Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

आता कलावंत-तंत्रज्ञ संपावर

$
0
0

पंचवार्षिक करारावरून कलावंत व निर्माता संस्थांमध्ये वाद

म. टा. प्रतिनिधी, पुणे

फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडियातील विद्यार्थ्यांचा गेल्या तीन महिन्यांपासून संप सुरू असताना, आता चित्रपट आणि टीव्ही मालिकांशी संबंधित अडीच लाख कलाकार-तंत्रज्ञही बेमुदत संपावर गेले आहेत. कलावंत-तंत्रज्ञांसाठी कार्यरत असलेल्या फेडरेशन ऑफ वेस्टर्न इंडिया सिने एम्प्लॉइजच्या मागण्या निर्मात्यांच्या संघटनांना मान्य नसल्याने हा संप सुरू झाला असून, चित्रपट व मालिकांची चित्रीकरणे तीन ऑक्टोबरपासून ठप्प होणार आहेत.

फेडरेशन ऑफ वेस्टर्न इंडिया सिने एम्प्लॉइजचे अध्यक्ष कमलेश पांडे यांनी 'मटा'ला याबाबत माहिती दिली. चित्रपट, टीव्ही मालिकांच्या निर्मात्यांची असोसिएशन (इम्पा, प्रोड्यूसर्स गिल्ड) आणि फेडरेशन ऑफ वेस्टर्न इंडिया सिने एम्प्लॉइज (एफडब्ल्यूआयसीए) या दोन संस्थांमध्ये दर पाच वर्षांनी करार केला जातो. त्यात कलाकार-तंत्रज्ञांचे मानधन, आरोग्य योजनांसंदर्भात नियम ठरवले जातात. यापूर्वी २०१०मध्ये करण्यात आलेला करार अलीकडेच संपुष्टात आला. त्यामुळे नवीन करार केला जाणार आहे. नव्या करारासाठी निर्मात्यांच्या असोसिएशनने केलेल्या चर्चेत काहीच समाधानकारक बाबी नव्हत्या. त्यामुळे एफडब्ल्यूआयसीएने या सर्व कलाकार तंत्रज्ञांच्या कल्याणाचा विचार असलेला कराराचा मसुदा १६ मार्चला निर्मात्यांच्या असोसिएशनकडे पाठवला. मात्र, वारंवार आठवण करूनही त्यांच्याकडून काहीच प्रतिसाद आला नाही. त्यामुळे एफडब्ल्यूआयसीएने एक ऑक्टोबरपासून बेमुदत संपाची हाक दिली असून, तीन ऑक्टोबरपासून सर्व चित्रीकरणे थांबणार आहेत.

'करार करण्यावरून सुरू असलेल्या वादामुळे सहा मेपासून संप करण्यात येणार होता. त्या वेळी निर्मात्यांकडून मानधनात १३ टक्के वाढ मान्य करण्यात आल्यावर संप मागे घेण्यात आला. मात्र, आता परिस्थिती वेगळी आहे. वारंवार लक्ष वेधूनही करार, मागण्यांचा निर्मात्यांकडून विचार केला जात नाही. त्यामुळे बेमुदत संप करण्यावाचून पर्याय उरलेला नाही,' असे पांडे यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


दोन विद्यार्थिनी जखमी

$
0
0

पुणे : भरधाव मोटारीने दुचाकीवरून जाणाऱ्या दोन महाविद्यालयीन तरुणींना धडक दिल्याने त्या जखमी झाल्या. सणस मैदानाजवळील कल्पना हॉटेलसमोर शुक्रवारी दुपारी हा अपघात झाला. या प्रकरणी स्वारगेट पोलिसांनी मोटारचालकास अटक केली आहे.

निखिल बबन पवार (वय २५, रा. कर्वेनगर) असे अटक करण्यात आलेल्या चालकाचे नाव आहे. या प्रकरणी मानसी गोपाल झंवर (वय २०, रा. सुभाषनगर, मूळ रा. सोलापूर) या तरुणीने तक्रार दिली आहे. मानसी आणि तिची मैत्रीण स्नेहल प्रसाद बेलापूरकर (वय २१, रा. सुभाषनगर) या दोघी दुचाकीवरून दांडेकर पुलाच्या दिशेने जात होत्या. त्या वेळी पवार हा त्याच्या झेन मोटारीतून दांडेकर पुलाकडून स्वारगेटच्या दिशेने भरधाव वेगात जात होता. कल्पना हॉटेलजवळ त्यांच्या दुचाकीला पवारच्या मोटारीने धडक दिली. पळून जाणाऱ्या मोटारचालकास नागरिकांनी पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नवे रिक्षा परवाने नकोत

$
0
0

पुण्यात रिक्षा पंचायतीची राज्य सरकारकडे मागणी

म. टा. प्रतिनिधी, पुणे

पुणे व पिंपरी-चिंचवड शहरातील रिक्षांची संख्या ५० हजारांच्या जवळपास आहे. सध्या शहराच्या मागणीचा विचार करता ते प्रमाण गरजेपेक्षा अधिक आहे. राज्य सरकार नव्याने देत असलेले परवाने पुण्यात वितरित करण्यात येऊ नये, अशी मागणी रिक्षा पंचायतीने राज्याचे परिवहन सचिव व परिवहन आयुक्तांकडे केली आहे.

राज्य सरकारने गेल्या महिन्यात नवीन परवाने देण्याची घोषणा केली. एक ऑक्टोबरपासून त्या परवान्यांच्या वाटपाची प्रक्रिया सुरू झाली आहे. मुंबई महानगर क्षेत्रामध्ये अडीच, तर अन्य शहरांमध्ये सध्याच्या परवान्यांच्या संख्येच्या २५ टक्के नवे परवाने देण्यात येणार आहेत. पुण्यात एक लाख लोकसंख्येला आठशे रिक्षांचे प्रमाण परिवहन विभागाने दिले आहे. नवे परवाने दिल्यास आणखी रिक्षा रस्त्यावर येऊन शहराच्या रिक्षाचालकांच्या व्यवसायावर परिणाम होईल, असे पंचायतीचे म्हणणे आहे.

राज्यातील प्रत्येक शहराची वाहतुकीची स्थिती वेगळी आहे. त्यामुळेच स्थानिक पातळीवर निर्णय घेण्यासाठी प्रादेशिक परिवहन विभाग आहेच. परवाने वाढविण्याचा निर्णय घेताना प्राधिकरणाची शिफारस घेतली होती का? हा निर्णय घेताना काही शास्त्रीय आधार घेतला का? सरसकट २५ टक्के परवाने देण्यामुळे वाहतूक व्यवस्थेचे तीन-तेरा वाजतील त्याचे काय, असे विविध प्रश्न पंचायतीचे सरचिटणीस नितीन पवार यांनी उपस्थित केले आहेत.

'परमिट नूतनीकरण करावे'

दरम्यान, रिक्षाच्या जुन्या परमिटचे मुदतीत नूतनीकरण न केलेल्या रिक्षांच्या परमिटचेही एक ऑक्टोबरपासून नूतनीकरण करण्यात येईल, असे परिवहन विभागाने स्पष्ट केले होते. मात्र, प्रत्यक्षात त्याची प्रक्रिया सुरू झालेली नाही, असे रिक्षा फेडरेशनचे बापू भावे यांनी सांगितले. रिक्षाचालकांकडून दंड आकारून लवकरात लवकर परमिटचे नूतनीकरण करावे, अशी मागणी त्यांनी केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘कँटोन्मेंट’ स्मशानभूमीत विद्युतऐवजी गॅसदाहिनी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

पुणे कँन्टोन्मेंट बोर्डाच्या धोबीघाट येथील स्मशानभूमीत असलेल्या विद्युतदाहिनीच्या देखभाल-दुरुस्तीचा खर्च वाढत असल्याने या स्मशानभूमीत गॅसदाहिनी बसविण्यात येणार आहे.

याबाबतचा प्रस्ताव बोर्डाच्या सर्वसाधारण सभेत दाखल करण्यात येणार आहे. बोर्डाची धोबीघाट येथे स्मशानभूमी असून, सध्या या स्मशानभूमीत विद्युतदाहिनी आहे. मात्र, विद्युतदाहिनीचा देखभाल आणि दुरुस्तीचा खर्च वाढत आहे. त्यामुळे गॅसदाहिनी बसविण्याची सूचना नगरसेवकांनी वित्त समितीच्या बैठकीत मांडली. त्यानुसार याबाबतचा प्रस्ताव दाखल करण्यात येणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

विद्युतदाहिनीच्या देखभाल आणि दुरुस्तीसाठी बोर्डाने टेंडर काढले होते. त्यासाठी दोन कंत्राटदारांनी टेंडर भरले. त्यांनी ३० ते ३२ लाख रुपयांचा खर्च अपेक्षित धरला आहे. आतापर्यंत बोर्डाला विद्युतदाहिनीसाठी वर्षाला सुमारे वीस लाख रुपये लागतात. विद्युतपुरवठा खंडित झाल्यानंतर जनरेटरवर विद्युत दाहिनी चालविली जाते. त्यासाठी डिझेलचा खर्च बोर्डाला करावा लागतो. त्यामुळे विद्युतदाहिनीऐवजी गॅसदाहिनी बसविण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कात्रज डेअरीतील कर्मचाऱ्याचा खून

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

कात्रज डेअरी येथे काम करणाऱ्या एका कर्मचाऱ्याचे अपहरण करून त्याचा निर्घृण खून करण्यात आला आहे. त्याचा मृतदेह पौड घाट परिसरात टाकून देण्यात आला होता. या प्रकरणी भारती विद्यापीठ पोलिसांनी एकाला अटक केली आहे. त्याच्या चार साथीदारांचा शोध सुरू आहे. उसन्या पैशाच्या वादातून हा खून केल्याचे तपासात समोर आले आहे.

सनी राजू भेगडे (वय २६, रा. प्रतीक हाइट्स, नऱ्हे) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. त्याचा खून केल्याप्रकरणी किशोर उर्फ भावड्या शेडगे (रा. सर्व्हे नं. १३०, दांडेकर पूल) याला अटक करण्यात आली आहे. त्याच्या चार साथीदारांचा शोध सुरू आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भेगडे कात्रज डेअरीमध्ये नोकरीला होता. आरोपी किशोर आणि त्याचे चार साथीदार भेगडेचे मित्र होते. काही दिवसांपूर्वी भेगडेने हातउसने पैसे घेतले होते. त्या पैशांवरून आरोपींसोबत त्याची वादावादी झाली होती. २९ सप्टेंबर रात्री दहाच्या सुमारास किशोर आणि त्याचे साथीदार कात्रज डेअरीजवळ आले. त्या वेळी भेगडे रात्रपाळीला कामावर होता. आरोपींनी त्याला बाहेर बोलावून घतले. पार्टीला म्हणून त्याला पौड येथे घेऊन गेले. पौड घाटापासून काही अंतरावर असलेल्या एका हॉटेलमध्ये या सर्वांनी जेवण केले. त्यानंतर आरोपींनी भेगडेवर चॉपरने वार करून त्याचा खून केला. हॉटेलपासून काही अंतरावर असलेल्या चेंबरमध्ये भेगडेचा मृतदेह टाकून आरोपी पसार झाले.

भेगडे बेपत्ता झाल्याची तक्रार त्याच्या कुटुंबीयांनी भारती विद्यापीठ पोलिसांकडे दिली होती. या तक्रारीवरून पोलिसांनी भेगडेचा शोध सुरू केला. त्या वेळी पोलिसांना भेगडेचा खून झाला असून तो किशोर आणि त्याच्या साथीदारांनी केल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी किशोर याला ताब्यात घेतले. पोलिसी खाक्या दाखविल्यानंतर त्याने पौड परिसरात भेगडेचा याचा खून केल्याची माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थाळाला भेट देऊन मृतदेहाची ओळख पटवली आहे.

भारती विद्यापीठ ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक मच्छिंद्र चौहान, गुन्हे शाखेचे निरीक्षक श्रीकांत शिंदे, सहायक पोलिस निरीक्षक एस. आर. करनूर यांच्या पथकाने ही कामगिरी केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ऑनलाइन मागणी अर्जांची सेवा बंद

$
0
0

पुणे : औद्योगिक क्षेत्रामध्ये वाटपासाठी भूखंड, जागा व शेड उपलब्ध नसल्याने भूखंड मागणीची ऑनलाइन सेवा एक वर्षासाठी बंद करण्याचा निर्णय महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने घेतला आहे. महामंडळाच्या केवळ 'जपान झोन'मध्ये (सुपा) ही सुविधा सुरू राहणार आहे. औद्योगिक क्षेत्रामधील भूखंड, जागा व शेडसाठी मागणीअर्ज ऑनलाइन करण्याची सुविधा महामंडळाने दिली होती. तथापि, राज्यातील काही औद्योगिक क्षेत्रांमध्ये वाटपासाठी भूखंड शिल्लक नाहीत. त्यामुळे या क्षेत्रातील भूखंड मागणीची ऑनलाइन सुविधा एक वर्षासाठी स्थगित ठेवण्यात आली आहे.

ऑनलाइन भूखंड मागणीअर्जांची सुविधा बंद केल्याने महामंडळाच्या गेल्या वर्षीच्या परिपत्रकानुसार ज्येष्ठता याद्या तयार करण्याची सूचना करण्यात आली आहे. ही ज्येष्ठता यादी करताना ऑनलाइन अर्ज नाही म्हणून संबंधितांचा भूखंड मागणी अर्ज अपूर्ण समजला जाऊ नये, असेही महामंडळाने स्पष्ट केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आर्किटेक्चर प्रवेशाच्या बहाण्याने फसवणूक

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

एका नामांकित कॉलेजमध्ये आर्किटेक्चरला प्रवेश मिळवून देण्याच्या बहाण्याने ५० हजार रुपयांची फसवणूक केल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी खडक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत सुनील पारखे (वय ४८, रा. बाणेर) यांनी तक्रार दिली आहे. त्यावरून सूरज शशिकांत म्हेत्रे (रा. पूना कॉलेजसमोर, भवानी पेठ) याच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पारखे यांच्या मुलीला आर्किटेक्चरला प्रवेश घ्यायचा होता. पारखे यांची एका ओळखीच्या व्यक्तीच्या माध्यमातून म्हेत्रेची ओळख झाली. त्याने पारखे यांच्या मुलीस एका कॉलेजमध्ये आर्किटेक्चरला प्रवेश मिळवून देण्याचे आमिष दाखविले. त्यासाठी पारखे यांच्याकडून ५० हजार रुपये घेतले. पण त्यांच्या मुलीला प्रवेश मिळवून दिला नाही. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर पारखे यांनी खडक पोलिसांकडे तक्रार दिली आहे. या प्रकरणी पोलिस उपनिरीक्षक निकम अधिक तपास करीत आहेत.

पोलिसाला वाहनाची धडक

चारचाकी वाहनाला हात दाखवून थांबविण्याचा प्रयत्न करणाऱ्या पोलिस कर्मचाऱ्याला त्या वाहनाने धडक दिल्याचा प्रकार कात्रज येथे गुरुवारी रात्री घडला. हा चालक धडक झाल्यानंतर पळून गेला. पोलिस कर्मचारी राऊत भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात कार्यरत आहेत. ते गुरुवारी रात्री सव्वातीनच्या सुमारास कात्रज येथील लोळे कार्यालयाशेजारील रस्त्यावर ड्यूटीवर होते. या वेळी त्यांनी हात दाखवून चारचाकी वाहनाला थांबण्याचा इशारा केला. वाहनचालकाने गाडी पुढे घेऊन राऊत यांच्या दुचाकीला धडक दिली. त्यामुळे ते जखमी झाले आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘त्रास देण्यासाठी खोटी तक्रार’

$
0
0

पुणे : 'फडणीस प्रॉपर्टीज'चे विनय फडणीस आणि अनुराधा फडणीस यांना त्रास देण्यासाठी राजेन रायसोनी यांनी पोलिसांकडे हेतुपुरस्सर खोटी तक्रार दिल्याचा आरोप 'फडणीस प्रॉपर्टीज'कडून शुक्रवारी करण्यात आला. बांधकाम व्यवहारांच्या संदर्भाने रायसोनी यांना आतापर्यंत दोन कोटी ५५ लाख रुपये देण्यात आले असल्याचेही फडणीस यांच्याकडून सांगण्यात आले.

फडणीस यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकानुसार, फडणीस आणि रायसोनी भागीदार असलेल्या व्योम डेव्हलपर्स या कंपनीच्या माध्यमातून बाणेर येथे एक निवासी प्रकल्प पूर्ण करण्यात आला. प्रकल्प पूर्ण होण्यापूर्वीच रायसोनी भागीदारीतून निवृत्त झाले. देय रकमेपैकी दोन कोटी ५५ लाख रुपयांची रक्कम 'फडणीस प्रॉपर्टीज'ने त्यांना दिलेली आहे. रासयोनी भरमसाठ व्याजाची मागणी करत असून, हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. तसेच, अनुराधा फडणीस भागीदारी संस्थेत व्यक्तिशः भागीदार नाहीत. असे असतानाही, रासयोनी यांनी केवळ त्रास देण्याच्या हेतूने खोटी तक्रार दाखल केली आहे, असे 'फडणीस'चे म्हणणे आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


ठेकेदारांचा संप अखेर मागे

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

पुणे महानगर परिवहन मंहामंडळाला भाडेतत्वावर बस पुरविणाऱ्या ठेकेदारांनी गुरुवारी अचानक पुकारलेला संप शुक्रवारी सकाळी मागे घेतला. त्यामुळे कंत्राटदारांच्या ६५३ बस पुन्हा मार्गावर आल्याने पीएमपीची वाहतूक पूर्ववत होऊन प्रवाशांची गैरसोय टळली. दरम्यान, महापालिकेकडून पैसे आल्यानंतर ठेकेदारांची देणी देण्यास प्राधान्य दिले जाईल, असे पीएमपी प्रशासनाने सांगितले.

पीएमपीने विविध ठेकेदारांकडून ६५३ बस भाडेतत्वावर घेतल्या आहेत. या बसचे ६० कोटी रुपयांचे भाडे पीएमपीकडे थकित आहे. ते तातडीने मिळावे, यासाठी त्यांनी संप पुकारला होता. या संपामुळे पीएमपी प्रवाशांचे अतोनात हाल झाले; तसेच दोन्ही बाजूला दरवाजा असलेल्या बस बंद झाल्याने बीआरटी सेवा विस्कळित झाली. त्यामुळे तातडीने सेवा पूर्ववत न केल्यास अत्यावश्यक सेवा कायदा (मेस्मा) लावण्याचा इशारा पीएमपी प्रशासनाने दिला होता. त्यानंतर कंत्राटदारांनी नरमाईची भूमिका घेतल्याची चर्चा आहे.

या संदर्भात महापौर दत्तात्रय धनकवडे, पीएमपीचे व्यवस्थापकीय संचालक अभिषेक कृष्णा, डॉ. प्रविण आष्टीकर आणि ठेकेदार यांच्यात शुक्रवारी बैठक झाली. त्यात ठेकेदारांच्या प्रश्नांवर चर्चा करण्यात आली.

पीएमपीचे अधिकारी आणि कर्मचारी यांच्याकडून ठेकेदारांना वेळेवर पैसे न मिळण्याताबत काही तांत्रिक अडचणी आणि चुकीच्या बाबीवर या वेळी चर्चा करण्यात आली. ठेकेदरांना गाड्यांचे बिल उशिरा का मिळते, याबाबतचा अहवाल एका महिन्यात सादर करण्याचे आदेश महापौरांनी या वेळी दिले. पुणेकरांचे हाल होऊ नयेत, यासाठी पुणे शहर जिल्हा काँग्रेसच्या वतीने शुक्रवारी दहा मार्गांवर दहा बस सोडल्या होत्या. सकाळी साडेसात वाजता त्याचा प्रारंभ झाला. उपमहापौर आबा बागुल, माजी आमदार मोहन जोशी, सरचिटणीस अमित बागुल, विक्रम खन्ना, नंदकुमार बानगुडे, नंदकुमार कोंडाळकर उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मराठी कलाकारांकडून मोठे कामः जसराज

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

'कलाकार अच्छा है तो मराठी है। फिर उसको जमाईही बना लेते है। अशाच मराठी कलाकारांकडून 'मायस्ट्रोज स्पीक'सारखे मोठे काम झाल्याचा मला आनंद आहे,' अशी भावना स्वतः व्ही. शांताराम यांचे जावई असलेले संगीतमार्तंड पं. जसराज यांनी 'मायस्ट्रोज स्पीक' या ग्रंथाच्या प्रकाशन समारंभात व्यक्त केली. त्यांनी 'आज तो आनंद आनंद' ही रचना गाऊन हा आनंद व्यक्त केला.

गानवर्धन संस्थेतर्फे आयोजित कार्यक्रमात 'मायस्ट्रोज स्पीक' या इंग्रजी ग्रंथाचे प्रकाशन शुक्रवारी पं. जसराज यांच्या हस्ते झाले. ज्येष्ठ गायिका स्वरयोगिनी डॉ. प्रभा अत्रे यांना हा ग्रंथ समर्पित करण्यात आला. केसरीवाडा येथील लोकमान्य सभागृहात झालेल्या या कार्यक्रमाप्रसंगी व्यासपीठावर पं. जसराज, डॉ. प्रभा अत्रे, ग्रंथाच्या संपादक व अनुवादक डॉ. अलका देव- मारुलकर, सहसंपादक शोभना कुलकर्णी- गदो, पद्मभूषण डॉ. शां. ब. मुजुमदार, सतारवादक उस्ताद उस्मान खान, ज्येष्ठ पत्रकार मुकुंद संगोराम आणि संस्थेचे संस्थापक-अध्यक्ष कृ. गो. धर्माधिकारी उपस्थित होते. धर्माधिकारी यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या या ग्रंथाचे प्रकाशनही त्यांच्या वयाला ८१ वर्षे पूर्ण झाल्याचे औचित्य साधून करण्यात आले.

बहुतेक वेळा कलेच्या निर्मितीविषयी लिहा-बोलायला अनुत्सुक असलेल्या भारतीय कलाकारांनी व्यक्त केलेले कलानिर्मितीविषयीचे सोप्या शब्दांतील विचार या ग्रंथात आहेत. ते या ग्रंथामुळे जागतिक स्तरावर पोहोचणार असल्याचा आनंद आणि समाधान डॉ. अत्रे यांनी व्यक्त केले. फिलाडेल्फिया येथील एका व्याख्यानादरम्यान भारतीय कलाकारांच्या संगीतविषयक विचारांची इंग्रजी भाषेत मागणी झाली. त्यातून हा ग्रंथ साकारल्याची बाब डॉ. मारुलकर यांनी नमूद केली.

हा ग्रंथ म्हणजे गानवर्धन संस्थेतर्फे आयोजिण्यात येणाऱ्या 'मुक्त संगीत चर्चासत्र' या उपक्रमात मान्यवर संगीततज्ज्ञांनी मांडलेल्या निवडक विचारधनाचे लिखित आणि संकलित रूपांतर आहे. डॉ. श्रीरंग संगोराम संपादित 'मुक्त संगीत संवाद' या मराठी आणि हिंदी ग्रंथाच्या सुधारित आवृत्तीचे हे इंग्रजी भाषांतर आहे. यात पं. जसराज आणि डॉ. प्रभा अत्रे यांच्यासह पं. भीमसेन जोशी, पं. शिवकुमार शर्मा, पंडिता रोहिणी भाटे यांसारख्या ४५ गायक, वादक आणि नृत्य कलाकारांचे विचारधन आहे.

पं. जसराज यांचे शिष्य हेमांग मेहता यांचे शास्त्रीय गायन झाले. त्यांना अविनाश पाटील (तबला) आणि राहुल गोळे (हार्मोनियम) यांनी वाद्यसाथ केली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थेचे उपाध्यक्ष दयानंद घोटकर यांनी, तर सूत्रसंचालन आनंद देशमुख यांनी केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तीन दिवसांच्या मुलीचा आईच्या पदराखाली मृत्यू

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

आईच्या साडीच्या पदराचा गळ्यावर दाब पडून तीन दिवसांच्या मुलीचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी मुलीच्या आईवर मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी सहकारनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. धनकवडी येथे अडीच वर्षांपूर्वी ही घटना घडली होती. डॉक्टरांचा अहवाल मिळाल्यानंतर हा गुन्हा दाखल करण्यात आला.

याबाबत पोलिस उपनिरीक्षक ए. बी. जगताप यांनी तक्रार दिली आहे. त्यावरून धनकवडी येथील २२ वर्षीय महिलेच्या विरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ९ फेब्रुवारी २०१३ रोजी संबंधित विवाहित महिला गर्भवती असताना पतीसह तीन चाकी टेम्पोतून रुग्णालयात जात होती. मात्र, वाटेतच ती प्रसुत होऊन त्यांना मुलगी झाली. त्यानंतर ते दवाखान्यात न जाता मुलीला घरी घेऊन आले. १२ फेब्रुवारी रोजी पहाटे चार वाजता मुलगी खूप रडू लागल्याने आईने तिला दूध पाजवून झोपवले. त्यानंतर दोन तासांनी मुलगी बेशुद्ध असल्याचे लक्षात आले. त्यांनी तिला तातडीने ससून रुग्णालयात दाखल केले. मात्र, तेथील डॉक्टरांनी मुलीला मृत घोषित केले. या वेळी पुढील तपासासाठी डॉक्टरांनी तिचा व्हिसेरा राखून ठेवला होता. त्यावेळी सहकारनगर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती.

ससून रुग्णालयाकडून राखून ठेवलेल्या व्हिसेराचा अहवाल पोलिसांना अडीच वर्षांनंतर ऑगस्ट २०१५ मध्ये मिळाला. मुलीचा गळ्यावर दाब पडल्याने मृत्यू झाल्याचे त्यात स्पष्ट करण्यात आले आहे. स्तनपान करत असताना मुलीच्या गळ्याभोवती आईच्या पदराचा दाब पडल्याने मृत्यू झाल्याचे पोलिसांनी सांगितले. त्यानुसार मुलीच्या आईवर कलम ३०४ अ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पैसे उसने मागितले; रक्षकावर हल्ला

$
0
0

पुणे : उसने घेतलेले सहाशे रुपये परत मागितले म्हणून हॉटेलच्या वेटरने सुरक्षारक्षकावर झोपेत असतानाच धारदार शस्त्राने वार केले. या हल्ल्यात सुरक्षारक्षक गंभीर जखमी झाला असून, त्याला उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. कर्वेनगर येथील हॉटेल सन्मान येथे गुरुवारी मध्यरात्री ही घटना घडली. वारजे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

चंद्रवीरसिंग तीकासिंग राणा (वय ५६, रा. सन्मान हॉटेल, कर्वेनगर, मूळ. उत्तराखंड) असे जखमी झालेल्या सुरक्षारक्षकाचे नाव आहे. या प्रकरणी साधू लखन रॉय (वय ३२, रा. सन्मान हॉटेल, कर्वेनगर) याच्यावर खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. राणा व आरोपी रॉय एकाच हॉटेलमध्ये काम करण्यास आहेत. राणा हॉटेलमध्ये सुरक्षारक्षक, तर रॉय हॉटेलमध्ये वेटर म्हणून काम करतो. राणाकडून रॉयने काही दिवसांपूर्वी सहाशे रुपये ऊसने घेतले होते. गुरुवारी रात्री राणा यांनी उसने दिलेले पैसे कधी देणार, अशी विचारणा रॉयकडे केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मेट्रो स्टेशनबाबत पुनर्विचार आवश्यक

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

शहराच्या जुन्या हद्दीच्या विकास आराखड्यात (डीपी) दिल्ली मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनच्या (डीएमआरसी) मूळ अहवालानुसार मेट्रो स्टेशन दर्शवण्यात आली आहेत; मात्र आता मेट्रो जंगली महाराज रोडऐवजी नदीपात्रातून जाणार असल्याने काही स्टेशनचा पुनर्विचार करावा लागणार आहे.

शहरात पिंपरी-चिंचवड ते स्वारगेट आणि वनाज ते रामवाडी असे दोन मेट्रो मार्ग प्रस्तावित आहेत. यातील बहुतांश भाग जुन्या हद्दीतूनच जात असल्याने 'डीपी'मध्ये मेट्रोच्या दोन्ही मार्गांची आखणी दर्शवण्यात आली आहे. तसेच, मेट्रो स्टेशन्स, डेपो याचीही आरक्षणे निश्चित करण्यात आली आहेत. त्यानुसार, पुणे महापालिकेच्या हद्दीतून जाणाऱ्या मेट्रो मार्गासाठी १८ आरक्षणांसह कृषी महाविद्यालयाच्या मागील बाजूस डेपोसाठी आरक्षण निश्चित केले गेले आहे.

'डीएमआरसी'च्या मूळ प्रस्तावानुसार वनाज ते रामवाडी हा मार्ग कर्वे रोड, जंगली महाराज रोडमार्गे जाणार होता. या मेट्रो मार्गाला अनेकांनी आक्षेप घेतला होता. गेल्या महिन्यात केंद्रीय परिवहनमंत्री नितीन गडकरी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत अखेर पालकमंत्री गिरीश बापट यांच्या समितीचा अहवाल स्वीकारून मेट्रो मार्गांत काही सुधारणा सुचवण्यात आल्या आहेत. त्यानुसार, जंगली महाराज रोडने जाणारी मेट्रो आता डेक्कन बसस्थानकाच्या मागील बाजूने धावणार आहे. त्यानुसार, 'डीपी'मध्ये दर्शवण्यात आलेल्या मेट्रो स्टेशनमध्ये पुन्हा बदल करावे लागणार आहेत. मेट्रोच्या सुधारित आराखड्यानुसार किमान चार ते पाच स्टेशनांचा पुनर्विचार करणे क्रमप्राप्त झाले असून, एक भूमिगत स्टेशनही कमी होण्याची शक्यता आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

खासगी टँकरवर ‘जीपीएस’ नियंत्रण

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

टंचाईग्रस्त भागांमध्ये पाणीपुरवठा करणाऱ्या खासगी टँकरच्या फेऱ्यांवर लक्ष ठेवण्यासाठी 'जीपीएस' यंत्रणा बसवण्याचा आदेश राज्य सरकारने दिला आहे. तसेच टंचाईग्रस्त गावांमध्ये पाणीपुरवठा करण्यासाठी शक्यतो शासकीय टँकरचा वापर करण्यात यावा, अशीही सूचना करण्यात आली आहे.

राज्यातील अनेक भागांमध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला आहे. पावसाचे प्रमाण कमी असल्याने पिण्याच्या पाण्याचे स्रोत आटले आहेत. अनेक गावांमध्ये पिण्याच्या पाण्याची टंचाई भासत आहे. गावांची पाण्याची गरज भागवण्यासाठी सरकारी व खासगी टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे; मात्र हा पाणीपुरवठा करताना खासगी टँकरवर कोणतेही नियंत्रण राहत नाही. या परिस्थितीमध्ये बदल करण्याच्या दृष्टीने खासगी टँकरने पाणीपुरवठा करताना त्यावर जीपीएस यंत्रणा बसवण्याचे आदेश सरकारने दिले आहेत. ही यंत्रणा बसवण्याची अट खासगी टँकर नियुक्त करताना घालण्यात यावी. त्यामुळे टँकरच्या फेऱ्यांवर नियंत्रण ठेवणे शक्य होणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

राज्यातील संभाव्य पाणीटंचाईग्रस्त गावे व वाड्यांसाठी उपाययोजना करताना २०१५-१६ या वर्षातील टंचाई आराखडा आतापासूनच तयार करून तो सरकारला पाठवण्याची सूचना संबंधित जिल्हाधिकाऱ्यांना करण्यात आली आहे. या आराखड्यामध्ये टंचाई निवारणासाठी योजना करताना त्या कमी कालावधीत होतील असे पाहावे आणि तुलनात्मक कमी खर्चाची योजना प्रस्तावित करावी. तसेच पाणीटंचाई निवारणासाठी तातडीच्या उपाययोजना सुचवताना त्यासाठी होणारा खर्च, भविष्यात होणारा फायदा, उपाययोजना कार्यान्वित करण्यासाठी लागणारा वेळ यांचाही विचार करण्याची सूचना करण्यात आली आहे.

याशिवाय पिण्याच्या पाण्याच्या सार्वजनिक स्रोतांच्या प्रभावक्षेत्रात ५०० मीटर अंतरापर्यंत विहिरींचे खोदकाम करण्यास मनाई करण्यात आली आहे. या अंतरामध्ये फक्त पिण्याच्या पाण्यासाठीच विहीर खोदता येणार आहे. तसेच पिण्याच्या पाण्याच्या स्रोतापासून एक किलोमीटरपर्यंत भू-जल उपशावर बंदी आणण्याची कार्यवाही जिल्हा प्राधिकरणाने करावी, असेही सरकारने स्पष्ट केले आहे.

पिण्याचे पाण्याचा अन्य उपयोग नको

पाणीसाठा जिल्हाधिकाऱ्यांच्या नियंत्रणाखाली आणण्यात आला आहे. या जलसाठ्यांवर अनेक गावांच्या पिण्याच्या पाण्याच्या योजना आहेत. हे पाणी पिण्यासाठी देताना त्याचा वापर अन्य कामांसाठी होणार नाही याची दक्षता घेण्याचेे सरकारने म्हटले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पकडलेले बिबटे ठेवायचे कुठे?

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

आमच्या शेतात बिबट्या आलाय, पर्यटकांच्या सुरक्षेसाठी गड पायथ्याच्या बिबट्याला तातडीने पकडा, गुरांची शिकार करणाऱ्या बिबट्याला तुम्ही ताब्यात घ्या... पुणे परिसरातील वनाधिकाऱ्यांना दर आठवड्याला बिबट्या पकडण्याची मागणी करणारे फोन येतात. पण पकडलेले बिबटे आता ठेवायचे तरी कुठे, असा प्रश्न वनाधिकाऱ्यांना पडला आहे. जुन्नरमधील माणिकडोह बिबट निवारा केंद्राची क्षमता संपली असून, नवीन बिबट्यांना आता 'प्रवेश बंद'चा फलक दाखविण्याची वेळ आली आहे.

बिबट्या फार वर्षांपासून माणसाच्या सहवासात, त्याच्या नकळत राहत असला तरी पूर्वी त्याला विरोध होत नव्हता. मात्र, गेल्या काही वर्षात बिबट्या वस्तीत जवळ दिसला की गावकरी त्याला पकडण्याची मागणी करतात. त्यामुळे बिबट्याच्या रेस्क्यू ऑपेरेशनमध्ये वाढ झाली आहेत. पण त्यांना ठेवायचे कुठे, ही नवीन समस्या निर्माण झाली आहे. पकडलेले अनेक बिबटे जखमी असल्याने व त्यांना पुन्हा निसर्गात सोडणे शक्य नसल्याने अशा बिबट्यांसाठी १३ वर्षांपूर्वी माणिकडोह केंद्र स्थापन करण्यात आले. बिबट्यांची संख्येनुसार केंद्राचा विस्तार होत गेला.

आता या केंद्राची क्षमता पूर्ण संपली आहे. या केंद्रात सोळा जुने पिंजरे, तर बारा नव्याने तयार केलेले पिंजरे आहेत. तसेच इतर फिरते पिंजरे धरून ३४ बिबट्यांना ठेवण्याची क्षमता आहे. धक्कादायक बाब म्हणजे यातील बहुतांश बिबटे जखमी असल्याने त्यांना निसर्गात सोडता येणार नाही. केंद्रात सध्या ३३ बिबटे आहेत. त्यामुळे नवीन आलेल्या बिबट्याला ठेवायला जागाच उरलेली नाही.

बिबट्यांची वाढती संख्या लक्षात घेऊनच आम्ही त्याच्या विस्ताराची मागणी केली आहे. नवीन प्रस्तावानुसार पिंजऱ्यांची एकूण संख्या ४५पर्यंत वाढविण्याचा आमचा विचार आहे. काही दिवसांपूर्वीच पुण्यातून एक बिबट्या आला, त्या वेळी त्याला कुठे ठेवायचे ही समस्या निर्माण झाली होती. पण वैद्यकीय तपासणी झाल्यावर तो सुदृढ असल्याने त्याला निसर्गात सोडणे शक्य झाले. केंद्राचे तातडीने विस्तारीकरण झाले पाहिजे, अशी माहिती जुन्नरचे उपवनसंरक्षक विठ्ठल धोकटे यांनी दिली.

विस्ताराचा प्रस्ताव रेंगाळला

बिबट्यांची वाढती संख्या लक्षात घेऊन केंद्राचा विस्तार करणे आवश्यक आहे. यासाठीचे प्राथमिक नियोजन वन विभागाने केले आहे. मात्र या केंद्राला लागून असलेली पाटबंधारे विभागाची तीन एकर जागा यासाठी लागणार आहे. बिबट्यांच्या समस्येचे गांभीर्य लक्षात घेऊन पाटबंधारे विभागाने आम्हाला जागा उपलब्ध करून द्यावी, असा पत्रव्यवहार वनाधिकारी गेल्या दोन वर्षांपासून करीत आहेत, अद्याप उत्तर दिलेले नाही.

वेळापत्रकात बदल नाहीच

जुन्नरमधील बहुतांश खेड्यांमध्ये लोडशेडिंगची समस्या आहे. यातील अनेक गावात रात्री लाइट नसतात. गावकरी अंधारात शेतात पंप लावायला जातात, तेव्हाच बिबट्या हल्ला करतो. त्यामुळे 'महावितरण'ने लोडशेडिंगचे वेळापत्रक बदलावे, अशी मागणी वन विभाग आणि गावकऱ्यांनी वारंवार केली आहे. जिल्हाधिकाऱ्यांनीही याला समर्थता दर्शविली आहे. मात्र, 'महावितरण'चे अधिकाऱ्यांनी या प्रस्तावाकडे दुर्लक्ष केले आहे.

गावकऱ्यांच्या रेस्क्यू टीमने केली जनजागृती

ऐन वस्तीत येऊन बिबट्याने माणसावर हल्ला केल्याच्या घटना वाढल्याने वन विभागाने जुन्नरमध्ये ऑपरेशन बिबट्या ही मोहीम हाती घेतली आहे. या उपक्रमातून पिंजरे लावून सगळ्या बिबट्यांना पकडण्याचे नव्हे, तर गावकऱ्यांना बिबट्यापासून वाचविण्यासाठी विविध योजना राबविण्यात येत आहेत. यासाठी वनाधिकाऱ्यांनी जवळपासच्या गावातील ५५ उत्साही नागरिकांच्या आठ टीम तयार केल्या आहेत. मुंबईतील वाइल्ड लाइफ कॉन्झर्व्हेशन ट्रस्टने त्यांना गणवेश आणि आपत्कालीन साहित्य दिले आहे. त्यांना ट्रेनिंगही देण्यात येते आहे. बिबट्याशी निगडित घटना घडल्यावर वन विभागाचे अधिकारी पोहोचण्यापूर्वीच ही टीम घटनास्थळी पोहोचवी, नागरिकांना योग्य पद्धतीने मार्गदर्शन मिळावे, हा उपक्रमाचा उद्देश आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


नेत्यांना कानपिचक्या

$
0
0

'एसआरए' खासगी बिल्डरांच्या घशात घालण्यावरून पवारांची टीका

म. टा. प्रतिनिधी, पुणे

महापालिकेच्या जागांवरील झोपडपट्टी पुनर्वसनाचे प्रकल्प (एसआरए) खासगी बिल्डरांच्या घशात घालण्यावरून माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही पालिकेतील नेत्यांचे शुक्रवारी कान उपटले. पालिकेच्या जागांवरील एसआरए प्रकल्पांसाठी महापालिकेने धोरण तयार करावे, अशा सूचना करतानाच, त्याचे सर्व अधिकार आयुक्तांकडे सोपवा, असे निर्देश पवार यांनी दिले.

पालिकेतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांच्या कामाची आढावा बैठक पवार यांनी शुक्रवारी घेतली. शहरातील हिराबाग आणि कोथरूड येथील झोपडपट्टीच्या मोक्याच्या जागा बिल्डरांना विकसित करण्यासाठी घेतलेल्या निर्णयाचे पडसाद या बैठकीत उमटले. मनसेवगळता इतर सर्व पक्षांना सोबत घेऊन राष्ट्रवादीने घेतलेल्या या निर्णयाचे तीव्र पडसाद उमटत असून, त्यावरून पक्षावर चहूबाजूंनी टीका केली जात आहे. त्यामुळे भविष्यात पालिकेच्या इतर जागांबाबत पुन्हा वाद उद्भवू नये, याकरिता एसआरएच्या पुनर्वसनाविषयी धोरण तयार करण्याचे स्पष्ट आदेश त्यांनी दिले; तसेच त्यावरून लोकप्रतिनिधींवर टीका होत असल्याने त्याच्या अंमलबजाणीचे सर्वाधिकार आयुक्तांना सोपवा, असा सल्लाही त्यांनी दिला. सर्वांना समान न्याय देण्याची भूमिका बजावा, कोणाच्या फायद्यासाठी निर्णय घेऊ नका, अशी तंबीदेखील पवार यांनी भरली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

खान समितीने विद्यार्थ्यांना फटकारले

$
0
0

पुणेः फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडियातील (एफटीआयआय) संपकरी विद्यार्थ्यांना, केंद्र सरकारने नेमलेल्या एस. एम. खान यांच्या अध्यक्षतेखालील त्रिसदस्यीय समितीने स्पष्ट शब्दांत फटकारले असून, २००८ तुकडीचा बॅकलॉग राहण्यात विद्यार्थीच दोषी असल्याचा ठपका समितीने ठेवला आहे; तसेच प्राध्यापकांनी वेळोवेळी आपली भूमिका बदलल्याचे समितीने अहवालात नमूद केले आहे. पोलिसांत तक्रार दाखल केलेल्या संचालक प्रशांत पाठराबे यांची या अहवालात पाठराखण करण्यात आली आहे.

नियामक मंडळाच्या अध्यक्षपदी नेमण्यात आलेले गजेंद्र चौहान आणि अन्य चार सदस्यांना हटवण्याच्या मागणीसाठी विद्यार्थ्यांनी बेमुदत संप सुरू केला. आंदोलन चिघळल्यावर माहिती व प्रसारण मंत्रालयाने 'रजिस्ट्रार फॉर न्यूजपेपर्स इन इंडिया' चे (आरएनआय) एस. एम. खान यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली होती. काही प्राध्यापक व विद्यार्थ्यांकडून अयोग्य पद्धतीचे वातावरण तयार करण्यात आले होते. मात्र, या अहवालातून वस्तुस्थिती स्पष्ट झाली आहे, अशी प्रतिक्रिया प्रशांत पाठराबे यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

'झाबुवा' टोळीला पुणे पोलिसांकडून अटक

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पिंपरी

तळेगाव दाभाडे येथील कमला ज्वेलर्सवर दरोडा टाकणा-या 'झाबुवा' टोळीला पुणे ग्रामीण पोलिसांनी अवघ्या काही तासात जेरबंद केले. शुक्रवारी सायंकाळी सातच्या सुमारास दहा जणांच्या टोळीने दगडफेक आणि गोळीबार करीत लाखो रूपांचे दागिने लुटून नेले होते. यावेळी टोळीने केलेल्या मारहाणीमध्ये ज्वेलर्स मालक मनोज व मंगेश पालरेचा गंभीर जखमी झाले होते.

घटनास्थळावर दाखल झालेले पोलिस अधीक्षक डॉ. जय जाधव, अप्पर अधीक्षक राजकुमार शिंदे, उपाधीक्षक विवेक पानसरे, स्थानिक गुन्हेशाखाचे वरिष्ठ निरीक्षक राम जाधव, वसंत बाबर यांनी तपासाची दिशा निश्चित केली.

घटनास्थळाची पाहणी केल्यावर आणि सर्वात आधी घटनास्थळी प्रतिकार करण्याचा प्रयत्न करणाऱ्या ट्राफिक कर्मचा-याची माहिती तपासात महत्वाची ठरली.

मागील २२ वर्षा पासून वेग वेगळ्या राज्यात धुमाकूळ घालणाऱ्या "झाबुवा " गँगने हा दरोडा टाकल्याचे तपासात पुढे आले. त्यानंतर अवघ्या काही तासात सर्व टोळीला अटक करत, दागिने हस्तगत केले आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महाराष्ट्र भयमुक्त करण्याचे आव्हान

$
0
0

राज्याचे नवनियुक्त पोलिस महासंचालक प्रवीण दीक्षित यांनी पदाची सूत्रे स्वीकारली आहेत. दीक्षित यांनी पोलिस दलात विविध जबाबदाऱ्या सांभाळल्या आहेत. नवी जबाबदारी पार पाडताना असणारी आव्हाने, त्यांची 'व्हिजन' याबाबत प्रशांत आहेर यांनी त्यांच्याशी संवाद साधला.

आपल्या कार्यकाळात कुठल्या कामांना प्राधान्य देणार आहात?

दीक्षित : मावळते पोलिस महासंचालक संजीव दयाळ यांनी दोषसिद्धी वाढवण्यासाठी मोलाची कामगिरी केली आहे. त्याच धर्तीवर मीही शास्त्रीय व तांत्रिक उपायांचा वापर करून दोषसिद्धी वाढवण्यासाठी प्रयत्न करणार आहे. पोलिस दलाला लोकाभिमुख बनवून राज्यातील महिला, मुले, वृद्ध, अनुसूचित जाती व जमातीतील नागरिक आणि अल्पसंख्याकांच्या हक्कांचे संरक्षण व संवर्धन करणे, हे माझे दुसरे उद्दिष्ट आहे. सरकारने राज्यातील औद्योगिकीकरण वाढवण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. या प्रयत्नांना पूरक वातावरणनिर्मिती करण्याचा कसोशीने प्रयत्न राहील. नागपूरमध्ये जुलै २००८ ते ऑगस्ट २०१० या कालावधीत पोलिस आयुक्तपदाची जबाबदारी मी पोलिस-मित्रांच्या सहकार्याने यशस्वीरीत्या पार पाडली होती. ही संकल्पना राज्यभर राबवण्याचा माझा मानस आहे.

पोलिस दलासमोर सर्वांत महत्त्वाचे कोणते आव्हान आहे, असे तुम्हाला वाटते?

दीक्षित : सर्वसामान्यांच्या मनातील भीती घालवणे, हे पोलिस दलासमोरचे सर्वांत मोठे आव्हान आहे, असे मला वाटते. ग्रामीण भाग असो किंवा शहरे, सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य असले पाहिजे. ग्रामीण भागापेक्षा शहरातील नागरिक आपण अधिक असुरक्षित असल्याच्या काळजीत जगतात. ग्रामीण भागात आपल्याला शक्यतो सर्व गोष्टी, व्यक्ती परिचित असतात. तुलनेने शहरात तसे होत नाही. त्यामुळे सर्वसामान्यांना भयमुक्त वातावरण निर्माण करणे, हेच पोलिस दलासमोरील मुख्य आव्हान आहे.

राज्यातील जवळपास सगळ्याच शहरांतील वाहतुकीची समस्या उग्र रूप धारण करत आहे. त्याबाबत आपली काय भूमिका आहे?

दीक्षित : शहरांतील लोकसंख्या, तसेच वस्ती वाढत चालल्याने वाहतुकीची समस्या उग्र रूप धारण करते आहे. ही समस्या सोडवण्यासाठी वाहतूक पोलिसांकडून वेगवेगळ्या उपाययोजना करण्यात येतात. चौकाचौकांत पोलिस उभे राहिले म्हणजे ही समस्या सुटेल, अशी परिस्थिती नाही. लहान मुलांपासून ज्येष्ठापर्यंत सर्वांनीच वाहतुकीचे नियम पाळले पाहिजेत आणि पोलिस नसतानाही ते पाळले पाहिजेत, ही भावना वाढीस लागणे गरजेचे आहे. नागरिकांमधील स्वयंशिस्तच वाहतूक समस्येवर चांगला तोडगा असेल.

राज्यात सोनसाखळी चोरीच्या गुन्ह्यांनी डोके वर काढले आहे. त्यावर धोरणात्मक उपाययोजना होतील का?

दीक्षित : राज्यातील सर्वच शहरांमध्ये सोनसाखळी चोरीचे गुन्हे वाढत आहेत, हे खरे आहे. दुचाकीवर वेगात येणारे हे आरोपी अवघ्या काही क्षणांत चोऱ्या करतात. काय झाले, हे पीडित महिलेला कळायच्या आतच चोरटे फरार होतात. गुन्हे उघडकीस येण्याचे प्रमाण तुलनेने कमी आहे. गुन्हे उघडकीस आले, तर चोरीस गेलेली मालमत्ता परत मिळण्याचे प्रमाण कमी आहे. हे गुन्हे आटोक्यात आणण्यासाठी

पोलिसांची 'व्हिजिबिलिटी' वाढवणे आणि गुन्हे उघडकीस आणून गुन्हेगारांवर कठोर कारवाई करणे, यावर भर देण्यात येईल.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बालाजी मंदिरातील दरोड्याचा छडा

$
0
0

दिघी पोलिसांकडून पाच जणांना अटक

म. टा. प्रतिनिधी, पुणे

पैशाची वाटणी न मिळाल्याने आळंदी रस्त्यावरील बालाजी मंदिरात गेल्या वर्षी पडलेल्या दरोड्याला वाचा फुटली. त्याची कुणकुण दिघी पोलिसांना लागल्यानंतर त्यांनी कौशल्याने दरोडेखोरांचा माग काढीत पाच जणांस अटक केली.

या आरोपींकडून आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.

मल्लेश उर्फ मल्ला लक्ष्मण सासणे (वय २५, रा. आळंदी), ज्ञानेश्वर आत्माराम आंभोरे (वय २६, रा. आळंदी), बाळू रामकिसन कवपळासे (वय २५, रा. सोलापूर), विनोद प्रकाश पवार (वय २६, रा. आळंदी) आणि नारायण यशवंत पाटील (वय २६, रा. खेड, चाकण, मूळ-सिल्लोड , औरंगाबाद) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत, अशी माहिती अतिरिक्त पोलिस आयुक्त प्रकाश मुत्याळ यांनी दिली. या वेळी पोलिस उपायुक्त सुधीर हिरेमठ, सहायक पोलिस आयुक्त स्वप्ना गोरे उपिस्थित होते.

वडमुखवाडी येथील बालाजी मंदिरावर गेल्या वर्षी दरोडेखोरांनी सुरक्षारक्षक नामदेव भगवंत पवार (वय ५०, रा. भोसरी) याचा खून केला होता, तसेच पुजाऱ्याला मारहाण करून मंदिरातील सोन्या चांदीचे दागिने, बालाजीच्या मूर्तीवरील अंगरखा, रोख रक्कम असा साडेचार लाख रुपयांचा ऐवज चोरून नेला होता. दरोडेखोरांनी चोरी करण्याअगोदर मंदिरातील सर्व सीसीटीव्ही कॅमेरे काढून मंदिराच्या पाठीमागील विहरीत टाकून दिले होते. त्यामुळे या गुन्ह्याच्या तपासात यश येत नव्हते.

दिघी पोलिस ठाण्यातील कर्मचारी सोमनाथ बोऱ्हाडे यांना खबऱ्याकडून दरोडेखोरांची माहिती मिळाली. त्यानुसार वरिष्ठ पोलिस निरीक्षक नवनाथ घोगरे व सहायक पोलिस निरीक्षक संतोष काटे यांच्या पथकाने पाठपुरावा सुरू केला. अगोदर तिघांना ताब्यात घेऊन नंतर मुख्य आरोपी पाटील यालाही अटक करण्यात आली. पाटील सुरक्षारक्षकाचे काम करतो. पैशांची चणचण भासू लागल्याने त्यांनी दरोड्याचा कट रचला होता. कोणताही तांत्रिक पुरावा नसताना खबऱ्याच्या जाळ्यावर गुन्हा उघडकीस आणल्याचे मुत्याळ यांनी सांगितले.

पथकाला पंधरा हजारांचे बक्षीस

मंदिरातील बालाजीच्या मूर्तीवरील दागिने व रोख नऊ हजार रुपये दरोडेखोरांनी लुटले होते. त्यापैकी नऊ हजार रुपये सर्वांनी वाटून घेतले. पण, दागिने विकता न आल्याने त्याचा हिस्सा इतरांना मिळाला नाही. त्यामुळे आरोपींमध्ये धुसफूस सुरू झाली. त्याची माहिती मिळाल्यानंतर गुन्हा उघडकीस आला. कौशल्यापूर्ण तपास केल्यामुळे या पथकाला पंधरा हजारांचे बक्षीस मुत्याळ यांनी जाहीर केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images