Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

‘भातुकली’चा डाव रंगलेलाच अजुनी सुरू कहाणी

0
0

गाण्याला ४५ वर्षे पूर्ण; रसिकांवर मोहिनी कायम

म. टा. प्रतिनिधी, पुणे

'अधुऱ्या कहाणी'ची व्यथा सांगणारे 'भातुकली'चे गाणे ४५ वर्षांचे झाले आहे. मराठी भावजीवनाचा अविभाज्य भाग बनलेल्या या गाण्याने 'मांडलेला डाव' आजच्या पिढीच्या मनाचाही ठाव घेतो आहे. कॅसेट युगापासून सुरू झालेला हा प्रवास आज मोबाइल फोनच्या रिंगटोनपर्यंत येऊन पोहोचला आहे.

'भातुकलीच्या खेळामधली राजा आणिक राणी' हे गाणे गेली ४५ वर्षे मराठी मनांवर अधिराज्य गाजवते आहे. कविवर्य मंगेश पाडगावकर, ज्येष्ठ संगीतकार यशवंत देव आणि ज्येष्ठ गायक अरुण दाते या त्रिकुटाने एकत्र येऊन ज्या उत्तमोत्तम गाण्यांनी मराठी भावविश्व समृद्ध केले, त्यात या गाण्याचा समावेश होतो. 'शुक्रतारा मंदवारा' या गाण्यालाही नुकतीच ५० वर्षे पूर्ण झाली. त्याच ध्वनिमुद्रिकेतील 'भातुकलीच्या खेळामधली...' या गीतानेही पंचेचाळीशीचा टप्पा ओलांडला आहे. या त्रिकुटाने मांडलेला भातुकलीचा डाव मोडलेला नसून, आजही रंगलेलाच असल्याची रसिकांची भावना आहे.

'भातुकलीच्या खेळामधली राजा आणिक राणी, अर्ध्यावरती डाव मोडला, अधुरी एक कहाणी,' हे गीत आजही अनेकांच्या ओठी येते. त्यामध्ये या गाण्याच्या पिढीमधीलच नव्हे, तर तरुणांचाही समावेश असतो. तरुणांच्या स्मार्ट फोनवरही हे गाणे वाजते. या गाण्याच्या पंचेचाळीशीच्या निमित्ताने 'मटा'ने ज्येष्ठ संगीतकार यशवंत देव यांच्याशी संवाद साधला.

देव म्हणाले, 'या गाण्याला ४५ वर्षे पूर्ण झाली, हे खरे असले, तरी मी वर्षे मोजत नाही, गाणी मोजतो.' देव यांनी या गाण्याच्या निर्मितीप्रवासाच्या अनेक आठवणी जागवल्या. 'पाडगावकरांनी हे गीत लिहिल्यानंतर त्यास मी चाल दिली. त्यांना आधी ती आवडली नव्हती. त्यांची मी समजूत घातली आणि पुढे जे काही घडले, ते आपल्यासमोर आहे,' असे देव यांनी नमूद केले.

'मी मुंबई आकाशवाणीवर होतो. अरुण दाते विविध भारतीवर हिंदी गाणी गात असत. त्यांनी मराठी गाणे गावे, अशी गळ मी घातली. अनेक वर्षांच्या पाठपुराव्यानंतर सन १९६२ मध्ये 'शुक्रतारा मंद वारा' या पहिल्या गीताची ध्वनिमुद्रिका प्रकाशित झाली. त्यालाही आता ५० वर्षे लोटली,' असे देव यांनी सांगितले.

'मी हिंदी मुलखातला. माझे मराठी उच्चार धड नाहीत. मी हेच काय; पण कोणतेही मराठी गीत म्हणू शकणार नाही,' असे म्हणणाऱ्या अरुण दाते यांनी शेवटी हे भावगीत म्हटले. त्यानंतर अनेक गाणी या त्रिकुटाने केली.
पाडगावकरांची आठवण

'आमच्या घरी एक किस्सा घडला. माझी मुलगी अंजू त्या वेळी कॉलेजमध्ये होती. हे गाणे ऐकून तिच्या मैत्रिणी तिला म्हणाल्या,'अगं, तुझ्या बाबांचा प्रेमभंग झालाय का?' आता हा प्रश्न तिने मला विचारायचा, तर ती तिच्या आईकडे गेली. आईने तिला गमतीने उत्तर दिले, 'तुझे बाबा नुसते रस्त्यावरून चालत गेले ना, तरी त्यांचा दहा वेळा प्रेमभंग होईल.' आमची वास्तवातली राजाराणीची गोष्ट ही अशी होती...' अशा शब्दांत या गाण्याच्या लोकप्रियतेची गंमत मंगेश पाडगावकर नेहमी सांगतात.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


‘राष्ट्रवादी’चा आंदोलन सप्ताह

0
0

पिंपरी-चिंचवडमध्ये शनिवारी करणार चक्का जाम

म. टा. प्रतिनिधी, पिंपरी

सामान्यांच्या तोंडचा घास पळविणारी महागाई, भाजप नेत्यांचे बेताल वक्तव्य आणि सरकारला कोंडीत पकडण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने आंदोलन सप्ताहाचे नियोजन केले आहे. संपूर्ण राज्यात ठिकठिकाणी रविवारपासून (२५ ऑक्टोबर) आंदोलने सुरू झाली असून, शनिवारी (३१ ऑक्टोबर) बालेकिल्ला पिंपरी-चिंचवडमध्ये राष्ट्रवादी सरकारचा निषेध नोंदविण्यासाठी आंदोलन करणार आहे.

एकाच वेळेस ठिकठिकाणी आंदोलन करण्याऐवजी आठ दिवस दररोज राज्यातील विविध जिल्ह्यात आंदोलन करण्याचे प्लॅनिंग पक्षाच्या प्रांतिक कार्यकारिणीकडून करण्यात आले आहे. गेल्या दोन दिवसांपासून राज्यभर आणि शहराच्या आसपास आंदोलन होत असताना राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पिंपरी-चिंचवडमध्ये पक्षाचे नेते-कार्यकर्ते थंड कसे, असा सवाल उपस्थित होत होता. त्याबाबत शहराध्यक्ष संजोग वाघेरे पाटील यांच्याशी संपर्क साधला असता शनिवारी (३१ ऑक्टोबर) शहरात मोठे आंदोलन करणार असल्याची माहिती त्यांनी 'मटा'शी बोलताना दिली.

रविवारी स्थानिक पदाधिकाऱ्यांनी प्रदेश राष्ट्रवादी युवा काँग्रेसचे अध्यक्ष निरंजन डावखरे यांच्या नेतृत्वाखाली वडगाव मावळ येथे रास्ता रोको आंदोलन केले. २५ ते ३० ऑक्टोबरदरम्यान दररोज पुणे जिल्ह्यातील दोन तहसील कार्यालयावर महागाईविरोधात मोर्चा काढण्यात येणार आहे. याचाच एक भाग म्हणून रविवारी मावळ तहसील कार्यालयातून मोर्चाला सुरुवात झाली.

याप्रसंगी प्रदेश राष्ट्रवादी युवा काँग्रेसचे अध्यक्ष निरंजन डावखरे, पुणे जिल्हा राष्ट्रवादी महिला काँग्रेस आघाडीच्या अध्यक्षा वैशाली नागवडे, पुणे जिल्हा युवा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष राजेंद्र कोरेकर, पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे वरिष्ठ उपाध्यक्ष गणेश खांडगे, जिल्हा बँकेचे संचालक बाळासाहेब नेवाळे, मावळ राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष गणेश ढोरे, माजी जिल्हा परिषद सदस्या अर्जुन गरूड यांच्यासह मावळ राष्ट्रवादीचे कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

वडगाव मावळच्या तहसील कार्यालयात अन्नधान्याची महागाई कमी करावी, दुष्काळग्रस्त शेतक-यांना मदत करावी व शालेय विद्यार्थ्यांची फी माफ करावी या मागण्यांचे निवेदन तहसीलदार शरद पाटील यांना देण्यात आले.

उघडपणे अंतर्गत दुफळी नसल्याचा दावा करणाऱ्यांमुळे वास्तवातील गटतटात राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची पिंपरी-चिंचवडमध्ये सध्या पुरती गोची झाली आहे. अमुक गटाचा म्हणून आगामी निवडणूकीत डावलला जाण्याच्या भीतीने सध्या युवा कार्यकर्ते सैरभैर झाले आहेत. त्यांना सावरण्यासाठी शहराध्यक्ष संजोग वाघेरे पाटील यांच्या मदतीला नुकतीच कार्याध्यक्ष म्हणून जगदीश शेट्टी यांच्या नावाची घोषणा माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली. त्यानंतर पुन्हा कार्यकर्ते बांधणीला वेग येणार असल्याचे पहिल्या फळीतील कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे.

पद भिन्न, दबाव भिन्न कार्यालयांवर

महापौर बदल आणि पदावर नसलेल्यांचा दबाव गट याची जोरदार चर्चा महापालिकेत रंगत आहे. ठरावीक पदावर काम करून सध्या दुसऱ्या पदावर नियुक्त झालेल्या काही नेत्यांचा पूर्वीच्या पदावर आणि तेथील कार्यालयावर आपला दबाव कायम ठेवल्याचे चित्र आहे. त्यातूनच अनेकदा शाब्दिक चकमक नेत्यांमध्ये घडत असून, याचा परिणाम शनिवारच्या आंदोलनावर होणार असे दिसत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

निधी मिळाल्यावर लगेच देणी फेडू

0
0

खासगी ठेकेदारांना 'पीएमपी'चे आश्वासन

म. टा. प्रतिनिधी, पुणे

पुणे महापालिकेने निधी उपलब्ध करून देताच, पुणे महानगर परिवहन महामंडळाला (पीएमपी) बस पुरविणाऱ्या खासगी ठेकेदारांची देणी फेडण्यात येतील, असे आश्वासन सोमवारी देण्यात आले. तसेच, त्यांना लावण्यात आलेल्या दंडाबाबत अंतिम निर्णय घेण्याचे सर्वाधिकार 'पीएमपी'चे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक अभिषेक कृष्णा यांना देण्यात आले.

'पीएमपी'कडून थकबाकी मिळत नसल्याने सर्व खासगी ठेकेदारांनी महापौर आणि स्थायी समिती अध्यक्षांना सविस्तर पत्र लिहिले होते. त्यावर तोडगा काढण्यासाठी सोमवारी महापौर दत्तात्रय धनकवडे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. महापालिकेकडून 'पीएमपी'ला देण्यात येणारा निधी रखडला आहे. या निधीअभावी ठेकेदारांची थकबाकी देण्यात 'पीएमपी'ला अडचणी येत असल्याचे स्पष्ट झाल्याने पुढील दोन दिवसांत पालिकेचा निधी 'पीएमपी'ला दिला जावा, अशा सूचना महापौरांनी केल्या. पालिकेकडून निधी उपलब्ध होताच, ठेकेदारांची सर्व देणी चुकती केली जातील,' अशी ग्वाही 'पीएमपी'च्या कृष्णा यांनी दिली.

'पीएमपी ठेकेदारांच्या मार्गावर न येणाऱ्या बसबाबत चुकीच्या पद्धतीने दंड लावला जात असल्याची तक्रारही सातत्याने केली जात होती. त्याबाबत, ठेकेदारांनी लेखी स्वरूपात अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालकांकडे म्हणणे सादर करावे. त्यांच्या तक्रारींची योग्य ती दखल घेऊन त्यानुसार दंड कमी करण्याचा अथवा कायम ठेवण्याचा निर्णय घेण्याचे सर्वाधिकार कृष्णा यांना देण्याचा निर्णयही एकमताने घेण्यात आला. त्यानुसार, पुढील काही दिवसांत दंडाबाबत योग्य तो विचार करून निर्णय घेतला जाईल,' असे स्पष्ट करण्यात आले आहे.
...............

निधी अभावी ठेकेदारांची देणी देण्यात अडचणी येत आहेत. मात्र, महापालिकेकडून निधी मिळाल्यानंतर तातडीने सर्व ठेकेदारांची देणी चुकती केली जातील.
अभिषेक कृष्णा, अध्यक्ष, व्यवस्थापकीय संचालक, पीएमपी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शहरालगतही दिवसाआड पाणी

0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

धरणाच्या परिसरातील पाच ग्रामपंचायतींनाही शहराप्रमाणेच दिवसाआड पाणीपुरवठा केला जाईल, असे पुणे महापालिकेने सोमवारी स्पष्ट केले. येत्या दोन दिवसांत पाणीपुरवठ्याचे वेळापत्रक जाहीर केले जाणार आहे. गेल्या दीड महिन्यापासून शहरात एक दिवसाआड पाणीपुरवठा केला जात असताना या गावांना मात्र दररोज पाणीपुरवठा केला जात होता.

यंदा अपुऱ्या पावसामुळे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये जेमतेम ५० टक्के साठा आहे. त्यामुळे, शहरात गेल्या महिन्यापासूनच दिवसाआड पाणीपुरवठा केला जात आहे. हद्दीलगतच्या गावांना पाणीपुरवठा करण्याचे बंधन पालिकेवर असल्याने धरणांच्या परिसरातील खडकवासला, नांदेड, शिवणे, धायरी आणि नांदोशी या पाच गावांनाही पालिकेतर्फेच पाणीपुरवठा केला जातो. शहरात पाणीकपात केली गेली असताना, या गावांना नियमित पाणीपुरवठा सुरू होता. त्याबद्दल, नागरिकांनी पालिकेकडे तक्रारी केल्या होत्या. अखेर, सोमवारी महापौर दत्तात्रय धनकवडे यांच्या अध्यक्षतेखाली पाणीपुरवठा विभागाची बैठक घेण्यात आली. अतिरिक्त महापालिका आयुक्त ओमप्रकाश बकोरिया यांच्यासह पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी या वेळी उपस्थित होते.

या पाच गावांच्या परिसरात मोठ्या प्रमाणावर वस्ती वाढली असल्याने पाण्याचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो. त्यामुळे, शहराप्रमाणेच या गावांमध्येही पाणीपुरवठ्यावर बंधने घातली जावीत, अशी मागणी केली गेली. त्यानुसार, या सर्व गावांमध्ये दिवसाआड पाणीपुरवठ्याचे नियोजन करण्यात आल्याची माहिती महापौर धनकवडे यांनी दिली. या बदलांची माहिती सर्व नागरिकांना देण्यात येणार असून, बुधवारपासून सर्व ठिकाणी दिवसाआड पाणीपुरवठा केला जाईल. कोणत्या भागांत, कोणत्या दिवशी पाणीपुरवठा सुरू असेल, याची माहिती पालिकेतर्फे जाहीर करण्यात येणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कैद्यांसाठी टेलिमेडिसिन

0
0

नऊ मध्यवर्ती कारागृहांमध्ये सुविधा; जिल्हास्तरावरही सेवा देणार

म. टा. प्रतिनिधी, पुणे

कैद्यांची सुरक्षितता आणि पळून जाण्याचे प्रकार थांबविण्यासाठी राज्यातील नऊ मध्यवर्ती कारागृहांमध्ये कैद्यांसाठी 'टेलिमेडिसिन'ची सोय उपलब्ध करण्यात आली आहे. मध्यवर्ती कारागृहे आणि सरकारी हॉस्पिटल 'व्हिडिओ कॉन्फरन्सिंग'ने जोडण्यात आली असून, त्याद्वारे कैद्यांवर उपचार करण्यात येत आहे. ही सेवा लवकरच जिल्हा स्तरावर असलेल्या इतर तुरुंगांमध्येही सुरू करण्यात येणार आहेत.

'कैद्यांची ने-आण करण्यासाठी मोठ्या प्रमाणात मनुष्यबळ लागते. त्याशिवाय कैद्यांची सुरक्षितता तसेच ते पळून जाणार नाही, यासाठी जेल प्रशासनाबरोबरच पोलिसांवरही सुरक्षिततेचा ताण येतो. कैद्यांना ​शक्य तितक्या लवकर आणि चांगल्या दर्जाचे उपचार मिळावेत, यासाठी टेलिमेडिसिनची सोय उपलब्ध करण्यात आली आहे. राज्यातील नऊही मध्यवर्ती कारागृहांमध्ये ही सोय उपलब्ध करण्यात आली आहे,' अशी माहिती कारागृह विभागाचे उपमहानिरीक्षक डॉ शहाजी सोळुंके यांनी दिली.

प्रत्येक मध्यवर्ती तुरुंगांमध्ये मिनी हॉस्पिटल असून, तेथे कैद्यांवर उपचार करण्यात येतात. मात्र, गंभीर आजारांसाठी कैद्यांना मोठ्या सरकारी हॉस्पिटलमध्ये हलवणे गरजेचे ठरते. कैद्यांना हॉस्पिटलमध्ये हलवण्यासाठी पोलिस बंदोबस्ताची आवश्यकता असते. त्यासाठी कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी वेळही जातो. कैद्यांना चांगल्या दर्जाची वैद्यकीय सेवा तुरुंगांमध्येच उपलब्ध करण्यात आली, तर यंत्रणेवरही ताण येणार नाही या शक्यतेतून 'टेलिमेडिसिन'ची सोय सुरू करण्यात आली आहे.

सरकारी हॉस्पिटले आणि मध्यवर्ती कारागृहे 'व्हिडिओ कॉन्फरन्सिंग'ने जोडण्यात आली आहेत. त्याद्वारे जेलमधील डॉक्टर हॉस्पिटलमधील डॉक्टरांशी संपर्क करतात. त्यांना 'व्हिडिओ कॉन्फरन्सिंग'द्वारे कैद्यांना दाखवता येते. कैदीही संबंधित डॉक्टरांशी संवाद साधून आपले आजार सांगतात. त्याद्वारे त्या कैद्यांवर उपचार करण्यात येतात. ज्या कैद्यांना हॉस्पिटलमध्ये अॅडमिट करण्याची आवश्यकताच आहे, त्यांना तत्काळ दाखल करण्यात येते. अन्यथा, जेलमध्येच त्यांच्यावर उपचार सुरू ठेवण्यात येतात.
..

जिल्हा स्तरावरील तुरुंगांमध्ये ही सेवा सुरू करण्यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत. प्रत्येक जेलमध्ये 'व्हिडिओ कॉन्फरन्सिंग'ची सोय उपलब्ध झाली की उपचार करणे अधिक सोपे होणार आहे. त्याशिवाय कैद्यांची 'व्हिडिओ कॉन्फरन्सिंग'द्वारे कोर्टात सुनावणीही घेण्यात येते.
डॉ. शहाजी सोळुंके, उपमहानिरीक्षक, कारागृह विभाग

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

क्लासच्या इमारतीवरून उडी मारून विद्यार्थ्यांची आत्महत्या

0
0

कोथरूड परिसरातील घटना

म. टा. प्रतिनिधी, पुणे

कोथरूड येथील मयूर कॉलनीत क्लासच्या इमारतीच्या सहाव्या मजल्यावरून बारावीच्या विद्यार्थ्याने उडी मारून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना सोमवारी सकाळी घडली. हा विद्यार्थी ब्रिलियंट सोसायटीमध्ये क्लाससाठी आला होता. आत्महत्येचे कारण अद्यापपर्यंत स्पष्ट झालेले नाही. दरम्यान, या घटनेने क्लासमध्ये आणि आसपासच्या शाळांमध्ये घबराट पसरली होती.

सौरभ शामराव भरेकर (वय १७, रा. सुतारदरा, कोथरूड) असे या विद्यार्थ्यांचे नाव आहे. कोथरूड पोलिसांनी याप्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. पी. जोग इंग्लिश स्कूलसमोर ब्रिलियंट सोसायटीच्या इमारतीतील दीपा पाठक केमिस्ट्री क्लासमध्ये तो सकाळी सातच्या बॅचला होता. नेहमीप्रमाणे त्याच्या वडिलांनी त्याला सकाळी पावणेसातच्या सुमारास क्लासला सोडले होते, अशी माहिती सहायक निरीक्षक जे. ए. मोरे यांनी दिली. क्लासमध्ये न जाता तो सहाव्या मजल्यावरील टेरेसवर पोहोचला आणि तेथून उडी मारली. या इमारतीशेजारीच केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांचे निवासस्थान आहे. तेथे सुरक्षेसाठी ड्यूटीवर असलेले पोलिस विनोद सोनवणे यांना हा प्रकार लक्षात आला. त्यांनी तत्काळ नियंत्रण कक्षाला माहिती दिली आणि सौरभला जवळच्या हॉस्पिटलमध्ये दाखल केले. मात्र, त्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला.

सौरभचे वडील कॉट्रॅक्टर असून आई महापालिकेमध्ये नोकरीस आहे. तो एमआयटी कॉलेजमध्ये बारावी सायन्सला शिकत होता. त्याने आत्महत्या का केली, हे स्पष्ट झालेले नाही. त्याच्या कुटुंबीयांनाही मोठा धक्का बसल्याने पोलिसांना अधिक माहिती मिळू शकली नव्हती. या घटनेपाठीमागे काही कौटुंबिक किंवा अन्य कारण आहे की काय, याचाही तपास सुरू आहे. हॉस्पिटलमध्ये एकुलत्या एक मुलाचा मृतदेह पाहून सौरभच्या नातेवाइकांनी केलेल्या आक्रोशाने उपस्थितांची मने हेलावली.

पोलिस कर्मचाऱ्याची तत्परता

केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांच्या घरी पोलिस गार्ड म्हणून विनोद सोनवणे नियुक्तीवर आहेत. ते म्हणाले, 'मी रात्रपाळीच्या ड्युटीवर होतो. सकाळी सव्वाआठच्या सुमारास इमारतीवरून काहीतरी पडल्याचा आवाज आल्याने माझे लक्ष गेले. कोणीतरी वरून पडले असावे, असे वाटल्याने मी तिकडे धावत गेलो. एक मुलगा बेशुद्धावस्थेत पडल्याचे दिसले. त्याला इतरांच्या मदतीने रिक्षा घालून कृष्णा हॉस्पिटलमध्ये दाखल केले.'

हुशार, सरळ विद्यार्थी

'सौरभ हा अत्यंत हुशार व सरळमार्गी विद्यार्थी होता. तो नियमित क्लासला येत होता. त्याच्याबाबत कधीच तक्रार नव्हती. सकाळी तो क्लासला न आल्यामुळे त्याची गैरहजेरी नोंदविण्यात आली होती. ही घटना दुःखद आहे,' अशी भावना क्लासच्या दीपा पाठक यांनी व्यक्त केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मॅट्रिमोनी साइटवरून महिलांची फसवणूक

0
0

लैंगिक शोषण करणाऱ्याला अटक

म. टा. प्रतिनिधी, पुणे

मॅट्रिमोनियल साइटवरून उच्चशिक्षित महिलांची ओळख करून फसविणाऱ्या भामट्याला चतुःश्रुंगी पोलिसांनी सोमवारी अटक केली. या भामट्याने पुणे आणि मुंबई येथील प्रत्येकी दोन आणि नागपूरची एका अशा पाच महिलांना फसविले असून, काही जणींचे लैंगिक शोषण केल्याचे समोर आले आहे.

शिवसेनेच्या कार्यकर्त्या आणि जिल्हा दक्षता समितीच्या सदस्य मनीषा धारणे आणि सहकाऱ्यांनी या भामट्याला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. विनयकुमार प्रकाशराव माने (३२, रा. पाषाण, मूळ रा. बेंगळुरू) असे अटक केलेल्याचे नाव आहे.

या प्रकरणी एका तीस वर्षीय महिलेने तक्रार दिली आहे. ही महिला घटस्फोटित असून एका कंपनीत आयटी इंजिनियर आहे. तिने भारत मॅट्रिमोनियल साइटवर नोंदणी केली होती. माने यानेही तेथे घटस्फोटित म्हणून प्रोफाइल तयार केले होते. मानेची या महिलेसोबत ओळख झाली. आपण बेंगळुरूत एका मोबाइल कंपनीत नोकरी करीत असून, पत्नीशी घटस्फोट घेणार असल्याचे मानेने सांगितले. त्यानंतर या महिलेला विवाहाची मागणी घातली. दोघांच्या कुटुंबीयांनी संमती दिल्यानंतर जूनमध्ये तो पुण्यात आला. मोबाइल कंपनीचे डिस्ट्रिब्युशन सुरू करणार असून, विमानगर भागात फ्लॅट घेऊन राहणार असल्याचे त्याने सांगितले. राहण्यास ठिकाण नसल्यामुळे या महिलेने त्याला घरी राहण्यास संमती दिली. या काळात त्याने लैंगिक शोषण केल्याचे तिने तक्रारीत म्हटले आहे.

मानेने या महिलेच्या नावावर गाडी घेण्यासाठी एक लाख रुपयांचे कर्ज काढले. एजन्सीठीही २४ लाखांचे कर्ज काढले होते. मात्र, संशय आल्याने मानेचा मोबाइल तपासला असता, तो चार मुलींशी चॅटिंग करीत असून त्यांनाही तो विवाहाचे आश्वासन देत असल्याचे समजले. येरवडा भागातील एका महिलेकडून पैसे घेणार असल्याचे मेसेजही तिने पाहिला. तिने हा प्रकार धारणे यांना सांगितला. त्यानुसार धारणे यांनी दुसऱ्या महिलेस फोन करून माहिती घेतली, तेव्हा फसवणुकीचा प्रकार उघडकीस आला.

येरवडा येथील महिलेने मानेला पैसे देण्यास बोलवून सोमवारी सकाळी पकडले. त्याला चतुःश्रुंगी पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. माने याने अशा पद्धतीने पाच मुलींची फसवणूक केल्याचे समोर आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

औंध-बाणेर, बालेवाडीचा ‘स्मार्ट’ विकास

0
0

* स्मार्ट सिटीतील क्षेत्रनिहाय विकासाकरिता पालिकेकडून निवड
* सविस्तर आराखडा केंद्राला सादर करणार

म. टा. प्रतिनिधी, पुणे

केंद्र सरकारच्या स्मार्ट सिटी योजनेमध्ये क्षेत्रनिहाय विकासाकरिता (एरिया डेव्हलपमेंट) औंध-बाणेरसह बालेवाडीच्या निवडीवर सोमवारी शिक्कामोर्तब करण्यात आले. स्मार्ट सिटीच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार या भागाचा कायापालट करण्यासाठी (रेट्रोफिटिंग) सविस्तर आराखडा सरकारला सादर करण्यात येणार आहे.

स्मार्ट सिटीच्या निकषांनुसार देशभरातून निवडलेल्या सर्व शहरांना दोन टप्प्यांत त्यासाठीचा प्रस्ताव सादर करावा लागणार आहे. संपूर्ण शहरात राबविल्या जाणाऱ्या प्रकल्पासह (पॅन सिटी प्रोजेक्ट) क्षेत्रनिहाय विकासाचा त्यात समावेश आहे. त्या अंतर्गत गेल्या शनिवारी झालेल्या सर्वपक्षीय खासदार-आमदार, गटनेत्यांच्या बैठकीत औंध-बाणेर या भागाला सार्वत्रिक पसंती मिळाल्याचे चित्र दिसून आले. परंतु, काही पक्षांकडून त्याला विरोध झाल्याने सोमवारी अंतिम निर्णय घेण्याचे निश्चित करण्यात आले. त्यानुसार, महापौर दत्तात्रय धनकवडे यांनी औंध-बाणेरसह बालेवाडीच्या काही भागाचा क्षेत्रनिहाय विकासाकरिता विचार केला जाणार असल्याचे जाहीर केले.

या भागामध्ये गेल्या काही वर्षांत बऱ्यापैकी विकास झाला आहे, तरीही अद्याप काही मोकळ्या जागा शिल्लक आहेत. त्यामुळे, सुमारे एक हजार एकरहून अधिकच्या परिसरात विविध घटकांचा विकास साधण्यासाठी प्रयत्न केला जाईल. स्मार्ट सिटीच्या निकषांनुसार त्यासाठीचा सविस्तर आराखडा येत्या काही दिवसांत तयार करण्यात येणार आहे. या संपूर्ण परिसराचा 'मॉडेल' स्वरूपात विकास करून शहराच्या इतर भागांमध्येही त्याची पुनरावृत्ती करण्याचा मानस आहे, असे महापौरांनी स्पष्ट केले.

स्मार्ट सिटीच्या नियमांत बसणारा झोपडपट्टी, टेकडी, हरित पट्टा, विकसनशील भाग या परिसरात मोठ्या प्रमाणात आहे. तसेच, हा भाग आत्तापर्यंत बऱ्यापैकी विकसित झाला असला, तरी आणखी विकासाकरिता संधी उपलब्ध असल्यानेच प्रशासनाने केलेल्या तांत्रिक विश्लेषणानुसार त्याची निवड करण्यात आली आहे.
..............
औंध-बाणेरचा विकास झाला आहे. मात्र, अद्यापी इथे मोकळ्या जागा आहेत. स्मार्ट सिटीच्या निकषांनुसार त्यासाठीचा सविस्तर आराखडा येत्या काही दिवसांत तयार करण्यात येणार आहे. या संपूर्ण परिसराचा 'मॉडेल' स्वरूपात विकास करून शहराच्या इतर भागांमध्येही त्याची पुनरावृत्ती करण्याचा मानस आहे.
दत्तात्रय धनकवडे, महापौर, पुणे

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


खासगी ‘व्होल्व्हो’ धावणार सुस्साट

0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

प्रवासी वाहतूक करणाऱ्या खासगी व्होल्वो बस (लक्झरी बस) आता पुन्हा वेगात धावणार आहेत. या एक ऑक्टोबरपासून सर्व प्रकारच्या ट्रान्स्पोर्ट वाहनांना स्पीड गव्हर्नर बसविण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, केंद्रीय परिवहन मंत्रालयाने नुकतेच यामधून व्होल्वो बस आणि साडेतीनशे टन वजनापेक्षा कमी क्षमतेच्या गाड्या एक एप्रिल २०१६पर्यंत वगळण्याचा निर्णय घेतला आहे.

गेल्या महिन्यात केंद्र सरकारने प्रसिद्ध केलेल्या राजपत्रानुसार ट्रक, टुरिस्ट बस, ट्रेलर, डंपर यांसारख्या ट्रान्स्पोर्ट वाहनांना स्पीड गर्व्हनर बसविणे बंधनकारक करण्यात आले होते. राज्याच्या परिवहन आयुक्तांनी त्याबाबतचा आदेश काढून ट्रान्स्पोर्ट वाहने जास्तीत जास्त ताशी ८० किमी वेगाने चालविण्याचे बंधन घातले होते. त्याची अंमलबजावणी एक ऑक्टोबरपासून केली जाणार होती.

खासगी बसने प्रवास करणाऱ्या नागरिकांना लवकरात लवकर इच्छित स्थळी पोहोचणे अपेक्षित असते. मात्र, स्पीड गव्हर्नरमुळे या बसला प्रवास पूर्ण करण्यासाठी नेहमीपेक्षा दुप्पट वेळ लागण्याची शक्यता होती. त्यामुळे विविध संघटनांनी सरकारकडे या बसना स्पीड गव्हर्नरमधून वगळण्याची मागणी केली होती. त्यास प्रतिसाद देत सरकारने एक एप्रिल २०१६पर्यंत या गाड्यांना त्यातून वगळले आहे.

दुचाकी, तीन चाकी वाहने, प्रवासी वाहतूक करणाऱ्या चारचाकी गाड्या (प्रवासी क्षमता आठ), अॅम्ब्युलन्स, पोलिस, फायरब्रिगेडची वाहने या वाहनांना सुरुवातीपासून स्पीड गव्हर्नरच्या बंधनातून वगळण्यात आली होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पुण्यातल्या ‘भाईं’ना लगाम?

0
0

छोटा राजनच्या अटकेनंतर पुण्यातील 'नेटवर्क'बाबत चर्चा

म. टा. प्रतिनिधी, पुणे

'सीआर'च्या नावाखाली अनेकांना धमकावत लाखो रुपयांच्या खंडणी गोळा करणाऱ्या तथाकथित 'भाईं'ना अंडरवर्ल्ड डॉन राजेंद्र निकाळजे उर्फ छोटा राजनच्या अटकेने लगाम बसणार का, अशी चर्चा सुरू झाली आहे.

राजनविरुद्ध पुण्यात केवळ दोनच गुन्हे दाखल असून त्या दोन्ही गुन्ह्यांत त्याचे हस्तक निर्दोष सुटलेले आहेत. राजनचे पुण्यातही नेटवर्क असून, त्याने अनेक जमिनींचे व्यवहार केल्याचीही चर्चा आहे.

पुण्यात राजनचे कॉन्टॅक्ट असून ते अनेक बिल्डरांशी त्याचा संपर्क करून देतात. 'सीआर' या नावाचा आधार घेऊन पुण्यातील अनेक बिल्डरांकडून खंडणी गोळा केल्याचे प्रकार घडले आहेत. मात्र, त्याबाबत फारसे गुन्हे दाखल झालेले नाहीत. राजनवर पुण्यात पहिला गुन्हा १९९६ साली स्वारगेट पोलिस ठाण्यात दाखल झाला आहे. अंजुम महेस पटेल (रा. सॅलिसबरी पार्क) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार राजनसह ११ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल होता. या गुन्ह्यात राजन वगळता इतर आरोपी निर्दोष सुटले आहेत. त्याशिवाय माजी नगरसेवक सतीश मिसाळ यांच्या खुनाच्या गुन्ह्यांतही राजन आरोपी आहे. या गुन्ह्यांत डी. के. रावसह इतर आरोपी निर्दोष सुटलेले आहेत काही आरोपींचा मृत्यू झाला आहे. या गुन्ह्यांत राजन फरार असल्याची नोंद आहे.

राजनला यापूर्वी सिंगापूरमध्ये स्थानबद्ध करण्यात आल्याचे वृत्त होते. मात्र, तो काही तपास यंत्रणांच्या हाती लागला नव्हता. या वेळी त्याला बालीमध्ये अटक करण्यात आल्याचे वृत्त आहे. सरकारी यंत्रणांकडूनही त्याचे अटकेच्या वृत्ताला दुजोरा देण्यात आला आहे. त्यामुळे सोपस्कार पार पाडून त्याला भारतात आणण्याची अटकळ बांधण्यात येत आहे. भारतात आणल्यानंतर पुणे पोलिसांनाही त्याची कोठडी घ्यावी लागणार आहे.

राजनने गेल्या काही वर्षांत पुणे आणि परिसरात जमिनीच्या व्यवहारांमध्ये लक्ष घातले होते. त्याचे काही हस्तक वतनाच्या जमिनी घेण्यासाठी सक्रिय होत असल्याचे पोलिसांना आढळले होते. मात्र, कोणाही तक्रार देण्यासाठी पुढे येत नसल्याने आतापर्यंत कारवाई झालेली नव्हती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तूर डाळ प्रतिकिलो @ ₹१७०

0
0

किमतीमध्ये प्रतिक्विंटल ५०० रुपयांची घट

म. टा. प्रतिनिधी, पुणे

तूर डाळीचे दर सोमवारी कमी होण्यास सुरुवात झाली असून, क्विंटलमागे ५०० रुपयांची घट झाली आहे. परिणामी, एका किलोसाठी ग्राहकांना आता १७० रुपये म्हणजे रविवारपेक्षा पाच रुपये कमी मोजावे लागणार आहेत.

'केंद्र सरकारने तूर डाळ १३५ रुपये किलो दराने उपलब्ध करण्याचे आश्वासन दिले आहे. सरकार या आश्वासनानुसारच्या किमतीला डाळ उपलब्ध केली जाईल, त्या वेळी खरेदी करू,' असा पवित्रा किरकोळ विक्रेत्यांनी घेतला आहे. परिणामी, घाऊक बाजारात डाळखरेदीकडे सोमवारीही ग्राहकांनी पाठ फिरविल्याचे चित्र पाहायला मिळाले. या परिस्थितीमुळे तूर डाळीच्या दरात क्विंटलमागे ५०० रुपयांची घट झाली. त्यामुळे एका किलोसाठी ग्राहकांना आता १७० रुपये द्यावे लागणार आहेत.

'तूर डाळीचे दर वाढत असताना राज्य सरकारने डाळींच्या साठ्याबाबत कारवाई सुरू करायला हवी होती. त्या वेळी किमतीवर निश्चित परिणाम झाला असता; परंतु दर गगनाला भिडल्यानंतर सरकारला जाग आली आणि कारवाईचे सत्र सुरू झाले. दर वाढत असताना आयात केली असती, तर डाळीचे दर कमी होण्यास मदत झाली असती. सरकारच्या चुकीच्या धोरणाचा ग्राहकांसह व्यापाऱ्यांना फटका बसत आहे,' असा आरोप आता व्यापाऱ्यांकडून होऊ लागला आहे.


डाळ - प्रतिक्विंटल दर (रुपयांत)
तूर डाळ - १४,००० ते १७,०००
हरभरा डाळ - ६००० ते ६७००
मटकी डाळ - १०,००० ते १०,५००
मसूर डाळ - ७७०० ते ८०००
मूग डाळ - १०,००० ते ११,०००

जिल्ह्यात तपासणी सुरू

अन्नधान्य वितरण विभागाने पुणे शहरानंतर आता जिल्ह्यातील विविध तालुक्यांतील साठेबाज व्यापाऱ्यांकडे मोर्चा वळवला आहे. दिवसभरात जिल्ह्यातील १३ तालुक्यांमध्ये १०० व्यापाऱ्यांकडील साठ्याची तपासणी करण्यात आली. त्यामध्ये भोर तालुक्यातील नसरापूर येथे खाद्यतेलासह सोयाबीन, शेंगांचा अनधिकृत साठा केल्याचे आढळून आले. नसरापूरमध्ये दोन ठिकाणी सुमारे दहा हजार ५५५ लिटर खाद्यतेलाचा अनधिकृत साठा आढळून आला. त्याशिवाय सोयाबीनची ५५ ते ६० किलोची १७८ पोती, तर ५० किलोची १४२ पोती, असा १७ हजार ७८० किलो सोयाबीन; तसेच शेंगांच्या ३५ किलो वजनाची ७२ पोती आढळून आल्याची माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी ज्योती कदम यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

फेलूदा रहस्यकथा स्पर्धेत यशोधन पह‌िला

0
0

>>म. टा. प्रतिनिधी, पुणे

'महाराष्ट्र टाइम्स' आणि रोहन प्रकाशन यांनी आयोजिलेल्या 'फेलूदा रहस्यकथा' या स्पर्धेत यशोधन केळकर यांनी प्रथम क्रमांक मिळवला. राजेश्री कापडी खरवडकर आणि समीर मुजुमदार हे अनुक्रमे दुसरे आणि तिसरे आले. स्पर्धेला राज्यभरातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. वाचन संस्कृती वाढावी आणि लेखनकला विकसित व्हावी, हा या स्पर्धेचा उद्देश होता.

सत्यजित रे यांनी लिहिलेली ३५ कथांची फेलूदा ही गुप्तहेर कथांची मालिका रोहन प्रकाशनातर्फे अशोक जैन यांनी मराठीतून अनुवादित केली आहे. यापैकी २४ कथा आजपर्यंत रोहन प्रकाशनने 'फँटास्टिक फेलूदा' या मालिकेत प्रसिद्ध केल्या होत्या. यानिमित्ताने फेलूदा रहस्यकथा ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. स्पर्धेमध्ये वाचकांना कथेतील फेलूदा, तोपशे, जटायू या पात्रांना केंद्रस्थानी ठेवून कथा लिहिण्यास सांगण्यात आले होते.

स्पर्धेच्या पारितोषिक वितरण समारंभामध्ये फेलूदाच्या मालिकेतील उर्वरित कथांचे प्रकाशन 'महाराष्ट्र टाइम्स'च्या पुणे आवृत्तीचे निवासी संपादक पराग करंदीकर यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. या वेळी रोहन प्रकाशनचे प्रदीप चंपानेरकर, रोहन चंपानेरकर उपस्थित होते.

कल्पनाशक्ती, अभिनव विचारशक्ती, सर्जनशीलता या गोष्टींना उत्तेजन द्यावे, नव्या दमाचे लेखक तयार व्हावेत, किशोरवयीन आणि तरुण पिढीला वर्तमानपत्रवाचन आणि साहित्य यांच्याकडे आकृष्ट करावे, यासाठी ही स्पर्धा आयोजित केली होती. वाचकांनी विविध विषय घेऊन उत्तम दर्जाच्या कथा आमच्याकडे पाठविल्या, असे प्रदीप चंपानेरकर यांनी सांगितले. विजेत्यांना अनुक्रमे २१००, ११००, ७५० रुपये रोख आणि पुस्तके भेट देण्यात आली. लहान वयातच केलेल्या उत्तम प्रयत्नांना प्रोत्साहन देण्यासाठी पाच विद्यार्थ्यांना तीनशे रुपयांची भेट देण्यात येणार आहे, असे चंपानेरकर यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नगर रोड बीआरटी अधांतरीच

0
0

बसथांब्यांच्या दुरुस्तीची कामे अपूर्ण

म. टा. प्रतिनिधी, पुणे

संगमवाडी-विश्रांतवाडी (आळंदी रोड) दरम्यान जलद बस वाहतूक सेवा (बीआरटी) सुरू केल्यावर नगर रोडवरही महिन्याभरात सुरू करण्याचे पालिकेने नियोजन फसले आहे. आळंदी रोड बीआरटी सुरू होऊन दोन महिने होत आले, तरी नगर रोडवरील बीआरटी केव्हा सुरू होणार, याची तारीख जाहीर करण्यात पालिकेतर्फे टाळाटाळ केली जात आहे.

कात्रज-हडपसर दरम्यानच्या पथदर्शी बीआरटीनंतर आळंदी आणि नगररोडवरील बीआरटीसाठी पालिकेने पायाभूत सुविधांची निर्मिती केली. या मार्गावर बीआरटी सेवा सुरू व्हावी, याचा आग्रह नागरिकांकडून सातत्याने धरण्यात येत होता. अखेर, दोन महिन्यांपूर्वी ऑगस्टअखेरीस आळंदी रोडवर बीआरटी सुरू झाली. त्याच वेळी महिन्याभरात नगर रोडवरही बीआरटी सुरू होईल, अशी ग्वाही पालिका आणि पुणे महानगर परिवहन महामंडळाने (पीएमपी) दिली होती. नगर रोडवरील बसथांब्यांच्या दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले असून, १३ पैकी १० बसथांब्यांचे दुरुस्तीचे काम पूर्ण होत आले आहे. अद्याप टर्मिनलसाठीची जागा निश्चित होणे बाकी आहे. त्यामुळे, नगर रोडवर बीआरटी सुरू होण्यास आणखी विलंब होण्याची शक्यता आहे.

आळंदी आणि नगररोडवर बीआरटीसाठी पालिकेने कोट्यवधी रुपये खर्चून बसथांबे उभारले. परंतु, बससेवा उपलब्ध नसल्याने त्याचा गैरवापर केला गेला. अनेक बसथांब्यांची तोडफोड करण्यात आली. त्यामुळे, अशा सर्व बसथांब्यांवर बीआरटीसाठी आवश्यक आयटीएमएस यंत्रणा बसविण्यासाठी पालिकेला पुन्हा खर्च करावा लागला. आळंदी रोडवर हे काम पूर्ण झाल्यावर नगर रोडवर काम केले जाईल, असे आश्वासन देण्यात आले होते. मात्र, नगर रोडवरील बसथांब्यांच्या दुरुस्तीचे काम अद्याप बाकी आहे. येत्या काही दिवसांत पिंपरी-चिंचवडमधील दुसरा नाशिक फाटा ते वाकड हा बीआरटी मार्ग सुरू होण्याची शक्यता आहे. त्यामुळे, पुण्यातील नगर रोडवर बीआरटी केव्हा सुरू होणार, अशी विचारणा प्रवाशांकडून केली जात आहे.

टर्मिनलमुळे अडली बीआरटी

विश्रांतवाडी येथे तात्पुरत्या स्वरूपात टर्मिनल उभारल्याने बीआरटीच्या संचलनात पीएमपीला काही अडचणींचा सामना करावा लागत आहे. नगर रोडवर टर्मिनलसाठी पुरेशी आणि व्यवस्थित जागा असल्याशिवाय बीआरटी सुरू करता येणार नाही, असे स्पष्ट संकेत 'पीएमपी'ने दिले आहेत. नगर रोडवरील बीआरटी टर्मिनलसाठी जागा पाहणी केली जाणार आहे. त्यानंतर, टर्मिनलचे काम सुरू होणार असल्याने या वर्षी नगर रोड बीआरटीला मुहूर्त मिळण्याची शक्यता धूसर होत चालली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘दिवाळी पहाट’साठी अटी

0
0

उद्यांनामध्ये कार्यक्रमांसाठी पालिका देणार सशर्त परवानगी

म. टा. प्रतिनिधी, पुणे

शहरातील उद्यानांमध्ये काही अटी-शर्तींवर 'दिवाळी पहाट' कार्यक्रमांना परवानगी देण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. त्यामुळे, शहराच्या विविध भागांत होणाऱ्या दिवाळी पहाट कार्यक्रम आयोजकांना काहीसा दिलासा मिळाला आहे.

राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाने (एनजीटी) उद्यानांमध्ये कार्यक्रम घेण्यास बंधने घातली होती. एनजीटीच्या आदेशांनुसार पालिकेने दिवाळी पहाट कार्यक्रमासाठी आलेल्या सर्व अर्जांवरील निर्णय राखून ठेवला होता. एनजीटीच्या आदेशामध्ये सरसकट सर्व कार्यक्रमांवर बंदी घालावी, असे नमूद करण्यात आले नव्हते. त्यामुळे, एनजीटीच्या निकालाचा नेमका अर्थ लावून, अशा कार्यक्रमांना परवानगी देण्याबाबत काय भूमिका घ्यावी, अशी विचारणा उद्यान विभागाने विधी विभागाला केली होती. विधी विभागानेही सुप्रीम कोर्टाच्या एका ज्येष्ठ वकिलांकडून त्याबाबतचा अभिप्राय मागविला होता.

'एनजीटी'च्या आदेशाप्रमाणे कार्यक्रम आयोजकांवर काही बंधने घालून, परवानगी देता येणे शक्य असल्याचे स्पष्टीकरण देण्यात आले. त्यानुसार, मंगळवारी पालिका आयुक्त कुणाल कुमार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत उद्यानांमधील कार्यक्रमांना सशर्त परवानगी देण्याचा निर्णय घेण्यात आला. अशा कार्यक्रमांना परवानगी देण्यासाठीच्या अटी-शर्ती पालिकेकडून निश्चित करण्यात आल्या आहेत. 'एनजीटी'च्या आदेशांनुसार उद्यानांमध्ये होणाऱ्या कार्यक्रमांना आवाजाचे बंधन पाळावे लागेल. ठराविक डेसिबलच्या मर्यादेमध्येच कार्यक्रम सादर करता येईल. तसेच, उद्यानांमध्ये कार्यक्रम करताना कोणत्याही स्वरूपात झाडे-झुडपे, गवत किंवा बागेतील हरित पट्ट्याचे नुकसान होणार नाही, याची काळजी घ्यावी लागणार आहे. या संदर्भात आयोजकांकडून हमी घेण्यात येणार असून, त्यानंतरच त्यांना परवानगी दिली जाण्याची शक्यता आहे.

अशी असतील बंधने...

>> ध्वनिप्रदूषण करणार नाही असे प्रतिज्ञापत्र द्यावे लागणार.
>> महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाची परवानगी आवश्यक.
>> सर्व अटींनुसार कार्यक्रम केल्याचे परिपूर्ती पत्र सादर करण्याचे बंधन.
>> गायन, कवितावाचन, व्याख्यानांना परवानगी; पण ऑर्क्रेस्ट्राला परवानगी नाही
>> राजकीय पक्षांच्या कार्यक्रमांना उद्यानात बंदी
>> हायकोर्ट, एनजीटीनी दिलेली आवाजाची बंधने पाळावी लागणार
>> उद्यानाचे नुकसान होणार नाही, याची जबाबदारी आयोजक संस्थेवर
>> कार्यक्रम संपल्यावर उद्यानाची स्वच्छताही संस्थेनेच करावी
>> शांतता क्षेत्रात येणाऱ्या उद्यानांमध्ये कार्यक्रमाला परवानगी नाही

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

धर्मादाय आयुक्तालयाचे होणार ‘डिजिटायझेशन’

0
0

घरबसल्या पाहायला मिळणार विविध संस्थांची ऑनलाइन माहिती

Mustafa.Attar@timesgroup.com

शहरात कोणत्या शिक्षणसंस्था, सामाजिक तसेच धार्मिक संस्थांबरोबर हॉस्पिटलच्या माहितीचे 'डिजिटायझेशन' करण्यात येत आहे. धर्मादाय आयुक्तालयाच्या अंतर्गत कोणत्या हॉस्पिटलमध्ये गरिबांसाठी बेड राखीव आहेत का याची माहितीही आता घरबसल्या पाहायला मिळणार आहे. विविध प्रकारच्या संस्थांची माहिती 'ऑनलाइन' मिळणार असल्याने एकप्रकारे विविध संस्थांच्या कारभारावर अंकुश वाढणार आहे.

राज्यात विविध ठिकाणी धर्मादाय सहआयुक्त कार्यालये आहेत. पुण्याच्या धर्मादाय सहआयुक्तालयांतर्गत पुणे, सातारा आणि नगर अशा तीन जिल्ह्यांतील संस्थावर अंकुश ठेवण्यात येते. शैक्षणिक, सामाजिक, धार्मिक तसेच हॉस्पिटलसह लहान मोठ्या विविध प्रकारच्या संस्था संघटनांची एकट्या पुणे शहर, पिंपरी चिंचवड तसेच जिल्ह्यात एकत्रित संख्या ७० हजार एवढी आहे. सातारा आणि नगर जिल्ह्यांमध्ये तीस हजार संस्था कार्यरत आहेत. याचाच अर्थ पुणे विभागात एक लाखापेक्षा अधिक संस्था कार्यरत आहेत.

'राज्यातील सर्व धर्मादाय सहआयुक्तालयातील संस्थांच्या फाइल्स, कागदपत्रांचे डिजिटायझेशनची मोहीम हाती घेण्यात आली आहे. त्या मोहिमेंतर्गत पुणे विभागाच्या कार्यालयातील सुमारे एक लाखांहून अधिक संस्थांच्या फाइल्सच्या कागदपत्रांचे धर्मादाय सहआयुक्त शिवकुमार डिगे यांच्या पुढाकाराने डिजिटायझेशनचे काम वेगाने सुरु आहे. विविध संस्थांच्या कागदपत्रांच्या स्कॅनिंगचे काम सध्या सुरू आहे. धर्मादाय आयुक्तलय कार्यालयाचे डिजिटायझेशन झाल्यानंतर नागरिकांना घरबसल्या शैक्षणिक, धार्मिक, सामाजिक संस्थांची ऑनलाइन माहिती उपलब्ध होणार आहे. त्याशिवाय घरातच धर्मादाय योजनेखाली असलेल्या हॉस्पिटलमधील गरिबांसाठी राखीव बेड्स किती आहेत याची देखील माहिती एका ''क्लिक''वर कळू शकणार आहे,' अशी माहिती पुण्याच्या धर्मादाय आयुक्तालयातील सूत्रांनी ''मटा''ला दिली.

माहिती अधिकार कार्यकर्त्यांचे काम सोपे

विविध संस्थांच्या कागदपत्रांचे डिजिटायझेशन झाल्यास संस्थांच्या कारभारातील पारदर्शकता वाढण्यास मदत होणार आहे. कोणत्याही शिक्षणसंस्थांपासून ते धार्मिक संस्थांची माहिती घेण्यासाठी माहिती अधिकार कायद्यातंर्गत (आरटीआय) माहिती मागविण्यात येते. अनेकदा माहिती मागूनही ती देण्यास टाळाटाळ केली जाते. आता धर्मादाय आयुक्तालयाचे डिजिटायझेशन होणार असल्याने वारंवार माहिती मागविण्याची तसदी आता माहिती अधिकार कार्यकर्त्यांना घ्यावी लागणार नाही. त्यामुळे 'आरटीआय' कार्यकर्त्यांचे अर्ज प्रलंबित राहणार नाही. यामुळे त्यांचे काम खूपच सोपे झाले आहे. धर्मादाय आयुक्तालयाबरोबर विश्वस्तांवर नागरिकांचा देखील वचक राहण्यास मदत होणार आहे.
.....

पुण्याच्या धर्मादाय आयुक्तालयात कागदपत्रांचे स्कॅनिंग होणार आहे. संस्थांच्या विविध प्रकारच्या माहितीचे डिजिटायझेशनमुळे पक्षकारांसह वकिलांना फायदा होणार आहे.
अॅड. दिलीप हांडे

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


हरित लवादाने ओढले महापालिकेवर ताशेरे

0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

एक दिवस तरी शास्त्रीय पद्धतीने तुम्ही कचरा व्यवस्थापन केले आहे का, असा थेट सवाल उपस्थित करीत हरित न्यायाधिकरणाने महापालिकेच्या कारभारावर ताशेरे ओढले. कचरा डेपोसाठी महापालिकेने तीन ठिकाणी नवीन जागा घेतल्या असल्याचे प्रतिज्ञापत्रात लिहिले असले तरी पुरावे त्यांचे दाखविण्यास वकील असमर्थ ठरले. त्यामुळे जिल्हाधिकारी अथवा त्यांच्या वकिलांनी बुधवारी या व्यवहाराचे सर्व पुरावे सादर करावे, असे आदेश न्यायधिकारणाने दिले.

उरळी देवाची येथील कचऱ्यासंदर्भात सुरू असलेल्या याचिकेबद्दल न्यायाधिकरणाने महापालिकेची बाजू ऐकून घेतली. महापालिकेच्या पदाधिकाऱ्यांनी उरळी देवाची येथील कचऱ्याची सद्यस्थिती मांडणाऱे प्रतिज्ञापत्र गेल्या आठवड्यात सादर केले होते. त्याबद्दल महापालिकेचे वकील पी. नारायणन यांनी बाजू मांडली. याचिकाकर्त्यांचे वकील असीम सरोदे यांनी या वेळी प्रतिज्ञापत्रकांतील माहितीवर आक्षेप घेऊन अनेक शंका उपस्थित केल्या.

उरळी देवाची येथील कचराडेपोमध्ये शास्त्रीय पद्धतीने कचरा व्यवस्थापन होत असल्याचे अहवालात नमूद केले असले तरी प्रत्यक्षात एक दिवस तरी हे काम तुम्ही केले आहे का, असा प्रश्न न्यायमूर्ती विकास किनगावकर आणि डॉ. अजय देशपांडे यांनी उपस्थित केला. महापालिकेच्या कारभारावरही आक्षेप घेण्यात आला.

'कचरा व्यवस्थापनासाठी राज्य शासन आणि महापालिकेने तुळापूर, वढू आणि शिंदेवाडी या जागा निश्चित केल्या असून, जागा ताब्यात घेण्यासाठी दोन कोटी रुपये रक्कमही भरली आहे. मात्र गावकऱ्यांकडून यास विरोध होतो आहे,' असे नारायणन् यांनी सांगितले. 'या जागेचे व्यवहार झाल्याचे पुरावे दाखवा,' अशी सरोदे यांनी मागणी केल्यावर ते पुरावे दाखवू शकले नाहीत. न्यायाधिकरण उद्या सरकारतर्फे जिल्हाधिकाऱ्यांची बाजू ऐकून घेणार आहे. स्वतः जिल्हाधिकारी अथवा त्यांच्या वकीलांनी नवीन कचरा डेपोसंदर्भात झालेल्या आर्थिक व्यवहारांचे पुरावे सादर करावेत, असे आदेश न्यायाधिकरणाने दिले आहेत.

कचरा डेपोची अवस्था बिकट

महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने उरळी देवाची येथील कचरा डेपोची सलग चार दिवस पाहणी करून सद्यस्थिती अहवाल न्यायाधिकरणासमोर सादर केला आहे. या डेपोवर वर्गीकरण न करता कचरा फेकला जात असून प्लॅस्टिकचा कचरा देखील थेट डेपोमध्ये जमा होतो आहे. कचरा डेपोचे कॅपिंगचे काम अवघे वीस टक्के पूर्ण झाले असून, डेपोची अवस्था एकूणच बिकट आहे असे या अहवालामध्ये नमूद करण्यात आले आहे, अशी माहिती असीम सरोदे यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पुणे मॅरेथॉनसाठी ललिता बाबर ‘ब्रँड अॅम्बेसेडर’

0
0

प्रवेशिका स्वीकारण्यास सुरुवात

म. टा. प्रतिनिधी, पुणे

यंदाची ३०वी पुणे आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन ६ डिसेंबरला होणार असून, या मॅरेथॉनची ब्रँड अॅम्बेसेडर म्हणून आंतरराष्ट्रीय धावपटू ललिता बाबरची निवड करण्यात आली आहे. या मॅरेथॉनसाठी प्रवेशिका स्विकारण्यास मंगळवारपासून सुरुवात झाली.

महाराष्ट्राची ललिता बाबर पुढील वर्षीच्या रिओ ऑलिम्पिकसाठी पात्र ठरली आहे. या मॅरेथॉनच्या माध्यमातून तिला आर्थिक मदतही केली जाणार आहे. यापुढील काळात ऑलिम्पिकच्या दृष्टीने तयारी करणाऱ्या खेळाडूंना मॅरेथॉनच्या माध्यमातून मदत केली जाणार असल्याचे स्पर्धेचे संयोजन सचिव प्रल्हाद सावंत यांनी सांगितले. या वेळी महाराष्ट्र अॅथलेटिक्स असोसिएशनचे उपाध्यक्ष अभय छाजेड उपस्थित होते. सावंत म्हणाले, 'यंदाच्या मॅरेथॉनसाठी नवीन मार्ग नियोजित करण्यात आला आहे. अर्थात, मॅरेथॉनची सुरुवात खंडोजीबाबा चौकातून होणार आणि समारोप नेहरू स्टेडियममध्ये होणार असल्याचे निश्चित आहे. आंतरराष्ट्रीय अॅथलेटिक्स महासंघाच्या नियमाप्रमाणे पुणे मॅरेथॉन मार्गाची परवानगी गेल्या वर्षी संपली आहे. संयोजकांनी नवीन मार्गाचे नियोजन महासंघाच्या मान्यतेसाठी पाठविले आहे. त्यांचा प्रतिनिधी येत्या काही दिवसांत भारतात दाखल होऊन मार्गाची पाहणी करणार आहे.'

स्पर्धेत पुरुषांसाठी फुल मॅरेथॉन (४२.१९५ किमी), हाफ मॅरेथॉन (२१ किमी) आणि १० किलोमीटर शर्यत; तसेच महिलांसाठी हाफ मॅरेथॉन (२१ किमी) आणि १० किलोमीटरची शर्यत होणार आहे. यंदा प्रथमच केवळ पुणेकरांसाठी ५ किलोमीटर अंतराची शर्यत ठेवण्यात आली आहे. तसेच, ३.५ किलोमीटरची 'चॅरिटी रन', अपंगांसाठी व्हीलचेअर शर्यत, कुमार गटाची शर्यतही होणार आहेत. कुमार व अंपंगांच्या शर्यतीसाठी प्रवेशिका नोव्हेंबर महिन्यात सुरू होतील.

मॅरेथॉनबाबत अधिक माहितीसाठी www.marathonpune.com या वेबसाइटवर किंवा मॅरेथॉन भवन, मित्र मंडळ चौक येथे (०२०-२४४२८३९०) संपर्क साधावा.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

राष्ट्रवादी काँग्रेसची कार्यकारिणी जाहीर

0
0

कार्याध्यक्षपदी शेट्टी, प्रवक्तेपदी शेख

म. टा. प्रतिनिधी, पिंपरी

राष्ट्रवादी काँग्रेसच्या पिंपरी-चिंचवड विभागाची कार्यकारिणी शहराध्यक्ष संजोग वाघेरे-पाटील यांनी जाहीर केली असून मंगळवारी या कार्यकारिणीची सभा झाली. 'महापालिकेच्या २०१७मधील निवडणुकीत पक्षाची एकहाती सत्ता आणून विजयाची हॅट्रिक करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे,' असे वाघेरे-पाटील यांनी सांगितले.

माजी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्याशी चर्चा केल्यानंतर कार्यकारिणी जाहीर करीत असल्याचे वाघेरे-पाटील यांनी स्पष्ट केले. नवीन कार्यकारिणी पुढीलप्रमाणे (कंसात पद) : जगदीश शेट्टी (कार्याध्यक्ष), फजल शेख (प्रवक्ते व सरचिटणीस), अरुण बोऱ्हाडे (मुख्य संघटक सचिव), संजय लंके (खजिनदार), महंमद पानसरे, वैशाली काळभोर, अनुराधा गोफणे, गोरक्ष लोखंडे, डॉ. आत्माराम कांबळेस कृष्णा ठाकूर, दिनेश मूलचंदानी, साहेबराव खरात, सचिन चिंचवडे, दिलीप गोते, प्रभाकर ववले, संतोष वाघेरे, अंकुश पठारे, शशीकिरण गवळी, महेंद्र शर्मा, अजहर खान, अमरजित यादव, आत्माराम ढेरे (उपाध्यक्ष), सुमन नेटके, कविता खराडे, अमोल भोईटे, माधव बिराजदार, श्रीधर कसबे, गोपीचंद जगताप, शशिकांत चौंडीकर, अंकुश नढे, शंकर देसाई, साजिद पठाण, गोरोबा गुजर, विलास भोईर, प्रशांत खुळे, श्रीकांत काटे (सरचिटणीस), दीपाली लांडे, मनोज वाखारे, शहजादी सय्यद, तुकाराम बजबळकर, संग्राम चव्हाण, संजय कुटे, कपिल आगरवाल, सीताराम कुऱ्हाडे, कादंबरी केळशीकर, दिलीप कापसे, नितीन कदम, प्रकाश थोरात, महेश झपके (चिटणीस).

संघटक सचिव - श्रीधर वाल्हेकर (चिंचवड विधानसभा), नीलेश पांढरकर (पिंपरी विधानसभा), विजय लोखंडे (भोसरी विधानसभा). ब्लॉक अध्यक्ष - रामभाऊ तावरे (आकुर्डी-प्राधिकरण), सुनील जाधव (संभाजीनगर-काळभोरनगर), संजय अवसरमल (पिंपरीनगर, मोरवाडी, संत तुकारामनगर), राजू बनसोडे (पिंपरी वाघेरे, दापोडी, बोपखेल), पंकज थोरात (चिंचवड, किवळे), प्रल्हाद गुजर (काळेवाडी, थेरगाव, ताथवडे, पुनावळे), रमेश नखाते (वाकड, रहाटणी, पिंपळे सौदागर), राजेंद्र पाटील (पिंपळे गुरव, सांगवी), सलीम अत्तार (निगडी, तळवडे), प्रवीण काळजे (चिखली, मोशी, चऱ्होली), दीपक साकोरे (मासुळकर कॉलनी, नेहरूनगर), भानुदास फुगे (भोसरी, दिघी).

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

एसटी बुकिंगला अत्यल्प प्रतिसाद

0
0

म. टा. प्रतिसाद, पुणे

राज्य परिवहन महामंडळाने (एसटी) दिवाळी निमित्त जादा गाड्या उपलब्ध करून दिल्यानंतर सात दिवसातच नागपूर, अमरावतीच्या १३ गाड्यांचे शंभर टक्के बुकिंग झाले आहे. मात्र, आरक्षणासाठी उपलब्ध असलेल्या एकूण ९३२ गाड्यांपैकी ९२१ गाड्यांच्या आरक्षणाला सध्या अत्यल्प प्रतिसाद मिळत आहे. दिवाळीसाठी आणखी १२ दिवस बाकी असल्याने पुढच्या आठवड्यात बुकिंगचे प्रमाण वाढण्याची शक्यता आहे.

एसटीने २१५० जादा गाड्यांचे नियोजन केले आहे. त्यापैकी ९३२ गाड्या आरक्षणासाठी उपलब्ध करून दिल्या आहेत. मात्र, दिवाळीसाठी अजून १२ दिवस शिल्लक असल्याने आरक्षणाला म्हणावा प्रतिसाद मिळालेला नाही. लातूर, संभाजीनगर, भुसावळ, धुळे, अकोला, बुलढाणा, जळगाव आदी गाड्यांची आरक्षणेही उपलब्ध आहेत.

'कर्मचाऱ्यांना सुटी आणि बोनस मिळण्याची प्रतीक्षा असल्याने आरक्षणावर परिणाम झाल्याचे सांगण्यात येत आहे. पर्यायाने अनेक प्रवाशांनी आरक्षण करणे पुढे ढकलले आहे. त्यामुळे सध्या ९३२ आरक्षित गाड्यांपैकी फक्त १३ गाड्यांचे आरक्षणच झाले आहे. मात्र, ऐन दिवाळीच्या तोंडावर प्रवशांनी संख्या अचानक वाढते. अचानक वाढलेल्या प्रवशांमुळे एसटीच्या गाड्यांवर अतिरिक्त भार येतो. प्रवाशांनी आरक्षणासाठी विलंब केल्यास ऐन वेळेस प्रवशांना आरक्षित जागा मिळणार नाही,' असे एसटीचे विभागीय वाहतूक अधिकारी शिवाजी भोईर यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कैद्यांना वायरिंगचे काम

0
0

राज्यातील पहिलाच प्रकल्प येरवडा जेलमध्ये

म. टा. प्रतिनिधी, पुणे

महिंद्रा कंपनीच्या मोटारींच्या वायरिंगचे भाग आता येरवडा जेलमधील कैदी तयार करणार आहेत. कैद्यांना रोजगारासाठी उद्योगाच्या साह्याने आधुनिक वायरिंग जॉब युनिट सुरू करणारे येरवडा हे राज्यातील पहिले जेल ठरले आहे.

जेलमधील कैद्यांना रोजगार देण्यासाठी अशोक मिंडा ग्रुपकडून येरवडा जेलमध्ये मॉडर्न टेक्नॉलॉजीचे 'वायरिंग हार्नेस असेम्बली युनिट' सुरू करण्यात आले आहे.

या युनिटमध्ये कैद्यांनी तयार केलेली वायर महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीकडून त्यांच्या मोटारीसाठी खरेदी करण्यात येणार आहे. या युनिटचे उद‍्घाटन कारागृहाचे प्रमुख आणि अतिरिक्त पोलिस महासंचालक भूषणकुमार उपाध्याय यांच्या हस्ते मंगळवारी झाले. जेलचे उपमहानिरीक्षक डॉ. शहाजी सोळुंके, स्वाती साठे, येरवडा जेलचे अधीक्षक यू. टी. पवार, मिंडा ग्रपुचे मुख्य मार्केटिंग अधिकारी एन. के. तनेजा, महिंद्रा अॅन्ड महिंद्राचे उपाध्यक्ष नितीन टिकले उपस्थित होते.

'अशोक मिंडा ग्रुपच्या पुढाकारातून हे युनिट सुरू करण्यात आले आहे. येथे तयार झालेली वायर महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीच्या बोलोरे मोटारीसाठी खरेदी केली जात आहे. या युनिटमुळे जेलमधील तीस कैद्यांच्या हाताला काम मिळाले आहे. त्यांना प्रतिदिन ५५ रुपये रोजगार मिळणार आहे. दिवसाला ऐंशी युनिट वायर यामधून तयार होणार आहे. लवकरच अशा प्रकारचे युनिट नागपूर जेलमध्ये सुरू करण्यात येणार आहे,' असे उपाध्याय यांनी संगितले.

'परिस्थितीमुळे माणूस वाईट वागतो आणि त्याला जेलमध्ये यावे लागते. अशा कैद्यांच्या पुर्नवसनासाठी कलागुणांना वाव देऊन त्यांना मुख्य प्रवाहात आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. शिक्षा झालेल्या ९० टक्के कैद्यांना सध्या काम दिले जाते. शिक्षा भोगून बाहेर पडल्यानंतर चांगल्या व्यक्ती म्हणून समाजात सहभागी होतील, या दृष्टीने प्रशासनाकडून काम सुरू आहे. या युनिटमध्ये काम करणाऱ्या कैद्यांना बाहेर पडल्यानंतर काम मिळणार आहे. पोलिसांपेक्षा जेलमधील कर्मचाऱ्यांना जास्त काम करावे लागते. हे काम जेलचे कर्मचारी चोखपणे करीत आहेत,' असे उपाध्याय यांनी स्पष्ट केले.

टिकले म्हणाले, 'जेलमध्ये युनिट सुरू झाल्यापासून कंपनीकडून ही वायर खरेदी केली जाते. या वायरची गुणवत्ता ही बाहेरून खरेदी केलेल्या वायरपेक्षा अधिक चांगली आहे.'

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images