Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

रावसाहेब दानवेंच्या विरोधात आंदोलन

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पिंपरी
राज्यातील तूर उत्पादक शेतकऱ्यांविरुद्ध अपशब्द वापरणारे भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या निषेधार्थ पिंपरी-चिंचवड शिवसेनेतर्फे शुक्रवारी ‘जोडे मारो’ आंदोलन करण्यात आले.

येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा चौकात सकाळी साडेअकरा वाजता आंदोलन झाले. गटनेते राहुल कलाटे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या आंदोलनात नगरसेवक नीलेश बारणे, अॅड. सचिन भोसले, मीनल यादव, रेखा दर्शिले, माजी नगरसेवक अनंत कोऱ्हाळे, विनायक रणसुभे, राम पात्रे, गजाजन चिंचवडे, भगवान वाल्हेकर, राजेश वाबळे, रोमी संधू, युवराज दाखले, विशाल यादव, नेताजी काशीद यांनी भाग घेतला. या सर्वांनी दानवे यांच्या विरोधात निषेधाच्या घोषणा दिल्या.

कलाटे म्हणाले, ‘राज्यातील शेतकरी संकटात आहे. त्यांच्या आत्महत्येचे प्रमाण वाढले आहे. शेतकऱ्यांचे कर्ज माफ होणे गरजेचे आहे. परंतु, कर्जमाफी न देता सत्ताधारी भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे शेतकऱ्यांबाबत बेताल वक्तव्य करत आहेत. दानवे यांना शेतकऱ्यांचे दु:ख माहित असतानाही त्यांनी बेताल वक्तव्य करणे निषेधार्ह आहे.’

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


शहरातील मद्याची दुकाने सुरू करण्याचा प्रस्ताव

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
महापालिकांच्या हद्दीत असल्यामुळे महापालिकांनी बांधकाम परवाना दिलेल्या; पण कागदोपत्री राष्ट्रीय किंवा राज्य महामार्गाचा दर्जा असलेल्या रस्त्यांवरील ५०० मीटरच्या आत असलेली मद्याची दुकाने पुन्हा सुरू करण्याबाबतचा प्रस्ताव राज्य उत्पादन शुल्क विभागाने राज्य सरकारकडे पाठविला आहे. दरम्यान, राष्ट्रीय किंवा राज्य महामार्गालगत ५०० मीटरच्या आत असलेल्या पुण्यातील ९० दुकानदारांनी दुकाने स्थलांतर करण्यासाठी अर्ज केले आहेत.
‘पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिकांच्या हद्दीत असलेले; पण कागदोपत्री महामार्गांचा दर्जा असलेले अनेक रस्ते आहेत. त्यावर महापालिकांनी इमारत बांधकामासाठी परवाने दिले आहेत. संबंधित रस्त्यांवरील ५०० मीटरच्या आत असलेली दुकाने पुन्हा सुरू करण्याबाबतचा प्रस्ताव राज्य सरकारकडे देण्यात आला आहे,’ असे राज्य उत्पादन शुल्क खात्याच्या पुणे विभागाचे अधीक्षक मोहन वर्दे यांनी सांगितले.
‘कागदोपत्री महामार्गाचा दर्जा असलेल्या रस्त्यांमध्ये कात्रज ते स्वारगेट, स्वारगेट ते हडपसर, जुना बाजार ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, चंदननगर खराडी ते मगरपट्टा, औंध ते शेलारवाडी, जंगली महाराज रस्ता, निगडी ते दापोडी आदी रस्त्यांचा समावेश आहे,’ असे वर्दे यांनी स्पष्ट केले.
‘सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर ५०० मीटरच्या आतील दुकाने बंद करण्यात आली आहेत. पुणे शहर, पिंपरी चिंचवड आणि जिल्ह्यातील सुमारे एक हजार ६०० दुकाने बंद झाली आहेत. त्यापैकी ९० दुकानदारांनी दुकान स्थलांतर करण्यासाठी अर्ज केले आहेत. त्यांना परवानगी देण्यात येणार आहे,’ असे वर्दे म्हणाले.
‘बेकायदा मद्याची विक्री वाढू नये, हातभट्टी, परराज्यांतून येणारे मद्य यावर कारवाईसाठी लक्ष केंद्रित करण्यात आले आहे,’ असेही वर्दे यांनी सांगितले.

व्हॉटस्अपवर नागरिकांना करता येणार तक्रार
‘अवैध मद्य निर्मिती, विक्री, वाहतूक किंवा साठवणुकीबाबत नागरिकांना राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या ८४२२००११३३ या व्हॉटस्अप क्रमांकावर तक्रार करता येणार आहे. याशिवाय १८००८३३३३३३ या टोल फ्री क्रमांकावर तक्रार करण्याची व्यवस्था करण्यात आली आहे,’ असे अधीक्षक मोहन वर्दे यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

एअर इंडिया विमान टायर फुटल्याने घसरले

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
एअर इंडियाचे दिल्लीहून पुण्यात दाखल झालेले विमान लोहगाव विमानतळाच्या धावपट्टीवर उतरल्यानंतर टायर फुटल्याने धावपट्टी सोडून काही अंतर घसरत गेल्याची दुर्घटना शुक्रवारी सायंकाळी घडली. यावेळी अन्य कोणतीही आपत्ती न उद्‍भवल्याने विमानातील सर्व १५२ प्रवासी बचावले. या दुर्घटनेनंतर काही तास अन्य विमानांची वाहतूक बंद ठेवण्यात आली होती.
एअर इंडियाचे ‘दिल्ली-पुणे एआय-८४९’ हे विमान दुपारी चार वाजून पाच मिनिटांनी दिल्लीवरून रवाना झाले. ते सायंकाळी वाजून १० मिनिटांनी लोहगाव विमानतळ क्षेत्रावर पोहोचले. मात्र, लॅण्डिंगसाठी सिग्नल न मिळाल्याने १० मिनिटे हवेत घिरट्या घालाव्या लागल्या. त्यानंतर विमान धावपट्टीवर उतरले. धावपट्टीवर विमान उतरत असताना विमानाचा टायर फुटला. त्यामुळे विमान धावपट्टीपासून काही अंतर घसरत गेले होते. मात्र, वैमानिकाने प्रसंगावधान दाखवित कौशल्याने विमान थांबविण्यास यश मिळविले. या वेळी विमानतळावरील आपत्कालीन पथकाने आणि कर्मचाऱ्यांनी विमानाकडे धाव घेत धावपट्टीवर प्रवाशांना विमानाच्या खाली उतरवून घेतले. विमानात १५२ प्रवाशी प्रवास करीत होते. ते सर्व सुखरूप असल्याचे विमानतळ प्रशासनाने आणि एअर इंडिया प्रशासनाने सुहास जाधव यांनी सांगितले.
या दुर्घटनेनंतर संबंधित विमानातील प्रवाशांना सुमारे दोन तास थांबविण्यात आले होते. त्यांचे विमानातील सामान बाहेर काढून त्यांना सुपूर्द करण्यासाठी विलंब लागला. या दुर्घटनेचा अन्य सेवेवर परिणाम झाला. त्यामुळे काही उड्डाणे विलंबाने झाली. दरम्यान, गेल्या काही महिन्यातील लोहगाव विमानतळावरील ही दुसरी दुर्घटना आहे. ऑक्टोबर २०१६ मध्ये पुण्याहून दिल्लीला जाणारे विमान रविवारी ‘टेक ऑफ’ करताना विमानाच्या इंजिनमध्ये तांत्रिक बिघाड होऊन मोठ्या प्रमाणावर धूर निघाल्याने विमान थांबवण्यात आले होते.

सर्वात पहिल्यांदा झालेला मोठा आवाज ऐकला आणि बाहेरील बाजूचा धूर पाहिल्यानंतर सर्व प्रवासी घाबरले होते. मात्र, पायलटने सर्वांना शांत राहण्यास सांगितले. विमान कंट्रोल केले. त्यानंतर विमानाचे बाहेर पडण्याचे सर्व मार्ग खुले करून प्रवाशांना मार्ग करून दिला.
- वर्षा गर्ग (प्रवासी)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भक्तिमय कार्यक्रमात राजकीय ‘श्रद्धा’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
‘डॉ. रामचंद्र देखणे यांचे कार्यक्रम खूप झाले; पण त्यांची जीभ कधी घसरली नाही, हे त्यांच्याकडून राजकीय व्यक्तींनी शिकण्यासारखे आहे,’ अशा शब्दांत माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे व पालकमंत्री गिरीश बापट यांचा नामोल्लेख टाळून टोला लावला. ‘पाटील हे मी घसरण्याची वाट पाहत असतात; पण पुन्हा ‘हात’ तेच देतात. २५ वर्षे आम्ही विधानसभेत एकत्र आहोत. पूर्वी ते अलीकडे आणि आम्ही पलीकडे असायचो. आता आम्ही अलीकडे आहोत; पण ते कुठेच नाहीत,’ अशी फटकेबाजी बापट यांनी केली आणि आध्यात्मिक व भक्तिमय कार्यक्रमात राजकीय ‘श्रद्धा’ उफाळून आल्या.
ज्येष्ठ साहित्यिक, संतसाहित्याचे व लोकसंस्कृतीचे व्यासंगी अभ्यासक डॉ. रामचंद्र देखणे यांचा एकसष्टीनिमित्त ज्येष्ठ निरुपणकार डॉ. किसनमहाराज साखरे यांच्या हस्ते सपत्नीक सत्कार करण्यात आला. देखणे यांच्या पत्नी अंजली पाटील, खासदार श्रीरंग बारणे, एअर मार्शल ( निवृत्त ) भूषण गोखले, ज्येष्ठ नेते उल्हास पवार, भाजपचे शहराध्यक्ष योगेश गोगावले, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते अंकुश काकडे, आयोजक भाऊसाहेब भोईर, संकेत देशपांडे आणि सचिन इटकर उपस्थित होते. संतसाहित्याचे अभ्यासक डॉ. सदानंद मोरे, कुलपती डॉ. पी. डी. पाटील, बीव्हीजी ग्रुपचे हनुमंत गायकवाड, पालिकेचे सहआयुक्त ज्ञानेश्वर मुळक यांचा सत्कार करण्यात आला.
‘देखणे यांनी महाराष्ट्राला लोकसंस्कृती व संतसाहित्यातील विचारांचे देखणेपण दिले आहे. संस्कृती जोपसतानाच प्रबोधन करण्याचे काम देखणे यांनी केले,’ असे गौरवोद्‍गार पाटील यांनी काढले. ‘बापट परदेशातून येणार आहेत, हे मला माहीत होते. मी अरविंद शिंदे यांना सांगत होतो की बोर्ड लावू नका,’ अशी टिप्पणी पाटील यांनी करताच बापट यांच्यासह उपस्थितांनी त्यांना दाद दिली. यावर बापट यांनीही फटकेबाजी करण्याची संधी न दवडता पाटील यांची फिरकी घेतली आणि भक्तिभावाने भारलेल्या बालगंधर्व रंगमंदिरात राजकीय टीकाटिप्पणीच भाव खाऊन गेली. उत्तरार्धात उद्धव कानडे यांनी डॉ. देखणे यांची मुलाखत घेतली. सूत्रसंचालन सुधीर गाडगीळ यांनी केले. भावार्थ देखणे यांनी आभार मानले.

डॉक्टरांचा भांग विस्कटत नाही
‘डॉक्टरसाहेब कडकलक्ष्मी झाले, तरी त्यांचा भांग विस्कटत नाही. ते एक वेगळेच रसायन आहेत. विंचू चावला की वाईट वाटते; पण त्यांचे ‘विंचू चावला’ ऐकले की गोड वाटते. लोकांच्या आयुष्यात परिवर्तन करण्याचे काम देखणे यांनी केले आहे. यापुढे अनेकांना देखणे यांच्यामुळे रस्ता दिसावा. तुम्ही लोकांना विनयशीलतेने जिंकले आहे, हे पदव्या आणि पैशाने जिंकता येत नाही,’ असे गौरवोद्वगार गिरीश बापट यांनी काढले. ‘माझ्या आयुष्यात पौर्णिमा उगवली असून रसिकत्वाचे चांदणे अनुभवत आहे. मला वैश्विकतेची जाणीव संतसाहित्य व लोककलेतून मिळाली,’ अशी भावना डॉ. देखणे यांनी व्यक्त केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

प्रत्येक वॉर्डात उभारणार डिजिटल साक्षरता केंद्र

$
0
0

पुणे : शहरातील अधिकाधिक नागरिक डिजिटल साक्षर झाले पाहिजेत, या उद्देशाने महापालिकेने प्रत्येक वॉर्डात डिजिटल साक्षरता केंद्र उभारण्याचा विचार सुरू केला आहे. यापूर्वी प्रशासनाने २० प्रभागांमध्ये डिजिटल साक्षरता केंद्र सुरू केल्यानंतर आता शहरात १०० डिजिटल केंद्र सुरू करण्याचा निर्णय महापालिका आयुक्त कुणाल कुमार यांनी घेतला आहे. प्रत्येक वॉर्डात हे केंद्र सुरू केले जाणार असून महापालिका, पुणे सिटी कनेक्ट आणि नासकॉम फाउंडेशन यांच्यामार्फतही केंद्रे सुरू केली जाणार आहेत.
यापूर्वी महापालिकेने शहरातील २० प्रभागांमध्ये प्रायोगिक तत्वावर ही साक्षरता केंद्रे सुरू केली असून आता प्रत्येक वॉर्डात एक केंद्र सुरू करण्याचा निर्णय महापालिका आयुक्त कुणाल कुमार यांनी घेतला आहे. सर्वसामान्य नागरिकांना माहिती तंत्रज्ञान क्षेत्राची ओळख करून देणे, सर्व सरकारी, निमसरकारी तसेच सार्वजनिक उपक्रमातील सर्व कर्मचाऱ्यांना डिजिटल साक्षर करणे, नागरिक डिजिटल साक्षर झाल्यास मोबाइल, टॅब्लेट, कम्प्युटर याचा वापर नागरिकांना अधिक चांगल्या प्रकारे करता यावा, या उद्देशाने हा उपक्रम आखण्यात आला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अकरावी प्रवेशप्रक्रियेस २५ मेपासून सुरुवात

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

अकरावी प्र‍‍वेश प्रक्रियेचे काम पूर्ण झाले असून पुणे- पिंपरी चिंचवड महापालिका क्षेत्रातील ज्युनियर कॉलेजांमध्ये प्रवेश प्रक्रियेला २५ मे पासून सुरूवात होणार आहे. केंद्रीय प्रवेश नियंत्रण समितीने विद्यार्थी-पालकांच्या सुविधेसाठी शाळांमधून ऑनलाइन अर्ज भरण्याची आणि अर्जामध्ये एक ते दहा ज्युनियर कॉलेजांचे पसंतीक्रम भरण्याची सुविधा निर्माण केली आहे. तसेच, यंदा २०१७-१८ शैक्षणिक वर्षाच्या प्रवेश प्रक्रियेला सुरुवात झाल्यावरही प्रक्रियेत सहभागी होता येणार आहे. त्यामुळे अकरावी प्रवेश प्रक्रियेचा त्रास पालक आणि विद्यार्थ्यांना कमी होणार आहे.
गेल्या वर्षी अकरावी प्रवेश प्रक्रियेला वेळेत सुरुवात होऊनदेखील प्रक्रियेत विविध प्रकारच्या त्रुटी असल्याने ही प्रवेश प्रक्रिया रेंगाळली होती. तसेच, विद्यार्थ्यांना त्यांच्या पसंतीचे कॉलेज मिळविण्यासाठी मोठा आटापिटा करावा लागला तसेच काहींनी गुणवत्ता यादीत असूनदेखील पसंतीच्या कॉलेजमध्ये प्रवेश मिळाला नसल्याची तक्रार केली होती. या सर्वांवर उपाय म्हणून शिक्षण विभागाने आणि प्रवेश नियंत्रण समितीने यावर्षी विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी प्रवेश प्रक्रियेत बदल केले आहे.
या बदलानुसार ज्युनियर कॉलेजांमध्ये विज्ञान, कला आणि वाणिज्य शाखेत प्रवेश घेण्यासाठी इच्छुक असणाऱ्या विद्यार्थ्यांना त्यांच्या शाळांमधून ऑनलाइन प्रवेश अर्ज भरता येणार आहेत. अर्ज हा दोन भागांत असून विद्यार्थ्यांना पहिला भाग हा २५ मेपासून भरता येणार आहे. विद्यार्थी इयत्ता दहावी ज्या शाळेमधून उत्तीर्ण झाला आहे, त्या शाळेतून त्याला प्रवेशासाठी ऑनलाइन अर्ज भरता येणार आहे. संबंधित विद्यार्थ्यांची माहिती त्या शाळेकडे असल्याने आणि अर्ज भरताना चूक होऊ नये, यासाठी हा बदल करण्यात आला आहे. दरम्यान, अर्जामध्ये एक ते दहा ज्युनियर कॉलेजांचे पसंतीक्रम भरण्याची सुविधा निर्माण केली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये गोंधळाचे वातावरण निर्माण होणार नाही.
यापूर्वी एकदा प्रवेश प्रक्रियेसाठी दिलेल्या मुदतीत लॉग-इन आयडी आणि पासवर्डमार्फत नोंदणी केली नाही, तर प्रवेश प्रक्रियेत सहभागी होता येत नव्हते. मात्र, आता विद्यार्थ्याला प्रवेश प्रक्रियेला सुरुवात झाल्यावरही प्रक्रियेत माहितीपुस्तिका घेऊन लॉग-इन आयडी आणि पासवर्डमार्फत सहभागी होता येणार आहे. विद्यार्थ्यांना प्रवेश प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी लागणाऱ्या माहिती पुस्तिका (लॉगइन आयडी आणि पासवर्डसहीत) २५ मेपासून त्यांच्या शाळेतून किंवा मार्गदर्शन केंद्रातून दीडशे रूपयांना मिळणार आहे. दरम्यान, माहिती पुस्तिकांची छपाई सुरू असून त्या २५ मेपासून उपलब्ध होतील. मात्र, विद्यार्थी-पालकांना त्या ऑनलाइन स्वरूपात http://www.dydepune.com या वेबसाइटवर पाहता येईल, असे सहायक शिक्षण संचालक मीनाक्षी राऊत यांनी सांगितले.

...तर प्रवेश घ्यावाच लागेल
अकरावी प्रवेश प्रक्रियेत विविध फेऱ्यांसाठी पसंतीच्या कॉलेजांसाठी एक ते दहा पसंतीक्रमांचा अर्ज भरावा लागतो. अर्ज भरल्यानंतर पहिल्या क्रमांकाचे कॉलेज विद्यार्थ्यांला मिळाल्यास त्याला त्या कॉलेजमध्ये प्रवेश घ्यावाच लागणार आहे. विद्यार्थ्यांनी त्या कॉलेज प्रवेश घेतला नाही; तर त्याचा प्रवेश रद्द होईल आणि पुढल्या फेरीत त्याला सहभागी होता येणार नाही, असे राऊत यांनी सांगितले. दरम्यान, यंदा अकारावी प्रवेशासाठी पुणे- पिंपरी चिंचवड शहरात २६७ कॉलेजात ९४ हजार ५८० जागा आहेत. विद्यार्थ्यांना http://pune.11thadmission.net या वेबसाइटहून लॉगइन आयडी आणि पासवर्डने ऑनलाइन अर्ज भरता येईल, असे राऊत यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘एक्स्प्रेस वे’वरील अपघातात एक ठार

$
0
0

लोणावळा : मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर कार आणि ट्रकच्या अपघातात एका जणाचा मृत्यू झाला, तर चार जण गंभीर जखमी झाले. कामशेत बोगद्याजवळ शुक्रवारी सकाळी साडेआठच्या सुमारास हा अपघात झाला.

जितेश जगदीश जाधव (वय ३५, रा. नेरूळ, मुंबई) असे या अपघातात मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. जखमींमध्ये इंद्रजीत आप्पाराव भोसले (वय ६५), शोभा इंद्रजीत भोसले (वय ५८, दोघेही रा. बारामती, पुणे), डॉ. पल्लवी जितेश जाधव (वय ३२, रा. नेरूळ, मुंबई) आणि निनाद सुहास रामाने (वय १०, रा. विरार, मुंबई) यांचा समावेश आहे.

कामशेत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जितेश दक्षिण आफ्रिकेतील एका आयटी कंपनीत कार्यरत होते. कंपनीची मिटिंग, तसेच त्यांच्या बहिणीच्या लग्नासाठी ते मुंबईला आले होते. शुक्रवारी सकाळी ते त्यांच्या पत्नी, आत्या, आतेमामा व भाचा काही कामानिमित्त त्यांच्या फिएस्टा फोर्ड कारने (एमएच ४३ एबी ८६२९) पुण्याला जात होते. कामशेत बोगद्यात किलोमीटर क्रमांक ७१जवळ त्यांचे कारवरील नियंत्रण सुटल्याने कार भरधाव वेगात एका मालवाहू ट्रकवर (एनएल ०३ ए ४४८१) मागून जोरात आदळली. या भीषण धडकेत जितेश यांचा जागीच मृत्यू झाला. त्यांची पत्नी डॉ. पल्लवी जाधव, आत्या शोभा भोसले, आतेमामा इंद्रजीत भोसले हे गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर निगडीतील लोकमान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत. भाचा निनाद रमाने हा किरकोळ जखमी झाला आहे. रस्तेविकास महामंडळाच्या ‘देवदूत’ या आपत्कालीन पथकाने जखमींना उपचारासाठी निगडीला रवाना केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘वायफाय’ बंद केल्याने मारहाण

$
0
0



पुणे : ‘वायफाय’ बंद केले, या कारणावरून वकील असलेल्या पतीने गळा दाबून पत्नीला जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार धनकवडी परिसरात घडला. या प्रकरणात पती व इतर चौघांवर खुनाचा प्रयत्न व कौटुंबिक हिंसाचार कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत प्रियांका प्रतीक वाघोलीकर (वय २९, रा. धनकवडी) यांनी तक्रार दिली आहे. त्यावरून पती प्रतीक वाघोलीकर व इतर चार जण अशा पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रियांका व प्रतीक यांचे २०१२ मध्ये लग्न झाले. प्रतीक वकील आहे. लग्नात माहेरच्यांनी मानपान केले नाही, लग्नात काही दिले नाही म्हणून प्रियंकाला आरोपी सातत्याने शिवीगाळ व मारहाण करीत होते. तसेच, त्यांच्या पावणेदोन वर्षांच्या मुलालाही मारहाण करीत होते. प्रियंकाचा शारीरिक व मानसिक छळ सुरू होता.
प्रतीक बुधवारी घरात असताना प्रियांका यांनी वायफाय बंद केले. या कारणावरून चिडून आरोपीने त्यांच्याशी वाद सुरू केला. त्यांच्या तोंडावर उशी दाबली. तसेच, गळा दाबून डोक्यात कुंडीने मारहाण केली. यामध्ये प्रियंका जखमी झाल्या. त्यांच्यावर उपचार सुरू असून या प्रकरणात त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून सहकारनगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. उपनिरीक्षक एस. एम. थोरात अधिक तपास करत आहेत. याबाबत वरिष्ठ पोलिस निरीक्षक दीपक निकम यांनी माहिती दिली. या प्रकरणी तपास सुरू असून आरोपीचा शोध
सुरू आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


वाहतूक नियंत्रणासाठी चक्क 'यमराज'

$
0
0

पुणे मिरर । पुणे

वाहन चालवताना मोबाइल फोनवर बोलू नये यासाठी वाहतूक पोलिसांकडून अनेकदा प्रयत्न केले जातात. मात्र, त्यांच्या प्रयत्नांना फारसं यश मिळत नसल्यामुळे वाहतूक पोलिसांच्या मदतीला थेट यमराजच अवतरले आहेत.

वाहतूक पोलिसांकडून वाहन चालकांना शिस्त लावण्यासाठी अनेक प्रयत्न केले जातात. दंड आकारणी करण्यात येते. तरीदेखील वाहन चालक सर्रासपणे नियम पायदळी तुडवतात. त्यामुळे अशा वाहन चालकांना नियम पाळण्याचे गांभीर्य समजावून सांगण्यासाठी वाहतूक पोलीस आता 'यमराज' स्वयंसेवकांची मदत घेणार आहे. वाहन चालवताना मोबाइलवर बोलणे प्राणावर बेतू शकते, असे यमराज वाहन चालकाला सांगणार आहेत. पुण्यातील रस्त्यांवर शनिवारपासूनच रस्त्यांवर यमराज दिसू लागले आहेत. सहाय्यक पोलीस निरीक्षक एम.पी. सरतापे यांनी सांगितले की, 'यमराजला प्रत्यक्षात पाहिल्यामुळे वाहन चालवताना मोबाइलवर बोलण्याचे टाळतील. वाहतुकीचे नियम पाळणे हे वाहन चालक आणि लोकांसाठी महत्त्वाचे आहे. त्यामुळे यमाच्या भेटीमुळे काही सकारात्मक परिणाम होण्याची अपेक्षा आहे.'

याआधी चेन्नईमध्ये वाहतूक पोलिसांनी 'डोन्ट ड्रिंक अॅण्ड ड्राइव्ह' मोहिमेसाठी 'यमराज' स्वयंसेवकाची मदत घेतली होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आयटीतज्ज्ञ कोडिंगमध्येच अडकलेल

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
‘माहिती तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात भारत सुपरपॉवर आहे, असे सांगितले जाते. वास्तवात आयटी क्षेत्रातले तज्ज्ञ आजही कोडिंग आणि टेस्टिंगमध्येच अडकून पडले आहेत. अभियांत्रिकीचे शिक्षण आणि उद्योगक्षेत्राची अपेक्षा यामध्ये आजही भारतात प्रचंड तफावत आहे,’ अशी खंत ज्येष्ठ माहिती तंत्रज्ञान तज्ज्ञ व प्रसिद्ध लेखक अच्युत गोडबोले यांनी शनिवारी व्यक्त केली.
मॅजेस्टिक प्रकाशनातर्फे संगणक तज्ज्ञ सतीश जोशी व लेखिका शोभा बोंद्रे लिखित ‘सहावं महाभूत आणि मी’ या पुस्तकाचा मराठी अनुवाद करण्यात आला आहे. त्या निमित्ताने सिनेट हॉल येथे माहिती तंत्रज्ञान या विषयावर खुल्या चर्चेचे आयोजन करण्यात आले होते. त्या वेळी गोडबोले यांनी भारताच्या संगणक शिक्षणपद्धतीवर ताशेरे ओढले. सतीश जोशी, शोभा बोंद्रे, मायक्रोसॉफ्ट कंपनीचे माजी वरिष्ठ अधिकारी मकरंद गद्रे आदींनी या चर्चेत सहभाग घेतला होता.
‘भारतात संगणकाचे उत्तम ज्ञान असलेली जाणकार मंडळी अजूनही कमी आहेत. बऱ्याचदा अजूनही भारतीय संगणक तज्ज्ञ कोडिंग आणि टेस्टिंगमध्येच अडकून पडले आहेत. त्यावरून देशात संगणकाची क्रांती खरेच झाली का, असा प्रश्न पडतो,’ असे गोडबोले म्हणाले. पुढच्या चार ते पाच वर्षांत परदेशात भारतीय संगणक तज्ज्ञांच्या नोकरीवर गदा येण्याची शक्यता आहे, असे सांगत ते म्हणाले, ‘भारतीयांच्या संगणक क्षेत्रातील कामाचे मूल्य आकारण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहे. सुरुवातीला ते अमेरिकन तज्ज्ञांपेक्षा अत्यंत कमी असल्याने कंपन्यांना कमी खर्चात दर्जेदार काम मिळत होते. आता मात्र, पुढच्या काही वर्षांमध्ये भारतीय अमेरिकन्सच्या बरोबरीला येऊन ठेपतील. त्यातच अमेरिकेत सध्या राष्ट्रवाद उफाळून आला आहे. त्यामुळे येत्या काही वर्षांतील भारतीय संगणक तज्ज्ञांच्या भवितव्याविषयी शंका निर्माण झाली आहे.’
सतीश जोशी यांनी संगणकाच्या प्रगतीवर प्रकाश टाकला. भलामोठा वाटत असणारा कम्प्युटर हळूहळू लहान कसा होत गेला. याची कहाणी जोशी यांनी रंजकपणे मांडली. विविध कंपन्यांमध्ये त्यांनी हाताळलेल्या प्रोजेक्टसमधील गमतीजमतीही त्यांनी रसिकांना सांगितल्या. शोभा बोंद्रे यांनी या सर्वांशी संवाद साधला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘स्वीकृत’च्या मुद्द्यावरून भाजपचा राडा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पिंपरी
पक्षविरोधी काम करणाऱ्यांची स्वीकृत नगरसेवकपदासाठी शिफारस केल्याचा आरोप करीत पिंपरी-चिंचवडमधील भाजपच्या नाराज कार्यकर्त्यांनी पक्षाला शनिवारी घरचा आहेर दिला. खासदार अमर साबळे आणि राज्य लेखा समितीचे अध्यक्ष अॅड. सचिन पटवर्धन यांच्या छायाचित्राला काळे फासून त्यांचे पुतळेही जाळले. त्यामुळे पक्षांतर्गत गटबाजी उफाळून आली आहे.
महापालिकेच्या स्वीकृत नगरसेवकपदासाठी भाजपकडून माउली थोरात, बाबू नायर, अॅड. मोरेश्वर शेडगे यांना उमेदवारी जाहीर झाली असून, त्यांची अधिकृत घोषणा येत्या सर्वसाधारण सभेत होणार आहे. उमेदवारी जाहीर झाल्यानंतर चौथ्या दिवशी पक्षातील काही नाराज कार्यकर्त्यांनी पक्षाच्या मोरवाडीतील येथील कार्यालयासमोर येऊन आंदोलन केले. कार्यालयातील फलकावरील खासदार साबळे आणि पटवर्धन यांच्या छायाचित्रांना काळे फासले.
‘नेत्यांच्या मागेपुढे करणाऱ्यांना स्वीकृत नगरसेवकपदी संधी दिली आहे. खासदार साबळे यांनी पक्षविरोधी काम करणाऱ्यांचीच स्वीकृत नगरसेवकपदासाठी शिफारस केल्याने त्यांच्या प्रतिमेला काळे फासले आणि पुतळा जाळला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निर्णयाला विरोध नसून, चुकीच्या शिफारशीला विरोध आहे,’ असे आंदोलन करणाऱ्या कार्यकर्त्यांनी सांगितले. पक्ष सत्तेत असताना न्याय देण्याची वेळ आल्यावर ज्यांनी पक्षासाठी काहीच काम केले नाही, अशा लोकांना स्वीकृत नगरसेवकपदाची संधी दिली आहे. ते कार्यकर्त्यांसाठी कधीही उपलब्ध नसतात, असेही आंदोलकांनी सांगितले.
पालिकेतील सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार यांनी आंदोलनाच्या ठिकाणी येऊन माजी नगरसेवक राजेश पिल्ले, कुणाल लांडगे, नंदू कदम, प्रमोद निसळ, अजय पाताडे, मिथुन मथुरे, नीलेश अष्टेकर आदी कार्यकर्त्यांची समजून घालण्याचा प्रयत्न केला. परंतु, त्याचा काही उपयोग झाला नाही. पवार म्हणाले, ‘पक्षांतर्गत बाब पक्षश्रेष्ठींच्या निदर्शनास आणून देण्यात येईल. नाराज कार्यकर्त्यांना समजावून सांगण्याचा प्रयत्न केला जाईल.’
दरम्यान, साबळे आणि पटवर्धन यांच्या छायाचित्राला काळे फासल्यानंतर दोघांचेही प्रतीकात्मक पुतळे जाळण्यात आले. त्यामुळे पोलिस आंदोलनस्थळी आले. त्यांनी वातावरण नियंत्रणात आणले.
पिल्ले म्हणाले, ‘पक्षविरोधी काम करणाऱ्या थोरात यांना खासदारांनी स्वीकृतची बक्षीसी दिली आहे. ही चुकीची बाब आहे. पंचवीस वर्षे काम करणाऱ्यांना संधी नाही. परंतु, नुकत्याच दाखल झालेल्या नायर यांनाही पटवर्धन यांनी स्वीकृत सदस्यपदी संधी दिली आहे. पक्षावर निष्ठा असणाऱ्या कार्यकर्त्यांची नावे अपेक्षित होती. मात्र, पक्षाचे देणेघेणे नसणाऱ्यांना बक्षिसी दिल्यामुळे आम्ही नाराज आहोत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आमचा विरोध नसून त्यांची दिशाभूल करणाऱ्यांना विरोध आहे.’

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पुण्याच्या विद्यार्थ्यांची ‘अंतराळसृष्टी’ प्रथम

$
0
0

पुणे : खासगी शाळा-कॉलेजांमध्येच दर्जेदार शिक्षण मिळते, हा समज खोटा पाडत पुणे महापालिकेच्या शाळेतील विद्यार्थ्यांनी आपल्या जिद्दीने जागतिक सन्मान मिळविला आहे. बिबवेवाडीत राहणाऱ्या आणि राजीव गांधी अॅकॅडमी ऑफ ई-लर्निंगमध्ये बारावीत शिकणाऱ्या चिन्मय आणि तन्मय सामक या जुळ्या भावंडांच्या ‘अंतराळसृष्टी’ प्रकल्पाने थेट नॅशनल अॅरोनॉटिक्स अॅन्ड स्पेस अॅडमिनिस्ट्रेशनच्या (नासा) ‘एम्स स्पेस सेटलमेंट डिझाइन स्पर्धे’त ग्रेड १२ गटात पहिला क्रमांक पटकावला आहे.

‘नासा एम्स रिसर्च सेंटर’ आणि ‘नॅशनल स्पेस सोसायटी’तर्फे जगभरातील विद्यार्थ्यांसाठी दर वर्षी ही स्पर्धा घेण्यात येते. मानवाला अंतराळात राहण्यासाठी काय पावले उचलावी लागतील, अंतराळातील शहर कसे असेल आणि त्याचे नियंत्रण कसे करता येईल, आदी मुद्द्यांवर ही स्पर्धा आधारित असते. या स्पर्धेसाठी चिन्मय आणि तन्मयने अंतराळसृष्टी हा १०७ पानांचा संशोधन प्रकल्प तयार केला. मार्गदर्शक किंवा शिक्षकांची मदत न घेता संपूर्ण प्रकल्पासाठी संशोधनाचे काम दोघांनीच केले. विशेष म्हणजे या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्यांना त्यांच्या शाळा आर्थिक मदत करतात आणि मेंटर्सकडून मार्गदर्शन मिळते. मात्र, या भावंडांनी तेही न घेता स्वतःच्या मेहनतीवर हे यश मिळवले आहे. जगातील सहा हजार शाळांच्या सुमारे १५०० प्रकल्पांमधून चिन्मय आणि तन्मयच्या प्रकल्पाची निवड झाली आहे.

नासाचे शास्त्रज्ञ व परीक्षकांनी केलेल्या परीक्षणानंतर या प्रकल्पास पहिला पुरस्कार जाहीर झाला आहे. त्यामुळे आता चिन्मय आणि तन्मय अमेरिकेतील सेंट ल्युईसमध्ये २५ ते २९ मे दरम्यान होणाऱ्या ‘इंटरनॅशनल स्पेस डेव्हलपमेंट कॉन्फरन्स’मध्ये नासाचे शास्त्रज्ञ आणि जगातील तज्ज्ञांसमोर सादरीकरण करणार आहेत. चिन्मय आणि तन्मयचे वडील बँकेत कार्यरत होते. त्यांची आई अर्चना सामक या स्टेट बॅक इंडियाच्या झोनल शाखेत आयटी ऑफिसर म्हणून कार्यरत आहेत. दोन्ही भावंडांचे दहावीपर्यंतचे शिक्षण ज्ञानप्रबोधिनी प्रशालेतून झाले असून त्यांना रोबोटिक्समध्ये आवड आहे. गेल्या वर्षीही त्यांना ११ ग्रेड गटात यश मिळाले होते. या स्पर्धेत दिल्लीच्या शाश्वत जी. आणि अंकिता पी. यांनी ग्रँड पारितोषिक मिळवले.

काय आहे अंतराळसृष्टी प्रकल्प?
या संशोधन प्रकल्पात चिन्मय आणि तन्मयने सुमारे दहा हजार लोकसंख्या असलेल्या शहराचे ‘इक्वेटोरीयल लो अर्थ ऑर्बिट’मध्ये वसविलेले मॉडेल तयार केले आहे. पृथ्वीवरील एखाद्या स्मार्ट सिटीप्रमाणे पाणी, रस्ते, वीज, ऑनलाइन पद्धतीने कामकाज करणारी सरकारी कार्यालये, वाहतूक व्यवस्था, इमारती, रोजगारासाठी लहान उद्योग, शेती, सांडपाणी व कचरा व्यवस्थापन, वाहने, स्पेस स्टेशन आदी सर्व बाबी या संकल्पित शहरात आहेत. वीजनिर्मितीसाठी सोलर पॅनलचा वापर करण्यात येईल. अंतराळात असल्याने शहर सुरक्षित राहण्यासाठी अॅल्युमिनियम, टायटॅनियम, अॅन्टिब्रिजपासून तयार केलेल्या संरक्षण भिंतीत ते राहणार आहे. शहरामध्ये पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी देखील अॅल्युमिनियम, टायटॅनियम, कार्बन फायबरचा वापर करण्यात येईल. नागरिकांना आरामात आनंदी जीवन जगण्यासाठी लागणाऱ्या सर्व सोयीसुविधा शहरात राहणार आहेत. असे शहर प्रत्यक्षात वसविण्यासाठी ५०० अब्ज डॉलरचा खर्च येऊ शकतो, असे चिन्मय आणि तन्मयने सांगितले.

चिन्मय आणि तन्मयला दुचाकी, स्मार्ट फोन, आकर्षक कपडे अशा कोणत्याच गोष्टींचे आकर्षण नाही. केवळ अभ्यास आणि संशोधनाला लागणाऱ्या विविध गोष्टी घेऊन देण्यासाठी ते हट्ट करतात.
- अर्चना सामक, आई

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘वर्किंग मॉम’ची पसंती ‘वर्क फ्रॉम होम’ला!

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

करिअरचा आलेख उंच नेण्याची स्वप्न पाहताना आजच्या ‘मॉर्डन’ आईचे चित्त मात्र पिल्लापाशीच अडकलेले आहे. मुलांचे संगोपन आणि घराकडे लक्ष देण्यासाठी आयटी-सॉफ्टवेअर कंपन्यांमधील ‘वर्किंग मॉम’ वयाच्या पस्तीशीनंतर घरबसल्या नोकरीचा पर्याय निवडत आहेत. करिअर आणि कौटुंबिक जबाबदाऱ्यांचा समतोल साधताना कमी पगारात आणि पदोन्नती टाळून स्वखुशीने हा पर्याय निवडत असल्याची माहिती सर्वेक्षणातून पुढे आली आहे.

‘वर्क फ्रॉम होम’चा पर्याय निवडणाऱ्यांमध्ये ३५ ते ४५ वर्षे या वयोगटातील महिलांचा सर्वाधिक सहभाग आहे. लहान वयात मुलांना आईची जास्त गरज असल्याने या काळात नोकरीला ब्रेक घेऊन प्रवाहाच्या बाहेर पडण्याऐवजी घरी बसून काम करणे अधिक सोयीस्कर ठरते, असे मत महिलांनी व्यक्त केले आहे. ‘मदर्स डे’ निमित्त असोसिएटेड चेंबर्स ऑफ कॉमर्स ऑफ इंडिया (अॅसोचॅम) आणि जीएसएनच्या सर्वेक्षणातून हे निष्कर्ष पुढे आले आहेत.

गेल्या काही वर्षात एकत्र कुटुंब पद्धत कमी होत असताना नोकरदार महिलांची संख्याही वाढते आहे. मुलाच्या संगोपनाचा मुद्दा पुढे येतो, तेव्हा मुलांना सांभाळण्यासाठी घरी कोणीच नसते. अशा वेळी नोकरी की मुलांचा सहवास, याबाबत महिलांची द्विधा मनस्थिती होते. एकीकडे कंपनीत मोठ्या पदापर्यंत पोहोचण्याचे पाहिलेले स्वप्न आणि मुलांना लहान वयात आईची असलेली गरज या दोन्हीचा समतोल साधण्यासाठी त्या घरी बसून ऑफिसचे काम करण्याचा पर्याय निवडतात.

‘अॅसोचॅम’ने दिल्लीसह, महाराष्ट्र आणि कर्नाटकामध्ये सर्वेक्षण केले असून उच्चपदस्थ महिलांशीही संवाद साधण्यात आला. ‘वर्क फ्रॉम होम’चा पर्याय निवडण्यात दिल्ली पुढे असून दुसऱ्या क्रमांकावर बेंगळूरू, कर्नाटकातील इतर शहरे तर तिसऱ्या क्रमांकावर मुंबई आहे. दिल्लीतील २० टक्के महिलांनी हा पर्याय निवडला आहे. छोट्या शहरांमध्ये नोकरीच्या संधी मर्यादित असल्याने इच्छा असूनही त्यांना घरी बसणे शक्य नाही.

आधुनिक जीवनशैलीमुळे दैनंदिन खर्चाचे प्रमाण वाढत असल्याने महिलांना नोकरी सुरू ठेवायची आहे. घरी बसून काम करताना कमी पगार आणि पदोन्नतीला मुरड त्यांनी मान्य केली आहे. मुख्यतः आयटी, ग्राफिक डिझायनिंग, कन्टेंट रायटिंग, टेलिमार्केटिंग आणि डेटा एन्ट्री क्षेत्रातील महिलांचे यात सर्वाधिक प्रमाण आहे. घर से नोकरी (जीएसऩ) या संस्थेच्या सभासद महिलांमध्ये ६२ टक्के महिला एक ते दहा वर्षांचा नोकरीचा अनुभव असलेल्या आहेत. त्यांचे वय ३५ ते ४५ वर्षांच्या दरम्यान आहे. कौटुंबिक कारणांसाठी त्यांनी नोकरीला ब्रेक घेतला असून घरी बसून आम्ही ऑफिसपेक्षा जास्त काम करू शकतो, असे सत्तर टक्के महिलांनी नमूद केले.

सारे काही मुलांसाठी

घरच्या दैनंदिन जबाबदाऱ्यांसह ऑफिसला जाण्याता मुलांची शाळा, प्रोजेक्ट, त्यांचे वेगवेगळे क्लासचे नियोजन करताना धावपळ होते. खूप ताण येतो आणि मुलांनीही समाधानकारक वेळ देता येत नाही. यातून होणारी चिडचिड आणि ऑफिसची टार्गेट पूर्ण करण्याचा तणाव अनुभवताना धांदल उडते. यापेक्षा अलीकडे बहुतांश कंपन्यांमध्ये घरी बसून काम करण्याचा पर्याय उपलब्ध झाला आहे, यामुळे महिलांना करिअर आणि मुलांसाठी ‘क्वालिटी’ वेळ देणे सहज शक्य आहे, असे मत स्वखुशीने वर्क फ्रॉम होमचा पर्याय निवडलेल्या भक्ती मिश्रा यांनी व्यक्त केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चंद्रकांत पाटलांकडून दानवेंची पाठराखण

$
0
0

मटा ऑनलाइन वृत्त । पुणे

महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब दानवे यांची पाठराखण केली आहे. रावसाहेब दानवे यांच्या वक्तव्याचा विपर्यास केला गेला, असं पाटील म्हणाले.

रावसाहेब दानवे यांना शेतकऱ्यांच्या प्रश्नाची जाण आहे. ते कधी शेतकरीविरोधी बोलू शकत नाहीत. आणि राजीनामा मागण हे विरोधकांचं कामच आहे, असं चंद्रकांत पाटील म्हणाले.

‘तूर खरेदी करूनही रडतात साले’ असे वक्तव्य रावसाहेब दानवे यांनी काही दिवसांपूर्वी केले होते. जालन्यातील कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात त्यांनी हे वक्तव्य केलं होतं. दानवे यांच्या या वक्तव्यानंतर शिवसेनेसह विरोधकांनी राळ उठवली. राज्यात ठिकठिकाणी विरोधकांनी आंदोलन करत दानवेंविरोधात निदर्शनंही केली. यामुळे दानवेंच्या प्रकरणावर आता सरकारकडून सारवासारव करण्याचा प्रयत्न होतोय आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

निर्माते अतुल तापकीर यांची आत्महत्या

$
0
0

मटा ऑनलाइन वृत्त । पुणे

'मी आता कायम स्वरुपी माझ्या आईसोबत राहणार याचा मला खूप आनंद आहे', असं सुसाइड नोटमध्ये लिहित निर्माते अतुल तापकीर यांनी आज आत्महत्या केली. जागतिक मातृदिनाच्या दिवशी आणि अचानक घडलेल्या या दुःखद घटनेने मराठी चित्रपट उद्योगाला हादरा बसला आहे.

अतुल तापकीर यांनी पुण्यातल्या हॉटेल प्रेसिंडेटमध्ये विष प्राशन करुन आत्महत्या केली. आत्महत्येपूर्वी तापकीर यांनी फेसबुकवर सुसाइड नोट लिहिली आहे. पत्नी प्रियंकाशी सतत होत असलेल्या वादाला आणि तिच्या जाचाला कंटाळून आत्महत्या करत असल्याचं त्यांनी सुसाइड नोटमध्ये लिहिलंय.

अतुल तापकीर हे 'ढोल ताशे' या चित्रपटाचे निर्माते होते. ३ जुलै २०१५ हा चित्रपट प्रदर्शित झाला. जितेंद्र जोशी, हर्षिता भट्ट, अभिजित खांडकेकर अशा मोठ्या कलाकारांनी चित्रपटात भूमिका केली आहे. पण हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर आपटला आणि अतुल तापकीर यांचे मोठे नुकसान झाले.



'चित्रपटामुळे कर्जबाजारी झाल्याने पत्नी प्रियंकाने त्रास द्यायला सुरुवात केली. पण त्याकडे दुर्लक्ष करून प्रयत्न सुरुच ठेवले. नंतर दोघांमध्ये वाद होऊन भांडणं होऊ लागली. तिने सर्वत्र बदनामी सुरू केली आणि आपल्या भावांमार्फत मला मारहाणही केली. हे प्रकरण पोलिसात गेले. यामुळे गेल्या सहा महिन्यांपासून मी वेगळा राहतोय. माझ्या दोन मुलांपासूनही दूर ठेवले. पण आता हा त्रास सहन होत नसल्याने मी आत्महत्या करतोय, असं तापकीर यांनी आपल्या फेसबुक पेजवर टाकलेल्या पोस्टमध्ये लिहिलंय.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


गुड न्यूज... मान्सून अंदमानमध्ये दाखल

$
0
0

मटा ऑनलाइन वृत्त । पुणे

राज्याच्या वेगवेगळ्या भागात मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावलेली असतानाच हवामान खात्याकडून आनंदाची बातमी देण्यात आली आहे. यंदाचा मान्सून सात दिवस आधीच अंदमानात दाखल झाल्याची माहिती हवामान खात्याने दिली आहे.

मान्सून अंदमानच्या दक्षिण समुद्र, निकोबार बेट, आणि बंगालच्या उपसागराच्या काही भागात दाखल झाला असे हवामान विभागाने रविवारी दुपारी जाहीर केले. त्या परिसरात पडत असलेला पाऊस, वा-यांचा वेग या बाबी लक्षात घेऊन अंदमानमध्ये मान्सून दाखल झाल्याचे घोषित करण्यात आले आहे. पुढील ७२ तासात बंगालच्या उपसागरातील आणखी काही भाग, अंदमान समुद्राचा उर्वरित भाग, निकोबार बेटे आणि पूर्व मध्य बंगालच्या उपसागरात आगमन होण्याच्या दृष्टीने अनुकुल स्थिती असल्याची माहिती सुद्धा हवामान विभागाने दिली आहे.

सर्वसाधारणपणे दक्षिण पश्चिम मान्सूनचे आगमन २० मे रोजी अंदमानच्या समुद्रात होते. त्यानंतर २५ मेपर्यंत अंदमान बेट, श्रीलंकापासून म्यानमारपर्यंत आगमन होते़. त्यानंतर १ जून रोजी केरळ येथून प्रत्यक्ष भारतीय उपखंडात मान्सूनचा प्रवेश होतो़. त्यात काही वेळा पुढे मागे होतात. आताची पोषकस्थिती लक्षात घेता दरवर्षीपेक्षा साधारण ७ दिवस आधीच मान्सूनचे आगमन झाले आहे. दरम्यान, मंगळवारी मान्सून केरळमध्ये दाखल होणार असल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चितळे बंधूची ग्राहकांना दुपारची ‘साखर’भेट

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

आंबा बर्फी असो वा चक्का आणि बाकरवडी असो वा पेढे, ‘चितळे बंधू मिठाईवालें’कडे मिळणाऱ्या अशा चविष्ट खाद्यपदार्थांसाठी दुपारी करावी लागणारी प्रतीक्षा लवकरच संपुष्टात येण्याचे स्पष्ट संकेत रविवारी देण्यात आले. दुपारी एक ते चार खरेदीसाठी गेल्यास रिकाम्या हाताने परताव्या लागणाऱ्या ग्राहकांना ‘चितळें’नी सुखद धक्का दिला असून, येत्या एक जुलैपासून टप्प्याटप्प्याने शहरातील सर्व शाखांच्या वेळा बदलणार आहेत. दुपारी दुकान बंद ठेवण्याची ‘पुणेरी’ सवय मोडून चितळे यांनी ग्राहकांच्या सोयीसाठी हा लोकप्रिय निर्णय घेतला आहे.

विविध स्वरूपाची मिठाई आणि रुचकर खाद्यपदार्थांसाठी चितळे यांच्या दुकानात सकाळी आणि सायंकाळी नेहमीच गर्दी असते. परंतु, दुपारी १ ते ४ या वेळेत दुकान बंद राहत असल्याने बाहेरगावी जाणाऱ्या अनेक ग्राहकांचा हिरमोड व्हायचा. सध्याच्या बदलत्या युगात दुपारी दुकान बंद ठेवण्याच्या सवयीत बदल केला जावा, अशी आग्रही मागणी ग्राहकाकंडून सातत्याने केली जात होती. या मागणीचा योग्य सन्मान करत, अखेर पारंपरिक वेळेत बदल करत, दिवसभर सेवा उपलब्ध करून देण्याचा ग्राहकोपयोगी निर्णय चितळेंनी घेतला आहे. ठाण्यामध्ये रविवारी झालेल्या एका कार्यक्रमात ‘चितळे बंधूं’चे इंद्रनील चितळे यांनी हा निर्णय जाहीर केला.

‘दुकान दिवसभर सुरू ठेवण्यासाठी आम्ही प्रयत्नशील होतो. अनेक पदार्थ नाशवंत असल्याने त्यांची विशेष काळजी घेणे, खाद्यपदार्थांची उपलब्धता याचे नियोजन विचारात घेणे आवश्यक होते. आधुनिक तंत्रज्ञान आणि नव्याने केलेल्या काही बदलांमुळे दुकानाची वेळ वाढविणे शक्य होणार आहे. येत्या १ जुलैपासून आम्ही दुपारी १ ते ४ दुकान सुरू ठेवण्याचा निर्णय़ घेतला असून, टप्प्याटप्याने सर्व शाखा या वेळेत सुरू राहतील’, असे चितळे यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दानवे यांच्या वक्तव्याचा विपर्यास

$
0
0

महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांचा दावा

म. टा. प्रतिनिधी, पिंपरी
शेतकऱ्यांशी थेट संवाद साधण्यासाठी भाजपकडून आयोजित करण्यात येणारी संवादयात्रा ही प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्याच नेतृत्वाखाली आयोजित करण्यात येणार असून, दानवे यांच्या वक्तव्याचा माध्यमांनी विपर्यास केल्याचा दावा महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केला आहे.

पिंपरी येथील एका खासगी हॉस्पिटलचे उद्घाटन चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते रविवारी झाले. त्यानंतर पाटील यांनी माध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना दानवे यांची पाठराखण केली. ‘दानवे यांच्या वक्तव्यामुळे शेतकरी दुखावलाच नाही, केवळ माध्यमांनी त्यांच्या वक्तव्याचा विपर्यास केला,’ असा दावा या वेळी पाटील यांनी केला.

दरम्यान, संवाद यात्रा ही प्रामुख्याने पक्ष विस्तार करण्यासाठी काढली जात असून, शिवार सभा आणि शेतकरी संवाद हा त्याचाच एक भाग असल्याचा खुलासा देखील पाटील यांनी या वेळी केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ऑनलाइन बिलांत पुणेकर अव्वल

$
0
0

वीजबिलाचा ११९३ कोटींचा ऑनलाइन भरणा

म. टा. प्रतिनिधी, पुणे
महावितरणच्या वेबसाइट आणि मोबाइल अॅपद्वारे वीजबिलाची रक्कम ‘ऑनलाइन' भरण्यामध्ये पुणेकर हे राज्यात आघाडीवर आहेत. गेल्या आर्थिक वर्षात ६६ लाख ५० हजार पुणेकरांनी सुमारे ११९३ कोटी ८५ लाख रुपयांच्या वीजबिलांचा ‘ऑनलाइन’ भरणा करून राज्यात अव्वल स्थान मिळविले आहे.

महावितरणने लघुदाब वीजग्राहकांसाठी ‘ऑनलाइन’ बिल भरण्यासाठी www.mahadiscom.in या वेबसाइटद्वारे सोय उपलब्ध करून दिली होती. जून २०१६मध्ये वीजग्राहकांसाठी मोबाइल अॅपची निर्मिती करण्यात आली. या अॅपद्वारे चालू आणि मागील वीजबिल पाहणे आणि त्याचा ऑनलाइन भरणा करण्यासाठी नेटबँकिंग, क्रेडिट किंवा डेबिट कार्डासह मोबाइल वॉलेट व कॅश कार्डचा पर्याय उपलब्ध आहे. भरलेल्या पावतीचा तपशीलही मिळत आहे. वीजग्राहकांना त्यांच्या एकाच खात्यातून स्वतःच्या अनेक वीजजोडण्यांबाबतही सेवा उपलब्ध आहे. त्यामुळे पुणे परिमंडलात या आर्थिक वर्षात ३३३ कोटी २९ लाख रुपयांनी, तर ग्राहकसंख्येत १९ लाख १५ हजारांनी वाढ झालेली आहे.

पुणे परिमंडलात गेल्या वर्षभरात दरमहा सरासरी ९९ कोटी ४८ लाख रुपयांचा ‘ऑनलाइन’ भरणा झाला आहे. २०१५-१६ मध्ये हे प्रमाण सरासरी दरमहा ७१ कोटी ७१ लाख रुपये होते.

वीजबिलाच्या ‘ऑनलाइन’ भरणा करण्यामध्ये आघाडीवर असलेल्या पुणे, भांडूप व कल्याण परिमंडलात मागील आर्थिक वर्षाच्या तुलनेत २४७ ते ३३३ कोटी रुपयांनी वाढ झाली असल्याचे महावितरणकडून सांगण्यात आले. महावितरणने लघुदाब वीजग्राहकांसाठी वेबसाइट; तसेच मोबाइल अॅपच्या माध्यमातून ‘ऑनलाइन’ बिल भरणासह ई-मेलद्वारे वीजबिल मिळविण्याची सेवा उपलब्ध करून दिली आहे. गो-ग्रीन अंतर्गत; तसेच वीजबिलाच्या छापील कागदाऐवजी फक्त ई-मेलचा पर्याय स्वीकारल्यास दरमहा तीन रुपये सूट देण्यात येत असल्याचे महावितरणकडून स्पष्ट करण्यात आले.

ऑनलाइन भरणा

पुणे : ११९३ कोटी ८४ लाख
भांडूप : १०३१ कोटी ८१ लाख
कल्याण : ७९८ कोटी ८६ लाख
नाशिक : ३१४ कोटी
नागपूर : २३९ कोटी
कोल्हापूर : १९० कोटी
बारामती : २२८ कोटी
औरंगाबाद : १७७ कोटी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अंदमानात मान्सून दाखल

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
सर्वांनाच प्रतीक्षा असलेला मान्सूनने रविवारी भारताच्या अंदमान बेटांवर प्रवेश केला. मान्सून रविवारी अंदमान, निकोबार बेटांसह बंगालच्या उपसागराच्या काही भागात डेरेदाखल झाला. याच परिसरातील उर्वरित भागात येत्या ७२ तासात मान्सून दाखल होईल, असा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तविला आहे.

मान्सूनच्या सर्वसाधारण वेळापत्रकानुसार मान्सून २० मेपर्यंत अंदमानमध्ये दाखल होतो. यंदा मान्सून १५ मेपर्यंत अंदमानात दाखल होईल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला होता. प्रत्यक्षात १४ मे रोजीच म्हणजेच निर्धारित वेळेपेक्षा सहा दिवस आधीच मान्सून अंदमानात दाखल झाला. मान्सूनची इथून पुढची वाटचाल ही अनुकूल परिस्थिती निर्माण होण्यावर अवलंबून असते. मान्सून केरळमध्ये दाखल झाल्यानंतरच मान्सून खऱ्या अर्थाने भारतात दाखल झाल्याचे मानले जाते. सर्वसाधारण वेळापत्रकानुसार मान्सून एक जून रोजी केरळच्या किनारपट्टीवर दाखल होतो. मान्सून केरळमध्ये केव्हा दाखल होईल, याबाबत हवामान विभागाने कोणताही अंदाज अजून वर्तविलेला नाही.

पुण्यात शनिवारी सायंकाळी जोरदार पाऊस झाला. त्यानंतर रात्री आणि पहाटेही जोरदार पाऊस झाला. त्यामुळे रात्रीही झाडांच्या फांद्या कोसळण्याचे प्रकार घडले. शनिवारी सायंकाळी साडेपाच ते रविवारी सकाळी साडेआठ या वेळेत शिवाजीनगर येथे ४.६ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. याच काळात लोहगाव येथे १९.७ मिलिमीटर, तर पाषाण येथे ५.६ मिलिमीटर पावसाची नोंद झाली.

पुण्यात आजही पाऊस

दरम्यान, मध्य प्रदेशाच्या नैर्ऋत्य भागापासून उत्तर महाराष्ट्रापर्यंत कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. मराठवाडा ते तमिळनाडूचा दक्षिण किनारी भागापर्यंत कमी दाबाचा पट्टा आहे. त्यामुळे राज्यात पाऊस होत आहे. पुण्यात सोमवारी सायंकाळनंतर शहरात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 75772 articles
Browse latest View live


Latest Images

<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>
<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596344.js" async> </script>