Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

जन्मदात्यांना दिलासा

$
0
0

मुलांनी दरमहा पाच हजार पोटगी व फ्लॅट देण्याचा निर्णय

Dhananjay.Jadhav@timesgroup.com

पुणे : वयोवृद्ध वडील आणि अर्धांगवायूमुळे अपंगत्व आलेल्या मातेचा सांभाळ न करणाऱ्या त्यांच्या दोन मुलांना अपर जिल्हाधिकाऱ्यांच्या कोर्टाने त्यांच्या जबाबदारीची जाणीव करून देताना, दरमहा पाच हजार रुपये पोटगी व राहण्यासाठी तहहयात फ्लॅट देण्याचा निकाल दिला आहे.

पोटगीपोटी दर महिन्याच्या पाच तारखेपर्यंत आई-वडिलांच्या संयुक्त बँक खात्यात रक्कम जमा न केल्यास आणि रास्ता पेठेतील फ्लॅटचा ताबा देण्यास दोन महिन्यांपेक्षा अधिक विलंब लावल्यास फौजदारी कारवाई करण्याचाही अंतर्भाव या निकालात करण्यात आला आहे.

रावसाहेब शिंदे व त्यांची अपंग पत्नी आनंदी शिंदे (नावे बदलली आहेत) यांनी आपल्या दोन मुलांविरोधात अपर जिल्हाधिकारी प्रदीप पाटील यांच्या कोर्टात अपील केले होते. रावसाहेब यांना अनिल व सुनील (नावे बदलली आहेत) ही दोन मुले आहेत. आपली दोन्ही मुले आपला व्यवस्थित सांभाळ न करता शारीरिक व मानसिक त्रास देतात. त्यामुळे 'आई-वडील व ज्येष्ठ नागरिक चरितार्थ व कल्याणकारी अधिनियम २००७'च्या कलम १५ अन्वये त्यांनी कायद्याने आपल्याला आधार देण्याची विनंती कोर्टासमोर केली होती.

शिंदे यांच्या अर्जाच्या आधारे कोर्टाने दोन्ही मुलांना नोटीस बजावली; मात्र नोटिशीला त्यांनी प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे त्यांना कोर्टात हजर राहण्यासाठी पोलिसांमार्फत समन्स बजावण्यात आले. या समन्सनंतर अनिल व सुनील ही दोन्ही मुले सुनावणीसाठी हजर राहिली. या सुनावणीमध्ये दोन्ही बाजू मांडल्या गेल्यानंतर आई-वडील आणि मुलांचे समुपदेशनही करण्यात आले. या समुपदेशनामध्ये रावसाहेब यांचा ज्येष्ठ मुलगा अनिल याने आई-वडिलांना मानसिक आधार देऊन सांभाळ करण्याची तयारी दर्शवली. हा समझोता रावसाहेब व त्यांची पत्नी आनंदी यांनी मान्य केला; मात्र त्यांचा कनिष्ठ मुलगा सुनील याचा प्रतिसाद प्रतिकूल राहिला.

अखेर, जन्मदात्या आई-वडिलांचा सांभाळ करत नसल्याने सुनील यांना आई-वडिलांना पोटगी देण्याचा निकाल अपर जिल्हाधिकारी पाटील यांनी दिला. त्यात सुनील यांनी एक ऑगस्ट १४ ते ३० सप्टेंबर १५ या कालावधीसाठी पोटगी म्हणून ७० हजार रुपये द्यावेत. तसेच दरमहा पाच हजार रुपये आई-वडिलांच्या संयुक्त बँक खात्यात जमा करावेत आणि रास्ता पेठेतील त्यांच्या ताब्यातील फ्लॅट आई-वडिलांना राहण्यासाठी देण्यात यावा, असेही निकालपत्रात स्पष्ट करण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


​येळकोट येळकोट जयमल्हार !

$
0
0

येळकोट येळकोट जयमल्हार ! सदानंदाचा येळकोट... असा जयघोष करीत जेजुरी गडावर सोमवती अमावास्येला राज्यभरातून लाखो भाविकांनी गर्दी केली होती. लाखो भक्तांनी या वेळी भंडारा-खोबऱ्याची उधळण केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पिंपरी सांडस ग्रामस्थांचा जागामोजणीस विरोध

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

कचऱ्यावर प्रक्रिया करणारा प्रकल्प उभारण्यासाठी पिंपरी सांडस येथील वनखात्याच्या जागेची मोजणी करण्यास ग्रामस्थांनी विरोध केल्याने जिल्हा प्रशासनाला सोमवारी हात हलवत परत यावे लागले. या भागातील जिल्हा परिषद सदस्यांसह लोकप्रतिनिधींनी ही जागा कचरा प्रकल्पाला देण्यासाठी विरोध केल्याने जिल्हा प्रशासनापुढे आव्हान उभे राहिले आहे.

केंद्रीय पर्यावरण राज्यमंत्री प्रकाश जावडेकर यांनी महापालिकेला कचरा प्रकल्प उभारण्यासाठी पिंपरी सांडस येथील वनविभागाची काही जागा देण्याची तयारी दाखविली होती. त्यासाठी पालिकेने काही कोटी रुपयांचे शुल्कही जिल्हा प्रशासनाकडे भरले आहे. या जागेची मोजणी करण्यासाठी महापालिका आणि जिल्हा प्रशासनातील अधिकारी सोमवारी गेले असता स्थानिकांनी मोजणी करण्यास विरोध केला. त्यामुळे हा प्रकल्प रखडणार असल्याचे समोर आले आहे.

दरम्यान, उरुळी देवाची येथील कचराडेपोत कचरा टाकण्याबाबत राष्ट्रीय हरित लवादासमोर (एनजीटी) सुरू असलेल्या याचिकेवर अंतिम सुनावणी येत्या २६ ऑक्टोबरला होणार आहे. कचरा व्यवस्थापनासाठी तातडीची गरज म्हणून नवीन जागा शोधण्याचे काम जिल्हाधिकाऱ्यांनी त्वरित करावे. भूमी अधिग्रहण कायद्यातील तरतुदींचा वापर करून या जागा घ्याव्यात, अशा सूचना लवादाने दिल्या. लवादाच्या निर्णयाची माहिती माध्यमांना देताना काळजी घेण्याच्या सूचनाही एनजीटीने पालिकेला केल्या.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कर आकारणीसाठी ‘राष्ट्रवादी’चा मोर्चा

$
0
0

पुणेः कर आकारणी बंद असल्याने जिल्ह्यातील ग्रामपंचायती आर्थिक अडचणीत सापडल्या असून, या कर आकारणीविषयी तातडीने निर्णय घेण्याच्या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला.

जिल्ह्यातील ग्रामपंचायतींची कर आकारणी एप्रिल महिन्यापासून बंद आहे. ही कर आकारणी चौरस फुटांप्रमाणे करण्याविरोधात हायकोर्टात याचिका दाखल झाली आहे. त्यात हायकोर्टाने या कर आकारणीला स्थगिती दिली आहे. परिणामी, गेल्या पाच महिन्यांपासून ग्रामपंचायतींमध्ये कर आकारणी झालेली नाही.

कराच्या माध्यमातून ग्रामपंचायतींचा कारभार चालतो. हा कर गोळा करण्याचे काम बंद झाल्यामुळे जिल्ह्यातील १४०५ ग्रामपंचायती आर्थिक अडचणीत आल्या आहेत. कर्मचाऱ्यांच्या वेतनापासून विकास कामांपर्यंत खोळंबा झाला आहे. ग्रामपंचायतींकडे निधी नसल्याने पथदिव्यांची बिले भरता आलेली नाहीत. त्यामुळे आता गावांमधील पिण्याच्या पाण्याच्या योजनाही बंद झाल्या आहेत. ग्रामपंचायतींच्या करांबाबत राज्य सरकारने तातडीने निर्णय घ्यावा आणि तोपर्यंत कोणत्याही गावांचे वीज कनेक्शन तोडू नये अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष जालिंदर कामठे यांनी केली असून, त्याविरोधात जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. या मोर्चामध्ये मुळशीचे तालुकाध्यक्ष सुनिल चांदेरे, बारामतीचे तालुकाध्यक्ष संभाजीनाना होळकर, शिरूरचे प्रकाश पवार यांच्यासह अन्य पदाधिकारी सहभागी झाले होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वाइन शॉपमध्ये तोडफोड

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पिंपरी

नगरसेवकाच्या मालकीच्या वाइन दुकानातून मुदत संपलेली वाइनची बाटली दिली गेल्याचे कारण सांगून ग्राहकाने दुकानाची तोडफोड करून सोने चोरले. पिंपळे-सौदागर येथे नुकतीच ही घटना घडली. शशी गुरुबक्ष पहलाणी (२९, रा. लिंक रोड, पिंपरी) यांनी फिर्याद दिली आहे. या प्रकरणी सचिन यादव (रा. डेअरी फार्म, पिंपरी) व त्याच्या दोन साथीदारांविरोधात सांगवी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नगरसेवक गुरुबक्ष पहलाणी यांच्या मालकीचे विनगेट वाइन नावाचे दुकान आहे. शनिवारी सचिन व त्याचे दोन साथीदार तेथे आले आणि त्यांनी वाइन शॉपमधून घेतलेल्या वाइनच्या बाटलीची एक्स्पायरी डेट संपली असल्याचे सांगून शशी पहलाणी यांच्याबरोबर वाद घातला. दुकानातील शोकेस व बाटल्या फोडून सुमारे ४० हजार रुपयांचे नुकसान केले. या वेळी सचिन व त्याच्या साथीदारांनी पहलाणी यांच्या हातातील ब्रेसलेट व रोख पैसे असा ३५ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला. सहायक पोलिस निरीक्षक एम. पी. सोनवणे तपास करत आहेत.

कार्यालयाची तोडफोड

राष्ट्रवादी काँग्रेसचे नवनिर्वाचित प्रभाग अध्यक्ष आशुतोष नखाते यांच्या रहाटणी-नखाते वस्ती येथील कार्यालयाची अज्ञातांनी तोडफोड केली. रविवारी रात्री दहाच्या सुमारास ही घटना घडली. नखाते यांच्या कार्यकर्त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, रहाटणी येथील नखाते वस्ती भागाचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रभाग अध्यक्ष आशुतोष नखाते यांचे जनसंपर्क कार्यालय आहे. रविवारी रात्री दहाच्या सुमारास मोटारसायकलीवरून आलेल्या १२ ते १३ अज्ञात सशस्त्र हल्लेखोरांनी नखाते यांच्या कार्यालयात घुसून कार्यालयाची प्रचंड मोठ्या प्रमाणात तोडफोड केली. या घटनेनंतर वाकड पोलिस ठाण्याच्या पथकाने घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेनंतर परिसरात पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कत्तलखान्याला स्थगिती

$
0
0

नगरविकास खात्याचे पिंपरी महापालिकेला पत्र

म. टा. प्रतिनिधी, पिंपरी

डाल्को कंपनीच्या जागेत कत्तलखाना उभारण्यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेने केलेल्या जागा फेरबदलाच्या कार्यवाहीला राज्याच्या नगरविकास विभागाने तात्पुरती स्थगिती दिली आहे. त्यामुळे महापालिकेच्या भूमिकेला चपराक बसली आहे.

गेल्या अनेक वर्षांपासून पिंपरीतील इंदिरा गांधी रेल्वे उड्डाणपुलाखाली कत्तलखाना चालू होता. त्याला अनेक संस्था, संघटना आणि विविध पक्षांनी विरोध दर्शवला. त्यामुळे कत्तलखाना बंद करण्यात आला; मात्र वाढत्या नागरीकरणामुळे पर्यायी व्यवस्था निर्माण होणे गरजेचे होते. त्यासाठी कत्तलखाना पिंपरीतील डाल्को कंपनीच्या जागेत उभारण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला. परंतु त्यालाही विरोध झाला. तरीही राष्ट्रवादी काँग्रेसची एकहाती सत्ता असलेल्या 'सर्व्हे क्रमांक २०२'मधील डाल्को कंपनीच्या औद्योगिक क्षेत्राची जागा निवडण्यात आली. त्यापूर्वी फेरबदलाची प्रक्रिया राबवणे आवश्यक होते.

त्यानुसार औद्योगिक क्षेत्रातील जागा महापालिकेच्या उपयोगात आणण्याचा प्रस्ताव सर्वसाधारण सभेने मंजूर केला. तो मंजुरीसाठी राज्य सरकारकडे पाठवण्यात आला. त्याला १२ मार्च २०१५ रोजी मंजुरी मिळाली; मात्र या प्रस्तावित कत्तलखान्याला आमदार लक्ष्मण जगताप यांच्यासह शहरातील संस्था, संघटना आणि राजकीय पक्षांनी कायम विरोध केला. कत्तलखाना मंजूर करू नये, या मागणीसाठी जगताप यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठपुरावा चालू ठेवला. महापालिकेनेही डाल्को कंपनीच्या जागेतच कत्तलखाना उभारण्याची भूमिका कायम ठेवली. तसेच 'मांस प्रक्रिया केंद्र' नावाने २५ कोटी रुपये खर्चून अत्याधुनिक कत्तलखाना उभारण्यासाठी निविदा प्रक्रियेलाही सुरुवात केली. परंतु नागरिकांचा विरोध डावलून कत्तलखाना उभारण्याच्या प्रयत्नांना खीळ बसली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शौचालय पाडण्याच्या मुद्द्यावरून राजकारण

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, येरवडा

धानोरीतील श्रमिकनगर भागात नागरिकांच्या सोईसाठी उभारलेल्या शौचालयाचा वापर होत नसल्याने ते तातडीने पाडण्यात यावे, अशी मागणी स्थानिक नगरसेविका रेखा टिंगरे आणि अखिल भारतीय छावा संघटनेने पालिका आयुक्तांकडे केली आहे. मात्र शौचालय पाडण्याची मागणी पहिल्यांदा कोणी केली यावरून राजकारण सुरू झाले आहे.

धानोरीतील नागरिकांच्या सोयीसाठी श्रमिकनगर भागात शौचालय उभारण्यात आले. कालांतराने अस्वच्छतेमुळे नागरिकांनी शौचालयाचा वापर बंद केला. शौचालय बंद असल्याने परिसरात दुर्गंधी पसरत आहे. हे शौचालय रस्त्याचा कडेला असल्याने अनेक लहान मोठे अपघात होऊ लागले आहेत, असा दावा केला जात आहे.

नगरसेविका रेखा टिंगरे याबाबत म्हणाल्या, 'श्रमिकनगरमधील शौचालयामुळे अनके लहान मोठे अपघात होत आहेत. त्यामुळे ते पाडण्यात यावे अशी मागणी पालिकेकडे केली होती. त्यानुसार मागील वर्षी महिला व बाल कल्याण समितीने मागणी मंजूर करून शौचालय जमीनदोस्त करण्याची परवानगी दिली. पण येरवडा क्षेत्रीय कार्यालयाकडून शौचालय पाडण्यास विलंब होत आहे. त्यामुळे २८ तारखेला पालिकेसमोर आंदोलन केले जाणार आहे. अखिल भारतीय छावा संघटनेचे कार्यकर्ते शौचालय पाडण्याचे निवेदन देण्यासाठी आले होते. त्यावेळी मी बाहेर असल्याने निवेदन स्वीकारले नसेल. त्यामुळे गैरसमज निर्माण झाला. मात्र शौचालय पाडण्याची कागदोपत्री प्रक्रिया आधीच पूर्ण झाली आहे.'

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महापालिकेविरोधात हायकोर्टात याचिका

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औंध

बाणेर-बालेवाडी येथील पाणी समस्या, तसेच रखडलेली विकास कामांच्याविरोधात अमोल बालवडकर यांनी हायकोर्टात जनहित याचिका दाखल केली आहे. बाणेर-बालेवाडी गावांचा पालिकेत समावेश होऊन १५ वर्षे होऊनही सुविधा निर्माण करण्यास पालिका उदासीन आहे.

परिसरात अनेक सोसायट्यांना अपुरा पाणी पुरवठा होत होता. कोट्यावधी रुपयांची कामे करूनही पाणी प्रश्न अद्याप सुटला नाही. आधीच पाणी पुरवठा कमी असताना आता या भागात पालिकेने पाणी कपात लागू केली आहे. त्यामुळे अवघा ३० टक्केच पाणी पुरवठा होत आहे. पाणी पुरवठ्याच्या असमान वाटपाचा फटका या परिसराला बसला आहे. काही सोसायट्यांना लाखो रुपये महिन्याला टँकरवर खर्च करावे लागत आहेत. टँकर विकत घेणाऱ्या सोसायट्यांना पालिकेचा कर माफ करण्यात यावा, अशी मागणी देखील याचिकेत करण्यात आली आहे.

बाणेर-बालेवाडीमध्ये पालिकेने रस्ते, ड्रेनेज, भाजी मंडई, क्रीडांगण, बगीचा, आग्निशामक यंत्रणा आशा कोणत्याही सुविधा परिसरात दिलेल्या नाहीत. यामुळे कोट्यावधीचा कर वसूल करूनही पालिका सुविधा देत नसल्याने पालिकेच्या विरोधात थेट हायकोर्टात ही याचिका दाखल करण्यात आली आहे.

अमोल बालवडकर याबाबत म्हणाले, 'पाणी पुरवठा अपुरा असणाऱ्या ठिकाणी पुन्हा पाणी कपात लागू करण्यात आली आहे. त्यातून पालिका नागरिकांना सुविधांपासून वंचित ठेवत आहे. गेल्या १२ वर्षांत पालिकेने या परिसरात दहा टक्क्यांहून कमी रस्ते निर्माण केले असून अनेक रस्ते अपुरे आहेत. कोट्यावधीचा महसूल गोळा करून सुविधा निर्माण झाल्या नसल्याने ही जनहित याचिका दाखल केली आहे.'

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


गुन्ह्यांचा ‘व्हायरस’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

बनावट कंपन्या स्थापन करून जादा व्याजाचे आमिष दाखवणे, शेअर बाजाराच्या नावाने ठेवी गोळा करणे अशा विविध कारणावरून शहरालगचा भाग आणि जिल्ह्यात फसवणुकीच्या घटना वाढत आहेत. बनावट कंपन्यांमध्ये, लकी ड्रॉ स्कीममध्ये आणि जादा व्याजदर देण्याचे आमिष दाखविणाऱ्या कंपन्यामध्ये नागरिकांनी गुंतवणुक करू नये. तसेच, मोठे आर्थिक व्यवहार करताना नागरिकांनी वकील अथवा त्या क्षेत्रातील तज्ज्ञ व्यक्तीचा सल्ला घ्यावा, असे आवाहन पोलिस अधीक्षक डॉ. जय जाधव यांनी केले आहे.

पुणे शहर परिसरात आणि जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात शहरीकरण, औद्योगिकीकरण होत असून त्यामुळे जमिनीचे भाव वाढत आहेत. त्याचा फायदा काही गुंड प्रवृत्तीचे लोक घेत असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले आहे. त्यामुळे जमीन अथवा फ्लॅट खरेदी करताना नागरिकांनी तज्ज्ञ व्यक्ती किंवा वकिलांचा सल्ला घ्यावा. काही लोकांनी बनावट कंपन्यांची स्थापना केली आहे. या कंपन्यांव्दारे मोठ्या रक्कमेच्या परताव्याचे अमिष दाखवून फसवणूक होऊ शकते. तसेच, शेअर बाजाराच्या नावाखाली ठेवी गोळा करण्याचे प्रकार शिक्रापूर, यवत, लोणीकाळभोर, देहूरोड आणि इतर ठिकाणी घडले आहेत. इंदापूर, आळेफाटा पोलिस ठाण्याच्या हद्दीमध्ये लकी ड्रॉ स्कीम राबवून काही नागरिकांची फसवणूक झाल्याचे समोर आले आहे.

एखादी स्कीम राबवून नागरिकांकडून हप्ते गोळा करायचे, त्यांना सुरुवातीच्या काळात चांगला परतावा द्यायचा, नंतर स्कीम बंद करून जायचे, अशा पद्धतीने काही नागरिकांची लाखो रुपयांची फसवणूक केल्याच्या घटना आहेत. नागरिकांनी कोणत्याही लकी ड्रॉ स्कीममध्ये गुंतवणुक करू नये, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.

'सायबर' गुन्हे टाळण्यासाठी

नागरिकांची फसवणूक होवू नये म्हणून ग्रामीण पोलिसांकडून जनजागृती मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. अलिकडच्या काळात पुणे शहराजवळील भाग व जिल्ह्यात सायबर गुन्हेगारी वाढली आहे. डेबिट, क्रेडिट कार्डच्या पीन नंबरचा वापर करून, ऑनलाइन बँकिंगव्दारे खातेदारांची फसवणूक करण्याच्या घटना घडत आहेत. अशा घटनांना आळा घालण्यासाठी नागरिकांनी महत्त्वाचे ऑनलाइन व्यवहार सार्वजनिक सायबर कॅफेत करू नयेत, हॉटेल, पेट्रोल पंप, मॉल आदी ठिकाणी डेबिट आणि क्रेडिट कार्ड स्वतः स्वाइप करावे, खात्याचा पासवर्ड कोणालाही देवू नये, फोनद्वारे कोणालाच बँक खाते आणि एटीएम कार्डचे पासवर्ड देवू नयेत, असे पोलिसांकडून सांगण्यात आले आहेत. सोशल मीडियाचा वापर करताना नागरिकांनी काळजी घेण्याची गरज आहे. धार्मिक तेढ निर्माण होईल, असे मजकूर, फोटो, व्हिडीओ क्लिप्स सोशल मीडियावर अपलोड करू नये. अश्लील फोटो, व्हिडीओ तयार करून पोस्ट करणे, लाइक करणे, शेअर करणे, त्यावर कॅमेंट करणे अशी कृती करणाऱ्याविरुध्द गुन्हा दाखल होऊ शकतो.

पोलिस ठाण्यात जनजागृती मोहीम

ग्रामीण पोलिसांकडून आयोजित केलेल्या जनजागृती मेळाव्यात पोलिस अधीक्षक डॉ. जय जाधव हे मार्गदर्शन करणार आहेत. १६ ऑक्टोबरला सकाळी १० वाजता लोणीकाळभोर, दुपारी चार वाजता बारामती शहर, तर १७ ऑक्टोबरला सकाळी १० वाजता शिक्रापूर आणि दुपारी चार वाजता तळेगाव दाभाडे पोलिस ठाण्याच्या हद्दीत जनजागृती मेळावा होणार आहे. या वेळी नागरिकांना आर्थिक व सायबर गुन्हे घडू नयेत याबद्दल माहिती दिली जाणार आहे. पुणे ग्रामीण पोलिसांनी यावर जिल्ह्यात जनजागृती मोहिम हाती घेतली असून नागरिकांना यातून सतर्क केले जाणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

एसी स्वच्छतागृह उद्घाटनाच्या प्रतीक्षेत

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

पुणे रेल्वे स्टेशनला आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्टेशन बनवण्याची योजना आखण्यात आली असून, त्याद्वारे प्रवाशांना दर्जेदार सोयीसुविधा उपलब्ध करून देण्याचा मानस प्रशासनाने व्यक्त केला आहे; मात्र दुसरीकडे, रेल्वे स्टेशनवर प्रवाशांसाठी चार महिन्यांपूर्वी बांधण्यात आलेले एसी स्वच्छतागृह उद्घाटनाअभावी धूळ खात पडले आहे. स्वच्छतागृहाचे अंतर्गत काम अपूर्ण असल्याने ते सुरू करण्यात आलेले नाही, असा दावा रेल्वेच्या जनसंपर्क विभागाने केला आहे.

पुणे रेल्वे स्टेशनच्या प्लॅटफॉर्म क्रमांक एकवर चार महिन्यांपूर्वी पाच ते १० लाख रुपये निधी खर्च करून एसी स्वच्छतागृह बांधण्यात आले आहे. त्या स्वच्छतागृहात महिला व पुरुषांसाठी प्रत्येकी दोन शौचालये व दोन बाथरूमची व्यवस्था करण्यात आली आहे. यासाठी चार एसी बसविण्यात आले आहेत. तसेच, या सुविधेसाठी प्रवाशांकडून पाच व १० रुपये आकारण्याचे निश्चित करण्यात आले आहे; मात्र या स्वच्छतागृहाचे उद्घाटन अद्याप झालेले नाही. त्यामुळे त्याला टाळे लावण्यात आले आहे.

पुणे स्टेशनवरून देशाच्या कानाकोपऱ्यात रेल्वेगाड्यांची ये-जा असते. हजारो प्रवाशांची दररोज या स्टेशनवर वर्दळ असते. रेल्वे स्टेशनवर सध्या उपलब्ध असलेले स्वच्छतागृह प्रवाशांना अपुरे पडत होते. तसेच येथील स्वच्छतेबाबतही वारंवार प्रश्न निर्माण होत होता. नागरिक चांगल्या स्वच्छतागृहाची मागणी करत होते.

एसी स्वच्छतागृहाचे अंतर्गत काम अपूर्ण आहे. ते तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना संबंधितांना दिल्या आहेत.

- मनोज झंवर, रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी, पुणे विभाग

या स्वच्छतागृहाला गेल्या अनेक दिवसांपासून त्याला टाळे लावण्यात आले आहे. तसेच, दीड-दोन महिन्यांपासून कोणत्याही स्वरूपाचे काम केले गेलेले नाही.

- हर्षा शहा, अध्यक्षा, रेल्वे प्रवासी संघ

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विशेष ट्रेन मिळणार का?

$
0
0

वाढत्या गर्दीमुळे त्रस्त प्रवाशांचा उद्विग्न सवाल

म. टा. प्रतिनिधी, पुणे

नवरात्र, दसरा आणि दिवाळीनिमित्त रेल्वेची प्रवासी संख्या आता झपाट्याने वाढू लागली आहे. त्यामुळे गाड्यांना असलेले वेटिंगही वाढले असून, जनरल डब्यांबरोबरच आरक्षित डब्यातील प्रवाशांवरही गर्दीचा त्रास सहन करण्याची वेळ आली आहे. त्यामुळे गेल्या अनेक वर्षांपासून उद्भवणाऱ्या या परिस्थितीतून सुटका करण्यासाठी यंदा तरी सुटीच्या काळात विशेष गाड्या उपलब्ध होणार का, असा प्रश्न प्रवासी उपस्थित करत आहेत.

आता नवरात्रौत्सव सुरू झाला आहे. पुढील आठवड्यात दसरा आहे. त्यानंतर दोन आठवड्यांनी दिवाळी आहे. त्यामुळे नोकरीनिमित्त पुण्यात स्थायिक असलेले परराज्यातील नागरिक मोठ्या संख्येने गावी जातील. तसेच, सध्या कॉलेजांत परीक्षा सुरू असून, परीक्षा संपताच विद्यार्थ्यांना दिवाळीच्या सुट्या लागतील. त्यामुळे प्रवासी संख्या नेहमीपेक्षा अनेक पटींनी वाढेल आणि बहुतांश गाड्या गर्दीने फुलून जातील. असा अनुभव दर वर्षीच येतो. त्यामुळे यंदा तरी सुटीच्या काळात विशेष गाड्या उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी केली जात आहे.

सोमवारी व मंगळवारी 'मटा'च्या प्रतिनिधीने पुणे स्टेशनवर पाहणी केली. त्या वेळी उत्तर भारतात जाणाऱ्या बहुतांश गाड्यांना गर्दी असल्याचे पाहायला मिळाले. झेलम एक्स्प्रेसच्या जनरल डब्यात जागा मिळावी यासाठी प्रवाशांनी दीड तास आधीपासून प्लॅटफॉर्मवर रांग लावल्याचे पाहायला मिळाले. तसेच, रेल्वेच्या एकूण प्रवासी क्षमतेच्या बरोबरीनेच वेटिंग तिकीटधारकांची संख्या असल्याने आरक्षित डब्यांनाही जनरल डब्याचे रूप आल्याचेही निदर्शनास आले.

पुण्यातील अधिकाऱ्यांकडून मागणी नाही

उन्हाळी किंवा दिवाळीच्या सुटीत पुण्याला विशेष गाड्या का मिळत नाहीत, याबाबत रेल्वे प्रवासी संघटनेच्या अध्यक्ष हर्षा शहा यांनी मुंबई येथे मध्य रेल्वेच्या प्रमुख अधिकाऱ्यांकडे विचारणा केली असता, पुणे विभागातील अधिकारी विशेष गाड्यांची मागणी करत नसल्याचे त्यांनी सांगितले. ही मागणी झाल्यास गाड्यांबाबतचा निर्णय घेतला जाईल, असेही त्यांनी सांगितल्याचे शहा म्हणाल्या.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सोने पोहोचले २७ हजारांवर

$
0
0

पुणेः अमेरिकी डॉलरच्या तुलनेत रुपयाचे अवमूल्यन झाल्याने मंगळवारी सोने-चांदीच्या दरात वाढ झाली. सोन्याच्या दरात साधारण दीडशे रुपयांची, तर चांदीच्या दरात चारशे रुपयांची वाढ झाली. त्यामुळे मंगळवारी २४ कॅरेट सोन्याचा भाव २७ हजार १०० रुपये प्रति दहा ग्रॅम, तर २३.५ कॅरेट सोन्याचा भाव २६ हजार ९०० रुपये प्रति दहा ग्रॅम होता. चांदीचा दर प्रतिकिलो ३८ हजार १०० रुपयांपर्यंत पोहोचला.

याबाबत पु. ना. गाडगीळ अँड सन्सचे कमोडिटी तज्ज्ञ अमित मोडक म्हणाले, 'चलनवाढीच्या दरात वाढ झाल्याने डॉलरच्या तुलनेत रुपया घसरला. रुपयाच्या दरात पाऊण टक्क्यांनी घट झाल्याने सोन्याच्या दरात सुमारे दीडशे रुपयांची वाढ झाली, तर चांदीच्या दरात ४०० रुपयांची वाढ झाली.'

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘मुख्यमंत्र्यांमुळे महाराष्ट्राची बदनामी’

$
0
0

जुन्नरः 'मुख्यमं‌‌त्री देवेंद्र फडणवीस यांच्या पाकधार्जिण्या विधानामुळे आणि कृत्यानेच महाराष्ट्राची बदनामी झाली,' अशी टीका शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी मंगळवारी केली. 'सत्तेत असलेल्यांनीच सत्तेतून बाहेर पडावे, दर वेळी आम्हीच राजीनामे का द्यावेत,' असा टोला त्यांनी भाजपला लगावला.

पिंपळवंडी येथील मळगंगामाता नवरा‌‌त्रोत्सवाच्या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त आयोजित सोहळ्यात त्यांनी मित्रपक्ष आणि मुख्यमंत्र्यांवर टीकास्त्र सोडले. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. सदानंद मोरे, आमदार शरद सोनवणे आदी या वेळी उपस्थित होते. हभप दत्तूआबा लेंडे यांच्या अर्धपुतळ्याचे अनावरणदेखील या वेळी करण्यात आले.

राऊत म्हणाले, 'राष्ट्रप्रेम हवे, हे समजू शकते; परंतु भाजपला पाकिस्तानविषयी प्रेम का? पाकिस्तानने मुंबईवर हल्ला केला, तेव्हा तुकाराम ओंबाळेंसारखे पोलिस लढताना हुतात्मा झाले. कसुरी प्रकरणात त्याच पोलिस दलाला पाकिस्तानच्या संरक्षणासाठी वापरले गेले.' शिवसेना सत्तेतून बाहेर पडणार का, असे विचारले असता, 'याबाबतची चर्चा कोणाला करायची तर करू द्या,' असा टोला त्यांनी लगावला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तिजोरीवरही डल्ला

$
0
0

sujit.tambade@timesgroup.com

पुणेः औंध येथील 'स्पायसर अॅडवेंटिस्ट विद्यापीठा'चा जमीन घोटाळा उघडकीस आल्यानंतर, आता विद्यापीठाच्या तिजोरीवरही डल्ला मारण्यात आल्याने अंतिम मान्यता मिळण्यापूर्वीच विद्यापीठ आर्थिक घोटाळ्याच्या गर्तेत सापडले आहे. विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. जस्टन देवदास यांनी 'प्रशासकीय खर्चा'च्या नावाखाली तिजोरीतून लाखो रुपये काढून आर्थिक उधळपट्टी केल्याचे कारनामे चव्हाट्यावर आले आहेत.

राज्यातील पहिले खासगी विद्यापीठ असलेल्या 'स्पायसर अॅडवेंटिस्ट विद्यापीठा'चा जमीन घोटाळा 'महाराष्ट्र टाइम्स'ने उघडकीस आणल्यानंतर विद्यापीठाच्या वर्तुळात खळबळ उडाली आहे. हे विद्यापीठ स्थापन करण्यास सरकारने मान्यता दिली आहे. मात्र, अद्याप अंतिम मान्यता मिळालेली नाही. याबाबतचे वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर मंगळवारी विद्यापीठाच्या मुख्यालयातील जबाबदार अधिकारी गायब झाले होते.

विद्यापीठाच्या जमीन घोटाळ्यानंतर आणखीही काही गैरप्रकार निदर्शनास आले आहेत. 'सेव्हन्थ डे अॅडवेंटिस्ट' या संस्थेचे हे विद्यापीठ आहे. या संस्थेतील कर्मचारी आर. जॉन्सन यांनी माहितीच्या अधिकारात घेतलेल्या माहितीवरून ही माहिती समोर आली आहे.

डॉ. देवदास हे कुलगुरू असताना सन २०१४मध्ये त्यांच्या स्वाक्षरीद्वारे लाखो रुपये तिजोरीतून काढण्यात आले आहेत. त्यासाठी दिलेली कारणे तकलादू आहेत. 'प्रशासकीय खर्च', 'कम्प्लिशन सर्टिफिकेट', 'ना हरकत प्रमाणपत्र' असे शेरे लिहून लाखो रुपये घेण्यात आले आहेत. त्या रकमा नक्की कशासाठी वापरण्यात आल्या, याचा तपशीलही देण्यात आलेला नाही. ​हा निधी देणग्या, विद्यार्थ्यांचे शुल्क आदी मार्गांनी तिजोरीत जमा होता. या रकमांचा अपव्यय करण्यात आला असल्याचे जॉन्सन यांनी सांगितले.

हा निधी विद्यापीठाच्या खात्यातून काढण्याऐवजी 'स्पायसर उच्च माध्यमिक स्कूल'च्या खात्यामधून घेण्यात आला आहे. या शाळेच्या पैसे काढण्याच्या पावत्यांवर डॉ. देवदास यांची स्वाक्षरी असून, त्या द्वारे अकाउंट विभागाने या रकमा दिल्या असल्याचे जॉन्सन यांनी स्पष्ट केले.

डॉ. देवदास यांच्या स्वाक्षरीने २५ मे २०१४ रोजी १२ लाख रुपये घेण्यात आले. त्यासाठी पैसे काढण्याच्या पावतीवर 'प्रशासकीय खर्च' हा शेरा लिहिलेला आहे. २५ जून २०१४ रोजी 'ना हरकत प्रमाणपत्रा'साठी गोडबोले नावाच्या व्यक्तीला ७० हजार रुपये दिल्याचा शेरा लिहून ही रक्कम वापरण्यात आली आहे. १४ नोव्हेंबर २०१४ रोजी 'कम्प्लिशन सर्टिफिकेट' हे कारण दाखवून ५० हजार रुपये तिजोरीतून काढण्यात आले असल्याचे जॉन्सन यांनी मिळविलेल्या कागदपत्रांवरून स्पष्ट झाले आहे.

डॉ. देवदास यांच्या स्वाक्षरीद्वारे काही रकमा या कोणतेही कारण न देता काढण्यात आल्या आहेत. हा निधी कशासाठी वापरण्यात आला, याचा तपशील देण्याची तसदी घेण्यात आलेली नाही. १० जून २०१४ रोजी तब्बल १५ लाख रुपये काढण्यात आले. १६ जून रोजी पाच लाख रुपये, ३० जून रोजी दोन लाख रुपये, २२ जुलैला दोन लाख रुपये, एक ऑगस्ट रोजी पाच लाख रुपये आणि सात ऑगस्टला दोन लाख रुपये घेण्यात आल्याचे उघडकीस आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महामार्गावर लुटणाऱ्या टोळीस अटक

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

गेल्या आठवड्यात खराडी बायपास येथे व्यावसायिकाला अडवून चाकूच्या धाकाने लुटलेल्या टोळीतील चौघांना गुन्हे शाखेच्या युनिट पाचने अटक केली. यामध्ये व्यवसायिकाच्या दुकानातील कामगाराने मदत केल्याचे समोर आले आहे; तसेच या टोळीने महामार्गावर नागरिकांना अडवून शस्त्रांचा धाक दाखवून अनेकांना लुटल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. त्यांच्याकडून महामार्गावरील लुटमारीचे गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.

अनिकेत रमेश भांदिर्गे (वय १८, रा. वाघोली), सागर तानाजी वनकळस उर्फ पाटील (वय २५, रा. रामवाडी जकातनाक्याजवळ), मयूर उर्फ भुऱ्या जगन्नाथ वाघमारे (वय २४, रा. भाडळे वस्ती, वाघोली) व ऋतुराज उर्फ राज ह्रदयनाथ जाधव (वय २७, रा. मोझे कॉलेजजवळ, वाघोली) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. आकाश म्हस्के हा फरारी आहे. गेल्या आठवड्यात खराडी बायपास रोडवर चार जणांनी चंदन मार्बल या दुकानाचे मालक निलेश परमार यांना अडवून मारहाण करीत दोन लाख रुपयांची बॅग चोरून नेली होती. या गुन्ह्याचा तपास करीत असताना खराडी बायपास रोडवरील रिलायन्स मॉलजवळ शस्त्रासह काही व्यक्ती असल्याची माहिती गुन्हे शाखेचे सहायक पोलिस निरीक्षक महादेव वाघमोडे व पोलिस नाईक गणेश बाजारे यांना मिळाली होती. त्यानुसार सापळा रचून पोलिसांनी चौघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे चौकशी केल्यानंतर यांनीच व्यावसायिकाला दुकानातील कामगाराच्या मदतीने लुटल्याचे सांगितले.

गेल्या सात वर्षांपासून आरोपी सागर हा परमार यांच्या दुकानात काम करत आहे. त्यामुळे त्याला रोज दुकानात जमा होणाऱ्या रकमेची माहिती होती. त्याने ही माहिती त्याचा मित्र म्हस्के याला सांगितली. सात ऑक्टोबर रोजी परमार दुकान बंद करून घरी जात असताना आरोपींनी त्यांचा पाठलाग केला. रात्री नऊच्या सुमारास दुचाकीला गाडी आडवी लावत कोयत्याच्या धाकाने त्यांच्याजवळील दोन लाखाची बॅग पळवली. यातील मुख्य सूत्रधार आकाश म्हस्के फरारी असून पोलिस त्याचा शोध घेत आहेत. या आरोपींनी महामार्गावर अशाच प्रकारचे अनेक गुन्हे केले असण्याची शक्यता आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


पुण्याचे श्रद्धास्थान चतु:श्रुंगी देवी

$
0
0

>> मंदार लवाटे

गणेशभक्तीच्या उत्सवानंतर आता पुणेकर सज्ज झाले आहेत, ते नवरात्रौत्सवासाठी. परिसरातील देवीच्या मंदिरांची माहिती, इतिहास आणि परंपरांची माहिती 'मटा'च्या वाचकांसाठी...

नाशिकनजवळच्या वणीचे म्हणजेच सप्तश्रुंगीदेवीचे पुण्यातील स्थान म्हणजे चतु:श्रुंगी. सप्तश्रुंगनिवासिनी ही साडेतीन शक्तीपीठांपैकी एक व अनेकांची कुलस्वामिनी. पेशवाईतील प्रसिद्ध सावकार दुलभशेठ या देवीचा मोठा भक्त होता व तो वणीला दर्शनास नेहेमी जात असे. कालांतराने त्याचे वय झाल्यावर देवीने त्याच्यासाठी तत्कालीन पुण्यानजीक प्रकट होत असल्याचा दृष्टांत त्यास दिला. परंतु वेळेआधीच दुलभशेठ देवीने सांगितलेल्या ठिकाणी पोहोचला तेंव्हा देवी पूर्ण प्रकट झालेली नसून तीन हात व चेहेराच प्रकट झाल्याचे त्यास आढळून आले. हे स्थान म्हणजेच चतु:श्रुंगी होय. अर्थातच या स्थानी दुलभशेठने मंदिर बांधले. दुलभशेठने चतरशिंगी रुपयाही पडला होता.

'मटा'संगे नवरात्रोत्सव साजरा करा; बक्षिसं जिंका!

पुण्यात उत्तर पेशवाईत दुलभशेठने नाणी पडण्याचा म्हणजेच टाकसाळीचा मक्ता घेतला होता, तसेच नाशिकजवळही दुलभशेठची एक टाकसाळ होती. दुलभशेठने पुण्यात एक धर्मशाळा बांधली व तेथे कालियामर्दनाची मूर्ती स्थापन केली. लक्ष्मीरस्त्यावर सतरंजीवाला चौकानजीक ही मूर्ती आजही पाहायला मिळते. चतु:श्रुंगी हे पूर्वीपासून पुणेकरांचे श्रद्धास्थान राहिले आहे. नवरात्रात गावातून तालीमबाज नारळाचे तोरण घेऊन चतु:श्रुंगी येथे पहाटे पळत जात असत. आता तालीमबाज व पळत जाणे बाजूला पडले असले, तरी आजही पुण्याच्या पेठांमधून चतु:श्रुंगीला तोरण वाहण्याची प्रथा सुरू आहे. जुन्या काळातील येथील जत्रा आजही अनेकांच्या स्मरणात असेल. चतु:श्रुंगीचे दुसरे एक मंदिर रविवार पेठेत आहे हे मात्र थोडक्याच जणांना माहित असेल. सुमारे २०० वर्षांपूर्वी किसनदास राजाराम यांनी येथे देवीची स्थापना केली व बढाई समाजाने मंदिर बांधले. येथे देवी तांदळा स्वरूप आहे. सुभानशा दर्ग्याच्या चौकातून गोविंद हलवाई चौकाकडे जाऊ लागले की उजव्या बाजूस हे मंदिर आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बांधकाम व्यावसायिकांचा मोर्चा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

बांधकाम व्यावसायिकांना प्रकल्प मंजुरी देताना शासन यंत्रणांकडून येणाऱ्या विविध अडचणी, राजकीय हस्तक्षेप, वाढता भ्रष्टाचार, खंडणीचा त्रास या विरोधात शहरातील विविध बांधकाम व्यावसायिकांनी मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. क्रेडाई या बांधकाम व्यावसायिकांच्या संघटनेतर्फे पुण्यासह देशभरात सर्व बांधकाम प्रकल्प बंद ठेवून लाक्षणिक आंदोलन करण्यात आले.

क्रेडाई पुणे मेट्रो या संघटनेच्या नेतृत्वाखाली शेकडो बांधकाम व्यावसायिकांनी हजारो बांधकाम कामगारांसह पूना क्लबपासून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत (कौन्सिल हॉल) मोर्चा काढला. मराठी बांधकाम व्यावसायिक संघटना, आर्किटेक्ट्स असोसिएशन, इंडियन सोसायटी ऑफ स्ट्रक्चरल इंजिनीअर्स आदी संघटनाही या आंदोलनात सहभागी झाल्या होत्या. बांधकाम व्यावसायिकांच्या शिष्टमंडळाने प्रथम विभागीय आयुक्त व जिल्हाधिकाऱ्यांना तर त्यानंतर पुणे व पिंपरी चिंचवडच्या आयुक्तांना विविध मागण्यांचे निवेदन सादर केले.

क्रेडाई पुणे मेट्रोचे अध्यक्ष शांतीलाल कटारिया, क्रेडाईचे राष्ट्रीय उपाध्यक्ष सतीश मगर, मराठी बांधकाम व्यावसायिक संघटनेचे अध्यक्ष सुधीर दरोडे, डी. एस. कुलकर्णी, श्रीकांत परांजपे, सुहास मर्चंट, रोहित व कुमार गेरा, अनिल फरांदे, मनीष जैन, किशोर पाटे, अनुज भंडारी, अतुल गोयल, खजिनदार नितीन न्याती, तेजराज पाटील, गजेंद्र पवार, अखिल अगरवाल आदी उपस्थित होते.

बांधकाम प्रकल्पांना विविध टप्प्यांवर मान्यता मिळताना होणारा विलंब व त्रास, भ्रष्टाचार, खंडणीचा त्रास, शासकीय यंत्रणांतर्फे पूर्वलक्ष्यी प्रभावाने लागू केले जाणारे विविध निर्णय यामुळे संपूर्ण राज्यातील बांधकाम व्यावसायिक त्रस्त आहेत. ठाण्यातील सूरज परमार यांनी या त्रासाला कंटाळून आत्महत्या केली. त्यामुळे बांधकाम व्यावसायिकांना होणाऱ्या त्रासाला वाचा फोडण्यासाठी क्रेडाईच्या नेतृत्वाखाली देशभर आंदोलन करण्यात आले. १५४ शहरांतील साडेअकरा हजार बांधकाम व्यावसायिकांनी आपले कामकाज बंद ठेवून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले, असे कटारिया यांनी सांगितले.

'सरकारी विलंब, राजकीय हस्तक्षेप, भ्रष्टाचार, खंडणी या त्रासामुळे एका विकसकाला आत्महत्या करावी लागणे दुर्दैवी आहे. त्यामुळे सर्वच बांधकाम व्यावसायिक त्रस्त, अस्वस्थ आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून बांधकाम व्यावसायिकांना विविध प्रकाराचा त्रास सहन करावा लागत आहे. ही अस्वस्थता व्यक्त करण्यासाठी लाखो बांधकाम व्यावसायिक राज्यभर, देशभर रस्त्यावर उतरले आहेत. बांधकाम व्यावसायिकांना वेळेत व भ्रष्टाचाराशिवाय परवानग्या मिळाल्यास स्वस्तात घरे उपलब्ध करून देणे शक्य होईल,' असे सुधीर दरोडे यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बनावट मोबाइलपासून सावधान

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पिंपरी

दिल्ली उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर सॅमसंग कंपनीचे बनावट अथवा ग्रे-मार्केटमधील मोबाईल आणि अॅक्सेसरीज विक्री करणाऱ्या पिंपरी कॅम्प मधील अकरा दुकानांवर छापा टाकण्यात आला. या छाप्यामध्ये सुमारे एक लाख मोबाईल अॅक्सेसरीज सील करण्यात आल्या असून, यामध्ये २० मोबाईल सेटचा समावेश आहे.

उच्च न्यायलयाने गठीत केलेल्या आठ 'हायकोर्ट कमिश्नर' आणि शंभर पोलिसांच्या फौजफाट्यासह पिंपरी कॅम्प आणि पुण्यातील बुधवारपेठ तसेच शिवाजीनगर परिसरात बुधवारी (१४ ऑक्टोबर) हे छापासत्र राबविण्यात आले. विशेष म्हणजे पुणे, पिंपरी-चिंचवडमध्ये ज्यावेळेस छापासत्र सुरू होते. तेव्हाच दिल्ली येथील काही भागात देखील ही कारवाई सुरू होती.

सॅमसंग कंपनीने भारतभरात कंपनीच्या नावाने मोबाईल आणि अॅक्सेसरीजची मोठ्या प्रमाणात विक्री सुरल्याबाबत दिल्ली उच्चन्यायलायत याचिका दाखल केली होती. त्यावर न्यायालयाने नेमलेल्या एका विशेष पथकाने भारतभरात छुप्या पद्धतीने पाहणी करून एक अहवाल न्यायालयात सादर केला होता. यामध्ये पिंपरी कॅम्प परिसरातील अकरा दुकानांची नावे-पत्ता होते. तसेच पुण्यासह दिल्लीतील देखील दुकानांचा नाव-पत्ते होते. कारवाईसाठी उच्च न्यायलयाने आठ कोर्ट कमिश्नरची नेमणूक केली.

बुधवारी सकाळी मुख्य हायकोर्ट कमिश्नर अॅड. सचिन पुरी यांच्यासह त्यांचे सात सहकारी कमिश्नर पुण्यात दाखल झाले. त्यांनी पुणे पोलिस आयुक्तांची भेट घेतली. एकाचवेळेस कारवाई करायची असल्याने फौजफाट्याची मागणी केली. त्यानंतर तत्काळ पोलिस आयुक्तांनी आठ पोलिस निरीक्षक आणि ९२ अधिकारी-कर्मचाऱ्यांची टीम कारवाईसाठी नेमली. त्यानंतर दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास एकाच वेळेस कारवाईला सुरवात झाली.

धडक कारवाई करीत दुकानांची पाहणी करताना सुरवातीच्या दहा दुकानांमधील हॅण्सफ्री, चार्जर, कव्हर, बंपर आदी स्वरूपाचे सुमारे एक लाख अॅक्सेसरीज सील केल्या. त्यानंतर अकराव्या दुकानात या पथकाने २० मोबाईल सील केले. याकारवाई दरम्यान पुण्यातील बुधवार पेठेत एका संपूर्ण इमारतीमध्ये वरील प्रमाणे कारवाईची आवश्यकता असल्याचे समजताच पिंपरीतील पथक पुण्याच्या दिशेने रवाना झाले. विशेष म्हणजे पिंपरी कॅम्पमधील एका दुकानदाराने थेट एका हायकोर्ट कमिश्नरला लाच देण्याचे आमिष दाखवल्याने हे पथक चांगलेच संतापले होते. कॉपिराईट अॅक्टअंतर्गत ही कारवाई करण्यात आली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पत्नीचा खून करणाऱ्या चव्हाणच्या कोठडीत वाढ

$
0
0

पुणेः जावयाशी अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरून पत्नीचा निर्घृण खून तिचे शीर घेऊन भररस्त्याने फिरणाऱ्या रामचंद्र चव्हाण याच्या पोलिस कोठडीत १६ ऑक्टोबरपर्यंत वाढ करण्यात आली आहे. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी टी. एन. जाधव यांच्या कोर्टाने हा आदेश दिला. चव्हाण याच्या पोलिस कोठडीची मुदत संपल्यामुळे त्याला मंगळवारी कोर्टात हजर करण्यात आले होते. रामचंद्र चव्हाणने त्याची पत्नी सोनाबाई (वय ५०) हिचा निर्घृण खून केला. याप्रकरणी सुनीता रमेश चव्हाण (२२ रा. सुखसागरनगर) हिने भारती विद्यापीठ पोलिस स्टेशनमध्ये फिर्याद दिली आहे.

पत्नी सोनाबाई आणि जावई यांचे अनैतिक संबंध आहे याचा संशय, पत्नी चांगली वागणूक देत नाही, जेवण वाढत नाही याकारणावरून पत्नीचा खून केल्याचे चव्हाणने पोलिस तपासात कबूल केले. गुन्हा पाहणारे प्रत्यक्ष साक्षीदार, तसेच आरोपी त्याच्या पत्नीचे शीर घेऊन जाताना पाहणारे साक्षीदार यांच्याकडे तपास करण्यात आला आहे. चव्हाण याच्याकडे ​अधिक तपास करण्यासाठी त्याच्या पोलिस कोठडीची मागणी सरकारी वकील पी. जे. तरंगे यांनी कोर्टात केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘टीईटी’ परीक्षेसाठी नवी तारीख ?

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

राज्यस्तरीय शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) आणि प्राध्यापक पदासाठीची राष्ट्रीय पातळीवरील पात्रता परीक्षा (नेट) एकाच दिवशी आल्याने, आता 'टीईटी'च्या तारखेमध्ये बदल होण्याची शक्यता आहे. शिक्षण खात्यामध्ये त्या विषयी विचार सुरू असून, 'टीईटी'चे आयोजन करणाऱ्या राज्य परीक्षा परिषदेने त्यासाठीचा प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठविला आहे.

'नेट'च्या परीक्षेबाबत 'सीबीएसई'ने गेल्या महिनाभरापूर्वी जाहीर केलेल्या नियोजनानुसार, यंदा २७ डिसेंबरला देशभरात नेटची परीक्षा होणार आहे. राज्य परीक्षा परिषदेने आठवडाभरापूर्वी जाहीर केलेल्या नियोजनानुसार, २७ डिसेंबरलाच राज्यभरात 'टीईटी' घेतली जाणार आहे. परिषदेने नियोजन जाहीर केल्यानंतर या दोन्ही परीक्षांसाठीची पात्रता पूर्ण करणाऱ्या राज्यभरातील उमेदवारांनी परिषदेने 'टीईटी' परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी केली होती. उमेदवारांची ही अडचण 'मटा'ने आपल्या वृत्तातून मांडली होती. त्या पार्श्वभूमीवर परिषदेने ही पावले टाकल्याचे स्पष्ट झाले.

या विषयी राज्याचे शिक्षण आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर म्हणाले, 'परीक्षेची तारीख निश्चित करण्यासाठी परिषदेला राज्य सरकारची परवानगी घ्यावी लागते. त्यानुसार नवी तारीख ठरविण्याबाबतचा प्रस्ताव परिषदेने सरकारकडे पाठविला आहे. निर्णय झाल्यास, परिषद नवी तारीख लवकरच जाहीर करेल.' परिषदेचे अध्यक्ष महावीर माने या विषयीचा पाठपुरावा करत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images