Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

परदेशवारीवर ‘हातोडा’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पिंपरी

अवैध बांधकामांच्या प्रश्नावरून गेल्या काही वर्षांपासून पिंपरी-चिंचवड शहरातील राजकारण ढवळून निघाले. महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना अधिनियम (एमआरटीपी अॅक्ट) नुसार अशी बांधकामे करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले. या गुन्ह्यांमुळे अवैध बांधकामधारकांना पासपोर्ट मिळण्यात अडचणी निर्माण झाल्या आहेत. त्यामुळे त्यांच्या परदेशवारीवरच 'हातोडा' पडणार आहे.

औद्योगिकनगरी म्हणून ओळख असलेल्या पिंपरी-चिंचवडमध्ये नोकरीच्या संधी वाढत असतानाच दुसरीकडे परदेशात नोकरी निमित्ताने जाणाऱ्याचे प्रमाण मोठे आहे. त्याचबरोबर परदेशात पर्यटनासाठी जाणाऱ्यांची देखील संख्या जास्त आहे. त्यामुळे शहरातून पासपोर्टसाठीचे अर्जही तेवढेच जातात. पासपोर्ट काढताना अर्जदारावर कोणते गुन्हे आहेत का? याची माहिती पोलिसांकडून मागविण्यात येत असते. गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असल्यास आणि न्यायालयात त्याची सुनावणी सुरू असल्यास पासपोर्ट न देण्यास पोलिसांकडून कळविण्यात येत असते. तसा अहवाल पोलिसांकडून पासपोर्ट विभागाला पाठविण्यात येतो.

दिवसाला एका पोलिस ठाण्यात किमान १५ ते २० जण पासपोर्ट व्हेरिफिकेशनसाठी येत असतात. त्यापैकी तीन ते चार जणांवर कोणत्या ना कोणत्या स्वरूपाचे गुन्हे दाखल असतात किंवा ते निकालात निघाले असतात; पण तसे रेकॉर्ड उल्लेख नसल्याने नेहमीच गोंधळ होत असतो. मात्र, सध्या अवैध बांधकामांचे गुन्हे दाखल झालेल्यांना व्हेरिफिकेशनमध्ये याचा अडसर निर्माण झालेल्यांची संख्या वाढली आहे.

'बांधकाम करताना राज्यकर्ते आणि पालिकेचे अधिकारी यांना बांधकामांबाबत माहिती होती. आम्ही कोणाचा खून केलेला नाही. बांधकाम अवैध अचानक ठरते आणि आमच्या नोकरीच्या संधीदेखील आता गमावून घेतल्या जातात,' अशी संतप्त प्रतिक्रिया काही तरुणांनी व्यक्त केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


किरकोळ कारणावरून अल्पवयीन मुलाचा खून

$
0
0

हडपसरः कपडे शिलाईसाठी दिलेले वीस रुपये वारंवार मागत असल्याने आणि 'बिन बापाच्या पोरा', असे चिडवत असल्याने मनात राग धरून तेरा वर्षांच्या मुलाचा गळा दाबून खून केल्याची घटना पिसोळी येथे घडली. याप्रकरणी आरोपीला अटक केली असून कोंढवा पोलिस स्टेशनमध्ये खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. मच्छिंद्र गिरी (वय १३, रा. दगडे चाळ, पिसोळी) असे मयत मुलाचे नाव आहे. दिंगबर भारती (१८, रा. दगडे चाळ ,पिसोळी) असे आरोपीचे नाव आहे. ही घटना पिसोळी येथील दगडे चाळी शेजारील मैदानात शनिवारी सकाळी अकरा वाजता घडली.

मयत मच्छिंद्र या मुलाने काही दिवसांपूर्वी आरोपी दिगंबरचे एका टेलरकडून फाटलेले कपडे शिवून आणून दिले होते. यासाठी २० रुपये शिलाई ही दिली होती. मात्र ही शिलाईसाठी दिलेले वीस रुपये मच्छिंद्र वारंवार आरोपी दिगंबरकडे मागत होता. तसेच 'तू बिन बापाचा मुलगा आहेस', असे वारंवार चिडवत असल्याने त्याचा राग मनात धरून आरोपी दिगंबरने शनिवारी सकाळी अकरा वाजता पिसोळी येथील पत्र्याच्या खोलीत त्याला बोलावून गळा दाबून खून करण्याचा प्रयत्न केला. मुलाची प्रकृती गंभीर झाल्याने त्याला उपचारासाठी ससून हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. मात्र त्याचा मृत्यू झाला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कलवड खाणीत मृतदेह सापडला

$
0
0

येरवडाः लोहगाव येथील कलवड खाणीत उडी मारून आत्महत्या केलेल्या तरुणाचा मृतदेह शनिवारी संध्याकाळी पाण्यात तरंगताना दिसून आला. गेल्या तीन दिवसांपासून पोलिस आणि अग्निशमन दल तरुणाचा पाण्यात शोध घेत होते. शाम उर्फ करुणादीप अर्जुन जेठीथोर (वय ३३, रा. बर्माशेल) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. विमानतळ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी एका तरुणाने कलवडच्या खाणीत उडी मारल्याची माहिती नियंत्रण कक्षाकडून स्थानिक पोलिसांना देण्यात आली. अग्निशमन दलाने बुधवारी रात्री उशिरा तरुणाचा मृतदेह शोधण्याचा प्रयत्न केला, तीन दिवसांपासून शोध घेऊनही शामचा मृतदेह सापडत नव्हता.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पोटखराब जम‌िनीवर ‘आकार’ लागू होणार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

पोटखराबा जमिनीवर शेतकऱ्यांनी लागवड केली असल्यास त्या जमिनीला गटनंबरच्या आकारणीप्रमाणे आकार लागू करण्यात यावा, असा प्रस्ताव जमाबंदी आयुक्तांनी राज्य सरकारला दिला आहे. जमिनीच्या पुनर्मोजणीमध्ये हा बदल करता येऊ शकतो असेही त्यांनी स्पष्ट केले आहे. जमिनीचा पोटखराबा हा प्रकार रद्द करण्याचा विचार राज्य सरकार करीत आहे. विभागीय आयुक्त व जिल्हाधिकाऱ्यांच्या राज्यस्तरीय परिषदेत महसूल मंत्री एकनाथ खडसे यांनी या दृष्टीने सरकार पावले उचलत असल्याचे नमूद केले होते. पोटखराबा हा प्रकार संपुष्टात आणल्यास राज्यातील अनेक शेतकऱ्यांना भविष्यात त्याचा मोठा लाभ होणार आहे.

महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६ मधील कलम ४३ खालील महाराष्ट्र जमीन महसूल (जमिनीच्या वापरावर निर्बंध) नियम १९६८ मधील प्रस्तावित नियम क्रमांक २ (२) अ व ब नुसार पोटखराबात येणारी जमीन संबंधित मालकाने कोणत्याही लागवडीखाली आणली असेल तर त्यावर कार्यवाही करणे शक्य होणार आहे. जमीन पुनर्मोजणीच्या दरम्यान वर्ग 'अ'मध्ये येणारी जमीन संबंधित मालकाने कोणत्याही लागवडीखाली आणली आहे असे निदर्शनास आले तर गटनंबर वा सर्व्हे नंबरच्या आकारणीचा विचार करुन पोटखराबा क्षेत्रास आकार लागू करता येईल, असे जमाबंदी आयुक्त संभाजी कडू-पाटील यांनी स्पष्ट केले आहे. पोटखराब 'ब' मध्ये मोडणाऱ्या स्मशानभूमी, तलाव तसेच सार्वजनिक वापराच्या जमिनी यामध्ये पुनर्मोजणीवेळी वहिवाट आढळून आल्यास संबंधित उपअधीक्षक भूमि अभिलेख यांनी या अधिनियमात नमूद असलेल्या तरतूदी प्रमाणे कार्यवाही करून त्याचा निर्णय लवकर घेता येऊ शकतो, असेही त्यांनी राज्य सरकारकडे प्रस्तावित केलेले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘स्मार्ट’ रेशन कार्डमध्ये गोंधळ

$
0
0

संदीप भातकर, येरवडा

राज्यातील अन्न धान्य वितरणातील गैरव्यवहार रोखण्यासाठी आणि बोगस रेशन कार्डांना आळा घालण्यासाठी सरकारने पारंपरिक रेशन कार्ड हद्दपार करून स्मार्ट कार्ड तयार करण्याचा निर्णय घेतला आहे. परंतु, स्मार्ट कार्ड साठी उपलब्ध करून दिलेल्या अर्जात रेशन कार्डधारकाच्या कुटुंबाच्या आडनावाचा उल्लेखच नसल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. त्यामुळे स्मार्ट कार्डच्या माहितीत चुका होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

राज्यासह शहरात अनेक नागरिकांनी एकापेक्षा जास्त रेशन कार्ड बनवून घेतले आहेत. परिणामी अन्न धान्य वितरणात होणारा गैरव्यवहार, रॉकेलचा काळा बाजार आणि विविध प्रकारचे रेशन कार्ड बनवून घेतल्यामुळे सरकारची होणारी फसवणूक या सर्व बेकायदा गोष्टींना आळा घालण्यासाठी रेशन कार्ड ऐवजी स्मार्ट कार्ड बनविण्याकरिता अधिकाधिक नागरिकांकडून अर्ज भरून घेण्याचे काम सुरू आहे.

पुणे शहरात आठ लाख ६६ हजार अधिकृत रेशन कार्ड धारक आहे. हे रेशनकार्ड हद्दपार करून पुढील काळात पुणेकरांना एटीएमप्रमाणे स्मार्ट कार्ड बनवून दिले जाणार आहे.

शिधापत्रिका विवरण फॉर्ममध्ये रेशन कार्ड धारकांचे गाव, पत्ता, दुकानाचे नाव, बँकेचे नाव, आधार क्रमांक, कुटुंबातील सदस्यांचे नावे तसेच मोबाइल क्रमांकांची सविस्तर माहिती असणारी भली मोठी यादीच विचारली आहे. पण या विवरण फॉर्ममध्ये कुठेही रेशन कार्डधारकाच्या आडनावाचा शब्दाचा उल्लेखच केला नसल्याचा प्रकार सामाजिक कार्यकर्ते आशिष माने यांनी समोर आणला आहे.

माने म्हणाले, 'शिधा पत्रिका विवरण फॉर्ममध्ये रेशन कार्डधाराकाच्या आडनावाचा कुठेही उल्लेख करण्यात आलेला नाही. त्यामुळे हजारो रेशन कार्ड धारकांच्या नव्याने देण्यात येणाऱ्या स्मार्ट कार्डमध्ये चुका होण्याची शक्यता आहे.'

याबाबत सहायक अन्न धान्य वितरण अधिकारी सुचित्रा आमले म्हणाल्या, 'काही महिन्यांपूर्वी विभागाच्या अधिकृत वेबसाइटवरून स्मार्ट कार्ड करिता लागणारी फॉर्मची प्रिंट काढण्यास सांगितले होते. पण शहरातील आठ लाखांहून अधिक कार्डधारकांना प्रिंट फॉर्मचे वाटप शक्य नसल्याने फॉर्मची झेरोक्स काढून सर्व ई परिमंडळात वितरित करण्यात आली. शिधापत्रिका विवरण फॉर्म मध्ये कुठेही आडनावाचा उल्लेख नसल्याने रेशन कार्डधारकांनी सदस्याच्या रकान्यामध्ये आडनावाने सुरुवात करावी, अशी माहिती रेशन धान्य दुकानदारांनी कार्डधारकांना द्यावी, अशा सूचना दुकानदारांना करण्यात आल्या आहेत.'

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पुण्याचा दावा कागदावर प्रबळ

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

मुंबई हायकोर्टात दाखल होणाऱ्या केसमध्ये पुण्यातून दाखल होणाऱ्या केसचे प्रमाण ४० टक्क्यांहून अधिक आहे. पुण्याला खंडपीठ मिळावे ही वकिलांची मागणी रास्त असून, खंडपीठसाठी पुण्याचा दावा प्रबळ आहे. मुंबई हायकोर्टात दाखल होणाऱ्या एकूण केसपैकी पुणे जिल्ह्यातून दाखल होणाऱ्या केसची संख्या ४० टक्क्यांहून अधिक आहे. तसेच प्रलंबित केसची संख्या ४० टक्क्यांहून अधिक आहे. पुण्यातून सर्वाधिक केस मुंबई हायकोर्टात दाखल होतात. पुण्याला खंडपीठ स्थापन करणे रास्त असून, याबाबत ठोस निर्णय घेण्यात यावा अशी मागणी वकिलांकडून करण्यात येत आहे.

सातारा, सांगली, सोलापूर आणि कोल्हापूर, तसेच पुण्यासह या चार जिल्ह्यांमधून हायकोर्टात किती केस दाखल होतात, याची माहिती महाराष्ट्र आणि गोवा बार कौन्सिलचे सदस्य अॅड. सुरेशचंद्र भोसले यांनी मुंबई हायकोर्टाकडे माहिती अधिकाराद्वारे मागितली होती. त्यानुसार २०१०मध्ये पुणे जिल्ह्यातून ८४१६ केस, साताऱ्यातून १८८५, सांगलीतून १९१५, सोलापूरमधून २७५२, तर कोल्हापुरातून ३०४८ केस दाखल झाल्या होत्या. २००९ आणि २००८ या वर्षांमध्ये हीच स्थिती कायम होती, अशी माहिती अॅड. भोसले यांनी दिली.

प्रलंबित असलेल्या केसबाबतही हीच परिस्थिती आहे. ३१ मार्च २०११ अखेरपर्यंत पुणे जिल्ह्यातील सर्वाधिक २१ हजार ८६ केस प्रलंबित होत्या. साताऱ्यातील ५८८१, सांगलीतील ५६७९, सोलापूरच्या ६९०७ आणि कोल्हापूरमधील ७८०२ केस हायकोर्टात प्रलंबित होत्या. माहिती अधिकारात हायकोर्टाकडे ही माहिती मागवण्यात आली होती. २०१०पर्यंत पुणे जिल्ह्यातून दाखल होणाऱ्या केसची, तसेच प्रलंबित केसची संख्या सर्वाधिक होती. यात गेल्या चार वर्षांत आणखी २५ टक्क्यांनी वाढ झाली आहे.

'हायकोर्टाची दादागिरी मोडली पाहिजे'

'पुण्याला खंडपीठ मिळावे या मागणीसाठी सुरू केलेला लढा केवळ वकिलांसाठी नाही, तर पक्षकारांसाठीही आहे. वकिलांनी मुंबई किंवा पुण्यात केस चालवली तरी त्यांना त्याची फी मिळणार आहे; मात्र सामान्य पक्षकारांना हायकोर्टातील केससाठी हजर राहण्यासाठी वेळ आणि पैसा खर्च करावा लागतो. अनेकदा तारीख पडल्यामुळे पक्षकाराची मुंबईत राहण्याची सोयही नसते. पक्षकारांसाठी​ न्यायाचा विचार करत खंडपीठ देणे योग्यच आहे; मात्र हायकोर्टाकडून याबाबत मक्तेदारी करण्यात आली आहे. हायकोर्टाची दादागिरी मोडून काढली पाहिजे,' अशी प्रतिक्रिया अॅड. भोसले यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आंदोलन झाले…खंडपीठाचे काय?

$
0
0

वंदना घोडेकर, पुणे

पुण्याला मुंबई हायकोर्टाचे खंडपीठ देण्याची मागणी योग्य की अयोग्य, याचे उत्तर शोधण्यातच गेली अनेक वर्षे खर्ची पडली आहेत. शिवाजीनगर जिल्हा न्यायालय सलग १६ दिवस आंदोलनामुळे बंद ठेवण्याचा 'इतिहास' वकिलांनी रचला खरा; मात्र या आंदोलनाचे फलित काय? आंदोलन मागे घ्यावे लागल्याबद्दल वकीलवर्गाकडून खेद व्यक्त केला जात आहे. खंडपीठाच्या मागणीची पूर्तता करूनच आंदोलन मागे घेतले पाहिजे होते, असा सूर लावण्यात येत आहे. खंडपीठाच्या मागणीचा रेटा या पुढेही चालू राहील, असा निर्धार वकिलांनी व्यक्त केला.

लढाई जिंकण्याच्या तोंडावर असतानाच काही कारण नसताना हरल्याचे शल्य फार काळ बोचते. आंदोलन मागे घेतल्यामुळे पुण्यातील अनेक वकिलांची तशी अवस्था झाली आहे. हातातोंडाशी आलेली लढाई अचानक हरताना पाहण्याची नामुष्की ओढवली. खंडपीठाच्या मागणीसाठी पुण्यातील वकिलांनी आपल्यातील हेवेदावे, मतभेद बाजूला ठेवून एकत्र येऊन आपली एकजूट दाखवून तब्बल १६ दिवस कोर्टातील कामकाज बंद ठेवण्याचे आंदोलन केले.

खंडपीठाच्या लढ्यासाठी प्रसंगी आपल्याच वकील बांधवांशी वाईटपणा घेतलेल्या वकिलांवर लढाच गुंडाळला गेल्यामुळे तोंडघशी पडण्याची वेळ आली. वकिलांच्या या एकजुटीमुळे आतातरी खंडपीठाबद्दल ठोस निर्णय घेतलाच जाईल, असे सकारात्मक आणि उत्साही वातावरण तयार झाले होते. ज्या वकिलांना आपल्याच वकील बांधवांच्या लढ्याबद्दल खात्री नाही, त्यांनी या लढ्यात सहभाग घेतला नाही. त्यांनी गप्प बसणे पसंत केले; मात्र अशा वकिलांची संख्या लढ्यात उतरलेल्या वकिलांपेक्षा कमी होती.

अभी नही तो कभी नही

खंडपीठाच्या मागणीसाठी वकिलांनी दाखवलेली एकजूट आणि तयार झालेले वातावरण पाहून 'अभी नही तो कभी नही,' अशा भावना निर्माण झाल्या होत्या. या वेळी पुकारलेले आंदोलन अयशस्वी झाले, तर पुन्हा आंदोलनासाठी वकील तयार होणार नाहीत, असे अनेकांना वाटत होते. त्यामुळे लढ्याला तीव्र स्वरूप आले तरी आंदोलन सुरू ठेवण्याची वकिलांची मानसिक तयारी झाली होती.

अन् अचानक बंद मागे

पुण्याला खंडपीठ देण्याबाबत जोपर्यंत कॅबिनेटमध्ये प्रस्ताव मंजूर केला जात नाही, तसेच तो प्रस्ताव हायकोर्टाच्या मुख्य न्यायमूर्तींकडे पाठवला जात नाही, तोपर्यंत बंद करण्याचा निर्णय ठरला होता; मात्र ऐन भरात असलेले आंदोलन आपल्याच वकील बांधवांशी चर्चा न करता गुंडाळण्यात आले. गेली १६ दिवस आंदोलनासाठी आपला वापर करून घेऊन कोणतीही पूर्वकल्पना न देता थेट आंदोलन मागे घेण्याचे घोषित करण्यात आल्यानंतर वकिलांमध्ये प्रचंड नाराजी पसरली. पुण्याला हायकोर्टाचे खंडपीठ मिळाल्यावर केवळ वकीलच नव्हे, तर पक्षकारांचाही फायदा होणार आहे. 'आंदोलनामुळे काहीच साध्य होणार नाही, आंदोलनात उतरलेले जमिनीवर येतील,' अशी भाषा करणाऱ्यांना आंदोलन मागे घेतल्याचा आसुरी आनंद झाला; मात्र प्रामाणिकपणे या लढ्यात उतरलेल्या वकिलांना आपल्या आंदोलनाचा शेवट अपमानास्पद झाल्याचे पाहावे लागले. या अपमानास्पद शेवटाचे शल्य इतके होते, की काही वकिलांना आपले रडू आवरणेही शक्य झाले नाही.

तीव्र प्रतिक्रिया

पुणे बार असोसिएशन प्रतिष्ठित असून, त्यांनी संप करणे शोभत नाही, असे कारण दिल्यावर वकिलांनी दिलेल्या प्रतिक्रिया बोलक्या होत्या. 'प्रतिष्ठित 'बार'च्या कुकरची शिट्टी वाजली आणि कुकर फुटला, आंदोलनासाठी वापर करून घेतला, आंदोलन मागेच घ्यायचे होते, तर नेत्यांनी आश्वासन दिले तेव्हाच मागे घ्यायचे होते, हायकोर्टाकडून कारवाई होईल या भीतीने आंदोलन मागे घ्यायचे होते, तर सुरूच कशाला केले, हायकोर्टाकडून होणाऱ्या कारवाईला सामोरे जावे लागेल याची कल्पना असतानाही इतके दिवस आमचे नुकसान का केले,' अशा अनेक प्रतिक्रिया आंदोलन गुंडाळाल्यानंतर ऐकायला आल्या.

एकजुटीला गालबोट

आंदोलन मागे घेतल्यामुळे नाराज झालेल्या वकिलांनी एकत्र येऊन शिवाजीनगर जिल्हा न्यायालयासमोरील हिरवळीवर एकत्र येऊन निषेध सभा घेतली. कालपर्यंत एका चांगल्या कारणासाठी सर्व मतभेद बाजूला ठेवून एकत्र आलेल्या वकिलांच्या एकजुटीला गालबोट लागले. त्यातून निर्माण झालेल्या तणावाचे पडसाद पुढील काळात उमटत राहतील. त्यातून निर्माण होणारे वादही धुमसत राहतील. पुण्याला खंडपीठ मिळणे कसे योग्य नाही किंवा ते मिळूच शकणार नाही, हे सोदाहरण स्पष्ट करून सांगणाऱ्या वकिलांकडून आपणच बरोबरच आहोत हे आता इतरांना ऐकायला लागेल.

कामाचे विकेंद्रीकरण हवे

खंडपीठाची मागणी रास्त आहे की नाही, याचा विचार करताना हायकोर्टात पुण्यातून दाखल होणाऱ्या केसची संख्या पाहणे गरजेचे आहे. हायकोर्टात दाखल झालेल्या अपिलाची सुनावणी सुरू होण्यास पक्षकारांना दहा वर्षे वाट पाहावी लागते. काही केसमध्ये तर यापेक्षा जास्त काळ वाट पाहावी लागते. हायकोर्टातील जागा अपुरी पडू लागली आहे. त्यामुळे हायकोर्टाच्या कामाचे विकेंद्रीकरण होणे आवश्यक आहे, असे अनेक वकील सांगतात.

पुण्याला खंडपीठ देताना सातत्याने अंतराचा मुद्दा मांडला जातो. न्याय आपल्या दारी अशी संकल्पना राबवताना पक्षकारांच्या सोयीचे म्हणून अंतराचा मुद्दा बाजूला ठेवायला पाहिजे, हेच नेमके अजून समजावून सांगता आलेले नाही.

राजकीय पाठिंबा हवा

पुण्याला हायकोर्ट मंजूर झालेच, तर त्यासाठी लागणारी जागा, कोट्यवधी रुपयांचा निधी मंजूर होणार आहे का, मुख्य म्हणजे हे शक्यच नाही, असे म्हटले जाते आहे. अशक्य गोष्ट शक्य करण्याची इच्छाशक्ती पाहिजे. मुख्य म्हणजे त्यासाठी भक्कम राजकीय पाठिंबा पाहिजे. वकिलांच्या आंदोलनासाठी पाठपुरावा करण्याकरिता राजकीय इच्छाशक्तीचा अभाव असल्याचे अजून दिसते आहे. वकिलांनी केलेल्या या आंदोलनाला शहरातील विविध संस्था-संघटनांकडून पाठिंबा मिळू लागला होता; मात्र आंदोलनाची दिशाच भरकटल्यामुळे आंदोलन गुंडाळले गेले.

आंदोलनाच्या मागणीसाठी वातावरण तयार होत असतानाच ते मागे घेत असल्याचे पुणे बार असोसिएशनच्या अध्यक्षांनी घोषित केल्यानंतर त्यांनी अनेकांचा रोष ओढवून घेतला. मुंबई हायकोर्टाचा अवमान होत असल्याचे कारण सांगण्यात आले. त्यामुळे नाराज वकिलांमध्ये आंदोलन अयशस्वी झाल्याची भावना आहे. त्याच्या उलट आंदोलन यशस्वी झाल्याचे समर्थन करणारे वकीलही आहेत. आपण योग्य वेळी आंदोलन तात्पुरते स्थगित केले असल्याचे सांगितले जात आहे. या आंदोलनाची दखल घेऊन मुख्यमंत्र्यांनी परदेशातून आल्यावर कॅबिनेटमध्ये पुणे खंडपीठाबाबत प्रस्ताव मंजूर करण्याचे आश्वासन दिले आहे. बंद मागे घेतला नाही, तर हायकोर्टाकडून कारवाई होईल. त्या कारवाईला आपण कसे तोंड देणार, याची तयारी नाही. त्यामुळे आंदोलन पूर्णतः बंद नाही तर तात्पुरते स्थगित आहे, असे सांगून समर्थन केले जाते आहे. आंदोलनाच्या निमित्ताने १६ दिवस सर्वांनी एकजूट पाहिली. मुख्य म्हणजे त्याचे सर्वत्र कौतुक केले जात होते. आंदोलनादरम्यान अनेक वाद उफाळून आले; मात्र त्याचा परिणाम आंदोलनावर झाला नव्हता; मात्र आंदोलन अयशस्वी ठरल्यामुळे एकजूट दाखवलेल्या वकिलांमध्ये उभी फूट पडली. कोर्टात वकिलांचे दोन गट पडले. आंदोलनाचे समर्थक असलेल्या संतप्त वकिलांकडून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत.

यंदाच्या आंदोलनामध्ये ज्युनिअर वकील, महिला वकिलांचा मोठ्या प्रमाणावर सहभाग होता. खंडपीठ मिळणे कसे योग्य नाही हे पटवून देणाऱ्यांना खंडपीठासाठी समर्थन वाढत असल्याचे बहुधा लक्षात येत नसावे. गेली ३५ वर्षे खंडपीठाची मागणी केली जाते आहे, याचा अर्थ ही मागणी योग्य आहे, असे वाटत असणाऱ्यांचे प्रमाण अधिक आहे. खंडपीठाच्या मागणीचा रेटा आणखी वाढेल; मात्र आंदोलन मागे घेतल्यामुळे काय साध्य झाले, याचे ठोस उत्तर मात्र कोणाकडेच नाही!
असे झाले आंदोलन...

मुंबई हायकोर्टाचे खंडपीठ पुण्याला मिळावे या मागणीसाठी कोर्टातील कामकाज दोन दिवस बंद ठेवण्याचा निर्णय पुणे बार असोसिएशनतर्फे १८ जून रोजी जाहीर करण्यात आला. त्यानंतर १९ जून रोजी 'कामकाज बंद' आंदोलनाला सुरुवात झाली. बंद सुरू करण्यात आल्यानंतर वकिलांचा वाढता सहभाग आणि बंद यशस्वी होत असल्याचे पाहून आंदोलन बेमुदत करण्याचा निर्णय घेण्यात आला. आंदोलनाच्या भूमिकेवर वकील ठाम असल्यामुळे जे आंदोलनात सहभागी होऊ इच्छित नाहीत, त्यांनी कोर्टात न येणे पसंत केले. कोर्टाच्या कामकाजात कोणी नजर चुकवून सहभाग घेऊ नये, यासाठी वकिलांची 'रॅपिड अॅक्शन टीम' करण्यात आली. वकिलांच्या या टीमने प्रत्येक कोर्ट हॉलमध्ये फिरून कोणी काम करण्यासाठी येत नाही, याची पाहणी करून त्याबाबत खबरदारी घेतली.

आंदोलनाला मिळत असलेला प्रतिसाद वाढत असलेला पाहून शहरातील आजी-माजी राजकीय पदाधिकाऱ्यांकडून असोसिएशनला पाठिंब्याची पत्रे देण्यात आली. शहरातील विविध संस्था, संघटनांकडून पाठिंबा देण्यात आला. खंडपीठासाठी वकिलांकडून दगडूशेठ मंदिरात महाआरती करण्यात आली. वकिलांकडून सुरू करण्यात आलेले कामकाज बंद आंदोलन तब्ब्ल १६ दिवस यशस्वीपणे पार पाडण्यात आले.

आंदोलनाचा घटनाक्रम...

१९ जून : मुंबई हायकोर्टाचे खंडपीठ पुण्याला मिळावे या मागणीसाठी पुण्यातील वकिलांचे कामकाज बंद आंदोलन सुरू.

२० जून : कामकाज बंद आंदोलनाकडे लक्ष वेधण्यासाठी कोर्टाच्या परिसरात मानवी साखळी.

२१ जून : सुट्टीच्या कोर्टातील कामकाजातही वकील सहभागी नाहीत. बंद यशस्वी.

२२ जून : आंदोलन सुरू करण्यात आल्यानंतर चौथ्या दिवशी विधानभवनावर भव्य मोर्चा. पालकमंत्री गिरीश बापट यांच्याकडून वकिलांना पाठपुराव्याचे आश्वासन.

२३ जून : बेमुदत आंदोलनाबाबत भूमिका घेण्याचा निर्णय दुसऱ्या दिवशी ठरवण्याचा निर्णय.

२४ जून : खंडपीठाबाबतची मागणी मंजूर होईपर्यंत बेमुदत आंदोलन करण्याचा निर्णय.

२५ जून : आंदोलना पाठिंबा देण्यासाठी 'मिस्ड कॉल' देण्याचे आवाहन.

२६ जून : आंदोलनाला पाठिंबा दर्शवण्यासाठी फॅमिली कोर्टातील वकिलांचा मोर्चा.

२७ जून : बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवातर्फे पुण्यातील वकिलांच्या आंदोलनाची दखल घेऊन पुण्याला खंडपीठ मिळावे या प्रस्तावाला कौन्सिलच्या बैठकीत मंजुरी.

२८ जून : सुट्टीच्या कोर्टातही कामकाज बंद आंदोलन सुरू.

२९ जून : हडपसर येथून वकिलांची रॅली. पुणे शहरातून दुचाकी रॅली काढण्याचे नियोजन करण्यात आले.

३० जून : शिवाजीनगर कोर्टाच्या चार नंबर गेटपासून रॅली सुरू. ही रॅली खंडुजीबाबा चौक, जंगली महाराज रस्ता, टिळक चौक, कुमठेकर मार्ग, अप्पा बळवंत चौक या मार्गाने काढण्यात आली.

१ जुलै : पुणे बार असोसिएशनच्या अध्यक्षांनी राज्यपाल सी. विद्यासागर राव यांची भेट घेतली. पक्षकाराचा कोर्टासमोर आत्मदहनाचा प्रयत्न.

२ जुलै : आंदोलनाविरुद्ध हायकोर्टात जनहितयाचिका. बंदप्रकरणी हायकोर्टाने फटकारले. असोसिएशनचे अध्यक्ष, कौन्सिल अध्यक्षांना हजर राहून खुलासा करण्याचा आदेश.

३ जुलै : जनहितयाचिकेवर सुनावणी. 'बंद'बाबत निर्णय घेण्याचा आदेश. चार जुलैला विशेष सभा घेण्याचे ठरले.

४ जुलै : आंदोलन स्थगित करण्यात येत असल्याचे असोसिएशनच्या अध्यक्षांनी जिल्हा न्यायालयाच्या गेट नंबर चारवर आयोजित करण्यात आलेल्या विशेष सभेत जाहीर केले. या निर्णयावरून वकिलांमध्ये रोष.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

प्राणिसंग्रहालये एकाच छताखाली

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

वन विभागाकडील कामाचा भार हलका करण्यासाठी केंद्राच्या धर्तीवर राज्य वन्यजीव मंडळाने राज्य प्राणिसंग्रहालय प्राधिकरण सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे प्राणिसंग्रहालयातील वन्यप्राण्यांसंदर्भात रेंगाळणारे प्रस्ताव अल्पावधीत मार्गी लागणार असून, यामुळे राज्यातील सर्वच प्राणिसंग्रहालये एकाच छताखाली येतील.

वनाधिकाऱ्यांना प्राणी संग्रहालयातील वन्य प्राण्यांच्या कल्याणाकडे पुरसे लक्ष देणे शक्य नसल्याने आतापर्यंत अनेक प्रस्ताव धूळ खात पडून राहत होते. राज्यातील कोणत्याही प्राणिसंग्रहालयात वन्यप्राण्यांशी निगडित कोणताही निर्णय घेण्यापूर्वी वन विभागातील राज्यस्तरीय अधिकाऱ्यांची संमती आवश्यक असते. या संमतीनंतर पुढे राष्ट्रीय प्राणिसंग्रहालयाकडे प्रस्ताव पाठवला जातो. पर्यायाने संग्रहालयाचे प्रस्ताव या टेबलावरून त्या टेबलावर फिरत राहतात. मुख्यतः प्राणिसंग्रहालयाचे स्थलांतर करताना अनेक अडचणी येतात. ही किचकट प्रक्रिया दूर करण्याच्या उद्देशानेच राज्य वन्यजीव मंडळाने राज्यस्तरीय प्राणिसंग्रहालय प्राधिकरणाला मान्यता दिली आहे.

महाराष्ट्र राज्य पुनर्रचित वन्यजीव मंडळाची पहिली बैठक नुकतीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईत पार पडली. या वेळी वन विभागाचे पदाधिकारी उपस्थित होते

केंद्रीय चिडियाघर प्राधिकरणाच्या धर्तीवर राज्यात 'महाराष्ट्र राज्य प्राणी संग्रहालय प्राधिकरण' स्थापन करण्यात यावे, अशी सूचना फडणवीस यांनी वनाधिकाऱ्यांना दिली. मुख्य वनसंरक्षकांना प्राणी संग्रहालयातील वन्य प्राण्यांच्या कल्याणाकडे पुरेसे लक्ष देणे शक्य नसल्याने राज्यात असे प्राधिकरण स्थापन करणे उपयुक्त ठरेल. यामुळे राज्यातील विविध यंत्रणांमार्फत चालवण्यात येणारी प्राणिसंग्रहालये एकाच छताखाली येतील, असे फडणवीस यांनी सांगितले. केंद्र सरकारच्या मंजुरीनंतर राज्यातील अभयारण्ये, राष्ट्रीय उद्यान क्षेत्रात कोणत्याही प्रकल्पासाठी जागा दिल्यानंतर, त्या संबंधित यंत्रणेकडून प्रकल्पाच्या किमतीच्या दोन टक्के निधी वन विभागाकडे जमा केला जातो. या निधीचा विनियोग वन्य प्राण्यांच्या संवर्धनासाठी व संरक्षणासाठी करण्याच्या दृष्टीने स्वतंत्ररीत्या 'महाराष्ट्र वन्यजीव निधी' स्थापन करण्यात यावा, अशा सूचना फडणवीस यांनी दिल्या.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


राज्याच्या परिवहन कायद्याला विरोध

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

'राज्य सरकार ड्रायव्हिंग स्कूलच्या नियमांत बेकायदेशीरपणे बदल करत आहे. त्यामागे ड्रायव्हिंग स्कूल बंद पाडणे आणि हा व्यवसाय कॉर्पोरेटच्या घशात घालण्याचा डाव आहे,' असा सूर महाराष्ट्र राज्य ड्रायव्हिंग स्कूल असोसिएशनच्या बैठकीत उमटला. राज्याचा परिवहन कायदा प्रस्तावित आहे. या कायद्यामध्ये केंद्र सरकारने ड्रायव्हिंग स्कूलना ठरवून दिलेल्या नियमांपेक्षा अधिक चार नियम लागू करण्यात येणार आहेत. हे नियम आणि हा कायदा लागू होऊ नये, याबाबत पुढील धोरणे ठरवण्यासाठी असोसिएशनतर्फे राज्यातील पदाधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती.

असोसिएशनचे अध्यक्ष राजू घाटोळे, 'आरटीए'चे माजी सदस्य बाबा शिंदे, ज्ञानेश्वर वाघुले, अॅड. तुषार मंडलेकर आणि राज्यभरातील मोटार ड्रायव्हिंग स्कूलचालक या वेळी उपस्थित होते. 'ड्रायव्हिंग स्कूलची जागा किती असावी, गाड्यांची संख्या किती असावी, गाड्यांचे वय किती असावे आणि स्कूलमध्ये इन्स्ट्रक्टर कसा असावा, अशा प्रकारचे नियम नवीन कायद्यामध्ये घालण्यात आले आहेत. हे नियम घालणे राज्य सरकारच्या अधिकारात नाही; मात्र ड्रायव्हिंग स्कूलचा व्यावसाय बंद पाडून तो कॉर्पोरेटच्या घशात घालण्यासाठी राज्य सरकार हे करत आहे,' असे अॅड. मंडलेकर यांनी सांगितले.

'केंद्र सरकारच्या कायद्याचा अवमान करून राज्य सरकार आपल्या पातळीवर करत असलेला बेकायदेशीर मोटार वाहन कायदा मान्य होऊ देणार नाही. मंत्री, विरोधी पक्षनेते, स्थानिक नेते, सामाजिक संघटना यांना बरोबर घेऊन हा लढा लढणार आहोत. वेळप्रसंगी या निर्णयांविरोधात कोर्टात दाद मागितली जाईल,' असा इशाराही घाटोळे यांनी या वेळी दिला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आगीच्या तीन घटना; फ्लॅट, टेम्पोचे नुकस

$
0
0

पुणेः शहरात रविवारी पहाटे तीन ठिकाणी आगीच्या घटना घडल्या. एक भंगाराचे दुकान, एक फ्लॅट आणि एक टेम्पो यांचे आगीत नुकसान झाले. यामध्ये कोणीही जखमी झाले नाही. दांडेकर पूलजवळील रामकृष्ण मठाजवळील बंद दुकानाला रात्री दीड वाजता आग लागली. यात दुकानातील सामान पूर्णपणे जळाले. हे दुकान झोपडपट्टीच्या अगदी शेजारी असल्याने आग पसरण्याची शक्यता होती. मात्र, अग्निशामक दलाचे पथक वेळेत पोहोचल्याने आग आटोक्यात आणणे शक्य झाले. यामध्ये दुकानाजवळ पार्किंग केलेल्या पाच दुचाकींचेही नुकसान झाले.

कमिन्स कंपनीमागे एरंडवणे येथे टेम्पोने अचानक पेट घेतला. त्यामध्ये टेम्पो जळून खाक झाला, तर विमाननगर येथील लुंकड टॉवरमधील सहाव्या मजल्यावरील एका खासगी कंपनीच्या ऑफिसमध्ये फ्लॅटमध्ये पहाटे चार वाजता आग लागली होती. या टॉवरची आगप्रतिबंधक यंत्रणा कार्यरत होती, त्यामुळे अग्निशामक दलाच्या यंत्रणेबरोबरच या यंत्रणेचाही वापरही केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आश्वासनांचाच कारभार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

'महसूल विभाग आणि सामाजिक न्याय विभागातील अधिकाऱ्यांतील पदाच्या वादामुळे कागदावरच असलेल्या जिल्हावार समित्या येत्या महिनाभरात कार्यान्वित होतील,' असे आश्वासन सामाजिक न्याय व विशेष साह्य विभागाचे राज्यमंत्री दिलीप कांबळे यांनी दिले. सद्य परिस्थितीत जात पडताळणी समितीकडे विद्यार्थी आणि कर्मचाऱ्यांचे मिळून एकूण ९१ हजार अर्ज प्रलंबित आहेत.

सामाजिक न्यायमंत्री राजकुमाल बडोले, राज्यमंत्री दिलीप कांबळे यांनी नुकतीच पुण्यातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्थेला (बार्टी) भेट दिली. त्या वेळी कांबळे यांनी समिती स्थापन करण्यासंदर्भातील कार्यवाहीची माहिती दिली.

जिल्हा स्तरावर अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली जात पडताळणीचे काम करण्याचा निर्णय घेण्यात आला होता; मात्र सामाजिक न्याय विभाग आणि महसूल विभागातील अधिकाऱ्यांच्या वादामुळे समितीचे काम सुरू झाले नाही. या प्रकरणी प्रांताधिकाऱ्यांनी 'काम बंद' आंदोलन केले होते. या आंदोलनावर शासनाने तोडगा काढला; मात्र अद्याप जिल्हास्तरीय जात पडताळणीचे काम सुरू झाले नाही. दरम्यान, आता महसूल विभागाशी याबाबत बोलणे झाले असून हा प्रश्न मार्गी लागेल, असे कांबळे यांनी सांगितले.

शासकीय नोकरीत असलेल्या अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त भटक्या जमाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, विशेष मागास प्रवर्गातील कर्मचाऱ्यांनी ३१ जुलै २०१३पर्यंत जात पडताळणी प्रमाणपत्र सादर न केल्यास नोकरीतून काढून टाकण्याचा आदेश शासनाने काढला होता. यामुळे जात पडताळणी विभागाकडे कर्मचारी व विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणात अर्ज आले होते. गेल्या वर्षभरात जवळपास दोन लाख अर्ज निकाली काढण्यात आले. आता शैक्षणिक आणि शासकीय नोकरदारांची ९१ हजार प्रकरणे प्रलंबित आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

लंडनमध्ये ‘जाणता राजा’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

भारतावर दीडशे वर्षे अधिराज्य गाजविणाऱ्या ब्रिटिशांच्या राज्यातील त्या भव्य सभागृहात 'हर हर महादेव... जय भवानी जय शिवाजी'चा जयघोष दुमदुमला, भगवा झेंडाही दिमाखात फडकला अन् बघता बघता छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्यासाठी केलेल्या पराक्रमांचा प्रवास सर्वांसमोर उलगडत गेला. रंगमंचावरील भव्य सेट आणि कलाकारांचा रोमहर्षक अभिनय पाहून प्रेक्षक शिवकालात हरवून गेले.

निमित्त होते लंडनमधील वेम्ब्ली एरिना सभागृहात जल्लोषात साकारलेल्या 'जाणता राजा' या महानाट्याचे. खास लंडनवासीय भारतीयांच्या आग्रहास्तव महाराजा शिवछत्रपती प्रतिष्ठानने लंडनमध्ये नुकत्याच आयोजित केलेल्या प्रयोगाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. भारतातील आदर्श राजा या संकल्पनेतून शिवाजी महाराजांचा जीवनपट या वेळी लंडनवासीयांसमोर जिवंत करण्यात आला. अमेरिकेत यशस्वी प्रयोग केल्यानंतर पंधरा वर्षांनी या महानाट्याने परदेश वारी करून तेथील सभागृह गाजवले. पाच हजारांहून अधिक नागरिक या नाटकाचे साक्षीदार झाले. लंडनमधील सर्व भाषिक नागरिक यामध्ये सहभागी होणार असल्याने नाटकाचे दोन्ही प्रयोग हिंदी भाषेत करण्यात आले.

'लंडनमधील रहिवासी भूपिंदर खांबाय यांनी आम्हाला या सभागृहातील ध्वनी आणि प्रकाश संयोजन करून दिले. प्रयोगाला पुण्यातून ५० कलाकार सहभागी झाले होते. याशिवाय तेथील मराठीसह इतर भाषिक मुलांनीही यात काम केले,' अशी माहिती महाराजा शिवछत्रपती प्रतिष्ठानचे महेश बुलाख यांनी दिली.

'खुद्द शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे, श्रीनिवास वीरकर आणि डॉ. अजित आपटे यांनी मार्गदर्शन केले. लंडनच्या प्रयोगासाठी आम्ही नवीन सेट बनवला होता. सभागृह बंदिस्त असले, तरी जाणता राज्याची भव्यता, विशालता कुठेही कमी होणार नाही, याची काळजी घेतली होती. नवीन आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला होता. विशेष म्हणजे या सभागृहात घोडे आणि उंट वापरण्याची परवानगी मिळाल्याने कार्यक्रमात रंगत आली. तेथील उत्साही कलाकारांनीही खूप मदत केली,' असे बुलाख यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

उत्सवांसाठी प्रसंगी कायद्यात बदल करू

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

'केंद्रातील पूर्वीच्या संयुक्त पुरोगामी आघाडीच्या सरकारने (यूपीए) काही चुकीचे कायदे केले आहेत. त्यामुळे नागपंचमीसारखे पारंपरिक सण साजरे करता येत नाहीत. आपल्या परंपरा, नागरिकांच्या भावना लक्षात घेऊन केंद्र सरकार या कायद्यात बदल करून नवा कायदा आणण्याच्या विचारात आहे,' अशी केंद्रीय वन, पर्यावरण आणि हवामानबदलमंत्री प्रकाश जावडेकर यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.

पुण्यातील वनभवन येथे जावडेकर यांनी पत्रकारांशी संवाद साधला. 'कॉँग्रेसप्रणित यूपीए सरकारने काही चुकीचे कायदे केले. वन्यजीव संरक्षण कायद्यात करण्यात आलेल्या कडक तरतुदींमुळे बत्तीस शिराळ्यासारख्या ठिकाणी शेकडो वर्षांपासून चालत आलेल्या नागपंचमी उत्सवावरही बंदी आली आहे. नागपंचमी उत्सवातील नागांच्या पुजेला नागांचे प्रदर्शन ठरविल्याने त्यावर बंदी आली आहे. परंतु, आम्ही परंपरेचा, तसेच लोकभावनेचा, संस्कृतीचा आदर करतो. त्यामुळेच असे चुकीचे कायदे बदलण्यात येणार असून वन्यजीव संरक्षण कायदाही बदलण्यात येणार आहे. परंतु, नवे कायदे करताना प्राण्यांबाबत हिंसाचार, अत्याचार होणार नाहीत, याची दक्षता घेण्यात येईल,' असे जावडेकर यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष सदाभाऊ खोत यांनी बत्तीस शिराळा येथील ग्रामस्थांसह रविवारी जावडेकर यांची भेट घेतली. त्या वेळी शेकडो वर्षांपासून चालत आलेल्या बत्तीस शिराळा येथील नागपंचमी उत्सवावरील बंदी उठविण्याची मागणी त्यांनी जावडेकर यांच्याकडे केली होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कचरा डेपोस ना हरकत?

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

पुण्यासाठी पिंपरी-सांडस गावातील वनखात्याच्या जमिनीवर कचरा डेपो उभारण्याच्या पुणे महापालिकेच्या प्रस्तावाला केंद्रीय वनविभागाकडून सकारात्मक भूमिका घेतली जाणार आहे. या संदर्भात तोडगा काढण्यासाठी राज्य सरकारने प्रस्ताव दिल्यास वनविभागाकडून त्याला पाठिंबा देण्यात येईल, असे केंद्रीय वन-पर्यावरण आणि हवामानबदल मंत्री प्रकाश जावडेकर यांनी स्पष्ट केले. पिंपरी-सांडस येथील कचरा डेपोच्या प्रस्तावाला वनविभागाची मान्यता मिळावी, यासाठी महापौर दत्तात्रय धनकवडे, महापालिका आयुक्त कुणाल कुमार, सभागृह नेते शंकर उर्फ बंडू केमसे आदींनी जावडेकर यांची भेट घेतली. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना जावडेकर यांनी ही माहिती दिली.

दरम्यान, 'पिंपरी-सांडस येथील कचरा डेपोच्या प्रस्तावाबाबत जावडेकर यांच्याशी सकारात्मक चर्चा झाली. हा डेपो गावापासून आठ किलोमीटर आत आहे. त्यामुळे त्याचा ग्रामस्थांना त्रास होणार नाही. वनविभागाने याबाबत सकारात्मक विचार करावा, अशी विनंती जावडेकर यांना केली आहे,' असे महापौर दत्तात्रय धनकवडे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

लिफ्ट देण्याच्या बहाण्याने नळस्टॉप चौकात लुटले

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

लिफ्टच्या बहाण्याने विद्यार्थ्याला लुटल्याचा प्रकार नळस्टॉप चौकात शनिवारी रात्री दीडच्या सुमारास घडला. या प्रकरणी कोथरूड पोलिस ठाण्यात जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत नीलेश स्वामी (वय २४, रा. लातूर) यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. स्वामी 'एसएनडीटी' येथून घरी चालले होते. त्यासाठी त्यांनी एका दुचाकीस्वाराकडे लिफ्ट मागितली होती. या लिफ्टवर दोघे होते. त्यांनी स्वामी यांना दुचाकीवर बसवून घेतले आणि दुचाकी नळस्टॉपच्या दिशेने नेले. तेथे गेल्यावर त्यांनी स्वामी यांना चाकूचा धाक दाखवत त्यांच्या खिशातील आठ हजार रुपयांची रोकड आणि मोबाईल हॅन्डसेट असा ऐवज हिसकावून पळ काढला.

कर्वेनगर रोडवरून जॅमर चोरले

कर्वे रोडवरील हॉटेल शीतलसमोर डबल पार्किंग केलेल्या कारवर वाहतूक पोलिसांनी जॅमरची कारवाई केली होती. कारचालकाने वाहतूक पोलिसांकडे दंड न भरता पोलिसांनी कारला लावलेले जॅमर चोरल्याचा प्रकार घडला आहे. पोलिसांनी या प्रकरणी कारचालकावर जॅमर चोरीचा गुन्हा दाखल केला आहे. कर्वे पुतळा चौकातील शीतल हॉटेलसमोर एमएच १४-सीके ९५९२ ही कार डबल पार्किंगमध्ये होती. त्यामुळे या कारली जॅमर लावण्यात आल्याचा दावा वाहतूक पोलिसांकडून करण्यात आला आहे. वाहतूक पोलिस दलातील कर्मचारी गोरख शिंदे यांनी जॅमरची कारवाई केली होती. कारचालकाने जॅमर कारवाईबाबत वाहतूक पोलिसांकडे संपर्क न साधता जॅमर काढून कार घेऊन गेला आहे.

सदाशिव पेठेत घरफोडी

सदाशिव पेठेतील नवयूग सोसायटीतील फ्लॅट फोडून सोन्या चांदीचे दागिने, रोख रक्कम असा सुमारे पावणे चार लाख लाख रुपयांचा ऐवज चोरण्यात आला आहे. याप्रकरणी विश्रामबाग पोलिस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल केला आहे. लक्ष्मी ढवळीकर (वय ६५, रा. सदाशिव पेठ) यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. ढवळीकर यांचा फ्लॅट शनिवारी दुपारी दीड ते साडेतीनच्या दरम्यान, केवळ दोन तास बंद होता. चोरट्यांनी या कालावधीत घराचा मुख्य दरवाजा कटावणीने उचकटून घरात प्रवेश केला. कपाटात ठेवलेले सोन्या चांदीचे दागिने, रोख रक्कम असा सुमारे तीन लाख ७३ हजार रुपयांचा ऐवज चोरला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


कारखाना राष्ट्रवादीचा; कारभार काँग्रेसकडे

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

संत तुकाराम सहकारी कारखान्यावर दोन तज्ज्ञ संचालक नेमण्यावरून राजकीय वाद निर्माण झाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे वर्चस्व असलेल्या या कारखान्याचा गाडा काँग्रेसचे नेते मनमानी पद्धतीने हाकत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. इतकेच नव्हे, तर राजकीय विरोधक असलेल्या भाजपला तज्ज्ञ संचालकाची एक जागा देताना दुसऱ्या जागेवर काँग्रेसचे माजी खासदार नाना नवले यांच्या पुत्राची वर्णी लावण्याच्या घराणेशाहीवरही आक्षेप घेण्यात आला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य राजेंद्र हगवणे यांनी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, नेते अजित पवार यांच्या निदर्शनास ही बाब आणली आहे. कारखान्यावर तज्ज्ञ संचालक नेमताना राष्ट्रवादीला प्रतिनिधीत्व न दिल्यास कार्यकर्त्यांना भविष्यकाळात वेगळा विचार करावा लागेल, असे त्यांनी पक्षनेत्यांना पत्राद्वारे कळविले आहे. मुळशी तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसची सूत्रे काँग्रेसचे नेते नवले चालवतात. शरद पवार यांच्या नावाचा नेहमी जप करणारे नवले निवडणुकीत मात्र काँग्रेसचे काम करतात या दुटप्पीपणाकडेही हगवणे यांनी लक्ष वेधले.

संत तुकाराम कारखान्यावर राष्ट्रवादीचे १३ संचालक, भाजपचे सहा, काँग्रेस आणि शिवसेनेचा प्रत्येकी एक सदस्य आहे. असे असताना स्वीकृत संचालकाचे एक पद भाजपला व दुसऱ्या पदावर नवले हे त्यांच्या पुत्राची वर्णी लावली जाण्याची शक्यता आहे. वारसाला कारखान्यात प्रतिनिधीत्व नको, असे निवडणुकीत सांगणारे नवले आता मात्र शब्द फिरवित आहे. त्यांची घराणेशाही खपवून घेणार नाही, असेही हगवणे यांनी स्पष्ट केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

एक पत्र प्रामाणिक डॉक्टरांसाठी...

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

शहरात प्रामाणिकपणे प्रॅक्टिस करीत पेशंटना आरोग्यसेवा देणाऱ्या नागरिकांकडून डॉक्टरांना पत्र देण्याची मोहीम जनआरोग्य अभियानातर्फे राबविण्यात येत आहे. चांगल्या डॉक्टरांप्रती कृतज्ञता व्यक्त करणे हा या मोहिमेचा उद्देश आहे.

डॉक्टर्स डे निमित्ताने अशा प्रामाणिक डॉक्टरांना 'प्रिय डॉक्टर...' असे पत्र लिहून शुभेच्छा देण्यात आल्या. वैद्यकीय व्यवसायात अनेक अनैतिक प्रकार घडत असले, तरी प्रामाणिकपणे व्यवसाय करणारे काही डॉक्टर समाजात अद्याप आहेत. अशा डॉक्टरांप्रती कृतज्ञता व्यक्त करणे आणि अशा प्रामाणिक डॉक्टरांना समाजाकडून पाठिंबा मिळणे आवश्यक आहे. यासाठी ही मोहीम राबविण्यात येत आहे. वैद्यकीय व्यवसायातील प्रामाणिक डॉक्टरांनी इतर सहकारी डॉक्टरांशी चर्चा घडवून आणावी; तसेच वैद्यकीय व्यवसायातील गैरव्यवहारांना विरोध करावा, असेही आवाहन पत्राद्वारे करण्यात आले आहे. डॉक्टरांना पत्र देण्याच्या मोहिमेत जनआरोग्य अभियानातर्फे शकुंतला भालेराव, शैलेश ढिकले, हेमराज पाटील, अच्युत बोरगावकर, श्रीपाद कोंडे, रवी मांडेकर सहभागी झाले होते.

पत्रात पेशंट डॉक्टरांमध्ये खुंटलेला संवाद, दुरावा दूर करण्याचे डॉक्टरांना आवाहन करण्यात आले आहे. मेडिकल कौन्सिल ऑफ इंडियाच्या निर्देशानुसार पेशंटला प्रत्येक डॉक्टरने निदान, उपचार, तपासण्या, तसेच सर्जरीबद्दल माहिती देणे आवश्यक आहे; तसेच पेशंटने मागितल्यानंतर ७२ तासांत केसपेपर, तपासण्यांचे रिपोर्ट देणे बंधनकारक आहे. बहुतांश डॉक्टर हा नियम विसरत असल्याकडे पत्रात इतर डॉक्टरांचे लक्ष वेधण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सर्वेक्षणाच्या पुढे काय?

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

राज्यात मोठा गाजावाजा करून राबवण्यात आलेल्या शालाबाह्य मुलांच्या सर्वेक्षणाच्या पुढे काय, असा प्रश्न निर्माण होण्याची दाट शक्यता आहे. सर्वेक्षणानंतरच्या पातळीवर आवश्यक पावले उचलण्यासाठी मार्गदर्शक ठरणारा अहवाल अद्याप राज्य सरकारकडे अधिकृतरीत्या सादरच झाला नसल्याने शालाबाह्य विद्यार्थ्यांचे हे सर्वेक्षण फार्सच ठरणार की काय, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

राज्यातील शालाबाह्य विद्यार्थ्यांचे सर्वेक्षण करण्यासाठी शनिवारी एकाच वेळी राज्यभरात सर्वत्र विशेष मोहीम राबवण्यात आली. राज्याच्या शिक्षण खात्यातील सात लाखांहून अधिक शिक्षकांसह महसूल खात्यामधील दोन लाख कर्मचाऱ्यांच्या मदतीने ही मोहीम पूर्ण करण्यात आली. शाळेमध्ये कधीही न आलेल्या, शाळेत नाव नोंदवूनही एक महिन्याहून अधिक काळ हजर नसलेल्या आणि शाळा सोडलेल्या मुलांची माहिती या मोहिमेच्या माध्यमातून एकत्र करण्यात आली. शालाबाह्य मुलांची आकडेवारी आणि हे विद्यार्थी नेमकेपणाने समोर आल्यानंतर त्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी कोणते प्रयत्न करायला हवेत, याचा निर्णय घेण्यासाठी राज्य सरकारने एक समिती या पूर्वीच नेमली होती; मात्र या समितीचा अहवाल अद्यापही राज्य सरकारकडे न गेल्याने ही परिस्थिती उद्भवली आहे.

शालाबाह्य विद्यार्थ्यांविषयीच्या शैक्षणिक समस्यांवर उपाय शोधण्यासाठी सरकारने २८ ऑगस्ट २०१४ रोजी एक कार्यगट स्थापन केला होता. राज्याचे प्राथमिक शिक्षण संचालक महावीर माने यांच्या अध्यक्षतेखाली एकूण सात जणांच्या या कार्यगटाने आपला अहवाल एक महिन्याच्या आत सरकारकडे सादर करणे अपेक्षित होते. त्यानंतरच्या काळात या समितीला आपला अहवाल सादर करण्यासाठी एक महिना मुदतवाढही देण्यात आली होती; मात्र त्यानंतरही आजतागायत, अगदी सर्वेक्षणाची आकडेवारी हाती येईपर्यंतही हा अहवाल राज्य सरकारकडे अधिकृतपणे सादर झाला नसल्याची माहिती अधिकृत सूत्रांनी 'मटा'ला दिली. याविषयी अधिक माहितीसाठी माने यांच्याशी संपर्क साधला असता, ते उपलब्ध होऊ शकले नाहीत.

पुणे विभागात सर्वेक्षण 'उत्तम'

सर्वेक्षणासाठी शिक्षक पाठवणे, शिक्षकांना शौचालयांची माहिती गोळा करण्यास सांगणे, आदी बाबींमुळे वादात सापडलेले शालाबाह्य विद्यार्थ्यांचे सर्वेक्षण पुणे विभागात सुरळीत पार पडल्याची माहिती पुणे विभागीय शिक्षण उपसंचालक रामचंद्र जाधव यांनी रविवारी दिली. या सर्वेक्षणात पुणे शहरात एक हजार ६८३, तर पुणे जिल्ह्यात एक हजार ६१९ शालाबाह्य विद्यार्थ्यांची नोंद झाली. सोलापूर जिल्ह्यामध्ये एक हजार ७७०, तर नगर जिल्ह्यामध्ये ९६५ शालाबाह्य मुलांची नोंद झाल्याचे जाधव यांनी सांगितले.

'फक्त मदरशांवरच भर नव्हता'

या सर्वेक्षणामध्ये समितीला अपेक्षित असणाऱ्या अनेक बाबींबाबत प्रत्यक्ष कार्यवाही करताना उलट प्रकार झाल्याचे अनुभवायला मिळाल्याची माहिती समितीमधील सूत्रांनी दिली. विशेषतः शालाबाह्य मुलांमध्ये धार्मिक शिक्षण देणाऱ्या संस्थांमधील मुलांचा विचार करताना, त्यामध्ये केवळ मदरशांमधील मुलांवरच भर देण्यात आला. त्याच वेळी वेदपाठशाळा, महानुभाव पंथांचे मठ अशा इतर धार्मिक संस्थांबाबत सरकारने तुलनेने मवाळ भूमिका घेतल्याचा अनुभवही या सूत्रांनी सांगितला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मान्यतांसाठी आर्थिक व्यवहारांची कबुली

$
0
0

योगेश बोराटे, पुणे

सेट-नेट अपात्र प्राध्यापकांच्या बाबतीत राज्य सरकारच्या पातळीवरून झालेले दुर्लक्षच या प्राध्यापकांना चुकीच्या पद्धतीने मान्यतांचे घोळ घालण्यास भाग पाडत असल्याची बाब आता पुढे आली आहे. त्याच वेळी अगदी प्राचार्यांपासून ते मंत्रालयातील अधिकारी वर्गापर्यंत मान्यतांसाठी आर्थिक व्यवहार झाल्याची कबुलीही सेट- नेट अपात्र प्राध्यापकांकडून देण्यात येत आहे.

सेट-नेट अपात्र प्राध्यापकांनी विद्यापीठांमधील अधिकारी वर्ग हाताशी धरून आपल्याला सोयीची कागदपत्रे तयार करून घेण्यासाठी प्रयत्न केल्याची बाब 'मटा'ने नुकतीच उघड केली. पदोन्नतीचे सर्व नियम बाजूला सारून राज्यातील अनेकांनी या कागदपत्रांच्या आधारे, तुलनेने कमी कालावधीमध्ये पदोन्नती मिळवल्याचे प्रकारही यातून समोर आले. राज्यातील अशा प्राध्यापकांना नियमित मान्यता मिळाल्यास, राज्य सरकारवर जवळपास तीन हजार कोटींचा आर्थिक भार पडणार असल्याची बाबही यातून उघड झाली. त्या पार्श्वभूमीवर सेट-नेट अपात्र प्राध्यापकांनी आपली बाजू मांडताना सरकारच्या धोरणांवर टीका केली. त्याच वेळी चुकीच्या पद्धतीने पदोन्नती मिळवण्यासाठी केलेले प्रयत्न, सरकारी अधिकाऱ्यांसोबत झालेल्या आर्थिक व्यवहारांची गणिते निश्चितच योग्य नसल्याची बाबही कबूल केली.

गेल्या काही वर्षांमध्ये राज्यातील प्राध्यापकांच्या संघटनांमध्ये पडलेल्या फुटीमुळे सेट-नेट अपात्र प्राध्यापकांचा प्रश्न गुंतागुंतीचा होत गेला. विद्यापीठ कायद्यामध्ये प्राध्यापकांच्या पात्रतेविषयी कोणतीही स्पष्ट तरतूद नाही. त्यामुळे राज्यातील विविध विद्यापीठांनी आपापल्या पातळीवर नियमांमध्ये दुरुस्त्या करत सेट-नेट अपात्रांना सूट देण्याबाबतचे निर्णय घेतले. त्या आधारे सेट-नेट अपात्र प्राध्यापकांच्या सेवांचा नियमिततेसाठी विचार सुरू झाल्याचे या प्राध्यापकांनी 'मटा'ला सांगितले.

स्थानिक पातळीवरील या सेवांचा विद्यापीठ आणि विद्यापीठ अनुदान आयोगाकडील कागदपत्रांमधील नोंदीसाठी विचार न झाल्याने हा गोंधळ निर्माण झाल्याची शक्यता या प्राध्यापकांनी वर्तवली. हा गोंधळ टाळण्यासाठीच आता कोर्टाच्या मदतीने न्याय मिळवण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे प्राध्यापकांकडून सांगण्यात आले. त्याच वेळी या प्राध्यापकांपैकी अनेकांनी 'वेगळ्या' मार्गाने वैयक्तिक पातळीवर आपापल्या मान्यतांचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न केले. त्यातून अनेक ठिकाणी मोठे आर्थिक व्यवहारही झाले. त्यामध्ये प्राध्यापकांच्या गरजेचा फायदा घेऊन राज्य उच्चशिक्षण संचालनालय आणि मंत्रालयातील अधिकाऱ्यांनी पैसे उकळल्याचा आरोप या प्राध्यापकांनी केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मुंबईच्या दोघा तरुणांचा भुशी डॅममध्ये बुडून मृत्यू

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, लोणावळा

लोणावळ्याल भुशी डॅममध्ये रविवारी दुपारी साडेबारा वाजता दोघांचा बुडून मृत्यू झाला. भूपेन धीरज भंडारी (वय २०) व अनिकेत हांडे (२०, दोघेही रा. अंधेरी, मुंबई) अशी या दोन तरुणांची नावे आहेत. या ठिकाणी आठ दिवसांत चार जणांनी प्राण गमावले आहेत.

लोणावळा शहर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भुपेन, अनिकेत यांच्यासह त्यांच्या पूर्वीच्या शाळेतील १३ मित्र रविवारी सकाळी लोणावळ्यात वर्षाविहार व पर्यटनासाठी मुंबईहून आले होते. सकाळी अकराच्या सुमारास ते भुशी डॅम परिसरात आले होते. या ठिकाणी त्यांचे मित्र पोहण्यासाठी उतरून ते पोहत होते. परंतू भूपेन अणि अनिकेतला पोहता येत नसतानादेखील ते पोहण्यासाठी पाण्यात उतरले. येथील पाण्याची खोली व परिस्थितीची माहिती नसल्याने त्यांचा दुपारी साडेबारा वाजता पाण्यात बुडून मृत्यू झाला. या वेळी त्यांच्या मित्रांनी त्यांना वाचविण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांना अपयश आले. या ठिकाणी असलेले जीवरक्षक साहेबराव चव्हाण, राजू पवार या जीवरक्षकांसह आदिवासी कातकरी असलेले दीपक कोळी, सखाराम वाघमारे यांनी या दोघांना काढण्यासाठी पाण्यात उड्या मारल्या होत्या. ते खोल पाण्यात बुडाल्याने त्यांचा तपास लागण्यास उशीर झाला. पोलिसांनी या जीवरक्षकांच्या मदतीने अनिकेतचा मृतदेह दुपारी दीडला, तर भूपेनचा साडेतीन वाजता मृतदेह काढण्यास यश आले. गेल्या रविवारी व शुक्रवारी प्रत्येकी एक जण व आज दोन अशा प्रकारे चार जणांनी फाजील आत्मविश्वासाने नाहक जीव गमावले आहेत.

सूचनाफलकाकडे दुर्लक्ष

भुशी डॅममध्ये गेल्या काही वर्षांत शेकडो, तर दहा वर्षांत आतापर्यंत सत्तरपेक्षा अधिक पर्यटकांचा बुडून मृत्यू झाला आहे. येथील दुर्घटनांच्या पार्श्वभूमीवर लोणावळा शहर पोलिसांसह काही संस्था-संघटनांनी पर्यटकांसाठी पाण्यात उतरू व पोहू नये, असे सूचनाफलक लावले असतानाही अनेक जण या फलकांकडे दुर्लक्ष करतात.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images