात्पुरत्या स्वरूपात टर्मिनलची सोय केली असल्याने त्या ठिकाणी बस उभी करणे, ती वळविणे आणि तेथून दुसऱ्या मार्गावर बस पाठविणे, ही व्यवस्था करताना पीएमपीसमोर अनंत अडचणी येत आहेत. त्यामुळे, नगर रोडवर टर्मिनल उभारल्याखेरीज बीआरटी सुरू करता येणार नाही, अशी भूमिका मांडण्यात येत आहे. नगर रोडवर वाघोलीजवळ टर्मिनलसाठी पालिकेतर्फे जागा मिळविण्याचा प्रयत्न केला जात आहे; पण त्याला अद्याप यश आलेले नाही. त्याबाबत, पालिकेतर्फे वारंवार पाठपुरावा केला जात असला, तरी जागा पालिकेच्या ताब्यात येऊन, तेथे टर्मिनल सुरू होण्यास किमान महिनाभरापेक्षा अधिक कालावधी लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे, या वर्षात तरी नगर रोडवरील बीआरटीचे कार्यान्वित होण्याची शक्यता धूसर होत चालली आहे.

पुण्यासह पिंपरी-चिंचवड महापालिकेने बीआरटीसाठी पायाभूत सुविधांच्या निर्मितीवर कोट्यवधी रुपये खर्च केले. तरीही, प्रत्यक्षात नागरिकांना सेवा उपलब्ध होत नव्हती. आयटीएमएस यंत्रणेशिवाय बीआरटी सुरू करता येणार नसल्याने पुणे महापालिकेने सुरुवातीला आळंदी रोड मार्गावर ही यंत्रणा बसविली; तर पिंपरी-चिंचवड महापालिकेने सांगवी ते किवळे हा मार्ग त्यासाठी निवडला. आळंदी रोड बीआरटी ऑगस्टअखेरीस, तर सांगवी बीआरटी सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात प्रवाशांच्या सेवेत दाखल झाली. त्यानंतर, अवघ्या महिनाभरातच पुढच्या मार्गावरील बीआरटी सुरू केली जाईल, अशी ग्वाही देण्यात आली होती. प्रत्यक्षात, अडीच महिन्यांनंतर पिंपरी-चिंचवडमधील दुसरा मार्ग कार्यान्वित झाला आहे, तर नगर रोड केव्हा सुरू होणार, याचे कोणतेही ठोस उत्तर पुणे महापालिकेकडे नाही.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘अभाविप’चा गनिमी कावा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

ज्येष्ठ लेखिका अरुंधती रॉय यांना अखिल भारतीय समता परिषदेतर्फे महात्मा फुले समता पुरस्कार प्रदान करतेवेळी प्रेक्षकांमध्ये बसलेल्या 'अखिल भारतीय विद्यार्थी परिषदे'च्या (अभाविप) कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करून शनिवारी गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे काही काळ कार्यक्रमस्थळी तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

महात्मा जोतिबा फुले यांच्या पुण्यतिथीनिमित्त रॉय यांना महात्मा फुले समता पुरस्कार प्रदान करण्यात आला. फुले वाड्यात या पुरस्कार वितरणाचा कार्यक्रम झाला. मात्र, रॉय यांच्या देशविरोधी वक्तव्यांमुळे त्यांना विरोध असल्याची भूमिका 'अभाविप'ने घेतली होती. त्या पार्श्वभूमीवर फुले वाडा परिसरात पोलिसांचा कडक बंदोबस्त ठोवण्यात आला होता. रॉय यांना पुरस्कार प्रदान करतेवेळी 'अभाविप'च्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करून त्यांचा निषेध व्यक्त केला. विद्यार्थ्यांचा आक्रमक पवित्रा पाहून पोलिसांना त्यांच्यावर सौम्य लाठीमार करावा लागला. या प्रकारानंतर 'अभाविप'चे महानगर सहमंत्री प्रदीप गावडे यांनी पत्रकार परिषद घेऊन भूमिका मांडली. 'संपूर्ण कार्यक्रमात रॉय यांना पुरस्कार देताना निदर्शने करण्यात आली. सध्याचा असहिष्णुतेचा मुद्दा आणि आमच्या आंदोलनाचा संबंध नाही. तसेच, समता परिषदेलाही आमचा विरोध नाही. मात्र, देशविरोधी वक्तव्य करणाऱ्या रॉय यांना विरोध आहे,' असे त्यांनी सांगितले.

भुजबळ-'अभाविप'ची जुगलबंदी

'अभाविप'च्या कार्यकर्त्यांनी कार्यक्रमाच्या सुरुवातीला आमच्याकडे निषेधाचे पत्र दिले होते. त्याचा आम्ही स्वीकारही केला होता. त्यानंतर देखील गोंधळ घालणे चुकीचे आहे. रॉय यांना त्यांची मते मांडू न देणे, हे असहिष्णुतेचे लक्षण आहे,' अशी टीका परिषदेचे अध्यक्ष छगन भुजबळ यांनी केली. तर, आमचे कार्यकर्ते निषेधाचे पत्र द्यायला गेलेच नव्हते; भुजबळ खोटे बोलत असल्याचे 'अभाविप'ने स्पष्ट केले.

'अभाविप'चे प्रायश्चित्त

अरुंधती रॉय यांना पुरस्कार देण्यापासून रोखू न शकल्याने आम्ही​ आज,रविवारी महात्मा फुले वाड्यात जाऊन प्रायश्चित्त घेणार आहोत, असे 'अभाविप'तर्फे सांगण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सुधारकांचे हिंदुत्वीकरण

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

महात्मा जोतिबा फुले, सावित्रीबाई फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि पंडिता रमाबाई यांनी खुलेपणाने हिंदू धर्माचा त्याग केला. मात्र, या थोर समाजसुधारकांचे हिंदुत्वीकरण करण्याचे प्रयत्न सध्या सुरू आहेत, अशी टीका ज्येष्ठ लेखिका अरुंधती रॉय यांनी शनिवारी केली. तसेच, देशातील एका प्रसिद्ध इतिहासकाराने महान हिंदू व्यक्तींच्या यादीत या चौघांचा समावेश केल्याचा गौप्यस्फोटही त्यांनी केला.

महात्मा जोतिबा फुले यांच्या १२५ व्या पुण्यतिथीनिमित्त अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्यावतीने रॉय यांना 'महात्मा फुले समता पुरस्कार' प्रदान करण्यात आला. या वेळी महापौर दत्तात्रय धनकवडे, परिषदेचे संस्थापक छगन भुजबळ, आमदार अॅड. जयदेव गायकवाड, महापालिकेच्या स्थायी समितीच्या अध्यक्ष अश्विनी कदम, सभागृह नेते बंडू केमसे, परिषदेचे कार्याध्यक्ष कृष्णकांत कुदळे, माजी खासदार समीर भुजबळ, माजी आमदार पंकज भुजबळ, प्रा. डॉ. हरी नरके, सुशिला नेटके आदी उपस्थित होते. श्रीमती रॉय यांनी पुरस्काराची एक लाख रुपयांची रक्कम आणि पुस्तकांच्या रॉयल्टीतून मिळालेले एक लाख रुपये रमाबाई मुक्ती मिशनला देणगी स्वरूपात दिले.

'सत्ताधारी पक्षामध्ये बौद्धिक भ्रष्टाचार माजला आहे. कोणतीही पर्वा न करता देशाला हिंदू राष्ट्र बनविण्यासाठी डावपेच आखले जात आहेत. त्यासाठी खासगीरित्या आणि सार्वजनिकरित्या चक्रे फिरवली जात आहेत. विद्यापीठे, शाळांचे अभ्यासक्रम बदलले जात आहेत. इतिहासाचे सोयीने पुनर्लेखन केले जात आहे. तसेच, न्यायपालिका, पोलिस, गुप्तवार्ता आणि लष्करातही हिंदुत्ववाद्यांना नेमण्यात येत आहे,' असा घणाघाती आरोप रॉय यांनी केला.

दलित आणि बहुजनांना जिवंत जाळण्यात येत असून, ही परिस्थिती असहिष्णुतेपेक्षा वेगळी आहे. त्यामुळे त्यास पर्यायी शब्द शोधला पाहिजे, असेही त्या म्हणाल्या.

देशातून जातीचे उच्चाटन झाल्याशिवाय भारत महासत्ता होणार नाही. भारत महाशक्ती असल्याचे आपले नेते सांगतात. मात्र, देशात आठ कोटी नागरिक दररोज २० रुपयांपेक्षा कमी रोजगारावर जगतात. त्याउलट देशाच्या एकूण दरडोई उत्पन्नातील २५ टक्के वाटा मोजक्याच १०० कुटुंबांकडे आहे. जगातील अत्यंत विषम समाजांपैकी आपण एक आहोत, अशी खंतही रॉय यांनी व्यक्त केली.

फुले, शाहू, आंबेडकरांचे नाव घ्यायचे आणि त्यांच्याच विचारांना तिलांजली द्यायची, असा प्रकार सध्या मोदी सरकारमध्ये पाहायला मिळत आहे. सरकारमधील काही व्यक्तींची वक्तव्ये धोकादायक आहेत. मात्र, मोदी त्यांच्यावर नियंत्रण ठेवण्यात अपयशी ठरले आहेत, अशी टीका भुजबळ यांनी केली.

महात्मा फुलेंना भारतरत्न देण्याची चर्चा सुरू होती. मात्र, सामान्य लोकांनी दिलेली महात्मा ही पदवी त्यापेक्षा श्रेष्ठ असल्याने फुलेंना भारतरत्न पुरस्कार देण्याची गरज नाही.

- छगन भुजबळ, माजी मंत्री

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महिलांची फसवणूक; सराईताला कैदेची शिक्षा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

दागिने पॉलिश करून देण्याच्या बहाण्याने महिलांचे दागिने फसवणूक करून नेणाऱ्या सराईत गुन्हेगाराला दोन गुन्ह्यांत चौदा महिन्यांच्या साध्या कैदेची शिक्षा कोर्टाने सुनावली. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी पी. टी. गोटे यांनी हा आदेश दिला.

रणजितकुमार शत्रुघ्न दास (वय २४, रा. लेबर कॅम्प, खेड, मूळ बिहार) असे शिक्षा झालेल्याचे नाव आहे. दास आणि त्याच्या साथीदारांनी खेड येथील वैभव इमारतीमध्ये दोन खोल्या भाड्याने घेतल्या होत्या. एकूण सात जण या खोल्यांमध्ये राहत होते. दास याने संगमवाडी येथील नयना चव्हाण (वय २६, रा. शिंदे चाळ) यांचे २६ जुलै २०१४ रोजी २२ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने फसवणूक करून लांबवले. रेखा जितेंद्र परमार (रा. संगमवाडी, निमक चाळ) यांचीही फसवणूक करून ७६ हजार रुपयांचे दागिने नेले होते. दासच्या सोबत इतर दोन आरोपीही होते. गुन्हे शाखेच्या प्रॉपर्टी सेलने याप्रकरणी तपास करून दागिने पॉलिश करून फसविणाऱ्या टोळीला अटक केली होती. या प्रकरणी येरवडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

या दोन्ही गुन्ह्यांचा स्वतंत्र खटला कोर्टात चालला. सहायक सरकारी वकील वामन कोळी यांनी सरकारी पक्षाची बाजू मांडली. दोन्ही गुन्ह्यात एकूण वीस साक्षीदार तपासले. दोन्ही गुन्ह्यात दास याला कोर्टाने चौदा महिन्यांची शिक्षा व एक हजार रुपये दंड ठोठावला. या खटल्यात पोलिस हवालदार सुनील जाधव यांनी मदत केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पिंपरीतील तिघांना मोक्कांतर्गत कोठडी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

कोयत्याचा धाक दाखवून मेडिकल दुकानातील ६८ हजारांची रोकड लुटणाऱ्या तिघा सराईतांवर पिंपरी पोलिसांनी महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी कायद्या (मोक्का) अंतर्गत कारवाई केली. तिघांनाही कोर्टाने पाच डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला आहे.

अमर रिंकू कुलवंतसिंग चौहान (वय २६), बिट्टू उर्फ मनप्रित सुखदेवसिंग माही (वय १९) आणि दिलीप इंद्रजितसिंग चौहान (वय १९, तिघेही रा. नेहरूनगर, पिंपरी) अशी कोठडी सुनावलेल्यांची नावे आहेत. या प्रकरणी अमित नंदकुमार अगरवाल (वय २५, रा. नेहरूनगर, पिंपरी) यांनी तक्रार दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी २० ऑक्टोबर रोजी रात्री पावणेबाराला दुकानात आले. रिंकू चौहान हा काऊंटरजवळ आला. आम्हाला गोव्याला जायचे आहे, तसेच कोर्टातही पैसे भरायचे असल्याचे सांगून त्याने अगरवाल यांच्याकडे पैशाची मागणी केली. अगरवाल यांनी पैसे देण्यास विरोध केल्यानंतर तिघांनी कोयत्याचा धाक दाखवून गल्ल्यातील ६८ हजार रुपये जबरदस्तीने चोरून नेले.

घरफोडी करणारा अटकेत

पुणे : कोथरूड येथील उजवी भुसारी कॉलनीत घरफोडी करणाऱ्या एकाला पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याकडून चाळीस हजार रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. त्याच्या इतर पाच साथीदारांचा शोध सुरू आहे. रिंकू दयाराम मिश्रा (वय २४, रा. नालासोपारा पूर्व) असे अटक केलेल्याचे नाव आहे. तर, त्याचे साथीदार मानसिंग धोंडिराम सपकाळ, युसूफ मुमताज शेख रंजन आनंद महंती, श्रावण कृष्णा हेगडे आणि आशिकअली मिर्झाबेग या आरोपींचा शोध सुरू आहे. या बाबत मंदार मुकुंद यज्ञोपवित (वय ३८, रा. वंदना अपार्टमेंट, उजवी भुसारी कॉलनी, कोथरूड) यांनी तक्रार दिली होती. एक एप्रिल २०१५ रोजी मंदार घर बंद करून बाहेर गेले असता चोरट्यांनी घराच्या दरवाजाच्या कुलूप तोडून आत प्रवेश केला. कपाटातील सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम असा ७० हजार रुपयांचा माल चोरून नेला होता.

सराईत गुन्हेगाराला अटक

पुणेः बाणेर, भोसरी परिसरात बंद फ्लॅट फोडणाऱ्या गुन्हेगारास दरोडा प्रतिबंधक पथकाने शुक्रवारी सापळा रचून ठाणे परिसरातून अटक केली. त्याच्याकडून घरफोडीचे दोन गुन्हे उघडकीस आणत दीड लाखाचा माल जप्त करण्यात आला आहे. सैफ मुर्तझा खान (वय २४, रा. शांतीनगर, भिवंडी, जि. ठाणे) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. बाणेर येथील बंद फ्लॅटचे कुलूप तोडून सोन्याचे दागिने चोरून नेल्याची घटना ५ नोव्हेंबर रोजी घडली होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दहा मिनिटांत क्विक रिस्पॉन्स

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

पुणे-मुंबई एक्स्प्रेस वेवर आपत्कालिन परिस्थितीत पीडितांच्या मदतीसाठी 'क्विक रिस्पॉन्स अॅण्ड रेस्क्यू' वाहनांच्या चार गाड्यांचा ताफा तैनात करण्यात आला आहे. एक्स्प्रेस-वेच्या ९५ किलोमीटरच्या परिसरात कोठेही दुर्घटना घडल्यास अवघ्या १० मिनिटांत ही वाहने घटनास्थळी पोहोचून मदतकार्य करणार आहेत.

पुणे-मुंबई एक्स्प्रेस वेवरील वाहनांचा सुसाट वेगच अनेकांच्या जीवावर बेतत असल्याचे आतापर्यंत झालेल्या अपघातांमध्ये स्पष्ट झाले आहे. या मार्गावर मे २०१५ पर्यंत ४,६८३ अपघात झाले आहेत. त्यापैकी ९५७ अपघातांमध्ये जवळपास बाराशे जणांना प्राण गमवावा लागला आहे. गेल्या काही वर्षांमध्ये या रस्त्यावरील अपघातांची संख्या कमी होत असले तरी, बळींचे प्रमाण वाढत आहे. जखमींना 'गोल्डन अवर'मध्ये मदत मदत न मिळाल्याने त्यांचे मृत्यू ओढावण्याचे प्रमाण अधिक आहे. त्यामुळे कोणतीही दुर्घटना घडल्यास जखमींना तातडीने मदत मिळावी, या दृष्टिने राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) उपाययोजना केली आहे.

यंदा १५ ऑगस्ट रोजी पहिली 'क्विक रिस्पॉन्स अॅण्ड रेस्क्यू' गाडी प्रायोगिक तत्त्वावर सुरू करण्यात आली होती. त्यानंतर ९ नोव्हेंबर रोजी आणखी तीन गाड्या सेवेत दाखल झाल्या आहेत. या गाड्या तळेगाव टोलनाका, लोणावळा, खालापूर टोलनाका आणि पनवेलपासून नऊ किमी अलीकडे उपलब्ध राहणार आहेत, अशी माहिती 'एमएसआरडीसी'चे प्रकल्प उपाध्यक्ष सुरेश कामले यांनी 'मटा'ला दिली.

वाहनांना लागणाऱ्या आगी, भीषण अपघात, अपघातानंतर वाहनातच अडकून पडलेले प्रवासी यांना 'क्विक रिस्पॉन्स अॅण्ड रेस्क्यू' वाहनांद्वारे मदत करणे शक्य होणार आहे. चार वाहनांमध्ये रस्त्याची हद्द विभागण्यात आली आहे. एखादी दुर्घटना घडल्यास एका वाहनाला साधारणपणे साडेतेवीस किमी अंतर पार करावे लागणार आहे. त्यामुळे गाडी १० मिनिटांत घटनास्थळी पोहोचणे शक्य असल्याचेही कामले यांनी सांगितले.

दीडशे अपघातांमध्ये मदतीचा हात

एक्स्प्रेस वेवर पहिली 'क्विक रिस्पॉन्स अॅण्ड रेस्क्यू' गाडी १५ ऑगस्ट रोजी दाखल झाली. त्या गाडीद्वारे आतापर्यंत १४० अपघातांमध्ये मदतकार्य करण्यात आले आहे. जखमींना अॅम्ब्युलन्सपर्यंत तातडीने पोहोचविणे, कटरने गाडीचा भाग कापून अडकलेल्यांना बाहेर काढणे, टायर किंवा इंजिनमध्ये आग लागल्यानंतर ती विझवणे, आदी मदत या वाहनाद्वारे करण्यात आली आहे, अशी माहिती कामले यांनी दिली.

क्विक रिस्पॉन्स अॅण्ड रेस्क्यू वाहनाची वैशिष्ट्ये

आग प्रतिबंधक यंत्रणा

नाइट ऑपरेशनसाठी

लाइट मास्क

गॅस कटर

प्रशिक्षित मनुष्यबळ

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


‘बालगुन्हेगारांना मुख्य प्रवाहात आणा’

$
0
0

पुणेः 'समाजाच्या दृष्टीने बालगुन्हेगारी हा अत्यंत ज्वलंत विषय असून, मोठा गुन्हेगार बनण्याची सुरुवात त्यातून होते. त्यामुळे बालगुन्हेगारांना शिक्षा करण्यापेक्षा समुपदेशनाद्वारे समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्याची गरज आहे. त्यासाठी भोई प्रतिष्ठानने पुढाकार घ्यावा,' असे मत राज्याचे पोलिस महासंचालक प्रवीण दीक्षित यांनी व्यक्त केले.

दीक्षित यांची विघ्नहर्ता न्यासाचे विश्वस्त डॉ. मिलिंद भोई यांच्या शिष्टमंडळाने पोलिस आयुक्तालयात भेट घेतली. त्यावेळी दीक्षित यांनी बालगुन्हेगारी निवारण, पोलिसांच्या कायदा व सुव्यवस्थेच्या कामात गणेशोत्सव मंडळांचा सहभाग, धार्मिक संस्था आणि पोलिस यंत्रणेतला समन्वय आणि विधायक कार्य करणाऱ्या युवकांचा पोलिस मित्र म्हणून सहभाग अशा विविध विषयांवर मार्गदर्शन केले. या वेळी पोलिस सहआयुक्त सुनील रामानंद, गुन्हे शाखेचे अतिरिक्त पोलिस आयुक्त सी. एच. वाकडे उपस्थित होते.

गुन्हेगारीकडे वळणाऱ्या बालगुन्हेगारांना आणि तरुण पिढीला परावृत्त करण्यासाठी एमएसडब्ल्यू करणाऱ्या विद्यार्थ्यांची, तसेच व्यवसायिक समुपदेशकांची मदत घेऊन भोई प्रतिष्ठानने काम करावे, असे दीक्षित यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

स्वदेशी युद्धनौका लवकरच

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

भारतीय नौदलाच्या ताफ्यामध्ये लवकरच पूर्णपणे स्वदेशी तंत्रज्ञानाच्या मदतीने विकसित झालेल्या युद्धनौका आणि पाणबुड्या दाखल होणार असल्याची माहिती नौदलप्रमुख अॅडमिरल आर. के. धवन यांनी शनिवारी खडकवासला येथे दिली. महिला वैमानिकांच्या भरतीसाठीही नौदल प्रयत्नशील असून, त्यासाठीचा प्रस्ताव मान्यतेसाठी राष्ट्रपतींकडे सादर केल्याचेही त्यांनी या निमित्ताने स्पष्ट केले.

राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या १२९ व्या तुकडीची पासिंग आउट परेड शनिवारी खडकवासला येथील प्रबोधिनीच्या आवारात पार पडली. या परेडनंतर धवन यांनी पत्रकारांशी संवाद साधत नौदलाच्या उपक्रमांची माहिती दिली. नौदलामध्ये महिला आणि पुरुष अधिकाऱ्यामध्ये कोणत्याही प्रकारचा भेदाभेद केला जात नसून, नौदलातील महिला अधिकाऱ्यांविषयी नौदलाला तितकाच अभिमान असल्याचेही त्यांनी या वेळी सांगितले.

धवन म्हणाले, 'नौदलासाठी स्वदेशी तंत्रज्ञानाचा वापर वाढविण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. त्यासाठी देशातील औद्योगिक क्षेत्राला सोबत घेत आम्ही विशेष उपक्रमही आखले आहेत. या उपक्रमांच्या अंमलबजावणीसाठी पुढील १५ वर्षांचा एक विकास आराखडा नौदलाने तयार केला आहे. त्या आधारे टप्प्याटप्प्याने स्वदेशी तंत्रज्ञानाचा वापर वाढविला जाणार आहे. नौदलाने संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेच्या मदतीने (डीआरडीओ) पुढील तीस वर्षांसाठी विशेष दीर्घकालीन कृती आराखडाही आखला असून, त्या द्वारे विज्ञान आणि तंत्रज्ञानाबाबतच्या धोरणांची आखणी आणि अंमलबजावणीवर भर दिला जाणार असल्याचेही त्यांनी नमूद केले. सध्या पूर्णपणे भारतीय तंत्रज्ञानावर आधारलेल्या एकूण ४७ नौका आणि पाणबुड्यांची बांधणी सुरू असून, त्या लवकरच सेवेत दाखल होण्याचा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

नौदलातील महिला अधिकाऱ्यांविषयी विचारले असता धवन म्हणाले, 'नौदलातील महिला अधिकाऱ्यांची मोठी कामगिरी विचारात घेता, नौदलाला त्यांच्याविषयी अभिमानच आहे. त्यांनी नौदलातील वेगवेगळ्या विभागांच्या माध्यमातून नौदलाच्या आणि पर्यायाने देशाच्या प्रगतीमध्ये मोठा वाटा उचलला आहे. पुरुष आणि महिला अधिकारी असा कोणताही भेद नौदलामध्ये केला जात नाही. या पुढील टप्प्यात नौदलाच्या विमानांसाठी महिला वैमानिकांची भरती करण्यासाठीही नौदल प्रयत्नशील असून, त्यासाठीचा प्रस्ताव मान्यतेसाठी राष्ट्रपतींकडे सादर केल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मेट्रो, पीएमपीची स्थानके एकाच ठिकाणी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

वनाज ते रामवाडी मेट्रो प्रकल्पाचा मार्ग बदलण्यात आल्याचा सर्वाधिक फायदा प्रवाशांना होणार असून, मेट्रो आणि पीएमपी बस सेवा आता एकाच ठिकाणी उपलब्ध होऊ शकेल, अशी चिन्हे आहेत. तसेच, डेक्कन जिमखाना आणि महापालिका ही शहरातील दोन महत्त्वाची बसस्थानकेही मेट्रोशी जोडली जाणार आहेत.

पुणे मेट्रो प्रकल्पाचा सुधारित अहवाल दिल्ली मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनने (डीएमआरसी) शुक्रवारी पालिकेला सादर केला. या अहवालानुसार जंगली महाराज रोडने जाणारी मेट्रो आता खंडुजीबाबा चौकापासून नदीपात्रातून शिवाजीनगर येथील धान्य गोदामापर्यंत जाणार आहे. धान्य गोदामाच्या येथील मेट्रोचे स्टेशन 'इंटरचेंज स्टेशन' म्हणून वापरता येणार आहे. पिंपरी-चिंचवड ते स्वारगेट दरम्यानच्या भुयारी मेट्रोचे स्टेशन मंगला टॉकीजच्या मागे असेल. या स्टेशनपासून धान्य गोदामाला 'कनेक्ट' करणे अधिक सोयीचे जाणार असल्याचा दावा करण्यात येत आहे. त्याचप्रमाणे, जंगली महाराज रोडने जाताना डेक्कन जिमखाना येथील बसस्थानक मेट्रोशी जोडता येणे जिकिरीचे होणार होते. आता नदीपात्रातूनच मेट्रो धावणार असल्याने तेथे स्टेशन करून ते पीएमपीच्या स्थानकाशी जोडणे शक्य होणार आहे.

डेक्कनसह महापालिका बस स्थानकही मेट्रोशी थेट जोडले जाणार आहे. शहराच्या विकास आराखड्याबाबत (डीपी) राज्य सरकारने नियुक्त केलेल्या त्रिसदस्यीय समितीनेही धान्य गोदामावर मेट्रो आणि पीएमपीचे एकत्रित आरक्षण दर्शविले आहे. याच ठिकाणी एलिव्हेटेड मेट्रोच्या खालच्या जागेत पीएमपीसाठी मोठे स्थानक आणि आगार विकसित करता येणे शक्य होणार आहे. शहराच्या अनेक भागांत जाण्यासाठी महापालिका भवन स्थानकापासून पीएमपीची बस सेवा उपलब्ध आहे. त्यामुळे, मेट्रोतून उतरणाऱ्या प्रवाशांना लगेच सार्वजनिक वाहतुकीचा पर्याय वापरता येऊ शकेल.

दरम्यान, गरवारे कॉलेजनंतर धान्य गोदामापर्यंतच्या मार्गावर मेट्रोचे डेक्कन जिमखाना येथे एक स्थानक करायचे, की सावरकर भवन/बालगंधर्व पूल येथे आणखी एक स्थानक उभारायचे, याबाबतचा निर्णय मेट्रोला अंतिम मंजुरी मिळाल्यानंतर घेतला जाण्याची शक्यता आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पुण्यात फ्लॅट महागणार?

$
0
0

रेडी रेकनरमध्ये दहा ते तेरा टक्क्यांनी वाढीचा प्रस्ताव

Dhananjay.Jadhav@timesgroup.com

पुणे : मंदीच्या सावटामुळे बांधकाम व्यवसायासमोर अडचणींचा डोंगर उभा असताना नव्या वर्षातील रेडी रेकनरच्या दरात दहा ते तेरा टक्क्यांनी वाढ करण्याचा प्रस्ताव मुद्रांक व नोंदणी विभागाने तयार केला आहे. रेडी रेकनरमधील ही प्रस्तावित वाढ मंजूर झाल्यास पुण्यातील फ्लॅट आणखी महागणार आहेत.

जमीन वा सदनिकांच्या खरेदी-विक्रीचे वार्षिक मूल्यदर (रेडी रेकनर) दरवर्षी निश्चित केले जातात आणि ते एक जानेवारीपासून लागू करण्यात येतात. नव्या वर्षातील (२०१६) रेडी रेकनरच्या दराची निश्चिती करण्याचे काम मुद्रांक व नोंदणी विभागामार्फत करण्यात येत आहे. त्यासंदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयात नुकतीच बैठक झाली. या बैठकीमध्ये शहर व ग्रामीण भागातील रेडी रेकनरच्या दरामध्ये तब्बल १० ते १३ टक्क्यांनी वाढ करण्याचा प्रस्ताव मुद्रांक व नोंदणी विभागाने दिला आहे.

पुणे महापालिकेच्या हद्दीत सुमारे पावणेसातशे मूल्य विभाग आहेत. त्यांपैकी सुमारे साडेतीनशे प्रभाव क्षेत्रांतील रेडी रेकनरमध्ये मोठी वाढ सूचविण्यात आल्याचे समजते. पिंपरी, तसेच नगरपालिका क्षेत्रातील पावणेचारशे मूल्य विभागांमध्येही वाढ प्रस्तावित आहे. त्याच थेट परिणाम सदनिकांच्या किमतींमध्ये वाढ होण्यामध्ये होणार आहे.

बांधकाम व्यवसायावर सध्या मंदीचे सावट आहे. ग्राहकांची क्रयशक्तीही कमी झाली आहे. अशा परिस्थितीत रेडी रेकनरचे दर कमी होण्याची आशा असताना मुद्रांक व नोंदणी विभागाने त्यात वाढ प्रस्तावित केल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. रेडी रेकनरचे दर वास्तववादी नसल्याने आणि दस्तनोंदणी करताना 'एलबीटी'पोटी एक टक्का अतिरिक्त मुद्रांक शुल्क घेतले जात असल्याने त्याचा ग्राहकांवर नाहक बोजा पडत आहे.

दरम्यान, मंदीची चर्चा होत असली तरी शहरात प्रत्यक्षात ज्या दराने फ्लॅटची विक्री होत आहे, त्याचीच सरासरी काढून रेडी रेकनरचे दर ठरविण्यात येत असल्याचा मुलामा मुद्रांक व नोंदणी विभागाकडून देण्यात येत आहे. एखाद्या विभागातील वा प्रभाव क्षेत्रात झालेल्या फ्लॅट विक्रीच्या आधारेच हे दर निश्चित करण्यात येत असल्याचे या विभागाच्या अधिकाऱ्यांनी बैठकीत स्पष्ट केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

योगाभ्यास करा... शिक्षेत सूट मिळवा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

राज्यातील सर्व तुरुंगातील शिक्षा झालेल्या कैद्यांसाठी येत्या जानेवारी महिन्यापासून योगासनांचे वर्ग सुरू केले जाणार आहेत. योगाभ्यास पूर्ण झाल्यानंतर कैद्यांची परीक्षा घेतली जाणार असून त्यामध्ये उत्तीर्ण होणाऱ्या कैद्यांना शिक्षेत सूट दिली जाणार आहे, अशी माहिती राज्याच्या कारागृह विभागाचे प्रमुख आणि अतिरिक्त पोलिस महासंचालक डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांनी दिली. यामुळे जास्तीत जास्त कैदी योगाकडे वळण्यास मदत होणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

येरवडा मध्यवर्ती तुरुंगात योगवर्गाला शुक्रवारी सुरुवात करण्यात आली. या वेळी डॉ. उपाध्याय यांनी कैद्यांना योगासंबंधी माहिती कैद्यांना दिली. याप्रसंगी येरवडा तुरुंगचे उपअधीक्षक कौस्तुभ कुर्लेकर, वरिष्ठ तुरूंग अधिकारी प्रदीप जगताप आदी अधिकारी उपस्थित होते.

डॉ. उपाध्याय यांनी सांगितले, 'येरवडा तुरुंगात कैद्यांसाठी योगाचे क्लास सुरू करण्यात आले आहेत. त्यांना थिअरी आणि प्रात्यक्षिक असे दोन्हीचे शिक्षण दिले जाणार आहे. थिअरीचे वर्ग आठवड्यातून एकदा मी स्वतः घेणार आहे. तर, लोणावळा येथील कैवल्याधाम संस्थेकडून योगाचे प्रात्यक्षिक घेतले जाईल. राज्यातील तुरुंगात जानेवारी महिन्यापासून योगवर्ग सुरू केले जाणार आहेत.'

'योगविद्या ही प्राचीन विद्या आहे. मन व शरीर आणि माणसाला माणसाशी जोडण्याचे काम योगा करते. त्यामुळे कैद्यांना योगाचा शास्त्रीय आधार, त्याचे महत्व थिअरीच्या माध्यमातून शिकवले जाणार आहे. शिक्षा झालेल्या कैद्यांसाठी हे क्लास सुरू केले जाणार आहे. क्लास पूर्ण झाल्यानंतर कैद्याची परीक्षा घेतली जाणार आहे. त्यामध्ये उत्तीर्ण होणाऱ्या कैद्यांना शिक्षेत माफी मिळणार आहे. जेलच्या अतिरिक्त पोलिस महासंचालकांना कैद्याची वर्षातून एकदा तीन महिन्यांपर्यंत शिक्षा माफ करण्याचे अधिकार आहेत. त्यामुळे जास्तीत जास्त कैदी योगा शिकण्यास तयार होतील. त्यातून कैद्यांमध्ये नक्कीच सुधारणा होईल,' असे डॉ. उपाध्याय यांनी स्पष्ट केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images

<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>
<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596344.js" async> </script>