Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

कारवाईच्या धास्तीने वाढला पर्यावरण कराचा भरणा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

पंधरा वर्ष जुन्या असलेल्या व पर्यावरण कर न भरलेल्या वाहनांवर प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून (आरटीओ) केल्या जात असलेल्या कारवाईच्या धास्तीने पर्यावरण कर भरणाऱ्या व वाहनांची पुनर्नोंदणी करणाऱ्यांची संख्या झपाट्याने वाढली आहे. गेल्या सहा दिवसांत याद्वारे २५ लाख ५८ हजार २२ रुपये शुल्क पुणे आरटीओ कार्यालयाकडे जमा झाला आहे.

कायद्यानुसार १५ वर्षांपेक्षा जुन्या वाहनांची पुनर्नोंदणी करून पर्यावरण कर भरणे बंधनकारक आहे. मात्र, अज्ञानामुळे किंवा निष्काळजीपणामुळे अनेक लोक त्याची टाळाटाळ करीत होते. त्यामुळे 'आरटीओ'ने सहा पथकांची स्थापन करून यासंबंधी विशेष मोहीम सुरू केली आहे. ही पथके जुन्या वाहनांचा शोध घेऊन जप्त करीत आहेत. या कारवाईचा भितीपोटी वाहनचालकांनी जुन्या वाहनांचा पर्यावरण कर भरण्यास सुरुवात केली आहे. अशा वाहनांची संख्या पुण्यात एक लाखाहून अधिक असल्याचे 'आरटीओ'ने जाहीर केले आहे.

या विशेष मोहिमेअंतर्गत पुण्यात आणि आसपासच्या भागांत दीड ते दोन हजार वाहने जप्त करण्यात आली आहेत. वाहने जप्त केल्यानंतर पर्यावरण कराचा तातडीने भरणा करणाऱ्यांची वाहने सोडली जातात. मात्र, त्यानंतरही टाळाटाळ करणाऱ्यांची वाहने जप्त करून आरटीओला आणली जात आहेत, अशी माहिती आरटीओ कार्यालयातील अधिकाऱ्यांनी सांगितली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


पीएफसाठी मजुरांची आता कामाच्या ‌ठिकाणी पाहणी

$
0
0

वेतनातील कपातीची होणार चौकशी

म. टा. प्रतिनिधी, पुणे

मजुरांना प्रॉव्हिडंट फंडचे (पीएफ) संरक्षण मिळण्यासाठी एम्प्लॉइज प्रॉव्हिडंट फंड ऑर्गनायझेशनच्या (ईपीएफओ) अधिकाऱ्यांकडून कामाच्या ‌ठिकाणी जाऊन पाहणी केली जाणार आहे. त्यानुसार इमारतीचे बांधकाम, रस्ते, उड्डाणपूल आणि पाइपलाइन टाकण्याची कामे सुरू असलेल्या ठिकाणी भेट देऊन त्या कामगारांच्या वेतनातून 'पीएफ' कपात करण्यात येत आहे की नाही, याची चौकशी करण्यात येणार आहे.

मजुरी काम करणाऱ्यांनाही 'पीएफ'चे संरक्षण देण्याचे धोरण केंद्र सरकारने स्वीकारले आहे. बांधकाम मजुरांच्या वेतनातून 'पीएफ' कपात करण्यासाठी बांधकाम व्यावसायिकांना सूचना देण्यात आल्या आहेत. आता 'ईपीएफओ'चे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी बांधकाम सुरू असलेल्या ठिकाणी भेट देऊन पाहणी करण्याचे आदेश मुख्यालयाकडून देण्यात आले असल्याचे 'ईपीएफओ'च्या पुणे विभागीय कार्यालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.

साधारणतः दहा हजार चौरस फुटापेक्षा जास्त बांधकाम सुरू असलेल्या ठिकाणी भेट देण्यात येणार आहे. प्रत्यक्ष काम सुरू असताना त्याची छायाचित्रे काढली जाणार आहेत. या कामाचा अहवाल दर महिन्याला मुख्यालयाकडे द्यावा लागणार असल्याचे अधिकाऱ्यांकडून स्पष्ट करण्यात आले.

विविध सरकारी कार्यालयांमार्फत विकासकामे सुरू असतात. खासगी कंत्राटदारांमार्फत ही कामे केली जातात. त्या ठिकाणी काम करणाऱ्या कामगारांच्या वेतनातून 'पीएफ' कपात व्हावी, यासाठी आता प्रयत्न केले जाणार आहेत. त्यानुसार रस्ते, उड्डाणपूल, पाइपलाइन टाकणे यांसारखी कामे सुरू असताना त्या ठिकाणी जाऊन 'ईपीएफओ'च्या अधिकाऱ्यांकडून माहिती घेण्यात येणार आहे, असेही सांगण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पवारांचा असहकार...

$
0
0

नगरच्या कार्यक्रमाला शरद पवार यांची अनुपस्थिती

म. टा. प्रतिनिधी, पिंपरी

पिंपरी-चिंचवडमधील कामगारांचे प्रलंबित प्रश्न सोडविण्यासाठी उद्योजक सकारात्मक प्रतिसाद देत नसेल, तर अशा उद्योजकांच्या कार्यक्रमाला न गेलेलेच बरे, या भावनेतून ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी काहीशी असहकाराची भूमिका घेतली. परिणामी अहमदनगर एज्युकेशन सोसायटीच्या कार्यक्रमाला पवार हे मंगळवारी (२७ ऑक्टोबर) अनुपस्थित राहिले आणि त्यांनी राजगुरुनगर दौरा केला.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या उपस्थितीत अहमदनगर एज्युकेशन सोसायटीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. परंतु, पिंपरी-चिंचवडमधील फोर्स मोटर्सच्या कामगारांचा वेतनकराराचा प्रश्न प्रलंबित आहे. संतप्त कामगार आणि त्यांचे कुटुंबीय आंदोलने करीत आहेत. उपोषण, ठिय्या आंदोलन, मोर्चा या माध्यमातून प्रश्नाकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्यामुळे कंपनीतील कामगार प्रतिनिधी राजकीय नेत्यांच्या मध्यस्थीने तोडगा काढण्याची विनंती करीत आहेत.

यापूर्वी राज्याचे कामगारमंत्री प्रकाश मेहता, आमदार महेश लांडगे यांच्या मध्यस्थीने तोडगा काढण्याचा प्रयत्नही झाला. परंतु, यश मिळाले नाही. प्रश्न चिघळतच राहिला. त्यामुळे कामगारांनी माजी महापौर आझमभाई पानसरे यांच्या मध्यस्थीने पवार यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. पानसरे यांनीही वस्तुस्थितीची जाणीव करून दिली आणि या प्रश्नी लक्ष घालण्याची विनंती केली. त्यावरून पवार यांनी बड्या उद्योजकांना चर्चेसाठी आमंत्रित केले. परंतु, प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे पवार साहेबांनीही असहाकाराची भूमिका घेत कार्यक्रमाला जाण्याचे टाळले आणि तातडीचा राजगुरुनगरचा दौरा केला.

पवार यांचे वर्गमित्र असलेले राजगुरुनगर येथील व्यापारी चंपाशेठ सिंगवी यांचे नुकतेच निधन झाले. त्यांच्या कुटुंबीयांचे सांत्वन करण्यासाठी पवार आवर्जून गेले. या वेळी विधानसभेचे माजी अध्यक्ष दिलीप वळसे-पाटील, माजी आमदार दिलीप मोहिते उपस्थित होते. त्यानंतर पवार यांनी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या ठिकाणी सभाही घेतली.

फोर्स कंपनीतील कामगारांच्या कुटुंबातील महिलांनी मार्च महिन्यामध्ये सलग दहा दिवस उपोषण केले होते. त्या वेळी कामगारांच्या प्रश्नांची अवहेलना करणाऱ्या उद्योजकांची मुजोरी खपवून घेणार नाही, असा इशारा राज्याच्या कामगार मंत्र्यांनी दिला होता.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सहायक आयुक्त लाच घेतल्याने अटकेत

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

व्यवसायकर कमी करण्यासाठी २३ लाख रुपयांची लाच स्वीकारणाऱ्या सहायक विक्रीकर आयुक्त सोमनाथ मधुकर नलावडे यांना त्यांच्या भोसलेनगर येथील घरी अटक करण्यात आली. नलावडे यांच्या उपस्थितीत त्यांच्या वतीने एकाने ही रक्कम स्वीकारली. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मंगळवारी सायंकाळी साडेसातच्या दरम्यान ही कारवाई केली.

या प्रकरणी 'हाउस किपिंग कंपनी'च्या मालकांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागात तक्रार दाखल केली होती. नलावडे यांनी या कंपनीच्या कर थकबाकीप्रकरणी गेल्या तीन वर्षांची छाननी केली होती आणि कंपनीच्या मालकाला एक कोटी ६० लाख रुपये कर भरावा लागणार असल्याचे सांगितले होते. कंपनीच्या अंदाजानुसार त्यांना १४ लाख रुपये कर भरावा लागणार होता. मात्र, नलावडे आपल्या मतावर ठाम होते, अशी माहिती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अधीक्षक शिरीष सरदेशपांडे यांनी दिली.

नलावडे यांनी व्यवसायकर कमी करून तीन लाख रुपयांवर आणतो, असे आश्वासन संबंधित मालकाला दिले आणि त्यासाठी ३० लाख रुपयांच्या लाचेची मागणी केली. तडजोड होऊन २३ लाख रुपये लाचेची रक्कम देण्याचे ठरले होते. दरम्यान, कंपनीच्या मालकांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधला आणि नलावडे यांच्या विरोधात तक्रार नोंदवली. विभागाने नलावडे यांच्याकडेही पडताळणी केली होती. पडताळणीमध्ये त्यांनी लाचेची मागणी केल्याचे स्पष्ट झाल्यानंतर त्यांच्यावर सापळा रचण्यात आला.

भोसलेनगरमध्ये घर आणि घरातच ऑफिस

नलावडे यांचे भोसलेनगरमध्ये घर आहे. त्यांनी घरातच ऑफिस थाटले असून, तेथून कारभार हाकण्यात येतो. या ऑफिसमध्येच त्यांनी 'हाउस किपिंग कंपनी'च्या मालकांना लाचेची रक्कम घेऊन बोलावले होते. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उपअधीक्षक श्रीहरी पाटील, प्रकाश शिंदे, सुनील शेटे, पोलिस निरीक्षक नीरज उबाळे, अरुण घोडके यांनी साप‍ळा रचला होता. नलावडे यांच्या समक्ष त्यांचा कामगार शिवाजी कृष्णा गुजर (४२) यांनी लाचेची रक्कम स्वीकारल्यानंतर दोघांना ताब्यात घेण्यात आले.

घराची झडती

नलावडे यांच्या घरातच सापळा रचण्यात आला होता. त्यामुळे सापळा यशस्वी झाल्यानंतर त्यांच्या घराची झडती लगेच सुरू झाली. त्यांच्या कसबा पेठेतील घराचीही झडती घेण्यात येणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चितळे, गोकूळ, अमूल दुधाच्या विक्रीस नकार

$
0
0

दूध विक्रेत्यांनी नाकारले ५० हजार लिटर दूध

म. टा. प्रतिनिधी, पुणे

दुधाच्या विक्रीसाठी एका लिटरमागे १० टक्के कमिशन देण्याच्या मागणीसाठी सिंहगड रस्त्यावरील दूध विक्रेत्यांनी पुकारलेल्या आंदोलनाच्या पहिल्याच दिवशी चितळे, गोकूळ, अमूल कंपनीच्या ५० हजार दूधाच्या विक्रीस नकार दिला. शहरातील अन्य विक्रेत्यांचा आंदोलनास पाठिंबा मिळत असल्याने बुधवारी एक लाख लिटरपेक्षाही अधिक दूध विक्रीसाठी नाकारण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.

दूध पुरवठा कंपन्यांकडे किरकोळ विक्रेत्यांनी एका लिटरमागे दहा टक्के कमिशन देण्याच्या मागणीसाठी आंदोलनाचा इशारा दिला होता. मात्र, कंपन्यांनी प्रतिसाद न दिल्याने सिंहगड रस्त्यावरील दूध विक्रेत्यांनी मंगळवारपासून दूध विकण्यास नकार देत आंदोलन पुकारले. चितळे, गोकूळ, अमूल या सर्वाधिक विक्री होणाऱ्या दूध कंपन्यांचे सुमारे ५० हजार लिटर दूध विक्रीसाठी नाकारले. आज (बुधवारी) एक लाख लिटरपेक्षाही अधिक दूध विक्रीसाठी नाकारले जाऊ शकते, असे व्यापारी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले.

एका लिटरमागे दहा टक्के कमिशन वाढविण्याची काही कंपन्यांनी मागणी मान्य केली होती; परंतु या प्रमुख कंपन्यांकडून अद्याप प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे किरकोळ विक्रेत्यांनी त्यांच्या दूध विक्रीस नकार दिला. सिंहगड रस्त्यावरील किरकोळ विक्रेत्यांच्या आंदोलनास कोथरूड, मध्यवर्ती पेठांमधील विक्रेत्यांनी पाठिंबा दिल्याचे संघटनेकडून सांगण्यात आले.

दहा टक्के कमिशन वाढविण्याच्या विक्रेत्यांच्या मागणीला चितळे, गोकूळ, अमूल दूध कंपनीव्यतिरिक्त इतर कंपन्यांनी कमिशन देण्याचे मान्य केले. त्यामुळे त्या कंपन्याचे दूध विक्रीसाठी उपलब्ध ठेवले जात आहे. परिणामी ग्राहकांची गैरसोय होणार नाही या दृष्टीने काळजी घेण्यात येत आहे, असेही पदाधिकाऱ्यांकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पत्नी व मुलाचा खून करून आत्महत्या

$
0
0

मुलाच्या आजारपणाला कंटाळून बेरोजगार पित्याचे कृत्य

म. टा. प्रतिनिधी, पुणे

चारित्र्याच्या संशयावरून, तसेच मुलाच्या आजारपणाला कंटाळून ​पत्नी आणि मुलाचा खून करणाऱ्या एका बेरोजगाराने स्वतः ग‍ळफास घेऊन आत्महत्या केली. हा प्रकार निम्हण मळा येथील अंजनीताई निम्हण यांच्या चाळीत सोमवारी रात्री घडला. त्यांची मुलगी आजोबांकडे राहण्यास गेली असल्याने ती बचावली.

राजू गायकवाड (वय ४०) याने आपली पत्नी आरती उर्फ रु​क्मिणी (वय ३५) आणि मुलगा विशाल (१८) यांचा खून केला. गायकवाडने आपल्या पत्नीच्या डोक्यात कुऱ्हाड घातली, तर मुलाचा गळा आवळून खून केला. त्यानंतर त्याने दरवाज्याच्या पाठीमागील बाजूल नायलॉनच्या दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली, अशी माहिती चतुश्रृःगी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अरुण सावंत यांनी दिली.

या प्रकरणी आरतीचा सावत्र भाऊ आनंद दिलीप नाईक (वय ३५, रा. पिंपळे सौदागर) यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. नाईक यांनी दिलेल्या माहितीनुसार गायकवाडला दारूचे व्यसन होते; तसेच तो बेरोजगार होता. आरती दोन ​ठिकाणी घरकाम करत होत्या. त्यातून त्यांना दहा हजार रुपये मिळत होते. त्यातून घरभाड्यासह इतर खर्च भागवण्यात येत होता. गायकवाड कुटुंबीय मूळचे सोलापूर येथील आहे. दहा वर्षांपूर्वी ते पुण्यात राहण्यासाठी आले होते.

विशाल हा पक्षघाताने आजारी होता. त्याला वयाच्या पाचव्या वर्षांपासून हा आजार होता. त्याच्यावर वारंवार उपचार करण्यात आले होते. मात्र, त्याचा काहीही उपयोग झाला नव्हता. घरात आरती या एकट्याच कमवत्या होत्या. तर, त्यांची मुलही शुभांगी (वय १५) ही इयत्ता आठवीत शिकते. गायकवाड हा घरीच असायचा. गायकवाड याला आरतीच्या चारित्र्यावर संशय होता. त्यातून त्याच्यात सतत वादही होत होते.

तिहेरी मृत्यूमुळे निम्हण मळा हादरला

दुहेरी खुनाच्या आणि आत्महत्येच्या घटनेने निम्हण मळा परिसरातील नागरिक हादरले होते. राजू गायकवाड यांच्या घरात झालेला भयानक प्रकार मंगळवारी सकाळी उघडकीस आल्यानंतर परिसरात तो एकच चर्चेचा विषय झाला होता. शहरात खून आणि आत्महत्येचे असे प्रकार वाढले असल्याचे वारंवार दिसून येत असल्याचीच चर्चा होती.

निम्हण मळ्यात मंगळवारी पहाटे पाचच्या सुमारास नेहमीप्रमाणे पाणी आले होते. या वेळी सर्व​ निम्हण मळा जागा होतो. मात्र, मंगळवारी पहाटे गायकवाड यांच्या घरातून कुठलीही हालचाल झाली नाही. तेथे राहत असलेल्या स्थानिकांना ही बाब लक्षात आली होती. हीच परिस्थिती सकाळी आठ वाजेपर्यंत होती. अखेर स्थानिकांनी ही माहिती पोलिसांना दिली. पोलिस घटनास्थळी पोहोचल्यावर त्यांनी दरवाजा तोडला आणि आत प्रवेश केला.

आरती या रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या होत्या, तर गायकवाड याने गळफास घेतला होता. विशालच्या गळ्यावरही व्रण होते तसेच तो निपचित पडलेला होता. या घटनेची माहिती नाईक यांना देण्यात आली. आरती यांच्यावर वार करण्यात आलेली कुऱ्हाडही तेथेच बाहेर ठेवण्यात आली होती. त्यावर रक्ताचे डाग होते, असे सावंत यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सायबर पोलिस स्टेशन ‘लॉगऑफ’

$
0
0

- प्रस्ताव सरकारकडे ५ वर्षे प्रलंबित

म. टा. प्रतिनिधी, पुणे

सायबर गुन्ह्यांमध्ये देशात आघाडीवर असताना आणि त्यातून करोडो रुपयांची लूट होत असताना, सायबर पोलिस ठाण्याच्या स्थापनेबाबत पुणे पोलिसांनी पाठविलेला अहवाल गेली पाच वर्षे राज्य सरकारकडे धूळ खात पडून आहे.

शिक्षण, माहिती तंत्रज्ञान आणि अन्य उद्योगांमधील प्रगतीमुळे पुणे हे देशातील आघाडीचे शहर ठरले आहे. उच्चशिक्षित आणि तरुण मंडळींची संख्या जास्त असून, इंटरनेट आणि मोबाइलच्या वापरातही साहजिकच पुण्याचे स्थान मोठे आहे. मात्र, त्याबरोबरच गेल्या काही काळात पुण्यात सायबर गुन्ह्यांतही प्रचंड वाढ झाली आहे. हे रोखण्यासाठी राज्यात 'सायबर इमर्जन्सी रिस्पॉन्स टीम' (सीईआरटी) स्थापन करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. मात्र, पुणे पोलिसांच्या वाट्याला अद्याप काहीही आलेले नाही. पुणे पोलिसांनी सायबर पोलिस ठाण्याची आवश्यकता असल्याचा अहवाल सरकारकडे पाठवला आहे. त्यात सायबर पोलिस ठाण्यासाठी प्रमुख या नात्याने सहायक पोलिस आयुक्त, सोळा पोलिस निरीक्षक आणि सुमारे १०० कर्मचाऱ्यांची फौज आणि त्यांच्या मदतीसाठी सायबर लॅब आणि सपोर्ट टीम कार्यरत असावी. या टीमने गुन्ह्यांचे विश्लेषण करून कारवाईसाठी पोलिसांना मदत करावी, अशी योजना आहे.

त्याशिवाय हार्डवेअर, नेटवर्किंगसाठीच्या तंत्रज्ञांची टीमही असावी. या गुन्ह्यांचा तपास कायद्याच्या चौकटीत कसा झाला पाहिजे, चार्जशीट दाखल करताना, कुठल्या बाबींवर भर द्यावा, यासाठी आयटी अॅक्टमधील कायदेविषयक सल्लागार मदतीला असावेत, अशी मागणी करण्यात आली आहे.

सायबर गुन्ह्यांमध्ये पुण्याचा बेंगळुरू पाठोपाठ देशात दुसरा क्रमांक लागतो. पुण्यातील वाढती​ सायबर गुन्हेगारी रोखण्यासाठी सायबर सेल, सायबर पोलिस ठाणे आणि सपोर्ट टीम अशा तीन स्तरांवर प्रयत्न होणे गरजेचे असल्याचे पुणे पोलिसांकडून सांगण्यात येत आहे.

'वाहतूक मुख्यालय' हवेतच

पुणे शहर स्मार्ट बनवण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू आहेत. पुणेकरांसाठी सर्वांत मोठी समस्या ही वाहतुकीची आहे. ही समस्या सोडवण्यासाठी वेगवेगळ्या स्तरावर प्रयत्न सुरू असले तरी भविष्यात त्यात काही फरक पडेल अशी ​परिस्थती नाही. वाहतूक पोलिसांनी आघाडी सरकारच्या काळात वाहतूक मुख्यालयाचा प्रस्ताव तयार केला होता. तत्कालीन सरकारने औंध येथे जागा देत वाहतूक मुख्यालय सुरू करण्याचे आश्वसन दिले होते. मात्र, सध्या या प्रस्तावर साधी चर्चाही होत नाही. वाहतूक पोलिसांना प्रशिक्षणापासून ट्रॅफिक इंजिनीअरिंगचा अर्तंभाव या प्रस्तावात आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रेल्वेचा प्रवाशांना ‌दिलासा

$
0
0

आता सहा तास आधी कळणार आरक्षित तिकीट स्थितीचा चार्ट

म. टा. प्रतिनिधी, पुणे

रेल्वेने दूरच्या प्रवासासाठी निघालेले आहात. मात्र, आरक्षित ति‌किटासाठी वेटिंग असते, आ‌णि अखेरच्या क्षणी तिकीट 'कन्फर्म' होणार नसल्याची माहिती मिळते. त्यानंतर प्रवासासाठी पर्यायी व्यवस्था करताना धावपळ होते. आता रेल्वे प्रशासनाच्या एका निर्णयाने नागरिकांची या धावपळीतून काही प्रमाणात सुटका होण्याची शक्यता आहे. रेल्वेच्या नवीन आदेशानुसार गाडी सुटण्याच्या किमान चार ते सहा तास आधी आरक्षित तिकीट स्थितीचा चार्ट बनविण्यात येणार आहे. त्यामुळे तिकीट कन्फर्म न झालेल्यांना पर्यायी व्यवस्था करण्यास पुरेसा वेळ मिळेल.

रेल्वे प्रशासनाच्या या नवीन आदेशाची अंमलबजावणी सुरू झाली आहे. पूर्वी रेल्वे सुटण्याच्या नियोजित वेळेच्या अडीच तास आधी रेल्वेचा अंतिम तिकीट चार्ट बनविला जात होता. रेल्वे प्रशासनाने आता अंतिम तिकीट चार्ट सहा तास आधी बनविण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, त्यासाठी उशीर झाल्यास चार तास आधीपर्यंत ते चार्ट जाहीर करू शकतात.

पुणे स्टेशनवरून अन्य ठिकाणी जाण्यासाठी पुण्यासह जवळपासच्या भागातून नागरिक येतात. रेल्वेचे तिकीट 'कन्फर्म' नसल्यास अनेक जण रेल्वेने प्रवास करणे टाळतात. मात्र, वेटिंग असलेले तिकीट शेवटच्या क्षणापर्यंत कन्फर्म होईल, अशी अपेक्षा असणाऱ्यांची संख्याही खूप असते. अडीच तास आधी अंतिम चार्ट तयार झाल्यानंतर तो स्टेशनवरील फलकावर लावला जातो. तेथे चार्ट पाहण्यासाठी प्रवाशांची गर्दी उसळलेली असते. त्यामुळे त्यातही काही वेळ जातो. त्यानंतर तिकीट कन्फर्म झाले नसल्याचे कळाल्यावर, पर्यायी व्यवस्था करण्यासाठी धावाधाव सुरू होते. लांब पल्ल्यांच्या गाड्यांना उभे राहून जाणे शक्य नसल्याने नागरिकांना पर्यायी साधनांचा वापर किंवा गैरसोय सहन करीत प्रवास करावा लागतो.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


तूर डाळ १६५ रुपये किलो

$
0
0

छापासत्रामुळे विक्रेत्यांमध्ये घबराट, क्विंटलमागे पाचशे रुपयांची घट

म. टा. प्रतिनिधी, पुणे

डाळीचे भाव गगनाला भिडल्याने अन्न व पुरवठा खात्याकडून पुणे शहरापाठोपाठ जिल्ह्यातही छापासत्र सुरू झाले आहे. त्यामळे विक्रेत्यांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाल्याने तूर डाळीच्या दरात क्विंटलमागे आणखी पाचशे रुपयांची घट झाली. परिणामी, तूरडाळीसाठी ग्राहकांना प्रतिकिलो १६५ रुपये द्यावे लागणार आहेत.

तूरडाळीच्या दरात शनिवारपासून घसरण सुरू असून, किलोमागे आठवड्याच्या सलग दुसऱ्या दिवशी पाच रुपयांची घट झाली. त्यामुळे ग्राहकांना थोडासा दिलासा मिळण्याची शक्यता व्यक्त होत आहे. दर वाढत असल्याने गेल्या आठवड्यापासून किरकोळ विक्रेत्यांसह घरगुती ग्राहकांनी मार्केट यार्डातील डाळीच्या बाजाराकडे पाठच फिरविली आहे. ग्राहक नसल्याने व्यापारी चिंतेत आहेत. उपलब्ध साठा विकल्याशिवाय नवा साठा खरेदी करता येत नसल्याने व्यापाराचे गणित कोलमडले आहे. सध्यापेक्षा कमी दराने विकण्याची तयारी दाखवूनही ग्राहक डाळ खरेदीस तयार नाहीत. त्यामुळे बाजारात शुकशुकाट दिसत आहे.

'शहरात डाळींच्या साठ्याची तपासणी करण्यात आली. जिल्ह्यातील विक्रेत्यांकडे अन्न व पुरवठा खात्याच्या अधिकाऱ्यांनी तपासणी सुरू झाली आहे. भोरमध्ये तेलाचा अनधिकृत साठा आढळून आला. त्यामुळे विक्रेत्यांमध्ये मंगळवारी दिवसभर घबराट पसरली होती. तूर डाळीच्या दरात क्विंटलमागे पाचशे रुपयांची घट झाली आहे. त्यामुळे १७ हजार रुपये क्विंटल दराची तूर डाळ आता १६ हजार ५०० रुपये दरापर्यंत घसरली आहे. त्यामुळे प्रतिकिलो १६५ रुपये दर आहे. तूरडाळ घटली असली तरी अन्य डाळींच्या दरावर मात्र परिणाम झाला नसल्याचे दिसून येते,' अशी माहिती मार्केट यार्डातील व्यापाऱ्यांनी दिली. दोन दिवसांपासून दर उतरत असल्याने किरकोळ विक्रेत्यांकडून उपलब्ध साठ्याची १८० ते १८५ रुपये या जादा दराने विक्री सुरूआहे.


डाळ - प्रतिक्विंटल दर (रुपयांत)
तूर डाळ : १४,००० ते १६,५००
हरभरा डाळ : ६००० ते ६७००
मटकी डाळ : १०,००० ते १०,५००
मसूर डाळ : ७७०० ते ८०००
मूग डाळ : १०,००० ते ११,०००

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

एफटीआयआय संप मागे घेणार?

$
0
0

सरकारी प्रतिसादाअभावी विद्यार्थी निराश

म. टा. प्रतिनिधी, पुणे

फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडियामध्ये (एफटीआयआय) गेल्या १३९ दिवसांपासून सुरू असलेला संप मागे घेण्याच्या दृष्टीने विचार सुरू झाला आहे. विद्यार्थ्यांच्या मागण्यांना केंद्र सरकारकडून काहीच प्रतिसाद मिळत नसल्याने संप मागे घेतला जाण्याची शक्यता आहे.

एफटीआयआयच्या नियामक मंडळ अध्यक्षपदी गजेंद्र चौहान यांची निवड झाल्यानंतर विद्यार्थ्यांनी बेमुदत संप पुकारला. चौहान यांच्यासह मंडळाच्या सदस्यपदी निवड झालेले राहुल सोलापूरकर, डॉ. नरेंद्र पाठक, अनघा घैसास व शैलेश गुप्ता यांची नियुक्ती रद्द करण्याची विद्यार्थ्यांची मागणी आहे. या संपाला राजकीय रंगही देण्यात आला. मात्र, सरकारकडून संप मिटवण्याबाबत काहीच प्रयत्न करण्यात आले नाहीत.
विद्यार्थ्यांनी नियुक्त्या रद्द करण्यासह संस्थेला स्वायत्तता द्यावी, पायाभूत सुविधांचा विकास करावा आदी मागण्या केल्या होत्या. संपाचे शंभर दिवस उलटून गेल्यानंतर माहिती व प्रसारण मंत्रालयाकडून चर्चा करण्याची तयारी दर्शवण्यात आली. त्याच्या चार फेऱ्याही झाल्या. मात्र, नियुक्ता रद्द करण्याचा मूळ मुद्दा बाजूला ठेवूनच चर्चा करण्यात आली. संप करण्यात बराच वेळ जात असून, हाती काहीच लागत नसल्याने संप सुरू ठेवायचा की नाही, याचा विचार करण्यात येत आहे. संप मागे घेऊन जानेवारीपासून शैक्षणिक कामकाज पुन्हा सुरू करण्याचाही विचार सुरू आहे, असे विद्यार्थ्यांशी संबंधित सूत्रांनी सांगितले.

इफ्फीमध्येही पडसाद?

भारताचा अधिकृत महोत्सव असलेल्या 'इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल ऑफ इंडिया'मध्ये (इफ्फी) या संपाचे पडसाद उमटण्याची शक्यता आहे. नोव्हेंबरमध्ये गोव्यात हा महोत्सव होणार आहे. एफटीआयआयचे विद्यार्थी या महोत्सवादरम्यान पत्रके वाटून सरकारचा निषेध करणार असल्याचेही सूत्रांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

FTIIच्या विद्यार्थ्यांचा १३९ दिवसांनंतर संप मागे

$
0
0

मटा ऑनलाइन वृत्त । पुणे

फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडियामध्ये (एफटीआयआय) गेल्या १३९ दिवसांपासून सुरू असलेला संप विद्यार्थ्यांनी अखेर मागे घेतला. मात्र संप मागे घेतला तरी, लोकशाही पद्धतीने आंदोलन सुरुच राहील, अशी माहिती एफटीआयआयच्या आंदोलनकर्त्या विद्यार्थ्याने दिली.

एफटीआयआयच्या नियामक मंडळ अध्यक्षपदी गजेंद्र चौहान यांची निवड झाल्यानंतर विद्यार्थ्यांनी बेमुदत संप पुकारला. चौहान यांच्यासह मंडळाच्या सदस्यपदी निवड झालेले राहुल सोलापूरकर, डॉ. नरेंद्र पाठक, अनघा घैसास व शैलेश गुप्ता यांची नियुक्ती रद्द करण्याची विद्यार्थ्यांची मागणी आहे. या संपाला राजकीय रंगही देण्यात आला. मात्र, सरकारकडून संप मिटवण्याबाबत काहीच प्रयत्न करण्यात आले नाहीत.

विद्यार्थ्यांनी नियुक्त्या रद्द करण्यासह संस्थेला स्वायत्तता द्यावी, पायाभूत सुविधांचा विकास करावा यांसह इतर महत्त्वाच्या मागण्यांना केंद्र सरकारकडून कोणताही प्रतिसाद मिळत नसल्याने विद्यार्थ्यांनी संप मागे घेतला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

थंडीला सुरुवात; पारा १८ अंशांवर

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

दिवसा ऑक्टोबर हीटच्या झळा बसत असतानाच सायंकाळी थंडीची चाहूलही हळूहळू लागू लागली आहे. शहरातील किमान तापमानात घट होत असून, पारा आता १८ अंशांपर्यंत खाली आला आहे. येत्या काही दिवसात तापमानात आणखी एखाद-दोन अंशांनी घट होण्याची शक्यता आहे.

नवरात्रीनंतर कोजागिरी पौर्णिमा झाली की हवामानातील थंडी हळूहळू वाढू लागते. त्याप्रमाणेच यंदाही थंडीची चाहूल लागू लागली आहे. शहरात बुधवारी ३२.१ अंश सेल्सिअस इतके कमाल, तर १८.५ अंश सेल्सिअस इतके किमान तापमान नोंदले गेले आहे. कमाल आणि किमान तापमानात मोठा फरक पडत असल्याने दिवसा उकाडा आणि रात्री थंडी असे विषम वातावरण आता अनुभवयास मिळत आहे.
पुण्याबरोबरच मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातही किमान तापमानात घट होऊ लागली आहे. पुढील दोन दिवसात पुण्यात वातावरण अंशतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे. तर किमान तापमान १७ अंशांपर्यंत खाली येईल, असा अंदाज हवामान विभागातर्फे वर्तविण्यात आली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पुण्यातील ५० ठिकाणे महिलांसाठी असुरक्षित

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

सारसबाग, लक्ष्मी रोड, कर्वे रोड, आपटे रोड, सारबाग यांच्यासह पुण्यातील ५० ठिकाणे महिला आणि मुलींसाठी 'संवेदनशील' असल्याची बाब समोर आली आहे. पोलिस आयुक्तांच्या अध्यक्षतेखालील महिला सुरक्षा समितीने या ठिकाणांची यादी केली आहे. त्यामध्ये प्रामुख्याने शाळा-कॉलेजांचा समावेश आहे. येथे मुलींची टिंगलटवाळी आणि गैरप्रकार घडण्याची शक्यता गृहीत धरून उपाययोजना सुरू करण्यात आल्या आहेत.

शहर आणि पिंपरी-चिंचवडमधील महिला आणि मुलींच्या दृष्टीने संवेदनशील असलेल्या ५० ठिकाणी छेडछाड आणि गैरप्रकार घडण्याची शक्यता गृहीत धरून उपाययोजना सुरू केल्याची माहिती महिला सहाय्य कक्षाच्या वरिष्ठ निरीक्षक प्रतिभा जोशी यांनी बुधवारी दिली.

राज्यातील सर्व पोलिस आयुक्तालये आणि अधीक्षकांच्या हद्दीत महिला सुरक्षा समित्या स्थापण्याचे आदेश शासनाने दिले होते. त्यानुसार पुण्यातील समितीने शहरांमधील संवेदनशील ठिकाणांची पाहणी केली. शाळा, महाविद्यालये, सार्वजनिक ठिकाणे, बागा, गल्ली बोळा, बाजार, क्लासेस आदी ठिकाणांची पाहणी केली. तसेच प्रत्येक उपायुक्तांकडूनही माहिती मागवण्यात आली होती. यापूर्वी गैरप्रकार घडलेल्या ठिकाणांचाही यामध्ये समावेश आहे. पोलिसांच्या दृष्टीने यातील अतिसंवेदनशील ठिकाणांवर विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. पोलिस शाळा महाविद्यालये आणि विविध संस्थांमध्ये जाऊन मुलींनी व महिलांनी काय काळजी घ्यावी याबाबत मार्गदर्शन करीत आहेत. रोडरोमियोंचा बंदोबस्त करण्यासह मुलींनीही व्यवस्थित कपडे वापरावेत आणि योग्य वर्तणूक ठेवावी, असा सल्ला देण्यात देत आहेत. गैरप्रकार किंवा एकतर्फी प्रेमासारख्या प्रकारांचा सामना करण्यासाठी पोलिसांची मदत घेण्याचे आवाहन त्यांनी केले आहे; तसेच बागेमध्ये, टेकड्यांवर अंधारात बसणेही जोडप्यांसाठी धोकादायक असल्याचे जोशी यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

एफटीआयआय संपाचे ‘पॅकअप’

$
0
0

विद्यार्थ्यांकडून आंदोलन मागे; चौहान यांना विरोध कायम

म. टा. प्रतिनिधी, पुणे

गजेंद्र चौहान यांच्या नियुक्तीला विरोध करण्यासाठी फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाच्या (एफटीआयआय) विद्यार्थ्यांनी १३९ दिवसांनंतर अखेर आपला संप बुधवारी मागे घेतला. आपल्या प्रदीर्घ आंदोलनानंतरही सरकार चौहान यांची नियुक्ती रद्द करीत नसल्याने संप मागे घेत असलो, तरी चौहान यांच्यासह अन्य चार सदस्यांच्या नियुक्तीला असलेला विरोध कायम राहणार असल्याचे विद्यार्थ्यांनी म्हटले आहे.

एफटीआयआयच्या नियामक मंडळाच्या अध्यक्षपदी चौहान यांची निवड झाल्यानंतर, त्यांना आणि मंडळातील काही सदस्यांच्या नावांना विरोध करून विद्यार्थ्यांनी संप सुरू केला होता. संप मिटविण्याबाबत गेल्या साडेचार महिन्यांत केंद्रीय माहिती व प्रसारण राज्यमंत्री राज्यवर्धनसिंह राठोड, वरिष्ठ अधिकारी आणि विद्यार्थी यांच्यात चर्चेच्या पाच फेऱ्या झाल्या. मात्र, त्यातून काहीच तोडगा निघाला नाही. या पार्श्वभूमीवर, विद्यार्थ्यांनी संप मागे घेण्याचा निर्णय जाहीर केला. आता सरकारच्या कोणत्याही प्रतिनिधीशी चर्चा करणार नसल्याचे विद्यार्थ्यांनी सांगितले. तसे पत्र सरकारला पाठविण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.

'आंदोलनाच्या काळात आम्ही आमचे मुद्दे मांडत राहिलो. त्याची उत्तरे सरकार देऊ शकले नाही. एकाच प्रकारची विचारसरणी संपूर्ण देशात सरकार रुजवू पहात आहे. त्याला विरोध केलाच पाहिजे. यापुढे चित्रपटकर्मी, साहित्यिक, कलावंत, सर्वसामान्यांनी हा लढा पुढे नेण्याची गरज आहे,' अशी भूमिका एफटीआयआयच्या स्टुंडट्स असोसिएशनचा अध्यक्ष हरिशंकर नचिमुथू, विकास अर्स, राकेश शुक्ला यांनी पत्रकार परिषदेत मांडली. एफटीआयआयमधील आपले शैक्षणिक कामकाज परत सुरू करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

माजी विद्यार्थ्यांकडून पुरस्कारवापसी

सरकारच्या आडमुठ्या भूमिकेचा निषेध करण्यासाठी संस्थेचे माजी विद्यार्थी प्रतीक वत्स, विक्रांत पवार व राकेश शुक्ला या तीन विद्यार्थ्यांनी आपल्याला मिळालेले राष्ट्रीय पुरस्कार परत केले. प्रतीक वत्सला शॉर्टफिल्मसाठी रजत कमळ, विक्रांत पवारला शॉर्टफिल्मसाठी सुवर्णकमळ आणि राकेश शुक्लाला माहितीपटासाठी राष्ट्रीय विद्यार्थी चित्रपट महोत्सवात पुरस्कार मिळाला होता.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ऐका त्रिशुंड गणपती मंदिराचा इतिहास

$
0
0

पुणे टाइम्स टीम

पुण्यामध्ये पेशव्यांच्या राजवटीची साक्ष देणारी बरीच ऐतिहासिक ठिकाणं आहेत. त्यापैकीच एक महत्त्वाचं ठिकाण म्हणजे त्रिशुंड गणपती मंदिर. मध्ययुगीन पुण्याची शिल्पकला आणि मूर्तीकला दाखवणारं हे मंदिर उत्तम ऐतिहासिक नमुना आहेच; शिवाय इथली गणपतीची मूर्ती तीन सोंडेची आणि रिद्धी-सिद्धीचा थाट असल्यानं वेगळी ठरते. ऐतिहासिक वारसा असलेलं हे मंदिर पाहण्यासाठी १ नोव्हेंबरला हेरिटेज वॉकचं आयोजन करण्यात आलं आहे.

'महाराष्ट्र टाइम्स', 'हेरिटेज इंडिया' आणि 'टिमविचा संस्कृत व इंडॉलॉजी' विभाग यांच्या वतीनं या हेरिटेज वॉकचं आयोजन करण्यात आलं आहे. हेरिटेज वॉकचं हे तिसरं पर्व असून, आधीच्या उपक्रमाला पुणेकरांनी भरघोस प्रतिसाद दिला होता. हे यश पाहता हा उपक्रम पुन्हा एकदा पुणेकरांसाठी आम्ही घेऊन येतोय. त्यामध्ये पुण्यातील ऐतिहासिक वारसा असलेल्या सगळ्या ठिकाणांचा इतिहास पुणेकरांसमोर उलगडल्यानंतर हाच ठेवा पुन्हा एकदा समोर आणण्याचं नियोजन आहे.

१ तारखेला होणारा हेरिटेज वॉक विनामूल्य खुला असून, सोमवार पेठेतील या मंदिराजवळ संध्याकाळी ५.३० वाजता एकत्र जमण्याचं आवाहन करण्यात आले आहे. पुरातत्त्वज्ञ डॉ. मंजिरी भालेराव या मंदिराचा इतिहास आणि जडणघडण सांगणार आहेत.

साधारण १८व्या शतकाच्या सुमारास पेशव्यांच्या राजवटीत हे मंदिर आकाराला आलं. गोसाव्यांनी ते बांधल्याचा इतिहास आहे. समाधी स्थान तसंच साधकांना साधना करण्याची विशेष सोय मंदिराच्या तळघरात असून, ते कायमस्वरूपी बंद करण्यात आलं आहे. मंदिरावरील शिल्प रेखीव आहेत. तसंच, गणपतीची मूर्तीही वेगळ्या धाटणीची असल्यानं तिचा इतिहास या वॉकच्या माध्यमातून ऐकणं नक्कीच रंजक ठरेल.

हेरिटेज वॉक

कधीः रविवार, १ नोव्हेंबर कुठेः त्रिशुंड गणपती मंदिर, सोमवार पेठ किती वाजताः संध्या. ५.३० वाजता अधिक माहितीसाठी संपर्कः ९९२२४४२२३८.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


पणत्या, फराळ आणि बरंच काही

$
0
0

पुणे टाइम्स टीम

दिवाळी म्हटलं, की आप्तेष्टांना भेटवस्तू देणं आलंच. आपण देणारी भेट इतरांपेक्षा वेगळी आणि आकर्षक असावी अशी सगळ्यांचीच इच्छा असते. मात्र, ती बजेटमध्येही असावी; कारण अशा वस्तू बऱ्याच खरेदी कराव्या लागतात. त्यामुळे बजेटमध्ये गिफ्ट खरेदी करण्याची संधी 'महाराष्ट्र टाइम्स'चा 'कल्चर क्लब' आणि 'स्माइल' देतंय.

यांच्या संयुक्त विद्यमाने १ ते ३ नोव्हेंबरदरम्यान विशेष प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं आहे. यामध्ये पणत्या, आकाशकंदील, फराळ या गोष्टी विक्रीकरिता ठेवल्या आहेत. तसंच, ज्यूट, खण आणि वारली पेंटिगपासून बनवलेले फोल्डर, विविध बॅग, पर्स आणि गिफ्ट आर्टिकल्सही उपलब्ध आहेत. विश्रामबाग वाडा इथं सकाळी १० ते रात्री ८ यावेळेत या प्रदर्शनात खरेदी करता येईल.

स्मृती महिला मंडळ आणि पुणे महानगरपालिका याच्या संयुक्त विद्यमाने 'स्माइल' हे विक्री केंद्र गेल्या १५ वर्षांपासून लोकमान्य नगर, कात्रज आणि विश्रामबाग वाडा इथं सुरू आहे. या निमित्तानं महिला आणि अपंगांनी तयार केलेल्या वस्तूंना भरपूर मागणी मिळते. या प्रदर्शनाचं नियोजन प्रदीप्ता कुलकर्णी यांनी केलं असून, 'स्माइल'च्या अध्यक्षा खासदार अॅड. वंदना चव्हाण यांचा आयोजनामध्ये महत्त्वाचा वाटा असतो.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बचत गटांची लगबग सुरू

$
0
0

चकलीची भाजणी, अनारसे, शंकरपाळ्या, करंजीला सर्वाधिक मागणी

म. टा. प्रतिनिधी, पुणे

दिवाळीच्या फराळातील अवघड रेसिपी असलेले पदार्थ विकत घेण्यास ग्राहकांची पसंती मिळत असल्याने बचत गटांची सध्या लगबग सुरू झाली आहे. अनारसे, चकली, शंकरपाळ्या आणि करंजीला सर्वाधिक मागणी आली आहे. एकीकडे ऑर्डरची यादी वाढत असताना महाग सामान आणि पदार्थांची किंमत किती वाढावयाची, असा संभ्रम लघु उद्योजिकांसमोर आहे.

नोकरीच्या अनियमित वेळांमुळे फराळ बनविण्यास वेळच उपलब्ध होत नसल्याने पदार्थ विकत आणण्याचे प्रमाण दर वर्षी वाढते आहे. त्यामुळे प्रत्येक वेळी आमची फराळाची ऑर्डर किमान वीस टक्क्यांने वाढते असल्याचे बचत गटाच्या प्रतिनिधींनी सांगितले. दिवाळीचा उत्सव अवघ्या दहा दिवसांवर आल्याने बचत गटांमध्ये फराळाच्या नियोजनाची लगबग सुरू झाली आहे. अनेक बचत गटांनी ऑर्डरचा आढावा घेऊन फराळाची प्राथमिक तयारी सुरू केली आहे.

बहुतांश महिलांना अनारसे बनविणे अवघड वाटते. त्यांचा प्रयत्न अनेकदा फसतो. त्यामुळे अलीकडे महिला अनारसे विकतच घेत असल्याने मागणी वाढली आहे. याशिवाय चकली, शंकरपाळ्या, चिरोटे, करंजी, बेसनाचे लाडू यांना जास्त मागणी मिळते आहे. दिवाळी जवळ आल्यामुळे महिलांची धावपळ सुरू झाली आहे. आम्ही महिलांना या पदार्थांचे पॅकिंग आकर्षक कसे करावे, याचेही प्रशिक्षण दिले आहे. त्यामुळे चविष्ट पदार्थ आणि चांगल्या पद्धतीने केलेल्या पॅकिंगमुळे ग्राहकांची पसंती मिळते. आमच्या संस्थेशी १७० महिला आणि बचत गट जोडले असून फराळाच्या माध्यमातून त्यांचा चांगला रोजगार उपलब्ध झाला आहे, असे स्माइल संस्थेच्या वरिष्ठ पदाधिकारी प्रदीप्ता कुलकर्णी यांनी दिली.

'अनारसे बनवायला सुरुवात झाली असून पुढील टप्प्यात चकली, शंकरपाळी करणार आहोत,' असे सांगून श्रद्धा फुड्सच्या वंदना वाडेकर म्हणाल्या, 'निरक्षर आणि बेरोजगार असलेल्या महिलांना उप्तन्नाचे साधन मिळवून देण्यासाठी आम्ही आठ वर्षांपूर्वी फराळाचे पदार्थ आणि पापड-लोणचे अशी उत्पादने बनविण्यास सुरुवात केली. आज आमच्या फराळाच्या पदार्थांना शहराच्या विविध भागातील नामांकित दुकानातून चांगल्या ऑर्डर मिळत आहेत. क्लिष्ट पदार्थ बनविण्यापेक्षा विकत घेण्यावर महिलांचा कल असल्याने या महिलांना फराळाच्या निमित्ताने अर्थाजनाचे साधन मिळाले आहे, असे वाडेकर यांनी सांगितले.

महागाईचे सावट

'फराळाच्या पदार्थांसाठी लागणाऱ्या साहित्याला या वर्षी महागाईचा फटका बसला आहे. या पदार्थांच्या किमतीमध्ये दररोज चढउतार होत आहेत. पुढील काही दिवसात किमती उतरतील असे सरकारने सांगितले आहे; पण खरेदीसाठी वाट बघायची की सध्या आहे त्या रकमेत कच्च्या मालाची खरेदी करायची, याबद्दल संभ्रम निर्माण झाला आहे. पर्यायाने याचे पडसाद फराळाच्या पदार्थांच्या किमतीवर उमटणार आहेत,' असे वंदना वाडेकर यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आधार नोंदणीला मिळणार गती

$
0
0

जिल्हा गटविकास अधिकारी आणि गट शिक्षणाधिकाऱ्यांची घेणार मदत

म. टा. प्रतिनिधी, पुणे

जिल्ह्यातील आधार नोंदणीच्या कामाला गती देण्यासाठी जिल्हा गटविकास अधिकारी आणि गट शिक्षणाधिकाऱ्यांची मदत घेण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला आहे. त्यासाठी जिल्हा परिषदेचे सहकार्य घेण्यात येणार असून येत्या डिसेंबर अखेरपर्यंत जिल्ह्यात शंभर टक्के आधार नोंदणी करण्याचा निर्धार करण्यात आला आहे.

जिल्ह्यात आधार नोंदणीचे काम प्रगतीपथावर आहे. परंतु, त्याची गती फारशी समाधानकारक नाही. जिल्ह्यात आतापर्यंत ८४ टक्के आधार नोंदणीचे काम झाले आहे. हे काम शंभर टक्के पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. सुप्रीम कोर्टात दाखल झालेल्या एका याचिकेमध्ये 'आधार नोंदणी सक्तीची करता येणार नाही,' असे आदेश देण्यात आले आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून आधार नोंदणीचे काम रेंगाळले आहे.

सुप्रीम कोर्टाचे हे आदेश असताना केंद्र सरकारने येत्या ३१ डिसेंबरपर्यंत शंभर टक्के आधार नोंदणी करण्याचे आदेश राज्य सरकारला दिले आहेत. या आदेशान्वये आधार नोंदणीच्या मोहिमेला गती देण्यासाठी जिल्हाधिकारी सौरभ राव यांच्या अध्यक्षतेखाली एक बैठक झाली. त्यामध्ये आधार नोंदणीचा आढावा घेऊन हे काम गतीने कशा पद्धतीने करता येईल याचे नियोजन करण्यात आले आहे. आधार नोंदणीसाठी प्रशासनाकडे दीडशे मशिन्स उपलब्ध आहेत. मात्र, ही संख्या पुरेशी नाही. या नोंदणीसाठी अधिक मशिन्सची गरज आहे. त्यासाठी राज्य सरकारकडे मागणी करण्यात आली आहे. ही जादा मशिन्स पुढील महिन्यात उपलब्ध होणे अपेक्षित आहे. त्यामुळे तूर्त उपलब्ध असलेल्या मशिन्सचा अधिक कार्यक्षमपणे वापर करण्याचे नियोजन या बैठकीत करण्यात आले.

'संग्राम या संस्थेच्या १५० मशिन ऑपरेटरांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. जिल्ह्यातील ज्या नोंदणी केंद्रांवर दररोज तीसपेक्षा कमी आधारची नोंदणी होते अशा केंद्रातील मशिन्स 'संग्राम'च्या ऑपेरटरकडे देण्यात येणार आहेत,' असे जिल्हाधिकारी राव यांनी सांगितले. या ऑपरेटरच्या मदतीने गावांतील आधार नोंदणीचे काम पूर्ण करण्यात येणार आहे. या कामासाठी जिल्हा परिषदेचे गटविकास अधिकारी आणि गटशिक्षणाधिकारी यांची मदत घेण्यात येणार आहे. त्यांच्या माध्यमातून हे काम पूर्ण करण्याता प्रयत्न करण्यात येत असल्याचेही त्यांनी सांगितले. पुणे व पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या हद्दीतील आधार नोंदणीसाठी या दोन्ही संस्थांना प्रत्येकी २५ मशिन उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. महापालिकांच्या शिक्षण विभागाच्या मदतीने अंगणवाडी आणि शाळांमध्ये आधार नोंदणीचे काम केले जाणार असल्याचेही राव यांनी स्पष्ट केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पोलिस महासंचालकाचे ‘पोलिसी धडे’

$
0
0

संवादाबरोबर विविध योजनांची घेतली माहिती

म. टा. प्रतिनिधी, पुणे

राज्याचे पोलिस महासंचालक प्रवीण दीक्षित यांनी पोलिस आयुक्तालयातील सर्व अधिकाऱ्यांशी संवाद साधत 'पोलिस मित्र' संकल्पना प्रभावीपणे राबवण्याची सूचना केली. त्यांनी 'सीसीटीव्ही' यंत्रणेची माहिती घेत या यंत्रणेचा जास्तीत जास्त उपयोग करत नियम मोडणाऱ्या वाहनचालकांवर प्रभावी कारवाई करण्याचे आदेशही दिले.

दी​क्षित हे गेली दोन दिवस पुण्याच्या दौऱ्यावर होते. त्यांनी रविवारी राज्य गुन्हे अन्वेषण विभागात बैठका घेत राज्यभरातील गुन्हेगारीचा आढावा घेतला. त्यानंतर सोमवारी सकाळी ते बैठकीसाठी पोलिस आयुक्तालयात दाखल झाले होते. पोलिस आयुक्त के. के. पाठक, सहआयुक्त सुनील रामानंद यांच्या उपस्थितीत त्यांनी शहरातील सर्वच पोलिस अधिकाऱ्यांशी थेट संवाद साधला.

पोलिस ठाण्यांच्या निरीक्षकांसह, अप्पर आयुक्त, उपायुक्तांशी त्यांनी चर्चा केली. पुण्याच्या वाहतूक समस्येबाबत काय तोडगा काढता येवू शकतो, याबाबत त्यांनी सखोल चर्चा केली. वाहतूक उपायुक्त सारंग आवाड यांनी पॉवर पॉइंट प्रेझेंटेशनद्वारे पोलिसांकडून करण्यात येत असलेल्या प्रयत्नांबाबत त्यांना माहिती दिली. पोलिस निरीक्षकांशी चर्चा करत त्यांच्या अडचणी तसेच सूचनाही जाणून घेतल्या.

'पोलिस मित्र' वाढवा

शहरातील खडान‍्खडा माहिती मिळवण्यासाठी तसेच नागरिकांचा सहभाग वाढवण्यासाठी पोलिस मित्र संकल्पना रुजवणे आवश्यक आहे. त्यामुळे समाजात घडणाऱ्या अनेक बाबींची माहिती पोलिसांना मिळेल. त्यासाठी पोलिस मित्र वाढवण्याची गरज दीक्षित यांनी व्यक्त केली.

'सीसीटीव्हीं'चा वापर वाढवा

राज्यात सर्वप्रथम सुरू झालेल्या 'सीसीटीव्ही'चा प्रकल्प दीक्षित यांनी पाहिला. पोलिस आयुक्तालयातील कमांड सेंटरला भेट देत त्यांनी 'सीसीटीव्ही' ऑपरेशनची माहिती घेतली. पोलिस आयुक्त पाठक यांनी 'सीसीटीव्ही'द्वारे उघडकीस आणलेले गुन्हे त्यांच्या निदर्शनास आणून दिले. दीक्षित यांनी नियम मोडणाऱ्या वाहनचालकांवर 'सीसीटीव्ही'द्वारे कारवाई करण्याची सूचना केली आहे, असे पाठक यांनी सांगितले.

महासंचालक म्हणतात...

-तळीरामांविरुद्धची कारवाई वाढवा, आठवड्यातील सातही दिवस प्रभावी कारवाईची गरज.
- 'सीसीटीव्ही'द्वारे नियम तोडणाऱ्यांवरही कारवाईची गरज.
- 'डिव्हिजन' स्तरावर वाहतूक सल्लागार समितींची स्थापन करा. स्थानिकांचा सहभाग वाढवा.
- पोलिसांच्या आरोग्याची काळजी घ्या. पोलिस लाइनमध्ये घरोघरी जाऊन पोलिसांच्या आरोग्याची माहिती संकलित करा.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘शौर्य’ गाथा अॅपवर

$
0
0

परमवीरचक्र प्राप्त सैनिकांची माहिती अॅपद्वारे मिळणार

म. टा. प्रतिनिधी, पुणे

देशासाठी प्राणाची आहुती दिलेल्या सैनिकांना परमवीरचक्र या सैन्यदलातील सर्वोच्च किताबाने गौरविण्यात येत असल्याने अशा परमवीरचक्रप्राप्त सर्व वीरांची माहिती अँड्रॉइड अॅप्लिकेशनच्या माध्यमातून उपलब्ध होणार आहे. असीम फाउंडेशनने परमवीरचक्र मिळालेल्या २१ वीरांविषयी माहिती देण्यासाठी 'शौर्य' हे अॅप विकसित केले आहे.

असीम फाउंडेशन गेली १५ वर्षे देशाच्या सीमावर्ती भागांमध्ये कार्यरत आहे. या अनुभवातूनच ही संकल्पना सुचली आणि आता अनेकांच्या मदतीने ती प्रत्यक्षात आल्याची माहिती फाउंडेशनचे संस्थापक-अध्यक्ष सारंग गोसावी यांनी दिली.

'एखाद्या राष्ट्राची खरी ओळख त्या राष्ट्रामध्ये वीरांना आणि शहिदांना मिळणाऱ्या सन्मानावर ठरते, याकडे लक्ष वेधून, ज्यांनी राष्ट्राच्या अखंडतेसाठी आणि एकात्मतेसाठी त्याग केला, अद्वितीय शौर्य दाखवले अशा वीरांबद्दलची माहिती पुढच्या पिढीला व्हावी, याउद्देशाने हे अॅप विकसित केले आहे,' असे गोसावी यांनी सांगितले. या अॅपमधून मराठी आणि इंग्रजी अशा दोन्ही भाषांमधून माहिती मिळू शकेल.

३ नोव्हेंबर १९४७ रोजी जम्मू-काश्मीरमध्ये घुसलेल्या पाकिस्तानी सैन्याशी लढताना वीरमरण प्राप्त झालेले मेजर सोमनाथ शर्मा भारताचे प्रथम परमवीरचक्र विजेते. त्यांच्या स्मृतिदिनी ३ नोव्हेंबरलाच या अॅपचे लोकार्पण होणार आहे. तसेच, या कार्यक्रमात '१९६५ चे युद्ध : शोध आणि बोध' या विषयावर ले. ज. विनायक पाटणकर (नि.) यांचे व्याख्यान होईल. चाणक्य मंडलचे प्रमुख अविनाश धर्माधिकारी या वेळी उपस्थित राहणार आहेत. हा कार्यक्रम सायंकाळी ६ वाजता मयूर कॉलनीतील बाल शिक्षण मंदिर येथे होणार आहे. कार्यक्रमाच्या प्रवेशिकांसाठी info@aseemfoundation.org यावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images