Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

‘बीआरटी’ने होते वेळ, इंधनाची बचत

$
0
0

पुणे : 'बीआरटी बसची सुविधा खूपच उपयोगी आहे. स्वतःची दुचाकी अथवा चारचाकीने लांब पल्ल्याचा प्रवास करण्यापेक्षा या बसने प्रवास सुखकर होतो. यामुळे वाहतुकीच्या कोंडीमुळे होणारा मानसिक त्रास वाचतो आणि पेट्रोलची बचत होत आहे...'

ही बोलकी प्रतिक्रिया आहे कोथरूड ते विश्रांतवाडी या मार्गावर दैनंदिन प्रवास करावा लागणाऱ्या एका मोठ्या कंपनीतील अविनाश हंद्राळे या युवकाची. संगमवाडी-विश्रांतवाडी रस्त्यावर (आळंदी रोड) जलद बस वाहतूक सेवा (बीआरटी) सुरू होण्यापूर्वी रोजच्या रोज टू-व्हीलरने प्रवास करताना होणारी त्याची दमछाक आता पूर्ण थांबली आहे. तसेच, पीएमपी बसची फ्रिक्वेन्सीही चांगली असल्याने एखादी बस चुकली, तरी फार वेळ वाट पाहावी लागत नसल्याचे निरीक्षण त्याने नोंदवले. बीआरटी बसमध्ये प्रत्येक बसस्टॉप जवळ आल्यावर त्याचे नाव बोर्डवर दिसते. यामुळे नवख्या व्यक्तीलाही त्याचा फायदा होतो. ही व्यवस्था अशीच कायम राहिली, तरी नक्कीच माझ्यासारखे अनेक जण 'वज्र'नेच प्रवास करतील, अशी अपेक्षा त्याने व्यक्त केली.

बहुसंख्य प्रवाशांना या सेवेचा फायदा होत असल्याचे निदर्शनास येत असून, काही प्रवाशांकडून तक्रारींचा सूरही ऐकायला मिळत आहे. अशा तक्रारींचा आढावा घेऊन त्या सोडवण्यासाठी पुढील काळात विशेष प्रयत्न करण्यात येणार असल्याची ग्वाही 'पीएमपी'चे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक अभिषेक कृष्णा यांनी दिली.

प्रवाशांच्या वाढत्या संख्येने 'बीआरटी'ला सकारात्मक प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र सकृतदर्शनी दिसून येत आहे; मात्र अजूनही काही प्रवाशांमध्ये या सेवेविषयी संभ्रम आहे. विश्रांतवाडीच्या टर्मिनलवर बससाठी बराच वेळ थांबावे लागत असल्याची तक्रार पुण्यातील कॉलेजमध्ये शिकायला येणाऱ्या विद्यार्थ्यांकडून केली जात आहे. 'विश्रांतवाडीला बसचे वेळापत्रक लावले, तर नेमकी कोणती बस केव्हा येणार आहे, हे समजू शकेल,' अशी अपेक्षा रोहन कदम याने व्यक्त केली.

'बीआरटी'च्या मार्गावर प्रवाशांना अद्याप जाणवत असलेल्या काही समस्या दूर करण्यासाठी सातत्यपूर्ण प्रयत्न सुरू आहेत. बस थांब्यांवरील स्क्रीनवर येणारी माहिती, तसेच स्वयंचलित दरवाजांमध्ये अधूनमधून होणारे बिघाड, यावर त्वरेने उपाययोजना केल्या जातील.

- अभिषेक कृष्णा, अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक, पीएमपी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


केसनंद गावात दहा दुकाने फोडली

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, येरवडा

काही दिवसांपूर्वी वाघोलीतील केसनंद गावात चोरी करताना चोरट्यांना महिलेने प्रतिकार केल्याने हल्ल्यात एक वृद्ध महिलेला जीव गमवावा लागला होता. ही घटना ताजी असतानाच चोरट्यांनी वाघोलीत पुन्हा एकदा दहा दुकाने फोडून धुमाकूळ घातल्याने परिसरातील व्यापाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. बुधवारी ही घटना घडली.

पुणे-नगर महामार्गावर असणाऱ्या वाघोलीतील परिसरात नऊ, तर बाएफ रोडवरील एक अशी एकूण दहा दुकाने चोरट्यांनी बुधवारी पहाटे फोडली. काही तासांत दहा दुकानांची शटर उचकटून चोरी झाल्याने खळबळ माजली आहे.

यात वाघेश्वर कॉम्प्लेक्समधील सहा दुकानांचा समावेश आहे. दुकानात चोरट्यांना मोठी रक्कम न सापडल्याने काही हजारांचीच चोरी झाल्याचे पोलिसांनी सांगितले; मात्र एकाच वेळी दहा दुकाने फोडल्याने दुकानदार-व्यापारी धास्तावले आहेत.

आदित्य डेव्हलपर्स या कार्यालयातील संगणकाची चोरी करून आतील काचा फोडण्यात आल्या. सीसीटीव्ही कॅमेरे उखडून त्यातील हार्ड डिस्कचीही चोरी करण्यात आली. एका मोबाइल शॅापीमधील दोन मेाबाइल चोरण्यात आले. ब्युटीपार्लरमधील सुमारे आठ हजारांची रोकड आणि पुस्तक दुकानातील किमती कॅल्क्युलेटर चोरट्यांनी लंपास केले. वाघेश्वर कॅाम्प्लेक्समधील तीन ऑफिसेस, एक ब्युटीपार्लर आणि एक पुस्तकाचे दुकान फोडण्यात आले. याच कॉम्प्लेक्ससमोर एक फोटोचे दुकान व लेडीज शॅापी आहे. तेथेही त्यांनी चोरी करण्याचा प्रयत्न केला. दुकान व ऑफिसमधील वस्तूही त्यांनी फेकून दिल्या. बाएफ रोडवरील एका ऑप्टिकल्समधील माल चोरीला गेला. सकाळी दुकाने उघडल्यानंतर ही बाब सर्व व्यापाऱ्यांच्या लक्षात आली; मात्र तक्रार देण्यास कोणीही पुढाकार घेतला नव्हता.

सात की दहा दुकाने?

बुधवारी पहाटे वाघोलीत चोरट्यांनी काही तासांतच दहा दुकाने फोडल्याने परिसरातील दुकानदारांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे; मात्र ज्यांची दुकाने फोडली गेली, ते कोणीही पोलिसांत तक्रार देण्यास पुढे आले नाही. त्यामुळे नेमकी किती दुकाने फोडली आणि किती किमतीचा ऐवज चोरीला गेला, हे पोलिसांना समजू शकले नाही. पोलिसांच्या माहितीनुसार, हद्दीतील सात दुकाने फोडण्यात आली आहेत. त्यामुळे नेमकी किती दुकाने फोडली यावर एकमत झालेले नाही.

एकाच रात्री एवढी दुकाने फोडल्याने व्यापारी धास्तावले आहेत. रोकड मिळाली नाही, म्हणून चोरट्यांनी किमती माल लंपास केला. याबाबतची माहिती लोणीकंद पोलिसांना कळवल्यानंतर त्यांनी घटनास्थळी धाव घेतली; पण चोरीची तक्रार देण्यासाठी दुपारपर्यंत कोणीही पुढे आले नव्हते. त्यामुळे नेमका किती ऐवज चोरीला गेला, हे समजू शकले नाही. लोणीकंदचे सहायक पोलिस निरीक्षक आर. ए. मांजरे यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मालवाहतूकदारांचा आजपासून बंद

$
0
0

राज्यातील सात लाख वाहतूकदार सहभागी होणार

म. टा. प्रतिनिधी, पुणे

मालवाहतूकदारांकडून आकारला जाणारा टीडीएस व टोलच्या विरोधात 'ऑल इंडिया मोटार ट्रान्स्पोर्ट काँग्रेस'तर्फे आज, गुरुवारपासून देशव्यापी चक्का जाम आंदोलन केले जाणार आहे. राज्यभरातील सात लाख वाहतूकदार या आंदोलनात सहभागी होणार असून, वाहतूक बंद ठेवणार आहेत, अशी माहिती ट्रान्स्पोर्ट समितीचे सदस्य बाबा शिंदे यांनी बुधवारी दिली.

देशात ३७४ टोलनाके आहेत. तेथे टोल भरण्यासाठी लागणाऱ्या वाहनांच्या रांगांमुळे वाहतूक कोंडी होऊन दर वर्षी ८७ हजार कोटी रुपयांचे इंधन जळते. त्यामुळे या टोलवर प्रत्येक वर्षी जमा होणारी १४ हजार १५७ कोटी रुपये रक्कम देशातील मालवाहतूकदार एकरकमी भरण्यास तयार आहेत. त्याबाबतचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे सादर करण्यात आला आहे; मात्र सरकारने त्याला केराची टोपली दाखवली आहे. त्यामुळे देशभरातील मालवाहतूकदार बेमुदत आंदोलनावर ठाम आहेत. या आंदोलनात ट्रक, टेम्पो आणि टँकरचालक सहभागी होणार आहेत.

पुण्यातून गोवा, मध्य प्रदेश, राजस्थान, कर्नाटक, आंध्र प्रदेशसह देशातील अनेक ठिकाणी दररोज ८७० ट्रॅव्हल बस जातात. त्या कंपन्या संपात सहभागी होणार असल्याने प्रवाशांचे मोठ्या प्रमाणात हाल होण्याची शक्यता आहे. मुंबईतील स्कूलबसचालकही या संपात सहभागी होणार आहेत. तसेच, प्रवासी वाहतूक करणाऱ्या खासगी गाड्या बंद राहणार आहेत, असे शिंदे यांनी सांगितले. तसेच, जीवनावश्यक वस्तूंची वाहतूक करणाऱ्या वाहनांनी आंदोलनात सहभागी होण्याचा निर्णय ऐच्छिक असल्याचेही त्यांनी सांगितले.

पुणेकरांनाही फटका

पुण्यातील १० हजार वाहने या बंदमध्ये सहभागी होणार आहेत. त्यामुळे पुणेकरांनाही या आंदोलनाचा फटका बसणार आहे. याविषयी चर्चा करण्यासाठी केंद्रीय रस्तेवाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी मंगळवारी बैठक बोलावली होती. तसेच, बुधवारी पुन्हा त्यांची मीटिंग झाली; मात्र संघटेनच्या मागणीवर तोडगा न निघाल्याने आंदोलनाचा निर्णय घेण्यात आला, असे बाबा शिंदे यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पुण्यात यंदा फक्त ३१ पावसाळी दिवस

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

यंदाचा पावसाळा पुण्यासाठी अपुऱ्या पावसाचाच ठरला आहे. पुण्यात सरासरी ५६६ मिलिमीटर पाऊस होतो. यंदा त्यापेक्षा ९४.७ मिलिमीटर कमी म्हणजेच ४७१.६ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. जून ते सप्टेंबर या १२० दिवसांच्या पाऊसकाळात केवळ ३१ दिवसच खऱ्या अर्थाने 'रेनी डेज' म्हणजेच पावसाचे दिवस ठरले.

हवामान विभागातर्फे एक जून ते ३० सप्टेंबर हा पावसाचा हंगाम मानला जातो. या चार महिन्यांच्या काळात जुलै आणि ऑगस्ट हे दोन महिने सर्वाधिक पाऊस पडतो. परंतु, यंदा जून आणि सप्टेंबर या सुरुवातीच्या आणि शेवटच्या महिन्यातच पुण्यात सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाला, तर जुलै आणि ऑगस्टमध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस नोंदला गेला.

यंदा प्रत्येक महिन्यात काही मोजकेच दिवस पावसाने हजेरी लावली. एखाद्या दिवशी अडीच मिलिमीटरपेक्षा अधिक पावसाची नोंद झाली, तर त्या दिवसाची नोंद 'रेनी डे' म्हणजेच पावसाचा दिवस अशी केली जाते. पुण्यात जून ते सप्टेंबर या पावसाच्या हंगामात असे ३८ 'रेनी डे'ज असतात. यंदा फक्त ३१ 'रेनी डेज'चीच नोंद झाली.

सर्वाधिक पावसाचा महिन्यांपैकी एक असलेल्या ऑगस्ट महिन्याने तर पुण्याला थेट १९७२ च्या गंभीर दुष्काळाची आठवण करून दिली. सप्टेंबरमध्ये झालेल्या दमदार पावसाने सरासरी वाढण्यास मदत झाली. नऊ सप्टेंबर रोजी २२ मिमी, १३ सप्टेंबर रोजी ४९ मिमी, १९ व २० सप्टेंबर रोजी प्रत्येकी २० मिमी पावसाची नोंद झाल्याने सप्टेंबर महिन्यातील पावसाने महिन्याची सरासरी ओलांडली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘अॅस्ट्रोसॅट’ देणार संशोधनसंधी

$
0
0

Yogesh.Borate @timesgroup.com

पुणे : 'अॅस्ट्रोसॅट'कडून मिळणारा 'फर्स्ट हँड डेटा' अभ्यासण्याची संधी भारतीय खगोल शास्त्रज्ञांसोबतच विद्यार्थ्यांनाही उपलब्ध करून दिली जाणार आहे. त्याद्वारे भारतीय विद्यार्थ्यांना खगोलशास्त्रामधील नवी संशोधने पुढे आणण्याची नामी संधी मिळणार असून, परदेशी संशोधन संस्थांवरील परावलंबित्वही संपुष्टात येणार आहे. विशेष म्हणजे पुण्यातील आंतरविद्यापीठीय खगोल आणि खगोलभौतिकी केंद्र (आयुका) त्यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावणार आहे.

'अॅस्ट्रोसॅट'कडून मिळणाऱ्या माहितीच्या अभ्यासामधील विद्यार्थ्यांचा सहभाग वाढवण्यासाठी भारतीय अंतराळ संशोधन केंद्राने (इस्रो) 'राष्ट्रीय अॅस्ट्रोसॅट वैज्ञानिक सुविधे'चा प्रस्ताव सादर केला आहे. विद्यार्थ्यांना खगोलशास्त्राची गोडी लावण्यासाठी आतापर्यंत महत्त्वाची जबाबदारी पेलणाऱ्या 'आयुका'मधूनच त्याचे बहुतांश काम चालण्याची शक्यता आहे. 'आयुका'मधील ज्येष्ठ संशोधक डॉ. रंजीव मिश्रा यांनी मंगळवारी 'मटा'ला या योजनेविषयीची माहिती दिली.

'अॅस्ट्रोसॅट'मध्ये विद्यार्थ्यांचा सहभाग वाढवण्यासोबतच पुढच्या पिढीतील संशोधक तयार करण्यावर भर दिला जाणार आहे. प्राथमिक टप्प्यात पदार्थविज्ञानाचे मूलभूत शिक्षण घेतलेल्या आणि खगोलशास्त्रामध्ये रुची असणाऱ्या विद्यार्थ्यांना संधी दिली जाईल. शिक्षक आणि प्राध्यापकांसाठीही प्रशिक्षणपर कार्यक्रम राबवले जातील. यातून 'अॅस्ट्रोसॅट'कडून मिळालेल्या माहितीचे विश्लेषण करणे, त्याचा अभ्यास करणे, त्यावर आधारित प्रश्न तयार करणे आदींचे प्रशिक्षण दिले जाईल. माहितीवर आधारित प्रश्नांच्या निर्मितीपासून ते अज्ञातावर आधारित प्रश्नांचा विचार करण्याची मानसिकता विकसित करण्याचे हे प्रयत्न आहेत,' असे डॉ. मिश्रा यांनी नमूद केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दुष्काळावर शिक्कामोर्तब!

$
0
0

Mayuresh.Prabhune@timesgroup.com

पुणे : हवामानशास्त्रीयदृष्ट्या यंदाचा नैऋत्य मोसमी पावसाचा हंगाम बुधवारी संपला. एक जून ते ३० सप्टेंबर या कालावधीत देशभरात सरासरीपेक्षा १४ टक्के कमी, तर महाराष्ट्रात २९ टक्के कमी पावसाची नोंद झाली. 'एल निनो'च्या प्रभावामुळे यंदा अपुऱ्या पावसाची शक्यता भारतीय हवामानशास्त्र विभागासह (आयएमडी) जगभरातील अनेक संस्थांच्या मॉडेलद्वारे वर्तवण्यात आली होती. मराठवाड्यात सलग दुसऱ्या वर्षी ४० टक्के कमी पाऊस झाल्यामुळे येत्या काळात तेथील परिस्थिती आणखी गंभीर होण्याची चिन्हे आहेत.

देशाच्या अनेक भागांतून मान्सून पूर्णपणे माघारी फिरला नसला, तरी हवामानशास्त्रीय नोंदींच्या प्रथेप्रमाणे एक जून ते ३० सप्टेंबर हा मान्सूनचा हंगाम मानला जातो. एखाद्या भागात किंवा देशभरात दुष्काळ जाहीर करण्यासाठी याच कालावधीमधील पावसाची आकडेवारी गृहीत धरण्यात येते. बुधवारी 'आयएमडी'ने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार देशभरात यंदाच्या हंगामात ८८७.५ मिलिमीटर या सरासरी पर्जन्यमानाच्या तुलनेत ७६०.६ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. ३६ हवामानशास्त्रीय विभागांपैकी राजस्थान या एका विभागात सरासरीपेक्षा जास्त पाऊस, १८ विभागांमध्ये सरासरीइतका, तर १७ विभागांमध्ये अपुऱ्या पावसाची नोंद झाली.

महाराष्ट्रात पर्जन्यमानाची स्थिती आणखी गंभीर असून, नागपूर या फक्त एका जिल्ह्यात सरासरीपेक्षा जास्त पावसाची नोंद झाली. कोकण विभागात सरासरीपेक्षा ३१ टक्के कमी, मध्य महाराष्ट्रात ३३ टक्के कमी, मराठवाड्यात ४० टक्के कमी, तर विदर्भात ११ टक्के कमी पावसाची नोंद झाली. हंगामातील सरासरी पावसापेक्षा १९ टक्के कमी किंवा जास्त पाऊस हा सर्वसाधारण (नॉर्मल) पाऊस मानला जातो. २० ते ५९ टक्के कमी पाऊस हा अपुरा (डेफिशिअंट) मानला जातो. राज्यात यंदा सर्व विभागांतील एकूण २३ जिल्ह्यांमध्ये अपुरा पाऊस नोंदला गेला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रिटर्न भरण्यास मुदतवाढ?

$
0
0

पुणेः पंजाब-हरियाणा हायकोर्ट आणि गुजरात हायकोर्टांने दिलेल्या आदेशानंतर या राज्यात रिटर्न दाखल करण्यासाठी केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने (सीबीडीटी) ३१ ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ दिली आहे. दरम्यान, मुंबई हायकोर्टानेही रिटर्नसाठी एक महिन्याची मुदत देण्याचे आदेश दिले असले, तरी त्याबाबत सीबीडीटीने अजून अध्यादेश काढलेला नसल्याने काहीसे संभ्रमाचे वातावरण आहे.

सीबीडीटीने महाराष्ट्राबाबत बुधवारी रात्री उशिरापर्यंत कोणताही अध्यादेश काढलेला नाही; परंतु हायकोर्टाने मुदतवाढ देण्याचे आदेश दिले आहेत, असे इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडियाच्या पुणे शाखेचे अध्यक्ष सी. ए. यशवंत कासार यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सहकारी बँकांपुढे आता ‘प्रीमियम’ धोका

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

सर्व प्रकारच्या बँकांकडून त्यांच्याकडील एक लाख रुपयांपर्यंतच्या ठेवींसाठी देण्यात येणाऱ्या विमा संरक्षणासाठीचा प्रीमियम बँकेला असलेल्या धोक्यानुसार आकारण्याचा रिझर्व्ह बँक विचार करत आहे. बँकेला जितका धोका अधिक तितका अधिक प्रीमियम आकारण्याची शिफारस याबाबत नेमण्यात आलेल्या समितीने रिझर्व्ह बँकेकडे केली आहे.

सर्व व्यापारी बँका, सार्वजनिक बँका, विभागीय ग्रामीण बँका, जिल्हा बँका व सहकारी बँकांना डिपॉझिट इन्शुरन्स अँड क्रेडिट गॅरेंटी कॉर्पोरेशनतर्फे ठेवींवर विमा कवच पुरविण्यात येते. एक लाख रुपयांपर्यंतच्या ठेवींसाठी सर्वच बँकांकडून प्रत्येक शंभर रुपयांसाठी दहा पैसे इतका प्रीमियम आकारण्यात येतो. परंतु, जागतिक पातळीवर बँकांना असलेल्या धोक्यानुसार प्रीमियम आकारण्यात येतो. भारतातही अशीच व्यवस्था असावी, अशी मागणी होत होती. याबाबत विचार करण्यासाठी रिझर्व्ह बँकेने बँकांकडून ठेवींवर देण्यात येणाऱ्या विम्याच्या प्रीमियमबाबत जसबीरसिंग यांच्या नेतृत्वाखाली समिती नेमली होती. या समितीने दिलेल्या अहवालात ही शिफारस करण्यात आली आहे. हा अहवाल रिझर्व्ह बँकेने आपल्या वेबसाइटवर प्रकाशित केला आहे. ३१ ऑक्टोबरपर्यंत या अहवालावर हरकती सूचना नोंदवता येणार आहेत.

या अहवालातील शिफारशींनुसार हा प्रीमियम सरसकट न आकारता प्रत्येक बँकेला असलेल्या धोक्यानुसार आकारण्यात यावा, असे म्हटले आहे. जागतिक पातळीवरही अशाच प्रकारची व्यवस्था आहे.

बँकेची एकूण कामगिरी व बँकेला असलेला धोका यानुसार एकूण १०० पैकी गुण देण्यात यावेत. यामध्ये ८० पेक्षा अधिक गुण असलेल्या बँका कमी धोक्याच्या बँका, ६५ ते ८० गुण मिळविणाऱ्या बँकांना काहीसा धोका, ५० ते ६५ दरम्यान गुण असलेल्या बँकांना मध्यम धोका, तर ५० पेक्षा कमी गुण असलेल्या बँकांना अधिक धोका असल्याचे मानण्यात यावे आणि अधिक प्रमाणात प्रीमियम आकारण्यात यावा, असे या शिफारशींमध्ये म्हटले आहे.

सत्तर टक्के सहकारी बँकांना धोका

अहवाल मंजूर झाल्यास देशातील सुमारे ७० टक्के सहकारी बँका अधिक धोक्याच्या गटात मोडण्याची शक्यता आहे. त्यामुळे त्यांना अधिक प्रीमियम आकारला जाण्याची शक्यता आहे. त्यातच धोकादायक शेऱ्यामुळे ठेवीदारही बँकांपासून दुरावण्याची शक्यता निर्माण झाली आहे. याबाबत नॅशनल फेडरेशन ऑफ अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक्सचे अध्यक्ष डॉ. मुकुंद अभ्यंकर यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी 'याबाबत विचारविनिमय सुरू आहे. सहकारी बँकांमधील तज्ज्ञांची एक समिती नेमून त्यांच्या अहवालानुसार रिझर्व्ह बँकेकडे हरकती सूचना देण्यात येतील,' असे त्यांनी स्पष्ट केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


शिरीष यादव एसीबीच्या जाळ्यात

$
0
0

पाच लाख रुपयांची लाच घेताना अटक

म. टा. प्रतिनिधी, पुणे

झोपडपट्टी पुनर्वसन योजनेच्या (एसआरए) प्रवर्तकाकडून पाच लाख रुपयांची लाच स्वीकारताना एसआरएचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी शिरीष यादव यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) गुरूवारी अटक केली. यादव हे बहुचर्चित टीडीआर घोटाळ्यातील आरोपी असून यापूर्वीही त्यांच्यावर एसीबीने कारवाई केली होती. लोहियानगर येथील एका 'एसआरए' स्कीममधील वादग्रस्त जागेची मोजणी आणि झोपडपट्टीवासियांच्या संख्येला मान्यता देण्याची प्रकरणे यादव यांच्याकडे सुनावणीस होती. त्यावर निकाल देण्याकरिता यादव यांनी २५ लाख रुपयांची मागणी केली होती. त्यापैकी पाच लाख रुपये त्यांनी सहा महिन्यांपूर्वीच घेतले होते. उर्वरित रक्कम देण्यासाठी तगादा लावला होता.

या प्रवर्तकाने तक्रार केल्यानंतर एसीबीच्या पथकाने सापळा रचला. दुपारी दोनच्या सुमारास पैसे स्वीकारल्यानंतर यादवना ताब्यात घेण्यात आले. यादव यांच्या ऑफिसातही तीन लाख रुपये आढळून आले.

यापूर्वी पुणे महापालिकेतील टीडीआर घोटाळ्याप्रकरणी यादव यांच्यावर कारवाई झाली होती. त्यावेळी एसीबीचे अधिकारी झडतीसाठी कोथरूडमधील स्वप्नशिल्प कॉलनीत गेले असता त्यांच्या पत्नीने घरातील पैशांची बॅग खिडकीतून खाली फेकली. तेव्हा या बॅगेतून कॉलनीत पैशांचा पाऊस पडला, या घटनेची सर्वत्र चर्चा झाली होती.

विभागाच्या पथकाने यादव यांच्या घराची झडती घेतली, तेव्हा त्यांच्याकडे सुमारे पन्नास लाख रुपयांची रोकड आणि २५ ते ३० तोळे सोने आढळून आल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. रात्री उशिरापर्यंत या ऐवजाची मोजणी करण्याचे काम सुरू होते. तसेच कॉसमॉस बँकेतील त्यांचे लॉकर अद्याप उघडलेले नसून अन्य मालमत्तेचीही तपासणी सुरू आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पुण्यातील शिक्षण प्रयोग राज्यात

$
0
0

पुणे जिल्हा परिषदेच्या शाळांमधील उपक्रम राज्यभरात पोहोचणार

Yogesh.Borate@timesgroup.com

एकीकडे इंग्रजी शाळांचे प्रमाण सातत्याने वाढत असतानाच, दुसरीकडे राज्यभरात विद्यार्थ्यांना कृतीआधारित शिक्षणाचे धडे देणाऱ्या जिल्हा परिषदांच्या शाळांची संख्याही वाढू लागली आहे. पुणे जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये यशस्वी ठरल्यानंतर कृतीआधारित शिक्षणाचा हा 'पुणे पॅटर्न' राज्यभरात शिक्षण पद्धतीमध्ये आमूलाग्र बदल करण्यासाठी सज्ज झाला आहे. त्यातूनच जिल्हा परिषदांच्या शाळांमध्येही गुणवत्तापूर्ण शिक्षणाची हमी देण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत.

शैक्षणिक अभ्यासक्रमांमध्ये होत असलेल्या बदलांमधून गेल्या काही वर्षांमध्ये राज्यात ज्ञानरचनावाद आणि कृतीवर आधारित शैक्षणिक उपक्रमांवर भर दिला जात आहे. त्यावर आधारित शैक्षणिक पाठ्यपुस्तकेही आता वापरात आली आहेत. मात्र, त्यानंतरही प्रत्यक्षात शाळांमध्ये पारंपरिक पद्धतीनेच विद्यार्थ्यांना शिकविले जात असल्याची ओरड केली जात आहे. या पार्श्वभूमीवर, पुणे जिल्हा परिषदेच्या शाळांमधून सुरू असलेला कृतीआधारित शिक्षणाचा हा उपक्रम राज्यभरात कौतुकाचा विषय ठरला आहे. भोर तालुक्यातील ३० शाळांपासून सुरू झालेला हा उपक्रम आता राज्यभरातील दीड हजार शाळांपर्यंत पोहोचला आहे. पुणे जिल्हा परिषदेतील शाळांमध्ये यशस्वी ठरल्यानंतर विदर्भातील पाच जिल्ह्यांसह कोल्हापूर आणि ठाणे जिल्हा परिषदेच्या शाळांमध्येही कृतीआधारित शिक्षणाचे धडे गिरवण्यास सुरुवात झाली आहे. या प्रकल्पाचे प्रमुख मार्गदर्शक आणि शिक्षण खात्यातील माजी अधिकारी प्रकाश परब यांनी 'मटा'ला या उपक्रमाच्या वाढत्या विस्ताराची माहिती दिली. ते म्हणाले, 'पारंपरिक शिक्षण पद्धतीमधील त्रुटी दूर करण्यासाठी आपल्याकडे सध्या विविध उपक्रम राबविले जात आहेत. मात्र, ही पद्धतच बदलण्यासाठी हा प्रकल्प राबवण्यात येत आहे. पुणे जिल्हा परिषदेचे तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. संजीवकुमार यांच्या मदतीने जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांमधील विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढवण्यासाठी या प्रकल्पाला सुरुवात केली. त्यासाठी आम्ही देशभरातील नावाजलेल्या शैक्षणिक प्रयोगांचा आधार घेतला; तसेच राज्याच्या अभ्यासक्रमावर आधारलेले शैक्षणिक साहित्यही तयार केले. जिल्हा परिषदेच्या शाळांमधील शिक्षकांनीच हे साहित्य बनवले. प्रत्यक्ष अंमलबजावणीत या उपक्रमाचे यश अधोरेखित झाल्यावर इतर जिल्ह्यांमधील शिक्षक हे उपक्रम पाहण्यास येऊ लागले. आता हेच शिक्षक इतर जिल्ह्यांमध्येही हा उपक्रम राबववित आहेत.'

'मुलांमध्ये संकल्पना समजून घेण्याची क्षमता या प्रकल्पाद्वारे प्राथमिक शिक्षणाच्या टप्प्यावरच विकसित केली जात आहे. मुलांना समजेल अशा पद्धतीने शिकवण्याचे तंत्र आम्ही शिक्षकांपर्यंत पोहोचवत आहोत. अध्ययन-अध्यापन पद्धतीमधील हा नियोजनपूर्वक बदल विद्यार्थी आणि शिक्षकांसाठीही आनंददायी ठरत आहे.' - प्रकाश परब

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भर दुपारी सहा फ्लॅटमध्ये चोरी

$
0
0

साडेसहा लाख रुपयांचा ऐवज पळवला

म. टा. प्रतिनिधी, पुणे

सिंहगड रोडवरील सरितानगरी येथे बुधवारी दुपारी दीड ते साडेचारच्या दरम्यान सहा फ्लॅट फोडून सुमारे साडेसहा लाख रुपयांचा ऐवज चोरण्यात आला आहे. या सहाही फ्लॅटमध्ये दुपारी कोणीही नव्हते. या प्रकरणी दत्तवाडी पोलिस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सरितानगरीसारख्या गजबजलेल्या सोसायटीत एकाच वेळी सहा फ्लॅटमध्ये घरफोडी झाल्याने एकच खळबळ उडाली आहे.

स्नेहल पाटणकर (४५, रा. सिंहगड रोड) यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. सरितानगरीमध्ये राहणारे सुजित विजय कुलकर्णी, मिलिंद माधव आठवले, स्मिता सुरेश जेरे, मिलिंद वासुदेव गाडगीळ आ​णि ज्योतीबेन शशिकांत पटेल यांच्या फ्लॅटमध्ये चोरी झाली आहे.

पहिल्या फेजमधील दोन फ्लॅट फोडले

पाटणकर आणि कुलकर्णी यांचा फ्लॅट एकाच बिल्डिंगमध्ये आहे. पाटणकर या गृहिणी आहेत. त्या दुपारी शिवण क्लाससाठी गेल्या असताना घरफोडी झाली. दुपारी दीडपर्यंत त्या घरीच होत्या. क्लासवरून चारच्या दरम्यान त्या घरी परतल्या तेव्हा चोरी झाल्याचे लक्षात आले. त्यांच्या फ्लॅटमधून सव्वातीन लाख रुपयांचा ऐवज चोरीस गेला आहे. पाटणकर यांच्या शेजारी राहणारे सुजित कुलकर्णी यांचा फ्लॅटही फोडण्यात आला. त्यांच्या घरातून १० ग्रॅम वजनाची सोन्याची साखळी चोरण्यात आली आहे.

फेज दोनमध्येही चोऱ्या

दुसऱ्या दोनमध्ये आठवले, जेरे, गाडगीळ आ​णि पटेल यांचा फ्लॅट आहे. शिवणे येथील एका कंपनीत आठवले नोकरीस आहेत, तर त्यांची पत्नी रेल्वेत नोकरी करते. आठवले यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, त्यांच्या घरातून ७५ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने चोरीस गेले आहेत. गाडगीळ यांच्या घरातून ४० ग्रॅम वजनाचे ८० हजार रुपये किमतीचे दागिने चोरीस गेले आहेत. जेरे यांच्या घरातून २५ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने चोरण्यात आले. पटेल यांचा फ्लॅट फोडूनही चोरीचा प्रयत्न झाला. या चारही घटनांमध्ये सुमारे तीन लाख रुपयांचा ऐवज चोरीस गेला आहे.

अशी झाली चोरी

सरितानगरी ही २२० फ्लॅटची सोसायटी आहे. या सोसायटीमध्ये वॉचमन नेमण्यात आले आहेत; मात्र घटनेच्या दिवशी दुपारी बारानंतर या सोसायटीत कोण आले याची नोंद नाही. चोरट्याने इलेक्ट्रिक कटरचा वापर केला आहे. चोरट्यांनी अवघ्या काही ​मिनिटांत कुलूप तोडून घरात प्रवेश केला. फ्लॅटमधून सोने आणि रोख रक्कम नेलेली असल्याने या गुन्ह्यांत रेकॉर्डवरचे गुन्हेगार असण्याची शक्यता आहे. काही संशयितांचा माग काढण्यात येत असून, लवकरच चोरट्यांना अटक होईल, असा विश्वास दत्तवाडी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक श्रीधर जाधव यांनी व्यक्त केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जितेंद्र जाधव यांना ‘डीआरडीओ’चा अग्नी पुरस्कार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

बेंगळुरू येथील 'एरॉनॉटिकल डेव्हलपमेंट एजन्सी'चे (एडीए) वरिष्ठ संशोधक जितेंद्र जाधव आणि त्यांच्या टीमला संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेतर्फे (डीआरडीओ) अग्नी पुरस्काराने गौरवण्यात आले. संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या हस्ते नुकतेच नवी दिल्लीत या पुरस्काराचे वितरण झाले. जाधव मूळचे पुण्याचे आहेत.

तेजस या भारतीय बनावटीच्या कमी वजनाच्या लढाऊ विमानाच्या 'स्ट्रक्चरल डिझाइन'मधील संशोधनात मोलाची भूमिका बजावल्याबद्दल जाधव व त्यांच्या टीमला हा पुरस्कार देण्यात आला. पर्रीकर यांच्याबरोबर नौदल व हवाईदलप्रमुख, संरक्षण मंत्रालयाचे सचिव व 'डीआरडीओ'चे महासंचालक डॉ. एस. ख्रिस्तोफर या वेळी उपस्थित होते. जाधव यांना २००८ मध्ये 'डीआरडीओ'चे सर्वोत्कृष्ट शास्त्रज्ञ म्हणून, तर २०१३मध्ये 'बेस्ट सायंटिस्ट ऑफ दी इयर' हे पुरस्कार प्राप्त झाले आहेत. भारतीय जनता पक्षाचे दिवंगत नगरसेवक शिवाजीराव आढाव यांचे जाधव हे जावई आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘पालिकेच्या नुकसानाचा ठराव विखंडित करावा’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

'महापालिकेच्या जागा खासगी बिल्डरला झोपडपट्टी पुनर्वसन योजनेसाठी (एसआरए) देण्याचा ठराव पालिकेचे आर्थिक नुकसान करणारा आहे. हा ठराव जागावाटप नियमावलीचे उल्लंघन करणारा असून, त्यात मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार झाल्याचे दिसून येत आहे. तो विखंडित करून पुणेकरांच्या हिताचा निर्णय घेण्यास महापालिकेला भाग पाडावे,' अशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करण्यात आली आहे.

कोथरूड परिसरातील पालिकेच्या मालकीच्या श्रावणधारा वसाहतीची ११७ गुंठे जागा बिल्डरला 'एसआरए'साठी देण्याचा ठराव मनसे वगळता सर्व पक्षांनी महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत मंजूर केला. गेल्या आठवड्यात हिराबाग येथील २९ गुंठे जागा खासगी बिल्डरला देण्याचा ठरावही मंजूर झाला. यामध्ये पालिकेला एक रुपयाचाही फायदा होणार नसतानाही काही नेत्यांना हाताशी धरून संबंधित बिल्डरने आर्थिक हित पाहिल्याने महापालिकेचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान करून या जागा बिल्डरला देण्याचा निर्णय सभागृहात घेण्यात आला. हा ठराव मंजूर करू नये, या दोन्ही जागांवर महापालिकेने स्वत: एसआरए प्रकल्प राबवावा, अशा पूर्वीच्या ठरावाचा फेरविचार करून बिल्डरला या जागा कोणाच्या फायद्यासाठी दिल्या, याची शहानिशा करावी, अशी मागणी सुराज्य संघर्ष समितीचे अध्यक्ष विजय कुंभार यांनी मुख्यमंत्री फडणवीस आणि मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय यांच्याकडे केली आहे.

'हा प्रस्ताव मान्य करण्यासाठी आर्थिक गैरव्यवहार झाल्याचे स्पष्ट दिसून येत आहे. पुणेकरांचे हित जपण्यासाठी तसेच पालिकेच्या मालकीची प्रॉपर्टी बिल्डरच्या ताब्यात जाऊ नये, म्हणून हा ठराव विखंडित करावा,' अशी मागणी कुंभार यांनी केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विद्यार्थिनींचा मोर्चा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

लिंगडोह समितीच्या शिफारशींनुसार कॉलेजमधील विद्यार्थी निवडणुकांची लवकरात लवकर अंमलबजावणी व्हावी, या मागणीसाठी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या विद्यार्थिनींनी गुरुवारी विद्यापीठात मोर्चा काढला होता. या विद्यार्थिनींनी कुलगुरू डॉ. वासुदेव गाडे यांना निवेदन देऊन आपल्या मागण्या मांडल्या.

कॉलेजांमध्ये विद्यार्थिनींच्या समस्यांकडे कॉलेज प्रशासन आणि विद्यापीठाचेही दुर्लक्ष होत आहे. सध्याचे नामनिर्देशित विद्यार्थी प्रतिनिधीही या समस्यांकडे लक्ष देत नाहीत. त्यामुळे या समस्या सोडवल्या जात नाहीत. त्यामुळेच कॉलेजांमध्ये आणि विद्यापीठात विद्यार्थिनी प्रतिनिधी निवडून देण्याची सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी या मोर्चादरम्यान करण्यात आली. विद्यार्थिनींच्या समस्यांबाबत विद्यापीठाने सकारात्मक पावले न उचलल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा संघटनेच्या देवश्री खरे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अभिजात आहे, तेच टिकते

$
0
0

ज्येष्ठ साहित्यिक विश्वास पाटील यांचा विश्वास

म. टा. प्रतिनिधी, पुणे

'आताच्या काळात आपल्याकडे व्हॉट्सअॅपसारख्या गोष्टींची चलती आहे. त्याच वेळी, जपानमध्ये कोणी मोबाइलही वापरत नाही. आपल्याकडील परिस्थिती नक्कीच बदलेल. कारण, जे अभिजात आहे, तेच टिकते,' असे मत ज्येष्ठ साहित्यिक विश्वास पाटील यांनी व्यक्त केले.

मेहता पब्लिशिंग हाउसच्या वतीने आयोजित पुस्तक प्रदर्शनाचे उद्घाटन पाटील यांच्या हस्ते गुरुवारी झाले. त्या वेळी ते बोलत होते. मिलिंद कुलकर्णी यांनी पाटील यांच्या 'बंदा रुपया' या पुस्तकातील 'रात्री तुम्ही कुठं होता,' 'रंगभूमीवरचे वाघ-सिंह' अशा काही लेखांचे अभिवाचन करून पाटील यांच्याशी संवाद साधला. लावणी, चित्रपट, नाटके अशा विषयावर पाटील मोकळेपणाने बोलले.

'भाताच्या लावणीइतकीच ओठांवरची लावणीही महत्त्वाची आहे. ढोलकी, फडाचा तमाशा ही संस्कृती होती; मात्र आता तितके दर्जेदार कलावंत राहिले नाहीत,' अशी खंतही पाटील यांनी व्यक्त केली. फिल्मसिटीमध्ये काम करत असताना दिलीपकुमार, राम कदम, नौशाद यांच्यासह झालेल्या भेटीगाठींच्या आठवणींनाही त्यांनी उजाळा दिला. 'मी 'महानायक' कादंबरी लिहिल्यावर, नेताजी सुभाषचंद्र बोस विमान अपघातात गेले अशा निष्कर्षाप्रत आलो होतो; मात्र आता नवनवीन पुरावे समोर येत आहेत. त्यातील भाषा वेगळीच जाणवते. कित्येक फाइल्स नष्ट करण्यात आल्या. अजून कित्येक फाइल्स समोर आलेल्या नाहीत. या फाइल्स समोर आल्यावर काहीतरी सनसनाटी सत्य समोर येईल,' असेही त्यांनी सांगितले. ......................

'बाहुबली'ला महाकाव्याचा पदर

चित्रपटांविषयी बोलताना पाटील यांनी आवर्जून 'बाहुबली'चा उल्लेख केला. 'चित्रपटाची पहिली काही मिनिटे भव्यदिव्यतेचा अनुभव देतात. या चित्रपटाला महाकाव्याचे पदर आहेत. हा चित्रपट हॉलिवूडच्या तुलनेत कोठेही कमी नाही,' असे पाटील यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


बलात्काराप्रकरणी एकाला कोठडी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

घरकाम करण्यासाठी ठेवलेल्या मुलीला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर बलात्कार केल्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या आरोपीला सात दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. प्रथमवर्ग न्यायंदडाधिकारी ए. बी. कुलकर्णी यांच्या कोर्टाने हा आदेश दिला.

दत्तात्रय ऊर्फ दत्ता अरुण कदम (२६, रा. अप्पर इंदिरानगर, बिबवेवाडी) असे आरोपीचे नाव आहे. त्याच्याविरुद्ध एका १९ वर्षीय मुलीने बिबवेवाडी पोलिस स्टेशनमध्ये फिर्याद दाखल केली आहे. आरोपीने घरकाम करणाऱ्या या मुलीचा विश्वास संपादन करून तिला लग्नाचे आमिष दाखवले. घरकामासाठी ठेवून त्याने तिच्यावर वेळोवेळी बलात्कार केला. अधिक तपासासाठी सरकारी वकील अनंत चौधरी यांनी पोलिस कोठडीची मागणी केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रेशन धान्याचा गैरप्रकार उघड

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

रेशन दुकनांमध्ये वितरणासाठी आलेला सुमारे वीस टन गहू आणि तांदूळ परस्पर भूगावमधील फ्लोअर मिलला पाठवण्यात आल्याचा गैरप्रकार गुरुवारी उघडकीस आला आहे. या प्रकरणी फ्लोअर मिलला सील ठोकण्यात आले असून, रेशन धान्याच्या ट्रकचा चालक आणि मिलच्या मालकाविरोधात पौड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

रेशनच्या दुकानातील धान्याची गैरमार्गाने विक्री होत असल्याचा प्रकार उघड होण्याची ही गेल्या काही दिवसांतील दुसरी वेळ आहे. गरीब व अल्प उत्पन्न गटातील नागरिकांना रेशनवर सवलतीच्या दराने दिलेला गहू आणि तांदूळ थेट फ्लोअर मिलला बेकायदा पाठवले जात असल्याचे प्रकार यापूर्वी उघडकीस आले आहेत. भूगावमधील मिलला रेशनचे धान्य पाठवण्यात आल्याची माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी ज्योती कदम यांना मिळाली. त्यानुसार विभागाच्या पथकाने मिलवर छापा मारला. त्या वेळी १२ टन गहू आणि आठ टन तांदूळ गाडीतून उतरवला जात असल्याचे निदर्शनास आले. कदम यांनी तातडीने सर्व धान्य जप्त केले. कारवाई सुरू झाल्यावर मिलचा मालक फरार झाला. त्याच्याविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. ज्या दुकानात हे धान्य वाटपासाठी पाठवण्यात आले होते, त्यांची चौकशी केली जाणार आहे. हे धान्य जप्त करून पौड येथील गोदामात ठेवण्यात आले आहे, असे जिल्हा पुरवठा अधिकारी ज्योती कदम यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कंत्राटदारांकडून अचानक बस बंद

$
0
0

'बीआरटी'ला सर्वाधिक फटका



म. टा. प्रतिनिधी, पुणे

'पीएमपी'च्या कंत्राटदारांनी अचानक बस बंद केल्याचा सर्वाधिक फटका गुरुवारी जलद बस वाहतूक योजनेला (बीआरटी) बसला. दोन्ही बाजूंना दरवाजे असणाऱ्या बस मार्गावरच येऊ न शकल्याने बऱ्याच ठिकाणी प्रवाशांना तिष्ठत थांबावे लागले. 'पीएमपी'ने पर्यायी स्वरूपात साध्या बस मार्गावर पाठवल्या असल्या, तरी 'बीआरटी'च्या स्वतंत्र मार्गिकेतून या बस धावू शकत नसल्याने वाहतूक कोंडीत भर पडली.

'पीएमपी'ने नुकतीच शहर आणि पिंपरी-चिंचवडमध्ये दोन मार्गांवर बीआरटी सेवा सुरू केली आहे. पुणे महापालिका हद्दीतील संगमवाडी-विश्रांतवाडी रस्त्यासह (आळंदी रोड) पिंपरी-चिंचवडमधील सांगवी ते किवळे या बीआरटी मार्गावरील बसथांबे रस्त्याच्या मधोमध असल्याने दोन्ही बाजूला दरवाजे असलेल्या बस मार्गावर पाठवल्या जात होत्या. आळंदी रोडसाठी ६०, तर सांगवी-किवळे मार्गावर दैनंदिन स्वरूपात ११० बस सुरू असायच्या. गुरुवारी दुपारपर्यंत दोन्ही मार्गांवरील सेवा व्यवस्थित सुरू होती; मात्र त्यानंतर कंत्राटदारांकडून या बस टप्प्याटप्प्याने काढून घेण्यात आल्याने बीआरटी सेवेवर त्याचा परिणाम झाला. अचानक या बस बंद झाल्याने प्रवाशांची गैरसोय झाली. त्यांना बससाठी बराच वेळ वाट पाहावी लागली.

दोन्ही बाजूंना दरवाजे असलेल्या बसऐवजी 'पीएमपी'च्या ताफ्यातील बसची पर्यायी व्यवस्था केली, तरीही दोन्ही बाजूंना दरवाजे नसल्याने या बस 'बीआरटी'च्या स्वतंत्र मार्गिकेतून धावू शकल्या नाहीत. त्यामुळे 'पीएमपी'तर्फे प्रवाशांना त्याची माहिती देण्यासाठी स्वतंत्र अधिकारी-कर्मचारी नियुक्त केले गेले. गेल्या महिन्याभरापासून बीआरटी सेवा व्यवस्थित सुरू असताना, अचानक त्यात खंड पडल्याने त्याचा फटका प्रवाशांना सहन करावा लागला. प्रवाशांअभावी 'बीआरटी'चे बसथांबे ओस पडले, तर टर्मिनलवर गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली. तसेच, 'पीएमपी'च्या पर्यायी बस बीआरटी मार्गिकेऐवजी इतर वाहनांसाठी असलेल्या रस्त्यातून धावत असल्याने पुन्हा ठिकठिकाणी वाहतुकीची कोंडी निर्माण झाली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पीएमपी सुधारणांना जाणीवपूर्वक खो

$
0
0

कंत्राटदारांना राजकीय फूस असल्याचा संशय

म. टा. प्रतिनिधी, पुणे

पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपी) मार्गांवर धावणाऱ्या बसची संख्या वाढली..., परिणामी प्रवाशांच्या संख्येतही वाढ झाली अन् दैनंदिन उत्पन्नाचे आकडेही वाढले... 'पीएमपी'तील सुधारणांच्या या 'ट्रॅक'ने अस्वस्थ झाल्यानेच कंत्राटदारांच्या खांद्यावर बंदूक ठेवून व्यवस्था विस्कळीत करण्याचा प्रयत्न केला जात असल्याची भीती आहे. तसेच, अचानक उद्भवलेल्या 'बस बंद'ला राजकीय फूस असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. 'पीएमपी'ला साडेसहाशे बस पुरवणाऱ्या कंत्राटदारांनी गुरुवारी अचानक बस बंद केल्या. त्याचा मोठा फटका प्रवाशांना बसला असून, 'पीएमपी'च्या उत्पन्नावरही विपरीत परिणाम होण्याचा अंदाज आहे. गेल्या काही वर्षांपासून अपुरी बससंख्या, घटते उत्पन्न आणि घटती प्रवासी संख्या अशा दुष्टचक्रात अडकलेल्या 'पीएमपी'त सुधारणा करण्यासाठी काही ठोस निर्णय घेतले जात आहेत. त्याची काटेकोर अंमलबजावणी केली जात असल्याने सकारात्मक परिणाम दिसून येत आहेत. 'पीएमपी'ने गेल्या महिन्यात सुरू केलेल्या दोन बीआरटी मार्गांनाही प्रवाशांचा उत्तम प्रतिसाद लाभत आहे. 'पीएमपी'तील या सुधारणांना 'ब्रेक' लावण्यासाठीच खासगी कंत्राटदारांना हाताशी धरण्यात आल्याची चर्चा सुरू आहे. सर्व गोष्टी सुरळीत सुरू असताना, तसेच ठेकेदारांची देणीही नुकतीच चुकती केली असूनही बस बंद करण्याचे कारण काय, अशी विचारणा केली जात आहे.

बीआरटी सेवेला नुकताच एक महिना पूर्ण झाला असल्याने त्याचा आढावा घेण्यासाठीही गुरुवारी विशेष बैठक घेण्यात आली होती. या बैठकीलाही कंत्राटदारांपैकी कोणीही उपस्थित राहिले नाही. त्यामुळेच, 'पीएमपी'ची सेवा विस्कळीत करण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न केले जात असल्याची शंका व्यक्त केली जात आहे. राजकीय पाठिंबा असल्याशिवाय 'पीएमपी'ला टक्कर देण्याचे धाडस कंत्राटदार दाखवू शकत नाहीत, अशी चर्चाही सुरू असल्याने 'पीएमपी'च्या सुधारणांना खो घालण्याचा हा प्रकार तातडीने थांबवण्याची गरज व्यक्त होत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘तेवढे सोडून बोला...’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाच्या (एफटीआयआय) नियामक मंडळाचे नवनियुक्त अध्यक्ष गजेंद्र चौहान आणि चार सदस्यांना हटवण्यास सरकार राजी झालेले नाही. या पाच जणांची नियुक्ती रद्द करण्याची मागणी सोडून विद्यार्थ्यांच्या इतर मागण्या मान्य करण्यास सरकार तयार आहे.

'एफटीआयआय'चे विद्यार्थी व केंद्र सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे सहसचिव यांची गुरुवारी मुंबईत बैठक झाली. मात्र, या बैठकीत संप मिटण्याबाबत कोणताही ठोस मार्ग निघू शकला नाही. संस्थेच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष गजेंद्र चौहान यांच्यासह राहुल सोलापूरकर, अनघा घैसास, नरेंद्र पाठक, शैलेश गुप्ता या सदस्यांना हटवण्याची विद्यार्थ्यांची मागणी आहे. त्याचबरोबर 'एफटीआयआय'ला 'सेंटर फॉर एक्सलन्स'चा दर्जा द्यावा, पूर्ण स्वायत्तता द्यावी, अशाही काही मागण्या आहेत.

'नियामक समितीवरील पाच सदस्यांना हटवणे शक्य नसल्याचे सहसचिवांनी विद्यार्थ्यांना स्पष्ट सांगितले. चौहान यांना अध्यक्षपदी कायम ठेवून उपाध्यक्ष पद निर्माण करण्यात आले आहे. त्याला सर्व अधिकार देण्यात आले आहेत. मात्र, विद्यार्थ्यांना हा पर्याय पटत नसल्यानेच ६ ऑक्टोबरला पुन्हा बैठक होणार आहे,' अशी माहिती मंत्रालयाशी संबंधित सूत्रांनी 'मटा'ला दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images