Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

शेती झोनमध्ये बांधकाम

$
0
0

म. टा. विशेष प्रतिनिधी, पुणे

गावठाण हद्दीलगतच्या 'शेती' तसेच 'शेती ना विकास' झोनमध्ये अधिमूल्य भरून निवासी बांधकामास परवानगी देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. औद्योगिक झोनमधील जमिनीवरही अधिमूल्य आकारून निवासी वापराला परवानगी देण्यात येणार आहे.

शेती तसेच, शेती ना विकास झोनमध्ये निवासी बांधकाम करण्यासाठी रेडिरेकनरच्या पन्नास टक्के रक्कम सरकारी तिजोरीत भरावी लागणार आहे. औद्योगिक झोनमध्ये निवासी बांधकामाला परवानगी देताना रेडिरेकनरच्या वीस टक्के आकारणी केली जाणार आहे. राज्यात पुण्यासह कोल्हापूर, सांगली, सोलापूर, नगर, नाशिक, औरंगाबाद अशा सोळा मंजूर प्रादेशिक योजनांमध्ये या निर्णयाची अंमलबजावणी केली जाणार आहे. त्यासाठी येत्या तीस दिवसांत नागरिकांच्या हरकती व सूचना मागविण्यात आल्या आहेत. या हरकतींवर सुनावणी झाल्यानंतर त्याचा अंतिम अहवाल राज्य सरकारकडे सादर करण्यात येणार आहे. त्यानंतर या निर्णयाची प्रत्यक्ष अंमलबजावणी करण्यात येणार आहे. नगर विकास विभागाचे अवर सचिव संजय सावजी यांनी या संदर्भातील शासन निर्णय जारी केला आहे.

मंजूर प्रादेशिक योजनांमधील गावठाणांचे निवासी क्षेत्र पाचशे ते एक हजार मीटरने वाढविण्याचे प्रस्तावित आहे. ही निवासी क्षेत्रवाढ अपेक्षित असताना गावठाणालगतच्या शेती तसेच शेती ना विकास झोनमध्ये अधिमूल्य आकारून निवासी बांधकामास परवानगी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. गावठाणांची हद्द निश्चित करून काही वर्षे लोटली आहेत. कालौघात गावठाणांमधील लोकसंख्या वाढली आहे. कुटुंबांची संख्या वाढल्याने गावठाण विस्ताराची गरज भासू लागली आहे. परंतु, निवासी हद्दवाढीचा विषय दुर्लक्षितच राहिला होता. ही वेळखाऊ प्रक्रिया असल्याने तात्पुरते फेरबदल करण्यात येत आहेत. त्यानुसार गावठाणापासून विवक्षित अंतरापर्यंतच्या शेती तसेच शेती ना विकास झोनमध्य निवासी बांधकाम परवानगी देण्यात येणार आहे. औद्योगिक झोनमध्ये अधिमूल्य आकारून निवासी बांधकामास परवानगी देण्यात येणार आहे.

१९९१ ऐवजी नजीकची लोकसंख्या

गावठाणापासून विवक्षित अंतरापर्यंतच्या शेती तसेच शेती ना विकास झोनमध्ये बांधकाम परवानगी देताना १९९१ ची लोकसंख्या विचारात घेण्यात येणार होती. त्यामध्येही फेरबदल करण्यात आला असून, आता १९९१ऐवजी नजीकच्या जनगणनेची लोकसंख्या ग्राह्य धरण्यात येणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


४ दिवस आधीच मान्सून अंदमानात

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

नैर्ऋत्य मान्सून अंदमान निकोबार बेटावर नियोजित वेळेपेक्षा चार दिवस आधीच दाखल झाला आहे. यंदा सरासरीपेक्षा कमी पावसाचा अंदाज वर्तविण्यात आल्याच्या पार्श्वभूमीवर मान्सूनचे वेळेआधी आगमन काहीसे दिलासादायक ठरणार आहे.

सर्वसाधारणपणे दरवर्षी २० मेला मान्सून अंदमानात दाखल होतो. गेल्या वर्षी मान्सून येथे १८ मे रोजी दाखल झाला होता. यंदाही मान्सून २० मेपूर्वीच अंदमानात दाखल होईल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला होता.

येत्या तीन ते चार दिवसात मान्सून अंदमान परिसरात दाखल होईल, असा अंदाज हवामान विभागाने १४ मे ला वर्तवला होता. त्यावेळी या परिसरात मान्सूनच्या आगमनासाठी अनुकूल परिस्थिती निर्माण झाली होती. गेल्या दोन दिवसांपासून अंदमान-निकोबार बेटावर जोरदार पाऊस पडत आहे. या हवामानाचा अभ्यास करून हवामान विभागाने अंदमानात मान्सून सक्रिय झाल्याचे शनिवारी जाहीर केले आहे. मान्सूनच्या पुढील वाटचालीसाठी अनुकुल वातावरण राहिल्यास पुढील दोन दिवसात अंदमानचा इतर भाग, दक्षिण बंगालच्या उपसागराचा उरलेला भाग व्यापून तो मध्य बंगालच्या उपसागरात प्रवेश करेल. येत्या २४ तासांत अंदमान-निकोबार बेटांवर मुसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे.

अंदमानसह बंगालच्या उपसागराच्या काही भागातही मान्सून सक्रिय झाल्याचे हवामान विभागाने सांगितले आहे. अंदमानात दाखल झाल्यानंतर बंगालच्या उपसागराच्या मध्य भागातून श्रीलंकामार्गे मान्सून केरळमध्ये दाखल होतो. यंदा, मान्सून ३० मे रोजी म्हणजेच सर्वसाधारण वेळेपेक्षा (एक जून) दोन दिवस आधीच दाखल होईल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

खेडमध्येच ‘टेकऑफ’साठी हालचाली

$
0
0

धनंजय जाधव, पुणे

गेल्या काही वर्षांपासून केवळ चर्चेच्या फेऱ्यांमध्ये अडकलेल्या खेड येथील नियोजित आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या 'टेकऑफ'साठी हालचाली सुरू झाल्या आहेत. विमानतळाच्या उभारणीसाठी खेडच्या विशेष आर्थिक क्षेत्रातील (सेझ) जमिनीला प्रशासनाने पसंती दर्शविली असून भारत फोर्ज व खेड इकॉनॉमिक इन्फ्रास्ट्रक्टर कंपनीच्या सहमतीने जमीन ताब्यात घेण्यासंबंधीचा प्रस्ताव प्रशासनाने दिला आहे.

राज्यातील उभारणीच्या प्रतीक्षेत असलेल्या विमानतळांसंदर्भातील माहिती भारतीय विमान प्राधिकरणाच्या उच्चपदस्थ अधिकाऱ्यांनी मुंबईत नुकतीच घेतली. सोलापूर, शिर्डी, फलटण, कराड, अमरावती, चंद्रपूर तसेच गडचिरोलीच्या विमानतळाबाबत चर्चा करण्यात आली. खेडमधील नियोजित आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी लागणारी जमीन व संपादनासाठी करावे लागणारे प्रयत्न याविषयीची माहिती जिल्हाधिकाऱ्यांमार्फत या अधिकाऱ्यांना देण्यात आली.

पुण्यातील आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी पहिल्यांदा चाकणजवळील ७५६ हेक्टर जागा सूचविण्यात आली होती; परंतु त्यास मोठा विरोध झाल्याने हा प्रस्ताव बारगळला. त्यानंतर चांदूस व लगतच्या सात गावांतील जमिनीचा प्रस्ताव दिला गेला. मात्र, बागायती जमिनींमुळे शेतकऱ्यांनी त्यास नकार दिला. या प्रस्तावाला विरोध झाल्याने कोये-पाईटमधील १६४९ हेक्टर जमिनीचा प्रस्ताव मांडला गेला. परंतु जमिनीचा उंच-सखलपणा आणि संपादनातील अडथळ्यांमुळे हा प्रस्तावही फेटाळला गेला. विमानतळासाठी अंतिमतः खेडमधील सेझच्या जागेचा प्रस्ताव देण्यात आला आहे. या विमानतळासाठी १,२६० हेक्टर जमिनीची आवश्यकता आहे.

खेड 'सेझ'साठी १७०५ हेक्टर जमीन संपादित करण्यात आली आहे. त्यापैकी ८१२.७५ हेक्टर जमीन विमानतळासाठी ताब्यात घेण्याचा प्रस्ताव आहे. तसेच निमगाव, दावडी, कनेरसर व केंदूर या चार गावांतील ४४७ हेक्टर जमीन संपादन करण्याचे प्रस्तावित करण्यात आले आहे.

'सेझ'चे क्षेत्र महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने (एमआयडीसी) औद्योगिक क्षेत्र म्हणून संपादित केले आहे. हे क्षेत्र 'सेझ' कायद्याखाली अधिसूचित करण्यात आले. ते अद्याप विनाअधिसूचित करण्यात आलेले नाही. त्यासंबंधीची प्रक्रिया केंद्र सरकारमार्फत सुरू असून एमआयडीसीने त्यास 'ना हरकत' दिली आहे; तसेच भारत फोर्ज कंपनीस हे क्षेत्र 'सेझ' कायद्यान्वये हस्तांतरीत केलेले आहे. त्यामुळे कंपनीस भागधारकांच्या संमतीशिवाय या क्षेत्रावर त्रयस्थ हक्क स्थापित करता येणार नाहीत. एमआयडीसीने सेझचे क्षेत्र भारत फोर्ज व खेड इकॉनॉमिक इन्फ्रास्ट्रक्चरला विकसित करण्यास दिले आहे. त्यामुळे त्यांच्या सहमतीनेच निर्णय घेण्याचे प्रशासनाने सूचित केले आहे.

जागेचा आणखी शोध

पुण्यातील आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी चाकण, चांदूस, कोये-पाईट अशा तीन जागा सुचविण्यात आल्या. पण त्याला शेतकऱ्यांचा विरोध झाला. त्यानंतर खेडमधील सेझच्या जागेचा पर्याय निवडण्यात आला आहे. या जागेवरही विमानतळाला विरोध झाल्यास शिक्रापूर ते चौफुला या दरम्यान विमनातळासाठी नवी जागा शोधण्यात येत असल्याचे उच्चपदस्थ सूत्रांकडून सांगण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘लालफिती’ने अडविली पालिका

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

पूर्व पुण्याच्या स्वतंत्र महापालिकेसाठीचा प्रस्ताव सादर करण्याचे आदेश तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दिल्यानंतरही प्रशासकीय दिरंगाईमुळे गेल्या दोन वर्षांत याबाबत कोणत्याच हालचाली झाल्या नसल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे या पालिकेच्या स्थापनेसाठी अधिक पाठपुरावा होण्याची अपेक्षा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून केली जात आहे.

आघाडी सरकारच्या काळात माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुण्याच्या हद्दीत समाविष्ट होणारी गावे वगळून आसपासच्या गावांची स्वतंत्र महापालिका स्थापन करावी, असे पत्र तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना दिले होते. जुलै २०१३ मध्येच हे पत्र मुख्यमंत्र्यांना देण्यात आले होते. त्यावर चव्हाण यांनीही पवार यांच्या सूचनेचा अभ्यास करून त्यासंबंधीचा प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना नगरविकास विभागाला दिल्या होत्या. मात्र, त्यावर गेल्या दोन वर्षांत प्रशासनाने कोणतीच कार्यवाही केली नसल्याचे दिसून येत आहे. माजी आमदार महादेव बाबर यांनीही नव्या पालिकेसाठी वारंवार पाठपुरावा केला होता. विधिमंडळातही त्याबद्दल आवाज उठविला होता; पण मुख्यमंत्र्यांच्या सूचनेनंतरही नगरविकास विभागातील त्यावेळच्या अधिकाऱ्यांना या प्रस्तावाला केराची टोपलीच दाखविल्याचे स्पष्ट होत आहे.

शहराच्या हद्दीत नव्याने ३४ गावांचा समावेश करण्याचा प्रस्तावही सध्या सरकारदरबारी प्रलंबित आहे. या गावांच्या समावेशानंतर पुण्याच्या पालिकेवर मूलभूत सेवा-सुविधा पुरविण्यासाठी मोठा ताण येण्याची चिन्हे आहेत. शहराच्या पूर्व भागासाठी स्वतंत्र महापालिका स्थापन करण्याची मागणी जोर धरत आहे. पुण्याचा वाढता विस्तार पाहता नव्या महापालिकेची गरज 'महाराष्ट्र टाइम्स'ने सातत्याने मांडली आहे. त्यादृष्टीने, नव्या सरकारनेही पावले टाकली असून, महापालिकेच्या सर्वसाधारण सभेने त्यावर निर्णय घ्यावा, असे निर्देश दिले आहेत.

नव्या मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेकडे लक्ष

तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी नव्या महापालिकेचा प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना देऊनही नगरविकास विभागाने त्यांच्या आदेशाला वाटाण्याच्या अक्षता लावल्या. त्यामुळे आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नव्या पुण्याच्या नव्या पालिकेबाबत आग्रही भूमिका घ्यावी; तसेच प्रशासनाकडून त्यासंबंधीचा प्रस्ताव मागवून घेऊन, वेगळ्या पालिकेला गती द्यावी, अशी अपेक्षा या परिसरातील नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गाडीवर झाड पडल्याने पाच जखमी

$
0
0

पिंपरी : पुण्याहुन पिंपरीच्या देशेने येणाऱ्या कारचालकाचा गाडीवरील ताबा सुटून कार झाडाला धडकून झाड पडल्याने पाचजण जखमी झाले आहेत. एका दुचाकीस्वाराला वाचवण्याच्या प्रयत्नात हा अपघात झाला. जखमींवर उपचार सुरू आहेत. पिंपरी येथील एचए कंपनीसमोर सायंकाळी साडेपाचच्या सुमारास हा अपघात झाला. आशिक चौधरी (रा. मोरवाडी), अभिताप पवार (तळेगाव दाभाडे), कार्ल फर्नांडिस, आदित्य गाडे (अजमेरा कॉलनी), स्वप्नील प्रभुणे अशी जखमी झालेल्यांची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अपघातात जखमी झालेले सर्वजण पुण्याहुन पिंपरीच्या दिशेने फोर्चुनर कारमधून येत होते. त्या वेळी पिंपरी येथील एचए कंपनी समोर त्यांच्या गाडी समोर एक दुचाकीस्वार आला. त्या दुचाकीस्वाराला वाचवण्याच्या प्रयत्नात हा अपघात झाला. अग्निशमन दलाच्या जवानांना पाऊण तासांच्या प्रयत्नानंतर झाड बाजूला करून जखमींना बाहेर काढण्यात यश मिळाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सुसाइड नोट लिहिणारा परतला

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पिंपरी

फेसबुकवर 'सुसाइड नोट' पोस्ट करून बेपत्ता झालेला कॉलेजचा विद्यार्थी अखेर तीन दिवसांनी पहाटे दोनच्या सुमारास त्याच्या घरी सुखरूप परतला. अभिजित भगवान व्यवहारे (वय २३, रा. मातृछाया अपार्टमेंट, गुरुद्वारा रोड, वाल्हेकरवाडी, चिंचवड) असे या विद्यार्थ्याचे नाव आहे. तो तब्बल ७७ तास बेपत्ता झाला होता. तो कुठे गेला होता याबाबत चिंचवड पोलिस त्याची चौकशी करणार आहेत. अभिजित आकुर्डी येथील डॉ. डी. वाय. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयात मॅकेनिकल इंजिनिअरिंगच्या तिसऱ्या वर्षाचा विद्यार्थी आहे.

मित्र त्रास देतात म्हणून १३ मे रोजी रात्री नऊ वाजता तो बाहेर पडला. त्यानंतर त्याचा कोणताही ठावठिकाणा समजू शकलेला नव्हता. जाताना त्याने फेसबुकवर सुसाइड नोट पोस्ट केली होती. त्यानंतर तो रविवारी पहाटे दोन वाजता स्वतःहून त्याच्या नगर जिल्ह्यातील वडगाव गुप्ता या गावातील घरी परत आला. त्याबाबत त्याच्या वडिलांनी पोलिसांना कळविले. अभिजितची मनःस्थिती ठीक नसल्याने तो कुटुंबीयांशी देखील अजून बोललेला नाही. त्यामुळे तो बेपत्ता होण्यामागील नेमके कारण काय तसेच गेले तीन दिवस तो कोठे होता, हे अद्याप स्पष्ट होऊ शकलेले नाही.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘वर्षात एकही घोटाळा नाही’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पिंपरी

केंद्रातील भाजप सरकारला एक वर्ष पूर्ण होत असल्याच्या निमित्ताने सरकारने राबविलेल्या विविध योजनांची माहिती देण्यासाठी खासदार अमर साबळे यांनी ​शनिवारी पत्रकार परिषद आयोजित केली होती. मागील एक वर्षात केंद्र सरकारने राबविलेल्या विविध योजनांची माहिती त्यांनी या वेळी दिली. तसेच युपीए सरकारने ज्या क्षेत्रात भ्रष्टाचार केला, त्याच क्षेत्रात भाजप सरकारने कोट्यवधी रुपयांचे उत्पन्न वाढवले असून, गेल्या एक वर्षात एकही घोटाळ्याचा आरोप या सरकारवर झाला नसल्याचे त्यांनी सांगितले.

लोककल्याणाच्या निर्णयाकरिता भाजप सरकारने व्यापक योजना आणल्या आहेत. त्याचा लेखाजोगा खासदार अमर साबळे यांनी पत्रकार परिषदेत मांडला. या वेळी भाजपचे शहराध्यक्ष सदाशिव खाडे, पश्चिम महाराष्ट्राचे संपर्क प्रमुख एकनाथ पवार, भाजपच्या सरचिटणीस शोभा बऱ्हाडे, दीपाली धनोकार, महिला आघाडीच्या शैला मोळक, अमोल थोरात, नामदेव ढाके, शोभा बऱ्हाडे, भाजपचे युवा मोर्चाचे अध्यक्ष अॅड. मोरेश्वर शेडगे, विजय ओव्हाळ आदी उपस्थित होते.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यापक योजना आणल्या आहेत. त्यामध्ये आदर्श गाव, स्वच्छ भारत मिशन, हागणदारीमुक्त गाव, पेन्शन योजना, अटल बिमा पेन्शन योजना, झिरो बॅलन्स योजना, जनधन योजना आदी योजनांची माहिती त्यांनी या वेळी दिली.

रेडझोनच्या प्रश्नांबाबत सातत्याने पाठपुरावा केला. रेडझोनचा प्रश्न केवळ पिंपरी-चिंचवडच्या संबंधित नसून संपूर्ण देशातला प्रश्न आहे. एक वर्षाच्या आत रेडझोनचा प्रश्न मार्गी लावू असे आश्वासन त्यांनी दिले. तसेच हिंदुस्थान अॅन्टिबायोटिक्स कंपनीच्या कामगारांचा प्रश्नाचा पाठपुरावा सुरू आहे. नऊ महिन्यांचे वेतन थकलेल्या एचए कंपनीच्या कामगारांना दिलासा मिळणार आहे. केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी ११ कोटी रुपयाचा हफ्ता लवकरात लवकर मिळवून देऊ त्यासंदर्भात वित्तमंत्री अरुण जेटली यांच्याशी याबाबत चर्चा झाली आहे, असे साबळे यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रेन वॉटर हार्वेस्टिंगचा विसर

$
0
0

संतराम घुमटकर, बारामती

काँक्रिटचे जंगल वाढत असल्यामुळे बारामती तालुक्यात मराठवाड्यापेक्षा भरपूर पाऊस पडूनही उन्हाळ्यात पाण्याची टंचाई भासते. त्यामुळे पावसाळ्यातील पाणी जमिनीत खोलवर जाऊन भूगर्भातील जलसाठा वाढावा तसेच, इमारतींच्या छतावरील पडणारे पावसाचे पाणी पुन्हा वापरात यावे, यासाठी रेन वॉटर हार्वेस्टिंग सक्तीचे केले आहे. सरकारचे असे निर्देश असतानाही बारामतीमधील कोणत्याही प्रशासकीय इमारतीला रेन वॉटर हार्वेस्टिंग केलेले नाही, तरीही या इमारतींना पूर्णत्वाचा दाखला देण्यात आला आहे.

रेन वॉटर हार्वेस्टिंग म्हणजेच काळाची गरज. पाण्याचा वाढता तुटवडा लक्षात घेऊन तसेच विविध सामाजिक उपक्रमांसाठी व दर्जेदार सुविधा नागरिकांना उपलब्ध करून देण्यासाठी लागणाऱ्या पाण्याची गरज लक्षात घेऊन राज्य सरकारने 'रेन वॉटर हार्वेस्टिंग'साठी पुढाकार घेतला. मात्र, बारामतीमधील सार्वजनिक विभागाने त्याकडे पूर्णतः दुर्लक्ष केले आहे. शासन पाण्यासाठी कोटी रुपये खर्च करून पिण्याच्या पाण्याच्या व शेती पाण्याच्या योजना करीत आहे, तर पाण्याविषयी जनजागृती करण्यासाठी जाहिरातीवर लाखो रुपये शासन खर्च करीत आहे. मात्र, प्रशासनातील काही अधिकारी मात्र 'रेन वॉटर हार्वेस्टिंग'साठी ढिम्म कारभार करत आहेत.

बारामती येथील प्रशासकीय भवन, परिवहन कार्यालय व अन्य कोणत्याही शासकीय कार्यालयाच्या इमारती 'रेन वॉटर हार्वेस्टिंग' विनाच पूर्ण करण्यात आल्या आहे. सरकारचे काम ज्या कार्यालयातून चालते तेथेच पाणी बचतीबाबत अक्षम्य दुर्लक्ष झाले आहे. आता याप्रकरणी संबंधित अधिकाऱ्यांवर प्रशासन कोणती कारवाई करणार, असा प्रश्न सर्व सामान्य नागरिकांना पडला आहे. सामान्य नागरिकांना इमारत पूर्ण झाल्यानंतर पूर्णत्वाचा दाखला घेण्यासाठी रेन वॉटर हार्वेस्टिंग काम केले पाहूनच दाखला दिला जातो, असे नगरपालिका बांधकाम अभियंता शहा यांनी 'मटा'ला सांगितले. मात्र, शासकीय इमारतीला नियम मोडून पूर्णत्वाचा दाखला नगरपालिकेने बहाल केला आहे.

प्रशासकीय भवनाचे रेन वॉटर हार्वेस्टिंगचे काम पावसाळ्यापूर्वी करण्यात येणार आहे. छतावरील पावसाचे पाणी येथील विहिरीत सोडण्यात येणार आहे. इमारतीला पूर्णत्वाचा दाखला मिळाला आहे.

- व्ही. एम. जगदाळे, शाखा अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग, बारामती

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


भूस्खलन, पुराचा धोका

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कात्रज

कात्रज हद्दीत अंजलीनगरच्या टेकडीवरील खाण बुजवून बेकायदा प्लॉटिंग करणाऱ्यांविरोधात फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे आदेश अतिरिक्त आयुक्त ओमप्रकाश बकोरीया यांनी महापालिकेच्या अधिकाऱ्यांना दिले आहेत.

कात्रज येथील सर्व्हे नंबर ६१ अंजनीनगरच्या टेकडीवरील खाण बुजवून प्लॉटिंग केल्यामुळे भविष्यात निर्माण होणाऱ्या धोकादायक स्थितीची माहिती महापालिका प्रशासनाला व्हावी व त्याच्यावर तत्काळ कारवाई महापालिकेने करावी, असे पत्र कात्रजचे नगरसेवक वसंत मोरे यांनी महापालिका आयुक्तांना दिले होते. त्याची दखल घेत अतिरिक्त आयुक्त ओमप्रकाश बकोरीया, उपायुक्त सुरेश जगताप, बांधकाम विकास विभागाचे कार्यकारी अभियंता प्रसन्न जोशी, कनिष्ठ अभियंता प्रवीण शिंदे, भूमी जिंदगीचे रमेश कांबळे, धनकवडीचे प्रभारी सहाय्यक आयुक्त के. पी. निकम यांनी कात्रज येथील संबंधित क्षेत्राची पाहणी केली.

नगरसेवक मोरे यांनी भविष्यात निर्माण होणाऱ्या धोकादायक स्थितीची माहिती अधिकाऱ्यांना दिली. टेकडीवरील नैसर्गिक जलस्रोताला अडथळा निर्माण होणारा भराव केल्यामुळे पावसाळ्यात शिंदेवाडीसारखी दुर्घटना पुन्हा घडण्याचा धोका आहे. पुणे-बेंगळुरू मार्गावरील गुजरवाडी फाटा येथील कलवर्टखालून टेकडीवरील पावसाचे पाणी मोठ्याप्रमाणात ओढ्यात येते. मोठ्या पावसात भुस्खलन होवून येणारा पाण्याचा लोंढा मार्गावरील वाहतुकीसह जाधवनगर व केडमे वस्तीला धोकादायक ठरणार आहे. त्याचबरोबर खाण बुजवून केलेले प्लॉटिंग विकण्याचा धडाका लावल्यामुळे या सगळ्याची माहिती नसणारे प्लॉट विकत घेणार आणि इमारती उभारणार आहेत.

भुसभुशीत ठिकाणी उभारल्या जाणाऱ्या इमारती धोकादायक ठरणार असल्याची माहिती मोरे यांनी या या वेळी बकोरीया यांना दिली. वस्तुस्थितीची पाहणी करून बकोरीया यांनी तात्काळ संबंधितांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे आदेश अधिकाऱ्यांना दिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

होस्टेलमधील पॅरासाइट्सना घरी कधी पाठवणार?

$
0
0

योगेश बोराटे, पुणे

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या आवारात नुकत्याच झालेल्या आत्महत्येच्या प्रकाराने विद्यापीठाच्या होस्टेलवर राहणाऱ्या पॅरासाइट्सचा मुद्दा पुन्हा चर्चेला आला आहे. या पॅरासाइट्सना घरी पाठवण्यात विद्यापीठ अपयशी ठरत असल्याने, कोणताही संबंध नसलेल्या प्रकारांमध्ये विद्यापीठालाच टीकेचे धनी व्हावे लागत असल्याचे पुन्हा समोर आले आहे. त्यामुळेच विद्यापीठाशी कोणताही संबंध नसलेल्या व्यक्तींना विद्यापीठाच्या वाहेर काढण्याचे आव्हान विद्यापीठ पेलणार की नाही, असा सवाल उपस्थित होत आहे.

विद्यापीठाच्या आवारामध्ये मंगळवारी विद्यापीठाच्या एका माजी विद्यार्थ्याने गळफास लावून आत्महत्या केली. हा विद्यार्थी माजी विद्यार्थी असल्याने या घटनेचा विद्यापीठाशी तसा कोणताही थेट संबंध नसल्याचे विद्यापीठ प्रशासनाने स्पष्ट केले. हा विद्यार्थी विद्यापीठाच्या होस्टेलमध्ये अनधिकृतपणे राहत होता, ही बाब विद्यार्थ्यांशी झालेल्या चर्चेमधून समोर आली. विद्यापीठ प्रशासनाने त्या विषयी कोणतीही स्पष्ट भूमिका जाहीर करणे टाळले. विद्यार्थी विद्यापीठाच्या होस्टेलमध्येच राहत होता, हे सांगितल्यास घटनेची जबाबदारी घ्यावी लागेल हे त्यामागचे महत्त्वाचे कारण आहे.

गेल्या काही वर्षांपासून विद्यापीठामध्येच तळ ठोकून बसलेल्या विद्यार्थ्यांनीही या प्रकाराविषयीच्या चर्चेदरम्यान संबंधित विद्यार्थी विद्यापीठामध्ये राहतच नव्हता अशी भूमिका पुढे रेटण्याचा प्रयत्न केला. हा विद्यार्थी विद्यापीठातच राहत होता हे उघड झाल्यास, आपलाही तळ हलवावा लागणार या भीतीने या विद्यार्थ्यांकडून हे प्रयत्न सुरू असल्याचे समोर आले. त्यामुळेच विद्यापीठाच्या होस्टेलवर अनधिकृतपणे राहणाऱ्या विद्यार्थ्यांविरोधात विद्यापीठ प्रशासनाने कडक पावले न उचलल्यास या पुढील काळात हा प्रश्न अधिकाधिक बिकट होणार असल्याचेही दिसून येत आहे. विद्यापीठाच्या सध्याच्या मुलांच्या आणि मुलींच्या होस्टेलच्या क्षमतेचा विचार करता, साधारण अकराशे विद्यार्थ्यांची आणि साधारण बाराशे विद्यार्थिनींना राहण्याची सुविधा होऊ शकते. उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये विविध परीक्षांच्या कारणांनी साधारण तीनशे विद्यार्थ्यांना राहण्याची सुविधा विद्यापीठ उपलब्ध करून देते. मात्र, उन्हाळ्यात हा आकडा एक हजारावर जातो. उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्येही विद्यापीठ न सोडणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये गेल्या काही वर्षांपासून विद्यापीठातच तळ ठोकून असलेल्या शेकडो विद्यार्थ्यांचा समावेश असतो. आपल्या सुरुवातीच्या अभ्यासक्रमाचा कालावधी संपल्यानंतरही इतर अभ्यासक्रमांना प्रवेश घेऊन विद्यापीठातील होस्टेलचा लाभ मिळविण्यासाठी हे विद्यार्थी प्रयत्नशील असतात. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्यांसोबतच प्रसंगी विद्यापीठाबाहेर नोकरी करणाऱ्यांचाही अशा 'पॅरासाइट्स'मध्ये समावेश आहे. अशा सर्व विद्यार्थ्यांवर मेहेरनजर करण्यामुळे विद्यापीठाच्या नियमित विद्यार्थ्यांवर अन्याय होतो. विद्यापीठामध्ये स्पर्धा परीक्षांच्या विद्यार्थ्यांसाठी दोन नव्या होस्टेल्सचे बांधकाम सुरू झाल्याने, या परिस्थितीमध्ये बदल होण्याची अपेक्षा सध्या व्यक्त केली जात आहे. पॅरासाइट्सची समस्या कायम राहिल्यास, नवी होस्टेल्स उपलब्ध झाल्यानंतरही नियमित विद्यार्थी दुर्लक्षितच राहण्याची भितीही व्यक्त केली जात आहे.

पॅरासाइट्सचा प्रश्न कसा सुटेल?

विद्येचे माहेर घर म्हणवले जाणाऱ्या पुण्यात बाहेरगावचे सुमारे पाच लाख विद्यार्थी शिक्षणासाठी वास्तव्यास आहेत. वसतिगृहांची अपुरी संख्या, आणि महाग शुल्क या गोष्टींमुळे अनेक विद्यार्थ्यांना वसतिगृहात राहणे शक्य होत नाही. पर्यायाने रुचत नसले तरी पॅरासाइट म्हणून राहण्याशिवाय त्यांच्याकडे पर्यायही उरत नाही.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

परदेशी नागरिकांची भाड्यासाठी फसवणूक

$
0
0

पुणे : कोंढव्यात फ्लॅट भाड्याने देण्याच्या बहाण्याने चार परदेशी नागरिकांकडून भाडे आणि डिपॉझिट घेऊन पावणेतीन लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला. या प्रकरणी पुनीत नंदवानी आणि इतरांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नासा चिनासा (वय २८, रा. उंड्री) यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. चिनासा यांच्यासह मिस रोझ (७० हजार), रेव्हरंड डॅनियल (५५ हजार), रेव्हरंड ओसाम ( ५१ हजार ) आणि कोसी लिंडा (४४ हजार) या चौघांना फसवण्यात आले आहे. या प्रकरणी पुनीत नंदवानी याच्यासह आणखी एकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

परदेशी नागरिकांनी नंदवानी याच्याकडे भाड्याने फ्लॅट मिळेल का अशी विचारणा केली होती. त्याने चौघांनाही फ्लॅट दाखवून त्यांच्याकडून पैसे घेतले. मात्र, फ्लॅट पसंत न आल्याने त्यांनी दुसऱ्या फ्लॅटची मागणी केली. नंदवानी चौघांचे पैसे घेऊन गायब झाला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सात बालकामगारांची सुटका

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

पुणे पोलिसांच्या सामाजिक सुरक्षा विभागाने कोंढवा पोलिस स्टेशनच्या हद्दीतील टिळेकरनगर येथील एका शाळेसमोर पत्र्याच्या शेडवर छापा टाकून सात बालकामगारांची सुटका केली. याप्रकरणी तिघांना अटक करण्यात आली आहे. सुटका करण्यात आलेल्या बालकामगारांकडून केबल वायरमधील तार काढणे आणि प्लास्टिक ओतकाम प्रक्रिया करण्याचे काम करून घेतले जात होते. या प्रकरणी पोलिसांनी आलीम बारची खान उर्फ लाला खान (३१, समरी, उत्तरप्रदेश), विजयपाल चंद्रभान यादव (२० रा. समरी, उत्तरप्रदेश), मिंकू धर्मपाल यादव (२६, रा. सिक्टा, उत्तरप्रदेश) या तिघांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याविरुद्ध कोंढवा पोलिस स्टेशनमध्ये बालकामगार प्रतिबंध व नियमन अधिनियम १९८६ अंतर्गत कलम ३ आणि १४, बाल न्याय अधिनियम २००० चे कलम २४ आणि २६ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सुटका करण्यात आलेली मुले सात - बारा या वयोगटातील आहेत. त्यांच्याकडून दररोज सहा - आठ तास वायर सोलून त्यातून तार काढणे, भट्टीमध्ये वितळून त्यातून प्लॅस्टिक आणि अॅल्युमिनियम वेगळे करण्याची प्रक्रि करण्याचे काम करून घेतले जात होते. त्या बदल्यात त्यांना दररोज ५० रुपये किंवा दरमहा २५०० रुपये रोजंदारी दिली जात असे. सहायक पोलिस फौजदार रमेश काळे यांना मिळालेल्या माहितीवरून छापा टाकून ही कारवाई करण्यात आली.

कामगार आयुक्तालयाचे अप्पर कामगार आयुक्त रत्नदीप हेंद्रे, पोलिस उपायुक्त पी. आर. पाटील, प्रसाद हसबनीस, वरिष्ठ पोलिस निरीक्षक संजय निकम, सहायक पोलिस निरीक्षक निता मिसाळ, ज्योती राजेशिर्के, दिपक सप्रे, रमेश काळे, गणेश जगताप, शशिकांत शिंदे, सुरेश विधाते यांच्या पथकाने ही कारवाई केली.

मोबाइल शॉपीत चोरी

कोथरूड बस स्टँड जवळील ए. एम. मोबाइल शॉप फोडून त्यातील २३ लाख रुपये किमतीचे १३२ मोबाइल हँडसेट चोरल्याचा प्रकार शनिवारी पहाटे घडला. या प्रकरणी कोथरूड पोलिस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गिरीश धाबलिया (वय ३०, रा. कोथरूड) यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. या प्रकरणी अज्ञात आरोपींविरुद्ध घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. धाबलिया हे मॅनेजर असून, सिल्वर फन इमारतीत हे दुकान आहे.

चोरट्यांनी दुकानाच्या शटरचे दोन्ही कोयंडे उचकटून चोरट्यांनी आत प्रवेश केला. शोकेसमधील सॅमसंग कंपनीचे ८२, नोकिया १०, सोनी ३६, एचटीसी ४ असे १३२ मोबाइल हँडसेट आणि रोख ७० हजार रुपये असा २३ लाख १० हजार रुपयांचा ऐवज चोरला. गेल्या वर्षीही चोरट्यांनी अशाच प्रकारे तीन मोबाइल शॉपी फोडून सुमारे एक कोटी रुपयांचा ऐवज चोरला. कोथरूड पोलिसांनी आरोपींची सीसीटीव्ही फुटेज मिळवण्यास सुरुवात केली आहे.

पाटील शाळेत चोरी

धनकवडी येथील कर्मवीर भाऊराव पाटील विद्यामंदिर या शाळेचे ऑ​​फिस फोडून कपाटातील ११ हजार ८०० रुपयांची रक्कम चोरीस गेल्याची घटना शुक्रवारी रात्री घडली. या प्रकरणी भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. लक्ष्मण आबदर (वय ५४, रा. धनकवडी) यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. या प्रकरणी अज्ञात आरोपींविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल केला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘बाजार समिती सुधारणार’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

पुणे प्रादेशिक कृषी उत्पन्न बाजार समितीला आंतरराष्ट्रीय दर्जाचे हब बनविण्याचा मानस समितीचे नवनियुक्त उपसभापती दिलीप खैरे यांनी रविवारी व्यक्त केला. बाजार समितीच्या आवारात होणारा प्रत्येक आर्थिक व्यवहार ऑनलाइन करण्याचा प्रयत्न असून, त्यामुळे भ्रष्टाचार होण्याची शक्यता कमी होईल, असेही त्यांनी सांगितले.

प्रादेशिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या उपसभापती पदावर खैरे यांची निवड झाल्यानंतर प्रथमच पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. या वेळी बाजार समितीचे संचालक गोरख दगडे, आडते असोसिएशचे अध्यक्ष शिवलाल भोसले व व्यापारी विलास भुजबळ, सहायक सचिव अनिल जगताप, विभाग प्रमुख एन. डी. घुले उपस्थित होते. 'बाजार समितीवर येणाऱ्या पदाधिकाऱ्यांची हुजरेगिरी करण्यामध्ये अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा वेळ जात होता. आता ही पद्धतच बंद करणार येईल,' असेही खैरे यांनी सांगितले.

या वेळी ते म्हणाले, 'समितीच्या मुख्य बाजारास खडकी बाजार, मोशी बाजार, नारायणगाव बाजार समिती या समित्यांच्या विविध अडचणी सोडविण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. त्यासाठी बाजारांचा आढावा घेतला जात असून या बाजार समित्यांचा रचना अहवालही मागविण्यात आला आहे. 'सेस'चा प्रश्न मोठ्या प्रमाणावर भेडसावत आहे, तो सोडविला जाईल.'

किरकोळ विक्री करणारऱ्या दुकानदारांवर सहकारमंत्र्यांनी जप्तीचा आदेश देऊनही अद्याप ही दुकाने सुरू आहेत. त्याबाबत विचारले असता, त्याबाबत न्यायालयीन प्रक्रिया सुरू असून येत्या दोन दिवसात उच्च न्यायालयामध्यो अंतिम निर्णय लागण्याची अपेक्षा आहे. अद्यापपर्यंत कोणालाच नूतनीकरणाचे परवानेही देण्यात आलेले नाहीत, असे खैरे यांनी स्पष्ट केले.

पाच तालुका बाजार समितीच्या निवडणुका जाहीर झाल्या आहेत. राहिलेल्या बाजार समितीच्या निवडणुकाही लवकरच पुर्ण होतील. त्यानंतरच या बाजार समितीची निवडणूक होणार आहे. त्यामुळे या संपूर्ण कामाला साधारणतः सहा ते सात महिन्यांचा कालावधी मिळेल, असे दिलीप खैरे यांनी सांगितले.

तेरा तालुक्यांत निवडणुका

प्रादेशिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुका कायद्यातील ९७ घटना दुरुस्तीनुसार होणार आहेत. त्यापूर्वी तेरा तालुक्यातील बाजार समितीच्या निवडणुका अपेक्षित आहे. सोसायटींच्या निवडणुकांनंतरच या तालुका बाजार समितीच्या निवडणुका अपेक्षित आहे.

'बाजार समितीमध्ये काळानुरूप बदल गरजेचा आहे. गेल्या ४० वर्षात त्यामध्ये काहीच बदल झालेला नाही. त्यामुळे आवश्यक बदलांसाठी कायदेशीर बाबी तपासून मार्ग काढला जाईल. संचालक बदलानंतर पॉलिसी बदलते, असे न होता पुढील ४० वर्षांचा आराखडा तयार करणे गरजेचे आहे.

दिलीप खैरे, उपसभापती

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

उन्हामुळे पालेभाज्या महाग

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

गुलटेकडी येथील छत्रपती शिवाजी मार्केट यार्डात रविवारी भाजीपाल्याची आवक स्थिर होती. मागणीच्या तुलनेत पुरवठा कमी असल्याने तोंडली, शेवगा, बीट या भाज्यांचे दर १० ते २० टक्क्यांनी वधारले. उन्हामुळे आवक घटल्याने पालेभाज्या महागल्या आहेत.

रविवारी सुमारे १७० ते १७५ गाड्या भाजीपाल्याची आवक झाली. परराज्यातून झालेल्या आवकीमध्ये मध्य प्रदेशातून मटार तीन ट्रक, कर्नाटक आणि मध्य प्रदेशातून हिरवी मिरची १० ते १२ टेम्पो, कर्नाटकातून तोतापुरी कैरीचे पाच ते सहा ट्रक, कोबीची सहा ते सात ट्रक आवक झाली. आंध्र प्रदेश आणि तमिळनाडू येथून चार ते पाच टेम्पो शेवगा, तसेच मध्य प्रदेशातून लसूण आठ ते १० ट्रक, इंदूर, गुजरात आणि आग्रा आणि स्थानिक बटाट्याची ७० ट्रक आवक झाली होती.

स्थानिक आवकेमध्ये पुणे विभागातून सातारी आले ५०० ते ५५० गोणी, टोमॅटो साडेपाच ते सहा हजार क्रेट, हिरवी मिरची तीन ते चार टेम्पो, फ्लॉवर १५ ते १६ टेम्पो, कोबी आणि ढोबळी मिरची प्रत्येकी १० ते १२ टेम्पो आवक झाली. शेवगा तीन ते चार टेम्पो, स्थानिक गाजर पाच ते सहा टेम्पो, भुईमूग शेंग १५० ते १७५ पोती, तांबडा भोपळा आठ ते १० टेम्पो, गावरान कैरी पाच ते सहा टेम्पो, अखंड चिंच १५० गोणी, कांदा सुमारे १०० ट्रक आवक झाली.

बाजारात उन्हाळ्यामुळे पालेभाज्यांची आवक घटली आहे. पालेभाज्या नाजूक माल असला तरी वाढत्या उष्णतेमुळे अवकाळी पावसाचा त्यावर परिणाम होत नाही. बाजारात चांगल्या दर्जाचा माल उपलब्ध आहे. आवक घटल्याने सर्वच पालेभाज्यांच्या दरात वाढ झाली आहे. स्थानिक कोथिंबिरीच्या एक लाख जुड्यांची आवक आणि गुजरातहून सात टेम्पो कोथिंबिरीची आवक झाली आहे.

मासळीच्या दरात वाढ

गणेश पेठ येथील मासळी बाजारात मासळीची आवक घटली असून, मागणी वाढल्याने मासळीच्या दरात १० टक्के वाढ झाली आहे. मासळी बाजारात रविवारी खोल समुद्रातील मासळीची सात टन, खाडीच्या मासळीची १५० किलो, नदीच्या मासळी २०० ते २५० किलो, आंध्रप्रदेशातून रहूची १२ टन इतकी आवक झाली.

डाळिंब, खरबूज महागले

गेल्या आठवड्याच्या तुलनेच या रविवारी गुलटेकडी फळबाजारात सर्वंच फळांची आवक वाढली आहे. मात्र, तरीही डाळिंब, चिक्कू आणि खरबुजाच्या दरात वाढ झाली आहे. लिंबाच्या एका गोणीमागे ६० ते ७० रुपयांची घट झाली आहे. रविवारी गुलटेकडी येथील मार्केट यार्ड बाजारात लिंबाच्या तीन ते चार हजार गोणी, डाळिंबाची ३५ ते ४० टन, अननसाचे पाच ट्रक, मोसंब्याचे १० ट्रक, पपईचे आठ ते १० टेम्पो, खरबुजाचे पाच ते सहा टेम्पो, कलिंगडाचे ३० ते ४० ट्रक, संत्र्याची १० टन तर चिक्कूची दीड हजार गोणींची आवक झाल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गणवेश घोटाळा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

पुणे कँटोन्मेंट बोर्डाच्या शाळांतील विद्यार्थ्यांसाठी गेल्यावर्षी केलेल्या गणवेश खरेदीत बोर्डाकडून आर्थिक उधळण झाल्याचे आढळून आले आहे. यावर्षीच्या तुलनेत गेल्यावर्षी दुप्पट दराने गणवेश खरेदी करण्यात आली असून, या प्रकाराची प्रशासकीय पातळीवर चौकशी केली जाणार आहे. आगामी शैक्षणिक वर्षासाठी बोर्डाच्या शाळेतील विद्यार्थ्यांच्या रेडिमेड गणवेश खरेदीबाबतच्या प्रस्तावाला मान्यता देण्यात आली आहे. मात्र, गेल्यावर्षी झालेल्या गणवेश खरेदीबाबत नगरसेवकांकडून विचारणा करण्यात आली.

गेल्यावर्षी विद्यार्थिनींच्या एका पिनो फ्रॉकसाठी कमीत कमी ३५५ रुपये, तर जास्तीत जास्त ६०५ रुपयांनी बोर्डाने खरेदी केली. मात्र, यावर्षी त्याच आकाराचे गणवेश निम्म्या किमतीमध्ये खरेदी करण्यास बोर्डाने मान्यता दिली आहे. त्यामध्ये कमीत कमी १९२ रुपयांत, तर जास्तीत जास्त २८५ रुपयांमध्ये गणवेश खरेदी करण्यात येणार आहेत. विद्यार्थिनींसाठी पंजाबी ड्रेसची खरेदीही गेल्यावर्षी जास्त दराने झाल्याचे निदर्शनास आले आहे. गेल्यावर्षी कमीत कमी ६२५ रुपयांमध्ये आणि जास्तीत जास्त ८२५ रुपयाला एक याप्रमाणे पंजाबी ड्रेस खरेदी करण्यात आले. यावर्षी हेच ड्रेस कमीत कमी ३७२ रुपये आणि जास्तीत जास्त ४२१ रुपयांमध्ये खरेदी होणार आहेत. विद्यार्थ्यांच्या गणवेश खरेदीतही बोर्डाने आर्थिक उधळण केली असल्याचे दिसून आले आहे. गेल्यावर्षी चढ्या भावाने गणवेश खरेदी का करण्यात आली, अशी िवचारणा नगरसेवकांनी केली. या खरेदीची प्रशासकीय पातळीवर चौकशी केली जाणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


लोकसाहित्य समितीचे काम ठप्प

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

लोकसाहित्य, संस्कृतीचे जतन करण्याच्या उद्देशाने स्थापन झालेल्या लोकसाहित्य समितीचे काम पूर्णतः ठप्प झाले आहे. प्रा. फ. मुं. शिंदे यांच्या अध्यक्षतेखालील समितीची गेल्या दहा महिन्यांत एकही बैठक झाली नसल्याचा प्रकार समोर आला आहे. त्यामुळे साहित्यसंस्कृतीचा कळवळा असलेल्या राज्य सरकारने या समितीकडे लक्ष देण्याची मागणी होत आहे.

मराठी प्रदेशातील लोकसाहित्याचे संशोधन, जतन करणे, लोकसाहित्याचा प्रसार करणे या उद्देशांने तत्कालीन मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी 'लोकसाहित्य समिती'ची स्थापना केली होती. चिं. ग. कर्वे, डॉ. सरोजिनी बाबर, द. ता भोसले आदींनी या समितीचे अध्यक्षपद भुषवले आहे. या समितीच्या माध्यमातून काही ग्रंथ प्रकाशित झाले, लोकगीतांचे दस्तावेजीकरण करण्यात आले. मात्र, अलीकडे या समितीकडे राज्य सरकारने दुर्लक्ष केले. डॉ. केशव फाळके यांच्या अध्यक्षतेखालील समितीला निधी आणि कार्यालयाअभावी तीन वर्षांत काहीच काम करता आले नाही. त्यानंतर सरकारने या समितीची पुनर्रचना करून माजी संमेलनाध्यक्ष प्रा. फ. मुं. शिंदे यांच्याकडे समितीचे अध्यक्षपद सोपवण्यात आले, तर डॉ. फाळके यांना सदस्य करण्यात आले. आतापर्यंत या समितीकडून काहीही ठोस असे काम झालेले नाही. सरकारने सोयीसुविधा आणि निधीही उपलब्ध करून दिला पाहिजे, असे सदस्य प्रा. मिलिंद जोशी यांनी सांगितले.

लोकसाहित्य समितीची पुनर्रचना निवडणुकीपूर्वी आघाडी सरकारने केली होती. नवे सरकार अस्तित्वात आल्यानंतर या समितीशी सरकारकडून काहीच संपर्क साधण्यात आलेला नाही. त्यामुळे समितीकडून काहीच कामकाज झालेले नाही.

- प्रा. फ. मुं. शिंदे, अध्यक्ष, लोकसाहित्य समिती

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तुळशीबागेत हाणामारी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

तुळशीबागेत अतिक्रमण असलेले उसाचे गुऱ्हाळ हटवल्याच्या रागातून रविवारी सकाळी दोन गटांत तुफान हाणामारी झाली. दोन्ही गटातील एक-एक सदस्य हॉस्पिटलमध्ये अॅडमिट असून परस्परांविरोधी गुन्हे दाखल केले आहेत. विश्रामबाग पोलिस ठाण्यात नगरसेविका रुपाली पाटील-ठोंबरे यांच्यासह पाच जणांविरुद्ध खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आदित्य कृष्णा जागडे (वय २५, रा. सिंहगड रोड) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार रुपाली पाटील यांच्यासह पाच जणांविरुद्ध खुनाचा प्रयत्नचा गुन्हा दाखल केला आहे. तर, ठोंबरे यांचे मामा दराडे यांनीही पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. विश्रामबाग पोलिसांनी परस्परांविरोधी गुन्हे दाखल केले असून तपास सुरू असल्याची माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजेंद्र सावंत यांनी दिली.

जागडे यांचा तुळशीबाग येथे वडिलोपार्जित वाडा आहे. या वाड्यासमोरील गल्लीत उसाचे गुऱ्हाळ आहे. पालिकेने दोन दिवसांपूर्वी अतिक्रमण असल्याने हे गुऱ्हाळ पाडले होते. त्यानंतर रविवारी सकाळी अचानक दोन-तीन मुले येथील मोकळ्या जागेत स्टॉल लावत होते. जागडे यांनी आपल्या भावासह तेथे स्टॉल लावणाऱ्या मुलांना थांबवले. त्या वेळी तेथे अजय लॉजचे मालक अजय दराडे आणि विजय दराडे सात-आठ अनोळखी व्यक्तींसह आले. त्यांनी शिवीगाळ करत लोखंडी रॉड, बांबूने मारहाण केली. रुपाली पाटील तसेच रुपेश पाटील यांनीही मारहाण करत पिस्तुलाचा धाक दाखवल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले.

'राजकीय आकसाने गुन्हा'

पुणे : 'मनपा' आयुक्त कुणाल कुमार यांनी तुळशीबागेत भेट दिली होती. या वेळी त्यांनी अतिक्रमण हटवण्यास सांगितले होते. त्यानुसार जागडे यांचे गुऱ्हाळ हटवण्यात आले. माझे मामा अजय दराडे यांचे लॉज याचठिकाणी आहे. स्थानिक गुंडांनी अजय दराडे यांना 'आमचे गुऱ्हाळ का हटवले,' अशी विचारणा करून मारहाण केली. दराडे यांनी मला फोन केला. त्यानंतर मी लगेचच पोलिस नियंत्रण कक्षाशी संपर्क साधून मदत मागितली आणि मी ही घटनास्थळी पोहोचले. मी पोहचल्यानंतर धक्काबुक्की करण्यात आली, तसेच विजय जागडे याने पिस्तुलाचा धाक दाखवला. जिवे मारण्याची धमकी दिली. पोलिसांनी आम्हाला विश्रामबाग पोलिस ठाण्यात नेले. पोलिसांत तक्रार दिल्यानंतर आमच्याविरुद्ध राजकीय सूडबुद्धीने खोटी तक्रार दाखल करण्यात आली, अशी माहिती नगरसेविका रुपाली पाटील-ठोंबरे यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

साहित्य महामंडळ भाषेसाठी काय करते?

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाव्यतिरिक्त वर्षभर साहित्य महामंडळाकडून काही काम होत नसल्याने महामंडळाच्या कारभारावर सदस्यांनीच ताशेरे ओढले. महामंडळाच्या वतीने केवळ साहित्य संमेलनाचेच आयोजन केले जाते हा सर्वसामान्यांचा समज एका अर्थाने खरा असून, महामंडळाकडून बाकी वर्षभरात भाषा वाङ्मयविषयक उपक्रम होणार आहेत की नाही, असा सवाल सदस्यांकडूनच उपस्थित करण्यात आला.

साहित्य महामंडळाची बैठक रविवारी पुण्यात झाली. या बैठकीत घुमान येथील संमेलनाचा आढावा घेण्यात आला. साहित्य संमेलनाच्या अनुषंगाने या बैठक खेळीमेळीच्या वातावरणात ही बैठक झाली. संमेलनात महामंडळाच्या अध्यक्षांवर दोन वेळा सूत्रसंचालन करण्याची आलेली वेळ, सदस्यांना झालेला सुरक्षा व्यवस्थेचा त्रास या विषयी नाराजी व्यक्त करण्यात आली. महामंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी इतर व्यक्तींच्या माध्यमातून वैयक्तिक फायदा घेऊ नये असेही सदस्यांनी स्पष्टपणे सांगितले.

मराठी भाषा, वाङ्मय प्रसार हे साहित्य महामंडळाचे मुख्य उद्देश असताना त्याविषयीचे कोणतेही काम साहित्य महामंडळाकडून केले जात नसल्याबद्दल सदस्यांनी स्पष्ट शब्दांत नाराजी व्यक्त केली. साहित्य महामंडळ केवळ साहित्य संमेलन घेते हा समज खरा होतो आहे. महामंडळाकडून साहित्य संमेलनात मराठी भाषा वाङ्मयविषयक ठराव केले जातात. त्याची प्रत्यक्षात अंमलबजावणी केली जात नाही, याकडेही सदस्यांनी लक्ष वेधले. भाषा आणि वाङ्मयविषयक प्रश्न गंभीर आहे. ज्या उपक्रमांविषयी समाजात जागृती नाही, त्यासाठी महामंडळाने पुढाकार घेऊन काम केले पाहिजे, असेही सदस्यांनी सुनावले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शहरात उद्या पावसाची शक्यता

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

वळवाच्या पावसानंतर काहीसा कमी झालेला उकाडा आता पुन्हा वाढू लागला आहे. रविवारी दुपारी शहरात उकाडा जाणवत होता. सायंकाळनंतर मात्र, हवेत काहीसा गारवा जाणवत असल्याने पुणेकरांना दिलासा मिळाला. सोमवारी दुपारनंतर शहरात वातावरण ढगाळ होण्याची शक्यता वर्तविण्यात आली असून, मंगळवारी काही भागात पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

रविवारी शहरात ३७.७ अंश सेल्सियस इतक्या कमाल तर, २४ अंश सेल्सियस इतक्या किमान तापमानाची नोंद झाली. कमाल आणि किमान तापमान दोन्ही सरासरीपेक्षा एक अंशाने अधिक होते. ढगाळ वातावरण दूर झाल्याने शहरात दुपारी चांगला उकाडा जाणवत होता. शहराच्या काही भागात मात्र, काही काळ ढगाळ वातावरण होते. त्यामुळे हवेत उकाडा असला, तरी ढगाळ वातावरणामुळे उन्हाचा चटका जाणवत नव्हता. सायंकाळनंतर हवेत किंचित गारवा जाणवत होता.

रविवारी राज्यात कोठेही पावसाची नोंद झाली नाही. राज्यातील सर्वाधिक तापमान अकोला येथे (४४.६ अंश सेल्सियस) तर सर्वात कमी तापमान महाबळेश्वर येथे (१८.५ अं.से) नोंदले गेले. रविवारी कोकणचा दक्षिण भाग तसेच मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

मान्सूनची आगेकूच दोन दिवसांत

शनिवारी अंदमानच्या व बंगालच्या उपसागराच्या काही भागात दाखल झालेल्या मान्सूनची रविवारी आगेकूच झाली नाही. मात्र, पुढील दोन दिवसात मान्सूनची आगेकूच शक्य आहे. पुढील ४८ तासात मान्सून बंगालच्या उपसागराच्या दक्षिणेकडील काही भाग तसेच अंदमान बेटांच्या उत्तरेकडील भागात दाखल होण्यासाठी हवामान अनुकूल आहे, अशी माहिती हवामान विभागातर्फे देण्यात आली. त्यानुसार सोमवारी दुपारनंतर शहरात वातावरण ढगाळ होण्याची शक्यता वर्तविण्यात आली असून, मंगळवारी काही भागात पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

११ वी प्रवेशाला या वर्षीही विलंबच

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

वादाच्या भोवऱ्यात सापडलेली अकरावीची केंद्रीय ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया पूर्वनिश्चित वेळापत्रकाच्या तुलनेत उशीराच सुरू होण्याची चिन्हे आहेत. कोर्टाच्या तारखांमुळे प्रक्रियेच्या माहितीपुस्तिका आठवडाभर उशिराने विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचणार असल्याचे शिक्षण खात्याकडून रविवारी सांगण्यात आले. माहितीपुस्तिकेमधील तांत्रिक चुकांची दुरुस्ती लांबल्यानेच ही परिस्थिती ओढावल्याचे याच निमित्ताने समोर येत आहे.

गेल्या वर्षी केंद्रीय ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेत झालेला गोंधळ विचारात घेत, यंदा ही प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाइनच करण्याची घोषणा शिक्षण खात्याने केली होती. मात्र, शिक्षणसंस्था चालकांनी त्याला केलेल्या विरोधाच्या पार्श्वभूमीवर अकरावीसाठीचे मॅनेजमेंट कोट्याचे प्रवेश वगळता इतर सर्व प्रक्रिया ऑनलाइन होणार असल्याची बाब 'मटा'ने नुकतीच उघड केली होती. या प्रक्रियेसाठीची सर्व तयारी पूर्ण झाली असून, प्रक्रियेसाठीच्या माहितीपुस्तिका २० मेपासून विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देणार असल्याची घोषणा पुणे विभागीय शिक्षण उपसंचालक रामचंद्र जाधव यांनी काही दिवसांपूर्वी केली होती. मात्र, जाधव यांनीच आता या माहितीपुस्तिका जूनच्या पहिल्या आठवड्यात विद्यार्थ्यांना मिळणार असल्याचे स्पष्ट केल्याने प्रक्रियेच्या सुरुवातीच्या टप्प्यामध्येच प्रक्रिया लांबणार की काय, असा प्रश्न उपस्थित होऊ पाहात आहे.

माहितीपुस्तिकेचे प्रारुप तयार झाल्यानंतर ते शनिवारी 'बालभारती'कडे छपाईसाठी दिले. उपसंचालक कार्यालयाने गेल्या काही दिवसांमध्ये माहितीपुस्तिकेच्या कच्च्या प्रारुपामधील दुरुस्त्या केल्या. तसेच कोर्टाकडून या प्रक्रियेबाबत देण्यात आलेल्या निर्देशांनुसार काही बाबींचा समावेश करण्यात आला. त्यानंतरच माहितीपुस्तिका छपाईसाठी देण्यात आल्या. या प्रक्रियेमुळे यापूर्वी जाहीर केल्यानुसार २० मेपर्यंत विद्यार्थ्यांसाठी माहितीपुस्तिका उपलब्ध करून देणे शक्य होणार नसल्याचे जाधव यांनी रविवारी सांगितले. विद्यार्थ्यांना जूनच्या पहिल्या आठवड्यामध्ये माहितीपुस्तिका उपलब्ध करून दिल्यानंतर, अकरावी प्रवेशाची वेबसाइटही सुरू होणार आहे. दहावीच्या निकालापर्यंतच्या टप्प्यामध्ये विद्यार्थ्यांना या वेबसाइटवरून पहिल्या टप्प्यातील अर्ज भरणे शक्य असेल. या प्रक्रियेची सर्व रुपरेषा अंतिम करण्यासाठी येत्या मंगळवारी गरवारे कॉलेजमध्ये एका बैठकीचे आयोजन करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.

गेल्या वर्षीचाच कित्ता गिरविणार?

गेल्या वर्षी पहिल्यांदाच ऑनलाइन प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून ही प्रक्रिया राबविण्यात आली. त्यावेळी कमीतकमी मनुष्यबळाच्या वापरातून आणि कमीत कमी वेळेत ही प्रक्रिया पार पाडणार असल्याचे पुणे विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयाकडून सांगण्यात आले होते. प्रत्यक्षात प्रक्रियेदरम्यान झालेला गोंधळ आणि तो दूर करण्यासाठी कार्यालयाने केलेले प्रयत्न विचारात घेता, एरवीपेक्षाही अधिक मनुष्यबळाचा त्यासाठी वापर झाल्याचे दिसून आले. प्रक्रियेच्या पार्श्वभूमीवर कमीतकमी कालावधीत प्रवेश देत, वेळेत कॉलेज सुरू करण्याची घोषणाही प्रक्रियेच्या शेवटी फोलच ठरल्याचे अनुभवायला मिळाले. त्या पार्श्वभूमीवर यंदा सुरुवातीपासूनच विलंबित तालावर गेलेली ही प्रक्रिया वेळेत पूर्ण होईल का, असा सवाल या निमित्ताने उपस्थित होत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images