Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

मनोरुग्ण पत्नीकडून पतीच्या डोक्यात पाटा

$
0
0


पुणे : मनोरुग्ण महिलेने आपल्या पतीच्या डोक्यात पाटा घालून ठार मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना शिवणे येथील देशमुखवाडी येथे शनिवारी पहाटे घडली. या प्रकरणी ​उत्तमनगर पोलिस ठाण्यात मुलाने दिलेल्या तक्रारीनुसार आईविरुद्ध खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

संतोष देशमुख (वय २८, रा. देशमुखवाडी, शिवणे) या मुलाने आपली आई शोभा रोहिदास देशमुख (वय ५६) हिच्याविरुद्ध पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. शोभा यांनी आपले पती रोहिदस गणपत देशमुख (वय ६३) यांच्या डोक्यात पाटा घातला असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. देशमुख कुटुंबीय शिवण्यातील देशमुखवाडी येथे राहतात. रोहिदास देशमुख शनिवारी पहाटे चारच्या सुमारास झोपेत असताना त्यांच्या पत्नीने त्यांच्या डोक्यात पाटा घातला. या प्रकारामुळे त्यांना गंभीर दुखापत झाली असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. शोभा मानसिक रुग्ण आहेत. या अवस्थेत त्यांनी आपल्याच पतीच्या डोक्यात पाटा घातला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


ऑगस्टमध्येही पावसाची हुलकावणी?

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

जुलै महिन्यात अपुरा पाऊस झाला असतानाच ऑगस्ट महिन्यातही देशभरात सरासरीच्या ९० टक्केच पाऊस होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. येत्या आठवडाभरातही राज्यात पावसाचे प्रमाण वाढण्यासाठी परिस्थिती अनुकूल नसल्याने राज्यासह दक्षिण भारतावर दुष्काळाचे सावट घोंघावू लागले आहे.

राज्यात चांगल्या प्रमाणात पाऊस होण्यासाठी अरबी समुद्रावरील किनारपट्टीवर, तसेच बंगालच्या उपसागरात आंध्र व ओडिशाच्या किनारपट्टीच्या भागात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होणे आवश्यक असते. यंदाच्या जुलै महिन्यात या भागात कमी दाबाचे क्षेत्र क्वचितच निर्माण झाल्याने राज्यात पावसाचे प्रमाण कमी होते. येत्या काही दिवसांतही या भागात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होण्याची शक्यता कमी असल्याने येत्या आठवडाभरात राज्यातील पावसाचा जोर वाढण्याची शक्यता नसल्याचे हवामानतज्ज्ञांनी सांगितले.

जुलै महिन्यात देशभरात सरासरीच्या ८० टक्के पाऊस होईल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला होता. हा अंदाज खरा ठरला असून, देशभरात केवळ ८० टक्के पाऊस झाला आहे. या पार्श्वभूमीवर ऑगस्टमध्येही सरासरीपेक्षा दहा टक्के पाऊस कमी होणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. संपूर्ण हंगामात सरासरीपेक्षा १२ टक्के कमी म्हणजेच सरासरीच्या ८८ टक्केच पाऊस होण्याची शक्यताही हवामान विभागाने आपल्या सुधारित अंदाजात व्यक्त केली आहे. त्यामुळे दक्षिण भारतावर दुष्काळाची छाया पसरण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

कमी दाबाची क्षेत्रे उत्तरेकडे

पावसाळ्यादरम्यान गुजरातपासून बंगालच्या उपसागरापर्यंत निर्माण होणारी द्रोणीय स्थिती (मान्सून ट्रफ) यंदा नेहमीपेक्षा उत्तरेकडे सरकून हिमालयाच्या पायथ्याकडे अधिक सक्रिय होती. त्यामुळे पावसासाठी आवश्यक कमी दाबाची क्षेत्रे उत्तरेकडे अधिक प्रमाणात तयार झाली. त्यामुळे उत्तरेकडील राज्यात अनेक ठिकाणी सरासरीइतक्या, तर काही ठिकाणी सरासरीपेक्षा अधिक पावसाची नोंद झाली. महाराष्ट्रात मात्र अनुकूल परिस्थिती नसल्याने पावसाचे प्रमाण खूपच कमी राहिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अन्याय होऊ देणार नाही

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

स्मार्ट सिटी प्रकल्पासाठी पुणे-पिंपरीचा एकत्रित प्रस्ताव सादर केल्याने होणारी हानी टाळण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार असल्याचे खासदार अनिळ शिरोळे यांनी स्पष्ट केले. 'स्मार्ट सिटी'साठी एकत्रित प्रस्ताव केल्याचे वृत्त 'मटा'ने प्रसिद्ध केले होते. त्यानंतर सरकारच्या भूमिकेवर पुणे-पिंपरीतून टीका करण्यात आली. या पार्श्वभूमीवर शिरोळे यांनी या प्रस्तावाबाबत माहिती घेऊन पुणेकरांचे नुकसान होऊ न देण्याची भूमिका घेतली.

केंद्र सरकारच्या स्मार्ट सिटी स्पर्धेत सहभागी होणाऱ्या दहा शहरांची नावे दोन दिवसांपूर्वी राज्य सरकारने जाहीर केली. ही नावे जाहीर करताना राज्यातील इतर नऊ शहरांचा स्वतंत्र समावेश करण्यात आला असताना, पुणे-पिंपरी चिंचवड मात्र एकच शहर दाखवण्यात आले आहे.

राजकीय हेतूने भाजप सरकारने जाणीवपूर्वक दोन्ही शहरांना एकत्र करण्याची खेळी केली असून, आगामी महापालिका निवडणुकांपूर्वी जास्तीत जास्त शहरे स्मार्ट सिटीत घेण्याच्या उद्देशाने सरकारने हा निर्णय घेतल्याचा आरोप करून पालिकेतील काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेससह शिवसेनेच्या नेत्यांनी शासनाच्या या भूमिकेवर जोरदार टीकास्त्र सोडून हा निर्णय मागे घेण्याचा इशारा दिला आहे. 'स्मार्ट सिटी'मध्ये या दोन्ही शहरांची निवड झाल्यास पुण्याला केवळ अर्ध्या निधीवरच समाधान मानावे लागणार आहे. यामुळे प्रत्येक प्रकल्पासाठी दोन्ही शहरांना एकमेकांवर अवलंबून राहावे लागणार असल्याचे समोर आले आहे.

पुणे आणि पिंपरी चिंचवड ही दोन्ही स्वतंत्र शहरे असल्याने नक्की कोणत्या उद्देशाने सरकारने या दोन्ही शहरांना एकत्रित केले, हे समजून घेण्यासाठी पुढील काही दिवसांतच मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेऊन चर्चा करणार आहे. स्मार्ट सिटी संदर्भात पुणेकरांवर कोणताही अन्याय होऊ देणार नाही. यासाठी राज्याबरोबरच केंद्राच्या पातळीवर प्रयत्न केले जाणार आहेत.

- अनिल शिरोळे, खासदार

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पोलिसांशी हुज्जत; महिलेविरुद्ध गुन्हा

$
0
0

पुणे : कॅम्पमधील बुधानी वेफर्स दुकानासमोर कारचालक महिलेने वाहतूक पोलिसांशी हुज्जत घालत त्यांच्या अंगावर कार घालण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या महिलेविरुद्ध सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी लष्कर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रश्मी रमेश पमनानी (४५ ,रा. गंगा सॅटेलाइट, वानवडी) असे संबंधित महिलेचे नाव आहे. ही घटना शनिवारी सायंकाळी घडली. या प्रकरणी पोलिस निरीक्षक अर​​विंद जोंधळे यांनी तक्रार दाखल केली आहे.

जोंधळे आपल्या स्टाफसह कॅम्प परिसरात 'नो-पार्किंग'मध्ये लावण्यात आलेल्या वाहनांवर कारवाई करत होते. या वेळी पमनानी यांनी जोंधळे यांच्याशी बोलताना अरेरावीची भाषा वापरली. तसेच निष्काळजीपणे कार चालवल्याने जोंधळे यांच्या पायाला कारचा धक्का लागला. या घटनेनंतर पमनानी या निघून गेल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विद्यार्थ्यांचे आज ‘जंतरमंतर’वर आंदोलन

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

अभिनेते गजेंद्र चौहान यांच्या अध्यक्षतेखालील पुनर्रचित समिती बरखास्त करण्याच्या मागणीसाठी पुण्यातील 'फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया'चे (एफटीआयआय) विद्यार्थी आज, सोमवारी दिल्लीतील जंतरमंतर येथे आंदोलन करणार आहेत. विद्यार्थ्यांच्या या आंदोलनाची सरकार दखल घेणार का, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

विद्यार्थ्यांचा संप सुरू होऊन आता दोन महिने होत आले आहेत; मात्र माहिती व प्रसारण मंत्रालयाने पुन्हा संपाची दखल घेतलेली नाही. विद्यार्थ्यांनी आतापर्यंत पाच पत्रे पाठवली आहेत; मात्र त्यातील एकाही पत्राला उत्तर देण्यात आलेले नाही. त्यामुळे आपला आवाज संसदेपर्यंत पोहोचवण्यासाठी विद्यार्थी दिल्लीत आंदोलन करत आहेत.

काही खासदारांना पत्र पाठवण्यात आलेले आहे; मात्र आंदोलनात कोण सहभागी होणार हे स्पष्ट झालेले नाही. जंतरमंतरवरील आंदोलनानंतर लोकसभा रस्त्यावरही निदर्शने केली जाणार आहेत, असे विद्यार्थी प्रतिनिधी रणजित नायरने सांगितले.विद्यार्थ्यांच्या संपाबाबत तणावाची स्थिती निर्माण झाली आहे. तसेच त्यातून वादही निर्माण होत आहेत. या पार्श्वभूमीवर, माहिती व प्रसारण मंत्रालयासह माहिती व प्रसारण राज्यमंत्री राज्यवर्धनसिंह राठोड यांनाही विद्यार्थ्यांनी पत्र पाठवले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार ठार

$
0
0

पुणे : बिबवेवाडी येथे ओंकार अपार्टमेंटसमोरील रस्त्यावर ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार ठार झाल्याची घटना श​निवारी सायंकाळी घडली. या प्रकरणी बिबवेवाडी पोलिस ठाण्यात अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी अमित गोगावले (३५, रा. गोगलवाडी) यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली असून, पोलिसांनी ट्रकचालक विशाल श्रीकांत जाधव (२६, रा.साईचरण सोसायटी, बिबवेवाडी) याला अटक केली आहे. या अपघातात राजाभाऊ निवृत्ती गोगावले (६३, रा. पोकळे वस्ती, बिबवेवाडी) ठार झाले.

नोकरीच्या बहाण्याने लावला बालविवाह

पुणे : तेरा वर्षांच्या मुलीला पंजाब येथे नोकरीच्या बहाण्याने नेऊन तेथे तिचा बालविवाह केल्याप्रकरणी विमानतळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही मुलगी येरवडा येथील असून, सध्या ती पंजाबमध्येच आहे. पोलिसांचे एक पथक तिला आणण्यासाठी पंजाब येथे रवाना झाले आहे. या प्रकरणी विमानतळ पोलिस ठाण्यात अपहरण, तसेच बालविवाह प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. येरवडा येथील ५५ वर्षांच्या महिलेने पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार नंदू साखरे (रा. बर्मा सेल, लोहगाव) आणि छायाताई साखरे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आरोपी साखरे त्या मुलीचे मामा-मामी आहेत. तसेच साखरेच्या मुलीचेही लग्न पंजाबमध्येच झाले आहे. साखरे यांनी या अल्पवयीन मुलीचे लग्न पंजाबमधील गुरुमित याच्याशी लावले आहे. मुलीची आई लग्नात उपस्थित होती; मात्र हे लग्न फसवून लावले असल्याचा आरोप तिने केला असून, तशी तक्रारही दाखल केली आहे. मुलीच्या आईच्या तक्रारीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुलीचा शोध घेऊन तिला पुण्यात आणण्यासाठी एक पथक पंजाबला पाठवण्यात येत आहे, अशी माहिती विमानतळ पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक संजय कुरुंदकर यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बँक खाते हॅक करून ७३ हजार लांबवले

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

एचडीएफसी बँकेतील खाते हॅक करून ७३ हजार रुपये परस्पर ऑनलाइन ट्रान्स्फर केल्याप्रकरणी कोरेगाव पार्क पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. हा प्रकार ३१ जुलै रोजी घडला. अनुषा मिश्रा (३०, रा.कल्याणीनगर) यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. या प्रकरणी रोहितकुमार (रा. ४०१, सिंहगड रोड, नांदेड सिटी) यांच्याविरुद्ध फसवणूक, तसेच आयटी अॅक्टखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आरोपी कुमार याने मिश्रा यांचे बँक खाते हॅक करून त्यावरील ७३ हजार १०० रुपये परस्पर ऑनलाइन ट्रान्स्फर केल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. कोरेगाव पार्क पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक कल्याण पवार अधिक तपास करत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

५५ बँक खाती गोठवली

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

दहशतवाद्यांना पैशांचा पुरवठा करणारी ५५ बँक खाती केंद्र सरकारने गोठवली आहेत. केंद्रीय गृहमंत्रालयाने नुकत्याच प्रकाशित केलेल्या वार्षिक अहवालातून ही बाब स्पष्ट झाली आहे. पुण्यातील एका संशयित दहशतवाद्याचेही बँक खाते तीन वर्षांपूर्वी गोठवण्यात आले होते. याशिवाय हवालामार्गे होणारी आर्थिक रसद थांबवण्यासाठी 'कॉम्बॅटिंग फायनान्सिंग ऑफ टेररिझम सेल'कडून (सीएफटी) विशेष पावले उचलण्यात येत आहेत.

दशतवाद्यांना पैशांचा पुरवठा करणे, बनावट नोटा चलनात आणणे, दहशतवादी कृत्यांसाठी अमली पदार्थांच्या माध्यमातून पैसा उभा करणे, हे गुन्हे आता बेकायदा हालचाली प्रतिबंध (यूएपीए) कायद्याअंतर्गत नोंदवण्यात येत आहेत. या गुन्ह्यांच्या तपासादरम्यान देशभरातील ५५ खाती गोठवण्यात आली असल्याची माहिती केंद्रीय गृह मंत्रालयाच्या वार्षिक अहवालात देण्यात आली आहे.

दहशतवादविरोधी पथकाच्या पुणे सेलने बनावट नोटा चलनात आणल्याप्रकरणी नुकताच एक गुन्हा दाखल केला होता. या नोटा सीमेपलीकडे तयार केला असल्याचा अहवाल शासकीय प्रिंटिंग प्रेसकडून आल्यानंतर गुन्हेगारांविरुद्ध बेकायदा हालचाली प्रतिबंध कायद्याअंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे. याशिवाय 'एटीएस'चे सहायक आयुक्त भानुप्रताप बर्गे यांच्या पथकाकडून उत्तरेतही तपास सुरू आहे. जंगली महाराज रोडवरील साखळी स्फोट, हैदराबाद येथील साखळी स्फोटांसाठी 'आयएम'च्या दहशतवाद्यांना हवाला, तसेच मनी ट्रान्स्फर करणाऱ्या कंपन्यांमार्फत पैसा पुरवण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे.

पैशांऐवजी आता सोन्याचा वापर

दहशतवाद्यांना पैसा पुरवण्यात अनेकदा अडचणी निर्माण होत असल्याने आता आखाती देशांमधून सोने पाठवण्यास सुरुवात झाली आहे. केंद्रीय गृहमंत्रालयाच्या अहवालात याबाबतचा उल्लेख आहे. दरम्यान, 'फायनान्शिअल अॅक्शन टास्क फोर्स'ने नुकत्याच प्रकाशित केलेल्या अहवालात दहशतवाद्यांकडून पैशांऐवजी सोन्याचा वापर करण्यात येत असल्याचे म्हटले आहे. भारतातही मोठ्या प्रमाणात सोन्याची तस्करी करण्यात आली असून, यंत्रणांकडून याचा माग काढण्यात येत आहे. लोहगाव विमानतळावरही कस्टम विभागानेही वारंवार होणारी सोन्याची तस्करी पकडली आहे. या घटनांचा तपास सुरू आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


यंदाही दोन लाख वाहनांची कोंडीत भर

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

शहरात सार्वजनिक वाहतुकीला प्रोत्साहन देण्यासाठी अनेक उपाययोजनांची आखणी पालिकेकडून केली जात असली, तरी वाहनांच्या संख्येत प्रतिवर्षी होणाऱ्या वाढीवर नियंत्रण राखता आलेले नाही. गेल्या वर्षभरात पुण्यात पुन्हा दोन लाख वाहनांची भर पडली असून, त्यामध्ये तब्बल दीड लाख दुचाकी आहेत.

पालिकेच्या पर्यावरण सद्यस्थिती अहवालातून (२०१४-१५) शहरात दरवर्षी वाढणाऱ्या वाहनांची माहिती देण्यात आली आहे. वाहनांच्या वाढत्या संख्येमुळे वाहतुकीच्या सुविधांवर ताण निर्माण होत असून, एकूण वाहनांच्या तुलनेत दुचाकींची संख्या ७५ टक्क्यांहून अधिक झाली आहे. त्याचा परिणाम शहरातील हवेच्या प्रदूषणावर होत असल्याचे निरीक्षण नोंदविण्यात आले आहे. खासगी वाहनांची वाढती संख्या मर्यादित ठेवण्यासाठी पुणे महानगर परिवहन महामंडळाला (पीएमपी) सक्षम करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. प्रवाशांची मागणी लक्षात घेता पुरेशा प्रमाणात बस उपलब्ध नसल्याने खासगी वाहनांचा वापर वाढत आहे.

शहराचा मेट्रो प्रकल्प अद्याप केंद्र सरकारच्या अंतिम मान्यतेसाठी रखडला आहे. त्यामुळे, वाहनांच्या वाढत्या संख्येमुळे बहुतेक भागांत नागरिकांना वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागत आहे. उड्डाणपूल, रस्ता रुंदीकरण यासारख्या उपायांचा अवलंब केला, तरीही वाहतूक कोंडीतून अद्याप पुणेकरांची सुटका झालेली नाही. वाढत्या वाहनसंख्येमुळे पार्किंगचा प्रश्न गंभीर होत चालला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

प्रदूषण थांबविताना पालिकेची ‘दमछाक’

$
0
0

सुनीत भावे, पुणे

शहरात दरवर्षी वाढणाऱ्या वाहनांच्या मोठ्या संख्येमुळे शहरातील हवा अधिकाधिक प्रदूषित होत असून, हवा प्रदूषणाचे घातक परिणाम कमी करण्यासाठी पालिकेतर्फे केले जाणारे प्रयत्न अपुरे पडत आहेत.
पालिकेच्या पर्यावरण सद्यस्थिती अहवालातून (२०१४-१५) ही बाब स्पष्ट झाली आहे. नायट्रोजन ऑक्साईड, नायट्रोजन डायऑक्साईड, धूलीकण (पीएम १०) आणि अतिसूक्ष्म धूलीकण (पीएम २.५) या हवा प्रदूषित करणाऱ्या सर्वच घटकांमध्ये झालेली वाढ पुणेकरांसाठी चिंताजनक आहे. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने ठरवून दिलेल्या मानकांपेक्षा या सर्व घटकांचे प्रमाण शहरात अधिक आहे. शहरातील एकूण वाहनांमध्ये दुचाकीचे प्रमाण तब्बल ७५ टक्के असल्याने हवा प्रदूषणात सातत्याने वाढ होत आहे. हडपसर, कात्रज, नवी पेठ, शिवाजीनगर, मंडई, पाषाण, लोहगाव अशा शहराच्या सर्वच भागांतील प्रमाण अधिक असल्याने त्यावर तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली जात आहे.

अतिनील निर्देशांक

सूर्यप्रकाशातील हानिकारक अतिनील किरणांचे मोजमाप करण्यासाठी अतिनील निर्देशांकाचा (यूव्ही इंडेक्स) वापर केला जातो. गेल्यावर्षी पालिकेने पहिल्यांदाच त्याची पातळी मोजली होती. सूर्योदयानंतर अतिनील निर्देशांक वाढत जातो तर, सूर्यास्तानंतर रात्रीच्या वेळी तो शून्यावर असतो. ० ते १० यावर त्याची मोजणी केली जात असून, चारपर्यंत कोणताही धोका नसल्याचे सांगण्यात येते. ४-५ कमी धोका, ५-७ मध्यम धोका, तर ७-१० उच्च धोका, अशी श्रेणी करण्यात आली आहे. एप्रिल ते ऑक्टोबर २०१४ मध्ये त्याची सर्वाधिक पातळी (७ पेक्षा अधिक) नोंदविण्यात आली असून, नोव्हेंबत ते फेब्रुवारीदरम्यान तो पाचपर्यंत मर्यादित राहिला आहे.

नायट्रोजन ऑक्साइड, नायट्रोजन डायऑक्साइड, धूलीकण (पीएम १०) आणि अतिसूक्ष्मधूलीकण (पीएम २.५) याचे आलेख पर्यावरण अहवालात पान क्र ५१, ५२, ५४ आणि ५६ वर आहेत. ते मराठीत करून घ्यावेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नदी, नाले, ओढे अवघे कासावीस

$
0
0

चैतन्य मचाले, पुणे

शहराच्या वाढत्या विस्तारामुळे गेल्या काही वर्षांत शहरातून वाहणाऱ्या नदी, नाले, ओढे यामधील प्रदूषणही वाढत चालल्याचे समोर आले आहे. शहरातील तलावांप्रमाणेच नाल्यांमधील पाण्याच्या गुणवत्तेचा अभ्यास केला असता, गेल्या चार वर्षांत पाण्यात विरघळणाऱ्या ऑक्सिजनचे प्रमाण हळूहळू कमी होत असल्याचे समोर आले आहे. महापालिकेने अभ्यास करून तयार केलेल्या पर्यावरण अहवालामधून ही वस्तूस्थिती समोर आली आहे. याकडे पालिका प्रशासनाने गांभीर्याने न पाहिल्यास येणाऱ्या काही वर्षांत ही स्थिती अधिकच गंभीर होऊन त्याचे परिणाम पुणेकरांना भोगावे लागतील.

मुठा नदीत रोज सोडले जाणारे बहुतांश पाणी प्रकिया केलेले नसते. त्यामुळे पाण्याची गुणवत्ता दिवसेंदिवस ढासळते आहे. महापालिकेच्या पर्यावरण अहवालानुसार मुठा नदीतील ऑक्सिजनच्या पातळीचा अभ्यास केल्यास विठ्ठलवाडी ते म्हात्रे पुलाच्या अलीकडे ऑक्सिजनची पातळी चांगली असल्याचे दिसते. पण जशी नदी शहरात प्रवेश करते, आणि निवासी परिसर सुरू होतो, तसे नदीच्या पाण्यातील विरघळलेल्या ऑक्सिजनचे (डीओ) प्रमाण कमी झालेले आढळते. एरंडवणे, एस. एम. जोशी पूल, स्वातंत्र्यवीर सावरकर पूल आणि रेल्वे पूल या ठिकाणी प्रदूषण नियंत्रण मंडळाने ठरवून दिलेल्या पातळीपेक्षा डीओचे प्रचंड कमी आहे.

शहरात मोठ्या प्रमाणात निर्माण होणारे मैलापाणी थेट नदीत सोडले जात असल्याने नदी प्रदूषित होत असल्याचा ठपका यापूर्वीच महाराष्ट्र प्रदूषण महामंडळाने ठेवला आहे. नदीत सोडल्या जाणाऱ्या पाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी महापालिकेने आतापर्यंत दहा प्रकल्प उभारले असून, अजून नऊ प्रकल्प उभारण्यासाठी निधी मिळावा, असा प्रस्ताव केंद्र सरकारकडे देण्यात आला होता. या प्रकल्पासाठी होणारा खर्च मोठा असल्याने महापालिकेच्या हिश्श्याचा निधी उभारण्याचे काम पालिकेने जायका कंपनीला दिले आहे. गेल्या महिन्यातच केंद्र सरकारने या योजनेला मान्यता दिली असून, शहरातील नदी सुधारण्यासाठी तब्बल ९०० कोटी रुपयांचे अनुदान देण्याचा प्रस्ताव मान्य करण्यात आला आहे.

नदीचे प्रदूषण कमी करण्यासाठी दरवर्षी महापालिकेच्या वतीने कोट्यवधी रुपयांचा निधी पालिकेच्या बजेटमधून खर्च केला जातो. एवढा मोठा निधी खर्च करूनही मैलापाण्यावर आवश्यक ती प्रक्रिया करून या पाण्याचा पुनर्वापर करण्यात प्रशासनाला यश आलेले नाही. रेल्वे पुलाजवळ नदी सर्वाधिक प्रदूषित झालेली आढळते. संगम पूल येथील रेल्वे पुलाजवळ 'बीओडी'चे प्रमाण प्रदूषण मंडळाने ठरवून दिलेल्या प्रमाणापेक्षा ३० मिलिग्रॅम प्रतिलिटर या पातळीपेक्षा जास्त आहे. यातूनच या भागात जैविक प्रदूषकांचे प्रमाण जास्त असल्याचे स्पष्ट झाले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कळतंय, पण वळत नाही

$
0
0

चैत्राली चांदोरकर, पुणे

संकटाला सामोरे जाण्यापूर्वी, त्याचे मूळ कशात आहे याचा उलगडा झाल्यास नेमका पर्याय शोधता येतो. अर्थातच त्यातून समस्या अल्पावधीतच आटोक्यात येते.... वेगाने विस्तारणाऱ्या पुण्याला सध्या कोणकोणत्या पर्यावरणीय समस्यांना सामोरे जावे लागते आहे ते सोडविण्याचे नेमके पर्याय कोणते असू शकतात... याची उत्तरे महापालिकेच्या पर्यावरण सद्य:स्थिती अहवालामध्येच सापडतात. मात्र, अंमलबजावणीत प्रशासकीय यंत्रणा मागे पडत असल्याने 'कळतंय पण वळत' नाही, अशी पुण्याची अवस्था झाली आहे.

पुणे हे निसर्गसौंदर्याने नटलेले, समृद्ध जैवविविधता आणि मुबलक नैसर्गिक साधनाने परिपूर्ण असे शहर आहे. गेल्या काही वर्षांत शहराचा वेगाने विकास होत गेल्याने नैसर्गिक साधनांवर प्रचंड ताण आला आहे. यातूनच जल, ध्वनी आणि वायूप्रदूषणाच्या आकडेवारीचा आलेख घसरण्याऐवजी वर चढतो आहे. सार्वजनिक आरोग्याचे प्रश्नही सातत्याने डोके वर काढत आहेत. याचे गांभीर्य लक्षात घेऊनच पुणे महापालिकेने सतरा वर्षांपूर्वी 'पर्यावरण सद्यस्थिती अहवाल' पहिल्यांदा प्रसिद्ध केला. इतर महापालिकांसाठी हा एक पथदर्शी प्रकल्प ठरला. प्रत्येक वर्षी हा अहवाल अधिकाधिक सविस्तर व्हावा, यासाठी पर्यावरण अधिकारी दरवर्षी प्रयत्न करतात. विशेष म्हणजे या वर्षीचा पर्यावरण अहवाल खऱ्या अर्थाने पर्यावरणाच्या सर्वच मुद्द्यांना सर्वांगाने स्पर्श करणारा ठरला आहे. समस्या मांडत असताना महापालिका स्तरावर सुरू असलेल्या उपक्रमांचीही सविस्तर माहिती यात देण्यात आली आहे. मात्र, यावरच समाधान न मानता आगामी काळात पर्यावरणीय संवर्धनाच्या योजना आणि मूल्यांकनावर भर दिला पाहिजे.

शहरात नदी प्रदूषण हा सर्वांत गंभीर विषय बनला आहे. शहराच्या विविध भागात जलशुद्धीकरण प्रकल्प उल्लेखनीय काम करीत असल्याचा दावा महापालिकेने अहवालात केला आहे. प्रत्यक्षात आज ६० टक्के मैलापाणी विनाप्रक्रिया नदीत सोडले जाते. नदी सुधारणेसाठी प्रशासनाने आतापर्यंत कोट्यवधी रुपये खर्च केले आहेत, पण त्याचा उपयोग काय झाला, याचे उत्तर अहवालात मिळत नाही.

गेल्या काही वर्षांत ध्वनी आणि वायू प्रदूषणाची आकडेवारी गंभीर झाली असून, सार्वजनिक आरोग्यावर त्याचे पडसाद उमटत असल्याचे अहवालात अधोरेखित करण्यात आले आहे. पण प्रदूषण कमी करण्यासाठी प्रशासनाने जनजागृती सोडून इतर कोणते उपक्रम राबविले, याचे उत्तर त्यात नाही. सण-उत्सवांमध्ये होणाऱ्या ध्वनीप्रदूषणामुळे प्रदूषणाची पातळी उच्चांक गाठत असल्याचे पुरावे दाखवताना, ते कमी करण्यासाठी राबविलेले उपक्रम अहवालात सापडत नाहीत. पुण्यातील टेकड्या जैववैविध्याने समृद्ध असून तेथील वनसंपदा आणि वन्यजीवन याबद्दल प्रशासन भरभरून बोलते. पण ही सद्यस्थिती मांडताना अतिक्रमण आणि कचऱ्याने वेढल्या गेलेल्या टेकड्यांना मोकळा श्वास मिळावा, यासाठी आतापर्यंत काय केले, याबद्दल अहलावात मौन बाळगण्यात आले आहे. अनेक सार्वजनिक समस्यांचे मूळ हे पर्यावरणाशी जोडले गेले असून त्या समस्या सोडविल्याशिवाय पर्यावरण संवर्धन होणार नाही, असे अहवालात नमूद केले आहे. मात्र, अंमलबजावणीच्या पातळीवर प्रशासन कमी पडत असल्याचा निष्कर्ष अहवालाच्या वाचनानंतर पुढे येतो.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘बचत’ ५० कोटींची

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

अकरावीचे प्रवेश ऑनलाइनच करण्याच्या निर्णयामुळे प्रवेशाच्या 'दुकानदारी'ला आळा बसला असून पालकांकडून वसूल केले जाणाऱ्या तब्बल ५० कोटी रुपयांची 'बचत' झाली आहे. शिक्षणसंस्था, प्रवेशाचे दलाल आणि बाबूंच्या खिशात जाणारी ही रक्कम वाचल्याने विद्यार्थ्यांना अधिक दर्जेदार शिक्षणसुविधा उपलब्ध करून देण्यावर आता लक्ष केंद्रित करता येईल, अशा शब्दांत पालकवर्गाने भावना व्यक्त केल्या आहेत.

अकरावीसाठी केवळ पहिल्या दोनच फेऱ्या ऑनलाइन करून त्यानंतरचे हजारो प्रवेश ऑफलाइनच्या माध्यमातून करण्याचा 'धंदा' गेल्या काही वर्षांपासून बोकाळला होता. संस्थाचालक, प्रवेशाच्या दलालांमधील साटेलोट्यात ३६ टक्के प्रवेश ऑफलाइन केले जात होते. प्रत्येक प्रवेशासाठी सरासरी ५० हजार रुपये उकळले जात होते. 'मटा'ने ही 'दुकानदारी' थांबविण्यासाठी मोहीम हाती घेतली. शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनीदेखील त्याची दखल घेऊन प्रवेश ऑनलाइनच करण्याची तंबी दिली. इतकेच नव्हे, तर मुंबई हायकोर्टाने ऑफलाइन प्रवेश केले जात असल्याबद्दल संबंधित अधिकाऱ्यांची कानउघाडणी केली. परिणामी, एरवी गुंडाळली जाणारी ऑनलाइन प्रक्रिया यंदा पाचव्या ऑनलाइन फेरीपर्यंत चालविण्यात आली. त्याचा थेट फायदा १२ हजारांवर विद्यार्थ्यांना झाल्याचे प्रवेश समितीनेच जाहीर केलेल्या आकडेवारीतून स्पष्ट झाले आहे.

७५ हजार ते २ लाखांचा 'भाव'...

शहरातील बड्या कॉलेजांमध्ये एका ऑफलाइन प्रवेशासाठी किमान ७५ हजार ते दोन लाख रुपयांचा 'भाव' काढण्यात येतो. सर्वसाधारण कॉलेजांमध्ये अशा ऑफलाइन प्रवेशाला किमान पन्नास हजार रुपये उकळले जातात. या व्यतिरिक्त प्रवेशांच्या दलालांची फी वेगळीच असते. यापूर्वीपर्यंत तिसऱ्या फेरीत ही 'दुकानदारी' सुरू होत असे. जून-जुलैमध्ये भूछत्र्यांप्रमाणे उगविणाऱ्या विद्यार्थी संघटनांचे स्वयंघोषित 'कार्यकर्ते' ही प्रवेशाची दलाली करीत. यंदा 'मटा'च्या पुढाकाराने ऑनलाइनचाच आग्रह धरण्यात आल्याने त्यांना प्रक्रियेबाहेरच राहावे लागले. 'सिस्कॉम' या संस्थेच्या वतीने वैशाली बाफना आणि सहकारी प्रवेशप्रक्रियेतील नियमबाह्य घटकांना रोखण्यासाठी हायकोर्टात लढा देत आहेत.

पुढील वर्षी 'नॉट रिपोर्टेड'ला आळा...

यंदाच्या प्रक्रियेमध्ये अनेक विद्यार्थ्यांनी पसंतीचे कॉलेज मिळविण्यासाठी नॉट रिपोर्टेड राहून मिळालेले प्रवेश न घेता पुढील फेरीत धाव घेतली. त्यामुळे ही प्रक्रिया रेंगाळल्याने पुढील फेऱ्यांमधील विद्यार्थ्यांचे नुकसान होत जागा विनाकारण रिक्त राहत गेल्या. या रिक्त जागांच्याच माध्यमातून प्रवेशाचा 'बाजार' आरंभला जात असल्याचे स्पष्ट झाले. म्हणूनच, इंजिनीअरिंग प्रवेशाच्या प्रक्रियेप्रमाणेच अकरावीलादेखील 'नॉट रिपोर्टेड'वर मर्यादा आणण्याचा प्रस्ताव विचाराधीन आहे. तसेच, लांबवरच्या कॉलेजमधील प्रवेश मिळाल्याने होणारी गैरसोय टाळण्यासाठी पूर्वीप्रमाणे विभागवार प्रवेशाचे पर्याय उपलब्ध करून देण्याचा प्रस्तावदेखील विचाराधीन आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आता संपूर्ण डोंगराचाच सर्व्हे

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पिंपरी

एक्स्प्रेस-वेवरील दरडसंकट कायमच राहिल्याने आता संपूर्ण डोंगराळ भागाचा जिऑलॉजिकल सर्व्हे करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. दरम्यान, नव्याने दरड कोसळल्यानंतर दुसऱ्या दिवशी रविवारी एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कूर्मगतीने सुरू होती. त्यातच, वीकएंड पर्यटनासाठी आलेल्या अतिउत्साही वाहनचालकांमुळे त्यात भरच पडली.

दरडसत्र सुरूच राहिल्याने एक्स्प्रेस-वेच्या सुरक्षेवर आणि राज्य सरकार व टोलवसुली करणाऱ्या आयआरबी यांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उभे राहत आहे. नागरिकांकडून त्याबाबत संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहे. म्हणूनच सार्वजनिक बांधकाम मंत्री (रस्तेविकास) एकनाथ शिंदे आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी रविवारी एक्स्प्रेस-वेवर धाव घेतली. अर्थात, त्यांच्या ताफ्यामुळे कोंडीमध्ये भरच पडली!

तज्ज्ञांच्या उपस्थितीमध्ये परिस्थितीचा आढावा घेऊन आणखी प्रभावी उपाययोजना करण्यासाठी पावले उचलण्याचा निर्णय या वेळी घेण्यात आला, अशी माहिती पाटील यांनी दिली. ठिसूळ झालेले दगड, दरडींचा धोका आणि उपाययोजना याबाबत नव्याने पाहणी केली जाणार आहे.

वाहतूक पुन्हा वळवली...

नव्याने कोसळलेल्या दरडींचे खडक दूर करण्यासाठी वाहतूक पुन्हा जुन्या मार्गावरून वळविण्यात आली. खंडाळ्याच्या दस्तुरी येथे ती पुन्हा एक्स्प्रेस-वेला जोडली आहे; तर एक्स्प्रेस-वेवरील पुण्याहून मुंबईकडील वाहतूक मुंबई ते पुणे या मार्गावरील दोन लेन खुल्या करून सोडण्यात आली. काम पूर्ण होईपर्यंत हीच व्यवस्था ठेवण्यात येईल, असे राज्य महामार्ग पोलिस अधीक्षक सुनील सोनावणे यांनी सांगितले.

एसटीच्या गाड्यांना विलंब...

एक्स्प्रेस-वेवरील एसटीच्या बसेस अर्धा ते एक तास उशिराने धावत होत्या. दरडसंकटाचा एसटीच्या सेवेवर परिणाम होऊ नये यासाठी एसटी महामंडळाकडून प्रयत्न केले जात होते. कोणत्या बसला उशीर होत आहे, कोणती बस वाहतूक कोंडीत अडकली आहे, याची माहिती घेऊन पुढील गाड्यांचे नियोजन केले जात होते. त्यामुळे प्रवाशांना कोंडीत अडकून पडावे लागले नाही, असे महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मोबाइल विक्रेत्याची फसवणूक

$
0
0

पुणेः एका व्यक्तीने शंभर 'आयफोन ६' खरेदी केल्यावर ५० आयफोन मोफत देण्याचे आमिष दाखवून एका विक्रेत्याकडून १८ लाख रुपये उकळले आणि त्याची फसवणूक करून फरार झाला. या प्रकरणी फारूख खान या विरोधात कोंढवा पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अनुभन गुप्ता (वय २१, रा. कोंढवा) गुप्ता याने फिर्याद दिली आहे. गुप्ता याचे कोंढवा येथे इलेक्ट्रो कार्डस् एंटरप्रायजेस नावाचे इलेक्ट्रॉनिकचे दुकान आहे. चीन येथून मोबाइल आणि मोबाइल अॅक्सेसरीज ऑनलाइन मागवून त्याची येथे विक्री करतात.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


गजा मारणेच्या संपत्तीचा शोध

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

कुख्यात गुन्हेगार गजा मारणे व त्याची पत्नी जयश्री यांच्या नावे पुणे जिल्ह्यात असलेल्या स्थावर व जंगम मालमत्तांचा शोध घेण्यात येत असून या कामाला गती देण्यासाठी तहसीलदारांना स्मरणपत्र देण्यात आले आहे. मारणे याच्या हवेली, मुळशी, मावळ, दौंड तालुक्यात मालमत्ता असल्याचे काही पुरावे जिल्हा प्रशासनाच्या हाती लागले आहेत.

गँगस्टर मारणे व नीलेश घायवळ यांच्या टोळीत पुण्यात वर्चस्वावरून वाद सुरू आहेत. या वादातून पुणे शहर व ग्रामीण भागात सहा महिन्यांपूर्वी खूनसत्र घडले. या टोळीयुद्धात नवी पेठेत भरदिवसा गोळ्या घालून खून करण्याच्या प्रकारामुळे तर शहरातील कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित झाला. या टोळीयुद्धाला अटकाव घालून गुन्हेगारांचा बिमोड करण्यासाठी पोलिसांनी मारणे टोळीतील गुंडांवर 'मोक्का'खाली कारवाई केली.

ही कारवाई करतानाच मारणे व त्याच्या साथीदारांच्या आर्थिक नाड्या आवळण्यासाठी त्यांच्या स्थावर आणि जंगम मालमत्तेवर टाच आणण्याच्या दृष्टीने पावले उचलण्यात येत आहे. मारणे व त्याच्या साथीदारांच्या प्रॉपर्टी शोधण्यासाठी पोलिसांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे अर्ज दिला होता. त्यानुसार गजा मारणे, त्याची पत्नी जयश्री व भाऊ यांच्या नावावर शहर व ग्रामीण भागात असलेल्या मालमत्तांचा शोध घेण्यात येत आहे. मारणे व त्याच्या कुटुंबाची हवेली, मुळशी, मावळ, दौंड व इंदापूरमध्ये मालमत्ता असल्याचे पुरावे मिळाले आहेत. त्याची सत्यता पडताळून त्याची माहिती तातडीने द्यावी, असे पत्र जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत संबंधित तहसीलदारांना नुकतेच पाठविण्यात आले आहे.

प्रसंगी प्राप्तिकर विभागाचीही घेणार मदत...

वाममार्गाने मिळविलेल्या संपत्तीमधून गँगस्टर हे गुन्हेगारांची 'कंपनी' चालवतात. या गँगस्टरच्या आर्थिक नाड्या आवळल्यावर त्यांच्या कारवायांना मर्यादा येतात. त्यामुळेच गजा मारणे आणि त्याचे साथीदार रूपेश मारणे, संतोष शेलार, सुनील बनसोडे व सागर रजपूत यांच्याही प्रॉपर्टी जप्त करण्याच्या दृष्टीने हालचाली करण्यात येत आहेत. मारणे याने कमावलेली मालमत्ता कोठून आली, याचा तपास पोलिसांनी सुरू केला आहे. त्यासाठी प्रसंगी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, प्राप्तिकर विभागाचीही मदत घेण्यात येत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

लिफ्टमध्ये अडकलेल्या सात जणांची सुटका

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

फर्ग्युसन कॉलेजसमोरील एका पाच मजली इमारतीची लिफ्ट अचानक बंद पडल्याने सात जण पाऊण तास अडकून पडल्याची घटना सोमवारी दुपारी घडली. अनेक प्रयत्न केल्यानंतरही लिफ्टचा दरवाजा न उघडल्याने अखेर फायरब्रिगेडला पाचारण करण्यात आले. जवानांनी दरवाजा उचकटून नागरिकांना बाहेर काढले.

भागवत जावळे, सुखदेव चांदणे, माया चांदणे, राजेश सूर्यवंशी, सुप्रिया लोखंडे, प्रथमेश उपाध्ये आणि कुंडळे (पूर्ण नाव नाही) हे सात जण लिफ्टमध्ये अडकले होते. फर्ग्युसन कॉलेजसमोरील शिरोळे रस्त्यावर मार्शल कॉम्प्लेक्स नावाची पाच मजली इमारत आहे. या इमारतीमध्ये विविध कामानिमित्त हे सर्वजण आले होते. ही घटना एक वाजण्याच्या सुमारास घडली. या घटनेनंतर इमारत व्यवस्थापनाने लिफ्ट निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या तंत्रज्ञांनाही पाचारण केले होते. लिफ्टमध्ये क्षमतेपेक्षा अधिक व्यक्तींचा समावेश असल्याने लिफ्ट बंद पडल्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली.

लिफ्ट अडकल्याचे कळाल्यानंतर आमच्यातील एकाने अलार्मचे बटण दाबले. सर्वजण मदतीच्या अपेक्षेने आवाज देत होते ; परंतु बाहेरून काहीच प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे आम्ही अडकल्याचे कोणाला कळाले आहे की नाही, याची शंका वाटली. साधारण १५ मिनिटांनी सुरक्षारक्षकाकडून प्रतिसाद मिळाल्याने जरा हायसे वाटले. लिफ्टमध्ये फॅन सुरू असल्याने काही त्रास झाला नाही,' असे भागवत यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बीआरटी हवी; परंतु सदोष नको

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

'पुणेकरांना बीआरटी हवी आहे; परंतु ती सदोष नको. त्यामुळे आता नव्याने सुरू करण्यात येणाऱ्या संगमवाडी ते विश्रांतवाडी दरम्यानची बीआरटी योजना आणि भविष्यात प्रस्तावित असलेल्या अनेक योजनांचा 'सातारा रोड' होणार नाही, याची काळजी प्रशासनाने घेतली पाहिजे,' असा सूर सजग नागरी मंचप्रणित पीएमपी प्रवासी मंचाने आयोजित केलेल्या चर्चासत्रात उमटला.

पीएमपी प्रवासी मंचातर्फे बीआरटी नवीन मार्ग सुरू करण्याची, पूर्वीप्रमाणेच धोकादायक घाई होत आहे का, या चर्चासत्राचे रविवारी आयोजन करण्यात आले होते. पीएमपीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मयुरा शिंदेकर, पेडेस्ट्रीयन फर्स्टचे अध्यक्ष प्रशांत इनामदार, परिसरचे सुजित पटवर्धन, सामाजिक कार्यकर्त्या कनीझ सुखरानी, मंचाचे प्रमुख जुगल राठी व विवेक वेलणकर आदी यावेळी उपस्थित होते.

'कात्रज- हडपसर या मार्गावर शहरातील पहिला बीआरटी प्रकल्प राबविण्यात आला. गेल्या काही वर्षात या मार्गावर करण्यात आलेल्या प्रयोगांमुळे येथील बीआरटी योजनेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. स्वारगेट, धनकवडी, मगरपट्टा येथे उड्डाणपूल उभारण्यात आले. त्यामुळे काही महिन्यांपासून येथे बीआरटी कार्यान्वित नाही. ही योजना फसली आहे,' असे मत तज्ज्ञांनी मांडले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पुण्याच्या ‘स्मार्ट’नेसवर कारभाऱ्यांची वक्रदृष्टी

$
0
0

सुनीत भावे, पुणे

केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी 'स्मार्ट सिटी' योजनेत अंतर्भाव व्हावा, यासाठी सुरुवातीपासून विविध स्तरांवर उपाययोजना करणाऱ्या पुण्याच्या प्रयत्नांवर राज्य सरकारच्या 'ओव्हर-स्मार्ट' निर्णयाने पाणी फिरण्याची वेळ येण्याची चिन्हे आहेत. केंद्र आणि राज्यात एकाच पक्षाचे सरकार असूनही शहराचा मेट्रो प्रकल्प अद्याप प्रलंबित असताना, स्मार्ट सिटीत पिंपरी-चिंचवडसह केलेल्या समावेशाने या दोन्ही शहरांकडे राज्यातील नव्या सत्ताधाऱ्यांची 'वक्रदृष्टी'च राहणार असल्याचे स्पष्ट होते.

केंद्राने स्मार्ट सिटी योजना जाहीर केल्यापासून त्यात समावेश व्हावा, यासाठी पालिकेतर्फे विविध पातळ्यांवर प्रयत्न सुरू होते. लोकप्रतिनिधींचा सहभाग घेण्यासह स्मार्ट सिटी संकल्पनेत नागरिकांचा सहभाग असावा, या हेतूने विशेष वेबसाइट कार्यान्वित करण्यात आली. त्यावर, नागरिकांनीही भरभरून प्रतिसाद देत, स्मार्ट सिटीच्या दिशेने कौल दिला. स्पर्धात्मक पातळीवर घेतल्या जाणाऱ्या या केंद्राच्या योजनेत पुण्याने घेतलेला पुढाकार राष्ट्रीय पातळीवर चर्चेचा विषय ठरला. स्व-मूल्यांकनासह सादरीकरणामध्ये अग्रेसर राहूनही राज्यातील इतर शहरांच्या तुलनेत सत्ताधाऱ्यांसाठी पुणे 'डावे'च ठरल्याचे दिसून आले.

संयुक्त पुरोगामी आघाडीच्या (यूपीए) कार्यकाळातील जवाहरलाल नेहरू राष्ट्रीय नागरी पुनर्निर्माण योजनेत (जेएनएनयूआरएम) पुणे आणि पिंपरी-चिंचवडच्या प्रकल्पांना स्वतंत्रपणे मान्यता देण्यात आली होती. पीएमपी बससाठीच्या एकत्रित प्रकल्पाला मान्यता देतानाही पुणे व पिंपरी-चिंचवड महापालिकांना त्या प्रमाणात त्यांचा निधी खर्च करावा, असे बंधन घालण्यात आले होते. नदीसुधारणा, पाणीपुरवठा अशा योजनांचेही दोन्ही पालिकांचे स्वतंत्र प्रकल्प मान्य झाले होते. बीआरटीही दोन्ही ठिकाणी मान्य झाली असली, तरी त्यासाठीचा खर्च संबंधित महापालिकांनी करायचा होता. पुणे महापालिकेने सर्वाधिक प्रकल्प मंजूर करून केंद्र सरकारकडून मोठा निधी प्राप्त केला होता.

स्मार्ट सिटी योजना सर्वस्वी वेगळ्या प्रकारची असून, यामध्ये केंद्राकडून पहिल्या वर्षी दोनशे कोटी, तर त्यापुढील चार वर्षे प्रत्येकी शंभर कोटी अनुदान मिळणार आहे. केंद्राच्या अनुदानाएवढी रक्कम राज्य आणि स्थानिक स्वराज्य संस्थांना, म्हणजेच पालिकांना उभी करायची आहे. अशा स्थितीत पुणे आणि पिंपरी-चिंचवडचा एकत्रित समावेश केल्याने केंद्राकडून येणाऱ्या निधीत तर कपात होणारच आहे; पण राज्याकडून मिळणारा निधीही कमी होणार आहे. त्यामुळे, नक्की विकासाची कामे होणार कशी, अशी विचारणा केली जात आहे.

केंद्र सरकारने स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत जाहीर केलेल्या मार्गदर्शक तत्त्वांमध्येच एक शहर-एक योजना असे स्पष्ट केले आहे. त्यामुळे, ही योजना दोन शहरांत लागू करणे निव्वळ अशक्य आहे. या योजनेंतर्गत 'पॅन सिटी' म्हणजे संपूर्ण शहरातील नागरिकांना लाभदायक ठरेल, अशा प्रकल्पाचा आराखडा सादर करणे आवश्यक आहे. पुणे आणि पिंपरी-चिंचवड जुळी शहरे असले, तरी दोन्ही शहरांतील मूलभूत समस्या वेगवेगळ्या आहेत. त्यामुळे, या शहरांना एकाच तराजूने तोलणे कदापि सोयीस्कर ठरणार नाही. प्रशासकीय सोयीसाठी राज्य सरकारने दोन्ही शहरांना एकच दर्जा देण्याचा घाट घातला असला, तरी अशाने ना पुणे 'स्मार्ट' होईल, ना पिंपरी-चिंचवडला 'स्मार्ट' शहराचा दर्जा मिळेल.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अभय योजनेतून २१ कोटी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

स्थानिक संस्था कराच्या (एलबीटी) थकबाकीदारांना व्याज आणि दंडाशिवाय कर भरण्यास प्रोत्साहन देण्यासाठी राज्य सरकारच्या 'अभय योजने'तून पालिकेला २१ कोटी रुपयांचे उत्पन्न प्राप्त झाले आहे. 'अभय योजने'चा कालावधीही सरकारने वाढविला असून, आता १५ ऑगस्टपर्यंत व्यापाऱ्यांना दंडाशिवाय एलबीटी भरण्याची संधी देण्यात आली आहे.

भारतीय जनता पक्षाने निवडणुकीदरम्यान एलबीटी रद्द करण्याचे आश्वासन दिले होते. त्यानुसार, सत्तेत आल्यानंतर एक ऑगस्टपासून एलबीटी मर्यादा वाढविण्यात आली असून, बहुतेक व्यापाऱ्यांना त्यापासून दिलासा मिळणार आहे. तसेच, एलबीटी लागू झाल्यापासून एक रुपयाचाही कर पालिकेकडे जमा न करणाऱ्या व्यापाऱ्यांसाठी अभय योजना लागू करण्यात आली होती. त्याअंतर्गत, आजवरचा सर्व कर भरणे बंधनकारक करून, त्यावरील व्याज व दंड माफ करण्यात आले होते. ही योजना ३१ जुलैपर्यंत असेल, असे सरकारने स्पष्ट केले होते; पण या योजनेला १५ दिवसांची मुदतवाढ देण्याचे आदेश सरकारने नुकतेच काढले आहेत. त्यामुळे, आतापर्यंत कर न भरणाऱ्या व्यापाऱ्यांना १५ ऑगस्टपर्यंत कर जमा करता येणार आहे.

राज्य सरकारने जाहीर केलेल्या अभय योजनेचा लाभ सुमारे दोन हजार व्यापाऱ्यांनी घेतला. अभय योजनेतून पालिकेला २१ कोटी रुपयांचे उत्पन्न प्राप्त झाले आहे. त्यामुळे, जूनचे एलबीटीचे उत्पन्न ११८ कोटी रुपयांवर पोहोचले आहे. तसेच, गेल्या तीन वर्षांत पहिल्या तिमाहीतील ३१० कोटी रुपयांचे सर्वाधिक उत्पन्न पालिकेला प्राप्त झाले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images