Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

काँग्रेसचा सरकारवर हल्लाबोल

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

'राज्यातील सरकारने जनतेचा विश्वास गमावला असून, सरकारची कारभारावरची 'ग्रिप'ही सुटत चालली आहे,' अशी टीका माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी गुरुवारी पुण्यात केली. 'विधिमंडळाच्या अधिवेशनात जनतेच्या प्रश्नांवरील चर्चा टाळण्याचा प्रयत्न केला, तर आम्ही सभागृह चालू देणार नाही,' असा इशाराही त्यांनी दिला.

शेतकऱ्यांच्या समस्या आणि राज्यातील अन्य प्रश्नांवर काँग्रेसने प्रत्येक जिल्ह्यात आंदोलनांचे आयोजन केले होते. त्यामध्ये चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष विश्वजित कदम, आमदार संग्राम थोपटे, दीप्ती चवधरी, उपमहापौर आबा बागूल, विरोधी पक्षनेते अरविंद शिंदे, शहराध्यक्ष अभय छाजेड, जिल्हाध्यक्ष देविदास भन्साळी, पिंपरी-चिंचवडचे अध्यक्ष सचिन साठे, तसेच उल्हास पवार, बाळासाहेब शिवरकर, चंद्रकांत छाजेड, मोहन जोशी, गोपाळ तिवारी, अजित आपटे, संजय बालगुडे व अन्य पदाधिकारी यामध्ये सहभागी झाले होते. 'अनेक आश्वासने देऊन सत्तेवर आलेल्या सरकारकडून जनतेचा घोर अपेक्षाभंग झाला आहे. सरकारमधील मंत्रीच मुख्यमंत्र्यांच्या गृहखात्यावर टीका करू लागले असून, कोणाचा पायपोस कोणाला नाही, अशी स्थिती निर्माण झाली आहे. एकीकडे मंत्री टीका करीत असून, दुसरीकडे मित्रपक्ष हल्ले चढवत आहेत. शिवसेनेने भाजपवर केलेल्या टीकेत नक्कीच तथ्य आहे,' असे चव्हाण म्हणाले. तसेच, 'केंद्र आणि राज्यातील अनेक मंत्र्यांचे घोटाळे बाहेर येऊ लागले असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यावर मौन धारण करून परदेशवाऱ्याच करत आहेत,' अशी टीका त्यांनी केली. 'महिला-बालविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी मुख्यमंत्र्यांनी केलेला नियम गुंडाळून एकाच दिवसात २०६ कोटी रुपयांच्या खरेदीचे आदेश कसे दिले, याचे उत्तर मुख्यमंत्र्यांनी दिले पाहिजे,' अशी मागणी त्यांनी केली.

'मंत्र्यांची उद्धट विधाने'

शेतकऱ्यांचे प्रश्न बिकट होत चालले असून, त्यांना कर्जमाफी देण्याऐवजी मंत्र्यांकडून 'साखर कारखानदार सरकारचे जावई आहेत काय,' अशी उद्धट विधाने सुरू आहेत. 'हा राज्यातील शेतकऱ्यांचा अपमान आहे. अवकाळी पाऊस आणि दुष्काळासारख्या आपत्ती आणि शेतीमालाचे दर कोसळल्यामुळे शेतकरी संकटात असून, यापूर्वी यूपीए सरकारने दिलेल्या कर्जमाफीप्रमाणे या सरकारने संपूर्ण कर्जमाफी दिली पाहिजे,' अशी मागणी चव्हाण यांनी केली. दरम्यान, हे अवकाळी सरकार असून, त्याने राज्यातील जनतेचे मोठे नुकसान केल्याची टीका उल्हास पवार यांनी केली.

मानापमानाचे नाट्य

अनेक दिवसांनंतर काँग्रेसचे सर्व नेते या आंदोलनाच्या निमित्ताने रस्त्यावर उतरल्याचे चित्र गुरुवारी दिसून आले. परंतु, तेथेही नेत्यांमध्ये मानापमानाचे नाट्य रंगला. आमदार संग्राम थोपटे यांना व्यासपीठावर जाताना अडवण्यात आल्याने ते नाराज होऊन आंदोलनातून निघून गेले. या प्रसंगाची चर्चा कार्यकर्त्यांमध्ये सुरू होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


आभूषणांचा चोर सापडला

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

अखिल मंडई गणपती मंडळाच्या शारदा-गजाननाच्या मंदिरातील आभूषणांची चोरी कोथरूड येथील एका नशेखोराने केल्याचे दुसऱ्या दिवशी गुरुवारी उघडकीस आले. मुलाने ही चोरी केल्याचे लक्षात आल्यावर त्याच्या वडिलांनी पोलिसांत ही माहिती दिली आणि दागिने परत केले. मात्र, काही दागिने चोरट्याकडेच राहिले आहेत. पोलिसांनी चोरट्याला ताब्यात घेतले असून, त्याच्या हाताला दुखापत झाली असल्याने त्याला ससून रुग्णालयात दाखल केले आहे.

विजय नारायण कुडले (रा. शास्त्रीनगर) असे या चोरट्याचे नाव आहे. गुरुवारी सकाळी त्याच्या वडिलांनी पोलिसांना ही माहिती दिली. सोन्याच्या दोन साखळ्यांसह ते कोथरूड पोलिस ठाण्यावर हजर झाले. 'माझ्या मुलाने दागिन्यांची चोरी केली असण्याची शक्यता आहे. त्यातील हे दागिने मी आणले असून, त्याला घरात कोंडून ठेवले आहे,' असे त्याने वरिष्ठ पोलिस निरीक्षक नितीन भोसले पाटील यांना सांगितले. तपास पथकाचे फौजदार हर्षल कदम यांनी तत्काळ नारायण कुडले यांचे घर गाठले. मात्र, पोलिस पोहोचण्याच्या आधीच विजय घरातून दागिन्यांसह सटकला होता.

आणखी दागिन्यांचा शोध सुरूच

मंडई येथील शारदा-गजानन मंदिरात चोरी केलेला विजय कुडले गुरुवारी शिवाजीनगर कोर्टात नळ चोरण्यासाठी गेला असता पकडला गेला. मंदिरातून मोहनमाळ, गंठण, हार अशी सुमारे ४४ लाख रुपयांची आभूषणे चोरीस गेली होती. त्यांपैकी दोन साखळ्या जप्त झाल्या आहेत. बहुतांश आभूषणे घेऊन कुडलेने घरातून पळ काढला. नशेत असलेल्या कुडलेने उर्वरित आभूषणांची माहिती अद्याप दिलेली नाही.

कुडलेने या पूर्वी कोर्टात प्लंबिंगची कामे केली आहेत. गुरुवारी दुपारी तो शिवाजीनगर कोर्टात पोहोचला. तेथे त्याने दिवाणी कोर्टाच्या इमारतीतील नळ चोरण्याचा प्रयत्न केला. ही घटना पाहणारे कर्मचारी गुजर यांनी त्याला पकडून कोर्टातील चौकीत नेले. चौकीतील वरिष्ठ पोलिस निरीक्षक सचिन सावंत यांनी कुडलेला पाहताच मंदिरातील चोरटा असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी त्याच्याकडून नारायण कुडलेंचा नंबर घेतला. त्यांच्याकडे खातरजमा केल्यानंतर कुडलेला पोलिस आयुक्तालयात नेण्यात आले. सहआयुक्त सुनील रामानंद यांनी त्याच्याकडे विचारपूस केली. विश्रामबाग पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक हेमंत भट यांनी त्याला ताब्यात घेतले. अटकेच्या वेळी कुडले नशेत होता. त्याच्या हाताला फ्रॅक्चर झाल्याने त्याला ससूनमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. उपचारानंतर त्याला चोरीच्या गुन्ह्यांत अटक करण्यात येणार आहे, अशी माहिती उपायुक्त तुषार दोशी यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सरकारबरोबर वाहत जाणार नाही: सेना

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

'सरकारबरोबर वाहत जाणार नाही. अन्याय असेल तेथे खंबीर भूमिका घेऊ,' असे सांगून राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी सरकारला घरचा आहेर दिला. पर्वती दर्शन येथे घडलेल्या दंगलीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेने पोलिस आयुक्तालयावर मोर्चा काढला होता. या मोर्चात सहभागी होऊन शिवतारे यांनी कार्यकर्त्यांना संयमाने काम करण्याचा सल्लाही दिला.

शिवसेनेचे शहरप्रमुख माजी आमदार विनायक निम्हण यांच्या नेतृत्वाखाली मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी शिवसेनेचे गटनेते अशोक हरणावळ, शहर संघटक अजय भोसले, युवा सेनेचे शहर प्रमुख किरण साळी आदी या वेळी उपस्थित होते. पोलिसांनी आयुक्तालयाच्या दिशेने येणारे सर्व रस्ते वाहतुकीसाठी बंद करण्यात आले होते.

'शहरात नुकत्यात घडलेल्या वेगवेगळ्या घटनांमागे कट दिसतो आहे. कार्यकर्त्यांना संयमाने काम करावे लागेल. सरकारचा प्रतिनिधी म्हणून मोर्चात निवेदन स्वीकारण्यासाठी आलो आहे; मात्र सरकारबरोबर वाहत जाणार नाही. अन्याय असेल तेथे खंबीर भूमिका घेऊ. गुंडाच्या मांडीला मांडी लावून पोलिस अधिकारी बसत असतील, तर त्यांना घरी पाठवले जाईल. कार्यकर्त्यांवर खोटे गुन्हे दाखल करू नका,' अशा सूचना करतानाच त्यांनी कोणाचाही उन्माद सहन केला जाणार नसल्याचा इशारा दिला.

शिवसेनेने गुरुवारी दुपारी बाराच्या सुमारास लाल देवळापासून मोर्चा काढण्यात येणार असल्याचे जाहीर केले होते. त्यानुसार पोलिसांनी पोलिस आयुक्तालयाच्या दिशेने येणारे रस्ते बंद केले होते. मोर्चाला लाल देवळासमोर थांबवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. पोलिस सहआयुक्त सुनील रामानंद, पोलिस उपायुक्त डॉ. सुधाकर पठारे यांच्यासह गुन्हे शाखेतील अधिकाऱ्यांचा फौजफाटा मोठ्या प्रमाणात तैनात होता. शिवतारे हे राज्य सरकाचे प्रतिनिधी म्हणून मोर्चात सहभागी झाले होते. त्यांनीच निम्हण आणि इतरांकडून निवेदन स्वीकारले. त्यानंतर सर्किट हाउस येथे पोलिस अधिकारी आणि प्रमुख कार्यकर्त्यांसमवेत बैठक घेऊन तिन्ही घटनांचा आढावा घेतला.

पोलिसांची भूमिका पक्षपातीपणाची आहे. कार्यकर्त्यांवर खोटे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पोलिसांच्या चुकीच्या धोरणांमुळेच शहरातील कायदा-सुव्यवस्था धोक्यात आली आहे. महिलांवर अत्याचाराच्या घटना घडत असताना पोलिसांनी बघ्याची भूमिका घेतली आहे. - विनायक निम्हण, शिवसेनेचे शहरप्रमुख

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विश्व साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी शेषराव मोरे

$
0
0

मटा ऑनलाइन वृत्त । पुणे

निसर्गकवी ना. धो. महानोर यांच्या नकारामुळे रखडलेली विश्व साहित्य संमेलनाच्या अध्यक्षांची निवड अखेर झाली आहे. येत्या ५ व ६ सप्टेंबर रोजी होणाऱ्या या संमेलनाच्या अध्यक्षपदी शेषराव मोरे यांची निवड झाली आहे. साहित्य महामंडळाच्या अध्यक्षा डॉ. माधवी वैद्य यांनी आज ही माहिती दिली.

स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या सुवर्णमहोत्सवी स्मृती वर्षाचे औचित्य साधून चौथे विश्व साहित्य संमेलन अंदमान येथे भरवण्याचा निर्णय साहित्य महामंडळाने घेतला आहे. स्थळाच्या निश्चितीनंतर साहित्य महामंडळाने संमेलनाच्या अध्यक्षपदासाठी सर्वप्रथम ज्येष्ठ कवी ना. धो. महानोर यांच्याकडे विचारणा केली होती. मात्र, महाराष्ट्रात दुष्काळ असताना संमेलनाचा अध्यक्ष म्हणून मिरवणे मला योग्य वाटत नसल्याचे सांगत त्यांनी नकार दिला होता. निवृत्ती न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर यांनाही अध्यक्ष होण्यास असमर्थता दर्शवली होती. अखेर महामंडळाने शेषराव मोरे, विवेक घळसासी, विनय हर्डीकर, वा. ना. उत्पात, प्र. ल. गावडे, शं. ना. नवलगुंदकर, विजय कुवळेकर अशा नावांची यादी तयार केली. त्यापैकी शेषराव मोरे यांच्या नावावर अंतिम शिक्कामोर्तब करण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

राज्यपाल दर्शनाविनाच परतले !

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

चंद्रभागा नदीच्या वाळवंटात वारकऱ्यांच्या राहुट्यांना निर्बंध घालण्याविरोधात चोपदारांनी घेतलेल्या भूमिकेमुळे राज्यपाल सी. विद्यासागर राव हे श्री संत ज्ञानेश्वर महाराज व श्री संत तुकाराम महाराज यांच्या पालख्यांचे दर्शन न घेताच परतले. या पालखी सोहळ्यात सहभागी होऊन 'माउली-तुकाराम' नामाचा जप करण्याची त्यांची इच्छा या वादामुळे अपूर्ण राहिली.

पालखी सोहळ्यात सहभागी होऊन पायी चालण्याची इच्छा राज्यपालांनी दर्शविली. त्यानुसार ते दुपारी साडेबाराच्या सुमारास राजभवनात आले. पण त्याचवेळी वारीमध्ये पंढरपूरच्या चंद्रभागा नदीत राहुट्या टाकण्यास व खेळ करण्यास निर्बंध घालण्याच्या हायकोर्टाच्या निर्णयावरून वाद सुरू झाला. वारीतील दिंडीकर व चोपदारांनी या निर्णयाविरोधात आपला निषेध नोंदवित संगमवाडी येथील विसाव्याच्या जागेवर या विरोधात त्यांनी सुमारे दीड तास ठिय्या आंदोलन केले.

सोहळा प्रमुख व दिंडीप्रमुखांनी हा वाद तात्पुरता बाजूला ठेऊन राज्यपालांना वारीमध्ये सहभागी करून घेण्यासाठी विभागीय आयुक्त एस. चोक्कलिंगम, पोलिस आयुक्त के. के. पाठक व जिल्हाधिकारी सौरव राव हे प्रयत्न करीत होते. जिल्हाधिकारी राव यांनी चोपदारांशी संवाद साधला आणि त्यांना हात जोडून विनंती केली. राज्यपालांना वारीमध्ये चालत सहभागी व्हायचे आहे. हायकोर्टाच्या निर्णयाचा वाद घालण्याची ही वेळ नाही. हा विषय तात्पुरता बाजूल ठेवा आणि राज्यपालांना सोहळ्यात सहभागी करा अशी विनंतही त्यांनी केली. मात्र, चंद्रभागा नदीच्या वाळवंटात परंपरेने राहुट्या पडतात. सोहळ्याचे खेळ तेथे होतात आणि त्यावर निर्बंध आणण्याचे कारण काय असा सवाल करीत चोपदार आपल्या भूमिकेशी ठाम राहिले. सरतेशेवटी आपल्यामुळे कोणतेही नवे वाद उदभवू नयेत म्हणून राज्यपाल विद्यासागर राव यांनी पालखी सोहळ्यात सहभागी न होण्याचा निर्णय घेतला आणि दुपारी साडेचारच्या सुमारास ते गाडीने मुंबईला रवाना झाले.

मुख्यमंत्र्यांसमवेत बैठक घेणार : विजय शिवतारे

चंद्रभागेच्या वाळवंटी वारकऱ्यांच्या राहुट्या टाकण्यावर निर्बंध घातल्याप्रकरणी वारकरी आणि मुख्यमंत्री यांच्यामध्ये चर्चा घडवून आणण्याचे आश्वासन राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी दिले. त्यानंतर माउलींच्या पालखी सोहळ्यादरम्यान संगमवाडी विसाव्याच्या ठिकाणी पुकारण्यात आलेले ठिय्या आंदोलन वारकऱ्यांनी मागे घेतले. वारीमध्ये ठिय्या आंदोलन सुरू करण्यात आल्याची माहिती कराड येथे असलेल्या शिवतारे यांना समजली. त्यानंतर वारीप्रमुखांशी चर्चा करून त्यांनी हे आश्वासन दिले. 'या प्रश्नी तोडगा काढण्यासाठी १५ दिवस आहेत. मुख्यमंत्र्यांसमवेत आपली १२ तारखेला बैठक आहे. त्या वेळी या संदर्भात चर्चा करून हा विषय मार्गी लावण्यात येईल. हायकोर्टातदेखील या संदर्भात परस्पर समन्वयाने निर्णय घेण्यासाठी प्रयत्न केले जातील, असे आश्वासन आपण वारकऱ्यांना दिले, अशी माहिती शिवतारे यांनी 'मटा'ला दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बंद रस्ते खुले करण्याची मागणी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

लष्कराकडून बंद करण्यात आलेले रस्ते पुन्हा खुले करण्याची मागणी सर्वपक्षीय नगरसेवकांनी बोर्डाचे अध्यक्ष ब्रिगेडियर ए. के. त्यागी यांच्याकडे केली. मात्र, या मागणीकडे काणाडोळा करण्यात आल्याने या प्रश्नाचे भिजत घोंगडे कायम राहिले आहे.

'लष्कराकडून प्रमुख रस्ते बंद करण्यात आल्याने नागरिकांची अडचण होत आहे. त्यामुळे हे रस्ते खुले करा,' अशी मागणी सर्वपक्षीय नगरसेवकांनी बोर्डाच्या बैठकीत केली. बैठकीला बोर्डाच्या उपाध्यक्षा डॉ. किरण मंत्री, भाजपचे नगरसेवक विवेक यादव, अतुल गायकवाड, दिलीप गिरमकर, नगरसेविका प्रियांका श्रीगिरी, काँग्रेसचे नगरसेवक विनोद मथुरावाला, अशोक पवार आदी उपस्थित होते.

त्यागी बोर्डाचे अध्यक्ष आणि लोकल मिलिटरी अॅथॉरिटीच्या (एल​एमए) पुणे सब एरियाचे प्रमुख म्हणूनही कारभार पाहतात. बोर्डाच्या हद्दीतील रस्ते बंद करण्याचे आदेश 'एलएमए'कडूनच देण्यात आले आहेत. त्यामुळे हे रस्ते पुन्हा खुले करण्यासाठी नगरसेवकांनी आग्रह धरला. मात्र, या मागणीकडे दुर्लक्ष करण्यात आले. रस्ते खुले करण्याबाबतचे आश्वासन संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांनी दिले होते.

पेशंटना होतोय त्रास

घोरपडीतील एलाइट लाइन रस्ता आणि वानवडी बाजार येथील राइट फ्लँग रस्ता हे रस्ते अद्याप बंद ठेवण्यात आले आहेत. घोरपडीतील अलेक्झांडर रस्ता आणि नेहरू रस्ता हे दोन रस्ते खुले करण्यात आले आहेत. एलाइट लाइन रस्ता बंद असल्याने नागरिकांना स्मशानभूमीकडेही जाता येत नाही. राइट फ्लँक रस्त्यावर भिंत बांधून हा रस्ता बंद करण्यात आला आहे. त्यामुळे शालेय विद्यार्थी आणि सरदार वल्लभभाई पटेल हॉस्पिटलकडे जाणाऱ्या पेशंटना त्रास होत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कचऱ्यासाठी ‘पणजी मॉडेल’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

पुणे कँटोन्मेंट बोर्ड कचरामुक्त करण्यासाठी कचऱ्याचे पाच प्रकारांमध्ये वर्गीकरण करून त्याद्वारे खत निर्मिती आणि कचऱ्याच्या पुनर्वापराला चालना देणारे 'पणजी मॉडेल' प्रायोगिक तत्त्वावर राबविण्याचा निर्णय बोर्डाने घेतला आहे. पहिल्या टप्प्यात ठराविक सोसायट्यांची निवड करण्यात येणार असून, त्यामध्ये मॉडेल यशस्वी ठरल्यानंतर संपूर्ण बोर्डाच्या परिसरात या मॉडेलची अंमलबजावणी होणार आहे.

दक्षिण मुख्यालयांतर्गत येणाऱ्या १९ कँटोन्मेंट बोर्डाच्या हद्दीत गोव्यातील 'पणजी मॉडेल' राबविण्याचे नियोजन आहे. त्यासाठी कँटोन्मेंट बोर्डांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी नुकतीच गोव्यात भेट देऊन या मॉडेलची पाहणी केली आहे; तसेच प्रिन्सिपल डायरेक्टर ऑफ डिफेन्स इस्टेट (पीडीडीई) यांनी नऊ एप्रिल २०१५ रोजी पुणे कँटोन्मेंटमधील नगरसेवकांची बैठक घेतली होती. त्यामध्ये कँटोन्मेंटसाठी घनकचऱ्याचे मॉडेल राबविण्याबाबत चर्चा झाली होती. त्यानुसार बोर्डाच्या बैठकीत प्रायोगिक तत्त्वावर 'पणजी मॉडेल'ची अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

प्रायोगिक तत्त्वावर राबविण्यात येणाऱ्या या मॉडेलसाठी ठराविक सोसायट्यांची निवड केली जाणार आहे. त्यांना पाच वेगवेगळ्या प्रकारच्या पिशव्या किंवा बकेट दिले जाणार आहेत. नागरिकांनी त्याप्रमाणे कचरा वेगवेगळा करून बोर्डाच्या सफाई कर्मचाऱ्यांकडे देणे आवश्यक असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

काच आणि धातू, जैव वैद्यकीय, बांधकाम, अन्न आणि पालापाचोळ्याचा कचरा अशा स्वरूपातील ओला आणि सुका कचरा असतो. त्यापैकी काही कचऱ्याचा पुनर्वापर होतो, तर काही कचऱ्याचा पुनर्वापर होत नाही. प्रत्येक पिशवीवर क्रमांक देण्यात आलेले असल्याने नागरिकांनी त्याप्रमाणे कचरा हा पिशव्यांमध्ये टाकणे अपेक्षित आहे. पणजीमध्ये हे मॉडेल यशस्वी ठरले असल्याने पुणे कँटोन्मेंटमध्ये प्रायोगिक तत्त्वावर या मॉडेलची अंमलबजावणी होणार आहे. या मॉडेलबाबत नागरिकांमध्ये जनजागृतीही केली जाणार आहे. नागरिकांना माहिती दिल्यानंतरच मॉडेल राबविले जाणार असल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बोपोडीच्या अरुंद रस्त्याचा त्रास

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, खडकी

'बोपोडीच्या अरुंद रस्त्यामुळे गेली अनेक वर्षे वारकऱ्यांना त्रास सहन करावा लागत असून त्यामुळे या रस्त्याचे लवकरात लवकर रुंदीकरण व्हावे,' अशी समस्त वारकऱ्यांची मागणी असल्याचे देहू संस्थानचे अध्यक्ष हभप शांताराम महाराज मोरे आणि सोहळा प्रमुख हभप सुनील महाराज मोरे यांनी सांगितले. त्यामुळे आरपीआयने सर्व आंदोलने रद्द करत पालखीचे स्वागत केले.

बोपोडीच्या रस्त्याच्या रुंदीकरणाचा प्रश्न गेल्या पंधरा ते वीस वर्षांपासून प्रलंबित आहे. पुणे महापालिका यावर ठाम निर्णय घेत नसल्यामुळे या ठिकाणी वाहतूक कोंडी नित्याचीच झाली आहे. या सर्व त्रासामुळे आरपीआयचे नेते परशुराम वाडेकर यांनी रस्ता रुंदीकरणाच्या विषयावर संत तुकाराम महाराजांची पालखी आडवण्याचा निर्णय घेऊन पुणे महापालिकेला कळवले. दरम्यान, वाडेकर यांनी देहू संस्थानालाही भेट देवून या प्रश्नाची त्यांना माहिती दिली. देहू संस्थाननेही पुणे महानगरपालिका, खडकी कॅंटोन्मेंट यांच्यासाठी रस्त्याच्या प्रश्नावर पत्र पाठवले.

देहूसंस्थानच्या पत्रामुळे महापालिका प्रशासनाला जाग आली आणि त्यांनी त्वरित बैठक घेऊन या प्रश्नावर मार्ग काढण्याचे अश्वासन दिले. त्यामुळे वाडेकरांनी त्यांचे पालखी अडविण्याचे आंदोलन रद्द करत, संत तुकारामांना साकडे घालण्याचा निर्णय घेतला. मात्र, तोही निर्णय रद्द करत त्यांनी देहू संस्थानचे अध्यक्ष आणि पालखी सोहळा प्रमुखांचे बोपोडी चौकामध्ये तुकाराम महाराजांची पगडी आणि पुष्पहार घालून स्वागत केले.

चैतन्य महाराजांच्या पालखीचे प्रस्थान

जुन्नर ः संत तुकाराम महाराजांचे गुरू चैतन्य महाराज यांच्या पालखीचे मोठ्या उत्साहात पंढरपूरकडे प्रस्थान झाले. दिंड्या पताका घेतलेले वारकरी ओतूरहून निघालेल्या पालखी सोहळ्यात मोठ्या संख्येने तल्लीन झाले होते. चैतन्य महाराजांची ओतूर येथे संजीवन समाधी आहे. येथून त्यांची पालखी पंढरपूरला जाते. त्याचे यंदा ५५ वे वर्ष आहे, अशी माहिती चैतन्य प्रासादिक भजनी मंडळाचे अध्यक्ष महादू तांबे यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


आळंदीतून प्रस्थानाला बांधकामामुळे उशीर

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पिंपरी

संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या आळंदी येथील आजोळी म्हणजे गांधी वाड्यातील पालखीच्या पहिल्या मुक्कामाच्या जवळ दर्शनबारीच्या ठिकाणी झालेल्या बांधकामाच्या मुद्यावरून पालखी मार्गस्थ होण्यास गुरुवारी उशीर झाला. देवस्थानाकडून लेखी आश्वासन घेतल्यानंतरच माउलींची पालखी मंदिरातून मुक्काच्या ठिकाणी मार्गस्थ झाली.

सालाबादाप्रमाणे पालखी सोहळ्याला उत्साहात सुरुवात झाली होती. मात्र, दर्शनबारीच्या बांधण्यात आलेल्या जिन्यावरून काही काळ वादंग उद्‍भवला होता. यावर जर तोडगा न काढल्यास पालखी पोलिस ठाण्याच्या आवारातच उतरविण्याची टोकाची भूमिका चोपदार व पालखी मालक बाळासाहेब आरफळकर यांनी बोलून दाखवली होती.

परंपरेनुसार माउलींची पालखीचे प्रस्थान झाल्यानंतर पहिला मुक्काम हा गांधी वाड्यात असतो. मात्र, यंदा झालेल्या इमारतीच्या जिन्यामुळे तेथे पालखी ठेवल्या अपुऱ्या जागेमुळे चेंगाराचेंगरी होण्याची भीती चोपदारांनी व्यक्त केली होती. कोणत्याही अडचणी व्यतिरिक्त पालखीचा पहिला मुक्काम हा गांधी वाड्यातच होणार असल्याच्या भूमिकेवर देवस्थान विश्वस्थ ठाम होते. या सर्वामुळे प्रशासनाने अखेर या प्रकरणात हस्तक्षेप केला. दुसरीकडे हा सगळा वाद आत्ताच का काढला, दर्शनबारीची इमारत उभी करत असताना पालखी मुक्कामाची जागा का निश्चित केली नाही, असा सवाल उपस्थित करत आरफळकर यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.

मानकऱ्यांनी मुक्काच्या ठिकाणी बांधण्यात आलेल्या जिन्यावरून विश्वस्तांकडे काही मागण्या केल्या. तसेच, त्याबाबतचे लेखी आश्वासन मागितले. त्यामुळे चर्चेनंतर हे लेखी आश्वासन दिल्यावर पालखी मंदिरातून मुक्काच्या ठिकाणी मार्गस्थ झाली.

श्रीमंत शितोळे सरकार, मालक बाळासाहेब आरफळकर, चोपदार, दिंडी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. या सर्वांच्या मागण्या यापूर्वीच मान्य करण्यात आल्या होत्या. बांधलेल्या जागेबाबत यंदा सहकार्य करू पण, भविष्यात येथे जिना नको अशी मागणी होती. पण त्यांना लेखी आश्वासन हवे होते. त्यामुळे या सर्वांनी प्रथम तसेच लेखी निवेदन दिले त्यानंतर तत्काळ जिल्हाधिकारी, पोलिस अधीक्षक, प्रशासकीय अधिकाऱ्यांसमोरच तत्काळ लेखी आश्वासन दिले.

- प्रा. प्र. सुरू, विश्वस्थ आळंदी देवस्थान

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

राज्यपाल दर्शनाविनाच परतले!

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

चंद्रभागा नदीच्या वाळवंटात वारकऱ्यांच्या राहुट्यांना निर्बंध घालण्याविरोधात चोपदारांनी घेतलेल्या भूमिकेमुळे राज्यपाल सी. विद्यासागर राव हे श्री संत ज्ञानेश्वर व श्री संत तुकाराम महाराज यांच्या पालख्यांचे दर्शन न घेताच परतले.

पालखी सोहळ्यात सहभागी होऊन पायी चालण्याची इच्छा राज्यपालांनी दर्शविली. त्यानुसार ते दुपारी साडेबाराच्या सुमारास राजभवनात आले. पण त्याचवेळी वारीमध्ये पंढरपूरच्या चंद्रभागा नदीत राहुट्या टाकण्यास व खेळ करण्यास निर्बंध घालण्याच्या हायकोर्टाच्या निर्णयावरून वाद सुरू झाला. वारीतील दिंडीकर व चोपदारांनी या निर्णयाविरोधात आपला निषेध नोंदवित संगमवाडी येथील विसाव्याच्या जागेवर या विरोधात त्यांनी सुमारे दीड तास ठिय्या आंदोलन केले. सोहळा प्रमुख व दिंडीप्रमुखांनी हा वाद तात्पुरता बाजूला ठेऊन राज्यपालांना वारीमध्ये सहभागी करून घेण्यासाठी विभागीय आयुक्त एस. चोक्कलिंगम, पोलिस आयुक्त के. के. पाठक व जिल्हाधिकारी सौरव राव हे प्रयत्न करीत होते.

जिल्हाधिकारी राव यांनी चोपदारांशी संवाद साधला आणि त्यांना हात जोडून विनंती केली. राज्यपालांना वारीमध्ये चालत सहभागी व्हायचे आहे. हायकोर्टाच्या निर्णयाचा वाद घालण्याची ही वेळ नाही. मात्र, चंद्रभागा नदीच्या वाळवंटात परंपरेने राहुट्या पडतात. सोहळ्याचे खेळ तेथे होतात आणि त्यावर निर्बंध आणण्याचे कारण काय असा सवाल करीत चोपदार आपल्या भूमिकेशी ठाम राहिले. सरतेशेवटी आपल्यामुळे कोणतेही नवे वाद उद्‍भवू नयेत म्हणून राज्यपाल विद्यासागर राव यांनी पालखी सोहळ्यात सहभागी न होण्याचा निर्णय घेतला आणि दुपारी साडेचारच्या सुमारास ते गाडीने मुंबईला रवाना झाले. राज्यपालांना वारकऱ्यांतर्फे निवेदन देण्यात आले. राज्यपालांच्या वतीने पुणे प्रांत अधिकारी सोनप्पा यमगर यांनी निवेदन स्वीकारले.

मुख्यमंत्र्यांसमवेत बैठक घेणार : विजय शिवतारे

चंद्रभागेच्या वाळवंटी वारकऱ्यांच्या राहुट्या टाकण्यावर निर्बंध घातल्याप्रकरणी वारकरी आणि मुख्यमंत्री यांच्यामध्ये चर्चा घडवून आणण्याचे आश्वासन राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी दिले. त्यानंतर माउलींच्या पालखी सोहळ्यादरम्यान संगमवाडी विसाव्याच्या ठिकाणी पुकारण्यात आलेले ठिय्या आंदोलन वारकऱ्यांनी मागे घेतले. वारीमध्ये ठिय्या आंदोलन सुरू करण्यात आल्याची माहिती कराड येथे असलेल्या शिवतारे यांना समजली. त्यानंतर वारीप्रमुखांशी चर्चा करून त्यांनी हे आश्वासन दिले. 'या प्रश्नी तोडगा काढण्यासाठी १५ दिवस आहेत. मुख्यमंत्र्यांसमवेत आपली १२ तारखेला बैठक आहे. त्या वेळी या संदर्भात चर्चा करून हा विषय मार्गी लावण्यात येईल. हायकोर्टातदेखील या संदर्भात परस्पर समन्वयाने निर्णय घेण्यासाठी प्रयत्न केले जातील, असे आश्वासन आपण वारकऱ्यांना दिले, अशी माहिती शिवतारे यांनी 'मटा'ला दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

संगमवाडीत वारकऱ्यांचा ‘ठिय्या’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पिंपरी

चंद्रभागा नदीचे पावित्र्य आणि स्वच्छता अबाधित राखण्यासाठी हायकोर्टाने चंद्रभागेच्या वाळवंटामध्ये वारकऱ्यांच्या राहुट्या आणि तंबू उभारण्यास मज्जाव केलाय. याच्या पार्श्वभूमीवर संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांची (माउली) पालखी पुणे शहरात दाखल झाल्यानंतर चोपदार-मानकऱ्यांनी संगमवाडी येथील विसावा ठिकाणी शुक्रवारी ठिय्या आंदोलन केले. जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी राजाभाऊ चोपदार यांच्याशी फोन वरून चर्चा केल्यावर पालखी मार्गस्थ झाली.

गेल्या ३ ऑगस्ट २०१४ रोजी कोर्टाने हे निर्देश पारित केलेत. ऐन आषाढी वारीच्या तोंडावर वारकऱ्यांच्या रुढी परंपरेवर गंडांतर आल्याने, वारकऱ्यांनी या निर्णयावर फेरविचार करण्याची मागणी राज्य सरकारकडे केली होती. वारकऱ्यांच्या तगाद्यामुळे राज्य सरकारने कोर्टात धाव घेवून वारी दरम्यान आठ दिवसांची तात्पुरती सवलत मिळविली होती. आता हा विषय पुन्हा ऐरणीवर आला असून, स्थानिक प्रशासकीय यंत्रणेने या आषाढीमध्ये कोर्टाच्या निर्देशाची कडक अंमलबजावणी करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. वाळवंटाऐवजी प्रशासनाने नदीच्या पैलतीरावर वारकऱ्यांना राहुट्या आणि तंबू उभारण्याची व्यवस्था केली आहे. पण वारकऱ्यांनी अन्यत्र स्थलांतरित होण्यास नकार दिला आहे.

वारकरी सांप्रदयाच्या रुढी परंपरा अबाधित राखण्यासाठी कोर्टाच्या निर्णयाविरोधात पालखी सोहळ्यादरम्यान उग्र आंदोलन करू असा, इशारा वारकरी-फडकरी-दिंडीकरी समाज संघटनेचे अध्यक्ष हभप ज्ञानेश्वर जळगावकर महाराज यांनी नुकताच पंढरपूरात दिला आहे. दरम्यान, शिवतारे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी याबाबत चर्चा करून तोडगा काढणार असल्याचे आश्वासन मानकरी-चोपदार यांना दिले. काही वेळातच आंदोलनानंतर फोन आल्यानंतर पालखी मार्गस्थ झाली. रविवारी (१२ जुलै) मुख्यमंत्री फडणवीस वारीत सहभागी होण्याची शक्यता आहे. त्यावेळेस याबाबत चर्चा करण्यात येणार आहे. तसेच, मागणी मान्य न झाल्यास आंदोलनाची दिशा ठरविणार असल्याची प्रतिक्रिया चोपदारांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पुण्यनगरीत लोटला भक्तिसागर

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पिंपरी

खांद्यावर भगवी पताका, डोक्यावर तुळशी वृंदावन, टाळ-मृदंगांचा गजर आणि मुखी हरिनाम अशा भक्तिरसात चिंब झालेल्या वातावरणात जगतगुरू संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचे पुणेकरांनी मोठ्या भक्तिभावाने पालखीचे स्वागत केले.

जगद्‍गुरू संत तुकाराम महाराजांची पालखी शुक्रवारी (१० जुलै) आकुर्डीतील श्री विठ्ठल मंदिरातून मार्गस्थ झाली. पहाटे चार वाजता आयुक्त राजीव जाधव यांच्या हस्ते पूजा झाली. कुटे परिवाराने या महापूजेचे नियोजन केले होते. त्यानंतर पहाटे पाचला पालखीने पुण्याच्या दिशेने प्रस्थान केले. खंडोबामाळ, काळभोरनगर, चिंचवड स्टेशन, पिंपरी चौक, खराळवाडी, वल्लभनगर, कासारवाडी, फुगेवाडी, दापोडी येथे पादुकांच्या दर्शनासाठी भाविकांनी खूप मोठी गर्दी केली होती. सर्वच रस्ते वारकऱ्यांच्या गर्दीने फुलले होते.

मुक्कामाच्या वेळी आकुर्डी गावातील शाळा मंदिरे, सामाजिक संस्थांच्या इमारतींमध्ये वारकऱ्यांची राहण्याची सोय करण्यात आली होती. रात्री उशिरापर्यंत मंदिरात टाळ-मृदुंगाच्या गजरात अभंग, भारुड, भजन रंगले होते. एच. ए. कॉलनीच्या आवारातील मंदिरातील विसावा झाल्यानंतर पालखी पुढे मार्गस्थ झाली. वल्लभनगर, नाशिकफाटा, कासारवाडी, फुगेवाडी, दापोडी येथे पालखीचे स्वागत झाले. रांगळ्यांच्या पायघड्या, पुष्पवृष्टीने पालखीचे स्वागत करण्यात आले.

खराळवाडी येथील एच. ए. कंपनीच्या आवारीतल विठ्ठल मंदिरात पालखीने काही काळ विश्रांती घेतली. यावेळी नगरसेवक अरुण बोऱ्हाडे व त्यांच्या पत्नी गीतांजली बोऱ्हाडे यांच्या हस्ते पालखीची महापूजा झाली. या वेळी नगरसेवक सद‍्गुरू कदम, कैलास कदम, अमिना पानसरे, काँग्रेसचे शहराध्यक्ष सचिन साठे, विठ्ठल रुक्मिणी मंदिर पूजापाठ समितीचे सदस्य आदी उपस्थित होते. या वेळी वारकऱ्यांना प्रसादाचे वाटप करण्यात आले.

टपरी, पथारी, हातगाडी पंचायतीच्या वतीने वारकऱ्यांना रमेश आगरवाल यांच्या हस्ते केळी, बिस्किटे, लाडू आदींचे वाटप करण्यात आले. बाबा कांबळे, लक्ष्मण शेरखाने, प्रल्हाद कांबळे, रमेश शिंदे, वंदना सोनवणे, आशा कांबळे आदी उपस्थित होते. राजकीय पक्षांचे कार्यकर्ते, विविध संघटना, संस्था, सामाजिक कार्यकर्त्यांनी वारक-यांच्या सेवेसाठी कोणतीच कमी पडू दिली नाही.

पुणे शहराच्या प्रवेशद्वार असलेल्या बोपोडी गावामध्ये टाळ-मृदुंगाच्या नादात आणि ग्यानबा-तुकारामाच्या जयघोषात पालखीचे भव्य स्वागत करण्यात आले. पालखीचे पुण्यनगरीमध्ये प्रवेशापुर्वीच पावसाच्या दोन-चार सरी पडल्यामुळे समस्त वारकऱ्यांसह गावकरी सुखावले.

पालखी रथ दुपारी दोनच्या सुमारास पिंपरी-चिंचवडची हद्द सोडून मुळा नदी ओलांडून पुण्यनगरीत दाखल झाली. बोपोडी चौकामध्ये पालखीचे स्वागत पुणे महानगरपालिकेचे महापौर दत्तात्रय धनकवडे, उपमहापौर आबा बागुल, आयुक्त कुणाल कुमार यांनी केले. पालखीच्या दर्शन घेण्यासाठी रस्त्याच्या दोन्ही बाजूने मोठी गर्दी झाली होती.

वारकरी पोलिसांवर नाराज; पालखी थांबवली

बोपोडी चौकातून तुकाराम महाराजांच्या पालखीचे प्रस्थान झाल्यानंतर पालखी खडकी रेल्वेस्थानकाजवळ पोचली, त्या वेळी काही वाहने मध्येच घुसली. यामुळे पालखी सोहळ्यातील प्रमुख आणि वारकरी नाराज झाले. त्यांनी त्याच ठिकाणी पालखी थांबवण्याचा निर्णय घेतला. खडकी कॅँटोन्मेंट हद्दीतील रस्ता अरुंद आहे. हे पोलिसांना माहीत असूनही त्यांनी पालखी पुढे जाण्यापूर्वीच वाहने कशी काय सोडली यावरून वाद निर्माण झाला. शेवटी वाहतूक शाखेच्या पोलिसांनी तातडीने पालखीला मार्ग मोकळा करून दिला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दहावीचे विज्ञान दोन भागांत

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

या शैक्षणिक वर्षापासून दहावीची विज्ञान विषयाची परीक्षा दोन भागांत होईल. म्हणजे मार्च २०१६मध्ये होणाऱ्या परीक्षेसाठी विज्ञानाचे, विज्ञान-१ व विज्ञान-२ असे प्रत्येकी ४० मार्कांचे दोन पेपर असतील. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने हा निर्णय घेतला आहे.

या आधी दोन वर्षांपूर्वीपर्यंतही विज्ञानाचे प्रत्येकी ४० मार्कांचे दोन पेपर परीक्षेसाठी होते. मात्र, नंतर ते एकत्र करण्यात आले. विज्ञान विषयाच्या अभ्यासक्रमाची व्याप्ती जास्त असल्याने विज्ञानाचे दोन स्वतंत्र पेपरच घ्यावेत, अशी मागणी शिक्षक आणि विद्यार्थ्यांकडून होत होती. त्यानुसार, विज्ञानाची परीक्षा पुन्हा पूर्वीप्रमाणे दोन भागांत घेण्याचा निर्णय घेण्यात

आला आहे.

'विद्यार्थी आणि शिक्षकांच्या मागण्या आणि त्यांनी दिलेल्या प्रस्तावांवर विचार केल्यानंतर मार्च २०१६पासून दहावीच्या परीक्षेत विज्ञान विषयासाठी विज्ञान-१ आणि विज्ञान-२ असे दोन स्वतंत्र पेपर असतील, असा निर्णय आम्ही घेतला आहे; तसेच हे दोन्ही पेपर दोन स्वतंत्र दिवशी होतील, असेही ठरविण्यात आले आहे. यातील तांत्रिक बाबी अंतिम करण्याचे काम सुरू असून, ते झाल्यावर वेळापत्रक जाहीर करण्यात येईल,' अशी माहिती राज्य बोर्डाचे अध्यक्ष गंगाधर म्हमाणे यांनी दिली.

विज्ञानाच्या शिक्षकांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे. 'विज्ञानाचे पुस्तक बरेच मोठे आहे. त्याचप्रमाणे अभ्यासक्रमाची व्याप्तीही पुष्कळ आहे. त्यामुळे दोन वेगवेगळे भाग आणि दोन वेगवेगळे पेपर असणे विद्यार्थ्यांच्या दृष्टीने नक्कीच सोयीचे असेल,' अशी प्रतिक्रिया न्यू इंग्लिश स्कूल, रमणबाग शाळेतील विज्ञान शिक्षक प्रतिभा जक्का यांनी नोंदवली.

'विज्ञानाचा एकच पेपर असल्याने विद्यार्थ्यांना तो वेळेत संपवणे कठीण जात होते. यंदाच्या विज्ञान विषयाच्या निकालावरही त्याचा थोडा परिणाम जाणवतो आहे. विशेषतः सेमी-इंग्लिश पद्धतीने शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हे आव्हानात्मक ठरत होते. दोन स्वतंत्र पेपरमुळे त्यांनाही आता योग्य अवधी मिळेल,' असेही त्यांनी नमूद केले.

मार्च २०१५मध्ये घेतल्या गेलेल्या परीक्षेत विज्ञानाचा ८० मार्कांचा एकच पेपर घेण्यात आला होता. त्यासाठी तीन तास कालावधी होता. आता ४० मार्कांचे दोन पेपर, दोन स्वतंत्र दिवशी होणार आहेत. प्रत्येक पेपरसाठी दोन तास मिळतील, अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे.

मार्च २०१६पासून दहावीच्या परीक्षेत विज्ञान विषयासाठी विज्ञान-१ आणि विज्ञान-२ असे दोन स्वतंत्र पेपर असतील, असा निर्णय आम्ही घेतला आहे; तसेच हे दोन्ही पेपर दोन स्वतंत्र दिवशी होतील, असेही ठरविण्यात आले आहे.

- गंगाधर म्हमाणे, अध्यक्ष, राज्य एसएससी/एचएससी बोर्ड

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अपंगांसाठीच्या योजनांत हवा बदल

$
0
0

कुलदीप जाधव, पुणे

राज्यातील अपंगांसाठी राबविल्या जाणाऱ्या अनेक योजना कालबाह्य झालेल्या असूनही त्यामध्ये काळानुरूप बदल करण्यास प्रशासकीय पातळीवर अनास्था असल्याचे निदर्शनास आले आहे. अपंग कल्याण आयुक्तालयाकडून काही योजनांमध्ये बदल करण्याबाबतचा प्रस्ताव सरकारकडे पाठविण्यात आला आहे. मात्र, अद्याप त्या योजना कागदोपत्री सुरू असल्याने त्या प्रस्तावाबाबत कोणतीही कार्यवाही झाली नसल्याचे स्पष्ट होते. अपंग कल्याणाचा उद्देश साध्य करण्यासाठी कालबाह्य योजनांची फेररचना करून सद्यपरिस्थितीत फायदेशीर ठरतील अशा योजना राबविण्याची गरज आहे.

राज्यातील अपंग प्रवर्गासाठी अपंग कल्याण आयुक्तालयामार्फत विविध योजना राबविल्या जातात. यातील काही योजना २० ते २५ वर्षांपेक्षा जुन्या आहेत. तत्कालिन परिस्थितीचा आढावा घेत, तेव्हा या योजना आखण्यात आल्या होत्या. मात्र, गेल्या काही वर्षात शहरीकरण झपाट्याने वाढले. महागाई निर्देशांकात कितीतरी पटींनी वाढ झाली आहे. संसाधनांचा विकास झाला आहे. मात्र, अद्याप त्या योजना जून्याच गृहितकांवर सुरू आहेत. प्रशिक्षित अपंगांना स्वयंरोजगारासाठी टूल बॉक्स खरेदीसाठी एक हजार रुपये अर्थसहाय्य देण्याची योजना १९८९ मध्ये सुरू करण्यात आली. मात्र, अद्यापही त्या योजनेद्वारे एक हजार रुपयांची मदत केली जात आहे. सहायक साधनांची योजना १९९५ मध्ये सुरू झाली. त्या वेळी लाभार्थ्यांना घालण्यात आलेल्या उत्पन्नाच्या मर्यादा अजून वाढविण्यात आलेल्या नाहीत. त्यामुळे अशा योजनांचा लाभ घेण्यासाठी इच्छुक असलेल्या व्यक्ती लाभ घेऊ शकत नाहीत.

अभ्यासक्रमही कालबाह्य!

अपंग व्यक्तींना मोफत व्यवसायाभिमूख प्रशिक्षण देण्याची योजना गेल्या अनेक वर्षांपासून राबविली जाते. मात्र, या योजनेअंतर्गत अपंगांना खडू, मेणबत्ती अशा वस्तू बनविण्याचे प्रशिक्षण दिले जाते. येथील बहुतांश अभ्यासक्रम हे कालबाह्य झाले आहेत. या अभ्यासक्रमांची फेररचना करण्याबाबत तत्कालिन अपंग कल्याण आयुक्त ज्ञानेश्वर राजुरकर यांनी अभ्यासक्रमांचा आढावा घेण्यासाठी एक बैठकही घेतली होती. मात्र, त्यांच्या बदल्यानंतर तो विषय पुन्हा बारगळला आहे. कर्मशाळा या पूर्ण क्षमतेविषयी चालविल्या जाव्यात, अपंगांना त्या प्रशिक्षणाचा फायदा व्हावा, यासाठी अपंगांच्या कर्मशाळा हा विषय शिक्षण विभागाकडे हस्तांतरण करण्याची मागणी या क्षेत्रातील संस्था व संघटनांकडून केली जात आहे. अपंग कल्याण आयुक्तालयाकडे गेल्या अनेक वर्षांपासून अधिकारी व कर्मचाऱ्यांनी वानवा आहे. त्यामुळे या कर्मशाळांवर नियंत्रण ठेवणे शक्य होत नाही.

कालबाह्य योजनांमुळे निधी पडून!

वर्ष २०१४-१५ मध्ये अपंगांच्या काही योजनांसाठी तरतूद केलेला निधी खर्चाविना पडून असल्याचे समोर आले आहे. योजनांद्वारे मिळणारा लाभ किंवा सहाय्य हे तोकडे असल्यानेच लाभार्थी या योजनांचा विचार करीत नाहीत. शारीरिकदृष्ट्या अपंग व्यक्तींना लघुउद्योगांसाठी सहाय्य या योजनेसाठी एक लाख ५७ हजार रुपयांची तरतूद करण्यात आली होती. अपंग व्यक्तींच्या क्रीडा स्पर्धा आयोजित करण्यासाठी ३० लाख ८८ हजार निधी प्राप्त झाला होता. अपंग व्यक्तींना कृत्रिम अवयव देण्यासाठी ६३ हजार रुपयांचा निधी मिळाला होता. जागतिक अपंग दिन साजरा करण्यासाठी सव्वाचार लाख रुपये मिळाले होते. मात्र, या एकाही योजनेवर प्राप्त निधीतून एक पैसाही खर्च करण्यात आला नाही. तर, अपंग व्यक्तींना पुनर्वसनासाठी वित्त सहाय्य ४ लाख १८ हजार रुपये मिळाले होते. त्यापैकी केवळ ४६ हजार रुपये खर्च करण्यात आले. माध्यमिक आणि उच्च माध्यमिक परीक्षा उत्तीर्ण होणाऱ्या अपंग विद्यार्थ्यांना गुणवत्ता पुरस्कार देण्यासाठी एक लाख ५७ हजार रुपये देण्यात आले होते. त्यापैकी ९३ हजार रुपयेच खर्च केले आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

हरवलेले ‘ते’ तिघे सापडले

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

हरवलेल्या मुला-मुलींच्या शोधासाठी राबवण्यात येणारे ऑपरेशन मुस्कान यशस्वी होत आहे. गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाने आणखी तीन चिमुकल्यांचा शोध घेत त्यांना त्यांच्या पालकांच्या ताब्यात दिले आहे.

कृष्णा व्यंकटेश पत्रो (वय १५, रा. कौताला, ता. औतुलम, जि. कर्नूल, तेलंगणा), दयानंद सुरेश जाधव (९, रा. विटा, ता. करमाळा, जि. सोलापूर) आणि तुकाराम बबन गरूड (१५) अशी तिघांची नावे आहेत. गुन्हे शाखेचे अप्पर आयुक्त सी.एच. वाकडे, उपायुक्त पी. आर. पाटील, सहाय्यक आयुक्त राजेंद्र जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली सामाजिक सुरक्षा विभागाचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजकुमार वाघचवरे यांच्या पथकाने या मुलांचा शोध घेतला.

गुन्हे शाखेच्या सहायक निरीक्षक निता मिसाळ आणि फौजदार दीपक सप्रे यांच्या पथकांकडून रेल्वे स्टेशन, एस. टी स्टॅण्ड तसेच इतर ठिकाणी फिरणाऱ्या अनाथ मुलांचा शोध घेण्यात येत आहे. त्यांच्याकडे केलेल्या चौकशीतून पालकांचा शोध घेण्यात आला.

पत्रो हा ३० जानेवारी रोजी पुणे रेल्वे स्टेशनवर सापडला होता. शिवाजीनगर येथील निरीक्षण गृहात त्याला दाखल करण्यात आले होते. त्यानंतर दयानंद जाधव हा रेल्वे स्टेशनवर भटकत होता. त्याला लोहमार्ग पोलिसांनी ३१ मे रोजी निरीक्षण गृहात दाखल केले होते. गरूड हा देखील स्टेशन परिसरातच होता. वाघचवरे यांच्या पथकांनी तिघांच्याही पालकांचा शोध घेऊन त्यांची भेट घडवून आणली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


अपंग कल्याण आयुक्तांना केबिनमध्ये डांबले

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

अपंगांच्या प्रलंबित मागण्यांबाबत राज्य सरकारने दिलेले आश्वासन न पाळल्याने 'प्रहार' अपंग क्रांती आंदोलन संघटनेने अपंग कल्याण आयुक्तालयाला शुक्रवारी घेराव घातला आणि आयुक्त नरेंद्र पोयामांना त्यांच्या 'केबिन'मध्ये डांबून ठेवले. आयुक्तालय केवळ संस्थांच्या कल्याणाचे धोरण राबवित असून अपंगांकडे पूर्णपणे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप 'प्रहार'चे अध्यक्ष आमदार बच्चू कडू यांनी केला.

अपंगांच्या विविध प्रलंबित मागण्यांसंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात बैठक झाली होती. त्यावेळी अपंगांच्या मागण्या मान्य करण्याचे आश्वासन देण्यात आले होते. त्याला आता तीन महिने उलटले आहेत. मात्र, अद्याप एकाही मागणीची पूर्तता करण्यात आलेली नाही. त्याच्या निषेधार्थ संघटनेने अपंग कल्याण आयुक्तालयावर मोर्चा काढला होता. सकाळी साडेअकरा वाजण्याच्या सुमारास संघटनेच्या कार्यकर्त्यांनी संपूर्ण अपंग कल्याण आयुक्तालय ताब्यात घेतले. आयुक्तालयामध्ये आयुक्त हजर नव्हते. परिस्थितीचे गांभीर्य पाहून पोलिसांनी आयुक्तांना बोलावून घेतले. त्यानंतर आमदार कडू यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी आयुक्तांच्या केबीनचा ताबा घेतला.

दरम्यान, मुख्यमंत्र्यांकडून कोणत्याच प्रकारचा प्रतिसाद न मिळाल्याने आंदोलकांनी आयुक्तालयात वाहनाचा टायर पेटविला. त्यामुळे काही तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. त्यानंतर पोलिस बंदोबस्त वाढविण्यात आला. रात्री आठ वाजण्याच्या सुमारास मुख्यामंत्री कार्यालयाकडून फॅक्स प्राप्त झाला. त्यामध्ये 'प्रहार'ला १४ जुलैला मुंबई येथे बैठकीसाठी बोलाविण्यात आले आहे. हा फॅक्स मिळाल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले व आयुक्त नरेंद्र पोयाम यांची सुटका केली. त्यानंतर आयुक्तालयाच्या आवारात आंदोलकांकडून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.

अपंगांचे प्रश्न सोडविण्यासाठी यापूर्वीही अनेकदा आंदोलने केली. मुख्यमंत्र्यांसोबत बैठक झाली. त्यांनीही आश्वासन दिले. मात्र, पुढे काहीच झाले नाही. त्यामुळे आता १४ ला होणाऱ्या बैठकीत ठोस निर्णयांची अपेक्षा आहे. समाधान न झाल्यास पुन्हा तीव्र आंदोलन करावे लागेल.

- बच्चू कडू, अध्यक्ष, प्रहार

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आर्थिक लाभासाठी ‘आधार’ सक्ती नको

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

नागरिकांना विविध सेवा-सुविधा देण्यासाठी 'आधार कार्ड' बंधनकारक केले जात असल्याने नागरिक चेतना मंचाने त्याविरोधात सुप्रीम कोर्टात अवमान याचिका दाखल केली आहे. आर्थिक लाभासाठी 'आधार' सक्तीचे केले जाऊ नये, अशी मागणी याचिकेद्वारे करण्यात आली आहे. तसेच, 'आधार'साठी गोळा केलेल्या बायोमेट्रिक माहितीची देवाणघेवाण करण्यावरही निर्बंध लादण्यात यावेत, अशी मागणी करण्यात आली आहे.

कोणत्याही आर्थिक लाभांसाठी नागरिकांना आधार कार्ड सक्तीचे केले जाऊ नये, असे स्पष्ट निर्देश सुप्रीम कोर्टाने यापूर्वी दोन वेळा दिले आहेत. तरीही, गेल्या काही महिन्यांमध्ये केंद्र सरकार, तसेच राज्य सरकारतर्फे विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी 'आधार'ची सक्ती केली जात आहे. यातून नागरिकांमध्ये 'आधारप्राप्त' आणि 'विनाआधार' अशी विभागणी होत असून, राज्यघटनेने दिलेल्या मूलभूत अधिकारांचा भंग होत आहे, असा दावा नागरिक चेतना मंचाने केला आहे. कोर्टाने दिलेल्या आदेशांचा भंग करून आधार कार्डाची सक्ती लादली जात असल्याने त्याविरोधात गेल्या सोमवारी (६ जुलै) सुप्रीम कोर्टात अवमान याचिका दाखल करण्यात आल्याची माहिती मंचाचे अध्यक्ष मेजर जनरल (निवृत्त) एस. सी. एन. जठार यांनी दिली. केंद्र सरकारच्या इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकम्युनिकेशन, अपारंपरिक ऊर्जा मंत्रालय, कामगार मंत्रालय आणि ग्रामविकास मंत्रालयाने विविध योजनांच्या लाभार्थ्यांनी 'आधार कार्ड'चा क्रमांक देण्याचे बंधन घातले आहे. निवडणूक आयोगानेही मतदार ओळखपत्राला आधार क्रमांक जोडण्याचे बंधन घातल्याकडे सुप्रीम कोर्टाचे लक्ष वेधण्यात आले आहे. या अवमान याचिकेत, केंद्रीय सचिव प्रदीपकुमार सिन्हा, राज्याचे मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय, निवडणूक आयोगाचे मुख्य आयुक्त नसीम झैदी आणि रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर रघुराम राजन यांना प्रतिवादी करण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चांदणी चौकात विद्यार्थ्याला लुटले

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

चांदणी चौकात दुचाकीस्वार विद्यार्थ्याला अडवून त्याच्याकडील सोन्याची साखळी, मोबाइल असा सुमारे ८५ हजार रुपयांचा ऐवज लुटल्याची घटना मंगळवारी पहाटे घडली. या प्रकरणी कोथरूड पोलिस ठाण्यात जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नॉगम्बा सापम (वय २३, रा. बिबवेवाडी) यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. या प्रकरणी दोन दुचाकीवरील चौघा आरोपींविरुद्ध जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सापम हा भारती विद्यापीठात 'एमबीए'चे शिक्षण घेतो. त्याचा एक मित्र कर्वेनगर परिसरात राहतो. त्याला भेटण्यासाठी तो सोमवारी रात्री आला होता. त्यांनी पहाटे नळस्टॉपला पोहे खाल्ले. त्यानंतर तो चांदणी चौकातून कात्रज-देहुरोड बायपासने कात्रजच्या दिशेने जाण्यासाठी निघाला होता.

चांदणी चौकात हायवेच्या दिशेने जात असताना पल्सरवरील दोघांनी त्याला अडवले. त्यानंतर दुसऱ्या दुचाकीवरून आलेल्या दोघांनी त्याला मारहाण केली. त्याच्याकडील सोन्याची साखळी, मोबाइल असा सुमारे ८५ हजार रुपयांचा ऐवज हिसकावला. पोलिसांना पल्सरचा नंबर मिळाला आहे. त्याआधारे आरोपींचा शोध सुरू आहे. याशिवाय रेकार्डवरच्या गुन्हेगारांकडेही चौकशी सुरू करण्यात आली असल्याची माहिती कोथरूड पोलिस ठाण्याचे फौजदार हर्षल कदम यांनी दिली.

मारहाणप्रकरणी गुन्हा दाखल

म. टा. प्रतिनिधी, पुणे

कोथरूड येथील गोसावी वस्तीतील भारत चिकन सेंटरमध्ये दोघांना मारहाण केल्याप्रकरणी अलंकार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मेघराज आदमाने (वय ३०, रा.गोसावी वस्ती,कोथरूड) यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. या प्रकरणी बाजीराव बाळा सुकळे (वय ३०), राहुल दिगंबर निंबाळकर (वय ३०, रा.गोसावी वस्ती, कोथरूड) यांना अटक करण्यात आली आहेण, तर एका आरोपीचा शोध सुरू आहे.

आरोपी आणि आदमाने एकाच भागात राहण्यास आहेत. आदमाने यांना त्यांनी विनाकारण मारहाण करण्यास सुरूवात केली होती. ते आरोपींच्या तावडीतून सुटले आणि तेथे असलेल्या भारत चिकन सेंटरमध्ये लपले. आरोपींनी चिकन सेंटरचे मालक रशीद शेख यांनाही मारहाण केली. आदमाने यांना चिकन सेंटरमध्ये लपण्यास जागा का दिली याचा जाब विचारत त्यांना मारहाण केल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले. कोथरूड पोलिसांनी तिघा आरोपींवर जबरी चोरीचा गुन्हा दाखल केला असून दोघांना अटक केली आहे.

बलात्कारप्रकरणी आरोपीला कोठडी

पुणे : बिगारी काम करणाऱ्या महिलेवर बलात्कार केल्याप्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी अटक केलेल्या आरोपीला १४ जुलैपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. रामजी मेघावत (वय ४५, रा. पाषाण) असे आरोपीचे नाव आहे. या प्रकरणी तीसवर्षीय महिलेने फिर्याद दिली आहे. फिर्यादी मागील अडीच वर्षांपासून आरोपीकडे बिगारी काम करत आहे. २८ जून रोजी आरोपीने फिर्यादीला विमाननगर येथे बांधकामावर जाण्यासाठी पालिकेजवळ बोलावले. एका रिक्षातून त्याने कामावर नेण्याऐवजी लॉजवर नेऊन बलात्कार केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अल्पसंख्य संस्थांना नियम बंधनकारक

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

अल्पसंख्याक संस्थांनी त्यांच्यासाठीचे नियम पाळणे गरजेचे असल्याचा पुनरुच्चार राज्याचे अल्पसंख्याक विकासमंत्री एकनाथ खडसे यांनी केला. तसेच, 'नियम न पाळल्याबाबत राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्याही मुलीच्या शाळेची चौकशी करण्यात येत आहे. इतर संस्थांनीही नियम पाळले नाहीत, तर त्यांच्यावरही कारवाई होणारच,' असा इशाराही त्यांनी दिला.

पुण्यात एका कार्यक्रमानंतर 'मटा' प्रतिनिधीने उपस्थित केलेल्या प्रश्नांना उत्तर देताना खडसे यांनी ही भूमिका मांडली. राज्यातील अल्पसंख्याक संस्थांच्या शाळा शिक्षण खाते, तसेच अल्पसंख्याक विकास खात्याने आखून दिलेले नियम पाळत नसल्याचे वारंवार स्पष्ट झाले आहे. अल्पसंख्याक शाळा सरकारी अधिकारी आणि राजकारण्यांनाही जुमानत नसल्याची बाब खडसे यांनीही या निमित्ताने अधोरेखित केली. या पुढील काळात नियम न पाळणाऱ्या अशा संस्थांवर कडक कारवाई करण्याचे संकेतही त्यांनी दिले. खडसे म्हणाले, 'अल्पसंख्याक दर्जा असलेल्या संस्थांना रोस्टर लागू नसते. शिक्षक भरतीसाठीही मान्यता घेण्याचे त्यांच्यावर बंधन नाही. मात्र, त्यांनी प्रवेशामध्ये ५१ टक्के आरक्षण द्यावे अशी अट आहे. अनेक संस्था ही अट पाळत नाहीत. त्यामुळेच नियम न पाळणाऱ्या संस्थांचा अल्पसंख्याक दर्जा काढून घेण्यासाठी आम्ही पावले उचलली आहेत. त्यासाठी मुंबईतील दहा संस्थांना नोटिसाही बजावण्यात आल्या आहेत. मुख्यमंत्र्यांच्या मुलीच्या शाळेचाही त्यात समावेश आहे.'

धार्मिक संस्थांना इंजिनीअरिंग, मेडिकल वा इतर व्यावसायिक अभ्यासक्रमांची कॉलेजे काढण्यासाठीही परवानगी देण्यात आली आहे. मात्र त्यांच्याबाबतचा अनुभवही फारसा चांगला नसल्याचेही त्यांनी नमूद केले.

नियम न पाळल्याबाबत राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्याही मुलीच्या शाळेची चौकशी करण्यात येत आहे. इतर संस्थांनीही नियम पाळले नाहीत, तर त्यांच्यावरही कारवाई होणारच

- एकनाथ खडसे

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विश्व संमेलनाध्यक्षपदी मोरे

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या चौथ्या विश्व मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षस्थान ज्येष्ठ लेखक व स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या साहित्याचे अभ्यासक डॉ. शेषराव मोरे भूषवणार आहेत. अंदमान येथे ५ व ६ सप्टेंबर रोजी संमेलन होणार आहे.

साहित्य महामंडळाच्या अध्यक्षा डॉ. माधवी वैद्य यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत ही घोषणा केली. महामंडळाचे प्रमुख कार्यवाह प्रकाश पायगुडे व कोषाध्यक्ष सुनील महाजन या वेळी उपस्थित होते. कविवर्य ना. धों. महानोर यांनी राज्यात दुष्काळ असल्याच्या पार्श्वभूमीवर, अध्यक्षपद स्वीकारण्यास नकार दिला होता. त्यामुळे अंदमानच्या विश्व संमेलनासाठी अध्यक्ष कोण, याची साहित्यप्रेमींमध्ये उत्सुकता होती. स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या स्मृती सुवर्ण वर्षानिमित्त विश्व संमेलन अंदमान येथे होत असल्याने सावरकरांच्या साहित्याचे अभ्यासक असलेल्या डॉ. मोरे यांचे नाव अध्यक्ष पदासाठी निश्चित करण्यात आले. ऑफबीट डेस्टिनेशन व पोर्ट ब्लेअर येथील महाराष्ट्र मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने या विश्व संमेलनाचे आयोजन करण्यात येणार आहे.

अंदमान येथील संमेलन ५ व ६ सप्टेंबर रोजी होणार आहे. संमेलनाची रूपरेषा नंतर जाहीर करण्यात येईल.

- डॉ. माधवी वैद्य, साहित्य महामंडळाच्या अध्यक्षा

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images