Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

निवडणूक काळात व्यसनाधीनता वाढते

0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

निवडणुकीच्या काळात ग्रामीण भागातील तरुणांना मोफत दारू पुरवली जाते. गावागावांत टेंपो, ट्रकद्वारे दारूचा पुरवठा होतो. त्यामुळे ग्रामीण भागातील तरुणाई सहजपणे व्यसनाच्या आहारी जाते, हे चित्र बदलायला हवे, असे मत आमदार विनायक मेटे यांनी व्यक्त केले.

सेवा प्रबोधिनी संस्थेतर्फे देण्यात येणारा 'डॉ. द. वि. निकम स्मृती पुरस्कार' नुकताच पंढरपूर येथील सामाजिक कार्यकर्त्या मंगलाताई शहा यांना मेटे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. त्या वेळी ते बोलत होते. कैवल्य योग इन्स्टिट्यूटचे डॉ. नितीन उनकुले, पत्रकार राही भिडे, लीलाताई निकम, अप्पा डिंगणकर, अभिनंदन थोरात या वेळी उपस्थित होते.

'निवडणूक प्रचाराच्या काळातच ग्रामीण भागातील तरुण पिढीमध्ये व्यसनाधीनतेचे प्रमाण वाढते, याचा बारकाईने विचार केल्यास राजकारणीच व्यसनाधीनतेला खतपाणी घालत असल्याचे स्पष्ट होते,' असे मेटे यांनी सांगितले.

सामाजिक बांधिलकीच्या जाणीवेतून आतापर्यंत केलेल्या कार्याची दखल घेतल्याबद्दल शहा यांनी संस्थेप्रती कृतज्ञता व्यक्त केली. 'सध्या, परिस्थिती बदलली आहे. सामाजिक क्षेत्रामध्ये सध्या जे चित्र आहे, ते बदलले पाहिजे,' अशा भावना शहा यांनी व्यक्त केल्या.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


अंतर्गत गुणांच्या फुगवट्याला आक्षेप

0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

विद्यार्थ्यांना लेखी परीक्षांमध्ये पुरेसे गुण नसतानाही केवळ अंतर्गत गुणांच्या जोरावर विद्यार्थ्यांचे सुधारणारे निकाल आणि विद्यापीठीय निकालांच्या 'फील गुड' चित्रावर आक्षेप घेण्यात आले आहेत. निकालवाढीच्या मागे लागलेले विद्यापीठ प्रशासनच याला जबाबदार असल्याचा आरोप करून या प्रकाराविरोधात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या शनिवारीच्या सिनेटच्या बैठकीमध्ये विद्यापीठाला धारेवर धरण्याची तयारी सिनेट सदस्यांनी सुरू केली आहे.

विद्यापीठाच्या इंजिनीअरिंग विद्याशाखेमध्ये ऑनलाइन परीक्षांची सुरुवात झाल्यानंतरच्या काळात परीक्षा यंत्रणेविषयी वारंवार प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. इंजिनीअरिंग विद्याशाखेतील निकालवाढीचा फुगवटा कमी करण्यासाठी विद्यापीठाने इंटर्नल आणि एक्स्टर्नल परीक्षांसाठी सेपरेट पासिंगची अट लागू केली. मात्र ही अटही परिपूर्ण नसून इतर विद्याशाखा आणि इंजिनीअरिंग विद्याशाखेमध्ये एक वेगळा भेदभाव केला जात असल्याचेही या निमित्तानेच प्रकाशात आले आहे.

'इंजिनीअरिंगच्या सेपरेट पासिंगच्या प्रस्तावासाठी इंटर्नल आणि एक्स्टर्नल परीक्षांसाठी प्रत्येकी ४० टक्के गुणांची अट ठेवण्याचा प्रस्ताव होता. विद्यापीठाने मात्र सेपरेट पासिंग लागू करताना एक्स्टर्नल परीक्षांमधील गुणांची अट १० टक्क्यांनी खाली आणून ती केवळ ३० टक्के केली. इतर सर्व विद्याशाखांसाठी ही अट ४० टक्के गुणांचीच आहे. यातून विद्यापीठ इंजिनीअरिंगच्या विद्यार्थ्यांना इतर विद्यार्थ्यांपेक्षा स्पेशल ट्रिटमेंट देत आहे. हे प्रकार थांबायला हवेत,' अशी मागणी सिनेट सदस्य डॉ. श्रीधर देव यांनी केली.

इंटर्नलच्या जोरावर निकाल फुगण्याचे प्रकार विद्यापीठाच्या लौक‌िकास हान‌िकारक असल्यानेच त्या विरोधात आवाज उठविल्याचे डॉ. देव यांनी स्पष्ट केले. हे घोळ थांबविण्यासाठीच इंटर्नलचे गुण एक्स्टर्नलच्या गुणांपेक्षा २० टक्क्यांहून जास्त असल्यास ते एक्स्टर्नल परीक्षेतील गुणांच्या तुलनेत कमी करणे आणि दोन्ही परीक्षेमधील गुणांचा फरक जास्तीत जास्त २० टक्क्यांपर्यंत करणे आदी मागण्या करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

इतर विद्याशाखांबाबतीत इंटर्नल आणि एक्स्टर्नल गुणांमध्ये मोठी तफावत दिसून येते. विद्यार्थ्यांना लेखी परीक्षेत गुण कमी असतानाही केवळ इंटर्नल गुणांच्या बळावर ते पुढे जातात. त्यामुळेही निकाल उगाचच फुगतो.

- डॉ. श्रीधर देव, सिनेट सदस्य

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जगण्याच्या संघर्षाला हवा पाठिंबा

0
0

एकट्या महिलांची पिंपरीतील परिषदेत मागणी

म. टा. प्रतिनिधी, पिंपरी

'विधवा, परित्यक्त्या, घटस्फोटिता, प्रौढ कुमारिका, अशा महिला जगण्यासाठी जिद्दीने लढत असतात. पुरुषप्रधान आणि सरकार व्यवस्थेमुळे या महिलांची लढाई अवघड झाली आहे. त्यांच्यावर दया दाखवू नका, तर त्यांच्या जीवनाच्या संघर्षाला पाठबळ द्या,' अशी मागणी एकट्या महिलांच्या परिषदेमध्ये करण्यात आली. जागतिक महिला दिन आणि सावित्रीबाई फुले स्मृतिदिनानिमित्त एकट्या महिलांची आणि अंगणवाडी कर्मचारी महिलांची परिषद भोसरीच्या अंकुशराव लांडगे सभागृहात पार पडली.

परिषदेच्या अध्यक्षस्थानी सुनंदा साळवे होत्या. या वेळी अन्नधान्य वितरण अधिकारी धनाजी पाटील, पिंपरी-चिंचवड महापालिकेचे वैद्यकीय संचालक पवन साळवे, बालविकास प्रकल्प अधिकारी सुवर्णा जाधव, जिल्हा महिला संरक्षण अधिकारी सारिका साळुंके, नायब तहसिलदार पुनाजी थिटे आदी उपस्थित होते. परिषदेचे उद्घाटन मोलकरणी, काचपत्रावेचक, रोजंदारी मजूर, शेतमजूर, अंगणवाडीताई अशा विविध प्रकारची कामे करणाऱ्या महिलांनी एकत्र येऊन संघर्षाची आणि एकजुटीची मशाल पेटवून केले. अंगणवाडी कर्मचारी सभेचे अध्यक्ष नितीन पवार यांनी प्रास्ताविक केले. महिला वैद्यकीय अधिकारी वर्षा डांगे आणि त्यांच्या दहा सहकारी डॉक्टरांनी महिलांची मोफत वैद्यकीय तपासणी केली. डॉ. लीना खरात यांनी आरोग्यविषयक मार्गदर्शन केले. छाया जाधव, सुनंदा सोनवणे, सीमा जगदाळे, रतन फुलसुंदर, रीना कानडे, स्वाती करपे, नलिनी पवार यांनी ठराव मांडले. शांताबाई पवार, राजश्री पाटोळे यांनी पाठिंबा दर्शवणारे भाषण केले. शैलजा चौधरी यांनी उपस्थितांचे स्वागत केले. उर्वशी गाढवे यांनी आभार मानले.

असे आहेत ठराव

एकट्या महिलांना पिवळे रेशनकार्ड द्यावे

सदर महिलांच्या मुलांचा शिक्षणाचा खर्च शासनाने करावा,

या महिलांसाठी हेल्पलाईन सुरू करावी, किमान वेतनाच्या निम्मी पेन्शन द्यावी.

सर्व कष्टकरी महिलांना वयाच्या पन्नाशीनंतर किमान दोन हजार रुपये पेन्शन मिळावी.

या महिलांसाठी स्वस्त घरकुल योजना राबवावी.




मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

युवतीच्या तक्रारीने पोलिसांची धावपळ

0
0

म. टा. प्रतिनिधी, पिंपरी

कॉलेजमधून घरी परतत असताना अज्ञात युवकांनी बस स्टॉपवर अडवून चाकूच्या धाकाने अपहरणाचा प्रयत्न केल्याचे सांगत गुरुवारी एक युवती प्राधिकरण पोलिस चौकीत आली. पोलिसांनी त्यानंतर तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन सीसीटीव्ही फुटेज तपासले. मात्र, दुसरीकडे युवतीच्या कुटुंबीयांनी आमची तक्रार नसल्याचे सांगून प्रकरणावर पडदा टाकला.

अकरावीच्या प्रॅक्टिकलची परीक्षा देऊन शाहूनगर येथे राहणारी एक अल्पवयीन मुलगी निगडी येथील टिळक चौकात बसमधून उतरली. त्यानंतर तिने थेट प्राधिकरण पोलिस चौकी गाठली. तोंडाला रुमाल बांधलेल्या युवकांनी चाकूच्या धाकाने अपहरण करून पळवून नेण्याचा प्रयत्न केल्याचे तिने पोलिसांना सांगितले. त्यामुळे पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. तेथील बँका, सराफ पेढी आणि एटीएम सेंटरच्या सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केली. मात्र, फुटेजमध्ये तसे काहीच आढळून आले नाही. पण मोशी प्राधिकरणातील युवतीच्या छेडछाड आत्महत्याप्रकरणावरून झालेल्या वादंगामुळे पोलिसांनी तक्रार दाखल करण्याची तयारी केली. मात्र, युवतीबरोबर पोलिस चौकीत आलेल्या कुटुंबीयांनीच आपली तक्रार नसल्याचे सांगू प्रकरणावर पडदा टाकला. अखेर पोलिसांनी तशी नोंद करून युवतीला कुटुंबियांबरोबर पाठवून दिले. या सर्व प्रकारामुळे निगडी पोलिस आणि गुन्हे शाखेची मात्र पुरती धावपळ उडाली.

घड्याळाच्या दुकानात चोरी

पिंपरी ः बंद दुकानाच्या शटरचे कुलूप तोडून चोरट्यांनी महागडी घड्याळे लंपास केली. बुधवारी (११ मार्च) सकाळी चिंचवड येथील अनंत टाइम या दुकानात ही घटना उघडकीस आली. जयकिसन पुरुषोत्तम दासानी (२८, रा. पिंपरी) यांनी पिंपरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

दासानी यांनी त्यांचे दुकान मंगळवारी (१० मार्च) रात्री नऊच्या सुमारास बंद केले. त्यानंतर चोरट्याने दुकानाच्या शटरचे कुलूप तोडून दुकानात टायमॅक्स, मॅक्झिमा कंपनीचे घड्याळ आणि रोख रक्कम असा एकूण ६६ हजार ८८५ रुपयांचा ऐवज चोरून नेल्याचे दुसऱ्या दिवशी उघड झाले.

रिक्षाची चोरी

पुण्यावरून वाकडला प्रवासी घेऊन आलेल्या रिक्षाचालकाची रिक्षा एका खाकी कपडे घातलेल्या अज्ञात चोरट्याने लंपास केली. बुधवारी (११ मार्च) सकाळी अकराच्या सुमारास बेंगळुरू-मुंबई द्रुतगती मार्गावर असलेल्या 'माय कार शोरूम जवळ हा प्रकार घडला. नंदू विष्णू जगताप (४७, रा. पुणे) यांनी हिंजवडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

जगताप रिक्षा चालक आहेत. बुधवारी सकाळी त्यांच्या रिक्षामध्ये एक खाकी कपडे घातलेली व्यक्ती पुण्यातील दांडेकर पुलाजवळ बसली. त्याने परतीच्या भाड्यासह पैसे देण्याचे कबूल केल्याने जगताप हे त्याला घेऊन वाकडला आले. प्रवाशाने माय कार येथे गाडी असल्याचे सांगितले. जगताप यांच्याकडूनच ५०० रुपये घेतले. आतून आल्यावर पैसे देतो, असे सांगितले. पण त्यानंतर बराच काळ झाला तरी तो प्रवासी परत आला नाही. त्यामुळे जगताप यांनी आत जाऊन पाहिले तोपर्यंत त्या प्रवाशाने रिक्षा गायब केल्याचे जगताप यांनी दिलेल्या तक्रारीत नमूद केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

उद्योजकांनो, मुजोरी नको

0
0

राज्याचे कामगारमंत्री प्रकाश मेहता यांचा इशारा

म. टा. प्रतिनिधी, पिंपरी

कामगारांचे प्रश्नांची अवहेलना करणाऱ्या उद्योजकांची मुजोरी खपवून घेणार नाही. त्यासाठी प्रसंगी कामगारांबरोबर उपोषण करू, असा इशारा राज्याचे कामगार मंत्री प्रकाश मेहता यांनी गुरुवारी दिला.

आकुर्डी येथील फोर्स मोटर्स कामगारांच्या वेतनवाढ कराराच्या प्रश्नाबाबत कंपनीतील कामगारांचे कुटुंबीय काळभोरनगर येथे उपोषणाला बसले आहेत. या ठिकाणी मेहता यांनी भेट दिली. आमदार महेश लांडगे, राज्यसभेचे भाजपचे उमेदवार अमर साबळे, महापालिकेतील पक्षनेत्या मंगला कदम, भाजपचे शहराध्यक्ष सदाशिव खाडे, पश्चिम

महाराष्ट्र संपर्कप्रमुख एकनाथ पवार, महिला आघाडीच्या प्रदेश सरचिटणीस उमा खापरे, शहराध्यक्षा शैला मोळक, नामदेव ढाके, महेश कुलकर्णी, नामदेव ढाके, राजू दुर्गे या वेळी उपस्थित होते.

मेहता म्हणाले, 'फोर्स मोटर्स कामगारांच्या वेतनवाढ करार प्रश्नावर चर्चा करण्यासाठी कंपनी मालकाला चर्चेसाठी बोलाविले होते. मात्र, ते आले नाहीत. त्यांची ही मुजोरी सरकार खपवून घेणार नाही. कामगारांच्या वेतनवाढ कराराचा प्रश्न मार्गी न लागल्यास आपणही त्यांच्यासोबत उपोषणाला बसू. कामगारांची कुचंबणा करून कोणताही उद्योग मोठा होत नाही. ही बाब लक्षात घेतली पाहिजे. कंपनीने ऐकले नाही तर कायदेशीर मार्गाने लढा करण्याचा पर्याय आपल्याला खुला आहे.'

अधिवेशन चालू असतानाही मेहता या ठिकाणी आले आणि त्यांनी कामगारांचे प्रश्न समजून घेतले, याविषयी पक्ष कार्यकर्त्यांनी समाधान व्यक्त केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

प्रतीक्षा तीन ‘एफएसआय’ची

0
0



'म्हाडा पुनर्विकासा'चा प्रस्ताव देण्याची गृहनिर्माण मंत्र्यांची सूचना

म. टा. प्रतिनिधी, पिंपरी

'म्हाडा'च्या जुन्या वसाहतींचा पुनर्विकास करण्यासाठी राज्य सरकारने मुंबईच्या धर्तीवर पुण्यातही तीन चटई क्षेत्र निर्देशांक (एफएसआय) लागू करावा, या दृष्टीने प्रयत्न केले जात आहेत. यासाठी राज्याचे गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता यांच्याकडे गुरुवारी (१२ मार्च) आग्रह धरण्यात आला. त्याबाबत प्रस्ताव सादर करण्याची सूचना मेहता यांनी केली आहे.

आकुर्डीतील फोर्स मोटर्समधील कामगारांच्या प्रश्नांचा आढावा घेण्यासाठी मेहता यांनी पिंपरी-चिंचवडचा दौरा केला. त्यानंतर त्यांनी चिंचवड स्टेशन येथील 'एमआयडीसी' गेस्ट हाउसमध्ये म्हाडा, कामगार खात्यातील अधिकारी, भारतीय जनता पक्षाचे प्रमुख पदाधिकारी यांची संयुक्त बैठक घेतली. ती सुमारे तासभर चालली.

'म्हाडा'च्या जुन्या वसाहतींचा पुनर्विकास करण्यासाठी सरकारने विकास नियंत्रण नियमावलीत सुधारित फेरबदल करून नियम ३३ (५)चे नवीन धोरण एप्रिल २०१३ मध्ये जाहीर केले. त्याअंतर्गत 'म्हाडा'च्या जागेवरील नवीन गृहयोजना अंमलात आणण्यासाठी अत्यल्प/अल्प व मध्यम उत्पन्न गटातील योजनांकरिता त्यांचा फनजिबल एफएसआय वगळून तीन एफएसआय देण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचप्रमाणे चालू गृहनिर्माण योजनांमध्ये ज्या इमारतींचा पुनर्विकास होणार आहे, त्यास एकूण भूखंड जागेवर तीन एफएसआय लागू आहे. ही बाब तूर्तास मुंबईसाठी लागू आहे. त्याच धर्तीवर पुण्यातील पुनर्विकास योजनांनाही लाभ मिळावा, असे निदर्शनास आणून देण्यात आले. त्या वेळी मेहता यांनी त्याबाबतचा योग्य प्रस्ताव सादर करण्याची सूचना केली.

पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील लोकसंख्येत वेगाने वाढ होत आहे. या परिसरात 'म्हाडा'चे पुनर्विकासाचे अनेक प्रस्ताव प्रलंबित आहेत. त्यामुळे येथील नागरिकीरणाचा वेग लक्षात घेऊन राज्य सरकारने प्रयत्न करण्याची गरज बैठकीत व्यक्त करण्यात आली.

'घरे रिक्त ठेवू नका'

'पिंपरी-चिंचवड महापालिकेने झोपडपट्टी पुनर्वसन योजनेअंतर्गत लिंक रोड येथे दोन वर्षांपूर्वी मोठ्या प्रमाणावर घरे उभारली आहेत. परंतु, तांत्रिक कारणामुळे ही घरे लोकांना मिळालेली नाहीत. त्यामुळे घरांचे नुकसान होत आहे, या प्रश्नाकडे मेहता यांचे लक्ष वेधण्यात आले. यासंदर्भात महापालिका आणि स्थानिक पदाधिकारी यांनी एकत्रित बसून मार्ग काढावा. आवश्यक तेथे राज्य सरकार सहकार्य करेल,' असे आश्वासन मेहता यांनी दिले.

'एसआरए'कडे लक्ष द्या'

पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील झोपडपट्टी पुनर्वसन (एसआरए) योजनेचा आढावा राज्याचे गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता यांनी घेतला. दोन्ही शहरे मिळून आणि लगतच्या ग्रामीण भागातील जनतेलाही या योजनेचा लाभ मिळावा, यासाठी सरकार प्रयत्नशील राहणार आहे. त्याअंतर्गत अधिक सखोल अभ्यास करण्याच्या सूचना संबंधित खात्याला दिल्याची माहिती मेहता यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘स्वाभिमानी’ कार्यकारिणीची आज बैठक

0
0

कार्यकर्त्यांची मते जाणणार; पुढील दिशा ठरवणार

म. टा. प्रतिनिधी, पुणे

लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकांनंतर भारतीय जनता पक्षाच्या कोलांटउड्यांमुळे यापुढील काळात भाजपसोबत जायचे की नाही, असा प्रश्न स्वाभिमानी शेतकरी संघटनेपुढे पडला आहे. यावर कार्यकर्त्यांची मते जाणून घेऊन पुढील दिशा ठरविण्यासाठी उद्या (शनिवार) व परवा पुण्यात संघटनेच्या राज्यस्तरीय विस्तारित कार्यकारिणीची बैठक होणार आहे.

स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि स्वाभिमानी पक्ष यांची संयुक्त राज्यस्तरीय विस्तारित कार्यकारिणी कोथरूड येथील गांधीभवनात आयोजिण्यात आली असून, पक्षाचे संस्थापक खासदार राजू शेट्टी, प्रदेशाध्यक्ष सदाभाऊ खोत आणि सर्व जिल्ह्यांमधील प्रमुख पदाधिकारी या वेळी उपस्थित राहणार आहेत. प्रामुख्याने केंद्र सरकारचा नवा भूसंपादन कायदा व त्याचा शेतीवर होणारा परिणाम या विषयावर चर्चा होणार आहे. 'शेतकऱ्यांची फसवणूक'

लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकीत 'स्वाभिमानी'ने भाजपला साथ दिली. मात्र, त्या काळात भाजपने दिलेल्या एकाही आश्वासनाची अद्याप पूर्तता झालेली नाही. स्वामीनाथन समितीच्या अहवालाची अंमलबजावणी झाली नाही, तर दुष्काळ-अतिवृष्टी व गारपीटग्रस्त शेतकऱ्यांना केंद्राने कोणतीही मदत केलेली नाही; तसेच एफआरपी देण्यासाठी केंद्राने फक्त घोषणाच केल्या आहेत. त्यामुळे दोन्ही निवडणुकीत भाजपला आशेने मतदान करणाऱ्या शेतकऱ्यांमध्ये आपली फसवणूक झाल्याची भावना दिसून येत असल्याचा सूर 'स्वाभिमानी'च्या गोटात आहे. त्याबरोबरच सत्तेत सहभागी करून घेण्याच्या आश्वासनालाही भाजपने हरताळ फासला आहे. त्यामुळे या विषयांवर कार्यकर्त्यांच्या तीव्र भावना या बैठकीत मांडण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. त्याबरोबरच अशा परिस्थितीत भाजपसोबत फरपट होत असेल, तर शेतकऱ्यांमधील जनाधार गमाविण्याची भीतीही 'स्वाभिमानी'च्या गोटातून व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे भाजपसोबत जायचे की नाही, याबाबतचा निर्णय घ्यावा आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर आक्रमकपणे आंदोलने करावीत, अशी मागणी कार्यकर्त्यांमधून करण्यात येत आहे. त्यामुळे या बैठकीत काय निर्णय होणार, याबाबत राज्यभरातील कार्यकर्त्यांमध्ये उत्सुकता आहे.

गारपीट, शेतमालाचे कोसळलेले दर, शेतमालावर आकारण्यात येणारी आडत, कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या आवारात शेतमालाव्यतिरिक्त होणारे इतर व्यवसाय, आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांचे प्रश्न, शेतकऱ्यांवर वाढत असलेला कर्जाचा बोजा, उसाची थकीत एफआरपी या विषयांवर बैठकीत चर्चा होणार आहे.

- राजेंद्र ढवाण पाटील, जिल्हाध्यक्ष

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शिक्षणहक्काबाबत अडवणूक

0
0

पुणे:

शिक्षणहक्क कायद्यांतर्गत २५ टक्के आरक्षित जागांवरील प्रवेशांसाठी शहरातील काही शाळा पालकांकडून पैसे मागत असल्याचे प्रकार आता समोर आले आहेत. पालकांनी २५ टक्क्यांच्या प्रवेशांसाठी कोणतेही पैसे देऊ नयेत, असे आवाहन शिक्षण खात्याने केले असून, शाळा आणि सरकारच्या वादात विद्यार्थ्यांचे प्रवेश रोखणे योग्य नसल्याचेही राज्य प्राथमिक शिक्षण संचालक महावीर माने यांनी स्पष्ट केले.

शहरात सुरू असलेल्या २५ टक्क्यांच्या ऑनलाइन प्रवेशामध्ये अनेक तांत्रिक अडचणी समोर येत आहेत. खात्याने सुरू केलेली मदत केंद्रेही पालकांना अर्ज भरण्याची मदत करण्यात कमी पडत असल्याची तक्रार पालकांकडून करण्यात येत आहे. या तक्रारींच्या पार्श्वभूमीवर ऑनलाइन प्रक्रियेसाठी येत्या १८ मार्चपर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णयही खात्याने नुकताच घेतला आहे. या विषयीच्या सर्व मुद्द्यांची चर्चा करण्यासाठी समाजवादी अध्यापक सभा आणि कागद काच पत्रा कष्टकरी पंचायतीच्या शिष्टमंडळाने बुधवारी माने यांची भेट घेतली.

'शहरातील काही शाळा प्रवेशांसाठी पालकांकडून मुद्दाम पैसे मागत आहेत; तसेच मदत केंद्रांवरून पालकांना व्यवस्थित माहिती दिली जात नाही. या केंद्रांवर कम्प्युटर हँग होण्याचे प्रकार घडतात. वेळेच्या आधीच ही केंद्रे बंद करून कर्मचारी निघून जातात. फीबाबत शाळा आणि सरकारमध्ये असणाऱ्या मदत केंद्रांची परिस्थिती सुधारण्याचे आश्वासन माने यांनी दिले,' असे प्रा. जावडेकर म्हणाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


‘इपीएफओ’साठी ३५ लाखांचा निधी

0
0

पुणे:

एम्प्लॉइज प्रॉव्हिडंट फंड ऑर्गनायझेशनच्या (इपीएफओ) सभासदांना ऑनलाइन सेवा तत्परतेने मिळण्यासाठी कम्प्युटरायझेशनवर भर देण्यात आला आहे. त्यानुसार राज्यातील 'इपीएफओ'च्या विभागीय कार्यालयांसाठी सुमारे एक कोटी ९६ लाख रुपये उपलब्ध होतील. त्यापैकी पुणे विभागीय कार्यालयासाठी सुमारे ३५ लाख रुपये मिळणार आहेत.

'इपीएफओ'चा कारभार ऑनलाइन करण्याकडे विशेष लक्ष देण्यात आले आहे. त्यामुळे कम्पुटरायझेशनसाठी मोठ्या प्रमाणात तरतूद करण्यात आली आहे. या कामासाठी 'इपीएफओ'ने सुमारे एक कोटी २७ लाख रुपये ठेवले होते. मात्र, सुधारित एस्टिमेंट तयार करून ६९ लाख रुपये वाढविण्यात आले आहेत. या तरतुदीपैकी पुणे विभागीय कार्यालयासाठी ३५ लाख रुपये मिळणार असल्याचे 'इपीएफओ'च्या पुणे कार्यालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.

पुणे कार्यालयासाठी अवघी १६ लाख रुपयांची तरतूद होती. मात्र, आता सुमारे १९ लाख रुपये जास्त उपलब्ध होणार आहेत. या निधीतून नवीन प्रकल्पदेखील राबविले जाणार असल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

पुणे विभागीय कार्यालयाबरोबरच वांद्रे, ठाणे, नागपूर आणि कांदिवली या विभागीय कार्यालयांसाठीही सुधारित एस्टिमेंट बनविण्यात आले आहे. त्यापैकी वांद्रे कार्यालयासाठी ५० लाख रुपये ठेवण्यात आले आहेत. यापूर्वी या कार्यालयासाठी ३० लाख रुपये होते. नागपूर कार्यालयासाठी ४४ लाख रुपये मिळू शकतील. या कार्यालयासाठी यापूर्वी २६ लाख रुपये होते. ठाणे कार्यालयासाठी असलेल्या ३२ लाख रुपयांच्या तरतुदीत आणखी अवघे पाच लाख रुपये वाढविले गेले आहेत. कांदिवली कार्यालयासाठी आता ३० लाख रुपयांची नव्याने तरतूद करण्यात आली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

होर्डिंगवरून कोर्टाचे ताशेरे

0
0

चालढकल करणाऱ्या अधिकाऱ्यांना समज

म. टा. प्रतिनिधी, पुणे

शहरातील होर्डिंग आणि फ्लेक्स हटविण्याबाबत चालढकल करणाऱ्या पालिकेच्या दोन अधिकाऱ्यांची खरडपट्टी काढून हायकोर्टाने त्यांना कडक शब्दांत समज दिली. तर, मुंबईतील राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्यांवर कोर्टाचा अवमान केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे.

शहराचे विद्रूपीकरण रोखण्यासाठी शहराच्या सर्व भागांतील अनधिकृत होर्डिंग, फ्लेक्स आणि बॅनरवर कारवाई करण्याचे आदेश हायकोर्टाने यापूर्वीच दिले होते. त्यानुसार पुणे महापालिकेने अनधिकृत होर्डिंगवर सातत्याने कारवाई केली. तरीही शहराच्या काही भागांतील होर्डिंग हटविण्यात येत नसल्याने कोर्टाच्या आदेशांचे उल्लंघन होत असल्याच्या तक्रारी नागरिकांनी थेट कोर्टाकडेच केल्या होत्या. त्यावर गुरुवारी झालेल्या सुनावणीमध्ये राजकीय पक्षांशी संबंधित होर्डिंग असल्याने त्यावरील कारवाईबाबत चालढकल केली गेल्याचा आरोप तक्रारदारांतर्फे केला गेला. विशेषतः कसबा-विश्रामबागवाडा आणि धनकवडी या क्षेत्रीय कार्यालयांच्या कार्यकक्षेत कारवाई करण्यात टाळाटाळ केली जात असल्याचे सांगण्यात आले. मात्र, पालिकेने होर्डिंगवर केलेल्या कारवाईचा तपशील कोर्टासमोर सादर केल्याने दोन्ही क्षेत्रीय कार्यालयांच्या सहाय्यक आयुक्तांना कोर्टाने समज दिली.

दरम्यान, मुंबईत मनसेचे बाळा नांदगावकर आणि भाजपचे आशिष शेलार व मुकुंद कुलकर्णी यांच्यावर कोर्टाच्या आदेशांचा अवमान झाल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. महिला व बालकल्याण समितीतर्फे लावण्यात आलेल्या होर्डिंगवर मुख्यमंत्र्यांची छायाचित्रे असल्याने विभागाच्या सचिवांवरही कोर्टाने ताशेरे ओढले आहेत; तसेच, मीरा-भाईंदरच्या पोलिसांवरही कारवाईत कसून केल्याचा ठपका ठेवण्यात आला असून, याबाबतची पुढील सुनावणी जूनअखेरीस होणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गोळीबार प्रकरण: दोघांना कोठडी

0
0

दोघांना १९पर्यंत कोठडी

म. टा. प्रतिनिधी, पुणे

कुख्यात गुन्हेगार कुणाल पोळच्या खूनाचा बदला घेण्यासाठी गुंड अजय शिंदेवर बुधवारी झालेल्या गोळीबार प्रकरणी खडक पोलिसांनी अटक केलेल्या दोघांना १९ मार्चंपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी पी. बी. बावस्कर यांच्या कोर्टाने हा आदेश दिला.

पोलिसांनी याप्रकरणी नवनाथ संतोष लोधा (वय २९, रा. घोरपडे पेठ), नागेश ऊर्फ सोन्या सतीश गंगावणे (वय ३१, रा. सुखसागरनगर) या दोघांना अटक केली आहे. तर अप्पा ऊर्फ योगेश बाणेकर, अभिषेक ऊर्फ बाप्पा कसबे (रा. घोरपडे पेठ), सागर बागल यांचा पोलिस शोध घेत आहेत. या हल्ल्यात शिंदेची मैत्रीण मेघना ऊर्फ डॉली माधवराज धंदुकेच्या (२८, रा. कस्तुरे चौक, रविवार पेठ) पोटामध्ये गोळी लागली असून, तिच्यावर उपचार सुरू आहे.

खडक पोलिस वसाहतीतील शिंदेची मैत्रीण मेघना रविवार पेठेतील हिरालाल ज्वेलर्सजवळ असलेल्या विश्वेश्वर बँकेच्यावर राहायला आहे. शिंदे आणि मेघना बुधवारी संध्याकाळी रस्ता ओलांडत असताना आरोपींनी हल्ला केला. त्यानंतर ते पसार झाले. याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या दोघा आरोपींना शुक्रवारी कोर्टात हजर करण्यात आले. त्यांच्याकडे अधिक तपास करण्यासाठी पोलिस कोठडी देण्यात यावी, असा युक्तिवाद सरकारी वकील रजनी तहसीलदार यांनी कोर्टात केला.

या प्रकरणी वरिष्ठ पोलीस निरीक्षक शशीकांत चव्हाण, पोलीस निरीक्षक (गुन्हे) सुनिल दोरगे, उपनिरीक्षक संजय गायकवाड, महेश जानकर, सहायक फौजदार सुरेश गेंगजे, एकनाथ कंधारे, शैलेश जगताप, प्रदीप शिंदे, सुरेश सोनवणे, सर्फराज शेख, महेंद्र पवार, दत्तात्रय खुटवड, प्रल्हाद वाघ यांनी तपास केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘सीरम’च्या अवघ्या २२०० लसी

0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

'स्वाइन फ्लू'ची प्रतिबंधात्मक असलेली 'ट्राय व्हॅक्सिन' असलेली 'नॅझोव्हॅक' ही सीरम इन्स्टिट्यूटची लस बाजारात उपलब्ध झाली असली तरी प्रत्यक्षात पुणेकरांसाठी अवघ्या २२०० लसी उपलब्ध करण्यात आल्या आहेत. मात्र, डॉक्टरांसह काही जणांनी पूर्वनोंदणी केल्याने त्यांच्यापर्यंत प्राधान्याने लसी पोहोचविण्यात आल्या आहेत. त्यामुळे आणखी हजारो लसी उपलब्ध करण्याची मागणी केली आहे.

'स्वाइन फ्लू'चा संसर्ग रोखण्यासाठी रोग प्रतिकारशक्ती तयार करण्यासाठी सीरम इन्स्टिट्यूटच्या लसीचा उपयोग होतो. त्यामुळे राज्यात नागपूर बरोबर पुण्यात मोठ्या प्रमाणात स्वाइन फ्लूचा प्रादुर्भाव निर्माण झाला. त्यामुळे नागरिकांमध्ये भिती आहे. आतापर्यंत राज्यात २४७ जणांचा मृत्यू झाला आहे. त्यापैकी पुण्यात ५२ जणांचा समावेश आहे. सीरमने उत्पादित केलेल्या दोन बॅच बाजारात उपलब्ध होऊन त्याची हातोहात विक्री झाली. बॅचपैकी अवघ्या २२०० लसी पुण्याच्या सदाशिव पेठेतील काही होलसेल विक्रेत्यांकडे उपलब्ध झाल्या आहेत.

'सीरम इन्सिट्यूटने 'नॅझोव्हॅक' लसीच्या दोन बॅच बाजारात उपलब्ध केल्या आहेत. त्यापैकी पुणेकरांसाठी अवघ्या २२०० लसी उपलब्ध केल्याची माहिती कंपनीकडून मिळाली आहे. पुणेकरांकडून लसीची मागणी वाढली असून, एवढ्या लसी पुरेशा नसल्याचे कंपनीच्या निदर्शनास आणून दिले. त्यावर तिसऱ्या बॅचमधील लसींचा साठा पुणेकरांसाठी राखीव ठेवण्याचे आश्वासन त्यांनी दिले आहे. तसेच केमिस्टांकडूनही लसींची मागणी नोंदविण्यात आली आहे', अशी माहिती अन्न व औषध प्रशासनाचे (एफडीए) सहायक आयुक्त सुहास मोहिते यांनी दिली.

लस देण्याचे आदेश केंद्रीय औषध नियंत्रकांकडून (डीसीजीआय) मिळाले होते. त्यानुसार राजस्थान, गुजरात, कर्नाटक, उत्तरप्रदेश, बिहार, दिल्लीसह महाराष्ट्रात लसींचा काही प्रमाणात पुरवठा करण्यात आला. राज्यात पुण्यासह मुंबई, नागपूर येथे लस उपलब्ध करून दिली आहे. आणखी तिसरी बॅच येत्या तीन ते चार दिवसात उपलब्ध केली जाईल. - डॉ. सुरेश जाधव, कार्यकारी संचालक, सीरम इन्सिट्यूट

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दहावीच्या उत्तरपत्रिका वाऱ्यावरच

0
0

सुरक्षित वाहतुकीसाठी बोर्डाकडून सूचनाच नाहीत

म. टा. प्रतिनिधी, पुणे

बारावीच्या परीक्षेतील उत्तरपत्रिकांची टू-व्हीलरवरून होणारी वाहतूक उघड झाली असतानाच, दहावीच्या परीक्षेच्या उत्तरपत्रिकांची वाहतूकही टू-व्हीलरवर, वेळप्रसंगी खासगी चारचाकीमधूनही होत असल्याचे समोर येत आहे. ही धक्कादायक वस्तुस्थिती समोर आली असतानाही, बोर्डाने उत्तरपत्रिकांच्या सुरक्षित वाहतुकीसाठी कोणत्याही विशेष सूचना दिल्या नसल्याचेही याच निमित्ताने समोर येत आहे.

राज्यभरातील दहावी आणि बारावीच्या बोर्डाच्या परीक्षा सध्या राज्यभरात सुरू झाल्या आहेत. या परीक्षांसाठीच्या उत्तरपत्रिकांच्या वाहतुकीची जबाबदारी बोर्ड संबंधित परीक्षा केंद्रांच्या खांद्यावर टाकते. गेल्या काही वर्षांपासून या जबाबदारीपोटी बोर्डाकडून मिळणारे भत्ते आता तुलनेने तोकडे पडत असल्याने केंद्रांकडून बोर्डाच्या उत्तरपत्रिकांच्या वाहतुकीविषयीचे निर्देश धाब्यावर बसविले जात आहेत. त्यामुळेच अगदी टू-व्हीलरवरूनही ही वाहतूक होत असल्याची बाब 'मटा'ने मंगळवारी उघड केली होती. त्यानंतर राज्य बोर्डाचे अध्यक्ष गंगाधर म्हमाणे यांनी उत्तरपत्रिकांची ही धोकादायक वाहतूक थांबविण्यासाठी बोर्ड कटिबद्ध असून, उत्तरपत्रिकांची वाहतूक सुरक्षित पद्धतीने करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचेही सांगितले होते.

मात्र, त्यानंतरही उत्तरपत्रिकांची वाहतूक अजूनही धोकादायक पद्धतीनेच होत असल्याचे गुरुवारी शहरात अनुभवायला मिळाले. त्यातच बुलढाणा जिल्ह्यातील उत्तरपत्रिका वाहतुकी दरम्यान झालेल्या एका अपघातात बोर्डाने उत्तरपत्रिकांची जबाबदारी पोस्ट खात्यावर टाकल्याने, उत्तरपत्रिका गहाळ झाल्यास नेमके जबाबदार कोण, असा सवाल उपस्थित होत आहे.

जबाबदारी वैयक्तिक

दहावीच्या भूमितीच्या परीक्षेनंतर शहरातील परीक्षाकेंद्रांवरून टू-व्हीलरवरून आणलेल्या उत्तरपत्रिका बोर्डाच्या कोठडीवर आणल्या गेल्या. काही केंद्रांनी बोर्डाच्या निकषानुसार, रिक्षामधून उत्तरपत्रिकांची पोती आणली, तर मोजक्या केंद्रांवरून खासगी चारचाकी वाहनातून पोत्यांनी उत्तरपत्रिका कोठडीपर्यंत पोहोचविल्या. बोर्ड चारचाकी वाहनांसाठी पेट्रोल खर्च देत नसले, तरी वैयक्तिक पातळीवर जबाबदारी घेऊन चारचाकी वाहनांमधून उत्तरपत्रिका आणल्याचे संबंधितांनी सांगितले. उत्तरपत्रिकांच्या सुरक्षिततेविषयी बोर्डाने अद्याप कोणतेही विशेष निर्देश दिले नसल्याने पूर्वीप्रमाणेच ही वाहतूक केली जात असल्याचेही संबंधितांकडून सांगण्यात आले.

भूमितीच्या पेपरला १२० कॉपी

दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी गुरुवारी सकाळी झालेल्या भूमितीच्या पेपरला राज्यभरात १२० कॉपी प्रकरणांची नोंद झाल्याची माहिती राज्य बोर्डाने गुरुवारी दिली. यातील निम्म्या कॉपी प्रकरणांची नोंद एकट्या मुंबई विभागीय मंडळामध्येच झाल्याचेही बोर्डाच्या प्रसिद्धीपत्रकात सांगण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जिल्हा बँकांची निवडणूक प्रक्रिया जूनपर्यंत पूर्ण

0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

जिल्हा बँकेसारख्या अग्रणी सहकारी संस्थांची निवडणूक घेण्यापूर्वी संबंधित जिल्ह्यातील प्राथमिक संस्थांच्या निवडणुका घेण्याची गरज नाही, असा महत्त्वपूर्ण निकाल मुंबई हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठाने नुकताच दिला आहे. त्यामुळे येत्या जूनपर्यंत सर्व जिल्हा बँकांच्या निवडणुकीची प्रक्रिया पूर्ण होणार आहे.

या संदर्भात राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाची बाजू हायकोर्टाने ग्राह्य धरली आहे. बीड येथील जिल्हा बँकेची निवडणूक घेण्याबाबत हा प्रश्न उपस्थित झाला होता. प्राथमिक संस्थांवर निवडून आलेले प्रतिनिधी हे जिल्हा बँकेच्या निवडणुकीत मतदार असतात. त्यामुळे येथील प्राथमिक संस्थांची निवडणूक न झाल्यामुळे जिल्हा बँकेची निवडणूक घेता येणार नाही, असा आक्षेप घेण्यात आला होता. मात्र, राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाने वेगळी भूमिका मांडली. प्राथमिक संस्थांच्या निवडणुका झाल्याशिवाय जिल्हा बँकेची निवडणूक घेऊ नये, असे कोणतेही बंधन कायद्याने घातलेले नाही, अशी बाजू मांडण्यात आली. बीडमधील प्राथमिक संस्थांनी निवडणूकपात्र असल्याबाबत माहिती न कळविल्याने या निवडणुका होऊ शकल्या नाहीत, असेही कोर्टाच्या निदर्शनास आणून देण्यात आले.

अखेर कोर्टाने प्राधिकरणाची बाजू ग्राह्य धरली आणि या निवडणूक प्रक्रियेत कोणताही हस्तक्षेप करण्यास नकार दिला. हा निकाल सर्वच जिल्हा बँकांना लागू होणार आहे. त्यामुळे जूनपर्यंत जिल्हा बँकांच्या निवडणुकांची प्रक्रिया पूर्ण करण्याचा मार्ग मोकळा झाल्याचे राज्य सहकारी निवडणूक आयुक्त मधुकर चौधरी यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पुणे, पिंपरीत तीन बळी

0
0

आणखी १५ जणांना लागण; २१ अत्यवस्थ

म. टा. प्रतिनिधी, पुणे

स्वाइन फ्लूच्या संसर्गाने पुण्यासह पिंपरीत तीन जणांचा बळी गेला आहे. पुण्यात नव्याने १५ जणांना लागण झाली असून, २१ जण अत्यवस्थ आहेत. राज्यात आतापर्यंत बळींची संख्या २४७ ए‍वढी झाली आहे.

अनुसया भगवान कदम (वय ५२, रा. कालेवाडी) यांचा रुबी हॉस्पिटलमध्ये दहा मार्चला दुपारी मृत्यू झाला होता. तत्पूर्वी त्यांच्या लाळेचे नमुने तपासणीसाठी राष्ट्रीय विषाणू संस्थेकडे (एनआय़व्ही) पाठविण्यात आले होते. न्यूमोनियाचा संसर्ग, शरिरातील विविध अवयव निकामी होण्याबरोबर सेप्टिसेमिया झाला होता. 'स्वाइन फ्लू'चे निदान होण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. लक्ष्मण खेमा डगळे (वय ५७, रा. धानोरी) यांना तीन मार्चला लागण झाली होती. त्यांच्या उपचार सुरु असताना न्यूमोनिया तसेच 'स्वाइन फ्लू'चा संसर्गही झाला होता. बारा मार्चला त्यांचा दुपारी मृत्यू झाला. पिंपरीमध्ये वर्षा अनिल कुकरेजा (वय १८, रा. पिंपरी) या मुलीचा गुरुवारी सकाळी मृत्यू झाला. पुण्यात आतापर्यंत मृतांची संख्या ५२ झाली आहे.

राज्यात २४७ जण मृत्यूमुखी

राज्यात 'स्वाइन फ्लू'चे ११४ नवीन पेशंट आढळले आहेत. त्यामुळे राज्यातील स्वाइन फ्लूच्या पेशंटची संख्या ३००४ एवढी झाली. राज्यात 'स्वाइन फ्लू'मुळे आतापर्यंत २४७ जणांचा मृत्यू झाला आहे. तर विविध जिल्ह्यांत ४२४ जणांना 'स्वाइन फ्लू'या पेशंटवर उपचार सुरू आहेत. त्यापैकी ३३ जण व्हेंटिलेटरवर आहेत. राज्यात बारा जणांचा मृत्यू झाल्याची आरोग्य विभागाने नोंद केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


‘टॅमी फ्लू’ हवंय...?

0
0

'हेल्पलाईन'ला कॉल करा

केमिस्ट संघटनेची पेशंटसाठी हेल्पलाइन

म. टा. प्रतिनिधी, पुणे

सर्दी, ताप, खोकला यासारखी लक्षणे आढळणाऱ्या पेशंटना पालिकेच्या दवाखान्याऐवजी नायडू हॉस्पिटलला जाण्याची वेळ आली आहे. त्यामुळेच नजिकच्या औषध विक्री दुकानात 'टॅमी फ्लू' उपलब्धतेची माहिती आता एका कॉलवर उपलब्ध होणार आहे.

यासाठी केमिस्ट असोसिएशन ऑफ पुणे डिस्ट्रीक्टने (सीएपीडी) पुढाकार घेऊन हेल्पलाईन कार्यान्वित केली आहे. या हेल्पलाईनवर कॉल करताच तुमच्या घराच्या नजिक 'टॅमी फ्लू' उपलब्ध असणाऱ्या औषध दुकानाची माहिती दिली जाणार आहे, अशी माहिती 'सीएपीडी'चे सचिव विजय चंगेडिया यांनी दिली. ''स्वाइन फ्लू'चा संसर्ग वाढत आहे. त्यामुळे पेशंटमध्ये भीतीचे वातावरण आहे.

पेशंटसाठी शहरातील शंभराहून अधिक 'शेड्यूल एक्स'चा परवाना असलेल्या औषध विक्रेत्यांकडे 'टॅमी फ्लू' उपलब्ध करून दिले आहेत. परंतु, गरजेच्या वेळी पेशंटना औषध कोठे उपलब्ध होईल, हे कळत नाही. त्यामुळे सामाजिक बांधिलकी जपत आम्ही ७७२०८६६४६६ आणि ७७२०९६६४६६ या क्रमांकाची हेल्पपाईन कार्यान्वित केली आहे. पेशंटने या हेल्पलाइनला संपर्क साधताच पेशंटने कोणत्या भागात राहत असल्याची माहिती द्यावी. त्यानुसार त्याच्या घराजवळील औषध विक्रेत्याच्या संपर्क क्रमांकासह दुकानाचा पत्त्याची माहिती दिली जाईल', अशी माहिती चंगेडिया यांनी दिली.

'स्वाइन फ्लू'च्या औषध उपलब्धतेबाबत काही अडचणी आल्यास थेट चंगेडिया यांना फोन करता येणार आहे. त्यासाठी त्यांना ९८२२०८९५८९, अनिल बेलकर यांना ९८२२०४०४९६० आणि चेतन शहा यांच्याशी ९८६०१४१४१८ यावर संपर्क साधावा, असे आवाहन असोसिएशनने केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘स्वाइन फ्लू’च्या लसीचा काळाबाजार

0
0

डॉक्टरांकडूनच पेशंट वेठीस; ७१४ रुपयांची लस अडीच हजार रुपयांना

म. टा. प्रतिनिधी, पुणे

'स्वाइन फ्लू'च्या वाढत्या संसर्गाच्या प्रतिबंधात्मक लसीची मागणी वाढल्याचा गैरफायदा घेत एका कंपनीच्या लसीचा 'काळाबाजार' डॉक्टरांकडून काही दिवसांपासून सुरू असल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. एका कंपनीची ७१४ रुपयांना मिळणारी लस डॉक्टरच खरेदी करून तिप्पट दराने थेट पेशंटना विकत असल्याची माहिती हाती आली आहे.

पुणे-पिंपरी चिंचवडमधील काही बालरोग तज्ज्ञ तसेच फिजिशीयन काळाबाजाराला हातभार लावत असल्याची खात्रीलायक सूत्रांकडून माहिती देण्यात आली. लसींच्या काळाबाजाराला रोखण्याचे आता अन्न व औषध प्रशासनापुढे (एफडीए) मोठे आव्हान निर्माण झाले आहे. जानेवारीपासून राज्यात 'स्वाइन फ्लू'ची संसर्ग वाढत असल्याने हा, उद्रेक असल्याची कबुली देताना आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी चिंता व्यक्त केली. लस बाजारात कधी येणार याची नागरिकांकडून केमिस्टांकडे चौकशी केली जात आहे.

दरम्यान, सीरम इन्स्टिटयूटची 'ट्रायव्हॅक्सिन' असलेल्या 'नॅझोव्हॅक' एक लाख तीस हजार लसींची विक्री बाजारात झाली. 'अॅबॉट' कंपनीची इंजेक्शन असलेले 'इन्फ्लूव्हॅक' नावाची लसही बाजारात आली असून, त्याच्या तीन ते चार हजार लस उपलब्ध झाल्या आहेत. काही केमिस्टांसह कंपनीकडून थेट डॉक्टरांना विकण्यात आल्या आहेत. लसींची वाढती मागणी आणि 'स्वाइन फ्लू'चा वाढता उद्रेक याचा गैरफायदा घेत वाहत्या गंगेत हात धुवून घेण्यासाठी डॉक्टरमंडळी पुढे सरसावली आहेत. त्यामुळे केमिस्टांकडे असलेली लस पेशंट डॉक्टरांकडे घेऊन गेल्यास त्यांना 'आमच्याकडूच लस विकत घ्यावी लागेल. केमिस्टांकडील लस चालणार नाही', असा दम डॉक्टर भरू लागले आहेत. त्यामुळे पेशंट थेट डॉक्टरकडून लस टोचून घेत असून, त्यासाठी त्यांना आठशे ते अडीच हजार रुपयांपर्यंतची रक्कम मोजावी लागत आहे. डॉक्टरांकडून लसींचा काळाबाजार सुरू असल्याच्या तक्रारी पुढे आल्या आहेत. हा काळाबाजार रोखण्याची पेशंटकडून मागणी होत आहे.

डॉक्टर 'टॅमी फ्लू' का देत नाहीत?

'स्वाइन फ्लू'चे पेशंट वाढत आहेत. त्यामुळे नागरिकांमध्ये भिती आहे. अशा परिस्थितीत 'टॅमी फ्लू'सारखी औषधे उपलब्ध करण्याचे 'शेड्यूल एक्स'चा परवाना असलेल्या केमिस्टांना आदेश देण्यात आले आहेत. मात्र दुसरीकडे डॉक्टरच ७१४ रुपयांची 'इन्फ्लूव्हॅक' ही लस दोन ते अडीच हजार रुपयांना पेशंटना विकत आहेत. 'केमिस्टांना ही लस विकता येणार नाही. तुम्हाला अधिकार नाहीत,' अशी तंबीच डॉक्टरांकडून केमिस्टांना देण्यात येत आहे. त्यामुळे डॉक्टर जर जादा किमतीला लस विकत असतील तर 'त्यांनी टॅमी फ्लू'ची औषधे देखील विकावीत अशी प्रतिक्रिया देत केमिस्टांनी संताप व्यक्त केला आहे.

स्वाइन फ्लूच्या लसींची तिप्पट दराने डॉक्टरांकडून विक्री होत आहे. हा चुकीचा प्रकार असून, त्या सदर्भातील केमिस्ट संघटनेला तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. या प्रकरणासंदर्भात 'एफडीए'ने कारवाई करावी. - अनिल बेलकर, सचिव पश्चिम महाराष्ट्र केमिस्ट संघटना

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘रिलायन्स जिओ’वर फौजदारी गुन्हा

0
0



महापालिकेकडून दिलेली सर्व कामे रद्द

म. टा. प्रतिनिधी, पुणे

महापालिकेने दिलेल्या परवानगीकडे दुर्लक्ष करत शहरातील रस्त्यांची चुकीच्या पद्धतीने खोदाई करून रस्त्याची दुर्दशा करणाऱ्या रिलायन्स जिओ कंपनीची सर्व कामे बंद करण्यात आली आहेत. ओव्हरहेड केबल टाकण्यास बंदी असतानाही संगमवाडी परिसरात या कंपनीने दहा किलोमीटर ओव्हरहेड केबल टाकल्याने या कंपनीविरोधात महापालिकेने फौजदारी गुन्हा दाखल केला आहे. येरवडा पोलिस स्टेशनमध्ये हा फौजदारी गुन्हा दाखल करण्यात आला.

शहरातील विविध भागात केबल टाकण्यासाठी रस्ता खोदाईची परवानगी रिलायन्स जिओ कंपनीने महापालिकेकडून घेतली होती. महापालिका प्रशासनाने विविध भागात १८६ किलोमीटरची खोदाई करण्याची मान्यता कंपनीला दिली होती. पालिकेकडून एका भागाची परवानगी घेऊन प्रत्यक्षात दुसऱ्याच ठिकाणचे रस्ते कंपन‌ीने परस्पर खोदले होते. हे रस्ते खोदताना पालिकेने घालून दिलेल्या नियम आणि अटींकडे दुर्लक्ष करत चुकीच्या पद्धतीने कंपनीने रस्ते खोदले होते. नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक असलेली काळजी घेण्यात येत नसल्याचे स्पष्ट झाल्याने या कंपनीचे काम थांबवून त्यांच्याकडून खुलासा घेण्याचे आदेश महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त ओमप्रकाश बकोरिया यांनी गेल्या आठवड्यात पथ विभागाला दिले होते. त्यानुसार पथ विभागाने कंपनीकडून खुलासा मागविला मात्र त्यामध्ये समाधानकारक खुलासा न आल्याने शहरातील सर्व कामे थांबविण्याचे आदेश देण्यात आल्याचे पथ विभागाचे प्रमुख वि‌वेक खरवडकर यांनी सांगितले.

जिओ कंपनीला देण्यात आलेल्या परवानगीपैकी ६० किलोमीटरची खोदाई पूर्ण झाली असून, उर्वरित खोदाई बंद करावी, असे महापालिका प्रशासनाने कंपनीला कळविले आहे. ओव्हरहेड केबल टाकण्यास कोणतीही परवानगी दिलेली जात नसतानाही याकडे दुर्लक्ष करत कंपनीने संगमवाडी भागात मोठ्या प्रमाणात चुकीच्या पद्धतीने केबल टाकल्याचे समोर आल्याने त्यांच्या विरोधात फौजदारी गुन्हा दाखल करण्यात आल्याचे महापालिकेचे विद्युत विभागाचे प्रमुख विजय दहिभाते यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गारपिटीची टांगती तलवार कायम

0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

पुण्यासह राज्यात गुरुवारी पावसाचा जोर ओसरला असला, तरी पाऊस आणि गारपिटीचे संकट अजून दूर झालेले नाही. पुढील तीन दिवसांत राज्यासह मध्य आणि उत्तर भारतात मेघगर्जनेसह पावसाची व तुरळक ठिकाणी गारपिटीची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. शुक्रवारी शहरात हवामान ढगाळ राहण्याची शक्यता असून, मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी गारांसह पावसाची शक्यता आहे.

दरम्यान, सध्या महाराष्ट्रासह मध्य आणि उत्तर भारतात होत असलेल्या पावसाबाबत हवामान विभागाने पत्रकाद्वारे माहिती दिली आहे. 'पूर्वेकडून वाहणारे बाष्पयुक्त वारे आणि उत्तरेकडून वाहणारे थंड व कोरडे वारे यांच्या संयोगामुळे राज्यासह काही ठिकाणी पाऊस होत आहे. पुढील तीन दिवसांतही वाऱ्यांचे हे दोन्ही प्रवाह एकत्र येऊन राज्यासह मध्य आणि उत्तर भारतात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे. तर या भागात तुरळक ठिकाणी गारपिटीचीही शक्यता आहे,' असे या पत्रकात म्हटले आहे. दरम्यान, गुरुवारी पुण्यात आकाश निरभ्र होते. शहर आणि उपनगरातही पावसाने हजेरी लावली नाही. राज्यात नाशिक येथे पाच मिलिमीटर पावसाची नोंद झाली. अन्य ठिकाणी तुरळक स्वरूपाच्या सरींनी हजेरी लावली. मात्र, राज्यात अनेक ठिकाणी तापमानात वाढ झाली होती. पुण्यात गुरुवारी ३३.३ अंश सेल्सियस इतके कमाल, तर १७.५ अंश सेल्सियस इतके किमान तापमान नोंदले गेले. राज्यातील सर्वाधिक तापमान भीरा येथे (४० अंश सेल्सियस) नोंदले गेले. तर सर्वात नीचांकी तापमान महाबळेश्वर येथे (१६ अंश सेल्सियस) नोंदले गेले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘सीरम’च्या अवघ्या २२०० लसी

0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

'स्वाइन फ्लू'ची प्रतिबंधात्मक असलेली 'ट्राय व्हॅक्सिन' असलेली 'नॅझोव्हॅक' ही सीरम इन्स्टिट्यूटची लस बाजारात उपलब्ध झाली असली तरी प्रत्यक्षात पुणेकरांसाठी अवघ्या २२०० लसी उपलब्ध करण्यात आल्या आहेत. मात्र, डॉक्टरांसह काही जणांनी पूर्वनोंदणी केल्याने त्यांच्यापर्यंत प्राधान्याने लसी पोहोचविण्यात आल्या आहेत. त्यामुळे आणखी हजारो लसी उपलब्ध करण्याची मागणी केली आहे.

'स्वाइन फ्लू'चा संसर्ग रोखण्यासाठी रोग प्रतिकारशक्ती तयार करण्यासाठी सीरम इन्स्टिट्यूटच्या लसीचा उपयोग होतो. त्यामुळे राज्यात नागपूर बरोबर पुण्यात मोठ्या प्रमाणात स्वाइन फ्लूचा प्रादुर्भाव निर्माण झाला. त्यामुळे नागरिकांमध्ये भिती आहे. आतापर्यंत राज्यात २४७ जणांचा मृत्यू झाला आहे. त्यापैकी पुण्यात ५२ जणांचा समावेश आहे. सीरमने उत्पादित केलेल्या दोन बॅच बाजारात उपलब्ध होऊन त्याची हातोहात विक्री झाली. बॅचपैकी अवघ्या २२०० लसी पुण्याच्या सदाशिव पेठेतील काही होलसेल विक्रेत्यांकडे उपलब्ध झाल्या आहेत.

'सीरम इन्सिट्यूटने 'नॅझोव्हॅक' लसीच्या दोन बॅच बाजारात उपलब्ध केल्या आहेत. त्यापैकी पुणेकरांसाठी अवघ्या २२०० लसी उपलब्ध केल्याची माहिती कंपनीकडून मिळाली आहे. पुणेकरांकडून लसीची मागणी वाढली असून, एवढ्या लसी पुरेशा नसल्याचे कंपनीच्या निदर्शनास आणून दिले. त्यावर तिसऱ्या बॅचमधील लसींचा साठा पुणेकरांसाठी राखीव ठेवण्याचे आश्वासन त्यांनी दिले आहे. तसेच केमिस्टांकडूनही लसींची मागणी नोंदविण्यात आली आहे', अशी माहिती अन्न व औषध प्रशासनाचे (एफडीए) सहायक आयुक्त सुहास मोहिते यांनी दिली.

लस देण्याचे आदेश केंद्रीय औषध नियंत्रकांकडून (डीसीजीआय) मिळाले होते. त्यानुसार राजस्थान, गुजरात, कर्नाटक, उत्तरप्रदेश, बिहार, दिल्लीसह महाराष्ट्रात लसींचा काही प्रमाणात पुरवठा करण्यात आला. राज्यात पुण्यासह मुंबई, नागपूर येथे लस उपलब्ध करून दिली आहे. आणखी तिसरी बॅच येत्या तीन ते चार दिवसात उपलब्ध केली जाईल. - डॉ. सुरेश जाधव, कार्यकारी संचालक, सीरम इन्सिट्यूट

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images