Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

रॅगिंगचा विषय गाजण्याची चिन्हे

$
0
0

योगेश बोराटे, पुणे

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडे यंदाच्या शैक्षणिक वर्षामध्ये रॅगिंगविषयीच्या एकूण चार तक्रारी झाल्याची धक्कादायक माहिती आता समोर येत आहे. त्यापैकी तीन तक्रारी कॉलेज पातळीवरून मागे घेण्यात आल्या, तर एका तक्रारीविषयी कॉलेज पातळीवर कारवाई झाल्याची माहिती विद्यापीठाकडूनच देण्यात आली आहे. रॅगिंगच्या या सर्व तक्रारींवरील कारवाई लालफितीच्या कारभारातच अडकून पडल्याने पीडितांना न्याय मिळणार तरी कधी, असा सवाल उपस्थित केला जात आहे.

एमआयटी इंजिनीअरिंग कॉलेजमध्ये विद्यार्थ्यावर झालेल्या रॅगिंगच्या प्रकारानंतर विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रातील रॅगिंगच्या प्रकारांविषयी चौकशी सुरू झाली होती. 'एमआयटी'मधील रॅगिंगविषयी कॉलेज प्रशासनापाठोपाठ विद्यापीठाच्या विद्यार्थी कल्याण विभागानेही वेळेत कार्यवाही न केल्याने थेट संसदेमध्येही त्या विषयीचा प्रश्न उपस्थित करण्यात आला होता. त्यानंतर कॉलेजने रॅगिंग करणाऱ्या विद्यार्थ्यांवर कारवाईचे संकेत दिले होते. त्या पार्श्वभूमीवर विद्यापीठाच्या येत्या शनिवारी होणाऱ्या सिनेटमध्येही प्रश्न उपस्थित होणार असल्याने, यंदाची सिनेट चांगलीच गाजणार असल्याचे समोर येत आहे.

सिनेट सदस्य आणि विद्यार्थी प्रतिनिधी मयूर हिवाळे याने याविषयी उपस्थित केलेल्या प्रश्नाला उत्तर देताना विद्यापीठाने रॅगिंगच्या चार तक्रारी नोंदविण्यात आल्याची माहिती दिली आहे. या तक्रारींबाबत नेमकी काय कार्यवाही केली, या प्रश्नाला उत्तर देताना विद्यापीठ प्रशासनाने रॅगिंगविरोधी कायद्यातील तरतुदींनुसार संबंधित कॉलेजांना कारवाई करण्याचे आदेश दिल्याचे सांगण्यात आले आहे. त्यासाठी विद्यापीठाने वेळेत कार्यवाही केल्याचेही प्रशासनाने लेखी दिले आहे.

बैठकीत दाद मागणार

विद्यापीठ एकीकडे सर्व कार्यवाही वेळेत केल्याचे सांगत असले, तरी 'एमआयटी'मधील रॅगिंगच्या प्रकाराविरोधात विद्यापीठाने वेळीच पावले न उचलल्यानेच विद्यापीठाविरोधात थेट संसदेत प्रश्न उपस्थित झाला. हे वास्तव समोर असतानाही विद्यापीठाने पुन्हा एकदा चुकीची माहिती लिखित स्वरूपामध्ये दिल्याचे मयूरने सांगितले. विद्यार्थी प्रतिनिधी म्हणून या प्रकाराविरोधात सिनेटच्या बैठकीमध्येच दाद मागणार असल्याचेही मयूरने नमूद केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


सलग दुसऱ्या दिवशी हजेरी

$
0
0

पुणे : शहर आणि परिसरात सलग दुसऱ्या दिवशी मेघगर्जनेसह पावसाने हजेरी लावली. शहराच्या मध्यवर्ती भागापेक्षा उपनगरांमध्ये पावसाचा जोर अधिक होता. आजही (गुरुवारी) शहरात काही ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. तर राज्यात मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जना व गारांसह पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.

राज्यात गुरुवारी तुरळक ठिकाणी पाऊस झाला. सायंकाळी साडेपाचपर्यंत अकोला येथे ०.२ मिलिमीटर पाऊस झाला. अन्यत्र तुरळक सरींनी हजेरी लावली. लक्षद्वीप ते राजस्थानच्या आग्नेय भागादरम्यान कमी दाबाचा पट्टा सक्रीय आहे. तर बंगालच्या उपसागराच्या नैऋत्य भागावरही कमी दाबाचा पट्टा कायम आहे. पूर्वेकडून वाहणारे बाष्पयुक्त वारे आणि उत्तरेकडून वाहणारे थंड व कोरडे वारे यांच्या संयोगामुळे राज्यासह काही ठिकाणी पाऊस होत आहे.

पुण्यात बुधवारी दुपारपासूनच ढगाळ वातावरण होते. दुपारी साडेपाचच्या दरम्यान उपनगरांमध्ये काही मध्यम स्वरूपाच्या सरी कोसळल्या. सहाच्या दरम्यान मध्यवर्ती भागात हलकासा शिडकावा झाला. उपनगरांमध्ये पावसाचा जोर अधिक असल्याने काही ठिकाणी पाणी साचले होते. राज्यातही काही ठिकाणी तुरळक स्वरूपाचा पाऊस झाला. आज गुरुवारी पुण्यात काही ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे. तर राज्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह गारांच्या पावसाची शक्यता आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

काटकसरीची भूमिका बदलणार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

सभा-समारंभ, कार्यक्रमांमधून एरवी निधीची उधळपट्टी केली जात असली, तरी जुनी प्रमाणपत्रे नवीन नावाचे शिक्के मारून देण्याचा कारभार काटकसर करण्यासाठी केला असल्याचे स्पष्ट झाले आहे. यापुढील काळात मात्र ही काटकसरी भूमिका बदलण्याचे संकेत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून देण्यात आले.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या नुकत्याच झालेल्या पदवीप्रदान सोहळ्यापूर्वी ८५ हजार प्रमाणपत्रे चुकल्याचे उघड झाल्यानंतर विद्यापीठाला ऐनवेळी सर्व प्रमाणपत्रे नव्याने छापावी लागली होती. ऐनवेळी छापलेल्या या प्रमाणपत्रांच्या कागदाच्या सुमार दर्जामुळे विद्यार्थी, पालक आणि प्राध्यापक मंडळींनीही नाराजी व्यक्त केली होती. या गोंधळामध्ये विद्यापीठाने ऐनवेळी घेतलेल्या निर्णयामुळे विद्यापीठाला जवळपास एक कोटी रुपयांहून अधिक भुर्दंड सहन करावा लागला. एकीकडे हा खर्च समोरच असताना दुसरीकडे जुन्या प्रमाणपत्रांबाबत काटकसर करत विद्यापीठ ती विद्यार्थ्यांना देत असल्याचे 'मटा'ने मंगळवारी उघड केले. त्याविषयीची वस्तुस्थिती जाणून घेताना विद्यापीठाच्या अधिकाऱ्यांनीच त्या विषयीची माहिती दिली.

विद्यापीठाच्या नामविस्तारानंतरच्या पातळीवर छापील स्टेशनरीविषयी झालेल्या निर्णयांमुळेच यंदा विद्यार्थ्यांना जुन्या नावाने छापलेली मात्र नव्या नावाचा शिक्का मारलेली प्रमाणपत्रे दिल्याचे विद्यापीठाचे परीक्षा नियंत्रक डॉ. अशोक चव्हाण यांनी 'मटा'ला सांगितले. 'वास्तविक विद्यार्थ्यांना नव्या नावाची छापील प्रमाणपत्रेच वितरित होणे रास्त ठरणार आहे. त्यामुळेच यापुढील काळात विभागामार्फत दिली जाणारी सर्वच प्रमाणपत्रे नव्याने तयार करून घेतली जातील. त्यासाठी कुलगुरू आणि विद्यापीठाच्या अधिकार मंडळातील अधिकाऱ्यांकडून योग्य ती परवानगी घेऊन काम सुरू केले जाईल,' अशी माहिती डॉ. चव्हाण यांनी दिली. गुणपत्रके, रँक सर्टिफिकेट, लँग्वेज सर्टिफिकेट आणि पदवी प्रमाणपत्रांचा यामध्ये समावेश असेल. या दरम्यानच्या काळात विद्यार्थ्यांना दिलेली जुनी प्रमाणपत्रे विद्यार्थ्यांच्या आवश्यकतेनुसार बदलून देण्यासाठीही पावले उचलणार असल्याचे त्यांनी नमूद केले.

नव्या नावाची छापील प्रमाणपत्रेच वितरित होणे रास्त ठरणार आहे. त्यामुळेच यापुढील काळात विभागामार्फत दिली जाणारी सर्वच प्रमाणपत्रे नव्याने तयार करून घेतली जातील. त्यासाठी कुलगुरू आणि विद्यापीठाच्या अधिकार मंडळातील अधिकाऱ्यांकडून योग्य ती परवानगी घेऊन काम सुरू केले जाईल.

- डॉ. अशोक चव्हाण, परीक्षा नियंत्रक, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तीन-चार महिन्यांत मेट्रो मार्गी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

'पुणे व पिंपरी-चिंचवडमधील दोन्ही मेट्रो मार्गिकांना केंद्र सरकारकडून मान्यता घेण्यात येईल आणि दोन्ही मार्गिकांचे काम येत्या तीन ते चार महिन्यांत मार्गी लावण्यात येईल,' अशी हमी राज्य सरकारने बुधवारी विधान परिषदेत दिली. दरम्यान, या विषयावरून गेले काही दिवस सुरू असलेल्या घोळावरून विरोधी पक्षाच्या सदस्यांनी सरकारला धारेवर धरले.

अनंत गाडगीळ यांनी मेट्रो प्रकल्पासंदर्भात लक्षवेधी सूचना मांडली होती. त्यावरील चर्चेत दीप्ती चवधरी, शरद रणपिसे आणि जयदेव गायकवाड या सदस्यांनीही भाग घेतला. त्यावर, 'पालकमंत्री गिरीश बापट यांच्या अध्यक्षतेखालील समिती एका महिन्यात अहवाल देणार आहे. त्यानंतर तीन ते चार महिन्यांत दोन्ही मार्गिकांचे काम मार्गी लावू,' असे आश्वासन नगरविकास राज्यमंत्री रणजित पाटील यांनी दिले. 'मेट्रोच्या मार्गावर चार एफएसआय देण्याच्या मुद्द्यावरून संभ्रम आहे, तसेच मेट्रोचे काम सुरू झाल्यावर वाहतुकीच्या कोंडीने नागरिकांना त्रास होणार असल्याने पर्यायी वाहतूक आराखडा तयार केला आहे का,' असा प्रश्न गाडगीळ यांनी विचारला.

दरम्यान, 'एकदा राज्य सरकारने मान्यता देऊन केंद्राकडे अहवाल पाठवल्यानंतर पुन्हा विचार करण्याची काय गरज आहे,' असा प्रश्न चवधरी यांनी विचारला आणि 'केंद्राकडून या प्रकल्पास मान्यता आणण्याची सरकारची मानसिकता आहे का,' असाही टोला त्यांनी लगावला. 'नागपूरपूर्वी पुण्याच्या मेट्रोचा डीपीआर तयार असताना आधी नागपूरला मान्यता दिली, त्यामुळे सरकार पुणेकरांची दिशाभूल करत आहे,' असा आरोप त्यांनी केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे नागपूरचे असल्यानेच पुणे मेट्रोचा विषय बाजूला राहिल्याची टीका त्यांनी केली.

भारतीय जनता पक्षातील अंतर्गत वादामुळे पुणे मेट्रोच्या अंमलबजावणीस विरोध होत असल्याची टीका रणपिसे यांनी केली, तेव्हा पालकमंत्री बापट यांनी 'तशी परिस्थिती नाही,' असे स्पष्टीकरण दिले. तसेच, 'दिल्ली मेट्रोने तयार केलेल्या 'डीपीआर'नुसार मेट्रो करणार की नाही,' असेही रणपिसे यांनी विचारले.

समितीवर टीकास्त्र

वनाज ते रामवाडी या मार्गासंदर्भात पालकमंत्री गिरीश बापट यांच्या अध्यक्षतेखाली नियुक्त केलेल्या समितीवरही सदस्यांनी टीकास्त्र सोडले. 'जे कधी रिक्षातही बसले नाहीत, ज्यांनी मेट्रोने प्रवास केला नाही, असे सदस्य पुणे मेट्रोचे भवितव्य कसे आणि काय ठरवणार,' असा सवाल अनंत गाडगीळ यांनी विचारला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘बेकायदा होर्डिंगवर कारवाई करा’

$
0
0

पुणे : शहरातील विविध भागात बेकायदा पद्धतीने उभारण्यात आलेल्या होर्डिंग आणि जाहिरातफलकांवर पालिका प्रशासन कारवाई करत नसल्याचा मुद्दा स्थायी समितीच्या बैठकीत बुधवारी जोरदार चर्चेला आला. पालिका प्रशासनाच्या मनमानी कारभारामुळे पालिकेचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान होत असून, अधिकारी होर्डिंगधारकांना पाठीशी घालत असल्याचा आरोप करण्यात आला. सभासदांनी प्रश्न उपस्थित करत प्रशासनाला धारेवर धरल्यानंतर बेकायदा होर्डिंगवर कारवाई करून त्याचा सविस्तर अहवाल पुढील बैठकीत ठेवण्याचे आदेश स्थायी समितीने प्रशासनाला दिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गुंड अजय शिंदेवर गोळीबार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

गुंड अजय शिंदेवर बुधवारी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास गोळीबार करण्यात आला. कुख्यात गुन्हेगार कुणाल पोळ याच्या खुनाचा बदला घेण्यासाठी हा हल्ला करण्यात आल्याचे पोलिसांच्या तपासात निष्पन्न झाले. हल्ल्यात शिंदेची पत्नी मेघना धंदुके (वय २८, रा. कस्तुरे चौक, रविवार पेठ) जखमी झाली असून, तिला खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. गोळीबाराच्या घटनेनंतर पोलिसांनी पाठलाग करून एकाला अटक केली आहे. नवनाथ लोधा, असे त्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी लोधासह आप्पा बाणेकर, अपूर्वा कसबे, सागर बागल, सोन्या गंगावणे या पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अजय शिंदे पोलिस वसाहतीमधील पोलिसाचा मुलगा आहे. तो सराईत गुन्हेगार असून, खडक आणि परिसरात त्याची दहशत आहे. जमीन खरेदी विक्रीच्या व्यवसायात तो सक्रीय आहे. शिंदेची पत्नी मेघना ही रविवार पेठेतील हिरालाल ज्वेलर्सजवळ असलेल्या विश्वेश्वर बँकेजवळ राहते. अजय शिंदे आणि मेघना बुधवारी संध्याकाळी कारमधून रविवार पेठेतील घरी आले होते. कारमधून उतरून रस्ता ओलांडून इमारतीमध्ये जाताना त्यांच्या मागावर असलेल्या आरोपींनी शिंदेवर गोळीबार केला. परंतु, तो जमिनीवर झोपल्यामुळे वाचला. आरोपींनी दुसऱ्यांदा केलेल्या गोळीबारात मेघना जखमी झाली. तिच्या पोटामध्ये गोळी लागली. गोळीबाराचा आवाज ऐकून मेघनाचा भाऊ खाली पळाला. तेव्हा आरोपी कारमध्ये बसून पसार झाले होते. पोलिस नियंत्रण कक्षाला हा प्रकार कळविण्यात आला.

खडक पोलिस स्टेशनच्या बीट मार्शलवर असलेले पोलिस कर्मचारी कमलेश बाबर आणि सुमित यादव यांनी घटनास्थळी धाव घेतली. आरोपी कारमधून पसार झाल्याचे समजल्यावर त्यांनी पाठलाग सुरू केला. पोलिसांनी जवळपास आठ किलोमीटरपर्यंत पाठलाग करून शंकरशेठ रस्त्यावर लोधा याला पकडले, तर इतर चार आरोपी पसार झाले. आरोपींची कार पोलिसांनी ताब्यात घेतली आहे. घटनेची माहिती मिळताच गुन्हे शाखेचे सहायक आयुक्त राजेंद्र भामरे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक रघुनाथ फुगे, अनिल पाटील, मिलींद गायकवाड, शशीकांत चव्हाण, ज्ञानेश्वर भोसले, सहायक निरीक्षक महेंद्र जाॊधव, राजन जगदाळे, उपनिरीक्षक अकिल शेख आदींनी भेट दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पुण्यात आणखी तिघांचा बळी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

'स्वाइन फ्लू'च्या संसर्गाने पुण्यातील हॉस्पिटलमध्ये आणखी तिघांचा मृत्यू झाल्याची नोंद आरोग्य विभागाने केली आहे. त्यामुळे संसर्गाने दगावणाऱ्यांची संख्या ५० झाली आहे. नव्याने २१ जणांना पुण्यात लागण झाली आहे, तर आणखी २० जण व्हेंटिलेटरवर आहेत. राज्यात १४ जणांचा मृत्यू झाला असून, एकूण मृतांची संख्या २३५ वर पोहोचली आहे.

कादरी नसिम रौफ (वय ५०, रा. परंडा, जि. उस्मानाबाद) असे दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्ये मृत्यू पावलेल्या महिलेचे नाव आहे. या महिलेला लागण झाल्याचे २६ फेब्रुवारीला राष्ट्रीय विषाणू संस्थेने (एनआयव्ही) निदान केले. त्यानंतर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. मंगळवारी रात्री त्यांचा मृत्यू झाला. राजेश जगन्नाथ कदम (वय ४३, रा. पुणे सातारा रस्ता) असे रुबी हॉस्पिटलमध्ये दगावलेल्या पेशंटचे नाव आहे. 'स्वाइन फ्लू'ची लागण झाल्याचे नऊ मार्चला निदान झाले. लक्षणे दिसूनही कदम यांनी उपचार घेण्यास चार दिवस उशीर केला होता. परंतु, किडनीविकारासह रक्तवाहिन्यांचा विकार बळावल्याने त्यांचा बुधवारी पहाटे साडेचार वाजण्याच्या सुमारास मृत्यू झाला.

राज्यात ४३ जण व्हेंटिलेटरवर

दरम्यान, 'स्वाइन फ्लू'चे राज्यात नव्याने १८७ पेशंट आढळले आहेत. त्यामुळे पेशंटची राज्यातील संख्या २८९० वर पोहोचली आहे. आजपर्यंत राज्यात २३५ जणांचा मृत्यू झाला आहे. त्यापैकी तेरा जण मध्य प्रदेशातील तसेच तीन जण गुजरातमधील आहेत. राज्यातील विविध जिल्ह्यांत ४५२ जणांना हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आले आहे. त्यापैकी ४३ जण व्हेंटिलेटरवर आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बैलगाडा मालकांचे आळंदीत उपोषण

$
0
0

पिंपरीः बैलगाडा शर्यतींवर घालण्यात आलेली बंदी उठविण्यासाठी, त्याचप्रमाणे कायद्यात बदल करून बैलांचे प्रदर्शन व शर्यती पुन्हा चालू केल्या जाव्यात, या मागणीसाठी अखिल भारतीय बैलगाडा शर्यत संघटनेच्या वतीने शुक्रवारी (१३ मार्च) आळंदीमध्ये एक दिवसीय लाक्षणिक उपोषण करण्यात येणार आहेत. संघटनेच्या वतीने पत्रकार परिषदेत ही माहिती देण्यात आली.

या वेळी अण्णासाहेब भेगडे, नितीन शेवाळे, संदीप बोदगे, रामकृष्ण टाकळकर, नवनाथ होले, आबा मोरे, आप्पा वायकर, सुदाम मुऱ्हे, विलास भुजबळ, महेश शेवकरी, संदीप सांडभोर आदी उपस्थित होते. केंद्र सरकारच्या वन व पर्यावरण मंत्रालयाने प्राणी छळ प्रतिबंधक कायदा १९६० च्या कलम २२(२)नुसार अधिसूचना काढून बैल या पाळीव प्राण्याचा समावेश राजपत्रामध्ये केला आहे. याच कायद्याच्या आधारे ७ मे २०१४ रोजी सर्वोच्च न्यायालयाने बैलांच्या शर्यतीवर बंदी घातली आहे.राज्यात १४ ते १५ हजार नोंदणीकृत बैलगाडा मालक आहेत. सरकारने बैलांचे प्रदर्शन व शर्यती काही नियम व अटी घालून पुन्हा चालू कराव्यात, या मागणीसाठी आळंदीमध्ये इंद्रायणी नदीच्या घाटावर उपोषण करण्यात येत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


सात-बारा कम्प्युटराइज्ड

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

नागरिकांना ऑनलाइन सात-बारा उतारा देण्याच्या महत्त्वाकांक्षी योजनेची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. जिल्ह्यातील पंधरा लाखांहून अधिक सात-बारा उतारे कम्प्युटराइज्ड करण्यात आले आहेत. येत्या एक एप्रिलपासून संपूर्ण जिल्ह्यात ऑनलाइन सात-बारा उतारे मिळणार आहेत. त्यामुळे सात-बारा मिळविणे आणि खरेदीविक्री व्यवहारानंतरच्या फेरफारांची प्रक्रियाही सुलभ होणार आहे.

उपजिल्हाधिकारी रामदास जगताप यांनी बुधवारी ही माहिती दिली. लाखो नागरिकांना आवश्यक असलेला सात-बाराचा उतारा ऑनलाइन देण्याच्या योजनेची तयारी गेले अनेक दिवस सुरू आहे. त्यामध्ये जिल्ह्यातील दहा तालुक्यांमध्ये सात-बारा उतारे कम्प्युटराइज्ड करण्यात आले आहेत. हवेली आणि इंदापूर तालुक्यातील कम्प्युटरायझेशनचे काम येत्या सोमवारपर्यंत पूर्ण होणार आहे. त्यानंतर पंधरा दिवस प्रायोगिक तत्त्वावर हे कामकाज सुरू होईल आणि एक एप्रिलपासून नागरिकांना ऑनलाइन सात-बारा उतारे मिळू लागतील, असे त्यांनी सांगितले.

नागरिकांना सात-बारा उतारा सहजी उपलब्ध व्हावा, त्यातील त्रुटी दूर व्हाव्यात आणि हस्तलिखित सात-बारा बंद व्हावा, यासाठी सरकारतर्फे तलाठी दप्तराचे कम्प्युटरायझेशन करून इ चावडी सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आलेला होता. त्यानंतर जिल्ह्यातील तलाठी दप्तरे युनिकोडमध्ये उपलब्ध करून देण्यात आली. आतापर्यंत जिल्ह्यात १५ लाख २६ हजार सात-बारा उतारे कम्प्युटराइज्ड करण्यात आलेले आहेत. या तलाठी दप्तरांमध्ये सव्वाचार कोटी त्रुटी दुरुस्त करण्यात आलेल्या आहेत.

दरम्यान, लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकांच्या कामांमुळे गेले काही महिने या कामाचा वेग मंदावलेला होता. मात्र, डिसेंबरमध्ये हे काम वेगाने करण्यात यावे याबाबतचा आदेश सरकारने दिला. या ऑनलाइन सुविधेमुळे दुय्यम निबंधकांच्या कार्यालयात खरेदीच्या दस्ताची नोंद झाल्यावर त्याची माहिती तातडीने तहसील कार्यालयांतील म्युटेशन सेलना मिळणार आहे. त्या माहितीवर आधारीत फेरफार उतारा तातडीने तयार होणार आहे.

दस्तनोंदणीच्या वेळेस विकणारे आणि खरेदीदार दोघेही उपस्थित असतील, तर सातबारावरील नोंदीसाठी नोटीस काढण्यात येणार नाही, तर फक्त संबंधित गावांत चावडीवर नोटीस लावण्यात येणार आहे. त्यानंतर पंधरा दिवसांत त्यावर हरकत न आल्यास ऑनलाइन सातबारा फेरफारांसह उपलब्ध करण्यात येणार आहे. यासोबतच दस्तनोंदणीला हजर राहिलेल्यांना नोटीस न काढण्यासाठी महसूल अधिनियमाच्या कलम १५० (२) मध्येही बदल करण्यात आलेला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

१ लाख ३० हजार लसींची विक्री

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

पुण्यासह राज्यात 'स्वाइन फ्लू'चा प्रादुर्भाव वाढत असल्याने बहुप्रतिक्षित प्रतिबंधात्मक सीरम इन्स्टिट्यूट निर्मित नाकाद्वारे घेण्यात येणाऱ्या एक लाख तीस हजार एवढ्या लसींची विक्री बाजारात झाली. 'ट्राय व्हॅक्सिन' असलेल्या लसीची आणखी तिसरी बॅचमधील लस चार दिवसांत बाजारात उपलब्ध होणार आहे.

पुण्यासह देशात २००९ मध्ये 'स्वाइन फ्लू'ने थैमान घातले होते. त्यावेळी विषाणूंना प्रतिबंध करण्यासाठी सीरम इन्स्टिट्यूटने विकसित केलेल्या लसीची मात्रा फायदेशीर ठरली. त्यामुळे जानेवारीपासून संसर्ग वाढल्याने या लसीची प्रतिक्षा करण्यात येऊ लागली. तसेच सीरमकडे लसीची विविध स्तरांतून मागणी होऊ लागली. त्या पार्श्वभूमीवर सीरम इन्स्टिट्यूटने 'स्वाइन फ्लू' (एच१एन१), 'सिझनल फ्लू' (एच३एन२) आणि 'टाइप बी' यासारख्या विषाणूंची 'ट्राय व्हॅक्सिन' लसीचे उत्पादन तीन बॅचमध्ये घेण्यात आले.

यासंदर्भात अन्न व औषध प्रशासनाचे (एफडीए) सहायक आयुक्त एस. एस. मोहिते यांनी माहिती दिली. ''सीरम इन्स्टिट्यूटने ६५ हजार लसींची पहिली बॅच बाजारात सोमवारी आणली. लसीला मागणी असल्याने हातोहात त्याची विक्री झाली. तर आणखी दुसऱ्या बॅचमधील ६५ हजार लसींचे उत्पादन घेण्यात आले. या 'ट्राय व्हॅक्सिन' लस बाजारात विकण्यात आल्या आहेत. सीरमची आणखी तिसरी बॅच येत्या तीन ते चार दिवसांत बाजारात उपलब्ध होईल. त्यानंतर त्याचीही विक्री केली जाईल,' अशी माहिती सहायक आयुक्त मोहिते यांनी दिली.

देशातील 'स्वाइन फ्लू'ची परिस्थिती चिंताजनक होत असल्याने केंद्रीय औषध नियंत्रण यंत्रणेमार्फत (डीसीजीआय) 'नॅशनल कंट्रोल लॅब'वर (एनसीएल) दबाव आला असावा. त्यामुळे त्यांनी तातडीने ही लस बाजारात आणण्याची परवानगी दिली. त्यामुळे सोमवारी आणि बुधवारी अशा दोन दिवसांत एक लाख ३० हजार 'ट्राय व्हॅक्सिन' लस बाजारात उपलब्ध करण्यात आल्या आहेत.

- डॉ. सुरेश जाधव, कार्यकारी संचालक, सीरम इन्स्टिट्यूट

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘मॉर्निंग वॉक’ टाळा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

एकीकडे व्यायाम करण्याबरोबरच रोज सकाळी फिरण्याचा सल्ला वैद्यकीय तज्ज्ञ देत असतात. मात्र 'स्वाइन फ्लू'च्या परिस्थितीमुळे सकाळी 'मॉर्निंग वॉक' करणे टाळा, असा सल्ला राज्याचे आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी दिला आहे.

राज्यातील 'स्वाइन फ्लू'च्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी पुण्यात आरोग्यमंत्र्यांनी बैठक बोलाविली होती. त्या बैठकीनंतर आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी 'स्वाइन फ्लू'संदर्भात भाष्य केले. या वेळी अतिरिक्त जिल्हाधिकारी प्रदीप पाटील, आरोग्य विभागाचे पुणे परिमंडळाचे उपसंचालक डॉ. एच. एच. चव्हाण, ससून हॉस्पिटलचे अधिष्ठाता डॉ. अजय चंदनवाले, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एस. एस. साठे, अन्न व औषध प्रशासनाचे सहायक आयुक्त एस. एस. मोहिते बैठकीला उपस्थित होते.

'राज्यात 'स्वाइन फ्लू'ची पुणे, मुंबई, नागपूर भागात परिस्थिती आहे. थंडी आणि अवकाळी पावसामुळे आम्ही 'स्वाइन फ्लू'च्या परिस्थितीबाबत चिंता आहे. सकाळी धुके खालच्या पातळीवर येत असल्याने विषाणूंचा संसर्ग वाढण्याचा धोका आहे. त्यामुळे सकाळी फिरायला जाणाऱ्या नागरिकांनी 'मॉर्निंग वॉक' ला जाऊ नये,' असा सल्ला देताना नागरिकांनी गर्दी टाळावी, असेही आवाहन आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी केले.

राज्यातील काही शाळांतील शालेय विद्यार्थ्यांनी 'मास्क'

लावण्यास सुरुवात केली आहे. ही बाब चांगली आहे. राज्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये आता 'स्वाइन फ्लू'चे पेशंट आढळले नाहीत. त्यामुळे आरोग्य केंद्रावर आम्ही लक्ष केंद्रित करीत आहोत, अशीही माहिती आरोग्यमंत्र्यांनी या वेळी दिली.

दोन दिवसांत घोषणा

मोफत उपचारांसंदर्भात आरोग्यमंत्री डॉ. सावंत यांना विचारले असता ते म्हणाले, 'सध्या अधिवेशन सुरू आहे. अधिवेशनाबाहेर मला घोषणा करता येणार नाही. 'स्वाइन फ्लू'च्या रुग्णांना मोफत उपचार देण्यासंदर्भात येत्या दोन दिवसांत सविस्तर निर्णय अधिवेशनात जाहीर केला जाईल. गरीब रुग्णांना वाऱ्यावर सोडणार नाही. हे सरकार सामान्यांना मदत देणारे आहे.'

स्वाइन फ्लूची लक्षणे दिसताच निदान होण्याची वाट पाहू नका. लक्षणे दिसताच एका दिवसात 'टॅमी फ्लू'सारखे उपचार घेण्यास सुरुवात करा. केमिस्टकडे जाऊन साधी औषधे घेऊ नका. सध्याची परिस्थिती हा तर स्वाइन फ्लूचा उद्रेकच आहे.

- डॉ. दीपक सावंत, आरोग्यमंत्री

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘टॅमी फ्लू’साठी वणवण

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

स्वाइन फ्लूमुळे दहा तासांतच तब्बल नऊ बळी जाण्याइतकी गंभीर परिस्थिती उभी राहिली असताना त्यावरील 'टॅमी फ्लू'औषध मिळविण्यासाठी हजारो रुग्णांना शहरात वणवण करावी लागत आहे. शहराच्या विविध भागांमधील महापालिकेच्या दवाखान्यांमध्ये या गोळ्या मिळत नसल्याने तापाने फणफणलेल्या रुग्णांना नायडू हॉस्पिलटची वाट धरून तेथे तासनतास ताटकळण्याची वेळ आली आहे. तेथेही अनेकांना गोळ्या मिळत नसल्याची तक्रार करण्यात येत आहे.

एकीकडे महापालिका प्रशासन टॅमी फ्लूचा पुरेसा साठा उपलब्ध असल्याचा दावा करीत असले, तरी खासगी डॉक्टरांनी दिलेल्या प्रिस्क्रिप्शन्सवर या गोळ्या महापालिकेच्या दवाखान्यांमधून उपलब्धच होत नसल्याचे आढळून आल्याने पेशंट आणि त्यांच्या कुटुंबीयांची परवड होत आहे, अखेरीस खासगी केमिस्टकडून पाचशे रुपयांना गोळ्यांची स्ट्रीप खरेदी करावी लागत आहे. त्यामुळे स्वाइन फ्लूच्या रुग्णांवर मोफत उपचार करण्याचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा दावाही फोल ठरला आहे. यापूर्वी स्वाइन फ्लूची साथ आली, त्यावेळी महापालिकेच्या सर्व दवाखान्यांमध्ये टॅमी फ्लू उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या. खासगी डॉक्टरांनी स्वाइन फ्लूची लक्षणे दिसून आलेल्या रुग्णांना प्रिस्क्रिप्शन दिल्यावर या गोळ्या रुग्णांना उपलब्ध करून देण्यात येत होत्या. मात्र, गेल्या काही दिवसांत स्वाइन फ्लूची साथ पुन्हा उफाळून आली आहे. मंगळवारी एका दिवसातच पुणे व पिंपरी-चिंचवडमध्ये यामुळे तब्बल नऊ बळी गेले. इतकी गंभीर परिस्थिती उद्भवली असताना महापालिकेने टॅमी फ्लूच्या औषधाचे रेशऩिंग सुरू केल्याने रुग्ण व नातेवाईकांनी संताप व्यक्त केला.

कोथरूड परिसरात हेच चित्र दिसून आले. परिसरातील डॉक्टरांकडे थंडीतापाच्या रुग्णांची संख्या प्रचंड वाढली आहे. त्यांची तपासणी केल्यावर स्वाइन फ्लूची लक्षणे दिसल्यास डॉक्टर त्यांना टॅमी फ्लूचे प्रिस्क्रिप्शन देतात. मात्र, या भागातील सुतार दवाखान्यात या गोळ्या उपलब्ध नाहीत. त्यामुळे पेशंट्सना आजारी अवस्थेत शहरभराचा वळसा घेऊन नायडू हॉस्पिटलची वाट धरावी लागत आहे. तेथेही अनेक रुग्णांना गोळ्या मिळत नसल्याची तक्रार आहे. शहरातील सर्वच भागांमध्ये ही परिस्थिती आहे. त्यामुळे शहरातील विविध ठिकाणी असलेल्या महापालिकेच्या दवाखान्यांमध्ये या गोळ्या उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी आहे.

टॅमी फ्लूच्या गोळ्यांच पुरेसा साठा उपलब्ध आहे. या गोळ्या महापालिकेच्या नायडू हॉस्पिटलमध्ये पेशंट्सना उपलब्ध करून देण्यात येत आहे.

- डॉ. एस. टी. परदेशी, आरोग्यप्रमुख, पुणे महापालिका

सध्या स्वाइन फ्लूची लक्षणे दिसल्यावर टॅमी फ्लू देण्यात येते. या गोळ्यांचे रिझल्ट्स चांगले आहेत. परंतु, रुग्णांना औषध वेळेत मिळणे आवश्यक आहे, अन्यथा गोळ्यांचा कोर्स सुरू होण्यास विलंब झाल्यास आजाराचे गांभीर्य वाढते. त्यामुळे या गोळ्या वेळेत व मुबलक उपलब्ध कराव्यात.

- डॉ. हेमंत मांजरेकर, फिजिशीयन, दीनानाथ हॉस्पिटल

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘पुणे मेट्रो’ यार्डातून बाहेर

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

प्रस्तावित पुणे मेट्रोच्या वनाज ते रामवाडी मार्गाबद्दल समिती सदस्यांनी केलेल्या सूचना पालिका आयुक्तांमार्फत दिल्ली मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनला (डीएमआरसी) सादर करण्यात येणार असून, त्यांनी पंधरा दिवसांत त्याबद्दलचा अहवाल द्यावा, असे निर्देश देण्यात आले आहेत. हा अहवाल सादर झाल्यावर समितीतर्फे अंतिम निर्णय घेण्यात येऊन तो सरकारच्या मान्यतेसाठी सादर केला जाणार आहे.

पुणे मेट्रोच्या वनाज ते रामवाडी या मार्गाबद्दल स्वयंसेवी संस्था व नागरिकांनी आक्षेप घेतल्याने त्यावर पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली तज्ज्ञ समिती नियुक्त करण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी घेतला होता. गिरीश बापट यांच्या अध्यक्षतेखाली या समितीची पहिली बैठक बुधवारी मुंबईत झाली. त्यात समिती सदस्यांनी केलेल्या विविध सूचना आयुक्तांमार्फत 'डीएमआरसी'कडे पाठवण्यात येणार असून, त्यानुसार 'डीएमआरसी'ने त्याबाबतचा व्यवहार्यता अहवाल सादर करावा, अशा सूचना करण्यात आल्या आहेत.

वनाज ते रामवाडी मेट्रोचा मार्ग भुयारी असावा, अशा सूचना स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी आणि बैठकीला उपस्थित असलेल्या लोकप्रतिनिधींकडून केल्या गेल्या. डीएमआरसी आणि नगरविकास विभागाच्या अधिकाऱ्यांसह या क्षेत्रातील तज्ज्ञांनी सध्याच्या प्रकल्प आराखड्यानुसार (डीपीआर) मेट्रो करणेच व्यवहार्य आणि फायदेशीर ठरणार असल्याचा मुद्दा मांडला.

पालकमंत्री गिरीश बापट यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या बैठकीला आमदार विजय काळे, प्रा. मेधा कुलकर्णी आणि जगदीश मुळीक यांच्यासह समितीचे सदस्य नगरविकास विभागाचे प्रधान सचिव डॉ. नितीन करीर, पुणे महापालिकेचे आयुक्त कुणाल कुमार, दिल्ली मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनचे माजी व्यवस्थापकीय संचालक ई. श्रीधरन; तसेच विद्यमान व्यवस्थापकीय संचालक मंगू सिंग, 'जनवाणी'चे किरण कुलकर्णी व तेजस जोशी, ज्येष्ठ उद्योगपती अरुण फिरोदिया; तसेच पुणे मेट्रोचे माजी विशेष कार्याधिकारी शशिकांत लिमये आणि सीओईपी अॅल्युमनी असोसिएशनचे रमेश राव उपस्थित होते.

'लक्ष्मी रोडवरून जावी मेट्रो'

लक्ष्मी रोड, तुळशीबाग, मंडई अशा भागांतून मेट्रोचा मार्ग आखला जावा, अशी सूचना केली जात आहे. पिंपरी-चिंचवड ते स्वारगेट हा मार्ग शहराच्या मध्य वस्तीतूनच जात असून, याच सर्व भागांना 'कनेक्ट' करत आहे. एवढेच नाही, तर या मार्गावरील मेट्रोचे एक स्टेशन मंडई परिसरातच दर्शवण्यात आले आहे. त्यामुळे मेट्रोचा दुसरा मार्गही त्याच भागांतून नेणे सयुक्तिक कसे ठरेल, अशी विचारणा केली जात आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मोफत उपचारांची प्रतीक्षाच

$
0
0

पुणे : गोरगरीब जनतेला स्वाइन फ्लूचे उपचार मोफत देण्यासंदर्भात राज्याचे आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत अजूनही घोषणांचेच 'उपचार' करत आहेत. विधिमंडळाचे अधिवेशन सुरू असल्याने त्या संदर्भातील कोणतेही वक्तव्य आपण करू शकणार नाही; मात्र मोफत उपचारांबाबत ठोस व सविस्तर निर्णय दोन दिवसांत जाहीर करू, असे त्यांनी बुधवारी पुण्यात स्पष्ट केले.

आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना मोफत उपचार देण्यात येतील, अशी घोषणा आरोग्यमंत्र्यांनी करूनही पुण्यातील खासगी हॉस्पिटलमध्ये स्वाइन फ्लूच्या पेशंटना मोफत उपचार देण्यास नकार देण्यात येत असल्याचे आढळून आले आहे. आरोग्य खात्याकडून लेखी आदेश अथवा तोंडी सूचनादेखील करण्यात आली नसल्याने पेशंटकडून हॉस्पिटल बिल वसूल करत असल्याचा प्रकार 'मटा'ने प्रकाशात आणला होता. आरोग्य खात्याच्या अधिकाऱ्यांमध्ये गोंधळ आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मेंटल हॉस्पिटल वसाहतीचे सर्वेक्षण

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, येरवडा

येरवडा मेंटल हॉस्पिटल कर्मचारी वसाहतीकडून दर महिन्याला लाखो रुपयांची विजेची उधळपट्टी होत असून काही निवडक कर्मचाऱ्यांकडून वीज बिला पोटी काही हजार रुपयांची रक्कम जमा होत आहे. त्यामुळे दर महिन्याला लाखो रुपयांचे वीज बिल भरणे हॉस्पिटलला शक्य नाही, यावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी प्रशासनानेन संपूर्ण वसाहतीचे सर्वेक्षणाचे काम सुरू केले आहे. यासाठी एका समितीची स्थापना केली असल्याची माहिती अधीक्षक डॉ. भालचंद्र डोंगळीकर यांनी दिली.

येरवडा मेंटल हॉस्पिटलने गेल्या दोन महिन्यांचे दहा लाख रुपयांचे वीज बिल थकविल्याने महावितरणने संपूर्ण कर्मचारी वसाहतीची वीज तोडली होती. ऐन दहावी, बारावीच्या परीक्षेच्या काळात वीज तोडल्याने विद्यार्थी हवालदिल झाले होते, तर वसाहतीतील कुटुंबांना अंधारात राहावे लागले, याबाबतचे सविस्तर वृत्त 'मटा'मध्ये प्रसिद्ध करण्यात आल्यावर आणि दहावी, बारावीच्या मुलांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, यासाठी प्रशासनाकडून जोरदार हालचाली करून महावितरणला विनंती करून काही दिवसांकरिता वीज पुरवठा सुरळीत करून घेण्यात यश आले. सरकारकडून अनुदान प्राप्त झाल्यानंतर थकीत वीज बिल अदा करण्यात येईल, अशी हमी प्रशासनाकडून देण्यात आली.

याबाबत डोंगळीकर म्हणाले, 'कर्मचारी वसाहतीमध्ये राहणाऱ्या चारशे कर्मचाऱ्यांपैकी जवळपास ऐंशी कर्मचाऱ्यांनी निवृत्त होऊनही खोल्या रिकाम्या केलेल्या नाहीत, तसेच केवळ चाळीस ते पन्नास कुटुंबांकडून दर महिन्याला चारशे रुपये प्रमाणे वीस हजार रुपयांची वीज कर आकारणी वसूल होते. तर प्रत्येक महिन्याला साडे चार ते पाच लाख रुपयांचे वीज बिल येत असल्याने ते भरणे अशक्य होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


रेशनधान्य बायोमेट्रिकने

$
0
0

काळाबाजार रोखण्यास नव्या पद्धतीने होणार मदत

म. टा. प्रतिनिधी, पुणे

रेशन दुकानांतून सवलतीच्या दरांत देण्यात येणारे धान्य आता रेशनकार्डधारकांना बायोमेट्रिक पद्धतीने देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. बायोमेट्रिक पद्धतीने धान्य वितरण केल्यास रेशनच्या धान्याचा काळाबाजार रोखण्यास मदत होणार आहे.

राष्ट्रीय अन्नसुरक्षा कायद्यांतर्गत देशभरातील गरीब कुटुंबांना सवलतीच्या दरात धान्य देण्यात येत आहे. हे दान्य देताना सुप्रीम कोर्टात दाखल झालेल्या एका याचिके रेशनिंगचे संगणकीकरण करण्याचे आदेश देण्यात आले आहे. त्यानुसार पहिल्या टप्प्यात अन्नधान्य महामंडळातून शासकीय गोदाम व तेथून दुकानदारांपर्यंत धान्य पोहचविण्याच्या यंत्रणेचे संगणकीकरण करण्यात आले आहे. तसेच संगणकीकृत रेशनकार्डही देण्यात येत आहेत. रेशन दुकानांतील व्यवहारांचे व्यवस्थापन संगणकाद्वारे करताना रेशनकार्डधारक लाभर्थ्यांना बायोमेट्रिक ओळख पटवूनच धान्य देण्याचा प्रस्ताव विचाराधीन होता. त्याला मंत्रिमंडळाच्या बैठकीत नुकतीच मान्यता देण्यात आली. त्यासंदर्भातील शासन निर्णय जारी करण्यात आला आहे.

रेशन दुकानांतून कार्डधारकांना धान्य वितरित करताना मोबाइल टर्मिनल टेक्नॉलॉजीचा वापर केला जाणार आहे. त्यासाठी १०३ कोटी रुपयांच्या खर्चासही मंजुरी मिळाली आहे. धान्य वितरणासाठी रेशनकार्डधारकांना आता बारकोडेड संगणकीकृत कार्ड देण्यात येणार आहे. त्यासाठी लाभार्थी रेशनकार्डधारकांचा आधार क्रमांक, बँक खाते क्रमांक व मोबाइल क्रमांकाची माहिती संकलित केली जाणार आहे. मोबाइल टर्मिनल टेक्नॉलॉजीद्वारे लाभार्थी रेशनकार्डधारकांची ओळख आधार क्रमांकाचा बायोमेट्रिक डाटा वापरून करण्यात येणार आहे. ही ओळख पटल्यानंतरच संबंधतांना रेशनवरील धान्य वितरित करण्यात येणार आहे. बायोमेट्रिकची प्रायोगिक योजना राज्यातील दोन जिल्ह्यांत राबविण्यात आली आहे.

'अपात्र' लाभार्थी शोधणेही शक्य

अन्नसुरक्षा कायद्यांतर्गत दोन व तीन रुपये किलो दराने नागरिकांना गहू आणि तांदळाचे वाटप करण्यात येत आहे. या योजनेचा लाभ 'अन्नसुरक्षे'च्या निकषात न बसणारी काही कुटुंबे घेत आहेत. अशा कुटुंबांचा शोध घेऊन त्यांची नावे योजनेतून वगळण्यात येत आहेत. बायोमेट्रिक्स पद्धतीने धान्य वितरण करण्याच्या योजनेमुळे अन्नसुरेक्षेचे 'अपात्र' लाभार्थी शोधणेही शक्य होणार आहे. संगणकीकृत रेशनकार्डांसाठी माहिती संकलित करण्याचे काम रेशन दुकानदारांना देण्यात आले आहे. त्यासाठी कार्डामागे पाच रुपये कमिशन देण्यात येणार आहे. ग्रामीण भागात हे काम महसूल कर्मचारी करणार आहेत. ही माहिती संकलित करताना उत्पन्नाचे निकषही तपासले जातील. त्यामुळे खोटा लाभ घेणाऱ्यांना अन्नसुरक्षा योजनेतून बाहेर काढणे शक्य होणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भूषण गांधी ‘गेट’मध्ये प्रथम

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

ग्रॅज्युएट अॅप्टिट्यूड टेस्ट इन इंजिनीअरिंग अर्थात 'गेट' या परीक्षेत नगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्यातील सोनगावच्या भूषण गांधीने 'लाइफ सायन्सेस' विषयात देशात प्रथम क्रमांक मिळवला आहे. त्याला आता आयआयटी, मुंबईमध्ये बायोमेडिकल इंजिनीअरिंगमध्ये एमटेक करायचे आहे.

भूषणने प्रवरानगर येथील पद्मश्री विखे पाटील कॉलेज ऑफ आर्टस्, सायन्स अँड कॉमर्समधून बायोटेक्नॉलॉजीमध्ये बीएस्सी केले असून, त्यानंतर बडोद्याच्या महाराज सयाजीराव गायकवाड विद्यापीठातूनन बायोटेक्नॉलॉजीमध्येच एमएस्सी केले आहे. त्याने गेल्या वर्षीही 'गेट' दिली होती. त्या वेळी तो परीक्षेत पात्र ठरला होता. मात्र, त्याची रँक ५६३ असल्याने त्याने या वर्षी पुन्हा परीक्षा द्यायचा निर्णय घेतला. यंदाची 'गेट' जानेवारीमध्ये पार पडली. त्याचा निकाल नुकताच जाहीर झाला असून, त्यामध्ये तो ९५६ स्कोअरसह 'लाइफ सायन्सेस'च्या पेपरमध्ये भारतात पहिला आला आहे.

'मी 'गेट'साठी तयारी करताना बायोटेक्नॉलॉजीतील मूलभूत संकल्पना समजून घेण्यावर अधिक भर दिला. या संकल्पनांचा विश्लेषणात्मक अभ्यासही केला. वेळेचे नियोजन आणि सातत्यपूर्ण अभ्यास याचा मला परीक्षा देताना फायदा झाला,' असे भूषणने सांगितले.

भूषणने बारावीला सायन्समध्ये ७५ टक्के मार्क मिळवले होते. त्यानंतर बायोटेक्नॉलॉजी हा आवडता विषय असल्याने त्याने बायोटेक्नॉलॉजीमध्ये बीएस्सी आणि एमएस्सी केले. 'गेट'साठी त्याने 'लाइफ सायन्सेस'मध्ये बायोकेमिस्ट्री आणि मायक्रोबायोलॉजी हे दोन विषय निवडले होते. भूषणचे आई-वडील सोनगाव येथेच राहतात. त्यांचे कापडाचे दुकान आहे. भूषणला त्यांचे कायमच प्रोत्साहन मिळाले असून, काका सुभाष गांधी आणि काकू स्वाती गांधी यांचेही मार्गदर्शन मिळाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दुकाने, हॉटेलांची सोसायट्यांना डोकेदुखी

$
0
0

परवानगी असल्याने पोलिसांना कारवाईचा बडगा उगारणेही कठीण

म. टा. प्रतिनिधी, पुणे

सोसायटीच्या खाली असलेली दुकाने, या दुकानांमधून केली जाणारी सिगारेटची विक्री, आणि सिगारेट ओढत आक्षेपार्ह वर्तन करणारे तरुण यामुळे अनेक सोसायट्यांना विविध प्रकारचा त्रास होत आहे. अनेकदा समजावून काही उपयोग होत नसल्याने काही सोसायट्यांनी पोलिसांकडेही धाव घेतली आहे. मात्र, सोसायट्यांनीच आपल्या आवारात दुकान अथवा हॉटेलला परवानगी दिल्याने तेथे येणाऱ्या ग्राहकांवर कारवाई करता येणे शक्य नसल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.

अनेक सोसायट्यांमध्ये तळमजल्यावर दुकान, हॉटेल किंवा काही ऑफिस, क्लास आहेत. बिल्डरने सुरुवातीला येथे दुकान किंवा हॉटेल होणार नाही. बँक किंवा ऑफिससाठीच या जागांचा वापर होईल, असे सांगितलेले असते. परंतु, प्रत्यक्षात तेथे हॉटेल किंवा दुकान सुरू होते. हॉटेलच्या दारात पानटपरी उभी राहते आणि किराणा मालाच्या दुकानातही सिगारेट तंबाखूची विक्री केली जाते. त्यामुळे सोसायटीतील रहिवाशांना विविध प्रकारचा त्रास सहन करावा लागत आहे.

कोथरूडमधील काही सोसायट्यांनी अशा त्रासाबाबत पोलिसांकडे धाव घेतली होती. काही सोसायट्यांनी तर तक्रारही दाखल केली आहे. कोथरूड येथील एलआयसी कॉलनीमधील एका इमारतीतील नागरिकांनाही अशाच प्रकारचा त्रास सहन करावा लागत होता. इमारतीतील दुकानात सिगारेट उपलब्ध असल्याने तसेच जवळपास कॉलेज आणि अनेक हॉस्टेल असल्यामुळे या इमारतीलगत दिवसभर तसेच रात्री उशीरापर्यंत कॉलेजमधील युवकांचे विविध गट सिगारेट ओढत उभे राहात. यामध्ये मुलींचाही समावेश होता. दिवसभर येणाऱ्या सिगारेटच्या धुरामुळे वरच्या मजल्यावर राहणाऱ्या रहिवाशांना आरोग्याच्या समस्या भेडसावू लागल्या. त्यातच हे विद्यार्थी मनमानी पद्धतीने गाड्या लावत असल्याने त्यावरून सोसायटीच्या सभासदांशी वाद होऊ लागले. अनेकदा हे विद्यार्थी उर्मट उत्तरे देत, तर काही वेळा अंगावरही धावून येत. त्यामुळे शेवटी सर्व सभासदांनी पोलिसांकडे जाण्याचा निर्णय घेतला. बीट मार्शल पाठवून एक दोन वेळा या विद्यार्थ्यांना गैरवर्तनाबाबत ताकीद दिली. त्यानंतर सोसायटीने सोसायटीच्या दारात व आजूबाजूला येथे उभे राहून सिगारेट ओढण्यास, तसेच गैरवर्तन करण्यास मनाई आहे. व केल्यास कायदेशीर कारवाई केली जाईल, असे बोर्ड लावले. दुकानदारालाही सिगारेट विकण्यास बंदी घालण्यास सांगितले. त्यानंतर हा त्रास बऱ्याच अंशी कमी झाला, असा अनुभव सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितला.

दरम्यान, याबाबत सह पोलिस आयुक्त संजय कुमार म्हणाले, 'सोसायटीत कोणत्या दुकानांना परवानगी द्यायची, कोणत्या नाही, हा सोसायटीच्या सभासदांचा निर्णय आहे. त्याबाबत कायदेशीर तरतूदही आहेत. एकदा कायद्याने व सोसायटीने दुकानाला परवानगी दिल्यानंतर तेथे येणाऱ्या ग्राहकांना रोखता येणार नाही. त्यामुळे पोलिसांना थेट कारवाई करता येत नाही. सोसायटीनेच अशा दुकानांना परवानगी देऊ नये. सिगारेट विक्रीवर कायदेशीर बंदी आल्यास पोलिस कारवाई करतील,'.

रहिवासी सोसायट्यांमध्ये व्यावसायिक दुकाने किंवा आस्थापना असाव्यात किंवा नाही, याबाबत कायद्यात स्पष्ट तरतूद नाही. सोसायटीतील अशा व्यावसायिक आस्थापना किंवा दुकानांमुळे स्थानिक रहिवाशांना विविध प्रकारचा त्रास होत आहे. कायदेशीर तरतुदींअभावी पोलिसांना अशा प्रकरणात कारवाई करता येत नाही. केवळ कायद्यात स्पष्टता नसल्याने नागरिकांना हा त्रास होत असून त्याविषयी नव्याने कायदेशीर तरतूद करण्याची गरज निर्माण झाली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कृषी दिंडीचे २६ला अरणमधून प्रस्थान

$
0
0

तरुणांसह अडीचशे साहित्यप्रेमी होणार सहभागी

म. टा. प्रतिनिधी, पुणे

पंजाबमधील घुमानमध्ये होत असलेल्या ८८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात सहभागी होण्यासाठी सोलापूर जिल्ह्यातून येत्या २६ मार्चला साहित्यप्रेमी वारकऱ्यांची कृषी दिंडी निघणार आहे. शेतकरी साहित्य इर्जिक परिषद आणि महाराष्ट्र साहित्य परिषद, मोडनिंब यांच्या संयुक्त विद्यामाने श्री संत शिरोमणी सावता महाराज साहित्य-कृषी दिंडी आयोजित केली आहे. ज्येष्ठ कवी नारायण सुमंत यांच्या नेतृत्त्वाखाली दिंडी निघणार असून, २५० अधिक वारकरी यात सहभागी होणार आहेत.

सोलापूर जिल्ह्यातील अरण आणि मोडनिंबमधून येत्या २६ मार्च रोजी घुमानला जाण्यासाठी प्रस्थान करणार असून, संमेलनाच्या एक दिवस आधी पोहोचणार आहे. कवी सुमंत आणि परिषदेच्या मोडनिंब शाखेचे प्रमुख कार्यवाह कवी सुरेशकुमार लोंढे आणि दिंडी मालक भारत हरीभाऊ शिंदे यांनी उपक्रमाचे संयोजन केले आहे.

दिंडीचा एकूण प्रवास सुमारे अडीच हजार किलोमीटरचा असून, यासाठी औरंगाबाद, जळगाव, उज्जैन, ग्वाल्हेर, मथुरा, आगरा, दिल्ली, चंदीगड, अमृतसर आणि घुमान असा मार्ग निश्चित करण्यात आला आहे. प्रवासात दिंडी महत्त्वाच्या थांब्यांवर ग्रामस्वच्छता, शेतकऱ्यांच्या आत्महत्या, स्त्री-भ्रूणहत्या, व्यसनमुक्ती, अंधश्रद्धा निर्मूलन या विषयावर पथनाट्य तसेच कविसंमेलन, कथाकथन, भारूड, प्रवचन करणार आहेत. दिंडीमध्ये २५० साहित्यप्रेमी वारकऱ्यांच्या ८२ महिला आणि मुलींचा सहभाग असून, १४० तरुण-तरुणी सहभागी होत आहेत, अशी माहिती सुमंत यांनी पत्रकार परिषदेत दिली. या वेळी अखिल भारतीय साहित्य मंडळाच्या माधवी वैद्य उपस्थित होत्या.

संमेलनाची जोरदार तयारी

साहित्य संमेलमाची घुमानमध्ये जोरात तयारी सुरू असून, संमेलनाच्या ठिकाणाला संतश्रेष्ठ श्री नामदेव नगरी, घुमान असे नामकरण करण्यात आले आहे. मुख्य सभामंडपाला श्री गुरूनानक देवजी सभामंडप, असे नाव निश्चित केले आहे. संमेलनाच्या व्यासपीठाला लाल-बाल-पाल व्यासपीठ असे वैशिष्ट्यपूर्ण नाव देण्यात येत असून, दोन सभागृहांना अनुकमे गुरू गोविंदसिंहजी आणि न. वि उर्फ काकासाहेब गाडगीळ सभागृह, अशी नावे देण्यात येणार आहेत, अशी माहिती डॉ. माधवी वैद्य यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सूक्ष्मजीव करणार गंगेची स्वच्छता

$
0
0

भारत, अमेर‌िकेच्या शास्त्रज्ञांचा पुढाकार;
जीवाणूंच्या साह्याने वीजनिर्मिती शक्य

म. टा. प्रतिनिधी, पुणे

रासायनिक आणि जैविक घटकांमुळे प्रदूषित झालेल्या गंगा नदीच्या स्वच्छतेसाठी सूक्ष्मजीवांचा वापर करण्याची अभिनव कल्पना भारतीय आणि अमेरीकी शास्त्रज्ञांच्या संयुक्त प्रयत्नांतून लवकरच राबविण्यात येणार आहे. अमेरीकेतील प्रख्यात जे. क्रेग व्हेन्टर इन्स्टीट्यूट (जेसीव्हीआय) आणि पुण्यातील राष्ट्रीय पेशीविज्ञान संस्थेच्या (एनसीसीएस) संयुक्त विद्यमाने केंद्र सरकारसमोर लवकरच याबाबतचा प्रस्ताव सादर होणार आहे.

गंगेच्या पाण्याच्या शुद्धिकरणासोबत सूक्ष्मजीवांच्या साह्याने पाण्यापासून वीजनिर्मितीही करणे शक्य आहे, असा दावा 'जेसीव्हीआय'च्या अध्यक्ष डॉ. कॅरेन नेल्सन यांनी महाराष्ट्र टाइम्सशी बोलताना केला. मोदी सरकारच्या अजेंडावरील एक प्रमुख विषय असणाऱ्या गंगा स्वच्छता अभियानात देशा-विदेशातील अनेक संशोधन संस्था आणि तज्ञ जोडले जात आहेत. या अभियानात सहभागी होण्यासाठी आता सूक्ष्मजीव शास्त्रज्ञही सरसावले आहेत. गंगेमधील रासायनिक आणि जैविक प्रदूषणावर सूक्ष्मजीवांच्या साह्याने तोडगा काढणे शक्य असल्याचे या शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे.

गंगा स्वच्छतेसाठी सूक्ष्मजीवांच्या वापराबाबत डॉ. नेल्सन म्हणाल्या, 'प्रदूषित नद्यांमधील जैविक आणि रासायनिक घटकांचे विघटन करण्यासाठी विशिष्ठ प्रकारचे जिवाणू वापरले जातात. काही जीवाणू प्रदूषित पाणी पाच दिवसांत स्वच्छ करीत असल्याचे आमच्या प्रयोगांतून दिसून आले आहे. त्याच प्रकारे काही जीवाणू मायक्रोबिअल फ्युएल सेलच्या साह्याने वीजनिर्मितीही करतात. अशा जीवाणूंच्या वापरातून गंगेच्या शुद्धीकरणासोबत वीजनिर्मितीही करणे शक्य होऊ शकेल. आमच्या संस्थेने गेट्स फौंडेशनच्या मदतीने असे काही प्रकल्प राबवले आहेत. भारत सरकारने मान्यता दिल्यास गंगा शुद्धीकरणामध्येही हे तंत्रज्ञान वापरता येऊ शकेल.'

गंगा स्वच्छतेसाठी केंद्र सरकारने देशभरातील संशोधन संस्थांना आवाहन केले आहे. त्याला प्रतिसाद म्हणून आम्ही सूक्ष्मजीवशास्त्रीय उपाय सुचवत असल्याचे एनसीसीएसचे संचालक डॉ. शेखर मांडे यांनी सांगितले. ते म्हणाले, 'गंगेच्या पाण्यातील सूक्ष्मजीवांचे नियमितपणे सर्वेक्षण करून पाण्याचा दर्जा तपासता येऊ शकतो. तसेच, शुद्धिकरणाच्या इतर पद्धतींसोबत सूक्ष्मजीवांचा वापर केल्यास त्यावर कायमस्वरूपी नैसर्गिक तोडगा निघू शकतो. याबाबत लवकरच आम्ही केंद्र सरकारकडे प्रस्ताव सादर करणार आहोत.'

काही जीवाणू प्रदूषित पाणी पाच दिवसांत स्वच्छ करीत असल्याचे आमच्या प्रयोगांतून दिसून आले आहे. त्याच प्रकारे काही जीवाणू मायक्रोबिअल फ्युएल सेलच्या साह्याने वीजनिर्मितीही करतात. अशा जीवाणूंच्या वापरातून गंगेच्या शुद्धीकरणासोबत वीजनिर्मितीही करणे शक्य होऊ शकेल.

- डॉ. कॅरेन नेल्सन, अध्यक्ष, 'जेसीव्हीआय'

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images