Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

लोणावळावासींचा संताप उफाळला

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, लोणावळा

लोणावळ्यातील कुमार रिसॉर्टमध्ये सात वर्षीय चिमुरडीवर बलात्कार करून निर्घृण हत्या झाल्याच्या घटनेविरुद्ध बुधवारी लोणावळामध्ये संताप उफाळून आला. पोलिस आणि हॉटेल व्यवस्थापनाच्या हलगर्जीपणाच्या निषेधार्थ लोणावळावासींनी काढलेल्या मोर्चाला हिंसक वळण लागले. संतप्त आंदोलकांनी कुमार रिसॉर्टवर तुफान दगडफेक केली. बलात्कार व हत्येचा निषेध करण्यासाठी लोणावळ्यात बुधवारी बंद पुकारत रिसॉर्टवर मोर्चा काढला होता. दरम्यान, आंदोलनावेळी तोडफोड केल्याप्रकरणी रिसोर्टचे कार्यकारी व्यवस्थापक मनोहर बुधवानी यांनी लोणावळा शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार २२ आंदोलकांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. रिसोर्टच्या मालमत्तेच्या तोडफोड केल्याने नुकसान झाल्याची तक्रार दाखल झाली आहे.


रायगडावर जेव्हा शाळा भरते...

$
0
0

'हिरकणी' चालवतेय जिजाऊ प्रबोधिनी

>> प्रसाद पवार, पुणे

छत्रपती शिवरायांच्या रायगडावर एका 'हिरकणी'ने साक्षरतेचा दिवा तेवता ठेवला आहे. गडावरच जन्मलेल्या, वाढलेल्या नव्या पिढीला शिक्षणाची गोडी लावण्यासाठी या हिरकणीने शिवभक्तांच्या मदतीने रायगडावर जिजाऊ प्रबोधिनी थाटली आहे. तिच्या या अभ्यासवर्गात धनगरवाड्यातली मुले अक्षरांशी दोस्ती करत आहेत.

रायगड हेच या हिरकणीचे माहेर आणि सासर असून ती गडावरची आणि धनगरवाड्यातली एकमेव पदवीधर मुलगी आहे. या तरुणीचे नाव आहे गौरी अवकीरकर. शिवछत्रपतींच्या जयंतीनिमित्त हा आगळावेगळा उपक्रम सुरू करण्यासाठी गौरीला हरितभूमी फाउंडेशनने मदत केली. एरवी शाळा संपली की गुरेढोरे आणि पर्यटकांना ताक, सरबत विकण्यासाठी धावणारी ही मुले आता संध्याकाळी आवर्जून अभ्यासही करणार आहेत. गौरी त्यांच्या अडीअडचणी सोडवणार आहे, तर फाउंडेशनच्या सदस्यांनी गडावरच्या या बहिणीला हवी ती मदत देऊ केली आहे. शिवछत्रपतींच्या जयंतीनिमित्त या उपक्रमाची पूर्वतयारी करून त्याचा श्रीगणेशाही रायगडावर करण्यात आला. २२ मुलांना शैक्षणिक साहित्य तर विविध विषयांवरील ६० पुस्तकांची ग्रंथदिंडीही या प्रबोधिनीसाठी गौरीकडे देण्यात आली.

या निमित्ताने गडावर स्वच्छता अभियान राबविण्यात आले. चाळीस पोती कचरा गोळा करण्यात आला. गट आणि ग्रुपचे राजकारण सोडून त्यात फाऊंडेशनसह शिवसह्याद्री, शिवसंस्कार, गडवाट, झुंजार शिलेदार, डोंबिवलीचे दुर्गमित्र अशा अनेक संस्थांची साथ मिळाली. राज्यभरातून ४० शिलेदार या मोहिमेत सहभागी झाले होते. रायगडासह गडांवरील उपक्रमांना इच्छुकांनी वेळ द्यावा, असे आवाहनही यानिमित्ताने करण्यात आले आहे. संपर्क : ७७०९५४२५७३.

‘बिकिनी डान्स’ झाला सिंहगड इन्स्टिट्यूटमध्ये

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

सांस्कृतिक कार्यक्रमांदरम्यान बिकिनी डान्ससारख्या बिभत्स प्रकाराचे आयोजन करणाऱ्या सिंहगड इन्स्टिट्यूटवर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने कारवाईचा बडगा उगारला आहे. विद्यापीठाच्या मॅनेजमेंट कौन्सिलच्या सदस्याच्याच संस्थेत असा प्रकार घडल्याने मॅनेजमेंट कौन्सिल सदस्यांच्या नीतीमत्तेवरही समाजातून प्रश्न उपस्थित केला जात आहे.

पुण्यातील एका शैक्षणिक संस्थेत आयोजित एका सांस्कृतिक कार्यक्रमात बिकिनी डान्स झाल्याचा प्रकार 'मटा'ने बुधवारी उघड केला. व्हॉट्सअप आणि यू-ट्युबर उपलब्ध असलेल्या व्हिडिओ क्लिप्समुळे हा प्रकार सिंहगड इन्स्टिट्यूटमध्ये नुकत्याच झालेल्या सिंहगड करंडकामध्येच झाल्याची बाबही स्पष्ट झाली. एकीकडे संस्थेच्या संचालिका सुनंदा नवले विद्यापीठाच्या मॅनेजमेंट कौन्सिलच्या माध्यमातून विविध धोरणे राबविण्यासाठी भूमिका बजावत असतानाच, दुसरीकडे त्यांच्याच संस्थेत बिकिनी डान्ससारखे आक्षेपार्ह प्रकार घडत असल्याचेही त्यातून दिसून आले. विद्यापीठ या प्रकारावर नियमानुसार कारवाई करणार असल्याचे कुलगुरू डॉ. वासुदेव गाडे यांनी बुधवारी स्पष्ट केले. डॉ. गाडे म्हणाले, 'हा प्रकार निश्चितच धक्कादायक आहे. एका शैक्षणिक संस्थेत असा प्रकार घडणे, ही अतिशय निंदनीय बाब आहे. या विरोधात कारणे दाखवा नोटीस बजावण्यात येणार आहे.'

शैक्षणिक संस्थांची नैतिक जबाबदारी विद्यापीठाच्या मॅनेजमेंट कौन्सिलच्या सदस्यांवर असते. मात्र, सदस्यांच्याच संस्थेत असा प्रकार होत असेल, तर विद्यापीठ त्या विरोधात कारवाई करण्यात मागे पुढे पाहणार नसल्याचेही डॉ. गाडे यांनी स्पष्ट केले. विद्यापीठाने त्या विरोधात कडक कारवाई न केल्यास, रस्त्यावर उतरून आंदोलन करू,' असा इशारा राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे शहराध्यक्ष राकेश कामठे यांनी दिला.

विद्यार्थी संघटना आक्रमक

विद्यार्थी संघटनांनीही या प्रकाराविरोधात तीव्र भावना व्यक्त केल्या आहेत. या प्रकाराविरोधात संस्थेला निवेदन देऊन संघटनेची भूमिका मांडणार असल्याचे अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने बुधवारी स्पष्ट केले. 'झालेला प्रकार स्वीकारार्ह नाही, यापुढे संस्थेत असे प्रकार दिसून आल्यास ते उधळून लावण्यासोबतच संस्थेची मान्यता रद्द करण्यासाठीही पाठपुरावा करू,' असा इशाराही परिषदेने दिला.

सासवडमध्ये चोरट्यांचा फिल्मीस्टाइल सशस्त्र दरोडा

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सासवड

सासवड-नारायणपूर रस्त्यावरील चौखंडे आळीत राहणाऱ्या माजी नगराध्यक्षा नीलिमा भारत चौखंडे यांच्या तीन मजली अलिशान बंगल्यात घुसलेल्या दरोडेखोरांनी तलवार अन सत्तूरीचा धाक दाखवून सव्वा लाख रुपये रोख आणि चाळीस तोळे सोने लुटले. बुधवारी मध्यरात्री दोन वाजल्यापासून सुमारे दोन तास हा थरार चौखंडे कुटुंबीयांनी अनुभवले.

दरोड्यात नेमका किती ऐवज लांबवण्यात आला, याची नेमकी आकडेवारी अद्याप न जुळल्याने पोलिस खातेही चक्रावून गेले आहे. आतापर्यंतचा तालुक्यातील हा सर्वांत मोठा दरोडा असल्याची माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुरेशसिंग गौड यांनी दिली. दरम्यान, जिल्हा ग्रामीण अधीक्षक कार्यालय पुणे येथून श्वान पथक पाठविण्यात आल्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक जाधव यांनी स्पष्ट केले.

चौखंडे कुटुंबीयांपैकी एकाचे नुकतेच लग्न झाले. त्यामुळे सोन्याचे दागिने आणि इतर रोख रक्कम घरात असल्याची माहिती घेऊनच दरोडा टाकल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. बुधवारी पहाटे तलवारी आणि सत्तूर घेतलेल्या चार अज्ञात दरोडेखोरांनी अस्सल फिल्मी पद्धतीने दार कटावणीने उघडून घरात प्रवेश केला. त्यानंतर झोपलेल्या बाळासाहेब चौखंडे आणि त्यांची पत्नी शकुंतला यांना धमकावले. शकुंतला यांना घरातील किमती वस्तू दाखविण्यास भाग पाडले. मग, त्यांनी आपला मोर्चा वरील मजल्यावरील बेडरूमकडे वळवला. तेथे झोपलेल्या घरातील अन्य दोन सदस्यांच्या डोक्याला तलवार लावून दागिने आणि पैसे देण्याची मागणी केली. त्यानंतर संपूर्ण घरात हैदोस मांडून ४० तोळे सोन्याचे दागिने आणि बॅगेतील सव्वा लाख रुपये काढून घेतले.हा प्रकार सुमारे एक ते दीड तास सुरू होता.

चारही दरोडेखोर तरुण होते, तसेच ते मराठीत बोलत होते. त्यांनी तुळजाभवानी मातेची शपथ घेऊन आपण मारहाण करणार नसल्याचे आश्वासन दिल्याची माहिती बाळासाहेब चौखंडे यांनी पोलिसांना दिली. घटनेचे वृत्त कळताच पोलिस उपनिरीक्षक नदाफ यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. या वृत्तामुळे शहरात घबराहट पसरली आहे. चोरटे चौखंडी -गिरमे आळीतून जेजुरीच्या दिशेने पळून गेले असल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

‘स्वाइन फ्लू’ रोखण्यासाठी उपाययोजना करा

$
0
0

उपमहापौर आबा बागूल यांच्या प्रशासनाला सूचना

म. टा. प्रतिनिधी, पुणे

शहरात स्वाइन फ्ल्यूचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी पालिका प्रशासनाने तातडीने उपाययोजना कराव्यात, अशा सूचना उपमहापौर आबा बागूल यांनी महापालिका प्रशासनाला दिल्या. स्वाइन फ्ल्यूबाबत बागूल यांनी पालिका प्रशासनाची बुधवारी आढावा बैठक घेतली यामध्ये या सूचना देण्यात आल्या. या आजाराविषयी जनजागृती करण्यासाठी माहितीपट तयार करून शहरात जाहिराती करून या आजाराची माहिती नागरिकांपर्यंत पोहचवावी, अशा सूचना या बैठकीत देण्यात आल्या.

महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त ओमप्रकाश बकोरिया, पालिकेचे प्रभारी आरोग्य प्रमुख डॉ. एस. टी. परदेशी यांच्यासह आरोग्य विभागातील अधिकारी या बैठकीला उपस्थित होते. गेल्या दीड महिन्याभरात शहरातील १३५ पेशंटला स्वाइन फ्ल्यूची लागण झाली असल्याचे समोर आले असून १७ पेशंटचा या आजाराने मृत्यू झाला आहे. दररोज ५० ते १०० पेशंटला या आजाराची लक्षणे दिसत असल्याचे समोर आले आहे. या आजाराचे प्रादुर्भाव वाढत असताना यावर नियंत्रण आणण्यासाठी पालिका प्रशासन ठोस उपाय करत नसल्याबद्दल उपमहापौर बागूल यांनी नाराजी व्यक्त केली. महापालिकेच्या नायडू हॉस्पिटलमध्ये केवळ टॅमी फ्ल्यूच्या गोळ्या उपलब्ध असून इतर कोणत्याही हॉस्पिटलमध्ये या गोळ्या का मिळत नाही, असा प्रश्न बागूल यांनी उपस्थित केला. स्वाइन फ्ल्यूवर नियंत्रण आणण्यासाठी राज्य सरकारकडून टॅमी फ्ल्यूचा साठा तातडीने मागवून घ्यावा, अशा सूचनाही या बैठकीत देण्यात आल्या.

शहराची लोकसंख्या ३५ लाख दीड महिन्यात सापडलेले पेशंट १३५ पालिका हद्दीतील पेशंट १०० हद्दीबाहेरील पेशंट ३५ मृत्यू पडलेले पेशंट १७ दररोज आजाराची लक्षणे आढळणारे पेशंट ५० ते १००

स्वतःच केस लढली आणि जिंकलीही

$
0
0

संतुक पाटील, वारजे

शहाण्याने कोर्टाची पायरी चढू नये असे म्हणतात. प्रत्यक्षात कोर्टाची पायरी चढावी लागल्यावर काय त्रास होतो, याचा अनुभव मी घेतला आहे. इथे फरक फक्त इतकाच आहे की, मला ग्राहक कोर्टाची पायरी चढावी लागली. ग्राहक कोर्टात तक्रारदार स्वतःच आपली केस लढवू शकतो या बद्दल मला माहिती होती.

ग्राहक म्हणून आपल्याला अनेकदा वाईट अनुभव आलेला असूनही किरकोळ ​नुकसान आहे किंवा आता नुकसान झाले तर ते थोडेच भरून येणार आहे, कोर्टाच्या चकरा मारण्यासाठी आपल्याकडे कुठे इतका वेळ आहे असा विचार करून अनेकजण तक्रार करणे, दाद मागणे या फंदातच पडत नाही. त्यामुळे मात्र ग्राहकांना गृहीत धरणाऱ्यांचे फावते. मला आलेला अनुभवही असाच होता. माझे नुकसान झाले म्हणून मी त्याबाबत विचारणा केली, नुकसानभरपाई मागितली म्हणून मलाच उलटे उत्तर देऊन सुनावण्यात आले. आधी तर संबंधितांनी माझी तक्रारही ऐकली नाही. त्याचा पाठपुरावा केला असता कमी रक्कम देऊ असे सांगण्यात आले. ग्राहकाला अशा प्रकारे वागणूक मिळते हे पाहून मी याचा पाठपुरावा करायचाच असे ठरविले.

ग्राहक मंचाकडे मी स्वतः केस दाखल करून ती लढविली . मुख्य म्हणजे मी ती केस जिंकलो. त्यासाठी मला ग्राहक मंचाच्या १४ - १५ वेळा वाऱ्या कराव्या लागल्या. मात्र, मी हार मानली नाही. ग्राहक मंचातील कर्मचाऱ्यांनी मला वेळोवेळी मदत केली. दावा चालविताना येणाऱ्या अडचणी सोडविण्यास मदत केली. आयुष्यात पहिल्यांदा मी कोर्टाची पायरी चढलो होता. स्वतः केस लढून मी ​जिंकलो. 'ग्राहक देवो भवः' या सदराच्या माध्यमातून मला हा अनुभव लोकांपुढे मांडायचा आहे. ग्राहक म्हणून आपल्याला कोणी त्रास दिला असेल, नुकसान केले असेल तर त्याचा पाठपुरावा करण्यासाठी आपणच पुढाकार घ्यायला पाहिजे.

परभणी येथून धान्याच्या गोण्यांचे पार्सल मी मागविले होते. अंकल पार्सल्स या कंपनीद्वारे ते पार्सल पाठविण्यात आले. ही कंपनी एसटी महामंडळासाठी पार्सलचे कंत्राटदार म्हणून काम पाहते. परभणी येथील माझ्या एका नातेवाइकाने एसटी महामंडळाच्या पार्सलमध्ये धान्याच्या पाच गोण्या त्यांना पाठविल्या होत्या. शिवाजीनगर येथे पार्सलचे एक हजार ५३ रुपये देऊन पार्सल सोडवून घेतले. त्यावेळी पाच गोण्यांमधील तीस किलो तूरडाळ आणि पंधरा किलो मूगडाळ खराब झाल्याचे मला आढळले.

पार्सल कंपनीच्या कामगारांनी एसटीच्या टपावरून गोण्या फेकल्यामुळे त्या खराब झाल्या होत्या. या गोण्यांवर रासायनिक पदार्थ सांडला होता. त्याबाबत विचारणा केली असता पार्सलचे नुकसान होतच असते असे उत्तर देण्यात आले. पार्सल उतरविताना ते एसटीच्या शिडीवरून उतरविण्यात यावे, असा नियम आहे. मात्र हा नियम पाळला जात नाही. एसटीच्या टपावरून खाली पार्सल फेकले जातात. त्यामुळे पार्सलचे नुकसान होते. माझ्या पार्सलचेही तसेच नुकसान झाले. याप्रकरणी मी जळगाव येथील मुख्य कार्यालयाकडे तक्रार केली. त्यांनी मला फॅक्सद्वारे तक्रार पाठविण्यास सांगितले. त्यांच्याकडे मी साडेतीन हजार रुपयांची नुकसाभरपाई मागितली. तर फक्त तीनशे रुपये नुकसान भरपाई घ्या अन्यथा ९० दिवसांनंतर तक्रारीची चौकशी केली जाईल असे उत्तर देण्यात आले. याबाबत एसटी महामंडळाच्या मुंबई येथील मुख्य कार्यालयाकडे तक्रार केली होती. त्यानंतर संबंधित पार्सल कंपनीने सहाशे रुपयांची नुकसानभरपाई देण्याचे मान्य केले. मात्र, मला नुकसानभरपाईच्या रक्कमेपेक्षा कमी रक्कम देण्यात येत होती. त्यामुळे मी जळगाव येथील अंकल पार्सल्स या कंपनीचे मुख्य कार्यकारी अ​धिकारी आणि पुण्यातील शिवाजीनगर येथील कंपनीच्या प्रतिनिधीच्या विरोधात हा दावा दाखल केला होता.

अंकल्स पार्सल्सतर्फे वकिलाने हजर राहून त्यांचे म्हणणे मांडले होते. मी मंचापुढे स्वतःच बाजू मांडली. मंचापुढे खराब झालेल्या गोणीचे फोटो सादर केले. कागदोपत्री पुरावाही दाखल केला. मंचाने याप्रकरणी निकाल देताना पार्सल कंपनीने निकृष्ट दर्जाची सेवा दिल्याचे सांगितले. निकृष्ट सेवा दिल्याप्रकरणी दोन हजार रुपये आणि मला झालेल्या त्रासापोटी एक हजार रुपये असे मिळून तीन हजार रुपये देण्याचा आदेश दिला. ग्राहक मंचापुढे मी स्वतः केस लढवून ती​ जिंकलो. मला आलेला अनुभव इतरांपर्यंत पोहोचावा यासाठी मी हा अनुभव मांडत आहे. या निमित्ताने एसटी महामंडळाने नेमलेल्या कंत्राटदाराकडून कशा पद्धतीने काम केले जाते हे सुद्धा लोकांपुढे आणायचे होते. ग्राहकाने सजग राहून आपली बाजू मांडली तर त्याला नक्कीच न्याय मिळू शकतो. त्यासाठी आपल्याला वकील नेमण्याचीही गरज नाही. आपल्याकडे हवी असलेली सर्व कागदपत्रे पुरावा म्हणून असणे आवश्यक आहे. एसटीचा अशा प्रकारचा गलथान कारभार या निमित्ताने लोकांपुढे मांडण्याचा प्रयत्न करतो आहे.

बलात्कार करणाऱ्याला पुण्यात अटक

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

राजस्थान येथील करोली जिल्ह्यात एका महिलेवर सामूहिक बलात्कार करून फरार झालेल्या दोघांपैकी एकाला गुन्हे शाखेच्या पोलिसांनी पुण्यात अटक केली. खुशीराम कमल मिना (२८, मुळ रा. करोली, राजस्थान) असे त्याचे नाव आहे. त्याने व त्याचा साथीदार भुरा उर्फ भुरासिंग मुरारी मीना यांनी एका महिलेवर २०१३ मध्ये बलात्कार केला होता. तेव्हापासून ते फरार आहेत.

आरोपी खुशीराम काही दिवस आंध्रप्रदेशात वास्तव्यास होता. त्यानंतर तो पुण्यात फुरसुंगी परिसरात रहायला आला होता. खुशीरामबद्दल गुन्हे शाखेच्या प्रॉपर्टी सेलमध्ये पोलिस कर्मचारी बोरकर यांना माहिती मिळाली. वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस पथकाने त्याला अटक केली असुन त्याला राजस्थान पोलिसांच्या ताब्यात देण्यात येणार आहे.

सदतीस कोटी खर्चूनही बारामतीकर तहानलेलेच

$
0
0

जीवन प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांचा भ्रष्ट कारभार येणार मूळावर

म. टा. वृत्तसेवा, बारामती

बारामती शहराची सध्याची वाढती लोकसंख्या आणि भविष्यात वाढणारी लोकसंख्या लक्षात घेऊन नगरपालिकेच्या हद्दीत ३७ कोटी खर्च करून दोन साठवण तलावांची निर्मिती करण्यात आली. मात्र, इतक्या मोठ्या प्रमाणात निधी खर्चूनही बारामतीकरांची तहान अद्याप भागलेलीच नाही.

एकूण निधीपैकी एका तलावासाठी १२ कोटी खर्चण्यात आले. तर, २० ते २२ कोटी रुपयांचा खर्च करूनही दुसऱ्या तलावाचे बांधकाम अद्याप अपूर्णच राहिल्याने नगरपालिकेचे तत्कालीन मुख्याधिकारी आणि महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या अधिकाऱ्याने संगनमताने फसवणूक केल्याचा आरोप करण्यात येत आहे. या अधिकाऱ्यांच्या ढिसाळ कारभाराचा फटका नागरिकांना बसला असून, पिण्याच्या पाण्यासाठी त्यांना झगडावे लागणार असल्याचे चित्र आहे.

पहिल्या साठवण तलावाला पहिल्या वर्षी गळती लागल्यामुळे योजनेच्या कार्यक्षमतेबाबत वर्षातच शंका येऊ लागल्यामुळे नागरिकांनी नाराजी व्यक्त केली होती. हा साठवण तलाव १२८ दशलक्ष लिटर क्षमतेचा असून, त्याचे उदघाटन तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी २ सप्टेंबर २०११ रोजी केले होते. या तलावासाठी १२ कोटी रुपये खर्चण्यात आले होते. तलावाचे काम मे. लक्ष्मी सिव्हिल इंजिनीअरिग सर्व्हिसेस, कोल्हापूर या कंपनीने केले आहे. विकासाबाबत नेहमी आग्रही असणारे अजित पवार बारामतीकरांच्या पाण्याबाबत एवढे बेफिकीर कसे असा प्रश्न सर्व सामान्यांना पडला आहे. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या अधिकाऱ्याकडून कंपनीची पाठराखण करण्याचा प्रकार सध्या सुरू आहे.

दुसऱ्या पाणी पुरवठा साठवण तलावाचे अंदाजपत्रक तयार करून प्रत्यक्ष कामास सुरुवातही झाली, मात्र कामाला लागणारा कालावधी अधिकारी आणि संबंधित ठेकेदाराच्या मनाप्रमाणे बिनबोभाट वाढवून घेण्यात आल्याचा आरोपही काही नगरसेकांनी केली आहे. वाढीव निविदा मिळवण्यासाठी अधिकाऱ्यांमध्येच जुंपली आहे. अधिकारी आणि ठेकेदारांची भ्रष्ट साखळी निर्माण झाल्याची जाहीर कबुली एका ज्येष्ठ नगरसेवकाने भर सभागृहात दिल्याने मध्यंतरी खळबळ उडाली होती. याचा प्रत्यय मात्र साठवण तलावाच्या कामात दिसून आला आहे. या पार्श्वभूमीवर अधिकारी आणि ठेकेदारांच्या ​'मिलीभगत'चा फटका मात्र, सामान्य बारामतीकरांना उन्हाळ्यात बसणार असल्याची चिन्हे आहेत. मात्र, याचे पाणी पुरवठा सभापती आणि पाणी पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांना कसलेही सोयरसुतक नसल्याचे दिसून आले आहे. नीरा -डावा कालवा बंद झाल्यास बारामती शहराला फक्त १५ दिवस पुरेल इतकेच पाणी शिल्लक आहे.

कोर्टानेही घेतली गंभीर दखल

बारामती तालुक्यातील ढाकाळे पाणीपुरवठा योजनेचे काम अर्धवट, चुकीच्या पद्धतीने करून सरकारी निधीचा अपव्यय केल्याच्या प्रकरणाची हायकोर्टाने गंभीर दखल घेतली असून, संबधितांवर विनाविलंब प्रशासकीय, फौजदारी आणि आर्थिक कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.

आगामी काळात बारामतीकरांना पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाल्यास त्याला सर्वस्वी जबाबदार महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच असणार आहे. त्यांना यापुढील कोणत्याही कामाचे देयक अदा करण्यात येणार नाही. नागरिकांना नगरपालिका पिण्याचे पाणी कमी पडू देणार नाही . दीपक झिंझाड, मुख्याधिकारी, बारामती नगरपालिका


चेस्ट पेन क्लिनिक पुण्यात

$
0
0

देशातील पहिले ​चेस्ट पेन क्लिनिक

म. टा. प्रतिनिधी, औंध

एम्स हॉस्पिटल, औंध आणि फिलिप्स हेल्थ केअरच्यावतीने पुणे जिल्हा परिसरात भारतातील पहिले चेस्ट पेन क्लिनिक सुरू करण्यात आल्याची माहिती 'एम्स'चे संचालक डॉ. शिरीष हिरेमठ यांनी दिली. एखाद्या व्यक्तीला हृदय विकाराचा झटका आल्यानंतर त्याला एका तासाच्या आत तातडीने प्राथमिक उपचार देण्यात आल्यास त्याचे प्राण वाचवता येणे शक्य आहे. हे उपचार उपनगर तसेच ग्रामीण भागातील छोट्या हॉस्पीटलमध्ये मिळावेत, यासाठी चेस्ट पेन क्लिनिक्सचा उपक्रम राबवण्यात आला आहे. या वेळी फिलिप्स हेल्थ केअरचे संचालक शंकर एस., डॉ. राजेश देशपांडे, एम्सचे संचालक गोकूळ गायकवाड, इफ्तिकार पठाण, डॉ. जी. जी. खन्ना आदी उपस्थित होते.

कार्यकर्त्यांनी नैतिकता जोपासावी

$
0
0

गोखले स्मृती शताब्दी कार्यक्रमात डॉ. सदानंद मोरे यांचे मत

म. टा. प्रतिनिधी, पुणे

'नामदार गोपाळ कृष्ण गोखले यांनी जीवननिष्ठा, राष्ट्रनिष्ठा आणि कार्यनिष्ठा अंगीकारली होती. समाजातील कार्यकर्त्यांनी आपल्या क्षेत्रात काम करताना पारदर्शकता आणि नैतिकता जोपासून समाजकार्य केल्यास तीच नामदार गोखले यांना खरी श्रद्धांजली ठरेल,' असे विचार अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष डॉ. सदानंद मोरे यांनी गुरुवारी येथे व्यक्त केले.

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान पुणे आणि महाराष्ट्र सहकारी मुद्रणालयाच्या व‌तीने आयोजित करण्यात आलेल्या गोखले स्मृती शताब्दी कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. मोरे बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ पत्रकार एस. के. कुलकर्णी होते. महापौर दत्तात्रेय धनकवडे, अजित निंबाळकर, अंकुश काकडे, मुद्रणालयाचे अध्यक्ष विजय पाटील, उपाध्यक्ष अरविंद शिंदे, जितेंद्र पाटील, शांतीलाल सुरतवाला, नगरसेविका माधुरी सहस्त्रबुद्धे, जयराम देसाई, सुनील गोखले या वेळी उपस्थित होते. महाराष्ट्र सहकारी मुद्रणालयाच्या आवारात हा कार्यक्रम झाला.

'नामदार गोखले यांचे काम देशाच्या विकासात मोठे योगदान देणारे ठरले आहे. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचे ते राजकीय गुरू, तर न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांचे शिष्य होते. शिक्षण क्षेत्रात त्यांनी दिलेले योगदान सदैव लक्षात ठेऊन त्यांचे अनुकरण करून देशाच्या विकासासाठीचे काम प्रत्येकाने केले पाहिजे,' अशी अपेक्षा डॉ. मोरे यांनी व्यक्त केली. मुद्रणालयाचे संचालक अंकुश काकडे यांनी प्रास्ताविक करून स्वागत केले. जयराम देसाई यांनी सूत्रसंचालन केले, तर विजय पाटील यांनी आभार मानले.

किरकोळ व्यापाराच्या वादातून गटबाजी उघड

$
0
0

मुस्तफा आतार, पुणे

कित्येक वर्षापासून व्यापाऱ्यांच्या हितासाठी काम करणाऱ्या दी पूना मर्चंट्स चेंबर संघटनेतील गटबाजी अखेर उघड झाली. मार्केट यार्डातील भुसार विभागातील ८१ किरकोळ व्यापाऱ्यांना पाठिंबा देणाऱ्या चेंबरच्या पदाधिकाऱ्यांच्या भूमिकेला विरोध दर्शवून पाच माजी अध्यक्षांसह सात जणांनी राजीनामा दिला आणि आपल्या नाराजीला वाट करून दिली. त्यामुळे किरकोळ व्यापाऱ्यांना पाठिंबा देणाऱ्या चेंबरच्या भूमिकेला आता उघड विरोध होणार हे स्पष्ट झाले आहे.

कृषी उत्पन्न बाजार समितीच्या उपविधीत दुरुस्ती करून घाऊक विक्रेत्यांना किरकोळ व्यापार करण्याचे परवाने देण्यात आले. तेव्हापासून ते आतापर्यंत मार्केट यार्डात ८१ व्यापाऱ्यांचा 'किरकोळ' व्यापार सुरू आहे. मात्र हा व्यापार बेकायदेशीर असल्याच्या तक्रारी तत्कालीन पणन संचालक सुभाष माने यांच्याकडे करण्यात आल्या. सेवेतून निवृत्त होता होता माने यांनी मार्केट यार्डातील भुसार व्यापारातील किरकोळ विक्रेत्यांवर कारवाईचे आदेश बाजार समितीला दिले. तेव्हापासून किरकोळ विक्रेत्यांचा वाद सुरू आहे.

एकीकडे मार्केट यार्डाच्या भुसारातील काही वरिष्ठ व्यापाऱ्यांनी सुरू असलेला किरकोळ व्यापार बेकायदा असल्याचे स्पष्ट करून त्याला विरोध केला. व्यापाऱ्यांच्या हिताची भूमिका घेत असल्याचे दाखविणाऱ्या दी पूना मर्चंट्स चेंबरने मात्र वरिष्ठ व्यापाऱ्यांसह अन्य दोनशेहून अधिक व्यापाऱ्यांची मते जाणून घेतली नाही. उलट ८१ व्यापाऱ्यांना चेंबरचे संरक्षण पुरविण्याचा विडा उचलला. चेंबरच्या पदाधिकाऱ्यांमध्ये खऱ्या अर्थाने धूसफुस सुरू झाली. तेव्हाच चेंबरच्या आजी माजी पदाधिकाऱ्यांच्या अंतर्गत वादात ठिणगी पडली. यामुळेच थेट किरकोळ व्यापाऱ्यांच्या वतीनेचे चेंबरनेच पुढाकार घेऊन पणनमंत्री यांच्याकडे पणन संचालकांच्या आदेशाला स्थगिती देण्याची मागणी केली. पणनमंत्र्यांकडे अपील करण्यासाठी चेंबरने पुढाकार घेतला. अपिलात गेल्यानंतर किरकोळ विक्रेत्यांऐवजी त्यांची बाजू मांडण्याचे काम चेंबरने केले. त्यासंदर्भात भूमिका ठरविणे अथवा मंत्र्यांना भेटण्यासाठी शिष्टमंडळ नेताना माजी अध्यक्षांना विश्वासात घेतले गेले. त्यांना प्रत्येक वेळी डावलले गेले. 'किरकोळ विक्रेत्यांच्या चुकीच्या कृत्यांना पूना मर्चंट्स चेंबरने पाठिंबा देऊ नये,' अशी माजी अध्यक्षांची भूमिका होती. त्याशिवाय कायद्याच्या विरोधी गोष्टी करणाऱ्या व्यापाऱ्यांना पाठिंबा द्यायचा की त्यांना सुधारावयाचे याचा विचार व्हावा, अशीही त्यांची अपेक्षा होती. प्रत्यक्षात घाऊक विक्रेत्याचे परवाना असून किरकोळ विक्री करणे हे चुकीचे असल्यानेच माजी अध्यक्षांच्या गटाने चेंबरच्या भूमिकेला पाठिंबा दिला नाही. तसेच कार्यकारिणी काम करताना माजी अध्यक्षांसह सात संचालकांना कोणतीही महत्त्वाची जबाबदारी सोपविण्यात आली नाही. अशा विविध कारणास्तव असलेली नाराजी, गटबाजी किरकोळ विक्रीच्या वादामुळे उघड झाली.

काही घाऊक व्यापाऱ्यांनी किरकोळ व्यापार करण्याची चूक केली असली तरी त्यांना संरक्षण दिले पाहिजे, अशी चेंबरची भूमिका होती. त्यामुळे चेंबरने ८१ व्यापाऱ्यांसाठी अनेकांचा रोष पत्करला. गेल्या पंधरा वर्षापासून बाबा पोकर्णा गटाचे असलेल्या माजी अध्यक्षांच्या गटाकडेच चेंबरची सत्ता होती. ही सत्ता हातातून गेल्यानंतर माजी अध्यक्षांना विरोध करण्याची संधी मिळायला हवी होती. पदाधिकाऱ्यांकडून व्यापाऱ्यांच्या हिताचे काम सुरू असताना त्यात खो घालण्याचे काम माजी अध्यक्ष करीत होते, असा आरोप पदाधिकाऱ्यांकडून करण्यात येतो. म्हणूनच किरकोळ विक्रीच्या निमित्ताने हा वाद उफाळून आला. सध्याचे विद्यमान अध्यक्ष असलेल्या वालचंद संचेती यांच्या गटाला शह देण्यासाठीच माजी अध्यक्षांनी ही नवी खेळी खेळल्याची चर्चा मार्केट यार्डात सुरू आहे.

गटबाजी नव्हे 'इलेक्शन स्टंट'

बाबा पोकर्णा पॅनेलचे माजी अध्यक्ष असलेले राजेश शहा, राजेश फुलफगर, राजेंद्र गुगळे, अजित सेठिया, दीपक बोरा, यांच्यासह नितीन नहार आणि दिलीपकुमार रायसोनी या सात संचालकांनी बुधवारी चेंबरच्या पदाचा राजीनामा दिला. यापूर्वी अशी घटना घडलेली ऐकिवात नाही. पूर्वीपासून चेंबरमध्ये असलेली अंतर्गत धूसफूस, गटबाजी कोणत्याही आंदोलनात फारशी कधी उघड झाली नाही. मात्र, ही गोष्ट राजीनामा नाट्यातून ती स्पष्ट झाली. येत्या जून महिन्यात सध्याच्या कार्यकारिणीची दोन वर्षांची मुदत संपते आहे. त्यामुळे मे महिन्यात नव्या कार्यकारिणीसाठी निवडणुका जाहीर होतील. व्यापारी मतदारांसमोर किरकोळ विक्रेत्यांचा मुद्दा घेऊन जाताना त्यासाठी पदाचा राजीनामा दिल्याचा मुद्दा चर्चेचा आणि फायद्याचा ठरणार आहे. गटबाजी होतीच; पण सध्या हा 'इलेक्शन स्टंट' आहे असे काही जाणकारांकडून सांगितले जात आहे.

संगीत मैफलीचा आनंद घ्या रात्रभर

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

शास्त्रीय संगीताचे सूर दूरवर पोहोचविण्यासाठी 'स्पीक मॅके' संस्थेच्या वतीने येत्या शनिवारी (दि. २१) रात्री साठेआठ ते दुसऱ्या दिवशी सकाळी सात वाजेपर्यंत विविध गायकांच्या सुरातून शास्त्रीय संगीताचा आनंद लुटण्याची संधी मिळणार आहे.

संगीताच्या चाहत्यांना ही अनोखी संधी कॉलेज ऑफ इंजिनीअरिंगच्या (सीओईपी) सभागृहात मिळणार आहे. ही मैफल सर्वांसाठी खुली आणि विनामूल्य आहे. या मैफलीत पंडित संदीप देशमुख हिंदुस्थानी शास्त्रीय गायन सादर करतील. त्यानंतर पं. नयन घोष सितार वादन करून संगीत रसिकांना मंत्रमुग्ध करतील.

नंदिनी बेडेकर या हिंदुस्थानी शास्त्रीय संगीत सादर करताना शांत, काळोख्या रात्रीत सुरांचा साज चढवतील. पं. राजेंद्र कुलकर्णी शास्त्रीय बासरीवादन, तर डॉ. अलका देव मारुलकर पहाटे शास्त्रीय गायन सादर करणार आहेत. गायकांसह बासरी, सतारवादनास सुयोग कुंडलकर हे हार्मोनियम, श्रीकांत भावे, संजय देशपांडे, पं. अरविंद कुमार हे तबल्याची साथ संगत करतील, अशी माहिती संस्थेचे सचिव अभिषेक पतंगे यांनी दिली.

धामापूरला होणार निसर्ग पर्यटन केंद्र

$
0
0

वन खात्याची जागा हस्तांतरित

म. टा. प्रतिनिधी, पुणे

दाट निसर्गराजी, नारळ-पोफळीची बने आणि विस्तीर्ण शिवकालीन तलाव अशा वैविध्याने नटलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील धामापूरमध्ये निसर्ग पर्यटन केंद्र साकारणार आहे. या पर्यटन केंद्रासाठी वन खात्याची सुमारे तीन एकर जागा 'वनमुक्त' करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

सिंधुदुर्गमधील मालवणपासून दहा ते बारा किलोमीटर अंतरावर धामापूर हे पर्यटनस्थळ आहे. धामापूरला पाच एकर जागेवर विस्तारलेला शिवकालीन तलाव आहे. जांभा दगडात बांधलेला हा तलाव कोरडा पडत नाही. कोकणात पर्यटनासाठी येणाऱ्या पर्यटकांसाठी धामापूर हे आकर्षणाचे केंद्र आहे. या तलावात जलक्रीडेची व्यवस्था करण्यात आली आहे.

या तलावाच्या लगतच भगवती देवीचे प्राचीन मंदिर बांधलेले आहे. भगवती देवीची अतिशय सुबक अशी मूर्ती पर्यटकांचे भक्तिस्थळ झालेले आहे. कोकणात सिंधुदुर्गला जाणारा पर्यटक हा धामापूरला आवर्जून भेट देतो. त्यामुळे पर्यटकांच्या सोयीसाठी तेथे अनेक सुविधा पुरविण्यात येत आहेत. धामापूरला निसर्ग पर्यटन करण्याचा प्रस्ताव होता. मात्र, त्यासाठी जमीन उपलब्ध नव्हती. वन खात्याकडे या परिसरात मोठी जमीन असल्याने सर्व्हे क्रमांक ९० वरील तीन एकर बारा गुंठे जमीन पर्यटन केंद्रासाठी मिळावी असा प्रस्ताव महसूल खात्याकडून देण्यात आला होता. हा प्रस्ताव नागपूरच्या मुख्य वनसंरक्षकांमार्फत भोपाळच्या वन व जलवायू परिवर्तन मंत्रालयाला पाठविण्यात आला. या प्रस्तावाला काही अटींवर नुकतीच मंजुरी देण्यात आली आहे. त्यामुळे धामापूर येथे निसर्ग पर्यटन केंद्र उभारण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
या निसर्ग पर्यटन केंद्रामुळे पर्यटकांची मोठी सोय होणार आहे. धामापूरला येणाऱ्या पर्यटकांना विश्रांतीसाठी तसेच निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी सोयीची जागा नव्हती. या केंद्रामुळे ही सोय उपलब्ध होणार आहे. पर्यायाने धामापूरला येणाऱ्या पर्यटकांची संख्या वाढून स्थानिक नागरिकांच्या रोजगारालाही हातभार लाभणार असल्याचे अधिकृत सूत्रांकडून सांगण्यात आले.

महिलेच्या खुनाचे गूढ उलगडले

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

शिवाजीनगर येथे मंगळवारी रात्री झालेल्या महिलेच्या खुनाचे गुढ उकलण्यात गुन्हे शाखेच्या युनिट एकच्या पथकाला यश आले आहे. शारिरीक संबंध ठेवण्यास विरोध केला म्हणून हा खून केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. खून केल्यानंतर आरोपीने मृतदेहावर बलात्कार केल्याचेही तपासात निष्पन्न झाले आहे.

अलका पावले (वय ५९, रा. अनुतेज अथर्व सोसायटी, शिवाजीनगर) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी राजेश मणीराम यादव (वय ३०, रा. क्लाऊड नाईट हॉस्पिटल साईट, वाकडेवाडी) याला अटक करण्यात आली आहे.

याप्रकरणी त्यांचा मुलगा महेश पावले (वय ३९, रा. चंदननगर) यांनी फिर्याद दिली आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक रघुनाथ फुगे यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी काही महिन्यांपुर्वी तो पुण्यात कामानिमित्त आला होता. तर पावले या गंज पेठेतील एका सोसायटीमध्ये राहण्यास होत्या. तिथे एसआरएचे काम सुरु असल्याने त्यांना तात्पुरते शिवाजीनगर येथे सदनिका देण्यात आली होती. पावले यांच्या पतीचे निधन झाले आहे.

अनुतेज सोसायटीमध्ये रहात असलेल्या पावले रविवारी सकाळी साहित्य घेऊन रिक्षाने घरी गेल्या. शेजारीच बांधकाम सुरु असलेल्या इमारतीमध्ये पेंटीगचे काम करत असलेल्या तरुणापैकी एकाला मदत करण्यास त्यांनी सांगितले. त्यातील यादवने त्यांचे साहित्य घरापर्यंत पोचवले. पावले यांच्या विनंतीवरुन त्याने त्यांचे पाय चेपून दिले. तेल आणि काही साहित्य विकत आणण्यासाठी त्यांनी यादवला १०० रुपये दिले.

मंगळवारी पुन्हा तो पावलेंकडे गेला. त्यांचे पाय चेपून देतो असे सांगून त्याने त्यांच्यावर बळजबरी करायला सुरुवात केली. त्याला पावले यांनी विरोध केला. त्यावेळी यादवने त्यांचा गळा आवळला. त्यानंतर सु-याने गळा कापला. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या पावले यांच्यावर त्याही अवस्थेत त्याने बलात्कार केला.

दरम्यान, पोलीस कर्मचारी रिजवान जिनेडी यांना आरोपीबाबत माहिती मिळाली. अतिरीक्त पोलीस आयुक्त (गुन्हे) डॉ. शहाजी सोळुंके, उपायुक्त राजेश बनसोडे, सहायक आयुक्त प्रसाद हसबनीस यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ निरीक्षक रघुनाथ फुगे, सहायक निरीक्षक महेंद्र जाधव, कर्मचारी रमेश भोसले, संभाजी भोईटे, मेहबुब मोकाशी, सुधीर माने, रिजवान जिनेडी, तुषार खडके, श्रीकांत वाघवले, इरफान मोमीन, दिलीप मोरे, रविंद्र कदम, प्रकाश लोखंडे, प्रविण शिंदे, प्रभाकर हिरगुडे, सुभाष पिंगळे, मोहन येलपले यांच्या पथकाने आरोपीला मुंबईतून ताब्यात घेतले.

पुण्यातील कुत्री, मांजरी; लय भारी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

डॉबरमॅन, बॉक्सर, अल्सेशियन असे कुत्र्यांचे नेहमीच चर्चेत असलेल्या कुत्र्यांबरोबरच तब्बल शंभर जातीच्या वेगवेगळ्या कुत्र्यांचा आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर बक्षिसे मिळविलेल्या मांजरांचा मेळावा सध्या पुण्यात भरला आहे. पुढील दोन दिवस या कुत्र्यांच्या स्पर्धा रंगणार असून विजेत्या कुत्र्यांना 'चॅम्पियन'चा किताबही देण्यात येणार आहे.

निमित्त आहे, पूना केनेल फेडरेशनतर्फे आयोजित पेट कार्निव्हलचे. म्हात्रेपूल परिसरातील पंडित फार्म येथे आयोजित करण्यात आलेल्या या कार्निव्हलमध्ये शुक्रवारी शंभरावा डॉग शोला सुरूवात झाली. डॉबरमॅन पिंचर क्लब ऑफ इंडियाच्या वतीने डॉबरमॅन स्पेशालिटी शो आयोजित करण्यात आला होता. या शोमध्ये साठहून अधिक डॉबरमॅन जातीच्या कुत्री सहभागी झाली. कुत्र्यांची चालण्यातली ऐट, त्यांचे उंची, स्वच्छता आणि निरोगी आरोग्याचे सगळे निकष लावल्यानंतरच परीक्षकांनी उत्तम श्वानाची निवाड केली. या वेळी 'बेस्ट ऑफ द ब्रीड' म्हणून कोलकत्त्याच्या कॅम्ब्रियाज नावाच्या कुत्र्याने सन्मान पटकाविला. सेकंड बेस्ट ऑफ द ब्रीड म्हणून अमहदाबादच्या बादेन बादेन या कुत्र्याने तर तिसरा क्रमांक नेल्लोरच्या संजना स्टायटेनियाम या कुत्रीने किताब मिळवला. या स्पर्धेचे परीक्षक म्हणून इंटरनॅशनल जज ऑफ डॉबरमॅन ब्रीड - सी. व्ही. सुदर्शन यांनी काम पहिले.

कार्निवलमध्ये पुढील दोन दिवसात जर्मन शेफर्ड स्पेशालिटी शो व रॉटविलर स्पेशालिटी शो देखील होणार आहे. त्याबरोबरच शनिवारी आणि रविवारी सायंकाळी कुत्र्यांसाठी 'ओबेडियन्स व एजिलिटी'ची प्रात्यक्षिकेही दाखवली जाणार आहेत. दुसऱ्या सत्रामध्ये जर्मन शेफर्डचा शो झाला. त्यांचे निकाल मात्र शनिवारी जाहीर करण्यात येणार आहेत.

या 'ऑल ब्रीड डॉग शो चॅम्पियनशीप' हे कार्निव्हलचे आकर्षण ठरले असून शनिवारी आणि रविवारी विजेतेपदासाठी विविध प्रजातींच्या कुत्र्यांमध्ये चुरस होणार आहे. या स्पर्धेत सुमारे ५०० कुत्री सहभागी झाली आहेत. यातील ३०० कुत्री पुण्यातील आहेत.

ह्याद्री जर्मन शेफर्ड सोसायटीच्या वतीने जर्मन शेफर्ड स्पेशालिटी शो आणि रॉटविलर क्लब ऑफ इंडियाच्या वतीने रॉटविलर स्पेशालिटी शो देखील होणार आहे. याशिवाय आंतरराष्ट्रीय पातळीवरील बक्षीसे मिळविलेली पन्नासहून अधिक मांजरेही या महोत्सवात पहिल्यांदाच सहभागी होणार आहेत. हे कार्निवल रविवार (२२ फेब्रुवारी)पर्यंत सुरू राहणार आहे. प्राणिप्रेमींना या महोत्सवात सहभागी होता येणार आहे.


बिलाच्या वादातून वीज कनेक्शन तोडले

$
0
0

पुणेः विजेचे बिल नेमके कोणी भारायचे, या वादात थकबाकी लाखोंच्या घरात गेल्याने जिल्हा परिषदेच्या जुन्या इमारतीचे वीज कनेक्शन शुक्रवारी तोडले गेले. वीज खंडित झाल्यामुळे सरकारी कार्यालयांत अंधार होता. वीज नसल्याने सर्वसामान्य नागरिकांच्या कामांचाही खोळंबा झाला.

जिल्हा परिषदेच्या या जुन्या इमारतीत जिल्हाधिकारी व जिल्हा परिषदेशी संबंधित कार्यालये आहेत. त्यांच्याकडून विजेचा वापर केला जातो. पण वीज बील कोणी भरायचे यावरून त्यांच्यात वाद आहे. जिल्हा परिषदेने आपली जागा जिल्हाधिकारी कार्यालयाशी संबंधित विभागांना भाडेकराराने दिली आहेत. त्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयानेच वीज बिल भरावे अशी जिल्हा परिषदेची भूमिका आहे. पण, जागा भाडेकराराने घेतली असल्याने वीज बिलाचा मुद्दा जिल्हाधिकारी कार्यालयाशी संबंधित नाही असा दावा केला जातो.

या वादामध्ये जिल्हा परिषदेच्या जुन्या इमारतीचे विजेचे बिल सुमारे साडेचार लाख रुपयांवर पोहोचले. या इमारतीत दोन मीटर आहेत. त्यातील एका मीटरचे बील तीन लाखांवर तर दुसऱ्या मीटरचे बील दीड लाखांवर गेले आहे. महावीजने बिल भरण्यासंदर्भात वारंवार सूचना केली. पण, बिल भरले न गेल्याने अखेर महावीजच्या कर्मचाऱ्यांनी सकाळीच वीज तोडण्याची कारवाई केली. कारवाईनंतर जिल्हा परिषदेने वीज बिल तातडीने भरण्यासंदर्भात जिल्हाधिकारी सौरव राव यांना पत्र दिले आहे.

खून प्रकरणातील धागेदोरे हाती

$
0
0

लोणावळाः लोणावळ्यातील लग्न समारंभातून बेपत्ता झालेल्या आणि त्यानंतर बलात्कार करून खून करण्यात आलेल्या चिमुरडीच्या प्रकरणातील तपासात महत्त्वाचे धागेदोरे पोलिसांच्या हाती लागले आहेत. लोणावळ्यातील कुमार रिसॉर्टमध्ये पाच दिवसांपूर्वी ही घटना उघडकीस आली होती. येत्या एक दोन दिवसात नराधमांना अटक होण्याची दाट शक्यता आहे.

तब्बल दीडशे पोलिस या प्रकरणाचा तपास करीत आहेत. या घटनेसंदर्भात एक प्रत्यक्षदर्शी शुक्रवारी पोलिसांकडे आला. त्याच्या म्हणण्यानुसार, त्या दिवशी रात्री नऊ ते साडेनऊच्या दरम्यान ही मुलीला लग्न समारंभ परिसरात तीनचार महिलांसोबत पाहिली होती. यावेळी ती मुलगी रडत त्यांना शिव्या देत लाथा मारत होती. त्यावेळी त्याच ठिकाणी तीन चार मुले तिला ओढत असताना प्रत्यक्षदर्शीला दिसली. मात्र ते तिचे नातेवाईक असावे, असे वाटल्याने संबंधित व्यक्तीने त्याकडे दुर्लक्ष केले.

पंकजा मुंडे-पालवे यांना झटका

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

राज्याच्या महिला बाल कल्याण आणि ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे पालवे यांच्याशी संबधित असलेल्या सुप्रा प्रायव्हेट लिमिटेड या जाहिरात कंपनीचा ठेका रद्द करण्याचा प्रस्त‌ाव पालिका आयुक्तांनी स्थायी समितीसमोर ठेवला आहे. या कंपनीबरोबर करण्यात आलेल्या करारामध्ये अनियमितता आढळून आल्याने प्रस्ताव ठेवण्यात आल्याचा खुलासा अतिरिक्त आयुक्त राजेंद्र जगताप यांनी केला.

भाजपच्या मंत्री मुंडे पालवे यांच्याशी संबधित असलेल्या जाहिरात कंपनीबरोबर करार करताना प्रशासनाने स्थायी समितीची कोणतीही मान्यता न घेता या कंपनीबरोबर करार केला आहे. याबाबतची सर्व माहिती आणि तक्रार पालिका आयुक्तांकडे दोन आठवड्यापूर्वी देऊनही त्यावर कोणतीही कारवाई केली नसल्याचा मुद्दा विरोधी पक्षनेते अरविंद शिंदे यांनी सभागृहात उपस्थित केला. स्थायी समितीच्या बैठकीत ठराव झालेला नसतानाही या कंपनीबरोबर करण्यात आलेल्या करारनाम्यावर दोन नगरसेवकांनी सह्या केल्या आहेत. यामध्ये दोषी असलेल्या अधिकाऱ्यांवर आणि स्थायीला अंधारात ठेऊन करारावर सही करणाऱ्या नगरसेवकांवर फौजदारी गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी शिंदे यांनी केली. मनसेसह राष्ट्रवादीच्या सभासदांनी यावर प्रश्न उपस्थित केल्याने याचा सविस्तर अहवाल पुढील आठवड्यात सभागृहात मांडावा असे आदेश महापौर दत्तात्रय धनकवडे यांनी दिले.

महापालिकेतील सभासदांनी याबाबत आक्षेप घेतल्यानंतर पालिका आयुक्तांनी आवश्यक ती कागदपत्रांची तपासणी करून या कंपनीचा ठेका रद्द करण्याचा प्रस्ताव स्थायी समितीसमोर ठेवला असल्याचा खुलासा अतिरिक्त आयुक्त जगताप यांनी केला. बीओटी समितीने दिलेल्या मंजुरीनुसार २००४ मध्ये या कंपनीबरोबर करार करण्यात आला होता. मात्र त्यानंतर स्थायी समितीची मान्यता न घेता परस्पर मुदतवाढ दिली आहे. याची कोणतीही कागदपत्रे उपलब्ध नसल्याने कंपनीबरोबरचा ठेका रद्द करण्याचा प्रस्ताव प्रशासनाने ठेवल्याचे त्यांनी स्पष्ट केले. प्रशासन सुप्रा कंपनीला एक न्याय आणि इतरांना दुसरा न्याय असा दुजाभाव का करते, असा प्रश्न उपस्थित करत काँग्रेस, राष्ट्रवादी, मनसेच्या नगरसेवकांनी प्रशासनावर कडक शब्दात तोंडसुख घेतले. पुढील आठवड्यात प्रशासनाने याचा सविस्तर अहवाल सर्वसाधारण सभेत सादर करावा, असे आदेश महापौर धनकवडे यांनी दिले.

‘बीआरटी’ला ‘मे अखेर’चा मुहूर्त

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

बहुचर्चित आणि बहुप्रतीक्षित जलद बस वाहतूक सेवेसाठी (बीआरटी) पुणेकरांच्या नशिबी अजून 'तारीख पे तारीख'च लिहिली असल्याचे शुक्रवारी स्पष्ट झाले. 'इंटेलिजन्ट ट्रान्झिट मॅनेजमेंट सिस्टीम'चे (आयटीएमएस) काम मे अखेरपर्यंत पूर्ण झाल्यानंतरच आळंदी व नगररोडवरील बीआरटी कार्यान्वित होऊ शकणार आहे.

महापौर दत्तात्रय धनकवडे यांनी एक मार्चपासून बीआरटी सुरू करण्याचे गेल्यावर्षी जाहीर केले होते. मात्र, बीआरटीसाठी आवश्यक असणाऱ्या आयटीएमएससह इतर सुविधांची पूर्तता होणे अद्याप बाकी असल्याने ही 'डेडलाइन' गाठता येणार नसल्याचे वृत्त 'महाराष्ट्र टाइम्स'ने बुधवारी दिले होते. पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपी) शुक्रवारी झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत त्यावर शिक्कामोर्तब झाले. 'आयटीएमएस'च्या टेंडरला विलंब झाल्याने ही प्रक्रिया रखडली होती. संचालक मंडळाने शुक्रवारी तातडीने या कामासाठीची 'वर्क ऑर्डर' दिली असून, ही सर्व प्रक्रिया पूर्ण होण्यास आणखी किमान तीन महिन्यांचा कालावधी लागणार आहे. त्यामुळे, आळंदी व नगररोडवरील बीआरटीसाठी नागरिकांना मे अखेरपर्यंत थांबावे लागणार आहे.

आळंदी व नगररोडवर पालिकेने कोट्यवधी रुपये खर्चून बीआरटीच्या पायाभूत सुविधांची निर्मिती केली. तसेच, येथील बसथांब्यांसाठीही लाखो रुपये खर्च करण्यात आले. अहमदाबाद बीआरटीच्या धर्तीवर स्वयंचलित दरवाजांपासून ते पादचाऱ्यांसाठी सुरक्षित क्रॉसिंगपर्यंत अनेक सुविधा उभारण्यात आल्या. गेल्यावर्षी, पालिकेने बीआरटी ट्रॅकवर 'टेस्ट रन'ही घेतली, तरीही आयटीएमएस सुविधा नसल्याने पीएमपीकडून बससेवा सुरू करण्यात टाळाटाळ केली जात होती. पुणे महापालिकेने त्यासाठीचा आवश्यक निधी उपलब्ध करून दिल्यानंतर गेल्या काही महिन्यांत त्याला गती प्राप्त झाली असली, तरी हे काम पूर्ण होण्यासाठी आणखी काही दिवसांची प्रतीक्षा करावी लागणार आहे.

भाडेकरार आता खासगी एजन्सींकडे

$
0
0

पुणेः फ्लॅटमधील भाडेकरूंच्या भाडेकराराची नोंदणी करण्यासाठी आता वकिलांची गरज भासणार नाही. हे भाडेकरार सुलभरीत्या नोंदविण्याचे काम खासगी एजन्सींना देण्याचा निर्णय मुद्रांक शुल्क व नोंदणी महानिरीक्षक विभागाने घेतला आहे. हे एजन्सी चालक नेमण्याची जाहिरात लवकरच देण्यात येणार आहे.

राज्याचे नोंदणी महानिरीक्षक डॉ. श्रीकर परदेशी यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. भाडेकरार नोंदणीसाठी (लिव्ह अॅण्ड लायसन्स) या एजन्सी नेमण्याच्या निर्णयामुळे फ्लॅट; तसेच दुकानांच्या भाडेकराराची नोंदणी करण्यासाठी नोंदणी अथवा महा-ई-सेवा केंद्राबरोबरच एजन्सी चालकांची मदत होणार आहे. विशेष म्हणजे स्टॅम्प व्हेंडरप्रमाणेच या एजन्सी चालकांची नेमणूक केली जाणार आहे.

एजन्सीचे काम घेण्याची प्रक्रिया सुलभ ठेवण्यात आली आहे. दहा हजार रुपये अनामत रक्कम जमा करून एजन्सी म्हणून काम घेता येणार आहे. या एजन्सीमार्फत भाडेकरार दस्त नोंदणीसाठी सातशे रुपये आकारता येणार आहेत. त्यातील अडीचशे रुपये दस्तनोंदणीपोटी नोंदणी विभागात जमा करावे लागतील आणि उर्वरित साडेचारशे रुपये एजन्सी चालकाला मिळतील. फ्लॅट खरेदीच्या दस्त नोंदणीचे कामही एजन्सी चालकाला करता येणार आहे.

Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images