Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

कोणत्याही हल्ल्यासाठी भारतीय नौदल सक्षम

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

‘सध्याच्या काळात संरक्षण दलांपैकी कोणतेही एक दल युद्ध जिंकू शकत नाही,’ असे सांगत नौदलप्रमुख अॅडमिरल सुनील लांबा यांनी एनडीएच्या छात्रांना ‘जॉइंटमनशिप’ची वृत्ती अंगी बाणण्याचे आवाहन केले. भारतीय नौदलाने हिंदी महासागराबरोबरच पॅसिफिक व अटलांटिक महासागरापर्यंत आपले अस्तित्व निर्माण केल्याचे सांगत कोणत्याही हल्ल्याला किंवा धोक्याला सामोरे जाण्यासाठी भारतीय नौदल सक्षम असल्याचेही लांबा यांनी स्पष्ट केले.

‘एनडीएमध्ये छात्रांना तिन्ही दलांमध्ये समन्वय ठेवून काम करण्याचे (जॉईंटमनशिप) धडे दिले जातात. ते तुम्हाला पुढील कारकीर्दीत उपयोगी येतील,’ असे अॅडमिरल लांबा यांनी छात्रांना उद्देशून केलेल्या भाषणात सांगितले. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना लांबा म्हणाले, ‘तिन्ही दलांमधील समन्वय वाढावा, यासाठी एकत्रित प्रशिक्षण कार्यक्रम केले जात आहेत. भविष्यात फक्त गुप्तचर विभागच नव्हे; तर अन्य क्षेत्रांतील सहकार्यही वाढविण्यात येईल’. ‘भारतीय नौदलाने हिंदी महासागरात आपला दबदबा आणखी वाढवला आहे. एडनच्या आखातात युद्धनौका कायमस्वरूपी तैनात आहे. तर पश्चिमी ताफ्याने मध्य समुद्रापासून अॅटलांटिकपर्यंत आपले अस्तित्व निर्माण केले आहे. पूर्व ताफ्याने दक्षिण चीन समुद्रात सिंगापूरच्या नौदलासोबत सराव केला; तर सध्या आपल्या नौका ऑस्ट्रेलियन नौदलासोबत सरावासाठी रवाना झाल्या आहेत. त्यामुळे भारतीय नौदलाचा पसारा पॅसिफिक ते अटलांटिक असा झाला आहे,’ असे लांबा यांनी सांगितले. ‘नौदलाने पहिल्यापासूनच ‘मेक इन इंडिया’ला प्राधान्य दिले आहे. सध्या ४२ नौका व पाणबुड्यांची बांधणी सुरू आहे. हा सर्व ताफा सांभाळायला कुशल मनुष्यबळही नौदलाकडे उपलब्ध आहे,’ असेही लांबा म्हणाले.
पुन्हा २६-११ सारखा हल्ला झाल्यास त्याला तोंड देण्यासाठी आपण सक्षम आहोत का, या प्रश्नाला उत्तर देताना लांबा म्हणाले, ‘नौदल कोणताही हल्ला परतवून लावण्यासाठी सक्षम आहे. सरकार सांगेल ती कामगिरी आम्ही अचूक पार पाडू’.एनडीएचेच माजी छात्र असलेले लांबा यांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला. ‘जानेवारी १९७४ मध्ये मी एनडीएत दाखल झालो. इथली तीन वर्षे खूप वेगळी होती. माझी गोल्फ स्क्वाड्रन ही एनडीएतली सर्वोत्तम स्क्वाड्रन आहे. गोल्फच्या प्रथा-परंपरा खूप वेगळ्या आहेत’, असे ते म्हणाले.

‘विराट’च्या संग्रहालयाचा प्रस्ताव नाही’

भारताची पहिली विमानवाहू नौका विक्रांत नौदलाने भंगारात काढली होती. या पार्श्वभूमीवर सहा मार्च रोजी निवृत्त झालेल्या विराट या दुसऱ्या विमानवाहू नौकेचे तरी संग्रहालयात रूपांतर व्हावे, ही मागणी जोर धरत आहे. त्या पार्श्वभूमीवर ‘महाराष्ट्र टाइम्स’च्या प्रतिनिधीने अॅडमिरल लांबा यांना विचारले असता, ‘विराट सध्या निवृत्तीचे जीवन जगत आहे. तिचे संग्रहालयात रूपांतर करण्याविषयी अजूनही आम्हाला ठोस प्रस्ताव आलेला नाही. योग्य प्रस्ताव आल्यास त्याबाबत निर्णय घेतला जाईल,’ असे त्यांनी सांगितले. त्यामुळे योग्य प्रस्तावाअभावी विराटही भंगारात निघण्याची शक्यता वाढली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


बाँडसाठी गरजेची सरकारी मान्यता

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

पालिकेच्या समान पाणीपुरवठा (२४ बाय ७) योजनेअंतर्गत कर्जरोखे (म्युन्सिपल बाँड) उभारण्यास स्थायी समितीने मान्यता दिली असली, तरी राज्य सरकारच्या मान्यतेनंतरच त्यावर शिक्कामोर्तब होणार आहे. समान पाणीपुरवठा योजनेतील साठवण टाक्या आणि जलवाहिन्यांबाबत राज्याच्या नगरविकास विभागाने आक्षेप घेतले असल्याने बाँडच्या मान्यतेची प्रक्रिया सुलभ होणार का, याकडे लक्ष लागले आहे.
समान पाणीपुरवठ्याच्या तीन हजार कोटी रुपयांच्या योजनेला यापूर्वीच मान्यता देण्यात आली आहे. केंद्र, राज्य आणि महापालिकांचा निधी वगळता उर्वरित निधी कर्जरोख्यांच्या माध्यमातून उभारला जाणार आहे. गेल्या काही महिन्यांपासून त्यासाठी प्रक्रिया सुरू होती. साठवण टाक्या, जलवाहिन्या आणि वॉटर मीटर याची कामे टप्प्याटप्प्याने होणार असून, त्यानुसार कर्जरोखे काढण्यात येणार असल्याचे महापालिका आयुक्त कुणाल कुमार यांनी स्पष्ट केले. त्यानुसार, आता टाक्यांच्या कामांसाठी दोनशे कोटी रुपयांचे कर्जरोखे काढण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. अर्थात, हे कर्जरोखे काढण्यापूर्वी राज्य सरकारच्या मान्यतेचे सोपस्कार पूर्ण करावे लागणार आहेत.
पालिकेने काढलेल्या साठवण टाक्यांच्या निविदा चुकीच्या पद्धतीने काढण्यात आल्याचा आरोप झाल्याने सरकारने स्थगिती दिली होती. त्यानंतर विभागीय आयुक्तांमार्फत चौकशी करण्यात येणार असल्याचे स्पष्ट झाले होते. तसेच, जलवाहिन्यांच्या कामाच्या सर्व कागदपत्रांची तपासणी करण्याचे आदेशही नगरविकास विभागाने नुकतेच दिले होते. त्यामुळे, आता कर्जरोख्यांना तातडीने मान्यता मिळणार, की त्यामध्ये सरकार वेगळी भूमिका घेणार, याकडे आता लक्ष लागले आहे.

तर.. ठरेल पहिली पालिका
सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडियाने (सेबी) घातलेल्या निर्बंधांमुळे गेल्या १० वर्षांमध्ये कोणत्याही महापालिकेने कर्जरोखे काढलेले नाहीत. पुण्यासह, अहमदाबाद आणि विशाखापट्टणम महापालिकांकडून सध्या कर्जरोख्यांसाठी प्रयत्न सुरू असून, राज्य सरकारने मान्यता दिल्यास अलीकडच्या काळात कर्जरोख्यांद्वारे निधी उभारणारी पुणे ही देशातील पहिली महापालिका ठरेल, असा दावा आयुक्त कुणाल कुमार यांनी केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वैचारिक दहशतवाद फोफावतोय

$
0
0

माजी सैन्याधिकारी हेमंत महाजन यांची टीका

म. टा. प्रतिनिधी, पुणे

‘सध्या प्रसारमाध्यमांमध्ये देशाच्या सुरक्षेसंदर्भात नको ती चर्चा केली जाते. या चर्चांमध्ये काही तथाकथित विचारवंत सैन्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करतात. अनेकदा सैन्याच्या विरोधातही बोलले जाते. एकप्रकारे हा वैचारिक दहशतवाद असून, तो फोफावत चालला आहे,’ अशी टीका ब्रिगेडियर हेमंत महाजन (निवृत्त) यांनी केली.
शिवधनुष्य प्रतिष्ठानच्या वतीने शिवनेरी ते रायगड या पायी पालखी सोहळ्यानिमित्त लालमहाल येथे महाजन यांच्या हस्ते शिवधनुष्य पुरस्कार प्रदान करण्यात आले. त्या वेळी महाजन यांनी सैन्यावर टीका करणाऱ्या विचारवंतांना खडे बोल सुनावले. देशाचे रक्षण करण्याची जबाबदारी ही फक्त सैन्याची नाही तर प्रत्येक नागरिकाची आहे, असेही त्यांनी सांगितले. कार्यक्रमात ज्येष्ठ लेखक प्र. के. घाणेकर, छायाचित्रकार सुरेश तरलगट्टी, संदीप भोंडवे यांना क्रीडा पुरस्कार, शीतल कापशीकर यांना शाहिरी पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
महापौर मुक्ता टिळक, ज्येष्ठ इतिहासतज्ज्ञ पांडुरंग बलकवडे, सरसेनापती येसाजी कंक यांचे वंशज शशिकांत कंक, सरदार कृष्णाजी नाईक बांदल यांचे वंशज करणराजे बांदल, पिलाजीराव सणस यांचे वंशज बाळासाहेब सणस, शिवशाही संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित थोपटे आदी या वेळी उपस्थित होते. शाहीर हेमंत मावळे आणि शाहीर हिंगे कला प्रबोधिनीच्या विद्यार्थ्यांनी पोवाडे व ऐतिहासिक गीते सादर करून कार्यक्रमात रंग भरले.
देशाला पाकिस्तान आणि चीन या दोन्ही शेजाऱ्यांकडून धोका आहे. एकाबाजूला चीनने आपल्या देशात विविध वस्तूंच्या विक्रीच्या माध्यमातून अर्थिक घुसखोरी केली आहे. दुसरीकडे पाकिस्तान दहशतवादी कारवायांच्या आधारे भारतावर कुरघोडी करण्याचा प्रयत्न करीत आहे. अशावेळी या दोन्ही शत्रूंचे मनसुबे हाणून पाडणे गरजेचे आहे. चीनच्या वस्तूंवर बहिष्कार टाकण्याची गरज निर्माण झाली आहे. दहशतवादी हल्ल्यांना आळा घालण्यासाठी नागरिकांनी सतर्क होणे गरजेचे आहे, त्यासाठी त्यांनी आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या घटनांना आळा घालायला हवा, असे आवाहन महाजन यांनी केले. मुक्ता टिळक आणि पांडुरंग बलकवडे यांनीही आपले विचार मांडले.

गोगोईंच्या कारवाईचे समर्थन
काश्मीरमध्ये मेजर गोगोई यांनी केलेल्या कारवाईचे महाजन यांनी समर्थन केले. ‘लढाईला कोणतेही नियम नसतात. काश्मीरमध्ये जे युद्ध लढले जात आहे ते अपारंपरिक आहे. भारतीय सैन्याला अपारंपरिक मार्गच स्वीकारावा लागणार आहे. छत्रपती शिवरायांनी हेच केले होते. आपली ताकद शत्रूपेक्षा कमी असते, तेव्हा शत्रूला बेसावध पकडून त्याच्यावर हल्ला करणे म्हणजे गनिमी कावा होय, याकडे महाजन यांनी लक्ष वेधले.

आज सैन्याच्या विरोधात बोलणारे तथाकथित विचारवंत शिवकाळात असते, तर त्यांनी शाहिस्तेखान विरोधी मोहिमेबद्दल छत्रपतींनाही प्रश्न विचारले असते. जे राजकीय पक्ष सैनिकांच्या विरोधात बोलतील, त्यांना आम्ही मतदान करणार नाही, असे लोकांनी निक्षून सांगायला हवे.
हेमंत महाजन

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पत्रकारितेला हवी साहित्याची जोड

$
0
0

ज्येष्ठ लेखक भानू काळे यांचे मत

म. टा. प्रतिनिधी, पुणे

‘पत्रकार आणि साहित्यिक हे दोन्ही व्यवसाय परस्परांना मारक आहेत असे म्हटले जाते. पत्रकाराला बहिर्मुखता आवश्यक असते तर, साहित्यिकाला अंतर्मुखता... पत्रकारांना कायम बाहेर फिरावे लागते तर, लेखकाला एकांत हवा असतो. मात्र, पत्रकारितेला साहित्य गुणांची जोड मिळाली तर त्यातून निर्माण होणारी साहित्यकृती उत्कृष्ट असते,’ असे मत ज्येष्ठ लेखक-संपादक भानू काळे यांनी व्यक्त केले. सुरेश द्वादशीवार हे पत्रकारीता आणि साहित्य याचा उत्तम मेळ घालणारे लेखक आहेत, असे गौरवोद्गारही त्यांनी काढले.
सुरेश द्वादशीवार लिखित ‘हाकुमी’, ‘तांदळा’ आणि ‘अलकनंदा’ या तीन कादंबऱ्यांच्या दुसऱ्या आवृत्तीचे प्रकाशन काळे यांच्या हस्ते एस. एम. जोशी सोशलिस्ट फाउंडेशन येथे झाले. त्या वेळी ते बोलत होते. साधनाचे संपादक विनोद शिरसाट, प्रथम बुक्सच्या संपादक संध्या टाकसाळे, सुरेश द्वादशीवार आणि लाटकर प्रकाशनचे आनंद लाटकर आदी या वेळी उपस्थित होते.
‘पत्रकारितेचे सामर्थ्य साहित्याला एका उंचीवर नेते, याचे उत्तम उदाहरण सुरेश द्वादशीवार हे आहेत. सध्याच्या पत्रकारितेला साहित्याचा फारसा वारसा नाही. त्यांच्या लेखनात लालित्य नसल्याने बातम्या रूक्ष वाटतात. द्वादशीवार साहित्य व पत्रकारिता यांची सांगड घालणारे लेखक असून, ते उत्तम पत्रकार असताना एक उत्तम साहित्यिक कसे बनले हे एक कोडेच आहे,’ असे काळे म्हणाले. ‘तांदळा’ या कादंबरीविषयी बोलताना काळे म्हणाले, की ‘तांदळा’ ही मुखवटे धारण करणाऱ्या एका स्रीची कथा आहे. मुखवटे किती क्लेशदायक असतात आणि क्रौर्य हे मुखवट्यांशी कसे जोडले गेले आहे हे आपल्याला ही कादंबरी वाचताना लक्षात येते.’ ‘हाकुमी’ आणि ‘अलकनंदा’ या कादंबऱ्यांविषयीही त्यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
‘तिन्ही कादंबऱ्या सत्य कथेवर आधारित आहेत. आपल्या आत्मसाक्षाकारातून कोलमडलेल्या एका बाईला उभा करण्याचा प्रकार म्हणजे तांदळा ही कादंबरी आहे. हाकुमी हा आमच्या कुटुंबातील भाग आहे. समाजाला खोटं व गुळमिळीत किती सांगायचे, कधीतरी त्याच्या समोर आरसा धरला पाहिजे आणि समाजाला त्याचा खरा चेहरा दाखवला पाहिजे. सामाजिक संबंध म्हणजे भूमिकांचे, मुखवट्यांचे संबंध आहेत, ते माणसांचे एकमेकांशी असलेले संबंध नाहीत,’ अशी खंत द्वादशीवार यांनी व्यक्त केली. विनोद शिरसाट आणि संध्या टाकसाळे यांनी कादंबऱ्यांचे विवेचन केले. निहारिका मोकाशी यांनी सूत्रसंचालन केले आणि आभार मानले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

प्रसिद्धीपेक्षा कलासाधना महत्त्वाची

$
0
0

१. संगीत नाटक अकादमीचा मुख्य पुरस्कार मिळाल्याबद्दल अभिनंदन... ६० वर्षांहून अधिक कालावधी शास्त्रीय गायकीत व्यतीत केल्यानंतर या टप्प्यावर पुरस्कार मिळाला. काय भावना आहेत?
- आनंद आहेच; पण त्याआधी परमेश्वरानं मला कलेसाठी निवडलं, गायनाची साधना करता आली हा माझ्यासाठी मोठा पुरस्कार आहे. संगीतक्षेत्रात मी असणे माझ्यासाठी खूप काही आहे. गाण्याची इच्छा असूनही अनेकांना गायन शिकण्याची संधी मिळत नाही. आदर्श गुरूचा सहवासही लाभत नाही. अशात मला गंगाधर पिंपळखरे, मोगूबाई कुर्डीकर, किशोरी अमोणकर, निवृत्तीबुवा सरनाईक, गजानन जोशी अशा दिग्गज गुरूंच्या सहवासात गानकलेला स्वतःला समर्पित करण्याची संधी मिळण्याबाबत मी देवाचे आभार मानते.

२. इतकी वर्षे या क्षेत्रात असला, तरी सत्तर वर्षांपूर्वी मुलगी म्हणून गायनक्षेत्रात येण्यासाठी संघर्ष करावा लागला का?
- माझे आजोळ कीर्तनकारांचे. त्यामुळे घरात गाणे होतेच. सामाजिक परिस्थितीचा संघर्ष असला, तरी घरातून आई-वडिलांचा पूर्ण पाठिंबा मिळाला. सामाजिक बंधनांची पर्वा न करता त्यांनी प्रोत्साहन दिले. इतकेच नाही, तर मैफलीलाही मोठ्या धाडसाने पाठवले. यामुळे माझ्या मनावर कोणतेही दडपण राहिले नाही आणि गाणे शिकायला मोकळे वातावरण लाभले. ‘मी तुझ्या लग्नाच्या मागे लागणार नाही. गाणे शिक. ओघाने लग्न होईलच; पण विद्या संपादन करण्याची हीच योग्य वेळ आहे,’ असा पाठिंबापूर्ण दिलासा वडिलांनी दिल्याने मी स्वतःला खूप नशीबवान समजते. प्रत्येक गोष्टीची योग्य वेळ असते आणि ती साधायलाच हवी, ही वडिलांकडून मिळालेली शिकवण मी खूणगाठ म्हणून मनाशी बांधली. शिष्यवृत्ती मिळवून मुंबईला गाणे शिकायला गेले आणि माझा संगीताचा खऱ्या अर्थाने प्रवास सुरू झाला.

३. नावाजलेल्या अनेक गुरूंकडून शिकताना स्वतःची अशी गानशैली निर्माण करणे अवघड गेले?
त्यांच्याकडून शिकताना प्रभाव ठेवला होता. गुरूंकडून शिकताना आपले विचार मनात आणायचे नाहीत, हे मनाशी पक्के बांधले होते. केवळ कान उघडे ठेवायचे. त्यांच्याच गाण्यात राहायचे आणि रियाजादरम्यान स्वतःला आजमावायचे. पं. भीमसेन जोशी, कुमार गंधर्व आणि आमीर खाँ साहेब यांच्याकडून भरपूर गायन ऐकले. ‘गुरूंसारखी गायकी’ असा शिक्कामोर्तब मला नको होता आणि गांभीर्याने केलेल्या रियाजाने मला हे साधता आले.

४. काणेबुवांकडून (आजोबा) कीर्तनाची मिळालेली पार्श्वभूमी. त्यानंतर मोठ्या गायक-गुरूंकडूनही गायन शिकलात. कलाकार हा नेहमी शिष्य असतो असे तुमच्या सांगीतिक प्रवासातून दिसते. आजकाल असे शिष्यत्त्व दिसत नाही. याबाबत काय निरीक्षण आहे?
- खरेच दिसत नाही. एकंदरितच गायनकलेविषयी भक्ती कमी झाली आहे. गानविद्या घेण्याची आणि ती कायम शिकत राहण्याची तळमळ, ध्यास मला नव्या पिढीमध्ये दिसत नाही. गुरू काय सांगतो, निस्सीम कलेला आपल्याकडून काय अपेक्षित आहे यापेक्षा प्रसिद्धी महत्त्वाची वाटू लागल्याचे हे लक्षण आहे. कला शिकताना स्वतःला गुरूच्या स्वाधीन करावे लागते, त्याच्यासमोर आपले अस्तित्त्व विसरावेच लागते. गाणे हा स्थायीभाव व्हावा लागतो. मला गाण्यातून काय मिळेल यापेक्षा गाणे शिकायला मिळतेय हेच महत्त्वाचे असे मनात बिंबवावे लागते. मग पैसा, मान, प्रसिद्धी ओघाने येतेच. खरे तर, कलेच्या ध्यासापुढे मला या गोष्टी दुय्यम वाटतात. जेव्हा स्वतःवर, गायकीवर विश्वास बसायला सुरुवात होते, तेव्हा संधी आपोआप मिळत जातात. गाण्यातून मिळणारा मानसिक आनंद, आत्मिक समाधान माझ्यासाठी मोठा आहे. प्रत्येक गुरूकडून शिकताना माझी स्वरसाधना वाढत होती. मी माईंकडे (मोगूबाई कुर्डीकर) गाणे शिकायला गेले तेव्हा त्यांनी नाट्यपदे सोडणार असशील, तर शिकवेन असे बजावले. मी त्याचक्षणी नाट्यपद गायन सोडले आणि त्याचे शिष्यत्त्व पत्करले. त्यावेळी नाट्यपदांमुळे मिळणाऱ्या प्रसिद्धीच्या मोहात अडकले असते, तर माई आणि किशोरीताईंच्या सानिध्यात मला येताच आले नसते.

५. गाण्याच्या रिअॅलिटी शोचे प्रमाण वाढले आहे. त्यातून लगेच प्रसिद्धी मिळते. त्या प्रसिद्धीच्या झोतात कलाकार म्हणून शिकणे राहून जाते. हे कलेचे सच्चे उपासक आहेत का?
- ही प्रसिद्धी क्षणभंगूर आहे हे त्यांच्या लक्षातच येत नाही. अशा शोंमधून विद्यार्थ्यांचे भले नक्कीच होणार नाही. मान-सन्मान मिळवणे आपल्याच हातात असते. मात्र, त्यासाठी सतत शिष्याच्या भूमिकेत असावे लागते. एकदा का प्रसिद्धी मिळू लागली, की शिक्षण थांबते. मीही वयाच्या तेराव्या वर्षापासून छोटेखानी मैफली करत होते; पण प्रसिद्धीसाठी नाही, तर अनुभवासाठी. हेच अनुभव कलाकार म्हणून अंगी मुरतात. एक किस्सा येथे सांगावासा वाटतो. पुण्यात बालगंधर्व रंगमंदिराचा उद्घाटनाचा कार्यक्रम होता. त्यावेळी मी १७ वर्षांची होते. या कार्यक्रमाला पं. भीमसेन जोशी, माणिक वर्मा, वसंतराव देशपांडे, पु. ल. देशपांडे असे दिग्गज उपस्थित होते. माझ्या दोन्ही दिवसाच्या गाण्याला वन्स मोअर मिळाला. पु.लंही माझे भरपूर कौतुक केले. यामुळे माझ्या नावाची चर्चा वर्तुळात वाढली; पण याचे मी भांडवल केले नाही, की या कौतुकाने भारावून गेले नाही. स्वतःला जमिनीवर ठेवून कलेची उपासना नवखी असल्यासारखी सुरू ठेवली. मला इतकी वर्षं या क्षेत्रात झाली. गाणे किती येते हे माहीत नाही; पण गाणे कसे असावे, गुरू कसा असावा एवढे मात्र कळाले.

६. इतक्या वर्षांत सिनेमासाठी गाण्याची इच्छा नाही झाली?
- या माध्यमाचा मोह कधीच वाटला नाही.

७. तुमचं घर नेहमी शिष्यांनी भरलेले असते. त्यांच्याकडून काय मिळते?
-निव्वळ आनंद. माझ्या घरात गायनाचे जणू अग्निहोत्रच सुरू आहे. चोवीस तास गायनात राहण्याचे आत्मिक समाधान काय वर्णावे?

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पावणेदोन महिने पारा ३८ अंशांपुढे

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

गुलाबी थंडीने फेब्रुवारी अखेरीस पुणेकरांचा निरोप घेतल्यानंतर मार्च महिन्यातच यंदा तापमानाच्या पाऱ्याने चाळीशी गाठली. गेल्या दहा वर्षांत पुण्यात पहिल्यांदाच मार्चमध्ये दोन दिवस चाळीस अंश सेल्सिअस तापमान पुणेकरांनी अनुभवले. एवढेच नव्हे, तर गेल्या तीन महिन्यांत तब्बल ४४ दिवस पारा ३८ अंश सेल्सिअसच्या पुढे रेंगाळलेला होता. तर, १२ दिवस पाऱ्याने चाळीशी ओलांडली.

गेल्या वर्षी पाऊस समाधानकारक झाल्यामुळे हिवाळ्याचा हंगाम पुणेकरांसाठी आल्हाददायक ठरला. मार्चच्या साधारणतः दुसऱ्या आठवड्यापासून सुरू झालेल्या उकाड्याने यंदाचा उन्हाळा पुणेकरांना त्रस्त करणार असल्याचे संकेत दिले होते. गेल्या पाच वर्षांपासून शहरातील मार्च महिन्यातील उष्णतेचे प्रमाण वाढत आहे. तीन वर्षांपूर्वी मार्चमध्ये ३८ अंश सेल्सिअस हे सर्वाधिक तापमान नोंदविण्यात आले होते. गेल्या वर्षी ३९.१ अंश सेल्सिअस, तर यंदा मार्चच्या शेवटच्या आठवड्यात दोन दिवस ४०.१ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. साधारणतः आठ दिवस पारा ३८ अंशाच्या पुढे होता.

एप्रिल महिना मात्र गेल्या वर्षाच्या तुलनेत काही प्रमाणात कमी त्रासदायक ठरला. गेल्या वर्षी या महिन्यात २४ दिवस तापमान चाळीशीपर्यंत पोहोचले होते. या वेळी सहा दिवस ४० अंश सेल्सिअसच्या पुढे तापमान नोंदवले गेले आणि अठरा दिवस शहरात ३८ अंश सेल्सिअसपेक्षा जास्त तापमान होते. दुसऱ्या आठवड्यात १२ ते १७ एप्रिलदरम्यान सलग ४०पेक्षा जास्त तामपान नोंदविण्यात आले. सकाळपासून उन्हाच्या झळांमुळे चटके बसत होते. रात्रीदेखील हवेमध्ये गारवा अनुभवायला मिळाला नाही. कमाल आणि किमान तापमानात वाढ झाल्यामुळे अनेकांना उष्माघाताचा त्रास झाला. राज्यात दर वर्षी मार्चच्या अखेरीस एक वळवाचा पाऊस येतो. यंदाही राज्यात पावसाने हजेरी लावली मात्र, पुण्यात पाऊस पडला नाही.

मे महिन्यात उकाड्याने उच्चांक गाठला. शहरात सतरा दिवस ३८ अंश सेल्सिअसपेक्षा जास्त तापमानाची नोंद झाली. तसेच, चार दिवस तापमानाने चाळीशी ओलांडल्याने नागरिकांचे उकाड्याने हाल झाले. याच काळात किमान तापमानही वाढले होते. ऊन्हाने तापलेल्या शहराला थंड करण्यासाठी लवकरात लवकर पावसाळा सुरू झाला पाहिजे, याची नागरिक वाट बघत होते. तिसऱ्या आठवड्यात वादळी वाऱ्यासह वळवाच्या पावसाने सलग दोन दिवस हजेरी लावल्याने नागरिक सुखावले. पण, पुन्हा तापमानाचा पार घसरण्याऐवजी दोन आठवडे चाळीशीच्या दिशेने सरकरला. गेल्या दोन दिवसांत मात्र उन्हाच्या तीव्रतेत उल्लेखनीय प्रमाणात घट झाली आहे. दोन दिवसांपूर्वी मान्सून केरळमध्ये दाखल झाला असून मान्सूनपूर्व पावसाने कोकणात हजेरी लावली आहे. त्यामुळे पुणेकर आता मान्सूच्या आगमनाची आतूरतेने वाट बघत आहेत.

वर्ष महिना ३९ अंश सेल्सिअस तापमानाचे दिवस ४० अंश सेल्सिअसपेक्षा जास्त तापमान दिवस

२०१५ मार्च ० ०

एप्रिल ५ १

मे २ ६

२०१६ मार्च ३ ०

एप्रिल ११ ११

मे ३ ५

२०१७ मार्च ३ २

एप्रिल ६ ६

मे १० ४

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बारा वर्षांच्या मुलीला पळवून नेण्याचा प्रयत्न

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

पर्वती परिसरात एका बारा वर्षांच्या मुलीच्या अपहरणाचा प्रयत्न नागरिकांच्या सतर्कतेमुळे फसला. अपहरणाचा प्रयत्न करणाऱ्या महिलेला पळून जाताना नागरिकांनी पाठलाग करून पकडले असून तिला दत्तवाडी पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. ही महिला बुधवार पेठेत राहणारी असून ती मूळची पश्मिच बंगालची असल्याचे सांगत आहे.

शहरात मुलांना पळवून नेणारे मोठे रॅकेट सक्रिय असल्याची चर्चा सुरू असतानाच मंगळवारी सांयकाळी ही घटना घडली. त्यामुळे खळबळ उडाली आहे. तारादेवी तमांग (वय ३०, रा. बुधवार पेठ, मूळ-पश्मिच बंगाल) असे अटक केलेल्या महिलेचे नाव आहे. या प्रकरणी मुलीच्या आईने तक्रार दिली असून त्यानुसार महिलेवर अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पर्वती परिसरात मंगळवारी सायंकाळी तक्रारदार यांची बारा वर्षांची मुलगी किराणा दुकानातून साहित्य घेऊन येण्यासाठी गेली होती. त्याचवेळी तारादेवी हिने तिला चॉकलेट दाखवून जवळ बोलविले. मुलगी जवळ येताच, तिच्या हाताला धरून ओढत घेऊन जाऊ लागली. मुलीने मोठमोठ्याने रडत आरडा-ओरडा केला. त्यामुळे येथील महिला तत्काळ तिच्याजवळ आल्या. त्यांनी मुलीला विचारले. तोपर्यंत तारादेवी तेथून पसार झाली. मात्र, परिसरातील तरुणांनी तिचा पाठलाग करुन तिला पकडले. तोपर्यंत परिसरात मोठ्या प्रमाणात गोंधळ सुरू झाला. त्यामुळे मुलीची आई बाहेर आली. त्यांनी गर्दी जमलेल्या ठिकाणी जाऊन पाहिले. त्या वेळी त्यांची मुलगी रडत असल्याचे दिसले. त्यांनी मुलीला काय झाले, अशी विचारणा केली. तिने घडलेला प्रकार सांगितले.

ताराचंद तमांग हिला येथील महिलांनी चोप दिला. दत्तवाडी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक अनिल पाटील यांना माहिती मिळाल्यानंतर त्यांनी तत्काळ उपनिरीक्षक दत्ताजीराव मोहिते व महिला कर्मचाऱ्यांना घटनास्थळी पाठवून तारादेवी हिला ताब्यात घेण्यास सांगितले. या प्रकरणी तिच्यावर अपहरणाचा गुन्हा दाखल करून अटक केली. दरम्यान, तिच्याकडे चौकशी केल्यानंतर ती मुळची पश्चिम बंगालची असून पुण्यात बुधवार पेठेत राहत असल्याचे निष्पन्न झाले आहे, असे पोलिसांनी सांगितले. दरम्यान, ती मुलीला कशासाठी पळवून नेत होती याचा उलगडा अद्याप झालेला नाही.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ग्रेड सेपरेटरना मंजुरी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पिंपरी

नाशिक फाटा ते वाकड ‘बीआरटीएस’ रस्त्यावर जगताप डेअरी येथे दोन समांतर ग्रेड सेपरेटर (समतल विलगक) बांधण्यात येणार असून, त्यासाठीच्या २८ कोटी १५ लाख रुपयांच्या खर्चास पिंपरी-चिंचवड पालिकेच्या स्थायी समितीच्या बैठकीत बुधवारी मंजुरी देण्यात आली. हे काम पुढील दोन वर्षांत पूर्ण करण्याची अट घालण्यात आली आहे.

पालिकेमार्फत नाशिक फाटा ते वाकड बीआरटीएस रस्त्यावर जगताप डेअरी येथील साई चौकात दोन समांतर ग्रेड सेपरेटर बांधण्यात येणार आहेत. या कामासाठी २१ कोटी ४७ लाख ८७ हजार रुपये मूळ खर्च आणि सहा कोटी ८८ लाख ९१ हजार रुपये रॉयल्टी आणि युटिलिटी खर्च असा एकूण २८ कोटी ३६ लाख ७८ हजार रुपये खर्च अपेक्षित आहे. निविदा प्रक्रियेत चार ठेकेदारांनी भाग घेतला. त्यापैकी व्ही. एम. मातेरे कन्स्ट्रक्शन यांच्या लघुत्तम दराची निविदा स्वीकारण्यास आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी १८ मे रोजी मान्यता दिली. त्यानुसार, मातेरे यांच्यासमवेत करारनामा करून घेण्याचा प्रस्ताव स्थायी समितीच्या बैठकीत सर्वानुमते मंजूर करण्यात आला, अशी माहिती अध्यक्षा सीमा सावळे यांनी दिली.

आरोग्य विभागासाठी ४.५ घनमीटर क्षमतेचे बीन्स कंटेनर खरेदी करण्यास बैठकीत मंजुरी देण्यात आली. त्यासाठी एक कोटी ७१ लाख रुपये मंजूर करण्यात आले. प्राप्त निविदाधारकांपैकी निर्मिती इंजिनीअरिंग कॉर्पोरेशन आणि रेखा इंजिनीअरिंग वर्क्स यांचे ४.५ घनमीटर क्षमतेच्या बीन्स कंटेनरसाठी प्रतिनग ७४ हजार ६७७ रुपये असे समान लघुत्तम दर प्राप्त झाले आहेत. एकूण २३० नग बीन्स कंटेनर खरेदी करण्यात येईल, असे सावळे यांनी सांगितले.

पालिका कर्मचाऱ्यांना नवीन गणवेश

महापालिका कर्मचाऱ्यांना नवीन गणवेश देण्यात येणार आहेत. पालिका कर्मचारी महासंघाच्या मागणीनुसार, विविध विभागांतील कर्मचाऱ्यांना गणवेशासाठी बारा प्रकारचे कापड खरेदी केले जाणार आहे. त्यासाठी एक कोटी रुपये खर्च होणार असून या प्रस्तावास सर्वानुमते मंजुरी देण्यात आली. महासंघाची मागणी विचारात घेता महालक्ष्मी ड्रेसेस यांच्यासमवेत पुनर्प्रत्ययी आदेशानुसार करारनामा करण्यास समितीने मान्यता दिली. या सर्व प्रस्तावांसह बैठकीत सुमारे ३५ कोटी ६० लाख रुपयांच्या खर्चाच्या कामांना मंजुरी देण्यात आली.

‘प्रकल्पाची निविदा पुन्हा काढा’

महापालिकेतर्फे पुणे-मुंबई महामार्गावर निगडी येथील भक्ती-शक्ती चौकात ग्रेड सेपरेटर आणि उड्डाणपूल उभारण्यात येणार आहे. या प्रस्तावाला नुकतीच मंजुरी देण्यात आली आहे. स्पाइन रस्त्याला समांतर ग्रेड सेपरेटर उभारण्यात येणार आहे. परंतु, सदरचा रस्ता पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाच्या हद्दीतून जातो. प्राधिकरण बाधित घरांना पालिकेतर्फे सुखसुविधा पुरविल्या जात आहेत. त्याचा अतिरिक्त खर्च महापालिकेच्या तिजोरीवर पडतो. आता नवीन होणाऱ्या उड्डाणपूल आणि ग्रेड सेपरेटरचा खर्चही राज्य शासनाच्या ताब्यातील रस्त्यावर महापालिकाच करणार आहे. मुळात प्राधिकरण हद्दीतून जाणाऱ्या ग्रेड सेपरेटरचा खर्च केवळ महापालिकेने न करता पालिका आणि प्राधिकरण यांनी संयुक्तरीत्या करावा. त्यामुळे पालिकेवरील खर्चाचा बोजा कमी होईल. ही बाब लक्षात घेऊन भक्ती-शक्ती चौकातील प्रकल्पाची निविदा पुन्हा काढावी, अशी मागणी ज्येष्ठ नगरसेवक भाऊसाहेब भोईर यांनी केली आहे.

दोषींवर कारवाईचे आश्वासन

गॅस शवदाहिनी भ्रष्टाचार प्रकरणाच्या अहवालाची योग्य पद्धतीने चौकशी केल्यानंतर दोषींवर प्रशासकीय त्याच्यावर विहित पद्धतीने चौकशी केली जाणार आहे. त्यानंतर चौकशीत दोषी आढळणाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल, असे आश्वासन आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी सांगितले. शहरातील पाच ठिकाणच्या स्मशानभूमीत गॅस शवदाहिन्या बसविण्यात आल्या होत्या. त्यासाठी दहा कोटी रुपये खर्च झाला. या कामात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप त्या वेळी विरोधी पक्षात असलेल्या भारतीय जनता पक्षाच्या नगरसेविकांनी केला होता. त्यानंतर चौकशीसाठी त्रिसदस्यीय समिती नियुक्त करण्यात आली. त्यांनी याबाबतचा अहवाल स्थायी समितीसमोर ठेवला. त्यावर आयुक्तांनी पुन्हा एकदा अभ्यास करून निर्णय घेणार असल्याचे स्पष्ट केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


‘झेडपी’तील शिक्षकांच्या ९२५ रिक्त जागा भरणार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागातील उपशिक्षक पदांची बिंदुनामावली पूर्ण झाली असून त्यामुळे शिक्षण विभागातील रिक्त असलेल्या ९२५ शिक्षकांच्या जागा भरण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. २०१०मध्ये झालेल्या डीएड सीईटीमध्ये शिफारस पात्र ठरलेले उमेदवार, जिल्हाबदली शिक्षकांचा ९२५ पदांमध्ये समावेश आहे. पदोन्नतीने रिक्त पदे तत्काळ भरण्यात येणार आहेत.

जिल्हा परिषदेच्या शिक्षण व अर्थ समितीचे सभापती आणि उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील यांनी ही माहिती दिली. जिल्ह्यांमध्ये ११ हजार ८८१ शिक्षकांच्या जागा मंजूर आहेत. मात्र, सध्या १० हजार ९५६ शिक्षक सेवेत कार्यरत आहेत. सुमारे ९२५ शिक्षकांच्या जागा आजमितीला रिक्त आहेत. शिक्षकांच्या जागा रिक्त असल्याने शाळेवर शिक्षकांची अनुपस्थिती, अनेक विषय शिकविण्याची जबाबदारी एकाच शिक्षकावर यायची. त्यामुळे कामाचा शिक्षकांवर ताण होता. विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळण्यात अडथळे येत होते. त्यामुळे रिक्त जागा भरण्याची मागणी वारंवार होत होती.

बिंदुनामावली पूर्ण होत नाही, तोपर्यंत रिक्त जागा भरण्यात येऊ नये, असे आदेश सरकारने जारी केले होते. सरकारच्या आदेशानुसार जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाचे रोस्टर तयार करण्याचे काम २०१४पासून सुरू झाले होते. २ जुलै १९९७पासून कार्यरत असलेल्या सर्व उपशिक्षकांची बिंदुनामावली पूर्ण करण्यासाठी जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाला तीन वर्षांचा कालावधी लागला. जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील यांनी रोस्टर पूर्ण झाली असल्याची घोषणा बुधवारी केली. बिंदुनामावलीप्रमाणे शिक्षकांच्या ९२५ रिक्त जागा आहे. तसेच, आरक्षणानुसार खुल्या जागेतील शिक्षकांची संख्या २४२ने अतिरिक्त झालेली आहे. ही पदे पुढे सेवानिवृत्त होणाऱ्या उपशिक्षकांच्या बिंदुनुसार समायोजित करण्यात येणार आहे.

पुणे जिल्ह्यात बदली करण्यासाठी १ हजार २३ जणांनी अर्ज केला आहे. बिंदुनामावलीमुळे इतर जिल्ह्यातील अनेक शिक्षकांची रिक्त जागी वर्णी लागण्याची शक्यता आहे. रिक्त पदांमधील शिक्षकांची पदे भरणार असल्याने ताण कमी होणार आहे.

विवेक वळसे पाटील, उपाध्यक्ष, सभापती अर्थ व शिक्षण विभाग

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘एमपीएससी’कडून मानधनात वाढ

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

पुणे जिल्ह्यात स्पर्धा परीक्षांसाठी बसणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या लक्षात घेऊन महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (एमपीएससी) मनुष्यबळ आणि त्यांचे मानधन वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार आता पाच हजार उमेदवारांमागे दोन कर्मचारी आणि तीन उपकेंद्रांसाठी एक समन्वय अधिकारी नेमण्यात येणार आहेत. शाळा आणि महाविद्यालयांनी केंद्र उपब्लध करून द्यावे, यासाठी आता त्यांना प्रत्येक उमेदवारामागे पाच रुपयांऐवजी आठ रुपये; तसेच परीक्षेसाठी पर्यवेक्षक म्हणून काम करणाऱ्यांच्याही मानधनात वाढ झाली आहे.

‘एमपीएससी’ने १२ मे रोजी याबाबतचा निर्णय घेतला असून, याबाबतचे पत्र जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठविले आहे. विविध स्पर्धा परीक्षा घेताना केंद्र उपलब्ध न होणे आणि रविवारच्या दिवशी या परीक्षा घेण्यात येत असल्याने मनुष्यबळ उपलब्ध न होणे, या प्रमुख अडचणी येत होत्या. त्याबाबतची माहिती जिल्हाधिकारी सौरभ राव यांनी ‘एमपीएससी’ला कळविली होती. त्यानुसार ‘एमपीएससी’ने मनुष्यबळ वाढविणे, अधिकारी-कर्मचारी आणि शाळा-महाविद्यालयांचे मानधन वाढविण्याचा निर्णय घेतला आहे.

पुणे जिल्ह्यामध्ये ‘एमपीएससी’बरोबरच, केंद्रीय लोकसेवा आयोग (यूपीएससी), कर्मचारी चयन आयोग आणि अन्य स्पर्धा परीक्षा घेण्यात येतात. त्यासाठी स्वतंत्र परीक्षा विभाग नाही. या परीक्षांचे नियोजन जिल्हाधिकारी कार्यालयाअंतर्गत असलेल्या महसूल शाखेमार्फत करण्यात येते. सध्या हे काम करण्यासाठी निवासी उपजिल्हाधिकारी, महसूल विभागाचे तहसीलदार, सर्वसाधारण विभागाचे तहसीलदार, पाच कारकून, १५ लिपिक आणि सहा शिपाई यांच्यामार्फत केले जाते.

याबाबत निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र मुठे म्हणाले, ‘यापुढे घेण्यात येणाऱ्या स्पर्धा परीक्षांसाठी वाढीव मनुष्यवाढ मिळणार आहे. पाच हजार उमेदवारांमागे दोन कर्मचारी उपलब्ध होणार आहेत. पाच हजारांपेक्षा जास्त उमेदवार असतील, तर अतिरिक्त एक कर्मचारी मिळणार आहे. तीन उपकेंद्रांसाठी एक समन्वय अधिकारी नेमला जाणार आहे. विशेष निरीक्षक आणि एक भरारी पथकही असणार आहे.’


शाळा आणि महाविद्यालयांकडून केंद्र उपलब्ध करून देण्याबाबत नकारात्मक भूमिका असायची. त्यामुळे आता शाळा-महाविद्यालयांना प्रत्येक विद्यार्थ्यामागे आठ रुपये ​मिळणार आहेत. यापूर्वी पाच रुपये होते; तसेच पर्यवेक्षक आणि समावेक्षक यांच्या मानधनात वाढ झाली आहे.

- राजेंद्र मुठे, निवासी उपजिल्हाधिकारी


पद आणि मानधन रुपयांमध्ये (पूर्वीचे आणि आताचे)

निवासी उपजिल्हाधिकारी - १५०० - ४०००

तहसीलदार - १००० - २७००

लिपिक - ३०० - १५००

वाहनचालक ८००- ८००

शिपाई - २५० - १२००

पर्यवेक्षक - ३०० - ५००

समावेक्षक - २०० - ४००

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

उपविभागीय अधिकाऱ्यांना पाच हजारांचा दंड

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

जातीचा दाखला देण्यास विलंब लावल्याने सेवा हमी कायद्यानुसार उपविभागीय अधिकारी ज्योती कदम यांना पाच हजार रुपयांचा दंड करण्यात आला आहे. अतिरिक्त जिल्हाधिकारी रमेश काळे यांनी याबाबतचा आदेश दिला असून, या निर्णयाविरुद्ध कदम यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे अपील केले आहे.

कुणबी जातीचा दाखला मिळविण्यासाठी अमोल जाधव यांनी गेल्या वर्षी अर्ज केला होता. त्यामध्ये कागदपत्रे अपूर्ण असल्याचे सांगून कदम यांनी त्रुटी काढल्या होत्या. त्या त्रुटी दूर करण्यासाठी कागदपत्रांची पूर्तता करण्याच्या सूचना कदम यांनी जाधव यांना दिल्या होत्या; तसेच जाधव यांना तहसीलदार कार्यालयामधून चौकशी अहवाल आणण्यास सांगण्यात आले होते. मात्र, याबाबतची पूर्तता महसूल विभागाने करणे अत्यावश्यक होते. परिणामी जाधव यांना जातीचा दाखला देण्यास विलंब लागला. त्यामुळे त्यांचे नुकसान झाल्याने त्यांनी याबाबत अतिरिक्त जिल्हाधिकारी काळे यांच्याकडे तक्रार केली होती.

त्या तक्रारीवर सुनावणी झाली. जाधव यांच्या तक्रारीमध्ये तथ्य असल्याचे आढळून आले. त्यानंतर काळे यांनी कदम यांना सेवा हमी कायद्याअंतर्गत दंड केल्याचे ​जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले.

जाधव यांनी सेवा हमी कायद्याअंतर्गत तक्रार केली होती. त्यांना २१ दिवसांत जातीचा दाखला देणे अत्यावश्यक होते. या प्रकरणी सुनावणी घेतली असता, तक्रारीमध्ये तथ्य आढळून आले. त्यानंतर कदम यांच्याविरुद्ध सेवा हमी कायद्यातील तरतुदींनुसार कारवाई करण्यात आली आहे. कदम यांनी या प्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांकडे अपील केले आहे.

- रमेश काळे,

अतिरिक्त जिल्हाधिकारी


ई सेवा केंद्रांच्या कंत्राटदाराचे कंत्राट रद्द

ई सेवा केंद्र आणि सेतू केंद्र यासाठी नेमण्यात आलेल्या ‘गुजरात इन्फोटेक’ या कंत्राटदाराच्या कामकाजामध्ये अनियमितता आढळल्याने त्याचे कंत्राट रद्द करण्यात आले आहे. जिल्ह्यातील ई सेवा केंद्र आणि सेतू केंद्रांसाठी सध्या दोन कंत्राटदार आहेत. त्यांची पाहणी ​अधिकाऱ्यांकडून करण्यात आली. त्यामध्ये या कंत्राटदाराकडे असलेल्या केंद्रांमध्ये गैरप्रकार आढळून आले. नवीन कंत्राटदार नेमण्याची प्रक्रिया सुरू झाली असून, तोपर्यंत ‘गुजरात इन्फोटेक’कडून काम करवून घेतले जाणार असल्याचे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महापालिकेच्या शिष्यवृत्तीचेअखेर विद्यार्थ्यांना वाटप

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
दहावी आणि बारावीच्या परीक्षेमध्ये उल्लेखनीय यश मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांना महापालिकेतर्फे देण्यात येणाऱ्या लोकशाहीर अण्णा भाऊ साठे आणि मौलाना अबुल कलाम आझाद शिष्यवृत्तीचे वाटप अखेर मंगळवारी करण्यात आले. महापौर मुक्ता टिळक यांच्या हस्ते प्रातिनिधीक स्वरूपात काही विद्यार्थ्यांना मंगळवारी धनादेश देण्यात आले आहेत. तर, उर्वरित सर्व विद्यार्थ्यांना आज, बुधवारपासून संबंधित क्षेत्रीय कार्यालयात सकाळी ११ ते दुपारी दोन या वेळेत धनादेश मिळतील, असे पालिकेने जाहीर केले आहे.
दहावी-बारावीच्या परीक्षेमध्ये ८० टक्क्यांहून अधिक गुण प्राप्त करणाऱ्या विद्यार्थ्यांना अनुक्रमे १५ हजार आणि २५ हजार रुपयांची शिष्यवृत्ती दिली जाते. २००८-०९ पासून ही योजना सुरू असून, गेल्यावर्षी अर्ज दाखल केलेल्या विद्यार्थ्यांना अद्याप शिष्यवृत्ती मिळाली नव्हती. ही शिष्यवृत्ती त्वरेने देण्याची मागणी सातत्याने केली जात होती. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाने (आरपीआय) मंगळवारीच त्या संदर्भात आंदोलन करत आयुक्तांना निवेदन दिले होते. महापालिकेच्या समाजकल्याण विभागाने अखेर ही प्रक्रिया पूर्ण केली असून, बुधवारी महापौर मुक्ता टिळक यांच्या हस्ते प्रातिनिधीक स्वरूपात पाच विद्यार्थ्यांना चेक वाटप करण्यात आले.
ही शिष्यवृत्ती प्राप्त करण्यासाठी यंदा पालिकेकडे १६ हजार अर्ज दाखल झाले होते. त्यापैकी, ११ हजार विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती दिली जाणार आहे. क्षेत्रीय कार्यालयांमध्ये सकाळी ११ ते २ या वेळात विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचे चेक मिळणार आहेत, असे महापौर टिळक यांनी स्पष्ट केले. चेक प्राप्त करण्यासाठी विद्यार्थ्यांनी ओळखपत्र आणि एक रुपयाचा रेव्हेन्यू स्टँप सोबत नेणे आवश्यक आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘बालचित्रवाणी’ऐवजी आता ‘ई-बालभारती’

$
0
0

नव्या संस्थेच्या स्थापनेचा सरकारचा निर्णय
म. टा. प्रतिनिधी, पुणे
लहान मुलांकरिता दृकश्राव्य शैक्षणिक कार्यक्रम बनविण्यासाठी गेली साडेतीन दशके कार्यरत असलेली राज्य शैक्षणिक तंत्रज्ञान संस्था अर्थात बालचित्रवाणी अखेर बंद करण्याचा निर्णय राज्य सरकारकडून बुधवारी घेण्यात आला. बालचित्रवाणीला स्वत:च्या उत्पन्नाचा स्रोत नाही, आणि केंद्र सरकारचे अनुदान मिळत नसल्याने बालचित्रवाणीचा दैनंदिन खर्च भागविणे आणि कर्मचाऱ्यांचे वेतन देणे जमत नसल्याचे कारण पुढे करून सरकारने हा निर्णय घेतला. बालचित्रवाणीच्या ऐवजी आता ‘ई-बालभारती’ या नवीन संस्थेची स्थापना करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
बालचित्रवाणीच्या नियामक मंडळाच्या बैठकीत बालचित्रवाणी संस्था बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार त्याबाबतचा आदेश शिक्षण विभागाने बुधवारी काढला. बालचित्रवाणीच्या कर्मचाऱ्यांना एक महिन्याची नोटीस देऊन कामावरून कमी करण्यात आल्याने ३२ कर्मचारी उघड्यावर आले आहेत. शैक्षणिक कार्यक्रमांच्या निर्मितीसाठी सरकारने २७ जानेवारी १९८४ ला बालचित्रवाणीची स्थापना केली. बालचित्रवाणीकडून आतापर्यंत सहा हजार दृकश्राव्य शैक्षणिक कार्यक्रमांची निर्मिती करण्यात आली. दूरदर्शनवर दररोज बालचित्रवाणीचे कार्यक्रम दाखविण्यात येत होते. अतिशय कमी कालावधीत बालचित्रवाणी घराघरात पोहोचली होती. पुण्यामध्ये राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाजवळ बालचित्रवाणीचे प्रशस्त कार्यालय आहे. बालचित्रवाणीची सर्व स्थावर, जंगम मालमत्ता संस्थेच्या रेकॉर्डसह ‘बालभारती’ संस्थेकडे वर्ग करण्यात येणार आहे. याठिकाणी लवकरच ‘ई-बालभारती’ची स्थापना करण्यात येणार आहे.
बालचित्रवाणी संस्थेमार्फत दूरदर्शनवरून २०१२ सालापर्यत कालावधीमध्ये नि:शुल्क कार्यक्रम प्रक्षेपित केले गेले. मात्र, दूरदर्शनने हे कार्यक्रम दाखविण्यासाठी प्रक्षेपण शुल्क आकारल्यामुळे फेब्रुवारी २०१४पासून प्रक्षेपण बंद करण्यात आले आहे. संस्थेला केंद्र सरकारकडूनकडून मिळणारे अनुदानही एप्रिल २००३ नंतर बंद झाले आहे. त्यामुळे ही संस्था आर्थिक अडचणीत सापडली होती. बालचित्रवाणी संस्थेतील कर्मचाऱ्यांचे वेतन तसेच इतर खर्च बालभारती संस्थेकडून उसनवारी करून अदा केली जात होती. बालचित्रवाणीत काम करणारे निर्मिती सहायक, कॅमेरामन, संकलक, वेशभूषाकार, तंत्रज्ञ आदींचे पगार एप्रिल २०१४ पासून थांबविण्यात आले होते. ‘कर्मचाऱ्यांना वेतन देऊन बालचित्रवाणी बंद होऊ देणार नाही,’ अशी भीमगर्जना शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी केली होती. त्यामुळे बालचित्रवाणीला उर्जितावस्था मिळेल अशी चिन्हे होती. या संस्थेत कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांना औद्योगिक कलह कायदा १९४७नुसार एक महिन्याची आगाऊ ‘नोटीस पे’ देऊन बुधवारी सेवामुक्त करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. दरम्यान, ‘ई-बालभारती’मध्ये या कर्मचाऱ्यांना शैक्षणिक पात्रतेनुसार घेण्यासाठी वयाची अट डावलून प्राधान्य देण्याच्या सूचना दिल्या आहेत. ‘ई-बालभारती’ कशी असेल, याचा अभ्यास करून अहवाल तयार करण्यात येत असल्याची माहिती बालभारतीचे संचालक सुनील मगर यांनी दिली.
--------------
कर्मचाऱ्यांनी घेतली शिक्षण आयुक्तांची भेट
‘आमची नियुक्ती सरकारी कर्मचारी म्हणून झाली आहे. त्यामुळे आम्हाला अशा प्रकारे सेवेतून काढता येत शकत नाही.बालचित्रवाणीमध्ये बुधवारी सायंकाळी झालेल्या बैठकीत प्रशासकीय अधिकाऱ्यांनी गुरुवारी दुपारी १२ वाजेपर्यत सर्व प्रकारचे आर्थिक लाभ बँकेच्या खात्यात जमा होणार असल्याचे सांगितले. असे असले तरी बावचित्रवाणीतील काही कर्मचारी गुरुवारी शिक्षण आयुक्तांची भेट घेऊन त्यांना वस्तुस्थिती सांगणार आहे,’ असे कर्मचाऱ्यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

इंदापूरजवळ अपघातात दोन ठार; नऊ जखमी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे/ बारामती
पुणे-सोलापूर महामार्गावर इंदापूरजवळील कोंडकुलवाडी येथे उभी असलेली मिनी बस आणि मृतदेह घेऊन जाणारी रुग्णवाहिका यांना पाठीमागून येणाऱ्या भरधाव ट्रकने बुधवारी सकाळी नऊच्या सुमारास जोरात धडक दिली. यामध्ये दोघांचा मृत्यू झाला असून नऊ जण जखमी आहेत. या प्रकरणी इंदापूर पोलिस ठाण्यात ट्रकचालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रियाज माणिक सुतार (वय २७, रा. नवी मुंबई), कल्पना अब्दुल सुतार (वय ५४, रा. शिवडी, मुंबई) अशी मृत्यू झालेल्यांची नावे आहेत. नऊ जण जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबईतील रतन सुतार यांच्या मुलाचा मृत्यू झाला होता. त्यांच्या मूळगावी अंत्यसंस्कार करण्यासाठी मुलाचा मृतदेह रुग्णवाहिकेतून घेऊन मंगळवेढा येथे ते निघाले होते. इतर कुटुंबीय मिनीबसमध्ये होते. इंदापूरजवळ आल्यावर रुग्णवाहिका आणि मिनी बस रस्त्याच्या कडेला उभी होती. त्या वेळी पाठीमागून भरधाव येणाऱ्या ट्रकने बसला जोराची धडक दिली. त्यामुळे बस रुग्णवाहिकेला धडकली. त्यामुळे रुग्णवाहिका उलटली. मिनी बसमधील एक आणि रुग्णवाहिकेतील एक अशा दोघांचा जागीच मृत्यू झाला. तर, बसमधील नऊ जण जखमी झाले.
अपघाताची माहिती मिळताच इंदापूर पोलिस व स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमींना बसमधून बाहेर काढून उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. जखमीवर इंदापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणी पोलिसांनी ट्रकचालक इमाम शेख अब्दुल रहीम (वय ५८, रा. बिदर) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी पोलिस हवालदार वाघमारे अधिक तपास करत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बेकायदा खाद्यविक्रेत्यांवर कारवाईचा बडगा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
रमजान महिन्याच्या पार्श्वभूमीवर लष्कराच्या हद्दीत विविध सार्वजनिक रस्त्यांसह फूटपाथवर खाद्याचे स्टॉल उभारणाऱ्या विक्रेत्यांवर कारवाई करण्याचा बडगा पुणे कँटोन्मेंट बोर्डाच्या प्रशासनाने उचलला आहे. या संदर्भात लष्कराच्या पोलिसांनादेखील पत्र पाठवून त्यांनी कारवाई करण्याची विनंती केली आहे.
मुस्लिम बांधवाच्या पवित्र रमजान महिन्यास प्रारंभ झाला आहे. सहेरी आणि इफ्तारी करण्यासाठी विविध खाद्यपदार्थांची गरज असते. त्या करिता लष्कराच्या भागातील अनेक भागांत विविध शाकाहारी आणि मांसाहारी खाद्यपदार्थांचे स्टॉल उभारण्यात येतात. त्यामुळे शहरातील अनेक भागांतून स्टॉलवर खाण्यासाठी ग्राहकांची गर्दी होत असते. त्यामुळे त्या भागात वाहतूक कोंडी होत असते. त्यातून अनेक अनुचित प्रकार घडतात. त्या संदर्भात यंदाच्या वर्षी पुणे कँटोन्मेंट बोर्डाने कडक पावले उचलली आहेत.
‘दर वर्षी रमजान महिन्यात मुस्लिम बांधवासाठी खाद्यविक्रेत्यांकडून स्टॉल लावण्यात येतात. लष्करातील जान महंमद रस्ता, श्री छत्रपती शिवाजी मार्केट ब्लुडेंल रोड, हिदायतुल्ला रोड (आझम कॅम्पस), व्ही पी रस्ता (कुरेशी मस्जिद), ताबूत स्ट्रीट, साचापीर स्ट्रीट याशिवाय कँटोन्मेंटमधील अन्य ठिकाणीही खाद्यपदार्थ विक्रेत्यांकडून बेकायदा स्टॉल उभारण्यात येतात. त्यामुळे त्या ठिकाणी वाहतूक कोंडी होण्याची शक्यता अधिक असते. मुख्य चौकात अशा स्टॉलमुळे नागरिकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. त्यामुळे या वर्षी अशा बेकायदा खाद्यविक्रेत्यांना परवानगी न देण्याचा निर्णय घेतला आहे,’ अशी माहिती पुणे कँटोन्मेंट बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. डी. एन. यादव यांनी दिली.
चिकन, बोकड तसेच मोठ्या प्राण्यांचे मांसाहारी पदार्थ या ठिकाणी विक्रीस असतात. स्टॉलवर तयार करण्यात येणारे खाद्यपदार्थ किती खाण्यालायक आहेत, याबाबत साशंकता असते. त्यामुळे आरोग्याच्या दृष्टीने ते घातक आहे. यामुळे स्टॉलना परवानगी दिलेली नाही. अनेक स्टॉल विक्रेत्यांकडून घरगुती गॅसचा वापर केला जात आहे. त्यामुळेही रस्त्यावर अनुचित प्रकार होण्याची शक्यता नाकारता येत नाही. या संदर्भात लष्कर पोलिसांना निवेदन दिले असून बोर्डाचे आरोग्य निरीक्षक, तसेच महसूल अधिकाऱ्यांच्या मदतीने पोलिसांनी कारवाई करावी, अशी विनंती करण्यात आली आहे, असेही सांगण्यात आले आहे.

रमजान महिन्यासाठी लष्कर भागातील विविध ठिकाणी खाद्यांचे स्टॉल उभारण्यासाठी बोर्डाकडे परवानगी मागण्यात आली आहे. अनेकांनी अर्ज दाखल केले आहेत. सार्वजनिक रस्ते, फूटपाथवर खाद्यपदार्थांचे स्टॉल उभारण्यात येऊ नये अशी अपेक्षा आहे. चौका-चौकांमध्ये वाहतूक कोंडी होऊ नये तसेच गर्दी कमी व्हावी यादृष्टीने हा निर्णय घेतला आहे.
- डॉ. डी. एन. यादव, मुख्य कार्यकारी अधिकारी, पुणे कँटोन्मेंट बोर्ड

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


लघुपट महोत्सवांना नियमांची चौकट

$
0
0

पुणे : लघुपट महोत्सवाच्या नावाखाली लाखो रुपयांची कमाई करून लघुपट निर्मात्यांची फसवणूक करणाऱ्या संस्था आणि व्यक्तींना आळा घालण्यासाठी अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाने मोहीम हाती घेतली आहे. त्या अंतर्गत लघुपट महोत्सवाचे आयोजन करण्यापूर्वी महामंडळाची परवानगी घ्यावी, असे आवाहन केले जाणार आहे. शिवाय लघुपट निर्मात्यांनीही महामंडळाची परवानगी नसलेल्या महोत्सवांमध्ये सहभागी होऊ नये, अशा सूचनाही करण्यात येणार आहेत.
चित्रपट महामंडळाच्या येत्या संचालक मंडळाच्या बैठकीत लघुपट महोत्सवासंदर्भात हा निर्णय घेण्यात येणार आहे. लघुपट निर्मात्यांची फसवणूक होत असल्याच्या तक्रारी चित्रपट महामंडळाकडे गेल्या अनेक दिवसांपासून येत होत्या. त्या पार्श्वभूमीवर महामंडळ ही मोहीम हाती घेणार आहे. त्यामध्ये लघुपट महोत्सवाचे आयोजन कसे करावे, प्रवेश फी किती असावी, तसेच लघुपटांच्या निवडीसाठी नेमण्यात आलेले ज्युरी हे चित्रपट आणि लघुपट क्षेत्रातील तज्ज्ञ असावेत, अशा अनेक गोष्टी विचारात घेऊन एक नियमावली तयार करण्यात येणार आहे. त्यानुसार चित्रपट महोत्सवाचे आयोजन करावे, अशा सूचनाही आयोजक संस्थांना दिल्या जाणार आहेत.
सध्या शहरात आणि राज्यभरात अनेक लघुपट महोत्सव आयोजित केले जातात. अनेक महोत्सव हे गेल्या अनेक वर्षांपासून अखंडितपणे सुरू आहे. त्या महोत्सवांची माहिती महामंडळाकडे आहे. परंतु, ते वगळता छोट्या पातळीवर अनेक महोत्सव आयोजित केले जातात. आयोजकांचा हेतू केवळ पैसे कमावणे हाच असतो. एका लघुपटाच्या प्रवेशासाठी अनेकदा एक हजार रुपये आकारले जातात. बऱ्याचदा महोत्सवासाठी ३०० ते ५०० प्रवेश येतात. परंतु, त्यातील केवळ १० किंवा १५ चित्रपटांचे स्क्रीनिंग होते आणि त्यामधून विजेते काढले जातात. विजेत्यांना मिळणाऱ्या पारितोषिकांची रक्कमही अत्यंत तोकडी असते. लघुपट महोत्सवात सहभागी झालेले सर्व लघुपट ज्युरींना दाखवले जात नाहीत, अशा प्रकारच्या अनेक तक्रारी स्वतः ज्युरी सदस्यांनी महामंडळाकडे केल्या आहेत. त्यांच्या नावाचा केवळ वापर केला जातो, असे त्यांनी सांगितले आहे. हे सर्व प्रकार टाळण्यासाठी महामंडळाने नियमावली तयार करण्याचा निर्णय घेतला आहे. त्या माध्यमातून ज्युरी सदस्य, तसेच महोत्सवात सहभागी होणाऱ्या लघुपट निर्मात्यांना महामंडळाकडून आवाहन केले जाणार आहे.
यासंदर्भात चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले म्हणाले, ‘गेल्या काही दिवसांमध्ये लघुपट निर्मात्यांच्या अनेक तक्रारी महामंडळाकडे आल्या आहेत. लघुपट महोत्सवाच्या नावाखाली सर्रास पैसे उकळण्याचा प्रकार सुरू आहे. या प्रकारांना आळा घालण्याकरता आम्ही निर्मात्यांना आवाहन करणार आहोत. आमच्या परवानगीशिवाय महोत्सवात सहभागी होऊ नका, असेही त्यांना सांगण्यात येणार आहे. एखादी आयोजक संस्था महोत्सव आयोजित करण्यासाठी आली; तर संस्थेची पूर्ण पडताळणी करून त्यांचा हेतू लक्षात घेऊनच महोत्सवाला परवानगी देण्यात येईल.’

महामंडळ प्रशिक्षण देणार
लवकरच चित्रपट महामंडळ लघुपटांसाठी एक वेगळा विभाग तयार करणार असून त्या अंतर्गत लघुपटांमधील कलाकार, तंत्रज्ञ, लेखक, दिग्दर्शक, निर्माते यांना महामंडळाचे सभासदत्व देण्यात येणार आहे, असे मेघराज राजेभोसले यांनी सांगितले. लघुपटाशी संबंधित कलाकारांना सभासद करून घेतल्यानंतर कार्यशाळा, परिसंवाद या माध्यमातून या कलाकारांना प्रशिक्षण दिले जाणार आहे, याकडे त्यांनी लक्ष वेधले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

योग्याच्या साह्याने होऊ व्याधीमुक्त

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
‘महाराष्ट्र टाईम्स कल्चर क्लब’ आणि इन्स्टिट्यूट ऑफ योगा यांच्या वतीने विविध व्याधींवर आचार्या विदुला शेंडे योग कार्यशाळा घेणार आहेत. येत्या तीन आणि ११ जूनपासून या कार्यशाळा सुरू होत आहेत.
धावत्या जीवनशैलीमध्ये आपल्या व्यग्र दिनक्रमामध्ये अनेक व्याधी जडत असतात, परंतु त्या व्याधीची आपल्या शरीरामध्ये होणारी नित्य वाढ अत्यंत धोकादायक ठरू शकते. आधुनिक उपचार पद्धतीबरोबर जर आपण योगासारख्या पारंपरिक भारतीय जीवनशैलीचा प्रभावी आणि नेमका उपयोग केला, तर यावर आपण नक्कीच मात करू शकतो.
लठ्ठपणा नियंत्रण, त्याबरोबर येणारे मणक्यांचे आणि सांधेदुखी आजार, नैराश्य यावर कार्यशाळा (३ जून ते १० जून) (सकाळ आणि संध्याकाळचे वर्ग) आयोजित करण्यात आली आहे. तसेच कॉर्पोरेट योगा म्हणजेच कम्प्युटरवर आणि बैठे काम करणाऱ्या व्यक्ती यांच्यासाठी मान व खांदेदुखी, नैराश्य आणि तणाव, पाठीचे आजार, व्हेरिकोज व्हेन्स इत्यादी विकारांवर (११ जून ते २० जून) (सकाळ आणि संध्याकाळचे वर्ग ) योग कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे. या कार्यशाळेमध्ये व्याधी नियंत्रित करण्यासाठी उपयुक्त आसनांचे मार्गदर्शन आणि प्रशिक्षण प्रत्येक सहभागी व्यक्तींना योग तज्ज्ञांकडून दिले जाणार आहे. कार्यशाळेमध्ये सर्व वयाच्या स्त्री, पुरुषांना प्रवेश दिला जाणार आहे. व्याधींच्या अनुषंगाने येणाऱ्या सर्व वैद्यकीय तपासण्या यामध्ये समाविष्ट आहेत. सर्व कार्यशाळा संस्थेच्या नळ स्टॉप, कर्वे रोड येथील कार्यालयात होणार असून नावनोंदणीसाठी ३९६३१४३४/९८५०२२९७५९ वर संपर्क साधावा.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘लॉस्ट अँड फाउंड’वर बाराशे तक्रारी

$
0
0

मोबाइल, लायसेन्स आणि एटीएम हरविल्याचे प्रमाण सर्वाधिक

Shrikirishna.Kolhe@timesgroup.com
..............
@ShrikrishnaMT
पुणे : हरवलेल्या वस्तू, कागदपत्रांबाबत तक्रार देण्यासाठी पोलिसांनी सुरू केलेल्या ‘लॉस्ट अँड फाउंड’ उपक्रमाला नागरिकांकडून प्रचंड प्रतिसाद मिळाला आहे. गेल्या सात दिवसांमध्ये तब्बल साडेबाराशे नागरिकांनी त्यांच्या वस्तू हरवल्याची ऑनलाइन तक्रार केली आहे. यामध्ये प्रामुख्याने आयकार्ड, मोबाइल, लायसन्स, एटीएम कार्ड हरवल्याच्या तक्रारी आल्या आहेत.
वाहन परवाना, पॅन कार्ड, मोबाइल, शैक्षणिक कागदपत्रे, मोबाइल सीमकार्ड अथवा विविध कागदपत्रे हरविल्यानंतर नागरिकांना पोलिस ठाण्यात जाऊन तक्रार अर्ज द्यावा लागत होता. त्या वस्तू परत मिळविण्यासाठी त्यांना पोलिसांकडून तक्रारीची प्रत दिली जात होती. यासाठी नागरिकांना पोलिस ठाण्याच्या फेऱ्या माराव्या लागत होत्या. या त्रासातून नागरिकाची सुटका व्हावी म्हणून पुणे पोलिसांनी ‘लॉस्ट अँड फाउंड’ ही लिंक पुणे पोलिसांच्या वेबसाइटवर सुरू केली आहे. या ठिकाणी हरवलेल्या वस्तूंची नागरिक या लिंकवर जाऊन तक्रार देऊ शकत आहेत. ‘२२ मेपासून हा उपक्रम पुणे पोलिसांनी सुरू केला आहे. याचा नागरिकांना खूपच चांगला फायदा होऊ लागला आहे. गेल्या सात दिवसांमध्ये साडेबाराशे नागरिकांनी वस्तू हरविल्याची ऑनलाइन तक्रार केली आहे,’ अशी माहिती सायबर आर्थिक गुन्हे शाखेचे पोलिस उपायुक्त सुधीर हिरेमठ यांनी दिली.
-------------
तक्रार करणाऱ्यांच्या प्रतिक्रिया...
हिंजवडी आयटी कंपनीत काम करणारे आयटी इंजिनीअर संग्राम गायकवाड यांनी लॉस्ट अँड फाउंडवर ऑनलाइन तक्रार केली आहे. गायकवाड म्हणाले, ‘हिंजवडी येथून काम करून घरी जात असताना कंपनीचे ओळखपत्र हरवले होते. त्यावर माझा फोटो होता आणि आयकार्ड हरवल्याने त्याबाबतच्या तक्रारीची पोलिसांकडून दिली जाणारी कॉपी कंपनीसाठी आवश्यक होती. त्यासाठी पोलिस ठाण्यात गेल्यावर या उपक्रमाबद्दल समजले. मी स्वतः आयकार्ड हरविल्याची लॉस्ट अँड फाउंडवर तक्रार नोंदविली. त्यानंतर पोलिस अधिकाऱ्यांचे डिजिटल सिग्नेचर असलेली कॉपी आली. हा उपक्रम खूपच चांगला आहे. यामुळे नागरिकांचा वेळ वाचणार आहे.’
वाहनचालक म्हणून काम करणारे किशोर गरुडकर यांनी सांगितले, ‘मगरपट्टा येथे माझे पाकीट हरवले होते. त्यामध्ये वाहन परवाना, पॅनकार्ड, एटीएमकार्ड होते. चालक असल्यामुळे वाहन परवाना खूपच आवश्यक आहे. तो काढण्यासाठी आरटीओकडे गेलो होतो. त्या वेळी पोलिसांची तक्रार कॉपी घेऊन येण्यास सांगितले. हडपसर पोलिसांकडे गेल्यावर ऑनलाइन तक्रार करता येण्याबाबतची माहिती मिळाली. त्यानुसार ‘लॉस्ट अँड फाउंड’वर तक्रार केली. हा खूपच चांगला उपक्रम आहे. जास्तीत जास्त नागरिकांना याची माहिती होण्याची गरज आहे.’
आर्किटेक्ट फर्ममध्ये नोकरी करणारे अभिजित रॉय म्हणाले, ‘मी मूळचा पश्चिम बंगाल येथील राहणारा आहे. माझे कंपनीने दिलेले आयकार्ड हरवले होते. त्याची तक्रार ऑनलाइन दिली. त्यामुळे पोलिस स्टेशनमध्ये जाण्याचा वेळ वाचला आहे.’
----------
अशी तक्रार द्या....
पुणे पोलिसांच्या www.punepolice.co.in वेबसाइटवर गेल्यानंतर इम्पॉर्टंट लिंकमध्ये ‘लॉस्ट अँड फाउंड’ या नावाची लिंक देण्यात आली आहे. त्यावर लिंकवर केल्यानंतर मोबाईल क्रमांक विचारला जाईल. त्या ठिकाणी मोबाइल क्रमांक टाकल्यानंतर तुमच्या मोबाइल ओटीपी क्रमांक येईल. हा ओटीपी टाकल्यानंतर पेज उघडले. त्यामध्ये हरवलेले कागदपत्र, वस्तूचा प्रकार, स्वत:चा मोबाइल क्रमांक, नाव, पत्ता अशी त्या ठिकाणी विचारलेली माहिती भरावी लागेल. सर्व माहिती भरून झाल्यानंतर सबमिट करावे. त्यानंतर सायबर आर्थिक गुन्हे शाखेचे पोलिस उपायुक्त सुधीर हिरेमठ यांची डिजिटल सिग्नेचर असलेली तक्रारीची कॉपी ऑनलाइन मिळेल. ती कॉपी नागरिक हरवलेली वस्तू नवीन घेण्यासाठी वापरू शकतील. तक्रार दिल्यानंतर वस्तू अथवा कागदपत्र सापडल्यास तक्रारदारांना त्याची माहिती देण्यात येण्याची व्यवस्था करण्यात आली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कामगार विमा हॉस्पिटलचे राज्यात जाळे

$
0
0

एक हजार कोटी रुपयांची तरतूद; केंद्रीय कामगार राज्यमंत्री बंडारू दत्तात्रय यांची माहिती

म. टा. प्रतिनिधी, पुणे

‘राज्यात कामगारांसाठी बार्शी, चाकण, रांजणगाव, पनवेल, वाळुंज, हिंजवडी, पालघर, सातारा, बारामती, शिरवळ या ठिकाणी प्रत्येकी ३० ते १०० बेड्सचे अद्ययावत हॉस्पिटल उभारण्याचे प्रस्ताव आहेत. त्या करिता एक हजार कोटी रुपयांची तरतूद करण्याची तयारी आहे,’ असे केंद्रीय कामगार राज्यमंत्री बंडारू दत्तात्रय यांनी स्पष्ट केले.

बिबवेवाडी येथील राज्य कामगार विमा योजनेच्या (ईएसआयसी) हॉस्पिटलच्या विस्तारीकरणाच्या कामाचे भूमिपूजन त्यांच्या हस्ते झाले. या वेळी ते बोलत होते. या वेळी महापौर मुक्ता टिळक, खासदार चंद्रकांत खैरे, आमदार माधुरी मिसाळ, स्थानिक नगरसेवक सुनील कांबळे, मानसी देशपांडे, राजेंद्र शिळीमकर, अनुसया चव्हाण, कामगार मंत्रालयाच्या सचिव एम. सत्यवती, ‘ईएसआयसी’चे वित्त आयुक्त संध्या शुक्ला, विमा आयुक्त ए.के. सिन्हा, वैद्यकीय आयुक्त आर. के. कटारिया आदी उपस्थित होते.

‘राज्यातून कामगार विमा हॉस्पिटल उभारण्यासाठी अनेक प्रस्ताव आले आहेत. त्यामध्ये बार्शी, चाकण, रांजणगाव, पनवेल, वाळुंज, हिंजवडी, पालघर येथे प्रत्येकी १०० तर शिरवळ, सातारा, बारामती येथे प्रत्येकी ३० बेड्सचे हॉस्पिटल उभारण्याचा प्रस्ताव आहे. त्याबाबत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करण्यात येईल. त्यानंतर राज्यात कामगार विमा हॉस्पिटलचे जाळे उभारण्याचा विचार आहे,’ असे केंद्रीय राज्यमंत्री बंडारू दत्तात्रय यांनी स्पष्ट केले.

‘बिबवेवाडी येथील राज्य कामगार विमा हॉस्पिटल हे राज्य सरकारने केंद्राकडे हस्तांतरित केले आहे. त्यामुळे या हॉस्पिटलचा विस्तारीकरण करण्यात येत आहे. त्याकरिता ५४ कोटी रुपयांची तरतूद केली आहे. आता ५० बेड्सचे हे हॉस्पिटल असून १०० बेड्सचे हॉस्पिटल करण्यात येणार आहे. परंतु, भविष्यात हॉस्पिटलची क्षमता २०० बेड्सपर्यंत करण्याचा मानस आहे. कामगार हॉस्पिटलमध्ये कामगार आणि त्यांच्या कुटुंबियांसाठी हृदयविकार, कर्करोग यासारख्या आजारांचे उपचार उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न आहे,’ असेही त्यांनी सांगितले.

०००
विस्तारीकरणाबाबत मिसाळ यांची नाराजी
बिबवेवाडी येथील राज्य कामगार विमा हॉस्पिटलच्या विस्तारीकरण आणि तेथील सुविधांसंदर्भात आमदार माधुरी मिसाळ सुरुवातीपासून प्रयत्नशील होत्या. या पूर्वी राज्याचे मुख्यमंत्री तसेच आरोग्य विभागाच्या निदर्शनास आणून २०० बेड्सचे हॉस्पिटल करण्याचा त्यांचा प्रयत्न होता. परंतु, विमा कामगार हॉस्पिटलच्या विस्तारीकरणच्या भूमीपूजनाच्या कार्यक्रमात आमदार मिसाळ यांनी जाहीर नाराजी व्यक्त केली. बिबवेवाडीच्या हॉस्पिटलचे विस्तारीकरणासाठी जागा हस्तांतरित करण्यात आले. परंतु, अचानक आपल्याला कार्यक्रमाचे निमंत्रण मिळाले. इमारतीमध्ये डागडुजी करून बेड्सची संख्या वाढविली जाणार आहे. याबाबत मुख्यमंत्र्यांना माहिती देण्यात आली नाही अशा शब्दांत मिसाळ यांनी नाराजी व्यक्त केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मराठीचा टक्का उत्तीर्णांमध्ये जैसे-थे

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

केंद्रीय लोकसेवा आयोगातर्फे (यूपीएससी) घेण्यात भारतीय प्रशासकीय सेवा परीक्षेत राज्यातून उत्तीर्ण झालेल्या मराठी विद्यार्थ्यांची संख्या शंभरच्या आसपास असण्याची शक्यता आहे. गेल्या वर्षी देखील उत्तीर्णांचे प्रमाण तेवढेच होते. त्यामुळे राज्यातून उत्तीर्ण होणाऱ्यांची टक्केवारी गेल्या वर्षासारखीच ‘जैसे-थे’ असल्याची माहिती तज्ज्ञांनी दिली.

भारतीय प्रशासकीय सेवा परीक्षेला दर वर्षी राज्यातून मोठ्या संख्येने विद्यार्थी बसतात. मात्र, त्या तुलनेत परीक्षेत उत्तीर्ण होणाऱ्यांचे प्रमाण हे फारच कमी असते. गेल्या काही वर्षांपासून ही टक्केवारी वाढत नसल्याचे निकालावरून स्पष्ट होते. यंदाही राज्यातून उत्तीर्ण होणाऱ्यांची संख्या ही शंभरच्या आसपास राहण्याची शक्यता आहे. उत्तीर्णांचे हे प्रमाण ८ ते १० टक्क्यांच्या आसपास आहे.

यंदाच्या निकालात महाराष्ट्राने आपला टक्का टिकवून ठेवला आहे, असे प्रथमदर्शनी दिसते. यूपीएससीत यशस्वी झालेल्या उमेदवारांमध्ये साधारण शंभर उमेदवार हे महाराष्ट्राचे असण्याची शक्यता आहे. यात ‘चाणक्य मंडल’च्या ४० विद्यार्थ्यांचा समावेश आहे. गेल्या काही वर्षांमध्ये हे प्रमाण एक ते दोन टक्के खाली-वर होत असते,’ असे चाणक्य मंडलचे संस्थापक अविनाश धर्माधिकारी यांनी सांगितले.

यूपीएससीच्या परीक्षेत यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांमध्ये राज्यातले सर्वसाधारणपणे आठ ते दहा टक्के उमेदवार असतात. तीच संख्या यंदाच्या निकालात देखील कायम राहिली आहे. प्राथमिक माहितीनुसार या यादीत १०० च्या आसपास मराठी नावे असण्याची शक्यता आहे. ‘युनिक अॅकॅडमी’चे ६१ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत, असे अॅकॅडमीचे संचालक तुकाराम जाधव यांनी सांगितले.


यंदाच्या निकालात महाराष्ट्राने आपला टक्का टिकवून ठेवला आहे, असे प्राथमिक निकालावरून दिसून येते. यूपीएससीत यशस्वी झालेल्या उमेदवारांमध्ये साधारण शंभर उमेदवार हे महाराष्ट्राचे असण्याची शक्यता आहे. यात मंडलाच्या ४० विद्यार्थ्यांचा समावेश आहे. देशात अकरावी व राज्यात पहिली आलेली विश्वांजली गायकवाड ही आनंदाची गोष्ट असून तिच्या यशाचा आम्हाला अभिमान आहे,'.

- अविनाश धर्माधिकारी, संस्थापक, चाणक्य मंडल

'यूपीएससी यशस्वितांमध्ये राज्यातले सर्वसाधारणपणे आठ ते दहा टक्के उमेदवार असतात. तीच संख्या यंदाही कायम राहिली आहे. प्राथमिक माहितीनुसार या यादीत १०० च्या आसपास मराठी नावे आहेत. त्यापैकी किती जणांना आयएएससाठी निवडले गेले आहे, हे पाहावे लागेल,'

- तुकाराम जाधव, संचालक यूनिक अॅकॅडमी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images