Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

कर्जासाठी ‘बँक ऑफ महाराष्ट्र’वर निर्बंध

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

बँक ऑफ महाराष्ट्रच्या वाढत्या अनुत्पादित कर्जांमुळे रिझर्व्ह बँकेने निर्बंध घातले असून, मुंबई स्टॉक एक्स्चेंजला त्याची माहिती देण्यात आली आहे. मात्र, या निर्बंधांमुळे बँकेच्या नियमित कामकाजावर कोणताही परिणाम होणार नसल्याचे बँकेतर्फे स्पष्ट करण्यात आले आहे.

बँक ऑफ महाराष्ट्रने शनिवारी मुंबई स्टॉक एक्स्चेंजला पत्र पाठवून बँकेवर रिझर्व्ह बँकेने (प्रॉम्प्ट करेक्टिव्ह अॅक्शन) निर्बंध आणल्याची माहिती दिली आहे. रिझर्व्ह बँकेने १५ जून रोजी पाठविलेले पत्र बँकेला मिळाले असून, त्यानुसार बँक कार्यवाही करत असल्याचे म्हटले आहे. रिझर्व्ह बँकेने बँकेवर आणलेले निर्बंध हे बँकेची कामगिरी सुधारावी, बँकेच्या व्यवस्थापनात सुधारणा व्हावी, नफा वाढावा आणि बँकेच्या मालमत्तेचा (अॅसेट्स) दर्जा सुधारावा,यासाठी आहेत,असे या पत्रात म्हटले आहे.

प्रॉम्प्ट करेक्टिव्ह अॅक्शनमधील निर्बंधांनुसार बँकांना रिझर्व्ह बँकेच्या परवानगीशिवाय नव्या शाखा सुरू करता येत नाहीत. बँकांच्या उपकंपन्यांमध्ये गुंतवणूक करता येत नाही. बँकांच्या कामकाजातील काही गोष्टींवर रिझर्व्ह बँकेचे नियंत्रण राहते. बँकांना मान्यतेशिवाय मोठ्या रकमेची कर्ज (कॉपोरेट लेंडिंग) देण्यावरही निर्बंध असतात. यापैकी कोणते निर्बंध बँक ऑफ महाराष्ट्रवर लादण्यात आलेले आहेत, हे स्पष्ट होऊ शकलेले नाही.

‘पीसीए लागू होण्यासाठी काही निकष तपासण्यात येतात. त्यापैकी बँक ऑफ महाराष्ट्रचे फक्त निव्वळ अनुत्पादित कर्ज (नेट एनपीए) अधिक आहेत. नेट एनपीएचे प्रमाण ११.५० असल्याने बँकेवर निर्बंध लादण्यात आले आहेत. रिझर्व्ह बँकेने आम्हाला काही मार्गदर्शक तत्वे दिली आहेत. त्यानुसार बँकेचे कामकाज चालेल,’ असे बँकेचे व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र मराठे यांनी ‘मटा’ ला सांगितले.

केंद्र सरकारने राष्ट्रीयीकृत बँकांच्या कामगिरीचा आढावा घेण्यासाठी व रोडमॅप निश्चित करण्यासाठी दोन वर्ष ज्ञानसंगम परिषदेचे आयोजन केले होते. पुण्यात झालेल्या पहिल्या ज्ञानसंगम परिषदेनंतर बँकांची कामगिरी सुधारण्यासाठी इंद्रधनुष्य या सात कलमी कार्यक्रमाची निश्चिती करण्यात आली. बँकांना या निकषांनुसार आपली आर्थिक कामगिरी सुधारण्याचे निर्देश देण्यात आले होते. त्यानंतर बँकांच्या कामगिरीचा आढावा घेण्यासाठी वारंवार उच्चस्तरीय बैठका घेण्यात आल्या. या आढाव्यानंतरही ज्या बँकांची कामगिरी सुधारलेली नाही, अशा बँकांवर रिझर्व्ह बँकेने बंधने घालण्यास सुरुवात केली आहे, असे सूत्रांनी सांगितले.

बँकेचे कामकाज नियमित सुरू

रिझर्व्ह बँकेने बँक ऑफ महाराष्ट्रवर काही निर्बंध आणले आहेत. मात्र, त्याचा संबंध दैनंदिन कामकाजाशी नाही. बँकेचे कामकाज नियमित सुरू राहणार आहे. बँकेला ठेवी स्वीकारणे, कर्ज देण्यावर बंधने नाहीत, असे बँकेचे व्यवस्थापकीय संचालक व सीईओ रवींद्र मराठे यांनी स्पष्ट केले.

निर्बंध असलेली पाचवी बँक

गेल्या काही दिवसात निर्बंध लादण्यात आलेली बँक ऑफ महाराष्ट्र ही पाचवी राष्ट्रीय बँक आहे. रिझर्व्ह बँकेने आतापर्यंत आयडीबीआय, देना, युको आणि सेंट्रल बँक ऑफ इंडियावर असे निर्बंध लादले आहेत. असे असले, तरी या बँकांचे दैनंदिन कामकाज नियमित सुरू आहे.

‘सर्वाधिक कर्जवसुली’

बँकेच्या निव्वळ अनुत्पादित कर्जांचे (नेट एनपीए) प्रमाण ३१ मार्च २०१७ नुसार ११.७६ टक्क्यांवर पोहोचले आहे. त्यामुळे रिझर्व्ह बँकेने बँकेवर निर्बंध आणले आहेत. २०१६-१७ मध्ये बँकेने ११.१८ टक्के भांडवल पर्याप्तता राखली आहे. तर बँकेच्या कासा खात्यांचे प्रमाण ३६.६ टक्क्यांवरून ४४.८९ टक्क्यांवर पोहोचले आहे. तर बँकेच्या व्याजेतर उत्पन्नात ४७ टक्क्यांनी वाढ झाली आहे. तर बँकेने गेल्या आर्थिक वर्षात सर्वाधिक कर्जवसुली केली आहे, असे बँकेच्या अधिकृत प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


पोस्ट ऑफिसांत पासपोर्ट केंद्रे

$
0
0

राज्यातील ११ ठिकाणी सुरू होणार सुविधा

म. टा. प्रतिनिधी, पुणे
परराष्ट्र मंत्रालयाने पोस्ट ऑफिसमध्ये सुरू केलेल्या पासपोर्ट केंद्रांना नागरिकांचा उत्तम प्रतिसाद मिळाल्याने पुढील सहा महिन्यांत राज्यात आता ११ पोस्ट ऑफिसमध्ये ही सुविधा सुरू होणार आहे. पुणे विभागाअंतर्गत अहमदनगर, पंढरपूर आणि सांगलीमधील पोस्टाच्या मुख्यालयात नागरिकांनी पासपोर्टचा अर्ज भरता येणार आहे.

परराष्ट्र मंत्रालयाने गेल्या सहा महिन्यांत पहिल्या टप्प्यात ८०हून अधिक ठिकाणी पोस्ट मुख्यालयात पासपोर्टचे अर्ज स्वीकारण्यास सुरुवात केली. आता दुसऱ्या टप्प्यात विविध शहरातील १४९ पोस्ट ऑफिसमध्ये ही सुविधा सुरू होते आहे. महाराष्ट्रातील जालना, लातूर, पंढरपूर, सांगली, सिंधूदुर्ग, वर्धा, नवी मुंबई, डोंबिवली, पनवेल, नांदेड, लातूर येथील पोस्ट ऑफिसचा यामध्ये समावेश आहे. पुणे विभागामध्ये या पूर्वीच कोल्हापूर आणि पिंपरी-चिंचवडमध्ये पोस्ट ऑफिसमध्ये ही सुविधा सुरू झाली आहे. पुढील टप्प्यात अहमदनगर, पंढरपूर, सांगलीतील नागरिकांना त्यांच्याच शहरात पासपोर्ट काढता येणार आहे.

पासपोर्टची वाढती मागणी आणि मर्यादीत मनुष्यबळ लक्षात घेऊन परराष्ट्र मंत्रालयाने चार वर्षांपूर्वी टाटा कन्स्लटन्सी सर्व्हिसेस बरोबर (टीसीएस) करार करून देशभरात पासपोर्ट सेवा केंद्र सुरू केली होती. यामुळे पासपोर्ट विभागाचा ताण हलका झाला. देशातील प्रमुख शहरांमध्ये ही केंद्र कार्यरत आहेत. पण ग्रामीण भागातूनही पासपोर्टचे अर्ज वाढत असून या नागरिकांनी शहरात फेऱ्या घालाव्या लागतात. पासपोर्ट प्रक्रिया अधिक व्यापक करण्यासाठी सहा महिन्यांपूर्वी मंत्रालयाने या कामात पोस्ट ऑफिसला सहभागी करून घेण्याचा निर्णय घेतला. नागरिकांचाही या उपक्रमाला उत्तम प्रतिसाद मिळाला आहे. आगामी काळात अधिकाधिक लहान शहरापर्यंत पोहोचण्याचा पासपोर्ट विभागाचा मानस असून आता १४९ शहरांमध्ये पोस्ट ऑफिसमध्ये पासपोर्ट केंद्र सुरू होणार आहेत.

नागरिकांना सेवेचा फायदा

पोस्ट ऑफिसमधील पासपोर्ट सेवा केंद्रांचा नागरिकांना फायदा होतो आहे. पासपोर्टच्या वेबसाइटवर ऑनलाइन अपॉइंटमेंट घेऊन येणाऱ्या नागरिकांच्या अर्जाची छाननी, कागदपत्रांची पूर्तता करण्याचे काम पोस्टात होते आहे. यामुळे ग्रामीण भागातील जनतेला गावातच अर्ज भरण्याची संधी मिळाली आहे. नव्या निर्णयानुसार अहमदनगर, पंढरपूर, सांगलीत ही सुविधा सुरू होणार आहे. याशिवाय सोलापूरमधील पासपोर्ट सेवा केंद्राचे काम अंतिम टप्प्यात आले असून लवकरच या केंद्र नागरिकांच्या सेवेत दाखल होईल, असे पुणे पासपोर्ट विभागाचे मुख्य अधिकारी अतुल गोतसुर्वे यांनी सांगितले.

पासपोर्टचा चढता आलेख

- भारतामध्ये ३८ पासपोर्ट कार्यालये, तर ८९ पासपोर्ट सेवा केंद्र आहेत.
- दरवर्षी पासपोर्टची संख्या वाढत असून गेल्या वर्षी १ कोटी १५ लाख पासपोर्टचे वितरण झाले.
- पासपोर्ट विभागाने वर्षभरात ठिकठिकाणी पासपोर्ट मेळावे घेऊन ३४ हजार १११ पासपोर्टचे अर्ज स्वीकारले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

एक्स्प्रेस-वेच्या सुरक्षेकडे दुर्लक्ष

$
0
0

मुख्यमंत्र्यांचा निर्णय कागदावरच; वर्षभरानंतरही उपाययोजना नाही

म. टा. प्रतिनिधी, पुणे
‘एक्स्प्रेस-वेवरील कागदोपत्री उपाययोजना काय कामाच्या,’ असे म्हणत संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांची कानउघाडणी करणाऱ्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘इंटेलिजंट ट्रॅफिक मॉनिटरिंग सिस्टीम’ बसविण्यासह विविध उपाययोजनांची केलेली घोषणाही कागदावरच राहिली आहे. गेल्या वर्षी जून महिन्यात यासंबंधीचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र, अद्याप दृष्टिपथात काहीच नाही.

पनवेल येथे गेल्या वर्षी जून महिन्यात झालेल्या भीषण अपघातानंतर मुख्यमंत्र्यांनी एक्स्प्रेस-वेवरील अपघात रोखण्याच्या संदर्भात आणि उपाययोजनांबाबत उच्चस्तरीय बैठक घेतली होती. संपूर्ण महामार्गावर ‘इंटेलिजंट ट्रॅफिक मॉनिटरिंग सिस्टीम’ उभारण्याचा निर्णय या बैठकीत घेतला होता. त्याबरोबरच संपूर्ण मार्गावर बायफ्रेन रोप बसवणे, ओझर्डे येथील ट्रॉमा केअर सेंटर तातडीने सुरू करणे आणि वाहन चालकांना शिस्त लावण्यासाठी दंडात्मक कारवाईचा बडगा उगारणे आदी निर्णयही घेण्यात आले होते. मात्र, या बैठकीत झालेल्या निर्णयांपैकी कोणत्याही निर्णयाची काटेकोर अंमलबजावणी झाल्याचे दिसून आले नाही.

एक्स्प्रेस-वेवर बेशिस्त वाहन चालकांना धडा शिकविण्यासाठी, वाहन चालकांच्या मनात कायद्याची जरब बसविण्यासाठी महामार्ग पोलिस व राज्य रस्ते विकास महामंडळाचे मनुष्यबळ मोठ्या संख्येने नेमून कारवाई करण्याची सूचना त्यांनी केली. त्यासाठी महामंडळाचे शंभर कर्मचारी नेमले जातील, असे त्या बैठकीत सांगण्यात आले होते. प्रत्यक्षात असे काहीच घडले नाही. महामार्ग पोलिसांनी लेन कटिंगच्या केसेस मोठ्या संख्येने केल्या. मात्र, त्यांच्या कारवाईवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. प्रादेशिक परिवहन विभागाच्या पथकांकडून सुरुवातीच्या काळात कारवाई करण्यात आली. मात्र, त्यानंतर ती देखील थंडावली आहे. संपूर्ण ‘सेटअप’ उभा असूनही ट्रॉमा केअर सेंटर सुरू करण्यात सरकारला यश आलेले नाही.

कामांची गती मंदावली

या बैठकीत संपूर्ण एक्स्प्रेस वेवर बायफ्रेन रोप बसविण्याचा निर्णय झाला होता. मात्र, काही महिन्यांपूर्वी संपूर्ण एक्स्प्रेस वेवर ‘थाय बीम’ बसविण्यासाठीचे टेंडर प्रक्रिया राबविण्यात येत होती. बायफ्रेन रोप बसविणे व त्याची देखभाल दुरुस्ती करणे खूप खर्चिक असल्याने बायफ्रेन रोप वगळण्यात आल्याची चर्चा राज्य रस्ते विकास महामंडळात होती. तसेच, एक्स्प्रेस वेवर दिशादर्शक फलक बसविण्यासाठी टेंडर काढण्यात आले. परंतु, गेल्या वर्षातील कामाची गती पाहता ते फलक प्रत्यक्ष लावण्यास किती काळ लागेल, हा देखील एक प्रश्न आहे. दरम्यान, गेल्या वर्षभरात एक्स्प्रेस वेवर घाट परिसरात उड्डाणपूल आणि भुयारी मार्गासह आठ पदरी रस्ता करण्याच्या कामास मंजुरी देण्यात आली आहे. वाहतुकीसाठी धोकादायक ठिकाण असलेला अमृतांजन पूल पाडण्याबाबत नुकत्याच हरकती व सूचना मागविण्यात आल्या आहेत.

समितीच्या दोन बैठका

गेल्या पावसाळ्यात ‘ड्रोन कॅमेऱ्यां’द्वारे एक्स्प्रेस वेवरील बेशिस्त वाहनांवर लक्ष ठेवण्याचा प्रयोग करण्यात आला होता. त्यानंतर ‘व्हिडीओ सर्व्हेलन्सद्वारे वाहतुकीची पाहणी करण्यात आली. ‘ड्रोन कॅमेऱ्यां’ऐवजी ‘व्हिडीओ सर्व्हेलन्स’ यंत्रणा एक्स्प्रेस वेवर अधिक उपयुक्त ठरेल, असा अहवाल राज्य सरकारला पाठविण्यात आला होता. एक्स्प्रेस वेवरील ‘इंटेलिजन्स’ यंत्रणेबाबत काही महिन्यांपूर्वी एका समितीची स्थापना करण्यात आली आहे. त्या समितीच्या आतापर्यंत दोन बैठका झाल्या आहेत. मात्र, त्यावर पुढे निर्णय झालेला नाही.
...
मुख्यमंत्र्यांनी घेतलेल्या बैठकीला मी उपस्थित होतो. त्यानंतर जे काही घडले आहे, ते केवळ कागदावरच आहे. त्यामुळे राज्य सरकारला खरेच काही करायचे आहे का, असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.
- तन्मय पेंडसे

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘पीएसडीसीएल’ला करसवलत मागणार

$
0
0

कंपनीचे अध्यक्ष डॉ. नितीन करीर यांची माहिती

म. टा. प्रतिनिधी, पुणे
स्मार्ट सिटी योजनेची अंमलबजावणी करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या ‘पुणे स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कंपनी’ची (पीएसडीसीएल) निर्मिती कंपनी कायद्यानुसार झाली आहे. त्यामुळे या कंपनीला सरकारी कंपनी म्हणता येणार नाही. त्यामुळे इतर कंपन्यांप्रमाणेच स्मार्ट सिटीच्या कंपनीलाही कर भरावा लागणार आहे, असे कंपनीचे अध्यक्ष आणि नगरविकास खात्याचे प्रधान सचिव डॉ. नितीन करीर यांनी शनिवारी स्पष्ट केले. मात्र, ही कंपनी कोणताही फायदा मिळविणारी नसल्याने तिला विशेष दर्जा देऊन करामध्ये सूट द्यावी, अशी मागणी केंद्र सरकारकडे करणार असल्याचे करीर यांनी सांगितले.

स्मार्ट सिटी कंपनीच्या संचालक मंडळाची बैठक शनिवारी करी‌र यांच्या उपस्थितीत झाली. त्या वेळी स्मार्ट सिटी ही सरकारी कंपनी नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. सरकारी कंपनीसाठी राज्य अथवा केंद्र सरकारचे किमान ५१ टक्के शेअर असणे गरजेचे आहे. प्रत्यक्षात स्मार्ट सिटीचा प्रकल्प सुमारे तीन हजार कोटी रुपयांचा असून केंद्र व राज्य सरकार मिळून जेमतेम ७५० कोटी रुपये देणार आहे. त्यामुळे ही खाजगी कंपनी असून तिला नियमाप्रमाणे कर भरावे लागणार आहेत, असे विरोधी पक्षनेते चेतन तुपे यांनी निदर्शनास आणून दिले. त्या वेळी ‘कॅग’चा आक्षेप आणि तुपे यांनी उपस्थित केलेला मुद्दा कंपनी कायद्यानुसार योग्यच असल्याचे स्पष्ट करून स्मार्ट सिटीच्या कंपनीला देखील नियमाप्रमाणे सध्या कर हा भरावाच लागणार असल्याचे करीर यांनी सांगितले. मात्र, ही कंपनी कोणत्याही आर्थिक फायद्यासाठी स्थापन झालेली नसल्याने तिला विशेष दर्जा देऊन करामध्ये सूट द्यावी, असे पत्र केंद्र सरकारला पाठविण्यात येईल, असे आश्वासन या वेळी देण्यात आले. महापौर मुक्ता टिळक, सभागृह नेते श्रीनाथ भिमाले, स्थायी समिती अध्यक्ष मुरलीधर मोहोळ, शिवसेनेचे संजय भोसले, काँग्रेसचे रवींद्र धंगेकर यांच्यासह महापालिका आयुक्त कुणाल कुमार, अतिरिक्त महापालिका आयुक्त प्रेरणा देशभ्रतार या वेळी उपस्थित होते.

येत्या २५ जूनला स्मार्ट सिटीचा वर्धापनदिन साजरा केला जाणार आहे. यानिमित्त आयो‌जित करण्यात येणाऱ्या कार्यक्रमांसाठी ५० लाख रुपयांची तरतूद करण्यास या संचालक मंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली.

सिग्नलचा प्रस्ताव मागे

शहरातील २५० प्रमुख चौकातील सिग्नल स्वंयनियंत्रीत करण्याचा प्रस्ताव पुन्हा मंजुरीसाठी ठेवण्यात आला होता. या प्रकल्पामध्ये काही तांत्रिक त्रुटी असल्याने त्यामध्ये दुरुस्ती केल्यानंतर पुन्हा मांडण्यात येईल, असे सांगून पालिका आयुक्त कुणाल कुमार यांनी हा प्रस्ताव मागे घेतला. तसेच या प्रकल्पासाठी सी-डॅक कंपनीला मार्गदर्शक कंपनी म्हणून घेण्याबाबत केंद्र सरकारकडून मार्गदर्शन घेण्यात येईल, असे डॉ. करीर यांनी या वेळी स्पष्ट केल्याचे विरोधी पक्षनेते तुपे यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पीएमपी पाससाठीही आधार सक्तीचे

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
व्यवहारात पारदर्शकता आणण्यासाठी देशभरात शासकीय कामकाजात आधार कार्डची सक्ती केली जात असताना, आता पुणे महानगर परिवहन महामंडळाने (पीएमपी) देखील बस पाससाठी आधार कार्डची मागणी सुरू केली आहे. पीएमपीच्या काही ठरविक पास केंद्रांवर आधार कार्ड दाखविल्याशिवाय प्रवाशांना पास दिला जात नाही. त्यामुळे आता पीएमपीनेही आधार कार्डची सक्ती केली आहे का, असा प्रश्न उपस्थित केला जात असून, पीएमपी कर्मचारी आणि प्रवासी यांच्यात वाद होत आहेत.
पीएमपीकडून प्रामुख्याने दैनंदिन पास आणि मासिक पास दिले जातात. काही महिन्यांपूर्वी सहामाही आणि वार्षिक पास योजना सुरू करण्यात आली होती. मात्र, त्यास अपेक्षित प्रतिसाद मिळाला नव्हता. सर्व मार्गांच्या दैनंदिन पाससाठी ७० रुपये शुल्क आकारले जाते. तर, मासिक पाससाठी दोन्ही महापालिकांच्या हद्दीतील प्रवाशांसाठी १२०० रुपये व हद्दीबाहेरील प्रवाशांना १५०० रुपये शुल्क आकारण्यात येते. हे पास अहस्तांतरणीय आहेत. मात्र, पास एका व्यक्तीच्या नावाचा आणि प्रत्यक्ष त्याचा वापर दुसरीच व्यक्ती करीत आहे. पासच्या वैधता तारखेवर खाडाखोड केलेली आहे, असे अनेक गैरप्रकार सातत्याने समोर येतात. गेल्या महिन्यात बनावट पासचे प्रकरणही समोर आले आहे. त्यामुळे पास विक्री करताना संबंधित व्यक्तीची ओळख जाणून घेण्यासाठी आधार कार्डची मागणी केली जात आहे. पीएमपी प्रशासनाने तसे आदेश दिले आहेत, अशी माहिती पास केंद्रावरील कर्मचारी देत आहेत.
आधार कार्डवर महापालिका हद्दीबाहेरील पत्ता असल्यास संबंधित व्यक्तीकडून मासिक पाससाठी १५०० रुपयेच शुल्क आकारले जात आहे. आम्हाला हद्दीतीलच पास द्या, अशी विनंती केल्यानंतरही पीएमपीचे कर्मचारी हद्दीबाहेरीलच पास घ्यावा लागेल, हद्दीतील पास केवळ महापालिकेच्या कर दात्यांसाठी आहे, अशी अडवणूक केली जात असल्याची तक्रार प्रवाशांकडून केली जात आहे.
.............
मी पिंपरी-चिंचवडमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून राहतो. मात्र, माझ्या आधार कार्डवर गावाचा पत्ता आहे. त्यामुळे महापालिका भवन येथील पास केंद्रावर मला मागणी करूनही हद्दीतील पास (रु. १२००) दिला नाही. तसेच, सुरुवातीला आधार कार्डशिवाय पासच दिला जाणार नाही, असेही सांगण्यात आले.
- संदीप ढवळे (प्रवासी)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मेट्रो’च्या कामाला गती द्या

$
0
0

‘महामेट्रो’चे व्यवस्थापक ब्रजेश दीक्षित यांची सूचना
म. टा. प्रतिनिधी, पुणे
पिंपरी-चिंचवड ते रेंजहिल्स दरम्यानच्या मेट्रो मार्गाला अधिक गती देण्याच्या स्पष्ट सूचना महाराष्ट्र मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनचे (महामेट्रो) व्यवस्थापकीय संचालक ब्रिजेश दीक्षित यांनी दिल्या. तसेच, पावसाळ्याच्या दिवसांमध्ये मेट्रोचे काम सुरू असलेल्या ठिकाणी सुरक्षेची अतिरिक्त खबरदारी घेण्यात यावी, असे निर्देश त्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिले.
पुण्याच्या मेट्रो प्रकल्पाची अंमलबजावणी ‘महामेट्रो’कडे आहे. पिंपरी-चिंचवड ते रेंजहिल्स या १०.७५ किमीच्या प्राधान्य मार्गाच्या ‘व्हायडक्ट’चे काम एनसीसी लिमिटेड या कंपनीने नुकतेच सुरू केले आहे. नाशिक फाट्यालगत पहिल्या खांबासाठी (पिलर) काही दिवसांपूर्वी खोदाई सुरू झाली आहे. दीक्षित आणि मेट्रोच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी नुकतीच या कामाची पाहणी केली. सध्या एकाच पिलरचे काम सुरू असले, तरी पुढील काही दिवसांत आणखी दोन पिलरचे काम सुरू करण्यात येणार आहे. कामाचा वेग अधिक वाढवावा, अशा सूचना दीक्षित यांनी संबंधित कंपनीच्या अधिकाऱ्यांना दिल्या.
पावसाळ्याच्या दिवसांमध्ये मेट्रोचे काम सुरू झाले असल्याने वाहनचालक आणि पादचाऱ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने सर्व उपाययोजना केल्या जाव्या, असेही निर्देश दीक्षित यांनी दिले आहेत. सुरक्षेच्या उपायांची पाहणी मेट्रोच्या अधिकाऱ्यांनी स्वत: करावी आणि काही त्रुटी आढळल्यास त्या तातडीने दूर केल्या जाव्या, असेही त्यांनी स्पष्ट केले.
मेट्रोच्या प्राधान्य मार्गापाठोपाठ वनाज ते शिवाजीनगर धान्य गोदाम या सात किमीच्या मार्गाचे काम येत्या महिनाअखेरपर्यंत सुरू होणार असल्याचे संकेत ‘महामेट्रो’च्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिले.
--
पावसाळ्याच्या दिवसांमध्ये मेट्रोचे काम सुरू झाले असल्याने वाहनचालक आणि पादचाऱ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने सर्व उपाययोजना केल्या जाव्यात. तसेच, मेट्रोच्या कामाला अधिक गती द्यावी.
- ब्रजेश दीक्षित, व्यवस्थापकीय संचालक, महामेट्रो
०००००००००००००

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘स्मार्ट सिटी’चा निधी पडूनच

$
0
0

Prashant.Aher@timesgroup.com
Tweet: @PrashantAherMT
पुणे : स्मार्ट सिटीच्या १४ योजनांसाठी पुणे स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनला (पीएससीडीसी) या कंपनीला केंद्राच्या निकषांनुसारचा निधी तातडीने प्राप्त झाला, तरीही गेल्या वर्षभरात चारशे कोटी रुपयांपैकी १० टक्केही निधी खर्च झालेला नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत जाहीर झालेल्या १४ योजनांपैकी एकही योजना पूर्णत्वास गेली नसून, निधी खर्च होत नसल्याबद्दल केंद्रानेही कंपनीचे कान उपटले आहेत. कागदावरच्या योजनांना प्रत्यक्ष मुहूर्त मिळून, पुणेकरांचे जगणे स्मार्ट कधी होणार, असा प्रश्न नागरिकांना पडला आहे.
येत्या रविवारी (२५ जून) स्मार्ट सिटीचा वर्धापनदिन साजरा होणार आहे. त्याचे नियोजन महापालिकेतर्फे केले जात आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना कार्यक्रमांचे निमंत्रण देण्यात आले आहे तर, दुसरीकडे वर्धानपदिनाच्या कार्यक्रमासाठी ५० लाख रुपयांच्या खर्चास कंपनीच्या संचालक मंडळाने मंजुरीही दिली आहे. हे नियोजन सुरू असले, तरी गेल्या वर्षी जाहीर केलेल्या योजनांची अंमलबजावणी करण्यात कंपनीला यश प्राप्त झालेले नाही.
‘पुणे स्मार्ट सिटी’कंपनीने केंद्र, राज्याकडून आलेल्या निधीपैकी बहुतांश खर्च हा प्रशासकीय कामावर झाला आहे. विकासकामांवर फारसा खर्च झालेला नाही. दिलेला निधी कधी आणि कसा खर्च करणार, असा प्रश्नही दिल्ली येथे झालेल्या बैठकीत करण्यात आला होता. स्मार्ट सिटीमार्फत अपेक्षित विकासकामांची कालमर्यादा निश्चित करण्यात आली आहे आणि ही विकास कामे वेळेत होत आहेत की नाही, याचा आढावाही दिल्लीस्थित अधिकाऱ्यांकडून घेण्यात सुरुवात झाली आहे. महापालिकेकडून विविध विकासकामांसाठी निविदा काढण्यात आल्या आहेत. काही कामाच्या वर्क ऑर्डरही देण्यात आल्या आहेत. तसेच पुढील सहा महिन्यांच्या कालावधीत सर्व निधी खर्च करण्यात येईल, असे आश्वासन या बैठकीत ‘पीएससीडीसीएल’ने दिले होते. मात्र, त्याचवेळी पुणे शहरासाठी अॅडाप्टिव्ह ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टीम (एटीएमएस) बसवण्याच्या २६०.८७ कोटी रुपयांच्या निविदेवर ‘पीएससीडीसीएल’च्या बैठकीत निर्णय होऊ शकलेला नाही. या निविदांवर कंपनीचे अध्यक्षांनी शंका उपस्थित केल्या होत्या. ‘पीएससीडीसीएल’च्या दोन दिवसांपूर्वी झालेल्या बैठकीच्या अजेंड्यावर या निविदांचा विषय होता. मात्र, त्याबाबत काही त्रुटी दूर करायच्या असल्याने सांगत विनाचर्चा हा विषय पुढे ढकलण्यात आला. बाणेर-बालेवाडी हा भाग स्मार्ट सिटीसाठी निवडण्यात आला होता. या ठिकाणचे रस्ते, फूटपाथची जुजबी कामे सोडता फारशी काही प्रगती झालेली नाही.
.........
स्मार्ट सिटीच्या विशेष सेलकडूनही नाराजी व्यक्त
स्मार्ट सिटीच्या कंपनीसाठी केंद्र आणि राज्याने दोन वर्षांचा निधी वितरित केल्यानंतरही वर्षभरात अवघे २९ कोटी रुपये कंपनीला खर्च करता आले आहे. हा निधी गेल्या दीड वर्षांपासून उपलब्ध असतानाही तो खर्च झाला नसल्याने केंद्रीय नगरविकास मंत्रालयांतर्गत स्थापन करण्यात आलेल्या स्मार्ट सिटीच्या विशेष सेलने नाराजी व्यक्त केली होती. देशात स्मार्ट सिटीच्या स्पर्धेत पहिल्या आलेल्या भुवनेश्वरमध्येही अपेक्षेप्रमाणे खर्च झाला नसल्याने त्याबाबत चिंता व्यक्त करण्यात आली होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वेगळे राहण्याचा हट्ट देऊ शकतो घटस्फोट

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

वेगळे राहण्याच्या हट्टापायी संसार घटस्फोटापर्यंत पोहोचल्याच्या अनेक केसेस फॅमिली कोर्टात दाखल आहेत. सासू सासऱ्यांपासून वेगळे राहण्याचा हट्ट करणाऱ्या पत्नीपासून क्रूरतेच्या मुद्द्यावर पती कोर्टात घटस्फोट मागू शकतो. मात्र अशा प्रकारे घटस्फोट मागताना सासू आणि सासऱ्यांचा शारीरिक आणि मानसिक छळ करण्यात आला आहे हे मुद्दा कोर्टात सिद्ध करावा लागतो, अशी प्रतिक्रिया वकिलांनी दिली.

सुप्रीम कोर्टाने नुकतेच दिलेल्या एका निकालात, पत्नी जर सासू आणि सासऱ्यांपासून वेगळे राहण्याचा हट्ट करत असेल तर पती तिच्यापासून घटस्फोट घेऊ शकतो असे स्पष्ट केले आहे. कर्नाटक येथील एका दाम्पत्याने या संदर्भात कोर्टात दावा दाखल केला होता. कोर्टाने त्याचा निकाल देताना हे नमूद केले आहे. मुलाचे पालनपोषण करून आईवडील त्याला कमावता बनवितात. तो त्यांच्या घरातील एकमेव कर्ता व्यक्ती असतो. त्याच्यावर आई​वडीलांचा सांभाळ करण्याची जबाबदारी असते. अशा परिस्थितीत पत्नी वेगळे राहण्याचा हट्ट करत असेल, तर तो तिच्यापासून घटस्फोट घेऊ शकतो, असे कोर्टाने निकालात म्हटले आहे. न्यायमूर्ती अनिल दवे, एल. नागेश्वर यांच्या खंडपीठाने हा निकाल दिला आहे.

भगिनी हेल्पलाइनच्या संचालिका अॅड. सुप्रिया कोठारी, यांनी सध्याच्या काळात विवाहपूर्व समुपदेशन करतानाच लग्नानंतर वेगळे राहणार असल्याचे ठरविले जाते. त्या मुद्द्यावर आधीच बोलून मग विवाह ठरविले जात असल्याची अनेक उदाहरणे आहेत, असे त्यांनी सांगितले. लग्नानंतर पती आई-वडीलांपासून वेगळा राहिला नाही म्हणून त्याला पत्नी सोडून गेल्याच्या केसेस आपल्याकडे आहेत. सासू सासऱ्यांपासून वेगळे राहण्याचा हट्ट करणाऱ्या पत्नीने त्यांचा शारीरिक आणि मानसिक छळ केला आहे हे घटस्फोटाची मागणी करताना ​सिद्ध करावे लागते, असे अॅड. कोठारी यांनी सांगितले. पुण्यातील फॅमिली कोर्टातही अशा प्रकारच्या काही केस दाखल आहेत, अशी माहिती वकिलांनी दिली.

लग्नानंतर सासू सासऱ्यांबरोबर राहणार नाही, असा हट्ट धरलेली एका विवाहिता पतीला सोडून माहेरी निघून गेली. पतीने आठवड्यातील काही दिवस आई आणि काही दिवस तुझ्याकडे राहते असा तोडगा काढल्यानंतरही तिने मान्य केला नाही. आई ​किंवा मी असा निर्णय त्याला घ्यायला लावल्यामुळे त्याने आईबरोबरच राहण्याचे ठरविले, अशा प्रकारची केस आमच्याकडे असून त्यासंदर्भात कोर्टात दावा दाखल करण्याच्या तयारीत आहोत, अशी माहिती अॅड. रोहित माळी यांनी दिली. अशा प्रकारच्या केसेसमध्ये कायद्यातील क्रूरता या मुद्द्यावर घटस्फोट मागता येऊ शकतो, असे अॅड. माळी म्हणाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


पत्नीच्या त्रासाला कंटाळून डॉक्टरची आत्महत्या

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

चैनीच्या वस्तू न पुरविल्यामुळे त्रास देणाऱ्या पत्नीच्या त्रासाला कंटाळून वाघोली येथे डॉक्टर पतीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा प्रकार समोर आला आहे. या डॉक्टर पतीने सुसाइड नोट लिहून ठेवली असून, त्यामध्ये पत्नीला आत्महत्येस जबाबदार धरले आहे. या प्रकरणी लोणीकंद पोलिस ठाण्यात पत्नीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुण्यात मराठी चित्रपत निर्माते अतुल तापकीर यांनी पत्नीच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केल्या प्रकारानंतर काही दिवसांमध्येच हा प्रकार समोर आल्यामुळे खळबळ उडाली आहे.

अभयसिंह मारुती मचे (३४, रा. वाघोली) असे आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव आहे. या प्रकरणी मारुती पिराजी मचे (६०, रा. श्रीगोंदा, नगर) यांनी तक्रार दिली आहे. त्यावरून अभयसिंह याच्या पत्नीच्या विरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पाच जून रोजी वाघोली येथील सवाना सोसायटीत ही घटना घडली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अभयसिंह हे मूळचे श्रींगोदा येथील राहणारे आहेत. गेल्या काही वर्षापासून ते पुण्यातील वाघोली परिसरात राहत होते. त्या ठिकाणीच त्यांनी प्रॅक्टिस सुरू केली होती. काही वर्षांपूर्वी त्यांचा आरोपी महिलेसोबत विवाह झाला असून, त्यांना एक मुलगा व एक मुलगी आहे. पाच जून रोजी घरी कोणी नसताना अभयसिंह यांनी खोलीतील पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केली. पत्नी घरी आल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. लोणीकंद पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी पाहणी केली असता अभयसिंह याच्या खिशात एक सुसाइड नोट मिळाली. त्यामध्ये त्यांनी पत्नीस आत्महत्येस जबाबदार धरले आहे.

आरोपी महिला ही अभयसिंह यांना सतत चैनीच्या वस्तू पुरविण्याचा हट्ट धरत होती. तिच्या चंगळवादी गरजा न पुरविल्यामुळे तिने अभयसिंह यांच्यावर राग धरला होता. त्यामुळे ती त्यांच्या मुलांना क्षुल्लक कारणांवरून त्रास देत होती. तसेच, छोट्या मुलीला त्यांच्यापासून दूर ठेऊन अभयसिंह यांना मानसिक त्रास देत होती. या सर्व त्रास असह्य झाल्यामुळे त्यांनी राहत्या घरातील पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा प्रकार समोर आला आहे.
०००

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ग्रंथखरेदीला अखेर मुहूर्त

$
0
0

ग्रंथखरेदीला अखेर मुहूर्त

म. टा. प्रतिनिधी, पुणे
राजा राममोहन रॉय ग्रंथखरेदी योजनेअंतर्गत होणाऱ्या ग्रंथखरेदीला अखेर मुहूर्त मिळाला आहे. ग्रंथालय संचालनालयाने २०१४ सालच्या पुस्तक खरेदीसाठी ऑर्डर काढल्या असून, ३० जूनपर्यंत पुस्तकांची खरेदी केली जाणार आहे. त्यामुळे आता राज्यातील सरकारी ग्रंथालयांमध्ये २०१४ मध्ये प्रकाशित झालेली पुस्तके उपलब्ध होणार आहेत.
गेल्या तीन वर्षांपासून ग्रंथालय संचालनालयाने खरेदी रखडवली असल्याचे वृत्त ‘मटा’ने प्रसिद्ध केले होते. त्यानंतर संचालनालयाकडून पुस्तकांची केवळ यादी जाहीर करण्यात आली होती. यादी जाहीर केल्यानंतरही जवळजवळ चार महिने खरेदी रखडली होती. अखेर ग्रंथालय संचालकांनी ग्रंथखरेदीच्या ऑर्डर्स संबंधित प्रकाशकांना पाठवल्या आहेत. संचालनालयाकडून नेमण्यात आलेल्या निवड समितीने २०१४ सालामध्ये प्रकाशित झालेल्या ४१६ पुस्तकांची निवड केली असून, त्याच्या प्रत्येकी ११० प्रति मागवण्यात आल्या आहेत. त्यामध्ये ३३५ मराठी, ४५ हिंदी आणि ३६ इंग्रजी पुस्तकांचा समावेश करण्यात आला आहे. राज्यातील आणि देशभरातील विविध प्रकाशकांची पुस्तके या योजनेत निवडण्यात आली आहेत.
गेल्या तीस वर्षांपासून कोलकात्याचे राजा राममोहन रॉय ग्रंथालय प्रतिष्ठान महाराष्ट्रातील ग्रंथालय चळवळ वाढावी, यासाठी राज्य सरकारला अर्थिक मदत करते. या योजनेअंतर्गत राज्य सरकारकडून विविध प्रकारचे ललित साहित्य, बालसाहित्य, कथासंग्रह, काव्यसंग्रह आणि माहितीपर पुस्तकांची खरेदी केली जाते; मात्र, गेल्या तीन वर्षांच्या खरेदीला खीळ बसली होती. ‘मटा’ने सतत याबाबत पाठपुरावा केल्यानंतर अखेर संचालनालयाने एका वर्षीची का होईना खरेदी केली आहे. २०१५ आणि २०१६ सालची खरेदीही अद्याप बाकीच आहे. त्यापैकी २०१५ सालची खरेदी याच वर्षात करू, असे आश्वासन संचालनाचे संचालक किरण धांडोरे यांनी दिले. मात्र, त्याची प्रक्रियाही अद्याप सुरू केलेली नाही.
या रखडलेल्या खरेदीला संचालनालय पुढची दोन वर्षे घेणार का, असा प्रश्न निर्माण झाला आहे. राज्यभरात असलेल्या शासकीय ग्रंथालयांमध्ये चांगल्या दर्जाचे आणि नवे ग्रंथ नसतात, म्हणून या ग्रंथालयांमध्ये येणाऱ्या वाचकांची संख्या दिवसेंदिवस घटत चालली असल्याचे चित्र आहे. शिवाय कोलकाता येथील राजा राममोहन रॉय प्रतिष्ठान दरवर्षी ग्रंथालय संचालनालयाला निधी देते. तरीही केवळ शासकीय अधिकाऱ्यांच्या दिरंगाईमुळे या योजनेतील खरेदी रखडते आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आदिवासी तरुणाची भरारी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

केवळ आदिवासी नृत्य आणि गाण्यांच्या रुपाने कलाक्षेत्रात योगदान असणाऱ्या आदिवासी समाजाला कायम डावलले गेले आहे. नाट्य आणि चित्रपट क्षेत्रात आदिवासी समाजाचे प्रतिनिधित्व जवळजवळ शून्य आहे. या समीकरणाला छेद देत कुंडलिक केदारी यांनी मराठी चित्रसृष्टीत पाऊल ठेवण्याचे स्वप्न पाहिले आहे. केदारी यांनी आदिवासींच्या जीवनावर आधारित ‘व्वा पैलवान’ हा चित्रपट दिग्दर्शित केला असून, एका आदिवासी कलाकाराने आदिवासी समाजाचे जीवन चित्रपटात मांडण्याचा प्रयत्न केला आहे.

चित्रपटाचे कथानक एका आदिवासी पैलवानाच्या जीवनावर आधारलेले आहे. आदिवासी दिग्दर्शकाने आदिवासी जाणिवेतून निर्माण केलेला हा महाराष्ट्रातील पहिलाच चित्रपट असल्याचे सांगितले जात आहे. केदारी यांनी पुणे, नाशिक, सातारा, नगर येथील स्थानिक कलाकारांना चित्रपटात अभिनयाची संधी दिली आहे. चित्रपटाची कथा, पटकथा आणि संवाद स्वतः केदारी यांनी लिहिले आहेत. निखिल मोहिते यांच्या कॅमेऱ्यातून हा चित्रपट साकारला गेला आहे. अशोक काळे यांनी संगीत दिले असून, अभिजित भगत व पल्लवी कदम चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. सध्या चित्रपटाच्या संकलनाचे काम सुरू असून, दिवाळीपर्यंत तो प्रेक्षकांच्या भेटीला येईल. जुन्नर, आंबेगाव, खेड, मावळ या तालुक्यांमधील दुर्गम भागात चित्रपटाचे संपूर्ण चित्रीकरण पार पडले.

जुन्न्नर तालुक्यातील खैरे या अतिदुर्गम आदिवासी खेड्यात केदारी यांचा सन्म झाला. गावात प्राथमिक शिक्षणाची सुविधा नसताना तालुक्याच्या ठिकाणी वसतिगृहात राहून त्यांनी शिक्षण पूर्ण केले. नोकरीच्या निमित्ताने ते पुण्यात आले. नोकरी करीत असताना त्यांनी ‘नाट्य चित्रपट निर्मिती’चे प्रशिक्षण घेतले. आदिवासींचे मुक्तनाट्य बोहडा, दंडार, नाच्याचा तमाशा, मुक्तनाट्य अशा नाट्यप्रकारांचे प्रयोग करायला त्यांनी सुरुवात केली. एका लघुपटाच्या माध्यमातून २००६ मध्ये त्यांनी निर्मितीमध्ये पदार्पण केले.

सलग दोन वर्षे प्रयत्न केल्यानंतर चित्रपट पूर्ण झाला. स्वतः आदिवासी असल्याने या समाजाच्या जाणीवा, संवेदना आणि संस्कृती चित्रपटाच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचावी, असा उद्देश होता. चित्रपटाच्या संकलनाचे काम सुरू असून, दिवाळीपर्यंत तो प्रेक्षकांच्या भेटीला आणण्याचा मानस आहे.

- कुंडलिक केदारी, दिग्दर्शक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वारकऱ्यांचा महामेळा

$
0
0

हरिनामाच्या गजरात पालख्यांचे पुण्यात स्वागत

म. टा. प्रतिनिधी, पुणे
टाळ-मृदंगाच्या तालावर अखंड सुरू असलेला हरिनामाचा गजर, भजनाच्या चालीवर ठेका धरलेल्या भगव्या पताका, भजनामध्ये तल्लीन झालेले वारकरी, डोक्यावर तुळशी वृंदावन घेऊन सहभागी झालेल्या महिला अन् चिमुकल्या वारकऱ्यांचा महामेळा सायंकाळी पुण्यात दाखल झाला. भक्तिमय वातावरणाने परिसर भारावून गेला. पांडुरंगाच्या दर्शनाची आस घेऊन निघालेल्या या वैष्णवांच्या मेळ्याचे पुणेकरांनी उत्साहात स्वागत केले. संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्याने नागरिक भारावून गेले.

संत ज्ञानेश्वर महाराज, संत तुकाराम महाराजांच्या पादुकांचे दर्शन आणि राज्याच्या कानाकोपऱ्यातून येणाऱ्या वैष्णवांच्या स्वागतासाठी पुणेकरांनी गर्दी केली होती. विविध संस्था, संघटना आणि नागरिकांनी पालखीच्या स्वागतासाठी जय्यत तयारी केली होती. सकाळी सात वाजल्यापासूनच ठिकठिकाणी स्वागतकक्ष उभारण्यात आले होते.

पालखी दुपारी पिंपरी-चिंचवडची हद्द आणि मुळा नदी ओलांडून पुण्यनगरीत दाखल झाली. दर्शनासाठी नागरिकांची संगमवाडी पुलाजवळ वर्दळ होती. पुलावरून येणाऱ्या भगव्या पतका दिसायला लागल्यावर नागरिकांची उत्सुकता वाढत गेली. सायंकाळी साडेचारच्या दरम्यान टाळ आणि मृदंगाच्या गजरात वारकऱ्यांच्या दिंड्या पुण्यात दाखल झाल्या. विठ्ठलाचा गजर करीत येणाऱ्या वारकऱ्यांनी नकळत नागरिकांना ठेका धरायला लावला. पुणेकरांनी ग्यानबा-तुकोबा असा जयघोष करून वातावरणात उत्साहाचे रंग भरले.

पुणे शहराचे प्रवेशद्वार असलेल्या बोपोडी गावामध्ये दरवर्षी प्रमाणे पुणे महापालिका आणि नागरिकांनी पालखीचे उत्साहात स्वागत केले. संगमवाडी पुलाच्या चौकामध्ये महापालिकेसह विविध संस्थांनी स्टॉल उभारले होते. महापौर मुक्ता टिळक, उपमहापौर सिद्धार्थ धेंडे, महापालिका आयुक्त कुणाल कुमार यांसह विविध मान्यवरांच्या उपस्थितीत पालखीप्रमुख आणि दिंडीप्रमुखांचा सन्मान करण्यात आला.

संत तुकाराम महाराजांच्या पालखी पाठोपाठ काही वेळात सायंकाळी साडे सहाच्या दरम्यान संत ज्ञानेश्वरांची पालखी पाटील इस्टेट झोपडपट्टी चौकात दाखल झाली. पालख्यांच्या आमगानावेळी पुलावरून फुलांचा वर्षाव करण्यात आला. पालखीच्या स्वागतासाठी उभारण्यात आलेल्या स्टॉलधारकांनी जल्लोषात पालखीचे स्वागत केले. पुढील चौकात वारकऱ्यांनी मनमुराद खेळ खेळले. विठूनामाच्या गजरात रंगलेले हे खेळ कॅमेऱ्यात टिपण्यासाठी नागरिकांची लगबग सुरू होती. लहानांपासून वृद्धांपर्यंत तरुण मुले-मुली फुगड्या घालत, टाळ-मृदंग वाजवत तल्लीन होऊन चालले होते. दर्शनसाठी आलेले नागरिकही या खेळात सहभागी झाले.

वारकऱ्यांसाठी सेवा म्हणून संगमवाडी रोड, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ रोड, नामदार गोपाळकृष्ण गोखले रोड, टिळक चौक, लक्ष्मी रोडवर नागरिकांनी गर्दी केली होती. वारकऱ्यांना खाद्यपदार्थ, पाण्याच्या बाटल्या, औषधे, कापडी पिशव्यांचे वाटप करण्यात आले. लक्ष्मी रोडवरही विविध संस्थांनी फुलांचा वर्षाव करून पालखीचे स्वागत केले. सकाळपासून सुरू झालेला या पालख्यांचा प्रवास रात्री पुण्यात विसावला. भवानी पेठेतील पालखी विठोबा मंदिरात संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी थांबली. निवडुंगा विठ्ठल मंदिरामध्ये तुकाराम महाराजांच्या पालखीने मुक्काम केला.

पावसाने केली निराशा

पालख्यांचे पुण्यात आगमन होत असताना स्वागतासाठी पावसाच्या सरी पडतात, असे गेल्या काही वर्षांत सातत्याने घडले आहे. या वर्षी देखील हवामान विभागाने रविवारी दुपारी आणि संध्याकाळी शहरात पावसाचा अंदाज वर्तवला होता. मात्र, पावसाने यंदा वारकऱ्यांची निराशा केली. शहरात सकाळी काही वेळासाठी ढगाळ वातावरण होते. दुपारी बाराच्या दरम्यान ऊन वाढत गेले. संध्याकाळी देखील आकाशात ढग दिसले नाही. पालख्यांचे आगमन झाले त्या वेळी पाऊस पडला नाही, त्यामुळे वारकरी नाराज झाले.

पालखीत पोलिस आयुक्त सहभागी

पोलिस आयुक्त रश्मी शुक्ला यांनी रविवारी सायंकाळी वारकऱ्यांसोबत पायी पालखीत सहभाग घेतला. पालखीचे दर्शन घेत त्यांनी संचेती चौकापासून येरवडा सादलबाबा चौक ते पुन्हा संचेती, शिवाजीनगर, फग्युर्सन रोड असे पालखीत चालत सहभाग घेतला. या वेळी त्यांनी बंदोबस्ताचा आढावा घेतला. त्याच्या सोबत पोलिस सहआयुक्त रवींद्र कदम, गुन्हे शाखेचे अतिरिक्त आयुक्त प्रदीप देशपांडे, सहायक आयुक्त सुरेश भोसले, निरीक्षक संजय पाटील होते. टिळक चौकापर्यंत शुक्ला यांनी पालखीत सहभाग घेतला.

चोरट्यांचा सुळसुळाट

संत ज्ञानेश्वर महाराज व संत तुकाराम महाराज यांच्या पालखीचे दर्शन घेण्यासाठी आलेल्या अनेक नागरिकांचे पाकीट व मोबाइल गर्दीत भुरट्या चोरांनी पळविल्याच्या घटना समोर आल्या आहेत. रात्री उशिरापर्यंत पोलिस ठाण्यांकडे काही नागरिक तक्रारी करण्यासाठी गेले होते. फग्युर्सन रोडवर दोन तरुणांचे पाकीट चोरल्याचे आढळून आले. तर, संचेती व वाकडेवाडी येथे मोबाइल चोरल्याच्या घटना घडल्या.

धारकऱ्यांमुळे पालखी खोळंबली

गेल्या दोन वर्षांपासून संभाजी भिडे यांच्या श्री शिव प्रतिष्ठानचे कार्यकर्ते आणि समर्थक वारकरी-धारकरी म्हणून पाळखी सोहळ्यात सहभागी होतात. हातात शस्त्रे घेऊन, भगवे फेटे परिधान करून ही मंडळी वारीत सहभागी होतात. नेहमीप्रमाणे पालखी फर्ग्युसन रस्त्यावरील गोखले चौकाजवळ (गुडलक चौक) पोहोचल्यानंतर वारकरी-धारकऱ्यांची दिंडी वारीत सहभागी झाली. माऊलींच्या पालखी सोहळा व्यवस्थापनाला ही बाब खटकली. वारीतील दिंड्या क्रमानेच पुढे जातील, असा पवित्रा घेत जोपर्यंत पोलिस धारकऱ्यांची दिंडी बाजूला करीत नाहीत तोपर्यंत पालखी पुढे सरकणार नाही, असा पवित्रा व्यवस्थापनाने घेतला. अखेर पोलिसांच्या हस्तक्षेपाने धारकऱ्यांना बाजूला करण्यात आले आणि पाऊण तासाच्या खोळंब्यानंतर पालखी पुढे मार्गस्थ झाली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सामन्यात बेरंग, पालखीत अवघा रंग!

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
एक वर्षाची प्रतीक्षा संपली. ज्या दोन पालख्यांना पाहण्यासाठी, रथाला हात लावण्यासाठी, पादुकांपुढे नतमस्तक होण्यासाठी पुणेकर वर्षभर प्रतीक्षा करतात, ती प्रतीक्षा रविवारी संपली. डोळ्यात साठवून घ्याव्या, अशा त्या पालख्यांचे आगमन झाले आणि प्रत्येकाचेच हात आनंदाने, तृप्ततेने जोडले गेले. असा हा अपूर्व सोहळा घडून आला तो ज्ञानोबा-तुकोबा यांच्या पालखी मार्गक्रमणाने. भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यात बेरंग होत गेला तशी पालखी सोहळ्यात गर्दी वाढली आणि अवघा रंग एक झाला.

संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज आणि जगदगुरू श्री तुकाराम महाराज यांच्या पालख्यांचे रविवारी सायंकाळी शहरात आगमन झाले आणि अवघी पुण्यनगरी पुण्यमयी वातावरणात न्हाऊन निघाली. पालख्यांचे स्वागत करायला पावसाच्या सरी नसल्याने काहीशी रूखरूख प्रत्येकालाच वाटत होती. दोन्ही पालख्यांचे शहरात आगमन झाल्यानंतर दर्शनासाठी गणेशखिंड रस्ता, गोपाळ कृष्ण गोखले रस्ता (एफसी रोड), डेक्कन, टिळक चौक, लक्ष्मी रस्ता अशा सर्व मार्गांवर तोबा गर्दी उसळते; पण भारत-पाकिस्तान यांच्यातील क्रिकेट सामन्याचा परिणाम रविवारी ठळकपणे जाणवला.

तुकाराम महाराजांची पालखी फर्ग्युसन कॉलेजजवळ आली तेव्हा अर्धा सामना संपला होता. त्यामुळे रस्त्यावर दर वर्षी प्रमाणे गर्दी नव्हती. इतर भागातीलही रस्ते ओस पडले होते. अघोषित संचारबंदीची स्थिती होती. भारताची फलदांजी सुरू झाली आणि संघ ढेपाळायला सुरुवात झाली तोच गोपाळ कृष्ण गोखले रस्ता, डेक्कन भागात गर्दी वाढू लागली. तुकाराम महाराजांची पालखी डेक्कनपर्यंत गेल्यानंतर गर्दी चांगलीच वाढली होती. काही वेळाने ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचे आगमन झाले आणि दरवर्षीप्रमाणे गर्दी उसळली. ज्ञानेश्वर महाराजांची पालखी गोखले चौकात थांबल्याने काही वेळ तणाव निर्माण झाला होता. पुढे टिळक चौक, लक्ष्मी रस्ता या भागात गर्दी वाढल्याचे जाणवले. सामना हरला याच विचाराने सर्वजण बाहेर पडत असल्याचे ते निदर्शक असल्याचे जाणवले.

दरम्यान, भवानी पेठेतील पालखी विठ्ठल मंदिर येथे संत ज्ञानेश्वर महाराजांची आणि नाना पेठेतील निवडुंगा विठोबा देवस्थान येथे संत तुकाराम महाराजांची पालखी मुक्कामासाठी विसावली. आज, सोमवारी पालखी मुक्कामी असल्याने दिवसभर दर्शन घेता येणार आहे. पुणेकरांच्या सेवेनंतर मंगळवारी दोन्ही पालख्या पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान ठेवतील.

अश्व आणि सेल्फी

तुकाराम महाराज पालखीतील दोन अश्व रविवारी सायंकाळी गोपाळ कृष्ण गोखले रस्त्यावर थांबले होते. काही जणांनी अश्वाबरोबर सेल्फी काढून घेतले. दोन-चार जणांची ही कृती लगेच लोकप्रिय झाली आणि घोड्यांबरोबर सेल्फी काढण्यासाठी गर्दी झाली. घोड्यांबरोबर सेल्फी का काढला जातोय, हे उत्सुकतेने पाहण्यासाठी काही परदेशी मग तिथे आले. हा सर्व प्रकार ते अत्यंत कुतूहलतेने पाहात होते. घोड्याबरोबर सेल्फी काढलेल्यांनी मग या परदेशी पाहुण्यांना पकडले आणि त्यांच्याबरोबर सेल्फीचा खेळ रंगवला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पालखीच्या प्रसादाने इफ्तार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज आणि जगदगुरू श्री तुकाराम महाराज यांच्या पालख्यांचे रविवारी सायंकाळी शहरात आगमन झाले आणि सामाजिक सलोख्याचा एक अपूर्व सोहळा रंगला. माऊली आणि तुकोबांच्या पालखीच्या प्रसादाने मुस्लिम बांधवांनी उपवास (रोजा) सोडला. हिंदू-मुस्लिम सामाजिक सलोख्याचा हा सोहळा प्रत्येकाच्या मनात बंधूभाव निर्माण करणारा होता.

नाना पेठ येथील साखळीपीर तालीम राष्ट्रीय मारुती मंदिरातर्फे ३२ वर्षांपासून हिंदू-मुस्लिम सामाजिक सलोख्यासाठी हा उपक्रम आयोजित करण्यात येतो. कार्यक्रमाला मुस्लिम धर्माचे अभ्यासक, विविध धर्मगुरू यांच्यासह बौद्ध धर्माचे प्रचारक जयसिंगराव कांबळे, शिख धर्माचे मोकासिंग अरोरो, मुस्लिम धर्माचे इकबाल शेख, सत्तारभाई शेख, अन्वर राजन, साखळीपीर तालीम राष्ट्रीय मारुती मंदिराचे अध्यक्ष रवींद्र माळवदकर उपस्थित होते.

या वेळी उपस्थितांच्या हस्ते सर्व धर्मग्रंथाचे, तसेच राष्ट्रग्रंथ भारतीय राज्यघटनेचे पूजन करण्यात आले. मुस्लिम बांधवांनी दुवा पडल्यानंतर वारकऱ्यांच्या हातून खजूर खाऊन रोजा इफ्तार पार पडला. यानिमित्ताने सर्वांनी मिळून विविध पदार्थ, फळे यांचा आस्वाद घेतला.

भजन, भारूड अशा कार्यक्रमांनी वातावरणात चैतन्य निर्माण झाले होते. माहेश्वरी समाजातील मंडळींनी पुढाकार घेऊन सुरू केलेल्या भजनी मंडळाच्या कार्यक्रमाला उपस्थितांची भरभरून दाद मिळाली. माळवदकर म्हणाले, ‘पालखीच्या प्रसादाने या वर्षी इफ्तार करण्यात आला. गणेश उत्सावाच्या काळात रमजान आला, तर मोदकाने इफ्तार केला जातो.’ आतिक सय्यद यांनी हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी विशेष परिश्रम घेतले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पाच पिढ्यांचे चौघडा वादन

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

लाखो वारकऱ्यांना बरोबर घेऊन मार्गक्रमण करणारा पालखी सोहळा आणि त्या सोहळ्याच्या आगमनाची मंगलमय वार्ता देणारे चौघड्यांचा ताल कानी पडला की पालखीच्या आगमनाची चाहूल लागते. देहू गावातील पांडे कुटुंबीय गेल्या पाच पिढ्यांपासून पालखी सोहळ्याच्या आगमनाची मंगलमयी वार्ता लोकांपर्यंत पोहोचवत आहेत. पालखी मार्गस्थ झाली की थांबेपर्यंत काहीही झाले तरी वादन थांबवायचे नाही, असा वसा घेतलेले पांडे कुटुंबातील सदस्य पालखी सोहळ्याचे पुण्यात आगमन झाल्यानंतर मोठ्या उत्साहात चौघडा वादनात रंगून गेले होते.

गेल्या पाच पिढ्यांपासून पांडे कुटुंबातील प्रत्येक सदस्य संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यात चौघडा वादनाची सेवा घडवत आहेत. सध्या या कुटुंबाच्या दोन पिढ्या वारीत सहभागी झाल्या आहेत. बाळू दामू पांडे, गणेश पांडुरंग पांडे, अश्विन बाळू पांडे या सध्याच्या दोन पिढ्या दररोज पालखीच्या पुढे असलेल्या चौघड्याच्या रथात बसून वादन करतात. एकदा वादन सुरू झाल्यानंतर पालखी विसावा घेईपर्यंत ते थांबत नाहीत वाजवून वाजवून हाताला खड्डे पडतात पण तरीही ही मंडळी थांबत नाही. संत तुकाराम महाराजांचा निरोप गावोगावी पोहोचवण्यासाठी पांडे कुटुंबियांनी त्यांची कला समर्पित केली आहे.

सुमारे १०० वर्षांपूर्वी पांडे कुटुंबाकडे चौघडा वादनाचा मान आला. तेव्हापासून कुटुंबातील प्रत्येक पुरूष सदस्य चौघडा वादन करतो. देहू येथे संत तुकाराम महाराजांच्या मंदिरातही वादन चौघडा वादन करण्याचा मान याच कुटुंबाकडे आहे. यासंदर्भात बाळू दामू पांडे म्हणाले, गेल्या पाच पिढ्यांपासून आम्ही चौघडा वादन करून तुकाराम महाराजांची सेवा करतो आहोत. मी आणि माझी मुलेही या सेवेत रुजू आहेत. महाराजांच्या पालखी पुढे वादन करण्याचा मान खूप मोठा आहे. पंधरा दिवस वाजवून हाताची बोटे वाकडी होतात. पण देवाच्या इच्छेमुळे अंगातली शक्ती काही कमी होत नाही. देव निघाले की थांबेपर्यंत वादनात खंड पाडायचा नाही, असा वसा घेतला आहे. तो आजवर कायम टिकून आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


‘महामेट्रो’च्या ठिकाणी अपघात

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पिंपरी

महामेट्रोच्या पिंपरी ते स्वारगेट या पहिल्या टप्प्याचे काम वल्लभनगर (नाशिकफाटा) येथे सुरू झाले असून, रविवारी पहाटे या ठिकाणी नियुक्तीस असलेल्या दोघा कामगारांना भरधाव वेगातील कंटेनरने ठोकरले. हा अपघात एवढा भयंकर होता की कंटेनरसह दोघेजण काही मीटरपर्यंत फरफटत गेले. अपघातानंतर या ठिकाणी लावण्यात आलेले डायव्हर्जनचे पत्रे, बॅरिकेड्स संपूर्ण रस्त्यात पसरले होते. नागरिकांच्या मदतीने पोलिसांनी ते बाजूला करून रस्ता सुरळीत केला. मुंबई-पुणे मार्गावरील वल्लभनगर एससटी बसस्थानकासमोर ग्रेड सेपरेटरमध्ये पहाटे अडीचच्या सुमारास ही घटना घडली.

विनायक देवेंद्र बडोदिया (२१, रा. पिंपरी) व नितीन धनंजय सुरवसे (रा. नेहरूनगर) हे दोघे या अपघातात जखमी झाले आहेत. तर, कंटेनरचालक अंकुश शिवाजी म्हस्के याला पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. परंतु, दोघा जखमींनी तक्रार द्यायची नसल्याचे सांगितल्यावर म्हस्केला सोडून देण्यात आले. पहाटे अडीचच्या सुमारास पोलिसांच्या नियंत्रणकक्षाला अपघाताबाबत माहिती समजली. तोपर्यंत तेथे काही नागरिक गोळा झाले होते. निगडीकडून पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या वाहनांचा वेग भरधाव असल्याने सुरुवातीला वाहनांना थांबविण्याचे काम पोलिसांना करावे लागले.

वल्लभनगर एसटी बस स्थानकासमोरील ग्रेडसेपरेटरमध्ये पुणे मेट्रोसाठी पीलरचे काम सध्या सुरू आहे. त्यासाठी दोन लेनपैकी एक लेन बंद करण्यात आली असून, वाहनांना त्याची माहिती देण्यासाठी थांबलेले सुरक्षारक्षक या अपघातात जखमी झाले आहेत. निगडीकडून येताना पिंपरी येथून ग्रेड सेपरेटरमध्ये आल्यानंतर नाशिक फाटापर्यंत कोणताही सिग्नल नसल्याने वाहनांचा वेग हा मोठा असतो. तर, नाशिकफाटा कडून पिंपरीकडे जाताना नाशिक फाटा येथे सिग्नल असल्याने वाहनांचा वेग हा तुलनेने कमी असतो.

पिंपरीकडून येताना वल्लभनगरपर्यंत आल्यावर केवळ ५० मीटर अलीकडे वाहनांना डायव्हर्जनचा (एक लेन बंदचा) फलक दिसतो. त्यामुळे या ठिकाणी अपघाताचा धोका वाढला आहे. रात्रीच्या वेळेस वाहनांचा वेग अतिरिक्त असल्याने आणि दिवसा कोंडी होऊ नये, म्हणून महामेट्रोकडून दोन्ही लेनवर प्रत्येकी दोन-दोन सुरक्षारक्षक आणि दिशादर्शकाची नियुक्ती करण्यात आली आहे.

मात्र, वाहनांचा वेग जास्त असल्याने याठिकाणी रविवारी अपघात झाला. येथील लोखंडी बॅरिकेड्स एका जखमीच्या अंगावर पडले होते. तो त्याखाली दबला गेला होता. जखमींपैकी एकाने माझा सहकारी कुठे आहे याची विचारणा केल्यावर पोलिस आणि नागरिकांनी त्याचा लोखंडी बॅरिकेड्सखाली शोध घेऊन दोघांना महापालिकेच्या वायसीएम हॉस्पिटलमध्ये दाखल केले. दोघांवर उपचार करून दुसऱ्या दिवशी सोडण्यात आले. येथील अपघात टाळण्यासाठी महामेट्रोच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करून डायर्व्हजन बाबत निर्णय घेण्यात येणार असल्याचे पिंपरी पोलिसांनी सांगितले.

सुरक्षेच्या सर्व उपाययोजना केल्यामुळे प्रत्यक्ष काम सुरू असलेल्या ठिकाणी कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. पालख्यांमुळे कामही बंद होते. त्यामुळे, कोणालाही इजा झालेली नाही. दोन सुरक्षा रक्षकांना किरकोळ दुखापत झाली असून, ते रविवारी रात्री पुन्हा कामावर रुजू झाले.

ब्रिजेश दीक्षित, व्यवस्थापकीय संचालक, महामेट्रो

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘मोबाइल टॉयलेट’ नसल्याने गैरसोय

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

पालखीच्या स्वागतासाठी प्रशासकीय विभागांतर्फे ठिकठिकाणी स्वागत कक्ष उभारण्यात आले असले, तरी या वारकऱ्यांना प्राथमिक सुविधा देण्यात सरकारी यंत्रणा अपयशी ठरली आहे. आळंदी ते पुणे पालखी मार्गावर ‘मोबाइल टॉयलेट’ नसल्याने महिला वारकऱ्यांची रविवारी दिवसभर गैरसोय झाली.

वारकऱ्यांना सर्व प्रकारच्या सुविधा देण्यासाठी सरकारी; तसेच महापालिकेच्या पातळीवर महिनाभरापूर्वीच नियोजन करण्यात आले होते. वारकऱ्यांना ठिकठिकाणी पिण्याचे पाणी, मोबाइल टॉयलेट, वैद्यकीय सुविधा उपलब्ध होणार असल्याचे अधिकाऱ्यांनी जाहीर केले होते. त्यानुसार दर काही किलोमीटर अंतरावर रस्त्याच्या कडेला पाण्याचे टँकर उभे होते. वैद्यकीय पथकेही पाहायला मिळाली; पण आळंदीपासून संगम पूलापर्यंत पंधरा किलोमीटर अंतरात वारकऱ्यांसाठी कोठेही स्वच्छतागृहांची व्यवस्था केलेली नव्हती.

वारीमध्ये सहभागी होणाऱ्या वारकऱ्यांची संख्या हजारांमध्ये असताना संगमवाडी पूलावर अवघे एक मोबाइल टॉयलेट होते. या मार्गावर महापालिकेच्या शाळा-कॉलेज, सरकारी संस्था नसल्याने स्वच्छतागृहे शोधताना महिला वारकऱ्यांची गैरसोय झाली. वारकऱ्यांच्या स्वागत कक्षांवरही महिला सातत्याने स्वच्छतागृहांबद्दल चौकशी करीत होत्या. पुणे शहर परिसरात आल्यावरही त्यांना मोबाइल टॉयलेट सापडले नाहीत. वारकऱ्यांना सातत्याने स्वच्छतेचा संदेश देणाऱ्या प्रशासनाने वारी मार्गावरील मोबाइल टॉयलेटची संख्या वाढवावी, अशी मागणी महिला वारकऱ्यांनी केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रांगोळींनी सजले रस्ते

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

इतर दिवशी घाणीने उजळून निघणारे शहरातील रस्ते रविवारी रांगोळीच्या कलाकृतींनी सजले होते. पालख्या येणार म्हणून रस्त्यांवर रांगोळ्यांच्या पायघड्या घालण्यात आल्या होत्या. विविध ठिकाणी भल्या मोठ्या रांगोळ्या सर्वांचेच लक्ष वेधून घेत होत्या.

‘समर्थ रांगोळी’ या ग्रुपच्या माध्यमातून आळंदी ते पंढरपूर या दरम्यान रांगोळीतून सामाजिक संदेश दिला जातो. यंदाचे हे १८ वे वर्ष असून या ग्रुपने रविवारी भव्य-दिव्य रांगोळ्या साकारल्या. रांगोळीमुळे सण व उत्सवांचे पावित्र्य तसेच प्रसन्नता अधिकच वाढते. रांगोळी कलेवर आता पुरुषांची ‘छाप’ पडू लागली असून ती छाप रस्त्यांवर सुरेखपणे पडल्याचे दिसून आले.

समर्थ रंगावली ग्रुपमध्ये कोण डॉक्टर आहे तर कोण इंजिनीअर. आवड व प्रबोधन यातून अनेकांनी हा छंद जोपासला आहे. शहरातील पालख्यांचे प्रवेशद्वार, सिमला ऑफिस चौक, गणेशखिंड रस्ता, गोपाळ कृष्ण गोखले रस्ता, टिळक चौक, लक्ष्मी रस्ता अशा मार्गांवर रविवारी रंगावलीच्या पायघड्या घालण्यात आल्या. विविध संदेशांनी नटलेल्या रंगावल्या डोळ्यांचे पारणे फेडणाऱ्या असल्याने त्या आपल्या मोबाइलमध्ये साठवून घेण्याचा मोह नागरिकांना आवरता आला नाही.

अक्षय घोळवे म्हणाले, ‘वारीमध्ये कुणी कीर्तन, भजन यामधून प्रबोधन करतात, तसेच आम्ही रांगोळीतून करतो. गालिचा रांगोळी, संस्कार भारतीची रांगोळी, पाण्यावरची व पाण्याखालची रांगोळी अशा प्रकारच्या रांगोळ्या काढल्या जातात. एड्स जनजागृती, स्त्री-भ्रूणहत्या, बेटी बचाव, पाणी वाचवा, प्लास्टिकचा वापर टाळा , झाडे जगवा, हुंडा बंदी, नेत्र दान-रक्त दान, स्वच्छ भारत असा संदेश देणाऱ्या रंगावली आम्ही पालखी मार्गावर काढतो. नागरिक व वारकरी यांची कौतुकाची थाप समाधान देऊन जाते.’ ग्रुपमध्ये २१ सभासद असून यामध्ये ८ वर्षांपासून ते ४० वर्षांपर्यंतच्या कलाकारांचा समावेश आहे. संतोष आढागाळे, हेमंत जगताप, दिनेश ओझा, कुंदन तोडकर, निखिल शिंदे, विकास नाईक, सतीश तोडकर, राहुल बुरांडे, स्मिता आढागळे, सविता पवार, पूनम बायस, सुनीता सोनार यांनी रंगावल्या साकारल्या.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वारकऱ्यांना औषधे, बिस्किटे, फराळ

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, येरवडा

टाळ मृदंगाचा गजर, डोक्यावर तुळस आणि हातात भगवा झेंडा घेऊन ‘माऊली माऊली’चा जयघोष करीत लाखो वारकरी पंढरपूरकडे निघाले. श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी बरोबर निघालेल्या वारकऱ्यांना कळस, विश्रांतवाडी, फुलेनगर मार्गावर विविध संस्था, संघटनांकडून फराळ, बिस्किटे, चहा, पाण्याच्या बाटल्या, गोळ्या, औषधे मोफत देण्यात आली.

श्री संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचे शनिवारी सायंकाळी आळंदीहून प्रस्थान झाले. रविवारी सकाळी पालखी शहराकडे येण्यासाठी निघाली. विश्रांतवाडीतील रस्ते सकाळपासूनच वारकऱ्यांनी फुलले होते. पुणे महापालिकेकडून कळस येथे पालखी स्वागत मंडप उभारला होता. दर वर्षापेक्षा यंदाच्या वर्षी पालखी कळसमध्ये लवकर दाखल झाली. दुपारी सव्वाबाराच्या सुमारास पालखी कळसमध्ये आल्यानंतर महापौर मुक्ता टिळक, उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे, आयुक्त कुणाल कुमार यांनी स्वागत केले. त्यानंतर पालखी फुलेनगर येथील दत्त मंदिरात विसाव्यासाठी थांबली.

कळस-विश्रांतवाडी-फुलेनगर मार्गावर आमदार जगदीश मुळीक, नगरसेवक योगेश मुळीक, रेखा टिंगरे, अनिल टिंगरे, किरण जठार, माजी नगरसेवक सतीश म्हस्के आणि नगरसेविका सुनीता साळुंखे आणि विविध राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांनी आणि संस्थांनी मंडप उभारून वारकऱ्यांसाठी फराळ, बिस्किटे, पाण्याच्या बाटलीचे वाटप केले. विश्रांतवाडी, येरवडा आणि वाहतूक पोलिसांनी पालखी मार्गावर चोख बंदोबस्त ठेवला होता.

माध्यमांच्या प्रतिनिधींना धक्काबुक्की

पालखीचे फोटो काढण्यासाठी विश्रांतवाडी येथील स्काय वॉकवर गेलेल्या विविध प्रसारमाध्यमांच्या छायाचित्रकारांना फोटो काढण्यास मनाई करून खाली उतरण्यास सांगितले. त्यामुळे छायाचित्रकार आणि पोलिसांत शाब्दिक चकमक झाली. पोलिसांनी धक्काबुक्की करून अरेरावीची भाषा केल्याचे काही उपस्थितांनी सांगितले.

‘छावा’तर्फे वारकरी सेवा

पालखी सोहळ्यात सहभागी झालेल्या वारकरी भाविकांची सेवा केली. वारकऱ्यांसाठी मोफत औषधे आणि अॅम्ब्युलन्स उपलब्ध करून देण्यात आली. तसेच, बिस्किट आणि फराळाचे वाटप केले. त्यानंतर रस्त्यावरील कचरा उचलून स्वच्छता मोहीम राबविली. या वेळी छावा प्रमुख धनंजय जाधव, विनोद परांडे, अजय बांडे, सोनाली ठोकळ, नवनाथ कानसकर, दिलीप डालीमकर आदी अपस्थित होते.


पालख्यांच्या स्वागतासाठी हडपसर सज्ज

म. टा. वृत्तसेवा, हडपसर

श्री संत ज्ञानेश्वर महाराज व श्री संत जगद्गुरू तुकाराम महाराज यांच्या पालख्यांच्या स्वागतासाठी हडपसर सज्ज झाले आहे. मंगळवारी सकाळी नऊ वाजता श्री संत ज्ञानेश्वर महाराज माऊलींची पालखी, तर श्री संत जगद्गुरू तुकाराम महाराजांची पालखी अकरा वाजता येणार आहे.

श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचा विसावा पुणे-सोलापूर रोडवरील हरपळे इमारतीच्या येथे करण्यात आला आहे. वारकरी व भाविकांच्या सुरक्षेकरिता हडपसर पोलिस ठाणे व महापालिका सज्ज झाले आहे. श्री संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीच्या विसाव्यामध्ये भाविकांच्या सुरक्षेकरिता मागील वर्षांपासून बदल करण्यात आला आहे. उत्कर्षनगर सोसायटीच्या आवारातील नेहमीच्या ठिकाणाऐवजी गाडीतळ पीएमपीएमएल बस स्थानकाच्या परिसरात मंडप उभारून विसावा करण्यात आला आहे.

पीएमपीएलच्या बस पालखी येण्यापूर्वी एका दिवसापासून उड्डाणपुलाच्या खाली थांबणार आहेत. त्यामुळे प्रवाशांनी बस स्थानकाच्या चौकात न थांबता उड्डाणपुलाखाली थांबावे, असे पीएमपीएमल प्रशासनाने सांगितले. वारकऱ्यांच्या दिंडीतील वाहने उड्डाणपुलावरून मार्गस्थ होणार आहे. पालखीच्या दरम्यान वारकऱ्यांना व भाविकांना उड्डाणपुलावर जाण्यास बंदी घालण्यात आली आहे.

हडपसर व पुणे शहर पोलिसांकडून सातशे पोलिस कर्मचारी, तर तीनशे पोलिस मित्र, महाविद्यालयातील एनएसएस व एनसीसी कॅडेट्ससह स्वयंसेवी संस्थांचे सयंसेवक, गणेश मंडळाचे कार्यकर्ते मदत कार्यासाठी हडपसर पोलिस स्टेशनने भाविक व वारकऱ्यांच्या सुरक्षेसाठी सज्ज केले आहे. मोबाइल चोर, पाकीटमार करणाऱ्या चोरांवर सीसीटीव्ही व पोलिस पथकाची करडी नजर असणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बोलत नाही म्हणून मैत्रिणीवर ब्लेडने वार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पिंपरी

चिंचवड येथील पत्राशेड झोपडपट्टी येथील तरुणाने मैत्रीण बोलत नाही या कारणावरून ब्लेडने तिच्यावर वार केले. रविवारी सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास ही संतापजनक घटना घडली. आरोपीने मुलीवर ब्लेडने ३५ ते ४० वार केले असून जखमी मुलीवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

ओंकार राऊत असे या २० वर्षीय आरोपीचे नाव असून त्याला चिंचवड पोलिसांनी अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित तरुणी व ओंकार एकाच भागात राहत होते. त्या दोघांची मैत्री होती. मात्र, घरच्यांनी दोघांच्याही बोलण्यावर बंदी आणली. त्यामुळे मुलीने ओंकारशी बोलणे बंद केले. बोलणे बंद केल्याच्या रागातून आरोपीने मुलीवर एकटीच असताना वार केले. मुलीच्या दंडावर पोटरीवर ब्लेडने वार केल्यामुळे ती जखमी झाली आहे. सध्या रुग्णालयात तिच्यावर उपचार सुरू आहे. आरोपी तरुणाला चिंचवड पोलिसांनी अटक केली असून चिंचवड पोलीस अधिक तपास करत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images