Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

शहा, सिंग, सोमय्या नियामक मंडळावर

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाच्या (एफटीआयआय) नियामक मंडळावर ज्येष्ठ सिनेपत्रकार भावना सोमय्या, ज्येष्ठ अभिनेता सतीश शहा आणि ज्येष्ठ निर्माता दिग्दर्शक बी. पी. सिंग यांची नियुक्ती करण्यात आली.

ही नियुक्ती करण्यात आल्याचा निर्णय केंद्र सरकारच्या माहिती व प्रसारण मंत्रालयाने प्रसिद्ध केला आहे. अभिनेता गजेंद्र चौहान आणि अन्य चार सदस्यांच्या नियुक्तीला विरोध करत विद्यार्थ्यांनी सुमारे १४० दिवस संप केला होता. सरकारनियुक्त समितीतील अभिनेत्री पल्लवी जोशी, दिग्दर्शक संतोष सिवन आणि जहानू बरुआ या सदस्यांनी राजीनामा दिला होता. त्यामुळे या तीन जागा रिक्त झाल्या होत्या.

भावना सोमय्या या ज्येष्ठ सिनेपत्रकार आहेत. भारतीय चित्रपटांवर आधारित १२ पुस्तकांचे लेखन त्यांनी केले आहे. अनेक विनोदी भूमिकांमुळे अभिनेता सतीश शहा यांची स्वतःची ओळख आहे, तर बी. पी. सिंग हे 'एफटीआयआय'चे माजी विद्यार्थी असून, सीआयडी या मालिकेचे निर्माता-दिग्दर्शक आहेत. गाजलेली 'आहट' ही मालिकाही त्यांनीच दिग्दर्शित केली होती.
....

'नव्या नियुक्त्यांबाबत काही बोलण्यापूर्वी आधीच राजीनामा दिलेल्या पल्लवी जोशी, संतोष सिवन आणि जहानू बरुआ यांनी का राजीनामा दिला, याचे कारण समजून घेण्याचा प्रयत्न सरकारने का केला नाही? पाच अयोग्य लोकांना संस्था आणि विद्यार्थ्यांच्या माथी मारण्याचा सरकारचा सातत्याने प्रयत्न सुरू आहे. प्रश्न पात्रता आणि योग्यतेचा नाही. आधीच्याच नियुक्त्यांतून सरकारने त्यांची वृत्ती दाखवून दिली आहे.'
- यशस्वी मिश्रा, विद्यार्थी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


थंडी वाढली; पारा १४.१ अंशांवर

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

दिवाळीच्या संगतीने पसरलेल्या गारव्याने शहरात मुक्काम वाढवला असून, शुक्रवारी पारा आणखी घसरला. वेधशाळेत शुक्रवारी १४.१ अंश सेल्सियस अशा नीचांकी तापमानाची नोंद झाली. पुढच्या दोन दिवसांत थंडीचा जोर काहीसा कमी होण्याचा अंदाज असून, आकाश अंशतः ढगाळ राहण्याचे संकेत हवामान खात्याने दिले आहेत.

गेल्या आठवड्यापासून शहरात किमान तापमानात सातत्याने घट होत आहे. दोनच दिवसांपूर्वी पारा १५ अंशांच्या खाली उतरला होता. शुक्रवारी त्यात आणखी घट झाली. त्यामुळे पहाटेसह सकाळी नऊ-दहा वाजेपर्यंत हवेत गारठा जाणवत आहे; तसेच, रात्री उशिराची थंडी बोचरी होऊ लागली आहे.

पुढील दोन दिवसांत हीच परिस्थिती कायम राहण्याची शक्यता असून, किमान तापमान १५ अंशांच्या जवळपास राहील, अशी शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे. मध्य अरबी समुद्रावर असलेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे पुढील दोन दिवसांत आकाश अंशतः ढगाळ राहण्याचा अंदाज आहे. त्यानंतर पुन्हा थंडीत वाढ होण्याचे संकेत देण्यात आले आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

स्पर्धेपूर्वीच पुण्यावर शिक्कामोर्तब?

$
0
0

ब्रिटनच्या आश्वासनानंतर इंदूर आणि अमरावतीचेही स्थान निश्चित होणे शक्य

म. टा. प्रतिनिधी, पुणे

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ब्रिटनच्या दौऱ्यात पंतप्रधान डेव्हिड कॅमेरॉन यांनी स्मार्ट सिटीसाठी पुण्याला सहकार्य केले जाणार असल्याचे आश्वासन दिल्याने पहिल्या २० शहरांत पुण्याची निवड होणाच्या शक्यतेला बळकटी मिळत आहे. पुण्यासह इंदूर आणि अमरावतीच्या स्मार्ट सिटी प्रकल्पासाठी साह्य करण्याचे ब्रिटन सरकारने मान्य केल्याने या शहरांनाही प्रथम यादीत स्थान मिळण्याची शक्यता आहे.

स्मार्ट सिटीसाठी केंद्राची स्पर्धा संपण्यास आणखी महिन्याभराचा कालावधी असतानाच, ही नावे जाहीर करण्यात आल्याने त्याबाबत आक्षेप घेतला जाण्याची चिन्हे आहेत. शहरातील प्रमुख शहरांचा कायापालट करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्मार्ट सिटी योजना जाहीर केली. पहिल्या टप्प्यात देशभरातून शंभर शहरांची निवड केल्यानंतर आता त्यातील २० सर्वोत्तम शहरांना स्मार्ट सिटी योजनेद्वारे पहिल्या वर्षीचा निधी प्राप्त होणार आहे. त्यासाठी, सल्लागारांच्या माध्यमातून केंद्र सरकारला अहवाल सादर करणे अपेक्षित आहे. केंद्राने १५ डिसेंबर अशी अंतिम मुदत त्यासाठी दिली आहे. परंतु, तत्पूर्वीच पुणे, अमरावती आणि इंदूर ही शहरे स्मार्ट करण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य केले जाईल, असे ब्रिटनतर्फे नुकतेच जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे, या शहरांना पहिल्या यादीत निश्चित स्थान मिळणार असल्याचे मानले जात आहे. स्मार्ट सिटीची स्पर्धा अंतिम टप्प्यात असताना, अशा प्रकारे काही ठराविक शहरांसाठी झुकते माप दिले गेल्यास, त्याला विरोध होण्याची शक्यता आहे.


मग आटापिटा कशासाठी?

गेल्या तीन महिन्यांपासून स्मार्ट सिटी योजनेत पुण्याला स्थान मिळावे, यासाठी महापालिकेतर्फे जोरदार तयारी सुरू आहे. घरोघरी जाऊन नागरिकांकडून त्या संदर्भातील अर्ज भरून घेण्यापासून ते अधिकारी-कर्मचाऱ्यांना विविध कामांमध्ये गुंतवण्यापर्यंत, पालिकेमध्ये सध्या चर्चा फक्त स्मार्ट सिटीचीच आहे. स्पर्धा संपण्यापूर्वीच पुण्याचे नाव निश्चित असेल, तर मग एवढा आटापिटा कशासाठी केला, अशी विचारणा केली जात आहे. तसेच, हे 'मॅच फिक्सिंग' तर नाही ना, असा सवालही उपस्थित केला जात आहे.
.............

'केंद्राच्या स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत निवड झालेल्या शहरांना स्मार्ट सिटी चे नियोजन, रचना आणि प्रत्यक्ष उभारणी यासाठी ब्रिटिश कंपन्यांचे सहकार्य मिळणार आहे. पुणे शहर देशातील सर्वोत्तम स्मार्ट सिटी बनविण्यासाठीच्या माझ्या प्रयत्नांच्या दृष्टीने ही खूप अभिमानाची गोष्ट आहे.'
- अनिल शिरोळे,
खासदार

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

हरित आच्छादन १५ टक्क्यांपर्यंत वाढवा

$
0
0

>> दर वर्षी लहान मुलांसाठी एक क्रीडांगण निर्माण करा
>> अमृत योजनेमध्ये केंद्राचे सर्व शहरांना निर्देश

suneet.bhave@timesgroup.com

केंद्र सरकारच्या 'अमृत' योजनेमध्ये विविध क्षेत्रात कराव्या लागणाऱ्या सुधारणा आणि त्यासाठीची कालमर्यादा निश्चित करण्यात आली असून, पुढील पाच वर्षांमध्ये शहरातील हरित आच्छादन (ग्रीन कव्हर) १५ टक्क्यांपर्यंत वाढवा, असे स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत. तसेच, लहान मुलांसाठी खेळण्याच्या मैदानांची कमतरता लक्षात घेऊन, दर वर्षी 'चिल्ड्रेन पार्क' उभारण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

स्मार्ट सिटी योजनेसह एक लाखांपेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या शहरांमधील पायाभूत सुविधांच्या विकासासाठी 'अमृत' योजनाही जाहीर करण्यात आली. यामध्ये, राज्यातील ४२ शहरांचा समावेश केला गेला आहे. या शहरांमध्ये विविध क्षेत्रांत कोणकोणत्या सुधारणा अपेक्षित आहेत, याचा सविस्तर आराखडाच केंद्र सरकारने सर्वांना पाठविला असून, त्याची विहित कालमर्यादाही ठरवून देण्यात आली आहे.

वाढत्या नागरीकरणाच्या रेट्यामध्ये सर्वच शहरांचा चेहरामोहरा बदलत असून, पर्यावरणाचे संतुलन बिघडत असल्याची टीका केली जात आहे. त्यामुळे, शहरांमधील ग्रीन कव्हर १५ टक्क्यांपर्यंत वाढविण्याची अट घालण्यात आली आहे. पुढील सहा महिन्यांमध्ये हे ग्रीन कव्हर १५ टक्क्यांपर्यंत कसे वाढविता येईल, याचा 'मास्टर प्लॅन' तयार करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

नगर नियोजन, ई-गव्हर्नन्स, बांधकाम नियमावली, पालिका करप्रणाली, ऊर्जा आणि पाण्याचे ऑडिट, शुल्कवसुली मर्यादा, क्रेडिट रेटिंग अशा विविध क्षेत्रांत सहा महिने ते तीन-पाच वर्षांपर्यंत कोणकोणत्या सुधारणा करायला हव्यात, याचा आराखडाच केंद्र सरकारने तयार केला आहे. प्रत्येक स्थानिक स्वराज्य संस्थेच्या स्वतंत्र वेबसाइट, न्यूजलेटरपासून ते बांधकाम परवानगीची नियमावलीचे पुनरावलोकन आणि पाणीगळती २० टक्क्यांहून कमी करण्यापर्यंतची अनेक उद्दिष्टे केंद्राने आखून दिली आहेत.

काही महत्त्वाची उद्दिष्टे

निकष - कालमर्यादा

स्थानिक स्वराज्य संस्थेची वेबसाइट - ६ महिने
उद्याने, क्रीडांगणाच्या देखभालीसाठी सार्वजनिक-खासगी सहभाग - १२ महिने
पथदिवे आणि पाणीवापराचे ऑडिट - १२ महिने
क्रेडिट रेटिंग - १८ महिने
ऑनलाइन जन्म-मृत्यू आणि विवाह नोंदणी २४ महिने
कचरा संकलन, कचरा वाहतूक आणि शास्त्रशुद्ध विल्हेवाट - ३६ महिने

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ग्रीन बेल्टमध्ये होणार विकास

$
0
0

डीसी रुल्समधील तरतुदींमुळे नदीकिनाऱ्यावर कामे शक्य

म. टा. प्रतिनिधी, पुणे

शहराचा विकास आराखडा (डीपी) तयार करण्यासाठी राज्य सरकारने नेमलेल्या त्रिसदस्य समितीने विकास नियंत्रण नियमावलीमध्ये (डीसी रुल्स) ग्रीन बेल्टमध्ये विशिष्ट प्रकारची विकासकामे करण्याचे प्रस्तावित केले आहे. यामुळे नदीच्या ग्रीन बेल्टमध्ये गार्डन, शेती, सायकल ट्रॅक यासह फूटपाथ, बोट क्लब; तसेच नदीकिनाऱ्याचा विकास करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

शहराचा डीपी तयार करण्यासाठी शासनाने विभागीय आयुक्त एस. चोक्कलिंगम यांच्या अध्यक्षतेखाली नियुक्त केलेल्या समितीने डीसी रुल्स प्रसिद्ध करून ते सरकारकडे पाठविले आहेत. त्यामध्ये नदीच्या किनाऱ्यावर विविध कामे करण्याचे प्रस्तावित करण्यात आले आहे. यामुळे नदीकिनारी असलेल्या ग्रीन बेल्टमध्ये विकास कामे करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. नदीच्या बाजूला विकासकामे करायची झाल्यास महापालिका प्रशासनाला अनेक अडचणींना तोंड द्यावे लागते. नदीच्या कडेला विकास करण्यासाठी शहरातील स्वयंसेवी संस्थांचा विरोध आहे. पालिकेने कामे सुरू केल्यानंतर राष्ट्रीय हरित लवादाकडे (एनजीटी) धाव घेऊन त्या विरोधात दाद मागितली जाते. एनजीटीकडे अनेक खटले प्रलंबितही आहेत. या पार्श्वभूवी डीसी रुल्समध्ये बदल करण्यात आल्याने विकास कामांचा मार्ग मोकळा झाल्याचे बोलले जात आहे.

गुजरात, अहमदाबाद येथील साबरमती नदीवर करण्यात आलेल्या नदी सुधारणा प्रकल्पासारखा प्रकल्प पुण्यात करावा, असा प्रस्ताव पालिका आयुक्त कुणाल कुमार यांनी काही दिवसांपूर्वी चर्चेसाठी आणला होता. शहरातील मुळा-मुठा नदीचा विकास साबरमतीप्रमाणे करण्याचा प्रयत्न आयुक्त कुमार यांचा आहे. या प्रकल्पासाठी आवश्यक तो सल्लागार नेमण्याचा प्रस्तावही मंजुरीसाठी ठेवण्यात आला होता. अहमदाबाद नदीच्या कडेला ज्या कंपनीने काम केले, त्याच कंपनीला पुण्यातही काम देण्यासाठी आयुक्त प्रयत्नशील आहेत. डीसी रुल्समध्ये नदीकिनारी विकास कामे करता येतील, असे स्पष्ट करण्यात आल्याने अनेक अडथळे दूर झाले आहेत. नदीच्या बाजूला झाडे लावणे, सायकल ट्रॅक तयार करणे, गार्डन करणे याबरोबरच स्विमिंग टँक, ऊर्जानिर्मिती केंद्र उभारणे अशी कामे करणेही महापालिकेला सहज शक्य होणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वापरात नसलेल्या शब्दांची ‘टिवटिव’

$
0
0

स्वप्नील शिंगोटे या इंजिनीअर तरुणाचा पुढाकार

Chinmay.patankar@timesgroup.com

पुणे : वापरात नसलेले मराठी शब्द पुन्हा वापरात येण्यासाठी इंजिनीअर असलेला स्वप्नील शिंगोटे हा तरुण प्रयत्नशील आहे. ट्विटरवर 'आजचा शब्द' या हँडलच्या माध्यमातून जुने मराठी शब्द पुन्हा वापरात आणण्याचा प्रयत्न करत असून, त्याच्या प्रयत्नांना उत्तम प्रतिसादही लाभतो आहे. त्यामुळे वापरात नसलेल्या या शब्दांची ट्विटरवर 'टिवटिव' होत आहे.

सोशल मीडियात मराठीचा वापर होत नसल्याची बातमी स्वप्नीलच्या वाचनात आली होती. त्यामुळे सोशल मीडियात मराठीचा वापर वाढवण्यासाठी त्याने सुरुवातीला काही जुने मराठी शब्द व्हॉट्पअॅपच्या माध्यमातून वापरण्यास सुरुवात केली. मित्रमंडळींकडून त्याला चांगला प्रतिसाद मिळाल्याने त्याने ट्विटर हँडल सुरू केले. गेल्या वर्षभरात त्याचे साडेतीन हजारहून अधिक फॉलोअर्स आहेत. वापरात नसलेला एक शब्द रोज या हँडलवर त्याच्या अर्थासह पोस्ट केला जातो. आतापर्यंत घोणशा (सुस्त, आळशी) , मेधावी (कुशाग्र बुद्धिमत्तेचा), विहनन (हत्या), रिघाव (शिरकाव, प्रवेश, वाट), निष्पादित (निर्माण केलेले), निष्णा (धार लावण्याचा दगड), गिरिकंदर (गुहा, कपार) असे कित्येक शब्द आणि त्याचे अर्थ या हँडलवरून देण्यात आले आहेत.

'आजचा शब्द' या हँडलविषयी स्वप्नीलने 'मटा'ला माहिती दिली. 'अत्यंत अर्थपूर्ण असे कित्येक शब्द आज वापरात नाही. भाषेची शब्दसंपत्ती कायम ठेवण्यासाठी जुने शब्द वापरात येणे गरजेचे आहे. तेच काम हँडलच्या माध्यमातून करण्यात येत आहे. त्याला चांगला प्रतिसादही मिळत आहे. हँडलवरून देण्यात आलेल्या शब्दांव्यतिरिक्त फॉलोअर्सकडूनही काही शब्दांचे अर्थ विचारण्यात येतात ही सकारात्मक बाब आहे. तसेच इंग्रजी शब्दांना पर्यायी मराठी शब्दही विचारले जातात. शब्दकोशातून जुने शब्द निवडून अर्थासह हँडलवर दिले जातात. ते रिट्विट होऊन जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्यास मदत होते,' असे स्वप्नीलने सांगितले.

दोन मोहिमा

केवळ जुने शब्द वापरात आणण्यापुरते मर्यादित न राहता मराठीचा वापर वाढवण्यासाठीही प्रयत्न करण्यात आले. त्यासाठी हॅशटॅग हरवलेले शब्द आणि हॅशटॅग नवा शब्द या मोहिमाही राबवण्यात आल्या. त्यालाही उत्तम प्रतिसाद मिळाला. अनेक शब्द या निमित्ताने पुढे आले.

मराठीचा वापर वाढतोय

नियमितपणे मराठीचा वापर करणारी किमान चारशे ते पाचशे हँडल ट्विटरवर असल्याचे निरीक्षणही स्वप्नीलने नोंदवले. अलीकडेच ट्विटरने देवनागरीत हॅशटॅग सुरू केला. आता मोबाइलवरही मराठी की बोर्ड उपलब्ध झाल्याने स्वाभाविकच मराठीचा वापर वाढतो आहे. सोशल मीडियात वापरले जाणारे मराठीचे प्रमाण पाहता, तरुण पुन्हा मराठीकडे वळत असल्याचे दिसून येते, असेही स्वप्नीलने सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विष देऊन बिबट्याची शिकार

$
0
0

सिंहगड परिसरातील प्रकार; आरोपीला सोमवारपर्यंत कोठडी

म. टा. प्रतिनिधी, पुणे

घरातील शेळ्यांची शिकार करीत असल्याच्या रागातून शेतकऱ्याने बिबट्याची शिकार केल्याचा प्रकार नुकताच सिंहगड परिसरामध्ये उघडकीस आला. विष देऊन बिबट्याची हत्या केल्यानंतर त्याची पायांची नखे आणि दात काढून शेतकऱ्याने मृतदेह दरीत फेकला. या प्रकरणी वन विभागाने आरोपीला बिबट्याचे तोडलेले पंजे आणि दातांसह ताब्यात घेतले आहे.

सिंहगडाच्या पश्चिमेला असलेल्या राजणे या गावात (ता. वेल्हे) दोन दिवसांपूर्वी हा प्रकार उघडकीस आला. नथू गेनबा तामकर (वय ६०) असे या आरोपीचे नाव असून कोर्टाने त्याला सोमवारपर्यंत (१६ नोव्हेंबर) वन विभागाची कोठडी सुनावली आहे.

सिंहगड-पानशेतच्या जंगलांमध्ये मोठ्या प्रमाणात राखीव वन असून गेल्या अनेक वर्षांपासून या भागात बिबट्यांचा वावर आहे. गेल्या चार-पाच महिन्यांत सिंहगडच्या सभोवताली असलेल्या गावांतील गाई, म्हशी आणि शेळ्यांची बिबट्याने शिकार केल्याच्या घटना उघडकीस आल्या होत्या. सिंहगडच्या पायथा, घाट रस्त्यावरही गावकऱ्यांनी बिबट्याला फिरताना पाहिले. माझ्या पाळलेल्या शेळ्यांची बिबट्याने काही दिवसांपूर्वीच शिकार केली होती. वारंवार होणाऱ्या या शिकारींना कंटाळून आलेल्या रागातूनच हे कृत्य केले आहे, असे तामकर याने वनाधिकाऱ्यांना सांगितले.

बिबट्याच्या शिकारीचा प्रकार चार दिवसांपूर्वी घडला. तामकर याने त्याच्याकडील मेलेल्या शेळीच्या मासांत विषारी औषध घालून तिला गावाजवळील घनदाट जंगलात टाकले. त्याच परिसरात फिरणाऱ्या बिबट्याने रात्री त्या शेळीचा फडशा पाडला आणि विषबाधेमुळे तो तिथेच मरून पडला. दुसऱ्या दिवशी तामकरने घटनास्थळी जाऊन बिबट्याचे चारही पंजे कापले, दात आणि मिशाही कापल्या. हे सर्व अवयव एका पिशवीत भरून तो घरी आला. घराच्या पाठीमागील पडवीमध्ये त्याने ही पिशवी ठेवली होती, अशी माहिती सहायक वनसंरक्षक विजय माने यांनी दिली.

आम्हाला दोन दिवसांपूर्वी या परिसरातील काही खबऱ्यांकडून बिबट्याची शिकार झाल्याची माहिती मिळाली. वन कर्मचाऱ्यांनी शोध घेतल्यावर तामकरवर संशय आला. वनपरिक्षेत्र अधिकारी जहाँगीर शेख यांसह शोध पथकाने त्याच्या घरी छापा घातला. त्याने रात्री गुन्हा कबलू करून मुद्देमाल ताब्यात दिला. तामकरने बिबट्याचे अवयव तोडून त्याला पाचशे फूट खोल दरीत फेकून दिले होते. दरीमध्ये दिवसभर शोध मोहीम केल्यानंतर बिबट्याचा मृतदेह आढळून आला. गुरुवारी बिबट्याची कायदेशीर प्रक्रियेनुसार विल्हेवाट लावण्यात आली. डॉ. संभाजी प्रधान यांनी केलेल्या शवविच्छेदनामध्ये विषबाधेमुळे बिबट्याचा मृत्यू झाल्याचे सांगितले आहे, असे माने यांनी सांगितले.

मृत्यूमागे तस्करांचा हात?

सिंहगड घेरा परिसर ते वेल्ह्यातील अनेक गावांना लागून घनदाट जंगल आहे. या भागात वन्यजीवांचे प्रमाणही उल्लेखनीय असून स्थानिक लोक लहान प्राण्यांची नियमित शिकार करीत असल्याचे आरोप वन्यप्राणीप्रेमींनी वारंवार केले आहेत. या भागात वन्यप्राण्यांची तस्करी करणाऱ्या टोळ्याही कार्यरत असल्याचे गावकऱ्यांचे म्हणणे आहे. तामकर याने केलेली बिबट्याची शिकार ही शेळीच्या रागातून नव्हे, तर बिबट्याची नखे, आणि दातांच्या तस्करीसाठीच केली असल्याची चर्चा गावामध्ये सुरू आहे.

मधमाशांचा वनाधिकाऱ्यांवर हल्ला

वन्यजीव संवर्धन कायद्यानुसार बिबट्याचा मृतदेह जाळणे बंधनकारक आहे. त्यानुसार शवविच्छेदन झाल्यावर वनाधिकारी वन क्षेत्रात बिबट्याचा मृतहेदाची विल्हेवाट लावण्यासाठी गेले असताना, त्यांच्यावर मधमाशांनी हल्ला केला. वनाधिकाऱ्यांनी प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला मात्र अधिकारी आणि कर्मचारी दोघेही या हल्ल्यामुळे जखमी झाले. मृतदेहाची विल्हेवाट पूर्ण होईपर्यंत त्यांना जागा सोडता आली नाही.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पुढचे वर्ष चांगल्या पावसाचे

$
0
0

उन्हाळ्यात एल निनोची तीव्रता कमी होण्याचा अंदाज

>> मयुरेश प्रभुणे, पुणे

देशातील यंदाच्या दुष्काळी स्थितीला कारणीभूत ठरलेला 'एल निनो' हा घटक येत्या दोन महिन्यांत त्याच्या सर्वोच्च पातळीवर पोचणार असल्याचा अंदाज अमेरिकेच्या क्लायमेट प्रेडिक्शन सेंटरने (सीपीसी) दिला आहे. मात्र, त्याचबरोबर येत्या फेब्रुवारीपासून त्याची तीव्रता झपाट्याने कमी होण्याची शक्यताही वर्तवण्यात आली आहे. भारतासाठी हा अंदाज मोठा दिलासा देणारा असून, पुढील वर्षीचा मान्सून सर्वसाधारण राहण्याची शक्यता यामुळे बळावली आहे.

'सीपीसी'तर्फे दर महिन्याला एल निनोच्या स्थितीचा अहवाल आणि पुढील काळातील स्थितीचा अंदाज वर्तवण्यात येतो. गेल्या वर्षीपासून प्रथमच प्रशांत महासागराचे तापमान कमी होण्याचा अंदाज अमेरिकेच्या या संस्थेने वर्तवला आहे. जगभरातील सतरा गतिमान प्रारूप (डायनॅमिक मॉडेल) आणि आठ सांख्यिकी प्रारूप (स्टॅटिस्टिकल मॉडेल) यांचा आधार घेऊन हा अंदाज वर्तवण्यात येतो. एप्रिल २०१५मध्ये सीपीसीने वर्तवलेल्या अंदाजानुसार यंदाच्या मान्सूनवर सबंध हंगामात 'एल निनो'चे सावट राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती. ती खरी ठरून देशाच्या अनेक भागांत अपुरा पाऊस पडला.

'सीपीसी'ने नुकत्याच जारी केलेल्या अंदाजानुसार एल निनो हिवाळ्यामध्ये (नोव्हेंबर - डिसेंबर- जानेवारी) त्याच्या सर्वोच्च पातळीवर पोचण्याची शक्यता असून, मध्य आणि पूर्व प्रशांत महासागराच्या पृष्ठभागाचे तापमान सरासरीपेक्षा दोन अंशांहून अधिक नोंदले जाण्याची शक्यता आहे. इतक्या तीव्रतेची एल निनो घटना १९५० पासून फक्त तिसऱ्यांदाच घडत आहे. मात्र, फेब्रुवारी- मार्चपासून प्रशांत महासागराचे तापमान झपाट्याने कमी होण्याची शक्यता असून पुढील उन्हाळ्यात ते त्याच्या सामान्य पातळीवर (न्यूट्रल) पोचू शकते.

एल निनोची न्यूट्रल स्थिती किंवा ला निनाची (सरासरीपेक्षा कमी तापमान) स्थिती असताना भारतात मान्सून सरासरी गाठण्याची शक्यता सर्वाधिक असते असे आकडेवारी सांगते. दुष्काळी स्थितीशी सामना करणाऱ्या महाराष्ट्रासाठी हा नक्कीच दिलासादायक अंदाज आहे.

यंदाही गारपिटीचा धोका?

हिवाळ्यात एल निनोची तीव्रता वाढण्याच्या शक्यतेमुळे पुढील तीन ते चार महिन्यांमध्ये राज्यात पुन्हा गारपीटीच्या घटना घडू शकतात, असा इशारा हवामानतज्ञांनी दिला आहे. ज्येष्ठ हवामानशास्त्रज्ञ डॉ. जीवनप्रकाश कुलकर्णी म्हणाले, 'दोन वर्षांमध्ये ज्या स्थितीत गापिटीच्या घटना घडल्या तशीच स्थिती यंदाही कायम आहे. पश्चिमेकडून येणारे थंड वाऱ्यांचे प्रवाह एल निनोमुळे मध्य भारतातून वाहण्याची शक्यता असून, तसे झाल्यास महाराष्ट्रासह मध्य भारताला पुन्हा गारपिटीचा फटका बसू शकेल. गारपिटीची शक्यता गृहीत धरून शेतकऱ्यांनी योग्य त्या उपाययोजना करायला सुरुवात करावी.'

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


कमला लक्ष्मण यांचे निधन

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औंध

प्रसिद्ध व्यंगचित्रकार आर. के. लक्ष्मण यांच्या पत्नी कमला लक्ष्मण यांचे शनिवारी प्रदीर्घ आजाराने निधन झाले. त्या ८९ वर्षाच्या होत्या. त्यांच्या पश्चात मुलगा श्रीनिवासन, सून उषा, नात महालक्ष्मी असा परिवार आहे.कमला लक्ष्मण यांचा जन्म २२ ऑगस्ट १९२६ रोजी झाला. त्यांनी लहान मुलांसाठी संस्कारक्षम पुस्तके लिहिली होती. तसेच त्यांचा रामायण, महाभारताचादेखील चांगला अभ्यास होता. थम्मावर (लहान हत्ती) लहान मुलांसाठी लिहिलेल्या त्यांच्या पुस्तकासाठी आर. के. यांनीच चित्रे काढली होती. त्यांचे पुस्तकही प्रसिध्द आहे.

'द स्टार आय नेव्हर मेट' या फिल्मफेअर मासिकातील आपल्या कार्टून्सच्या मालिकेत लक्ष्मण यांनी कमला यांचे कार्टून काढून 'द स्टार आय ओन्ली मेट' असे शीर्षकही दिले होते. कमला या सतत आरकेंची काळजी घेत असत. कोणत्याही सार्वजनिक कार्यक्रमात, समारंभात कमला त्यांच्यासोबत असत. आरकेंना २००३मध्ये पक्षाघाताचा झटका आला. त्यानंतर काही वर्षांपूर्वी आरकेंना पुन्हा पक्षाघाताचा झटका आला. त्यात त्यांची वाचा गेली. तेव्हापासून कमला याच आरके यांचा आवाज बनल्या होत्या. लक्ष्मण यांच्या भावना जाणून घेऊन त्या नेहमी आलेल्या सर्वांशी संवाद साधत. गेल्या जानेवारीमध्ये आरके यांचे निधन झाल्यावर कमला यांची तब्येत खालावली. त्यातच, शनिवारी दुपारी चारच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली.

सिम्बायोसिसचे संस्थापक डॉ. शां. ब. मुजुमदार, काँग्रेस शहराध्यक्ष अभय छाजेड, माजी आमदार उल्हास पवार, माजी महापौर दत्तात्रय गायकवाड यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तूरडाळ पुन्हा महाग

$
0
0

घाऊक बाजारात क्विंटलमागे सातशे रुपयांनी दरवाढ

म. टा. प्रतिनिधी, पुणे

स्वस्तातील तूरडाळ सरकारकडून विकत घेतली जात असताना सुरुवातीला तूरडाळीचे दर उतरले होते. परंतु, तुटवडा निर्माण झाल्याने क्विंटलमागे ७०० रुपयांची वाढ झाल्याने गावरान तूरडाळ पुन्हा महाग झाली. त्यामुळे किलोसाठी ग्राहकांना घाऊक बाजारात १६२ रुपये मोजावे लागणार आहेत.

तूरडाळीचे यंदाच्या वर्षी पीक कमी असल्याचा फटका उत्पादनासह ग्राहकांना बसू लागला आहे. त्यामुळे गेल्या दोन महिन्यांपासून तूरडाळीचे दर गगनाला भिडले आहे. त्यात शिवसेना भाजपाच्या सरकारने दरावरून राजकारण सुरु केले. राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री व पालकमंत्री गिरीश बापट यांनी शंभर रुपयांत एक किलो तूरडाळ देण्याच आश्वासन दिले. त्या आश्वासनाची पूर्ती झाली खरी पण प्रत्यक्षात ५० ते ६० हजार किलो एवढीच तूरडाळ पुण्यात शंभर रुपये दराने विकली गेली. मात्र, ग्राहकांची मागणी अधिक होत असताना डाळ उपलब्ध होत नसल्याने ग्राहकांनी नाराजी व्यक्त केली आहे.

दरम्यान, ''एकीकडे स्वस्तातील तूरडाळ उपलब्ध होत नसताना डाळींचे गेल्या आठवड्यात १६५ रुपयांवरून १५५ रुपयांवर दर उतरले आहेत. परंतु, दोन दिवसांत गावरान तूरडाळीचा डाळींच्या मिल्सकडे तुटवडा निर्माण झाला आहे. परिणामी, १५५ रुपयांवरून तूरडाळ पुन्हा सात रुपये किलो दराने वाढून १६२ रुपये किलोपर्यंत घाऊक बाजारात पोहोचली आहे. त्यामुळे घाऊक बाजारात तूरडाळीचे १३ हजार ते १६ हजार २०० रुपयांपर्यंत क्विंटलचे दर झाले आहेत, अशी माहिती डाळींचे व्यापारी विजय राठोड यांनी दिली.

क्विंटलमागे ७०० ते ८०० रुपयांची वाढ झाल्याने तूरडाळ पुन्हा महाग झाली आहे.ऐन दिवाळीतही डाळींकडे ग्राहकांनी पाठ फिरविली होती. आता तूरडाळ वाढली असली तरी अन्य डाळींच्या दरावर कोणताही परिणाम झाला नाही. सध्या राज्यातील विविध ठिकाणच्या डाळ मिल्सकडे तूरडाळ उपलब्ध नसल्याचे सांगितले जाते. १५ डिसेंबरपर्यंत राज्यात तूरडाळ नव्याने उपलब्ध होऊ शकणार नाही. १५ डिसेंबरनंतर मात्र राज्यात तूरडाळीची नव्याने आवक होऊ शकते, असा अंदाजही राठोड यांनी व्यक्त केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शिर्डीतील खुनातील सराईत गुन्हेगार अटकेत

$
0
0

अल्पवयीनाचाही​ समावेश; भोसरी पोलिसांची कामगिरी

म. टा. प्रतिनिधी, पिंपरी
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यावरील गाण्याचा मोबाइलवर रिंगटोन लावला म्हणून युवकाचा खून करून पसार झालेल्या सराईत गुन्हेगारांना भोसरी पोलिसांनी दापोडी येथून अटक केली. शिर्डी येथील बिअर बारमध्ये १६ मे २०१५ रोजी ही घटना घडली होती. या घटनेचे पडसाद राज्यभर उमटले होते. याच आरोपींनी दोन दिवसांपूर्वी कोपरगावमध्ये रस्त्यावर, नगर, शिर्डी आणि रेल्वे मार्गावर अनेक ठिकाणी दरोड्यासह विविध गुन्हे केल्याचेही उघड झाले आहे.

या प्रकरणी किरण अर्जुन अजबे (वय २१, रा. नगर), धनंजय प्रकाश काळे (१८, रा. कोपरगाव) या दोघांना अटक करण्यात आली असून, त्यांच्या अल्पवयीन साथीदारालाही ताब्यात घेण्यात आले आहे. वरिष्ठ पोलिस निरीक्षक गणेश मोरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, नगर जिल्ह्यातील हे सराईत गुन्हेगार आळंदी रस्त्यावर खोलीत भाडेतत्त्वावर राहात असल्याची माहिती खबऱ्यामार्फत मिळाली होती. माहिती मिळता भाजीमंडई येथील खोलीवर छापा मारण्यात आला. पण, तेथून पळून जाण्यात ते यशस्वी ठरले होते.

त्यानंतर अजबे आणि काळे दापोडी येथील एका महिलेच्या घरात राहात असल्याची माहिती शनिवारी (१४ नोव्हेंबर) पहाटे पथकाला मिळाली. त्यानुसार साडेपाचच्या सुमारास वरिष्ठ निरीक्षक मोरे, निरीक्षक स्वाती थोरात, फौजदार डी. बी. धुमाळ, ए. एल. गवारी, हवालदार के. के. लांडगे, एम. डी. धनगर, एस. आर. धुळे आणि एन. पी. पटेल या पथकाने दापोडी येथे छापा मारून तिघांना अटक केली. अजबे याच्यावर शिर्डी येथील शेजवळे नामक तरुणाच्या खुनासह नगर एमआयडीसी येथील दरोड्याचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे. तसेच कल्याण, दौंड, मिरज, सातारा रेल्वे मार्गावर लूटमारीच्या गुन्ह्यात यापूर्वी त्याला शिक्षा झाली आहे. त्याच्यावर शिक्रापूर येथे वाहनचोरीचे गुन्हे दाखल आहेत. धनंजय काळे आणि अल्पवयीन आरोपी यांच्यावर देखील लुटमारी आणि दरोड्याचे गुन्हे दाखल आहेत.

अशी झाली होती शिर्डीमध्ये हत्या

सागर शेजवळ (वय २१) हा तरुण नाशिकहून नातेवाइकाच्या लग्नासाठी शिर्डीला आला होता. दुपारी दीडच्या सुमारास तो चुलत भावाबरोबर बिअर बारमध्ये गेला होता. तेथे त्यांच्या मागील बाजूला आठ स्थानिक तरुण बसले होते. या वेळी सागरला एक फोन आला. त्याचवेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांवरील एका गाण्याची रिंगटोन वाजली. ती बंद करण्यावरून त्या तरुणांशी त्याचा वाद झाला. दरम्यान, तरुणांनी त्याला लाथा-बुक्क्यांनी मारहाण करून बारबाहेर आणले आणि जवळच्या जंगलात नेऊन त्याची क्रूर हत्या केली. या वेळी विशाल खोते, सोमनाथ वाडेकर, रूपेश वाडेकर आणि सुनील जाधव यांना अटक झाली होती. अन्य आरोपी फरारी होते. परस्परविरोधी आंदोलन झाल्याने शिर्डीतील वातावरण तणावपूर्ण बनले होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘स्मार्ट सिटी एक्स्पो’त पालिका आयुक्तांचा सहभाग

$
0
0

बार्सिलोना येथे होणार जागतिक परिषद

म. टा. प्रतिनिधी, पुणे

स्पेनच्या राजधानीत बार्सिलोना येथे होत असलेल्या 'स्मार्ट सिटी एक्स्पो'मध्ये राज्यातून पुणे आणि मुंबईच्या पालिका आयुक्तांना सहभागी होण्याची संधी मिळणार आहे. येत्या १७ ते १९ नोव्हेंबरदरम्यान स्पेनची राजधानी बार्सिलोना येथे स्मार्ट सिटीवरील ही जागतिक परिषद होणार आहे.

जगभरातील विविध शहरांमधील सर्वोत्तम संकल्पनांचे आदान-प्रदान व्हावे; तसेच 'स्मार्ट सिटी' विकसित करण्यासाठी नवनव्या कल्पना मांडल्या जाव्या, या हेतूने ही जागतिक परिषद होत असते. जगभरातील ४२ देशांमधील २०५ शहरांचे प्रतिनिधी त्यात सहभागी होणार आहेत. जगातील अनेक शहरे 'स्मार्ट सिटी'कडे वाटचाल करत असताना, भारतामध्येही शंभर शहरे स्मार्ट करण्याचे उद्दिष्ट केंद्र सरकारने ठरविले आहे. त्यानुसार, देशातील अहमदाबाद, लखनौ, वाराणसी, म्हैसूर, भोपाळ, चंदीगढ, कानपूर, झाँसी, रायबरेली, तिरुपती अशा अनेक शहरांतून संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थांचे प्रतिनिधी या परिषदेला उपस्थित राहणार आहेत.

राज्यातून केवळ दोनच शहरांची त्यासाठी निवड झाली असून, पुण्याचे पालिका आयुक्त कुणाल कुमार यांच्यासह मुंबई महापालिकेचे आयुक्त अजय मेहता यांना सहभागी होण्याची संधी मिळणार आहे.

पुणे-मुंबईच्या आयुक्तांचा समावेश

केंद्र सरकारच्या स्मार्ट सिटी योजनेचे परीक्षण करणारे अनेक तज्ज्ञ या परिषदेत सहभागी होणार आहेत. त्यामुळे, स्मार्ट सिटीबाबतच्या त्यांच्या अपेक्षा, कल्पना देशातंर्गत स्पर्धेत सहभागी होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांना समजाव्यात, या उद्देशाने केंद्रीय नगरविकास मंत्रालयातर्फे पाच आयुक्तांना विशेषत्त्वाने परिषदेला उपस्थित राहण्याची संधी देण्यात आली आहे. त्यात, पुणे-मुंबईचा समावेश आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पॅरिस दुर्घटनेमुळे पर्यटक संभ्रमात

$
0
0



नियोजित युरोप सहलींवर प्रश्नचिन्ह

म. टा. प्रतिनिधी, पुणे

पॅरिसमध्ये दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यामुळे सहलीसाठी निघालेल्या पर्यटकांसमोर संभ्रम निर्माण झाला. फ्रान्समध्ये आणिबाणी घोषित केल्याने आमची सहल जाणार की नाही, पुढच्या सहली रद्द झाल्या का, तेथील सुरक्षा व्यवस्थेबद्दल शंका विचारण्यासाठी ट्रॅव्हल कंपन्यांचे फोन शनिवारी दिवसभर खणखणत होते.

सध्या दिवाळीच्या सुट्या असल्याने अनेकांनी परदेशी सहलींचे नियोजन केले आहे. मागील दोन वर्षांपासून युरोपसाठी पर्यटकांची मागणी वाढली असून, पॅरिस हे लोकप्रिय ठिकाण बनले आहे. पुढील दोन आठवड्यात देशभरातील अनेक पर्यटन कंपन्यांच्या सहली युरोपला रवाना होणार आहेत. मात्र, पॅऱिसमध्ये झालेल्या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर काही सहलींवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. फ्रान्स सरकारने देशात आणिबाणी जाहीर केल्यामुळे पर्यटकांमध्ये पॅरिसबद्दल घबराट पसरली आहे. फ्रान्समध्ये विदेशी पर्यटकांनी येऊ नये, असा कोणताही आदेश तेथील सरकारने अद्याप जारी केलेला नसल्याचेही पर्यटन कंपन्यांनी स्पष्ट केले.

'आमची एक बॅच आता प्रवासात असून, आज, रविवारी ती पॅरिसला पोहोचणार आहे. दुसरी बॅच पुढील आठवड्यात पॅरिससाठी रवाना होणार आहे. कंपनीचे संचालक शनिवारी सकाळीच पॅरिसमध्ये पोहोचले. त्यांच्याकडून मला सतत माहिती समजत आहे. सध्या तेथील सरकारने सार्वजनिक वाहतूक बंद केली आहे. सुरक्षेच्या कारणास्तव संग्रहालये आणि इतर ऐतिहासिक वास्तूदेखील पर्यटकांसाठी बंद करण्यात आल्या आहेत. पण पर्यटकांच्या फिरण्यावर कोणती बंधने लादलेली नाहीत. त्यामुळे घाबरून जाण्याचे काहीच कारण नाही. फ्रान्स प्रशासनाकडून काही सूचना आल्यास आम्ही पर्यटकांसाठी दुसरा प्लॅन तयार ठेवला आहे. त्यामुळे सगळ्यांची सुरक्षितता लक्षात घेण्याबरोबरच त्यांची गैरसोय होणार नाही, याची काळजी घेतली जाईल,' असे केसरी टुर्सच्या संचालिका झेलम चौबळ यांनी सांगितले.

दरम्यान, सोशल नेटवर्किंग साइट आणि अन्य मोबाइल अॅप्लिकेशन्सवरून येणारी अर्धवट माहिती आणि अफवांवर विश्वास ठेवू नका. कोणत्याही शंका विचारण्यासाठी पर्यटन कंपनीशी थेट संपर्क साधा, असे आवाहनही कंपन्यांकडून करण्यात येत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘आयटीआय’चे वाढीव शुल्क रद्द

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

राज्यातील शासकीय व खासगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थांच्या (आयटीआय)शुल्कात केलेली वाढ रद्द करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. याचबरोबर पूर्वी विकास शुल्काच्या नावाखाली आकारण्यात आलेले शुल्कही परत करण्यात येणार आहे.

राज्य सरकारने राज्यातील सरकारी व खासगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थाच्या प्रवेश व परीक्षा शुल्कात अचानक मोठी वाढ केली होती. या शुल्क वाढीच्या विरोधात राज्यभर असंतोष होता. स्टु़डंट्स फेडरेशन ऑफ इंडियाच्या नेतृत्वाखाली राज्यभर आंदोलन करण्यात आले. शुल्क वाढीच्या शासन निर्णयाची राज्यभर होळी करण्यात आली होती. या पार्श्वभूमीवर सरकारने नुकताच अध्यादेश काढून ही शुल्क वाढ रद्द केली आहे. शुल्क वाढ रद्द करण्याचा निर्णय घेतल्याने एसएफआयने त्याचे स्वागत केले आहे.

आयटीआयमध्ये गोरगरीब, कष्टकरी वर्गातील विद्यार्थी शिक्षण घेतात. अशा संस्थांमध्ये दहापट शुल्कवाढ करणे अन्यायकारक आहे. खासगी आयटीआयमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना कोणत्याही प्रकारचे विद्यावेतन अथवा सवलत मिळत नाही. त्यामुळे एसएफआयने या विरोधात लढा दिला. नकारात्मक गुणपद्धतीविरोधातही लढा देण्यात येईल, असे संघटनेचे प्रदेशाध्यक्ष मोहन जाधव आणि सचिव दत्ता चव्हाण यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

हस्तलिखित पासपोर्ट बंद

$
0
0

२५ तारखेपासून ठरणार अवैध; नूतनीकरणाचे आवाहन

म. टा. प्रतिनिधी, पुणे

'द इंटरनॅशनल सिव्हिल एव्हिएशन ऑर्गनायझेशन'तर्फे हस्तलिखित असलेले पासपोर्ट (नॉन मशिन रिडेबल पासपोर्ट) येत्या २५ नोव्हेंबरपासून अवैध ठरणार आहेत. परदेशातील दूतावासांकडूनदेखील यापुढे व्हिसा आणि पर्यटनासाठी हे पासपोर्ट स्वीकारले जाणार नाहीत. त्यामुळे वीस वर्षांची मुदत असलेले हस्तलिखित पासपोर्टचे तातडीने नूतनीकरण करून घ्यावे, असे आवाहन पुणे पासपोर्ट कार्यालयातर्फे करण्यात आले आहे.

केंद्र सरकारने २००१नंतर नागरिकांना छायाचित्र प्रिंटेंड स्वरूपात आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केलेले पासपोर्ट देण्यास सुरुवात केली. या पूर्वी पासपोर्ट काढलेल्या नागरिकांना हस्तलिखित पासपोर्ट देण्यात येत होते. यातील अनेकांना वीस वर्षांच्या मुदतीचे पासपोर्ट मिळाले आहेत. मात्र, आता पासपोर्ट प्रक्रिया ही पूर्णतः अत्याधुनिक सॉफ्टवेअरशी जोडली गेल्याने जुन्या पद्धतीचे पासपोर्ट या प्रणालीशी सुसंगत होत नाहीत. याची दखल घेऊन 'इंटरनॅशनल सिव्हिल एव्हिशन ऑर्गनायझेशन'ने हे नॉन-मशिन रिडेबल पासपोर्ट बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. ज्या पासपोर्टवर हाताने फोटो चिकटवले आहेत आणि वीस वर्षे मुदत असलेले पासपोर्टचा यामध्ये समावेश आहे. परदेश गमनासाठी आवश्यक असलेल्या व्हिसा प्रक्रियेतही हे पासपोर्ट या पुढील काळात ग्राह्य धरले जाणार नाहीत, त्यामुळे नागरिकांनी हे पासपोर्ट बदलून घ्यावेत, असे आवाहन पुणे विभागाचे पासपोर्ट अधिकारी अतुल गोतसुर्वे यांनी केले आहे.

पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर आणि अहमदनगर परिसरातील नागरिकांनी २४ नोव्हेंबरपूर्वीच त्यांचे पासपोर्टचे नूतनीकरण करून घ्यावे. या संदर्भातील अधिक माहितीसाठी संपर्क www.passportindia.gov.in या वेबसाइटवर संपर्क साधावा, असेही गोतसुर्वे यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून खून

$
0
0

पुरंदर तालुक्यातील प्रकार

मटा वृत्तसेवा, सासवड

पुरंदर तालुक्यातील राजेवाडी गावात शुक्रवारी सायंकाळी बारावीत शिकत असलेल्या व शेतात काम करीत असलेल्या अल्पवयीन मुलीवर शारीरिक अत्याचार करून त्यानंतर तिचा गळा आवळून तसेच दाढी करण्याच्या वस्तऱ्याने वार करून खून करण्यात आला. या प्रकरणी आरोपी सुदाम बब्रुवान सूर्यवंशी (वय ५०) यास जेजुरी पोलिसांनी अटक करून ताब्यात घेतले असून त्यास पुणे सत्र कोर्टाने २३ नोव्हेंबरपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

भाऊबीजेच्या दिवशी दुपारी जेजुरी पोलिस ठाण्याचे हद्दीत असलेल्या राजेवाडी गावातील धनंजय जगताप यांच्या शेतात मजुरीचे काम करीत असलेल्या आरोपी सुदाम सूर्यवंशी याने १७ वर्षे वयाच्या मुलीशी लगट करून तिला शेतावर गाठले. तसेच, तिच्यावर शारीरिक अन्याय व विनयभंग कर- ण्याचा प्रयत्न केला. या प्रकाराला मुलीने विरोध करताच तिचा गळा आवळून तिच्यावर वस्तऱ्याने वार करून तिचा खून करून पळून गेला. मुलगी बेपत्ता झाल्याचे लक्षात आल्यावर तिच्या आईने शोधाशोध सुरू केली व पोलिसात तक्रार दाखल केली. तेव्हा शनिवारी रात्री उशिरा पोलिसांनी आरोपीस ताब्यात घेऊन त्याला बाललैगिक अत्याचार गुन्ह्याखाली अटक केली आहे. दरम्यान, पुणे जिल्हा अप्पर ग्रामीण पोलिस अधीक्षक तानाजी चिखले व सहाय्यक पोलिस निरीक्षक परवीन शेख आदींनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. पुढील तपास उपनिरीक्षक गणेश पिंगुवले करीत आहेत.

आरोपीला अटक करून पुणे सत्र कोर्टात उभे केले असता कोर्टाने त्याला २३ नोव्हेंबरपर्यंत पोलिस कोठडीचे आदेश देण्यात आल्याचे पोलिस निरीक्षक रामदास वाकोडे यांनी सांगितले.

दहा महिन्यात १० खुनाचे प्रकार

गेल्या १० महिन्यात या पोलिस ठाण्याचे हद्दीत १० खुनांचे प्रकार घडले असून आरोपींना पकडण्यात यश आले असले तरी अद्याप खुनांची मालिका सुरूच राहिल्याने परिसरात घबराट निर्माण झाली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दिवाळीनंतरही शहरात थंडीचा कडाका कायम

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

सुखद गारव्यात दिवाळी पार पडल्यानंत ही थंडीचा कडाका कायम आहे. शहरात शनिवारीही चांगलीच थंडी होती. शनिवारी शहरात १५ अंश सेल्सिअस इतक्या किमान तापमानाची नोंद झाली. रविवारी तापमानात आणखी एका अंशाने घट होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. यंदाच्या दिवाळीत पुण्यासह राज्यात काही ठिकाणी चांगली थंडी होती.

पुण्याबरोबर राज्यातही अनेक ठिकाणी तापमानात घट झाली आहे. शनिवारी राज्यातील सर्वात नीचांकी किमान तापमानाची नोंद नाशिक येथे (१३.६ अंश सेल्सिअस) झाली. तर मराठवाड्यात नांदेड येथे १४ अंश सेल्सिअस इतके किमान तापमान नोंदले गेले. जळगाव, महाबळेश्वर तसेच उस्मानाबाद येथेही तापमानात घट झाली आहे. सध्या उत्तरेकडील काही राज्यात काही प्रमाणात हिमवर्षाव होत आहे. या राज्यांकडून महाराष्ट्राकडे थंड व कोरडे वारे वाहात असून त्यामुळे राज्यातील थंडीचा कडाका वाढला आहे. हा कडाका पुढील काही दिवस कायम राहील. तर रविवारी पुण्यातील किमान तापमानात एका अंशाने घट होऊन तापमान १४ अंशांपर्यंत उतरेल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बकेट खरेदीला शिस्त लागणार ?

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

कचरा गोळा करण्यासाठी लागणाऱ्या छोट्या आणि मोठ्या बकेटची खरेदी करताना वर्षासाठीचे दर (रेट कॉन्ट्रॅक्ट) ठरवून त्याच दराने बकेटची खरेदी करण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला आहे. या निर्णयामुळे बकेट खरेदीचा घोळ थांबण्याची शक्यता असून बकेट खरेदीला शिस्त लागणार आहे.

महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या वतीने दर वर्षी काही लाख रुपये किमतीच्या प्लॅस्टिकच्या बकेटची खरेदी केली जाते. ओला आणि सुका कचरा वेगळा करण्यासाठी छोट्या बकेटची; तर सोसायटी तसेच कचराकुंडीतील कचरा वाहतूक करणाऱ्या गाड्यांपर्यंत वाहून नेण्यासाठी मोठ्या आकाराच्या बकेटची खरेदी पालिकेच्या वतीने केली जाते. क्षेत्रीय कार्यालये आणि पालिकेचा घनकचरा विभाग यांच्या मार्फत वेगवेगळ्या पद्धतीने आणि वेगवेगळ्या दराने ही खरेदी होत असल्याने अनेकदा यावर टीका झालेली आहे. शहरातील स्वयंसेव‌ी संस्थांच्या वतीनेही या बकेट खरेदीला आक्षेप घेण्यात आलेले आहेत.

बकेट खरेदी करताना होणारे आरोप-प्रत्यारोप लक्षात घेऊन यंदाच्या वर्षी भांडार विभागाने क्षेत्रीय कार्यालय आणि घनकचरा व्यवस्थापन विभागासाठी आवश्यक असलेल्या बकेटची एकत्रित खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. पालिकेला कमी दरात या बकेट उपलब्ध व्हाव्यात आणि पालिका प्रशासनाचे पैसे वाचावे, यासाठी वेगवेगळ्या कंपन्यांकडून दर मागवून घेण्यात आले आहेत. या दरांमधून लहान आणि मोठ्या आकाच्या बकेटसाठी एकच दर निश्चित केला जाणार आहे. पुढील वर्षभर या निश्चित केलेल्या दरानेच मागणीनुसार बकेटची खरेदी केली जाणार असल्याचे पालिका प्रशासनातील अधिकाऱ्यांनी सांगितले. यानिमित्ताने बकेटच्या वापराचे ऑडिटही करणे शक्य होणार असून एकाच कामासाठी दोनदा केली जाणारी ‍खरेदी थांबणार आहे.

बकेट खरेदीसाठी प्रस्ताव

चालू वर्षात विविध क्षेत्रीय कार्यालये तसचे घनकचरा विभागाकडून बकेटची मागणी नोंदविण्यात आलेली आहे. मात्र, आतापर्यंत एकाही बकेटची खरेदी झालेली नाही. क्षेत्रीय कार्यालयाकडून ७५ लाख रुपयांचे बकेट खरेदीचे प्रस्ताव आले असून घनकचरा विभागाकडून ६० लाख रुपयांचे प्रस्ताव आले आहेत. या नवीन निकषानुसार खरेदी करायची झाल्यास त्याची प्रक्रिया राबवावी लागणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नागरी उपजीविका अभियान लवकरच

$
0
0

महिला बचत गटांचे फेडरेशन करणार

म. टा. प्रतिनिधी, पुणे

शहरातील अल्प उत्पन्न गटातील कुटुंबांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी केंद्र सरकारने सुरू केलेल्या राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियानाची लवकरच अंमलबजावणी पालिकेच्या वतीने केली जाणार आहे. दारिद्र्यरेषेखालील कुटुंबातील महिला बचत गटांचे फेडरेशन तयार करून त्यांना प्रशिक्षण तसेच मार्गदर्शन दिले जाणार आहे.

शहरी भागातील दारिद्र्यरेषेखालील कुटुंबांची संख्या कमी करण्यासाठी हे अभियान राबविले जाणार आहे. केंद्र सरकारची सुवर्ण जयंती शहर रोजगार योजना २०१४मध्ये संपुष्टात आल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियानाची घोषणा केली होती. या योजनेसाठी राज्यातील एक लाखाहून अधिक लोकसंख्या असलेल्या ५३ शहरांची निवड करण्यात आली आहे. शहरात राहणाऱ्या गरीब कुटुंबातील व्यक्तींना कौशल्य विकास प्रशिक्षण देऊन त्यांना रोजगार तसेच स्वयंरोजगाराची संधी उपलब्ध करून देणे, त्यांचे राहणीमान उंचावणे, बेघरांना निवाऱ्याची सोय उपलब्ध करुन देणे, फेरीवाल्यांच्या संदर्भातील समस्या सोडविण्यासाठी आवश्यक उपाययोजना करणे ही, या योजनेची प्रमुख उदिष्ट्ये आहेत.

या योजनेत अधिकाधिक नागरिकांना सहभागी होता यावे, या साठी पालिकेच्या नागरवस्ती विभागाच्या वतीने विशेष प्रयत्न सुरू करण्यात आले आहेत. योजनेत लाभार्थ्यांची संख्या वाढविण्यासाठी स्वयंसहाय्य समूह स्थापन करण्यात येणार आहेत. या मध्ये दहा ते वीस महिला, पुरुष एकत्र येऊन गट स्थापन करू शकतात. अभियानासाठी शहरातील दारिद्य रेषेखालील कुटुंबांचे ६३९ बचतगट तयार करण्यात आले आहेत. या बचतगटांचे प्रभाग स्तरावरील ४३ वस्ती स्तरावरील संघ तयार करण्यात आले आहेत. लवकरच या वस्ती स्तर संघातील सदस्यांचा मिळून शहर स्तरावरील समूह तयार करण्यात येणार असल्याचे नागरवस्ती विभागातील अधिकाऱ्यांनी सांगितले. शहर स्तरावरील संघाच्या माध्यमातून प्रशिक्षण कार्यक्रम, बचतगटांचे बॅंकांसोबत लिंकेज करणे अशी कामे करण्यात येणार असल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पुतळा अश्वारूढ की सिंहासनाधीश?

$
0
0

Dhananjay.Jadhav@timesgroup.com

पुणे : अरबी समुद्रातील जागतिक दर्जाच्या स्मारकामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा अश्वारूढ असावा की सिंहासनावर विराजमान झालेला असावा यावर आता खल सुरू झाला आहे. अश्वारूढ पुतळा हा दोनशे वर्षांपर्यंत टिकू शकणार नसल्याचा दावा करण्यात आल्याने त्यावर अभियांत्रिकी तज्ज्ञांचा सल्ला घेऊन लवकरच अंतिम निर्णय घेण्यात येणार आहे.

छत्रपती शिवाजी स्मारकाच्या उभारणीच्या कामात सल्लागार म्हणून वेगवेगळ्या सात समित्या नेमण्यात आल्या आहेत. या समित्यांची संख्याही लवकरच तीनवर मर्यादीत करण्यात येणार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक उभारण्याचे कंत्राट जगातील सर्वात उंच 'बुर्ज खलिफा' ही इमारत बांधणाऱ्या कॅनडातील 'नोर' कंपनीला देण्याचे प्रस्तावित होते. परंतु, या कंपनीच्या अटी व खर्च पाहता 'नोर'ला या कंत्राटापासून दूर करण्यात आले आहे. स्मारक उभारण्यासाठी आता नितीन देसाई व टाटा कन्सल्टंट, प्रोजेन-आक्रेडिया व सुनील पाटील असोसिएटस, इजीआयएस आणि एसटीयूपी या चार कंपन्या पुढे आल्या आहेत.

अमेरिकेतील 'स्टॅच्यू ऑफ लिबर्टी'च्या पुतळ्यापेक्षाही छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा उभारण्याचा संकल्प राज्य सरकारने केला आहे. परंतु, या स्मारकाच्या भूमिपूजनाच्या मुहूर्तामध्ये शिवाजी महाराजांचा पुतळा कसा असावा यापासून कन्सल्टंट नेमण्यापर्यंत विघ्न येत आहेत. अरबी समुद्रात मुंबईमध्ये शिवस्मारक उभारण्यासंदर्भात नुकतेच काही कंपन्यांनी प्रेझेंटेशन केले. त्यातील एका कंपनीने शिवाजी महाराजांचा समुद्रातील अश्वारूढ पुतळा दोनशे वर्षांपर्यंत टिकू शकणार नसल्याचा दावा केला आहे. तसेच, काही वस्तुस्थितीदर्शक अडचणीही मांडल्या.

त्यामुळे त्याची खात्री करण्यात येणार असून 'आयएटी'कडून सल्ला मागविण्यात आला आहे. शिवाजी महाराजांचा पुतळा अश्वारूढ असावा, की सिंहासनावर विराजमान झालेला असावा यादृष्टीने आता विचार करण्यात येत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस परदेश दौऱ्यावरून आल्यावर त्यासंबंधी बैठक होणार असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.

नोर कंपनीचा खर्च तिप्पट

समुद्रामध्ये इमारत बांधण्याचा अनुभव लक्षात घेता नोर या कंपनीला शिवस्मारकाचे काम देण्यावर शिक्कामोर्तब करण्यात आले होते. हे शिवस्मारक जागतिक ओळख ठरणारे असावे यासाठी 'नोर' कंपनीने 'बुर्ज खलिफा'च्या उभारणीसाठी मदत घेतलेले तंत्रज्ञ, अभियंते आणि कामगार या स्मारकाच्या कामासाठी आणावेत, अशी अट राज्य सरकारने घातली. मात्र, या कंपनीने ही अट मान्य केली नाही. तसेच, हे तंत्रज्ञ आणायचे झाल्यास तिप्पट खर्चाची मागणी केली. त्यामुळे 'नोर'ला काम देण्याचा निर्णय रद्द करण्यात आला आहे. शिवस्मारक उभारण्यासाठी चार कंपन्यांनी तयारी दाखविली आहे. त्यातील एका कंपनीची पंधरा दिवसांत कन्सल्टंट म्हणून निवड केली जाणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images