Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

राज ठाकरेंचा पुन्हा ‘चकवा’

0
0

शहराच्या प्रश्नांवरील चर्चेसाठी होणारी पालिका भेट लांबणीवर

म. टा. प्रतिनिधी, पुणे

पुणेकरांना 'नवनिर्माणा'चे स्वप्न दाखवून गेल्या पालिका निवडणुकीत भरघोस यश संपादन करणाऱ्या पक्षाच्या अध्यक्षांची शहराच्या महत्त्वाच्या प्रश्नांसाठी होणारी पालिकेतील भेट पुन्हा लांबणीवर पडली आहे. गेल्या चार ते सहा महिन्यांपासून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे पुण्याच्या प्रश्नांबाबत पालिका आयुक्तांशी चर्चा करण्यात येणार असल्याचे सांगितले जात असले, तरी गुरुवारच्या भेटीत त्यांनी पुन्हा पालिकेला चकवा दिला आहे.

गेल्या पालिका निवडणुकीत तब्बल २९ नगरसेवकांसह थेट विरोधी पक्षनेतेपदाला गवसणी घालण्याचे काम मनसेने केले. परंतु, त्यानंतर झालेल्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत पुणेकरांनी मनसेकडे पाठच फिरवली. या पार्श्वभूमीवर आगामी पालिका निवडणुकीला जेमतेम सव्वा वर्षाचा कालावधी राहिला असल्याने शहरातील महत्त्वाच्या प्रश्नांबाबत ठाकरे यांची पालिका भेट आयोजित करण्यासाठी पदाधिकाऱ्यांतर्फे प्रयत्न सुरू आहेत. गेल्या अनेक महिन्यांपासून त्याबाबतचे नियोजन केले जात असले, तरी अद्याप त्याला मुहूर्त लाभलेला नाही. गेल्या महिनाअखेरीस ही भेट होणार हे निश्चित झाले; पण पुन्हा ती पुढे ढकलण्यात आली. आज, गुरुवारी एका कार्यक्रमानिमित्त पुण्याच्या दौऱ्यावर असलेल्या ठाकरे यांची पालिका आयुक्तांशी भेट घडवून आणण्याची तयारी सुरू करण्यात आली होती. मात्र, सध्या आयुक्तच विकास आराखड्याच्या (डीपी) विकास नियंत्रण नियमावलीला (डीसी रूल्स) अंतिम स्वरूप देण्यात व्यग्र असल्याने ठाकरे यांची पालिका भेट पुन्हा लांबणीवर पडली आहे.

मनसेची भूमिका संदिग्ध

शहरातील बहुचर्चित मेट्रो प्रकल्पापासून ते विकास आराखडा, सार्वजनिक वाहतूक, कचरा, पाणीपुरवठा अशा अनेक समस्यांनी पुणेकरांना ग्रासले आहे. यातील बहुसंख्य समस्यांबाबत आवाज उठविण्याचा इशारा राज ठाकरे यांनी वेळोवेळी पालिकेतील नगरसेवकांना दिला आहे. तरीही, सुरुवातीपासूनच पालिकेतील मनसेची भूमिका संदिग्ध राहिली आहे. आत्ताही, मेट्रो मान्यतेच्या अंतिम टप्प्यात असताना तेथे मेट्रोऐवजी शिवसृष्टीच केली जावी, असा आग्रह मनसेने धरला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


पोलिसांनीच लुटली ९६ लाखांची रोकड

0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

मांजरी येथील गंधर्व रेसिडेन्सी येथे हडपसर पोलिस ठाण्याचे सहायक निरीक्षक गिरीधर यादव, कर्मचारी गणेश मोरे यांच्यासह दोघा स्थानिकांनी वासन आय केअर हॉस्पिटलची ९६ लाख रुपयांची रोकड लुटली. ही घटना मंगळवारी रात्री घडली. या प्रकरणी यादव यांच्यासह चौघांविरुद्ध हडपसर पोलिस ठाण्यात जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

यादव, मोरे यांच्यासह अविनाश देवकर आणि रवींद्र सोपान माने यांनाही ताब्यात घेण्यात आले आहे. या प्रकरणी इनोव्हाचालक विशाल देविदास धेंडे (३३, रा. पांडवनगर) यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. या चौघांनाही ताब्यात घेण्यात आले असून, त्यांना अटक करण्यात आली आहे. भेंडे वासन आय केअरच्या कोथरूड येथील हॉस्पिटलमध्ये चालक म्हणून नोकरी करतो. वायन आय केअरच्या कोथरूड, सदाशिव पेठ आणि मगरपट्टा येथे शाखा आहेत. मगरपट्टा येथील वासनच्या हॉस्पिटलमध्ये बुधवारी बैठक होती, तेव्हा हा प्रकार घडला.

हत्याराच्या बहाण्याने...

जगदाळे, ठाकूर यांना पोलिसांनी गाडीत हत्यार ठेवले असून तुमच्यावर कारवाई होऊ शकते, असा बहाणा करून दम दिला. रोकड पोलिसांच्या ताब्यात असल्याने आणि फारच रात्र झाल्याने ते सगळे घरी गेले, तर झेंडेला मारहाण झाल्यामुळे तो डॉक्टरांकडे उपचारांसाठी गेला होता.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सराफपेढीवरील लूट ‘सीसीटीव्ही’त कैद

0
0

म. टा. प्रतिनिधी, पिंपरी

बंदुकीच्या धाकाने सराफपेढीवर दरोडा टाकण्याचा प्रयत्न गुरुवारी फसला. दुकानाचे मालक व काही सजग नागरिकांनी एकत्रपणे दरोड्याचा प्रयत्न हाणून पाडला. सोने गहाण ठेवण्याच्या बहाण्याने दुकान शिरून लुटारूंनी दागिन्यांची पिशवी भरली; पण सराफाने ती सोडली नाही. अखेर सराफाच्या डोक्यात तलवारीने वार करून शोकेसमधील काही दागिने घेऊन चोरांनी पोबारा केला. थेरगाव येथील जयमल्हारनगर येथील बाजारपेठेत गुरुवारी सायंकाळी ही घटना घडली. पोलिसांनी सीसीटीव्ही फूटेज ताब्यात घेतले आहे.

दिनेश भंवरलाल सोनी (वय ३२, रा. शिवशंकर कॉलनी, थेरगाव) असे जखमी झालेल्या सराफाचे नाव आहे. याप्रकरणी तीन चोरांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, थेरगाव-काळेवाडी जवळील धनगरबाबा मंदिराच्या पाठीमागे सोनी यांचे 'हरिओम ज्वेलर्स' दुकान आहे. गुरुवारी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास तीन चोर दुकानात सोने गहाण ठेवण्याच्या बहाण्याने आले. त्यानंतर त्यांच्यातील एकाने दुकानाचे शटर ओढून घेऊन सोनी यांना बंदुकीचा व तलवारीचा धाक दाखवला. या वेळी एका चोराने दुकानातील सर्व सोन्याचे दागिने पिशवीत भरले. याच वेळी सोनी यांनी आरडाओरड केली. त्यामुळे चोरट्यांनी सोनी यांच्या डोक्यात तलवारीने वार केले. त्यांचा आरडाओरडा ऐकून शेजारचे दुकानदार तेथे आले व त्यांनी दुकानाचे शटर उघडले. त्यामुळे चोर गडबडले. अखेर हातात बसतील एवढेच दागिने खिशात टाकून नागरिकांना धमकावून चोरांनी पळ काढला. लुटारूंनी दुकानापासून काही अंतरावर आरएक्स १०० ही दुचाकी लावली होती. त्यावरून ते डांगे चौकाच्या दिशेने पळून गेल्याची माहिती स्थानिकांनी पोलिसांना दिली.

चोरांच्या हातात तलवार आणि पिस्तूल असल्याने नागरिकांनी त्यांना अडविण्याचा प्रयत्न केला नाही. मात्र, सोनी यांनी हिंमत दाखविल्याने मोठी लूट टळली. घटनेनंतर आसपासच्या व्यापाऱ्यांनी जखमी सोनी यांना खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल केले. घटनास्थळी पोलिस उपायुक्त डॉ. बसवराज तेली, सहाय्यक आयुक्त धनराज वाळुंजकर, वरिष्ठ निरीक्षक एन. जे. शेख यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांनी भेट दिली. या वेळी पोलिसांनी सराफपेढीतील सीसीटीव्ही फूटेज तपासासाठी ताब्यात घेतले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रंगभूमीदिनी जागवल्या ‘नाट्यमय’ आठवणी

0
0

सुहासिनी देशपांडे यांना जीवनगौरव प्रदान

म. टा. प्रतिनिधी, पुणे

'गाडगे महाराजांवरील प्रोजेक्ट करायला घेतला, तेव्हा दिग्दर्शक राजदत्त यांनी गाडगे महाराजांच्या आईच्या भूमिकेसाठी मला विचारले आणि गाडगे महाराज होते, डॉ. श्रीराम लागू! कुणाही कलाकारासाठी धडकी भरेल, असाच क्षण होता. मात्र, ही भूमिका उत्कृष्ट वठल्याची पावती नंतर मला दस्तुरखुद्द लागू यांनी दिली आणि मी कृतार्थ झाले,' अशी भावना ज्येष्ठ रंगकर्मी सुहासिनी देशपांडे यांनी व्यक्त केली.

अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या पुणे शाखेतर्फे रंगभूमीदिनाचे औचित्य साधून गुरुवारी देशपांडे यांना जयंतराव टिळक स्मृती जीवनगौरव पुरस्कार राजदत्त यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. या वेळी देशपांडे यांनी मनोगत व्यक्त केले. त्यांना सन्मानपत्र, स्मृतिचिन्ह, २५ हजार रुपये आणि मानपत्र देण्यात आले. व्यासपीठावर नाट्य परिषदेचे अध्यक्ष सुरेश देशमुख, कार्यवाह दीपक रेगे आणि कोषाध्यक्ष मेघराज राजेभोसले उपस्थित होते.

टिळक स्मारक मंदिर येथे ज्येष्ठ रंगकर्मी ज्योती सुभाष यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडलेल्या या सोहळ्याची सुरुवात 'पंचतुंड नररुंडमालधर' या नांदीने झाली. अंबरी रेगे, सानिया गोडबोले, जुई देशीवकर आणि मधुरा सरदेसाई यांच्या गणेशवंदनेनंतर नटराज पूजन आणि दीपप्रज्ज्वलन झाले. मुख्य कार्यक्रमात कविता जोशी व शमा वैद्य यांना माता जानकी पुरस्कार, रजनी भट यांना प्रपंच लक्ष्मी पुरस्कार, वंदना आणि रवींद्र घांगुर्डे यांना लक्ष्मी- नारायण पुरस्कार आणि भारती बाळ गोसावी यांना चित्तरंजन कोल्हटकर स्मृती पुरस्कार देण्यात आला.

पुरस्कारानंतर झालेल्या 'जल्लोष' या कार्यक्रमात घांगुर्डे दाम्पत्याने 'मधुमीलनात या', 'भासे जनात राया', ' 'खरा तो प्रेमा' आणि 'शतजन्म शोधिताना' ही नाट्यपदे माधव मोडक (तबला) आणि लीलाधर चक्रदेव (ऑर्गन) यांच्या साथीत सादर केली. त्यानंतर अशोक काळे (ऑर्गन), प्रसाद वैद्य (पखवाज) आणि चिन्मय जोगळेकर (गायक) यांच्या साथीत अंबरी रेगे हिने 'नारायणा रमारमणा' या नाट्यपदावर भरतनाट्यम् नृत्यप्रस्तुती केली. राधिका आणि सचिन देशपांडे यांनी सादर केलेल्या नृत्यासही रसिकांची दाद मिळाली. कार्यक्रमाचे निवेदन संजय डोळे आणि भाग्यश्री देसाई यांनी केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पोलिसासह चौघांना कोठडी

0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

वासन आय केअर सेंटर कंपनी कर्मचाऱ्यांचे पगार आणि दिवाळी बोनसची ९६ लाख रुपयांची रक्कम चोरल्याप्रकरणी हडपसर पोलिसांनी चौघांना अटक केली आहे. त्यांना लष्कर कोर्टात हजर करण्यात आले असता दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली.

याप्रकरणी हडपसर पोलिस स्टेशनचे सहायक निरीक्षक गिरीधर नकुल यादव (४० रा. वानवडी), कर्मचारी गणेश भानुदास मोरे (३२), अविनाश संतराम देवकर (२६) रविंद्र सोपान माने (३० तिघे राहणार हडपसर) यांना अटक करण्यात आली आहे.

त्यांच्याविरुद्ध विशाल देविदास धेंडे ( ३३, रा. गोखलेनगर) याने फिर्याद दाखल केली आहे. अटक आरोपींनी फिर्यादीला मारहाण करून त्याच्याकडील कारची डिक्की उघडण्यास भाग पाडले. त्यामधील वासन आय केअर सेंटर कंपनीच्या कर्मचाऱ्यांचे पगार आणि दिवाळी बोनसची ९६ लाख रुपये रक्कम असलेली पिशवी जबरदस्तीने चोरून नेली.

याप्रकरणी आरोपींना अटक करून कोर्टात हजर करण्यात आले. आरोपींकडून ९५ लाख ९० हजार रुपये हस्तगत करण्यात आले आहेत. उर्वरित ६० हजार रुपये हस्तगत करायचे आहेत. आरोपीचे आणखी कोण साथीदार आहेत याचा शोध घ्यायचा आहे. अटक आरोपींकडे अधिक तपास करण्यासाठी त्यांची पोलिस कोठडी देण्यात यावी, असा युक्तिवाद सरकारी वकील किरण बेंडभर यांनी कोर्टात केला. कोर्टाने अटक सहायक निरीक्षक, कर्मचारी याच्यासह चौघांना सात नोव्हेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वाद मिटविण्याच्या बैठकीचा ‘आखाडा’

0
0

काँग्रेस विरोधी पक्षनेते, स्थायी समिती सदस्यांत वाद

म. टा. प्रतिनिधी, पुणे

पालिकेची स्थायी समिती आणि मुख्य सभा यांच्यामध्ये वर्गीकरणावरून सुरू झालेला वाद मिटविण्यासाठी बोलाविण्यात‌ आलेल्या समन्वय समितीच्या बैठकीतच पुन्हा 'आखाडा' रंगला. काँग्रेसचे विरोधी पक्षनेते आणि काँग्रेसचे स्थायी समिती सदस्य यांच्यात आव्हान प्रतिआव्हानांचा खेळ सुरू झाला. त्यामुळे ही बैठक आटोपती घेण्याची वेळ महापौरांवर आली.

नुकत्याच झालेल्या मुख्य सभेच्या बैठकीत स्थायी समितीने मंजुरी दिलेले वर्गीकरणाचे प्रस्ताव पुढे ढकलण्याचा निर्णय गटनेत्यांनी घेतला. विरोधी पक्षनेते अरविंद शिंदे यांच्या प्रभागातील वर्गीकरणाचा प्रस्ताव स्थाय‌ी समितीने अमान्य केल्याने समितीच्या सदस्यांनी दिलेल्या वर्गीकरणाचे प्रस्ताव पुढे ढकलण्यात आले. मुख्य सभेत गटनेत्यांनी ‌दिलेल्या वागणुकीचा बदला म्हणून स्थायी समितीनेही वर्गीकरणाचे प्रस्ताव पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे स्थायी समिती विरुद्ध गटनेते असा संघर्ष पेटला आहे.

गटनेते आणि स्थायी समितीच्या सदस्यांमध्ये सुरू झालेला वाद मिटविण्यासाठी महपौर, उपमहापौर, स्थायी समितीचे सर्व सदस्य यांची समन्वय बैठक बोलाविण्यात आली होती. सर्व सभासदांनी एकमेकांचा मान राखण्याची गरज असल्याची चर्चा यामध्ये झाली. माझ्या प्रभागातील वर्गीकरणाचा प्रस्ताव स्थायी समितीने मंजूर का केला नाही, असा प्रश्न विरोधी पक्षनेते अरविंद शिंदे यांनी विचारला, तेव्हा हा विषय कोर्टात प्रलंबित असल्याचे कारण प्रशासनाने दिल्याने त्याला मंजुरी देण्यात आली नसल्याचे कारण स्थायीच्या अध्यक्षा अश्विनी कदम यांनी दिले. ही चर्चा सुरू असतानाच काँग्रेसचे नगरसेवक आणि स्थायीचे सदस्य चंदू कदम यांनी 'मुख्य सभेत माझे 'स' यादीतील वर्गीकरण का मंजूर केले नाही,' अशी विचारणा शिंदे यांना केली.

बैठक घेतली आटोपती

अरविंद शिंदे यांनी स्थायीमध्ये 'तुम्ही माझ्या वर्गीकरणात काय मदत केली,' असा प्रतिप्रश्न बैठकीत केला'. बैठकीला आपण उपस्थित नसल्याचे उत्तर कदम यांनी दिल्याने ‌तुम्ही बैठकीला उपस्थित का नव्हता, अशी विचारणा शिंदे यांनी केली. यावर कदम यांनी तुम्ही माझ्यावर ओरडू नका, वर्गीकरणे मंजूर करून घ्यायला मी समितीचा अध्यक्ष नाही. तसेच गटनेते या नात्याने आमची वर्गीकरणे मंजूर करून घेणे तुमचे काम असल्याचे शिंदे यांना सुनावले. त्यामुळे या दोघांमध्ये जोरदार शाब्दिक चकमक उडाली. बघू तुम्ही कसे प्रस्ताव मान्य करुन घेता, अशी आव्हाने एकमेकांना देत सभासद बाहेर पडल्याने बैठकही आटोपती घेण्याची वेळ महापौर, उपमहापौरांवर आली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ज्येष्ठ पदाधिकारी हवा की नको?

0
0

बालकुमार साहित्य संस्थेत आधीपासूनच गोंधळ

म. टा. प्रतिनिधी, पुणे

ज्येष्ठ व्यक्ती अध्यक्षपदी असावी की नसावी, यावरून अखिल भारतीय मराठी बालकुमार साहित्य संस्थेत गोंधळ निर्माण झाला आहे. ६५ वर्षांवरील व्यक्तीला संस्थेचा पदाधिकारी होता येणार नाही, असे एकीकडे सांगण्यात येत असताना दुसरीकडे १८ वर्षांवरील कोणत्याही व्यक्तीला संस्थेचा पदाधिकारी होता येईल, असे सांगण्यात येत आहे. 'साहित्यिक नसलेल्यांच्या हाती संस्था,' असा ठपका नको म्हणून ज्येष्ठ बालसाहित्यिकारांनी संस्थेच्या कामात लक्ष घालावे, असेही आवाहनही करण्यात येत आहे. यामुळे संस्थेची नेमकी भूमिका काय याबाबत गोंधळ निर्माण होत असून, संस्थेचे कामकाज सुरू होण्याआधीच विसंवाद व गोंधळ दिसू लागला आहे.

तब्बल पंधरा वर्षे जुन्याच संस्थेच्या नोंदणी क्रमांकावर संस्थेचे कामकाज सुरू होते. या पार्श्वभूमीवर संस्थेचे पुनरुज्जीवन करण्यासाठी घटनेमध्ये बदल करण्यात आले आहेत. नव्या घटनेनुसार पुण्याबाहेरील सदस्यांची जिल्हा प्रतिनिधी म्हणून वर्णी लागणार आहे. संस्थेचे मुख्य कार्यालय कायमस्वरूपी पुण्यातच राहणार आहे. त्यातच ६५ वर्षांवरील व्यक्तीला संस्थेच्या कुठल्याही पदावर राहता येणार नाही, या तरतुदीमुळे गोंधळ निर्माण झाला आहे.

संस्थेच्या एका पदाधिकाऱ्याशी याबाबतीत संवाद साधला असता, '६५ वर्षांवरील व्यक्तीला संस्थेच्या कुठल्याही पदावर राहता येणार नाही. जास्तीत जास्त १५ वर्षे एक व्यक्ती पदावर राहू शकेल, अशी तरतूद करण्यात येणार आहे. नवनव्या लोकांना संधी मिळावी, हा त्यामागे हेतू आहे,' असे त्यांनी सांगितले. दुसऱ्या एका पदाधिकाऱ्याशी संपर्क साधला असता, '१८ वर्षावरील कोणत्याही व्यक्तीला संस्थेचा पदाधिकारी होता येईल. साहित्यिक नसलेल्या लोकांच्या हातात संस्था असल्याचा ठपका येऊ नये यासाठी ज्येष्ठ बालसाहित्यिकारांनी संस्थेच्या कामात लक्ष घालावे, संस्थेकडे पाठ फिरवू नये,' असे आवाहन त्यांनी केले.

दरम्यान, पदाधिकाऱ्यांच्या परस्पराविरोधी भूमिकेमुळे संस्थेची नेमकी भूमिका काय, असा प्रश्न असून अध्यक्षपदाचा मार्ग खुला ठेवण्यासाठी तर ही तरतूद नाही ना, अशी शंका घेण्यास वाव आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भाडेकरूंना दिलासा

0
0

धोकादायक इमारतीतील जागेची नोंद करून प्रमाणपत्र देण्याचे आदेश

म. टा. प्रतिनिधी, पुणे

जुन्या, मोडकळीस आलेल्या इमारती/वाड्यांची परिस्थिती धोकादायक होऊनही त्यातून बाहेर पडण्यास टाळाटाळ करणाऱ्या भाडेकरूंना राज्य सरकारने दिलासा दिला आहे. पालिकेतर्फे अशा धोकादायक इमारती पाडण्यापूर्वी प्रत्येक भाडेकरू/सदनिकाधारकाची ताब्यातील राहत्या जागेची नोंद करून त्याचे प्रमाणपत्र देण्यात यावे, असे आदेश महापालिकांना देण्यात आले आहेत. त्यामुळे, धोकादायक इमारतींवर कारवाई केल्यानंतर हक्क जाणार, ही नागरिकांमधील भीती दूर होण्याची चिन्हे आहेत.

राज्याच्या विविध भागांमध्ये दर वर्षी पावसाळ्यात जुन्या/मोडकळीस आलेल्या इमारती कोसळून जीवित आणि वित्तहानी होते. संबंधित महापालिकांतर्फे अशा इमारतींची माहिती गोळा केली जात असली, तरी यापुढे दर वर्षी मार्च-एप्रिलमध्येच अशा मिळकतींचे सर्वेक्षण करून त्याचे चार प्रकारांत वर्गीकरण करण्याच्या सूचना नगरविकास विभागाने केल्या आहेत. त्यानुसार, अति-धोकादायक आणि राहण्यास अयोग्य अशा इमारती (सी १) तातडीने रिकाम्या केल्या जाव्या, असे स्पष्ट करण्यात आले आहे. मालक-भाडेकरूंमधील वादामुळे अशा धोकादायक इमारतींमधून बाहेर पडण्यास अनेकदा भाडेकरू तयार होत नाहीत. इमारतीमधून बाहेर पडल्यास आपला हक्क जाईल, अशी भीती त्यांच्या मनात असते. त्यामुळे, मोडकळीस आलेल्या इमारतींमध्ये जीव मुठीत घेऊन राहणाऱ्या नागरिकांनाही सरकारने संरक्षण देऊ केले आहे. अशा इमारती रिकाम्या करण्यापूर्वी भाडेकरू/सदनिकाधारक यांच्या ताब्यात असलेले चटई क्षेत्र मोजून प्रत्येक भाडेकरू/सदनिकाधारकाला तसे प्रमाणपत्र देण्यात यावे, असे निर्देश सरकारने दिले आहेत.

सरकारच्या सूचनांनुसार सर्व महापालिकांना आता 'सी १'सह इमारत रिकामी करून रचनात्मक दुरुस्ती करणे (सी २ ए), इमारत रिकामी न करता रचनात्मक दुरुस्ती करणे (सी २ बी) आणि इमारतीची किरकोळ दुरुस्ती (सी ३) अशाप्रकारे जुन्या इमारतींचे वर्गीकरण करावे लागणार आहे.

'वीज, पाणी तोडा'

जुन्या-मोडकळीस आलेल्या आणि अति-धोकादायक स्वरूपात मोडणाऱ्या इमारती रिकाम्या करण्यासाठी गेलेल्या महापालिकेच्या पथकाला अनेकदा स्थानिकांचा मोठा विरोध सहन करावा लागतो. त्यामुळे, त्या इमारतींवर अनेकदा कारवाई न करताच पालिका पथकांना परत फिरावे लागते. 'यापुढे, अशा इमारती रिकाम्या करण्यात काही अडथळे निर्माण झाल्यास इमारतीची वीज जोडणी आणि पाणीपुरवठा खंडित केला जावा,' असे स्पष्ट आदेश सरकारने दिले आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


पन्नास हजार किलो फराळाची विमानवारी

0
0

परदेशी, परराज्यांत कुरिअर पाठवण्याच्या प्रमाणात वाढ

म. टा. प्रतिनिधी, पुणे

नोकरीनिमित्त वेगवेगळ्या राज्यांत, परदेशांत वास्तव्याला असलेल्या आपल्या नातेवाइकांना दिवाळीतील फराळाचा आनंद मिळावा, या उद्देशाने सुरू झालेल्या कुरिअर सेवेला पुणेकरांचा चांगला प्रतिसाद मिळतो आहे. गेल्या आठवड्यापासून फराळाच्या पदार्थांच्या विमानवाऱ्या सुरू झाल्या असून, या वर्षीच्या दिवाळीत कुरिअर कंपन्यांमार्फत तब्बल पन्नास हजार किलो फराळाची वाहतूक होणार आहे.

दिवाळीत कुटुंबीय आणि मित्रमंडळींबरोबर फराळाचा आस्वाद घेणे, ही अलिखित परंपराच आहे; मात्र नोकरीनिमित्त दुसऱ्या राज्यात अथवा परदेशात गेलेल्या जवळच्या मंडळींना दिवाळीतल्या या कौटुंबिक स्नेहसंमेलनाची उणीव भासते. याची दखल घेऊन अनेक कुरिअर कंपन्या आणि फराळाचे पदार्थ बनवणाऱ्या उद्योजकांनी गेल्या तीन वर्षांपासून फराळ कुरिअर सेवा उपलब्ध केल्या आहेत. दर वर्षी या उपक्रमाला लोकांचा उत्तम प्रतिसाद मिळत असून, या वर्षी फराळाचे कुरिअर पन्नास हजार किलोंचा टप्पा गाठणार असल्याचे विक्रेत्यांचे मत आहे.

'खाऊवाले पाटणकर' यांनी तीन वर्षांपूर्वी कुरिअरने फराळ पाठविण्यास सुरुवात केली. या वर्षीही त्यांना ग्राहकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला, असून दहा हजार किलो फराळ त्यांच्या माध्यमातून पाठवला जाणार आहे. याबद्दल रमेश पाटणकर म्हणाले, 'आम्ही फराळाच्या पदार्थांच्या ऑनलाइन विक्रीसाठी मोबाइल अॅप्लिकेशन तयार केले आहे. त्यामुळे ग्राहकांना ऑनलाइन पैसे भरून हवी तिथे ऑर्डर मागवणे सोपे झाले आहे. अवघ्या अर्धा किलोपासून पंधरा किलो वजनापर्यंक फराळाचे वेगवेगळे बॉक्स उपलब्ध आहेत. आतापर्यंत अमेरिका, इंग्लड, स्वित्झर्लंड, जर्मनी, ऑस्ट्रेलिया, ओमान, दुबई अशा विविध ठिकाणी आम्ही फराळाची कुरिअर पाठवली आहेत.'

'गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा फराळाच्या कुरिअरमध्ये दुपटीहून जास्त वाढ झाली आहे. अवघ्या आठवडाभरात आम्ही दोन हजार किलो फराळ ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, आफ्रिका, जपान, अमेरिका आणि ब्रिटनमध्ये पाठवला आहे. फराळाच्या कुरिअरने आता वेग घेतला असून, संपूर्ण दिवाळीमध्ये आमची सेवा सुरू राहणार आहे. संबंधित देशांच्या पॅकिंगसंदर्भातील सर्व सूचनांचे काटेकोर पालन होत असल्याने फराळाचे कुरिअर पाठवणे सोपे झाले आहे,' असे 'पाळंदे कुरिअर'चे आशिष पाळंदे यांनी सांगितले.

बारकावे समजून घेतले

यापूर्वी अमेरिका आणि ब्रिटनमध्ये खाद्यपदार्थांची कुरिअरच्या माध्यमातून देवाणघेवाण होत होती; पण न्यूझीलंड, ऑस्ट्रेलिया यांसह काही देशांमध्ये खाद्यपदार्थांबद्दल अनेक नियम असल्याने कुरिअर पाठवण्याचे प्रमाण कमी होते. आता फराळाचे विक्रेते आणि कुरिअर कंपन्यांनी या सर्व देशांचे नियम बारकाईने समजून घेतले असून, त्यांच्या नियमात बसतील अशा पद्धतीने तेथील कंपन्यांशी करार करून कुरिअर पाठवण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे फराळ नामंजूर करण्याचे प्रमाण अत्यल्प झाले आहे. फराळाच्या वजनानुसार अवघ्या तीनशे रुपयांपासून पुढे कुरिअरसाठी दर आकारण्यात येत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ठकसेन संचालकाचा जामीनअर्ज फेटाळला

0
0

गुंतवणूकदारांची दीड कोटींची फसवणूक

म. टा. प्रतिनिधी, पुणे

तीन वर्षांत रक्कम दामदुप्पट करण्याच्या बहाण्याने हजाराहून अधिक गुंतवणूकदारांना १.३९ कोटी रुपयांना ठकविणाऱ्या आरबीएस मल्टिकेअरच्या संचालकाचा जामीन कोर्टाने फेटाळला. विशेष न्यायाधीश एस. जे. काळे यांच्या कोर्टाने हा अर्ज फेटाळला.

विनायक पांडुरंग मिसाळ (३७, रा. गंगाई अपार्टमेंट, दांडेकर पूल) असे या ठकसेनाचे नाव आहे. या प्रकरणी चंद्रकांत नाना वाळुंज (३९, रा. सिध्देश्वर सोसायटी, नवीन पनवेल पूर्व, जि. रायगड) यालाही यापूर्वीच गजाआड करण्यात आले आहे. रमेश बुधावले, विजय वर्गे, संतोष माटे, संतोष गायकर, सुरेश मुंढेकर, दिनेश शेंडे या कंपनीच्या संचालकांवरही दत्तवाडी पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी विलास रघुनाथ आंब्रे (५४, रा. मुपो शेल्डी, ता. खेड जि. रत्नागिरी) यांनी फिर्याद दिली होती. त्यानुसार अपहार करणे, फसवणूक करणे तसेच महाराष्ट्र ठेवीदारांच्या हितसंबंधाचे रक्षण अधिनियम १९९९ (एमपीआयडी नुसार कारवाई करण्यात आली आहे.

आरोपींनी ऑक्टोबर २०१० ते मार्च २०१४ या कालावधीत आरबीएस मल्टिकेअर प्रा.लि. या नावाने सातारा रस्त्यावरील पंचमी हॉटेलजवळ कार्यालय उघडले होते. कंपनीच्या माध्यमातून आरोपींनी विविध योजनांमध्ये पैसे गुंतविल्यास दोन ते तीन वर्षांत रक्कम दुप्पट करण्याचे आमिष गुंतवणूकदारांना दाखवले. त्यानुसार गुंतवणूकदारांनी मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली. दरम्यानच्या काळात ३५५ गुंतवणूकदारांना ५१ लाख ६७ लाखांची रक्कम परत करण्यात कंपनीला अपयश आले. गुन्ह्याचा तपास करीत असताना आरोपींनी नवी मुंबई, रत्नागिरी, ठाणे जिल्ह्यातील तब्बल साडेबाराशे गुंतवणूकदारांना एक कोटी ३८ लाख ९२ हजारांना गंडा घातल्याचे निष्पन्न झाले.

मिसाळ हा आरबीएस कंपनीचा संचालक म्हणून काम पाहात होता. त्याच्यावर आरोपपत्र दाखल होणे बाकी आहे. त्याला जामीन मिळाल्यास तो इतरांवर दबाब आणू शकतो. पुरावा नष्ट करण्याचीही शक्यता असल्याने अतिरिक्त सरकारी वकील सुनील हांडे यांनी त्याचा जामीन फेटाळण्याची मागणी केली. गुन्ह्याचा तपास दत्तवाडी पोलिस स्टेशनचे सहायक पोलिस निरीक्षक वि. द. केसकर करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जीवरक्षक आवश्यकच

0
0

सोसायट्यांमधील जलतरण तलावांसाठी नगरविकास विभागाचे बंधन

म. टा. प्रतिनिधी, पुणे

महापालिका हद्दींमध्ये बांधल्या जाणाऱ्या गृहप्रकल्पांमध्ये जलतरण तलाव असल्यास, त्या ठिकाणी प्रशिक्षित जीवरक्षकांची नियुक्ती करण्याचे बंधन राज्य सरकारने घातले आहे. बांधकाम परवानगी देतानाच्या अटींमध्येच प्रशिक्षित जीवरक्षकांची नियुक्ती अनिवार्य करण्याचा समावेश केला जावा, असे आदेश नगरविकास विभागाने सर्व पालिकांना दिले आहेत.

गेल्या काही वर्षांमध्ये विविध शहरांमध्ये मोठमोठे गृहनिर्माण प्रकल्प उभे राहिले. ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी बांधकाम व्यावसायिकांमार्फत विविध 'अॅमिनिटी' दिल्या गेल्या. त्यामध्ये, बहुतांश ठिकाणी जलतरण तलावांचा समावेश केला गेला. सार्वजनिक अथवा खासगी कोणत्याही जलतरण तलावावर जीवरक्षकांची नियुक्ती करणे आवश्यक असते. परंतु, अनेक गृहप्रकल्पांमध्ये अशाप्रकारे जीवरक्षक नियुक्तीकडे दुर्लक्ष केले गेले अथवा पोहता येत नसतानाही जीवरक्षक प्रमाणपत्र बाळगणाऱ्यांची नेमणूक केली गेली. राज्याच्या काही भागांमध्ये दुर्दैवी अपघात घडल्याने जीवरक्षकांच्या नियुक्तीबाबत ठोस पावले उचलण्यात यावी, अशी मागणी विविध स्तरांतून केली गेली. माजी आमदार मोहन जोशी यांनी विधान परिषदेतही सरकारकडे त्याबाबत विचारणा केली होती. अखेर, जलतरण तलावांसाठी प्रशिक्षित जीवरक्षकांची नियुक्ती केली जावी, असे स्पष्ट निर्देश नगरविकास विभागाने सर्व महापालिकांना दिले आहेत.

आपत्कालीन परिस्थितीत एखाद्याचा जीव वाचविण्यासाठी कृत्रिम श्वासोच्छ्वास देणे, पोटातून पाणी बाहेर काढणे, प्रथमोपचार करणे अशा सर्व गोष्टींचे ज्ञान जीवरक्षकाला असलेच पाहिजे. त्यामुळेच, बांधकाम परवानगी देतानाच, जलतरण तलावाची निर्मिती होत असल्यास, तेथे प्रशिक्षित जीवरक्षकाची नेमणूक करण्याची अट समाविष्ट करावी, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.

अटीची पूर्तता गरजेची

शहराच्या विविध भागांमध्ये मोठ्या प्रमाणावर बांधकामे होत असली, तरी प्रत्येक ठिकाणीच जलतरण तलाव असतो असे नाही. सरासरी शंभर बांधकामांमागे मोठ्या स्वरूपाच्या १० गृहनिर्माण प्रकल्पांमध्ये जलतरण तलावाची सोय उपलब्ध असते. अशा स्वरूपाच्या बांधकामांना यापुढे प्रशिक्षित जीवरक्षकाच्या अटीची पूर्तता करावी लागणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सत्ताधारी राष्ट्रवादीचे कचराप्रश्नी आंदोलन

0
0

कचरामुक्तीत आयुक्तांना अपयश आल्याची टीका

म. टा. प्रतिनिधी, पुणे

शहरातील कचरा प्रश्न सोडविण्यासाठी वारंवार पाठपुरावा करूनही पालिका आयुक्त कुणाल कुमार यांना त्यामध्ये अपयश आल्याची टीका करून गुरुवारी सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने आंदोलन करण्यात आले.

गेली अनेक वर्षे सत्तेवर असूनही राष्ट्रवादी काँग्रेसलाच रस्त्यावर आंदोलनासाठी उतरावे लागल्याने आयुक्त सत्ताधाऱ्यांनाही किंमत देत नसल्याची चर्चा पालिकेत रंगली होती. शहरातील विविध भागांत कचऱ्याचे ढीग साठल्याने राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी 'व्हॉटस्अॅप' वरून अधिकाऱ्यांना फोटो पाठवून आपला निषेध नोंदविला.

शहराध्यक्षा खासदार वंदना चव्हाण यांच्या नेतृत्त्वाखाली झालेल्या आंदोलनात सभागृह नेते शंकर केमसे, अंकुश काकडे, दीपक मानकर, बाळासाहेब बोडके, अप्पा रेणुसे, विशाल तांबे, बाबूराव चांदेरे, विनायक हणमघर, रुपाली चाकणकर, योगेश वराडे, संजय गाडे आदी सहभागी झाले होते. कचऱ्याच्या वाढत्या समस्येमुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण होत असून, शहराचे रुपांतर 'गार्बेज सिटी' मध्ये होऊ लागले आहे. या पूर्वीही राष्ट्रवादीने आयुक्तांना पत्र लिहून उपाययोजना करण्याची मागणी केली होती. मात्र, त्यावर कोणतीही सुधारणा न केल्याने आंदोलन करण्यात येत असल्याचे श्रीमती चव्हाण यांनी सांगितले. या पूर्वीच्या आयुक्तांनी पुणे शहराला 'स्वच्छ व सुंदर' बनविण्यासाठी प्रयत्न केले. अशीच कामगिरी आपल्याकडूनही व्हावी, असे चव्हाण यांनी कुणाल कुमार यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे. स्मार्ट सिटीचा प्रकल्प राबविताना ज्या पद्धतीने अधिकाऱ्यांना तसेच, कर्मचाऱ्यांना उत्साहाने कामाला लावले जाते तो उत्साह कचरा प्रश्न सोडविण्यामध्ये दिसून येत नसल्याची टीका चव्हाण यांनी केली. दिवाळीपर्यंत आयुक्तांनी कचरा प्रश्न सोडविण्यासाठी तातडीने पावले न उचलल्यास राष्ट्रवादीतर्फे नागरिकांच्या हितासाठी रस्त्यावर उतरून मोठे आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही चव्हाण यांनी दिला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बंद लेन होणार महिनाअखेर सुरू

0
0

द्रुतगर्ती मार्गावरील रॉक बोल्टिंगचे काम पूर्णत्वाकडे

म. टा. प्रतिनिधी, पुणे

पुणे-मुंबई एक्स्प्रेस-वेवरील मुंबईकडे जाणारी बंद असलेली एक लेन नोव्हेंबरअखेर सुरू होण्याची शक्यता आहे. एक्स्प्रेस-वेवरील आडोशी, खंडाळा बोगदा परिसरात दरडींना रॉक बोल्टिंग करून जाळ्या बसविण्याचे काम सुरू असल्याने गेल्या तीन ते चार महिनांपासून ही लेन बंद होती. दरम्यान, जाळ्या बसविण्याचे काम जवळपास पूर्ण झाल्याने नोव्हेंबरअखेर लेन सुरू होण्याची शक्यता आहे.

जून, जुलै महिन्यात खंडाळा, आडोशी येथे दरडी कोसळल्या होत्या. या परिसरात पुन्हा दरडी कोसळू नयेत, या साठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळातर्फे (एमएसआरडीसी) जिऑलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडियाचे शास्त्रज्ञ, इटालियन शास्त्रज्ञ आणि मुंबई आयआयटीतील तज्ज्ञांचा सल्ला घेण्यात आला होता. त्यानुसार एक्स्प्रेस-वेच्या कडेला असलेल्या दरडींना 'रॉक बोल्टिंग' करून उच्च क्षमतेच्या जाळ्या बसविण्यात आल्या आहेत.

रॉक बोल्टिंग करून उच्च क्षमतेच्या जाळ्या बसविण्यासाठी सहा महिन्यांचा कालावधी लागण्याची शक्यता महामंडळाने यापूर्वीच वर्तवली होती. मात्र, जाळी बसविण्याचे काम नमूद कालावधीच्या आतच पूर्ण होत आले आहे. त्यामुळे नोव्हेंबरअखेर पर्यंत मुंबईकडे जाणारी बंद असेलेली लेन सुरू होण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे जाळी बसविल्यानंतर उर्वरीत काम वाहतूक सुरू असतानाही केले जाईल, असे महामंडळाचे कार्यकारी अभियंता संजय गांगुर्डे यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मशाली-दिव्यांनी झळाळणार रायगड

0
0

दुर्गप्रेमींतर्फे दीपोत्सवाचे आयोजन

म. टा. प्रतिनिधी, पुणे

गड-किल्ल्यांवरील अंधार दूर करून संवर्धनाचा दिवा लावण्यासाठी दुर्गप्रेमींनी पुढाकार घेतला आहे. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी पहाटे स्वराज्याची राजधानी रायगड मशाली आणि दिव्यांनी झळाळून निघणार आहे.

यंदा १० आणि ११ नोव्हेंबर रोजी रायगडावर दीपोत्सव साजरा करण्यात येणार आहे. राज्यभरातील दुर्ग व इतिहासप्रेमी या उत्सवात सहभागी होणार आहेत. सरखेल कान्होजी आंग्रे यांचे वंशज रघुजीराजे आंग्रे, पहिल्या महिला सरसेनापती उमाबाई दाभाडे यांचे वंशज सत्यशीलराजे दाभाडे , दुर्गसंवर्धक महासंघाचे अध्यक्ष मिलिंद क्षीरसागर, अभिनेता प्रथमेश परब या वेळी उपस्थित राहणार आहेत.

रायगडावर केल्या जाणाऱ्या या दीपोत्सवाविषयी अमोल तावरे यांनी माहिती दिली. '२०१२पासून प्रतापगडावर नवरात्रीत ललिता पंचमीच्या दिवशी ३५१ मशाली लावल्या जातात. तसेच राजगडावरही दीपोत्सव साजरा केला जातो; मात्र स्वराज्याची राजधानी अंधारात राहात होती. ही उणीव दूर करण्यासाठी फेसबुकवरील 'महाराष्ट्राची दुर्गसंपत्ती' नावाच्या पेजवरील सदस्य एकत्र आले. त्यातील निखिल साळसकर यांच्या संकल्पनेतून 'एक पहाट रायगडावर' ही कल्पना प्रत्यक्षात आणण्यात आली. गेली तीन वर्षे हा उपक्रम करण्यात येतो. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी पहाटे रायगडावरील राजदरबार, समाधिस्थळ, जगदीश्वर मंदिर आदी ठिकाणी दिवे आणि मशाली लावल्या जातात. त्यावेळी गड झळाळून निघतो, असे तावरे यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आज ठरणार संमेलनाध्यक्ष

0
0

यंदा निवडणुकीत सर्वाधिक मतदानाची नोंद

म. टा. प्रतिनिधी, पुणे

साहित्य संमेलनाच्या आजवरच्या इतिहासातील सर्वाधिक मतदान ८९व्या साहित्य संमेलनाध्यक्ष निवडणुकीत झाले आहे. त्यामुळे या निवडणुकीत कोण बाजी मारणार याची उत्सुकता वाढली असून, आज शुक्रवारी मतमोजणी होऊन संमेलनाध्यक्षांचे नाव जाहीर केले जाणार आहे.

पिंपरी चिंचवड येथे होत असलेल्या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदासाठी शरणकुमार लिंबाळे, श्रीपाल सबनीस, श्रीनिवास वारुंजीकर, अरुण जाखडे आणि विठ्ठल वाघ निवडणुकीच्या रिंगणात आहेत. या निवडणुकीत मतदान करण्याची मुदत गुरुवारी सायंकाळी संपली. राज्यभरातील आणि बृहन्महाराष्ट्रातील एकूण १०७५ मतदारांपैकी १०३३ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. त्यामुळे आजवरच्या इतिहासातील हे सर्वाधिक मतदान असल्याचा दावा निर्वाचन अधिकारी अॅड. प्रमोद आडकर यांनी केला.

मागील वर्षी, ८८व्या संमेलनाध्यक्षपदाच्या निवडणुकीत १०२० जणांनी मतदान केले होते. हा विक्रम यंदा मोडीत निघाला. सुरुवातीला मतदानाचा वेग अत्यल्प होता. काहींना मतपत्रिका न मिळाल्याने त्यांना पुन्हा मतपत्रिका पाठवाव्या लागल्या होत्या. मतदानाच्या शेवटच्या काही दिवसांत एकगठ्ठा मतपत्रिका आल्याने मतदानाचा टक्का वाढला आहे. त्यामुळे ही निवडणूक चुरशीची होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. दाखल मतपत्रिकांची मोजणी शुक्रवारी सकाळी नऊ वाजल्यापासून करण्यात येणार आहे. दुपारी बारा वाजेपर्यंत संमेलनाध्यक्षांचे नाव जाहीर करण्यात येईल असे आडकर यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


अखेर चार वर्षांनी न्याय

0
0

मावळ गोळीबारातील मृतांच्या वारसांना नोकरी

म. टा. प्रतिनिधी, पिंपरी

मावळ गोळीबारात मृत्युमुखी पडलेल्या मृतांच्या वारसांना तब्बल चार वर्षांनंतर गुरुवारी न्याय मिळाला. मृतांच्या वारसदारांना पिंपरी-चिंचवड महापालिकेचे कर्मचारी म्हणून नियुक्तिपत्र मिळाले आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या पवना थेट जलवाहिनीच्या प्रकल्पाच्या विरोधात नऊ ऑगस्ट २०११ रोजी शेतकऱ्यांनी आंदोलन केले होते. त्यामध्ये पोलिसांनी केलेल्या गोळीबारात कांताबाई अंकुश ठाकर (रा. येळसे), मोरेश्वर सोपान साठे (रा. शिवणे) आणि श्यामराव वाघू तुपे (रा. सडवली) यांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर राज्य सरकारने प्रकल्पाच्या कामाला स्थगिती दिली. या मृतांच्या वारसदारांना महापालिकेने नोकरी द्यावी, अशी मागणी करण्यात आली होती. परंतु ती पूर्ण होत नव्हती.

खूप काळ प्रतीक्षा केल्यानंतर मृतांचे वारसदार नितीन ठाकर, अक्षय साठे आणि हौसाबाई तुपे यांची अनुक्रमे शिपाई आणि मजूर म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांना महापालिकेचे सहआयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे यांच्या हस्ते नियुक्तिपत्र देण्यात आले. शिवसेनेच्या गटनेत्या सुलभा उबाळे या वेळी उपस्थित होत्या. या तिघांनाही कामावर रुजू होण्याचे आदेशही देण्यात आले आहेत.
.......

नोकरीची गरज असतानाही तब्बल चार वर्षे वाट पहावी लागली. अखेर शिवसेनेने केलेल्या पाठपुराव्यामुळे नोकरी मिळाली.
- नितीन ठाकर
.................

राज्यात आघाडी सरकार असताना मृतांच्या वारसांना तीन वर्षांत नोकरी मिळू शकली नाही. त्यासाठी अनेक कारणे सांगण्यात येत होती. तांत्रिक मुद्दे उपस्थित केले जात होते. त्यामुळे नोकरीची गरज असतानाही शेतकरी कुटुंबांना हालअपेष्टा सोसाव्या लागत होत्या. हा मुद्दा युती सरकारने उचलून धरला आणि पाठपुरावा केला. त्यामुळे चार वर्षांच्या लढ्यानंतर वारसांना त्यांचा हक्क मिळाला. त्यांना आता शिपाई आणि मजूर म्हणून कामावर रुजू करून घेतले आहे. पुढे शिक्षणानुसार, कामानुसार पदोन्नती मिळेल, अशी अपेक्षा आहे.
- सुलभा उबाळे, गटनेत्या, शिवसेना

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चित्रसारक्षरतेसाठी हवा प्रयत्न!- राज

0
0

रवी परांजपे यांच्या सहस्रचंद्रदर्शन सोहळ्यात राज ठाकरेंची अपेक्षा

म. टा. प्रतिनिधी, पुणे

'चित्र कसे पहायचे असते ते आपल्या लोकांना माहीत नाही. परदेशी लोकांनी स्तुती केली की आपल्याकडचा चित्रकार अचानक मोठा होतो. चित्राला हात लावण्याची आपल्याकडे संस्कृती आहे,' अशी खरमरीत टीका करीत चित्रसाक्षरतेसाठी चित्रपट रसग्रहणासारखा अभ्यासक्रम असायला हवा, अशी अपेक्षा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुरुवारी व्यक्त केली. 'रवी परांजपे व माझे नाते गुरु-शिष्याचे आहे,' अशी भावनाही त्यांनी व्यक्त केली.

ज्येष्ठ चित्रकार रवी परांजपे यांच्या सहस्रचंद्रदर्शन सोहळ्यानिमित्त परांजपे यांच्या निवासस्थानी झालेल्या कला दालनाचे व चित्र प्रदर्शनाचे उद् घाटन राज यांच्या हस्ते झाले. या वेळी ते बोलत होते. परांजपे यांच्यासह परांजपे यांच्या पत्नी स्मिता परांजपे व रवी परांजपे फाउंडेशनचे मारुती पाटील उपस्थित होते.
'परांजपे हे भारतातील पहिले कलाकार असतील ज्यांनी आपल्या घरी कलादालन निर्माण केले,' असे गौरोद्वगार काढून राज म्हणाले, 'परांजपे सरांसारखी शैली जगात कोणाकडे नाही. त्यांची चित्रकला आपण उलगडू शकत नाही, ती फक्त अनुभवू शकतो. आमचे नाते गुरु-शिष्याचे आहे, त्यांच्याकडे मला शिकायला मिळाले म्हणून मी स्वत:ला भाग्यवान समजतो.'

'पुणे स्मार्ट होताना एक स्मार्ट कलादालन असावे ही आम्हा पती-पत्नीची इच्छा आज पूर्ण झाल्याचे समाधान आहे. यामध्ये सर्व श्रेय पत्नीचे आहे. राज माझे कौंटुबिक मित्र आहेत. त्यांच्या हस्ते इच्छा पूर्ण झाल्याचा विशेष आनंद आहे. त्यांच्यासोबतच्या अनेक आठवणी असून त्यात राजकारण नाही. राजकारणामुळे संबंध बिघडतात. राजकारणात राहूनही कलेच्या बाबतीतली सजगता राज यांनी जपली आहे. त्यामुळे त्यांचे कौतुक वाटते,' अशा शब्दांत परांजपे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

दिवाळीनंतर 'धमाका'

'मी काय बोलतो, याकडे तुमचे लक्ष लागले असेल; पण मी आज काही बोलणार नाही. कल्याण-डोंबिवलीबाबत दिवाळीनंतर काय बोलायचे ते बोलेन,' अशी मार्मिक टिप्पणी करत राज ठाकरे यांनी आगामी राजकारणाचे संकेत दिले.

कार्यकर्त्यांचा हिरमोड

राज ठाकरे यांना उत्साहाने भेटण्यासाठी गेलेल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांचा गुरुवारी चांगलाच हिरमोड झाला. 'ज्यांना कार्यक्रमाचे निमंत्रण आहे, अशांनीच इथे बसा,' असा आदेश संयोजकांपैकी एकाने दिल्याने या कार्यक्रमातून पक्षाचे शहराध्यक्ष, पालिकेतील गटनेते व नगरसेवक यांना बाहेर पडावे लागले. या प्रकाराबद्दल पदाधिकाऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.
....................
'

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

राज्यभरात डाळ; पुणेकरांना मात्र, ठेंगा!

0
0

जप्त डाळ पश्चिम महाराष्ट्राच्या वाट्याला नाही

म. टा. प्रतिनिधी, पुणे

साठेबाजांकडून जप्त करण्यात आलेली डाळ राज्यभरात परत वाटण्याचा आदेश देणारे अन्न व नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट यांच्या स्वतःच्या पुणे जिल्ह्यासह संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रातील बहुतेक नागरिकांना डाळीचा एकही कण मिळणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

साठेबाजीमध्ये जप्त करण्यात आलेली तूरडाळ शंभर रुपये किलो दराने देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला असला, तरी पुण्यासह पश्चिम महाराष्ट्रातील ग्राहक मात्र, या 'स्वस्त' डाळीपासून वंचित राहणार आहेत. साठेबाजीमुळे तूरडाळीचे भाव सर्वसामान्य नागरिकांच्या आवाक्याबाहेर गेले आहेत. तूरडाळ महाग झाल्याने अनेक कुटुंबांच्या भोजनातून ती हद्दपार झाली. भाव आटोक्यात आणण्यासाठी साठेबाजांवर कारवाई करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला. त्या पाठोपाठ साठेबाजांवर छापेही घालण्यात आले. या छाप्यांमध्ये शेकडो टन तूरडाळ सापडली. पुणे शहर व ग्रामीण भागातही दोनशेहून अधिक व्यापाऱ्यांच्या दुकानांवर प्रशासनाने छापे घातले. पुण्यासह सातारा, सांगली, कोल्हापूर व सोलापूर जिल्ह्यातही छापे घालून कारवाई करण्यात आली. त्यात कोल्हापूर वगळता एकाही जिल्ह्यातील व्यापाऱ्याकडे तूरडाळीचा अतिरिक्त साठा सापडला नाही. कोल्हापूरमधील कारवाईत साठा मर्यादेपेक्षा केवळ ५६ किलोच जादा डाळ सापडली.

साठेबाजांकडून जप्त करण्यात आलेली डाळ शंभर रुपये किलो दराने सर्वसामान्य ग्राहकांना देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला. राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट यांनी अठ्ठेचाळीस तासांत डाळीचे वाटप करण्यात येईल, असे जाहीर केले. ऐन दिवाळीत स्वस्त डाळ मिळणार असल्याने ग्राहक त्याकडे अपेक्षेने पाहत होते;'' परंतु पुणे विभागातील ग्राहकांचा अपेक्षाभंग झाला आहे. ज्या ठिकाणाच्या व्यापाऱ्यांकडून डाळ जप्त करण्यात आली, त्याच व्यापाऱ्यांना ती विकण्याची परवानगी देण्यात येणार आहे. पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर व सोलापूर जिल्ह्यात एकाही व्यापाऱ्याकडे अतिरिक्त डाळ न सापडल्याने या जिल्ह्यांतील ग्राहकांना डाळ स्वस्त दरात उपलब्ध होणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे.
....

ज्या व्यापाऱ्यांकडील साठामर्यादेपेक्षा अधिक डाळ जप्त करण्यात आली आहे, त्याच व्यापाऱ्यांना हमीपत्र घेऊन शंभर किलो रुपये दराने डाळ विकण्याचे बंधन घातले आहे. पुणे जिल्ह्यासह अन्य तीन जिल्ह्यांत डाळीचा अतिरिक्त साठा सापडला नाही. त्यामुळे या जिल्ह्यांत शंभर रुपये किलो दराने डाळ मिळणार नाही.
- प्रकाश कदम, उपायुक्त पुरवठा विभाग

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सात तालुक्यांतील भूजल पातळी घटली

0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

जिल्ह्यात यंदा सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्याने ऑक्टोबर महिन्यातील सरासरी भूजल पातळीत गेल्या पाच वर्षांच्या तुलनेत १.७४ मीटरने घट झाली आहे. जिल्हा भूजल सर्वेक्षण विकास यंत्रणेने केलेल्या पाहणीत १३ तालुक्यांपैकी सात तालुक्यातील भूजल पातळी खालावलेली आहे.

यावर्षी मान्सूनचे आगमन वेळेवर झाले. मात्र, आगमनानंतर पावसाने पाठ फिरवल्यानंतर पावसाळा संपेपर्यंत पुन्हा नीट हजेरी लावलीच नाही. जुलै, ऑगस्ट हे दोन्ही महिने कोरडे गेले. परिणामी दौंड तालुक्यात पाच फूट, इंदापूरमध्ये साडेतीन फूट आणि बारामती तालुक्यात तीन फुटाने भूजल पातळीत घट झाली. त्यामुळे यंदा उन्हाळ्यात पाणीटंचाई अधिक भासेल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.गेल्या पाच वर्षांत जिल्ह्यातील १३ तालुक्यांत ऑक्टोबरमधील सरासरी भूजलपातळी २.७४ मीटर इतकी होती. या ऑक्टोबर महिन्यात जिल्ह्यातील सरासरी भूजल पातळी २.६० मीटर इतकी आहे, तर एकूण सरासरी भूजल पातळीच्या तुलनेत यावर्षी भूजल पातळी ०.२९ मीटरने घटली आहे.जिल्ह्यातील बारामती, भोर, दौंड, हवेली, इंदापूर, खेड आणि पुरंदर या तालुक्यात यावर्षी १० सेंमी ते पाच फुटांपर्यंत भूजल पातळीत घट झालेली आहे. आंबेगाव, मावळ, मुळशी, जुन्नर, शिरूर आणि वेल्हा या तालुक्यात ७० सेंमी ते सव्वा फुटापर्यंत भूजल पातळीत वाढ झाली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘एमआयएम’ची शहर संघटना बरखास्त

0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीनची (एमआयएम) पुणे शहर पक्ष संघटना बरखास्त करण्यात आल्याचे पक्षाचे पुणे जिल्हाध्यक्ष मोहिउद्दिन सैय्यद यांनी गुरुवारी जाहीर केले. शहराध्यक्ष सर्फराज शेख यांच्यासह शहरातील कार्यकारणी व इतर सर्व वार्डस्तरीय पदाधिकाऱ्यांचा कार्यकाल संपल्याने, ही बरखास्ती केल्याचे सैय्यद यांनी प्रसिद्धीपत्रकात स्पष्ट केले. पक्षश्रेष्ठींच्या आदेशानुसार ही घोषणा करतानाच, महापालिका निवडणुकांचा विचार करत पुढील महिन्यात पक्षाची नवनियुक्त कार्यकारणी लवकरच जाहीर करणार असल्याचेही या पत्रकात सांगण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images