Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

‘ताम्हिणी’ची सुरक्षा वाऱ्यावर

$
0
0

वनक्षेत्राच्या संरक्षणासाठी दोन कर्मचारी; प्रत्यक्षात गरज २८ जणांची

म. टा. प्रतिनिधी, पुणे

वनसंपदेने समृद्ध असलेल्या ताम्हिणी वनक्षेत्राचे संरक्षण व्हावे या उद्देशाने राज्य सरकारने अभयारण्याचा दर्जा दिला असला तरी जंगलाच्या सुरक्षेसाठी वनकर्मचारीच नाहीत. एकीकडे पिकनिक स्पॉट म्हणून वेगाने लोकप्रिय झालेल्या या परिसराला अतिक्रमणाचा धोका असतानाही, तब्बल पन्नास किलोमीटर क्षेत्र व्यापलेले अभयारण्य अवघ्या दोन कर्मचारी आणि गावकऱ्यांच्या जीवावर तरले आहे. प्रत्यक्षात या अभयारण्याला २८ कर्मचाऱ्यांची गरज आहे.

पुण्यापासून अवघ्या तासाभराच्या अंतरावर असलेला ताम्हिणी वनक्षेत्र आता पिकनिक स्पॉट म्हणूनच प्रसिद्ध झाले आहे. त्याच्या संरक्षणासाठी अभयारण्याचा दर्जा मिळावा, अशी मागणी वन विभागाने तीन वर्षांपूर्वी केली होती. त्यानंतर राज्य वन्यजीव मंडळाने हिरवा कंदिलही दाखवला. मात्र अभयारण्याच्या सुरक्षेसाठी वनकर्मचारी संख्या वाढविण्याचा सरकारला विसर पडला आहे. सध्या हे अभयारण्याचा काही भाग पुण्यातील वन विभागाकडे, तर काही भाग रायगड जिल्ह्यातील वन्यजीव विभागाच्या ताब्यात आहे. हे संपूर्ण क्षेत्र पुणे आणि रायगड जिल्ह्यातील वन्यजीव विभागाकडे हस्तांतरित करावे, अशी मागणी वनाधिकाऱ्यांनी वन विभागाच्या मुख्यालयाकडे केली आहे; तसेच अभयारण्याच्या संरक्षणासाठी किमान २८ वनकर्मचाऱ्यांनी नियुक्ती करावी, असे पत्रही वारंवार पाठविण्यात आले आहे. मात्र, राज्य सरकारने याकडे दुर्लक्ष केल्याने अभायरण्य एक वनपरिक्षेत्र अधिकारी आणि अवघ्या दोन कर्मचाऱ्यांवर अवलंबून आहे.

गेल्या काही वर्षात येथील वाढते पर्यटन लक्षात घेऊन उद्योजकांनी या परिसरात ठिकठिकाणी फार्म हाउस उभारण्यास सुरुवात केली आहे. रिसॉर्ट आणि बंगल्याचे विस्तारही वाढतो आहे. अनेक ठिकाणी खासगी वनांचीही अवैधरित्या विक्री झाली असून, फार्म हाउसच्या कॉलनी उभारण्यात येणार आहे. राजकीय वरदहस्त असलेल्या काही बड्या मंडळींच्या नजरा आता राखीव वनांवर असल्याने वेळीच या वनक्षेत्राला वाचवा, अन्यथा ताम्हिणीच्या चोहोबाजूला कॉँक्रिटचे जंगल उभे राहील, अशी धोक्याची सूचनाही पर्यावरण संघटनांनी दिली आहे. मात्र, राज्य सरकारने याकडे दुर्लक्ष केले आहे.

प्रवेश शुल्कातून मदत

ताम्हिणी घाटाच्या संवर्धनासाठी सिंहगड मॉडेलच्या धर्तीवर वन विभाग आणि वनसंरक्षण समित्यांतर्फे गेल्या दोन महिन्यांपासून प्रवेश शुल्क आकारण्यास सुरुवात केली आहे. सध्या दर शनिवारी आणि रविवारी पर्यटकांकडून उपद्रव शुल्क आकारले जाते आहे. विशेष म्हणजे गेल्या दोन महिन्यात चाळीस हजार रुपये वनसंरक्षण समितीकडे जमा झाले आहेत. या रकमेतून वनसंवर्धन आणि गावकऱ्यांना रोजगार देण्यात येणार आहे.
....

राज्य सरकारकडून मनुष्यबळ मिळण्यास वेळ लागतो आहे, हे लक्षात आल्याने आम्ही ताम्हिणीला लागून असलेल्या गावातील उत्साही मंडळींची टीम आता तयार करतो आहोत. यासाठी येथील गावांमध्ये वनसंरक्षण समिती स्थापन केल्या असून त्यांना विविध कामे वाटून देण्यात आली आहेत. पर्यटकांना अभयारण्यातील सौंदर्य दाखविण्यासाठी आम्ही गाईडची टीम करणार आहोत, यासाठी त्यांना प्रशिक्षणही देण्यात येणार आहे.

- एस. एम. खलाटे, ताम्हिणी अभयारण्याचे वनपरिक्षेत्र अधिकारी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


‘नव्व्याण्णव बादची सफर’ने जिंकला विनोदोत्तम करंडक

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

विनोदाचे उत्तम सादरीकरण आणि दिग्दर्शन यांच्यातीस समन्वयाने 'नव्व्याण्णव बादची सफर' या अथांग नाट्य निर्मित एकांकिकेने यंदाचा 'विनोदोत्तम करंडक' पटकावला. ज्येष्ठ विनोदी अभिनेते सुनील गोडबोले आणि अभिनेता सुयश टिळ‍क यांच्या हस्ते विजेत्यांना मनोहर कोलते पुरस्कृत दहा हजार रुपयांचे दादा कोंडके पारितोषिक, करंडक आणि प्रशस्तीपत्र देण्यात आले.

सिंहगड स्कूल ऑफ इंजिनीअरिंगच्या 'अॅक्सिडेंट' या एकांकिकेला द्वितीय, तर मॉडर्न अभियांत्रिकीच्या 'राज्य तसं चांगलं...पण' या एकांकिकेला तृतीय क्रमांकाचे पारितोषिक मिळाले. द्वितीय क्रमांकासाठी सात हजार रुपये रोख, करंडक आणि स्मृतिचिन्ह, तर तृतीय क्रमांकाला पाच हजार रुपये रोख, करंडक आणि स्मृतीचिन्हाने गौरविण्यात आले. वन किड फाउंडेशनने ही स्पर्धा आयोजित केली होती.

विनोदोत्तम एकांकिका करंडक स्पर्धेत यंदा विविध ठिकाणचे २४ संघ सहभागी झाले होते. भरत नाट्य मंदिर इथे स्पर्धेचे पारितोषिक वितरण झाले. फाउंडेशनचे अध्यक्ष प्रकाश कुलकर्णी, उपाध्यक्ष मनोहर कोलते, 'विनोदोत्तम'चे संस्थापक आणि स्पर्धेचे संयोजक हेमंत नगरकर, संयोजन समितीचे सदस्य अमित पाटील, अमर परदेशी, राजीव पुणेकर आदी या वेळी उपस्थित होते. यंदा स्पर्धेचे नववे वर्ष होते. संजय डोळे आणि विनीता पिंपळखरे-उपाध्ये यांनी स्पर्धेचे परीक्षक म्हणून काम पाहिले.

'नऊ वर्षे विनोदाचा अखंड यज्ञ सुरू आहे. स्पर्धेतील प्रथम तीन विजेत्या एकांकिकांचे सादरीकरण लवकरच आयोजिण्यात येणार आहे. यातून मिळणारा निधी दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी नाम फाउंडेशनला देण्यात येणार आहे,' अशी घोषणा या वेळी कोलते यांनी केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

यादवच्या पत्नीच्या लॉकरमध्ये पन्नास लाख

$
0
0

अकरा तोळे सोने, दोन किलो चांदीही आढळली

म. टा. प्रतिनिधी, पुणे

झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाचा (एसआरए) उपमुख्य कार्यकारी अधिकारी शिरीष यादव याच्या पत्नीच्या नावे असलेल्या बँक लॉकरची लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने शनिवारी झडती घेतली. त्यामध्ये ५० लाख रुपये, ११ तोळे सोने व दोन किलो १३२ ग्रॅम चांदी सापडली आहे.

लोहियानगर येथील एका झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पामध्ये येणाऱ्या धार्मिकस्थळाला बेकायदा ठरविण्यासाठी यादव यांनी बांधकाम व्यावसायिकाकडे २५ लाख रुपयांची लाच मागितली होती. या रकमेतील पाच लाख रुपयांचा दुसरा हप्ता स्वीकारताना यादवला गुरुवारी अटक करण्यात आली होती. याप्रकरणी त्याच्यावर चतु:श्रृंगी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुरुवारी यादवच्या पाषाण रस्त्यावरील घराची झडती घेण्यात आली होती. त्यावेळी त्याच्याकडे ५१ लाख रुपयांची रोकड, ८४२ ग्रॅम सोन्याचे दागिने व एक किलो चांदीच्या वस्तू व दागिने मिळाले होते; तसेच त्याच्या पत्नीच्या नावे असलेल्या बँक लॉकरची चावीही मिळाली होती. लाचलुचपत विभागाने शनिवारी या लॉकरची झडती घेतली. त्यामध्ये रोख ५० लाख रुपयांसह ११ तोळे सोन्याचे दागिने व दोन किलो १३२ ग्रॅम चांदीच्या वस्तु मिळाल्या आहेत, अशी माहिती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे सहायक पोलिस आयुक्त श्रीहरी पाटील यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वृद्धाश्रमातील ज्येष्ठांना दरमहा ३५ किलो धान्य

$
0
0

पालकमंत्री गिरीश बापट यांची घोषणा

म. टा. प्रतिनिधी, पुणे

'राज्य सरकारतर्फे वृद्धाश्रमात राहणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांसाठी दरमहा प्रत्येकी ३५ किलो धान्य देण्यात येईल, याबाबतचा निर्णय लवकरच घेण्यात येईल; तसेच पुण्यातील ज्येष्ठ नागरिकांसाठी लवकरच जेनेरिक औषधांची मोबाइल व्हॅन सुरू करण्यात येईल,' अशी घोषणा पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांनी शनिवारी केली. राज्यात ज्येष्ठ नागरिक समिती स्थापण्याबाबत कार्यवाही सुरू केल्याचेही ते म्हणाले.

जनसेवा फाउंडेशनतर्फे जागतिक ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त आयोजित आनंद मेळाव्यात ते बोलत होते. केंद्रीय वन व पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर, महापौर दत्तात्रय धनकवडे, उपमहापौर आबा बागूल, आमदार मेधा कुलकर्णी, योगेश टिळेकर, तसेच मदन बाफना, मदनभाई सुरा, प्रतापराव भोसले, मोहन जोशी, अंकुश काकडे, रमणभाई शहा, मनिषा चोरबेले, हरीभाई शहा, हिराभाई शहा चोखावाला, डॉ. विनोद व मीना शहा या वेळी उपस्थित होते.

'वृद्धाश्रमातील ज्येष्ठांच्या धर्तीवर ज्येष्ठ नागरिक संघाच्या सभासदांनाही धान्य देण्याबाबत विचार सुरू आहे. एकटे राहणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांना संजय गांधी निराधार योजनेच्या धर्तीवर लाभ देण्याचाही विचार आहे. ज्येष्ठ नागरिकांसाठी नुसते कायदे करून उपयोग होणार नाही. त्यातून पळवाटाच शोधल्या जातील,' असे बापट यांनी सांगितले. राज्यात ज्येष्ठ नागरिकांसाठी वयाची अट ६० वर्षांपर्यंत आणण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासनही बापट यांनी दिले.

'सरकारने ज्येष्ठ नागरिकांच्या शिष्टमंडळांशी चर्चा करून त्यांच्या अडचणी समजून घेऊन त्यावर गांभीर्याने विचार केला पाहिजे,' असे भोसले सांगितले. 'ज्येष्ठ नागरिकांना शहरी वातावरणात अधिकाधिक सामावून कसे घेता येईल, यासाठी प्रयत्न व्हावेत, ज्येष्ठांनीही अवयवदान, देहदान, नेत्रदान करणे आवश्यक आहे. राज्य सरकारने ज्येष्ठ नागरिकांसाठीच्या वयाची अट ६५ वरून ६० वर्षांवर आणावी,' असे डॉ. शहा यांनी सांगितले.

केंद्रीय धोरणाची पुनर्रचना

ज्येष्ठ नागरिकांना आरोग्य व अन्य आवश्यक सुविधा सहज उपलब्ध व्हाव्यात, यासाठी केंद्रीय ज्येष्ठ नागरिक धोरणाची पुनर्रचना करण्यात येईल, अशी घोषणा केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कचरा डेपोः सरकारचा हस्तक्षेप हवा

$
0
0

कारभाऱ्यांचे राज्य सरकारकडे बोट; प्रकल्पांसाठी आणखी मुदतवाढ?

म. टा. प्रतिनिधी, पुणे

उरळी आणि फुरसुंगीच्या कचरा डेपोची मुदत येत्या आठवड्यात संपणार असल्याने त्यावर तोडगा काढण्यासाठी राज्य सरकारने हस्तक्षेप करावा, अशी मागणी करीत पालिकेतील सत्ताधाऱ्यांनी 'कचराकोंडी'चा विषय शनिवारी राज्य सरकारच्या कोर्टात ढकलला. तसेच, ग्रामस्थांना दिलेली बहुतांश आश्वासने पालिकेने पूर्ण केली असून, कचऱ्यावर प्रक्रिया करणारे काही प्रकल्प कार्यान्वित होण्यासाठी वेळ लागणार असल्याची कबुली देत, आणखी मुदतवाढ हवी असल्याचे संकेत दिले.

शहरातील कचरा प्रश्नाचा आढावा घेण्यासाठी शनिवारी महापौर दत्तात्रय धनकवडे यांच्या अध्यक्षतेखाली सर्वपक्षीय नेते आणि स्थायी समितीच्या सदस्यांची बैठक झाली. पालिका आयुक्त कुणाल कुमार यांच्यासह घनकचरा विभागचे वरिष्ठ अधिकारी या बैठकीला उपस्थित होते. मुख्यमंत्र्‍यांसमवेत झालेल्या बैठकीत दिलेली अनेक आश्वासने पालिकेने विहित मुदतीत पूर्ण केली असल्याचा दावा आयुक्त कुमार यांनी केला. तळेगाव येथे सुमारे तीनशे टन कचऱ्यावर प्रक्रिया करणारा प्रकल्प कार्यान्वित होण्यास आणखी एक ते दीड महिन्याचा कालावधी लागणार असल्याचे त्यांनी सूचित केले.

कचऱ्याच्या सद्यस्थितीबद्दल पालिका आयुक्तांनी दिलेल्या माहितीनंतर शहरात पुन्हा कचऱ्याची समस्या उद्भवू नये, या दृष्टीने आत्तापासूनच ग्रामस्थांशी चर्चा करून तोडगा काढा, अशा सूचना सर्वपक्षीय नेत्यांनी दिल्या. तसेच, पिंपरी-सांडस येथील जागा पालिकेला हस्तांतरित होण्यापासून ते गावकऱ्यांच्या रोजगाराबाबतचे प्रश्न सरकारशी निगडित असल्याने याबाबत त्यांनीही हस्तक्षेप करावा, अशी मागणी सभागृहनेते बंडू केमसे आणि विरोधी पक्षनेते अरविंद शिंदे यांनी केली.

महापालिकेत निर्माण होणारा कचरा उरळी आणि फुरसुंगीच्या हद्दीत टाकला जातो. हा कचरा डेपो कायमस्वरूपी बंद करण्यासाठी ग्रामस्थांनी वारंवार आंदोलने केली आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमवेत जानेवारीत झालेल्या बैठकीत पालिकेला नऊ महिन्यांची मुदत देण्यात आली होती. या कालावधीत गावांत नागरी सुविधा पुरविण्यासह शहरातील कचरा शहरातच जिरविण्याच्या दृष्टीने प्रयत्न करण्याची ग्वाही पालिकेने दिली होती.
.................

दररोज निर्माण होणारा कचरा
१६०० टन

कचरा डेपोवर यापूर्वी जाणारा कचरा
१२०० टन (ओला व सुका)

सद्यस्थितीत कचरा डेपोवर जाणारा कचरा
५०० टन (फक्त सुका कचरा)

पालिकेचे नियोजित कचरा प्रक्रिया प्रकल्प
४००-४५० टन

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘पीएमपी’साठी २५ जागा राखीव

$
0
0

'डीपी'च्या अहवालाचा एसटी, रेल्वे, मेट्रोला होणार फायदा

म. टा. प्रतिनिधी, पुणे

शहराच्या विकास आराखड्यावर (डीपी) नेमलेल्या चोक्कलिंगम समितीने अनेक आरक्षणे वगळल्याचा आरोप होत असला, तरी सार्वजनिक वाहतुकीसाठी मात्र हा अहवाल फलदायी ठरणार आहे. पुणे महानगर परिवहन महामंडळासाठी (पीएमपी) तब्बल २५ जागा राखीव ठेवण्यात आल्या असून, राज्य परिवहन (एसटी), रेल्वे आणि मेट्रो अशा इतर सेवांसोबत त्याचा मेळ घालण्यात आला आहे.

शहराची प्रमुख समस्या वाहतूक कोंडी असून, त्या दृष्टीने सार्वजनिक वाहतुकीचा प्रसार करण्याची नेमकी गरज ओळखून समितीने त्या संदर्भातील आरक्षणांबाबत काही महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. मूळ प्रा-रूप आराखड्यात पीएमपीसाठी संपूर्ण शहरात १९ आरक्षणे दर्शविण्यात आली होती. त्यात समितीने पीएमपीसाठी आणखी सहा स्वतंत्र आरक्षणांची भर घातली आहे. त्याशिवाय, रेल्वे, एसटी आणि मेट्रोसोबत आणखी चार, अशा दहा आरक्षणांच्या जागा पीएमपीसाठी निश्चित करण्यात आल्या आहेत. शहरातील महत्त्वाच्या ठिकाणांसह उपनगरांतही पीएमपीचे जाळे विस्तारले जावे, त्यांना स्टेशन आणि डेपोसाठी तेथे जागा उपलब्ध व्हाव्या, यादृष्टीने विशेष प्रयत्न करण्यात आल्याचे दिसून येत आहे.

पीएमपीएमएलसाठी कात्रज (मुख्य चौकाजवळ), कोथरूड (य. चव्हाण नाट्यगृहाच्या अलीकडे), नायडू हॉस्पिटल (राजा बहाद्दूर मिलजवळ), मुंढवा (भारत फोर्ज कंपनीच्या मागील बाजूस), येरवडा (गुंजन थिएटरसमोरील बाजूस) आणि कळस येथे सहा आरक्षणे नव्याने प्रस्तावित करण्यात आली आहेत. त्याशिवाय, एसएससी बोर्डाच्या मागील बाजूस (पीएमपी आणि रेल्वे), तसेच कोर्टासमोरील धान्य गोदामाजवळ (पीएमपी आणि मेट्रो) पीएमपीसाठी आणखी आरक्षणे सुचविण्यात आली आहेत. ठराविक मुदतीमध्ये ही सर्व आरक्षणे पीएमपीच्या ताब्यात येऊ शकली आणि रेल्वे-एसटी-मेट्रोसह त्याचा योग्य समन्वय साधला गेल्यास, पुणेकरांची वाहतूक कोंडीची समस्या दूर होण्याची शक्यता आहे.

दोन ठिकाणी ट्रान्सपोर्ट हब

मुंबईला जाणाऱ्या प्रवाशांच्या सोयीकरिता एसटी, पीएमपी आणि इतर वाहतूक सेवांचा एकत्रित ट्रान्सपोर्ट हब औंध येथे करावा, अशी शिफारस केली आहे. त्याशिवाय, शहराच्या सोलापूर रोड आणि त्या दिशेने जाणाऱ्या प्रवाशांसाठी पूर्व भागांत सोनमर्ग थिएटरजवळ ट्रान्सपोर्ट हब प्रस्तावित करण्यात आला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मतदार नोंदणीची महामोहीम

$
0
0

पालिका निवडणुकीसाठी मतदान करता येणार; नावांचा समावेश, दुरुस्तीची संधी

म. टा. प्रतिनिधी, पुणे

मतदारयादीत नाव समाविष्ट करणे, वगळणे, किंवा नाव-पत्ता,वय किंवा फोटो अशा तपशीलांमध्ये दुरुस्ती करण्यासाठी निवडणूक आयोगाच्या वतीने येत्या गुरुवारपासून (८ ऑक्टोबर) सात नोव्हेंबरपर्यंत शहर, पिंपरी-चिंचवड आणि जिल्ह्यात मतदार नोंदणीची महामोहीम हाती घेण्यात येणार आहे. या मोहिमेत यादीत नावे समाविष्ट केल्यास महापालिकांच्या आगामी निवडणुकीत मतदानाची संधी मिळणार आहे.

राज्याचे निवडणूक आयुक्त जे. एस. सहारिया, मुख्य निवडणूक अधिकारी नितीन गद्रे, अतिरिक्त आयुक्त शाम देशपांडे आणि जिल्हाधिकारी सौरव राव यांनी शनिवारी ही माहिती दिली. निवडणूक आयोगाच्या वतीने दरवर्षी ऑक्टोबरमध्ये नावनोंदणी मोहीम हाती घेण्यात येते. मात्र, यंदाच्या मोहिमेत नावनोंदणी नागरिकांसाठी अधिक महत्त्वाची ठरणार आहे. पुढील वर्षी आणि त्यापुढील वर्षी (२०१६-१७) राज्यातील ८० टक्के महापालिका, नगरपालिका, जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्यांच्या निवडणुका होणार आहेत. या निवडणुकीसाठी हीच मतदारयादी आधार म्हणून धरण्यात येणार आहे. त्यामुळे या निवडणुकीत मतदानास पात्र ठरण्यासाठी ही मोहीम ही कदाचित अखेरची मोठी संधी ठरणार आहे, त्यामुळे मतदारयादीत नाव नसलेल्या नागरिकांनी या मोहिमेत नावनोंदणी करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

येत्या एक जानेवारी २०१६ रोजी १८ वर्षे पूर्ण होणारे सर्वजण मतदारयादीत नाव नोंदविण्यास पात्र ठरणार आहेत. या महिन्याभराच्या काळात शहर, पिंपरी-चिंचवड आणि जिल्ह्यातील सुमारे सात हजार मतदान केंद्रांवर केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) दिवसभर उपलब्ध राहणार असून मतदारयादीत नाव नोंदविण्याचे, तसेच नाव वगळण्याचे, नाव-पत्ता-वय किंवा फोटो या तपशीलातील दुरूस्तीचे अर्ज स्वीकारणार आहेत, असे सहारिया यांनी सांगितले. दरम्यान, या मोहिमेच्या पार्श्वभूमीवर राजकीय पक्षांची बैठक घेण्यात आली. खासदार अनिल शिरोळे, शिवाजीराव आढळराव पाटील, श्रीरंग बारणे, आमदार संग्राम थोपटे, मेधा कुलकर्णी, गौतम चाबुकस्वार, पुणे महापालिकेचे आयुक्त कुणाल कुमार, पिंपरी-चिंचवडचे आयुक्त राजीव जाधव आदी यावेळी उपस्थित होते.

तीन लाख नावे वगळली

पुणे जिल्ह्याच्या पूर्वीच्या मतदारयादीतून आतापर्यंत तीन लाख १६ हजार नावे वगळण्यात आल्याची माहिती निवडणूक आयुक्त सहारिया यांनी दिली. त्यामध्ये मयत, दुबार किंवा स्थलांतरित नावांचा समावेश आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महिन्याचा स्वयंपाक साडेतीनशे रुपयांत

$
0
0

- सीएनजी-पीएनजीचे दर अडीच रुपयांनी उतरले
- पुणे, पिंपरी-चिंचवडकरांना दिलासा

म. टा. प्रतिनिधी, पुणे

पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील सीएनजी आणि पीएनजीच्या किंमती अडीच रुपयांनी उतरल्या आहेत. त्यामुळे दोन्ही शहरांमधील सीएनजी वाहनांचे चालक आणि घरगुती पीएनजी वापरणाऱ्या ग्राहकांना दिलासा मिळाला असून, आता सुमारे साडेतीनशे रुपयांमध्ये एका महिन्याचा स्वयंपाक होणार आहे.

महानगर नॅचरल गॅस लिमिटेडचे (एमएनजीएल) व्यवस्थापकीय संचालक अरविंद तांबेकर यांनी शनिवारी ही माहिती दिली. पूर्वी पुण्यात ४८.५० रुपये किलो असलेला सीएनजी आता ४६ रुपये प्रतिकिलो दराने, तर पिंपरी-चिंचवडमध्ये ४८ रुपयांनी मिळणारा सीएनजी आता ४५.५० रुपये दराने मिळणार आहे. तसेच स्वयंपाकासाठी पाइपलाइनद्वारे पुरविण्यात येणारा पीएनजी आता २३ रुपये प्रतिएससीएम (स्टँडर्ड क्युबिक मीटर) दराने उपलब्ध होणार आहे. दोन दिवसांपूर्वीच केंद्र सरकारने एलपीजीच्या किंमती कमी केल्या होत्या. त्यापाठोपाठ आता सीएनजी आणि पीएनजीचेही दर कमी झाले आहेत. देशभरात हे सर्वात कमी दर असल्याचे तांबेकर यांनी सांगितले. साधारणपणे एका कुटुंबाकडून दरमहा १५ एससीएम इतक्या पीएनजीचा वापर होतो. त्यामुळे नव्या दरांनुसार सुमारे साडेतीनशे रुपयांत घरातील महिन्याचा स्वयंपाक होणार आहे.
शहरात सध्या विविध परिसरांमध्ये २१ हजार कुटुंबांकडे पाइपने पीएनजी गॅसचा पुरवठा होतो. येत्या वर्षात ही संख्या ५० हजार कुटुंबांपर्यंत वाढविण्याचे टार्गेट समोर ठेवण्यात आले आहे. पावसाळ्याच्या काळातील रस्तेखोदाईवरील बंदी आता उठल्याने पाइपलाइनची कामे सुरू होत असून उर्वरीत कोथरूड, पाषाण, बाणेर, बावधन, बिबवेवाडी, हडपसर, तसेच विमाननगर आणि कल्याणीनगर, तसेच पिंपरी-चिंचवडमधील पिंपळे गुरव, पिंपळे सौदागर, आकुर्डी, थेरगाव आणि वाकड या परिसरात घरगुती गॅस उपलब्ध होणार आहे. यापैकी अनेक भागांमधील सुमारे साडेबारा हजार घरांमध्ये गॅसवाहिनीचे फीटिंग्ज तयार असून मुख्य पाइपलाइनचे काम होताच तेथे पीएनजी उपलब्ध होईल, असे तांबेकर यांनी सांगितले. शहर आणि पिंपरी-चिंचवड परिसरात सध्या सीएनजीचे ३१ पंप असून आणखी ४० पंपांसाठी टेंडर काढण्यात आली आहेत. मात्र, प्रत्यक्षात हे पंप सुरू होण्यासाठी सात ते आठ प्रकारच्या परवानगी मिळविण्यास सहा ते आठ महिन्यांचा कालावधी जातो, असे ते म्हणाले.

फायबरचा सिलिंडर ?

सध्या सीएनजीच्या पुरवठ्यासाठी लोखंडी सिलिंडरचा वापर होतो. त्यामुळे त्याचे वजन अधिक होते, आता त्याजागी फायबरचा सिलिंडर वापरण्याचा पर्याय पुढे आला असून त्याबाबत केंद्र सरकार आणि संबंधित उद्योगजगतामध्ये चर्चा सुरू आहे. त्याला मान्यता मिळाल्यास सिलिंडरचे वजन हलके होईल आणि त्याचे अनेक फायदे होतील, असे अरविंद तांबेकर यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


‘नाम’ला सव्वा कोटींची मदत

$
0
0

पिंपरी-चिंचवडकरांकडून भरघोस प्रतिसाद

म. टा. प्रतिनिधी, पिंपरी

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी पिंपरी-चिंचवडकरांनी सुमारे एक कोटी २९ लाख रुपयांचा निधी नाम फाउंडेशनला शनिवारी (तीन ऑक्टोबर) दिला. शहरातील ४५हून अधिक सामाजिक संस्थांनी एकत्रित येऊन हा निधी अभिनेते मकरंद अनासपुरे यांच्याकडे सुपूर्द केला.

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांचे अश्रू पुसण्यासाठी ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर आणि मकरंद अनासपुरे यांनी 'नाम' संस्थेची स्थापना केल्यानंतर त्यांना मदत करण्याचा संकल्प पिंपरी-चिंचवडकरांनी सोडला होता. त्याअंतर्गत निधी संकलनासाठी कलारंग सांस्कृतिक कलासंस्था, पिंपरी-चिंचवड सिटीझन फोरम, रोटरी क्लब ऑफ प्राधिकरण, कै. लक्ष्मीकांत बेर्डे फाउंडेशन यांच्यावतीने प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आला. अभिनेत्री मृणाल देव-कुलकर्णी, प्रिया बेर्डे, अभिनेते राहुल सोलापूरकर, संयोजक अमित गोरखे, 'नाम'चे ट्रस्टी डॉ. अविनाश पोळ, तुषार शिंदे, धनंजय शेडबाळे, वैभव घुगे, डॉ. महेश पाटील, अजय लंके या वेळी उपस्थित होते.

सामाजिक संस्थांनी एकत्रित येऊन २५ लाख रुपयांचा निधी उभारण्याचे ठरविले होते. प्रत्यक्षात भरघोस प्रतिसाद मिळाल्यामुळे केवळ एका आठवड्यात एक कोटी २९ लाख २८ हजार रुपये संकलित झाले. हा निधी महापालिकेचे आयुक्त राजीव जाधव यांच्या हस्ते अनासपुरे यांच्याकडे देण्यात आला.

अनासपुरे म्हणाले, 'आत्ममग्नतेतून बाहेर पडून समाजासाठी काहीतरी करावे या विचारातून चळवळ सुरू झाली. या फाउंडेशनची ठाणे, माटुंगा, पुणे, औरंगाबाद, अहमदनगर या ठिकाणी कार्यालये सुरू होणार आहेत; तसेच वैजापूर, वर्धा तालुक्यामध्ये कामाची सुरुवात झाली आहे. दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी काही वेगळ्या कल्पना असतील, तर जरूर फाऊंडेशनपर्यंत पोहोचवाव्यात.'

सांगीतिक कार्यक्रमात स्वप्नजा लेले, संदीप उबाळे, सुयश खटावकर यांनी गीते सादर केली. त्यांना कौस्तुभ देशपांडे यांनी साथ केली. चित्रकार मुकुंद वेदपाठक, विश्वेश पेठकर, अमित काटकर यांनीही कलाकृती सादर केल्या. वैभव घुगे यांनी प्रास्ताविक केले. मिलिंद कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पावसाने उपनगरांना झोडपले

$
0
0

सिंहगड रोड, कात्रज, पाषाणमध्ये जोरदार पाऊस

म. टा. प्रतिनिधी, पुणे

शहर आणि परिसरात शनिवारीही पावसाने कमी अधिक प्रमाणात हजेरी लावली. शहराच्या मध्यवर्ती भागापेक्षा उपनगरात पावसाचा जोर अधिक होता. लोहगाव, सिंहगड रोड, कात्रज, हडपसर, पाषाण यासारख्या उपनगरात जोरदार पाऊस झाला. शनिवारी रात्रीही पावसाच्या सरी पडल्या. दरम्यान, रविवारीही दुपारनंतर शहरात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे.

परतीच्या मार्गावर असलेल्या मान्सूनमुळे पुण्यासह राज्यात पाऊस होत आहे. शुक्रवारी जोरदार बसरल्यानंतर शनिवारी पावसाचा जोर तुलनेने कमी झाला. शहरात सकाळपासूनच काहीसे ढगाळ वातावरण होते. अधूनमधून मेघगर्जनाही होत होती. दुपारनंतर अंधारून येऊन पावसाला सुरुवात झाली. सिंहगड रोड, पाषाण, कात्रज या भागात जोरदार पाऊस झाला. दुपारी दोनच्या सुमारास सुमारे तासभर झालेल्या जोरदार पावसामुळे सिंहगड रोडवर अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणावर पाणी साचले होते. तर दोन दिवसात झालेल्या पावसाने पाषाण तलावही भरून वाहू लागला आहे. सायंकाळी साडेपाचपर्यंत लोहगाव येथे ८ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. तर मध्यवर्ती भागात केवळ ०.१ मिमी पाऊस नोंदला गेला. कोथरूड, कर्वेनगर, वारजेच्या काही भागात पावसाला जोर होता. रात्री उशिरा मध्यवर्ती भागात पावसाच्या काही सरींनी हजेरी लावली. दरम्यान, दोन दिवसातील पावसामुळे हवेतील उकाडा कमी होऊन काहीसा गारवा जाणवू लागला आहे.

शनिवारी राज्याच्या काही भागातही जोरदार पाऊस झाला. राज्यातील सर्वाधिक पावसाची नोंद महाबळेश्वर येथे (६० मिमी) झाली. सातारा येथे १८, नाशिक येथे १६, अहमदनगर येथे ५ मिमी, औरंगाबाद येथे २, उस्मानाबाद येथे एक मिमी पावसाची नोंद झाली. अन्यत्र तुरळक स्वरूपाचा पाऊस झाला.

पुढील दोन दिवसात कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात काही ठिकाणी तर विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे. तर दक्षिण कोकण, दक्षिण मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह मुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. पुण्यात दुपारनंतर मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे, असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

संमोहनाऐवजी तपासावर लक्ष द्यावे

$
0
0

डॉ. हमीद दाभोलकर यांची मागणी

म. टा. प्रतिनिधी, पुणे

कॉम्रेड गोविंद पानसरे, डॉ. नरेंद्र दाभोलकर, प्रा. डॉ. एम. एम. कलबुर्गी यांच्या खुनाच्या तपासावर लक्ष केंद्रित करण्याऐवजी संमोहनाला अवास्तव महत्त्व दिले जात आहे. त्याद्वारे जाणीवपूर्वक दिशाभूल करण्याचा प्रयत्न होत आहे. तपास यंत्रणांनी तपासावरच लक्ष केंद्रित करण्याची गरज आहे, अशी मागणी अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्य सरचिटणीस डॉ. हमीद दाभोलकर यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत केली.

अंनिसचे कार्याध्यक्ष अविनाश पाटील, प्रधान सचिव मिलिंद देशमुख, नंदिनी जाधव, श्रीपाल ललवाणी, परेश शहा, माधव बावगे आदी या वेळी उपस्थित होते.

'तिन्ही हत्यांच्या संदर्भात संपूर्ण तपासात संमोहन हा कटाचा केवळ एक भाग आहे. संमोहनापेक्षा हिंसक कारवाया करण्यासाठी मानवी मनाचे कट्टरीकरण करण्याची प्रवृत्ती अत्यंत घातक आहे. याचे गांभीर्य समाजासमोर आले पाहिजे. श्याम मानव आणि सनातन संस्थेमधील आरोप-प्रत्यारोपामुळे तपास यंत्रणांची दिशाभूल होत आहे,' असे डॉ. हमीद यांनी सांगितले.

'उघडपणे हिंसक, राष्ट्रविघातक आणि संविधानविरोधी भाषा, लिखाण आणि वर्तन याचा इतिहास असणाऱ्या संघटनांबद्दल राज्य सरकारने आपली नेमकी भूमिका स्पष्ट करावी. सनातनवर बंदी घालण्याविषयी राज्य सरकारने पूर्वीच केंद्र सरकारला पत्र पाठवले होते. त्यावर पुढे काय कार्यवाही झाली हे स्पष्ट करावे,' असेही डॉ. हमीद यांनी सांगितले.

'कॉ. पानसरे यांच्या खुनाच्या तपासात हाती लागलेल्या माहिती आणि पुराव्यांच्या आधारे डॉ. नरेंद्र दाभोलकर आणि प्रा. कलबुर्गी यांच्या खुनासंदर्भात देखील निश्चित धागेदोरे मिळू शकतील, तपास यंत्रणांनी त्या दृष्टीने तपास करावा,' असे अविनाश पाटील यांनी सांगितले. दरम्यान, अंनिसतर्फे सलग दहाव्या वर्षी यंदाही फटाके व प्रदूषणमुक्त दिवाळी उपक्रम राबविण्यात येणार आहे. त्याची रूपरेषा लवकरच स्पष्ट करण्यात येईल, असे सांगण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘एक्स्प्रेस वे’वर हजार कोटींची वाढीव लूट

$
0
0

कंत्राटदारांचीच तिजोरी भरणार

म. टा. प्रतिनिधी, पुणे

अपेक्षित वाहनसंख्येचा अंदाज काढताना वास्तवापासून फारकत घेतल्याने पुणे-मुंबई 'एक्स्प्रेस वे'च्या टोलच्या रकमांनी कंत्राटदारांची तिजोरी भरणार असून, सर्वसामान्यांचा खिसा मात्र हलका होणार आहे. या वाहनसंख्येनुसार मुदतीपूर्वी दोन वर्षे, म्हणजे २०१७ पर्यंतच कंत्राटदाराच्या देय रकमेची पूर्तता होणार आहे. मात्र, त्यानंतरही कराराप्रमाणे टोलवसूली सुरू राहिल्यास सर्वसामान्यांना सुमारे एक हजार कोटी रुपयांच्या जादा रकमेची चाट बसणार आहे.

माहितीच्या अधिकारातून ही बाब उघडकीस आली आहे. एक्स्प्रेस वेवर दरड कोसळून अपघात आणि वाहतूक कोंडी झाल्यानंतर रस्त्याच्या देखभाल दुरूस्तीची जबाबदारी कोणाची, हा प्रश्न अनु्त्तरित राहिल्याने या सर्व बाबी उजेडात येत आहेत. सजग नागरिक मंचाचे विवेक वेलणकर यांनी माहिती अधिकारात केलेल्या अर्जानंतर एक्स्प्रेस वेसह सार्वजनिक आणि खासगी भागीदारीतून (पीपीपी) उभारलेल्या सर्व प्रकल्पांची टोल कंत्राटे आणि अन्य तपशील वेबसाइटवर प्रसिद्ध करण्याचा आदेश माहिती आयुक्त रत्नाकर गायकवाड यांनी दिला. त्यानंतर राज्य रस्ते विकास महामंडळाने तुकड्यातुकड्याने ही माहिती प्रसिद्ध केली. त्यामध्ये पुणे-मुंबई एक्स्प्रेसवे सुरू झाल्यापासून टोलच्या अपेक्षित रकमा आणि प्रत्यक्षातील उत्पन्नची आकडेवारी शनिवारी प्रसिद्ध झाली आहे. त्यानुसार येत्या २०१८ पर्यंत टोलद्वारे २८६९ कोटी रुपये जमा होणे अपेक्षित आहे. त्यापैकी तब्बल दोन हजार ३०६ कोटी रुपये गेल्या ऑगस्टपर्यंतच जमा झाले असून आता केवळ ५६३ कोटी रुपये बाकी आहेत.

टोल कंत्राट करताना अपेक्षित वाहनसंख्या आणि अपेक्षित टोलची रक्कम यांचे अंदाज काढण्यात आले असून या अंदाजित रकमेपेक्षा प्रत्यक्षात वसूल होणारी टोलची रक्कम अधिक असल्याचे या आकडेवारीतून समोर आले आहे. याच गतीने वसुली सुरू राहिली, तर मार्च २०१७ पर्यंतच अपेक्षित २८६९ कोटी रुपये वसूल होणार आहेत. त्यानंतरही वसुली सुरू राहिल्यास वाहनचालकांना सुमारे एक हजार कोटी रुपयांचा अतिरिक्त भुर्दंड बसण्याची भीती आहे.

अपेक्षेहून अधिक टोलवसुली

२००४ ते ६ या पहिल्या दोन वर्षांमध्ये टोलच्या रकमेची अपेक्षेपेक्षा कमी वसुली झाली. त्यानंतर आतापर्यंत दरवर्षी टोलची वसुली अपेक्षित रकमेपेक्षा मोठ्या प्रमाणात वाढलेली आढळून आले आहे. गेल्या काही वर्षांत तर प्रत्यक्षातील वसुली अपेक्षेपेक्षा ९० ते १०० कोटी रुपयांनी अधिक आहे.
......
छोट्या वाहनांना वगळा

टोलच्या करारानुसार अपेक्षित रक्कम मार्च २०१७ पर्यंतच वसूल होणार आहे. त्यामुळे राज्य सरकारच्या धोरणानुसार त्यानंतर छोट्या वाहनांना आणि एसटीला टोलमधून सूट द्यावी, अशी मागणी सजग नागरिक मंचाचे विवेक वेलणकर यांनी राज्य सरकारकडे केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भाषा केंद्राचे घोंगडे ‘अभिजात’ मुळे भिजत

$
0
0

पुणे : महाराष्ट्रातील ऐतिहासिक संशोधन संस्था म्हणून ख्याती असलेल्या भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्थेमध्ये मराठी भाषा केंद्र सुरू करण्यासाठी सर्व तयारी झालेली असताना दीड वर्षांनंतरही या कामास फारसा वेग आलेला नाही, त्यास कारण ठरले आहे ते मराठीच्या 'अभिजात'करणाचे ! केंद्र सरकारकडे मराठीच्या अभिजात भाषेच्या दर्जाचे घोंगडे भिजत असल्याने भाषा केंद्र हा प्रकल्प अद्याप आकार घेऊ शकलेला नाही.

भांडारकर संस्थेच्या भारतीय भाषा अध्ययन विभागातर्फे अभिजात मराठी भाषा अभ्यास केंद्राची स्थापना करण्याचा निर्णय संस्थेच्या नियामक मंडळाच्या बैठकीत घेण्यात आला होता. या केंद्राच्या प्रमुखपदी प्रा. हरी नरके यांची नियुक्ती करण्यात आली होती.

राज्य सरकारने स्थापलेल्या अभिजात मराठी भाषा समितीतर्फे करण्यात आलेल्या मराठीच्या अभिजातविषयक संशोधनात भांडारकर संस्थेचा प्रमुख सहभाग होता. संस्थेतर्फे प्रा. नरके यांच्यासह प्रा. श्रीकांत बहुलकर, प्रा. मैत्रेयी देशपांडे आदींनी हा प्रस्ताव तयार करण्यात सहकार्य केले होते. मराठीला अभिजात भाषेचा दर्जा अद्याप मिळाला नसल्याने साधारण दीड वर्षानंरही या कामास फारसा वेग येऊ शकलेला नाही. तमीळ, संस्कृत, तेलगु, कन्नड, उडिया आणि मल्याळम या भाषांना अभिजात दर्जा मिळाला आहे. प्रा. रंगनाथ पठारे यांच्या अध्यक्षतेखाली शासनाने अभिजात मराठी भाषा समिती नेमली होती. या समितीने जुलै २०१३ मध्ये १२७ पानांचा अहवाल तयार केला. या पार्श्वभूमीवर संस्थेचे विश्वस्त राहुल सोलापूरकर यांच्याकडे विचारणा केली असता, ते म्हणाले, 'भाषा केंद्रासाठी काम सुरू आहे; मात्र केंद्र सरकारकडून मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळण्याच्या प्रतीक्षेत आम्ही आहोत,' अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली. याबाबतीत प्रा. हरी नरके यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.

कार्यालयीन कामकाजही मराठीत

मराठी भाषा अभ्यास केंद्राबरोबरच भांडारकर संस्थेचे कार्यालयीन कामकाजही मराठीतून सुरू झाले आहे. यापूर्वी संस्थेची कार्यालयीन भाषा इंग्रजी होती. या निर्णयामुळे आता पत्रव्यवहार, भाषणे, बैठकीचे मुद्दे यांसह इतर कार्यालयीन कामकाज मराठीतून होऊ लागले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सर्व बांधकाम प्रकल्प आज बंद

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

क्रेडाई पुणे मेट्रो या बांधकाम व्यावसायिकांच्या संघटनेतर्फे आज (मंगळवारी) सर्व बांधकाम प्रकल्पांची कामे बंद ठेवण्यात येणार आहेत. त्याचबरोबर जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चाही काढण्यात येणार आहे. ठाण्यातील बांधकाम व्यावसायिकाच्या आत्महत्येच्या पार्श्वभूमीवर सरकारच्या काही धोरणांचा निषेध करण्यासाठी हे आंदोलन पुकारण्यात आले आहे.

संघटनेतर्फे सकाळी दहा वाजल्यापासून पूना क्लबपासून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चा काढण्यात येणार आहे. क्रेडाई पुणे मेट्रोचे अध्यक्ष शांतीलाल कटारिया व अन्य सदस्य आपल्या मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांकडे देणार आहेत. बांधकाम प्रकल्पांबरोबरच व्यावसायिकांची कार्यालयेही बंद ठेवण्यात येणार आहेत. ठाण्यातील बांधकाम व्यावसायिक सूरज परमार यांच्या आत्महत्येनंतर बांधकाम व्यावसायिकांमध्ये दुःखाचे व नाराजीचे वातावरण आहे. सरकारच्या काही धोरणांमुळे बांधकाम व्यावसायिक त्रस्त झाले आहेत. तशी नोंद परमार यांनी आपल्या सुसाइड नोटमध्येही केली होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

घटस्थापना करा बारापर्यंत

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

अश्विन शुद्ध प्रतिपदा म्हणजेच नवदुर्गांच्या उत्सवाला आजपासून (१३ ऑक्टोबर) प्रारंभ होत आहे. सूर्योदयापासून दुपारी १२ वाजेपर्यंत घटस्थापना करता येणार असल्याची माहिती 'शारदा ज्ञानपीठम'चे संस्थापक पं. वसंतराव गाडगीळ यांनी दिली.

दुर्गा, शैलपुत्री, ब्रह्मचारिणी, महिषासूरमर्दिनी, महाकाली अशा विविध अवतारांत नऊ दिवस युद्ध करून राक्षसांचा वध करणाऱ्या शक्तीदेवतेच्या उत्सवात पुणेकरांना संस्कृती, परंपरा आणि धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल अनुभवायला मिळणार आहे. विविध संस्था-संघटनांच्या वतीने नऊ दिवस रास, गरबा, महाभोंडला असे वैविध्यपूर्ण सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. बंगाली समाजाच्या 'बंगिया संस्कृती संसद' संस्थेने खाद्यजत्रा, बंगाली संस्कृतीचे दर्शन घडवणाऱ्या महोत्सवाचे आयोजन केले आहे. नवरात्रौत्सव समितीने आयोजित केलेले वैविध्यपूर्ण कार्यक्रम आणि स्पर्धांमुळे सहकारनगर भागातील महोत्सव जल्लोषात साजरा केला जाणार आहे.

'अभ्यंगस्नान करून पूजाविधी झाल्यावर घटस्थापना करावी. सूर्योदपासून बारा वाजेपर्यंत घटस्थापना आणि त्यानंतर श्रीसूक्त, नवचंडीपाठ, सप्तशतीपाठ हे धार्मिक कार्यक्रम करावेत. यंदा प्रतिपदा दोन दिवस असून, नवमी व दशमी एकाच दिवशी आली आहे,' असेही गाडगीळ यांनी सांगितले.

मंदिरांना रंगरंगोटी, रोषणाईची सजावट

नवरात्रीनिमित्त पुण्याचे ग्रामदैवत असलेली तांबडी जोगेश्वरी, पिवळी आणि काळी जोगेश्वरी मंदिरांना रंगरंगोटी आणि सजावट करण्यात आली आहे. पुढील नऊ दिवस या मंदिरांमध्ये दिवसभर धार्मिक कार्यक्रम होणार आहेत. भवानी पेठेतील भवानी माता, चतुःश्रृंगी पद्मावती मंदिर, तळजाई येथील देवी, कात्रजमधील संतोषीमाता, कोथरूड येथील भवानीमाता, सारसबागेजवळील महालक्ष्मी मंदिर यांसह शहरातील प्रमुख मंदिरांमध्येही नऊ दिवस धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. भाविकांच्या सुरक्षेसाठी या मंदिरांमध्ये सुरक्षारक्षक, सीसीटीव्ही आदी यंत्रणाही कार्यान्वित करण्यात आली आहे.

खरेदीसाठी बाजारपेठ फुलली

झेंडू, शेवंती, अस्टर अशी रंगीबेरंगी फुले आणि पूजा साहित्याने सजलेल्या मंडईसह उपनगरातील बाजारपेठ ग्राहकांनी फुलून गेली होती. घटस्थापनेच्या पूजेच्या तयारीसाठी सकाळपासूनच महिला काळी माती, टोपली, पंचकडधान्य, मंडपी अशा साहित्याच्या खरेदीत व्यग्र होत्या. मंडई, मार्केट यार्डसह कोथरूड, डेक्कन, सिंहगड रोड, हडपसर आदी परिसरांतील बाजारपेठांमध्ये महिलांची रात्री उशीरापर्यंत लगबग सुरू होती. सोसायट्यांमध्ये राहणाऱ्यांना काळी माती उपलब्ध होत नसल्याने अनेकांनी काळी माती विकत घेणे पसंत केले, तर काही घरांत घट बसवताना देवीच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यासाठी मूर्ती खरेदी करण्यात आली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


बोपखेलकरांचा तरंगता पूल काढणार

$
0
0

'पर्यायी रस्त्याची जबाबदारी जिल्हाधिकारी, पालिकेची'

म. टा. प्रतिनिधी, पुणे

'बोपखेल येथे तात्पुरत्या स्वरुपात उभारण्यात आलेला तरंगता पूल लवकरच काढण्यात येणार आहे. त्यानंतर नागरिकांच्या सोईसाठी पर्यायी रस्ता उपलब्ध करण्याची जबाबदारी जिल्हाधिकारी व पिंपरी चिंचवड महापालिकेची आहे,' असे लष्कराने सोमवारी स्पष्ट केले. त्यामुळे बोपखेलकरांना आता कोणता रस्ता उपलब्ध करावा, असा पेच उभा राहिला आहे.

बोपखेल गावातून पिंपरी-चिंचवड शहराला जोडणारा लष्करी अभियांत्रिकी महाविद्यालयातून (सीएमई) जाणारा रस्ता 'सीएमई'ने बंद केला. त्यामुळे नागरिकांना मोठा वळसा घालावा लागत आहे. त्यातून हा वाद चिघळल्याने दगडफेक, लाठीमार आणि गोळीबाराचा प्रकार घडला. त्यानंतर अनेक बैठका होऊन सीएमईने बोपखेलच्या नागरिकांसाठी बोपखेल ते खडकीतील ५१२ डेपो असा तरंगता पूल उभारला. नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर या रस्त्याचा वापर सुरू केला आहे. मात्र, हा पूल लष्कराच्या नेहमीच्या वापरातील पूल असून सरावासह इतर मोहिमांमध्येही या पुलाचा वापर होतो; तसेच देखभाल-दुरुस्तीसाठी मोठ्या प्रमाणावर मनुष्यबळ कार्यरत आहे. लष्कराला प्रशिक्षण व अन्य मोहिमांसाठी या पुलाची गरज असून, लवकरच तो काढून घेण्यात येईल, असा पवित्रा सीएमईने घेतला आहे. या संदर्भातील याचिकेवरील सुनावणीदरम्यान मुंबई हायकोर्टाने सीएमईची जमीन लष्करासाठी

अत्यंत महत्त्वाची ए वन गटातील जमीन असल्यामुळे हा रस्ता नागरिकांसाठी खुला करता येणार नसल्याचे स्पष्ट केले होते; तसेच जिल्हा प्रशासन व महापालिकेने त्वरित पर्यायी रस्त्याच्या कामास सुरुवात करावी, असे आदेश दिले होते. त्यानुसार लवकरच लष्करातर्फे तरंगता पूल काढून घेण्यात येईल. त्यानंतर पर्यायी रस्त्याची व्यवस्था करण्याची जबाबदारी जिल्हाधिकारी व महापालिकेची असेल, असेही लष्करातर्फे स्पष्ट करण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वीज अभियंत्याला लाच घेताना अटक

$
0
0

पुणे : नवीन वीज मीटर जोडणीसाठी पंधरा हजारांची लाच घेताना देहू गाव येथील राज्य विद्युत वितरण कंपनीच्या सहायक अभियंत्याला सोमवारी अटक करण्यात आली. त्याच्यावर लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यानुसार देहूरोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सतीश साहेबराव केदार (वय २५, रा. त्रिवेणीनगर, निगडी) असे अटक केलेल्या सहायक अभियंत्याचे नाव आहे. तक्रारदाराची देहू येथे घराची बांधकाम साइट सुरू आहे. या ठिकाणी नवीन वीज मीटर घेण्यासाठी त्यांनी केदार याच्याकडे अर्ज केला होता. नवीन वीज मीटर जोडणीसाठी केदारने तक्रारदाराकडे पैशाची मागणी केली. मात्र, त्यांना पैसे द्यायचे नसल्यामुळे त्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तेजस मोरे यांच्यावर गुन्हा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

पाच वर्षांच्या मुलाचा खून करून आईने आत्महत्या केल्याप्रकरणी पोलिसांनी तिचे पती तेजस मोरे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे; मात्र हा गुन्हा केवळ तपासाचा भाग म्हणून दाखल करण्यात आला असून, तपासाअंती त्याबाबत अंतिम निर्णय घेण्यात येईल, असे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.

माणिकबाग परिसरात राहणाऱ्या आणि आयटी इंजिनीअर असलेल्या मोरे दाम्पत्याच्या आयुष्यात रविवारी वादळ आले. दीप्तीने नैराश्यातून आपल्या पाच वर्षांच्या

मुलाच्या नसा कापून खून केला आणि नंतर तिनेही गच्चीवरून उडी मारून आत्महत्या केली. 'पोलिसांनी घटनास्थळी दीप्तीची 'सुसाइड नोट' मिळाली आहे. त्यात अर्णवला संपवण्यात आल्याचा उल्लेख असल्याने, प्राथमिक संशयानुसार तिच्यावर गुन्हा दाखल झाला, तर दीप्तीच्या मृत्यूप्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. अर्णवच्या खुनाप्रकरणी दीप्ती आणि तेजस दोघांवरही गुन्हा दाखल केला आहे. तपासाअंती यावर निर्णय घेतला जाईल,' अशी माहिती पोलिस उपायुक्त डॉ. सुधाकर पठारे यांनी दिली.

तेजस घरात असताना घडलेल्या घटनांचा धक्का सहन न झाल्याने त्याला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. सिंहगड रोड पोलिस ठाण्याचे पोलिस कर्मचारी विकास मते यांनी तक्रार दाखल केली आहे. 'मयत आई दीप्ती किंवा वडील तेजस अंकुश मोरे ​किंवा दोघांनी मिळून अर्णवचा गळा दाबून व हाताची नस कापून ठार मारले असल्याने म्हणून माझी दोघांविरुद्ध भारतीय दंड संहिता कलम ३०२, ३४ प्रमाणे कायदेशीर फिर्याद आहे,' असे या फिर्यादीत म्हटले आहे.

तेजस यांच्यावर गुन्हा का?

सुसाइड नोट हा भक्कम पुरावा असला, तरी हस्ताक्षर तपासणीनंतरच त्यावर निर्णय होईल. परिस्थितीजन्य पुराव्यांच्या आधारे दीप्तीने आत्महत्या केल्यास दुजोरा मिळाल्याने तिच्या मृत्यूप्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद झाली. अर्णवचा खून गळा दाबून आणि नसा कापून झाल्याचा प्राथमिक वैद्यकीय अहवाल आहे. घटना घडली तेव्हा घरात असलेल्या दीप्ती, तेजस आणि अर्णव तिघांपैकी दीप्ती आणि अर्णवचा मृत्यू झाला. सद्यस्थितीत तरी तेजस यांच्याविरुद्ध कुठलेही पुरावे आलेले नाहीत. तपासाअंती हीच परिस्थिती राहिली तर खुनाचा गुन्हाही दप्तरी दाखल करण्यात येईल, म्हणजेच रद्द करण्यात येईल.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पुलाचा कॉलम कोसळला

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

शहरात रविवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे नीलायम थिएटरमागे असलेल्या श्री‌ लक्ष्मीनारायण टॉवर्स सोसायटीला जोडणाऱ्या आंबिल ओढ्यावरील पुलाचा कॉलम कोसळला. हा पूल खचल्याने या पुलाचा वापर वाहनांसाठी बंद करण्यात आला आहे. सिंहगड रोडवरून साने गुरुजी स्मारकाजवळून श्री लक्ष्मीनारायण टॉवर्सकडे जाण्यासाठी मुख्य रस्ता आहे. ही इमारत आंबिल ओढ्याला लागूनच आहे.

या इमारतीतील रहिवाशांना काही मीटर अंतरावर असलेल्या नीलायम थिएटरसमोरील रस्त्याकडे येण्यासाठी संबंधित बिल्डरने आठ वर्षांपूर्वी आंबिल ओढ्यावर हा पूल बांधला आहे. रविवारी रात्री झालेल्या जोरदार पावसामुळे ओढ्याला पूर आला. पाण्याच्या लोंढ्यामुळे पुलाच्या दोन कॉलमपैकी एक कॉलम कोलमडून पडला. यामुळे पुलाला ठिकठिकाणी तडे गेले आहेत. सोमवारी सकाळी हा प्रकार लक्षात आल्यानंतर पूल वाहनांसाठी बंद करण्यात आला. पालिकेचे अतिरिक्त आयुक्त ओमप्रकाश बकोरिया, स्थानिक नगरसेवक धनंजय जाधव यांनी पुलाची पाहणी केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘स्पायसर’मध्ये जमीन घोटाळा

$
0
0

मूळ संस्थेच्या परवानगीविना बक्षीसपत्र केल्याचे उघड

Sujit.Tambade@timesgroup.com

पुणे : राज्यातील पाहिले खासगी विद्यापीठ असलेल्या औंध येथील 'स्पायसर अॅडवेंटिस्ट विद्यापीठा'ची सुमारे १६.३१ एकर जागा एका माजी कुलगुरूंनी बक्षिसपत्राद्वारे 'सेव्हन्थ डे अॅडवेंटिस्ट' या मूळ संस्थेच्या परवानगीविनाच विद्यापीठाच्या कुलगुरूंच्या नावावर केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. राज्य सरकारच्या अंतिम मान्यतेच्या प्रतीक्षेत असलेले हे विद्यापीठ या जमीन घोटाळ्यामुळे आता अडचणीत आले आहे.

मूळची ही जागा 'सिंधिया देवस्थान ट्रस्ट, पूना' या संस्थेची होती. महादजी शिंदे यांच्या काळातील ही जमीन असून, ती सामाजिक आणि शैक्षणिक उपक्रम राबविण्यासाठी 'सेव्हन्थ डे अॅडवेंटिस्ट' या संस्थेला दान करण्यात आली. राज्य सरकारतर्फे 'स्पायसर अॅडवेंटिस्ट विद्यापीठ' स्थापन करण्याचे राजपत्र २४ जून २०१४ रोजी प्रसिद्ध करण्यात आले. संबंधित विद्यापीठाकडे किमान १५ एकर जागा असणे आवश्यक होते. औंधमधील ही जागा विद्यापीठाच्या नावावर असल्याचे दाखविण्यासाठी जागेची संशयास्पद नोंदणी करण्यात आल्याचे या संस्थेच्या मुंबई येथील कार्यालयातील कर्मचारी आर. जॉन्सन यांनी माहितीच्या अधिकारात घेतलेल्या माहितीवरून उघडकीस आले आहे.

'विद्यापीठ सुरू करण्यासाठी संस्थेची परवानगी मिळण्यात अडथळे येत असल्याने विद्यापीठाचे तत्कालीन कुलगुरू डॉ. जस्टस देवदास यांनी आपणच 'इंडिया फायनान्शियल असोसिएशन ऑफ सेव्हन्थ डे अॅडवेंटिस्ट्स' या विभागाचे अध्यक्ष असल्याचे दाखविले; तसेच या जमिनीच्या व्यवहाराचे सर्वाधिकार संस्थेने स्वतःला दिल्याचे भासविले,' असे आर. जॉन्सन यांनी सांगितले.

'इंडिया फायनान्शियल असोसिएशन ऑफ सेव्हन्थ डे अॅडवेंटिस्ट्स' या संस्थेचे २०१४ मध्ये डॉ. देवदास हे अध्यक्ष नव्हते, तर तमिळनाडू येथील आर. जॉन हे अध्यक्ष होते. त्यामुळे बक्षीसपत्राच्या नोंदीसाठी सादर केलेली कागदपत्रे संशयास्पद असल्याचा आरोप जॉन्सन यांनी केला आहे. विद्यमान कुलगुरू डॉ. नोबेल पिल्ले यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनीही या विषयावर बोलण्यास असहमती दर्शविली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images