Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

बाप्पा निघाले परदेशी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

अधिक मास संपत आल्याने आता व्रतवैकल्यांचा श्रावण महिना आणि त्यानंतरच्या गणपती बाप्पांच्या आगमनाची चाहूल लागली आहे. परदेशात स्थिरावलेल्या मराठीजनांच्या गणेशोत्सवासाठी गणेशमूर्ती पाठवण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. दगडूशेठ हलवाई गणपती आणि लालबागचा राजा या मूर्तींना परदेशात मागणी आहे.गेल्या काही वर्षांमध्ये सातासमुद्रापार मोठ्या संख्येने मराठीजन नोकरी व्यवसायाच्या निमित्ताने वास्तव्यास आहेत. त्यामुळे परदेशांमध्येही गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. परदेशात गणेशमूर्ती मिळत नसल्याने भारतातूनच त्या मागवाव्या लागतात. मात्र, प्रत्येक देशाचे नियम वेगळे असल्याने गणेशमूर्ती पाठविण्याची प्रक्रिया मे महिन्यापासून सुरू करावी लागते. कुरिअर सेवेमुळे मूर्ती पाठविण्याची प्रक्रिया सोपी झाली आहे. 'नटराज आर्ट्स'चे लालासाहेब देशमुख यांनी परदेशी पाठवल्या जाणाऱ्या गणेशमूर्तीबाबतची माहिती दिली. 'परदेशांमध्ये गणेशमूर्तींची मागणी वाढत आहे. यंदा बाराशेहून अधिक मूर्ती निर्यात केल्या आहेत. परदेशात फॅन्सी मूर्तींपेक्षा सर्वांगसुंदर व सात्त्विक मूर्तींना जास्त मागणी असते,' असे त्यांनी सांगितले.

व्हॉट्सअॅपवरून मागणी

गणेशमूर्तीसाठी अमेरिका, कॅनडा, मॉरिशस, हॉलंड, ब्रिटन आदी देशांमधून गणेशमूर्तींना मोठी मागणी आहे. आपल्याला कशी मूर्ती हवी याचा तपशील मूर्तिकारांना व्हॉट्सअॅपवरून पाठवण्यात येतो. त्याबरहुकुम तयार केलेल्या मूर्तीचे फोटो शेअर केले जातात. त्यानंतर मूर्ती परदेशी पाठवण्यात येते. लंडनमधील हिंदू हेरिटेज अँट कल्चरल सोसायटीने यंदा ४५० मूर्ती मागवल्या होत्या, असे त्यांनी स्पष्ट केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


आरोग्य कर्मचारी विनावेतन

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

पुणे स्टेशन येथील मध्यवर्ती इमारतीतील आरोग्य विभागाच्या स्थलांतरास विरोध करणाऱ्या पन्नासहून अधिक कर्मचाऱ्यांना महिनाभर विनावेतन राहण्याची शिक्षा सुनावण्यात आली आहे. त्यामुळे त्यांना अद्याप जुलै महिन्याचा पगार मिळालेला नाही.

पुणे स्टेशन येथील मध्यवर्ती इमारतीतील आरोग्य विभाग विश्रांतवाडी येथे स्थलांतर करण्याचा घाट घालण्यात आला आहे. त्यासाठी आरोग्य विभागाचे अधिकारी एकीकडे आणि कर्मचारी एकीकडे अशी स्थिती झाली आहे. या बाबत आरोग्य खात्यातील कर्मचाऱ्यांच्या संघटनांनी उडी घेतली होती. आंदोलने, मोर्चे काढले. प्रसंगी घंटानादही करण्यात आला. तरीही वादावर अद्याप तोडगा काढण्यात आलेला नाही. मध्यवर्ती इमारतीतील कर्मचाऱ्यांनी विश्रांतवाडी येथे स्थलांतर करावे, तसेच नव्या जागेत रूजू होण्याचे आदेशही देण्यात आले होते. मात्र, कर्मचाऱ्यांनी सातत्याने आदेशाला विरोध करून मध्यवर्ती इमारतीतूनच कामकाज करण्यास सुरुवात केली.

कर्मचारी आपल्याच मतावर ठाम असल्याचे लक्षात आल्याने वरिष्ठांच्या सूचनेनुसार मध्यवर्ती इमारतीच्या कार्यालयातील बायोमेट्रिक मशिनही काढण्यात आले. त्यामुळे कर्मचारी कामावर येऊन सायंकाळपर्यंत काम करीत होते. ऑगस्टच्या एक तारखेला सर्व कर्मचाऱ्यांचा पगार झाला. मात्र, मध्यवर्ती इमारतीतील आरोग्य सेवा कार्यालयातील आंदोलने करणाऱ्या सुमारे पन्नासहून अधिक कर्मचाऱ्यांचे वेतनच काढण्यात आले नसल्याचे सोमवारी स्पष्ट झाले. या प्रकारामुळे कर्मचाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

'मध्यवर्तीत काहीच अडचण नाही'

आंदोलनाच्या मुद्यांवरून तोडगा निघत नसल्याने काही दिवसांपूर्वी आरोग्य संचालक डॉ. सतीश पवार यांची संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी मुंबईत जाऊन भेट घेतली. त्यावेळी मध्यवर्ती इमारतीत सर्व आरोग्य कर्मचाऱ्यांनी बसत असतील, तर आपली काहीच हरकत नाही. मात्र, जागेची उपलब्धता तपासावी लागेल, असे आरोग्य संचालकांनी सांगितले. पुण्यातील प्रमुख अधिकाऱ्यांच्या अखत्यारीत सर्व कार्यालये असावीत अशी आपली अपेक्षा असल्याचे त्यांनी सांगितले.

आरोग्य खात्यातील सुमारे तीस आंदोलक कर्मचाऱ्यांचे पगार आरोग्य संचालकांच्या आदेशानुसार रोखण्यात आले आहेत. त्यांच्या वेतनाबाबत लवकरच मार्ग काढण्यात येईल.

- डॉ. कांचन जगताप, सहसंचालक, आरोग्य सेवा

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

संगीत माझा वीक पॉइंटः नाना

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

'संगीत हा माझा वीक पॉइंट आहे. मला त्यातील बारकावे कळत नाहीत; पण मी त्यात खूप रमतो. रशीद खानचा मी मोठा चाहता आहे. त्याला कधीही फोन करावा आणि त्याने माझ्यासाठी गाणे गावे. त्याच्यासारखे महान कलाकार आपल्याला लाभले हे आपले नशीबच म्हणावे लागेल...' प्रसिद्ध अभिनेते नाना पाटेकर बोलत होते आणि सगळे प्रेक्षक कान देऊन ऐकत होते. त्यांच्या बोलण्यातील एकही शब्द आपल्या ऐकण्यातून सुटू नये याची दक्षता घेऊन प्रेक्षकांच्या नजरा केवळ त्यांच्याकडेच रोखल्या गेल्या होत्या! त्याच्या प्रत्येक वाक्याला आणि विनोदाला प्रेक्षकांची मनमुराद दाद मिळत होती. निमित्त होते, गायिका मंजूषा पाटील आणि संगीतकार अशोक पत्की यांच्या 'मोहे रंग दे' या म्युझिक अल्बमचे. नानाने या कार्यक्रमाला जणू एका कौटुंबिक सोहळ्याचेच रूप दिले होते.

या वेळी अशोक पत्की, तबला वादक पंडित विजय घाटे, विजय पुसाळकर आदी उपस्थित होते. सीडीच्या प्रकाशनानंतर पाटील यांनी अल्बममधील 'मोहे रंग दे' आणि 'लम्हा लम्हा' ही गाणी सादर केली. नानाच्या खास आग्रहास्तव त्यांनी 'जोहार मायबाप' ही रचना सादर करून प्रेक्षकांच्या टाळ्या मिळवल्या. मैफलीला प्रसाद जोशी (तबला), सचिन जांभेकर (हार्मोनियम), उद्धव कुंभार (टाळ) यांनी साथसंगत केली. 'विविध भूमिका करत गेलो; कारण प्रेक्षकांना सतत नवीन हवे असते,' असेही त्यांनी सांगितले. 'आजकाल कुणीही अल्बम काढते. मात्र, मंजूषाला काहीतरी वेगळे हवे होते आणि तिने ते या अल्बममधून ते आपले वेगळेपण साध्य केले आहे,' असे पत्की म्हणाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अबुधाबीला आता विवाह पर्यटन सुरू

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

भारतीय पर्यटकांमध्ये लोकप्रिय ठरलेल्या अबुधाबीला आता 'वेडिंग डेस्टिनेशन' अशी नवीन ओळख मिळाली आहे. एकीकडे पर्यटकांची संख्या वाढत असतानाच भारतीय नागरिकांनी अबुधाबीला उत्तम वेडिंग डेस्टिनेशनचा पर्याय म्हणून निवडले आहे. गेल्या वर्षभरात तेथे १४ भारतीय विवाह उत्साहात साजरे झाले आहेत.

काही वर्षांपूर्वी दुबईमध्ये पर्यटनाला येणारे पर्यटक एक दिवसाची सहल म्हणून अबुधाबीला भेट द्यायचे. मात्र गेल्या काही वर्षात आम्ही तेथील पायाभूत सुविधा आणि हॉटेल्स यांचे उत्तम नेटवर्क तयार केले आहे. त्यामुळे पर्यटक आता चार दिवसांचे पॅकेज घेत आहेत.अबुधाबीमध्ये येणाऱ्या पर्यटकांचा सर्वाधिक वाटा आहे. गेल्या जानेवारी ते मे या काळात आमच्याकडे एक लाख पाच हजार ३० पर्यटकांनी पाहुणचार घेतला असून गेल्या वर्षाच्या तुलनेत यात १७ टकक्यांनी वाढ झाली आहे, अशी माहिती 'अबुधाबी टुरिझम अँड कल्चरल अॅथॉरिटी'चे भारतातील व्यवस्थापक बेजन दिनशॉ यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली. भारतीय पर्यटक आमच्यासाठी सर्वांत महत्त्वाचे असून, त्यांच्यासाठी भारताच्या विविध भागांत सध्या आम्ही रोड शो आयोजित केले आहेत. पुण्यातील पर्यटकांचा वाढता प्रतिसाद पाहून सुरू केलेल्या पुणे ते अबुधाबी या जेट एअरवेजच्या विमानसेवेलाही उत्तम प्रतिसाद मिळतो आहे.

अबु धाबी हे गोल्फिंग, क्रूझ, वाळवंट सफारी, वन्यजीव आणि सागरी प्रवासातील रोमांचक अनुभव देणारे सुट्टीचे एक परिपूर्ण स्थान आहे. मनोरंजन पर्याय, महत्त्वपूर्ण इमारती, गुणधर्म, संस्कृती, परंपरा आणि साहसी खेळ अशा वैविध्यापूर्ण सर्व वयोगटातील नागरिक आमच्या सहलीसाठी येतात. याशिवाय गेल्या काही वर्षात विवाहसोहळा आणि हनिमूनसाठी अबुधाबीला पसंती मिळते आहे. गेल्या वर्षात १४ भारतीय विवाह तेथे साजरे झाले, असे दिनशॉ यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रिइन्शुरन्स कंपन्यांसाठीची नियमावली अंतिम टप्प्यात

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

'भारताला रिइन्शुरन्स क्षेत्राचे हब बनविण्याचे सरकारचे तसेच विमा नियामक व विकास प्राधिकरणाचे (इर्डा) उद्दिष्ट आहे. रिइन्शुरन्स कंपन्यांना भारतात व्यवसाय करण्यासाठी आवश्यक नियमावली तयार करण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे,' अशी माहिती 'इर्डा'चे वरिष्ठ सहसंचालक रणदीप सिंग जगपाल यांनी नुकतीच दिली.

नॅशनल इन्शुरन्स अॅकॅडमी व फेअरतर्फे 'द चेंजिंग ग्लोबल रिइन्शुरन्स लँडस्केप' या परिषदेत ते बोलत होते. 'रिइन्शुरन्स कंपन्यांसाठी आवश्यक नियमावली तयार करताना कायदेविषयक तरतुदींवर भर देण्यात आला आहे. किमान पाच हजार कोटी रुपये फंड असलेल्या व किमान दहा वर्षे या व्यवसायात असलेल्या आणि त्यांच्या देशातल्या नियामकांकडून मान्यता असलेल्या कंपन्यांनाच भारतात व्यवसायाची परवानगी देण्यात येईल. यासाठी कररचनाही ठरविण्यात येणार आहे. या कंपन्यांनी तज्ज्ञ मनुष्यबळ उपलब्ध करावे, तसेच भारतातील अंडररायटर्सनाही त्यांनी मार्गदर्शन करावे, अशी अट घालण्यात येणार आहे. या कंपन्यांनी मान्यता घेतल्यानंतर एक वर्षात व्यवसाय सुरू न केल्यास सहा महिन्यांची अंतिम मुदतवाढ देण्यात येईल; अन्यथा त्यांची मान्यता रद्द होईल. या कंपन्यांना क्लेमचे काम भारतातच करावे लागेल, तर अन्य कामे आउटसोर्सिंग करता येईल. रिइन्शुरन्ससाठी एसईझेडचाही प्रस्ताव आहे,' असेही त्यांनी स्पष्ट केले.

विमा व्यवसायात भारत पाचवा

'भारतातील जीवन विमा व्यवसाय सध्या ७० अब्ज अमेरिकी डॉलर इतका आहे. यातील ५६ अब्ज डॉलर हा लाइफ इन्शुरन्सचा तर १४ अब्ज डॉलर हा अन्य स्वरूपाच्या इन्शुरन्सचा भाग आहे. लाइफ इन्शुरन्स क्षेत्रात भारत जगात आठव्या, तर अन्य इन्शुरन्सच्या बाबतीत भारत जगात विसाव्या क्रमांकावर आहे. २०२० पर्यंत भारत लाइफ इन्शुरन्समध्ये जगात पाचव्या, तर अन्य इन्शुरन्सच्या बाबतीत जगात १५ व्या क्रमांकाचा देश असावा, हे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे,' असे जनरल इन्शुरन्स कॉर्पोरेशनच्या सरव्यवस्थापक अॅलिस जी. वैद्यन यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘रिइन्शुरन्स‘ला भारतात संधी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

'भारतीय अर्थव्यवस्थेला पुन्हा चालना मिळाली आहे. सरकारने पहिल्यांदाच इन्शुरन्स क्षेत्राला मोठे महत्त्व दिले आहे. त्यातून रिइन्शुरन्स व्यवसायासाठी भारतात मोठी संधी आहे. भारतात रिइन्शुरन्स कंपन्या स्थिरावल्यानंतर रिइन्शुरन्ससाठी देशाबाहेर जाणारा पैसा वाचून भारताची परकी चलनाची मोठ्या प्रमाणावर बचत होणार आहे,' अशी माहिती जनरल इन्शुरन्स कंपनीचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक ए. के. रॉय यांनी नुकतीच दिली.

नॅशनल इन्शुरन्स अॅकॅडमी व फेअरतर्फे 'द चेंजिंग ग्लोबल रिइन्शुरन्स लँडस्केप' या विषयावर आयोजित परिषदेचे उद् घाटन जनरल इन्शुरन्स कॉर्पोरेशनचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक ए. के. रॉय यांच्या हस्ते झाले. फेडरेशन ऑफ अॅफ्रो-एशियन इन्शुरर्स अँड रिइन्शुरर्सचे (फेअर) सरचिटणीस डॉ. अदेल मौनीर, जनरल इन्शुरन्स कौन्सिलचे आर. चंद्रशेखरन, एनआयएचे संचालक सुशोभन सरकार या वेळी उपस्थित होते.

'नव्या इन्शुरन्स कायद्यानुसार रिइन्शुरन्स कंपन्यांना भारतात व्यवसाय करण्यास परवानगी देण्यात आली आहे. हा स्वागतार्ह निर्णय आहे. रिइन्शुरन्स व्यवसायातून चांगला नफा मिळण्याची शक्यता असल्याने या कंपन्यांसाठी मोठ्या प्रमाणावर भांडवल येत आहे. त्याचा परिणाम रिइन्शुरन्स प्रिमियम कमी होण्यात होत आहे. परंतु, या क्षेत्रात नवनवी आणि मोठी आव्हाने समोर येत आहेत. या समस्यांवर तोडगा काढणेही आवश्यक आहे. केंद्र सरकार पहिल्यांदाच इन्शुरन्स क्षेत्राला प्राधान्य देत असून सरकारी विमा योजनांमुळे कंपन्यांना मोठा ग्राहकवर्ग मिळाला आहे. कंपन्यांनी या ग्राहकांकडे विशेष लक्ष देणे आवश्यक आहे,' असेही रॉय यांनी सांगितले.

'रिइन्शुरन्स क्षेत्रात भारतात मोठी संधी आहे. इन्शुरन्स कंपन्यांची आर्थिक बाजू मजबूत असली, तरी नैसर्गिक आपत्तीसारख्या घटना कंपनीच्या परिस्थितीवर प्रतिकूल परिणाम करू शकतात. रिइन्शुरन्स क्षेत्रासाठी देशात तांत्रिक पार्श्वभूमी असलेल्या तज्ज्ञ मनुष्यबळाची आवश्यकता आहे,' असे चंद्रशेखरन यांनी सांगितले.

'इन्शुरन्स कंपन्यांना धोका व्यवस्थापनासाठी रिइन्शुरन्स महत्त्वाचा आहे. त्यासाठी संबंधित विषयांवर व्यापक विचारमंथन घडविण्यासाठी या परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे,' असे सरकार यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दप्तराचे ओझे ७५ टक्क्यांनी कमी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

पुस्तकांच्या विभाजनाद्वारे शाळकरी विद्यार्थ्यांचे दप्तराचे ओझे जवळपास ७५ टक्क्यांनी कमी होऊ शकते, हे पुण्यातील वैशंपायन कुलपरिवाराने सप्रयोग दाखवून दिले आहे. या प्रयोगाची राज्यभरात सरकारी पातळीवरून अंमलबजावणी झाल्यास, राज्यातील सर्वच विद्यार्थ्यांना त्याचा लाभ होणे शक्य असल्याचा दावाही परिवाराने केला आहे. परिवाराने पुण्यातील पुणे विद्यार्थी गृहाच्या शाळेतील सहावीच्या विद्यार्थ्यांसाठी हा प्रयोग नुकताच राबविला. त्यातून समोर आलेले निष्कर्ष परिवाराने 'मटा'शी शेअर केले. शाळेतील सहावीच्या विद्यार्थ्यांच्या सात पुस्तकांची चार गटांमध्ये विभागणी करून, त्या आधारे पाठ्यपुस्तकांचे रोजचे ओझे ७५ टक्क्यांनी कमी करून परिवाराने ही कामगिरी साध्य केली आहे.

कुलपरिवाराचे अध्यक्ष सुधीर वैशंपायन यांनी या प्रयोगाची माहिती दिली. परिवारातील सदस्य सुहास यशवंत यांनी या प्रयोगाची कल्पना मांडली होती. त्यानुसार सातवीच्या विद्यार्थ्यांची सर्व पुस्तकांची चार भागांमध्ये विभागणी करण्यात आली. साधारण दर तीन महिन्यांचा अभ्यासक्रम एका भागामध्ये, अशी या चार भागांची रचना आहे. एका भागात सातही विषयांच्या पाठांचा समावेश करण्यात आला. पुढील भागात जाणाऱ्या पानाची फोटोकॉपी करून, हे भाग पूर्ण करण्यात आले. गणितासारख्या विषयातील उदाहरणसंग्रहांच्या उत्तरांचा भागही त्या त्या भागामध्येच समाविष्ट करण्यात आला.

यातूनच या चार परिपूर्ण अशा भागांमधून सहावीच्या सातही विषयांचा अभ्यासक्रम एकत्र झाल्याचे वैशंपायन यांनी नमूद केले. कुलपरिवाराने प्रायोगिक तत्त्वावर एका शाळेसोबत केलेल्या कामातून हे साध्य झाले आहे. इतर शाळांनाही अशी मदत हवी असल्यास, परिवार त्याविषयीचे मार्गदर्शन करण्यास तयार आहे. सरकारी पातळीवरूनही अशाच धोरणांचा पाठपुरावा झाला तर राज्यातील विद्यार्थ्यांना त्याचा लाभ होणे शक्य असल्याचेही वैशंपायन यांनी सांगितले.

'विद्यार्थ्यांना सुरुवातीला सर्व विषयांच्या पुस्तकांचे एकूण ९६० ग्रॅम वजन दप्तरात वाहून आणावे लागत होते. आता चार भागांपैकी एकच भाग दप्तरात आणावा लागत आहे. या चार भागांमधील प्रत्येक भागाचे सरासरी वजन हे २५० ग्रॅम भरते. म्हणजेच, विद्यार्थ्यांच्या दप्तरामधील पुस्तकांचा भार ७५ टक्के कमी झाला आहे.

- सुधीर वैशंपायन, अध्यक्ष, वैशंपायन कुलपरिवार

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

राज्यातील शालाबाह्य विद्यार्थी वाढले!

$
0
0

योगेश बोराटे, पुणे

शालेय पोषणापासून सर्वशिक्षा अभियानासारखे कितीही उपक्रम राबविले, तरी २००९ नंतर राज्यातील शालाबाह्य विद्यार्थ्यांच्या संख्येत वाढच झाली आहे, असा निष्कर्ष 'असर'च्या अहवालात मांडण्यात आला आहे. परिणामी, राज्यात नुकतीच घेण्यात आलेली शालाबाह्य विद्यार्थ्यांनी गणनादेखील फसवी असल्याचे स्पष्ट होत आहे. शालाबाह्य विद्यार्थ्यांच्या टक्केवारीत २००६ च्या तुलनेत मात्र ६० टक्क्यांची घट आहे, असेही 'असर'चा अहवाल सांगतो.

राज्यात शिक्षण खात्याच्या माध्यमातून नुकतीच शालाबाह्य विद्यार्थ्यांची राज्य पातळीवरील मोजणी करण्यात आली. या मोजणीमध्ये अत्यल्प शालाबाह्य बालके आढळून आल्याने हे सर्वेक्षण वादाच्या भोवऱ्यात सापडले होते. अखेर हे सर्वेक्षण एकदाच संपणार नसून, ते या पुढील काळात सुरूच राहणार असल्याची बाब राज्याचे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी जाहीर केली. त्यानंतरच या सर्वेक्षणाच्या वादावर पडदा पडला होता. त्या पार्श्वभूमीवर 'प्रथम' या स्वयंसेवी संस्थेच्या माध्यमातून केल्या जाणाऱ्या असर या राष्ट्रीय पातळीवरील सर्वेक्षणातून राज्यातील शालाबाह्य बालकांची समोर आलेली आकडेवारी विचार करायला लावणारी ठरली आहे.

'असर'च्या गेल्या आठ वर्षांमधील सर्वेक्षणांचा तुलनात्मक अभ्यास नुकताच प्रकाशित झाला. राज्यातील शालाबाह्य बालकांचे प्रमाण गेल्या आठ वर्षांमध्ये टप्प्याटप्प्याने कमी होत चालल्याने या अभ्यासातून दिसून आले आहे. त्याच वेळी २००९ नंतरच्या पाच वर्षांमध्ये मात्र ते वाढल्याचे स्पष्ट झाले आहे. एकूण विद्यार्थी संख्येच्या तुलनेत जवळपास एक टक्के असणारे हे प्रमाण कधीही एक टक्क्याहून खाली गेले नसल्याचेही या अभ्यासातून स्पष्ट झाले आहे. शालाबाह्य मुले आणि शालाबाह्य मुलींचे प्रमाणही २००९ नंतरच्या टप्प्यावर वाढत चालल्याचे या अभ्यासातून अधोरेखित झाले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


कुरिअर बॉयकडील टॅब पळविला

$
0
0

पुणेः कुरिअर कंपनीच्या डिलिव्हरी बॉयला मारहाण करून त्याच्याकडील टॅबलेट हिसकावून पळ काढल्याचा प्रकार कात्रज येथे घडला. या प्रकरणी भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रशांत नगरकर (वय २९, रा. महर्षीनगर) यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. या प्रकरणी रोहित गायकवाड याच्याविरुद्ध जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नगरकर एका कुरिअर कंपनीत नोकरी करतात. आरोपीने वेबसाइटवरून टॅबलेट खरेदी केला होता. डिलिव्हरीनंतर पैसे देण्यात येणार होते. नगरकर यांनी आरोपीला फोन करून डिलिव्हरी देण्याबाबत चर्चा केली होती. त्यानुसार कात्रज येथे डिलिव्हरी देण्यासाठी ते गेले असताना ​आरोपी टॅब घेऊन पसार झाला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पुण्याने दिले मुंबईला हृदय

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

जागतिक अवयवदान सप्ताह काही दिवसांवर येऊन ठेपला असताना 'ब्रेन डेड' पेशंटचे हृदय मुंबईतील २२ वर्षीय युवकाला देण्याचा अनोखा प्रयोग सोमवारी घडून आला. 'ग्रीन कॉरिडॉअर'च्या माध्यमातून जहांगीर हॉस्पिटल ते लोहगाव विमानतळादरम्यान सात मिनिटांत हृदय पोहोचविण्यात आले. तेथून विमानाद्वारे मुंबईतील फोर्टीस हॉस्पिटलच्या ऑपरेशन थिएटरपर्यंत अवघ्या सव्वा तासात हृदय पोहोचले. त्यामुळे पश्चिम भारतातील पहिले हार्ट ट्रान्सप्लांट यशस्वी करण्यात पुणेकरांनी बाजी मारली.

काही दिवसांपूर्वीच ब्रेनडेड महिलेचे अवयव दिल्लीतील पेशंटना पाठविण्यासाठी वाहतूक पोलिसांनी ग्रीन कॉरिडॉर तयार केले. त्याद्वारे आठ मिनिटांत किडनीसह काही अवयव विमानतळावर पोहोचविण्यात यश आले. हा अनुभव ताजा असतानाच जहांगीर हॉस्पिटलमध्ये अशीच घटना घडली.

जहांगीर हॉस्पिटलमध्ये ४२ वर्षीय पंजाबी महिला 'ब्रेनडेड' झाल्याचे निदान रविवारी झाले. त्यावेळी महिलेच्या कुटुंबीयांनी अवयव दान करण्याची इच्छा बोलून दाखविली. हॉस्पिटलच्या अवयव प्रत्यारोपण समन्वयक वृंदा पुसाळकर यांनी प्रादेशिक प्रत्यारोपण समितीशी संपर्क साधला. त्यावेळी पुण्यात हृदयासाठी प्रतीक्षा यादी नसल्याचे समोर आले. त्यामुळे मुंबईतील फोर्टिस हॉस्पिटलशी संपर्क साधण्यात आला. तेथे एक पेशंट हृदयाच्या प्रतीक्षेत असल्याचे समजले. त्यानंतर हार्ट ट्रान्सप्लांट करण्याची तयारी सुरु झाली, अशी माहिती जहांगीर हॉस्पिटलच्या वैद्यकीय संचालक डॉ. मनीषा बोबडे यांनी दिली.

त्यानंतर 'फोर्टिस'चे तज्ज्ञांचे एक पथक रवाना झाले. सोमवारी दुपारी एक वाजता हृदय काढण्याची (रिट्रायव्ह) प्रक्रिया सुरू झाली. हृदय काढल्यानंतर चार तासांच्या आत ट्रान्सप्लांट करणे आवश्यक असते. हृदय काढल्यानंतर वेगळ्या 'परफ्युजन सोल्युशन' असलेल्या बॉक्समध्य़े अत्यंत सावधतेने ऑपरेशन थिएटर ते अॅम्बुसन्सपर्यंत नेण्यात आले. ग्रीन कॉरिडॉअरच्या माध्यमातून जहांगीर हॉस्पिटलच्या ऑपरेशन थिएटरपासून विमानतळापर्यंत अवघ्या सात मिनिटांत हृदय पोहोचविण्यात आले.

मुंबईत चार वाजण्याच्या सुमारास हार्ट ट्रान्सप्लांटचे ऑपरेशन सुरू झाले. मुंबई विमानतळापासून ते फोर्टिस हॉस्पिटलपर्यंत पुण्यासारखेच ग्रीन कॉरिडॉर करण्यात आल्याने वेळेत हृदय पोहोचणे शक्य झाले. त्यामुळे पुण्यात देखील हार्ट ट्रान्सप्लांट करणे शक्य आहे, अशी प्रतिक्रिया डॉ. बोबडे यांनी दिली. मुंबईच्या त्या युवकाच्या हृदयरोगावर औषधोपचार नव्हते. त्याला हार्ट ट्रान्सप्लांट शिवाय पर्याय नव्हता. त्यामुळे त्याला हृदय देण्यात आले.

'ब्रेनडेड' पेशंटचे हृदय काढण्यासाठी हॉस्पिटलचे हार्ट ट्रान्सप्लांट सर्जन डॉ. संजीव जाधव, किडनी ट्रान्सप्लांट तज्ज्ञ डॉ. श्रीनिवास अंबिके, डॉ. नितीन गाडगीळ, डॉ. दीपक किरपेकर, डॉ. सुरेश भालेराव, आणि भूलतज्ज्ञ डॉ. चंद्रशेखर कुलकर्णी यांनी विशेष कामगिरी बजावली. पुण्याच्या प्रादेशिक प्रत्यारोपण समितीच्या समन्वयक आरती गोखले यांच्यामुळे मुंबईच्या पेशंटचे प्राण वाचले.

जबरदस्त अनुभव...!

जहांगीर हॉस्पिटलमध्ये हृदय काढण्याची शस्त्रक्रिया सोमवारी एक वाजता सुरू करण्यात आली. दहा मिनिटांत ह्दय काढण्यात आले. वाहतूक पोलिसांचे खूप सहकार्य लाभले. अक्षरशः सात मिनिटांत कोठेही अडचण न येता विमानतळापर्यंत हृदय पोहोचविणे शक्य झाले. पुणे, मुंबईसह राज्यात नव्हे तर गोवा, महाराष्ट्र, गुजरात या पश्चिम भारतात पहिल्यांदाच हार्ट ट्रान्सप्लांट झाले. देशातील अवयव प्रत्यारोपणाचे हे तंत्रज्ञान आपल्या भारतात उपलब्ध आहे. पहिले हार्ट ट्रान्सप्लांट करण्याची संधी आपल्याला मिळाली, अशी प्रतिक्रिया जहांगीर हॉस्पिटलचे हृदयप्रत्यारोपण विभागाचे प्रमुख डॉ. संजीव जाधव यांनी 'मटा'ला दिली.

मुंबईत चार वाजण्याच्या सुमारास हार्ट ट्रान्सप्लांटचे ऑपरेशन सुरू झाले. मुंबई विमानतळापासून ते फोर्टिस हॉस्पिटलपर्यंत पुण्यासारखेच ग्रीन कॉरिडॉर करण्यात आल्याने वेळेत हृदय पोहोचणे शक्य झाले. त्यामुळे पुण्यात देखील हार्ट ट्रान्सप्लांट करणे शक्य आहे.

- डॉ. मनीषा बोबडे

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

साडेचारशे कोटींची थकबाकी द्या

$
0
0

काँग्रेसची राज्य सरकारकडे मागणी

म. टा. प्रतिनिधी, पुणे

स्थानिक संस्था कर (एलबीटी) रद्द करून राज्य सरकारने पालिकांना आर्थिक आणीबाणीच्या खड्ड्यात लोटले असून, आता रस्त्यावरील खड्डे बुजविण्यासही पालिकेकडे निधीही राहणार नाही, अशी भीती काँग्रेसने सोमवारी व्यक्त केली. पालिकेचे साडेचार हजार कोटी रुपयांचे बजेट अडचणीत सापडल्याने राज्य सरकारने पालिकेची साडेचारशे कोटी रुपयांची थकबाकी तातडीने द्यावी, अशी मागणीही करण्यात आली आहे.

पालिकेला सामोऱ्या जाव्या लागणाऱ्या आर्थिक कोंडीतून मार्ग काढण्यासाठी महापौरांनी तातडीने विशेष सभा बोलवावी, असे पत्र देण्यात आल्याची माहिती उपमहापौर आबा बागूल यांनी दिली. 'पालिकेच्या बजेटमध्ये एलबीटीतून सुमारे चौदाशे कोटी रुपये मिळतील, असे गृहित धरण्यात आले होते. आत्तापर्यंत त्यातील जेमतेम ३१० कोटी रुपये प्राप्त झाले आहेत. उर्वरित एकराशे कोटी रुपयांचा तोटा पालिकेला सहन करावा लागणार आहे. त्याचा सर्वाधिक फटका विकासकामांना बसणार आहे. पालिकेच्या आर्थिक अधिकारांवर गदा आणून सरकारने स्थानिक स्वराज्य संस्था संपविण्याचा घाट घातला आहे', असा आरोप बागूल यांनी केला.

आरोग्य, पाणीपुरवठा, जेएनएनयूआरएम, शिक्षण मंडळ आणि राज्य सरकारच्या इतर विभागांकडे पालिकेची सुमारे साडेचारशे कोटी रुपयांची थकबाकी आहे. ही रक्कम तरी पालिकेला तातडीने उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी बागूल यांनी केली. पालिकेचे उत्पन्न वाढविण्यासाठी महसूल समिती स्थापन करण्यास सर्वसाधारण सभेने मंजुरी देऊनही त्यावर निर्णय घेण्यास विलंब होत आहे. त्यामुळे, ही समिती तातडीने स्थापन करावी, अशी मागणी महापौरांकडे केल्याचे बागूल यांनी स्पष्ट केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कुत्र्यांच्या त्रासाविरोधात दबाव गटाची स्थापना

$
0
0

पुणेः कुत्र्यांच्या भुंकण्यामुळे आणि त्यांच्या अस्वच्छतेमुळे त्रस्त झालेल्या नागरिकांना दिलासा देण्यासाठी पुण्यामध्ये 'पीपल अगेन्स्ट झोनोसिस्ट' हा गट स्थापन करण्यात आला आहे. मूळातच पाळीव प्राणी म्हणून मानवी जीवनात समाविष्ट करण्यात आलेल्या या प्राण्यांचा उपद्रव कमी करण्यासाठी हा गट सक्रिय राहणार आहे.

शहरामध्ये सध्या दोन लाखांहून अधिक भटकी आणि पाळीव कुत्री आहेत. यातील बहुतांश कुत्री रस्त्यावर, सार्वजनिक ठिकाणी घाण करतात. त्यांची विष्ठा नैसर्गिकरित्या नष्ट होण्यास किमान पंधरा ते अठरा महिने लागतात. विदेशी जातीच्या कुत्र्यांची विष्ठादेखील रस्त्यांच्या दुतर्फा पडलेली असते. या घाणीमुळे संसर्गजन्य आजार पसरत असून, सार्वजनिक आरोग्यास धोका निर्माण झाला आहे. शिवाय रात्री- अपरात्री नागरिकांच्या अंगावर धावून जाणाऱ्या, विनाकारण भुंकणाऱ्या कुत्र्यांमुळे ध्वनिप्रदूषणात भर पडत आहे. कबुतरांच्या विष्ठेतूनही संसर्गजन्य आजार पसरत आहेत. या पार्श्वभूमीवर प्राण्यांमुळे निर्माण झालेल्या समस्या सोडविण्यासाठी हा गट कार्यरत राहणार आहे.

मानवी जीवनात समाविष्ट झालेले कुत्र्यासारखे प्राणी प्रत्यक्षात पाळीव नसून, त्यांना प्रयत्नपूर्वक पाळीव करण्यात आले आहे. परदेशात या प्राण्यांच्या उपद्रवावर मोठ्या प्रमाणात संशोधन झाले आहे. त्यांच्या विष्ठेमुळे आरोग्यावर दुष्परिणाम झाल्याचे निष्पन्न झाले आहे. या प्राण्यांच्या समस्या गुंतांगुंतीच्या असून त्यावर मार्ग काढण्यासाठी आमचा अभ्यासगट काम करणार आहे, अशी माहिती उपक्रमाचे समन्वयक संजय बी आणि अॅड. असीम सरोदे यांनी दिली. उपक्रमात सहभागी होण्यास इच्छुकांनी ९८२२४२२९१९ अथवा ०२० २५४५९७७७ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

उर्वरित दोन महिन्यांतही पावसाची पाठ?

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

जून आणि जुलै महिन्यांत रुसलेला पाऊस उर्वरित हंगामातही पाठ फिरवणार असल्याचा हवामान विभागाचा अंदाज आहे. ऑगस्ट आणि सप्टेंबर या दोन महिन्यांत एकूण सरासरीच्या ८४ टक्के पाऊस होण्याची शक्यता सोमवारी वर्तवण्यात आली. त्यामुळे राज्यावरील दुष्काळाची छाया गडद होण्याची भीती आहे.

मान्सूनवर प्रतिकूल परिणाम करणाऱ्या एल निनो या घटकाची तीव्रता वाढल्याने, तसेच 'इंडियन ओशन डायपोल' हा सागरी पृष्ठभागाशी संबंधित घटक प्रतिकूल राहण्याचीच शक्यता असल्याने कमी पाऊस होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविला आहे. विभागाच्या अंदाजानुसार, देशात ऑगस्ट आणि सप्टेंबर या पावसाळ्याच्या दुसऱ्या टप्प्यात सरासरीच्या केवळ ८४ टक्के (±आठ टक्के) पावसाची शक्यता आहे; तसेच ऑगस्टमध्ये सरासरीच्या ९० टक्के, तर संपूर्ण मोसमात (जून ते सप्टेंबर) देशात सरासरीच्या ८८ टक्के पावसाची शक्यता आहे.

सुरुवातीला कमी असलेली 'एल निनो'ची तीव्रता आता मध्यम पातळीवर पोहोचली आहे. सुधारित अंदाजानुसार मान्सूनच्या उर्वरित काळात एल निनो प्रभावी राहण्याची शक्यता ७२ टक्के आहे. हवामान विभागाच्या 'मान्सून मिशन'अंतर्गत सध्या प्रायोगिक स्थितीत असलेल्या 'डायनामिक मॉडेल'च्या माध्यमातूनही पावसाचा अंदाज वर्तवला आहे. देशभरात ऑगस्ट व सप्टेंबर महिन्यात सरासरीच्या केवळ ७५ टक्के पाऊस होईल, असे या अंदाजात म्हटले आहे.

अंदाज बरोबर आल्याने काळजाचा ठोका चुकला

देशात यंदा सरासरीच्या ९३ टक्के पाऊस होईल, असा प्राथमिक अंदाज हवामान विभागाने वर्तवला होता. त्यानंतर सुधारित अंदाजानुसार देशात सरासरीच्या ८८ टक्के पावसाचीच शक्यता वर्तवण्यात आली होती; परंतु जून महिन्यात देशभरात सरासरीच्या १६ टक्के अधिक पावसाची नोंद झाली; मात्र जुलै महिन्यात हवामान विभागाचा अंदाज खरा ठरला. जुलै महिन्यात देशभरात सरासरीच्या ८० टक्के पावसाची नोंद झाली. त्या पार्श्वभूमीवर आता ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यातही सरासरीपेक्षा १६ टक्के कमी पावसाची शक्यता वर्तवण्यात आल्याने दुष्काळाची छाया गडद होण्याची भीती निर्माण झाली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

संयुक्त ‘स्मार्ट’पणा मुळावर?

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

केंद्र सरकारच्या 'स्मार्ट सिटी' प्रकल्पासाठी दोन महापालिकांसाठी संयुक्त प्रस्ताव पाठवण्याचे राज्य सरकारचे धोरण अंगलट येण्याची भीती व्यक्त केली जात आहे. पुणे आणि पिंपरी-चिंचवडने स्वतंत्र अहवाल सादर करूनही केवळ राज्य सरकारच्या अजब भूमिकेमुळेच या दोन्ही शहरांचे भवितव्य आता केंद्राच्या निर्णयावर अवलंबून राहणार आहे. केंद्राकडे एकूण ९८ शहरांचे प्रस्ताव आले आहेत.

स्मार्ट सिटी प्रकल्पासाठी राज्यातील दहा शहरांची नावे नुकतीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केली. त्यात इतर सर्व शहरांचा स्वतंत्र समावेश केला गेला असताना, पुणे आणि पिंपरी-चिंचवडचा समावेश मात्र एकच शहर म्हणून करण्यात आला. स्मार्ट सिटी प्रकल्पासाठी एकाच शहराची निवड केली जाईल, असे केंद्र सरकारच्या मार्गदर्शक तत्त्वांमध्ये स्पष्ट नमूद करण्यात आले आहे. तरीही पुणे आणि पिंपरी-चिंचवड अशा दोन शहरांना एकत्र करण्याचे नेमके कारण काय, हे सरकारने जाहीर केलेले नाही. त्याचा फटका, पुणे, पिंपरी-चिंचवडपैकी एका शहराला बसण्याची भीती निर्माण झाली आहे.

येत्या काही दिवसांमध्ये राज्य सरकारमार्फत पाठवण्यात आलेल्या विविध शहरांच्या प्रस्तावांची छाननी केंद्रीय नगरविकास मंत्रालयातर्फे केली जाईल. ही छाननी पूर्ण झाल्यानंतर प्रत्येक शहराला 'स्मार्ट सिटी'च्या दुसऱ्या टप्प्यात प्रकल्प आराखडा तयार करण्यासाठी केंद्रातर्फे निधी मंजूर केला जाईल. पुणे आणि पिंपरी-चिंचवडचा समावेश एकत्रित केला गेल्याने आराखडा तयार करण्यासाठीचा निधी कोणाला दिला जाणार, असा यक्षप्रश्न उभा राहणार आहे.

फक्त महाराष्ट्राचाच प्रयोग

दोन महापालिकांचा संयुक्त समावेश करण्याचा प्रयोग केवळ महाराष्ट्रातूनच झाला असल्याचे समोर आले आहे. केरळ आणि जम्मू-काश्मीर या दोन राज्यांव्यतिरिक्त इतर सर्व राज्यांनी त्यांच्या कोट्यानुसार स्मार्ट सिटी प्रकल्पासाठी शहरांची शिफारस केंद्र सरकारकडे केली आहे. कर्नाटकने हुबळी-धारवाडची शिफारस केली असली, तरी महाराष्ट्रातील सांगली-मिरज, कल्याण-डोंबिवली आदी जोडशहरांप्रमाणे तेथे एकच महापालिका आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कॉलेजांचे होणार ऑडिट

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

राज्याच्या सामाजिक न्याय व विशेष साह्य विभागाकडून दिली जाणारी स्कॉलरशिप विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचली का, कॉलेजांना त्यासाठी दिलेल्या निधीचा विनियोग कसा केला, स्कॉलरशिपसाठी पात्र विद्यार्थ्यांची एकूण संख्या व स्कॉलरशिपचे प्राप्त झालेले अर्ज याचा मेळ बसतोय का आदी गोष्टींची पडताळणी विभागातर्फे करण्यात येणार आहे.

सामाजिक न्याय विभागातर्फे राज्यातील कॉलेजांना विविध प्रकारच्या स्कॉलरशिपसाठी निधी दिला जातो. स्कॉलरशिपची प्रक्रिया ऑनलाइन होण्यापूर्वी संपूर्ण निधी हा कॉलेजच्या खात्यात जमा केला होता. त्यानंतर कॉलेजकडून विद्यार्थ्यांना स्कॉलरशिपचे वाटप केले जात होते. ऑनलाइन प्रक्रियेची अंमलबजावणी सुरू केल्यापासून स्कॉलरशिपची रक्कम थेट विद्यार्थ्यांच्या खात्यात जमा केली जाते. मात्र, विद्यार्थ्यांनी स्कॉलरशिपचा अर्ज भरतात शिक्षण शुल्क भरल्याचे नमूद केले नाही, तर स्कॉलरशिपची रक्कम कॉलेजकडे जमा केली जाते. जिल्हा पातळीवर सहायक आयुक्त कार्यालयाच्या माध्यमातून स्कॉलरशिप वाटप केली जाते. राज्यातील बहुतांश सहायक आयुक्त कार्यालयांकडे स्कॉलरशिप न मिळाल्याच्या अनेक विद्यार्थ्यांच्या तक्रारी दर वर्षीच प्राप्त होतात. या पार्श्वभूमीवर कॉलेजांचे ऑडिट करण्याचा निर्णय सामाजिक न्याय विभागाने घेतला आहे.

यामध्ये कॉलेजांना दिली जाणाऱ्या निधीचे त्यांनी काय केले, त्यांच्या बँक खात्यामध्ये विद्यार्थ्यांना वितरित न केलेली रक्कम शिल्लक आहे का, सद्यपरिस्थिती स्कॉलरशिपसाठी अर्ज करणारा विद्यार्थी, त्याच कॉलेजमध्ये शिकत आहे का आदी गोष्टींची पडताळणी केली जाणार आहे. विभागाच्या जिल्हा लेखाधिकाऱ्याच्या अध्यक्षतेखाली हे ऑडिट केले जाणार आहे, अशी माहिती समाजकल्याण संचलनालयाचे आयुक्त रणजितसिंह देओल यांनी दिली.

विद्यार्थ्यांच्या खात्यावर स्कॉलरशिप जमा करण्यास सुरुवात केल्यानंतर बहुतांश कॉलेजांनी त्यांच्या खात्यावर विद्यार्थ्यांची शिल्लक असलेली रक्कम समाजकल्याण विभागाला परत केली आहे. त्यातूनही काही कॉलेजांनी पैसे परत केले नसल्यास त्याची माहिती याद्वारे मिळेल. तसेच, अनेकदा विद्यार्थी अॅडमिशन घेतात आणि काही महिन्यातच अॅडमिशन रद्द करतात. या विद्यार्थ्यांनी स्कॉलरशिपसाठी अर्ज केला असल्यास त्यांचे अर्ज बाद ठरविले जातात. मात्र, त्यानंतरही कॉलेज त्या विद्यार्थ्यांचे अर्ज पाठवीत असतील, तर ते निदर्शनास येईल, असे देओल यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


पवार काकापुतण्याला ‘जोर का झटका’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या 'कृषिमूल शिक्षण संस्थे'ची ७३ एकर सात गुंठे जमीन धर्मादाय आयुक्तांच्या परवानगीविना माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्या विद्या प्रतिष्ठानला हस्तांतर करण्याचा प्रकार उघडकीस आला आहे. त्यामुळे विद्या प्रतिष्ठानने घेतलेली जमीन 'कृषिमूल' संस्थेला परत करावी, तसेच त्यापोटी प्रतिष्ठानने सरकारला ९६ लाख ७३ हजार रुपयांची रक्कम व्याजासह परत करण्याचे आदेश सहधर्मादाय आयुक्त शिवकुमार डिगे यांनी सोमवारी दिले.

विद्या प्रतिष्ठानने घेतलेली जमीन काढून घेण्याचे आदेश दिल्याने शरद पवार यांच्यासह अजित पवार यांना हा मोठा धक्का असल्याचे मानले जात आहे. या शिवाय जिल्हाधिकारी, महसूल तसेच वनखात्याने या जमिनीसंदर्भात घेतलेला निर्णयदेखील रद्दबातल ठरविण्यात आला आहे. कोणत्याही ट्रस्टची अथवा देवस्थानच्या मालकीची मालमत्ता परस्पर हस्तांतर, अथवा खरेदी-विक्री करण्यासाठी सहधर्मादाय आयुक्तांची परवानगी गरजेचे असल्याचा नियम आहे. माहिती अधिकार कार्यकर्ते रवींद्र बराटे यांनी या संदर्भात पोलिसांकडे तक्रार दाखल केली होती. मात्र, त्या तक्रारीची दखल घेण्यास पोलिसांनी असमर्थता व्यक्त करून हे प्रकरण धर्मादाय आयुक्तांच्या अखत्यारीत असल्याचे स्पष्ट केले होते. २८ जानेवारीला बराटे यांनी धर्मादाय सहआयुक्तांकडे अर्ज दाखल करून विद्या प्रतिष्ठानच्या विश्वस्तांवर कारवाईची मागणी केली होती. त्यानुसार सहआयुक्तांनी या प्रकरणावर सुनावणी घेतली आणि त्यावर सोमवारी निकाल जाहीर केला.

बारामती तालुक्यातील कऱ्हाटी येथे अजित पवार अध्यक्ष असलेली 'कृषिमूल शिक्षण संस्था' आहे. या संस्थेला राज्य सरकारने कृषी शिक्षणाकरिता १९८० मध्ये ७३ एकर सात गुंठे जमीन दिली होती. 'कृषिमूल'च्या ताब्यातील सरकारी जमीन आणि इमारत पवार काका पुतणे विश्वस्त असलेल्या विद्या प्रतिष्ठानच्या नावे हस्तांतर करावी, असा ठराव २६ मे २००७ला मंजूर करण्यात आला. सार्वजनिक विश्वस्त अधिनियम १९५ च्या कलम ३६ अन्वये संस्थेच्या नावे नोंद असलेल्या मिळकती, भाडेपट्टा, विक्री करण्यासाठी धर्मादाय आयुक्तांची परवानगी घेणे बंधनकारक आहे. प्रतिष्ठान आणि 'कृषिमूल'दरम्यान ९९ वर्षांच्या कालावधीसाठी वार्षिक २५ हजार रुपये देण्याचा भाडेपट्टा लिहून आ​णि नोंदवून ठेवला. परंतु, त्याबाबत अद्याप एक रुपयादेखील पवार यांच्या विद्या प्रतिष्ठानने 'कृषिमूल'ला दिला नसल्याचा आरोप बराटे यांनी केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पुण्यात हरवल्या; मुंबईत सापडल्या

$
0
0

पुणेः नगर रोडवरील इंग्रजी माध्यमाच्या शाळेत सातवीत शिकणाऱ्या दोन मुली सोमवारी भरदुपारी गायब झाल्याचा प्रकार घडला. दिवसभर शोध घेऊनही मुलींचा ठावठिकाणा सापडला नाही. अखेर सोमवारी रात्री उशिरा त्या मुली मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानकावर भेदरलेल्या अवस्थेत आढळून आल्या.

दिया अनंत गोरे (वय १२) आणि आकृती जयप्रकाश मंडल (वय १२, दोघीही रा. चंदननगर) असे हरवलेल्या मुलींची नावे आहेत. दोघीही सोमवारी सकाळी सात वाजता शाळेत गेल्या होत्या. दोघींना आणण्यासाठी त्यांच्या माता दुपारी शाळेत गेल्या. यावेळी दोघीही शाळेतून गेल्याचे त्यांना समजले, अशी माहिती चंदननगर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अनिल पात्रुडकर यांनी दिली. या दोघींनीही मॉलमध्ये जाण्याचे ठरवले होते. त्यानुसार दोघीही दुपारी शाळेतून ​गेल्याची माहिती शाळेतील मुलांकडून समजली. त्यानुसार नगर रोडवरील मॉलमध्ये शोध घेण्यात आला. चंदननगर पोलिस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान, सोमवारी रात्री या दोघी मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानकावर सापडल्या. तिथे पाटील नामक कॉन्स्टेबल बंदोबस्तासाठी होते. हा प्रकार त्यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी चौकशी केली. मुलींनी आपण पुण्याचे असल्याचे सांगितले. पाटील यांनी आकृतीच्या आईला संपर्क करून त्या मुंबईत असल्याचे सांगितले. आई-वडील ओरडल्याने घाबरून घरातून निघाल्याचे आकृतीने या वेळी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पर्यावरण अहवाल चुकीचा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

शहरातील भटक्या, मोकाट कुत्र्यांची आणि कुत्रे चावणाऱ्या पेशंटची संख्या वाढत असतानाच 'रेबीज'चे प्रमाण शून्यावर आणल्याचा पालिकेचा दावा चुकीचा असल्याची माहिती समोर आली आहे. गेल्या दोन वर्षांत 'रेबीज'ने दगावलेल्या पेशंटची संख्या दुपटीने वाढली असून, या विषयी पालिकेच्या पर्यावरण अहवालात दिशाभूल करणारी माहिती देण्यात आली आहे.

नागरिकांना भटक्या कुत्र्यांचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे. रात्री-अपरात्री प्रवास करणाऱ्या दुचाकी चालकांना कुत्र्यांचा सर्वाधिक उपद्रव होत आहे. नागरिकांची होणारी गैरसोय लोकप्रतिनिधींकडून सातत्याने मांडली जात असल्याने यंदा प्रथमच भटक्या कुत्र्यांची माहिती पालिकेने पालिकेच्या पर्यावरण सद्यस्थिती अहवालात (२०१४-१५) समाविष्ट केली आहे. त्यात, गेल्या काही वर्षांत शहरातील 'रेबीज'च्या पेशंटची संख्या घटल्याचा दावा करण्यात आला आहे. आश्चर्याची बाब म्हणजे २०१३-१४ मध्ये 'रेबीज'ची संख्या शून्यावर आणण्यात आल्याचे नमूद करण्यात आले आहे. परंतु, वस्तुस्थिती तशी नसल्याचे पालिकेची आकडेवारीच स्पष्ट करते.

पालिकेच्या आरोग्य विभागाच्या आकडेवारीनुसार २०१३-१४मध्ये ११ पेशंटना 'रेबीज'ची लागण झाली होती; त्यातील आठ जणांना प्राण गमवावा लागला. गेल्या आर्थिक वर्षात (२०१४-१५) रेबीजने मृत्यू झालेल्या नागरिकांचे प्रमाण दुपटीने वाढल्याचे दिसून आले आहे. या वर्षात २१ पेशंटना रेबीजची लागण झाली. त्यातील १९ जणांचा मृत्यू झाला. गेल्या तीन महिन्यांतही रेबीजची लागण झालेले तीन पेशंट दगावले आहेत.

भटक्या आणि मोकाट कुत्र्यांमुळे नागरिकांना होणारा त्रास कमी करण्यासाठी पालिकेने गेल्या काही महिन्यांत दहा हजारांहून अधिक भटक्या आणि मोकाट कुत्र्यांवर नसबंदी शस्त्रक्रिया आणि लसीकरण केल्याचा दावा केला आहे. तरीही, अद्याप शहरातील भटक्या आणि मोकाट कुत्र्यांचा त्रास कमी झालेला नाही.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मनसे तालुकाध्यक्षाचा गोळीबारात मृत्यू

$
0
0

मटा ऑनलाइन वृत्त । पुणे

मनसेचे मावळ तालुका अध्यक्ष बंटी वाळूंज यांचा आज गोळीबारात मृत्यू झाला आहे. राजकीय वैमनस्यातून त्यांच्यावर दुपारी १२च्या सुमारास हल्ला झाला होता, त्यानंतर हॉस्पिटलमध्ये पोहोचण्याआधीच त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

गेल्या काही दिवसांपासून कामशेत गावातील राजकीय वातावरण चांगलंच तापलंय. मावळ तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकांसाठी राजकीय पक्षांकडून जोरदार शक्तिप्रदर्शन सुरू आहे. या प्रचारादरम्यान काही वेळा दोन्हीकडचे कार्यकर्ते आमनेसामनेही आले होते. या पार्श्वभूमीवरच, आज दुपारी मनसे तालुकाध्यक्ष बंटी वाळूंच्या यांच्यावर अज्ञात व्यक्तींनी गोळीबार केला. त्यांच्यावर तीन गोळ्या झाडण्यात आल्यानं ते गंभीर जखमी झाले. त्यानंतर मनसैनिकांनी त्यांना तात्काळ तळेगावच्या हॉस्पिटलमध्ये नेलं, पण तिथे पोहोचण्याआधीच त्यांचा मृत्यू झाला होता.

या हत्येमुळे मनसैनिक संतापले आहेत. हल्लेखोरांना अटक होईपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही, असा पवित्रा त्यांनी घेतलाय. परंतु, पोलीस त्यांची समजूत काढत असून वरिष्ठांशीही चर्चा करत आहेत. बंटी यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पुण्याच्या ससून हॉस्पिटलमध्ये नेण्यात येणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आख्यायिकांमुळे महिलांना प्रवेश बंद

$
0
0

प्रसाद पवार, पुणे

पुण्याची संस्कृती आणि इतिहास यांमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावलेल्या पर्वतीवर एक मंदिर असे आहे, की जिथे आजही महिला जात नाही. या मंदिरातील देवदर्शनाला महिलांना प्रत्यक्ष बंदी नाही; परंतु पुराणांतील विविध आख्यायिकांमुळे महिला तिथे जात नाही. फक्त कार्तिक पौर्णिमेला लांबलचक रांगा लावून दर्शन घेतात. हे मंदिर आहे - कार्तिकस्वामीचे.

पर्वतीवर देवदेवेश्वर, विष्णू, पार्वती, गणपती आदींसह कार्तिक स्वामींचे मंदिर आहे. यांपैकी कार्तिकस्वामींचे मंदिर वगळता उर्वरित मंदिरांत महिला भाविकांची दररोज गर्दी असते. कार्तिक स्वामींच्या मंदिराकडे मात्र महिला फिरकत नाहीत. 'आमच्याकडून येथे महिलांना दर्शनासाठी कोणत्याही प्रकारे बंदी नाही. पूर्वी इथे असणारी पाटीही काढून टाकण्यात आली आहे. येथे केव्हाही महिलांना दर्शनाची परवानगी आहे; परंतु याबाबत महिलांमध्येच अनेक गैरसमज आहेत. त्यामुळे त्या दर्शनासाठी येत नाहीत,' असे देवदेवेश्वर संस्थानचे विनायक पेशवा यांनी 'मटा'ला सांगितले.

'मंदिरांमध्ये सर्व भाविकांना प्रवेश मिळावा, यासाठी देशभर सत्याग्रह झाला होता. त्यावेळी पर्वतीवरही असा सत्याग्रह होऊन इथली मंदिरे सर्वांसाठी खुली झाली. मात्र, पुराणकथांमुळे महिला कार्तिकस्वामीच्या मंदिरात जात नाहीत,' असे इतिहास अभ्यासक मंदार लवाटे यांनी सांगितले. पुराणातील आख्यायिकेची भीती न बाळगता ज्या महिलांना कार्तिकस्वामीचे नित्य दर्शन घ्यावयाचे आहे, त्यांनी तसे घ्यावे, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.

काय आहे आख्यायिका?

कार्तिकस्वामी हा भगवान शंकर आणि माता पार्वती यांचे ज्येष्ठ पुत्र आणि श्री मंगलमूर्ती गजाननाचा ज्येष्ठ बंधू. षडानन, मुरुगन, महादेवपुत्र, कार्तिकेय अशा विविध नावांनी तो ओळखला जातो. स्त्रियांनी या देवतेचे दर्शन घेण्यास मज्जाव असल्याची एक पौराणिक कथा आहे. ती अशी - प्राचीन काळी शंकर आणि पार्वती पर्वतावर ध्यानस्थ बसले असता गणराय आणि कार्तिकस्वामी तेथे आले. भगवान शंकरांनी दोघांना पृथ्वी प्रदक्षिणा करण्यास सुचविले. कार्तिकस्वामी मयुरारूढ होऊन पृथ्वी प्रदक्षिणेस निघाले, तर गणरायांनी गायवासराला प्रदक्षिणा करून पृथ्वी प्रदक्षिणा पूर्ण केली. गणरायाची प्रदक्षिण आधी पूर्ण झाल्याचे कळल्यानंतर गायीचे आणि बाईचे दर्शन घेणार नाही, असा संकल्प कार्तिकस्वामीने सोडला. तेव्हापासूनच कार्तिकस्वामीचे दर्शन घेण्यास महिलांवर बंधने आणल्याचे बोलले जाते. कार्तिकस्वामीचे दर्शन घेतल्याने धन वाढते असा समज एकीकडे आहे, तर महिलांना त्याचे दर्शन घेणे निषिद्ध, असा विरोधाभासही दिसून येतो. कार्तिकस्वामीचे दर्शन घेतल्यास पुढल्या जन्मी बालविधवा व्हावे लागते, अशीही एक आख्यायिका आहे.

दर्शन केवळ कार्तिक पौर्णिमेला

दीपावलीमुळे ख्यात असलेल्या कार्तिक महिन्याच्या पौर्णिमेच्या म्हणजेच त्रिपुरारी पौर्णिमेच्या दिनी पर्वतीवरील मंदिरात दीपोत्सव होतो आणि दर्शनासाठी गर्दी होते. या दिवशी स्त्रियांनी कार्तिकस्वामीचे दर्शन घेतल्यास चालते, असाही समज आहे. त्यामुळे त्या दिवशी दर्शनासाठी पर्वतीच्या पायथ्यापर्यंत लांबलचक रांग लागते. या मंदिरातील काळ्या पाषाणातली कार्तिकस्वामीची मूर्ती चतुर्भुज असून मोरावर बसलेली आहे.

मंदिराचा इतिहास

विविध पेशव्यांच्या कालखंडात पर्वतीवर मंदिरांची उभारणी झाली. त्यापैकी पर्वतीवरील कार्तिकस्वामींचे मूळ मंदिर राघोबादादा पेशवे यांच्या कालखंडात बांधले गेले. त्याची नेमकी तारीख आणि वर्ष याची नोंद उपलब्ध नाही. थोरल्या माधवराव पेशव्यांच्या काळात १७९१ मध्ये या मंदिरावर वीज पडून मूर्तीचेही नुकसान झाले. त्यामुळे छोटी पडवी बांधून त्यात कार्तिकस्वामीची संगमरवरी मूर्ती बसविण्यात आली. सध्याचे मंदिर माधवराव जयराम सदावर्ते यांनी १८३०मध्ये बांधलेले आहे. १८६७मध्ये देवाचा मुकूट देवाच्या उजव्या हातावर पडून तो हात भंगला. त्यानंतर सध्याची मूर्ती १८६९मध्ये बसविण्यात आली.

महिलांनीच निर्णय घेण्याची वेळ

पर्वतीवरील कार्तिकस्वामी मंदिरात केव्हाही प्रवेश असताना, केवळ आख्यायिकांमुळे किंवा त्यांमध्ये व्यक्त केलेल्या भीतीमुळे तिथे न जाणे अयोग्य आहे. आता याबाबत महिलांनी ठाम निर्णय घेण्याची गरज व्यक्त केली जात आहे. याबाबत शंकराचार्यांशी बोलून तोडगा काढण्याची गरज देवदेवेश्वर संस्थानचे विनायक पेशवा यांनी व्यक्त केली.

पुण्यातच दोन प्रथा

पर्वतीवरील कार्तिकस्वामीच्या दर्शनासाठी महिला वर्षातून एकदाच जातात; पण अपोलो टॉकीज येथे असणाऱ्या मद्रासी गणपती मंदिराच्या आवारातही कार्तिकस्वामीचे मंदिर आहे. तिथे मात्र वर्षभर महिला कार्तिकस्वामीचे दर्शन घेतात.

इतरत्र बंदी नाही

महाराष्ट्र वगळता इतर कुठेही कार्तिकस्वामीचे दर्शन घ्यायला महिलांना बंदी नाही. महाराष्ट्रात कार्तिस्वामीला ब्रह्मचारी मानले जाते. दक्षिण भारतात त्याला देवसेना आणि वल्ली अशा दोन पत्नींसह पूजले जाते. महाराष्ट्रात पर्वती (पुणे), कोकणात राजापूर येथे, गोव्यात रावणकोंड येथे, गुजरातेत साबरमतीला, कर्नाटकात होसपेटे आणि बेल्लारी येथे कार्तिकस्वामीची भव्य मंदिरे आहेत. कोल्हापुरात पंचगंगेच्या तीरावरील प्रयागतीर्थ येथे आणि महालक्ष्मीच्या आवारात कार्तिकस्वामीचे मंदिर आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images