Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

स्वयंअध्ययनाला प्राधान्य द्या

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

‘प्रशासकीय सेवेच्या अभ्यासाला सुरुवात करण्यापूर्वी विद्यार्थ्यांनी आपल्यातील क्षमता आणि कमतरता ओळखावी. विद्यार्थ्यांनी परीक्षेत उत्तीर्ण होण्यासाठी क्लासपेक्षा केवळ आणि केवळ स्वयंअध्ययनाला महत्त्व देण्याची आवश्यकता आहे. आता मला ‘इंडियन फॉरेन सर्व्हिस’मध्ये (आयएफएस) देशसेवा करायची आहे,’ अशी माहिती केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या वतीने घेण्यात आलेल्या ‘भारतीय प्रशासकीय सेवा परीक्षा २०१६’मध्ये (आयएएस) देशात अकरावी, तर राज्यात पहिली आलेल्या पुण्याच्या विश्वांजली गायकवाड हिने ‘मटा’ला दिली.

शासकीय सेवा परीक्षेचा निकाल बुधवारी रात्री जाहीर झाला. या परीक्षेत विश्वांजलीने राज्यात पहिली येण्याचा बहुमान मिळविला आहे. विश्वांजलीचे शिक्षण शासकीय इंजिनीअरिंग कॉलेजमध्ये (सीओईपी) कम्प्युटर शाखेमध्ये झाले आहे. विश्वांजलीने परीक्षेच्या अभ्यासाची तयारी २०१४पासून सुरू केली. यापूर्वी दिलेल्या परीक्षेत काही टक्क्यांनी विश्वांजली पूर्वपरीक्षा उत्तीर्ण होऊ शकली नाही. मात्र, दुसऱ्या प्रयत्नात तिने हे यश प्राप्त केले आहे. विश्वांजलीचे वडील डॉ. मुरलीधर गायकवाड आणि आई डॉ. ज्योती गायकवाड हे एमएमसीसी कॉलेजात प्राध्यापक पदावर कार्यरत आहेत. तर, भाऊ चैतन्य गायकवाड हा व्हीआयटी कॉलेजमध्ये मेकॅनिकल शाखेत अंतिम वर्षाला आहे.

विश्वांजली म्हणाली, ‘सीओईपीमधून बी-टेकची पदवी मिळविल्यानंतर भारतीय प्रशासकीय सेवेचा अभ्यास करण्याला सुरुवात केली. परीक्षेची माहिती मिळण्यासाठी आणि एकंदरीत आढावा घेण्यासाठी युनिक अॅकॅडमीमध्ये क्लास लावला. केवळ क्लासला महत्त्व दिले नाही. याउलट मी स्व-अभ्यास आणि नियमित अभ्यास करण्याला प्राधान्य दिले. पूर्वपरीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर मुख्य परीक्षेचा आणि मुलाखतीचा कसून अभ्यास केला. मुख्य परीक्षेसाठी पॉलिटिकल सायन्स हा विषय निवडला होता. मुलाखतीमध्ये पहिल्यांदाच सामोरे जात असल्याने भीती वाटत होती. मात्र, पॅनेलसमोर गेल्यानंतर त्यांनी प्रश्न विचारायला सुरू केल्यावर भीती राहिलीच नाही. पॅनेलमधील व्यक्ती तुमच्या उत्तरांवरून तुमची ‘ओरिजिनॅलिटी’ तपासतात. त्यामुळे कोणताही ताण न घेता प्रश्नांची उत्तरे दिली आणि परीक्षेत यशस्वी झाली. माझ्या यशात आई, वडील आणि भावाचे योगदान आहे.’

‘विश्वांजलीला बारावीतदेखील सायन्स शाखेत ९६.३३ टक्के गुण होते. दहावीत तिचा पहिला क्रमांक आला होता. तिने अभ्यासासाठी कोणत्याच प्रकारचे शिकवणी वर्ग लावले नाही. तिने लहानपणापासून स्व-अभ्यासालाच अधिक महत्त्व दिले. त्यामुळेच ती आज परीक्षेत यशस्वी झाली आहे. तिच्या यशाचे श्रेय तिने आम्हाला दिले असले, तरी संपूर्ण यश तिचेच आहे,’ असे डॉ. मुरलीधर आणि डॉ. ज्योती गायकवाड यांनी सांगितले.

सीओईपीचे प्रा. संदीप मेश्राम आणि एस. एस. परदेशी यांनी सांगितले, की विश्वांजली ही सीओईपीच्या बोट क्लबची सदस्य असून कॉलेजमध्ये शिकताना ती विविध उपक्रमांमध्ये सहभागी असायची. विश्वांजली ही कॉलेजमध्ये शिकताना बोट क्लबची सक्रिय सदस्य होती. त्यामुळे ती एक उत्कृष्ट रोव्हर होती. तिने रोव्हिंग या क्रीडा प्रकारात सीओईपीच्या संघाचे राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रतिनिधित्व केले होते. काही वर्षांपूर्वी तिने फिलिपाइन्समध्ये झालेल्या अॅमेच्युअर्स रोव्हिंग स्पर्धेत सीओईपीचे प्रतिनिधित्व केले होते. तसेच, तिचा रिगाटामध्ये देखील सक्रिय सहभाग असायचा.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


आजपासून बँकांचे शुल्क महागणार

$
0
0

विविध सेवांसाठी ११५ ते १५० रुपये अतिरिक्त मोजावे लागणार

म. टा. प्रतिनिधी, पुणे

आपले उत्पन्न वाढविण्यासाठी सरकारी बँकांनी आता थेट खातेदारांनाच लक्ष्य करण्यास सुरुवात केली आहे. बँकांनी खातेदारांच्या व्यवहार शुल्कात मोठी वाढ केली आहे. काही बँकांची वाढ यापूर्वीच अंमलात आली असून, काही बँकांची वाढ आजपासून (एक जून) लागू होणार आहे.
चेकबुक देणे, खात्याची पुनर्रचना, मयत वगळता खात्यातून नाव कमी करणे किंवा जोडण्यास ११५ ते १५० रुपयांपर्यंत सेवाशुल्क आकारण्यात येणार आहे. इतकेच नव्हे तर बँकेच्या खात्याशी जोडलेला मोबाइल क्रमांक बदलण्यासाठीही ११५ ते १५० रुपयांपर्यंतचे शुल्क आकारले जाणार आहे.
खात्यातील जुन्या व्यवहारांची चौकशी करून त्याची नोंद घेण्यासाठीही मोठे शुल्क आकारण्यात येणार आहे. हे व्यवहार १२ महिन्यांपेक्षा जुने असल्यास प्रति व्यवहार २३० रुपये तर, १२ महिन्यांच्या आतील व्यवहारांसाठी १७३ रुपये आकारण्यात येतील. स्वाक्षरी बदलण्यासाठी १७५ रुपये तर, फोटो साक्षांकित करण्यासाठी ११५ रुपये आकारले जातील. त्याचबरोबर अन्य वित्तीय संस्थांकडून खातेदाराची स्वाक्षरी पडताळणीची मागणी झाल्यास त्यासाठी ११५ रुपये आकारण्यात येणार आहेत.
काही बँकांनी गेल्या वर्षीपासूनच या शुल्कामध्ये वाढ केली आहे. तर काही बँकांकडून येत्या एक ते दोन महिन्यात वाढ होण्याची शक्यता आहे.
सर्व बँकांच्या वेबसाइटवर सर्व्हिस चार्जेसची माहिती उपलब्ध आहे. काही बँकांनी ग्राहकांना एसएमएस अलर्ट पाठविण्यासाठी प्रति तिमाही १० ते ३० रुपयांपर्यंत शुल्क लागू केले आहे.
‘देशातील आघाडीच्या बँकेने एक जूनपासून आपले सेवाशुल्क वाढवले आहे. यामध्ये चारपेक्षा अधिक वेळा बँकेतून रोखीचा व्यवहार केल्यास प्रतिव्यवहार ५० रुपये आणि कर द्यावा लागेल. मोफत मर्यादेपेक्षा अधिक एटीएम व्यवहार केल्यास, फाटक्या नोटा खात्यात भरल्यास, नवे डेबिट कार्ड घेतल्यास तसेच हे शुल्क द्यावे लागणार आहे.
बँकांना कर्जावरील व्याजातून मोठे उत्पन्न मिळते. सर्वसामान्य बचत खात्याच्या ठेवीदारांवर हे अतिरिक्त शुल्क लादून बँका ग्राहकांची लूट करत आहेत. हा प्रकार दात कोरून पोट भरण्यासारखा आहे. खातेदारांनी बँकेत जाऊन आपल्याला लागणाऱ्या सेवाशुल्काची माहिती घ्यावी आणि त्या विरोधात आवाज उठवावा,’ असे सजग नागरिक मंचाचे विवेक वेलणकर यांनी सांगितले.
साधे बचत खाते उघडणे आणि चालवणे यासाठी बँकेला किमान २५० रुपये खर्च येतो. त्याचबरोबर इतर अनेक खर्चही होतात. बँकांनी लावलेले हे सेवाशुल्क नियमांनुसार असून ते वर्षभराहून अधिक काळ लागू आहे. या संदर्भातले एक परिपत्रक व्हॉटसअपवर व्हायरल झाल्याने खातेदारांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. प्रत्येक बँकेच्या वेबसाइटवर सेवाशुल्काची माहिती वेबसाइटवर उपलब्ध असते, असे एका सरकारी बँकेच्या व्यवस्थापकाने सांगितले.

खातेदारांनो, माहिती घ्या...
एटीएम, डेबिट, क्रेडिट कार्ड, मोबाइल बँकिंग, नेट बँकिंग सुविधांमुळे अनेक खातेदार क्वचितच बँकांमध्ये जातात. अनेकांनी तर पासबुकही घेतलेले नाही. मोजकेच खातेदार पासबुक भरून घेऊन त्याचे वाचन करतात. किंवा बँकेत जाऊन शुल्काविषयी माहिती घेतात. त्यामुळे बँक खातेदारांकडून कशासाठी व किती शुल्क आकारते, याची माहितीच खातेदारांना नसते, असे दिसून आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कचरा प्रकल्पासाठी पिंपरी सांडसची जागा

$
0
0

वनविभागाकडून हस्तांतरणास परवानगी; सीएमचे ट्विट

म. टा. प्रतिनिधी, पुणे

पिंपरी सांडस येथील वन विभागाची १९.९० हेक्टर जागा पुणे महापालिकेला कचरा प्रकल्प सुरू करण्यासाठी हस्तांतर करण्यास राज्य सरकारने परवानगी दिल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. दरम्यान, पिंपरी-सांडसच्या ग्रामस्थांनी या प्रकल्पाला विरोध करण्याची भूमिका घेतली आहे.
उरुळी देवाची आणि फुरसुंगी येथील कचरा डेपोंमुळे नवीन जागेचा शोध घेण्यात येता होता. जिल्हाधिकारी सौरभ राव यांनी पिंपरी ​सांडस येथील १९ हेक्टर जागा पुण्याच्या कचरा डेपोसाठी निश्चित केल्याचे जाहीर केले होते. ही जागा ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली होती. तसा प्रस्ताव राज्य सरकारला पाठवण्यात आला होता. ही जागा पुणे महापालिकेच्या ताब्यात देण्याची कार्यवाही राज्य सरकारने पूर्ण केली आहे.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी ट्विटद्वारे या जागेचा निर्णय घेण्यात आल्याचे जाहीर केले. पुणे महापालिकेला पिंपरी सांडस येथील जागा शास्त्रोक्तपद्धतीने कचरा प्रकल्प राबवण्यासाठी हस्तांतर करण्यात येत असल्याचे फडणवीस यांनी सांगितले. दरम्यान, पिंपरी सांडस येथील नागरिकांचा ही जागा देण्यास विरोध असल्याने प्रशासनाने कृत्रिम उपग्रहाच्या मदतीने जागेची मोजणी केली होती. या जागेत कोणत्याही प्रकारचे पाण्याचे स्त्रोत नाहीत; तसेच लोकवस्तीही नाही. या ठिकाणी कचऱ्यावर प्रक्रिया केल्यावर तयार होणारे खत शेतीसाठी दिले जाणार आहे.

आढळरावांचा विरोध
पिंपरी-सांडस येथे कुठल्याही परिस्थितीत कचरा प्रकल्प (डेपो) होऊ देणार नाही, अशी भूमिका खासदार शिवाजीराव आढळराव यांनी घेतली आहे. आढ‍ळराव यांनी पालिका आयुक्त कुणाल कुमार यांची बुधवारी भेट घेतली. महापालिकेने शहरातच कचरा प्रकल्प उभारण्याची आवश्यकता आहे. केंद्र आणि राज्य सरकारने मंजुरी दिलेले प्रकल्प संथगतीने सुरू आहेत. पालिकेने आपल्या हद्दीतील कचरा प्रकल्पांवर लक्ष देण्याची आवश्यकता आहे, असे त्यांनी सांगितले. या वेळी शिवसेना गटनेते संजय भोसले, नगरसेवक प्रमोद भानगिरे, प्राची आल्हाट आदी उपस्थित होते.
येवलेवाडी येथील नागरिकांनी आपल्याला मतदान न केल्याच्या रागातून तेथील पाणीपुरवठा तोडण्यात येत असल्याची तक्रार आढळराव यांनी केली. आढळराव यांनी स्थानिक आमदार योगेश टिळेकर यांचे नाव न घेता त्यांच्यावर टीका केली. जनतेने तुम्हाला बहुमत दिले आहे, तेव्हा चांगले काम करा, असा सल्लाही आढळराव यांनी दिला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दोन दिवसांत पाऊस पडणार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

शहरातील वाढते तापमान आगामी दोन दिवसात पडणाऱ्या पावसामुळे कमी होण्याची शक्यता आहे. पुण्यासह मध्य महाराष्ट्र, विदर्भातही तुरळ ठिकाणी सोसाट्याचा वारा आणि मेघ गर्जनेसह पाऊस पडणार असल्याचा अंदाज पुणे हवामान विभागाने वर्तवला आहे.
केरळमध्ये मान्सूनची आगेकूच सुरू असताना महाराष्ट्रातही मान्सूनपूर्व पावसाने कोकणात दोन दिवसांत हजेरी लावली आहे. आता हा पाऊस मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात दाखल होणार आहे. पुढील दोन दिवसात दक्षिण कोकण आणि गोव्यात मुसळधार पाऊस तर मध्य महाराष्ट्र विदर्भात तुरळक ठिकाणी सोसाट्याचा वारा आणि मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे.
दरम्यान, पुण्यात बुधवारी सकाळपासून आकाश ढगाळ होते. दुपारी बारानंतर ऊन वाढले आणि संध्याकाळानंतर पुन्हा ढग दाटून आले. दोन दिवसांच्या तुलनेत तापमानात वाढ होऊन दिवसभरात कमाल ३६ आणि किमान २४.३ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद घेण्यात आली. येत्या दोन दिवसात तापमानात घट होऊन शहरात पावसाच्या सरी कोसळतील, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कर्वेनगर खुनाचे रहस्य उलगडले

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

कर्वेनगर येथील मावळे आळीतील तरुणाच्या खूनप्रकरणी वारजे माळवाडी पोलिसांनी एकाला अटक केली. खून झालेला तरुण आरोपीच्या पत्नीबाबत वाईट बोलत असल्याने कटरच्या मदतीने झोपेतच गळ्यावर वार करून खून केल्याचे समोर आले आहे. आरोपीला कोर्टात हजर केल्यानंतर दोन जूनपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला.
मन्या उर्फ मनोज सोनवणे (वय २८, रा. कामना वसाहत, कर्वेनगर) असे अटक केलेल्याचे नाव आहे. या घटनेत राजू गिरमाला साबळे (वय २५, रा.म्हाडा वसाहत, वारजे माळवाडी) याचा खून झाला होता. त्या नंतर या परिसरात खळबळ उडाली होती. त्या तरुणाची ओळख पटवण्याचे काम पोलिस करत होते. सोमवारी त्याच्या भावाने मृतदेह ओळखला. वारजे माळवाडी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक बाजीराव मोळे, सहायक निरीक्षक एम. व्ही राऊत यांच्या पथकाने आरोपीचा शोध सुरू केला. साबळे याच्या मित्राची चौकशी केली. त्यावेळी सोनवणे हा त्याच्यासोबत असल्याचे समजले. त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली. त्यावेळी सोनवणे यानेच हा खून केल्याचे निष्पन्न झाले. साबळे हा सतत सर्व मित्रांसमोर सोनवणे याच्या पत्नीबाबत वाईट बोलत होता. याचा राग त्याच्या मनात होता. त्यामुळे त्याने २९ मे रोजी दुपारी साडेतीनच्या सुमारास त्याला दारू पाजून मावळे आळीच्या पडक्या खोलीत घेऊन गेला. या ठिकाणी झोपले असता सोनवणे याने झोपेतच साबळेच्या गळ्यावर कटरने वार करून त्याचा खून केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

साडेचारशे कोटींच्या रोख्यांनाही मान्यता

$
0
0

निर्धारित मुदतीत प्रकल्प पूर्ण न झाल्यास तरतूद

म. टा. प्रतिनिधी, पुणे

शहरात समान पाणीपुरवठ्यासाठी (२४ बाय ७) २ हजार २६४ कोटी रुपयांच्या कर्जरोखे काढण्याला मान्यता देतानाच, आवश्यकता भासल्यास अतिरिक्त साडेचारशे कोटी रुपयांचे (२० टक्क्यांपर्यंत जादा) कर्जरोखे उभारण्याच्या तरतुदीस मान्यता देण्यात आली आहे. पाच वर्षांच्या निर्धारित मुदतीत हा प्रकल्प पूर्ण न झाल्याने त्याचा खर्च वाढल्यास, त्यासाठी अतिरिक्त कर्जरोखे उभारण्यास स्थायी समितीने मान्यता दिली आहे.
समान पाणीपुरवठ्यासाठी कर्जरोखे उभारण्याच्या प्रस्तावाला स्थायी समितीने मंगळवारी मान्यता दिली. सध्याच्या प्रचलित दरांनुसार प्रकल्प खर्चाच्या आराखड्याला मान्यता घेण्यात आली असली, तरी भविष्यात योजनेचा खर्च वाढल्यास, त्याची तरतूद कर्जरोख्यांद्वारेच करण्यास स्थायी समितीने मान्यता दिली आहे. दोन हजार २६४ कोटी रुपयांचे कर्जरोखे उभारण्यास स्थायीने मान्यता दिली असून, वेळ पडल्यास त्याद्वारे आणखी ४५० कोटी रुपये उभारता येऊ शकतात, असेही कर्जरोख्यांच्या प्रस्तावातच नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे, कोणत्याही कारणाने योजनेचा खर्च वाढला, तरीही कर्जरोख्यांच्या माध्यमातून तो करता येऊ शकेल, अशी तरतूद करण्यात आली आहे. अर्थात, त्याचे व्याज आणि इतर बोजा महापालिकेलाच उचलावा लागणार आहे.
समान पाणीपुरवठा योजनेतील अडीचशे कोटी रुपयांच्या साठवण टाक्यांच्या कामास महापालिकेने यापूर्वीच सुरुवात केली आहे. हे काम साधारणतः दोन ते अडीच वर्षांत पूर्ण होण्याची शक्यता आहे. येत्या काही दिवसांमध्ये नव्याने जलवाहिन्या टाकण्याचे काम हाती घेण्यात येईल. त्या अंतर्गत संपूर्ण शहरामध्ये सोळाशे किमीच्या जलवाहिन्या नव्याने टाकण्यात येणार असून, त्यासाठी तब्बल अठराशे कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. तसेच, वॉटर मीटरचे काम करण्याचे प्रस्तावित आहे. यातील, बहुतांश खर्च कर्जरोख्यांद्वारेच भागवण्यात येणार आहे.

पुणेकरांची नियोजनबद्ध लूट
पाण्याच्या टाक्या, नव्या जलवाहिन्या आणि मीटर यामुळे पुणेकरांना २४ तास पाणी कसे उपलब्ध होणार, हे अद्याप स्पष्ट झाले नसताना, केवळ ठरावीक ठेकेदारांच्या भल्यासाठी ही योजना राबविण्याचा घाट घालण्यात आल्याचा आरोप पीपल्स युनियनच्या रमेश धर्मावत यांनी केला आहे. ठेकेदारांच्या फायद्यासाठी काम करणाऱ्या प्रशासन आणि लोकप्रतिनिधींच्या अभद्र युतीमुळे पुणे शहर कर्जबाजारी होणार असून, त्याविरोधात सर्व पुणेकरांना एकत्र येऊन संघर्ष करावा लागेल, असा दावा त्यांनी केला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष महागात पडणार

$
0
0

शरद पवार यांचा इशारा; राज्य, केंद्र सरकारवर टीका

म. टा. प्रतिनिधी, पुणे

‘आपल्या देशामध्ये शेतकरी हा महत्वाचा घटक आहे. गेल्या काही वर्षात शेतकऱ्यांचे प्रश्न वाढले आहेत. त्यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करणे देशाला महागात पडेल. राज्य, केंद्र सरकारने आजपर्यंत केलेल्या दुर्लक्षामुळेच शेतकऱ्यांवर संप करण्याची वेळ आली आहे,’ असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी बुधवारी केला.
केंद्राने सुप्रीम कोर्टाला लेखी स्वरूपात देशात दरवर्षी १२ हजार शेतकरी आत्महत्या करत असल्याचे पत्र दिले आहे. मी कृषिमंत्री असतानाही शेतकरी आत्महत्या होत होत्या. त्यावेळी आम्ही त्याचे विश्लेषण केले. कर्जबाजारीपणामुळे आत्महत्या होत असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे ७१ हजार कोटी रुपयांची कर्ज माफी करण्यात आली, असे पवार यांनी सांगितले. केंद्र सरकारच्या खासदार दत्तक गाव योजनेंतर्गत अॅड. वंदना चव्हाण यांनी दत्तक घेतलेल्या मावळ तालुक्यातील सदुंबरे गावातील विविध विकासकामांचे लोकार्पण पवार यांच्या हस्ते झाले. प्रतिभा पवार, खासदार श्रीरंग बारणे, माजी खासदार नानासाहेब नवले, माजी मंत्री मदन बाफना, माजी आमदार दिगंबर भेगडे, कृष्णा भेगडे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दौलत देसाई व अन्य पदाधिकारी या वेळी उपस्थित होते.
केंद्राचा निधी नसतानाही खासदारांनी एक गाव दत्तक घेऊन, तेथे विकास कामे करायची, हे सुरुवातीला अवघड वाटत होते. पण, इच्छाशक्तीच्या जोरावर ते शक्य होत आहे. चव्हाण यांनी सदुंबरे गावात या योजनेंतर्गत चांगली कामे केली आहेत, असे पवार म्हणाले.

‘सीएसआर’ची मदत
योजनेंतर्गत सदुंबरे गावातील रस्ते, महिलांसाठी अस्मिता भवन, शाळेची नवीन इमारत, कम्युटर प्रशिक्षण केंद्र उभारण्यात आले आहे. महिलांना कम्प्युटर प्रशिक्षणानंतर नोकरी मिळाली आहे. त्या आता ऑनलाइन शॉपिंगही करू लागल्या आहेत. तसेच, वाहन चालविण्याचे प्र्रशिक्षणही त्यांना दिले आहे. या कामामध्ये विविध कंपन्यांच्या ‘सीएसआर’ विभागाचे सहकार्य लाभले, असे अॅड. वंदना चव्हाण यांनी सांगितले.

‘राष्ट्रपतिपदाची केवळ चर्चाच’
पवार यांचे नाव राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीसाठी उमेदवार म्हणून पुढे येत आहे. याबाबत विचारले असता पवार म्हणाले, की मला काही जणांनी राष्ट्रपती पदाच्या उमेदवारीबाबत विचारणा केली आहे. त्यावर मी स्पष्ट नकार दिला आहे. मात्र, अद्याप याप्रकरणी कोणत्याही नावाची चर्चा अथवा निश्चिती झालेली नाही. ‘आयुष्यात मला खूप काही मिळाले आहे. महाराष्ट्रासारख्या राज्याचे मुख्यमंत्रिपद चारवेळा मिळाले. केंद्रामध्ये संरक्षणमंत्री, कृषिमंत्री, विरोधी पक्षनेता आदी पदे सांभाळली आहेत. महाराष्ट्रातील सर्वसामान्यांमुळेच हे शक्य झाले आहे,’ असे सूचक विधानही त्यांनी केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शेतकऱ्यांचा संप व्यापाऱ्यांच्या पथ्यावर

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, बारामती
राज्यभरात आजपासून पुकारण्यात आलेल्या शेतकरी संपाची झळ बारामतीतील शेतकऱ्यांना बसली. आक्रमक व संतप्त शेतकऱ्यांसह विविध संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी जळोची येथील उपबाजारातील लिलाव सकाळी बंद पाडले. या संपाला पाठिंबा देऊन सात दिवस बाजार समितीतील सर्व लिलाव बंद ठेवण्याचा निर्णय घेतला. मात्र, दोन दिवसांपूर्वी खरेदी झालेला शेतमाल खराब होऊन व्यापाऱ्यांचे नुकसान होईल म्हणून एक दिवस भाजी मार्केट सुरू ठेवण्याचा निर्णय व्यापारी व पदाधिकाऱ्यांनी घेतला. याच संधीचा फायदा घेऊन व्यापाऱ्यांनी गणेश मंडईत चढ्या दराने भाजीपाला विक्री सुरू केल्याने हा संप व्यापाऱ्यांच्या पथ्यावर पडल्याचे दिसून आले.
नगर जिल्ह्यातील पुणतांब्यापासून सुरू झालेले शेतकरी संपाचे पडसाद बारामतीतही उमटले. गुरुवारी बारामतीचा आठवडे बाजार असतो. त्यामुळे भाजीपाल्याची आवक तुलनेने जास्त असते. मात्र, आदल्या दिवशी बारामती तालुक्यात संपाचे कोणतेही नियोजन झाले नसल्याने शेतकऱ्यांनी भाजीपाला विक्रीसाठी आणला होता. अचानक ठरलेल्या नियोजनानुसार शेतकऱ्यांनी भाजीपाला घेऊन विक्रीसाठी नेमके जायचे कुठे, असा प्रश्न आज ग्रामीण भागातील अल्प भूधारक शेतकऱ्यांना पडला होता. विक्रीसाठी आणलेला भाजीपाला परत घेऊन जाण्याशिवाय पर्याय नसल्याने शेतकरी हतबल होऊन चिंताग्रस्त झाल्याचे दिसले.
शेतकऱ्यांनी आणलेला भाजीपाला जळोची बाजार समितीच्या उपबाजारात दाखल झाल्यानंतर आडत व्यापाऱ्यांनी लिलाव पुकारण्यास सुुरुवात केली. मात्र अचानक आलेल्या शेतकरी पदाधिकाऱ्यांनी व्यापाऱ्यांना आवाहन करीत लिलाव बंद ठेवण्याची सूचना केली. काही ठिकाणी तरीही लिलाव सुरू झाल्याचे समजताच आक्रमक शेतकऱ्यांनी हे लिलाव बंद पाडले. तर मंडई परिसरात पदाधिकाऱ्यांची व शेतकरी महिलांची किरकोळ बाचाबाची झाली. अनेक ठिकाणी सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी शिवराळ भाषा वापरल्याने शेतकरी महिलांना रडू कोसळले.

संपकरी शेतकऱ्यांच्या मागण्या काय आहेत?
* शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करा
* स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी लागू करा
* शेतकऱ्यांना पेन्शन योजना लागू करावी
* शेतीसाठी बिनव्याजी कर्जपुरवठा करावा
* शेतीसाठी अखंडित वीजपुरवठा करावा

शेतकऱ्यांच्या संपाला आमचा पाठिंबा आहे. मात्र घेतलेला माल खराब होऊन व्यापारी बांधवांचे नुकसान होऊ नये म्हणून आज भाजी मार्केट सुरू आहे. पुढील सात दिवस भाजीमार्केट बंद ठेवण्यात येईल.
- चिऊशेठ जंजिरे (गणेश भाजी मंडई संघटनेचे अध्यक्ष, बारामती)

मंडई सुरु आहे म्हणून फोटो काढण्यास मनाई.....
शेतकऱ्यांच्या संपाला आमचा पाठिंबा आहे. आमच्याकडे दोन दिवसांपूर्वीचा भाजीपाला आहे. तो खराब झाल्यावर नुकसानभरपाई कोण देणार? त्यामुळे आम्ही मंडई सुरू ठेवली आहे. हे प्रसिद्ध करू नये व फोटो काढू नये म्हणून पत्रकारांना अटकाव करण्याचा प्रयत्न काही गुंड प्रवृत्तीच्या व्यापाऱ्यांनी केला. व्यापाऱ्यांना भाजीपाला विक्रीस परवानगी मग शेतकऱ्यांना का नाही, असा प्रश्न अनुत्तरित राहिला.

आमच्या हितासाठी संप आहे; तर मग सर्व शेतकऱ्यांना गावनिहाय विश्वासात का घेत नाही. आम्हाला आज भाजीपाला विक्रीसाठी बंदी आणि व्यापाऱ्यांना सहानुभूती कशासाठी? आमचे नुकसान होते तर व्यापाऱ्यांनीही एक दिवस शेतकऱ्यासाठी नुकसान सोसले, तर काय झाले असते.
- रामभाऊ कर्डिले, शेतकरी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


शंभर खटले निकाली

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
पुणे जिल्हा न्यायालयात सुरू असलेल्या स्थायी लोकअदालतीमध्ये या वर्षी आतापर्यंत १०० हून अधिक दावे निकाली काढण्यात आले आहेत. स्थायी लोकअदालतीमध्ये लोकांना जलदगतीने न्याय मिळणे शक्य असून लोकांनी या उपक्रमाचा वापर करावा, असे आवाहन लोकअदालतीचे अध्यक्ष दिनकर कांबळे यांनी केले आहे.
स्थायी लोकअदालतीमध्ये दर महिन्याला तीनशेहून अधिक प्रकरणांवर सुनावणी घेतली जाते. मात्र, नवीन खटले दाखल होण्याचे प्रमाण खूप कमी आहे. आतापर्यंत सर्वाधिक तक्रारी या दूरध्वनीसंदर्भात आल्या आहेत. त्याखालोखाल बांधकाम व्यावसायिकांविरुद्ध करण्यात आल्या आहेत; तर आरोग्यविषयक केवळ चार तक्रारी दाखल आहेत.
लोकोपयोगी सेवांसंबंधित तक्रारींच्या निवारणासाठी राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरणाच्या निर्देशानुसार स्थायी लोक अदालत स्थापन करण्यात आली आहे. लोकांमध्ये संवाद घडवून मध्यम मार्ग काढून खटला निकाली काढण्यास या उपक्रमाद्वारे प्राधान्य दिले जाते. यामध्ये वाहतूक सेवा, टपाल, तार, दूरध्वनी, वीज, पाणीपुरवठा, नदी, नाले, बंदरे, आरोग्य सेवा, विमा, निवृत्त वेतन यांचा प्रामुख्याने समावेश आहे.
शिक्षण, निवारा, बांधकाम व्यवसायाचाही त्यामध्ये समावेश करण्यात आला आहे. महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरणामार्फत मुंबई, नागपूर, औरंगाबाद व पुणे या चार ठिकाणी स्थायी लोक अदालत स्थापन करण्यात आली आहेत. यामध्ये निवृत्त न्यायाधीश हे अध्यक्ष असून सार्वजनिक उपयुक्तता सेवांबाबत अनुभवी दोन व्यक्ती सदस्य
म्हणून काम पाहतात.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पॉलिशच्या बहाण्याने बांगड्या पळविल्या

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, हडपसर
रस्त्याने जाणाऱ्या एका ज्येष्ठ महिलेला ‘तुमच्या सोन्याच्या बांगड्या खराब झाल्या आहेत. त्या पॉलिश करून देतो’, असा बहाणा करून बांगड्या पळविल्याची घटना हडपसरमध्ये घडली. बांगड्यांसह फरारी झालेल्या दोन अज्ञात चोरट्यांविरुद्ध हडपसर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल झाली आहे.
या प्रकरणी सुमन नारायण जाधव (वय ५५, रा. इंद्रप्रस्थ सोसायटी, हडपसर) यांनी फिर्याद दिली आहे. बुधवारी दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास पंडित जवाहरलाल नेहरू भाजी मार्केटमधून जाधव या भाजी घेऊन पायी घरी जात होत्या. मंत्री मार्केट बिल्डिंगजवळ त्या आल्या असता दोन अज्ञात इसमांनी त्यांना थांबविले. ‘तुमच्या हातातील बांगड्या खूप मळालेल्या आहेत. त्यांना आम्ही पॅालिश करून देतो’, असे ते म्हणाले. त्यानंतर जवळ असलेल्या एका तुकड्याला त्यांनी पॅालिश करून दाखविले. त्यामुळे जाधव यांचा त्यांच्यावर विश्वास बसला. जाधव यांनी लगेच त्यांच्या हातातील तीन तोळ्याच्या दोन बांगड्या पॉलिशसाठी दिल्या. समोर आपला मित्र उभा आहे, त्याच्याकडून पॉलिशसाठी लागणारे अॅसिड घेऊन येतो, असे सांगून चोरट्यांनी धूम ठोकली. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी याबाबत हडपसर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. पुढील तपास सहायक फौजदार पी. एस. कामठे करत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

राजगुरुनगरलाही दूध रस्त्यावर

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, राजगुरुनगर
पुणे-नाशिक महामार्गावरील राजगुरूनगर येथील चांडोली टोल नाक्यावर आंदोलकांनी दोन टँकरमधील दूध रस्त्यावर सोडून सरकारचा निषेध व्यक्त केला. दोन्ही टँकरमध्ये तीस हजार लिटर दूध होते. मागण्या मान्य झाल्या नाही, तर यापुढे तीव्र आंदोलन करण्याचा इशारा शेतकरी संघटनेने दिला आहे. शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी गुरुवारी सकाळी अकराच्या सुमारास हे आंदोलन केले.
या आंदोलनात काही महिलाही सहभागी झाल्या होत्या. टोलनाक्यावर दूध भरलेले टँकर येताच शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी ते थांबवून रस्त्यात दूध सोडून दिले. त्यामुळे महामार्गावर सगळीकडे दूध पसरले होते. पोलिसांना ही खबर कळताच खेड पोलिस ठाण्याचे पोलिस घटनास्थळी दाखल झाले. तोपर्यंत शेतकरी संघटनेचे आंदोलक घटनास्थळावरून निघून गेले होते. शेतकरी संघटनेच्या महिला संघटक सीमा नरवडे यांच्या मार्गदर्शनाखाली हे आंदोलन करण्यात आले. दरम्यान, खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाकण येथील बाजारात शेतकऱ्यांचा कमी सहभाग होता. शेतमालाची आज रोजच्यापेक्षा कमी आवक झाली. शेतकऱ्यांनी बाजारात माल पाठविण्याचे थांबविले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शेतकऱ्यांना न्याय द्यायला हवा

$
0
0

डॉ. बाबा आढाव यांचे मत; संपाला हमाल पंचायत, आडते असोसिएशनचाही पाठिंबा

म. टा. प्रतिनिधी, पुणे

‘शेतमालाला हमी भाव देण्याची राज्य सरकार केवळ आश्वासने देत आहे. प्रत्यक्षात काहीच करीत नाहीत. त्यामुळे शेतकरी संपावर जात आहेत. शेतकऱ्यांना न्याय द्यायला हवा. यासाठी आम्ही देखील शेतकऱ्यांच्या संपाला पाठिंबा देत आहोत,’ असे स्पष्ट मत हमाल पंचायतीचे अध्यक्ष डॉ. बाबा आढाव यांनी व्यक्त केले. शेतकऱ्यांच्या संपाला हमाल पंचायत, आडते असोसिएशनसह अन्य संघटनांनी पाठिंबा दर्शविला आहे.

शेतकऱ्यांना हमी भाव मिळावा. उत्पादन खर्चाच्या दीडपट त्यांना हमी भाव मिळावा. सातबारा कोरा मिळावा. तसेच पेन्शन मिळावी यासारख्या विविध मागण्यांसाठी राज्यातील शेतकरी संपावर गेले आहेत. शेतकरी संपावर गेले आहेत. त्या पार्श्वभूमीवर छत्रपती शिवाजी मार्केट यार्ड कामगार युनियनच्या वतीने निषेध सभा आयोजित करण्यात आली होती. त्या वेळी डॉ. आढाव सभेच्या अध्यक्षस्थानी होते.

या वेळी आढाव म्हणाले, ‘शेतकऱ्यांच्या शेतमालाला हमी भावा मिळायला हवा. त्याशिवाय त्यांचा सातबारा कोरा करताना त्यांना राज्य सरकारने संपूर्ण कर्जमुक्ती द्यावी. शेतकऱ्यांच्या मागण्या रास्त असून त्यांच्या आंदोलनास आमचा पाठिंबा आहे.’ ‘संपाच्या काळात शेतकऱ्यांनी बाजार आवारात शेतमाल विक्रीसाठी आणला तर उत्पादन खर्चापेक्षा कमी दरात विक्री करू नये. अन्यथा त्या मालाची जबाबदारी बाजार समितीने घ्यावी,' असे आवाहनही आढाव यांनी केले.

किसान क्रांती आंदोलनाचे राज्य समन्वयक शांताराम कुंजीर, छत्रपती शिवाजी मार्केट अडते असोशियशनचे अध्यक्ष शिवलाल भोसले, विलास भुजबळ, हमाल पंचायतचे सरचिटणीस नवनाथ बिनवडे, गोरख मेंगडे शेतकरी कामगार पक्षांचे दत्तात्रय गायकवाड, कामगार युनियनचे अध्यक्ष नितिन जामगे, सेक्रेटरी संतोष नांगरे, तोलणार संघटनाचे राजेंद्र चोरगे आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शरद पवार यांनी राष्ट्रपतीपद स्वीकारावे

$
0
0

माजी राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांची भूमिका

म. टा. प्रतिनिधी, पुणे

‘शरद पवारांचे नाव राष्ट्रपतिपदासाठी चर्चेत असल्याचे ऐकले आहे. परंतु, ते त्यास नकारही देत आहेत. त्यांनी नकार देऊ नये, असा माझा त्यांना सल्ला आहे. ते सल्ला घेत नाहीत, तरीही त्यांनी राष्ट्रपतिपदासाठी नाही म्हणू नये,’ अशी आग्रही भूमिका माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासमोर जाहीर कार्यक्रमात मांडली.

देशात महिला धोरण प्रथम महाराष्ट्रात लागू झाले असून त्याला २५ वर्ष पूर्ण होत आहेत. तसेच पवारांच्या संसदीय कारकिर्दीला पन्नास वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त त्यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन बालगंधर्व रंगमंदिरात करण्यात आले होते. माजी राष्ट्रपती पाटील यांच्या हस्ते पवार यांचा सत्कार करण्यात आला. महापौर मुक्ता टिळक, शां. ब. मुजुमदार, प्रतिभा पवार, खासदार सुप्रिया सुळे, रजनी पाटील, वंदना चव्हाण, महिला आघाडीच्या राष्ट्रीय अध्यक्षा फौजिया खान, माजी केंद्रीय सचिव राधा सिंग यांच्यासह माजी महापौर, जिल्हा परिषद अध्यक्ष उपस्थित होत्या. या वेळी ‘आयसीएसई’ बोर्डाच्या परीक्षेत देशात बारावीत पहिली आलेली मुस्कान पठाण हिचा प्रतिभाताई पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

पवारांचे नाव राष्ट्रपतिपदाच्या चर्चेत असल्याचा उल्लेख पाटील यांनी आपल्या भाषणात केला, तेव्हा पवार यांनी व्यासपीठावरूनच हाताने खूण करून ‘आपण चर्चेत नाही,’ असे सांगितले. मात्र, त्याच वेळी खचाखच भरलेल्या सभागृहात टाळ्यांचा कडकडाट झाला. राजकारणात पवार यांच्यापेक्षा ज्येष्ठ असल्याचे सांगून माजी राष्ट्रपती पाटील यांनी पवार यांच्या व्यक्तिमत्त्वाचे अनेक किस्से उपस्थितांना सांगितले. ‘पवार कधीही सल्ला मागत नाही, परंतु मी माझे विचार मांडले आहेत. पवार यांनी राष्ट्रपतिपदासाठी नाही म्हणू नये,’ असा आग्रह त्यांनी व्यासपीठावरून धरला.

पाटील म्हणाल्या, ‘फुले, शाहू आणि डॉ. आंबेडकरांच्या विचाराने प्रभावित झालेले नेते म्हणजे पवार होय. अतिशय खडतर राजकीय प्रवासातही त्यांनी आपले कर्तृत्व सिद्ध केले असून, या पुढेही त्यांना असेच काम करीत राहायचे आहे.’

सत्काराला उत्तर देताना पवार म्हणाले, ‘महिलांमध्ये दिलेले काम बारकाईने आणि नेमकेपणाने करण्याची दृष्टी असते. तर, दिलेले काम सोडून दुसरीकडे लक्ष देण्याची सवय पुरुषांना असते. समाज पुढे न्यायचा असेल तर महिलांना अधिकार दिले पाहिजेत.’ ‘समाजात ५० टक्के महिला असताना त्यांना मागे ठेवणे शक्य नसल्याचे सांगून पवारांनी महिलांनी विविध क्षेत्रांत केलेल्या उल्लेखनीय कार्याचा उल्लेखही आपल्या भाषणात केला. संसदेत तसेच विधिमंडळात महिलांना आरक्षण देण्याचा ठराव कमल व्यवहारे यांनी या वेळी मांडला. त्याला उपस्थितांनी मान्यता दिली.

‘आज मी अस्वस्थ आहे’

शेतकऱ्यांबाबत बोलताना शरद पवार म्हणाले, ‘देशातील बळीराजा संकटात असून आज मी अस्वस्थ आहे. हा बळीराजा आज रस्त्यावर उतरून संघर्ष करतो आहे. त्याच्या कष्टाच्या गोष्टींचा लाभ घेणाऱ्या ग्राहकांनी त्याच्यासाठी शक्य ते करावे. राजकर्त्यांनी ​शहाणपणाचा निर्णय घेऊन बळीराजाचे राज्य आणावे.’ देशात दर वर्षी १२ हजार शेतकरी आत्महत्या करत आहेत. विधवा झालेल्या भगिनींचे जीवन सुसह्य होईल आणि त्यांना सन्मानाने कसा जगता येईल, यासाठी सर्वांनी पुढाकार घेण्याची गरजही त्यांनी व्यक्त केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

एकाच देशात दोन न्याय कसे?

$
0
0

शेतकरी कर्जमाफीबाबत पवार यांचा सवाल

म. टा. प्रतिनिधी, पुणे

‘ज्यांच्या हातात दिल्लीची सत्ता आहे, त्यांनी एका राज्यात कर्जमाफी दिली आहे. त्यामुळे अन्य राज्यातील लोकांची कर्जमाफीची मागणी ही काही चुकीचे नाही. ही मागणी मान्य होत नसल्याने लोक अस्वस्थ झालेले आहेत,’ अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पुण्यात केली.

‘उत्तर प्रदेशच्या निवडणुकीत देशाचे पंतप्रधान शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याची भूमिका घेतात. निवडून आल्यानंतर तेथील मुख्यमंत्री दोन आठवड्यात कर्जमाफीची घोषणा करतात. हा निर्णय देशातील सर्व राज्यांमध्ये झाला पाहिजे, ही अपेक्षा होती. बरेच दिवस उलटल्यानंतरही कर्जमाफीचा निर्णय होत नसल्याने लोकशाहीच्या मार्गाने आपल्या तीव्र भावना व्यक्त करण्यासाठी शेतकरी रस्त्यावर आला आहे,’ असे पवार म्हणाले.

शेतकऱ्यांनी पुकारलेला संप हा त्यांच्या भावना किती तीव्र आहेत, याचे हे लक्षण आहे. तसेच शेतकऱ्याने तो पिकवणार सुद्धा नाही, ही घेतलेली भूमिका फार गांभीर्याने घेण्याची गरजेची आहे,’ असा सल्लाही पवार यांनी सरकारला दिला. गेल्या दोन-तीन महिन्यांपासून विविध शेतकरी संघटना आणि शेतकऱ्यांनी शांतता आणि संयमाच्या मार्गाने आपली भूमिका मांडण्याचा प्रयत्न केला. शेतकरी रस्त्यावर येणार याची पूर्वसूचना देण्यात आली होती. त्यामुळे केंद्र आणि राज्याकडून याबाबत तातडीने निर्णय घेतले जातील, अशी अपेक्षा होती. हे निर्णय घेतले न गेल्याने उद्रेक पाहवयास मिळतो आहे. याबाबत शेतकऱ्यांना किंवा या चळवळीत काम करणाऱ्यांना दोष देता कामा नये. या प्रश्नांकडे दुर्लक्ष करणाऱ्यांकडे ही जबाबदारी जात असल्याची टीका पवार यांनी केली.
..
कर्जमाफीची मागणी गैर नाही
शरद पवार म्हणाले, ‘उत्तर प्रदेशने कर्जमाफीचा निर्णय घेतला. ते सूत्र नजरेसमोरून ठेऊन बाकीच्या राज्यांमध्ये कर्जमाफी दिली पाहिजे. त्याशिवाय हे थांबणार नाही. शेतीमालाला उत्तम किंमत मिळाली तर कर्जमाफीची मागणी राहणार नाही. मी ही जबाबदारी बघत होतो, तेव्हा ७० हजार कोटींचे कर्ज माफ केले. शेतीमालाच्या किमती वाढवून दिल्या. परिणामी देशातील उत्पन्न वाढले. भारत हा जगातील महत्त्वाचा निर्यातदार देश झाला. गहू, तांदूळ, कापूस आणि साखर या चारही शेतीमालामध्ये भारत हा क्रमांक एक आणि दोनचा निर्यातदार झाला.’ ‘शेतीमालाला हल्ली चांगली किंमत दिली जात नाही. त्यामुळे कर्जबाजारीपणा वाढला आहे. ज्यांच्या हातात दिल्लीची सत्ता आहे, त्यांनी एका राज्यात कर्जमाफी दिली आहे. त्यामुळे अन्य राज्यातील लोकांनी कर्जमाफीची मागणी करणे चुकीचे नाही. मागणी मान्य होत नसल्याने लोकांमध्ये अस्वस्था आली आहे.
...
शेतकऱ्यांचा संप हे पक्षातीत आंदोलन होत आहे आणि ही चांगली गोष्ट आहे. त्यामुळे पक्ष म्हणून हे आंदोलन करत नसलो तरी या आंदोलनाला राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी लोकांनी या आंदोलनाला सहकार्य करावे अशा सूचना दिल्या आहेत.
- शरद पवार, माजी केंद्रीय कृषिमंत्री
000

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तूर खरेदीची केंद्रे वाढवावीत

$
0
0

चांगल्या दर मिळण्याची माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांची अपेक्षा
म. टा. प्रतिनिधी, पुणे
‘तूर खरेदीसंदर्भात देशात यंदा वेगळे चित्र आहे. सरकारने तूर खरेदी केली पाहिजे. खरेदीची केंद्रे देखील वाढविली पाहिजेत. शेतकऱ्यांच्या तुरीला चांगली किंमत सरकारने द्यायला हवी,’ अशी अपेक्षा देशाचे माजी कृषिमंत्री शरद पवार यांनी राज्य सरकारकडून व्यक्त केली. राज्यातील संशोधकांनी नव्या जातीची निर्मिती करण्यावर भर दिला पाहिजे. शेतकऱ्यांनी स्वतःसह समाज, देशाची गरज भागविण्यासाठी तुरीचे अधिकाधिक उत्पादन घेण्याचा प्रयोग करावा, असे आवाहनही त्यांनी केले.
शेतकरी उत्पादक कंपन्यांकडून तूर खरेदी सांगता समारंभाचे महा फार्मर्स प्रोड्यूसर कंपनी प्रा. लि. यांच्या वतीने आयोजन करण्यात आले होते. त्या वेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून बोलत होते. व्यासपीठावर केंद्रीय ग्राहक सरंक्षण विभागाचे माजी सचिव हेम पांडे या वेळी उपस्थित होते.
‘देशात साखर, गहू, कापूस या वस्तू देशात आयात करण्याची वेळ एकेकाळी देशात आली होती. परंतु, चांगले प्रयोग केल्याने आता आपण जगात या वस्तू निर्यात करणारे दुसऱ्या क्रमांकाचा देश आहोत. देशात तुरीचे ६५ टक्के उत्पादन हाती येते. ३५ टक्के गरज भागविण्यासाठी शेजारच्या देशांवर अवलंबून राहावे लागते. आयात करावी लागते. ३५ टक्के तुरीची गरज भागविण्यासाठी तूर संशोधनाची जबाबदारी असलेले शेतकरी, संशोधक यांनी चांगल्या वाणाची निर्मिती करण्याची काळजी घ्यावी,’ असे आवाहन पवार यांनी केले.
..
गोमांस बंदीवर टीका
‘तूर आणि मांसाहारामुळे प्रोटिन्स चांगले मिळते. सरकार आता काय खावे काय खाऊ नये असे सांगत आहे. त्यामुळे भविष्यात तूर खूप खावी लागेल,’ असे सांगून पवार यांनी गोमांस बंदीच्या सरकारच्या धोरणावर टीका केली.
..
‘बळीराजाला रस्त्यावर आणू नका’
शेतकऱ्यांच्या भावना टोकाच्या आहेत. स्वतः पिकविलेल्या भाज्या आणि त्यांच्या जनावरांचे दूध रस्त्यावर ओतून देण्याचा शेतकरी कधी विचार करेल का? पण शेतकऱ्यांच्या डोक्यावर कर्जाचे डोंगर आहे. त्यामुळे टोकाची भूमिका घ्यावी लागली. राज्य आणि केंद्र सरकारला आपली विनंती आहे, की त्यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नात लवकर लक्ष घालावे. त्यांचा प्रश्न सोडवावा. बळीराजाला शिवार सोडून रस्त्यावर आणू नका, असे आवाहन करताना बघू सरकार काय करते, अशी टिप्पणी पवार यांनी केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


शैक्षणिक कागदपत्र मिळण्याचा मार्ग सुलभ

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, पुणे
विद्यार्थ्यांना जातीचा दाखला, उत्पन्नाचा दाखला आदी शैक्षणिक कागदपत्रे हवी असल्यास शंभर रुपयांच्या स्टॅम्पपेपरवर प्रतिज्ञापत्र देण्याची गरज नाही. विद्यार्थ्यांनी साध्या कागदावर सादर केलेले प्रतिज्ञापत्र महा-ई-सेवा आणि सेतू केंद्रांना घेण्याची सक्ती आहे. तरीही या कागदपत्रांसाठी स्टॅम्पपेपरवर प्रतिज्ञापत्र मागितल्यास संबंधित केंद्रांवर कारवाई केली जाणार आहे.
बारावीचा निकाल जाहीर झाला असून, दहावीचा निकाल लवकरच जाहीर होईल. या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने तयारी केली आहे. महा-ई-सेवा केंद्र आणि सेतू केंद्रांवर शैक्षणिक कागदपत्रांसाठी शंभर रुपयांच्या स्टॅम्पपेपरवर प्रतिज्ञापत्र सादर करण्याची मागणी केली जाते. याबाबत अनेक तक्रारी येत आहेत.
याबाबत अतिरिक्त जिल्हाधिकारी रमेश काळे म्हणाले, ‘शैक्षणिक कागदपत्रे हवी असल्यास विद्यार्थ्यांनी साध्या कागदावर प्रतिज्ञापत्र करणे आवश्यक आहे. महा-ई-सेवा आणि सेतू केंद्रांनी संबंधित प्रतिज्ञापत्र स्वीकारले पाहिजे. त्यांनी शंभर रुपयांच्या स्टॅम्पपेपरची मागणी केल्याचे आढळल्यास संबंधित केंद्रांवर कारवाई केली जाणार आहे.’
‘विद्यार्थ्यांव्यतिरिक्त अन्य नागरिकांना शैक्षणिक कागदपत्रे हवी असल्यास त्यांना स्टॅम्पपेपरवर प्रतिज्ञापत्र सादर करावे लागणार आहे.’ असे काळे यांनी स्पष्ट केले.

चार महिन्यांसाठी अधिकाऱ्यांच्या नेमणुका
जून ते सप्टेंबर या चार महिन्यांच्या कालावधीत प्रवेश प्रक्रिया सुरू असते. या कालावधीत महा- ई-सेवा आणि सेतू केंद्रांवर येणाऱ्या अर्जांनुसार शैक्षणिक दाखले देण्यासाठी अधिकाऱ्यांच्या नेमणुका करण्यात आल्या आहेत. याबाबत निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र मुठे म्हणाले, ‘प्रवेश प्रक्रियेच्या कालावधीत १२ उपायुक्त, आठ तहसीलदार, चार अव्वल कारकून आणि चार लिपिक यांच्या नेमणुका केल्या आहेत.’


सेवा हमी कायद्यानुसार कोणत्याही शैक्षणिक कागदपत्रासाठी अर्ज आल्यानंतर २१ दिवसांत संबंधित अधिकाऱ्यांनी निर्णय दिला पाहिजे. कागदपत्रांमध्ये त्रुटी असल्यास तसे अर्जदाराला कळवावे. अर्ज फेटाळला गेल्यास त्यामागची कारणे नमूद करावीत. याबाबतच्या सूचना अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत.
- राजेंद्र मुठे,
निवासी उपजिल्हाधिकारी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विद्यार्थ्यांना गावात मिळणार रहिवाशाचे दाखले

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, पुणे
‘आपले सरकार’ सेवा केंद्रामधून आता ग्रामीण भागातील दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांना रहिवाशासह दारिद्रय रेषेखालील असल्याचे दाखले मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यामुळे विविध प्रकारचे दाखल मिळविण्यासाठी नागरी सुविधा केंद्रासह तहसीलदार कार्यालयाकडे हेलपाटे मारावे लागणार नाहीत.
‘आपले सरकार’ सेवा केंद्रांमधून आता विविध प्रकारचे तेरा दाखले देण्यास प्रारंभ झाल्याने विद्यार्थ्यांचे हेलपाटे वाचणार आहेत. ज्या ग्रामपंचायतीचे उत्पन्न १५ लाख किंवा त्यापेक्षा अधिक आहे, अशा ग्रामपंचायतींना किमान एक स्वतंत्र आपले सरकार सेवा केंद्र उभारण्यात येणार आहे. तसेच, १५ लाखांपेक्षा कमी उत्पन्न असून, आर्थिक जबाबदारी घेणाऱ्या ग्रामपंचायतींनी स्वेच्छेने हे केंद्र उभारण्याचा निर्णय घेतला आहे. जिल्ह्यातील सुमारे ८८० ग्रामपंचायतीमध्ये आपले सरकार सेवा केंद्र सुरू केले आहे. त्या केंद्रांतून ग्रामपंचायतीच्या प्रशासनाचे संगणकीकरण करण्याबरोबरच ग्रामपंचायतीकडून देण्यात येणारे १९ पेक्षा अधिक दाखले संगणकीकृत दिले जाणार आहेत.
प्रकल्पामुळे ग्रामपंचायतीच्या कारभारात एकसूत्रता व पारदर्शकता येणार आहे. १९ दाखल्याबरोबरच २०० प्रकारच्या विविध सेवाही देण्यात येणार आहेत. रेल्वे, बस, आरक्षण, डीटीएच रिचार्ज, बँकिग सेवा, आर्थिक समावेश, ई- कॉमर्स, पॅनकार्ड, आधार नोंदणी, विमा हफ्ता भरणे, पासपोर्ट, वीज बील, पोस्ट विभागाच्या सेवाही उपलब्ध होणार आहेत. आपले सरकार सेवा केंद्रातून सध्या केवळ १३ दाखले दिले जात आहेत. राज्य सरकारच्या विविध सेवा हळूहळू आपले सेवा केंद्राकडे हस्तांतरीत करण्यात येत आहेत.
या केंद्रातून दोनशे सेवा देण्यात येणार आहे; परंतु त्यासाठी सहा महिन्यांचा कालावधी लागणार आहे. आपले सरकार केंद्रातील कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. या केंद्रातून सध्या ग्रामपंचायतीच्या दफ्तरांचे संगणकीकरण करण्याचे काम सुरू आहे. तसेच रहिवाशी दाखला, दारिद्रय रेषेखालील दाखले, जन्म- मृत्यू दाखला, विवाह नोंदणी दाखला, शौचालय वापरत असल्याचा दाखला, ज्येष्ठ नागरिकांचा दाखला, विधवा असल्याचा दाखला, ग्रामपंचायतीचे येणे नसल्याचा दाखला, हयातीचा दाखला, नमुना ८ अ उतारा, विभक्त कुटुंब दाखला, निराधार दाखला अशा प्रकारचे दाखले सध्या सेवा केंद्रातून दिले जात आहे. त्यामुळे नागरिकांची गैरसोय थांबणार असून, हे सर्व दाखले गावातच मिळणार आहे,’ असे आपले सरकार सेवा केंद्राच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘मसाप’च्या घटनेचे ‘परिवर्तन’ रखडले

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, पुणे
‘घटनादुरुस्ती लवकरच करू,’ असे सांगणाऱ्या महाराष्ट्र साहित्य परिषदेने गेल्या वर्षभरात यासाठी बैठकच घेतली नसल्याचे उघड झाले आहे. घटना समितीचे काम कोण पाहणार, निमंत्रक कोण असणार, पूर्वीच्या निमंत्रकांना घटनादुरुस्ती समितीमध्ये घ्यायचे की नाही, अशा राजकारणात परिषदेचे एक वर्ष निघून गेले आहे. निवडून आलो तर एक वर्षात घटनादुरुस्तीचा विषय मार्गी लावू, असा प्रचार करून परिषदेत ‘परिवर्तन’ घडल्यानंतरही घटनादुरुस्तीच्या बाबतीत ‘परिवर्तन’ झालेले नाही. समितीची वर्षभरात बैठकच झाली नसल्याने घटनादुरुस्तीच्या विषयाचा फुगा फुटला आहे.
साहित्य परिषदेत सध्याची कार्यकारिणी अस्तित्वात येऊन एक वर्ष झाले आहे. या कार्यकारिणीच्या आधी घटनादुरुस्तीचे निमंत्रक म्हणून सु. प्र. कुलकर्णी यांच्याकडे जबाबदारी होती. कुलकर्णी यांच्या म्हणण्यानुसार घटनादुरुस्तीचे ८० टक्के काम पूर्ण झाले आहे. ‘काम पुढे नेण्यासाठी स्वीकृत सदस्य म्हणून निवड करा,’ अशी मागणी कुलकर्णी यांनी कार्यकारिणीला केली होती; पण स्वीकृत सदस्य म्हणून कुणाचीच निवड करायची नाही, असा निर्णय कार्यकारिणीने सुरुवातीलाच घेतल्याने कुलकर्णी यांना समितीत स्थान मिळाले नाही.
‘मार्गदर्शक म्हणून काम करा’, असे कार्यकारिणीतर्फे कुलकर्णी यांना कळविण्यात आले होते. त्यातच अॅड. प्रमोद आडकर यांनी समितीच्या पदावरून राजीनामा दिल्याने सर्व काम रवींद्र बेडकीहाळ यांच्याकडे आले. त्यानंतर समितीचे काम पुढे जाऊ शकलेले नाही. या मानापमान नाट्यात समितीची वर्षभरात बैठकच झाली नसल्याने घटनादुरुस्तीचे काम आहे तिथेच आहे. नुकत्याच झालेल्या परिषदेच्या १११ व्या वर्धापन दिन कार्यक्रमात कुलकर्णी यांनी परिषदेच्या कारभारावर ताशेरे ओढले होते. या पार्श्वभूमीवर ‘मटा’ने त्यांच्याशी संपर्क केला असता, गेल्या वर्षभरात घटनादुरुस्तीसाठी बैठकच झाली नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.


घटनादुरुस्तीचे ८० टक्के काम पूर्ण केले आहे. कच्चा अंतिम मसुदा तयार आहे. हे काम पुढे नेण्यासाठी मला स्वीकृत सदस्य म्हणून समितीत घ्या, अशी मागणी मी केली होती. निमंत्रक करा असा माझा हट्ट नव्हता तर हे काम पूर्ण व्हावे, अशी इच्छा होती. सध्याच्या समितीची वर्षभरात बैठकच झालेली नाही.
- सु. प्र. कुलकर्णी,
घटनादुरुस्ती समितीचे माजी निमंत्रक

‘सहा महिन्यांत विषय मार्गी’
‘नवीन कार्यकारिणी निवडून आल्यानंतर स्वीकृत सदस्य करून घेतले तरच काम करेन अशी कुलकर्णी यांची भूमिका होती. कार्यकारिणीवर कोणालाच स्वीकृत म्हणून घ्यायचे नाही, असा निर्णय आमच्या कार्यकारिणीने सुरुवातीलाच घेतला असल्याने तो प्रश्नच नाही. आम्हाला मार्गदर्शन करा, आमची चर्चेची तयारी आहे, असे आम्ही कुलकर्णी यांना कळविले होते; पण त्यांचा गैरसमज झाला असावा. त्यांच्या अनुभवाचा फायदा होईल म्हणून आम्ही त्यांची वाट पाहिल्याने काही वेळ गेला तसेच एका सदस्याने राजीनामा दिला. पुरुषोत्तम काळे, विनोद कुलकर्णी या सदस्यांच्या मदतीने आता काम हाती घेतले असून, या किंवा पुढच्या आठवड्यात बैठक होणार आहे. येत्या सहा महिन्यांत हा विषय मार्गी लावू’, असे स्पष्टीकरण घटनादुरुस्तीच्या समितीचे निमंत्रक रवींद्र बेडकीहाळ यांनी दिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

इंद्रायणी नदीत बुडून दोघांचा मृत्यू

$
0
0

पिंपरी : देहू येथे पोहण्यासाठी गेलेल्या तिघा युवकांपैकी दोघांना पाण्याचा अंदाज न आल्याने त्यांचा बुडून मृत्यू झाला. गुरुवारी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास देहू येथील गाथा मंदिराच्या पाठीमागे ही घटना घडली.

अनिरुद्ध ज्ञानेश्वर देवतरसे (१७) आणि योगेश शंकर जगताप (१७, दोघे रा. मु.पो. शिंदगे, ता. कळंबनोरी, जि. हिंगोली) अशी मृत्यू झालेल्या दोघांची नावे आहेत. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, अनिरुद्ध आणि योगेश हे दोघे शाळांना सुट्टी असल्याने देहू येथे बहिणीकडे आले होते. गुरुवारी सायंकाळी इंद्रायणी नदीवर या दोघांसह अन्य एकजण पोहण्यासाठी नदीवर गेले होते. पाण्याचा अंदाज न आल्याने अनिरुद्ध व योगेश हे दोघे बुडाले. तर, एक जण बचावला. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन दोघांना बाहेर काढले. त्यांना उपचारांसाठी पिंपरी येथील महापालिकेच्या वायसीएम हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. परंतु, उपचारांपूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वृद्धेचे दागिने ओरबाडून लुटले

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पिंपरी

वडमुखवाडी येथे चोरांनी घरात घुसून वृद्धेच्या कानातील दागिने हिसकावून नेले. यामध्ये ६६ वर्षांच्या वृद्धेच्या कानाच्या पाळ्या फाटून गंभीर इजा झाली आहे. तसेच, सुमारे साडे आठ तोळे वजनाचे सोन्याचे दागिने घरातून लंपास केल्याची घटना बुधवारी रात्री दीडच्या सुमारास ही घटना घडली आहे.

सुभद्रा जगनाथ तापकीर (६६, रा. वडमुखवडी) असे जखमी वृद्धेचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तापकीर या रात्री घरामध्ये झोपल्या होत्या, तर त्यांचे नातू व मुले उन्हाळ्यामुळे घराच्या छतावर झोपण्यासाठी गेले होते. या संधीचा फायदा घेऊन चोरांनी घरात घुसून तापकीर यांना गुंगीच्या औषधाचा वास दिला. त्यानंतर त्यांच्या कानातील दागिने ओरबडून काढले. तसेच, घरातील व कपाटातील असे साडे आठ तोळे सोने चोरून पोबारा केला. चोरांनी आजीच्या कानातले हिसकावताना त्यांच्या दोन्ही कानांच्या पाळ्या फटल्या. मात्र, याची जाणीवच न झाल्याने हा प्रकार सकाळी घरच्यांना आल्यानंतर उघडकीस आला. दिघी पोलिस तपास करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images

<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>
<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596344.js" async> </script>