Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

फेरीवाल्याला पेट्रोल टाकून जाळले

$
0
0

लोणावळ्यातील घटनेत तरुणाचा मृत्यू; साथीदार गंभीर जखमी

म. टा. प्रतिनिधी, लोणावळा

लोणावळा येथे रेल्वे वसाहतीच्या परिसरात रेल्वेगाड्यांमधील दोन फेरीवाल्यांना अंगावर पेट्रोल टाकून जिवंत जाळण्याचा धक्कादायक प्रकार बुधवारी पहाटे घडला. यामध्ये एकाचा मृत्यू झाला असून, आणखी एक जण गंभीर जखमी झाला आहे. आपसांतील वादांमधून झालेल्या या घटनेमुळे रेल्वे फेरीवाल्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

अतुलसिंग जगजितसिंग भदोरिया (वय २०, रा. सध्या लोणावळा) असे या घटनेत मृत्यू झालेल्या फेरीवाल्याचे नाव असून, त्याचा साथीदार सचिनप्रताप शिवपाल सिंग (वय २२, रा. सध्या लोणावळा) या घटनेत गंभीररीत्या जखमी झाला आहे.

या प्रकरणी अमित अजमेरसिंग भदोरिया याला अटक करण्यात आली असून, त्याचा साथीदार सनी विजयपाल सिंग अद्याप फरारी आहे. लोणावळा शहर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अतुलसिंग आणि सचिन हे दोघे रेल्वेगाड्यांमध्ये फिरता व्यवसाय करत होते. ते दोघेही लोणावळा रेल्वे स्थानकाजवळील रेल्वे वसाहतीमध्ये भाड्याने राहत होते. सोमवारी त्यांची आणि अमित व सनी यांच्या रेल्वेमध्ये पाणी विकण्याच्या कारणावरून भांडणे झाली होती. या भांडणाच्या राग मनात धरून अमित आणि सनी यांनी बुधवारी पहाटे अतुलसिंग व सचिन हे त्यांच्या खोलीत झोपलेले असताना त्यांच्या अंगावर पेट्रोल टाकून त्यांना जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला. या घटनेत अतुलसिंग पूर्णपणे भाजल्याने त्याचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला, तर सचिन ८५ टक्के भाजला असून, त्यांच्यावर ससून रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेमागील नेमके कारण समजले नसून, पुढील तपास लोणावळा शहर पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरिक्षक श्रीकांत इंगवले करीत आहेत.

रेल्वेचे दुर्लक्ष भोवले

मागील काही वर्षांपासून लोणावळा रेल्वे स्थानक परिसरात गर्दुल्ल्यांचा मोठ्या प्रमाणात उपद्रव सुरू आहे. गर्दुल्ल्यांसह विविध व्यवसाय करणारे फेरीवाले, तृतीयपंथी यांचा रेल्वे आणि रेल्वेच्या उड्डाणपुलावर; तसेच परिसरात मोठ्या प्रमाणात उपद्रव सुरू असतो. यांच्यामध्ये वारंवार विविध कारणांवरून वाद होतात. काही वेळा या वादाचे हाणामारी व खुनात रूपांतर होते. आठ महिन्यांपूर्वीच रेल्वे स्थानकाच्या परिसरात एका गर्दुल्ल्याने एकाला अशाच प्रकारे जिवंत जाळण्याचा प्रकार केला होता. त्यात एक जण गंभीर भाजून मृत्यू झाला होता. असे असतानाही रेल्वेचे संबंधित विभाग याकडे हेतुपुरस्सर दुर्लक्ष करीत असल्याचा प्रवाशांचा आरोप आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


एफआयआर’ची प्रत व्हॉट्सअॅपवर

$
0
0

पोलिस महासंचालकांचे आदेश; त्रस्त नागरिकांना दिलासा

Prashant.Aher@timesgroup.com

पोलिसांत तक्रार करणाऱ्या तक्रारदारांना प्रथम माहिती अहवालाची (एफआयआर) प्रत व्हॉट्सअॅपवर देण्याचा आदेश नवे पोलिस महासंचालक प्रवीण दीक्षित यांनी दिला आहे. एफआयआरची प्रत वेळेत मिळत नसल्याच्या हजारो तक्रारींच्या पार्श्वभूमीवर त्रस्त नागरिकांना या आदेशामुळे मोठा दिलासा मिळणार आहे. तक्रारदाराला शक्यतो लगेचच 'एफआयआर'ची हार्ड कॉपी देण्यात यावी. ते शक्य नसल्यास 'एफआयआर'चा फोटो काढून तो शक्य तितक्या लवकर 'व्हॉटस्अॅप'वर पाठवावा, असे आदेश दीक्षित यांनी दिले आहेत.

पोलिस खाते डिजिटलाइज्ड करण्यावर दीक्षित यांनी भर दिला आहे. त्यासाठी प्रत्येक कर्मचाऱ्याचा स्वतःचा ई-मेल आयडी असणे बंधनकारक करण्यात आले आहे. तंत्रज्ञानाचा उपयोग सर्वसामान्यांना झाला पाहिजे, या भावनेतून 'एफआयआर'ची प्रत आता 'व्हॉटस्अप'वर पाठवावी, असे आदेश देण्यात आले आहेत.
गुन्हा दाखल केल्यानंतर तक्रारदाराला 'एफआयआर'ची कॉपी देणे पोलिसांना बंधनकारक असते. मात्र, अनेकदा काही ना काही कारणाने तक्रारदाराला 'एफआयआर'ची कॉपी देताना टाळाटाळ होते. याबाबतच्या तक्रारी पोलिस महासंचालक कार्यालयाकडे करण्यात आल्या आहेत. या तक्रारींची दखल घेऊन 'एफआयआर'ची कॉपी तक्रारदाराला वेळेत ​देण्यासाठी ई-मेल; तसेच 'व्हॉटस्अप'ची मदत घेण्यास सांगण्यात आले आहे.

पोलिस महासंचालक कार्यालयातील कायदा सुव्यवस्थेची जबाबदारी पाहणारे विशेष पोलिस महानिरीक्षक प्रभात कुमार यांनी राज्यातील सर्व पोलिस दलांना याबाबतचे आदेश पाठवले आहेत. पोलिस आयुक्त; तसेच पोलिस अधीक्षकांनी आपआपल्या विभागातील पोलिस ठाण्यांच्या प्रमुखांना या आदेशाची अंमलबजावणी करण्याचे आदेश द्यावेत; तसेच आदेश बजावल्याबाबतचा अहवाल पोलिस महासंचालक कार्यालयाला सादर करावा, असेही प्रभात कुमार यांनी आपल्या आदेशांत म्हटले आहे.
..........

तक्रारदाराला वेळेत 'एफआयआरची' कॉपी मिळणे आवश्यक आहे. ती हार्डकॉपीच्या रूपाने लगेचच देण्यात आली, तर चांगलेच आहे. मात्र, परिस्थितीनुसार ती वेळेत देण्यासाठी ई-मेल; तसेच व्हॉटस्अपचाही वापर करण्यास सांगितले आहे.
- प्रविण दीक्षित, पोलिस महासंचालक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मेट्रोचा खर्च जाणार ११,५०० कोटींवर?

$
0
0

तिकीट दरांमध्येही वाढ होण्याची भीती; किमान दर २० रुपये

म. टा. प्रतिनिधी, पुणे

राजकीय दिरंगाईमुळे पुणे मेट्रोचा खर्च तब्बल साडेअकरा हजार कोटी रुपयांहून अधिक होण्याची भीती असल्याने पुणेकरांना मेट्रोतून लांबच्या प्रवासासाठी शंभर रुपये मोजण्याची तयारी ठेवावी लागणार असल्याची चिन्हे आहेत. २००९च्या दरांनुसार मेट्रोच्या तिकिटासाठी किमान ८ रुपये मोजावे लागणार होते; पण आता मेट्रोचे किमान तिकिटच २० रुपयांपर्यंत जाण्याची शक्यता आहे.

दिल्ली मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनने (डीएमआरसी) महापालिकेला सादर केलेल्या मूळ प्रकल्प अहवालात (डीपीआर) २०१३-१४ पर्यंत प्रकल्प पूर्ण झाल्यास दोन किमीपर्यंतचे किमान तिकीट ८ रुपये, तर ३० किमीपर्यंतचे कमाल तिकीट २५ रुपये असेल, असे निश्चित करण्यात आले होते. मेट्रो मान्यतेला झालेल्या विलंबामुळे प्रकल्पाचा खर्च १० हजार कोटींच्या पुढे गेला. त्यावेळी, 'डीएमआरसी'ने मांडलेल्या सुधारित दरांनुसार मेट्रोचा किमान दर १३ रुपये, तर कमाल दर ४५ रुपयांपर्यंत पोहोचला होता. अर्थात, २०१८-१९ पर्यंत मेट्रो प्रकल्प कार्यान्वित होईल, असे गृहित धरून हे दर ठरविण्यात आले होते.

पुणे मेट्रोच्या वनाज ते रामवाडी मार्गाला केल्या जाणाऱ्या तीव्र विरोधामुळे मेट्रोच्या मान्यतेत पुन्हा अडसर निर्माण झाला होता. आता, २०१५ च्या प्रचलित दरांनुसार नव्याने खर्चाचा अंदाज बांधावा लागणार आहे. 'डीएमआरसी'तर्फे सध्या त्याची प्रक्रिया सुरू असून, वार्षिक साडेसात टक्के दरवाढीचे सूत्र लक्षात घेता मेट्रो प्रकल्पाचा एकूण खर्च साडेअकरा हजार कोटींच्याही पुढे जाण्याची शक्यता आहे. परिणामी, मेट्रोच्या दरांमध्येही फेरबदल करावे लागणार आहेत. एलिव्हेटेड मेट्रोच्या उभारणीला किमान चार ते पाच वर्षांचा अवधी लागतो, तर भुयारी मेट्रोला त्यापेक्षा अधिक कालावधी लागण्याची शक्यता असते.

अधिक कालावधी; अधिक दर

भुयारी मेट्रोला एलिव्हेटेड मेट्रोच्या तुलनेत चार ते पाच वर्षांचा कालावधी अधिक लागतो. त्यानुसार, २०२० पर्यंत मेट्रोचा किमान दर २० रुपयांपर्यंत पोहोचण्याची चिन्हे आहेत. तर, ३० किमीपर्यंतचा कमाल दर शंभरच्या घरामध्ये जाण्याचा अंदाज आहे. 'डीएमआरसी'ने सुधारित अहवाल पालिकेला सादर केल्यानंतरच त्याबाबतची सविस्तर आकडेवारी समोर येऊ शकेल.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शिवसेना-भाजपाच्या राजकारणात ‘डाळ शिजेना’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

'व्यापाऱ्यांचा जप्त केलेला हजारो टन तूरडाळीचा साठा पुन्हा हमीपत्राच्या आधारे त्यांनाच देण्याचा राज्य सरकारने निर्णय घेतला आहे. व्यापाऱ्यांनी जादा दराने खरेदी केलेली डाळ कमी १०० रुपये किलो दराने कशी विकायची,' असा सवाल अन्न व नागरी पुरवठामंत्री गिरीश बापट यांना व्यापाऱ्यांनी केला. दरम्यान, डाळीच्या दराच्या राजकारणावरून मार्केट यार्डातील घाऊक बाजारात तूरडाळीसह अन्य डाळींचे दर स्थिर राहिले आहेत.

एकीकडे सेनेने राज्य सरकारला १२० रुपये किलो दराने डाळ विक्री कऱण्याची सूचना केली. मुख्यमंत्र्यांनी सेनेची सूचना मान्य करीत डाळ उपलब्ध कऱण्याचे आश्वासन दिले. तोच राज्यातील छाप्यातून जप्त केलेली तूरडाळ नागरिकांनी 'दिवाळी भेट' म्हणून शंभर रुपयांत उपलब्ध कऱण्याचे आश्वासन गिरीश बापट यांनी दिले. त्या वेळी शंभर रुपये किलो दराने डाळ ग्राहकांना देण्याचे हमीपत्र व्यापाऱ्यांकडून सरकार घेणार आहे. त्यानंतर राज्यातील व्यापाऱ्यांना डाळ विकता येऊ शकेल. संदर्भात बापट यांनी घेतलेल्या बैठकीत शंभर रुपये दराने डाळ विण्याचे आश्वासन देण्यात आल्याचे सांगण्यात येते.

प्रत्यक्षात एकीकडे डाळीचा तुटवडा असताना डाळीच्या विक्रेत्यांवर छापे टाकून त्यांच्याकडील डाळ जप्त करून तो साठा कित्येक दिवस तसाच ठेवण्यात कोणता शहाणपणा आहे असा सवाल केला जात आहे. एक दीड महिन्यांपूर्वी कांद्याचा तुटवडा निर्माण झाल्याने सरकारने साठेबाजांवर कारवाई केली. त्या कारवाईनंतर कांदा बाजारात सहज उपलब्ध झाल्याने दर कोसळले. त्याच धर्तीवर डाळींचा साठा जप्त करून तो नंतर पुन्हा बाजारात आणायला हवा होता. त्याऐवजी पारंपरिक पद्धतीने लिलाव, रेशन दुकानातून वितरण आणि बँक गॅरंटी या उपायांचा विचार केल्याने त्याला वेळ लागत असल्यामुळे हमीपत्राचा पर्याय स्वीकारण्यात आला.

सामान्यांची उपेक्षा

शिवसेना भाजपाच्या डाळीच्या दरांच्या राजकारणावरून प्रत्यक्षात डाळ बाजारात येण्यापूर्वीच डाळ कोणत्या किमतीने विकली जावी यावर सेना भाजपचे राजकारण सुरू झाले. मात्र त्यात व्यापाऱ्यांसह सामान्य ग्राहक भरडला जात असून त्यांच्या घरी मात्र डाळ काही अद्याप शिजलेली दिसत नाही.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रस्त्यासाठी ‘सोशल’ लढा

$
0
0

Rohit.Athavale@timesgroup.com

पिंपरी : रक्षक चौक ते कुंजीर वस्तीदरम्यानचा लष्कराने बंद केलेला रस्ता पुन्हा सुरू करण्यासाठी आता स्थानिकांनी सोशल मीडियाचा आधार घेतला आहे. बोपखेलपाठोपाठ चार ऑक्टोबरला हा रस्ताही बंद झाल्याने येथील रहिवाशांना मोठा वळसा घालून दररोजचा प्रवास करावा लागत आहे. त्यामुळे रस्ता सुरू करण्यासाठी स्थानिकांनी प्रयत्न सुरू केले आहेत. यासाठी फेसबुक पेज, व्हॉट्सअॅप ग्रुप आणि ट्विटर हँडलद्वारे संबंधितांशी संपर्क साधण्यात येत आहे.

लष्कराच्या जागेतून जाणारा अवघ्या ९०० मीटरचा हा रस्ता बंद करण्याच्या हालचाली २००९ साली सुरू झाल्या होत्या. या रस्त्याशी संबंधित धोक्याचा इशारा आल्याने हा रस्ता बंद करण्याचा निर्णय लष्कराने त्या वेळी घेतला होता. रात्री नऊ ते पहाटे पाच या वेळेत हा रस्ता बंद ठेवण्यात येत होता; मात्र रस्ता कायचाच बंद होणार असल्याने याबाबत हायकोर्टात याचिका दाखल करण्यात आली. त्यानंतर काही मुदत देऊन हा रस्ता बंद न करण्याबाबत हायकोर्टाने सूचित केले होते. हायकोर्टात याबाबत दोन्ही बाजू ऐकून घेतल्यावर संबंधित परिसरातील काही हेक्टर जागा लष्कराला यापूर्वीच देण्यात आली आहे. तसेच याबाबत धोका असेल, तर याचा निर्णय संरक्षण मंत्रालय घेईल, असे हायकोर्टाने सांगितले. तसेच सहा महिन्यांची मुदत १५ मार्चला देण्यात आली.

लष्कराने त्यानंतर काही कालावधी दिला आणि चार ऑक्टोबरला हा रस्ता पूर्ण वेळेसाठी बंद करण्यात आला. त्यानंतर अनेक राजकीय व्यक्तींनी स्थानिकांची भेट घेऊन रस्ता पुन्हा सुरू करण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार असल्याचे सांगितले. तसेच संरक्षणमंत्र्यांची स्थानिकांशी भेट घडवून आणून तोडगा काढण्याचे आश्वासन दिले आहे.

बोपखेलप्रमाणे कोणतेही हिंसक आंदोलन न करता सोशल मीडियाच्या आधारे आणि बैठकांवर जोर देऊन स्थानिकांची मोट बांधण्याचे काम सध्या सुरू आहे. प्रत्येक सोसायटीमधील जेवढ्या इमारती आहेत त्यामधून एक या पद्धतीने अंतर्गत समिती तयार करण्यात आली आहे. प्रत्येक सोसायटीमधील समितीतील एक प्रतिनिधी अशा पद्धतीने संपूर्ण परिसरात एक समिती स्थापन करण्यात आली आहे. तसेच फेसबुक पेज, व्हॉट्सअॅप ग्रुप, ट्विटर हँडलद्वारे बैठकांचे नियोजन करण्यात येत आहे. सध्या हा रस्ता सुरू व्हावा म्हणून फेसबुक पेजवर सुमारे दोन हजार नेटकऱ्यांनी 'अॅक्टिव्ह' प्रयत्न केल्याचे दिसत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मुस्लिम बांधवांकडून जळीतग्रस्तांना मदत

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

गुलटेकडी येथील कै. मीनाताई ठाकरे वसाहतीमध्ये आगीत सर्वस्व गमावलेल्या ६६ कुटुंबीयांसाठी मुस्लिम तरुणांनी एकत्र येऊन मशीद, मदरसे आणि मुस्लिम समाजातील प्रतिष्ठितांकडून साडेअकरा लाख रुपयांची मदत उभी केली. या मदतीतून जळीतग्रस्त कुटुंबांना घरे बांधून देण्यात येणार आहे, तसेच त्यांना संसारोपयोगी साहित्य पुरवण्यात येणार आहे.

पुणे शहरातील मुस्लिम समाजाच्या वतीने जळीतग्रस्तांच्या मदतीसाठी जमा केलेल्या निधीवाटपाचा औपचारिक कार्यक्रम गुरुवारी झाला. या वेळी उपायुक्त डॉ सुधाकर पठारे, 'एटीएस'चे सहायक आयुक्त भानुप्रताप बर्गे, पी. ए. इनामदार, अॅड. अभय छाजेड, श्रीनाथ भिमाले, मौलाना कारी इद्रिस, अफसर भाई, बाजीलभाई शेख, जिकरभाई मेमन, शब्बीरभाई शेख, निसारभाई, यासीन शेख, डॉ. स्नेहल पाडळे, वरिष्ठ निरीक्षक दीपक निकम, सर्जेराव बाबर आदी उपस्थित होते.

'सहिष्णुता केवळ विचारांमधून नाही, तर ती कृतीमधूनही व्यक्त झाली पाहिजे. यासोबतच गुन्हेगारीकडे वळणारी तरुण पावले रोखण्याची आवश्यकता आहे,' असे मत 'परिमंडल दोन'चे उपायुक्त डॉ. सुधाकर पठारे यांनी या वेळी व्यक्त केले.

'हिंदू-मु​स्लिमांनी एकतेचा नवा मार्ग दाखवून एकमेकांच्या मनात नवे नाते निर्माण केले आहे. या नात्याची जोपासना झाली पाहिजे. मुस्लिम तरुणांनी दाखवलेल्या धार्मिक सहिष्णुतेचे यापेक्षा दुसरे उत्तम उदाहरण असू शकणार नाही,' असे मत बर्गे यांनी व्यक्त केले. या कार्यक्रमाचे आयोजन बाजीलभाई शेख, जिकरभाई मेमन, शब्बीरभाई शेख, यासीन शेख यांनी केले होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मंडईवर फेरीवाल्यांचा कब्जा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

दिवाळीच्या खरेदीसाठी मंडई, आर्यन वाहनतळ आणि तुळशीबाग-बाबू गेनू परिसरात अनधिकृत फेरीवाले-पथारीवाल्यांचे पेव फुटले असून, या ठिकाणी बेकायदेशीर पद्धतीने अनेक मंडप उभारण्यात आले आहेत. पालिकेच्या अतिक्रमण आणि मंडई विभागातील हद्दीच्या वादामुळे नागरिकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत असून, वाहतूक पोलिसांनीही या परिसराकडे साफ दुर्लक्ष केल्याचे चित्र आहे.

आज, शनिवारीवसुबारस आहे, तर पुढील आठवड्यात दिवाळी साजरी केली जाणार आहे. त्या निमित्ताने रांगोळी-पणत्यांपासून आकाशकंदील आणि इतर पूरक वस्तूंच्या खरेदीसाठी मंडई परिसरात गेल्या तीन-चार दिवसांपासून नागरिकांची गर्दी होत आहे. त्यातच या परिसरामध्ये अनेक ठिकाणी अनधिकृत पथारी व्यावसायिक-फेरीवाल्यांनी अतिक्रमण केली असून, मोक्याच्या जागांवर मांडव घालण्यात आले आहेत. वाहनतळांच्या प्रवेशद्वाराकडे जाणाऱ्या रस्त्यांवरही विविध वस्तूंच्या विक्रीसाठी स्टॉल्स उभारण्यात आले आहेत. त्याचा फटका वाहनतळाकडे जाणाऱ्या वाहनचालकांना, तसेच मंडई बस स्थानकावर ये-जा करणाऱ्या 'पीएमपी'च्या बसना बसला आहे.

मंडईपासून शंभर मीटरचा सर्व परिसर अतिक्रमणमुक्त ठेवण्याची जबाबदारी पालिकेच्या मंडई विभागावर आहे. त्यापलीकडच्या अतिक्रमणांवर कारवाई करण्याचे अधिकार अतिक्रमण विभागाला आहेत. पोलिस स्टेशनप्रमाणे पालिकेच्या या दोन विभागांमधील हद्दीच्या वादामुळे अतिक्रमणे मोठ्या प्रमाणावर फोफावली असून, चालायलाही जागा शिल्लक नसल्याचे चित्र दिसून येत आहे.

सणासुदीला मंडई आणि परिसरात नेहमीच गर्दी होत असते. त्यामुळे या भागांत येणाऱ्या वाहतुकीचे नियमन करण्याची जबाबदारी वाहतूक पोलिसांवर आहे. परंतु गेल्या दोन-तीन दिवसांपासून वाहतूक पोलिसांनी याकडे साफ दुर्लक्ष केले असून, बाजीराव रस्त्यावरील वाहनांच्या रांगा प्रतापसिंह राणा उद्यान-टेलिफोन भवनापर्यंत येत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दिलीप वळसे पाटील यांची निवड

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

राष्ट्रीय सहकारी साखर कारखाने महासंघाच्या अध्यक्षपदी माजी विधानसभा अध्यक्ष आमदार दिलीप दत्तात्रय वळसे-पाटील यांची, तर उपाध्यक्षपदी अमित प्रभाकर कोरे यांची निवड करण्यात आली आहे. नवी दिल्ली येथे झालेल्या या निवडणुकीत वळसे-पाटील यांची तीन वर्षांसाठी नियुक्ती झाली आहे.

संचालक मंडळावर गुजरात राज्य फेडरेशनचे मनिषभाई पटेल, हरियाणा राज्य फेडरेशनचे सुधीर राजपाल, कर्नाटक राज्य फेडरेशनचे दनाप्पागौडा बसनागौडा इनामदार, महाराष्ट्र राज्य फेडरेशनचे शिवाजीराव नगवडे, पंजाब राज्य फेडरेशनचे कंवाल प्रीत ब्रार, तामिळनाडू राज्य फेडरेशनचे के. जी. पी. गणामूर्ती, उत्तरप्रदेश फेडरेशनचे बी. के. यादव, गुजरात फेडरेशनचे जयंतीलाल बावजीभाई पटेल, हरियाणा शुगर फेक्टरीचे साचेनदार सिंह, दक्षिण महाराष्ट्र मतदारसंघातील कलप्पा आवडे, मध्य दक्षिण महाराष्ट्र मतदारसंघातील विजयसिंह मोहिते पाटील, उत्तर-मध्य महाराष्ट्र मतदार संघातील जयप्रकाश रावसाहेब साळुंके दांडेगावकर, पंजाब शुगर फेक्टरीचे हरदीपसिंह धिल्लोन, तमिळनाडू शुगर फेक्टरीचे ए. कुमार आणि उत्तर प्रदेश शुगर फॅक्टरीचे चंद्रशेखर सिंह यांची निवड झाली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


दौंड स्थानकावर बेवारस इनोव्हा

$
0
0

दौंड : दौंड रेल्वे स्थानकाजवळ दुचाकी पार्किंगच्या जवळ एक बेवारस इनोव्हा गाडी तीन महिन्यांपासून संशयास्पद रीतीने उभी आहे. रेल्वे सुरक्षा बल, रेल्वे पोलिस, ग्रामीण पोलिस यापैकी कुठल्याच यंत्रणेने या बेवारस गाडीची दखल घेतली नाही. दरम्यान, काही अज्ञात चोरट्यांनी या गाडीच्या पुढच्या दरवाजाची काच फोडून आतील म्युझिक सिस्टीम चोरल्याचे स्पष्ट दिसत आहे. या गाडीचे बॉनेट उघडण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचेही दिसत आहे. हे वाहन येथे कोण सोडून गेले. या वाहनाचा गुन्हेगारीसाठी वापर झाला असेल का, आदी बाबींचा तपास आवश्यक आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बेकायदा पिस्तूल बाळगणाऱ्यास अटक

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

बेकायदा पिस्तूल बाळगणाऱ्या सराईत गुन्हेगाराला सहकारनगर पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्या ताब्यातून एक गावठी पिस्तूल आणि दोन जिवंत काडतुसे जप्त केली आहेत.

मनोज उर्फ लल्या उर्फ शंकर कांतीलाल कांबळे (२७, रा. तळजाई वसाहत, सहकारनगर) असे अटक केलेल्याचे नाव आहे. सहकारनगर पोलिस ठाण्याचे कर्मचारी भापकर यांना बातमीदाराकडून माहिती मिळाली, की, पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार कांबळे हा सातारा रस्त्यावरील गुरुदास सोसायटी समोर येणार असून, त्याच्याकडे पिस्तूल आहे. त्यानुसार वरिष्ठ निरीक्षक शशिकांत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली शक्तीसिंग खानविलकर यांच्या पथकाने सापळा रचून त्याला ताब्यात घेतले. त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे एक गावठी पिस्तूल आणि दोन जिवंत काडतुसे मिळाली आहेत. त्याच्याकडून जप्त करण्यात आलेले पिस्तूल त्याने कोठून आणले आहे. याचा तपास सुरू आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बेकायदा उत्खनन केल्याने ‘ILFS’ला दंड

$
0
0

महसूल प्रशासन करणार ३२ कोटी रुपये वसूल

म. टा. प्रतिनिधी, पुणे

रस्ते बांधणीतील नामवंत कंपनी 'आयएलएफएस' आणि त्यांची सहठेकेदार जीएमव्ही इंडिया या कंपनीला बेकायदा उत्खनन केल्याप्रकरणी महसूल प्रशासनाने ३२ कोटी रुपयांचा दंड केला आहे. या दंडाची रक्कम संबंधित कंपनीच्या टोलच्या रकमेतून वसूल करण्यात यावी, असेही आदेश देण्यात आले आहेत

रस्ते बांधणीसाठी वापरण्यात येणाऱ्या डबर व मुरूमाच्या उत्खननापोटी प्रथमच अशा प्रकारची कारवाई करण्यात आली आहे. पुणे-सोलापूर महामार्गाच्या उभारणीचे काम या कंपनीला देण्यात आले आहे. या कंपनीने रस्त्याचे उपकंत्राट जीएमव्ही इंडिया या कंपनीला दिले आहे. रस्त्याच्या भरावाच्या कामासाठी या कंपनीने सोलापूर जिल्ह्यातील कोंडी, कारंबा, बीबी दारफळ आणि अकोलेकाटी या गावातून परवानगी न घेता मुरूमाचे उत्खनन केले. ही बाब सोलापूरचे जिल्हाधिकारी तुकाराम मुंडे यांच्या निदर्शनास आली.

या उत्खननाची जिल्हा प्रशासनाकडून तपासणी करण्यात आल्यानंतर तब्बल एक लाख २२ हजार ६३३ ब्रास बेकायदा उत्खनन ल्याचे स्पष्ट झाले. या उत्खननापोटी आयएलएफएस आणि जीएमव्ही या कंपन्यांवर प्रत्येकी १६ कोटी ४३ लाख रुपयांच्या दंडाची नोटीस सोलापूर जिल्हाधिकाऱ्यांनी बजावली. त्याविरोधात कंपनीने अतिरिक्त आयुक्त श्याम देशपांडे यांच्याकडे अपील दाखल केले होते. या कारवाईस स्थगिती देण्याची मागणी केली होती. या अपिलाची सुनावणी देताना, अतिरिक्त आयुक्त देशपांडे यांनी या दोन्ही कंपनीचे अपील फेटाळून लावले आणि ही दंडाची वसुली करण्याचे आदेश दिले आहेत.

मुरूम कोठून आला?

पुणे शहर व ग्रामीण भागामध्ये महामार्गाच्या विस्तारीकरणाची कामे सुरू आहेत. त्यासाठी मोठ्या प्रमाणावर मुरूम वापरला जात आहे. हा मुरूम कोठून आणला जातो. त्याच्या उत्खननाची परवानगी घेतली आहे काय, याची चौकशी आता होणार आहे. या बेकायदा उत्खननाच्या दंडापोटी मोठा महसूल वसूल होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पारंपरिक शेतीचे दिवस गेले : पवार

$
0
0

​बारामती : शेतीत जगभर काय बदल होत आहेत, कोणते नवे तंत्रज्ञान आले आदी गोष्टींची माहिती प्रदर्शनात मिळणार आहे. आता पारंपरिक शेती करण्याचे दिवस गेले असून, आधुनिक पद्धतीने शेती केली तरच ती परवडणार आहे, असे स्पष्ट मत माजी कृषिमंत्री शरद पवार यांनी व्यक्त केले. बारामतीत अॅग्रीकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्टच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या कृषिप्रदर्शनाच्या उद्‍घाटनप्रसंगी ते बोलत होते.

'इंडोनेशियात उसाचे संशोधन झाले आहे. चार महिने पाणी दिले नाही, तरी ऊस येतो आणि आठ महिन्यांमध्ये तोडला जातो. त्याची रिकव्हरीही चांगली मिळते आहे. आपल्याकडे असे प्रयोग झाले तर ऊस उत्पादनात निश्चित क्रांती होईल. तीन वर्षांपूर्वी महाराष्ट्र डाळी उत्पादनात देशात अग्रेसर होता. डाळी व कडधान्यात महाराष्ट्राला उत्पादन वाढविण्याची मोठी संधी आहे,' असेही पवार म्हणाले.

पाणी प्रश्न गंभीरच

पिण्याच्या पाण्याची जेव्हा गरज असेल, तेव्हा त्याकडे माणुसकीतून पाहिले पाहिजे. त्यासाठी कोणताही मतभेत ठेवू नये. नाशिक-नगरमधून मराठवाड्याला पाणी द्यायला हवे, आमचा याला पाठिंबा आहे. मात्र, पाण्याची नासाडी होणार नाही याचीही काळजी घ्यायला हवी अशी अपेक्षा पवार यांनी व्यक्त केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

राज्य कृषिप्रधानच राहील

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, बारामती

'शेती व्यवसाय शाश्वत होण्यासाठी शेतीमधील गुंतवणूक वाढण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी या क्षेत्रातील सर्व घटकांचे सहकार्य घेऊन आपले राज्य कृषिप्रधान होते व यापुढे ते राहील याची काळजी राज्य सरकार घेईल,' असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. यासाठी राज्यात १०५९ मंडल स्तरांपर्यंत ऑटोमेटेड व्हेदर स्टेशन्स कार्यान्वित करणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

बारामती येथील अॅग्रीकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्टच्या वतीने आयोजित आधुनिक तंत्रज्ञान आणि प्रात्यक्षिकांवर आधारित कृषी, पशुपक्षी प्रदर्शनाचे मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते शुक्रवारी उद्घाटन झाले. या वेळी व्यासपीठावर महसूल आणि कृषिमंत्री एकनाथ खडसे, पालकमंत्री गिरीश बापट, माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि अॅग्रीकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्टचे अध्यक्ष राजेंद्र पवार, तुकाराम मोरे आदी उपस्थित होते.

या वेळी मुख्यमंत्री म्हणाले, 'बेभरवशाच्या हवामानामुळे राज्यातील शेतीला वारंवार संकटाला सामोरे जावे लागते. हे संकट कमी करण्यासाठी हवामानाचे अचूक अंदाज देणारी व्यवस्था विकसित करण्याची गरज आहे. यासाठी राज्यातील प्रत्येक मंडळस्तरावर स्वयंचलित हवामान केंद्र उभारली जाणार आहेत. अशी केंद्रे उभारणारे महाराष्ट्र देशातील पहिले राज्य असेल. या केंद्रामुळे शेतकऱ्यांना प्रत्येक तासाला हवामानाचा अंदाज मिळू शकेल. जेणेकरून तो शेतीचे होणारे नुकसान टाळू शकले.'

'आपल्या राज्यात शेतीवर अवलंबून असलेल्या लोकांची संख्या ५२ टक्के आहे. पण कृषी क्षेत्राचा सकल राज्य उत्पादनातील वाटा केवळ १८ टक्के आहे. हा वाटा दिवसेंदिवस कमीच होत आहे. त्याचबरोबर शेतीतील गुंतवणूकही कमी होत चालली आहे. ही गुंतवणूक वाढल्याशिवाय शेती किफायतशीर होणार नाही. त्यामुळे शेतीला पूरक असे व्यवसाय वाढण्याची गरज आहे. अन्नप्रक्रिया उद्योग, कुक्कुटपालन, मधुमक्षिका पालन, दुग्ध व्यवसाय आदी उद्योगांचा विकास होण्याची आणि याबाबत अधिक संशोधन होण्याची गरज आहे.'असेही त्यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वटलेला चेक पुन्हा भरून फसवणूक

$
0
0

पुणे : भांडारकर रोडवरील एचडीएफसी बँकेत वटवण्यात आलेला अकरा हजार रुपयांचा चेक पुन्हा हरिणायातील सोनिपत शाखेत वटवण्याचा प्रयत्न झाला. हरियाणातील बँकेत २९ लाख ५२ हजार रुपयांचा बनावट चेक भरण्यात आल्याचे उघडकीस आले आहे. बँकेच्या लक्षात हा प्रकार आल्यानंतर स्वारगेट पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणी जेसी रिटेल प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे मालक हिंमत प्रजापती (वय ४८, रा. कर्वेनगर) यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. स्वारगेट पोलिसांनी श्रीकृष्ण इलेक्ट्रॉनिकसह अज्ञात आरोपींविरूद्ध चोरी तसेच बनावट चेक तयार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार सप्टेंबरमध्ये घडला.

प्रजापती यांनी ऑगस्ट महिन्यांत शिवशाही प्रतिष्ठा यांना ११ हजार रुपयांचा चेक दिला होता. त्यानंतर लगेचच हा चेक वटवण्यात आला. बँकेच्या ऑनलाइन सिस्टीममध्ये चेक नंबरसह सर्व माहिती नोंदविण्यात आली होती. त्यानंतर हरियाणातील सोनिपत येथील एचडीएफसी बँकेच्या शाखेत दोन सप्टेंबर रोजी श्रीकृष्ण इलेक्ट्रॉनिक्स या नावाने २९ लाख ५२ हजार रुपयांचा तोच चेक भरण्यात आला. सोनिपतच्या शाखेने त्यांच्या सिस्टीममध्ये चेक नंबर आणि इतर माहिती भरली असता, तो चेक यापूर्वीच क्लिअर झाल्याचे समजले. सोनिपत शाखेने चेकची खात्री करण्यासाठी तो ई-मेलद्वारा पुण्यातील शाखेत पाठवला.

पुण्यातील शाखेने खात्री केल्यानंतर तो चेक यापूर्वीच वटवण्यात आल्याचे लक्षात आले. बँकेने अधिक माहिती घेतली असता आरोपींनी बनावट चेक तयार करून तो सोनिपत शाखेत भरल्याचे उघड झाले, अशी माहिती फौजदार दिगंबर जाखडे यांनी दिली. त्यानुसार प्रजापती यांनी स्वारगेट पोलिस ठाण्यात अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वडिलांनीच केला गुन्हेगाराचा खून

$
0
0

पुणे : व्यसनासाठी आई-वडिलांना सतत त्रास देणाऱ्या सराईत गुन्हेगाराचा वडील आणि अल्पवयीन आतेभावाने केलेल्या मारहाणीत मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी सकाळी लोहियानगर येथे उघडकीस आली. या प्रकरणी खडक पोलिसांनी सराईत गुन्हेगाराच्या वडिलांना अटक केली असून, अल्पवयीनाला ताब्यात घेतले आहे.

तुषार ऊर्फ गेंड्या खराडे (वय २२, रा. ५४, एचपी, लोहियानगर) असे खून झालेल्याचे नाव आहे. या प्रकरणी त्याचे वडील महादू गोविंद खराडे (वय ५४) यांना अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खराडेच्या विरुद्ध घरफोडी, जबरी चोरी, हाणामारी असे गंभीर स्वरूपाचे गुन्हा दाखल आहेत. खराडेला दारूचे व्यसन होते. त्यासाठी तो सतत आई, वडील यांना त्रास देत होता.

खराडे गुरुवारी रात्री नऊच्या सुमारास मद्यपान करून घरी आला. त्यानंतर त्याने गोंधळ घालण्यास सुरुवात केली. या प्रकारानंतर वडील आणि आई पोलिसांकडे तक्रार देण्यासाठी निघाले. लोहियानगर येथील सावित्रीबाई स्मारकाजवळ गेल्यानंतर खराडेने आई-वडिलांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. दरम्यान, वडिलांनी त्याच्या पायावर मारहाण केली. त्यामुळे तो खाली पडला. त्याचवेळी खराडेचा अल्पवयीन आतेभाऊ तेथे आला. त्याला पाहताच खराडेने खिशातील ब्लेड काढली. त्यामुळे चिडलेल्या आतेभावाने बांबूचे दांडके घेऊन मारले. डोक्यातून रक्त येऊ लागल्यानंतर आतेभाऊ निघून गेला. खराडेला कुटुंबियांनी हॉस्पिटलात दाखल केले. उपचारानंतर त्याला घरी आणण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


अरुण भालेकर यांचे निधन

$
0
0

पुणेः भरत नाट्य मंदिरमधील नेपथ्य व्यवस्था सांभाळणारे अरुण भालेकर (६३) यांचे शुक्रवारी रात्री अल्पशा आजाराने निधन झाले. गेली ३० वर्षे ते भरत नाट्य मंदिर येथे बॅकस्टेज आर्टिस्ट म्हणून कार्यरत होते. अनेक नाट्यकलाकार; तसेच पुरुषोत्तम करंडक आंतरमहाविद्यालयीन स्पर्धेत सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्यांना ते अरुण काका म्हणूनच परिचित होते. 'भालेकर यांचे पार्थिव सकाळी आठच्या सुमारास भरत नाट्य मंदिर येथे आणण्यात येणार असून, यांच्यावर शनिवारी सकाळी नऊ वाजता वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार होतील.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चायनीज फटाके जप्त करण्याचे आदेश

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

भारतात फटाके आयात करण्यावर बंदी घालण्यात आल्याने बेकायदा चायनीज फटाक्यांची तस्करी होत असल्याचे उघडकीस आले आहे. या फटाक्यांची विक्री रोखून ते जप्त करण्याच्या सूचना महसूल अन्वेषण विभागाने (डायरेक्टर ऑफ रेव्हेन्यू इंटलिजअन्स) पोलिसांना दिल्या आहेत. त्यानुसार पुण्यातही गुन्हे शाखेकडून कारवाई करण्यात येणार आहे.

देशात दिवाळीच्या पार्श्वभूमीवर चायनीज फटाक्यांची विक्री मोठ्या प्रमाणात होत असल्याचे गेल्या वर्षी उघडकीस आले होते. त्यानुसार फटाके विक्री करणाऱ्या व्यावसायिकांवर कारवाई करून फटाके जप्त करण्याच्या सूचना 'डीआरआय'ने सर्व राज्यांतील पोलिस महासंचालकांना दिल्या आहेत. यंदाही दिवाळीच्या पार्श्वभूमीवर भारतात चायनीज फटाक्यांची तस्करी झाल्याची शक्यता 'डीआरआय' ने व्यक्त केली आहे.

देशाच्या 'आयात धोरणा'नुसार फटाके आयात करता येत नाहीत. या बाबत 'डीआरआय' तसेच सीमाशुल्क विभागाकडून वारंवार सूचना दिल्यानंतरही फटाके आयात होत असल्याचे उघडकीस आले आहे. 'डीआरआय' आणि सीमाशुल्क विभागाने फटाक्यांची तस्करी होत असल्याचे उघडकीस आणले आहे. विभागाने कारवाई झाल्यानंतर फटाक्यांची आयात मोठ्या प्रमाणात होत असल्याचे 'डीआरआय'चे अप्पर पोलिस महासंचालक जी. एस. कार्की यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे.

देशातील व्यावसायिक चीनमधून स्वतःच फटाके आयात करीत नाहीत, ना याची खातरजमा करण्यासाठी विशेष पथक स्थापन करण्याच्या सूचना 'डीआरआय'ने पोलिस महासंचालकांना केल्या आहेत. पुणे पोलिसांनी गुन्हे शाखेकडे चायनीज फटाक्यांची विक्री रोखण्याची जबाबदारी दिली आहे. या पार्श्वभूमीवर गुन्हे शाखा फटाके व्यावसायिक तसेच, व्यापाऱ्यांकडे चौकशी करणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ज्येष्ठ महिलेचे मंगळसूत्र हिसकावले

$
0
0

पुणेः टिंगरेनगर येथे ज्येष्ठ महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र जबरदस्तीने हिसका मारून लांबवल्याची घटना मंगळवारी दुपारी घडली. या प्रकरणी अज्ञात व्यक्तीच्या विरोधात विश्रांतवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित ज्येष्ठ महिला टिंगरेनगर येथून दुचाकीवरून घरी जात होती. त्यावेळी दुचाकीवरून आलेल्या दोघांनी त्यांच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसका मारून चोरले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पीएमपी कर्मचाऱ्यांनाही बोनस

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

पुणे महाननगर परिवहन महामंडळाला (पीएमपी) कर्मचाऱ्यांना दिवाळीचे सानुग्रह अनुदान आणि बक्षीस देण्यासाठी महापालिकेने शुक्रवारी आणखी साडेआठ कोटी रुपयांचा निधी दिला. त्यामुळे दिवाळीच्या एकच दिवस आधी कर्मचाऱ्यांच्या बोनसचा मार्ग मोकळा झाला आहे. दरम्यान, पीएमपीने भाडेकराराने बस घेतलेल्या कंत्राटदारांची थकित बिलेही देल्याने कंत्राटदारांचा संपही टळला आहे.

कर्मचाऱ्यांना बोनस देण्यात येणार नसल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आल्याने पीएमटी कामगार संघाने (इंटक) पीएमपीचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक अभिषेक कृष्णा यांना घेराव घातला होता. इंटकचे अध्यक्ष राजेंद्र खराडे आणि सरचिटणीस नुरुद्दीन इमामदार या वेळी उपस्थित होते.

पीएमपीच्या सुमारे साडेअकरा हजार कर्मचाऱ्यांना सानुग्रह अनुदान तसेच बक्षीस देण्यासाठी पीएमपीने पुणे महापालिकेकडे साडेअठरा कोटींची, तर पिंपरी-चिंचवड महापालिकेकडे १३ कोटी रुपयांची मागणी केली होती. त्यानुसार दोन्ही महापालिकांनी पीएमपीला पैसे दिले. मात्र, या पैशातून कर्मचाऱ्यांना बोनस द्यायचा की बस कंत्राटदारांची बिले द्यायची अशी परिस्थिती निर्माण झाली होती. हा प्रश्न सोडविण्यासाठी महापालिकेकडे अतिरिक्त साडेआठ कोटी रुपयांची मागणी करण्यात आली. त्यानुसार, शुक्रवारी सायंकाळी हा निधी देण्यास महापालिका आयुक्तांनी मान्यता दिल्यानंतर पीएमपीने कर्मचाऱ्यांच्या खात्यात बोनसची रक्कम जमा केल्याची माहिती कृष्णा यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रेल्वे स्टेशनही स्मार्ट

$
0
0

प्रवाशांना मिळणार वायफाय, कॅफे शॉप, रेस्ट रूमची सुविधा

म. टा. प्रतिनिधी, पुणे

मोबाइल, लॅपटॉप यूजर्ससाठी वाय-फायची सुविधा... मोबाइल चार्जिंग पॉइंट्स... कॅफे शॉप तसेच आरामदायी 'रेस्ट रूम' आदी पंचतारांकित सुविधा आगामी काळात पुणे रेल्वे स्टेशनवर प्रवाशांसाठी उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. पुणे स्टेशन हायटेक करण्याची योजना रेल्वेच्या पुणे विभागाने आखली असून, लवकरच वरील सुविधा प्रत्यक्षात येणार आहेत.

'डिजिटल इंडिया' या उपक्रमांतर्गत देशातील काही निवडक रेल्वे स्टेशनांवर वाय-फाय सुविधा देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्या अंतर्गत पुणे रेल्वे स्टेशनवर येत्या चार महिन्यात वाय-फाय सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे. ही सुविधा पहिल्या ३० मिनिटांसाठी मोफत असेल, त्यानंतर मात्र त्यांच्याकडून पैसे आकारण्यात येणार आहेत, असे रेल्वेच्या पुणे विभागाचे व्यवस्थापक बी. के. दादाभॉय यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.

पुणे रेल्वे स्टेशनवर सध्या सहा प्लॅटफॉर्म आहेत. त्यापैकी एकाच प्लॅटफॉर्मवर २६ कोचची गाडी थांबू शकते. त्यामुळे लांब पल्ल्याच्या २६ कोचच्या गाड्या स्टेशनवर दाखल झाल्यानंतर, त्यांना तातडीने प्लॅटफॉर्म उपलब्ध होत नाही. त्यासाठी काही वेळ प्रतीक्षा करावी लागते. त्याकरीता स्टेशनची यार्डची लांबी वाढवली जाणार आहे. या कामाला रेल्वे बोर्डाने मंजुरीही दिल्याचे दादाभॉय म्हणाले.

पुणे विभागात रेल्वेमध्ये चोऱ्या व दरोड्यांच्या घटनांचे प्रमाण वाढले असून ते रोखण्यासाठी रेल्वे प्रशासनाने कोणत्या उपाययोजना केल्या आहेत, याबाबत दादाभॉय यांना विचारण्यात आले. 'प्रवाशांच्या सुरक्षेसाठी २५०० आरपीएफच्या जवानांची गरज आहे. मात्र, प्रत्यक्षात सध्या ५५० जवानच उपलब्ध आहेत. जास्त जवान उपलब्ध व्हावेत, अशी मागणी काही वर्षांपूर्वी केली आहे. अद्याप त्यावर निर्णय झालेला नाही,' असेही त्यांनी स्पष्ट केले.

'लोणावळ्यासाठी तिसरी लाइन गरजेची'

पुणे-लोणावळा दरम्यान तिसरी लाइन सुरू करण्यासंबंधीचा प्रस्ताव रेल्वे बोर्डाला पाच वर्षांपूर्वी पाठविण्यात आला होता. मात्र, त्याबाबत अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही. येत्या दोन-तीन महिन्यांत या विषयावर बोर्डाकडून निर्णय होणे अपेक्षित आहे. सध्या या मार्गावर तिसऱ्या लाइनची गरज आहे. लोकल सेवेबरोबरच अन्य मेल गाड्यांनाही त्याचा फायदा होणार आहे. तसेच, ही लाइन सेवेत आल्यानंतर पुणे-लोणावळा दरम्यान लोकल गाड्यांची संख्या वाढवणे शक्य होईल, असेही दादाभॉय यांनी सांगितले.

पुणे स्टेशन..एका दृष्टिक्षेपात

रेल्वेच्या उत्पन्नात गेल्या वर्षीच्या तुलनेत १७ टक्क्यांनी वाढ

लोणावळा-पुणे तिसऱ्या लाइनचा निर्णय तीन महिन्यांत अपेक्षित

शिवाजीनगर स्टेशनचे विस्तारीकरण जागेअभावी रखडले

विविध गाड्यांच्या एकूण १५६ कोचना ४७५ बायो टॉयलेट बसविणार

बायो-मेट्रिक टोकन सिस्टीम कोल्हापूर, खडकी, चिंचवड स्थानकांवर राबविणार

हडपसरला रेल्वेचे टर्मिनस उभारण्यासाठी परवानगी प्राप्त; जागा ताब्यात येईपर्यंत काम नाही.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images