Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

काँग्रेसचा गोंधळ पूर्वनियोजित

$
0
0

अॅड. नलिन कोहली यांचा आरोप

म. टा. प्रतिनिधी, पुणे

'संसदीय अधिवेशनात काँग्रेस पक्षाच्या आमदारांनी घातलेला गोंधळ पूर्वनियोजित होता. घराणेशाही जपण्यासाठी काँग्रेसचे सर्व खासदार धडपड करत आहेत. या खासदारांना देशाच्या विकासाची चिंता नसून, ठराविक घराणेशाहीच्या विकासाची चिंता आहे. जीएसटी विधेयक मंजूर होऊ नये म्हणून गोंधळ घालण्यात आला,' असा आरोप भाजपाचे राष्ट्रीय प्रवक्ते अॅड. नलिन कोहली यांनी शुक्रवारी परिषदेत केला.

या वेळी भाजपच्या आमदार मेधा कुलकर्णी, प्रवक्ते माधव भंडारी, सरचिटणीस योगेश गोगावले व संदीप खर्डेकर उपस्थित होते. 'येत्या २५ सप्टेंबर ते दोन ऑक्टोबर या कालावधीत देशात ज्या शहरातून काँग्रेसचे आणि डाव्या पक्षाचे खासदार निवडून आले आहेत, त्या ठिकाणी जाऊन त्यांनी केलेल्या कृत्याची माहिती भाजपचे खासदार देणार आहे. काँग्रेस देशाच्या विकासाच्या विरोधात करत असलेले षड्‍‍यंत्र सर्व जनतेसमोर आले पाहिजे असा त्यामागचा उद्देश आहे,' असे कोहली म्हणाले.

'संसदेचे पावसाळी अधिवेशनाचे कामकाज सुरू होताच काँग्रेसच्या खासदारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सभागृहात यावे ही मागणी करत सभागृहात गोंधळ सुरू केला. हा गोंधळ पुर्वनियोजित असून, त्यामागे पक्षाचे मोठे षड्‍‍यंत्र आहे. संसदीय कामकाज सुरळीत चालू देणार नसल्याचे वक्तव्य काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी जनतेसमोर केले होते. त्याप्रमाणे खासदारांनी त्यांच्या आदेशाचे पालन करून कामकाजात गोंधळ घातला. काँग्रेसला जीएसटी विधेयक मंजूर होऊ द्यायचे नाही. जीएसटी कायद्याचे श्रेय भाजपला द्यायचे नाही. म्हणूनच काँग्रेसने संसदेत गोंधळ घातला,' अशी टीका कोहली यांनी केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


प्रकल्प तपासण्यास प्राध्यापकांचा नकार

$
0
0

सोमवारी निर्णय होण्याची शक्यता

म. टा. प्रतिनिधी, पुणे

'फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया'मधील (एफटीआयआय) २००८च्या बॅचच्या विद्यार्थ्यांचे प्रोजेक्ट्स 'आहेत त्या स्थितीत' तपासण्याला प्राध्यापकांनी नकार दिला आहे. त्यामुळे या प्रक्रियेला तात्पुरती स्थगिती देण्यात आली असून, सोमवारी या बाबतचा निर्णय होण्याची शक्यता आहे.

एफटीआयआयमधील २००८ बॅचच्या विद्यार्थ्यांचे अद्याप अपूर्ण असलेले फायनल प्रोजेक्ट्स 'आहेत त्या स्थितीत' तपासले जाणार असल्याची नोटीस प्रभारी संचालक प्रशांत पाठराबे यांनी नुकतीच दिली होती. अपूर्ण प्रोजेक्ट्स तपासण्याला विद्यार्थ्यांनीही विरोध दर्शवला होता. त्याला प्राध्यापकांनीही पाठिंबा देऊन तपासणी करणार नसल्याचे पत्र संचालकांना दिले होते. अशा प्रकारची तपासणी सद्यस्थितीत अन्यायकारक असल्याचे कारण प्राध्यापकांनी संचालकांना दिले होते. त्यामुळे ही प्रक्रिया होऊ शकली नाही. शुक्रवारी दुपारी संचालक व प्राध्यापकांच्या समितीची बैठक झाली. त्या बैठकीत तपासणी प्रक्रियेला तात्पुरती स्थगिती देण्याचे निर्णय घेण्यात आला. त्याबाबत सोमवारी पुन्हा बैठक होणार आहे.

प्राध्यापकांकडून संचालक व माहिती व प्रसारण मंत्रालयाला पत्र पाठवण्यात आले आहे. त्यात २००८ बॅचच्या अनुशेषाची कारणे देण्यात आली आहेत.

'रिट्रेसिंग फ्रीडम'चे आयोजन

गेल्या दोन महिन्यांपासून सुरू असलेल्या संपाला आता सर्जनशील दिशा दिली जाणार असल्याचे स्टुडंट्स् असोसिएशनच्यावतीने सांगण्यात आले. त्या दृष्टीने १५ ते २२ ऑगस्टदरम्यान 'रिट्रेसिंग फ्रीडम' हा महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. त्यात ४८ तासांचे फिल्म स्क्रीनिंग, चर्चा असे कार्यक्रम होणार आहेत. त्यासाठी देशभरातील विचारवंत, रंगकर्मी, चित्रकार आदींना निमंत्रित करण्यात आले आहे. स्वातंत्र्योत्तर काळातील कलेचा प्रवास उलगडण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.

...तर खरा स्वातंत्र्यदिन!

संप सुरू झाल्यापासून संस्थेच्या नियामक मंडळावर नेमणूक झालेले गजेंद्र चौहान, अनघा घैसास, राहुल सोलापूरकर, नरेंद्र पाठक व शैलेश गुप्ता यांची निवड कशी योग्य आहे, हे केंद्र सरकारने स्पष्ट केले नाही. मूळ मुद्दा बाजूला ठेवण्यात आला. आजच्या, स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर, सरकारने या सदस्यांच्या नेमणुकीचे स्पष्टीकरण दिल्यास विद्यार्थ्यांसाठी तो खऱ्या अर्थाने स्वातंत्र्यदिन असेल, असे विद्यार्थ्यांकडून सांगण्यात आले.

कंत्राटी कर्मचाऱ्यांवर अन्याय नको

संस्थेतील संपामुळे काम नसल्याचे कारण पुढे करून प्रशासनाने ८२ कंत्राटी कर्मचाऱ्यांना १ सप्टेंबरपासून तात्पुरते कार्यमुक्त करण्याचा निर्णय घेतला. 'प्रशासनाने ८२ कंत्राटी कमी करण्यापेक्षा संप मिटवण्याच्या दृष्टीने प्रयत्न केले पाहिजेत. या कर्मचाऱ्यांवर अन्याय होत आहे. त्यामुळे त्यांना पाठिंबा आहे. त्यांच्यावर कारवाई होऊ नये म्हणून कामगार संघटनांशी बोलणी सुरू आहेत,' असेही विद्यार्थ्यांनी स्पष्ट केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘एफटीआयआय’चे विद्यार्थी कोर्टात?

$
0
0

शहरातील वकिलांशी केली ​विविध मुद्यांवर चर्चा

म. टा. प्रतिनिधी, पुणे

'फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया'मध्ये (एफटीआयआय) गेल्या दोन महिन्यांपासून सुरू असलेल्या संपासंदर्भात कोणताही मार्ग निघालेला नाही. परिणामी, विद्यार्थ्यांची कोर्टाचा दरवाजा ठोठावण्याची तयारी चालवली असून, कायदेशीर मार्गांबाबत पुण्यातील एका प्रसिद्ध वकिलांशी चर्चा सुरू आहे.

केंद्र सरकारने पुनर्रचना केलेल्या नियामक मंडळातील पाच सदस्यांच्या पात्रतेबाबत प्रश्नचिन्ह उभे करून १२ जूनपासून विद्यार्थ्यांचा संप सुरू आहे. त्याबाबत एकदाच केंद्र सरकारशी बोलणी झाली होती. मात्र, त्यातून काहीच मार्ग निघाला नाही. पुनर्रचित मंडळ बरखास्त करण्याची विद्यार्थ्यांची मागणी सरकारला मान्य नसल्याने संपाचे घोंगडे भिजत पडले आहे. या नियुक्तीविरोधात विद्यार्थ्यांनी कोर्टात जाणार असल्याचे सूतोवाच केले होते. आता त्या दृष्टीने पावले टाकली जात आहेत.

पुण्यातील प्रसिद्ध विधिज्ञांनी 'एफटीआयआय' प्रश्नी कायदेशीर लढाई लढण्याची तयारी दर्शवली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांची त्यांच्याशी बोलणी सुरू आहेत. सरकारी नियुक्तीविरोधात याचिका दाखल करता येते का, याचिका विद्यार्थ्यांच्याच नावे दाखल करायची का, एखाद्या संस्थेची मदत घ्यायची का, जनहित याचिका दाखल करायची का,हायकोर्ट, सोसायटी कायद्याची मदत घ्यायची का, आदी मुद्द्यांची चाचपणी सुरू आहे, अशी माहिती विद्यार्थ्यांकडून देण्यात आली.

निवड कोणत्या निकषांवर?

'सरकारने कोणत्या निकषांवर मंडळातील सदस्यांची निवड केली हा प्रश्न आहे. मंडळातील सदस्यांच्या नियुक्तीसाठी काही निश्चित निकष असल्याचे दिसून येत नाही. पर्सन ऑफ एमिनन्स म्हणजे नेमके काय याची व्याख्या केली पाहिजे. संस्थेच्या भवितव्याच्या दृष्टीने ही कायदेशीर लढाई महत्त्वाची आहे. आता कायदेशीर लढाईबाबतचा अंतिम निर्णय विद्यार्थ्यांनी घेणे अपेक्षित आहे,' अशी माहिती संबंधित वकिलांनी नाव प्रसिद्ध न करण्याच्या अटीवर दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कॉलेजमधला शिपाई बनला अचानक श्रीमंत

$
0
0

मैत्रिणीच्या मदतीने घरफोड्या

म. टा. प्रतिनिधी, पुणे

कॉलेजचा शिपाई अचानक मित्रांना आखाड पार्ट्या देऊ लागल्याने; पॉश कपडे, तसेच सोन्याचे दागिने घालून ऐटीत ​फिरू लागल्याने अनेकांचे डोळे विस्फारले होते. याच विस्फारलेल्या डोळ्यांनी पोलिसांना माहिती दिली आणि घरफोडीचे तीन गुन्हे उघडकीस आले. आपल्या मैत्रिणीच्या मदतीने ती राहत असलेल्या सोसायटीत या शिपायाने घरफोड्या केल्या. पोलिसांनी त्याच्याकडून रोख रकमेसह सोन्याचे दागिने असा सहा लाख रुपयांचा ऐवज जप्त केला.

निखिल राजेंद्र मरळ (वय २५, रा. धायरी) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याने सिंहगड रोडवरील एका सोसायटीतील तीन फ्लॅट फोडल्याची कबुली दिली. या तिन्ही फ्लॅटमधून त्याने १२ लाख रुपयांचा ऐवज चोरला. त्यापैकी सहा लाख रुपयांचा ऐवज जप्त केला आहे, अशी माहिती गुन्हे शाखेचे सहायक आयुक्त राजेंद्र जोशी आणि युनिट दोनचे पोलिस निरीक्षक सतीश निकम यांनी दिली.

गुन्हे शाखेचे सहायक निरीक्षक संपत पवार आणि पोलिस कर्मचारी नीलेश अतुल गायकवाड यांना मरळ याच्या 'श्रीमंती'बाबत माहिती मिळाली होती. मरळकडे पैसे कोठून आले, याचा तपास करण्यात येत असताना घरफोडीच्या गुन्ह्यांची धक्कादायक माहिती उघडकीस आली.

मरळ हा कात्रज परिसरातील एका कॉलेजमध्ये शिपाई आहे. खडकवासला येथे गेला असताना त्याची एका ३० वर्षांच्या महिलेशी ओळख झाली होती. एकमेकांचे मोबाइल नंबर 'शेअर' झाल्यानंतर त्यांची मैत्री वाढली. याचदरम्यान आपल्याकडे फारसे पैसे नसल्याची जाणीव त्यांना झाली. त्यातून घरफोडी करण्याचा 'प्लॅन' त्यांनी केला.

मरळची मैत्रीण राहत असलेल्या सोसायटीमधील फ्लॅट फोडण्याचे ठरले. त्यासाठी सोसायटीमधील रहिवाशांनी या मैत्रिणीच्या घरी शेजारी या नात्याने ठेवण्यासाठी दिलेल्या किल्ल्या ड्युप्लिकेट बनवण्यात आल्या. या किल्ल्या तिने मरळला दिल्या; तसेच फ्लॅटमध्ये कोण कधी नसते, याची माहिती दिली. त्यानुसार मरळने फ्लॅट फोडले. एका व्यापाऱ्याच्या घरातील साडेदहा लाख रुपयांची रोकड चोरीस गेली होती. चोरीतून मिळालेल्या पैशांतून मरळ ऐष करू लागला. स्वतःसह मैत्रिणीलाही त्याने दागिने घेतले. मित्रांना पार्ट्या देऊ लागला आणि याच गोष्टींनी त्याला अडचणीत आणले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

स्वातंत्र्य दिनापूर्वी दणका आंदोलनांचा

$
0
0

'अभाविप', 'एसएफआय'नी गाजवला शुक्रवार

म. टा. प्रतिनिधी, पुणे

इंग्रजांच्या अन्यायाविरोधात भारतीयांनी पुकारलेल्या लढ्याच्या यशस्वीततेचे प्रतीक असणाऱ्या स्वातंत्र्यदिनाच्या तयारीची लगबग एकीकडे सुरू असतानाच, दुसरीकडे सरकारी यंत्रणांनी केलेल्या अन्यायाविरोधात रस्त्यावर उतरलेले विद्यार्थी शुक्रवारी पुणेकरांनी अनुभवले.

अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या प्रशासकीय इमारतीमधील कामकाज बंद पाडले, तर स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडियाने (एसएफआय) स्कॉलरशिपच्या प्रश्नावरून समाजकल्याण संचालनालयाबाहेर आंदोलन करून सरकारचा निषेध केला.

'जेएसपीएम'च्या इंजिनीअरिंग कॉलेजमधील 'अभाविप'च्या कार्यकर्त्यांना हेतुपुरस्सर अनुत्तीर्ण केल्याचा आरोप करून परिषदेने विद्यापीठात आंदोलन केले. काही महिन्यांपूर्वी 'जेएसपीएमच्या' प्रशासनाविरोधात संघटनेने केलेल्या आंदोलनामध्ये सहभागी विद्यार्थ्यांनाच कॉलेजने मुद्दाम नापास केल्याचा आरोप संघटनेने केला. या प्रश्नावर चर्चा करण्यासाठी परिषदेने कुलगुरू डॉ. वासुदेव गाडे यांच्याकडे भेटीसाठी वेळ मागितली होती. परंतु, वेळ न दिल्याने अखेर प्रशासकीय इमारतीमध्ये घुसून आंदोलन केल्याचे संघटनेतर्फे शुक्रवारी सांगण्यात आले. आंदोलनानंतर डॉ. गाडे यांनी या प्रकरणी कॉलेज प्रशासन, तसेच संबंधित परीक्षकांची चौकशी करण्याचे आश्वासन दिले. त्यानंतरच हे आंदोलन मागे घेण्यात आले. या प्रश्नावर येत्या आठ दिवसांत तोडगा न निघाल्यास, थेट कुलगुरू कार्यालयावर मोर्चा काढण्याचा इशाराही संघटनेने शुक्रवारी दिला.

सामाजिक व आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांमधील विद्यार्थ्यांसाठीच्या स्कॉलरशिप वितरणामधील अनियमिततेविरोधात 'शिष्यवृत्ती वाचवा, शिक्षण वाचवा' अशा घोषणा देऊन 'एसएफआय'ने आंदोलन केले. समाजकल्याण संचालनालयाबाहेर झालेल्या या आंदोलनानंतर स्कॉलरशिपच्या विविध प्रश्नांबाबत विद्यार्थ्यांनी समाजकल्याण आयुक्तांची भेट घेऊन मागण्या मांडल्या. विद्यार्थ्यांच्या स्कॉलरशिपमधील कालसुसंगत वाढ व्हावी, स्कॉलरशिप वेळेत मिळावी, व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी ओबीसी, एसबीसी, व्हीजेएनटी गटांमधील विद्यार्थ्यांनाही स्कॉलरशिप मिळावी, भ्रष्टाचारात अडकलेल्या अधिकाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करावेत आदी मागण्या या वेळी करण्यात आल्या.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘अजित पवारांचे बालिश ज्ञान खपवून घेणार नाही’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

इतिहासाबाबतचे अजित पवार यांचे बालिश ज्ञान खपवून घेतले जाणार नाही, अशी प्रतिक्रिया शिवप्रेमी जनजागरण समितीतर्फे देण्यात आली आहे.

शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान करण्यास शिवप्रेमी आदी संस्था-संघटनांतर्फे विरोध करण्यात येत आहे. त्या संदर्भात अजित पवार यांनी मतप्रदर्शन केले होते. पुरंदरे यांना थोर आणि महान म्हणून अजित पवार यांनी इतिहासाबाबतची वैचारिक दिवाळखोरी सिद्ध केली आहे. शिवरायांचा इतिहास तेजोमय व प्रेरणादायी आहे. जेम्स लेनला पुरस्कार दिल्यास तो अजित पवार यांना चालेल का, असा सवाल शिवप्रेमीचे राज्य समन्वयक मुकुंद काकडे यांनी उपस्थित केला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सिंहगड घाटात दरीत जीप कोसळली

$
0
0

तिघे जण जखमी, स्थानिक धावले मदतीला

म. टा. प्रतिनिधी, पुणे

सिंहगड घाटातून पुण्याकडे परतताना जीप दरड पॉइंटवरून ३०० फूट खोल दरीत कोसळल्याची घटना शुक्रवारी दुपारी घडली. या अपघातात गाडीतील तीन पर्यटक जखमी झाले आहेत. स्थानिक नागरिक आणि घेरा सिंहगड वनसंरक्षण समितीच्या सुरक्षारक्षकांनी वेळीच केलेल्या धावपळीमुळे तिघाही पर्यटकांना सुखरूप बाहेर काढण्यास यश आले आहे.

जवाहर मरोडिया, अनिल मरोडिया आणि रमेश रोजंडा अशी या जखमींची नावे आहेत. सिंहगड घाट रस्त्यावर दुपारी दोनच्या सुमारास हा अपघात झाला. अपघातात जखमी झालेले तिघेही मूळचे राजस्थानचे असून सध्या कात्रज येथील आमग परिसरात वास्तव्यास आहेत. कोंढणपूर अवसरवाडी येथे बांधकाम ठेकेदारीचे काम झाल्यानंतर दुपारी ते गडावर फिरायला गेले होते. गडावरून दुपारी दोनच्या दरम्यान गाडीतून परत येत असताना कोंढणपूरच्या फाट्यापासून काही अंतरावर वळणाचा अंदाज आल्याने मोटार अचानक खोल दरीच्या डाव्या बाजूच्या कठड्याला धडकली. पावसाळ्यामुळे कठडा मोडकळीस आलेला असल्याने जोराच्या धडकेमुळे तो तुटला. आणि गाडी थेट सुमारे तीनशे फूट खाली दरीत जाऊन एका झाडाच्या मोठ्या फांदीला अडकली. अपघाताची माहिती मिळताच स्थानिक कार्यकर्ते कैलास जरांडे, युवराज पायगुडे, भानुसाद घोगरे आणि वनसमितीचे सुरक्षारक्षक रोहित पढेर तत्काळ घटनास्थळी पोचले. दरीत उतरून जखमींना मदत केली. दरम्यान, दुसरे पथकही दोर लावून गाडीजवळ पोहोचले.

संजय गायकवाड, नंदू, जोरकर, विक्की दुधाने आदींनी दोराच्या साह्याने जखमींना दरीतून सुखरूप बाहेर काढले. यातील रमेश रोंजडा हे गंभीर जखमी झाला असून जवळच्या खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

मोटार दरीत झाडाला अडकली नसती तर तेथून खालील बाजूस असलेल्या खोल कड्यावरून खाली गेली असती. त्या दरीत मदतीसाठी पोहोचणे देखील अवघड होते, झाडांमुळे तिघेही बचावले, अशी माहिती वनसंरक्षण समितीचे संजय गायकवाड यांनी दिली. स्थानिक कार्यकर्ते माऊली कोडीतकर यांनी त्यांच्या खासगी वाहनातून जखमींना तातडीने पायथ्याशी आणले, दरम्यान जिल्हा परिषदेची १०८ क्रमांक रुग्णवाहिका पायथ्याशी दाखल झाली होती. तिघांवरही सध्या खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.

सिंहगड रस्त्यावरील कठडे धोकायादक

सिंहगड घाट रस्त्याचे दोन वर्षांपूर्वीच नूतनीकरण झाले. मात्र, गेल्या वर्षी पडलेल्या दरडीमुळे रस्त्यावर अनेक खड्डे पडले आहेत. गेल्या वर्षी रस्त्याच्या कडेला पडलेले दरडीचे दगड वन विभागाने अद्यापही उचलेले नाहीत. घाट रस्त्यावरील अनेक ठिकाणचे कठडे तुटलेले आहे तर काही ठिकाणी कठडे मोडकळीस आले आहेत. याबाबत वनसंरक्षण समितीच्या प्रतिनिधींनी वारंवार पाठपुरावा करूनही वनाधिकारी दुर्लक्ष करीत आहेत. एवढेच नव्हे तर घाटात दरड पडण्याचा धोका कायम असल्याचे खुद्द वन विभागानेही मान्य केले आहे. दरडींचे प्रकार टाळण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाला निधी देखील देण्यात आला आहे. पावसाळा संपल्याशिवाय आम्ही काहीच करणार नाही, अशी भूमिका त्यांनी घेतली आहे. दरम्यान, पुण्याच्या जिल्ह्याधिकाऱ्यांनी देखील महिनाभरापूर्वी घाटरस्त्याची पाहणी केली होती. पण, पर्यटकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने कोणताही ठोस निर्णय घेण्यात आलेले नाहीत.

रुग्णवाहिकेची नुसती आश्वासने

सिंहगडवर हजारो पर्यटक फिरण्यासाठी येतात; मात्र त्यांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून प्रशासनाने अद्याप सुरक्षा ऑडिट केलेले नसल्याची वृत्त मालिका 'मटा'ने सहा महिन्यांपूर्वी प्रसिद्ध केली होती. याची दखल घेत आपत्कालीन परिस्थिती लक्षात घेऊन सिंहगडावर दोन महिन्यांत पूर्णवेळ रुग्णवाहिका देणार असल्याचे आश्वासन दिले होते. त्यानंतर गिरीप्रेमी संस्थेने घेरा समितीच्या स्वयंसेवकांना आपत्कालीन परिस्थिती हाताळ्ण्याबाबत दोन दिवसांचे प्रशिक्षण दिले. दरम्यान, सिंहगडावर झालेल्या एका कार्यक्रमात दोन महिन्यांपूर्वी महापौर दत्ता धनकवडे यांनीही रुग्णवाहिका देणार असल्याचे जाहीर केले. मात्र, अद्याप एकही रुग्णवाहिका मिळालेली नाही.

गडावर जा... पण जपून

सिंहगडावर दर वर्षी १५ ऑगस्टला मोठ्या संख्येने पर्यटक हजेरी लावतात. आज (शनिवार) पर्यटकांची संख्या अपेक्षित धरून घेरा सिंहगड समितीतर्फे गडावरील बंदोबस्त वाढविण्यात येणार आहे. मात्र, पर्यटकांनीही घाट रस्त्यावर गाडी चालवताना आणि गडावर फिरताना काळजी घ्यावी. घाट रस्त्यावरील अनेक कठडे घसरडे आणि धोकादायक आहेत. धुक्यामुळे दरीच्या खोलीचा अंदाज येत नाही. कड्यावरून फोटो काढताना पायाखालचा मुरूम अनेकदा सरकतो अथवा घसरतो, अशावेळी तोल जाण्याची शक्यता असते. त्यामुळे पर्यटकांनी पायवाटा आणि गडावरील पादचारी मार्ग सोडून इतरत्र भटकंती करू नये, असे आवाहन घेरा सिंहगड समितीतर्फे कऱण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

हत्येच्या तपासात सरकार अपयशी

$
0
0

हमीद दाभोलकर यांचा आरोप; गुरुवारी निषेध रॅली

म. टा. प्रतिनिधी, पुणे

डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येला दोन वर्षे पूर्ण होत असूनही अद्याप सरकार या प्रकरणाचा तपास करण्यास उदासीन आहे. दाभोलकर यांच्या हत्येचा तपास सीबीआयकडे सोपविण्यात आला. मात्र, सीबीआयला तपाससाठी लागणारे सहा अधिकारीही सरकार नियुक्त करू शकले नाही. दाभोलकर आणि पानसरे यांच्या हत्येचा तपास करण्यास सरकार असमर्थ ठरले आहे, असा आरोप हमीद दाभोलकर यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत केला.

दाभोलकर यांच्या हत्येच्या प्रकरणाचा तपास कोर्टाच्या देखरेखीखाली व्हावा या साठी हायकोर्टात जनहित याचिका दाखल केल्याचे हमीद दाभोलकर म्हणाले. दाभोलकर यांच्या हत्येच्या घटनेला २० ऑगस्ट रोजी दोन वर्ष पूर्ण होत आहेत. मात्र, अद्याप मारेकेरी आणि सूत्रधार सापडले नाहीत. याचे दुःख आणि संताप अंनिसचे कार्यकर्ते आणि जनतेमध्ये आहे. याचा निषेध करण्यासाठी येत्या २० ऑगस्ट रोजी निषेध रॅली आणि सभेचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी सव्वासात वाजता वि. रा. शिंदे पुलावर रॅली सुरू होणार आहे. मनोहर मंगल कार्यालयात रॅली समाप्त होणार आहे. त्यानंतर दिवसभर या कार्यालयात विविध मान्यवर मार्गदर्शन करणार आहेत.

एन. डी. पाटील, अण्णा हजारे, हुसेन दलवाई, निखिल वागळे, शैला दाभोलकर, हमीद दाभोलकर, अविनाश पाटील, आशिष खेतान, गिरीश कुलकर्णी, सोनाली कुलकर्णी हे सभेसाठी उपस्थित राहणार आहेत.

'राधे माँ वर कारवाई करा'

आपल्या अंगात दैवी शक्ती आहे असे सांगून दहशत निर्माण करणाऱ्या राधे माँवर जादूटोणाविरोधी कायद्याखाली कारवाई करण्यात यावी अशी मागणी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मलून समितीतर्फे करण्यात आली आहे. मुंबईतील निकी गुप्ता या महिलेने राधे माँच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे. गुप्ता हिला आपल्या अंगात दैवी शक्ती असल्याचे सांगून तुझा संसार नीट होणार नाही असे सांगून, राधे माँ दहशत निर्माण करत आहे. या तक्रारीची दखल घेताना जादूटोणा विरोधी कायद्यातील तरतुदींचा विचार करुन कारवाई करण्यात यावी, अशी मागणी हमीद दाभोलकर यांनी केली आहे. तसेच जादूटोणा कायद्यानुसार कारवाई न केल्यास संबंधित पीडीत महिलेच्या कुटुंबियांवर आपण रस्त्यावर येऊन मागणी करु, असे दाभोलकर म्हणाले.

अंनिसतर्फे सर्पप्रबोधन सप्ताह

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मलून समितीतर्फे १७ ते २४ ऑगस्ट या कालावधीमध्ये सर्प प्रबोधन सप्ताह शाळांमध्ये राबविण्यात येणार आहे. लोकांमध्ये सापांविषयी मोठ्या प्रमाणावर अंधश्रद्धा आहे. अंधश्रद्धा कमी करण्यासाठी समितीतर्फे सर्पप्रबो​धन सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. ज्या शाळांना या कार्यक्रमाचे आयोजन करायचे आहे, त्यांनी श्रीपाल ललवानी यांच्याशी (९८२३९७७४७२) संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


आडोशी बोगद्याजवळ पुन्हा दरड कोसळली

$
0
0

दोन महिला जखमी

म. टा. प्रतिनिधी, लोणावळा

मुंबई-पुणे एक्सप्रेस-वेवरील खंडाळा घाटातील (बोरघाट) दरड संकट पुन्हा ओढावले आहे. शुक्रवारी संध्याकाळी आडोशी बोगद्याजवळ पुन्हा दरड कोसळली आहे. या घटनेत दोन प्रवासी जखमी झाले आहेत. दरड कोसळली असली तरी वाहतूक सुरळीत सुरू असल्याची माहिती देण्यात आली आहे.

आडोशी बोगद्याजवळ दीड महिन्यात दोनदा तर खंडाळा एक्झिट ते आडोशी बोगद्या दरम्यान सहावेळा दरड कोसळण्याच्या घटना घडल्या आहेत. यामुळे एक्सप्रेस वेवरील दरडी कोसळण्याचे भय अद्याप संपले नसल्याचे दिसून येत आहे. अक्षदा महाजन (वय २२) व उषा महाजन (वय ५०, दोघी रा. नवी सांगवी, पुणे ) असे दरड कोसळून झालेल्या दुर्घटनेत जखमी झालेल्या प्रवाशांची नावे आहेत.

बोरघाट (दस्तुरी) महामार्ग पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार महाजन त्यांच्या सँट्रोने मुंबईतून पुण्याकडे येत होते. या दरम्यान बोरघाटातील आडोशी बोगद्याजवळ आले असता, बोगद्यावरून दोन मोठे दगड अचानक रस्त्यात कोसळले. त्यापैकी एक दगड त्यांच्या कारच्या बॉनेटवर आदळल्याने कारमधील चार प्रवाशांपैकी अक्षदा व उषा महाजन या दोघी जखमी झाल्या आहेत. त्यांच्यावर लोणावळा येथील यश हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. शुक्रवारी दुपारनंतर लोणावळा, खंडाळा आणि घाटमाथा परिसरात जोरदार पाऊस झाला. आडोशी बोगद्याजवळ १९ जुलैला दरड कोसळून दोन जणांचा मृत्यू झाला होता, तर तीन जण गंभीर जखमी झाले होते. पुन्हा चोवीस दिवसांनी याच ठिकाणी दरड कोसळण्याची घटना झाली आहे. त्यामुळे आयआरबी आणि रस्ते विकास महामंडळाची दरड हटाव मोहीम निरूपयोगी ठरल्याचे दिसून आले आहे. पुन्हा दरड कोसळल्याने संबंधित यंत्रणेने नक्की कोणत्या धोकादायक दरडी हटविल्या आहेत असा प्रश्न उपस्थित करण्यात आला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बोगस मतदारांची गच्छंती!

$
0
0

पुणे जिल्ह्याच्या यादीतून साडेपाच लाख नावे वगळणार

म. टा. प्रतिनिधी, पुणे

पुण्याच्या मतदारयादीतील सुमारे पावणेपाच लाख बोगस मतदारांच्या नावांवर आता कायमची फुली पडणार असून, येत्या २५ सप्टेंबरपर्यंत ही नावे मतदारयादीतून वगळण्यात येणार आहेत. यादीतून नावे वगळलेल्या मतदारांना १ ते ३१ ऑक्टोबरदरम्यान निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे हरकत नोंदविता येणार आहे. मात्र, त्यावर कोणतीही हरकत न आल्यास संबंधितांचा मतदानाचा हक्क काढून घेतला जाणार आहे.

पुणे शहर व जिल्ह्याची मतदार यादी बोगस मतदारांमुळे फुगली आहे. बोगस मतदारांबरोबरच काही नावे वगळली गेल्याच्या तक्रारीमुळे लोकसभा निवडणुकीमध्ये त्यावर पुण्यात मोठा गदारोळ झाला होता. दुबार, मयत व स्थलांतरित मतदारांची नावे वगळण्याची कार्यवाही वर्षानुवर्षे झालेली नाही. त्यामुळे मतदानाच्या टक्केवारीवर त्याचा परिणाम झाल्याचे दिसून आले आहे. 'महाराष्ट्र टाइम्स'ने यावर सातत्याने प्रकाशझोत टाकल्यानंतर मतदारयादी अद्ययावत करण्याचे आदेश निवडणूक आयोगाने दिले आहेत.

निवडणूक प्रशासनाने गेल्या काही दिवसांत मोहीम राबवून सुमारे ८३ हजार बोगस मतदारांची नावे वगळली आहेत; तसेच मतदार यादीत आणखी चार ते सव्वाचार लाख बोगस नावे असल्याने ती यादीतून कमी करण्याची कार्यवाही सुरू केली आहे. निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार बोगस मतदारांना नोटीस बजावण्यात आली; तसेच बीएलओंमार्फत घरोघरी सर्वेक्षणही करण्यात आले. या नोटिशीनंतर त्या संदर्भात कोणताही प्रतिसाद निवडणूक प्रशासनाला मिळाला नाही. त्यामुळे महापालिका, नगरपालिका व ग्रामपंचायतीमधील जन्म-मृत्यू नोंद वही; तसेच बीएलओंनी केलेल्या सर्वेक्षणाचा आधार घेऊन बोगस नावांवर कायमची फुली मारण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे.

अनेक संधींना प्रतिसाद नाही

दुबार व स्थलांतरित झालेल्या मतदारांनाही अनेकदा संधी देण्यात आली आहे. मात्र, त्यातील बहुतांश मतदारांनीही प्रतिसाद दिलेला नाही. त्यामुळे २५ सप्टेंबरपर्यंत ही नाव वगळण्यात येणार आहेत. नाव वगळल्यानंतर १ ऑक्टोबर रोजी प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. ही यादी प्रसिद्ध झाल्यानंतर मतदारांनी आपल्या नावाची खात्री करावी आणि नाव वगळले असल्यास १ ते ३१ ऑक्टोबरदरम्यान त्यावर हरकत नोंदवावी, असे उपजिल्हा निवडणूक अधिकारी समिक्षा चंद्राकार-गोकुळे यांनी सांगितले.

सोसायट्यांचे सहकार्य हवे

मतदारयाद्यांच्या दुरुस्तीसाठी सहकारी गृहनिर्माण संस्थांचे अध्यक्ष व सचिव यांना 'मतदार स्वयंसेवक' म्हणून घोषित करण्यात आले आहे; तसेच मतदारयादीशी संबंधित कामे करणे त्यांना सक्तीचे करण्यात आले आहे. सोसायट्यांच्या मतदार स्वयंसेवकांनी १५ ऑगस्ट रोजी सोसायटीमधील मृत, स्थलांतरित व दुबार नावांची माहिती घेऊन १७ ऑगस्ट रोजी संबंधित निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना कळवावीत, असे आवाहन उपजिल्हा निवडणूक अधिकारी समीक्षा चंद्राकार-गोकुळे यांनी केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘सतर्क’ वर्तविणार दरडींचा अंदाज

$
0
0

कोसळण्याच्या घटनांबाबत आधी वेध घेण्याची यंत्रणा विकसित

म. टा. प्रतिनिधी, पुणे

दरडी कोसळण्याच्या घटनांची किमान २४ तास आधी पूर्वकल्पना देऊ शकणारी 'सतर्क' ही यंत्रणा पुण्यातील 'सेंटर फॉर सिटिझन सायन्स'ने (सीसीएस) विकसित केली आहे. सहा दिवसांचा पावसाचा अंदाज, उपग्रहांकडून मिळणारी पावसाची अद्ययावत माहिती आणि दरडप्रवण भागांमधील नागरिकांकडून मिळणारी माहिती या आधारे 'सतर्क' वेबसाइट, सोशल मीडिया आणि मोबाइल अपडेट्सच्या माध्यमातून नागरिकांना सतर्क करणार आहे.

'सीसीएस'चे उपाध्यक्ष आणि ज्येष्ठ हवामानशास्त्रज्ञ डॉ. जीवनप्रकाश कुलकर्णी आणि संघटनेचे सचिव मयुरेश प्रभुणे यांनी ही माहिती दिली. ते म्हणाले, 'ही यंत्रणा विकसित करण्यासाठी हवामानशास्त्रज्ञ आणि भूगर्भशास्त्रज्ञांचे एकत्रित मार्गदर्शन घेण्यात येत आहे. राज्यातील दरडप्रवण क्षेत्रांमध्ये पावसाळ्यात दरड कोसळण्याच्या घटनांची गेल्या दहा वर्षांची आकडेवारी या यंत्रणेसाठी विचारात घेण्यात आली आहे. त्यातूनच राज्यातील दरडप्रवण क्षेत्रांचा अद्ययावत नकाशाही तयार झाला आहे. नासाच्या 'ट्रॉपिकल रेनफॉल मेजरिंग मिशन' (टीआरएमएम) या प्रकल्पाच्या माध्यमातून सहा दिवसांचा पावसाचा अंदाज उपलब्ध होतो. तसेच, हवामान विभागाच्या 'रॅपिड' या यंत्रणेच्या माध्यमातून ढगांच्या सद्यस्थितीची माहितीही उपलब्ध होते. या दोन्ही यंत्रणांकडून मिळणारी माहिती राज्यातील दरडप्रवण क्षेत्राच्या अद्ययावत नकाशाशी जोडून, 'सतर्क' दरड कोसळण्याच्या घटनांची पूर्वकल्पना देऊ शकेल.' www.satarkindia.wordpress.com, www.facebook.com/satarkindia247 या लिंकवरून या यंत्रणेची माहिती उपलब्ध होणार आहे.

'राज्यात पश्चिम घाटाचा परिसर हा दरडप्रवण क्षेत्रात मोडला जातो. या परिसरात काही तासांमध्ये साधारण शंभर मिलीमीटरच्या पुढे पाऊस झाल्यास दरडी कोसळण्याचा धोका वाढतो. अशा सर्व ठिकाणांचा या नकाशासाठी विचार करण्यात आला आहे. यापूर्वी दरडी कोसळण्याच्या झालेल्या घटना आणि या पुढील काळातही होणाऱ्या घटनांच्या आधारे हा नकाशा सातत्याने अद्ययावत ठेवला जाणार आहे. त्यातूनच पावसावर आधारित दरडी कोसळण्याच्या घटनांचा अधिकाधिक अचूक अंदाज वर्तविण्यासाठी ही यंत्रणा कार्यरत राहील,' असे डॉ. कुलकर्णी यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

घटक पक्ष महायुतीतून बाहेर?

$
0
0

सरकारविरोधात २४ ऑगस्टपासून मेळावे घेणार

म. टा. प्रतिनिधी, पुणे

मराठवाडा आणि विदर्भातील शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरून महायुतीमधील घटक पक्षांनी पुन्हा एकदा सरकारविरोधात दंड थोपटले आहेत. शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करून या घटक पक्षांनी सरकारच्या विरोधात २४ ऑगस्टपासून एकत्रित मेळावे घेण्याचा निर्णय घेतला आहे. या मेळाव्यानंतरही सरकारचे डोळे उघडले नाहीत, तर महायुतीतून बाहेर पडण्यापर्यंतची भूमिका हे घटक पक्ष घेणार आहेत.

भाजप-शिवसेनेला पाठिंबा देऊन स्वाभिमानी शेतकरी संघटना, राष्ट्रीय समाज पक्ष व शिवसंग्राम संघटना महायुतीत सहभागी झाली आहे. परंतु मंत्रिपदांपासून शेतकऱ्यांच्या प्रश्नांपर्यंत महायुतीमध्ये खटके उडत आहेत. उसाच्या दरावर आंदोलन करून स्वाभिमानी शेतकरी संघटनेने यापूर्वीच महायुतीला घरचा आहेर दिला आहे. आता दुष्काळग्रस्त मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून महायुतीतील घटक पक्षांमध्ये नाराजीचा सूर आहे.

मराठवाड्यात पावसाअभावी भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे. पिण्याचे पाणी, जनवारांच्या चाऱ्यासह मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या जीवनमरणाचा प्रश्न निर्माण झाला आहे; मात्र सरकार त्याकडे गांभीर्याने लक्ष देण्यास तयार नाही. मराठवाडा, विदर्भात शेतकऱ्यांच्या आत्महत्येचे प्रमाण वाढत आहे. त्यातच भू-विकास बँकांच्या थकित कर्जांची वसुली सरकारने सुरू केली आहे. त्या पार्श्वभूमीवर, शेतकरी संघटना, राष्ट्रीय समाज पक्ष आणि शिवसंग्राम संघटनेने एकत्रित मेळावे घेऊन राज्य सरकारला जाब विचारण्याची तयारी केली आहे.

'मराठवाड्यातील शेतकरी दुष्काळाने होरपळून निघत असताना सरकारकडून मदत होत नाही. पाण्याचे टँकर वेळेवर मिळत नाहीत. चाऱ्याचा प्रश्न सोडवण्यासाठी सरकारने चारा छावण्या सुरू केल्या नाहीत. एलबीटी रद्द करून व्यापाऱ्यांना दिलासा देणारे हे सरकार शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे लक्ष द्यायला तयार नाही,' असा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सदाभाऊ खोत यांनी केला आहे.

'शेतमालासह दुधाचे दर घसरल्यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत आहे. त्यांना या अरिष्टातून सोडवण्यासाठी भू-विकास बँकेचे कर्ज माफ करावे, पीककर्ज वसुलीला स्थगिती द्यावी. दुष्काळ निवारण आयोगाची स्थापन करावी. तसेच कायमस्वरूपी दुष्काळ असलेल्या तालुक्यांना शाश्वत निधी देऊन कायमस्वरूपी उपाययोजना करावी,' अशा मागण्यांसाठी मेळावे घेणार असल्याचेही त्यांनी सांगितले. या मेळाव्यांत 'रासप'चे आमदार महादेव जानकर, 'शिवसंग्राम'चे विनायकराव मेटे सहभागी होणार आहेत. रिपब्लिकन पक्षाचे नेते खासदार रामदास आठवले यांनाही त्यासाठी निमंत्रित करण्यात आले आहे, असेही खोत यांनी स्पष्ट केले.

अंतिम निर्णय सप्टेंबरमध्ये

शेतकऱ्यांच्या मदतीसाठी प्रथम मराठवाडा, विदर्भ, तसेच खानदेश आणि त्यानंतर पश्चिम महाराष्ट्रात मेळावे घेतले जाणार आहेत. सप्टेंबर अखेरपर्यंत हे मेळावे झाल्यानंतर संपूर्ण राज्याचा एकत्रित मेळावा मुंबईमध्ये घेण्यात येणार आहे. या मेळाव्यांनंतरही सरकार शेतकऱ्यांकडे लक्ष देणार नसेल, तर महायुतीत राहायचे की नाही याचा निर्णय मुंबईच्या मेळाव्यात घेण्यात असल्याचेही स्वाभिमानी शेतकरी संघटेनेचे खोत यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रिक्षा दरीत कोसळली, १ ठार

$
0
0

मटा ऑनलाइन वृत्त । पुणे

लोणावळ्याची रिक्षा खोपोली बोरघाटातील शिंग्रोबा मंदिराजवळ ५०० फूट खोल दरीत कोसळली. या अपघातात एक प्रवासी ठार आणि चारजण गंभीर जखमी झाले. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी अग्निशमन दल आणि यशवंती हायकर्स ग्रुप यांच्या सहकार्याने मदतकार्य सुरु केले. संदीप पाटील, सनिज मंडलेकर, उत्तुंग गायकवाड, अरविंद पाटील, नितीन गावंड आणि हरीश कोळी हे गिर्यारोहक मदतकार्यात सहभागी झाले.

गिर्यारोहकांनी दरीत उतरुन मृत प्रवासी तसेच सर्व जखमी प्रवाशांना बाहेर काढले. जखमी प्रवाशांना तातडीने हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. दरम्यान, दरीत उतरुन जीव धोक्यात घालून मदतकार्य करणा-या यशवंती हायकर्स ग्रुपच्या गिर्यारोहकांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘कास’वर पर्यटकांची गर्दी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

कास पठार पर्यटकांना खुले करून अद्याप आठवडाही झालेला नाही, पण पर्यटकांनी मोठ्या संख्येने येथे हजेरी लावण्यास सुरुवात केली आहे. पठारावर सध्या काही लहान ऑर्किड आणि रानफुले फुलली असून सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात संपूर्ण कास फुलेले पाहायला मिळणार आहे. पाऊस कमी असला, तरी पठार चांगले फुलेल, असा अंदाज वन विभागाने व्यक्त केला आहे.

जैववैविध्याने समृद्ध अन् पश्चिम घाटाच्या निसर्गसौंदर्यातील कोंदण ठरलेल्या कास पठाराला 'वर्ल्ड हेरिटेज साइट'चा दर्जा मिळाल्यापासून पर्यटकांची संख्या दरवर्षी वाढते आहे. गेल्या वर्षी ऑगस्ट ते ऑक्टोबर या काळात पावणे दोन लाख पर्यटकांनी भेट दिली होती. या वर्षी ही संख्या दोन लाखाचा आकडा ओलांडणार असल्याचे गावकरी सांगताहेत.

कास पठार साधारणतः ऑगस्टच्या दुसऱ्या आठवड्यापासून फुलायला सुरुवात होते आणि ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत पठारावर रंगबिंरगी दुर्मिळ फुलांचे ताटवे पसरलेले असतात. सध्या ते लोकप्रिय ठिकाण झाल्याने यंदा ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यापासूनच पर्यटकांच्या सहली सुरू झाल्या आहेत.

'यंदा पर्यटकांचा ट्रेंड बघून आम्ही सात ऑगस्टपासून शुल्क आकारणीस सुरुवात केली आहे. शनिवारी आणि रविवारीच पर्यटकांची गर्दी जास्त असते. गेल्या आठवड्यात पर्यटकांचे प्रमाण उल्लेखनीय होते. अवघ्या दोन दिवसांत ३५ हजार रुपयांचे शुल्क समितीकडे गोळा झाले,' अशी माहिती वन विभागाचे सहाय्यक वनसंरक्षक महादेव मोहिते यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

'पुरंदरे यांना महाराष्ट्र भूषण देऊ नका!: नेमाडे

$
0
0

मटा ऑनलाइन वृत्त । पुणे

शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या 'महाराष्ट्र भूषण'ला विरोध करणाऱ्यांची यादी वाढतच चालली असून आता त्यात 'ज्ञानपीठ' विजेते ज्येष्ठ साहित्यिक भालचंद्र नेमाडे यांची भर पडली आहे. 'बाबासाहेबांनी शिवाजी महाराजांचं केलेलं चित्रण इतिहासाला धरून नाही. त्यामुळं त्यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार देण्यात येऊ नये,' असं स्पष्ट मत नेमाडे यांनी व्यक्त केलं आहे.

'बाबासाहेबांच्या निष्ठेविषयी अजिबात शंका घेता येणार नाही. त्यांच्याविषयी आम्हाला नितांत आदर आहे. मात्र, शिवाजी महाराजांबद्दलची आमच्या मनात असलेली प्रतिमा वेगळी आहे. बाबासाहेबांचं शिवरायांविषयीचं लेखन आमच्या आकलनात बसत नाही,' असं नेमाडे यांनी म्हटलं आहे.

नेमाडे यांच्याबरोबच साहित्यिक व सामाजिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी बाबासाहेबांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार देण्यास विरोध दर्शवला आहे. त्यात डॉ. नागनाथ कोतापल्ले, विद्या बाळ, मुक्ता दाभोलकर, मेघा पानसरे आदींचा समावेश आहे. या मान्यवरांनी यासंदर्भातील एक निवदेनच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिलं आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


किमया कृष्ण-धवल रंगांची

$
0
0

पुणे टाइम्स टीम

फॅशनची हौस असलेला माणूस जसे सतत कपडे बदलेल, तशा माझ्या कल्पना बदलत असतात. त्यातूनच चित्रं निर्माण होत जात असल्याचं बऱ्हान नगरवाला सांगतो. कोरेगाव पार्कमधील नॉर्थ मेन रोडवरील लेन नं. ५ इथल्या मलाका स्पाइसमध्ये बऱ्हानच्या चित्रांचं प्रदर्शन सध्या सुरू आहे.

कॅनव्हासवरील तैलरंगात बऱ्हाननं बुरख्याआडची स्त्री दाखवली आहे. कृष्णधवल रंगांचा उत्तम वापर असलेल्या या चित्राचं नाव 'फ्रीडम' असं आहे. 'ब्युटी इन ब्लॅक' या चित्रासाठी त्यानं काळ्या, करड्या आणि पांढऱ्या रंगांच्या पार्श्वभूमीवर लाल रंगाचा उठावदार उपयोग केला आहे. ३१ ऑगस्टपर्यंत सकाळी ११ ते रात्री ११.३० या वेळेत हे प्रदर्शन इथं सुरू राहणार आहे.

बऱ्हानला 'बॉम्बे आर्ट सोसायटी'चं सर्वोत्कृष्ट चित्राचं पारितोषिक मिळालं असून, व्यक्तिचित्रासाठी कॅम्लिन अॅवॉर्डही मिळालं आहे. पुण्यातील विविध कलादालनांतून त्याची चित्रं प्रदर्शित झाली आहेत आणि दुबई आर्ट फेअरमध्येही त्याला संधी मिळाली आहे. काळ्या-पांढऱ्या रंगांच्या चित्रांमध्ये पोपटी, हिरवा किंवा लाल रंगांचा उठावदार वापर हे त्याच्या चित्रांचं वैशिष्ट्य आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

लाडक्या भावासाठी बनवा खास राखी

$
0
0

पुणे टाइम्स टीम

राखी पौर्णिमा जवळ येतेय. विविध आकर्षक राख्यांनी बाजारपेठ सजली असून, आपल्या भाऊरायासाठी सर्वांत वेगळी राखी निवडण्याची बहिणींची लगबग सुरू झाली आहे. त्यासाठी अनेक दुकानांना चकरा मारल्या जाताहेत. मात्र, यंदाची राखी पौर्णिमा आपण स्वतः बनवलेली राखी बांधून साजरी केली तर? भावाला निश्चितच खूप आनंद होईल. त्यासाठीच 'मटा कल्चर क्लब' घेऊन आला आहे, 'राखी मेकिंग वर्कशॉप'.

ही कार्यशाळा १८ ऑगस्ट रोजी नर्मदा हॉल, भांडारकर रोड, गल्ली क्रमांक १५, टीव्हीएस शोरूम समोर या ठिकाणी दुपारी ३ वाजता होणार आहे. 'पेपर क्वीलिंग' ही कला वापरून मनोवेधक राख्या कशा बनवायच्या हे निवेदिता देशपांडे शिकवणार आहेत. यासाठी लागणारं साहित्य आयोजकांकडून देण्यात येणार आहे. सहभागी झालेल्यांनी फक्त डिंक सोबत आणायचा आहे.

कार्यशाळेत सहभागी होण्यासाठी नोंदणी आवश्यक आहे. ही कार्यशाळा सशुल्क असून, कल्चर क्लबच्या सदस्यांना शुल्कात विशेष सवलत मिळणार आहे. नोंदणीसाठी ९७६२११५८१४ या क्रमांकावर सकाळी ११ ते संध्याकाळी ६ या वेळेत संपर्क साधावा.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘श्रावणक्वीन’साठी नावनोंदणी केली?

$
0
0

पुणे टाइम्स टीम

फॅशन इंडस्ट्रीत मराठी प्रतिभा वाढते आहे. मग ते फॅशन डिझायनर म्हणून असो किंवा मॉडेल. या गर्दीत आपलं नाव कमवावं यासाठी प्रेरणा आणि व्यासपीठ देणारी एक स्पर्धा म्हणजे 'श्रावणक्वीन'. श्रावणातल्या ऊन-पावसाच्या खेळात फॅशन, सौंदर्य, बुद्ध‌िमत्ता आणि कलागुणांची किमया दाखवणाऱ्या 'महाराष्ट्र टाइम्स' आयोजित या स्पर्धेचे पडघम वाजू लागलेत. स्मार्ट तरुणींच्या प्रतीभेला वाव देणाऱ्या या स्पर्धेसाठी नावनोंदणी सुरू झाली आहे.

ही स्पर्धा 'वामन हरी पेठे'प्रस्तुत आणि 'ग्रीन लीफ'सहप्रायोजित आहे. दोन महिने आधीपासूनच तरुणींकडून या स्पर्धेबाबत विचारणा सुरू झाली होती. हा उत्साह पाहता आम्ही ऑनलाइन नावनोंदणी सुरू केली आहे. १८ ते २५ वर्षं वयोगटांतील तरुणींना यामध्ये भाग घेता येणार आहे. आपला फोटो आणि माहिती त्यांना http://www.mtshravanqueen.com या वेबसाइटवर अपलोड करायची आहे. प्राथमिक फेरीची तारीख, ठिकाण आणि वेळ लवकरच जाहीर करण्यात येईल.

काय आहे प्रक्रिया?

तुम्ही वेबसाइटवर केलेल्या नोंदणीनंतर वाचकांकडून मिळालेली मतं आणि तज्ज्ञ मंडळींचा निर्णय या आधारे 'श्रावणक्वीन' प्राथमिक फेरीसाठी तरुणींची निवड केली जाईल. या फेरीमधून अंतिम स्पर्धेसाठी निवड होणार आहे. त्यांची ग्रुमिंग सेशन्स होऊन त्यानंतर अंतिम फेरीतून 'श्रावणक्वीन'ची निवड होईल. स्पर्धेसाठी इच्छुक तरुणींनी अपलोड केलेले फोटो आणि माहिती वेबसाइटवर पाहून वाचक स्पर्धकांना मते देऊ शकतील. याबाबतच्या अधिक माहितीसाठी वाचत राहा 'महाराष्ट्र टाइम्स'.

असं करा प्रोफाइल अपलोड

वेबसाइटच्या होम पेजवर 'Participate now' या लिंकवर क्लिक केल्यास 'श्रावणक्वीन' स्पर्धेचा फॉर्म येईल. तो भरून तुमचे फोटो अपलोड करा आणि फॉर्म सबमिट करा.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विद्यार्थ्यांसाठी रेनकोट खरेदीचा हट्ट

$
0
0

स्थायी समितीच्या बैठकीत प्रस्तावावर आज होणार चर्चा

म. टा. प्रतिनिधी, पुणे

पुण्यासह राज्यातील अनेक शहरांमध्ये पावसाने दडी मारल्याने गंभीर स्थिती निर्माण झाली असली, तरी शिक्षणमंडळातील शाळांमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी रेनकोट खरेदीचा हट्ट धरला जात आहे. पालिकेतील एका माननीयाने हा हट्ट धरला असून रेनकोट खरेदीला पालिका प्रशासनाने सकारात्मक अभिप्राय द्यावा, यासाठी या माननीयांनी जोरदार प्रयत्न देखील केले आहेत‌.

शिक्षणमंडळाच्या शाळांमधील विद्यार्थ्यांना पावसाचे गणवेश द्यावेत. यासाठी स्थायी समितीने आवश्यक तो निधी उपलब्ध करून देण्याचा प्रस्ताव स्थायी समितीसमोर मांडण्यात आला आहे. शाळा सुरू होऊन दोन महिने उलटून गेले आहेत. असे असतानाही शाळांमधील ३५ ते ४० टक्के विद्यार्थ्यांना अद्यापही गणवेश, तसेच शैक्षणिक साहित्य मिळालेले नाही. या सर्व विद्यार्थ्यांना शाळेचे गणवेश मिळविण्यासाठी अजून महिभर वाट पहावी लागणार आहे. विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या गणवेशाचा गोंधळ सुरू असतानाच विद्यार्थ्यांसाठी रेनकोट खरेदीचा घाट घातला जात आहे. दोन आठवड्यापूर्वी स्थायी समितीच्या बैठकीत याचा प्रस्ताव मांडण्यात आला होता. मात्र, समितीने प्रशासनाकडे अभिप्रायासाठी हा विषय पाठविला आहे.

स्थायी समितीच्या सोमवारी (१७ ऑगस्ट) होणाऱ्या बैठकीत हा विषय चर्चेला येणार आहे. रेनकोट खरेदीसाठी तब्बल १ कोटी रूपये खर्च अपेक्षित असून यासाठी पालिकेतील एक माननीय विशेष आग्रही आहेत. रेनकोट पुरविण्याचे काम करणारा एक ठेकेदार या माननीयांशी संबधित असल्याने त्याला फायदा व्हावा, यासाठी ही खरेदी करण्याचा घाट घातला जात असल्याचा आरोप केला जात आहे. या खरेदीला समितीने मंजुरी दिल्यास पावसाळ्यात आवश्यक असलेले रेनकोट हिवाळ्यात मिळण्याची भीती व्यक्त केली जात आहे. प्रशासनाने या रेनकोट खरेदीला सकारात्मक अभिप्राय द्यावा, साठी या माननीयाने सर्वच ठिकाणी विशेष लक्ष घातले असल्याचा आरोप केला जात आहे. त्यामुळे या प्रस्तावावर प्रशासन नक्की काय अभिप्राय देते, तसेच स्थायी समि‌ती त्यावर नक्की कोणता निर्णय घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

प्रक्रियेविरोधातील संपाची दखल घ्यावी

$
0
0

एफटीआयआयचे माजी अध्यक्ष सईद अख्तर मिर्झा यांची भूमिका

म. टा. प्रतिनिधी, पुणे

फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट इंडियामध्ये (एफटीआयआय) सुरू असलेल्या विद्यार्थ्यांच्या संपाला नियामक मंडळाचे मावळते अध्यक्ष व ज्येष्ठ दिग्दर्शक सईद अख्तर मिर्झा यांनीही पाठिंबा दिला. 'विद्यार्थ्यांचा संप व्यक्तीविरोधात नाही, तर प्रक्रियेविरोधात असल्याने महत्त्वाचा आहे,' अशी स्पष्ट भूमिका अख्तर यांनी पाठिंबा देताना रविवारी मांडली.

सईद यांनी संस्थेतील संपकरी विद्यार्थ्यांची भेट घेऊन त्यांना पाठिंबा दिला, तसेच त्यांच्याशी संवादही साधला. नियामक मंडळाच्या अध्यक्षपदाचे महत्त्व त्यांनी विद्यार्थ्यांना सांगितले. ज्येष्ठ दिग्दर्शक श्याम बेनेगल यांनी नियामक मंडळाचे अध्यक्ष केवळ मानाचे असल्याचे मत मांडले होते. मात्र, अख्तर यांनी मानापेक्षाही हे पद शैक्षणिकदृष्ट्या महत्त्वाचे असल्याचे स्पष्ट केले.

शिक्षण क्षेत्रात हस्तक्षेप करण्याचे प्रकार केवळ भारतात नाही, तर जगभरात होत आहेत. एफटीआयआय ही केवळ शैक्षणिक संस्था नाही. संप करण्यात विद्यार्थ्यांना आनंद होत नाही. ६६ दिवस संप करणे हे काही सोपे काम नाही. केंद्र सरकारने एफटीआयआयला 'सेंटर ऑफ एक्सलन्स'चा दर्जा देण्याची घोषणा केलेली असताना, संबंधित सदस्यांची निवड योग्य कशी, मंडळाची पुनर्रचना करणाऱ्यांची पात्रता काय, असे प्रश्नही त्यांनी उपस्थित केले.

मिर्झ, सिगारेट आणि माध्यमे...

एफटीआयआयमधील 'मोकळ्या' वातावरणाची आणि विद्यार्थ्यांबाबत पोलिसांकडे केल्या जाणाऱ्या तक्रारींची कायमच चर्चा होत आहे. विद्यार्थ्यांशी संवाद साधण्यासाठी संस्थेतील सभागृहात आल्यानंतर सईद मिर्झा यांनी नकळत सिगारेट काढली. ती शिलगाविण्याची तयारीदेखील सुरू केली. विद्यार्थ्यांनी धूर बाहेर जाण्यासाठी दारे-खिडक्यादेखील खुल्या केल्या. तेवढ्याच, माध्यमांचे प्रतिनिधी उपस्थित असल्याची जाणीव त्यांना झाली. त्यानंतर त्यांनी सिगारेटसह बैठकीतही ब्रेक घेतला. काही कालावधीनंतर झालेल्या बैठकीत मात्र माध्यमांना उपस्थित राहण्याची परवानगी नव्हती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images