Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

विद्यापीठाकडून दंड वसुलीस टाळाटाळ

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने आपल्या हद्दीत इमारती बांधताना पालिकेच्या बांधकाम खात्याचे विकसन शुल्क भरले नसल्याचे समोर आले आहे. २७ इमारतींचे विकसन शुल्क भरलेले नसताना आणि बेकायदा पद्धतीने बांधकाम केलेले असतानाही महापालिका प्रशासन त्यांच्यावर कारवाई करून दंड वसूल करण्यास टाळाटाळ करत असल्याचा आरोप केला जात आहे. पुणे विद्यापीठ हे राज्य सरकारचे असल्याने विकसन शुल्क माफ असल्याचे कारण पुढे करून हे शुल्क बुडविले जात असल्याचा आरोप होत आहे.

विद्यापीठाच्या आवारात इमारतींचे बांधकाम करताना पालिकेच्या बांधकाम खात्याची कोणतीही परवानगी न घेता विद्यापीठाने अनेक इमारती बांधल्या आहेत. या इमारतींचा पूर्णत्वाचा दाखला न घेता याचा परस्पर वापर सुरू केला असल्याचे वृत्त 'महाराष्ट्र टाइम्स'ने सर्वांत अगोदर प्रसिद्ध करून याला वाचा फोडली होती. महापालिकेच्या बांधकाम विभागाची परवानगी न घेता विद्यापीठाच्या आवारात इमारती उभारून त्याचा वापर सुरू करणाऱ्या विद्यापीठ प्रशासनाकडून महापालिकेने विकसन शुल्क आणि विनापरवाना बांधकाम केल्याप्रकरणी दंड वसूल करावा, अशी मागणी गेल्या महिन्यात सजग नागरिक मंचाचे विवेक वेलणकर, विश्वास सहस्रबुद्धे यांच्यासह विद्यापीठाचे माजी सिनेट सदस्य डॉ. अतुल बागूल यांनी केली होती.

दंड वसुलीसाठी पालिकेच्या मिळकत कर विभागाकडे अनेकदा पाठपुरावा करूनही महापालिका प्रशासन याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करून दंडाची वसुली करण्यास टाळाटाळ करत असल्याचा आरोप वेलणकर यांनी केला. शहरातील सर्वसामान्य नागरिकांनी पालिकेची परवानगी न घेता बांधकाम केले आणि त्याचा प्रॉपर्टी टॅक्स बुडविला तर त्याला वेगळा न्याय आणि गेली अनेक वर्षे बेकायदा बांधकाम करून पालिकेचा कोट्यवधी रुपयांचा टॅक्स बुडविणाऱ्या विद्यापीठाला दुसरा न्याय कसा, असा प्रश्न सजग नागरिक मंचाने उपस्थित केला आहे.

एमआरटीपी कायद्यानुसार केंद्र आणि राज्य सरकारच्या खात्यांना बांधकाम करताना भरावयाचे विकसन शुल्क माफ असते. विद्यापीठ ही सरकारी संस्था असल्याचे कारण पुढे करून त्यांना सूट देण्याचा प्रयत्न केला जात आहे. मात्र, विद्यापीठ कायद्यानुसार विद्यापीठ ही स्वायत्त संस्था आहे. महावितरण आणि आयुकाप्रमाणे विद्यापीठ ही स्वतंत्र संस्थाच असल्याने त्यांच्याकडून बुडविलेला कोट्यवधी रुपयांचा दंड आणि प्रॉपर्टी टॅक्स महापालिकेने वसूल करावा.

- सजग नागरिक मंच

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


बनावट कागदपत्रांच्या आधारे जमीन घोटाळा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पिंपरी

बनावट कागदपत्रे तयार करून जमीन विक्री केल्याप्रकरणी सरकारी अधिकारी, विविध बांधकाम व्यावसायिकांसह काही बड्या धेंडांवर हिंजवडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याचप्रमाणे फिर्यादी यांनी काही सनदी अधिकारी यामध्ये सामील असल्याचा आरोप केला असून, चौकशीनंतर त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

शहीद अब्दुल रज्जाक सय्यद (वय ४०, रा. खराळवाडी, पिंपरी) यांनी हिंजवडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. किशोरीलाल गोयल, प्रकाश जगन्नाथ दगडे, रंजित बुवाजी निमण, जयंत वल्लभ कनेरिया, प्रीतम ईश्वरचंद गोयल, धीरजलाल हंसारिया, अनंत भगवान मानेकर, वैशाली विलास लांबे, ईश्वरचंद किशोरीलाल गोयल, सचिन ईश्वरचंद गोयल, दत्तात्रय नामदेव ढोरे, ज्योती चंद्रकांत बेलदिकर, गोपाळ कृष्ण पिल्ले, किरण सोनावणे, एस. जी. कराडकर, उत्तरेश्वर लोंढे, किशोरीलाल गोया, अभिनव ग्रुप, रेनबो हाउसिंग आदींवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या व्यतिरिक्त अन्य काही सनदी अधिकारी या प्रकरणात सामील असल्याचेही तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. मात्र, त्यांचा गुन्ह्यात सहभाग आहे की नाही याची चौकशी आणि खातरजमा करून मग त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचे वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुरेश भोसले यांनी दिलेल्या माहितीनुसार, जमिनीसंदर्भात मृत व्यक्तींच्या नावाने कागदपत्रे सादर करून; तसेच बनावट कागदपत्रांच्या साह्याने खरेदीखत करून जमिनीचा गैरव्यवहार केल्याची तक्रार संस्थेचे प्रवर्तक शहीद अब्दुल सय्यद यांनी सोमवारी (९ मार्च) हिंजवडी पोलिस ठाण्यात दिली. राजेंद्र बादल याने किरण सोनवणे व एस. जी. कऱ्हाडकर यांच्याशी संगनमत करून गंगोत्री गृहरचना सहकारी संस्थेच्या जमिनीचे बनावट खरेदीखत तयार केले आणि जमीन जयंत कनरिया व ईश्वरचंद गोयल या दोघांना विकली. नगररचनाचे सहायक संचालक उत्तरेश्वर लोंढे यांच्याकडून बोगस खरेदीखतावरून बांधकाम परवाना मंजूर करून घेतला. संबंधित जमिनीवर बांधकामही केले. याप्रकरणी वरिष्ठ निरीक्षक भोसले तपास करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ट्रकच्या धडकेत कात्रजजवळ दोन ठार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

कात्रज-देहूरोड बायपासवर कात्रजजवळ सिमेंट मिक्सर ट्रकची धडक बसल्याने मोटारसायकलवरील दोघांचा मृत्यू झाला. मंगळवारी सायंकाळी साडेसातच्या सुमारास ही दुर्घटना घडली. अमोल शिवराम मेंगडे (वय २९, रा. बालाजीनगर) आणि पोपट धोंडिबा मारणे (वय ६०, रा. दत्तनगर) अशी मृतांची नावे आहेत.

अमोल आणि पोपट दोघे कामावरून घरी चालले होते. कात्रजजवळ त्रिमूर्ती गार्डन मंगल कार्यालयासमोर सिमेंट मिक्सर ट्रकची त्याच्या मोटारसायकलला पाठिमागून धडक बसली. त्यामध्ये दोघेही मरण पावले. अमोल हा फरशीच्या दुकानात कामाला होता. तो मूळचा सातारा येथील असून, सध्या बालाजीनगर येथे रहात होता. मारणे हे फॅब्रिकेशनचे काम करत असत. अपघातानंतर ट्रकचालक फरारी झाला असल्याची माहिती भारती विद्यापीठ पोलिसांनी सांगितले. दरम्यान, ​​त्रिमूर्ती गार्डन मंगल कार्यालयासमोरचे ठिकाण वाहतुकीच्या दृष्टीने धोकादायक बनले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नव्या महापालिकेचे मुख्यमंत्र्यांकडून संकेत

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

नव्या पुण्यासाठी नवी महापालिका स्थापन करण्याशिवाय पर्याय नसल्याचे संकेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. पुणे महापालिकेत नव्याने समाविष्ट करून घेण्यात आलेल्या ३४ गावांचा बोजा पालिका कसा पेलणार, याबाबत पुण्याचे जिल्हाधिकारी व पालिकेच्या आयुक्तांकडून अहवाल मागण्यात आला आहे. त्याचा अभ्यास करून नवीन पालिकेबाबतचा औपचारिक निर्णय घेण्यात येईल.

पुण्याचा वाढता विस्तार लक्षात घेता हडपसर आदी भागांकरिता नवीन महापालिका स्थापण्याची गरज व्यक्त करून 'महाराष्ट्र टाइम्स'तर्फे याबाबत सातत्याने पाठपुरावा करण्यात येत आहे. आमदार योगेश टिळेकर यांनी विधानसभेत नवीन महापालिकेचा प्रश्न उपस्थित केला. नवीन गावांचा समावेश करण्यात आल्यानंतर त्यासाठीच्या सुविधा उपलब्ध करून देणे सध्याच्या महापालिकेला शक्य आहे का, नागरी सुविधांचा यापूर्वीच बोजवारा उडाला असताना समाविष्ट गावांचे भवितव्य कसे असणार, असे प्रश्न त्यामधून मांडण्यात आले.

'पालिकेत नव्याने ३४ गावांच्या समावेश करण्याबाबत वेगाने कार्यवाही केली जात आहे; मात्र, गावांच्या समावेशामुळे येणारा ताण आणि शहराचा वाढणारा भौगोलिक विस्तार विचारात घेऊन प्रशासनाची कशा पद्धतीने रचना करायची, याचा विचार करण्यात येईल. त्या संदर्भातील अहवाल तातडीने मागवून उपलब्ध पर्यायांचा विनाविलंब विचार करण्यात येईल. समाविष्ट गावांसाठी नवीन प्रशासकीय यंत्रणा उभारण्याशिवाय पर्याय नाही,' अशा शब्दांत फडणवीस यांनी नवीन महापालिका स्थापण्याचे संकेत दिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘TDS’ विरोध : बँका कोर्टात जाणार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

नागरी सहकारी बँकांनी सभासदांच्या ठेवींवर दिलेल्या व्याजावर पूर्वलक्ष्यी प्रभावाने उद्गगम कर (टीडीएस) दंडासहित भरावा, अशी नोटीस प्राप्तीकर विभागाने नागरी सहकारी बँकांना बजावली आहे. या आदेशामुळे नागरी सहकारी बँका अडचणीत आल्या आहेत. त्यांच्या अस्तित्वावरच टाच येण्याची शक्यता असल्याने नागरी सहकारी बँकांनी याबाबत हायकोर्टात जाण्याचा निर्णय घेतला आहे.

'नॅशनल फेडरेशन ऑफ अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक्स अँड क्रेडिट सोसायटीज लिमिटेड'चे (नॅफकॅब) अध्यक्ष डॉ. मुकुंद अभ्यंकर यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. कॉसमॉस को-ऑपरेटिव्ह बँकेचे सीईओ विक्रांत पोंक्षे या वेळी उपस्थित होते.

'प्राप्तीकर कायद्यातील कलम '१९४-अ'नुसार ठेवींवरील व्याज दहा हजार रुपयांपेक्षा अधिक असल्यास टीडीएस कापला जातो; परंतु याच कलमातील एका उपकलमानुसार ठेवीदार बँकेचा सभासद असेल, तर १९९५ पासून सभासदाने ठेवलेल्या ठेवींवर व्याज देताना टीडीएस कापणे आवश्यक नव्हते. त्यानुसार बँकांनी ही कपात केलेली नाही. संबंधित सभासद आपापल्या टॅक्स रिटर्नमध्ये त्याबाबतचा उल्लेख करत होते.'

'केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळ (सीबीडीटी) आणि जळगाव अर्बन बँकेच्या केसबाबत निकाल देताना हायकोर्टानेही सभासदांच्या ठेवींवर टीडीएस कापणे आवश्यक नसल्याचे स्पष्ट केले होते; तसेच सभासदांमध्ये याबाबत भेदभाव करता येणार नाही, असेही सांगितले होते. मात्र दोन-अडीच महिन्यांपासून प्राप्तीकर विभागाने देशभरात नागरी सहकारी बँकांना नोटीस बजावत मागील तीन वर्षांपासून बँकेने सभासदांच्या ठेवींवर कापलेल्या टीडीएसची माहिती मागवली आहे; तसेच टीडीएस कापला नसल्यास टीडीएसची रक्कम व त्यावर मोठ्या प्रमाणावर दंड भरण्याचेही आदेश देण्यात आले आहेत.'

'यंदा अर्थमंत्री अरुण जेटली यांनी अर्थसंकल्पात सहकारी सोसायट्या आणि सहकारी बँका यांना वेगवेगळे संबोधले आहे. बँकिंग परवाना असलेल्या सहकारी संस्थांना एक एप्रिल २०१५ पासून ठेवींवरील व्याज दहा हजारांपेक्षा अधिक असल्यास टीडीएसची सक्ती करण्यात आली आहे. त्याला आमचा विरोध नाही; परंतु त्यात ही रक्कम पूर्वलक्ष्यी प्रभावाने वसूल करण्याबाबत कोणताही आदेश नाही. तरीही प्राप्तीकर विभागाने नोटीस पाठवून पूर्वलक्ष्यी प्रभावाने टीडीएसची रक्कम आणि त्यावर मोठा दंड आकारण्यास सुरुवात केली आहे. प्रत्येक बँकेला २० ते ६० कोटी रुपयांपर्यंत रक्कम भरण्याचे आदेश देण्यात आल्याने बँका अडचणीत आल्या आहेत.'

देशभरात १५८७ नागरी सहकारी बँका आहेत. यातील बहुसंख्य बँका छोट्या आहेत. त्यांच्या नफ्यापेक्षा अधिक रक्कम दंड म्हणून भरण्यास सांगण्यात आल्याने या बँकांच्या अस्तित्वाचाच प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे काही नागरी सहकारी बँकांनी याबाबत मुंबई हायकोर्टात दाद मागण्याचा निर्णय घेतला आहे. लवकरच याबाबतची याचिका दाखल करण्यात येईल.

- डॉ. मुकुंद अभ्यंकर, अध्यक्ष, नॅफकॅब

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पेपरमधील चुकांचे मिळणार गुण

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

बारावी सायन्सच्या विद्यार्थ्यांच्या गणित आणि केमिस्ट्रीच्या प्रश्नपत्रिकांमधील चुकांसाठी राज्य परीक्षा मंडळ मार्क देणार असल्याचे अखेर मंगळवारी स्पष्ट झाले. ज्या विद्यार्थ्यांनी हे चुकीचे प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न केला आहे, त्यांना गणिताच्या पेपरमध्ये सात, तर केमिस्ट्रीच्या पेपरमध्ये चार मार्क दिले जाणार आहेत.

बोर्डाच्या नुकत्याच झालेल्या गणित आणि केमिस्ट्रीच्या पेपरमध्ये प्रत्येकी दोन प्रश्नांमध्ये चुका झाल्याचे बोर्डाच्या चीफ मॉडरेटर्सच्या सभेत उघड झाले होते. त्यानंतर संबंधित मॉडरेटर्सनीच दोन्ही पेपरमधील चुकांसाठी विद्यार्थ्यांना मार्क दिले जाणार असल्याचे परस्पर जाहीर केले होते. त्या पार्श्वभूमीवर बोर्डाने संबंधित मॉडरेटर्सवर कारवाई करण्याचे संकेतही दिले होते. मात्र बोर्डाची अधिकृत भूमिका जाहीर होत नसल्याने विद्यार्थ्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण होते. या पार्श्वभूमीवर बोर्डाचे अध्यक्ष गंगाधर म्हमाणे यांनी मंगळवारी बोर्डाची भूमिका जाहीर केली. म्हमाणे म्हणाले, 'गणित आणि केमिस्ट्रीमध्ये चुकलेल्या प्रश्नांचे मार्क दिले जाणार आहेत. हे प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न करणाऱ्या विद्यार्थ्यांनाच ते मार्क मिळतील. तसे निर्देश सर्व विभागीय मंडळांना दिले आहेत'.

पेपरफुटीबाबत अहवाल

कोणतेही अधिकार नसताना या प्रकाराविषयी जाहीर माहिती देणाऱ्या मॉडरेटर्सवर कारवाईचे आदेश देण्यात आल्याचेही म्हमाणे यांनी स्पष्ट केले. मुंबईतील पेपरफुटीच्या प्रकाराबाबत मुंबई विभागीय मंडळाला पोलिसात तक्रार दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. राज्यातील पेपरफुटीच्या इतर घटनांविषयी संबंधित विभागीय मंडळांकडून अहवाल आल्यानंतरच बोर्डाची भूमिका जाहीर केली जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

उत्तरपत्रिका हव्या सुरक्षित

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

बोर्डाच्या उत्तरपत्रिकांची धोकादायक वाहतूक केवळ विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्यच नाही, तर ही वाहतूक करणाऱ्या कर्मचारी आणि वेळप्रसंगी संबंधित केंद्र संचालकांची नोकरीही धोक्यात घालणारी ठरली असल्याचे अनुभव आता पुढे येत आहेत. बोर्डाकडून कारवाई होण्याच्या भीतीने याविषयी खुली चर्चा होत नसली, तरी 'मटा'च्या भूमिकेचे स्वागत करून उत्तरपत्रिकांची असुरक्षित वाहतूक थांबविण्याची मागणी आता जोर धरत आहे.

बोर्डाचा पेपर झाल्यानंतर केंद्र प्रमुख आपल्या कर्मचाऱ्यांच्या मदतीने आपल्याकडील सर्व उत्तरपत्रिका बोर्डाच्या कोठडीपर्यंत पोहोचवितात. केंद्रावर जमा झालेल्या उत्तरपत्रिकांच्या नोंदी तपासणे, नोंदी पडताळून पाहिल्यानंतर त्यांचे गठ्ठे बांधणे, हे गठ्ठे रिक्षा वा दुचाकीवरून कोठडीवर पोहोचविणे आणि तेथून पडताळणी झाल्यानंतर परत फिरणे या टप्प्यांमधून हा प्रवास होतो. मात्र, या दरम्यानच्याच प्रवासामध्ये एक उत्तरपत्रिका गहाळ झाल्याचा प्रकार घडल्याची बाब काही वर्षांपूर्वी घडल्याची कबुली एका केंद्र संचालकाने नाव न सांगण्याच्या अटीवर 'मटा'ला दिली. केवळ प्रामाणिक रिक्षाचालक, संबंधित विद्यार्थी आणि पालकांनी केलेले सहकार्य आणि कोणतेही दडपण न घेता उत्तरपत्रिका शोधण्यासाठी केलेल्या प्रयत्नांमुळेच मूळ उत्तरपत्रिका साधारण तासाभराच्या काळात परत मिळविता आल्याचे या केंद्र संचालकाने स्पष्ट केले. मात्र या संपूर्ण प्रकारामुळे पर्यवेक्षकाचे ब्लडप्रेशर वाढल्याने, उत्तरपत्रिका सापडल्यानंतर तत्काळ हॉस्पिटलमध्ये दाखल करावे लागल्याची आठवणही या केंद्र संचालकाने सांगितली.

'बोर्डाच्या प्रश्नपत्रिकांसाठी कमालीची सुरक्षितता बाळगली जाते. बोर्डाच्या उत्तरपत्रिकांसाठीही ही सुरक्षितता बाळगणे गरजेचे आहे. मात्र बोर्ड त्याची जबाबदारी केंद्र संचालक आणि शाळा-कॉलेजांच्या कर्मचाऱ्यांवर टाकते. वेळेत उत्तरपत्रिका पोहोचविण्याच्या गडबडीत अनेकदा छोटे-मोठे अपघातही होतात. मात्र केवळ विद्यार्थ्यांचा विचार करून आम्ही ही जबाबदारी पार पाडतो. बोर्डाने या प्रकारांची दखल घेऊन उत्तरपत्रिकांची वाहतूक सुरक्षितपणे करण्यासाठीची यंत्रणा उभारावी,' अशी मागणी एका मुख्याध्यापकाने नोंदविली.

शिक्षणमंत्रिमहोदय, विद्यार्थ्यांकडे लक्ष द्या

दहावी-बारावीच्या उत्तरपत्रिका कचराकुंडीत सापडल्या, असे वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर शैक्षणिक क्षेत्रातील कार्यकर्ते या नात्याने विनोद तावडे यांनी आंदोलने छेडली आहेत. विद्यार्थ्यांच्या हितरक्षणासाठी चोख व्यवस्था राखण्यासाठी पुढाकार घेतला आहे. उत्तरपत्रिकांचा प्रवास सुरक्षित करून विद्यार्थ्यांचे भवितव्यदेखील सुरक्षित ठेवण्यासाठी आता राज्याचे शिक्षणमंत्री या नात्याने लक्ष द्या!

उत्तरपत्रिकांच्या सुरक्षित वाहतुकीसाठी बोर्ड आग्रही आहे. त्यासाठी सर्व संबंधित घटकांचा विचार करून योग्य निर्णय घेण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत.

- गंगाधर म्हमाणे, अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पुणे विद्यापीठ ‘शिक्केबहाद्दर’

$
0
0

योगेश बोराटे, पुणे

पदवी प्रमाणपत्रातील चुकांमुळे नामुष्की सोसावी लागली असतानाच सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने 'रँक सर्टिफिकेट'देखील जुनीच देण्याचा कारभार केला आहे. 'युनिव्हर्सिटी ऑफ पुणे' अशाच नावाची ही मूळ प्रमाणपत्रे असून, त्यावर केवळ शिक्क्याद्वारे 'सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटी' असा उल्लेख करण्यात आला आहे. सावित्रीबाईंच्या नावाने नामविस्तार करण्याचा आग्रह धरतानाच प्रत्यक्ष कामकाजात मात्र त्यांचा किती आदर राखला जात आहे, याची यावरून प्रचिती येत आहे.

सर्वोत्कृष्ट कामगिरी नोंदवणाऱ्या विद्यार्थ्यांना विद्यापीठ 'रँक होल्डर' म्हणून गौरवते. गेल्या दोन वर्षांपासून विद्यापीठाच्या परीक्षा विभागाने त्यासाठीची काही प्रमाणपत्रे दिलीच नाहीत. त्यामुळे संबंधित विद्यार्थी-विद्यार्थिनींनी विद्यापीठाकडे पाठपुरावा सुरू केला होता. नावात बदल झाल्यानंतरचा सर्व कारभार नवीन नावानेच केला जाणे अपेक्षित आहे. त्यासाठी सर्व कागदपत्रे, प्रमाणपत्रे नव्याने छापून घेणे आवश्यक होते. प्रत्यक्षात जुन्याच प्रमाणपत्रावर शिक्के मारून विद्यापीठ कारभार करीत आहे. 'रँक होल्डर' म्हणून मिळालेले सर्टिफिकेट हा विद्यार्थ्यांसाठी आयुष्यभराचा ठेवा असतो. त्यावर अशा प्रकारे केवळ शिक्क्याच्या आधारे वेळ मारून नेणे हा विद्यार्थ्यांचा अपमान आहे, अशा शब्दांत विद्यार्थी-पालकांनी 'मटा'कडे नाराजी व्यक्त केली.

माननीय कुलपती महोदय... आपले लक्ष आहे काय?

राज्यपाल हे सर्व विद्यापीठांचे कुलपती असतात. विद्यापीठांमधील गैरप्रकार रोखण्यासाठी कुलपती या नात्याने हस्तक्षेप केल्याची उदाहरणे यापूर्वी महाराष्ट्रात घडली आहेत; तसेच विद्यापीठांमध्ये विद्यार्थिहिताच्या योजना राबवण्यासाठीदेखील कुलपतींनी यापूर्वी पुढाकार घेतला आहे. पुणे विद्यापीठातील गैरकारभाराबाबत मात्र कुलपती केवळ बघ्याची भूमिका का घेत आहेत? पदवी प्रमाणपत्राच्या घोळापासून, रँक सर्टिफिकेटवर शिक्के मारण्याच्या प्रतापापर्यंतचे कारभार करणाऱ्या पुणे विद्यापीठात कुलपती के. विद्यासागर राव लक्ष घालणार का, असा सवाल केला जात आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


मोफत उपचारास हॉस्पिटलचा नकार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

राज्याच्या आरोग्यमंत्र्यांनी घोषणा करूनही पुण्यातील खासगी हॉस्पिटलमध्ये स्वाइन फ्लूच्या पेशंटना मोफत उपचार दिले जात नसल्याचे आढळून आले आहे. मंत्र्यांचा लेखी आदेश प्राप्त न झाल्याने खासगी हॉस्पिटल बिल आकारत असून, पेशंटचा मृत्यू झाल्यास पूर्ण बिल भरेपर्यंत त्याचा मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात न देण्याचा प्रकारही हॉस्पिटलकडून केला जात आहे.

हडपसर येथील नोबेल हॉस्पिटलमध्ये मंगळवारी असा प्रकार घडला असून, स्वाइन फ्लूने दगावलेल्या पेशंटच्या नातेवाइकांना मृतदेह मिळवण्यासाठी ८५ हजार रुपयांचे बिल अदा करण्यासाठी धावाधाव करण्याची वेळ आली. मंत्र्यांच्या घोषणा आणि वास्तव यामधील दरी यातून स्पष्ट होत आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी स्वाइन फ्लूच्या पेशंटना मोफत उपचार दिले जाण्याची घोषणा केली होती. या घोषणेत बदल करून, केवळ आर्थिकदृष्ट्या दुर्बल, दारिद्र्यरेषेखालील (बीपीएल) स्वाइन फ्लू पेशंटनाच मोफत उपचार देण्यात येतील, असे आरोग्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. 'मटा'ने सातत्याने पाठपुरावा करून या बाबतीतील वास्तव जाणून घेतले आहे.

पुरंदर तालुक्यातील सासवड येथील सूर्यकांत बोरावके (४८) यांना शुक्रवारी हडपसरच्या नोबेल हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते. त्यांना 'स्वाइन फ्लू' झाल्याचे निदान झाले होते. उपचारांदरम्यान मंगळवारी पहाटे त्यांचा मृत्यू झाला. 'हॉस्पिटल प्रशासनाने पैशांची मागणी केल्याने ३० हजार रुपये भरले. आरोग्यमंत्र्यांच्या घोषणेनुसार मोफत उपचारांची मागणी हॉस्पिटलकडे करण्यात आली; मात्र ती फेटाळण्यात आली. अखेर सात हजार रुपयांच्या सवलतीनंतर उर्वरित ८५ हजार रुपयांचे बिल भरून मृतदेह ताब्यात घेण्यात आला,' अशी माहिती बोरावके यांचे बंधू अमलकांत बोरावके यांनी दिली.

'लेखी आदेश नाही'

'स्वाइन फ्लूच्या पेशंटना मोफत उपचाराबाबत आरोग्य खात्याकडून अद्याप कोणतेही लेखी वा तोंडी आदेश प्राप्त झाले नाहीत. नोबेल हॉस्पिटल धर्मादाय वर्गात मोडत नसून, ते खासगी मालकीचे आहे. त्यामुळे मोफत उपचार देता येत नाहीत. दानशूर व्यक्तींकडून मिळालेल्या देणगीतून आम्ही गरिबांना सवलतीत उपचार देतो,' असे 'नोबेल'मधील वैद्यकीय सामाजिक अधिकारी विशाल चोरडे यांनी स्पष्ट केले.

दहा तासांत नऊ बळी

स्वाइन फ्लू या संसर्गजन्य रोगाच्या शहरातील प्रसाराचा वेग वाढला असल्याचे दिसून येत आहे. स्वाइन फ्लूच्या संसर्गामुळे पुण्यासह पिंपरी-चिंचवडमधील हॉस्पिटलमध्ये अवघ्या दहा तासांत नऊ जणांचा बळी गेल्याची घटना घडली आहे. दीड ते दोन तासांच्या अंतराने नऊ जणांचा मृत्यू झाल्याची नोंद आरोग्य विभागाने केली आहे. त्यामध्ये पुण्यातील पाच, तर पिंपरीतील चौघांचा समावेश आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

माजी कुलगुरू श्रीधर गुप्ते यांचे निधन

$
0
0

पुणे : पुणे विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. श्रीधर चंद्रशेखर गुप्ते (वय ८२) यांचे बुधवारी पुण्यात वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्यावर बुधवारी दुपारी वैकुंठ स्मशानभूमीमध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या मागे पत्नी आणि दोन मुले असा परिवार आहे.

डॉ. गुप्ते यांनी १९ एप्रिल १९८९ ते १८ एप्रिल १९९५ या सहा वर्षांच्या काळात दोन वेळा विद्यापीठाचे कुलगुरूपद भूषविले. या काळात प्रशासकीय कार्याच्या माध्यमातून त्यांनी केवळ विद्यार्थ्यांच्याच नव्हे, तर विद्यापीठाच्या अधिकार मंडळांच्या सदस्यांमध्ये आणि पुण्याच्या शैक्षणिक वर्तुळामध्येही दबदबा निर्माण केला. त्यांच्या कुलगुरूपदाच्या कार्यकाळामध्येच 'आयुका', 'टीआयएफआर', 'एनसीआरए' आदी राष्ट्रीय पातळीवर संशोधन संस्थांना विद्यापीठाच्या आवारामध्ये केंद्र सुरू करण्यासाठीची प्रक्रिया पार पडली होती. नूमवि, फर्ग्युसन आणि वाडिया कॉलेजमधून आपले शिक्षण पूर्ण केल्यांनंतर डॉ. गुप्ते यांनी पुणे विद्यापीठातून भूगोल विषयामध्ये एम. एस्सी. केले. त्यानंतर काही काळ रुपारेल कॉलेजमध्ये व्याख्याता पदावर काम केल्यानंतर १९५९ पासून ते विद्यापीठाच्याच भूगोल विभागामध्ये व्याख्याते म्हणून रुजू झाले. त्यानंतरच्या काळात विभागप्रमुख पदासोबतच विद्यापीठाच्या सिनेट, मॅनेजमेंट कौन्सिल, अॅकेडमिक कौन्सिल अशा अधिकार मंडळांमधून त्यांनी आपल्या प्रशासकीय कार्यकुशलतेची प्रचिती दिली.

शुक्रवारी श्रद्धांजली सभा

डॉ. गुप्ते यांच्या निधनाने विद्यापीठाच्या इतिहासातील एका धोरणी प्रशासकास आपण मुकलो असल्याची भावना विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. वासुदेव गाडे यांनी व्यक्त केली. डॉ. गुप्ते यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी विद्यापीठाने येत्या शुक्रवारी दुपारी ४ वाजता शोकसभा होणार असल्याचेही त्यांनी जाहीर केले. विद्यापीठाच्या पर्यावरण विभागातील सभागृहात ही सभा होणार असल्याचेही त्यांनी सांगितले. ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ डॉ. राम ताकवले, भारती विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. शिवाजीराव कदम, डॉ. एस. एफ. पाटील यांच्यासह विद्यापीठाच्या वर्तुळातील अनेकांनी डॉ. गुप्ते यांना श्रद्धांजली अर्पण केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विधी खात्याचा चौकशी अहवाल द्या

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

विधी सल्लागार खात्याच्या कारभारामुळे पालिकेचे आर्थिक नुकसान होत आहे; तसेच बदनामी होत असून, त्याबाबतचा अतिरिक्त आयुक्तांचा चौकशी अहवाल तातडीने सभागृहासमोर सादर करावा, अशी मागणी काँग्रेसने केली आहे. तसेच, विधी खात्यातील दोषी व्यक्तींवर कारवाई करावी, अशी मागणी पालिका आयुक्तांकडे करण्यात आली आहे. गेल्या आठवड्यात पालिकेच्या विधी सल्लागार खात्यातील कर्मचाऱ्यांना लाचलुचपत खात्याने रंगेहात पकडले. पालिकेला दंड ठोठावणे, पालिकेचे वकील उपस्थित नसल्याने विरोधात निकाल लागणे, मयत व्यक्तीच्या बाजूने निकाल लागणे, खोट्या सह्यांद्वारे टीडीआर देण्याचा प्रयत्न, अशा बाबतीत विधी कार्यालयाच्या कारभारामुळे पालिकेला मानहानी सहन करावी लागली आहे. या पार्श्वभूमीवर विधी खात्याच्या कारभाराची चौकशी करण्यासाठी नेमलेल्या समितीचा अहवाल सभागृहासमोर सादर करावा, अशी मागणी काँग्रेसचे नगरसेवक संजय बालगुडे यांनी केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘इनामदार हॉस्पिटल’चा आदेश मागे घ्या

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

महापालिकेने बेकायदा ठरविलेल्या इनामदार हॉस्पिटलच्या बांधकामावर कारवाई करण्यास स्थगिती देण्याचा अधिकार राज्यमंत्री रणजित पाटील यांना कुणी दिला? राज्यमंत्र्यांनी घेतलेल्या या भूमिकेमुळे सर्वसामान्यांच्या मनात राज्य सरकारबद्दल चुकीचा समज निर्माण झाला आहे. यामध्ये लक्ष घालून हा आदेश मागे घ्यावा, अशी मागणी सजग नागरिक मंचाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली. वानवडी येथील इनामदार हॉस्पिटल केलेल्या बेकायदा बांधकामावर कारवाई करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला होता.

मात्र, राज्यमंत्र्यांकडे झालेल्या सुनावणीमध्ये त्यांनी हॉस्पिटलवर कारवाई करण्यास स्थगिती दिली आहे. वानवडी भागात इनामदार हॉस्पिटलने आर ७ अंतर्गत १२ मजले बांधले आहेत. यातील केवळ सात मजल्यांची परवानगी घेऊन हॉस्पिटलने पाच मजले बेकायदा पद्धतीने बांधले आहेत. यापैकी दोन मजले आर ७ च्या माध्यमातून महापालिकेला हस्तांतरीत करणे गरजेचे होते.

मात्र, अद्यापही हे मजले पालिकेकडे हस्तांतरीत करण्यात आलेले नाही. त्यामुळे या हॉस्पिटलवर कारवाई करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला होता. हायकोर्टाने यावर सुनावणी देताना पालिकेने निर्णय घ्यावा, असे सांगितले होते.

हॉस्पिटल प्रशासनाने नगरविकास खात्याकडे तक्रार केल्याने राज्यमंत्री पाटील यांनी कोणतेही कारण न देता बेमुदत स्थगिती आदेश दिला. महापालिकेच्या अखत्यारित प्रकरणांवर सुनावणी घेण्याचा व स्थगिती देण्याचा अधिकार मुख्यमंत्री म्हणून आपणाकडे असताना राज्यमंत्री यांनी स्थगिती आदेश कसे दिले याची चौकशी करून हे आदेश मागे घ्यावेत, अशी मागणी मंचाचे विवेक वेलणकर यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पिठलं भाकरीचे दर होणार निश्चित

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

सिंहगडावर फिरायला येणाऱ्या नवख्या पर्यटकांकडून पिठलं-भाकरी आणि कांदाभज्यांसाठी वाट्टेल तेवढ्या पैशांची मागणी करणाऱ्या व्यावसायिकांना लगाम घालण्यासाठी वन विभाग आणि सिंहगड घेरा समितीतर्फे गडावरील खाद्य पदार्थांचे मेनू कार्ड तयार करण्यात येणार आहे. एवढेच नव्हे तर गडावरील प्लास्टिकचा कचरा कमी करण्यासाठी पाण्याच्या बाटल्या तिप्पट किंमतींना विकण्यात येणार आहेत, पर्यटकाने संपलेली बाटली जमा केल्यावर उर्वरित रक्कम परत करणार आहेत.

सिंहगडावर जाण्यासाठी चांगला रोड झाल्यापासून गेल्या दोन वर्षांत पर्यटकांची संख्या दुपटीने वाढली आहे. सुट्टीच्या दिवशी तर गडावरील पार्किंग फुल झाल्यास अनेक पर्यटकांना पायथ्याला 'वेटिंग'च्या रांगेत थांबावे लागते. मात्र एकीकडे पर्यटन वाढत असताना गडावरील व्यावसायिकांमध्ये धंदा वाढविण्याची स्पर्धा सुरू झाली आहे. यासाठी काही व्यावसायिक अत्यल्प दरात खाद्य पदार्थांची विक्री करून पर्यटकांना आकर्षित करीत आहेत तर काही व्यावसायिक पहिल्यांदाच गडावर आलेल्यांना किंवा उच्च राहणीमान असलेल्या पर्यटकांना नेमके हेरून वाट्टेल त्या दरात पिठलं-भाकरी आणि कांदाभज्यांची विक्री करीत आहेत. गडावर सध्या अवघ्या पंधरा रुपयांपासून ते साठ रुपये दरापर्यंत पिठलं-भाकरी उपलब्ध आहे. पर्यटकांची होणारी ही लुबाडणूक थांबविण्यासाठी वन विभाग आणि घेरा सिंहगड समितीने पुढाकार घेतला आहे.

'वनाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत आम्ही मार्चअखेरपर्यंत गडावरील व्यावयासिकांची बैठक घेणार आहोत. यामध्ये गडावर सगळ्याच ढाब्यांवर एकाच दरात खाद्यपदार्थ विक्री करण्याचा नियम लागू होणार आहे. हा दर गावकरीच निश्चित करणार असून गडावर त्याचे फलकही लावण्यात येणार आहेत,' अशी माहिती घेरा सिंहगड समितीचे दत्ता जोरकर यांनी दिली. 'सिंहगडावरील पर्यटकांच्या एकूणच नियंत्रणासंदर्भात आमचे नियोजन सुरू असून एप्रिलमध्ये त्याची अंमलबजावणी सुरू होईल. यामध्ये गडावरील खाद्यपदार्थांचे दर निश्चित करण्याबरोबरच प्लास्टिकच्या बाटल्यांचा वापर कसा कमी करता येईल, यावर आम्ही भर देणार आहोत. यामुळे गडावरील प्लास्टिकचा कचरा नक्कीच कमी होईल,' असे वन विभागाचे उपवनसंरक्षक सत्यज‌ित गुजर यांनी सांगितले.

प्रथमोपचारपेट्यांच्या उद‍्घाटनाची प्रतीक्षा

सिंहगडावरील पर्यटकांच्या सुरक्षेच्या दृष्टीकोनातून घेरा सिंहगड समितीने प्रथमोपचार पेट्या आणल्या आहेत. त्या गडावरील समन्वयकांकडे ठेवणे अपेक्षित आहेत. पण या उपक्रमाचे उद‍्घाटन करण्यासाठी प्रमुख पाहुण्यांना मुहूर्त मिळत नसल्याने या पेट्या सध्या कपाटात ठेवण्यात आल्या आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

खुनाचा प्रयत्न; ५ वर्षे सक्तमजुरी

$
0
0

पुणे : चोरीच्या उद्देशाने मालकिणीच्या डोक्यात लोखंडी पहार घालून आणि गळा आवळून खूनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी मोलकरणीला पाच वर्षे सक्तमजुरी आणि पाचशे रुपये दंडाची ​शिक्षा सुनावण्यात आली आहे. विशेष न्यायाधीश साधना शिंदे यांच्या कोर्टाने हा निकाल दिला.

या प्रकरणी मंगल कृष्णा कांबळे (वय ४६, रा. दत्तवाडी पोलिस चौकी मागे, दत्तवाडी) या महिलेला शिक्षा सुनावण्यात आली आहे. या प्रकरणी मंदाकिनी पांडुरंग शेखतकर (७२, रा. भोसलेनगर) यांनी फिर्याद दिली होती. फिर्यादी या एकट्याच राहत होत्या. घटना घडण्यापूर्वी मंगल कांबळे ही फिर्यादींकडे मोलकरीण म्हणून कामाला होती. दरम्यानच्या काळात तिने फिर्यादी यांच्याकडील काम बंद केले. २१ मे २०१० रोजी पतीशी भांडणे झाल्याच्या कारणावरून कांबळे ही फिर्यादींच्या घरी आली. तिने त्यांच्याकडे एक दिवस आसरा देण्याची मागणी केली. त्या रात्री त्यांच्याकडे चोरी करण्याचा तिचा उद्देश होता. मात्र फिर्यादीकडे त्यांची मैत्रीण राहायला आल्याने आरोपी कांबळेचा उद्देश फसला. दुसऱ्या दिवशी सकाळी आरोपीने त्यांच्या डोक्यात लोखंडी पहारीने वार केला. या केसमध्ये सरकारी वकील उज्वला रासकर यांनी सात साक्षीदार तपासले.

सोनसाखळी चोरी

घराचा दरवाजा उघडा ठेवून फरशी पुसत असलेल्या महिलेच्या डोळ्यात मिरची पूड टाकून तिच्या गळयातील सोनसाखळी एका तरुणाने तोडून चोरून नेली. मंगळवारी सायंकाळी सोनकांबळे हाइट्स टेल्को कॉलनी, आंबेगाव येथे हा प्रकार घडला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ऑनलाइन बँकिंगद्वारे ज्येष्ठ नागरिकाची फसवणूक

$
0
0

पुणेः एका ज्येष्ठ नागरिकाच्या खात्यावरील २९ हजार रुपये काढून त्यांची ऑनलाइन बँकिंगद्वारे फसवणूक करण्यात आली. या प्रकरणी प्रकाश कुलकर्णी (वय ६०, रा. कोथरूड) यांनी फिर्याद दाखल केली आहे. फेब्रुवारी महिन्यात हा प्रकार घडला. त्यांना एका अज्ञात व्यक्तीने फोन केला. एका नामांकित खासगी बँकेतून बोलत असल्याचे त्याने सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


दहावीच्या डमी विद्यार्थ्याला अटक

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

दहावीच्या परीक्षेत गणिताच्या पेपरला डमी विद्यार्थी म्हणून बसलेल्या तरुणाला दिघी पोलिसांनी अटक केली आहे. येरवडा येथील गेनबा सोपानराव मोझे शिक्षण संस्थेत मंगळवारी हा प्रकार घडला. या प्रकरणी पोलिसांनी समीर सत्तार शेख (२६, रा. खडकवासला) याला अटक केली आहे.

आकाश जगताप या विद्यार्थ्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांच्याविरुद्ध संभाजी बोऱ्हाडे (४२, रा. खराडी) यांनी फिर्याद दाखल केली आहे. फिर्यादी सहशिक्षक म्हणून नोकरी करतात. या शाळेतील माजी विद्यार्थी आकाश जगतापने त्याच्या दहावीच्या परीक्षेत गणिताच्या पेपरला प्रवेशपत्रावर समीर शेखचा फोटो चिटकवला. त्याने गणिताचा पेपर लिहून फसवणूक केली, अशी फिर्याद दाखल करण्यात आली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अपूर्ण कामांना मुदतवाढ

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

गेल्या वर्षात दोन महत्त्वाच्या निवडणुका आणि तीन पोटनिवडणुका आल्याने शहरात विविध ठिकाणी सुरू असलेल्या कामांना ३१ मे पर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय स्थायी समितीने बुधवारी घेतला. प्रशासनाचा विरोध डावलून हा निर्णय घेण्यात आल्याने पालिकेच्या बजेटवरचा ताण आणखी वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

लोकसभा व विधानसभा निवडणुकांची आचारसंहिता; तसेच पोटनिवडणुकीच्या आचारसंहितेमुळे अनेक कामांना मंजुरी मिळाली असली, तरी त्याची निविदा प्रक्रिया वेळेत होऊ शकली नाही. त्यामुळे, ही कामे सुरू होण्यास विलंब झाल्याने ती ठराविक कालावधीत पूर्ण होणे शक्य होणार नसल्याचे स्पष्ट होत आहे. अशा कामांना किमान तीन महिन्यांची, म्हणजेच ३१ मे पर्यंत मुदतवाढ द्यावी, असा ठराव मंजूर करण्यात आल्याचे समितीच्या अध्यक्षा अश्विनी कदम यांनी सांगितले.

आचारसंहितेमुळे अनेक कामांना नुकतीच सुरुवात झाली असून, ही कामे रखडू नयेत यासाठी मुदतवाढ देण्याची आग्रही मागणी स्थायी समितीतील बहुतेक सदस्यांनी केली. माजी अध्यक्ष बापूराव कर्णे गुरुजी आणि रोहिणी चिमटे या सदस्यांनी मुदतवाढीचा ठराव दिला. पालिकेला मिळणारे उत्पन्न लक्षात घेऊनच सध्याच्या कामांसाठी मुदतवाढ देणे शक्य आहे का, हे ठरविता येईल, अशी भूमिका प्रशासनाने मांडली. तसेच, पुढील वर्षीच्या बजेटमधील कामे रेंगाळतील, असेही सांगण्यात आले. मात्र, तरीही सर्व कामांना ३१ मे पर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय घेण्यात आला. सर्वसाधारण सभेनेही त्याला मान्यता दिली, तर बजेटवरचा ताण वाढेल.

पहिल्याच बैठकीत १० कोटींची कामे मंजूर

स्थायी समितीच्या नवनिर्वाचित अध्यक्षा अश्विनी कदम यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या पहिल्याच बैठकीत १० कोटी रुपयांच्या कामांना मंजुरी देण्यात आली. यामध्ये, प्रामुख्याने शहराच्या विविध भागांमध्ये खोदण्यात आलेल्या रस्त्यांच्या पुर्नडांबरीकरणाच्या कामांचा समावेश असून, टिळकरोड, विश्रामबागवाडा, धनकवडी आणि सहकारनगर अशा चार क्षेत्रीय कार्यालयांच्या हद्दीतील रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी ४ कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

राज्यात द्राक्ष, डाळिंबाला फटका

$
0
0

टीम मटा, पुणे

राज्यात बुधवारी झालेल्या वादळी पावसामुळे सोलापूर, जालना, सांगली, सातारा परिसरात पिकांचे नुकसान झाले तसेच द्राक्ष, डाळिंब, गहू, ज्वारी, हरभरा या पिकांना फटका बसला आहे. सोलापूर जिल्ह्याला बुधवारी मध्यरात्री वादळी पावसाचा व गारपीटीचा जबरदस्त तडाखा बसला. बार्शी, कुर्डूवाडी, माढा परिसरात फळबागांबरोबरच रब्बी ज्वारी पिकांचेही आतोनात नुकसान झाल्यामुळे बळीराजाची झोप उडाली आहे. मध्यरात्री झालेल्या पावसामुळे ज्वारी, हरभरा, गहू या रब्बी पिकांसह द्राक्ष, आंबा फळबागांचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. पंधरा दिवसांत दोन ते तीनवेळा अवकाळी पावसाने व गारपीटीने जिल्हाभरात धुडगूस घातल्यामुळे बळीराजाचे कंबरडे मोडले आहे.

बार्शी तालुक्यातील वैराग, पिंपरी, सुर्डी, कारी-नारी, माळेगाव, जामगाव, भातंबरे, काळेगाव, दहीटणे, नांदणी या परिसराला पावसाचा तडाखा बसला असून, ज्वारी, गहू आणि हरभरा यासह द्राक्षबागा, शेवगा व आंब्याचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. कुर्डूवाडी परिसरालाही वादळी पावसाने झोडपून काढले. तसेच, जालना शहरातील औद्योगिक वसाहत परिसर आणि त्यालगत असलेल्या दरेगाव, निधोना, गुंडेवाडी, घाणेवाडी, तांदुळवाडी गावातील परिसरात मंगळवारी रात्री जोरदार गारपीट झाली. यामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. आंब्याच्या झाडाचा मोहोर गळून पडला आहे. त्यासोबतच वादळी वाऱ्यामुळे अनेकाच्या घरावरची पत्रे उडून गेली तर विजेच्या तारा तुटून खांब उन्मळून पडले.

सांगली जिल्ह्यातही पावसाने हजेरी लावली. कराडसह पाटण तालुक्याला मंगळवारी रात्री पाऊस आणि जोरदार वाऱ्याने झोडपून काढले. रात्री उशिरा विजेच्या कडकडाट आणि वादळी वाऱ्यासह आलेल्या जोरदार अवकाळी पावसाने चांगलेच झोडपून काढले. पावसामुळे काढणीस आलेल्या रब्बी हंगामातील शाळू, मका, गहू, हरभरा आदी पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. कराड तालुक्यातील हळद पिकाचेही नुकसान झाले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

फुकट्या प्रवाशांवर दंडात्मक कारवाई

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

मध्य रेल्वेच्या पुणे विभागाने राबविलेल्या विशेष अभियनाअंतर्गत केलेल्या कारवाईत एकूण ३३४ प्रवाशांवर कारवाई करण्यात आली असून, त्यांच्याकडून ८८ हजार ५० रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे.
पुणे सर्कलचा तिकीट तपासणी विभाग व रेल्वे सुरक्षा बल यांच्यावतीने पुणे व लोणी स्टेशनवर ही कारवाई करण्यात आली. लोणी रेल्वे स्थानकावर २३ फेब्रवारी रोजी विनातिकीट प्रवास करणाऱ्या १४२ प्रवाशांकडून ३७ हजार ६३० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. तसेच, ५ मार्च रोजी लोणी येथेच केलेल्या कारवाईत ५४ प्रवाशांकडून १३ हजार ९७५ दंड आकारण्यात आला. पुणे स्थानकावर २७ फेब्रुवारीला १३८ प्रवाशांकडून ३६ हजार ४४५ अशा तीन तपासण्यांमधून एकूण ३३४ प्रवाशांकडून ८८ हजार ५० रुपये वसुलीपोटी जमा झाल्याची माहिती पुणे रेल्वे प्रशासनाने दिली आहे. सिनिअर मॅनेजर (कमर्शियल) गौरव झा आणि विभागाचे मॅनेजर सुनीत शर्मा यांच्या नेतृत्वाखाली हे अभियान राबविण्यात आले. तसेच या पुढेही ते सुरू राहणार आहे. प्रवाशांनी तिकिट घेऊन प्रवास करावा, असे आवाहन पुणे रेल्वे विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पालिकेच्या शाळांसाठी नाट्यगृहे मिळणार मोफत

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

महापालिकेच्या कार्यक्रमांबरोबरच पालिकेच्या शाळांच्या गॅदरिंगसाठीही आता पालिकेची नाट्यगृहे मोफत देण्याचा प्रस्ताव बुधवारी स्थायी समितीच्या बैठकीत मान्य करण्यात आला. कार्यक्रमांसाठी नाट्यगृहांच्या तारखा मिळत नसल्याची ओरड सुरू असतानाच शाळांच्या गॅदरिंगसाठी देखील नाट्यगृहे देण्याचा निर्णय घेण्यात आल्याने याचे नक्की परिणाम काय होणार याबाबत उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे.

महापालिकेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देऊन त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी गॅदरिंग आयोजित केली जातात. मात्र, अनेकदा जागा तसेच आवश्यक त्या सोयीसुविधा उपलब्ध होत नसल्याने त्यावर पाणी फिरते. पालिकेच्या मालकीची शहरात अनेक नाट्यगृहे असून, पालिकेच्या शाळांना ही गॅदरिंगसाठी मोफत उपलब्ध करून द्यावीत, असे पत्र मनसेचे सभासद अस्मिता शिंदे, अजय तायडे यांनी स्थायी समितीकडे दिले होते. त्यावर समितीच्या बैठकीत चर्चा झाली. पालिकेच्या मालकीची सात नाट्यगृहे असून, ती पालिकेच्या शाळांना गॅदरिंगला उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे स्थायी समितीच्या अध्यक्षा अश्विनी कदम यांनी सांगितले.

वादात भर पडणार

नाट्यगृहांच्या तारखा मिळत नसल्याने चार ते पाच महिन्यापूर्वीच नाट्यसंस्थांकडून नाट्यगृहाचे बुकींग झालेले असते. नाट्यगृह उपलब्ध करून देतानाच महापालिकेचा कार्यक्रम ठरल्यास संबधित संस्थेला नाट्यगृह उपलब्ध द्यावे लागेल, अशी अट घातली जाते. यामुळे अनेकदा वादाचे प्रसंगही निर्माण होतात. त्यातच आता पालिकेच्या शाळांच्या गॅदरिंगसाठी नाट्यगृह उपलब्ध करुन देण्याचा निर्णय मान्य करण्यात आल्याने शाळेने अचानक गॅदरिंगची तारीख जाहीर केल्यास अडचण निर्माण होण्याची शक्यता आहे, असे घडल्यास पालिकेला आपल्या उत्पन्नावरही पाणी सोडावे लागणार आहे.

महापालिकेच्या पंधरा क्षेत्रीय कार्यालयामधील महापालिकेच्या शाळांना गॅदरिंगसाठी क्षेत्रीय कार्यालयात असलेली नाट्यगृहे मोफत उपलब्ध करून दिली जाणार आहेत. या वर्षापासून याची अंमलबजावणी केली जाणार आहे.

- अश्विनी कदम, अध्यक्ष, स्थायी समिती

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images