Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

‘फेसबुक’वर पोस्ट टाकून चित्रपट निर्मात्याची आत्महत्या

0
0

अतुल तापकीर यांनी पत्नीच्या त्रासामुळे संपविले जीवन

म. टा. प्रतिनिधी, पुणे
मराठीतील ‘ढोल-ताशे’ या चित्रपटाचे निर्माते अतुल बाजीराव तापकीर (रा. पिंपळे निलख) यांनी प्रभात रोडजवळील हॉटेल प्रेसिडेंटमध्ये विष प्राशन करून आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार रविवारी सकाळी उघडकीस आला. तापकीर यांनी आत्महत्येपूर्वी फेसबुकवर ‘सुसाइड नोट’ पोस्ट केली असून, त्यामध्ये पत्नीच्या जाचाला कंटाळून आत्महत्या करीत असल्याचे म्हटले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अतुल तापकीर यांनी २०१५ मध्ये ‘ढोल-ताशे’ या मराठी चित्रपटाची निर्मिती केली होती. या चित्रपटामुळे त्यांचे नाव झाले. मात्र, त्यांना या चित्रपटामुळे आर्थिक तोटा झाला होता. त्यानंतर त्यांची पत्नी प्रियांका व अतुल यांच्यात वादाला सुरुवात झाली. प्रियांका यांनी आपल्याला घराबाहेर काढले; त्यांना भावाच्या मदतीने मारहाणही केली. तसेच, फोनवर शिवीगाळ केल्याचा आरोप अतुल यांनी त्यांच्या ‘सुसाइड नोट’मध्ये केला आहे. तापकीर दोन दिवसांपासून बेपत्ता होते. त्याचे मित्र व कुटुंबीय त्यांचा शोध घेत होते. तापकीर यांनी हॉटेल प्रेसिडेंट येथे ऑनलाइन खोली बुक केली होती. शनिवारी रात्री ते साडेनऊच्या सुमारास हॉटेलमध्ये गेले. त्यानंतर त्यांनी रात्री एकच्या सुमारास फेसबुकवर ‘सुसाइड नोट’ पोस्ट केली. त्यानंतर दारूमध्ये विष टाकून आत्महत्या केल्याचे प्राथमिक माहितीमध्ये समोर आले आहे.

सुसाइड नोटनंतर दुसरी ‘पोस्ट’

अतुल तापकीर यांनी आत्महत्या करत असल्याची पोस्ट फेसबुकवर मध्यरात्री एक वाजता टाकली. त्या वेळी काही मित्रांनी त्याला ‘लाइक’ केले. त्यावर तापकीर यांनी दुसरी पोस्ट टाकून ‘काय मित्र आहेत, मी आत्ता एक पोस्ट टाकली तर ती न वाचताच लाईक करताहेत,’ असे म्हटले आहे. त्यांच्या अनेक फेसबुक मित्रांनी असे करू नये, म्हणून सल्ला दिला आहे. तसेच, तापकीर यांनी फेसबुकवरील ‘सुसाइड नोट’मध्ये त्यांच्या मुलांना वडिलांनीच सांभाळावे. रोज मानसिक त्रास सहन होत नसल्यामुळे आत्महत्या करत असल्याचे म्हटले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


जनताच होणार ‘निर्माती’

0
0

पुणे : चित्रपटाला निर्माताच नाही, असा विचारही कोणी करू शकत नाही. पण महाराष्ट्राची जनताच निर्माती झाली तर…? ही संकल्पना जरी थोडी विचित्र वाटत असली तरी तळेगावच्या ओंकार ढोरे या तरुणाने ती प्रत्यक्षात आणण्याचा विडा उचलला आहे. लोकवर्गणीतून हा २१ वर्षीय तरुण ‘तालुका शांघाय’ नावाचा चित्रपट तयार करणार असून त्यासाठी तो महाराष्ट्राच्या सर्व जिल्ह्यांचा दौरा करणार आहे.

वर्षभर राज्यभर फिरून स्वेच्छेने लोकांकडून मिळालेल्या देणगीतून ओंकार हा चित्रपट साकारणार आहे. चित्रपटासाठी पैसे देणाऱ्या प्रत्येकाला तो निर्मात्याचा दर्जा देणार आहे. संपूर्ण महाराष्ट्रात १० लाख लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न या उपक्रमामार्फत केला जाणार आहे. सफाई कर्मचारी, भाजीवाले, फेरीवाले यांच्यापासून ते उद्योगपतींपर्यंत सर्वांकडून त्यांना जमेल ती रक्कम घेतली जाणार आहे. एवढे करून ओंकार थांबणार नाही. त्याने ‘पीपल सिनेमा’ या नावाने एक वेबसाइट सुरू केली असून एका मोबाइल अँड्रॉइड अॅपला ती जोडली आहे. त्याद्वारे प्रत्येक पैसे देणाऱ्या नागरिकाला ओंकारकडे किती पैसे जमा झाले, हे कळू शकणार आहे. शिवाय प्रत्येक महिन्याला पैसे देणाऱ्या प्रत्येक नागरिकाला ओंकार स्वतः एसएमएसद्वारे माहिती देणार आहे. पीपल सिनेमाच्या नावाखाली दुसऱ्या कोणी पैशांची मागणी करू नये, यासाठी ओंकारने खबरदारी घेतली आहे. लोकांचा या उपक्रमावर विश्वास बसावा, या उद्देशाने त्याने दोन लाख रुपये खर्च करून चित्रपटाचा टीजर तयार केला आहे. त्याद्वारे लोकांकडून जमेल त्या स्वरूपात निधी जमा करण्याचा त्याचा मानस आहे.

ओंकारने सुजय डहाके यांच्या ‘फुंतरू’ या सिनेमासाठी स्क्रिप्ट सुपरवायजर म्हणून काम पाहिले. ‘बार्डो’ या आगामी मराठी चित्रपटातही त्याने महत्त्वाची भूमिका बजावली. त्यानंतर ओंकारने तामिळनाडूचा रस्ता धरला. तिथे त्याने एका रशियन चित्रपटासाठी सहलेखक आणि सहदिग्दर्शकाची जबाबदारी सांभाळली. तिथे त्याला सर जॉन अब्राहम या दिग्दर्शकाविषयी माहिती मिळाली. त्यांनी १९८०च्या दशकात केरळमध्ये फिरून लोकवर्गणी गोळा करून मल्याळी भाषेत एक चित्रपट तयार केला होता. त्या काळी त्यांनी १५ लाख रुपये जमवले होते. सर जॉन अब्राहम हे एफटीआयआयचे माजी विद्यार्थी आहेत. त्यांच्यापासूनच प्रेरणा घेऊन ओंकारनेही लोकवर्गणीतून ‘तालुका शांघाय’ हा चित्रपट तयार करण्याचा घाट घातला आहे.

ग्रामीण भागातले बदलते जीवनमान, गावातील नव्या आणि जुन्या पिढीतील तात्विक संघर्ष या चित्रपटातून दाखवण्यात येणार आहे. चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी तळेगाव जवळच मावळ तालुक्यातील काही खेडेगावांची निवड करण्यात येणार आहे. चित्रपटाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये सेलिब्रिटी कलाकाराला घेण्याऐवजी मावळ तालुक्यातील ग्रामस्थच या चित्रपटात अभिनय करणार आहेत.

ओंकारसह त्याच्या चार मित्रांनी हा उपक्रम पूर्ण करायचे ठरवले आहे. शिवाय चित्रपटाच्या तांत्रिक बाबी चित्रपटसृष्टीत अत्यंत अनुभवी असणारी मंडळी सांभाळणार आहेत. त्यामध्ये ‘व्हेंटिलेटर’ या चित्रपटाचे संगीत दिग्दर्शक रोहन-रोहन, ‘सैराट’, ‘फँड्री’, ‘तिथी’ अशा चित्रपटांचे साउंड डिझायनर अविनाश सोनावणे अशा अनुभवी तंत्रज्ञ आणि कलाकारांचा समावेश असणार आहे.
.....
‘पीपल सिनेमा’ ही कल्पना चांगली आहे. परंतु, जी मंडळी पैसे देणार आहेत, त्यांची विश्वासार्हता जपण्यासाठी कायद्याच्या आधारे हा उपक्रम राबवणे गरजेचे आहे. कायद्याच्या चौकटीत हा उपक्रम बसला, तर त्यासाठी चित्रपट महामंडळाकडून त्वरीत परवानगी देण्यात येईल.
- मेघराजराजे भोसले, अध्यक्ष, अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ
.....
चित्रपटासाठी गोळा झालेल्या लोकवर्गणीतील प्रत्येक पैसा चित्रपट निर्मितीसाठी वापरणार आहोत. राज्यभर फिरताना राहण्याचा आणि खाण्याचा खर्चही आम्ही स्वतःच्या खिशातून करणार आहोत. हा चित्रपट माझे स्वप्न आहे. ज्यामध्ये महाराष्ट्रातील लाखो लोकांचा सहभाग असेल. त्यांचा चित्रपट म्हणून ते स्वतःहून पाहायला येतील.
- ओंकार ढोरे, दिग्दर्शक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

धर्मवीरगड जागवतोय स्मृती

0
0

छत्रपती संभाजी महाराजांच्या इतिहासाला उजाळा; गडाचे संवर्धन

पुणे : बाभळीच्या झाडांमध्ये हरवलेला, पायवाटांवर काट्यांचे साम्राज्य असणारा आणि अवशेषसंपन्न असूनही उपेक्षेच्या गर्तेत असणारा पेडगावचा भुईकोट उर्फ धर्मवीरगड आता कात टाकत आहे. गडावरच्या वास्तूंचे मोठ्या प्रमाणावर जतन-संवर्धन सुरू असून छत्रपती संभाजी महारांजाचे बलिदान आणि देदीप्यमान कारकीर्दीच्या स्मृती यानिमित्ताने जपल्या जात आहेत.

पुण्यातल्या श्री शिवदुर्ग संवर्धन संस्थेतर्फे पुरातत्त्व खात्याच्या मार्गदर्शनाखाली या गडाच्या जतन आणि संवर्धनाचे काम सुरू आहे. बादशहा औरंगजेबाची छावणी या गडात असताना छत्रपती संभाजीराजांना या ठिकाणी आणण्यात आले होते. त्यामुळे पेडगावच्या या भुईकोटाचे नामकरण धर्मवीरगड असे करण्यात आले. शंभू छत्रपतींच्या अखेरच्या काळातल्या स्मृतींचा जागर या ठिकाणी कायम व्हावा, या हेतूने संस्थेने गडाचे संवर्धन करण्यासाठी पावले उचलली. पेडगावातले ग्रामस्थ आणि तरुणांना सोबत घेऊन गडावर विविध कामे सुरू केली.

गडावर बाभळीची झाडे मोठ्या प्रमाणावर वाढल्याने तिथले अवशेष आणि तटबंदी त्याखाली झाकली गेली होती. त्यामुळे सर्वप्रथम अनावश्यक ठिकाणची झाडे काढून तटबंदी आणि अंतर्गत रस्त्यांची सफाई करण्यात आली. भीमा नदीपासून भूमिगत पाइपलाइन आणून गडावर विविध ठिकाणी पाणी फिरविण्यात आले आहे. दीड किलोमीटरची ही पाइपलाइन जुन्या काळातील खापराच्या पाणीपुरवठा नळांना समांतरच घेण्यात आली आहे. राजवाडा परिसराचे सुशोभीकरण सुरू आहे. तिथे कुंपण घालण्यात आले असून बगीचा बनविण्याचे काम सुरू आहे. गडात महामृत्यूंजय मंत्राचा जपही करण्यात आला.

ज्या जागी शंभूराजांना ठेवल्याचे सांगितले जाते, त्या ठिकाणी एक पुरातन मंदिराचा खांब आहे. त्या परिसराचे सुशोभीकरणही सुरू आहे. पुरातत्त्व विभागाशी बोलून थेट राजदरबारात जाणाऱ्या जुन्या रस्त्याचे कामही हाती घेण्यात आले आहे. त्यामुळे गडातले चौकही उजेडात आले आहेत. या ठिकाणी पुरातन मूर्ती, तसेच इतर अवशेषांचा ठेवाही मिळाला आहे. गडावर शिव आणि शंभूजयंतीही साजरी केली जाते. भविष्यात या ठिकाणी नक्षत्रवनही साकारले जाणार असल्याची माहिती संस्थेचे पंडित अतिवाडकर यांनी दिली. गडावर नियमित संवर्धनाचे काम सुरू असून शंभूराजांच्या स्मृती जपण्याच्या या कार्यात इतिहासप्रेमींना सहभागी होता येणार आहे. त्यासाठी संपर्क : ९८२२६७०५५८.

मंदिरांचेही जतन

धर्मवीरगड हा पूर्वी पेडगावचा भुईकोट किंवा बहादूरगड या नावाने ओळखला जात असे. हा गड पुरातन अवशेषांनीही समृद्ध आहे. गडामध्ये सुमारे आठ ते नऊ पुरातन मंदिरे असून ती शिल्पसमृद्ध आहेत. ही मंदिरे इसवी सन पाचव्या शतकातील, तसेच चालुक्य शैलीतली असल्याचा वास्तूतज्ज्ञांचा दावा आहे. यातील लक्ष्मीनारायणाचे मंदिर शिल्पकलेचा उत्कृष्ठ नमुना आहे. या पुरातन मंदिरांसह, हत्ती मोट, विहिरी, राजदरबार, वेशी, तटबंदी आणि नदीकाठचे भरभक्कम बुरूज असे अवशेष आजही पाहता येतात. पुरातत्त्व खात्यातर्फे मंदिराच्या जतनाचे काम सुरू आहे. पुण्यातून दौंडमार्गे देऊळगाव आणि तिथून पेडगाव असा सुमारे ११० किलोमीटरचा प्रवास करून इथे जाता येते. नगरहून श्रीगोंदा मार्गेही येथे जाता येते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अतुल तापकीर यांच्या आत्महत्येने खळबळ

0
0

पुणे : मराठीतील ‘ढोल-ताशे’ या चित्रपटाचे निर्माते अतुल बाजीराव तापकीर (रा. पिंपळे निलख) यांनी फेसबुकवर पोस्ट करून आत्महत्या केल्याने शहरात रविवारी खळबळ उडाली.

प्रभात रोडवरील प्रेसिडेंट हॉटेलमध्ये रविवारी सकाळी हा प्रकार उघडकीस आला. हॉटेलमधील कर्मचारी सकाळी दहा वाजता खोल्यांची स्वच्छता करण्यासाठी गेले. त्या वेळी सहाव्या मजल्यावरील खोली क्रमांक ६०६ मधून प्रतिसाद मिळाला नाही. मॅनेजरने दुसऱ्या चावीने खोलीचे दार उघडले. त्या वेळी त्यांना तापकीर खोलीमध्ये पडलेले दिसले; तसेच दारूचा अर्धा ग्लासही दिसला. त्यांनी त्वरित पोलिसांना माहिती दिली.

तापकीर यांची पोस्ट वाचून त्यांचे मित्र शोध घेत होते. ते डेक्कन परिसरात असल्याचे त्यांना समजले. ते डेक्कन पोलिस ठाण्यात आले होते. त्या वेळी पोलिस नियंत्रण कक्षातून हॉटेल प्रेसिडेंटमध्ये एका व्यक्तीने आत्महत्या केल्याची माहिती आली. पोलिस आणि तापकीर यांच्या मित्रांनी घटनास्थळी धाव घेतली. तापकीर यांचा मृतदेह ताब्यात घेऊन, पोलिस शवविच्छेदनासाठी तो ससून रुग्णालयात घेऊन गेले.

पोलिसांनी दहा हजार घेतल्याचा आरोप

‘मद्यपान केल्यानंतर पत्नीला शिवीगाळ केली. पण, तिने समजून न घेता पोलिसांकडे तक्रार केली. त्या वेळी अटक करू नये म्हणून पोलिसांनी दहा हजार रुपये मागितले. माझी बाजू समजून सांगितल्यानंतर मी बरोबर असल्याचे पोलिसांनी सांगितले. पण, पहिली तक्रार पत्नीने केली आहे. त्यामुळे अटक करावी लागेल म्हणाले. माझी मुख्यमंत्री साहेबांना एकच विनंती आहे, की जसे पोलिस महिलांची बाजू ऐकून घेतात तशीच बाजू पुरुषांचीही ऐकून घेतली पाहिजे. बरेच पोलिस माझे मित्र आहे. ते खूप चांगले आहेत, पण मला जो अनुभव आला मी त्या पोलिसांबद्दलची माझी भूमिका मांडतो आहे,’ असे तापकीर यांनी ‘सुसाइड नोट’मध्ये म्हटले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सोसायट्यांमध्ये विनापरवाना खरेदी-विक्रीचे व्यवहार

0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
राज्य सरकारकडून जमिनी घेऊन बांधण्यात आलेल्या शहरातील गृहनिर्माण संस्थांमध्ये विनापरवाना खरेदी विक्री आणि भाडेकरार झाल्याचे आढळून आले असून, संबंधित सोसायट्यांची महसूल विभागाकडून तपासणी करण्यात येणार आहे. तपासणीत दोषी आढळलेल्या सभासदांवर दंडात्मक कारवाई केली जाणार आहे.
गृहनिर्माण संस्थेसाठी सरकारी अधिकारी आणि कर्मचारी; तसेच बँक अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना सरकारी भूखंड देण्यात येतात. त्या भूखंडांवर सोसायटी बांधल्यानंतर परवानगी न घेता सदनिकांची विक्री करता येत नाही. मात्र, शहरात अनेक ठिकाणी सदनिकांची खरेदी विक्री आणि भाडेकरार झाल्याचे निदर्शनास आले आहे.
‘पुणे शहर, पिंपरी चिंचवड आणि जिल्ह्यामध्ये सुमारे २५० सोसायट्या आहेत. या सोसायट्यांमध्ये अनेकांनी घरांची परस्पर विक्री केली आहे. काहींनी घरे भाड्याने दिली आहेत. त्यांच्यावर शर्तभंगाची कारवाई केली जाणार आहे,’ असे तहसीलदार प्रल्हाद हिरामणी यांनी सांगितले.
‘संबंधित सोसायट्या या पुणे शहरामध्ये सर्वाधिक आहेत. या सोसायट्यांमध्ये मूळ सभासदांशिवाय अन्य कोणालाही सभासदत्व देता येत नाही. या सोसायट्यांमधील सदनिका विकताना अथवा भाड्याने देताना सरकारची सशुल्क परवानगी घेणे आवश्यक असते. घरे गहाण, तारण ठेवतानाही सरकारची शुल्क भरून परवानगी घेणे बंधनकारक आहे. मात्र, परवानगी न घेता सोसायट्यांमध्ये व्यवहार झाल्याने राज्य सरकारचा महसूल बुडाला आहे. या सोसायट्यांच्या तपासणीसाठी चौदा पथके नेमण्यात आली आहेत. मध्यंतरी निवडणुकांमुळे या सोसायट्यांच्या तपासणीचे काम थांबले होते. आता जून महिन्यापासून पुन्हा तपासणीला सुरुवात करण्यात येणार आहे.’ असे हिरामणी यांनी स्पष्ट केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नव्या गावांसाठी निधी नाही

0
0

पालिका हद्दीत समावेश होण्याबाबत सत्ताधारी पक्षाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह
म. टा. प्रतिनिधी, पुणे
शहराच्या आजूबाजूची ३४ गावे पालिका हद्दीत समाविष्ट करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हिरवा कंदिल दाखविला आहे. मात्र, असे असतानाही पालिकेत सत्ताधारी असलेल्या भारतीय जनता पक्षाने आपला पहिला अर्थसंकल्प सादर करताना ३४ गावांसाठी एक रुपया देखील तरतूद केलेली नाही. यामुळे पालिकेतील सत्ताधारी गावांचा समाविष्ट करण्यासाठी उत्सुक आहेत की नाही, असा प्रश्न विचारला जात आहे.
शहराच्या बाजूला असलेल्या गावांचा पालिका हद्दीत समावेश करावा, यासाठी हायकोर्टात याचिका दाखल करण्यात आली आहे. कोर्टाने राज्य सरकारला गावांबद्दल भूमिका स्पष्ट करण्यास सांगितले होते. सरकारने १२ जूनपर्यंत ठोस निर्णय घेण्याच्या सूचना कोर्टाने दिलेल्या आहेत. पुढील दोन आठवड्यात काही गावांमध्ये निवडणूक होणार असल्याने हडपसरचे आमदार योगेश टिळेकर, वडगाव शेरीचे आमदार जगदीश मुळीक आणि खडकवासल्याचे आमदार भीमराव तापकीर यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेऊन या ग्रामपंचायतींच्या निवडणुकीला स्थगिती देण्याबाबत राज्य शासनाने निवडणूक आयोगाला विनंती करावी, अशी मागणी केली. त्यावर मुख्यमंत्र्यांनी या गावांच्या निवडणुकींचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. त्यामुळे आता निवडणूक आयोगाच्या कामात हस्तक्षेप करणे योग्य ठरणार नाही, असे सांगत स्थगिती देण्यास असमर्थता दर्शविली. ही गावे महिनाभरात पालिकेत घेण्याचा निर्णय घेतला जाणार असल्याने संबंधित गावांच्या ग्रामस्थांनीच निवडणुकींवर बहिष्कार टाकण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे मुख्यमंत्र्यांनी या वेळी स्पष्ट केले.
मुख्यमंत्री फडणवीस गावांच्या समावेशाबद्दल सकारात्मक असल्याने आपण पालिका हद्दीत जाणार, या आशेवर ग्रामस्थ आहेत. गावांचा समावेश पालिकेत झाल्यानंतर पालिकेचे क्षेत्रफळ ४५० चौरस किलोमीटर होणार आहे. या गावांना आवश्यक त्या सोयीसुविधा पालिकेला द्याव्या लागणार आहेत. पालिकेच्या चालू वर्षाच्या अर्थसंकल्पात या गावांसाठी निधीची तरतूद केली जाइल, अशी अपेक्षा होती. स्थायी समितीचे अध्यक्ष मुरलीधर मोहोळ यांनी यासाठी निधीची तरतूद न केल्याने वेगवेगळ्या चर्चा सुरू झाल्या आहेत.
०००
पालिका हद्दीमध्ये अद्याप या ३४ गावांचा समावेश झालेला नाही. गावांचा समावेश होणार की नाही, याचा कोणताही स्पष्ट निर्णय झालेला नसल्याने पालिकेच्या अर्थसंकल्पात तरतूद केलेली नाही. गावांचा समावेश झाल्यानंतर विकासकामांसाठी निधी उपलब्ध करून देण्यात येईल.
- मुरलीधर मोहोळ, अध्यक्ष, स्थायी समिती

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

फुले वाडा होणार अधिक आकर्षक

0
0

नूतनीकरणाच्या दुसऱ्या टप्प्याचे काम लवकरच सुरू
म. टा. प्रतिनिधी, पुणे
मूळ मातीचे बांधकाम असलेल्या, परंतु आता सिमेंटचा वापर करून पुन्हा जशाच्या तशा उभारलेल्या भिंती, मोडकळीस आलेले छताची दुरुस्ती, महात्मा फुले व सा‍वित्रीबाई फुले यांच्या अर्धपुतळ्याभोवती आकर्षक मेघडंबरी, भव्य प्रवेशद्वाराची निर्मिती, वाड्याभोवतीची देखणी सीमा भिंत, तुळशी वृंदावन आणि विहिरीचा दगडी कठडा आणि बर्मा येथून आणलेल्या लाकडाचा आकर्षक वापर.., असे चित्र महात्मा फुले पेठेतील फुले वाड्यात पाहायला मिळत आहे. हा वाडा पूर्वी होता तसाच, पण अधिक अधिक आकर्षक दिसू लागला आहे.
स्वातंत्र्यपूर्व काळात अनेक समाजसुधारकांनी समाजसुधारणेची प्रेरणा मिळविलेले स्थान अशी ओळख असलेल्या महात्मा फुले वाड्याच्या ऐतिहासिक रूपाला धक्का न लावता नूतनीकरण करण्याच्या कामाचा दुसरा टप्पा लवकरच सुरू होणार आहे. २०१४ मध्ये या वाड्याच्या नूतनीकरणाच्या कामास मंजुरी देण्यात आली. प्रत्यक्षात २०१५ मध्ये कामास सुरुवात झाली. पहिल्या टप्प्यामध्ये वाड्याच्या मू‍ळ वास्तूची डागडुजी करण्यात आली आहे. त्याबरोबरच मेघडंबरी, तुळशी वृदांवन, सीमा भिंत, भव्य प्रवेशद्वार आदी कामे पूर्ण झाली आहेत. आता कामाचा दुसरा टप्पा सुरू होत आहे. त्यामध्ये महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्यामागे म्युरल वॉल, मागील बाजूचे प्रवेश द्वार, वाड्याच्या परिसरातील फ्लोअरिंग, आकर्षक विद्युत रोषणाई ही कामे केली जाणार आहेत.
वाड्याच्या नूतनीकरणाच्या कामाची पाहणी करण्यासाठी माजी आमदार कमल ढोले-पाटील यांनी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना पाचारण केले होते. वाड्याच्या नूतनीकरणाचे काम दोन वर्षांपूर्वी सुरू झाले आहे. तेव्हापासून आतापर्यंत केवळ २५ ते ३० टक्के काम झाले असल्याचे माजी आमदार कमल ढोले-पाटील यांचे म्हणणे आहे. सरकारच्या अनास्थेमुळेच हे काम रेंगळाले असल्याचा आरोप त्यांनी केला. ‘फुले वाडा पुरातत्त्व विभागाच्या ताब्यात असून, त्या भोवतीची जागा महापालिका प्रशासनाच्या ताब्यात आहे. त्यामुळे या वाड्याचे नूतनीकरण करताना महापालिकेकडून सहकार्य होणे गरजेचे आहे,’ असेही त्या म्हणाल्या.
............
वाड्याच्या छतासाठी ‘बर्मा टीकवूड’चा वापर करण्यात आला आहे. या लाकडामध्ये तेलाचे प्रमाण अधिक असल्याने या लाकडाचे आयुष्य अधिक असते. या वाड्याच्या जुन्या बांधकामातील वासेही वाचविण्यात आले असून, त्यांचा पुनर्वापर करण्यात आला आहे.
- अर्चना देशमुख, आर्किटेक्ट, फुले वाडा नूतनीकरण योजना

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रिक्त भूखंडांवर कचऱ्याचे साम्राज्य

0
0

बारामती नगर पालिकेचे दुर्लक्ष; सार्वजनिक आरोग्य धोक्यात
म. टा. प्रतिनिधी, बारामती
बारामती शहर आणि शहराच्या वाढीव हद्दीत असणाऱ्या रिक्त भूखंडांवर कचऱ्याचे साम्राज्य पसरले आहे. तांदुळवाडी, रूई, जळोची, शहरालगतचा इतर ग्रामीण भाग आदी ठिकाणी असणाऱ्या रिक्त भूखंडांवर मोठ्या प्रमाणात कचरा दिसून येत आहे. या साचलेल्या कचऱ्यामुळे आणि घाणीमुळे परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.
भूखंड माफियांनी तांदुळवाडी, रुई, जळोची, शहरालगत ग्रामीण भाग, शहरातील मध्यवर्ती ठिकाणी अनेक भूखंड खरेदी ठेवले आहेत. सदर भूखंड वापराविना पडून राहिल्याने आजूबाजूचे नागरिक केरकचरा व घरातील ओला कचरा येथे टाकतात. या भूखंडावर झाडेझुडपेही वाढली आहेत. त्यामुळे अनेक कीटक आणि सापही येथे आढळून आले आहेत.
रिक्त भूखंडमालकांना नगरपालिका प्रशासनाने वारंवार सूचना देऊनही भूखंड मालकांनी याकडे दुर्लक्ष केले आहे. रिकाम्या जागेवर कचरा टाकू नयेत अशी सूचना देऊनही या ठिकाणी कचरा टाकणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. मात्र, निष्क्रिय पालिका प्रशासन बघ्याची भूमिका चोख बजावत आहे. याबाबत नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
---------------
आरक्षित भूखंडांवर अतिक्रमण
शहरातील विकास आराखड्यामध्ये जनतेच्या उपयोगितेसाठी (ओपनस्पेस) आरक्षित भूखंड ठेवण्यात आले आहेत. मात्र, पालिकेच्या दुर्लक्षामुळे या जागांवरही अतिक्रमण झाले आहे. या जागा सुरक्षित राहाव्यात यासाठी पालिकेने प्रयत्न करण्याची गरज असल्याचे मत नागरिकांनी व्यक्त केले.
प्रशासनाने ठोस उपाययोजना केल्यास आपोआपच खुल्या जागांवरील अतिक्रमण थांबेल आणि कचऱ्याचे साम्राज्यही कमी होईल अशी अपेक्षाही नागरिकांनी व्यक्त केल्या.
--------------
दंड न भरल्यास लिलाव
रिक्त भूखंडांवर कचरा आढळून आल्यास संबंधित भूखंडधारकांकडून दंड वसूल करावा, अशी मागणी होत आहे. दंड न भरल्यास त्या जागेचा लिलाव करण्याची तरतूद असावी असे मतही नागरिकांनी व्यक्त केले.
-------------
बारामतीत विकासकामे करण्यासह नागरिकांच्या सार्वजनिक आरोग्याची काळजी घेण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करू. भूखंडधारकांवर कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश देण्यात येतील.
– पौर्णिमा तावरे, नगराध्यक्ष, बारामती नगरपालिका, बारामती
-------------
बारामतीकरांच्या आरोग्याबाबत पालिका प्रशासनाने निष्क्रियता दाखवल्यास संबधित अधिकाऱ्यांवर प्रथम कारवाई करावी. मोठे भूखंड हे धनिकाचे असल्यामुळेच प्रशासन कारवाई करत नाही.
- विजय शिंदे, नागरिक, बारामती

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


ग्रामीण रुग्णालयाचे बांधकाम निकृष्ट

0
0

ऑपरेशन थिएटर बंद; चाकणमध्ये रुग्णांची गैरसोय
म. टा. वृत्तसेवा, राजगुरुनगर
लाखो रुपये खर्चून बांधलेल्या चाकण ग्रामीण रुग्णालयाच्या इमारतीचे बांधकाम अत्यंत सुमार दर्जाचे करण्यात आले असल्याचे समोर आले आहे. या इमारतीच्या चारही बाजूच्या भिंतींना तडे गेले आहेत. त्यामुळे भविष्यात या इमारतींना धोका उत्पन्न होऊ शकतो. पाण्याच्या गळतीमुळे ऑपरेशन थिएटर बंद ठेवण्याची वेळ वैद्यकीय अधिकाऱ्यांवर येत आहे. याबाबत वारंवार पत्रव्यवहार करूनही संबंधितांकडून कोणत्याही प्रकारची दखल घेण्यात आलेली नाही.
चाकण बसस्थानकासमोर चाकण ग्रामीण रुग्णालय आहे. पेशंटची गर्दी होत असल्याने येथील जागा अपुरी पडू लागली. त्यामुळे याच इमारतीच्या मागे नवीन दोन इमारत बांधण्यात आली. अद्यापही दुसऱ्या मजल्याचे बांधकाम सुरू आहे.
दरम्यान तळजल्याचे बांधकाम पूर्ण झाल्यानंतर जुन्या जागेत सुरू असलेले रुग्णालय नवीन जागेत स्थलांतरित करण्यात आले. अपुऱ्या जागेअभावी रुग्णांची होणारी गैरसोय टाळण्यासाठी इमारत पूर्णत्वाचा दाखला नसतानाही रुग्णालय प्रशासनाने तळमजल्याचा वापर सुरू केला. त्यामुळे वरच्या मजल्याचे बांधकाम चालू व खालच्या तळमजल्यावर रूग्णालय अशी परिस्थिती आहे.
तळमजल्याच्या छताला चांगल्या पद्धतीने जलरोधन न केल्यामुळे तळमजल्यावर मोठ्या प्रमाणात पाण्याची गळती सुरू झाली. ऑपरेशन थिएटर, लेबर रूम आदी ठिकाणी मोठ्या प्रमाणात गळती होत आहे. त्यामुळे काही वेळा ऑपरेशन थिएटर बंद ठेवण्याची वेळ येत आहे. भिंती आणि छताला मोठ्या प्रमाणात ओलावा आला आहे. परिणामी रुग्ण आणि नातेवाइकांना मनस्ताप होत आहे. याबाबत प्रशासनाने संबंधित जबाबदार अधिकारी व ठेकेदार यांना वारंवार सांगून त्यांच्याकडून कोणतीही कार्यवाही करण्यात आलेली नाही. जुन्या इमारतीतील शवविच्छेदन खोलीची अवस्था दयनीय झाली आहे. त्यामुळे शवविच्छेदन करताना मोठा त्रास सहन करावा लागतो.
...
‘निकृष्ट बांधकामाची चौकशी व्हावी’
नवीन बांधकाम असूनही जिन्याच्या छताला मात्र जुनाच पत्रा बसविण्यात आलेला आहे. याबाबत बोलताना ग्रामीण रुग्णालय चाकणचे वैद्यकीय अधिकारी डॉ. एम. बी. कनकवले म्हणाले, ‘सदर इमारतीचे बांधकाम समाधानकारक झालेले नाही. बांधकाम करताना महत्त्वाच्या गोष्टींकडे दुर्लक्ष करण्यात आलेले आहे. याबाबत संबंधित अधिकारी व ठेकेदारांना वारंवार सांगूनही त्याचा काहीही उपयोग झालेला नाही. या कामाची चौकशी होणे गरजेचे आहे.’ दरम्यान संबंधित सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांची प्रतिक्रिया मिळू शकली नाही.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सांस्कृतिक पर्यटनाची गरज

0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

ग्रामीण भागाची ओळख असलेले पारंपरिक खेळ, भारुड, वासुदेव आणि सांस्कृतिक कार्यक्रमांची ओळख मुलांना असावी, या उद्देशाने शहरी पालक कृषी पर्यटन केंद्रांकडे सांस्कृतिक उपक्रमांची मागणी करीत आहेत. एवढेच नव्हे; तर सेंद्रिय पालेभाज्यांनाही या पर्यटकांची विशेष पसंती मिळते आहे. कृषी पर्यटन केंद्रांमुळे ग्रामीण भागाची नाळ तुटलेल्या पर्यटकांना पुन्हा एकदा गावाबद्दल ओढ निर्माण झाली आहे.

नैसर्गिक संकटांमुळे निराश झालेल्या शेतकऱ्यांना शेतीला पूरक अर्थार्जनाचे साधन मिळावे, या हेतूने दहा वर्षांपूर्वी कृषी पर्यटन ही संकल्पना अस्तित्वात आली. गावांपासून दुरावलेल्या शहरी पर्यटकांना डोळ्यांसमोर ठेवून कृषी पर्यटनाची दिशा निश्चित करण्यात आली. पर्यटकांना ग्रामीण जीवनशैली अनुभवायला मिळावी, गावरान जेवण, शेतात काम करण्याची संधी मिळावी या उद्देशाने केंद्रांनी सुविधा उपलब्ध केल्या. विशेष म्हणजे शहराप्रमाणेच अत्याधुनिक सुविधा देणाऱ्या हॉटेल व्यावसायिकांची मोठी स्पर्धा असतानाही, गेल्या दहा वर्षांत राज्यातील कृषी पर्यटन केंद्रांनी चांगला जम बसवला आहे.

राज्यात सध्या साडेतीनशेहून अधिक कृषी पर्यटन केंद्र आहेत. यातील आठ ते दहा केंद्रांचे वार्षिक उत्पन्न आता ५० लाख रुपयांच्या पुढे गेले आहे. तीसहून अधिक केंद्रे वर्षाला ३० लाखांपेक्षा जास्त उत्पन्न मिळवतात; तर तीस टक्के केंद्रात १० लाखांपेक्षा जास्त उत्पन्न आहे. पर्यटकांच्या आदरातिथ्यात कमी पडलेली अथवा मार्केटिंगचे तंत्र आत्मसात करण्यात कमी पडलेली काही केंद्रे बंद पडली असली, तरी नव्याने सुरू होणाऱ्या केंद्रांची संख्या दर वर्षी वाढते आहे, अशी माहिती महाराष्ट्र कृषी आणि ग्रामीण पर्यटन सहकारी संघाचे (मार्ट) अध्यक्ष बाळासाहेब बराटे यांनी दिली.

रोजच्या धावपळीच्या वेळापत्रकाला वैतागलेले नागरिक सुट्टीच्या काळात निवांत ठिकाणांच्या शोधात आहेत. बहुतांश पर्यटन स्थळेदेखील अलीकडे गजबजलेली असल्याने पर्यटकांना हवा असलेला नवीन पर्याय कृषी पर्यटन केंद्रातून मिळाला आहे. या केंद्रांमध्ये येणारा वर्ग हा कौटुंबिक असून मुलांना ग्रामीण भागाची ओळख करून देण्यावर त्यांचा भर दिसतो. पर्यटकांसाठी केंद्र चालकाने पारंपरिक खेळ, साहसी खेळ तसेच गावाची ओळख असलेले सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करावेत, अशी सूचना ते करीत आहेत. एवढेच नव्हे; तर अलीकडील काही वर्षांत पर्यटकांकडून आवर्जून सेंद्रिय भाजीपाल्याचीही मागणी होते आहे, असे बराटे यांनी सांगितले.

………

केंद्रचालकांना प्रशिक्षणाची गरज

पर्यटकांच्या मागण्यांनुसार कृषी पर्यटन केंद्रे बदलत आहेत. व्यावसायिक हॉटेलचालकांच्या तुलनेत पर्यटकांचा पाहुणचार, सोयीसुविधा देण्यामध्ये कृषी पर्यटन केंद्र काही प्रमाणात कमी पडतात. काळानुसार काही कृषी केंद्रांनी बदल आत्मसात केले आहेत. पण कृषी पर्यटनाला चालना देण्यासाठी या केंद्रचालकांना वेळोवेळी पर्यटकांच्या आदरातिथ्याचे प्रशिक्षण देण्याची गरज आहे, असे बाळासाहेब बराटे यांनी सांगितले.

पार्ट्यांना आवरा

कृषी पर्यटन केंद्रांच्या आराखडा आणि ‘मार्ट’च्या नियमानुसार केंद्रात मद्यपानास परवानगी नाही. त्यामुळे कौटुंबिक सहलींसाठी केंद्रात जाणाऱ्यांचे प्रमाण मोठे आहे. मात्र गेल्या काही वर्षांत कृषी पर्यटन केंद्रांनीही मद्यविक्री सुरू करावी अशी वारंवार मागणी उपद्रवी पर्यटकांनी सुरू केली आहे. परिणामी सर्व नियम धाब्यावर ठेवून पैसे कमविण्याच्या उद्देशाने मावळ, मुळशीसह पश्चिम महाराष्ट्रातील कृषी पर्यटन केंद्रांनी अवैधरीत्या ‘ओल्या’ पार्ट्यांना प्रोत्साहन देण्यास सुरुवात केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कचरा समस्येसाठी पाच जूनपासून जागृती

0
0

म. टा. प्रतिनिधी, पिंपरी

भविष्यात कचरा प्रश्न गंभीर होऊ नये यासाठी येत्या पाच जूनपासून पिंपरी-चिंचवडमध्ये जनजागृती मोहीम हाती घेतली जाईल, अशी माहिती महापालिकेचे आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी दिली.

पिंपरी-चिंचवड श्रमिक पत्रकार संघातर्फे आयोजित वार्तालाप कार्यक्रमात ते बोलत होते. भविष्यात शहराला भेडसावणाऱ्या प्रश्नांबाबत आत्तापासूनच उपाययोजना हाती घेण्यात येतील, असे स्पष्ट करून हर्डीकर म्हणाले, ‘शहरातील कचरा प्रश्न गंभीर होऊ लागला आहे. कचरा निर्माण होत असलेल्या ठिकाणीच ओला आणि सुका असे वर्गीकरण करण्यावर भर द्यावा लागणार आहे. कचऱ्यावरील तांत्रिक प्रक्रिया अधिक वाढवून मिश्र कचऱ्यावर तात्काळ निर्णय घ्यावा लागणार आहे. या अनुषंगाने येत्या पाच जूनपासून शहरात व्यापक जनजागृती करणार आहे. त्याबाबतची नियमावली तयार करून नागरिकांचा सहभाग वाढविणार आहोत.’

ते म्हणाले, ‘शहरात वैयक्तिक शौचालयांच्या उभारणीबरोबरच सार्वजनिक शौचालये, स्वच्छतागृहे उभारण्यावर भर दिला जाईल. त्यासाठी विविध कंपन्यांच्या ‘सीएसआर’ फंडाची मदत घेता येईल. नागरिकांना शौचालय हवे असते. कचराकुंडी हवी असते. परंतु, ही बाब आपल्या दारासमोर नको, अशी त्यांची भूमिका असते. त्यामुळे स्थानिक नागरिक, पदाधिकाऱ्यांचा सहभाग घेवून काम करणे गरजेचे आहे. मोशी आणि पुनावळे येथील कचरा डेपोच्या जागांबाबत माहिती घेऊन योग्य कार्यवाही करण्यावर भर दिला जाईल.’

तक्रारींची दखल घेऊ

डिसेंबर २०१५नंतरच्या शहरातील अनधिकृत बांधकामांवर हातोडाच पडणार आहे, असे हर्डीकर यांनी एका प्रश्नाला उत्तर देताना नमूद केले. शासनाच्या नियमांचे नागरिकांनी पालन करावे. परवानगी घेऊनच बांधकाम करावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. शहरातील नागरिकांनी त्यांच्या अर्जाद्वारे कळवाव्यात. या प्रत्येक अर्जावर सेवा अधिकार अधिनियमानुसार (राईट टू सर्व्हिस) प्रशासनाने उत्तर देण्याची जबाबदारी आहे. मात्र, कोणी नागरिकांच्या हक्कांची पिळवणूक करून प्रशासन दिरंगाई करीत असेल, तर माहितीच्या अधिकारानुसार माहिती मागा. सारथी, लोकशाही दिन, आपले सरकार वेबसाइटवर तक्रारी कराव्यात. किंबहुना नागरिकांनी बिनदिक्कतपणे गोपनीय तक्रारी अर्ज द्या. व्हॉट्‌सअप, एसएमएस करा त्याची दखल घेतली जाईल, असे हर्डीकर यांनी स्पष्ट केले. प्रास्ताविक संघाचे अध्यक्ष सुनील लांडगे यांनी केले. दिपेश सुराणा यांनी स्वागत केले. संदेश पुजारी यांनी आभार मानले. अनिल कातळे यांनी सूत्रसंचालन केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

धरणातून गाळ काढण्यास प्रारंभ

0
0

म. टा. प्रतिनिधी, पिंपरी

पाणीसाठ्यात वाढ होण्याच्या उद्देशाने पवना धरणातून गाळ काढण्याच्या कामाला सोमवारपासून सुरवात झाली आहे. सलग दुसऱ्या वर्षी धरणातून गाळ काढण्यात येत असून, त्यासाठी खासदार श्रीरंग बारणे यांच्या विकास निधीतून खर्च केला जाणार आहे.

पवना धरणातून गाळ काढण्याच्या कामाला खासदार बारणे यांच्या उपस्थितीत प्रारंभ झाला. पाटबंधारे विभागाचे उपअभियंता नानासाहेब मठकरी, शाखा अभियंता मनोहर खाडे, शिवसेनेचे तालुकाप्रमुख राजू खांडभोर, विभागप्रमुख अमित कुंभार, नितीन बुटाला या वेळी उपस्थित होते.

गेल्या ५० वर्षांपासून पवना धरणातील गाळ काढला जात नाही. त्यामुळे पाणी साठण्यास अडथळा निर्माण होत असल्याच्या कारणावरून गेल्या वर्षापासून धरणातील गाळ काढण्यात येत आहे. त्यामुळे पाण्याच्या साठ्यात वाढ झाल्याचा दावा केला जात आहे. गाळ काढण्यासाठी गेल्या वर्षी बारणे यांनी खासदार निधीतून दहा लाख रुपये खर्च केले होते. त्या अनुषंगाने यंदाही तरतूद करण्यात आली असून, पावसाळा सुरू होईपर्यंत गाळ काढण्याचे काम चालू राहणार आहे.

बारणे म्हणाले, `पवना धरणातून पिंपरी-चिंचवडला पाणीपुरवठा होतो. या धरणात मोठ्या प्रमाणात गाळ साठला आहे. त्यामुळे पाणीसाठ्यात अडथळा निर्माण होतो. परिणामी पाणीटंचाईच्या समस्येला सामोरे जाण्याची वेळ येते. त्यामुळे धरणातून गाळ दर वर्षी काढण्यात येणार आहे. त्यामुळे पाणीसाठ्यामध्ये वाढ होऊ शकते. गाळ काढण्यासाठीचा खर्च खासदार निधीतून दिला जाईल.`

या कामाला जिल्हा परिषदेचे सहकार्य मिळत असून, पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनाही सहकार्याच्या सूचना जिल्हाधिकारी सौरभ राव यांनी दिल्या आहेत, असे बारणे यांनी नमूद केले. पाणीसाठा होण्याकरिता पिंपरी-चिंचवड महापालिकेनेही गांभीर्याने लक्ष द्यावे, अशी सूचना बारणे यांनी केली.

शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या पवना धरणामध्ये पुरेसा पाणीसाठा उपलब्ध असताना दिवसाआड पाणी देण्याचा महापालिकेचा निर्णय टँकर लॉबीला पाठीशी घालण्यासाठी घेतल्याचा आरोप खासदार श्रीरंग बारणे यांनी केला आहे. शहराला पूर्ववत रोज पाणीपुरवठा करावा, अशी मागणी त्यांनी महापौर नितीन काळजे आणि महापालिकेचे आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्याकडे केली आहे. पवना धरणात सध्या ३२ टक्के पाणीसाठा असून, तो एक ऑगस्टपर्यंत पुरेसा आहे. शिवाय गेल्यावर्षीच्या तुलनेतही मुबलक पाणी आहे. पुरेसा साठा, वेळेवर पावसाचा वेधशाळेचा अंदाज यानंतरही दिवसाआड पाणी देण्याचा निर्णय टँकरवाल्यांच्या हितासाठी आहे. शहरात सध्या पाण्यावाचून नागरिकांचे हाल होत आहेत, असेही बारणे यांनी म्हटले आहे. तसेच टँकरने पाणी पुरवठा करणारे वाटेल तसे दर लावत असून नागरिकांना नाहक पैसे मोजावे लागत आहे, या मुद्द्याकडे बारणे यांनी लक्ष वेधले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

थाटात रंगला ‘स्वरविलास’

0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

पावसाने भिजलेल्या मातीचा गंध आणि सोबत राग भैरवीने भारलेले वातावरण, एकीकडे हवेत गारवा निर्माण करणाऱ्या पावसाच्या सरी आणि दुसरीकडे मनाला थंडावा देणारे स्वर. सूर आणि पावसाचा अनोखा योग दोन दिवस जुळून आला आणि एक सुंदर सांगीतिक महोत्सव पुणेकरांनी अनुभवला.

निमित्त होते मनहर संगीत सभा आणि विलास जावडेकर यांच्यातर्फे आयोजित ‘स्वरविलास’ संगीत महोत्सवाचे. दोन दिवस चाललेल्या या महोत्सवात पावसासह सुरांनी हवेत गारवा निर्माण करून रसिकांना स्वरचिंब केले. महोत्सवाची सुरुवात कलापिनी कोमकली, पं. हेमंत पेंडसे आणि पं. शौनक अभिषेकी यांच्या गायनाने झाली. रविवारी सकाळच्या सत्रात अनुराधा कुबेर आणि पं. संजीव अभ्यंकर यांनी विविध रचना, रागदारी सादर करत महोत्सवाची सांगता केली.

‘थाट’ या संकल्पनेवर हा महोत्सव आधारला होता. पहिल्या दिवशी पं. हेमंत पेंडसे यांनी मनोरंजनी रागातील ‘सखी आनंद भजोरे’ ही रचना सादर केली. त्यानंतर त्यांनी सादर केलेल्या पिलू रागातील ‘बादल देख राही वो’ या रचनेने उपस्थितांची वाहवा मिळवली. पेंडसे यांना भरत कामत (तबला), चैतन्य कुंटे (संवादिनी), राधिका ताम्हणकर (गायन), सावनी लाड आणि पुष्कर देशपांडे (तानपुरा) यांनी साथसंगत केली. उत्तरार्धात कोमकली यांनी मुलतानी रागात ‘आवेगी याद’ या बंदिशीनं गायनाला सुरुवात केली. ‘दिल बेकरार’ या द्रुत बंदिशीसह रसिकांच्या आग्रहाखातर सहेली तोडी आणि ध्यानी रागही त्यांनी ऐकवला. त्यांचे सूर रसिकांच्या मनाला भेदणारे होते. कोमकली यांना प्रशांत पांडव (तबला) सुयोग कुंडलकर (संवादिनी), राधिका ताम्हणकर (गायन) मंगेश घाटपांडे आणि अमित मेनन (तानपुरा) यांची सुरेल साथसंगत लाभली. पं. शौनक अभिषेकी यांच्या सायंकालीन रागांच्या मैफलीने पहिल्या दिवसाची सांगता झाली. राग कौशिकानडा, ‘राजन के’ ही रचना त्यांनी सादर केली. त्यांना भरत कामत यांनी तबला, तर चैतन्य कुंटे यांनी संवादिनीवर साथसंगत केली.

दुसऱ्या दिवसाची सुरुवात अनुराधा कुबेर आणि पं. संजीव अभ्यंकर यांच्या गायनाने झाली. कुबेर यांनी अहिर भैरवी रागात ‘येवो म्हारो साजन’ ही विलंबित एकतालातील, तर ‘शिवहराये भवहरा’ ही द्रुत तीन तालातील बंदिश सादर केली. अभ्यंकर यांनी ‘आज राधे तोरे बदन पे श्याम मिले की छबी है...’ ही रचना सादर करत महोत्सवाचा समारोप केला. त्यांना प्रशांत पांडव (तबला), सुयोग कुंडलकर (संवादिनी), मृण्मयी फाटक (तानपुरा) यांनी साथ दिली. कार्यक्रमाचे निवेदन रवींद्र खरे यांनी केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

​ शहरात ‘संग्रहालयांचे प्रदर्शन’

0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

पुण्यातील ऐतिहासिक वारशाबद्दल नव्या पिढीमध्ये कुतूहल निर्माण व्हावे, या उद्देशाने आंतरराष्ट्रीय संग्रहालय दिनानिमित्त शहरातील १२ संग्रहालये एकत्र येऊन पहिल्यांदाच ‘संग्रहालयांचे प्रदर्शन’ भरविणार आहेत. येत्या १८ ते २० मे दरम्यान सिम्बायोसिस संस्थेच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाच्या प्रांगणात हे प्रदर्शन भरणार असून या संग्रहालयातील दुर्मिळ दस्तावेज मांडण्यात येणार आहेत.

सिम्बासोयिस संस्थेच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर संग्रहालयाच्या संचालिका डॉ. संजीवनी मुजुमदार म्हणाल्या, ‘सांस्कृतिक वारशाने समृद्ध असलेल्या पुण्यामध्ये दुर्मिळ वस्तूंचा संग्रह असलेली ३६हून अधिक संग्रहालये आहेत. देशभरातील उत्तम संग्रहालयांमध्ये पुण्यातील संग्रहालयांचा समावेश आहे. पण, नवी पिढी आणि गेल्या काही वर्षांत पुण्यात वास्तव्यास आलेल्या नागरिकांना यातील अनेक संग्रहालये माहिती नाहीत. त्यांच्यापर्यंत हा दुर्मिळ ठेवा पोहोचवण्याच्या उद्देशाने शहरातील १२ संग्रहालये पहिल्यांदाच प्रदर्शनासाठी एकत्र आली आहेत.’

प्रदर्शनामध्ये आमच्या संस्थेसह आफ्रो एशियन कल्चरल म्युझिअम, महात्मा फुले वस्तू संग्रहालय, दर्शन संग्रहालय, राजा दिनकर केळकर संग्रहालय, आर्य नागार्जून वस्तू संग्रहालय, जोशींचे रेल्वे प्रतिकृती, ब्लेड्स ऑफ ग्लोरी क्रिकेट संग्रहालय, डेक्कन कॉलेज पुरातत्त्व विभाग, आदिवासी संग्रहालय, सुभेदार धर्माजी खांबे राष्ट्रीय लष्करी वस्तू संग्रहालय सहभागी होणार आहेत. त्यांच्याकडील दुर्मिळ दस्तावेजांबरोबरच दुर्मिळ छायाचित्रे, वस्तू आणि स्मृतिचिन्हे या वेळी विक्रीसाठी उपलब्ध असतील. प्रदर्शन पाहिल्यानंतर लोकांचे कुतूहल वाढून त्यांनी पुढे प्रत्यक्ष सर्व संग्रहालयांना भेट द्यावी, यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत, असे केळकर संग्रहालयाचे सुधन्वा रानडे यांनी सांगितले.

येत्या १८ मेला सायंकाळी पाच वाजता राज्याचे पुरातत्त्व विभागाचे संचालक डॉ. तेजस गर्गे यांच्या हस्ते आणि सिम्बायोसिस संस्थेचे संस्थापक डॉ. शां. ब. मुजुमदार यांच्या अध्यक्षतेखाली प्रदर्शनाचे उद्घाटन होणार आहे. शहरातील सर्व संग्रहालयांची एकत्रित माहिती देणाऱ्या सचित्र माहिती पुस्तिकेचे प्रकाशनही या वेळी होईल. तीन दिवस चालणारे प्रदर्शन सर्वांसाठी विनामूल्य खुले असून सकाळी ११ ते ७ या वेळेत ते सुरू राहणार आहे, मुजुमदार यांनी सांगितले.

संग्रहालयांना द्या बस स्टॉपचे नाव

‘शहरातील दुर्मिळ संग्रहालयांची माहिती अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी ‘पीएमपीएमएल’ने तेथील बस थांब्यांना संग्रहालयाचे नाव द्यावे. या मुळे लोक कुतुहलातून संग्रहालयांकडे वळतील,’ अशी मागणी जोशी रेल्वे प्रतिकृती संग्रहालयाचे रवी जोशी यांनी केली.

ऐतिहासिक वारशांचा चालताबोलता इतिहास असलेल्या या संग्रहालयांकडे परदेशांत सन्मानाने बघितले जाते. मोठ्या संख्येने पर्यटक या संस्थांना भेट देतात. प्रशासनाच्या स्तरावरही या संस्थांना प्रोत्साहन दिले जाते. याच धर्तीवर आपल्याकडील संग्रहालयांना शासनाने सहकार्य केले पाहिजे. पुण्यामध्ये ३६हून अधिक संग्रहालये असून पुणे दर्शनच्या बसमधून यातील केवळ ३ ते ४ संग्रहालये दाखविण्यात येतात. प्रत्येकासाठी केवळ पंधरा मिनिटांसाठी वेळ मिळतो. त्यामुळे पर्यटकांना त्या वस्तूंचा आनंदही घेता येत नाही. हे चित्र बदलण्यासाठी संग्रहालयांसाठी स्वतंत्र सहल असावी, यासाठी आम्ही पीएमपीएमएलकडे पाठपुरावा करीत आहोत. याशिवाय, महापालिकेच्या ‘हेरिटेज सेल’ने संग्रहालयांचा स्वतंत्र हेरिटेज वॉक सुरू करण्याची मागणीही करीत आहोत, असे संजीवनी मुजुमदार आणि सुधन्वा रानडे यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘राजकीय हेतूपोटी खुळ्या कल्पना जिवंत’

0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

‘जुन्या गोष्टी बाजूला सारून नवनिर्मिती करण्याची क्षमता धम्मक्रांतीमध्ये आहे. आजपर्यंत अनेक धर्मांमध्ये क्रांती झाली. मात्र, त्यामध्ये बदल केले गेले नाहीत. काही लोकांनी केव‍ळ राजकीय हेतूपोटी धर्मातील बुरसटलेल्या कल्पना जिवंत ठेवल्या, अशी खंत रिपब्लिकन नेते एम. डी. शेवाळे यांनी व्यक्त केली.

‘आडकर फाउंडेशन’ आणि ‘श्यामची आई फाउंडेशन’तर्फे देण्यात येणारा ‘धम्मक्रांती पुरस्कार’ शेवाळे यांच्या हस्ते दादासाहेब सोनवणे यांना प्रदान करण्यात आला. त्या वेळी ते बोलत होते. सन्मानचिन्ह, सत्यशोधक फेटा, ग्रंथ असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. अ‍ॅड. प्रमोद आडकर, विठ्ठल गायकवाड आदी या वेळी उपस्थित होते.

शेवाळे म्हणाले, ‘अनेक धर्मांतील जाणकारांनी त्यांच्या अनुयानांना शिकण्यापासून वंचित ठेवले आहे. त्यामार्फत ते त्यांची राजकीय पोळी भाजून घेण्याचा प्रयत्न करीत आहेत. परंतु, धम्मक्रांतीमध्ये शिका, संघटित व्हा, संघर्ष करा, असा संदेश देण्यात आला आहे. आपला लढा ब्राह्मणविरोधी नाही, तर ब्राह्मणेतरवादी आहे.’

दादासाहेब सोनवणे म्हणाले, ‘रमाबाई आंबेडकरांचा ९.५ फूट पुतळा उभारण्याचा आणि तो राष्ट्रपतींच्या हस्ते बसविण्याचा मानस स्मारक समितीचा आहे. त्यासाठी १ लाख १ हजार महिलांना एकत्र करण्याचा प्रयत्न असेल. बहुजनांना अज्ञानी ठेवायचे. घोषणा, आश्वासन द्यायचे आणि राज्य करायचे, असे समीकरण सध्या सुरू आहे.’ कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उद्धव कानडे यांनी केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


मद्य व्यावसायिकांना परवानगीविना ‘अभय’ कसे ?

0
0


म. टा. प्रतिनिधी, पुणे
पुणे शहरातून जाणारे मात्र राष्ट्रीय आणि राज्य महामार्ग असलेले रस्ते महापालिकेच्या ताब्यात घेऊन या रस्त्यांवरील मद्य व्यावसायिकांना ‘अभय’ देण्यासाठी आखलेल्या योजनेवर विरोधकांनी जोरदार टीका केली आहे. मुख्यसभेच्या परवानगीविना प्रशासनाकडून सकारात्मक अभिप्राय कसा देण्यात आला, असा प्रश्न काँग्रेसकडून विचारण्यात आला आहे.
महापालिका आयुक्तांचे पत्र महापौर बंगल्यावर कसे पोहोचले? तेथे उपस्थित असलेल्या मद्यविक्री करणाऱ्या व्यावसायिकांना कसे देण्यात आले आणि त्यानंतर झालेले ‘फोटोसेशन’ जोरदार व्हायरल झाले आहे. महापालिका प्रशासन आणि भारतीय जनता पक्षाने (भाजप) सुप्रीम कोर्टाच्या आदेशाचा अनादर करत कायद्याची पळवाट शोधली असल्याची टीका विरोधकांकडून करण्यात येत आहे.
पुणे शहरातून जाणारे; मात्र राष्ट्रीय आणि राज्य महामार्ग असलेले रस्ते महापालिकेच्या ताब्यात घेण्याबाबत प्रशासनाला कोणताही अधिकार नसून तो सर्वस्वी मुख्यसभेला आहे. कोणते रस्ते ताब्यात घ्यायचे अथवा नाही याबाबत केवळ मुख्यसभाच निर्णय घेऊ शकते, असे असताना महापालिका आयुक्तांनी रस्त्यांसंदर्भात जे पत्र दिले आहे ती त्यांची वैयक्तिक भूमिका आहे. त्यामुळे मुख्यसभेच्या निर्णयाविना अथवा संमती नसताना पाठवण्यात आलेले पत्र कायदेशीर नाही, अशी टीका काँग्रेसचे नगरसेवक आबा बागूल यांनी केली आहे.
महापालिका आयुक्तांनी पाठवलेल्या या पत्रामुळे सुप्रीम कोर्टाच्या आदेशाची पायमल्ली होत आहे. विकासकामे असो किंवा शहरहितासाठी जे जे निर्णय घ्यावे लागतात, त्यासाठी महापालिकेच्या मुख्यसभेची मान्यता असणे आवश्यक असते. महानगरपालिकेच्या हद्दीतून जाणारे मात्र राष्ट्रीय आणि राज्य महामार्ग असलेले रस्ते यांची देखभाल, दुरुस्ती, विकसन व सुधारणा कामे महानगरपालिकेकडून करण्यात येत असतात. त्यामुळे रस्ते ताब्यात घ्यायचे किंवा नाही याचा निर्णय मुख्यसभाच घेऊ शकते आणि ते घटनात्मक दृष्टीने योग्य आहे, असे बागूल यांनी म्हटले आहे. पुणे महापालिकेचे आयुक्त कुणाल कुमार यांनी १२ मे रोजी सार्वजनिक बांधकाम विभागाला पत्र पाठवले असून त्यात त्यांनी शहरातील सर्व प्रमुख रस्ते जे राष्ट्रीय आणि राज्य महामार्ग यांच्या ताब्यात आहेत, अवर्गीकृत करून महापालिकेच्या ताब्यात देण्याबाबत अभिप्राय देण्यात आला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मेट्रोच्या नऊ स्टेशनच्या बांधकामासाठी प्रक्रिया सुरू

0
0


म. टा. प्रतिनिधी, पुणे
पुणे मेट्रो प्रकल्पाच्या पिंपरी-चिंचवड ते रेंजहिल्स दरम्यानच्या १०.७५ किमीच्या ‘प्राधान्य मार्गा’वरील नऊ स्टेशनच्या बांधकामासाठी महाराष्ट्र मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनने (महामेट्रो) निविदा प्रक्रिया सुरू केली आहे. मेट्रो स्टेशनच्या आराखड्यासाठी जागतिक स्तरावरील तज्ज्ञांची मदत घेण्यात येणार असतानाच, स्टेशनच्या बांधकामाच्या दृष्टीनेही महामेट्रोने एक पाऊल पुढे टाकले आहे.
शहरातील ३१ किमीपैकी पहिल्या टप्प्यात पिंपरी-चिंचवड ते रेंजहिल्सच्या मार्गाचे काम केले जाणार आहे. या मार्गाचे काम नुकतेच एनसीसी लिमिटेड कंपनीला देण्यात आले आहे. मेट्रोचा हा प्राधान्य मार्ग २०१९ च्या अखेरीपर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट असल्याने मेट्रोच्या नऊ स्टेशनच्या बांधकामासाठी निविदा प्रसिद्ध करण्यात आल्या असून, इच्छुक कंपन्यांना १३ जूनपर्यंत मुदत देण्यात आली आहे.
पिंपरी-चिंचवड, संत तुकाराम नगर, भोसरी (नाशिक फाटा), कासारवाडी, फुगेवाडी, दापोडी, बोपोडी, खडकी आणि रेंजहिल्स अशा नऊ स्थानकांच्या बांधकामासाठी सुमारे साडेचारशे कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित धरण्यात आला आहे. मेट्रोच्या नऊ स्टेशनसाठी प्रत्यक्ष बांधकाम सुरू करण्यापूर्वी महामेट्रोला त्यासाठी आवश्यक जागेचे भूसंपादन करावे लागणार आहे. पिंपरी-चिंचवड ते रेंजहिल्सचा मार्ग प्रामुख्याने रस्त्याच्या दुभाजकावरून आखण्यात आला आहे. त्यामुळे, मेट्रो मार्गिकेच्या बांधकामासाठी विशेष जागा ताब्यात घ्यावी लागणार नसली, तरी स्टेशनसाठी जागा ताब्यात घेण्याची प्रक्रिया महामेट्रोला सुरू करावी लागणार आहे. यामध्ये, काही सरकारी जागांचा समावेश असल्याने आगामी काळात त्यादृष्टीने नियोजन केले जाण्याची शक्यता आहे.

जिओ-टेक्निकल सर्वेक्षणाला सुरुवात
मेट्रोच्या प्राधान्य मार्गासाठी निविदा काढण्यापूर्वी महामेट्रोने संपूर्ण मार्गावर ‘जिओ-टेक्निकल’ सर्वेक्षण पूर्ण केले आहे. आता, एनसीसी लिमिटेड या कंपनीला हे काम मिळाले असून, येत्या काही दिवसांत प्रत्यक्ष काम सुरू होण्याची शक्यता आहे. तत्पूर्वी, संबंधित कंपनीकडून जिओ-टेक्निकल सर्वेक्षणाला सुरुवात करण्यात आली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

खोदाई शुल्कचा प्रस्ताव गेला कुठे ?

0
0

म. टा. प्र‌तिनिधी, पुणे
स्मार्ट ‌सिटी योजनेतंर्गत रस्ते खोदाईसाठी ‘एल अँड टी’ कंपनीला खोदाई शुल्क माफ करण्याच्या निर्णयावर जोरदार टीका झाली. या पार्श्वभूमीवर संबंधित कंपनीकडून नऊ कोटी रुपयांचे खोदाई शुल्क वसूल करावे की नाही, याचा प्रस्ताव पथ विभागाने आयुक्त कार्यालयाकडे पाठविला. मात्र गेल्या दीड महिन्यांपासून यावर काहीही निर्णय न झाल्याने हा प्रस्ताव कुठे गायब झाला, अशी चर्चा पालिकेत सुरू झाली आहे. विशेष म्हणजे हा प्रस्ताव नक्की कोणत्या कार्यालयाकडे आहे, याची काहीही माहिती पालिकेच्या पथ विभागाला नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
शहरातील कोणत्याही रस्त्यावर खोदकाम करण्याची मान्यता देताना पालिका संबंधित कंपनीकडून भुईभाडे तसेच खोदलेला रस्ता दुरुस्ती करण्यासाठीचे शुल्क घेते. खासगी कंपनी तसेच सर्वसामान्य नाग‌रिकांनी रस्ता खोदल्यास त्यांच्याक‍डून साडेपाच हजार प्रति रनिंग मीटर या दराने; तर सरकारी कंपन्यांकडून पावणेतीन हजार रुपये शुल्क घेतले जाते. सर्वसाधारण सभेने याबाबतचे धोरण तयार करून त्यानुसार अंमलबजावणी केली जाते. मात्र पालिकेच्या सर्वसाधारण सभेने तयार केलेल्या धोरणाकडे दुर्लक्ष करून महापालिका आयुक्त कुणाल कुमार यांनी शहरात मोफत वाय-फाय सुविधा देण्यासाठी एल अँड टी कंपनीस खोदकाम शुल्क माफ केले आहे. दरम्यान, नागरिकांना सेवा पुरविणाऱ्या महावितरण तसेच बीएसएनएल कंपनीकडून मात्र पालिका रस्ते खोदाईचे शुल्क घेत आहे.
आयुक्त कुमार यांनी या कंपनीवर केलेल्या मेहरबानीचे जोरदार पडसाद सर्वत्र उमटले होते. आयुक्तांच्या या भूमिकेवर कडक शब्दात टीका झाली होती. या कंपनीकडून नियमानुसार शुल्क वसूल करण्याची मागणी जोर धरत असल्याचे लक्षात आल्याने पथ विभागाने आयुक्त कार्यालयाकडे याबाबतचा प्रस्ताव मान्यतेसाठी पाठविला आहे. संबंधित कंपनीला देखील प्रशासनाने पत्र पाठवून खोदाई शुल्क म्हणून ९ कोटी रुपये भरावे लागतील, असे स्पष्ट केले आहे. पालिका आयुक्त कार्यालयामार्फत हा प्रस्ताव स्थायी समितीसमोर येणे अपेक्षित होते. मात्र एप्रिल महिन्यात पाठविलेल्या या प्रस्तावावर आयुक्त कार्यालयाने काहीही निर्णय न घेतल्याने दीड महिना उलटल्यानंतरही हा विषय स्थायी समितीसमोर आला नाही. हा विषय गुंडाळून संबंधित कंपनीकडून कोणतेही शुल्क वसूल केले जाऊ नये, यासाठी हा अट्टहास केला जात असल्याची चर्चा पालिकेत सुरू झाली आहे.

शुल्क वसुलीचा प्रस्ताव धूळ खात
प्रशासनाकडून कोणताही प्रस्ताव स्थायी समिती समोर ठेवायचा झाल्यास पालिका आयुक्तांच्या स्वाक्षरीने पाठविला जातो. प्रस्ताव आल्यानंतर आयुक्त संबंधित सर्व विभागाचे अभिप्राय त्यावर घेऊन हा प्रस्ताव नगरसचिव कार्यालयाकडे पाठवितात. त्यानंतर हा प्रस्ताव स्थायी समितीसमोर मांडला जातो. आयुक्तांकडे विभागाने पाठविलेला प्रस्तावावर सर्वसाधारण १५ दिवसांत निर्णय होते. मात्र, दीड महिन्यानंतरही एल अॅँड टी कडून शुल्क वसुलीचा प्रस्ताव आयुक्त कार्यालयात धूळ खात पडला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मराठी चित्रपट वितरकांच्या प्रतीक्षेत

0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

एकीकडे आशयघन मराठी चित्रपटांवर राष्ट्रीय पुरस्कारांची बरसात होत असताना दुसरीकडे मात्र याच चित्रपटांच्या निर्मात्यांना वितरक शोधण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे. वितरक मिळत नसल्याने अनेक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येऊ शकलेले नाहीत. गेल्या काही काळात ३५ ते ४० मराठी चित्रपट अद्यापही वितरकांच्या प्रतीक्षेत आहेत.

गेल्या वर्षभरात मराठी चित्रपटसृष्टीमध्ये अनेक आशयघन चित्रपटांची निर्मिती झाली आहे. या चित्रपटांनी देश-विदेशातील अनेक महोत्सवांमध्ये सहभाग घेतला. त्यामध्ये या चित्रपटांना नावाजले गेले. नुकत्याच पार पडलेल्या राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्यामध्येही ‘कासव’सारख्या मराठी चित्रपटाने बाजी मारत सुवर्ण कमळाचा मान मिळवला; परंतु या चित्रपटाला अद्याप वितरकांसाठी झगडावे लागत आहे. गेल्या काही वर्षांमध्ये ही परिस्थिती निर्माण झाली असून राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त अनेक चित्रपट अद्याप प्रेक्षकांसमोर येऊ शकलेले नाहीत.

‘बाबू बँड बाजा’, ‘जोगवा’, ‘कोर्ट’, ‘रिंगण’ असे अनेक चित्रपट राष्ट्रीय पुरस्कार आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कारांना गवसणी घालून आले. यातील अनेक चित्रपटांनी आंतरराष्ट्रीय महोत्सवापर्यंत मजल मारली. मात्र, त्यांना वाली मिळाला नाही. यातील काही चित्रपट उशिराने प्रदर्शित झालेही, पण प्रेक्षकांनीही त्याकडे पाठ फिरवली. त्यामुळे चित्रपटसृष्टीत चांगली कमाई करणारे मसालेदार चित्रपट आणि जागतिक चित्रपट क्षेत्रात नाव कमावणारे आशयघन चित्रपट, असे दोन भाग पडल्याचे चित्र आहे.

एकीकडे मराठी चित्रपटसृष्टीने कात टाकून दर्जेदार चित्रपट घडवावेत, अशी चर्चा केली जाते. प्रत्यक्षात मात्र, मराठी प्रेक्षक हा काही निवडक अपवाद वगळता आशयघन चित्रपटांकडे सातत्याने पाठ फिरवत आल्याचे चित्रपटांच्या व्यावसायिक कामगिरीतून समोर
आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जेक म्हणतो, धन्यवाद भाऊ

0
0

सोशल नेटवर्किंगनं जगाला जवळ आणलं असलं तरी माणसातल्या काही भिंती आजही टिकून आहेत. मात्र तो आला, त्यानं पाहिलं आणि भारतीय संस्कृतीच्या प्रेमात तो आकंठ बुडून गेला. अमेरिकेच्या जेक नॅपची महाराष्ट्रवारी त्याला भारतीय संस्कृतीची ओळख करून देणारी ठरली. मराठी शिकण्याची तयारी करणारा जेक आता ‘धन्यवाद भाऊ’ म्हणतच प्रतिसाद देतो.

फेसबुकवर जमलेली मैत्री, त्यातून नाशिकमधल्या युवकाला दिलेलं फोटोग्राफीचं काम, मग जमलेली दोस्ती, मित्राच्या लग्नाचं आमंत्रण मिळताच भारतभेटीची ओढ अमेरिकेतल्या जेक नॅप या युवकाच्या मनात निर्माण झाली. क्लाउड नाइन नामक व्यावसायिक फोटोग्राफी करणाऱ्या कंपनीचा मालक असणारा जेक भारतात, महाराष्ट्रात आला आणि अगत्यशील मराठी माणसाच्या प्रेमात पडला. ‘आयुष्यभर टिकेल अशी मैत्री मला महाराष्ट्रानं दिली, इथली संस्कृती सुंदर आहेच; पण माणसांनी एकत्र येऊन तिला समृद्ध केल्याचं मला जाणवलं. हेच वेगळेपण मला अधिक भावलं,’ असं जेक सांगतो.

भारतात येणं कसं झालं या विषयी बोलताना जेक म्हणाला, ‘मी अमेरिकेतल्या बेलिंगहॅमचा (वॉशिंग्टन). तिथं फोटोग्राफीची कंपनी मी चालवतो. फोटो एडिटींगचं काही काम आउटसोर्स केलं आहे. नाशिकमध्ये मला नकुल हा असं काम करणारा युवक मिळाला आणि आमची मैत्री जमली. त्यानं आमच्यासाठी भरपूर काम केलं. मला संस्कृती आणि माणसं समजून घेण्यासाठी प्रवास करायला फार आवडतं. नकुलच्या लग्नाचं आमंत्रण आलं आणि मी थेट भारतात दाखल झालो. कुडता आणि फेटा चढवून थिरकताना या संस्कृतीच्या प्रेमात पडलो.’

‘भारताची संस्कृती खूप समृद्ध आणि रंगांना सामावणारी आहे. इथं आल्यावर मला घरीच असल्यासारखं वाटलं. इथली खाद्यसंस्कृती आणि अगत्यानं मला प्रेमात पाडलं. काटेचमचे सोडून हातानं खाणं मला आवडू लागलं. इथलं बहुभाषिकपण मला भावलं. मराठीतले शब्द तर भन्नाट आहेत. जिथं संधी मिळेल तिथं म्हणी आणि या शब्दांचा वापर करायला मला आवडतं. मला तीन भाऊ आहेत आणि त्या सगळ्यांनाच इथं घेऊन यायचं माझं स्वप्न आहे. जगाच्या पाठीवर कुठंही गेलो, तरी माणूस एकच असल्याची जाणीव मला इथं आल्यावर झाली,’ असं सांगून ‘धन्यवाद भाऊ’, ‘हो’ असे अनेक मराठी शब्द शिकल्याचं जेक कौतुकानं सांगतो.

‘जगातल्या अनेक ठिकाणांना मी भेट दिली. भारतात पुन्हा पुन्हा यायला मला निश्चितच आवडेल. महाराष्ट्राचा इतिहास जाणून घेण्यात मला खूप रस आहे. आयुष्यभर पुरेल अशी मैत्री मला इथे मिळाली आहे. आता माझं कुटुंबच तयार झालं आहे. त्यांना भाऊ म्हणणं ही मी माझा सन्मानच समजतो,’ असंही जेक सांगतो.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images