Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

व्यावसायिक दरानेच ससूनला पाणीपुरवठा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

गोरगरिबांसाठी मोफत उपचार देणाऱ्या ससून हॉस्पिटल; तसेच बी. जे. मेडिकल कॉलेजच्या विद्यार्थ्यांसाठी करण्यात येणारा पाणीपुरवठा व्यावसायिक दराने केला जात आहे. यामुळे ससूनच्या तिजोरीवर बोजा पडत असून दर वर्षाला साठ लाख रुपयांची रक्कम पालिकेला अदा करण्याची वेळ येत आहे.

शहरी गरीब आरोग्य योजनांसह अन्य विविध योजनांद्वारे सवलती पालिकेकडून सवलती दिल्या जात आहेत. गरिबांवर मेहेरनजर दाखवित मोफत उपचार करणाऱ्या ससूनला व्यावसायिक दराने पाणी पुरवठा करून जादा शुल्क आकारणी केली जात असल्याचा आरोप होत आहे. परिणामी घरगुती दराने पाणी पुरवठा करावा, अशी मागणी ससून हॉस्पिटल प्रशासनाने केली आहे.

महापालिकेने ससून हॉस्पिटलला १९८९ पासून पाणी पुरवठा करण्यात येतो. एका वर्षात लाखो लिटर पाणी ससून हॉस्पिटलला लागते. हॉस्पिटलमध्ये अनेक वॉर्ड आहेत. त्यात सर्जरी, स्वच्छता, पिण्यासाठी आणि अन्य कामासाठी पाण्याची गरज भासते. त्याशिवाय बी. जे. मेडिकल कॉलेज आणि विद्यार्थ्यांचे वसतिगृहाला पाण्याची आवश्यकता असते. त्यामुळे प्रतिहजार लिटरसाठी २१ रुपये हा व्यावसायिक दर आकारण्यात येत आहे. हॉस्पिटलला दरवर्षी साधारणतः २५ ते ३० कोटी लिटर पाणी लागते. त्या करिता सुमारे ५० ते ६० लाख रुपये बिल द्यावे लागते. व्यावसायिक दराने पाण्याचे बील आकारण्यात येत आहे. घरगुती दराने दर आकारणी केली तर ससून हॉस्पिटलचे पैसे वाचणार आहेत.

गरिबांवर मोफत उपचार करणारे हॉस्पिटल म्हणून ससूनची ख्याती आहे. तरीही पालिकेकडून व्यापारी दराने पाणी पुरवठा केला जातो. त्या पोटी ५० ते ६० लाख रुपये पाण्यासाठी द्यावे लागतात. हा खर्च कमी झाला तर निधीचा योग्य ठिकाणी वापर करता येईल.

- डॉ. अजय चंदनवाले, अधिष्ठाता, ससून हॉस्पिटल


‘वरसगाव’ची गळती थांबविण्यासाठी निधी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

वरसगाव धरणातून सेकंदाला पाचशे लिटरहून अधिक प्रमाणावर होणारी गळती पाण्याची गळती थांबविण्यासाठी राज्य सरकारने साडेचार कोटी रुपयांचा निधी दिला असून ही गळती थांबविण्याच्या कामाच्या निविदा येत्या आठ दिवसांत काढण्यात येणार आहेत. सिमेंट ग्राऊटिंग पद्धतीने ही गळती रोखली जाणार आहे.

वरसगाव धरणाचा माती बांध, फाउंडेशन गॅलरी व इन्सपेक्शन गॅलरीमधून मोठ्या प्रमाणावर पाणीगळती होत असल्याचे वास्तव 'मटा'ने मांडले होते. तसेच ही गळती तातडीने दुरूस्त न झाल्यास धरणफुटीचा धोका संभवू शकतो, असा जलसंपदा खात्याने दिलेला अहवालही 'मटा'ने प्रसिद्ध केला होता.

पानशेत धरणालगतच मोसे नदीवर वरसगाव धरण बांधण्यात आले आहे. या धरणाचे बांधकाम १९७६ मध्ये हाती घेण्यात आले. मुख्य दगडी धरण आणि बाजूला मातीचा बांध अशी या धरणाची रचना करण्यात आली. या बांधकाम तंत्रामुळे दगडी धरणाला धोका निर्माण झाल्यास ते न फुटता बाजूच्या माती बांधामधून पाणी वाहून जाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.

या धरणाचे बांधकाम १९९३ पर्यंत सुरू होते. धरणाचे बांधकाम सुरू असतानाच इन्स्पेक्शन आणि फाउंडेशन गॅलरीमध्ये लिकेज होत असल्याचे दिसले होते. तसेच, माती बांधांतून पाणी झिरपत असल्याचे निदर्शनास आले होते. त्यावर तातडीने उपाय करणे गरजेचे असताना त्याकडे दुर्लक्ष केले गेले. या धरणाची पाणीसाठवण क्षमता १३.२० अब्ज घनफूट (टीएमसी) असल्याने पाण्याच्या दबावाने ही गळती वाढत गेली. १९९७ मध्ये साधारणतः प्रतिसेकंद ३३८ लिटर असे पाणी गळतीचे प्रमाण होते. ते दर वर्षी वाढत गेले. २००८ मध्ये पाणी गळतीचे प्रमाण प्रतिसेकंद

४२२ लिटरवर पोहोचले. ही गळती आता पाचशे लिटरहून अधिक झाली आहे. धरणातून साधारणतः प्रतिसेकंद १५० लिटरपर्यंत पाणीगळती ग्राह्य धरली जाते. वरसगावमधील गळती जादा असल्याने त्यासंबंधीचे अहवाल पाटबंधारे खात्याने राज्य सरकारला वेळोवेळी पाठविले.

काम ‌तीन टप्प्यांत होणार

'गळती थांबविण्यासाठी राज्य सरकारने चाडेचार कोटी रुपयांचा निधी दिला आहे. त्यानुषंगाने येत्या आठ दिवसांत या कामाच्या निविदा काढण्यात येणार आहे,' असे खडकवासला पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता बी. बी. लोहार यांनी सांगितले. ग्राउटिंग पद्धतीने पाणी गळती कमी कमी केली जाणार आहे. हे काम तीन टप्प्यांत केले जाणार असून त्यासाठी धरणाच्या पाया पातळीपर्यंत बॉडी ड्रील करण्यात येणार आहे. या कामामुळे धरणातील पाणी गळती कमी होऊन धरण सुरक्षित राहणार आहे.

वीज अटकाव यंत्रणा खरेदी प्रक्रिया रद्द

$
0
0

पुणेः पालिकेच्या शाळांवर बसविण्यात येणारी वीज अटकाव यंत्रणेची खरेदी प्रक्रिया रद्द करण्याचा निर्णय मंगळवारी स्थायी समितीने घेतला आहे. यामध्ये अनेक वाद निर्माण झाल्याने ही प्रक्रिया रद्द करून यापूर्वी शिक्षण मंडळाच्या काही शाळांवर ही यंत्रणा बसविण्यात आली होती. त्याच्या सद्यस्थितीचा अहवाल प्रशासनाने सादर करावा, असे आदेश स्थायी समितीचे अध्यक्ष बापूराव कर्णे गुरुजी यांनी दिले. महापालिकेच्या शिक्षणमंडळाच्या शाळांवर वीज अटकाव यंत्रणा बसविण्यासाठी टेंडर काढण्यात आले होते. पालिकेतील माननीयांच्या आणि काही अधिकाऱ्यांच्या मर्जीतील ठेकेदाराला हे काम दिल्याचा आरोप सुराज्य संघर्ष समितीचे अध्यक्ष विजय कुंभार यांनी करत यावर आक्षेप घेतला होता.

प्रकाशक प‌रिषदेचा संमेलनविरोध मावळला

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, पुणे

पंजाबातील घुमान येथे होणाऱ्या साहित्य संमेलनावर प्रकाशक परिषदेने घातलेला बहिष्कार मागे घेतला असून, इतर प्रकाशकांना संमेलनात सहभागी होण्याची दारे खुली केली. महाराष्ट्रात उपसंमेलन घ्यावे, संमेलनातील ग्रंथ प्रदर्शनासाठी वेगळी समिती करावी, त्या समितीत प्रकाशक विक्रेत्यांचा समावेश असावा, अशा मागण्यांचे पत्रही प्रकाशक परिषदेने महामंडळाला दिले आहे. २८ फेब्रुवारीला होणाऱ्या महामंडळाच्या बैठकीत त्या पत्रावर चर्चा केली जाणार आहे.

अखिल भारतीय साहित्य महामंडळ व मराठी प्रकाशक परिषदेची मंगळवारी पुण्यात बैठक झाली. गेल्या काही दिवसांपासून घुमानच्या साहित्य संमेलनात सहभागी होण्यावरून सुरू असलेल्या वादावर त्यात चर्चा झाली. बैठकीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत महामंडळाच्या अध्यक्षा डॉ. माधवी वैद्य व प्रकाशक परिषदेचे कार्याध्यक्ष अरुण जाखडे यांनी त्याबाबत माहिती दिली. महामंडळाचे प्रमुख कार्यवाह प्रकाश पायगुडे, कोषाध्यक्ष सुनील महाजन, प्रकाशक परिषदेचे अध्यक्ष रमेश कुंदूर, उपाध्यक्ष अरविंद पाटकर, कार्यवाह अनिल कुलकर्णी, रमेश राठिवडेकर आदी उपस्थित होते. बैठकीत झालेल्या सकारात्मक चर्चेनंतर प्रकाशक परिषदेने इतर प्रकाशकांना संमेलनाला जाण्यासाठीची दारे खुली केली.

''महामंडळ व प्रकाशक परिषद या मराठीसाठीच झटणाऱ्या संस्था आहेत. त्यामुळे आमच्यातील मतभेदाचे मुद्दे चर्चेतून विरले आहेत. प्रकाशकांनी विरोधाला पूर्णविराम दिला आहे. त्यामुळे संमेलनात साहित्याच्या सर्व घटकांनी सहभागी होण्याच्या कल्पनेला खऱ्या अर्थाने मूर्त रूप येत आहे. परिषदेने दिलेल्या मागण्यांच्या पत्रावर महामंडळाच्या २८ फेब्रुवारीच्या बैठकीत चर्चा केली जाईल,' असे वैद्य यांनी सांगितले.

'संमेलनाला न जाण्याचे इतर प्रकाशकांवर घातलेले बंधन मागे घेण्यात आले. त्यामुळे इच्छा असलेल्या कोणत्याही प्रकाशकाने संमेलनाला जावे. वादाचा मुद्दा एका मर्यादेपर्यंतच ताणला गेला पाहिजे. आता आम्ही सुवर्णमध्य काढत आहोत,' असे जाखडे यांनी स्पष्ट केले.

'मटा'ने आणले 'आमनेसामने'

अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाने घुमानला साहित्य संमेलन घेण्याचे जाहीर केल्यापासूनच प्रकाशकांनी त्याबाबत नाराजी व्यक्त केली होती. नंतर प्रकाशकांनी संमेलनावरच बहिष्कार घातला होता. मराठी साहित्याचा उत्सव महत्त्वाचा मानायलाच हवा की व्यावसायिक गणिते, या अनुषंगाने या प्रश्नाबाबत प्रकाशक आणि महामंडळाच्या भूमिकांचा आढावा घेण्यासाठी महाराष्ट्र टाइम्सने प्रकाशक परिषदेचे अध्यक्ष रमेश कुंदूर व महामंडळाच्या अध्यक्षा डॉ. माधवी वैद्य यांना रविवारच्या (८ फेब्रुवारी) अंकात समोरासमोर आणले होते. या दोघांनीही भूमिका मांडताना चर्चेची तयारी दर्शवली होती. त्यानुसार झालेल्या चर्चेतूनच हा मार्ग निघला आहे.

प्रकाशक परिषदेच्या मागण्या

किमान दहा कुटुंबे असलेल्या बृहन्महाराष्ट्रातील ठिकाणी संमेलन घ्यावे.

संयोजक संस्था स्थानिक असावी.

संमेलनातील ग्रंथ प्रदर्शनासाठी वेगळी समिती करावी. त्या समितीत प्रकाशक-विक्रेत्यांचा समावेश असावा.

दोन्ही संस्थांनी एकमेकांचा सन्मान करावा.

लक्ष्मण प्रकाशनाच्या वतीने विविध पुरस्कार जाहीर

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

डॉ. एस.एन. पठाण, डॉ. विनोद शहा, डॉ. दत्ता कोहिनकर, बाजीराव रायकर, नवनाथ काकडे, नाबदा मोरे, नम्रता शिळीमकर आणि डॉ. बाळासाहेब शिंदे यांना विविध पुरस्काराने येत्या शुक्रवारी (१३ जानेवारी) एका कार्यक्रमात गौरविण्यात येणार आहे. लक्ष्मण प्रकाशनाच्या वतीने हे पुरस्कार दिले जातील.

प्रकाशनचे प्रमुख भा. ल. ठाणगे यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली. त्या वेळी नाबदा मोरे उपस्थित होते. संस्थेच्या वतीने तेजसिंहराजे राजेनिंबाळकर यांच्या स्मृत्यर्थ अॅड. भास्करराव आव्हाड, योगाचार्य बाबासाहेब काळे यांची ग्रंथतुला या वेळी केली जाणार आहे. डॉ. एस. एन. पठाण यांना शिवभूषण पुरस्कार, डॉ. विनोद शहा आणि बाजीराव रायकर यांना समाजभूषण, डॉ. दत्ता कोहिनकर यांना बुद्धभूषण पुरस्कार, अॅड. विनय भोपतराव यांना आदिवासी भूषण पुरस्काराने गौरविले जाणार आहे. रामदास महाराज जाधव यांच्या हस्ते प्रकाश आंबेडकर आणि रतनलाल सोनग्रा यांच्या उपस्थितीत येत्या शुक्रवारी दुपारी एक वाजता हा समारंभ होणार आहे.

या शिवाय रविंद्र वाकचौरे यांना तेजसिंहराजे जीवनगौरवर पुरस्कार, डॉ. वसंत मोरे, डॉ. बाळासाहेब शिंदे यांना आदर्श समाज प्रबोधनकार, जाई देशपांडे, आशा ताजवे यांना सावित्रीबाई फुले पुरस्कार दिले जाणार आहेत. नवनाथ काकडे यांना आदर्श सरपंच पुरस्कार, सुमन दरेकर यांना सावित्रीबाई फुले जीवनगौरव, भगवान वैराट यांना महात्मा फुले सेवा पुरस्कार, नाबदा मोरे यांना संत पुरस्कार, रावसाहेब झांबरे यांना आदर्श पालक पुरस्कार, शुभान खैरे यांना डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन, नम्रता शिळीमकर क्रीडा भूषण पुरस्कार देण्यात येणार आहेत.

एलबीटीबाबत अर्थमंत्र्यांचे मौन

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

स्थानिक स्वराज्य संस्था कराच्या (एलबीटी) पर्यायाबाबत अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी बुधवारी मौन पाळले. व्हॅटवरील संभाव्य अधिभाराबाबत काहीही न बोलता 'आम्ही एलबीटी हटविणार,' असाच धोशा त्यांनी कायम ठेवला.

'राज्यातील प्रमुख शहरांमध्ये लागू करण्यात आलेला एलबीटी हटवून त्याजागी व्हॅटवर अधिभार लावण्याच्या पर्यायावर राज्य सरकार विचार करीत आहे. मात्र, त्यामुळे मूठभर व्यापारी व उद्योजकांना कोट्यवधींचा फायदा होईल आणि त्याबदल्यात राज्यातील ग्रामीण जनतेच्या डोक्यावर महागाईचा बोजा पडेल,' अशी टीका करीत विरोधी पक्षांनी या प्रस्तावास विरोध करण्याचा इशारा दिला आहे. त्याबाबत विचारले असता अर्थमंत्री मुनगंटीवार यांनी आम्ही एलबीटी रद्द करण्याचे आश्वासन दिले आहे आणि तो शब्द आम्ही पाळणार, एवढेच उत्तर दिले. अजित पवार यांनी याबाबत केलेल्या टीकेबाबत विचारले असता, 'ती राजकीय भूमिका आहे,' असे उत्तर मुनगंटीवार यांनी दिले. मात्र, 'व्हॅटवरील अधिभाराचा पर्याय व्यवहार्य आहे का, असे विचारले असता, एलबीटीला कोणता पर्याय द्यायचा, ते मी ठरवेन,' असे ते म्हणाले.

दरम्यान, यापूर्वी पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत निश्चित करण्यात आलेल्या जिल्हा योजनांच्या निधीमध्ये कोणतीही कपात करण्यात येणार नाही, अशी हमी मुनगंटीवार यांनी दिली. मात्र, काही योजना कालबाह्य ठरल्या असून काही योजना सुरू ठेवण्यात जनतेचा काहीही फायदा नाही, अशा योजनांचा फेरविचार करण्यात येईल, असे ते म्हणाले. विकास आणि रोजगारनिर्मिती यासाठी आपण, सहकारमंत्री चंद्रकांत पाटील आणि जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्यासह मध्य प्रदेशातील योजनांची पाहणी करणार आहोत, असे त्यांनी सांगितले.

बायोमेट्रिक राज्यभरात लागू व्हावी

'पुणे जिल्ह्यातील शिरूरमध्ये रेशनकार्डांवरील धान्य बायोमेट्रिक पद्धतीने वितरीत करण्यात येते. त्यामुळे धान्यामध्ये २० ते २५ टक्क्यांची बचत होत असल्याचे आढळून आले आहे. ही योजना राज्यभरात लागू करण्याबाबत अन्न व नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट यांच्याशी चर्चा करून निर्णय घेऊ,' असे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले.

शिक्षणमंत्र्यांनाच अधिकार आहेत का?

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

'शिक्षण मंडळाला पूर्वीप्रमाणेच सर्व अधिकार देण्याचे पत्र शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी पालिकेला पाठविले असले, तरी कायद्याच्या विरोधातील आदेश शिक्षणमंत्री कसे देऊ शकतात,' अशी विचारणा काँग्रेसने केली आहे. शिक्षणमंत्र्यांच्या आदेशानुसार शिक्षण मंडळाचे अधिकार पूर्ववत देण्याची अंमलबजावणी केली गेली, तर त्याविरोधात आंदोलन केले जाईल, असा इशारा देण्यात आला आहे.

शिक्षण हक्क कायद्यानुसार (आरटीई) महापालिकेतील सर्व शिक्षण मंडळे बरखास्त केली गेली. मात्र, त्यानंतर हायकोर्टाने अस्तित्वातील शिक्षण मंडळांची मुदत संपेपर्यंत ती बरखास्त केली जाऊ नयेत, असे आदेश दिले होते. त्यामुळे, मंडळाचे अधिकार पुन्हा मिळावेत, यासाठी गेल्या काही दिवसांपासून पदाधिकाऱ्यांकडून सातत्याने प्रयत्न सुरू आहेत. शिक्षणमंत्री तावडे यांनीही पालिका आयुक्तांना नुकतेच लेखी पत्राद्वारे अधिकार परत देण्याचे निर्देश दिले होते. शिक्षणमंत्र्यांच्या पत्रालाच काँग्रेसने आक्षेप घेतला असून, हा अधिकारच त्यांना नसल्याचा दावा काँग्रेसचे नगरसेवक संजय बालगुडे यांनी केला आहे.

'कायद्यामध्ये केवळ शिक्षण मंडळांना मुदतवाढ देण्याचा स्पष्ट उल्लेख असतानाही त्याविरोधात त्यांना अधिकार देण्यासाठी शिक्षणमंत्र्यांनी एवढा पुढाकार घेण्याची गरज काय, अशी विचारणा त्यांनी केली; तसेच मुख्यमंत्री किंवा नगरविकास विभागाशी संबंधित विषयामध्ये शिक्षणमंत्र्यांनी हस्तक्षेप करण्याचे कारण काय,' असा सवालही त्यांनी उपस्थित केला. शिक्षण मंडळाला पूर्वीप्रमाणे अधिकार देण्याचा निर्णय घेऊन त्याची अंमलबजावणी केली गेल्यास, त्याविरोधात आंदोलन केले जाईल, असा इशारा बालगुडे यांनी दिला.

लवकरच लोडशेडिंगमुक्ती

$
0
0

मयुरेश प्रभुणे, पुणे

लोडशेडिंगमुक्त भारताचे उद्दिष्ट येत्या काही वर्षांत प्रत्यक्षात येऊ शकेल, असा निर्णय मोदी सरकारने नुकताच घेतला आहे. आयआयटी मद्रासमधील इलेक्ट्रिकल इंजिनीअरिंग विभागाचे प्रमुख प्रा. अशोक झुनझुनवाला यांनी सुचवलेल्या नावीन्यपूर्ण कल्पनेला केंद्राने हिरवा कंदील दाखवला असून, येत्या काही महिन्यांत देशातील पाच हजार गावांमध्ये पथदर्शी प्रकल्प राबवण्यात येणार आहे. प्रा. अशोक झुनझुनवाला यांच्या संकल्पनेनुसार प्रत्येक घराला कमी दाबाच्या समांतर डीसी पॉवर सप्लायची जोडणी दिल्यास घरातील वीज कधीही न जाता बल्ब, फॅन, टीव्ही, मोबाइल चार्जर यांसारखी उपकरणे २४ तास वापरता येऊ शकतील.

केंद्रीय ऊर्जा राज्यमंत्री पियुष गोयल यांनी 'मटा'ला नुकतीच याबाबत माहिती दिली. पणजी येथे आयोजित चौथ्या भारतीय विज्ञान संमेलनाच्या समारोपाला गोयल उपस्थित होते. या वेळी ऊर्जा मंत्रालयाच्या वतीने ऊर्जा क्षेत्रात संशोधन वाढावे यासाठी घेण्यात आलेल्या निर्णयांची माहिती त्यांनी दिली.

गोयल म्हणाले, 'प्रा. झुनझुनवाला आणि त्यांच्या आयआयटीच्या टिमने एसी सप्लायच्या सोबत घरांना समांतरपणे डीसी सप्लायची जोडणी देण्याची संकल्पना मांडली आहे. आज घरात वापरली जाणारी बहुतेक उपकरणे डीसी सप्लायवर चालतात मात्र, विजेचा पुरवठा एसी लाईनद्वारे केला जातो. लोडशेडींगच्या काळात एसी लाइन बंद झाल्यावर ही डीसी लाइन सक्रीय होऊन घरातील तीन दिवे, दोन पंखे, टीव्ही आणि मोबाइल चार्जर अखंड सुरू राहू शकतात.'

'केंद्र सरकारने या संकल्पनेला पूर्ण पाठिंबा दिला असून पहिल्या टप्प्यात पाच हजार गावे आणि दुसऱ्या टप्प्यात एक लाख गावांना समांतर डीसी लाइन देण्यात येईल. या पथदर्शी प्रकल्पातून समोर आलेल्या माहितीच्या आधारे पुढील काळात देशातील २५ कोटी घरांना याच पद्धतीने वीज पुरवठा करण्याची योजना आहे,' असेही ते म्हणाले.

पर्यावरणपूरक आणि किफायतश‌िरही!

सोलर पॅनलद्वारे निर्माण होणारी वीज डीसी स्वरूपात असल्यामुळे या प्रकल्पासाठी वीज निर्मिती सौरऊर्जेद्वारे करणे किफायतश‌िर आणि पर्यावरणपूरक ठरेल, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. त्यामुळे एखाद्या कुटुंबाने सरकारी जोडणीसह स्वतःचे सोलर पॅनल बसवले तर त्या कुटुंबाला एकदाच पॅनलचा खर्च येईल. त्यानंतर वीज बिल भरावे लागणार नाही. डीसी सप्लायवर चालणारी बहुतेक उपकरणे कमी वीज वापरत असल्यामुळे वीज बिलांमध्येही मोठी बचत होऊ शकेल.


बास्केटबॉलपटू अक्षय भोसलेचे निधन

$
0
0

पुणे : केरळमधील राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेदरम्यान साताऱ्याचा नेटबॉलपटू मयुरेश पवार याच्या दुर्दैवी निधनाची दुर्घटना ताजी असतानाच बुधवारी सकाळी पुण्याचा आंतरराष्ट्रीय बास्केटबॉलपटू अक्षय भोसले याचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले.

बीएमसीसीच्या मैदानावर सकाळी सातच्या सुमारास व्यायामासाठी २३ वर्षीय अक्षय मित्रांसोबत गेला होता. जॉगिंग करताना पहिल्याच राउंडदरम्यान तो पडला. त्यानंतर पाणी मारून त्याला शुद्धीवर आणण्यासाठी प्रयत्न करण्यात आले. त्यातील एका डॉक्टरांनी त्याचा हात तपासला. त्यानंतर त्यांनी तत्काळ अॅम्ब्युलन्सद्वारे त्याला जवळील जोशी हॉस्पिटलमध्ये दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. अक्षयच्या अचानक जाण्याने सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत होती. २००७मध्ये अक्षयने व्हिएतनाममध्ये झालेल्या १९ वयोगटाच्या आंतरराष्ट्रीय शालेय बास्केटबॉल (एजीएफआय) स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व केले होते. मॉडर्न हायस्कूलमध्ये पाचवीत असल्यापासून त्याने बास्केटबॉल खेळायला सुरुवात केली होती. त्याने विविध वयोगटांतून दहाहून अधिक राष्ट्रीय स्पर्धांत महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व केले.

सध्या तो भारती विद्यापीठाच्या आयएमईडी कॉलेजमध्ये एमबीएच्या (एचआर) प्रथम वर्षात शिकत होता. नुकत्याच झालेल्या पश्चिम विभागीय आंतरविद्यापीठ बास्केटबॉल स्पर्धेत त्याने भारती विद्यापीठ संघाचे नेतृत्व केले होते. त्याचा नेतृत्वाखाली भारती विद्यापीठ संघाने विजेतेपद पटकावले होते. या स्पर्धेत तो उत्कृष्ट खेळाडूही ठरली होती. चेन्नईत नुकत्याच झालेल्या अखिल भारतीय आंतरविद्यापीठ स्पर्धेत सलग तीन सामन्यांत तो उत्कृष्ट खेळाडू ठरला होता.

व्हिसेरा राखून ठेवला

आंतरराष्ट्रीय बास्केटबॉलपटू अक्षयच्या मृत्यूप्रकरणी डेक्कन पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. अक्षय याचा मृतदेहाचे पोस्टमार्टेम करण्यात आले असून, डॉक्टरांनी व्हिसेरा राखून ठेवला आहे. त्याच्या अहवाल आल्यानंतरच मृत्यूचे कारण स्पष्ट होईल, अशी माहिती डेक्कन पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक प्रवीण चौगुले यांनी दिली. या प्रकरणी तपास करण्यात येत आहे. अक्षयवर उपचार करण्यास काही दिरंगाई झाली आहे का, याचाही चौकशी करण्यात येईल, असेही ते म्हणाले.

राजगुरुनगरमध्ये महिलेचा खून

$
0
0

राजगुरुनगरः चाकणजवळील कडाचीवाडी येथे एका महिलेच्या डोक्यात हातोड्याने घाव घालून निर्घृण खून करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. घराच्या बाथरूममध्ये हा खून करण्यात आला असून, महिलेच्या डोक्याचा अक्षरशः चेंदामेंदा करण्यात आला आहे. संबंधित महिलेसोबत राहणारा इसम या भीषण घटनेनंतर गायब झाला असून, पोलिस त्याचा शोध घेत आहेत. उल्हास सुदाम गोऱ्हे (४०, रा. ठाकूरपिंपरी, ता. खेड) असे बेपत्ता झालेल्या या इसमाचे नाव असून, त्यानेच हे कृत्य केल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे; मात्र संबंधित महिलेचे नाव अद्याप निष्पन्न होऊ शकलेले नसल्याचे पोलिसांनी सांगितले.

याबाबत चाकण पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, उल्हास गोऱ्हे हा विवाहित असून, गावी ठाकूरपिंपरी येथे तो पत्नी व मुलांसोबत राहतो; मात्र गेल्या वर्षापासून उल्हास कडाचीवाडी येथे युवराज राजाराम कड यांच्या चाळीतील खोलीत संबंधित महिलेसह पती-पत्नी असल्याचा बनाव करून राहात होता. सकाळी संबंधित खोलीचा दरवाजा बंदच असल्याचे लक्षात आल्याने परिसरातील ग्रामस्थ संबंधित खोलीत डोकावले असता घडलेला प्रकार उघडकीस आला. संबंधित घराचे मालक युवराज राजाराम कड (रा. कडाचीवाडी, ता. खेड) यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला.

अपघातात तमाशा कलावंत जखमी

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, राजगुरुनगर

खेड तालुक्याच्या दुर्गम भागातील मंदोशी येथील घाटात अवघड वळणावरील अतिशय तीव्र उतारावर ट्रक चालकाचे नियंत्रण सुटून ट्रक थेट एका झाडावर जाऊन अडकला. ही घटना मंगळवारी सायंकाळी घडली. या दुर्घटनेत वीस महिला व पुरुष तमाशा कलावंत जखमी झाले.

बारामती येथील छाया खिलारे-बारामतीकर या तमाशातील हे कलावंत आहेत. जखमींना जवळच्या वाडा येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. सुदैवाने पुढे असलेल्या दोनशे ते अडीचशे फूट खोल दरीत ट्रक न कोसळल्याने मोठी दुर्घटना टळली. हे कलावंत तळेघर (ता. आंबेगाव) येथील गावयात्रेतील लोकनाट्य कार्यक्रमासाठी गेले होते. कार्यक्रम संपल्यानंतर ते तीन गाड्यांमधून परतत असताना तळेघरच्या अलीकडे खेड तालुक्याच्या हद्दीतील मंदोशी घाटात एका ट्रकचा अपघात झाला. दुर्घटनाग्रस्त ट्रकच्या मागे या कलावंतांची आणखी दोन वाहने असल्यामुळे जखमींना तातडीने मदत मिळाली. स्थानिक लोकांनीही मदतकार्यात सहभाग घेतला.

जमिनीच्या वादातून काटेवाडीत मारहाण

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, बारामती

जमिनीच्या वादातून बाजार समितीच्या माजी सभापतीने एका कुटुंबाला भर दिवसा काठी, चाकू, चॉपर, फायटरने अमानुष मारहाण केली; तसेच त्यातील एका महिलेचा विनयभंगही केल्याची तक्रार बारामती ग्रामीण पोलीस ठाण्यात दाखल झाली असून, चार दिवसांनंतरही आरोपी अद्याप मोकाटच आहे. आरोपी राष्ट्रवादी काँग्रेसचा कार्यकर्ता असल्याचे समजते.

कण्हेरी गावातील गट क्रमांक १५०मधील १२ गुंठ्यांच्या जमिनीवरून काटेवाडी येथील तुकाराम दळवी, संजय कोंडिबा काटे आणि श्रीपाद रत्नशिवराज काटे यांच्यात बारामतीच्या दिवाणी कोर्टात २०१०पासून वाद सुरू आहेत. कोर्टातील हा वाद मागे घेण्यासाठी सचिन काटे याने दळवी यांच्या कुटुंबावर सतत दडपण आणून यापूर्वी अनेकदा दमदाटी केल्याने पोलिसांत तक्रार देण्यात आली होती; मात्र तरीही पोलिसांनी दखल घेतली नसल्याने हा प्रकार घडल्याचे पीडित कुटुंबीयांकडून सांगण्यात आले आहे.

ही घटना गेल्या आठवड्यात घडली. आठ जणांनी काटेवाडी येथील दळवी यांच्या राहत्या घरात घुसून मारहाण केली आहे. पीडित महिलेने पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार बाजार समितीचे माजी सभापती संजय कोंडिबा काटे, योगेश संजय काटे, विवेक संजय काटे, रत्नशिवराम हनुमंत काटे, गणेश रत्नशिवराम काटे, दत्तात्रय भिकोबा काटे, अतुल सत्यवान काटे यांनी पीडित महिलेस दमदाटी करून शिवीगाळ केली.

तसेच 'दावा मागे घे, नाही तर एकालाही जिवंत ठेवणार नाही,' अशी धमकी दिली. असे बोलून सदर महिलेचा विनयभंग करत असताना पीडित महिलेचा ओरडण्याचा आवाज ऐकून पती अभिजित घरात प्रवेश करत असतानाच आठ जणांनी त्यांना मारहाण केली. त्यांना सोडवण्यास आलेल्या इतर व्यक्तींनाही मारहाण करण्यात आली. त्यांच्याविरुद्ध पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा तपास पोलिस उपनिरीक्षक एस. पी. गायकवाड करत आहेत.

पाण्याची समस्या दूर करणार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, येरवडा

पूर्व पुण्यातील नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याची समस्या दूर करण्यासाठी 'भामा आसखेड'मधून पाणीपुरवठा योजना आखण्यात आली; पण शासनाच्या विविध खात्यांत समन्वयाचा अभाव असल्याने योजना पूर्ण होण्यास निर्माण झालेल्या अडचणी दूर करण्यात येतील, असे आश्वासन जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी दिले.

धानोरी, वडगाव शेरी, येरवडा या पूर्व भागातील वाढत्या लोकसंख्येची तहान भागवण्यासाठी भामा आसखेड धरणातून २.६४ टीएमसी पाण्याची पुरवठा योजना मंजूर झाली आहे; पण विविध खात्यांतील अधिकाऱ्यांमध्ये योजना पूर्ण करण्यासाठी समन्वयाचा अभाव असल्याने दिरंगाई होत आहे. या पार्श्वभूमीवर वडगाव शेरीचे आमदार जगदीश मुळीक यांनी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांची मंत्रालयात भेट घेऊन परिस्थितीची माहिती दिली. या वेळी जलसंपदा विभागाचे अधीक्षक अभियंता चौधरी, पालिका अधिकारी उपस्थित होते.

भामा आसखेड धरणाचा नियोजित कालवा रद्द करण्यात आला असून, संपादित करण्यात आलेल्या जमिनीच्या सात-बारावरील शिक्के तात्काळ काढण्याचे आदेश जलसंपदामंत्र्यांनी दूरध्वनीवरून जिल्हाधिकारी यांना दिले. योजनेतील जेडवेल व अस्सल कामे करण्यासाठी मनपाने जलसंपदा खात्याकडे परवानगी मागितली. यावर विचार करण्याचे आश्वासन मंत्र्यांनी दिले.

लोकलमधून नदीत पडल्याने मृत्यू

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पिंपरी

लोणावळा-पुणे लोकलच्या दारात उभे राहून प्रवास करताना नदीमध्ये पडून एका तरुणाचा मृत्यू झाला. बुधवारी (११ फेब्रुवारी) दुपारी दापोडी येथील हॅरीस पुलावर ही घटना घडली. अग्निशमन दलाच्या जवानांनी तरुणाचा मृतदेह पाण्याबाहेर काढला. मात्र, अद्याप त्याची ओळख पटू शकलेली नाही.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनसुर, आज दुपारी लोणावळा- पुणे लोकल दापोडीच्या हॅरीस पुलावरून जात होती. त्या वेळी लोकलच्या दारात थांबून प्रवास करणाऱ्या एक तरुणाचा तोल जाऊन तो नदीपात्रात पडला. लोकलमधील इतर प्रवाशांनी लोकल थांबवून रेल्वे कर्मचाऱ्यांना घडलेल्या घटनेची माहिती दिली. लोहमार्ग पोलिसांनी घटनेची माहिती अग्निशमन दलला दिली. अग्निशामक दलाच्या जवानांनी त्वरित घटनास्थळी येऊन बोटीच्या सहाय्याने तरुणाचा शोध घेण्यास सुरुवात केली. चारच्या सुमारास तरुणाचा मृतदेह जवानांच्या हाती लागला. त्याच्या खिशातील सर्व कागदपत्रे भिजल्याने तरुणाची ओळख अद्याप पटू शकली नाही.

अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाऱ्या तरुणाला अटक

लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर आठ महिन्यांपासून बलात्कार करणाऱ्या तरुणाला वाकड पोलिसांनी मंगळवारी (१० फेब्रुवारी) अटक केली. संजय जनार्धन जाधव (वय १९, रा. वाल्हेकरवाडी, चिंचवड) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. या प्रकरणी एका १७ वर्षीय मुलीने वाकड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संजय जाधव हा पीडित अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून गेल्या आठ महिन्यांपासून तिच्यावर बलात्कार करत होता. दरम्यान, तिला गर्भधारणा झाल्यावर त्याने तिला गर्भपाताच्या गोळ्या देऊन तिचा गर्भपात केला. याबाबत तिने मंगळवारी वाकड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानंतर बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंध कायद्यानुसार संजय जाधव याच्यावर गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली आहे. महिला सहाय्यक पोलिस निरीक्षक व्ही. एस. धुमाळ तपास करीत आहेत.

कंटेनरखाली सापडून एकाचा मृत्यू; दोघे गंभीर

दुचाकीवरून तिघेजण बसून जाताना ट्रकला ओव्हरटेक करताना कंटेनरखाली सापडून दुचाकीचालकाचा जागीच मृत्यू झाला; तर अन्य दोघे गंभीर जखमी झाले. बुधवारी (११ फेब्रुवारी) दुपारी सव्वा दोनच्या सुमारास देहूरोड येथील केंद्रीय विद्यालयासमोर हा अपघात झाला.

कार्तिक नाडर (वय १९, रा. देहूरोड) असे मृत्युमुखी पडलेल्याचे नाव आहे; तर कृष्णदेव पाचोरी (१९), हर्षसिंग (१९, दोघेही रा. देहूरोड) हे गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर निगडीतील खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कार्तिक व त्याचे मित्र हे एकाच अॅक्टिव्हा गाडीवरून देहूरोडहून पुण्याच्या दिशेने जात होते. दुपारी सव्वा दोनच्या सुमारास देहूरोडमधील केंद्रीय विद्यालयासमोर आले असता, त्यांनी भरधाव वेगातील एका ट्रकला ओव्हरटेक केले. ट्रकच्या पुढे असणाऱ्या कंटेनरचा मात्र त्यांना अंदाज आला नाही. त्यामुळे भरधाव वेगातील दुचाकीवरील ताबा सुटून हे तिघे थेट कंटेनरखाली सापडले. कंटेनरचे चाक अंगावरून गेल्याने कार्तिकचा जागीच मृत्यू झाला; तर अन्य दोघे गंभीर जखमी झाले आहेत.

पत्नीला पेटवल्यावरून गुन्हा

किरकोळ कारणावरून झालेल्या भांडणातून पतीने पत्नीच्या अंगावर रॉकेल ओतून पेटवून दिले. यामध्ये गंभीर जखमी झालेल्या पत्नीवर उपचार सुरू आहेत. सोमवारी (९ फेब्रुवारी) रात्री साडेदहाच्या सुमारास मोरेवस्ती चिखली येथे ही घटना घडली. या प्रकरणी पतीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अनंत बाबुवार भांगे (वय २७, रा. साने चेंबर्स, मोरे वस्ती, चिखली) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्याचे नाव आहे; तर शिल्पा (वय १८) या गंभीर जखमी झाल्या. शिल्पाच्या वडिलांनी या प्रकरणी निगडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी रात्री शिल्पा आणि अनंत यांच्यामध्ये किरकोळ कारणावरून भांडण झाले. चिडलेल्या अनंतने घरामध्ये असलेल्या स्टोव्हमधील रॉकेल शिल्पाच्या अंगावर ओतून तिला पेटवून दिले. यामध्ये गंभीर जखमी झालेल्या शिल्पावर एका खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.

शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना दिलासा

$
0
0

अतिरिक्त संख्येबाबतच्या अध्यादेशाला सरकारची स्थगिती

म. टा. प्रतिनिधी, पुणे

शिक्षण हक्क कायद्यानुसार शिक्षकेतर कर्मचारी निश्चित करण्यासाठी राज्य सरकारने २३ नोव्हेंबर २०१३ रोजी काढलेल्या अध्यादेशाच्या अंमलबजावणीला स्थगिती देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. तसेच, कर्मचाऱ्यांची संख्या निश्चित करण्यासाठी शिक्षण आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमून नव्याने धोरण ठरवण्याचे निर्देशही राज्य सरकारने दिले आहेत.

महाराष्ट्र राज्य शिक्षकेतर कर्मचारी महासंघाने राज्य सरकारच्या या पावलाचे स्वागत केले असून, या माध्यमातून राज्यातील अतिरिक्त ठरू पाहणाऱ्या ३० हजार शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना दिलासा मिळाल्याचे सांगितले आहे. सरकारच्या आदेशानुसार, आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली नेमण्यात आलेल्या या समितीमध्ये मुख्याध्यापक, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी संघटनांचे प्रतिनिधींना सदस्य म्हणून स्थान देण्यात आले आहे. शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची संख्या निश्चित करण्यासाठी नव्याने नेमण्यात आलेल्या या समितीने गोगटे समिती, चिपळूणकर समिती आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची संख्या निश्चित करण्यासाठी तयार करण्यात आलेल्या २३ नोव्हेंबर, २०१३च्या अध्यादेशाचा अभ्यास करावा. त्यानुसार शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची संख्या निश्चित करण्यासाठी येत्या दोन महिन्यांच्या आत आपला अहवाल सादर करावा, असे निर्देशही या आदेशाद्वारे देण्यात आले आहेत.

राज्य सरकारने काढलेल्या या आदेशामुळे राज्यभरातील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे. गेल्या दोन महिन्यांपासून महामंडळाच्या माध्यमातून कर्मचाऱ्यांनी लावून धरलेल्या मागणीला या निमित्ताने यश आल्याची भावना महामंडळाचे सचिव शिवाजी खांडेकर यांनी गुरुवारी व्यक्त केली.


वसुलीची टांगती तलवार

$
0
0

राज्य सहकारी संघ गैरव्यवहार; संचालकांना १९ मार्चची अंतिम मुदत

म. टा. प्रतिनिधी, पुणे

राज्य सहकारी संघातील कोट्यवधी रुपयांच्या गैरव्यवहाराप्रकरणी दोषारोप ठेवण्यात आलेल्या संचालकांवरील वैयक्तिक नुकसानीची जबाबदारी कायम करण्यासंदर्भात चौकशी अधिकारी निवृत्त न्यायमूर्ती एम. आर. मखरे यांनी संचालकांना १९ मार्चची अंतिम मुदत दिली आहे. या मुदतीत संचालकांचे म्हणणे ऐकून संघाच्या नुकसान भरपाईच्या वसुलीची कारवाई केली जाणार आहे.

महाराष्ट्र राज्य सहकारी संघाच्या पुण्यातील मुख्यालयाच्या इमारतीसह गुलटेकडी व कोल्हापूरमधील भूखंडाचे 'बांधा, वापरा आणि हस्तांतरित करा' (बीओटी)या तत्त्वावर विकसन करण्याच्या करारात १०५० कोटी रुपयांचा गैरव्यवहार झाल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे; तसेच सहकारी संघाच्या भविष्य निर्वाह निधीबरोबरच विमान प्रवास, वाहन खर्च, मोबाइल फोन खरेदी व दुरुस्तीची बिले, दैनिक भत्ते, भोजन व लॉजिंग, कँटीन करार, अनामत रकमा यात मोठ्या प्रमाणावर गैरव्यवहार झाल्याचे स्पष्ट झाले आहे. या गैरव्यवहाराला संघाचे तत्कालीन संचालक अशोक जगताप, सुहास तिडके, शिवाजीराव नलावडे, राजकुमार भोगले, भिकाजी पारले, राजेश कांबे व माजी आमदार प्रवीण दरेकर यांच्यासह २१८ आजी-माजी संचालक व अधिकाऱ्यांना वैयक्तिक व सामुहिक नुकसानीसाठी जबाबदार ठरविण्यात आले आहे.

सहकार संघातील गैरव्यवहारांना जबाबदार असलेल्या संचालकांची कलम ८८ अन्वये; तसेच महाराष्ट्र सहकारी संस्था नियम १९६१ मधील नियम ७२ (३) अन्वये करण्यात प्राधिकृत अधिकारी निवृत्त न्यायाधीश एम. आर. मखरे यांच्यामार्फत चौकशी करण्यात आली. त्यांच्यावर संघाचे नुकसान झाल्याचा ठपका ठेवण्यात आला. ही नुकसान भरपाई करण्यासंदर्भात निवृत्त न्या. मखरे यांनी संचालकांना आपले अंतिम म्हणणे मांडण्याची गुरुवारी संधी दिली होती. या सुनावणीला बहुतांश माजी-माजी संचालक वकिलांच्या फौजफाट्यासह उपस्थित होते.

भरपाई वसुलीची कारवाई

सुनावणीसाठी संचालकांनी पुढची तारीख मागून घेतली. त्यावर विचार करून निवृत्त न्या. मखरे यांनी १९ मार्च ही सुनावणीची अंतिम मुदत दिली आहे. या सुनावणीच संचालकांचे म्हणणे ऐकले जाणार आहे. त्यानंतर प्रत्यक्ष नुकसान भरपाई वसूल करण्याची कारवाई केली जाणार असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.

मृतदेहावर अत्याचाराच्या खुणा

$
0
0

नयना पुजारी खूनप्रकरण

म. टा. प्रतिनिधी, पुणे

सॉफ्टवेअर इंजिनीअर नयना पुजारी हिच्या मृतदेहाचे पोस्टमार्टेम करताना तिच्यावर लैंगिक अत्याचाराच्या खुणा आढळल्या होत्या. तिचा गळा आवळून तसेच डोक्यात दगड टाकून खून करण्यात आल्याच्या खुणा दिसत होत्या, अशी साक्ष पुजारीच्या मृतदेहाचे पोस्टमार्टेम केलेल्या डॉक्टरांनी गुरुवारी कोर्टात दिली. विशेष न्या. साधना शिंदे यांच्या कोर्टात ही सुनावणी झाली

खेड ग्रामीण रुग्णालयातील डॉ. प्रकाश धोंडगे यांनी नयना पुजारीच्या मृतदेहाचे पोस्टमार्टेम केले होते. त्यांची साक्ष कोर्टात नोंदविण्यात आली. विशेष सरकारी वकील अॅड. हर्षद निंबाळकर यांनी या वेळी कामकाज पाहिले.

नयना पुजारीच्या मृतदेहाचे पोस्टमार्टेम करण्यासाठी १५ फोटो काढण्यात आले होते. ते फोटो डॉ. धोंडगे यांनी ओळखले.

पुजारीचे पोस्टमार्टेम करताना एक महिला डॉक्टरही उपस्थित होत्या. पोस्टमार्टेम करण्यापूर्वी २४ -३६ तासापूर्वी तिचा मृत्यू झाला असावा. तिच्या अंगावर लैंगिक अत्याचाराच्या खुणा होत्या. गळा आवळल्याच्या तसेच डोक्यात दगड टाकून खून केल्याच्या खुणा होत्या, असे डॉ. धोंडगे यांनी कोर्टात सांगितले.

भाजपचे आज ‘विचारमंथन’

$
0
0

राजकीय सद्यस्थितीवर गडकरी-फडणवीस यांच्या उपस्थितीत चर्चा

म. टा. प्रतिनिधी, पुणे

दिल्ली निवडणुकीनंतर भाजप आणि शिवसेनेत पेटलेले वादंग, मंत्र्यांच्या अधिकारांवरून धुसफूस आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बारामती भेटीवरून राष्ट्रवादीशी कथित मैत्रीच्या चर्चा.... अशा विविध विषयांवरून राज्यात निर्माण झालेल्या वादळांच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री व पक्षाचे ज्येष्ठ नेते नितीन गडकरी, भाजपचे राज्य प्रभारी राजीव प्रताप रूडी आणि प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्यासह केंद्र आणि राज्यातील वरिष्ठ नेते पुण्यात येत आहेत. हे सर्वजण निरनिराळ्या कार्यक्रमांच्या निमित्ताने पुण्यात येत असले, तरी राज्यातील राजकीय सद्यस्थितीवर त्यांच्यात चर्चा होणार असल्याची माहिती भाजपतील वरिष्ठ सूत्रांनी दिली. गेल्या काही दिवसांमध्ये भाजपने सातत्याने डावलल्याने नाराज झालेल्या शिवसेनेने दिल्लीतील भाजपच्या पराभवाने पुन्हा आक्रमक पवित्रा धारण केला आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांनाही त्यांना जोरदार प्रत्युत्तर दिल्याने भाजप आणि शिवसेनेत पुन्हा वादांचे फटाके फुटू लागले आहेत. त्याबरोबरच गेल्या काही दिवसांमध्ये राज्य मंत्रिमंडळातील राज्यमंत्र्यांना अधिकार देण्याच्या मुद्द्यावरून खडाजंगी उडाली आहे.

तसेच दुसरीकडे गेल्या काही काळापासून भाजप आणि राष्ट्रवादी यांच्या दोस्तान्याची चर्चा पुन्हा रंगली आहे. त्यातच पंतप्रधान नरेंद्र मोदी हे उद्या, शनिवारी (१४ फेब्रुवारी) राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या निमंत्रणावरून बारामतीला येत असल्याने या चर्चेला पुन्हा उकळी फुटली आहे. या भेटीबाबत महायुतीतील घटक पक्ष स्वाभिमानी शेतकरी संघटनेने नाराजी व्यक्त केली आहे. तसेच भाजप आणि महायुतीतील अन्य पक्ष यांच्यात संवाद वाढविण्यासाठी समन्वय समितीची स्थापना करण्याची मागणी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली आहे. त्यामुळे राज्यातील राजकीय वातावरण निरनिराळ्या स्तरावर ढवळून निघाले आहे.

या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री फडणवीस आणि केंद्रीय नेते गडकरी हे पुण्यात येत असून त्यांच्यात राजकीय सद्यस्थितीवर चर्चा होणार असून राज्यात उभ्या राहिलेल्या पेचप्रसंगातून मार्ग काढण्याबाबत विचार विनिमय होणार असल्याचे सांगण्यात आले. या दोन वरिष्ठ नेत्यांबरोबरच पक्षाचे राज्यप्रभारी राजीवप्रताप रूडी यांच्यासह ज्येष्ठ नेते महसूलमंत्री एकनाथ खडसे, प्रकाश जावडेकर, राधामोहन सिंह, विनोद तावडे, सहकारमंत्री चंद्रकांत पाटील, प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, विष्णू सावरा यांच्यासह पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट आणि राज्यमंत्री दिलीप कांबळे हेसुद्धा विविध कार्यक्रमांच्या निमित्ताने पुण्यात आहेत. आपापल्या कार्यक्रमांसह वरिष्ठ नेत्यांची राजकीय चर्चेसाठी बैठक होणार असल्याचे समजते.

उद्धव ठाकरेही पुण्यात

भाजपचे वरिष्ठ नेते पुण्यात असताना शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हेही आज पुण्यातच आहेत. सायंकाळी त्यांच्या उपस्थितीत अनौपचारिक भेटीगाठींचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.

तापमानात वाढ; पारा १२.६ अंशांवर

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

अंशतः ढगाळ वातावरणामुळे शहरातील तापमानात काहीशी वाढ होऊन किमान तापमान १२.६ अंशांवर पोहोचले. परंतु, राज्यातील सर्वात नीचांकी तापमानाची नोंदही पुण्यातच झाली. राज्यात विदर्भात काही ठिकाणी वादळी वाऱ्यांसह पावसाने हजेरी लावली. उर्वरित राज्यात हवामान कोरडे होते. पुढील दोन ते तीन दिवस शहरातील किमान तापमानात एक ते दोन अंशांनी वाढ होण्याची शक्यता आहे. तर, राज्यात उत्तर मध्य महाराष्ट्र, विदर्भात तुरळक ठिकाणी वादळी वाऱ्यांसह पावसाची शक्यता आहे.

यकृतदानातून आईने दिले जीवनदान

$
0
0

लहान मुलाचे पुण्यातील पहिले यकृत प्रत्यारोपण 'केईएम'मध्ये यशस्वी

म. टा. प्रतिनिधी, पुणे

तीन वर्षांच्या मुलाचे यकृत खराब झाल्याने त्याला यकृतदान करून चिमुरड्याला आईनेच दुसऱ्यांदा नवसंजीवनी दिली. केईएम हॉस्पिटलमधील प्रत्यारोपणतज्ज्ञांनी सोळा तास अथक परिश्रम करून पुण्यातील लहान मुलाचे पहिले 'लिव्हर ट्रान्सप्लांट' यशस्वी करून दाखविले. ऑपरेशननंतर चिमुकल्यासह कुटुंबीयांच्या चेहऱ्यावर आता हास्य उमटले आहे.

केईएम हॉस्पिटलमधील यकृत प्रत्यारोपणतज्ज्ञ डॉ. सुरेश भालेराव आणि डॉ. शशांक क्षोत्रिया यांनी याबाबत माहिती दिली. राजगुरुनगर येथील सायली सचिन झुजुम या महिलेने आपल्या तीन वर्षांच्या मयुरेशला यकृत देऊन आई-मुलाच्या नात्यावर पुन्हा एकदा शिक्कामोर्तब केले. हॉस्पिटलमधील तज्ज्ञ डॉ. भालेराव, क्षोत्रिया यांच्यासह डॉ. हर्षल राजेकर, डॉ. आशिष बावडेकर, डॉ. मधू ओतीव, डॉ. लोबो, डॉ. सरोज बांदे, डॉ. जॉय जाना, डॉ. बी. डी. बांदे, डॉ. दिपाली राव, डॉ. चोरडिया यांच्या पथकाने हे ऑपरेशन यशस्वी केले.

'रक्तवाहिनीत गाठ निर्माण झाल्याने रक्ताभिसरणाची प्रक्रिया थांबलेल्या तीन वर्षांच्या मुलाला 'बड्ड चारी सिंड्रोम' नावाचा दुर्मीळ आजार झाल्याचे निदान झाले. त्यामुळे संपूर्ण यकृत खराब झाले होते. यकृत प्रत्यारोपण करण्याशिवाय दुसरा पर्याय नव्हता. अखेर मयुरेशची आई सायली यांचा रक्तगट जुळला आणि त्यांचे यकृत देण्याचे निश्चि झाले. केईएम हॉस्पिटलमधील तज्ज्ञांनी एकाच वेळी मुलाचे यकृत काढून त्याच्या वजनाएवढा आईच्या यकृताचा भाग काढून त्याचे प्रत्यारोपण केले. गुंतागुंतीचे हे ऑपरेशन सोळा तासांच्या परिश्रमानंतर यशस्वी झाले,' अशी माहिती डॉ. भालेराव आणि डॉ. क्षोत्रिया यांनी दिली.

शस्त्रक्रियेसाठी १६ लाख रुपये येणारा खर्च कुटुंबियांना परवडणारा नव्हता. त्यामुळे आठ लाखांत हे प्रत्यारोपण करण्यात आले. देशात आतापर्यंत फक्त शंभर लहान मुलांचे यकृत प्रत्यारोपण झाले आहे. यापूर्वी दिल्ली, बेंगळुरू, चेन्नई येथे लहान मुलांच्या यकृत प्रत्यारोपणासाठी जावे लागत होते, असेही सांगण्यात आले.

'मयुरेश दोन महिन्यांचा असतानाच त्याचे यकृत खराब झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले होते. त्या वेळी यकृत बदलण्याशिवाय दुसरा मार्ग नाही असे सांगण्यात आले. त्यामुळे आर्थिक परिस्थिती नसतानाही आम्ही मुंबईच्या जसलोक हॉस्पिटल नंतर चेन्नईच्या हॉस्पिटलमध्ये गेलो. चेन्नईमध्ये सर्व तपासण्या झाल्या. मात्र २५ लाखांचा खर्च सांगितला. अखेर पुण्यात आलो. केईएम हॉस्पिटलमध्ये कमी खर्चात ऑपरेशन होईल असे कळाले. त्यानंतर आम्ही येथेच अॅडमिट झालो आणि कमी खर्चात डॉक्टरांनी यकृत प्रत्यारोपण करून मुलाचे प्राण वाचविले. आता आम्ही दोघेही सुखरूप आहोत', अशी प्रतिक्रिया सायली झुजुम यांनी दिली.
.......

पुण्यातील मुलांमधील पहिलेच यकृत प्रत्यारोपण केईएम हॉस्पिटलमध्ये झाले आहे. आता केईएममध्ये ही सुविधा कार्यान्वित झाली आहे. गरीब पेशंटनाही परवडेल अशा दरांत आता शस्त्रक्रिया केली जाणार आहे.
- डॉ. सुरेश भालेराव, यकृत प्रत्यारोपण तज्ज्ञ

Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images