Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

पिस्तुलच्या धाकाने विद्यार्थ्याला लुटले

$
0
0

लिफ्ट देऊन शहरभर फिरवले; एटीएममधील रक्कम काढून घेतली

म. टा. प्रतिनिधी, पुणे

होस्टेलला निघालेल्या एका 'एमबीए'च्या विद्यार्थ्याला रात्रीच्या वेळी लिफ्ट मागणे महागात पडले आहे. कारमधील दोघा आरोपींनी वडगाव धायरी येथे या विद्यार्थ्याला पिस्तुलाच्या धाकाने शहरभर फिरवले आणि ५० हजार रुपायांना लुटले. खेड शिवापूर, हिंजवडी, देहू रोड आणि दिघी परिसरात फिरवत आरोपींनी विद्यार्थ्याच्या 'एटीएम'कार्डवरून ५० हजार रुपये काढून घेतले. दिघी येथे सोडताना त्याच्या डोळ्यात 'चिली स्प्रे' मारण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे.

चंदन शर्मा (वय २०, रा. आंबेगाव बुद्रूक) असे तक्रार दाखल करण्यात आलेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे. या प्रकरणी सिंहगड रोड पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. ही घटना गुरुवारी मध्यरात्री आठ ते बाराच्या दरम्यान घडली. शर्मा हा मुळचा राजस्थान येथील आहे. वडगाव ​परिसरातील एका बड्या कॉलेजमध्ये त्याने 'एमबीए'साठी अॅडमिशन घेतले असून, तो पंधरा दिवसांपूर्वीच पुण्यात आला आहे. गुरुवारी तो हिंजवडी येथे नातेवाइकांकडे गेला होता. रात्री आठच्या दरम्यान तो पुन्हा वडगाव येथे परतला. स्वतःचे वाहन नसल्याने तो पायीच आंबेगाव येथे होस्टेलवर जात होता. पायी जात असताना एक कार अचानक त्याच्याजवळ येऊन थांबली. आंबेगावला जाण्यासाठी २० रुपये द्यावे लागतील, असे त्याला सांगण्यात आले. शर्मा हा होकार दर्शवत त्या कारमध्ये बसला. आरोपींनी विद्यार्थ्याला पिस्तुलाचा धाक दाखवला.

शर्मा कारमध्ये बसल्यानंतर चालकाने वेग वाढवला आणि कार खेड शिवापूरच्या दिशेने नेली. शर्माने कार थांबवण्यासाठी चालकाला विचारणा केली. मात्र, चालकाशेजारी बसलेल्या आरोपीने त्याला शिवीगाळ करत पिस्तुलाचा धाक दाखवला. आरोपींनी त्याच्याकडे पैशाची मागणी केली. मात्र, त्याच्या खिशात फारच थोडे पैसे होते. त्याने नुकताच हिंजवडी येथे नवीन मोबाइल विकत घेतला होता. आरोपींनी त्याच्याकडील ते दोन्ही मोबाइल हिसकावले. फिल्मीस्टाईलने कारमध्येच गोळी झाडण्याचा दिखावा करण्यात आला, तसेच त्याच्यासमोर पिस्तुलात काडतूस भरण्यात आले.

'एटीएम'मधून रोकड काढली

खेड शिवापूर येथील एका 'एटीएम' सेंटरसमोर कार थांबवण्यात आली. शर्माकडून जबरदस्तीने 'एटीएम' कार्ड तसेच पिननंबर मिळवण्यात आला. त्यातील एका आरोपीने 'एटीएम'मध्ये जाऊन पैसे काढले. जेलमध्ये असलेल्या एका मित्राला सोडवण्यासाठी पैसे लागत असल्याचे त्यांनी शर्माला सांगितले. त्यानंतर आरोपी हिंजवडीला गेले. तेथेही त्यांनी एका 'एटीएम' सेंटरमधून पैसे काढले. आरोपी पुन्हा देहू रोड येथे गेले. तेथेही पैसे काढले. अशा प्रकारे 'एटीएम'वरून ५० हजार रुपये काढण्यात आले. त्यानंतर आरोपी दिघीच्या दिशेने गेले. निर्जन रस्ता पाहून त्यांनी कार थांबवली. शर्माकडील पॅनकार्ड, आधार कार्ड इलेक्शन कार्ड हिसकावले आणि त्याच्या डोळ्यात 'चिली स्प्रे' मारून पळ काढला.

स्थानिकांनी केली मदत

'चिली स्प्रे' डोळ्यात गेला असल्याने शर्माचे डोळे चूरचूरत होते. त्याच अवस्थेत तो काही अंतर चालत गेला. रस्त्याच्या कडेला असलेले एका घराचा दरवाजा त्याने रात्री एकच्या सुमारास खटखटवला. घर मालकाने दरवाजा उघडल्यानंतर त्याने सर्व हकिकत त्यांना सांगितली आणि डोळे धुण्यासाठी पाणी मागितले. त्यानंतर तेथूनच रिक्षाने तो नऱ्हे येथे एका खासगी हॉस्पिटलमध्ये उपचारांसाठी दाखल झाला. हॉस्पिटलने घटनेची माहिती वाकड पोलिसांना दिली. वाकड पोलिसांकडून सिंहगड रोड पोलिसांना सांगण्यात आले. शर्मा हा नुकताच पुण्यात आला असल्याने आरोपींनी त्याला कुठे फिरवले, कोठून पैसे काढले, हेही नीट सांगता येत नव्हते, असे सिंहगड पोलिसांनी सांगितले.

चार महिन्यांत पाच घटना

हिंजवडी, निगडी, किवळे परिसरात अशा प्रकारे लुटमार करण्याच्या चार घटना एप्रिल महिन्यापासून घडल्या आहेत. हिंजवडी परिसरात स्वतःचे वाहन नसलेल्या आणि लिफ्टची गरज असणाऱ्या सॉफ्टवेअर इंजिनीअरला लुटण्याच्या घटना घडल्या आहेत. आरोपींकडून या नागरिकांच्या खिशातील पैसे तर हिसकवण्यात आले, परंतु शक्य असेल तर एटीएममधून रोकडही काढण्यात आली आहे. यातील बहुतेक घटना उघडकीस आलेल्या नाहीत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


अतिक्रमणमुक्तीच्या प्रयत्नांना गती

$
0
0

अतिक्रम हटाव मोहिमेमुळे वॉर्डातील रस्त्यांचा श्वास मोकळा
वॉर्ड क्रमांक ८ (महात्मा गांधी रस्ता)

>> सुजित तांबडे, पुणे

पुणे कँटोन्मेंट बोर्डातील व्यापारीदृष्ट्या महत्त्वाच्या असलेल्या महात्मा गांधी रस्ता आणि आसपासचा परिसर मिळून झालेल्या या वॉर्डात इंच-इंच जमिनीला कोट्यवधींचे मोल आहे. मागील पाच वर्षांत बोर्डातील माननीयांच्याच वरदहस्तामुळे या जमिनी आणि रस्ते अतिक्रमणांनी वेढले गेले होते. सत्ता परिवर्तन झाल्यानंतर या वॉर्डात झालेला महत्त्वाचा बदल म्हणजे अतिक्रमणांतून वॉर्डाला मुक्त करण्याचा विडा उचलण्यात आला आहे. त्यामुळे आता रस्ते मोकळे दिसू लागले आहेत.

पुण्यातील लक्ष्मी रोड आणि पुणे कँटोन्मेंट बोर्डाच्या हद्दीतील महात्मा गांधी रस्ता हे पुणेकरांचे खरेदीचे आवडते रस्ते आहेत. त्यातील महात्मा गांधी रस्ता या वॉर्डात असून, भीमपुरा लेन नंबर २२ ते २९, सेफी लाइन, इस्ट स्ट्रिट, दस्तूर मेहेर रस्ता, शिंपी आळी, ताबूत इस्टेट आदी परिसरही या वॉर्डात आहे. भाजपच्या प्रियंका श्रीगिरी या नगरसेविका आहेत. हा वॉर्ड महिलांसाठी राखीव झाला असल्याने पहिल्यांदाच त्यांना ही संधी मिळाली आहे. त्यांचे वडील राजू श्रीगिरी हे कँटोन्मेंट भागातील भाजपचे जुने पदाधिकारी आहेत. यापूर्वी ते भाजपच्या कँटोन्मेंट भागाचे अध्यक्ष होते. त्यामुळे पहिल्यांदाच या वॉर्डात भाजपला यश मिळाले आहे. पाच वर्षांपूर्वी बोर्डाचे सात वॉर्ड होते. मात्र, गेल्या निवडणुकीत हा वॉर्ड नव्याने तयार करण्यात आला. मागील निवडणुकीत काँग्रेसकडे हा वॉर्ड होता.

गेल्या पाच ते सहा वर्षांत या वॉर्डात अतिक्रमणांचा सुळसुळाट झाला होता. बोर्डाच्याच माननीयांच्या वरदहस्तामुळे या अतिक्रमणांवर निर्बंध घालणे बोर्डातील अधिकाऱ्यांना शक्य होत नव्हते. हातगाडीचालकांच्या टोळ्या महात्मा गांधी रस्ता आणि आसपासच्या बाजाराच्या ठिकाणी एकवटलेल्या होत्या. या टोळ्यांमुळे दुकानदार आणि हातगाडीचालक यांच्यात वादाच्या घटनाही घडल्या आहेत. मात्र, माननीयांचा पाठिंबा असल्याने हातगाडीचालक मोकाटपणे वॉर्डात फिरताना दिसत होते.

गेल्या सहा महिन्यांत हा रस्ता अतिक्रमणांनी मुक्त करण्याचे ठरविण्यात आले. प्रामुख्याने सायंकाळीच बोर्डाच्या अतिक्रमणविरोधी पथकाने मोहीम सुरू केल्याने सहा महिन्यांत वॉर्ड अतिक्रमणमुक्त होण्याच्या दिशेने वाटचाल करू लागला आहे.

नागरिकांच्यादृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या प्रश्नांकडे मागील पाच वर्षांत दुर्लक्ष झाले. ड्रेनेजलाइन, पिण्याच्या पाण्याच्या लाइन आणि फुटपाथ या कामांकडे लक्ष देण्यात आले नव्हते. त्यामुळे ही कामे आता सुरू झाली आहेत.

शिवाजी मार्केटला लागून हा वॉर्ड असल्याने वॉर्डात दुर्गंधी पसरलेली असायची. शिवाजी मार्केटमधील मटन आणि चिकनच्या मोठ्या गाड्या बाहेर उभ्या करण्यास बंदी घातल्याने वॉर्डातील दुर्गंधी कमी झाली असल्याचे दिसून येते.

सार्वजनिक शौचालयांच्या स्वच्छतेकडेही दुर्लक्ष झाले होते. शौचालयांचा परिसर स्वच्छ ठेवण्याच्यादृष्टीने गेल्या सहा महिन्यांत विशेष लक्ष पुरविण्यात आल्याने वॉर्डाचे चित्र आता बदलू लागले आहे. या वॉर्डातील नागरिक गजबजलेल्या आणि दाटीवाटीने उभ्या असलेल्या घरांमध्ये राहात आहेत. चटईक्षेत्र निर्देशांक (एफएसआय) वाढीची नागरिकांची अनेक वर्षांपासूनची मागणी आहे. ही मागणी केंद्रात आणि बोर्डात भाजपची सत्ता आल्याने आगामी काळात पूर्ण होईल, अशी नागरिकांना आशा आहे.

नगरसेवक म्हणतात...

माझ्या वॉर्डात ठि​कठिकाणी दाटीवाटीने घरे आहेत. त्यामुळे मोकळ्या जागा फारशा नाहीत. घरांच्या पुनर्बांधणीचा प्रश्न आहे. त्यामुळे 'एफएसआय' वाढीसाठी आगामी काळात प्रयत्नशील राहणार आहे. निवडून आल्यानंतर मागील पाच वर्षांत रेंगाळलेले नागरी प्रश्न सोडविण्यावर भर दिला. त्यामध्ये फुटपाथ, रस्ते दुरुस्ती आणि वॉर्डातील स्वच्छता यांचा समावेश आहे. तसेच पिण्याच्या पाण्याची समस्या भेडसावत होती. त्यामुळे नवीन पाइपलाइन टाकण्याची कामे केली​ आहेत. आता पिण्याच्या पाण्याचा प्रश्न राहिलेला नाही.
मागील काळात वॉर्डात अतिक्रमणे मोठ्या प्रमाणात झाली होती. ठिकठिकाणी हातगाडीचालक आणि पथारीवाले होते. त्यामुळे वॉर्ड अतिक्रमणापासून मुक्त करण्यासाठी मोहीम राबविण्यात आली. आता वॉर्डातील अतिक्रमणे कमी झाली आहेत.

महिलांनी लघुउद्योग सुरू करावेत, यासाठी महिला प्रशिक्षण केंद्र सुरू करण्यात आले आहे. सध्या एका खाजगी जागेत महिलांसाठी शिवणकाम आणि अन्य कामांचे प्रशिक्षण देण्यात येत आहे. बोर्डाच्या काही मोकळ्या जागा आहेत. त्या ठिकाणी कायमस्वरूपी महिला प्रशिक्षण केंद्र सुरू करण्यासाठी प्रयत्न करणार आहे.

वॉर्डातील नागरिकांसाठी बोर्डाचा दवाखाना आहे. मात्र, तो दुपारी बंद असतो. त्यामुळे नागरिकांना या कालावधीत बोर्डाच्या सरदार वल्लभभाई पटेल हॉस्पिटलमध्ये जावे लागते. वॉर्डातील दवाखाना दिवसभर सुरू ठेवण्याचा मानस आहे.

बोर्डाच्या हद्दीतील विद्यार्थ्यांना पुणे महानगर परिवहन महामंडळ लिमिटेडच्या (पीएमपी) बसेसचे पास मोफत किंवा सवलतीच्या दराने ​देण्यात येत नाहीत. बोर्डाच्या परिसरात राहणाऱ्या विद्यार्थ्यांनाही या योजनेचा लाभ मिळावा, यासाठी प्रयत्नशील राहणार आहे.
- प्रियंका श्रीगिरी, नगरसेविका, भाजप

पीपल फोरम

वॉर्डातील अंतर्गत रस्ते आणि फुटपाथची अनेक कामे पूर्ण झाली आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेली ही कामे मार्गी लागली आहेत. सहा महिन्यांमध्येच सर्व काही कामे होतील, असे नाही. तरीही रस्त्यांची कामे झाली पाहिजेत.
- नईम शेख
...

ताबूत स्ट्रिटवर पावसाळ्याच्या काळात पाणी साचण्याचे प्रकार घडत होते. त्यामुळे येथील ड्रेनेजलाइनचे काम तातडीने करण्यात आल्याने या वर्षी नागरिकांना त्रास झाला नाही. मात्र, अनेक दिवसांपासून रखडलेली अन्य भागातील ड्रेनेजलाइनची कामे लवकर हाती घेण्यात यावीत.
- परेश गायकवाड
...

बोर्डाच्या हद्दीत राहणाऱ्या शाळा आणि कॉलेजमधील विद्यार्थ्यांना पीएमपीच्या बस पास योजनेचा लाभ मिळत नाही. हे विद्यार्थी बोर्डाच्या हद्दीत राहत असले, तरी त्यांना पुणे महापालिकेच्या हद्दीतील शाळा आणि कॉलेजमध्ये जावे लागते. त्यामुळे पीएमपीने या विद्यार्थ्यांना बसपास द्यावेत.
- संजय लचके
...

वॉर्डातील नागरिकांना दुपारी औषधोपचारासाठी दवाखान्यात जाण्याची वेळ आली, तर वॉर्डातील दवाखाना दुपारी बंद असतो. त्यामुळे नागरिकांची अडचण होते. त्यामुळे दुपारीदेखील दवाखाना सुरू ठेवला पाहिजे. तसेच या ठिकाणी रक्त, लघवी आणि थुंकी तपासणीची सुविधा उपलब्ध झाली पाहिजे.
- ओंकार खोले
...

बोर्डातील नागरिकांची अनेक कामे असतात. त्यासाठी वॉर्डात नागरी सुविधा केंद्र असले पाहिजे. वॉर्डात यापूर्वी आर्ट गॅलरीसाठी जागा होती. ती जागा सध्या मोकळी आहे. त्या ठिकाणी नागरी सुविधा केंद्र सुरू करावे.
- विशाल रॉय

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘एचए’चा तिढा सुटेल का?

$
0
0

सातशे कोटींचा प्रस्ताव केंद्राकडे;
हंसराज अहिर यांच्यासह पुण्याच्या खासदारांची पुन्हा बैठक

म. टा. प्रतिनिधी, पिंपरी

पिंपरीतील हिंदुस्थान अॅन्टिबायोटिक्स कंपनीच्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असेला पुनरुज्जीवनाचा प्रश्न भाजप सरकार तरी लवकर मार्गी लावणार का?असा सवाल उपस्थित केला जात आहे. कारण दर दीड दोन महिन्यानंतर सध्याचे शहरातील भाजपचे खासदार अमर साबळे, श्रीरंग बारणे आणि पुण्याचे अनिल शिरोळे हे याबाबत केंद्रीय रसायन मंत्री हंसराज अहिर यांची भेट घेत आहेत. त्यांची भेट झाल्यावर लवकरच मार्गी लावणार असे सांगितले जात आहे. मात्र, अद्याप तरी हा प्रश्न काही मार्गी लागण्याची चिन्ह दिसत नाहीत.

दिल्लीतील हंसराज अहिर यांच्या कार्यालयात 'एचए'चा प्रश्न सोडविण्यासाठी बैठक झाली. या बैठकीसाठी खासदार अमर साबळे, अनिल शिरोळे यांच्यासह केंद्रीय रसायन मंत्रालयाचे सचिव सुब्बुराव, एच. ए. कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक के. व्ही. वर्की हे देखील उपस्थित होते. त्या वेळी कंपनीसाठी ७०० कोटींचा प्रस्ताव अर्थ मंत्रालयाकडे पाठवला असून, कंपनीत उत्पादन वाढविण्याचा प्रयत्न असल्याचे हंसराज अहिर यांनी सांगितल्याचे खासदार साबळे यांनी कळविले आहे.

पुन्हा एकदा झालेल्या भेटीदरम्यान एचए कंपनीची जागा व खेळते भांडवल आणि कामगारांचे पुनर्वसन या धोरणात्मक मुद्यावर चर्चा झाली. त्या वेळी 'एचए'च्या सहा एकर जागेबाबत, तसेच औषध निर्मितीला लागणारे भाग भांडवल, कामगारांचे थकित वेतन आणि त्यांचे पुनर्वसन या सगळ्यासाठी तयार केलेला ७०० कोटींचा प्रस्ताव अर्थ मंत्रालय व प्रधान कार्यालयाकडे पाठविण्यात आल्याचे हंसराज अहिर यांनी सांगितले आहे.

सार्वजनिक व खासगी उद्योगांची औषध निर्मितीची कामे एचए कंपनीला मिळवीत, यासाठी प्रयत्न आहे. तसेच २४ ऑगस्टपासून पहिल्या चार कोटींच्या औषध निर्मितीच्या मागणीचे उत्पादन सुरू होणार असून, उत्पादनात सातत्य ठेवण्याचा प्रयत्न असल्याचेही अहिर यांनी म्हटले आहे. यापूर्वी खासदार बारणे, साबळे यांनी हंसराज अहिर यांची भेट घेतली आहे. तसेच पुण्याचे खासदार शिरोळे हे देखील यापूर्वीच्या काही बैठकांना उपस्थित होते.

प्रत्यक्ष कृती की फक्त आश्वासने?

या खासदारांच्या प्रयत्नानंतर अहिर कंपनीत येऊन पाहणी करून गेले. त्यानंतर लवकरच हा प्रश्न मार्गी लावणार. येत्या काळात निधी उपलब्ध केला जाईल. पहिला टप्पा वाढविला जाईल. पुन्हा एकदा याच ठिकाणी उत्पादन सुरू केले जाईल, अशी अनेक आश्वासने देण्यात आली आहेत. मात्र, मागील आघाडी सरकारच्या नेत्यांप्रमाणेच भाजप सरकार केवळ आश्वासन देणार की प्रश्न मार्गी लावणार अशी चर्चा सध्या एचए कंपनीच्या कामगार वसाहतीत आणि शहरात रंगत आहे. त्यामुळे हा प्रश्न कधी मार्गी लागतो हे येत्या काळात स्पष्ट होईल.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पवना धरणात बुडून तरुणाचा मृत्यू

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, लोणावळा

स्वातंत्र्यदिनी पर्यटनासाठी लोणावळ्यात आलेल्या एका परप्रांतीय युवकाचा पवना धरणामध्ये बुडून मृत्यू झाला आहे. ही घटना शनिवारी दुपारी साडेतीन वाजता पवना धरणा लगतच्या ठाकूरसाई गावच्या हद्दीत घडली आहे. सुमीत सुरेंद्रकुमार शर्मा (वय २५, रा. हिंजवडी, पुणे, मूळ रा. मेरठ, उत्तरप्रदेश ) असे पवना धरणामध्ये बुडून मृत्यू झालेल्या युवकाचे नाव आहे. तो हिंजवडी येथील आयटी पार्कमधील एका कंपनीत कामाला होता.

लोणावळा ग्रामीण पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सुमीत आणि त्याचे इतर तीन मित्र शनिवारी स्वातंत्र्यदिनाची सुट्टी असल्याने पवना धरण परिसरात दुपारी पर्यटनासाठी आले होते. पवना धरणाच्या किनाऱ्यावरील ठाकूरसाई गावच्या हद्दीत ते फिरायले गेले होते. या वेळी सुमीतचा पाय घसरला आणि तो पाण्यात पडला. बाहेर येण्याचा सुमीत प्रयत्न केला. पण त्याची दमछाक झाल्याने खोल पाण्यात बुडून त्याचा मृत्यू झाला.

शनिवारी पोलिसांनी स्थानिकांच्या मदतीने त्याचा मृतदेह बाहेर काढण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, अंधार झाल्याने शोधकार्य थांविण्यात आले होते. रविवारी सकाळी साडेआठ वाजता तळेगाव येथील 'एनडीआरएफ'च्या जवानांनी सुमितचा मृतदेह बाहेर काढला. या घटनेचा पुढील तपास लोणावळा ग्रामीण पोलिस करीत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कर्जपुरवठा ही संधी: मुंद्रा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

'लघु व मध्यम उद्योगांना (एमएसएमई) कर्जपुरवठा ही बँकांसाठी मोठी व्यवसाय संधी आहे. या क्षेत्रासाठी बँकांनी कृती आराखडा तयार करावा. या क्षेत्रातील ग्राहकांच्या गरजा लक्षात घेऊन त्यानुसार योग्य पर्याय उपलब्ध करून द्यावेत,' असे मत रिझर्व्ह बँकेचे डेप्युटी गव्हर्नर एस. एस. मुंद्रा यांनी नुकतेच व्यक्त केले.

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या कृषी बॅँकिंग महाविद्यालयातर्फे 'लघु, मध्यम उद्योगांच्या वित्तीय वृद्धीकरता बॅँकांचे धोरण' या विषयावर राष्ट्रीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेच उद्‌घाटन मुंद्रा यांच्या हस्ते झाले. रिझर्व्ह बॅँकेचे कार्यकारी संचालक यू. एस. पालीवाल, मुख्य सरव्यवस्थापक (आरबीआय, एफआयडीडी) माधवी शर्मा, महाविद्यालयाचे मुख्य सरव्यवस्थापक प्रमोद कुमार पांडा, उपमुख्य सरव्यवस्थापक एल. एम. गणेशन, सहायक सरव्यवस्थापक रेणू अजवानी उपस्थित होते. कॉलेजतर्फे खास एमएसएमईच्या कर्जपुरवठ्यासाठी बँकांच्या शाखा व्यवस्थापकांना मार्गदर्शन करण्यासाठीच्या व बँकिंग क्षेत्रातील प्रशिक्षकांसाठी काढण्यात आलेल्या दोन पुस्तकांचे प्रकाशनही या वेळी मुंद्रा यांच्या हस्ते झाले.

'एमएसएमई क्षेत्राला काही समस्या भेडसावत आहेत. त्यासाठी बँकांनी कृती कार्यक्रम निश्चित केला पाहिजे. ई-कॉमर्सच्या माध्यमातून व्यवहार करण्यासाठी बॅँकांनी पुढाकार घेतला पाहिजे. केंद्र सरकारने फक्त एमएसएमईच्या विकासासाठी ७० हजार कोटी रुपये बॅँकांना देण्याचे मान्य केले आहे. त्यापैकी २५ हजार कोटी रुपये पहिल्या टप्प्यात देण्यात येतील,' असे मुंद्रा यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बेकायदा ‘सर्पमित्रां’चा पंचमीपूर्वी फुत्कार!

$
0
0

नियमावली कागदावर राहिल्याने तस्करीला आळा नाही

>> चैत्राली चांदोरकर, पुणे

सर्पमित्रांच्या आचारसंहितेबाबत राज्यस्तरीय नियमावली कागदावरच राहिल्यामुळे पुण्यामध्ये सध्या दीड हजारांहून अधिक बेकायदा 'सर्पमित्र' कार्यरत आहेत. कारवाईच्या अधिकाराअभावी वनाधिकाऱ्यांकडे त्याबाबत कोणतीही ठोस माहिती नाही. परिणामी, सोशल मीडियातून राजरोसपणे साप गळ्यात मिरविणारे फोटो शेअर केले जात आहेत.

केंद्रीय पर्यावरणमंत्री प्रकाश जावडेकर यांनी काही दिवसांपूर्वीच बत्तीस शिराळ्यासह राज्यभरात नागपंचमीला सापांच्या पूजनास अलिखित संमती दर्शविल्याने गेल्या महिनाभरात सर्पमित्रांच्या टोळ्यांचा छुपा कारभार सुरू झाला आहे.

पुणे शहर आणि जिल्ह्यात सापांच्या तस्करीचे रॅकेट कार्यरत असून हे लोक इतर शहरातील सर्पमित्रांना वेगवेगळ्या प्रकारातील साप पुरवतात, अशी तक्रार प्राणिप्रेमी वारंवार करीत आहेत. वनाधिकाऱ्यांनी मात्र याकडे दुर्लक्ष केले आहे. विनापरवाना सापांना पकडणाऱ्या सर्पमित्रांची संख्या दर वर्षी वाढते आहे. वेगवेगळ्या प्रकारच्या सापांना पकडायचे आणि त्यांचा संग्रह करून सोशल नेटवर्किंग साइटवरून त्याचे फोटो टाकून शौर्य मिरवायचे, अशी क्रेझ हौशी सर्पमित्रांमध्ये वाढली आहे.

सापांची माहिती, पुरावे बंधनकारक

प्राणिप्रेमी संस्थांनी वन विभागाकडे पाठपुरावा केल्यानंतर नागपूर येथील प्रधान मुख्य वनसंरक्षकांच्या अध्यक्षतेखाली अभ्यासकांची समिती नेमण्यात आली होती. या समितीने सर्पमित्रांसाठी नियमावली तयार केली आहे. त्यानुसार पुणे वनविभागाने अधिकृत सर्पमित्रांची यादी जाहीर करून त्यांना ओळखत्र देणे अपेक्षित आहे. या सर्पमित्रांनी दर आठवड्याला साप कोठे, किती आणि कोणते साप पकडले याची माहिती वन विभागाच्या कार्यालयात जाऊन नोंदविणे बंधनकारक केले आहे. एवढेच नव्हे तर सापांना पुन्हा निसर्गात सोडताना वनविभागाच्या कर्मचाऱ्याला बरोबर न्यावे, असा नियम करण्यात आला आहे. याची दखल घेऊन पुणे वन विभागाने सहा महिन्यांपूर्वी ३५० सर्पमित्रांना अधिकृत परवाने दिले. पण त्यांच्यावर नजर ठेवण्यास वनाधिकारी असमर्थ ठरले आहेत. काही मोजके सर्पमित्र सोडल्यास अनेकांकडे सापांच्या नोंदी उपलब्ध नाहीत. याशिवाय सुमारे दीड हजार सर्पमित्र आजही शहरामध्ये विनापरवाना साप पकडण्याचे काम करीत आहेत.

मानवी वस्तीतील सापांना पकडून त्यांचा संग्रह करायचा आणि इतर जिल्ह्यातील सर्पमित्रांना सापांची आदलाबदल करण्याचे उद्योग सर्रास सुरू आहेत. पुण्यातील वन विभागाच्या निष्काळजीपणामुळे गारुडींपेक्षाही क्रूरपणे मोकाट सुटलेले सर्पमित्र सापांचाच जीव घेत असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे.
.....

शहरातील सर्पमित्रांसाठी वन विभागाच्या ऑफिसमध्ये नोंदवहीमध्ये ठेवली आहे. याशिवाय आमचे कर्मचारी सर्पमित्रांवर नजर ठेवून असतात. पण त्यांच्याविषयी वाढलेल्या तक्रारींमुळे आम्ही आता धडक मोहिमा घेणार आहोत. नागपंचमीच्या पार्श्वभूमीवर सर्पमित्रांवर आमची नजर राहणार आहे
- विजय माने, सहायक वनसंरक्षक, पुणे वन विभाग

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘सरल’च्या वाटेत अडचणी

$
0
0

शाळांची ऑनलाइन माहिती संकलन यंत्रणा ठप्प होण्याचे प्रकार

म. टा. प्रतिनिधी, पुणे

राज्यातील विद्यार्थी-शिक्षक-शाळांची माहिती एकाच ठिकाणी जमा करण्यासाठी शिक्षण खात्याने सुरू केलेल्या 'सरल' या ऑनलाइन यंत्रणेच्या अंमलबजावणीमध्ये अनेक अडचणी येत असल्याची ओरड आता सुरू झाली आहे. ही माहिती भरण्याची प्रक्रिया अत्यंत वेळखाऊ असून, त्यामुळे शिक्षक मुख्याध्यापकांचा बहुतांश वेळ ही माहिती भरण्यात जात असल्याने, विद्यार्थ्यांच्या अभ्यासाकडे दुर्लक्ष होत असल्याची टीकाही केली जात आहे.

राज्याचे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी पुण्यात नुकत्याच झालेल्या एका कार्यक्रमात या यंत्रणेचे उद्‍‍घाटन केले होते. त्यानंतरच्या टप्प्यावर शाळा-शाळांमधून या यंत्रणेवर माहिती अपलोड करण्याचे आदेश शिक्षण खात्याने दिले होते. सुरुवातीच्या टप्प्यात या यंत्रणेचा चांगला प्रतिसाद मिळाला असला, तरी हळूहळू प्रतिसाद वाढू लागल्यानंतर ही यंत्रणा ठप्प होण्याचे प्रकार समोर येऊ लागले आहेत. त्यामुळे मुख्याध्यापक-शिक्षकांनी त्या विरोधात ओरड सुरू केली आहे.

'सरल'वर अपेक्षित माहितीमध्ये शाळेमधील वर्ग, तुकड्या, त्या-त्या वर्गांवर नेमलेले शिक्षक आणि त्यांच्या वैयक्तिक माहितीचा समावेश आहे. त्यासोबतच 'सरल'च्या माध्यमातून शाळांनी आपल्या विद्यार्थ्यांची सविस्तर माहिती सादर करणेही बंधनकारक करण्यात आले आहे. या माहितीमध्ये विद्यार्थ्याचे पूर्ण नाव, आईचे नाव, आधार कार्ड क्रमांक, रक्तगट, लिंग, जन्मतारीख, इयत्ता, माध्यम, धर्म, जात, पालकांचे वार्षिक उत्पन्न, सविस्तर पत्ता आदी बाबींचा समावेश आहे. पालक आणि विद्यार्थ्यांकडे या बाबींची विचारणा केल्यास, त्यामध्ये खूप टाळाटाळ केली जात असल्याची ओरडही संस्थाचालक आणि मुख्याध्यापक प्रतिनिधींनी केली. सध्या ही माहिती सादर करण्यासाठी कालमर्यादा देण्यात आली असली, तरी वेबसाइटच हँग होत असल्याने, शिक्षण खात्याने ही मुदत वाढवून देण्याची मागणीही केली जात आहे.

नेमका विरोध कशामुळे?

शाळांकडून ही माहिती गोळा करण्यासाठी खात्याने युद्धपातळीवर प्रयत्न सुरू केले आहेत. त्यामधून अनेक चुकीच्या गोष्टी उघड होण्याची शक्यता असल्यानेच त्याला विरोध होत आहे. सध्या ही यंत्रणा सुरुवातीच्या टप्प्यामध्ये असल्याने, त्यामध्ये अडचणी येत असल्याची ओरड केली जात आहे. मात्र, या अडचणी टप्प्याटप्प्याने दूर केल्या जात असल्याची माहिती खात्यातील उच्चपदस्थ अधिकाऱ्यांनी मंगळवारी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘सेट’ परीक्षा पुढे ढकलली

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

नाशिक येथे होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर राज्यभरात येत्या ३० ऑगस्टला आयोजित 'सेट'ची परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने घेतला आहे. आता ही परीक्षा येत्या ६ सप्टेंबरला होणार असल्याचे विद्यापीठाने शनिवारी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले.

प्रसिद्धीपत्रकात देण्यात आलेल्या माहितीनुसार, कुंभमेळ्यामुळे नाशिकमध्ये ३० ऑगस्टला या परीक्षेचे आयोजन परीक्षार्थींसाठी अडचणीचे ठरणार होते. तसेच, केवळ नाशिकमधील परीक्षा रद्द करून, इतर केंद्रांवर ही परीक्षा घेणेही रास्त ठरणार नव्हते. त्यामुळे राज्यात सर्वत्रच ही परीक्षा आता ६ सप्टेंबरला होईल. उमेदवारांना परीक्षेपूर्वी १० दिवस आपली ओळखपत्रे सेटच्या www.setexam.unipune.ac.in या वेबसाइटवरून उपलब्ध करून दिली जातील, असेही या पत्रकात सांगण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


पावसाच्या तुरळक सरी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

शहर आणि परिसरात रविवारी तुरळक सरींनी हजेरी लावली. रात्री साडेआठपर्यंत शहरात केवळ ०.७ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. रविवारी राज्यातील सर्वाधिक पाऊस विदर्भात गोंदिया येथे (१७ मिमी) नोंदला गेला. तर महाबळेश्वर येथे ७ मिमी पावसाची नोंद झाली. पुढील दोन दिवसात शहरात पावसाच्या एक दोन सरींची शक्यता आहे. राज्यात कोकणात बहुतांश ठिकाणी तर उर्वरित राज्यात काही ठिकाणी पावसाची शक्यता असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आरोपी संचालकालाच पायघड्या

$
0
0

व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण विभागातील प्रकार

म. टा. प्रतिनिधी, पुणे

राज्याच्या व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण विभागात कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार केल्याप्रकरणी ठपका ठेवण्यात आलेल्या संचालकांना पुन्हा पायघड्या घालण्याचा अजब कारभार राज्य सरकारकडून करण्यात आला आहे. लोकलेखा समितीकडूनही या प्रकरणाची चौकशी सुरू असताना या संचालकांना नव्याने पुन्हा याच पदावर नेमण्यात आल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

राज्याच्या व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण विभागात २००९ ते २०११ या काळात गैरव्यवहार केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. विभागीय चौकशीअंती संबंधित संचालकांची उघड चौकशी करण्याचे आदेश लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला देण्यात आले आहेत. त्यानुसार या अधिकाऱ्यासह पाच जणांची गेल्या दोन वर्षांपासून चौकशी सुरू आहे. या संचालकाने अस्तित्वात नसलेल्या तुकड्यांसाठी प्रशिक्षण साहित्य खरेदी केल्याप्रकरणी चौकशी करण्यात येत आहे.

तत्कालीन उच्च व तंत्र शिक्षण मंत्री राजेश टोपे यांनी या संचालकांची बदली प्रशिक्षण विभागात केली; तसेच या गैरप्रकारांची चौकशी लोकलेखा समितीकडूनही करण्यात येत आहे. चौकशीचा ससेमीरा सुरू असतानाच या संचालकांना पुन्हा त्याच पदावर बसविण्याचा अट्टहास का करण्यात येत आहे, असा सवाल व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण विभागात करण्यात येत आहे.

या संचालकांना पुन्हा याच पदावर बसविण्यासाठीचा सरकारी अध्यादेश (जीआर) शुक्रवारी (१४ ऑगस्ट) रात्री साडेसात वाजता काढण्यात आला. आज सोमवारी, हे संचालक आपला पदभार स्वीकारणार आहेत. या संचालकांना मूळ पदावर परत आणण्यात विभागाच्या सचिव स्तरावरील अधिकाऱ्यांनी महत्त्वाची भूमिका बजावल्याची चर्चा आहे.

पडद्यामागचे राजकारण

व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण विभागातील गैरप्रकाराबाबतची सुनावणी २६ ऑगस्ट रोजी लोकलेखा समितीसमोर होणार आहे. त्याचबरोबर या प्रकरणाची चौकशी करणाऱ्या अन्य एका उच्चस्तरीय समितीचा अहवालही अंतिम टप्प्यात आहे. येत्या १५ दिवसांत हा अहवाल सरकारकडे सादर होणार आहे. अशा परिस्थितीत सध्याच्या प्रभारी संचालकांकडून कार्यभार काढून घेऊन पुन्हा या संचालकांकडे कारभाराची सूत्रे देण्यात आली आहेत. त्यामुळे या प्रकरणावर पडदा टाकण्यासाठीच या संचालकांना पुन्हा मूळ पदावर आणण्याचे राजकारण शिजत असल्याची चर्चा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण विभागात सुरू आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आरोप असलेली व्यक्ती अध्यक्षपदी नको : नेमाडे

$
0
0

'साहित्य संस्कृती मंडळासारख्या महत्त्वाच्या संस्थेच्या अध्यक्षपदी भ्रष्टाचाराचे आरोप असलेली व्यक्ती असू नये,' असे स्पष्ट मत ज्ञानपीठ पुरस्कारप्राप्त ज्येष्ठ साहित्यिक डॉ. भालचंद्र नेमाडे यांनी मांडले.

राज्य सरकारने ज्येष्ठ लेखक प्रकाशक बाबा भांड यांची साहित्य संस्कृती मंडळाच्या अध्यक्षपदी नुकतीच निवड केली. काही वर्षांपूर्वी खडू फळा योजनेत भ्रष्टाचार केल्याचा आरोप भांड यांच्यावर असून, ते प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. त्यामुळे भांड यांच्या नियुक्तीवर साहित्य वर्तुळातून टीका केली जात आहे. या पार्श्वभूमीवर नेमाडे यांना त्याबाबत विचारण्यात आले होते.

'आरोप असणे आणि ते सिद्ध होणे या दोन्ही वेगळ्या गोष्टी आहेत. भ्रष्टाचाराचे आरोप असलेली व्यक्ती महत्त्वाच्या पदी असू नये. मात्र, व्यवहारात तसे असत नाही. असे आरोप असलेले अनेक राजकारण निवडणूक लढवतातच,' याकडे नेमाडे यांनी लक्ष वेधले.

'भांड यांच्याशी त्यांच्या विद्यार्थीदशेपासूनची ओळख आहे. ते भ्रष्टाचार करतील असे वाटत नाही,' असेही नेमाडे यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

राष्ट्रीय भाषेचा प्रश्न सुटल्याशिवाय साहित्य नाही : नेमाडे

$
0
0

'प्रादेशिक घटकांच्या बेरजेवर भारतीय साहित्य होत नाही. मराठीचा विचार करता मर्ढेकर, विंदा करंदीकर, साने गुरुजी हे राष्ट्रीय साहित्यिक आहेत. मात्र, आपल्या राष्ट्रीय भाषेचा प्रश्न सुटल्याशिवाय भारतीय साहित्य तयार होणार नाही,' असे मत ज्ञानपीठप्राप्त ज्येष्ठ साहित्यिक डॉ. भालचंद्र नेमाडे यांनी मांडले.

अक्षरधारा बुक गॅलरी व साकेत प्रकाशनच्या वतीने ज्ञानपीठ पुरस्कार मिळाल्यानिमित्त ज्येष्ठ साहित्यिक प्रा. द. मा. मिरासदार यांच्या हस्ते डॉ. नेमाडे यांचा सत्कार करण्यात आला. त्यानंतर एकविसावे शतक आणि भारतीय साहित्य या विषयावर नेमाडे यांचे व्याख्यान झाले. त्या वेळी ते बोलत होते. याच कार्यक्रमात नेमाडे यांच्या 'टीका स्वयंवर' या ग्रंथाच्या तिसऱ्या आवृत्तीचे प्रकाशन समीक्षक डॉ. विलास खोले यांच्या हस्ते झाले. प्रकाशक बाबा भांड, अक्षरधाराचे संचालक रमेश राठिवडेकर या वेळी उपस्थित होते.

भारतीय साहित्य कशाला म्हणावे हे नेमाडे यांनी सविस्तरपणे स्पष्ट केले. 'आपल्या साहित्याचे योग्य आकलन झाले नाही. त्यामुळे पुरेसे मूल्यमापनही करण्यात आलेले नाही. रामायण हे खरे भारतीय साहित्य आहे. मात्र, रामायण केवळ वाल्मिकीपुरते मर्यादित नाही. रामायणाची अनेक व्हर्जन्स आहेत. त्यातील काही मौखिक आहेत. हे सर्व साहित्य भारतीय आहे. भारतीय साहित्याला जागतिक साहित्यात काही स्थान नाही. कारण भारतीय साहित्यच कुणाला माहीत नाही. त्यामुळे सर्व भाषांत चांगले ते भारतीय साहित्य म्हणता येईल,' असे नेमाडे म्हणाले.

राष्ट्रापेक्षा धर्म आणि प्रदेश अधिक महत्त्वाचे ठरत आल्याने आपल्याला आजपर्यंत सर्वांना आपली वाटेल अशी एक राष्ट्रभाषा मिळू शकलेली नाही. 'ठरवून' कोणतीही भाषा राष्ट्रीय होत नसते. ती लोकच ठरवतात. त्यामुळे राष्ट्रीय भाषेचा प्रश्न सुटल्याशिवाय भारतीय साहित्य तयार होणार नाही, असे त्यांनी सांगितले.

लष्करातील सेवानिवृत्त कर्नल

प्रा. मिरासदार यांनी अपूर्व उत्साहात नेमाडे यांच्याविषयीची आठवण सांगून उपस्थितांना हसवले. 'फर्ग्युसन कॉलेजमध्ये साहित्य सहकारच्या कार्यक्रमाला मला निमंत्रित करण्यात आले होते. त्या वेळी पहिल्या बाकावर बसून नेमाडे माझ्याकडे पाहात होते. तेव्हा ते विद्यार्थी होते. आता ते लष्करातील निवृत्त कर्नलसारखे दिसतात. त्यांच्या मिशाही पांढऱ्या झाल्यात. त्यांच्याशी वादविवाद करणे सोपे नाही. ज्ञानपीठ पुरस्काराच्या रुपाने केवळ त्यांचाच नाही, तर मराठीजनांचा सन्मान झाला,' असे मिरासदार म्हणाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

काँग्रेसच्या विरोधात सत्ताधारीच रस्त्यावर

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

काँग्रेसने संसदेत मांडलेल्या गोंधळाच्या निषेधार्थ भारतीय जनता पक्षाने रविवारी पुण्यात आंदोलन केले. काँग्रेसच्या नकारात्मक राजकारणामुळे देशाचे नुकसान होत आहे, अशी टीका या वेळी करण्यात आली. खासदार अनिल शिरोळे, आमदार मेधा कुलकर्णी, माधुरी मिसाळ, जगदीश मुळीक, विजय काळे, भीमराव तापकीर आदी या वेळी उपस्थित होते. तसेच, शहर सरचिटणीस संदीप खर्डेकर, रमेश काळे, धीरज घाटे, मुरलीधर मोहोळ, नगरसेवक अशोक येनपुरे, वर्षा तापकीर, मनिषा घाटे, दिलीप काळेखे, माधुरी सहस्त्रबुद्धे, व इतर उपाध्यक्ष संदीप बुटाला, जयंत भावे, दत्ता खाडे, युवा मोर्चा अध्यक्ष गणेश घोष, महिला मोर्चा अध्यक्षा मंगल डेरे, संघटन मंत्री रवी अनासपुरे, मंदार घाटे आदी या वेळी उपस्थित होते.

या वेळी बोलताना शहर अध्यक्ष खा. अनिल शिरोळे म्हणाले, 'काँग्रेसचे खासदार त्यांचे नेते राहूल गांधी व अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली संसद चालू न देण्यासाठी ज्या पद्धतीने संसदेत वागत होते, ती पद्धतच असंसदीय होती. देशावर ६० हून अधिक वर्षे राज्य केलेला पक्ष फक्त संसदेचाच नाही, तर संपूर्ण देशाचा अपमान करत होता. गांधी कुटुंबाचा बचाव करण्यासाठी काँग्रेसच्या खासदारांनी भारतीय लोकशाही वेठीस धरली. त्यामुळे काँग्रेस पक्षाचा आम्ही निषेध करावा तेवढा कमीच ठरेल.'

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘तुटीचा’ मान्सून

$
0
0

* राज्यात सरासरीपेक्षा २८.७५ टक्के कमी पाऊस
* पुण्यातही २७ टक्के तूट

म. टा. प्रतिनिधी, पुणे

निम्म्याहून अधिक हंगाम सरला असताना, राज्यावरील पावसाचा रुसवा कायम असून सरासरीपेक्षा २८.७५ टक्के कमी पावसाची नोंद झाली आहे. हवामान विभागाच्या आकडेवारीनुसार केवळ विदर्भातच सरासरीइतका पाऊस झाला असून, उर्वरित राज्याकडे त्याने पाठच फिरवल आहे. दुष्काळाचे राजकारण तापत असताना आगामी पंधरवड्यातदेखील पावसाच्या स्थितीत फारशी सुधारणा होण्याचा अंदाज वर्तविण्यात आलेला नाही.

हवामान विभागाने राज्याचे मध्य महाराष्ट्र, कोकण-गोवा, मराठवाडा आणि विदर्भ असे चार उपविभाग केले आहेत. या चारही उपविभागात मिळून राज्यात रविवारपर्यंत २८.७५ टक्के कमी पावसाची नोंद झाली आहे. मराठवाड्यात सर्वाधिक म्हणजे ४८ टक्के, मध्य महाराष्ट्रात ३२ टक्के, कोकण-गोव्यात ३० टक्के, तर विदर्भात सरासरीपेक्षा पाच टक्के कमी पावसाची नोंद झाली आहे.

पर्जन्यछायेचा प्रदेश असलेल्या मराठवाड्यातच पावसाचे प्रमाण सर्वांत कमी राहिले आहे. परिणामी या भागातील दुष्काळी परिस्थिती आणखी गंभीर होत आहे. त्याखालोखाल मध्य महाराष्ट्रात पावसाचे प्रमाण कमी राहिल्याने दुष्काळाचे संकट अधिक गहिरे होत आहे. विरोधी पक्षांनी दुष्काळी पाहणीला सुरुवात करून सरकारविरोधात आघाडी उघडली आहे. अशा परिस्थितीत पावसाळ्याचा केवळ दीड महिना शिल्लक आहे. या दीड महिन्यापैकी ऑगस्टचा उर्वरित पंधरवडाच खऱ्या अर्थाने पावसाचा असेल. सप्टेंबर महिन्यात पावसाचा जोर हळूहळू कमी होत जातो. त्यातच ऑगस्ट आणि सप्टेंबर या दोन महिन्यांत एकूण सरासरीच्या ८४ टक्के पाऊस होण्याची शक्यता वर्तवण्यात आली.

देशातील सरासरीपेक्षा १० टक्के कमी पाऊस

देशात रविवारपर्यंतच्या सरासरीपेक्षा १० टक्के कमी पावसाची नोंद झाली आहे. हवामान विभागाच्या देशातील ३६ उपविभागांपैकी पाच उपविभागात सरासरीपेक्षा अधिक, १६ उपविभागात सरासरीइतका किंवा सर्वसाधारण तर १५ उपविभागांमध्ये सरासरीपेक्षा कमी म्हणजेच अपुरा पाऊस नोंदला गेला आहे. हवामान विभागानुसार सरासरीपेक्षा १९ टक्के कमी किंवा अधिक पाऊस हा सर्वसाधारण तर २० ते ५९ टक्के कमी पाऊस हा अपुरा पाऊस मानला जातो. ५९ टक्क्यांपेक्षाही कमी पाऊस झाल्यास हा तीव्र स्वरूपाचा दुष्काळ मानण्यात येतो.

पुण्यात २७ टक्के कमी पाऊस

पुण्यात एक जून ते १६ ऑगस्टपर्यंत सरासरी ३९३.२ मिमी पाऊस होतो. यंदा केवळ २८६.७ मिमी पावसाचीच नोंद झाली आहे. हे प्रमाण सरासरीपेक्षा १०६.५ मिलिमीटरने कमी म्हणजेच २७ टक्के कमी आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

हुल्लडबाजांचा धिंगाणा

$
0
0

भुशी डॅम, लोणावळा, खंडाळ्यात पर्यटकांची गर्दी

म. टा. प्रतिनिधी, लोणावळा

स्वातंत्र्यदिन आणि त्याला जोडून आलेल्या रविवार अशा सलग सुट्ट्यांमुळे लोणावळा-खंडाळ्यासह मावळातील पर्यटन स्थळांवर पर्यटकांनी अलोट गर्दी केली होती. पर्यटकांचे मुख्य आकर्षण असणाऱ्या भुशी डॅमवर जणू काही जत्रा भरल्यासारखे दिसून येत होते. मात्र, एक्स्प्रेस-वेवर सुरू असलेल्या दरड संकटाचे सावट या वर्षीच्या स्वातंत्रदिनाच्या पर्यटनावर पडल्याचे चित्र तालुक्यातील सर्व पर्यटनस्थळी जाणवले. या वर्षी पर्यटकांच्या संख्येत नेहमीपेक्षा निम्म्याने घट झाली आहे.

मुंबई, पुण्यासह महाराष्ट्रातून आलेल्या पर्यटकांसह प्रवाशांना दिवसभर मुंबई-पुणे एक्स्प्रेस-वेसह जुन्या राष्ट्रीय महामार्गावर वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला. लोणावळा-खंडाळा परिसरात वाहतूक कोंडीमुळे आठ ते दहा किलोमीटर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.

भुशी डॅमप्रमाणे टायगर, लायन्स, टायगरलिप्स, शिवलिंग, राजमाची, गिधड तलाव व नागफणी ( डयुक्सनोज) हे डोंगरावरचे पॉइंट, तुंगार्ली, वळवण, लोणावळा, पवना, मळवंडीठुले, शिरोता, उकसान या धरणांसह कार्ला, भाजे, बेडसे या प्राचीन लेण्या, लोहगड, विसापूर, तुंग, तिकोणा, कोराईगड, राजमाची या ठिकाणी प्रचंड गर्दी झाली होती.

पुण्याहून लोणावळ्याकडे येणाऱ्या सर्वच लोकल आणि लांब पल्ल्यांच्या रेल्वे गाड्यांना मोठी गर्दी होती. पर्यटकांच्या वाहनामुळे जुन्या मुंबई-पुणे राष्ट्रीय मार्गासह भुशी डॅमकडे जाणाऱ्या रस्त्यावर वाहनांच्या लांब रांगा लागल्या होत्या.

भुशी डॅमवर हुल्लडबाजी

मागील काही वर्षापासून भुशी डॅममध्ये पोहताना बुडून शेकडो पर्यटकांचा मृत्यू झाला आहे. याचे गांभीर्य ओळखून लोणावळा शहर व ग्रामीण पोलिसांनी मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त मागविला होता. मात्र, हा बंदोबस्त केवळ कागदावरच असल्याचे स्पष्ट चित्र भुशी डॅमसह परिसरात पाहायला मिळाले. लोणावळ्यातील गवळी वाडा व रायवूड परिसर वगळता इतर ठिकाणी कोठेही पोलिस नसल्यामुळे भुशी डॅमकडे जाणाऱ्या मार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी झाली होती. भुशी डॅमवर हुल्लडबाजी व स्टंटगिरी करणाऱ्या पर्यटकांवर अंकुश ठेवण्यासाठी आणि येथील कायदा सुव्यस्था राखण्यासाठी पोलिस नसल्याने शेकडो पर्यटक भुशी डॅमध्ये उंचावरून उड्या मारत पोहत होते. यामध्ये महिला पर्यटकही 'हम भी कुछ कम नही' असे म्हणून पोहताना दिसत होत्या.

जुन्या महामार्गावरही वाहतूक कोंडी

मुंबई-पुणे एक्स्प्रेस-वेवर सुरू असलेल्या दरड संकटामुळे एक महिन्यापासून एक्स्प्रेस-वेसह जुन्या मार्गावर वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात आले होते. मात्र, मागील आठवडयात खंडाळा एक्झिट ते खंडाळा बोगद्यापर्यंत दोन्ही लेनवर तर आडोशी बोगदा ते एचव्हीसी पुलापर्यंत पुणे मुंबई मार्गावर वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात आले आहे. शुक्रवारी रात्री पुन्हा आडोशी बोगद्या जवळ दरड कोसळली. एक्स्प्रेस-वेवरील वाहनकोंडी टाळण्यासाठी महामार्ग पोलिसांनी वाहतुकीत बदल केला खालापूर टोलनाक्यापासून जुन्या मार्गावर वळविली. त्यामुळे जुन्या मार्गावर खोपोली ते लोणावळा पर्यंत प्रचंड वाहतूक कोंडी झाली. यामार्गावर आठ ते दहा किलोमीटर लांब वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


मोदींचे हातही ‘आयपीएल’मध्ये काळे

$
0
0

माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांचा आरोप

म. टा. प्रतिनिधी, पुणे

इंडियन प्रिमियर लीगमध्ये (आयपीएल) अहमदाबादच्या टीमचे टेंडर भरताना अनेक गैरव्यवहार झाले असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी त्या वेळी गुजरात क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष होते. त्यामुळे या टेंडरवर सही करणाऱ्यांची नावे समोर आणा, अशी मागणी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी रविवारी पुण्यात केली. गैरव्यवहाराच्या प्रकरणात पंतप्रधान मोदी यांचे नाव घेऊन त्यांनी थेट हल्ला चढविला.

प्रदेश काँग्रेसचे चिटणीस संजय बालगुडे यांनी काढलेल्या 'फसवणुकीची वर्षपूर्ती' या पुस्तिकेचे प्रकाशन चव्हाण यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. चव्हाण म्हणाले, 'आयपीएलमध्ये पुणे आणि अहमदाबाद या दोन टीमचा समावेश ठरला, तेव्हा अहमदाबाद टीमच्या टेंडरमध्ये अनेक चुकीचे प्रकार समोर आले, त्यामुळे 'बीसीसीआय'चे शशांक मनोहर यांनी ही प्रक्रियाच रद्द केली. त्यामुळे अहमदाबाद टीमचे टेंडर भरण्यात कोण व्यक्ती होत्या, हे समोर आले, तर अनेक बाबींचे चित्र स्पष्ट होईल. सध्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे तेव्हा गुजरात क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष आणि अमित शहा हे उपाध्यक्ष होते, या टेंडरवर सह्या कोणी केल्या, त्यांची नावे समोर आणावीत.' वादग्रस्त ललित मोदी हे 'पंतप्रधान मोदी हे आपले चांगले मित्र आहेत,' हे आम्ही उगाच म्हणत नाहीत, अशीही टिपण्णी चव्हाण यांनी केली.

या वेळी माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, बाळासाहेब शिवरकर, चंद्रकांत छाजेड, उपमहापौर आबा बागूल, शहराध्यक्ष अभय छाजेड, महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष कमल व्यवहारे, युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष विश्वजीत कदम, तसेच रत्नाकर महाजन, उल्हास पवार, मोहन जोशी, रोहित टिळक, धर्माजी भोसले आदी उपस्थित होते.

मोदी सरकार हाच देशाला धोका

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सरकार हेच देशापुढील मोठा धोका आहे, असे टीकास्त्र चव्हाण यांनी सोडले. माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग स्वतः अर्थतज्ज्ञ असूनही त्यांनी आर्थिक सल्लागार मंडळ नेमले होते; पण पंतप्रधान मोदी यांनी तेही गुंडाळून टाकले. मोदी यांना अर्थकारण कळत नाही, किंवा त्यांना कोणाच्या सल्ल्याची गरज नसावी, असे चव्हाण म्हणाले. मी म्हणेन तीच पूर्वदिशा, असे म्हणत मोदी आणि शहा देश चालवित आहेत, हा देशाला फार मोठा धोका आहे, असा आरोप त्यांनी केला.

तेव्हा कोठे गेले राष्ट्रहीत?

परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज आणि राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांनी २१०० कोटी रुपयांच्या काळ्या पैशांच्या प्रकरणी आरोप असलेल्या ललित मोदी यांना मदत केल्याने त्यांनी राजीनामा द्यावा, या मागणीसाठी काँग्रेसने संसदेत आग्रही भूमिका घेतल्याने कामकाज चालू शकले नाही. त्यामुळे 'जीएसटी'ला विरोध केल्याने देशाचा विकास खुंटल्याचा आरोप भाजप करीत आहे. परंतु, काँग्रेस सरकारनेच आणलेल्या 'जीएसटी' विधेयकास गेली सात वर्षे विरोध करणाऱ्या भाजपच्या नेत्यांना तेव्हा देशाचा विकास आठवला नाही का, असा प्रश्न चव्हाण यांनी विचारला.

पुरंदरे वादग्रस्त व्यक्तिमत्व

शिवशाहिर बाबासाहेब पुरंदरे यांना महाराष्ट्र भूषण देण्याच्या मुद्द्यावरून वाद सुरू आहेत. महाराष्ट्र भूषण पुरस्कार देणे, हा सरकारचा अधिकार आहे, त्यामुळे आपण त्यावर भाष्य करणार नाही. मात्र, पुरंदरे यांच्याबाबत वाद असून, ते वादग्रस्त व्यक्तिमत्व आहे, अशी टिपण्णी चव्हाण यांनी पत्रकारांशी बोलताना केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भाजपला पुण्याविषयी आकस का?

$
0
0

माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचा सवाल

म. टा. प्रतिनिधी, पुणे

मेट्रो प्रकल्प व स्मार्ट सिटी योजनेबाबत अवलंबलेल्या धोरणामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पुण्याविषयी आकस आहे का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. आणि तो जाहीरपणे विचारला आहे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी.

स्मार्ट सिटीमध्ये पुणे आणि पिंपरी-चिंचवडचा एकत्रित प्रस्ताव पाठविल्याने भारतीय जनता पक्ष-शिवसेनेच्या राज्य सरकारवर टीका केली जात आहे. तसेच, पुणे मेट्रोसंदर्भातदेखील विलंबाचे राजकारण केले जात आहे. या प्रश्नी 'मटा'ने सातत्याने आवाज उठवून पुणेकरांच्या हितरक्षणाची भूमिका घेतली होती. त्याच धर्तीवर माजी मुख्यमंत्री चव्हाण यांनी पुण्याविषयीच्या धोरणांबाबत रविवारी प्रश्नचिन्ह उपस्थित केले. पुण्यावरील अन्याय कायम राहिल्यास आम्ही आंदोलन करू, असा इशाराही त्यांनी दिला.

एका कार्यक्रमानिमित्त चव्हाण पुण्यात आले होते. त्या वेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. स्मार्ट सिटीमध्ये पुणे आणि पिंपरी-चिंचवडचा एकत्र समावेश करणे ही चुकीची बाब आहे. त्यामुळे विकासकामांसाठीच्या निधीचे दोन्ही शहरांमध्ये विभाजन करावे लागेल. स्मार्ट सिटीसाठी दहाच शहरे निवडायची होती, तर अकरावे शहर घेणे चूक आहे. परंतु, आता निवड केलीच आहे, तर दहाऐवजी अकरा स्वतंत्र शहरांना त्याचा लाभ द्या. त्यासाठी आमदार, खासदारांनी त्यांचे वजन वापरावे, असा सल्ला चव्हाण यांनी दिला.

भाजपने रखडवली मेट्रो

काँग्रेस-राष्ट्रवादीच्या आघाडी सरकारच्या काळात लोकसंख्येनुसार मेट्रो प्रकल्पांना मान्यता देण्यात आली होती. मात्र, सध्याच्या फडणवीस सरकारने पुण्याची मेट्रो तांत्रिक बाबींमध्ये अडकवून ठेवली आणि नागपूरला मेट्रो प्रकल्पाचे काम सुरू केले. त्यामधून पुण्याविषयीचा द्वेषच स्पष्ट होत आहे, अशी टीकादेखील चव्हाण यांनी केली.

'जीएसटी' लागू झाल्यास स्थानिक स्वराज्य संस्थांना उत्पन्नासाठी पूर्णपणे केंद्र व राज्य सरकारवर अवलंबून राहावे लागेल. या कायद्यामुळे महापालिकांची स्वायत्तता धोक्यात येईल. स्मार्ट सिटीच्या माध्यमातून शहरे विकसित करण्याची स्वप्ने पाहत असताना, दुसरीकडे त्यांचे उत्पन्न कसे हिरावून घेतले जात आहे, असा सवालही चव्हाण यांनी उपस्थित केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विवाहानंतरही प्रेयसी-प्रियकर असावा!: नेमाडे

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

'आताच्या काळात विवाहित स्त्री पु्रुषांना नवरा बायकोशिवाय एक प्रेयसी-प्रियकर असायला अडचण नसावी', असं वक्तव्य ज्ञानपीठप्राप्त ज्येष्ठ साहित्यिक डॉ. भालचंद्र नेमाडे यांनी केलं.

स्त्री पुरुष संबंधांचे स्पष्टीकरण देताना नेमाडे यांनी पांडव व द्रौपदीचे उदाहरण दिले. 'मोकळ्या संबंधांची परंपरा पुरातन आहे. मात्र, नंतरच्या काळात विवाहाची व्याख्या काळानुरुप बदलली नाही. आताच्या काळात विवाहित स्त्री पु्रुषांना नवरा बायकोशिवाय एक प्रेयसी-प्रियकर असायला अडचण नसावी. सेक्स रेशो बदलल्यास बलात्कार, व्यभिचाराचे प्रकार थांबतील,' असे नेमाडे यांनी स्पष्ट केले.

मॅजेस्टिक प्रकाशनच्या वतीने डॉ. नेमाडे यांच्या हस्ते पुण्यातील मॅजेस्टिक बुक गॅलरीचे उद‍्घाटन स्वातंत्र्यदिनी करण्यात आले. त्या वेळी समीक्षक डॉ. अविनाश सप्रे, प्राची गुजर पाध्ये यांनी नेमाडे यांची मुलाखत घेतली. त्या वेळी ते बोलत होते. मॅजेस्टिकचे अशोक कोठावळे, समीक्षक डॉ. विलास खोले या वेळी उपस्थित होते. संजय भास्कर जोशी यांनी सूत्रसंचालन केले.

'टोचणारे लिहित असल्याने मी काही लाडका लेखक नाही. तरीही पानसरे, दाभोलकरांप्रमाणे मला परलोकात पाठवले नाही हे नशीबच आहे. मलाही निनावी पत्रे येतात. मात्र, ती प्रदीर्घ आयुष्य लाभावे अशा आशयाची असतात. मी परखड भूमिका घेतली, तरी सर्वांशी प्रेम सांभाळून आहे. शेतकऱ्याचा मुलगा असूनही शेतीविषयक लेखन करू शकलो नसल्याची लाज वाटते. सगळ्या शेतकऱ्यांचा कर शहरांवर लावला पाहिजे. जसा साबणावर कर असतो, तसा तांदळावरही लावला पाहिजे. ग्लोबल इकॉनॉमी असे काही अस्तित्वातच नाही. तो बदमाशीचा प्रकार असल्याचा टोला त्यांनी हाणला. कमीत कमी नफा कामगारांना देऊन स्वतः जास्त फायदा कमावण्याचा प्रकार ग्लोबल इकॉनॉमीच्या नावाखाली होतात. ही वर्ल्ड इकॉनॉमी बंदच केली पाहिजे,' असेही ते म्हणाले.

'कवी असल्याशिवाय लेखक होता येत नाही. कविता ही नेणिवेत असते. कोणतीही कविता खरी असते. ती अश्लील नसते. कविता येत असूनही मी केली नाही, हा माझा नीचपणा आहे. नोकरी कराव्या लागण्याच्या भानगडीत कविता नाही होत. कवी पोटासाठी काही काम करतो यावर समाजाचा विश्वास नसणे हे दुर्दैव आहे. कवितेला 'युजलेस' मानले जाते. कविता करणे सोपे आहे. मात्र, तुकाराम, कबीरासारखे धैर्य नाही, असे मत त्यांनी व्यक्त केले.

कसबेंना काही कळत नाही

ज्येष्ठ विचारवंत डॉ. रावसाहेब कसबे यांनी साधना साप्ताहिकातील अंकातून नेमाडे यांच्यावर टीका केली होती. त्या पार्श्वभूमीवर, 'कसबेंना काही कळत नाही. ते फक्त वाचतात,' असा टोला नेमाडेंनी हाणला. 'जातिव्यवस्थेचे समर्थन करत नाही. मात्र, जाती काय हे समजावून सांगण्याचा प्रयत्न आहे. जातीअंताला कधी यश मिळत नाही. जातिव्यवस्थेविरोधात बोलणारा पुरोगामी ठरतो. जातींमुळेच समाजातील एकोपा टिकला आहे. आपल्याइतका एकोपा जगात कुठेही नाही,' असेही नेमाडे म्हणाले.

गालिबची कविता बहुभाषिक

कॉलेजबाहेरच्या पानवाल्याने गालिब शिकवल्याची आठवण नेमाडे यांनी सांगितली. गालिब, मीर, फैज असे कवी आपल्या शिक्षणात आले असते, तर टेनिसनसारखे 'थर्ड क्लास' कवी शिकण्याची वेळ आली नसती. सर्वश्रेष्ठ कविता आपल्याकडे उर्दूत लिहिली गेली. गालिबची कविता ही बहुभाषिकतेचे प्रतिक आहे. मराठीपेक्षा कन्नड वाङ्मयसंस्कृती जास्त चांगली, पुढारलेली आहे. तिथे विचार ऐकून घेतले जातात. आपली वसाहतवादी परंपरा तुटणे आवश्यक आहे. मूळ प्रेरणांकडे जाण्याची गरज आहे, असेही त्यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आमदार रमेश कदम CIDच्या जाळ्यात

$
0
0

मटा ऑनलाइन वृत्त । पुणे

अण्णाभाऊ साठे महामंडळात कोट्यावधी रुपयांच्या घोटाळ्यात आरोपी असणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रमेश कदम यांना सोमवारी सकाळी अटक करण्यात आली. पुणे-नगर महामार्गावरील ग्रँड हयात या पंचतारांकित हॉटेलमधून राज्य गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने त्यांना अटक केली. आमदार कदम यांच्यावर २५० कोटी रुपयांचा घोटाळा केल्याचा आरोप आहे.

अण्णाभाऊ साठे महामंडळाचे अध्यक्ष असताना आमदार कदम यांनी गैरव्यवहार केल्याचा आरोप लक्ष्मण ढोबळे यांनी केला होता. याप्रकरणी त्यांनी ३ हजार ७०० पानांचा पुरावा लाचलुचपत विभागाकडे दिला होता. महामंडळाद्वारे ज्या संस्थांना कर्ज वाटप झाले आहे, त्या केवळ कागदावर असल्याचे आरोप ढोबळे यांनी केला होता. कदम यांच्यावर मुंबईतील दहिसर पोलीस ठाण्यात गुन्हा देखील झाला होता. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कदम यांच्या चौकशीचे आदेश दिले होते. मात्र चौकशी आणि अटकेच्या भितीने कदम २० जुलैपासून फरार झाले होते. तेव्हापासून सीआयडी पथक त्यांचा शोध घेत होते. कदम यांच्या अटकेसाठी सीआयडीने राज्यात अनेक ठिकाणी छापे टाकले होते. अखेर सकाळी कदम यांना अटक करण्यात यश आले. कदम यांची नवी मुंबईतील कोकण भवनात चौकशी सुरु आहे.

राष्ट्रवादी कारवाई करणार का?

राष्ट्रवादीचे माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे यांनीच आमदार कदम यांच्यावर गैरव्यवहाराचा आरोप केला होता. मात्र त्यानंतरही त्यांच्यावर पक्षाकडून कोणतीच कारवाई होत नव्हती. कदम यांच्या डोक्यावर पक्षश्रेष्ठींचा हात असल्याने त्यांच्यावर कारवाई केली जात नसल्याचे टीका देखील ढोबळे यांनी केली होती. राज्यातल्या युती सरकारमधील भ्रष्टाचारी मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी करणारे राष्ट्रवादी आता कदम यांना अटक झाल्यानंतर तरी कारवाई करेल का? असा प्रश्न सत्ताधारी करत आहेत. दरम्यान, कदम यांच्यावरील आरोपाची चौकशी सुरु असून त्यासंदर्भात न्यायालय जो निर्णय देईल तो पक्षाला मान्य असेल, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी दिली आहे. तसेच ढोबळे यांनी आपल्यावर चुकीचे आरोप केल्याचा दावा कदम यांनी केल्याचे मलिक यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पाणी...पुण्याचे

$
0
0

जितेंद्र अष्टेकर, पुणे

'नेमेचि येतो मग पावसाळा' ही म्हण पूर्वीपासून प्रचलित असली, तरी गेल्या काही वर्षांत 'पावसाचा काही नेम नाही,' याच म्हणीचा प्रत्यय पुणेकरांना 'नेमा'ने येत आहे. त्याचे चटकेही शहरात आणि जिल्ह्यातही पाणीटंचाईच्या रुपाने बसू लागले आहेत. त्यामध्ये लहरी निसर्गाचा सर्वात मोठा वाटा असला, तरी पाण्याचे नियोजन आणि वितरण यांच्या बळावर ही तीव्रता कमी करणे सहजसाध्य आहे, याबाबत कोणाचेही दुमत असणार नाही. पण एकदा धरणे भरली, की वर्षभर त्या विषयाकडे ढुंकून पहायचे नाही आणि हे नियोजन करण्याची आव्हानात्मक वेळ आली, की 'आपण म्हणू, ते नियोजन,' अशी आपापल्या पाठीराख्यांच्या सोयीची भूमिका घ्यायची, हाच शिरस्ता वेगवेगळ्या पातळ्यांवर पहावयास मिळत आहे.

मानवी हस्तक्षेप हा कोणत्याही योजनेची उद्दिष्टे सफल होण्यातील सर्वात मोठा अडथळा ठरतो, हीच देशभरात आढळणारी बाब लक्षात घेऊन केंद्र सरकारच्या नव्या स्मार्टसिटी योजनेत स्मार्ट पाणीपुरवठ्याबाबत काही मार्गदर्शक तत्त्वे निश्चित करण्यात आली आहेत. (तशी मानवी हस्तक्षेपाची प्रचिती पुणे आणि पिंपरी-चिंचवडकर याच योजनेच्या संयुक्त प्रस्तावाच्या निमित्ताने घेत आहेत, हा भाग अलाहिदा.) या सर्व तत्त्वांची अंमलबजावणी कशी करायची, तसे करणे शहरातील नागरिक आणि स्थानिक स्वराज्य संस्थांना आर्थिक व सामाजिक दृष्ट्या परवडणार आहे का, त्यासाठी निधी कोठून उपलब्ध होणार, हे प्रश्न कायम असले, तरी मूळात जग कोणत्या दिशेने चालले आहे, याचा अंदाज घेण्याच्या दृष्टीने त्याकडे एक नजर टाकता येईल.

स्मार्टसिटी योजनेचा प्रमुख भर हा तंत्रज्ञानावर आहे. नव्या तंत्रज्ञानाच्या आधारे योजना आखणे आणि प्रामुख्याने पाण्याचे नियोजन आणि वितरणातील 'एफिशियन्सी सुधारणे,' हा या मार्गदर्शक तत्त्वांचा मुख्य आधार आहे. देशातील शहरांमध्ये राहणाऱ्या नागरिकांना दर्जेदार पायाभूत सुविधा पुरविणे (गुड क्वालिटी इन्फ्रास्ट्रक्चर) हा योजनेचा प्रमुख हेतू यामध्ये नमूद करण्यात आला आहे. त्यातील 'फिजिकल इन्फ्रास्ट्रक्चर' या वर्गात वीजपुरवठा, पाणीपुरवठा, घनकचरा व्यवस्थापन, सांडपाणी व्यवस्थापन, वाहतूक, कनेक्टिव्हिटी, गृहनिर्माण आणि आपत्ती व्यवस्थापन या विषयांचा समावेश करण्यात आला आहे. त्यामध्ये वीजपुरवठ्यानंतर पाणीपुरवठा या विषयास स्थान देण्यात आले आहे.

'पुरेसे शुद्ध पाणी आणि दर्जेदार पाणीपुरवठा हा कोणत्याही शहराच्या दृष्टिने महत्त्वाचा आहे. विशेषतः शुद्ध पाण्याअभावी त्या शहरातील अनेक नागरिकांचे आरोग्य धोक्यात येते आणि त्याचा सर्वाधिक फटका तेथील गरीब वर्गाला बसतो,' असे निरीक्षण यामध्ये केंद्र सरकारने नोंदविले आहे. तसेच पाणीपुरवठा जितका सुलभ होईल, तेवढे तेथील नागरिकांचे जीवन सुसह्य होते. विशेषतः तेथील नागरिकांच्या आणि महिलांच्या उत्पादकतेमध्ये प्रतिदिन दीड ते दोन तासांनी वाढ होते, असे आढळून आले आहे. अनेक गावांमध्ये डोक्यावर हंडा घेऊन काही मैल पायपीट करणाऱ्या महिलांकडे पाहून ही बाब नक्कीच पटेल. त्यामुळे २४ तास पाणीपुरवठा आणि तोही बंद पाइपलाइनमधून हे उद्दिष्ट या योजनेत समोर ठेवण्यात आले आहे. २४ तास पाणीपुरवठा केल्यास पाणी साठवून ठेवण्याचे आणि नंतर ओतून देण्याचे प्रमाण कमी होते आणि एकूणात पाण्याचा अपव्यय कमी होऊन बचत होते, हा अनुभव अनेक शहरांमध्ये आला आहे.

त्याबरोबरच पिण्याच्या आणि अन्य कामांसाठी वापरण्याच्या पाण्याची स्वतंत्र वितरण व्यवस्था, हा मुद्दाही स्मार्टसिटीच्या योजनेत मांडण्यात आला आहे. हा मुद्दा आवाक्यातील आहे का, असा प्रश्न असला, तरी पाण्याच्या पुनर्वापराच्या दृष्टिने ती सोयीची बाब ठरणार असल्याचे केंद्राचे मत आहे. तसेच प्रत्येक घरास पाण्याचे स्वतंत्र कनेक्शन आणि शंभर टक्के मीटरींग ही तत्त्वे या योजनेत स्वीकारण्यात आली आहेत. पुणे महापालिकेच्या २४ तास पाणीपुरवठ्याच्या योजनेत महापालिकेच्या सर्वसाधारण सभेने यापूर्वीच हे निर्णय घेतले आहेत. (त्यांची अंमलबजावणी हे अर्थातच मोठे आव्हान आहे) त्याबरोबरच 'स्मार्ट मीटरींग'चा मुद्दा यामध्ये विशेषत्वाने नमूद करण्यात आला आहे. त्यामुळे पाणीपुरवठ्यातील तूट कमी होईल आणि उर्जेचीही बचत होणार आहे. वितरण व्यवस्थेत सेन्सर्सचा आवर्जून वापर करण्यात यावा, जेणेकरून पाण्याचा वापर, पाण्याची पातळी, त्याचे प्रेशर यावर तत्क्षणी (रिअल टाइम) देखरेख ठेवणे शक्य आहे. त्यातून पाणीवापराचे धोरण निश्चित करणे आणि गळती थांबविणेही शक्य होणार आहे.

तसेच या योजनेच्या मूळ हेतूंमध्येही 'यूजर टू पे,' हे तत्त्व स्वीकारण्यात आले असून त्याद्वारे पाण्यासह कोणतीही सुविधा कोणत्याही वापरकर्त्यास मोफत मिळणार नाही, असे नमूद करण्यात आले आहे. या शहरांतील विषमता आणि सामाजिक विचार करता हा मुद्दा वादाच्या भोवऱ्यात सापडण्याची शक्यता आहे आणि अंमलबजावणीच्या दृष्टिनेही हे मोठे आव्हान ठरणार आहे. ही सर्व मार्गदर्शक तत्वे अंमलबजावणीसाठी किती कठीण आहेत, याची कल्पना धोरणकर्त्यांना आली आहे. मात्र, नव्या जगाच्या विकासाची दिशा काय आहे, हे समजावून घेण्यासाठी यांचा अभ्यास करणे नक्कीच आवश्यक आहे, यात शंका नाही.

'स्मार्ट' वॉटरसप्लाय

> २४ तास पाणीपुरवठा

> शंभर टक्के घरांना पाण्याचे स्वतंत्र कनेक्शन

> १३५ लिटर्स दरडोई पाणीवापर

> शंभर टक्के मीटरींग

> पाणीवापर आकाराची शंभर टक्के वसुली

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images

<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>
<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596344.js" async> </script>