Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यांत रुजतेय ग्रंथचळवळ

$
0
0

प्रसाद पवार, पुणे

सह्याद्रीच्या दुर्गम दऱ्याखोऱ्यात अक्षरवाटांची पेरणी करण्यासाठी एखाद्या अधिकाऱ्यानं धडपडावं, हे चित्र तसं दुर्मिळच. पुण्याच्या सेंटर फॉर डेव्हलपमेंट ऑफ अॅडव्हान्स्ड कम्प्युटिंग (सी-डॅक) संस्थेत टेक्निकल ऑफिसर म्हणून कार्यरत असणारे दामोदर मगदूम यांनी हे शिवधनुष्य पेललं आहे. साल्हेर (नाशिक) ते पारगड (कोल्हापूर) या सह्यपट्ट्यात त्यांनी दहा ग्रंथालये उभी केली असून, एकूण एक हजार ग्रंथालये उभारण्याचा त्यांचा संकल्प आहे.

राजगड आणि रायगड हा स्वराज्याच्या राजधान्यांपासून त्यांच्या या उपक्रमाचा श्रीगणेशा झाला. त्यानंतर वाजेघर (राजगड पायथा), केंजळगाव (पुरंदर पायथा), जुन्नर (शिवनेरी पायथा), पाचाड (शिवतीर्थ रायगडाजवळ), वहाणगाव (ऐतिहासिक कुसूर घाटाजवळ), शिरवली (कोयना खोरे), बहिरडवाडी (अकोले तालुका), केंजळ (भोर), कुरूल (अलिबाग), पष्टेपाडा (ठाणे), कोळकेवाडी (चिपळूण), धामापूर (सिंधुदुर्ग), बदगी (नगर) या ठिकाणी ग्रंथदिंडीचं योगदान आहे.

हरितभूमी फाउंडेशनच्या माध्यमातून शिवसह्याद्री ग्रंथदिंडी या नावानं हा उपक्रम राबवला जातो आहे. त्यासाठीचा निधीही त्यांनी अनोख्या पद्धतीनं जमवायला सुरूवात झाली आहे. मगदूम यांच्या इतिहास संशोधनातून साकारलेलं 'स्वराज्याचे शूर सेनानी : शहाजीराजांपासून यशवंतराव होळकरांपर्यंत' हे पुस्तक त्यासाठी निधी संकलनाचं काम करत आहे.

या पुस्तकात स्वराज्यकार्यात सहभागी झालेल्या अनेक ज्ञात-अज्ञात शूरवीरांची माहिती, ऐतिहासिक संदर्भांसह त्यांनी दिली आहे. पुस्तकासाठी कर्ज काढूनही त्यातून जमा होणारा निधी ते सह्याद्रीसाठी वापरत आहेत. अधिकाधिक अभ्यासक आणि वाचकांपर्यंत हे पुस्तक पोहोचवायचा ते प्रयत्न करत आहेत. ग्रंथदिंडीतही केवळ इतिहासच नव्हे तर भूगोल, विज्ञान, भाषा, गणित अशा विविध विषयांची पुस्तकं दुर्गम भागातल्या शाळांपर्यंत पोहोचवली जात आहेत.

उपक्रमात सहभागी व्हा

मगदूम यांनी पुस्तकाच्या पुढच्या भागाची तयारीही सुरू केली आहे. 'उत्तरेत पराक्रम गाजवलेल्या अज्ञात ८० सरदारांची माहिती प्रकाशात आणणार आहे. या पुस्तकाच्या माध्यमातून जमणारा निधी सह्याद्रीतल्या विविध उपक्रमांसाठी राबवायचा आहे,' असे त्यांनी 'महाराष्ट्र टाइम्स'ला सांगितले. ग्रंथालयाच्या या उपक्रमात सहभागी होण्यासाठी ९४२१०५१८८९ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


दोन माओवाद्यांना पोलिस कोठडी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

तळेगाव दाभाडे येथून पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या दोन माओवाद्यांना कोर्टाने शनिवारी सात दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. हे दोघेही माओवाद्यांच्या केडरमध्ये वरच्या स्थानावर असल्याने त्यांची अटक महत्त्वाची मानली जात आहे. कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि केरळ या तिन्ही राज्यांचे पोलिस या दोघांच्या मागावर होते.

मुरलीधरन तथा अजित तथा थॉमस जोसेफ (वय ६२, रा. लोटस व्हिला प्लॉट नं. ७, तुकारामनगर, तळेगाव दाभाडे, मूळ राहणार इरिम्पनेम, केरळ) आणि ईस्माइल हमजा सीपी (चिरगपल्ली) ऊर्फ प्रवीण ऊर्फ जेम्स मॅथ्यू (२९, रा. वालॉरड, जि. मलपुरम, केरळ) या दोघांना पोलिसांनी शुक्रवारी रात्री अटक केली होती. त्यांना शनिवारी विशेष न्यायाधीश एस. व्ही. माने यांच्या कोर्टात या दोघांना हजर करण्यात आले होते.

'के. मुरलीधरन हा प्रमुख माओवादी असून, तो अन्य म्होरक्यांच्या संपर्कात होता. गेली दोन वर्षे तो तळेगावमध्ये राहतो आहे. त्याच्याकडे आक्षेपार्ह साहित्य मिळाले आहे. माओवाद्यांच्या म्होरक्यांशी झालेला संपर्कव्यवहारही मिळाला आहे,' अशी माहिती पोलिसांनी दिली. पुणे परिसरात माओवाद्यांचा वावर वाढत असल्याबद्दल चिंता व्यक्त केली जात असून, त्याबाबतचा तपासही वाढविला जाणार असल्याचे सांगण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पुणेः ४०.५ अंश सेल्सियस

$
0
0

पुणेः शहरातील तापमानाने शनिवारी हंगामातील नवा उच्चांक गाठला. शनिवारी ४०.५ अंश सेल्सियस इतक्या कमाल तापमानाची नोंद झाली. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर उकाडा जाणवत होता. दरम्यान, रविवारी दुपारनंतर शहराच्या काही भागात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. शहरात गेले काही दिवस कमाल तापमानाचा पारा चाळीस अंशांच्या आसपास आहे. त्यामुळे उन्हाची तीव्रताही मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. सकाळपासूनच उन्हाचा चटका जाणवत असून, भरदुपारी झळा अधिक तीव्र होत आहेत. गरम हवेचे झोत वाहत असल्याने पुणेकरांना घामाच्या धारांचा सामना करावा लागत आहे.

पुण्याबरोबरच राज्यातही तीव्र उन्हाळा कायम आहे. शनिवारी राज्यातील सर्वाधिक तापमान चंद्रपूर येथे (४४.८ अंश सेल्सियस) नोंदले गेले. तर सर्वात नीचांकी तापमानाची नोंद महाबळेश्वर येथे (१९.६ अंश सेल्सियस) नोंदले गेले. जळगाव, मालेगाव, सोलापूर, उस्मानाबाद, नांदेड, नागपूर, औरंगाबाद, उस्मानाबाद आदी ठिकाणी पारा चाळीस अंशांवर होता. दरम्यान, पुढील दोन दिवस राज्यात मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह वादळी पावसाची शक्यता आहे. तर पुण्यात दुपारनंतर मेघगर्जनेसह पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आयएमए–निमाचा संघर्ष कोर्टात

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

अॅलोपॅथीची प्रॅक्टिस करण्यास राज्य सरकारने आयुर्वेद तज्ज्ञांना परवाना दिल्यानंतरही 'इंडियन मेडिकल असोसिएशन'ने (आयएमए) आपला विरोध कायमच ठेवला आहे. हा संघर्ष आता हाय़कोर्टानंतर थेट सुप्रीम कोर्टात पोहोचला आहे. 'आयएमए'च्या याचिकेवर 'नॅशनल इंटिग्रेटेड मेडिकल असोसिएशन'ने (निमा) 'कॅव्हेट' दाखल केले आहे.

आयुर्वेदाच्या डॉक्टरांना अॅलोपॅथीची प्रॅक्टिस करण्याची मुभा देण्यासाठी राज्य सरकारने महाराष्ट्र मेडिकल प्रॅक्टिशनर्स कायद्यात सुधारणा केली. त्याद्वारे परिपत्रक काढून बीएएमएस, बीयूएमएसच्या डॉक्टरांना पदवी व पदव्युत्तर शिक्षणात समाविष्ट असलेल्या अॅलोपॅथीच्यानुसार औषधे वापरण्याची परवानगी देण्यात आली होती. यासाठी ''निमा' प्रयत्नशील होती. अॅलोपॅथीची प्रॅक्टिस एमबीबीएसच्या डॉक्टरांना करता येईल, अशी भूमिका 'आयएमए'ने घेतली. त्यामुळे अॅलोपॅथी विरुद्ध आय़ुर्वेद अर्थात 'आयएमए' विरुद्ध 'निमा' असा संघर्ष पेटला. या संदर्भात 'निमा'चे प्रवक्ते डॉ. मंदार रानडे, राज्याचे प्रभारी अध्यक्ष डॉ. सुहास जाधव, माजी अध्यक्ष डॉ. सुहास परचुरे यांनी पत्रकार परिषदेत भूमिका मांडली. या वेळी डॉ. शैलेश निकम, डॉ. मुश्ताक मुकादम आदी उपस्थित होते.

'शहरासह ग्रामीण भागात ८० हजार डॉक्टर आयुर्वेदाची प्रॅक्टिस करून जनतेला आरोग्य सेवा देत आहेत. आय़ुर्वेद तज्ज्ञांना सरकारने अॅलोपॅथीची प्रॅक्टिस करण्याचा अधिकार दिला. या आदेशाला स्थगिती द्यावी अशी याचिका आयएमएने हायकोर्टात दाखल केली होती. हायकोर्टाने आयएमएचा अर्ज फेटाळून लावला. त्यामुळे आयएमएने पुन्हा आयुर्वेदाविरोधात सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली आहे. परिणामी, निमाने देखील आयुर्वेद डॉक्टरांच्या हितासाठी कॅव्हेट दाखल केले असून, संघटनेतर्फे सुप्रीम कोर्टात भूमिका मांडण्यात येणार आहे,' अशी माहिती डॉ. रानडे यांनी दिली. आयुर्वेद डॉक्टर ग्रामीण भागात प्रॅक्टिस करीत असून, त्याचा जनतेला फायदा होत आहे. यासाठीच आमची ही लढाई आहे, असे डॉ. सुहास परचुरे यांनी स्पष्ट केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

घोटाळेबाजांच्या चौकशीला ब्रेक

$
0
0

म. टा. विशेष प्रतिनिधी, पुणे

बोगस यूएलसी (कमाल जमीनधारणा कायदा) दाखले, धरणग्रस्तांच्या जमीन वाटपात गैरव्यवहार, कामात निष्काळजीपणा आणि आर्थिक घोटाळ्यांचे आरोप असलेल्या पुण्यातील आठ अधिकाऱ्यांची विभागीय चौकशी तातडीने पूर्ण करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. विभागीय चौकशीच्या अभिप्राय अहवालाअभावी चार्जशीट दाखल होत नसल्याने संबंधितावर कारवाईचे पाऊल उचलण्यात अडचणी येत आहेत.

बनावट यूएलसी प्रकरणात अटक झालेले संजय कुंडेटकर, धरणग्रस्तांच्या जमीन वाटपात गैरप्रकारात निलंबित करण्यात आलेले प्रशांत शेळके, दौंडचे तत्कालीन तहसीलदार प्रशांत आवटे यांच्यासह आठ वरिष्ठ अधिकाऱ्यांची विभागीय चौकशी सुरू आहे. मात्र, या विभागीय चौकशीसंबंधीचे अभिप्राय अहवाल गेले कित्येक महिने तयार केलेले नाहीत. जिल्हाधिकाऱ्यांनी हा अभिप्राय अहवाल दाखल केल्यानंतर ते राज्य सरकारकडे पाठविले जातात. त्यानंतर संबंधितांवरील चार्जशीट तयार केले जाते. त्यानंतर प्रत्यक्ष कारवाई करण्यात येते.

विभागीय आयुक्त एस. चोकलिंगम यांनी महसूल खाते, रोजगार हमी योजना व जिल्हा परिषदेतील गैरप्रकारात अडकलेल्या व विभागीय चौकशीचे आदेश दिलेल्या प्रकरणांचा आढावा घेतला. त्यात जिल्हाधिकाऱ्यांच्या अभिप्राय अहवालाअभावी कारवाई प्रलंबित राहिल्याचे स्पष्ट झाल्याने त्यांनी यासंबंधी तातडीने अहवाल सादर करण्याची सूचना जिल्हाधिकाऱ्यांना करण्यात आली आहे. बनावट यूएलसी प्रकरणात राज्य गुन्हे अन्वेषण विभागाने (सीआयडी) कुंडेटकर यांना अटक केली होती. त्यानंतर त्यांना शासकीय सेवेतून निलंबित करण्यात आले. या बनावट यूएलसी प्रकरणी शिवाजीनगर पोलिस स्टेशनमध्ये २०१०मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता. सीआयडीने या गुन्ह्याचा तपास करून शासकीय रेकॉर्डकिपर प्रतिभा खाडे, त्यांचे पती शशिकांत खाडे यांना अटक केली होती. या प्रकरणाच्या तपासात यूएलसी प्रमाणपत्रे तत्कालीन अधिकारी कुंडेटकर यांच्या स्वाक्षरीने देण्यात आल्याचे निष्पन्न झाले होते. त्यांची विभागीय चौकशी करण्याचे आदेश देऊनही ती अद्याप प्रलंबित राहिली आहे.

बनावट धरणग्रस्तांना जमीन वाटप, एजंटांना जमिनी मिळवून देण्यासारखे आरोप तत्कालीन जिल्हा पुनर्वसन अधिकारी प्रशांत शेळके यांच्यावर करण्यात आले होते. या प्रकरणात तथ्यांश आढळल्याने त्यांना निलंबित करण्यात आले आणि त्यांची विभागीय चौकशीही सुरू करण्यात आली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

माओवादी ‘सह्याद्री’च्या कुशीत!

$
0
0

रोहित आठवले

सह्याद्रीच्या पर्वत रांगामध्ये कारवाया वाढविण्याची घोषणा कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडियाने (माओवादी) काही दिवसांपूर्वी इटलीतील मिलान शहरात झालेल्या आंतरराष्ट्रीय परिषदेत केली होती. त्याबाबचे पत्र सीपीआयने (माओवादी) ने जाहीर देखील केले होते. शनिवारी दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) तळेगावातून दोन संशयित माओवाद्यांना पकडल्यानंतर एक प्रकारे वरील पत्राला पुष्टी मिळाली आहे.

बिहार, गडचिरोली, आंध्र-तमिळनाडूमधून तपास यंत्रणांना कित्येक वर्षे गुंगारा देऊन फिरणाऱ्या माओवाद्यांनी आता सह्याद्रीच्या पर्वतरांगामध्ये किंबहुना थेट पुण्यात आश्रय घेतल्याचे दिसून येत आहे. पुणे एटीएसचे प्रमुख, वरिष्ठ निरीक्षक भानुप्रताप बर्गे आणि त्यांच्या पथकाने आतापर्यंत पौड येथून अँजेलिना सोनटक्के या लेडी कमांडरला तर आयटी हब असलेल्या हिंजवडी पट्ट्यातून अरुण भेलकेला अटक केली होती. अँजेलिनाची एक सहकारी तर भोसरी औद्योगिक वसाहतीत राहात असल्याचे तपासात उघड झाले होते.

सेकंड होम म्हणून मावळातील तळेगाव दाभाडे असो किंवा नव्याने विकसित होणाऱ्या वडगाव-कामशेत या गावांकडे पाहिले जाते. शनिवारी एटीएसच्या जाळ्यात आलेला के. मुरलीधरन उर्फ अजित उर्फ थॉमस जोसेफ (वय ६२) आणि इस्माईल हमजा सीपी (चिरगपल्ली) ऊर्फ प्रवीण ऊर्फ जेम्स मॅथ्यू (वय २९) हे दोघे तळेगावातील संत तुकाराम नगरमध्ये गेल्या दोन वर्षांपासून राहात होते. त्यांनी 'लोटस व्हिला' या इमारतीत फ्लॅट भाडेतत्त्वावर घेतला होता. बर्गे यांना या दोघांबाबत माहिती मिळाल्यानंतर एटीएसने संबंधित इमारतीवर छापा मारून दोघांना ताब्यात घेतले. तेव्हा या फ्लॅटमध्ये या दोघांव्यतिरिक्त अन्य कोणीही राहात नसल्याचे सध्या सांगण्यात येत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

माओवाद्यांना कोठडी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

केंद्र सरकारने बंदी घातलेल्या सीपीआय (एम) या दहशतवादी संघटनेच्या दोन माओवाद्यांना दहशतवादी विरोधी पथकाने (एटीएस) पुणे- लोणावळा रस्त्यावरील तळेगाव दाभाडे येथे अटक केली. त्यातील एकजण नक्षलवाद्यांचा प्रमुख नेता गणपती याचा जवळचा सहकारी आहे.

अटक करण्यात आलेल्या दोघांना शनिवारी कोर्टात हजर करण्यात आले. त्यांना सात दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. विशेष न्यायाधीश एस. व्ही. माने यांच्या कोर्टाने हा आदेश दिला. या प्रकरणी के. मुरलीधरन उर्फ अजित उर्फ थॉमस जोसेफ (वय ६२, रा. लोटस व्हिला प्लॉट नं. ७, तुकारामनगर, तळेगाव दाभाडे, मूळ रा. इरिम्पनेम, केरळ) आणि इस्माइल हमजा सीपी (चिरगपल्ली) उर्फ प्रवीण उर्फ जेम्स मॅथ्यू (२९, रा. वालॉरड, जि. मलप्पुरम, केरळ) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.

त्यांच्याविरूद्ध भारतीय दंड विधान कायदा कलम ४१९, ४६७,४६८,४७१, ३४ सह यूपीए कलम १०,१३,२०,३८ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. के. मुरलीधरन हा देशातील प्रमुख नक्षलवादी नेत्यांच्या संपर्कात असून, तो अनेक वर्षांपासून नक्षलवादी कारवायांमध्ये सक्रिय आहे. अनेक राज्यातील पोलिस त्याच्या मागावर आहेत. मावळ तालुक्यातील कान्हे येथे काही ​महिन्यांपूर्वी नक्षलवादी कारवाईत सक्रिय असलेल्या अरुण भेलके आणि कांचन भेलके या जोडप्याला 'एटीएस'ने अटक केली होती. त्यानंतर याच भागात पुन्हा आणखी दोघांना अटक करण्यात आली.

'एटीएस'चे अप्पर पोलिस महासंचालक विवेक फणसळकर, पोलिस अधीक्षक प्रदीप सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिस निरीक्षक भानुप्रताप बर्गे, सुनील तांबे, बाळकृष्ण कुतवळ, अतुल सबनीस, सहाय्यक पोलि​स निरीक्षक समीर गायकवाड, नागेश भास्कर, अश्विनी जगताप, पोलिस कर्मचारी राजेंद्र सुर्वे, सुखदेव वाळुंज, सुनील पवार, ज्ञानेश्वर पवार यांच्या पथकाने ही कारवाई केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

७ हजारांचे श्रवणयंत्र घेणार १३ हजाराला?

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पिंपरी

पिंपरी-चिंचवड महानगरपालिका नागरवस्ती विभागाच्या अपंग कल्याणकारी योजनेअंतर्गत २५ श्रवणयंत्रे खरेदी करणार आहे. विशेष म्हणजे बाजारात एक श्रवणयंत्र जास्तीत जास्त ७ हजार रुपयांना उपलब्ध असताना महापालिका मात्र हेच श्रवणयंत्र १३ हजार ४०० रुपयांना एक याप्रमाणे खरेदी करत आहे. त्याबाबतचा प्रस्ताव मंगळवारी होणाऱ्या स्थायी समिती सभेपुढे मंजुरीसाठी ठेवण्यात आला आहे.

अशा प्रकारे राष्ट्रवादी काँग्रेस करदात्या नागरिकांच्या पैशांची लूट करीत असल्याचा आरोप करून ही खरेदी थांबविण्याची मागणी नगरसेविका आशा शेंडगे यांनी केली आहे. नागरवस्तीच्या लाभार्थींना प्रत्यक्ष अर्थसाहाय्य, विविध प्रकरच्या व्यवसायांचे प्रशिक्षण; तसेच वस्तूंचे वाटप केले जाते. आता निविदा प्रक्रियेद्वारे २५ श्रवणयंत्र खरेदीचा प्रस्ताव आहे. एका पुरवठादार ठेकेदाराने श्रवणयंत्राच्या एका नगासाठी १३ हजार ४०० रुपये दर सादर केला आहे. त्याचा एकूण खर्च ३ लाख ३५ हजार रुपयांच्या खर्चाला मंजुरी देण्याचा प्रस्ताव मंगळवारी होणाऱ्या स्थायी समिती सभेपुढे ठेवण्यात आला आहे.

मात्र, नगरसेविका आशा शेंडगे यांनी या प्रस्तावाला विरोध केला आहे. बाजारात नामांकित कंपन्या चांगल्या दर्जाच्या एका श्रवणयंत्रासाठी जास्तीत जास्त ७ हजार रुपये आकारत आहेत. असे असताना महानगरपालिका मात्र एका श्रवणयंत्रांसाठी तब्बल दुप्पट रक्कम मोजत आहे. एक प्रकारे ही करदात्या नागरिकांची अक्षरशः लूट सुरू असल्याचा आरोप शेंडगे यांनी केला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


स्टंटबाजी करताना तरुणाचा मृत्यू

$
0
0

पिंपरीः स्टंटबाजी करताना मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरील अमृतांजन पुलावरून पडून एका तरुणाचा मृत्यू झाला. रविवारी सायंकाळी पावणेसातच्या सुमारास ही घटना घडली. आत्तापर्यंत पाच ते सात तरुणांनी स्टंटबाजी करत असताना आपला जीव गमावला आहे.

जय अजयभाई पार्या (वय १९, रा. राजकोट, गुजरात) असे मृत्यू झालेल्या युवकाचे नाव आहे. जय आणि त्याचे आई-वडील फिरण्यासाठी लोणावळा येथे आले होते. दिवसभर लोणावळा-खंडाळा परिसरातील पर्यटन स्थळांना भेट दिल्यानंतर ते सायंकाळी खंडाळा येथील अमृतांजन पुलाच्या परिसरातून सूर्यास्ताचे दृश्य पाहण्यासाठी गेले होते. या वेळी जयने नव्या पुलावरून जुन्या

पुलावर उडी मारून स्टंटबाजी करण्याचा प्रयत्न केला; परंतु त्याचा तोल गेला आणि तो ७० ते ८० फूट उंचीवरून खाली पडला. यामध्ये डोक्याला गंभीर मार लागून त्याचा जागीच मृत्यू झाला. यापूर्वी पाच ते सात तरुणांनी येथे आपला जीव गमावला आहे. याबाबत पोलिसांनी; तसेच स्थानिकांनी जनजागृती करूनही काहीही फरक पडलेला नाही.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गॅसचा भडका उडून तरुणीचा मृत्यू

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पिंपरी

स्वयंपाक करताना रॉकेलचा कॅन गॅसवर पडून झालेल्या भडक्यात एका बहिणीचा मृत्यू झाला, तर तिला वाचविण्यास गेलेला भाऊ आणि अन्य बहिण जखमी झाले आहेत. त्या दोघांवर उपचार सुरू आहेत. पिंपरीतील विठ्ठलनगर पुनर्वसन प्रकल्पाच्या इमारतीत रविवारी सकाळी ही घटना घडली.

अश्विनी मिलिंद बचुटे (वय २०) असे मृत्यू झालेल्या बहिणीचे नाव आहे, तर भाऊ विशाल शशीराव जावळे (वय २०) व बहिण स्वाती हृषीकेश गंजाळे (वय २६, तिघे रा. प्रज्ञा विकास हौसिंग सोसायटी, विठ्ठलनगर पुनर्वसन प्रकल्प, पिंपरी) हे गंभीर जखमी झाले आहेत. दोघांवर ससून सर्वोपचार हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शाळांना सुट्टी लागल्याने अश्विनी व स्वाती या माहेरी राहण्यासाठी आल्या होत्या. रविवारी सकाळी नेहमीप्रमाणे विशालचे आई-वडील कामासाठी बाहेर पडले. त्या वेळी अश्विनी स्वयंपाक करीत होती, तर विशाल व स्वाती दुसऱ्या खोलीत मुलांना खेळवत होते. तेव्हा अचानक रॉकेलचा कॅन गॅसवर पडला. त्यामुळे भडका उडून अश्विनीच्या कपड्यांनी पेट घेतला. तिला वाचविण्यात तिघे भावंडे भाजली. सुदैवाने लहान मुलांना काही इजा झाली नाही. शेजारील नागरिकांनी पाणी मारून आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. अग्निशामक दलाच्या जवानांनी पाण्याचा फवारा करून आग अटोक्यात आणली; तसेच तिघांना प्रथम वायसीएम व नंतर पुण्यातील ससून सर्वोपचार हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. तेथे उपचारादरम्यान अश्विनीचा मृत्यू झाला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

देशभरात वादळी पावसाची हजेरी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

वाढलेले तापमान आणि विविध ठिकाणी निर्माण झालेल्या चक्रीय स्थितीमुळे महाराष्ट्रासह देशाच्या अनेक भागांत शनिवारी वादळी वाऱ्यांसह पावसाने हजेरी लावली. विजांच्या कडकडाटासह झालेल्या या पावसामुळे वातावरणात काहीसा गारवा निर्माण झाला असला, तरी बहुतेक ठिकाणी कमाल तापमानाचा पारा अद्यापही चाळीस अंशांच्याच घरात आहे.

गेला आठवडाभर उत्तर, मध्य आणि पश्चिम भारतासह महाराष्ट्रात कमाल तापमानाने चाळिशी गाठली असून, उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भातील उष्णतेची लाट कायम आहे. रविवारी जळगावमध्ये ४३.७, तर चंद्रपूरमध्ये ४३ अंश कमाल तापमानाची नोंद झाली. वाढलेल्या तापमानासोबत जम्मू काश्मीर, हरियाणा, बिहार या भागांमध्ये वातावरणाच्या वरच्या थरात चक्रीय स्थिती आणि मध्य प्रदेशपासून तमिळनाडूपर्यंत कमी दाबाचा पट्टा सध्या सक्रिय आहे. ढगाळ हवामान आणि वाढलेले कमाल तापमान या स्थितीमुळे शनिवारी देशात अनेक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पावसाने हजेरी लावली. मध्य, दक्षिण महाराष्ट्र, मराठवाडा आणि उत्तर कर्नाटकमध्ये शनिवारी अनेक भागांना वादळी पावसाचा तडाखा बसला.

विजांचा खेळ

शनिवारी रात्री देशाच्या विविध भागांत झालेला विजांचा कडकडाट थेट अवकाशातूनही पहिला गेला. आंतरराष्ट्रीय अवकाशस्थानकामधून छायाचित्रित करण्यात आलेले भारतातील विजांचे दृश्य रविवारी अंतराळवीर टेरी विर्ट्स याने ट्विटरवरून प्रसिद्ध केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

स्वस्त घरकुल : अभियंत्यासह ३ दोषी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पिंपरी

पिंपरी-चिंचवड महापालिकेने राबविलेले झोपडपट्टी पुनर्वसन आणि स्वस्त घरकुल हे दोन प्रकल्प गुंडाळल्यानंतर या प्रकल्पांना पर्यावरण परवान्याअभावी विलंब आणि कायदेशीर अडचणी निर्माण झाल्याप्रकरणी आयुक्त राजीव जाधव यांनी दोन अभियंता आणि एका वास्तुशास्त्रज्ञाला दोषी ठरविले आहे. त्यापैकी एक अभियंता आणि वास्तुशास्त्रज्ञ सेवानिवृत्त झाले आहेत.

कार्यकारी अभियंता मकरंद निकम यांच्यावर भविष्यातील वेतनवाढीवर परिणाम न करता एक वेतनवाढ तात्पुरती स्थगित करण्यात आली आहे. याशिवाय सेवानिवृत्त अतिरिक्त अधीक्षक अभियंता मदनमोहन सावळे आणि सेवानिवृत्त मुख्य वास्तुशास्त्रज्ञ दीपक शिर्के या दोघांकडून एक महिन्याच्या मासिक निवृत्तीवेतनातील एक तृतीयांश रक्कम वसूल करण्याचे आदेश आयुक्तांनी दिले आहेत. या कारवाईची संबंधितांच्या सेवा पुस्तकात नोंद करण्याचे आदेशही आयुक्तांनी दिले आहेत.

घरे बांधायची झाल्यास त्याचा खर्च महापालिकेला उचलावा लागणार असून, तो न परवडणारा आहे, असे आयुक्तांनी जाहीर केले होते. त्यामुळे झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पच गुंडाळण्याचा निर्णय घेण्यात आला.

झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पाबरोबरच स्वस्त घरकुल प्रकल्पही गुंडाळण्याचा निर्णय झाला आहे. हा प्रकल्प एकूण १३ हजार २०० सदनिकांचा होता. या प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यांतर्गत चिखली येथील प्राधिकरणाच्या जागेत ६ हजार ७२० सदनिका बांधण्याचे काम सुरू आहे. दुसऱ्या टप्प्यात उर्वरित सदनिका बांधण्याची घोषणा झाली. मात्र, हा दुसरा टप्पाच आता गुंडाळण्यात आला आहे. एवढेच नाही, तर पहिल्या टप्प्यातील ६ हजार ७२० सदनिकांपैकी ५ हजार ५८० सदनिकाच बांधण्यात येणार आहेत.

अशी होती योजना

विठ्ठलनगर (१ हजार ४५६ घरे), वेताळनगर (१ हजार ३४४ घरे), मिलिंदनगर (१ हजार २३२घरे), चिंचवड, लिंक रोड (६७२ घरे), अजंठानगर (१ हजार ४५६ घरे), उद्योगनगर (४४८ घरे) आणि निगडी सेक्टर क्रमांक २२ (११ हजार ७६० घरे) आदी झोपडपट्ट्यांच्या जागेवर घरे बांधण्याचा निर्णय.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘लाचलुचपत’चे बोर्ड बेपत्ता

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, येरवडा

पुणे शहरातील बहुतेक पोलिस ठाण्यांत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची माहिती देणारे फलकच लावले नसल्याची बाब आढळून आली आहे. सरकारी कार्यालयांत एखाद्या अधिकाऱ्याने अथवा कर्मचाऱ्याने काम करण्यासाठी लाच मागितली, तर तात्काळ लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे संपर्क साधावा, अशा मजुकाराचे फलक प्रत्येक सरकारी कार्यालायांत, कोर्टात तसेच पोलिस ठाण्यांत दर्शनी भागावर लावणे बंधकारक आहे. मात्र, अनेक पोलिस ठाण्यांमध्ये असे फलक दिसत नाहीत.

लाचखोरांवर तातडीने कारवाई करता यावी, या उद्देशाने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने १०६४ हा टोल फ्री क्रमांक सुरू केला आहे; पण ज्या सरकारी कार्यालयांत, पोलिस ठाण्यांमध्ये या संदर्भात माहिती देणारे फलक लावले आहेत. त्यावर टोल फ्री क्रमांकच टाकण्यात आलेला नसल्याने ते अपडेट करण्याची गरज आहे. तसेच लाचखोरांचे संभाषण, फोटो आणि व्हिडिओ रेकॉर्डिंगसारखे सबळ पुरावे घेण्यासाठी मोबाईल अॅपही विकसित केले आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून लाचखोर पोलिसांवरही अटकेची कारवाई होत असल्याने नागरिकांचा प्रतिसाद वाढू लागला आहे. मात्र, नागरिकांना विभागाशी संपर्क साधण्याची माहिती मिळणेही गरजेचे आहे. त्यामुळे प्रत्येक पोलिस ठाण्यात किंवा पोलिस अधिकाऱ्यांच्या कार्यालयांत याबाबत माहिती देणारे फलक असणे गरजेचे आहे.

याबाबत लाच लुचलपत प्रतिबंधक पुणे विभागाचे अधीक्षक डॉ. दिगंबर प्रधान म्हणाले, 'सामान्य नागरिकांची सरकारी कामे वेळेत पूर्ण व्हावीत, यासाठी कोणत्याही सरकारी कर्मचाऱ्याने पैशांची मागणी केल्यास लाचलुचपत विभागाकडे तक्रार करता यावी, म्हणून शासनाच्या प्रत्येक विभागाच्या कार्यालयांत भ्रष्टाचार संबंधीचे फलक लावणे बंधनकारक आहे. याबाबत संबंधित विभागाच्या प्रमुखांकडे तसे पत्र दिले जाते.'

शहरातील प्रत्येक पोलिस ठाण्यात भ्रष्टाचार संबंधीचे फलक लावणे आवशयक आहे. तसे फलक लावण्यात आले आहे. जर कोणत्या पोलिस ठाण्यात, असे फलक लावले नसतील, तर ठाणे प्रमुखांनी तातडीने फलक लावावेत.

- प्रकाश मृत्याल, अप्पर पोलिस आयुक्त

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

खेळातील वादातून हाणामारीची घटना

$
0
0

येरवडाः कबड्डी खेळताना लहान मुलांमध्ये झालेल्या भांडणात मोठ्यांनी भाग घेतल्याने दोन गटांत जोरदार हाणामारी आणि दगडफेक झाली. त्यामुळे शनिवारी रात्री बर्माशेल झोपडपट्टीमध्ये तणाव होता. घटनेची माहिती मिळताच विमानतळ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली. हाणामारी करणाऱ्या दोन गटांतील चौदा आरोपींना पोलिसांनी अटक केली. निखील जाधव (वय १८), सागर ज्ञानोबा बनसोडे (२०), अक्षय अनिल काकडे (२०), आदेश कांबळे (१८), सौरभ उबाळे (१८) आणि शाकीर मौलानी सय्यद (२०), लक्ष्मण जालिंदर चौगुले (२५), राम जालिंदर चौगुले (२२), राजू होसाळे (२३),अनिल अशोक लंगडे (२२), सुनील प्रकाश मोरे (२४), नागेश भीमा लंगडे (४२), व्यंकटेश अशोक लंगडे (३४) आणि सुमित नागेश लंगडे (१९), अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बारामतीकर भरणार आता घरबसल्या कर

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, बारामती

बारामती नगरपालिकेने आधुनिकतेची कास धरत शहरवासीयांना अधिकाधिक सुविधा देण्याचा संकल्प सोडला आहे. त्याचाच एक भाग म्हणून मालमत्ता कर ऑनलाइन भरण्याची सुविधा लवकरच नगरपालिका कार्यान्वित करणार असल्यामुळे संगणक, लॅपटॉप वा मोबाईल वरूनही बारामतीकरांना घर बसल्या कर भरणे शक्य होणार आहे. नगरपालिकेने पालिकेच्या www. Baramati Municipal Council .com या वेबसाइटवर ई-सेवांचा पर्याय उपलब्ध आहे. त्यातील 'पे युवर प्रॉपर्टी टॅक्स'वर क्लिक केल्यास मालमत्ता करा संबंधी साइट ओपन होईल.

नव्या रचनेत खातेदाराच्या सध्याच्या मालमत्ता क्रमांकात काही प्रमाणात बदल होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांना नवा मालमत्ता क्रमांक क्रमांक मिळणार आहे. मालमत्ता कराचा भरणा नेटबँकिंग, डेबिट कार्ड व क्रेडिट कार्डाद्वारे करता येणार आहे. यासाठी नगरपालिका या प्रकारच्या सुविधा असणाऱ्या बँकांशी करार केले जाणार आहेत. कराचा भरणा केल्यानंतर लगेचच त्याची पावतीही संगणकावरून प्रिंट काढता येईल.

नव्या सेवेमुळे नागरिकांच्या वेळेत बचत होणार आहे. एक ते दोन महिन्यांत या सेवेचा लाभ नागरिकांना देण्यासाठी प्रशासनाचे प्रयत्न सुरू आहे.

- दीपक झीझाड, मुख्याधिकारी, बारामती

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


मंत्री शिवतारेंकडून अधिकारी धारेवर

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, हडपसर

जिल्हा परिषद व महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी नागरिकांचे प्रश्न सोडवण्यासाठी टाळाटाळ केल्यास सबंधित खात्याच्या मंत्र्यांसोबत चर्चा करून कारवाई करू, अशा शब्दांत जलसंपदा मंत्री विजय शिवतारे यांनी अधिकाऱ्यांना खडसावले.

कोंढवा बुद्रुक येथील नागरिकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी शिवसेनेचे माजी आमदार महादेव बाबर यांच्या कार्यालयात रविवारी जनता दरबारचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी मंत्री शिवतारे यांच्यासह माजी आमदार महादेव बाबर, पीएमपीएल चे संचालक विजय देशमुख, नगरसेवक भरत चौधरी, संगीता ठोसर, शिवसेना जिल्हा उप्रमुख अमोल हरपळे, तानाजी लोणकर, राजेंद्र बाबर, महापालिकेचे उपायुक्त सुरेश जगताप, हडपसर सहायक आयुक्त कार्यालयाचे संजय गावडे, तसेच पालिकेचे इतर अधिकारी उपस्थित होते. या वेळी बाबर यांच्या कार्यालयाबाहेर मंत्री शिवतारे यांच्या हस्ते तक्रार पेटीचे उद्घाटन करण्यात आले.

प्रत्येक वस्तीमध्ये नागरिकांसाठी तक्रार पेटी बसवणार आहोत. नागरिकांचे प्रश्न त्यात टाकावेत. दर आठवड्याला ही तक्रार पेटी उघडून संबधित प्रश्नांवर प्रशासनाने काम करावे.

- महादेव बाबर, माजी आमदार

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अशुद्ध पाण्याच्या विक्रीला चाप

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, बारामती

बारामतीमध्ये विनापरवाना तसेच बीआयएसचे प्रमाणपत्र न घेता पाणी विक्रीचा व्यवसाय करणाऱ्या पाणी विक्रेत्यावर अन्न व औषध प्रशासनाने अखेर कारवाई केली. बारामती तालुक्यातील दोन पाणी प्रकल्पावर सार्वजनिक आरोग्याचा विचार करून ही कारवाई करण्यात आल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले. या दोन्ही प्रकल्पांना उत्पादन बंद करण्याचे आदेश दिले. यामध्ये अक्वा तेजस (मुरूम लाडोबामाळ, ता.बारामती), मोरया अक्वा (मोरगाव शिंदेवस्ती, ता. बारामती) याठिकाणी अशुद्ध पाण्याचा व्यवसाय चालविला जात होता. या संदर्भात 'मटा' वृत्त प्रसिद्ध केले होते. अन्न सुरक्षा अधिकारी यु. ता. ढेबरे यांनी छापा टाकून दोन्ही प्रकल्पांवर कारवाई केली.

या दोन्ही प्रकल्पांमध्ये विनापरवाना व्यवसाय सुरू असल्याचे आढळून आले. यासाठी अन्न सुरक्षा व मानद कायद्यांतर्गत बंधनकारक असलेले बीआयएसचे प्रमाणपत्रही त्यांनी घेतले नसल्याचे उघड झाल्याची माहिती अन्न व औषध प्रशासनाचे सहआयुक्त संजय नारागुडे यांनी दिली. यापुढेही विना परवाना व अशुद्ध पाणी विक्री करणाऱ्यांवर कारवाई सुरुच राहणार असल्याची माहिती त्यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

फुकट्या रेल्वे प्रवाशांचे प्रमाण दुपटीने वाढले

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

शाळा, कॉलेजांना लागलेल्या उन्हाळी सुट्यांमध्ये रेल्वेच्या प्रवाशांच्या दुपटीने वाढलेल्या संख्येबरोबरच फुकट्या प्रवाशांचे प्रमाणही वाढल्याचे रेल्वे प्रशासनाने केलेल्या कारवाईनंतर समोर आले. मध्य रेल्वेच्या पुणे विभागाने राबविलेल्या विशेष मोहिमेत विनातिकीट प्रवास करणाऱ्या चार हजार ८४३ जणांकडून ३१ लाख ७५ हजार ६३३ रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.

गर्दीचा फायदा घेऊन फुकट प्रवास करणाऱ्यांना चाप बसविण्यासाठी पुणे विभागाने २७ ते ३० एप्रिल दरम्यान ही विशेष मोहीम राबविली. विना तिकीट प्रवास, चुकीचे तिकीट, सोबत नियमापेक्षा जास्त बाळगलेल्या साहित्याचे तिकीट न काढणे, अशा विविध प्रकारच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या प्रवाशांकडून हा दंड वसूल करण्यात आला आहे, अशी माहिती रेल्वे प्रशासनाने दिली.

सुटीच्या हंगामात रेल्वेच्या प्रवाशांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढते. सर्व गाड्या खचाखच भरून जात असतात; तसेच गेल्या एप्रिल महिन्यात एका गाडीला सुमारे पाचशे ते हजार प्रवाशांना वेटिंगचे तिकीट देण्यात आले होते. या गर्दीचा फायदा घेऊन अनेक लोक विनातिकीट प्रवास करतात. हे यापूर्वीच रेल्वे प्रशासनाच्या निदर्शनास आले आहे. त्यामुळे गर्दीच्या हंगामात विशेष मोहीम राबविण्यात येते. विनातिकीट प्रवास करणे हा सामाजिक गुन्हा आहे. परिणामी सर्व प्रवाशांनी आपले आर्थिक नुकसान अथवा मानहानी टाळण्यासाठी योग्य तिकीट खरेदी करावे; तसेच तिकिटावर निश्चित केलेल्या अंतराएवढाच प्रवास करावा, असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले.

रेल्वेच्या उत्पन्नात वाढ करण्यासाठी आणि विनातिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांना रोखण्यासाठी वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक गौरव झा आणि विभागीय रेल्वे व्यवस्थापक सुनीत शर्मा यांच्या नेतृत्वाखाली भविष्यात विविध मोहिमा हाती घेतल्या जाणार आहेत.

- रेल्वे प्रशासन

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘डिफॉल्टर’ना येणार एसएमएस अन् ई-मेल

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

एम्प्लॉइज प्रॉव्हिडंट फंड ऑर्गनायझेशनकडून (ईपीएफओ) थकबाकीदारांचा (डिफॉल्टर) सतत पाठपुरावा करण्यात येणार आहे. त्यासाठी प्रॉव्हिडंट फंडाची (पीएफ) थकबाकी असणाऱ्या संस्था किंवा कंपन्यांना दर महिन्याला एसएमएस आणि ई मेल पाठविण्याचे धोरण 'ईपीएफओ'ने आखले आहे. कोणत्याही संस्था, कंपनीमध्ये २० आणि त्यापेक्षा जास्त कर्मचारी असल्यास कर्मचाऱ्यांना 'पीएफ' संरक्षण देण्याची सबंधित संस्थेची जबाबदारी असते. मात्र, डिफॉल्टरची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्याचा आढावा 'ईपीएफओ'च्या मुख्यालयाकडून घेण्यात आला आहे.

'ईपीएफओ'च्या प्रचलित पद्धतीनुसार डिफॉल्टरना नोटिसा देण्यात येतात. त्यानंतरही थकबाकी न भरल्यास मालमत्ता जप्ती ​किंवा बँकेतील खाते बंद करण्याची कारवाई केली जाते. ही कारवाई करण्यापूर्वी संबंधित डिफॉल्टर कंपन्यांना दर महिन्याला एसएमएस किंवा ई मेल पाठवून याबाबतची माहिती देण्याचे सुचविण्यात आले आहे. डिफॉल्टर कंपन्यांचे चालू स्थितीतील मोबाइल क्रमांक आणि ई मेल आयडी मिळवून त्यावरून माहिती पाठविण्याबाबतच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

टाउनशिपला राज्याचे प्राधान्य

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

'शेती ना विकास' व 'सार्वजनिक-निमसार्वजनिक' झोनमधील जमीन 'रहिवास' झोनमध्ये बदलण्याच्या प्रक्रियेत २५ हेक्टरवरील भूखंडावर टाउनशिप उभारण्यास राज्य सरकारकडून प्राधान्य देण्यात आले आहे. त्यामुळे १० ते २५ हेक्टरपर्यंतच्या भूखंडांच्या झोन बदलापर्यंतच विभागीय आयुक्तस्तरावरील समितीचे अधिकार सीमित करण्यात आले आहेत.

राज्यातील मंजूर प्रादेशिक योजनेतील भूखंड वापराच्या झोन बदलांचे अधिकार विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखालील सात सदस्यांच्या समितीकडे सोपविण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. वाढती लोकसंख्या, बेकायदा बांधकामे व विकासाच्या वर्धितवेगामुळे 'शेती ना विकास'सारखे झोन कालबाह्य ठरत आहेत. या झोनमध्ये आवश्यकतेनुसार महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगर रचना अधिनियम १९६६ च्या कलम २० (२) अन्वये झोनमध्ये बदल करता येतात. यापूर्वी हे अधिकार थेट राज्य सरकारकडे होते. मात्र, राज्य सरकारने झोन बदलाचे नवे धोरण तयार करून या अधिकारांचे विभागीय आयुक्तस्तरावर विकेंद्रीकरण केले आहे.

मंजूर प्रादेशिक योजनेतील झोन बदलाचे प्रस्ताव विभागीय स्तरावर स्थापन करण्यात आलेल्या 'प्रस्ताव छाननी समिती'कडे दाखल करावे लागणार आहेत. मात्र, या समितीला दहा हेक्टर ते २५ हेक्टरपर्यंतच्या भूखंडाचे झोन बदलाचे अधिकार देण्यात आले आहे. या भूखंडाचे (२५ ते ६२ एकर) निवासी झोनमध्ये बदल करून इमारती बांधता येणार आहेत. या भूखंडाचे तुकडे करून त्यावर इमारती बांधण्यास मुभा आहे; परंतु या आकाराच्या भूखंडापेक्षा अधिक मोठ्या भूखंडाचा झोन बदलून तो रहिवासामध्ये बदलण्याचा प्रस्ताव आल्यास तो टाउनशिपमध्ये रूपांतरीत होणे अपेक्षित आहे.

मंजुरीच्या अधिकाराबाबत दुमत

पुण्यासारख्या वेगाने वाढणाऱ्या शहराच्या सुनियोजित विकासासाठी मुंबईच्या धर्तीवर पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण स्थापन करण्यात आले आहे. शहर व ग्रामीण भागातील ३ हजार ५३५ चौरस किलोमीटर क्षेत्राचा या प्राधिकरणात समावेश करण्यात आला आहे. त्यात येणाऱ्या जमिनींचे बांधकाम आराखडे मंजूर करण्याचे अधिकार प्राधिकरणाला देण्यात आले आहेत; परंतु टाउनशिप मंजुरीचे अधिकार अद्याप जिल्हाधिकारी स्तरावरच आहेत. हे अधिकार प्राधिकरणाकडे द्यावेत की जिल्हाधिकाऱ्यांकडेच ठेवावेत यावर सरकारी पातळीवर अद्याप दुमत आहे.

झोन बदलाचे अधिकार

टाउनशिप उभारण्यासाठी स्वतंत्र नियामवली आहे. त्यामध्ये सुटसुटीत रस्ते, मोकळ्या जागा, उद्याने, शाळा अशा सर्वप्रकारच्या सोयी देणे सुकर होऊ शकते; तसेच आर्थिक उत्पन्न गटानुसार टाउनशिपमध्ये सर्वच स्तरावरील नागरिकांची त्यात निवासाची सोय होऊ शकते. या उद्देशानेच विभागीय आयुक्तांच्या समितीला पंचवीस हेक्टरपर्यंत झोन बदलाचे अधिकार देण्यात आल्याचे नगर विकास विभागातील सूत्रांकडून सांगण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images