Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

‘पायाभूत सुविधांची देखभाल आवश्यक’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

'महावितरणच्या सार्वजनिक ठिकाणी असलेल्या पायाभूत सुविधांची देखभाल व दुरुस्ती करणे आवश्यक आहे. रोहित्रे, विजेच्या खांबांवरील तारा, फिडर पिलर्स व केबल यांची पुरेशी काळजी घेतली जात नाही, त्यामुळे विद्युत अपघात घडतात,' असे मत विद्युत सुरक्षा मंचाचे समन्वयक राजीव जतकर यांनी व्यक्त केले.

विद्युत सुरक्षा सप्ताहाच्या समारोपाच्या कार्यक्रमात ते बोलत होते. 'या पायाभूत सुविधांच्या देखभालीच्या कामात विद्युत सुरक्षा मंच महावितरणला नेहेमीच सहकार्य करेल. काही इमारतींच्या तळघरात असलेल्या धोकादायक रोहीत्रांचा प्रश्नही ज्वलंत आहे. महावितरण, तसेच विद्युत निरीक्षक यांच्या सहकार्याने या समस्येवर तोडगा काढण्याचा प्रयत्न केला जाईल,' असेही ते म्हणाले. महावितरणचे मुख्य

अभियंता नीलकंठ वाडेकर, विद्युत निरीक्षक अंकुश रणवरे यांनी मंचाच्या उपक्रमांबद्दल समाधान व्यक्त केले व आपला सहकार्याचा हात नेहमीच पुढे राहील अशी ग्वाही दिली.

या प्रसंगी टाटा मोटर्सचे मनोज बडवे यांनी त्यांच्या कंपनीत राबविलेल्या विशेष विद्युत सुरक्षा प्रणालीची दृकश्राव्य माध्यमातून सविस्तर माहिती दिली. या प्रसंगी इन्स्टिट्युशन ऑफ इंजिनीअर्स, पी. व्ही. जी. कॉलेज, अर्न विद्युत शाळा, इकॅम, पूना इलेक्ट्रिक आणि इलेक्ट्रोनिक असोसिएशन, विद्युत सल्लागार संघटना, कॉपर असोसिएशन इत्यादी संस्थांच्या प्रतिनिधींनी आपले विचार व्यक्त केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


‘ते’ पाकिस्तानी घोडे अखेर विमानाने मार्गस्थ

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, येरवडा

विमानातील इंजिनात बिघाड आणि तेल गळती झाल्याने मागील दोन दिवसांपासून पुणे विमानतळावर तळ ठोकून राहणाऱ्या श्रीलंकन हवाई दलाच्या विमानाने शुक्रवारी पहाटे पाच वाजता श्रीलंकेकडे उड्डाण केले.

दुरुस्तीचे काम गुरुवारी रात्री पूर्ण झाल्यानंतर सोलापूर रोड येथील रेसकोर्समध्ये ठेवण्यात आलेले ८ घोडे व बालेवाडीतील हॉटेलमध्ये मुक्कामाला असलेल्या १० श्रीलंकन आणि ५ पाकिस्तानी प्रवाशांना घेऊन विमानाने पहाटे विमानतळावरून उड्डाण केले. पाकिस्तान लष्कराने प्रशिक्षणा दरम्यान श्रीलंकन लष्कराला ८ घोडे भेट दिले होते. पाकिस्तानने दिलेले घोडे घेऊन श्रीलंकन विमान इस्लामाबाद विमानतळावरून श्रीलंकेकडे उड्डाण केले. विमान पुणे विमानतळाच्या परीक्षेत्रात आले असताना इंजिनात बिघाड होऊन तेल गळती होत असल्याचे वैमानिकाच्या लक्षात आल्यावर त्यांनी तातडीने लोहगांव विमानतळावर उतरण्याकरिता हवाई वाहतूक नियंत्रण कक्षाशी संपर्क साधाला. शुक्रवारी (दि. ६ )रात्री आठ वाजता विमान उतरले. श्रीलंकन हवाई दलाचे विमानाच्या दुरुस्तीसाठी लागणारे सुटे भाग श्रीलंकेतून आणावे लागणार असल्याने दोन दिवस विमान लोहगांव विमानतळावर मुक्काम ठोकून होते. विमान शुक्रवारी उतरल्यानंतर सर्व प्रवासी आणि नागरिकांची बालेवाडीतील हॉटेलमध्ये; तर घोड्याची मुक्कामाची व्यवस्था सोलापूर रोडवरील रेसकोर्समध्ये करण्यात आली होती.

अखेरीस गुरुवारी रात्री बारा वाजण्याच्या सुमारास विमान दुरुस्त झाल्यावर पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास विमानाने श्रीलंकेकडे उड्डाण केले. आणि त्यानंतर भारतीय हवाई दल आणि स्थानिक पोलिसांनी सुटकेचा नि:श्वास घेतला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दोघींचा खून; चौघे दोषी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

बंगल्यावर पाळत ठेवून भर दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास चोरीच्या इराद्याने घरात शिरून दोन महिलांवर चाकूने वार करून त्यांचा निर्घृण खून केल्याप्रकरणी चौघा आरोपींना कोर्टाने दोषी धरले आहे. अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस. एस. तिवारी यांच्या कोर्टात सोमवारी या प्रकरणी शिक्षेवरील सुनावणी होणार आहे. अंबादास जाधव (वय ३२) पांडुरंग उर्फ पांड्या उर्फ अतुल बाळू जाधव (१९) बंटी वडवेराव (२२) आणि मल्लिकांत उर्फ लाल्या हनुमंत जाधव (२२, सर्व रा. सोलापूर) या चौघांना दोषी धरण्यात आले आहे. कर्वेनगर येथील रघुकुल सोसायटी येथे शाकंभरी बंगला येथे १७ एप्रिल २०१० रोजी ही घटना घडली होती.

स्मिता प्रभाकर पत्की (५२) आणि सुलभा व्यंकटेश पाच्छापूरकर (६३, रा. शाकंभरी बंगला, रघुकुल सोसायटी, कर्वेनगर) यांचा खून करण्यात आला होता. या प्रकरणी प्रभाकर पांडुरंग पत्की (५७) यांनी कोथरूड पोलिस स्टेशनमध्ये फिर्याद दाखल केली होती. आरोपींनी सोन्याच्या दोन पाटल्या, दोन मंगळसूत्र, सोन्याची अंगठी, घड्याळ, मोबाइल फोन चोरून नेले होते. त्यापैकी आरोपींकडून २४ हजार रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला होता.

फिर्यादी पत्की हे त्यांची पत्नी स्मिता आणि बहीण सुलभा यांच्यासह या ठिकाणी राहत होते. प्रभाकर हे मुंबई येथे बँकेत नोकरीला होते. त्यांच्या बंगल्यासमोर बागेचे काम सुरू होते. गुन्ह्याच्या अगोदर काही दिवासांपासून आरोपी बंगल्यासमोरील बागेत बसत होते. त्यांनी बागेत काम करणाऱ्या एकाला बंगल्यातील लोकांविषयी माहिती विचारली होती. बंगल्यातील कर्मचाऱ्यांच्या येण्या जाण्याच्या वेळाही आरोपींनी माहिती करून घेतली होती.

१७ एप्रिल २०१० रोजी दुपारी पावणे बारा ते साडेबाराच्या दरम्यान पाळत ठेवलेले आरोपी बंगल्यात शिरले. त्यांनी चोरीच्या इराद्याने स्मिता आणि सुलभा यांच्यावर चाकूने वार करून त्यांचा खून केला. त्यानंतर घरातील ऐवज चोरून पळून गेले. दरम्यान, घरकाम करणारी महिला दुपारी घरी आल्यानंतर स्मिता आणि सुलभा या त्यांना रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या दिसल्या. त्यांनी पोलिसांना हा प्रकार कळविला. त्यानंतर प्रभाकर यांनाही फोन करून बोलावण्यात आले. त्यानंतर पोलिस आरोपींचा शोध घेत होते. यासंदर्भात वृत्तपत्रात बातमी छापून आल्यानंतर एका रिक्षाचालकाने पोलिसांची भेट घेऊन घटनेच्या दिवशी चौघांना सोडल्याचे सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पोलिसांशी हुज्जत घालणाऱ्यांना अटक

$
0
0

पुणेः ट्रिपल सीट असलेल्या तिघांना अडवून त्यांच्याकडे पेट्रोलिंग करत असलेल्या पोलिसांनी कागदपत्रांची चौकशी केली असता पोलिसांशी हुज्जत घालून सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी येरवडा पोलिसांनी चौघांना अटक केली आहे. या प्रकरणी पोलिसांनी अमोल मधुकर विधाते (२५, रा. वाडिया बंगला, नगर रोड), रोहित उत्तम सोलंकी (२५, रा. जुना व्हाइट हाउस, येरवडा), सचिन बाळू शेंडेकर (२८), धनंजय राजेंद्र रहिसपाल (२२) यांना अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी पोलिस कर्मचारी सुधीर वाळुंज यांनी फिर्याद दाखल केली आहे. गुरुवारी रात्री पावणेदहा वाजण्याच्या सुमारास गुंजन टॉकीज चौकातून ट्रिपल सीट जात असलेल्या तिघांना फिर्यादी यांनी पेट्रोलिंग करत असताना अडविले. त्यांच्याकडे कागदपत्रांची चौकशी केली. कागदपत्रे का मागितली या कारणावरून त्यांनी हुज्जत घातली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ओव्हरटेकच्या वादातून दोघा भावांवर हल्ला

$
0
0

पिंपरी : कारला ओव्हरटेक करण्यावरून झालेल्या वादातून एका कार चालकाने दुसऱ्या कारमधील प्रवाशांवर धारदार चाकूने हल्ला चढविला. दरम्यान, हल्ला करणाऱ्यांनी वापरलेली कार सैन्यातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याच्या नावावर नोंदविण्यात आल्याचे उघड झाले आहे. त्यामुळे हल्ला नेमका कोणी केला, याचा तपास पोलिस करीत आहेत.

पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावरील खोपोलीनजीक असलेल्या दस्तुरी गावच्या हद्दीत रविवारी (३ मे) ही घटना घडली. कौसर नबील खान (रा. एमजी रोड, पुणे) यांनी या प्रकरणी खोपोली पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांचे पती नबील खान आणि दीर उझेर खान हल्ल्यात गंभीर जखमी झाले आहेत. खान यांच्या तक्रारीवरून एमएच १२ सीके ६०४३ या लाल रंगाच्या पोलो कारच्या चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. खोपोली पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक जयसिंग तांबे यांनी दिलेल्या माहितीनुसार, खान कुटुंबीय महाराष्ट्रदिनानंतर सलग तीन दिवस लागून सुटी आल्याने अलिबाग येथे फिरण्यासाठी गेले होते. तेथून रविवारी परतताना दस्तुरी गावच्या हद्दीत त्यांचे पोलो कार चालकाशी ओव्हरटेकवरून वाद झाले. संबंधित कारचालक धोकादायक पद्धतीने ओव्हरटेक करीत असल्याचा आरोप खान यांनी केला.

कार कर्नल देशपांडेंची

हल्ला केल्यानंतर कारचालक पळून गेला. गाडीच्या क्रमांकावरून माहिती घेतली असता, ही कार लेफ्टनंट कर्नल परेश भास्कर देशपांडे यांची असल्याचे पोलिसांना समजले. त्यानंतर पोलिसांनी देशपांडे यांच्या घरी जाऊन चौकशी केली. मात्र, अद्याप खान बंधूंवर जीवघेणा हल्ला नेमका कोणी चढविला हे स्पष्ट झालेले नाही.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चारचाकीच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू

$
0
0

पिंपरी : मित्राच्या घरून स्वतःच्या घरी परतणाऱ्या दुचाकीस्वाराला भरधाव वेगातील इंडिका कारने ठोकरले. या अपघातात जखमी दुचाकीस्वाराचा उपचारादरम्यान हॉस्पिटलमध्ये मृत्यू झाला. वल्लभनगर पिंपरी येथे हा अपघात झाला. आकाश नंदकिशोर वर्देकर असे मृत्यूमुखी पडलेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे. या प्रकरणी सूरज राजेंद्र वाटारकर (वय २५, रा. बिबवेवाडी, पुणे) याने फिर्याद दिली आहे. संजय रमाकांत मिश्रा (वय ३८, रा. प्रभातनगर, कासारवाडी) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आकाश आणि सूरज त्यांच्या दुचाकीवरून पिंपरीत आले होते. पिंपरी येथील काम संपवून ते

मित्र सुनील पोळ याच्याकडे पार्टीला गेले. पार्टी संपल्यानंतर दोघे पुन्हा घराकडे निघाले होते. दरम्यान वल्लभनगर येथे पोचल्यानंतर इंडिका कारने त्यांच्या दुचाकीला ठोकरले. त्यात आकाश हा गंभीर जखमी झाला. हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला. अपघातानंतर इंडिकाचा चालक मिश्रा याने सूरजला लाथाबुक्यांनी मारहाणदेखील केली होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

खोदाईचा आदेश प्रशासनाकडून पायदळी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

पावसाळ्याच्या तोंडावर रस्तेखोदाई करण्यास मनाई करण्यात आलेली असतानाही या आदेशाला केराची टोपली दाखवून शहरभर रस्तेखोदाईचे काम बिनधास्तपणे सुरू असल्याचे उघडकीस आले आहे. शुक्रवारी सकाळपासूनच लॉ कॉलेजरोडवरील अशोक पथ परिसरात खोदकाम सुरू होते. खोदल्या जाणाऱ्या रस्त्याची माहिती पालिकेच्या पथविभागाला देऊनही काम बंद करणे तर सोडाच, पण त्याची दखल घेण्याची साधी तसदीही पालिकेतील अधिकाऱ्यांनी घेतली नाही.

गेल्या काही महिन्यांपासून शहरातील विविध भागांत सुरू असलेल्या रस्ते खोदाईमुळे नागरिक हैराण झाले आहेत. वाहनचालक, तसेच पादचाऱ्यांनाही यामुळे मनस्ताप सहन करावा लागत आहे. नागरिकांना होणाऱ्या त्रासाला 'मटा'ने छायाचित्रांच्या माध्यमातून वाचा फोडली होती. त्यावर रस्तेखोदाईची कामे बंद असल्याचा दावा पथ विभागातील अधिकाऱ्यांनी केला होता. मात्र, हा दावा फोल ठरल्याचे शुक्रवारी पुन्हा समोर आले. शहरातील रस्त्यांवर केल्या जाणाऱ्या रस्ते खोदाईची दखल घेऊन गेल्या महिन्यात महापौर दत्तात्रय धनकवडे, सभागृह नेते शंकर केमसे, स्थायी समिती अध्यक्षा अश्विनी कदम यांनी स्वतंत्र बैठका घेऊन १ मे पासून पाणीपुरवठा, ड्रेनेजलाइन विभाग वगळता इतर कोणालाही रस्तेखोदाई करता येणार नाही, असे स्पष्ट केले होते. ३० एप्रिलपर्यंत सर्व खोदाईची कामे पूर्ण करावीत, असे आदेशही प्रशासनाला देण्यात आले होते.

मे महिन्याचा पहिला आठवडा संपत आला तरी, शहराच्या बहुतांश भागात रस्तेखोदाईला ऊत आल्याचे दिसून येत आहे. शुक्रवारी लॉ कॉलेज रोड परिसरात महावितरणचे खोदाईचे काम दिवसभर सुरू होते. पालिकेच्या पथ विभागाकडे या कामाबाबत चौकशी केली असता, माहिती नसल्याचे त्यांनी सांगितले. पथ विभागाचे प्रमुख विवेक खरवडकर यांना विचारले असता, आपण बैठकीत असून कार्यकारी अभियंता राजेंद्र राऊत यांच्याकडे तक्रार करण्याचा सल्ला त्यांनी दिला.

शहरात कोठेही रस्तेखोदाई करू नयेत, असे आदेश देण्यात आले होते. मात्र त्यानंतरही खोदाई सुरू असेल तर ही गंभीर बाब आहे. प्रशासनाला जबाबदार धरून अधिकाऱ्यांवर कारवाई केली जाईल.

- दत्तात्रय धनकवडे, महापौर

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दप्तराचे ओझे कमी करण्यासाठी पेटंट दाखल

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

शालेय विद्यार्थ्यांच्या दप्तराचे ओझे ५० ते ७५ टक्क्यांनी कमी करणारी अभिनव कल्पना पिंपरी-चिंचवडमधील प्राध्यापकाने पुढे आणली आहे. पिंपरी-चिंचवड कॉलेज ऑफ इंजिनीअरिंगच्या डॉ. डॉ. हरिश तिवारी आणि विवेक गोमसे यांनी या कल्पनेसाठी पेटंट फाइल केले असून, या कल्पनेमुळे विद्यार्थ्यांना दप्तराच्या ओझ्यामधून सुटका मिळणे शक्य असल्याचा दावाही त्यांनी केला आहे.

विद्यार्थ्यांच्या सर्व विषयांच्या अभ्यासक्रमाचे मोजके भाग करून, त्या प्रत्येक भागाच्या एकत्रित पुस्तकाच्या माध्यमातून हे शक्य होणार असल्याचे डॉ. तिवारी यांनी 'मटा'ला सांगितले. 'विषयवार पुस्तकांच्या निर्मितीमुळे विद्यार्थ्यांना गरज नसताना सर्वच्या सर्व धड्यांचे ओझे कायम दप्तरात न्यावे लागते. आमच्या कल्पनेनुसार, प्रत्येक विषयाचा अभ्यासक्रम विशिष्ट टप्प्यांमध्ये विभागतो. प्रत्येक विषयाचा पहिला टप्पा एका पुस्तकामध्ये समाविष्ट केला जातो. अशाच प्रकारे इतर टप्प्यांसाठीही प्रत्येकी एक पुस्तक तयार करणे शक्य आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना पहिल्या टप्प्याचा अभ्यासक्रम सुरू असताना केवळ पहिल्या टप्प्याचे एकच पुस्तक शाळेत न्यावे लागले.' इतर टप्प्यांमधील सर्व विषयांचे पाठ त्या त्या संबंधित टप्प्यांसाठीच्या पुस्तकांमध्ये असल्याने, विद्यार्थ्यांना त्या पुस्तकांमधील पाठांचे कोणतेही ओझे न्यावे लागणार नाही. अपवादात्मक परिस्थितीत दोन वेगवेगळ्या टप्प्यांमधील धड्यांचा विचार सुरू असल्यास, विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त दोनच टप्प्यांसाठीच्या पुस्तकांच्या ओझ्याचा भार सहन करावा लागेल, असेही डॉ. तिवारी यांनी स्पष्ट केले.

पाठ्यपुस्तकांच्या याच रचनेप्रमाणे वह्यांचीही निर्मिती शक्य असल्याचे त्यांनी सांगितले. त्या त्या टप्प्यामधील धड्यांसाठी आवश्यक पानांचा विचार करून वह्यांचा आकार निश्चित करावा आणि त्या गरजेनुसार वापराव्यात, अशी कल्पनाही या पेटंटच्या माध्यमातून मांडण्यात आली आहे. या कल्पनेमुळे विद्यार्थ्यांच्या दप्तराचे ओझे ५० ते ७५ टक्क्यांनी कमी होत असल्याचा दावाही त्यांनी केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


पिस्तुलाचा धाक दाखवून भरदिवसा लुटले

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

पिस्तुलाचा धाक दाखवून ज्येष्ठ नागरिकाच्या गळ्यातील सोनसाखळी हिसकावून नेण्याचा प्रकार सिंहगड रोडवर वडगाव धायरी परिसरात शुक्रवारी घडला. भर दुपारी झालेल्या या घटनेमुळे सोनसाखळी चोरी रोखण्यासाठी पोलिसांनी केलेल्या नाकाबंदीचा कोणताही उपयोग होत नसल्याचे पुन्हा स्पष्ट झाले आहे; तसेच साखळीचोरांनी आता पिस्तुलाचाच धाक दाखविण्यास प्रारंभ केल्याने सर्वसामान्य पुणेकरांसमोरील धोक्यांमध्ये आणखी वाढ झाली आहे.

सदाजी सीताराम जांभळे (वय ६०, रा. वडगाव धायरी) या ज्येष्ठ नागरिकाला चोरट्यांनी लुटले. वडगाव धायरी येथील बेनकर वस्तीत हा प्रकार घडला. या प्रकरणी सिंहगड पोलिस स्टेशनमध्ये मोटारसायकलस्वारांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

धायरीतील बेनकर वस्ती येथून जांभळे दुपारी जात होते. त्या वेळी तोंडाला रुमाल बांधलेले तिघेजण तिथे आले. त्यांनी पिस्तुलाचा धाक दाखवून त्यांच्या गळ्यातील ५० ग्रॅम सोन्याची साखळी हिसकावून नेली. त्यानंतर तिघे आरोपी मोटारसायकलवरून पळून गेले. घटनेची माहिती मिळताच पोलिस उपायुक्त पी. आर. पाटील आणि इतर अधिकाऱ्यांनी घटनास्थळाची पाहणी करून तपासपथके रवाना केली.

आतापर्यंत मोटारसायकलवरून आलेल्या चोरांकडून महिलांच्या गळ्यातील ऐवज चोरून नेला जात होता. त्यासाठी अभावानेच शस्त्राचा धाक दाखविला गेला. नागरिक बेसावध असल्याचा गैरफायदा घेऊन ही चोरी केली जात होती. शुक्रवारच्या या घटनेत मात्र अगदी भर दिवसा, भर रस्त्यात पिस्तुलाचा धाक दाखविण्यापर्यंत चोरट्यांची मजल गेली आहे.

चोरट्यांसाठी नाकाबंदी करण्याऐवजी टू-व्हीलरचालकांकडून चिरीमिरी वसूल करण्याचा उद्योग पोलिसांनी आरंभल्याची टीका नागरिकांकडून होत आहे. साखळीचोरीच्या घटना वाढतच असल्याने नवीन पोलिस आयुक्तांच्या कार्यशैलीच्या परिणामकारकतेची आता परीक्षाच पाहिली जात आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शिष्यवृत्ती प्रक्रियेत बदल

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे घेण्यात येणाऱ्या स्कॉलरशिपच्या परीक्षांचा निकाल जाहीर करण्याच्या प्रक्रियेत बदल करण्यात आला आहे. सुटीच्या काळात विद्यार्थ्यांची धावपळ होऊ न देता, नव्या शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीलाच या परीक्षांचा निकाल उपलब्ध करून दिला जाणार आहे. स्कॉलरशिपचे कामकाज ऑनलाइन पोर्टलवरून सुरू झाल्यानंतरच्या टप्प्यावर हा बदल झाला असून, निकालाचे काम अधिकाधिक बिनचूक करण्यासाठी परिषदेने नवी कार्यपद्धती अंमलात आणली आहे.

यापूर्वी स्कॉलरशिपचा निकाल जाहीर झाल्यानंतर निकालांमधील चुकांबाबत आक्षेप घेतले जात होते. या आक्षेपांचा विचार करण्यासाठी निकालानंतरच्या टप्प्यावर परिषद गुणपडताळणीची प्रक्रिया असे. गुणपडताळणीमध्ये संबंधित विद्यार्थी स्कॉलरशिपला पात्र ठरल्यास, परिषद नियमित संख्येपेक्षा अधिक संख्येनेही विद्यार्थी स्कॉलरशिपसाठी पात्र करत असे. मात्र, यंदापासून स्कॉलरशिपच्या ठरवून दिलेल्या संख्येपेक्षा एकही स्कॉलरशिप जास्त दिली जाणार नसल्याचे राज्य माध्यमिक शिक्षण संचालनालयाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. त्या पार्श्वभूमीवर परिषदेने निकाल जाहीर करण्यापूर्वी गुणपडताळणी करून, त्यानंतरच निकाल जाहीर करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार यंदा ठरवून दिलेल्या गणितानुसार, राज्यभरातून चौथीच्या एकूण १६ हजार ६८३, तर सातवीच्या १६ हजार ५७८ विद्यार्थ्यांनाच स्कॉलरशिप दिल्या जाणार आहेत. या संख्येमध्ये कोणतीही वाढ होणार नसल्याचे परिषदेने स्पष्ट केले.

परिषदेने नव्या कार्यपद्धतीबाबत आपल्या वेबसाइटवरून २७ नोव्हेंबर २०१४ रोजीच माहिती उपलब्ध करून दिली. तसेच, परीक्षार्थी विद्यार्थ्यांच्या प्रवेशपत्रावरही माहिती छापण्यात आली आहे. स्कॉलरशिपच्या विद्यार्थ्यांसाठी http://msshss.in/HSSMSS/Home.htm या लिंकच्या माध्यमातून या विषयीची माहिती उपलब्ध करून देण्यात आल्याचेही परिषदेकडून सांगण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पवना धरणात ३९ टक्केच पाणी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पिंपरी

पिंपरी-चिंचवडला पाणीपुरवठा करणाऱ्या पवना धरणात शुक्रवारअखेर (८ मे) सुमारे ३९ टक्के पाणीसाठा शिल्लक असून, तो पुढील ११० दिवस पुरेल इतका असल्याचे महापालिका प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
धरणातील पाणीसाठ्याबाबत पालकमंत्री गिरीश बापट यांच्या उपस्थितीत नुकतीच बैठक झाली. १५ जूनला आढावा बैठक घेण्यात येणार आहे. पिंपरी-चिंचवडसह तळेगाव नगरपरिषद, देहूरोड कँटोन्मेंट आणि महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (एमआयडीसी) यांना पवना धरणातून पाणीपुरवठा केला जातो. या धरणात शुक्रवारअखेर ३९ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. गेल्या वर्षी मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात ३४ टक्के पाणीसाठा शिल्लक होता. त्या तुलनेत पाच टक्क्यांपेक्षा जास्त पाणीसाठा शिल्लक आहे. पाऊस वेळेवर आल्यास हा पाणीसाठा पुरेसा आहे, परंतु, लांबणीवर पडल्यास पाण्याचे संकट निर्माण होऊ शकते, असे सांगण्यात आले.

पवना धरण परिसरात दरवर्षी पुरेसा पाऊस पडतो. त्यामुळे धरणही लवकर भरते. मात्र, गेल्या वर्षी पाऊस लांबणीवर पडल्यामुळे शहरात एक वेळ आणि दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. शहरवासीयांवर तूर्तास तरी पाणीकपातीचे संकट ओढवण्याची भीती नाही. परंतु, पाऊस लांबणीवर पडल्यास मात्र गांभीर्याने विचार करावा लागणार आहे. शहराला धरणातून सरासरी रोज सुमारे ४३० ते ४५० दशलक्ष लिटर पाणीपुरवठा होतो. सध्या दिवसातून दोनदा पाणीपुरवठ्याचे नियोजन आहे. काही ठिकाणी वितरण व्यवस्थेत अडचणी निर्माण झाल्यामुळे काहीसा बदल केला आहे. मात्र, तूर्तास तरी नियोजनात बदल करण्यात येणार नाही, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शिकावू कोटा ३७५ पर्यंत

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

परिवहन कार्यालयामध्ये 'कोटा' पद्धतीची अंमलबजावणी करण्यापूर्वी दररोज लर्निंग लायसन्ससाठी येणारे उमेदवार, शहरी भागात दररोज विकल्या जाणाऱ्या गाड्यांची संख्या याचा विचार करता प्रादेशिक परिवहन कार्यालयात दुचाकी आणि चारचाकी वाहनांसाठी असलेला कोटा १४५ ने वाढविण्याचा निर्णय परिवहन विभागाने घेतला आहे. नवीन पद्धतीनुसार सध्या दररोज २३० उमेदवारांनाच लायसन्स दिले जातेे. त्यामध्ये वाढ करून आता ३७५ जणांना लायसन्स देण्यात येतील.

लर्निंग लायसन्ससाठी ऑनलाइन पद्धत राबविण्यास सुरुवात झाली तेव्हापासून आरटीओमध्ये एका दिवसात लर्निंग लायसन्स देण्याच्या संख्येवर मर्यादा घालण्यात आली. पूर्वी एका दिवसात शेकडो लायसन्स दिले जात होते. मात्र, नवीन पद्धतीनुसार एका दिवसात फक्त २३० लायसन्स देण्यात येत होते. त्यामुळे नागरिकांना अपॉइंटमेंट मिळण्यासही काही महिन्यांचा अवधी लागत होता. त्यामुळे हा कोटा वाढविण्याची मागणी आरटीओशी संबंधित विविध स्तरातून केली जात होती. अखेर परिवहन विभागाने मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात त्याबाबतचा निर्णय घेतला आणि त्याचे परिपत्रक राज्यातील सर्व परिवहन कार्यालयांना पाठविले.

आता कोटा वाढविल्यानंतर वेटिंगची संख्या कमी होऊन नागरिकांना वाट पाहावी लागणार नाही. मात्र, निर्णयाचे परिपत्रक सर्वच प्रादेशिक कार्यालयांना पाठवून एक आठवडा उलटला आहे. काही ठिकाणी त्याची अंमलबजावणी झाल्याचे दिसून येत नसल्याचे सूत्रांनी सांगितले.

परिवहन विभागाने ३७५ चा कोटा निश्चित करून दिला असला, तरीदेखील पुणे प्रादेशिक परिवहन कार्यालयात दररोज ४०० लायसन्स दिली जात आहेत. येथील कर्मचारी क्षमता व उपलब्धता यामुळे ३७५ एेवजी ४०० जणांना दररोज लर्निंग लायसन्स देण्याचा निर्णय घेतला आहे.

- जितेंद्र पाटील, प्रादेशिक परिवहन अधिकारी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

हलक्या दप्तराचे पेटंट

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

शालेय विद्यार्थ्यांच्या दप्तराचे ओझे ५० ते ७५ टक्क्यांनी कमी करणारी अभिनव कल्पना पिंपरी- चिंचवडमधील प्राध्यापकाने पुढे आणली आहे. पिंपरी-चिंचवड कॉलेज ऑफ इंजिनीअरिंगच्या डॉ. हरीश तिवारी आणि विवेक गोमासे यांनी या कल्पनेसाठी पेटंट दाखल केले असून, या कल्पनेमुळे विद्यार्थ्यांची दप्तराच्या ओझ्यामधून सुटका होणे शक्य असल्याचा दावाही त्यांनी केला आहे.

विद्यार्थ्यांच्या सर्व विषयांच्या अभ्यासक्रमाचे मोजके भाग करून, त्या प्रत्येक भागाच्या एकत्रित पुस्तकाच्या माध्यमातून हे शक्य होणार असल्याचे डॉ. तिवारी यांनी 'मटा'ला सांगितले. 'विषयवार पुस्तकांच्या निर्मितीमुळे विद्यार्थ्यांना गरज नसताना सर्वच्या सर्व धड्यांचे ओझे कायम दप्तरात न्यावे लागते. आमच्या कल्पनेनुसार, प्रत्येक विषयाचा अभ्यासक्रम विशिष्ट टप्प्यांमध्ये विभागतो. प्रत्येक विषयाचा पहिला टप्पा एका पुस्तकामध्ये समाविष्ट केला जातो. अशाच प्रकारे इतर टप्प्यांसाठीही प्रत्येकी एक पुस्तक तयार करणे शक्य आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना पहिल्या टप्प्याचा अभ्यासक्रम सुरू असताना केवळ पहिल्या टप्प्याचे एकच पुस्तक शाळेत न्यावे लागेल. इतर टप्प्यांमधील सर्व विषयांचे पाठ त्या त्या संबंधित टप्प्यांसाठीच्या पुस्तकांमध्ये असल्याने, विद्यार्थ्यांना त्या पुस्तकांमधील पाठांचे कोणतेही ओझे न्यावे लागणार नाही. अपवादात्मक परिस्थितीत दोन वेगवेगळ्या टप्प्यांमधील धड्यांचा विचार सुरू असल्यास, विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त दोनच टप्प्यांसाठीच्या पुस्तकांच्या ओझ्याचा भार सहन करावा लागेल,' असे डॉ. तिवारी यांनी स्पष्ट केले.

पाठ्यपुस्तकांच्या याच रचनेप्रमाणे वह्यांचीही निर्मिती शक्य असल्याचे त्यांनी सांगितले. त्या त्या टप्प्यामधील धड्यांसाठी आवश्यक पानांचा विचार करून वह्यांचा आकार निश्चित करावा आणि त्या गरजेनुसार वापराव्यात, अशी कल्पनाही या पेटंटच्या माध्यमातून मांडण्यात आली आहे. या कल्पनेमुळे विद्यार्थ्यांच्या दप्तराचे ओझे ५० ते ७५ टक्क्यांनी कमी होत असल्याचा दावाही त्यांनी केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रबरी स्पीडब्रेकर धोकादायक

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

शहरातील अनेक रस्त्यांवर वाहनांची गती कमी करण्यासाठी बसविण्यात आलेले रबरी स्पीडब्रेकर वाहनचालकांसाठी अत्यंत धोकादायक ठरत आहेत. चुकीच्या नियमांच्या आधारे बेकायदा पद्धतीने बसविण्यात आलेले हे स्पीडब्रेकर तातडीने काढून टाकावेत, अशी मागणी केली जात आहे. नियमबाह्य पद्धतीने बसविण्यात आलेल्या या स्पीडब्रेकरमुळे वाहनचालकांची तारांबळ उडत असून, यामुळे अनेकांना पाठीच्या, तसेच मणक्याच्या आजारांना सामोरे जावे लागत असल्याची तक्रार केली जात आहे.

शहरातील रहदारीच्या अनेक रस्त्यांवर वाहनांचा वेग कमी करण्यासाठी स्पीडब्रेकर बसविले जातात. वाहतूक शाखेच्या मान्यतेनंतर पालिका ते बसवते. हे स्पीडब्रेकर कसे असावेत, याबाबत इंडियन रोड काँग्रेसमध्ये मार्गदर्शक तत्वे घालून देण्यात आले आहेत. यामध्ये केलेल्या सूचनांनुसार रस्त्यांवर स्पीडब्रेकर बसविणे गरजेचे असते. मात्र, याकडे दुर्लक्ष करत चुकीच्या पद्धतीने रबरी स्पीडब्रेकर बसविण्याचा 'प्रताप' महापालिका प्रशासनाने केला आहे. वाहतूक शाखेने दिलेल्या मान्यतेनंतरच अशा पद्धतीचे स्पीडब्रेकर बसविण्यात आल्याचा खुलासा करून पालिका आपली जबाबदारी झटकून टाकत आहे. याबाबतचे वृत्त 'मटा'ने सर्वांत अगोदर प्रसिद्ध करून नागरिकांना होणाऱ्या त्रासाला वाचा फोडली होती.हे स्पीडब्रेकर काढून टाकावेत, अशी मागणी पीपल्स युनियनचे निमंत्रक रमेश धर्मावत यांनी वाहतूक शाखेचे उपायुक्त सारंग आव्हाड यांच्यासह पालिका आयुक्त कुणाल कुमार यांच्याकडे केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चालत्या एसटीने घेतला पेट

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, लोणावळा

पुणे- मुंबई एक्स्प्रेस वेवर लोणावळ्यानजीक कुणे पुलाजवळ राज्य परिवहन महामंडळाची एशियाड अचानक लागलेल्या आगीत जळून खाक झाली. सुदैवाने यात कोणीही जखमी झाले नाही. ठाण्याहून बारामतीला जाणाऱ्या या बसमध्ये ४२ प्रवासी होते. ही घटना शनिवारी दुपारी पावणेचारच्या सुमारास घडली.

खंडाळा महामार्ग पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ठाणे येथून बारामतीला जाणाऱ्या बारामती डेपोच्या बसला ( एमएच ०७ सी ७५३८) खंडाळा घाटमाथा सर केल्यानंतर लोणावळ्याजवळील कुणे पुलाजवळ अचानक आग लागली. या मार्गाने जाणाऱ्या एका वाहनचालकाने बसचालकाला आग लागल्याची माहिती दिली. चालक पी. डी. कवडे आणि वाहक ए. बी. बुटे यांनी प्रसंगावधान राखून याबाबत प्रवाशांना कल्पना दिली. त्यानंतर बस मार्गालगत सर्व्हिस रोडवर उभी केल्यानंतर प्रवाशांनी जीव मुठीत घेवून साहित्याची तमा न करता बसमधून उड्या मारल्या. प्रवासी खाली उतरल्यानंतर काही वेळातच आगीने रौद्र रूप धारण केले. या घटनेची माहिती कळताच खंडाळा महामार्गाचे प्रभारी सहाय्यक पोलिस निरीक्षक नंदकुमार कुळकर्णी, अल्ताफ पठाण, दिलीप कुरंदळे, सुधाकर शिंदे व आणि आयआरबीच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच, खबरदारी म्हणून यामार्गाने जाणारी वाहतूक काही काळ रोखण्यात आली. दहा मिनिटांत आयआरबीचा बंब घटनास्थळी दाखल झाला. त्याने आग आटोक्यात आणल्यानंतर मार्गावरील वाहतूक दोन लेनवरून सुरू करण्यात आली.

आगीत प्रवाशांचे सामान जळून खाक झाले होते. उन्हाचे प्रमाण वाढल्याने तसेच बस गरम झाल्याने आगल्याचा प्राथमिक अंदाज आहे. बसमधील प्रवाशांना चालक आणि वाहकाने अन्य बसमध्ये बसविण्याची व्यवस्था केली. लोणावळा डेपोचे वाहतूक नियंत्रक व्ही. व्ही. धुमाळ यांनी घटनास्थळी जाऊन प्रकाराची पाहणी केली. घटनेचा पुढील तपास लोणावळा शहर पोलिस करीत आहेत.

नेमके काय घडले?

एसटी ठाण्याहून बारामतीला जात होती. खंडाळा घाटमाथा सर केल्यानंतर लोणावळ्याजवळील कुणे पुलाजवळ अचानक आग लागली.

या मार्गाने जाणाऱ्या एका वाहनचालकाने बसचालकाला आग लागल्याची माहिती दिली. चालक आणि वाहकाने प्रवाशांना या विषयी माहिती दिली.

त्यानंतर बस मार्गालगत सर्व्हिस रोडवर उभी केल्यानंतर प्रवाशांनी जीव मुठीत घेवून साहित्याची तमा न करता बसमधून उड्या मारल्या.

प्रवासी खाली उतरल्यानंतर काही वेळातच आगीने रौद्र रूप धारण केले.

खबरदारी म्हणून यामार्गाने जाणारी वाहतूक काही काळ रोखण्यात आली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


अवर सचिवांकडून राव यांची उघाडणी

$
0
0

पुणेः राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात मांडण्यात आलेल्या कपातसूचनेवर स्वयंस्पष्ट अहवाल न दिल्याबद्दल जिल्हाधिकारी सौरव राव यांची अवर सचिवांकडून कानउघाडणी करण्यात आली आहे. हा अहवाल तातडीने न पाठिवल्यास ही बाब मुख्यमंत्र्याच्या निदर्शनास आणण्याची तंबीही देण्यात आली आहे.

या संबंधीचे पत्र अवर सचिव श्रीकांत देशपांडे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना पाठविले आहे. विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन नुकतेच झाले. या अधिवेशनात कपात सूचना मांडण्यात आल्या होत्या. त्यातील सूचना क्रमांक सातवर राव यांच्याकडून स्वयंस्पष्ट अहवाल मागविण्यात आला होता. कपात सूचनेवर जिल्हाधिकाऱ्यांनी तातडीने अहवाल पाठवावा. हा अहवाल पाठविण्यात दिरंगाई केल्यास ही बाब देवेंद्र फडणवीस यांच्या निदर्शनास आणण्यात येणार असल्याचे देशपांडे यांनी स्पष्ट केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मोटार कालव्यात पडून तरुणाचा मृत्यू

$
0
0

पुणेः मद्यप्राशन करून मोटार वळवित असताना ती कालव्यात पडल्यामुळे एका तरुणाचा मृत्यू झाला. गोळीबार मैदानाजवळील कालव्यात शनिवारी दुपारी ही घटना घडली. तुषार रमेश माने (वय २४, रा. भवानी पेठ) या तरुणाचा घटनेत मृत्यू झाला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, माने हा त्याच्या तीन मित्रांबरोबर सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास गोळीबार मैदानाजवळील कालव्याजवळ मोटारीने गेला. त्याठिकाणी त्यांनी मोटार लावली. या चौघांनी मोटारीत मद्यपान केले. अकरा वाजण्याच्या सुमारास पार्टी संपल्यानंतर मोटारीतून तिघेजण उतरले. दरम्यान, माने काहीतरी आणायचे म्हणून मोटार वळविण्याचा प्रयत्न करत असताना तोल जाऊन पाठीमागे असलेल्या कालव्यात मोटार पडली. मानेला उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, त्याचा मृत्यू झाला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

परीक्षेतील गोंधळाची मालिका सुरूच

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या परीक्षा विभागातील गोंधळाची मालिका अजूनही सुरूच आहे. परीक्षेचा विषय सोडून भलत्याच विषयाची प्रश्नपत्रिका देण्यात आल्याने विद्यार्थ्यांचा गोंधळ उडाला. त्यातच वेगळ्याच विषयाची प्रश्नपत्रिका देऊन विद्यार्थ्यांनी हवे ते प्रश्न निवडून पेपर सोडविण्याची अजब सूचनाही विद्यार्थ्यांना करण्यात आली. या सावळ्या गोंधळामुळे विद्यार्थ्यांना परीक्षेपासून वंचित राहावे लागले.

विद्यापीठाच्या बहिःस्थ विद्यार्थ्यांच्या परीक्षा सध्या सुरू आहेत. शनिवारी अर्थशास्त्राच्या एम ए अभ्यासक्रमाची पर्यायी विषयांची परीक्षा होती. 'शेतकी आणि औद्योगिक अर्थशास्त्र' आणि 'भारतीय आर्थिक धोरण आणि औद्योगिक अर्थशास्त्र' या विषयाच्या प्रश्नपत्रिका विद्यार्थ्यांना देण्यात आली नाही. परीक्षेची वेळ ११ वाजताची होती. परंतु, या विद्यार्थ्यांना तब्बल दोन तासांनी म्हणजेच एक वाजता प्रश्नपत्रिका देण्यात आली. मात्र, ही प्रश्नपत्रिका वेगळ्याच विषयाची असल्याने गोंधळात आणखी भर पडली. त्यानंतर या विद्यार्थ्यांना 'गणिती अर्थशास्त्र आणि संख्याशास्त्रीय तंत्र' व 'भारतीय आर्थिक धोरण आणि औद्योगिक अर्थशास्त्र' या विषयांच्या प्रश्नपत्रिका देऊन त्यातील तुमच्या विषयाशी संबंधित प्रश्न निवडा आणि परीक्षा द्या, अशी सूचना देण्यात आल्याचे समजते. गोंधळामुळे हे पेपर रद्द करून फेरपरीक्षा घेण्याची मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे. मात्र, रात्री उशिरापर्यंत विद्यापीठाकडून फेरपरीक्षेविषयी कोणतीही घोषणा करण्यात आली नाही.

सोमवारी होणार निर्णय

पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमाला पर्यायी विषय असतात. तीन विषयांची परीक्षा सकाळच्या सत्रात होती. यासाठी प्रत्येक विषयाच्या स्वतंत्र प्रश्नपत्रिका काढणे आवश्यक होते. यापैकी एका विषयाची प्रश्नपत्रिका योग्य होती. अन्य दोन विषयांची प्रश्नपत्रिका एकत्रित काढण्यात आली. या प्रकरणी पेपरसेटरची चूक असून याबाबत सोमवारी होणाऱ्या अधिष्ठातांच्या बैठकीत याबाबत निर्णय घेण्यात येईल, असे विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. वासुदेव गाडे यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

युतीतील धूसफूस आली चव्हाट्यावर

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

पुणे महानगर प्रादेशिक विकास प्राधिकरणावर (पीएमआरडीए) लोकप्रतिनिधींना संधी नाही..., बाजार समितीच्या प्रशासकीय मंडळावर शिवसेनेला नगण्य स्थान दिले... आणि राष्ट्रवादीच्या लोकप्रतिनिधींना आपल्या लोकप्रतिनिधींपेक्षा अधिक निधी मिळतो....आदी तक्रारींवरून भाजप-सेना युतीच्या पदाधिकाऱ्यांमधील धूसफूस पुन्हा चव्हाट्यावर आली आहे.

या संदर्भात राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून आपले गाऱ्हाणे मांडले आहे. त्यानंतर पालकमंत्री गिरीश बापट, शिवसेनेचे जिल्हा संपर्क प्रमुख डॉ. अमोल कोल्हे, खासदार शिवाजीराव आढळराव पाटील आणि शशिकांत सुतार यांच्यात नुकतीच चर्चा झाली. त्यामध्ये गैरसमज दूर करण्याबाबत समाधानकारक चर्चा झाली असून, महिनाअखेरपर्यंत त्याचे सकारात्मक निकाल दिसतील, असे डॉ. कोल्हे यांनी शनिवारी पत्रकारांना सांगितले.

दोन्ही पक्षांमध्ये धुसफूस नाही, तर सत्तेत असताना सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सोडविणे अधिक महत्त्वाचे आहे, असे शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पूर्वीच सांगितले आहे. त्यानुसार आम्हीही काम करीत आहोत, असेही डॉ. कोल्हे म्हणाले. 'प्रत्येक लोकप्रतिनिधीचा आपल्या मतदारसंघासाठी अधिकाधिक निधी मिळविण्यासाठी आग्रह असतो. त्यामुळे शिवसेनेच्या आमदारांनी त्याबाबत आग्रही भूमिका घेणे चुकीचे नाही,' अशा शब्दांत डॉ. कोल्हे यांनी सेनेच्या आमदारांची पाठराखण केली. पीएमआरडीएवर पंचायत समित्या व अन्य स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पदाधिकाऱ्यांना स्थान देण्यात आले आहे. त्यामुळे राष्ट्रवादीच्या सदस्यांची संख्या अधिक दिसत असल्याने तसे चित्र निर्माण झाले असावे, अशी टिपण्णीही त्यांनी केली. दरम्यान, येत्या काळात संघटना बांधणीकडे आवर्जून लक्ष पुरविण्यात येईल, असे डॉ. कोल्हे यांनी सांगितले. पुणे शहरातील कचरा, डीपी, मेट्रो, रिंगरोड असे प्रश्न सोडविण्यासाठी आग्रही भूमिका घेण्यात येईल, असेही ते म्हणाले.

'सैनिकांवर अन्याय होऊ देणार नाही'

नुकत्याच झालेल्या महापालिका निवडणुकांमध्ये शिवसेनेला सर्वाधिक यश मिळाले आहे. त्यानंतर पुणे महापालिकेच्या निवडणुकीसाठीही तयारी करण्यात येत आहे, असे डॉ. कोल्हे म्हणाले. दरम्यान, पुणे पालिकेसाठी युती झाल्यास वर्षानुवर्षे काम करणाऱ्या शिवसैनिकांवर अन्याय अन्याय होऊ देणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. मात्र, त्यासाठी पक्षाची रचना बळकट करण्याचे काम प्राधान्याने करण्यात येईल, असेही ते म्हणाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पुणेकरांचा भर आता पर्यायी आराखड्यावर

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

वादग्रस्त ठरलेल्या पुण्याचा विकास आराखडा सरकारदरबारी अडकल्याने पुणेकरांनी आता पर्यायी विकास आराखड्याची तयारी आरंभली आहे. त्यासाठी विविध पक्षातील नेते, वास्तूतज्ज्ञ आणि शहरनियोजन तज्ज्ञ एकत्र आले असून, त्यांनी 'आपले पुणे' या नावाने नवीन विकास आराखडा तयार करण्यास सुरुवात केली आहे. पहिल्या टप्प्यात ही टीम पूरनियंत्रण रेषेतील बांधकामे आणि शहरातील टेकड्यांच्या उतारांचे नव्याने सर्वेक्षण करणार आहे.

पुण्याचा विकास आराखडा गेल्या दोन वर्षांपासून चर्चेत आहे. पुणेकरांनी ८७ हजार हरकती आणि सूचना नोंदविल्या असून, ५५ हजारांहून अधिक वैयक्तिक सुनवण्याही झाल्या आहेत. काही दिवसांपूर्वीच राज्य सरकारने शहराचा विकास आराखडा ताब्यात घेऊन एक नवीन समिती स्थापन केली. ही समितीच आता आराखडा पुढे कसा न्यायचा यावर निर्णय घेणार आहे. या धर्तीवर शहरातील स्वयंसेवी संस्था, सर्व राजकीय नेते, वास्तूतज्ज्ञ आणि शहर नियोजन तज्ज्ञ एकत्र आले आहेत. त्यांची नुकतीच एक बैठक झाली. त्यामध्ये लोकसहभागातून 'आपले पुणे' या नावाने एक नवीन पर्यायी विकास आराखडा आणि शहर विकासासाठी उपाययोजना करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 'सस्टेनेबिलिटी इनिशिटएटिव्ह' ही संस्था या उपक्रमाचा समन्वय साधणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images

<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>
<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596344.js" async> </script>