Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

शहर भाजपला ‘त्या’घटनेची माहितीच नाही

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
स्वीकृत सदस्यांच्या निवडीवरून भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये झालेल्या जोरदार हाणामारीनंतर पक्षाकडे अद्याप या सर्व घटनेची माहिती उपलब्ध नाही. त्यामुळे, पक्षातील नेमक्या कोणत्या कार्यकर्त्यांवर शिस्तभंगाची कारवाई करायची, यावरून पक्ष संभ्रमावस्थेत असल्याचे दिसून येत आहे.
गेल्या मंगळवारी महापालिकेत स्वीकृत सदस्यांसाठी अर्ज भरायचे होते. पक्षाचे सरचिटणीस गणेश घोष यांच्याऐवजी माजी गटनेते गणेश बीडकर यांना संधी देण्यात आली. यामुळे, संतापलेल्या घोष यांच्या समर्थकांनी पालिकेतील सभागृहनेते आणि पक्षाच्या कार्यालयाची नासधूस केली. दोन्ही गटांमध्ये बाचाबाची आणि हाणामारी झाली. ही सर्व घटना भाजपच्या पालिकेतील पदाधिकाऱ्यांसह अनेकांनी ‘याचि देही याची डोळा’ अनुभवली असली, तरी पक्षाकडे त्याची कोणतीच माहिती अजूनही उपलब्ध झालेली नाही.
शिस्तबद्ध पक्ष म्हणून लौकिक असलेल्या भाजपच्या कार्यकर्त्यांनी बेशिस्त वर्तणूक करून पक्षाचे कार्यालय फोडण्याचा पराक्रम केला आहे. तर, हे कार्यालय फोडण्यावरून पक्षाचे विद्यमान सरचिटणीस गणेश घोष यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. त्यामुळे, शिस्तीचा भंग केल्यावरून पक्षातर्फे कारवाई केली जाणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या संदर्भात भाजपचे शहराध्यक्ष योगेश गोगावले यांच्याशी संपर्क साधला असता, ‘या सर्व प्रकरणाची माहिती अद्याप माझ्यापर्यंत पोहोचलेली नाही. ही सर्व माहिती घेण्याचे काम सुरू आहे. पुढील दोन दिवसांत सर्व सविस्तर माहिती मला मिळेल. त्यानंतर, त्याबद्दल बोलता येईल’, अशी भूमिका त्यांनी मांडली.
महापालिका निवडणुकीदरम्यान गटबाजीला लगाम घालण्यात पक्षाला बऱ्यापैकी यश मिळाले होते. महापालिकेतील सत्तेची सूत्रे स्वीकारल्यानंतर अवघ्या महिन्याभरात घडलेल्या या घटनेमुळे पक्षातील गटबाजी पुन्हा उफाळून आली आहे. माजी गटनेते बीडकर यांच्या नियुक्तीवरून अजूनही पक्षातील निष्ठावंत कार्यकर्त्यांमध्ये नाराजी पसरली आहे. काही ज्येष्ठ कार्यकर्त्यांनी नव्या नेतृत्वाला संधी देण्याची गरज व्यक्त केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


३१ मे पर्यंत ऑनलाइन कर भरल्यास सवलत

$
0
0





म. टा. प्रतिनिधी, पुणे
ऑनलाइन व्यवहारांना प्रोत्साहन देण्यासाठी महापालिकेचा मिळकत कर ऑनलाइन पद्धतीने भरणाऱ्या नागरिकांना वाढीव दोन टक्के सवलत देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पालिकेच्या सर्वसाधारण सभेत ही सवलत देण्याचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला. त्यामुळे ३१ मे पर्यंत पालिकेचा मिळकत कर ऑनलाइनद्वारे भरणाऱ्यांना याचा फायदा होणार आहे.
कॅशलेस व्यवहारांना चालना देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद देऊन पालिका प्रशासनाने ‘ऑनलाइन’ प्रॉपर्टी टॅक्स भरणाऱ्यांना पाच टक्के सवलत देण्याचा प्रस्ताव सर्वसाधारण सभेत मंजुरीसाठी ठेवला होता. मात्र, बहुमत असूनही गेल्या महिन्यात झालेल्या सर्वसाधारण सभेत पालिकेत सत्ताधारी असलेल्या भाजपला हा ठराव मंजूर करण्यात अपयश आले होते. एक महिना हा प्रस्ताव पुढे ढकलण्याचा निर्णय घेतल्याने पक्षाच्या नेत्यांनी भाजपच्या पालिकेतील पदाधिकाऱ्यांची कडक शब्दात कानउघडणी केली होती. गुरुवारी हा विषय मान्यतेसाठी आल्यानंतर ऑनलाइनप्रमाणेच रोखीने तसेच चेकद्वारे कर भरणाऱ्यांनाही सवलत द्या, अशी मागणी विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेस, शिवसेना तसेच राष्ट्रवादी काँग्रेसने केली.
शहरातील पन्नास टक्के नागरिक आजही रोखीने तसेच चेक, डीडीद्वारे मिळकतकर भरतात. त्यांनाही सवलत दिली पाहिजे, केवळ ऑनलाइन पद्धतीने व्यवहार करणाऱ्यांना सवलत दिल्यास इतरांवर अन्याय होईल, अशी भूमिका विरोधी पक्षनेते चेतन तुपे, काँग्रेसचे गटनेते अरविंद शिंदे, शिवसेनेचे गटनेते संजय भोसले यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांनी घेतली. १ एप्रिल ते ३१ मे या दोन महिन्यांच्या काळात मिळकतकर भरणाऱ्या सर्वांना पाच ते दहा टक्के सवलत दिली जाते. मग वाढीव सवलत केवळ ऑनलाइनसाठी देऊन इतरांवर अन्याय करू नये, असे मत विरोधकांनी मांडले. तर ‘ऑनलाइनसाठी सवलत दिली पाहिजे, असे मत भाजपच्या सभासदांनी व्यक्त केले. ऑनलाइन मिळकतकर भरणाऱ्यांना पाच टक्क्यांऐवजी दोन टक्के सवलत द्यावी, अशी उपसूचना बापूराव कर्णेगुरुजी यांनी मांडली. त्याला सभागृहात मान्यता दिल्याने ३१ मे पर्यंत मिळकतकर भरणाऱ्यांना वाढीव दोन टक्के सवलत मिळणार आहे.
पालिकेचा मिळकतकर ३१ मे पर्यंत भरणाऱ्या नागरिकांमधून प्रत्येक क्षेत्रीय कार्यालयाप्रमाणे १० नागरिक याप्रमाणे १५ क्षेत्रीय कार्यालयामधील १५० जणांचा ‘लकी ड्रॉ’ काढला जाणार आहे. यामध्ये १५ हजार रुपयांचे बक्षिस दिले जाणार आहे. ही रक्कम संबंधित व्यक्तीच्या मिळकतीवर जादा रक्कम भरून दाखविण्यात येणार आहे. ऑनलाइन पद्धतीने कर भरणाऱ्यांबरोबरच रोखीने तसेच चेकद्वारे कर भरणाऱ्यांमधून हा लकी ड्रॉ काढला जाणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महावितरण अधिकाऱ्यांची ऊर्जामंत्र्यांकडून कानउघडणी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
नागरिकांनी तक्रार केल्यावर त्या तक्रारींबाबत उत्तरे देताना महावितरणचे अधिकारी दिशाभूल करत असल्याचा अनुभव दस्तुरखुद्द ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनाच गुरुवारी घ्यावा लागला. तेव्हा मंत्र्यांचा पारा चढला आणि या कारभाराचे वाभाडे काढत, त्यांनी ‘यांचे इन्क्रिमेंट थांबवा, यांची पदोन्नती थांबवा, या अधिकाऱ्याची विदर्भात बदली करा’ अशा आदेशांच्या फैरी झाडल्याने अधिकाऱ्यांची पाचावर धारण बसली. आता संबंधित अधिकाऱ्यांना काही दिवसांमध्ये कारवाईला सामोरे जावे लागणार आहे.
बानवकुळे यांनी रास्ता पेठेतील मुख्यालयात जनता दरबार आयोजित करून नागरिकांच्या तक्रारी ऐकून अधिकाऱ्यांची कानउघडणी केली. या दरबारामध्ये ८५ प्रमुख तक्रारी आल्या होत्या. त्या तक्रारींची उत्तरे देतानाच बावनकुळे यांनी कारवाईचा बडगा उचलल्याने अधिकऱ्यांची भंबेरी उडाली. नागरिकांकडून आलेल्या तक्रारींवर अधिकारी कारवाई करत नसल्याचे दिसून येताच, बावनकुळे यांनी दरबारातच निर्णय घेण्यास सुरवात केली.
एखाद्या तक्रारीबाबत उत्तरे देताना काही​ अधिकारी वेळ मारून नेत होते. त्या अधिकाऱ्यांची बाजू प्रादेशिक संचालक संजय ताकसांडे आणि मुख्य अभियंता रामराव मुंडे हे घेत असल्याचे लक्षात आल्यावर बावनकुळे यांनी आदेश देण्यास सुरवात केली. ‘खोटे बोलणाऱ्या या अधिकाऱ्याचे इन्क्रिमेंट थांबवा. त्यांना पदोन्नती देवू नका. निलंबित करण्याबाबतची नोटीस काढा, त्यांची विदर्भात बदली करा.’ असे आदेश दिले. तेवढ्यावरच ते थांबले नाहीत, तर खोटी माहिती देणाऱ्यांची भर दरबारात खरडपट्टी काढली. त्यावर ‘साहेब चुकलो! पुन्हा चूक होणार नाही, एकदा माफ करा!’ अशा शब्दांत काही​ अधिकाऱ्यांनी माफी मागितली; पण संतापलेल्या बावनकुळे यांनी ‘चुकीला माफी नाही’ असे धोरण स्वीकारले. काही अधिकाऱ्यांनी ड्रेस कोडचे पालन केले नव्हते. त्यांना बावनकुळे यांनी चांगलेच सुनावले. ‘संघटनेचे नेते असला तरी हयगय केली जाणार नाही’ असा सज्जड दमही त्यांनी दिला.
दरम्यान, अखिल भारतीय ग्राहक पंचायतीचे बी. आर. खेडकर यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांकडून ई- मेलला उत्तरे देण्यात येत नसल्याची तक्रार केली; तसेच महावितरणकडून बिलांमध्ये स्वतंत्रपणे वहन आकार (व्हिलिंग चार्जेस) आकारण्यात येत आहे. ही आकारणी योग्य नसल्याचे म्हणणे मांडले.

मंत्र्यांनी दिला मोबाइल क्रमांक
वीजग्राहकांना महावितरण, महापारेषण आणि महानिर्मिती या कंपनीबाबत किंवा अधिकाऱ्याबाबत तक्रार असल्यास ती तक्रार एसएमएसद्वारे देण्याचे आवाहन बावनकुळे यांनी केले. त्यासाठी त्यांनी ९०४९४४४४४४ हा मोबाइल क्रमांक दिला आहे.

ट्रान्सफॉर्मेरचे भाडे मिळणार?
महावितरणकडून सोसायट्यांमध्ये ठेवण्यात येत असलेल्या ट्रान्सफॉर्मरचे भाडे दिले जात नसल्याची तक्रार स्वप्ना नारायण यांनी मांडली. त्यावर मुख्य अभियंता रामराव मुंडे यांनी भाडे देण्यात येत असल्याचे जनता दरबारात सांगितले. वास्तविक कोणत्याही सोसायट्यांना भाडे मिळत नसल्याची बाब त्यावेळी निदर्शनास आणून देण्यात आली. या पार्श्वभूमीवर बावनकुळे यांनी ‘पीएमआरडीएच्या हद्दीतील बांधकाम व्यावसायिकांनी मोठी संकुले उभारली आहेत; पण ट्रान्सफॉर्मर सोसायट्यांबाहेर ठेवली आहेत. ते ट्रान्सफॉर्मर ताबडतोब संकुलाच्या आवारात घ्यावे’ असे आदेश दिले. याबाबत अधिकाऱ्यांनी पाहणी करून सर्व ट्रान्सफॉर्मर सोसायट्यांच्या आवारात घेण्याचेही सुचवले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चतुरस्त्र लेखणीचा धनी हरपला

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

प्रा. रामनाथ चव्हाण यांनी आपल्या चतुरस्र लेखणीने दलित साहित्य आणि एकूणच मराठी साहित्य विश्वात महत्त्वाचे योगदान दिले. विविध विषयांवर संशोधन करून त्यांनी विपुल लेखन केले. चव्हाण यांनी अखिल भारतीय दलित नाट्य संमेलन, अखिल भारतीय नवोदित मराठी साहित्य संमेलन, अस्मितादर्शन साहित्य संमेलन, कडोली मराठी साहित्य संमेलन आणि दलित साहित्य विचारवेध संमेलन अशा विविध संमेलनांचे अध्यक्षपद भूषविले. चव्हाण यांना उत्कृष्ट साहित्यनिर्मितीबद्दल राज्य सरकारच्या सहा पुरस्कारांसह अनेक पुरस्कार मिळाले. महाराष्ट्र सरकारच्या विविध समित्यांवर सदस्य म्हणून देखील त्यांनी काम केले.
लेखक रामनाथ चव्हाण यांनी भटक्या-विमुक्तांच्या पालांवर, तांड्यांवर आणि वस्त्यांवर प्रत्यक्ष भटकून त्यांच्याशी जवळीक निर्माण करून या जमातींविषयी विपुल माहितीचे संकलन केले. भटक्या जमातींचा पूर्व इतिहास, त्यांच्या लोककथा, पुराणकथा, रूढी-परंपरा, देव-देवता, उत्सव, सण, विवाह संस्कार, काडीमोड व इतर न्यायनिवाडे, अंत्यविधी, व्यवसाय, भाषा, त्यांची जातपंचायत, काळानुसार या सगळ्यात झालेले बदल, त्यांचे प्रश्न याविषयी त्यांनी शक्य तितक्या तपशिलात माहिती गोळा केली. त्याच विपुल माहितीतून त्यांचा ‘भटक्या-विमुक्तांची जातपंचायत’ हा दस्तावेज पाच खंडांत प्रसिद्ध झाला. भटक्या विमुक्तांचे वेगळे जग समजून घेण्यासाठी सर्वसामान्य वाचकांबरोबरच संशोधक-अभ्यासकांसाठी, सामाजिक कार्यकर्त्यांसाठी मराठीतील हा एक महत्त्वाचा दस्तावेज ठरला.
प्रा. चव्हाण हे गेल्या काही दिवसांपासून आजारी होते. उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालविली. चव्हाण यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी महाराष्ट्र साहित्य परिषदेत ठेवण्यात आले होते. या वेळी केंद्रीय सामाजिक न्याय राज्य मंत्री रामदास आठवले, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. वासुदेव गाडे, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते उल्हास पवार, महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, कोषाध्यक्ष सुनीताराजे पवार, परशुराम वाडेकर, डॉ. सतीश देसाई, सुनील महाजन यांनी श्रद्धांजली वाहिली.

चव्हाण यांची ग्रंथसंपदा
भटक्या-विमुक्तांची जातपंचायत (पाच खंडातून सुमारे ५० जमातींवर लेखन), जाती व जमाती, भटक्या विमुक्तांचे अंतरंग, पारध, बिनचेहऱ्याची माणसं, गावगाडा : काल आणि आज, घाणेरीची फुलं, जगण्यासाठी, निळी पहाट, पुन्हा साक्षिपुरम, वेदनेच्या वाटेवरून, दलितांचा राजा : डॉ. बाबासाहेब आंबेडकर , आकाशवाणीसाठी नभोनाटिका, शृतिका, प्रासंगिक लेखन तसेच मराठी वृत्तपत्र, पत्रिकेमध्ये ललित, वैचारिक आणि सामाजिक लेखन.

प्रा. चव्हाण यांनी आपल्या साहित्यातून एक सक्षम भूमिका मांडली. भरकटणाऱ्या समाजाच्या वेदना, विद्रोह त्यांनी साहित्याच्या माध्यमातून देशासमोर मांडला. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीत ते पूर्णपणे बुडाले होते. साहित्याच्या माध्यमातून ते कायमच आपल्यात असतील. पुणे महापालिकेने चव्हाण यांच्या नावाने एखादे सभागृह बांधावे. त्यासाठीचा प्रस्ताव पाठवावा. माझ्या खात्याच्या माध्यमातून जी मदत करता येईल, ती मी करीन.
- रामदास आठवले, केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री

अण्णा भाऊ साठे अध्यासनावर कार्यरत असताना चव्हाण यांनी गावागावात जाऊन साहित्याच्या माध्यमातून मांडणी केली. त्यांनी बहुमूल्य लेखन केले. त्यांनी विद्यापीठात जे योगदान दिले ते विद्यापीठ कधीही विसरणार नाही.
- डॉ. वासुदेव गाडे , कुलगुरू, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘एफएसआय’चा रेट अद्याप जाहीर नाही

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
शहराच्या जुन्या हद्दीच्या विकास आराखड्याला (डीपी) मान्यता देऊन आता तीन महिन्यांपेक्षा अधिक काळ उलटला, तरीही अद्याप राज्य सरकारने प्रीमियम चटई क्षेत्र निर्देशांकाचा (एफएसआय) दर जाहीर केलेला नाही. त्यामुळे, शहर आणि परिसरात सध्या केवळ मूलभूत एफएसआयनुसारच बांधकामाला परवानगी दिली जात आहे.
राज्य सरकारने जानेवारीमध्ये शहराच्या डीपीला अंतिम मान्यता दिली. डीपीला मान्यता दिल्यानंतर काही दिवसांतच विकास नियंत्रण नियमावली (डीसी रूल्स) जाहीर करण्यात आली. यामध्ये, शहरातील मूलभूत एफएसआय वाढविण्यात आला होता. तसेच, प्रीमियम एफएसआयच्या माध्यमातून अतिरिक्त एफएसआय उपलब्ध करून देण्याचा पर्याय सुचविण्यात आला होता. प्रीमियम एफएसआयचा दर राज्य सरकारकडून निश्चित केला जाणार असला, तरी अद्याप त्याबाबत कोणताच निर्णय घेण्यात आलेला नाही.
शहराच्या जुन्या हद्दीमध्ये मूलभूत एफएसआयमध्ये वाढ करण्यात आली असली, तरीही जुन्या भागांमध्ये काही ठिकाणी टीडीआर वापरता येत नाही. त्यामुळे, या ठिकाणी अतिरिक्त एफएसआयची गरज भासते. अशावेळी जागामालक किंवा बांधकाम विकसकांना प्रीमियम एफएसआयद्वारे जादा एफएसआय घेण्याची मुभा असली, तरी त्याचा दरच अद्याप निश्चित झाला नसल्याने मूलभूत एफएसआयचा विचार करूनच बांधकामाचे नकाशे सध्या मंजुरीसाठी पाठवले जात आहेत. भविष्यात, प्रिमियम एफएसआय मिळाल्यास, नियोजनात पुन्हा बदल करावे लागणार असल्याने त्याचा निर्णय लवकर घेण्यात यावा अशी मागणी केली जात आहे.
प्रिमियम एफएसआयचा दर निश्चित करण्यात सरकारकडून चालढकल होत असतानाच, याद्वारे मिळणाऱ्या उत्पन्नाचा ५० टक्के निधीवर सरकारने हक्क सांगितला आहे. हा निधी सरकारच्या तिजोरीत जमा करण्याचे आदेश सरकारने पालिकेला दिले आहेत. हा निधी सरकारकडे वर्ग केला गेल्यास पालिकेतील विकास कामांकरिता उपलब्ध होणाऱ्या निधीवर परिणाम होण्याची भीती आहे. त्यामुळे, हा निर्णय रद्द केला जावा, अशी विनंती पालिकेकडून सरकारला केली जाणार असल्याचे संकेत पालिका आयुक्त कुणाल कुमार यांनी यापूर्वी दिले होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दोन तपांनंतर मूत्रपिंड प्रत्यारोपण

$
0
0

हृदयाचे ’रिट्रायव्ह’, मूत्रपिंड प्रत्यारोपण करणारे पहिले सरकारी हॉस्पिटल

म. टा. प्रतिनिधी, पुणे

ब्रेनडेड झालेल्या ३५वर्षे वयाच्या महिलेचे हृदय काढण्याची (रिट्रायव्ह) पहिली प्रक्रिया आणि गेल्या २४ वर्षानंतर पहिले मूत्रपिंड प्रत्यारोपण ससून हॉस्पिटलमध्ये करण्यात आले. अशा प्रकारचे अवयव प्रत्यारोपण करणारे ससून हे राज्यातील पहिले सरकारी हॉस्पिटल ठरले आहे.
काही महिन्यांपूर्वी एका ब्रेनडेड पेशंटचे हृदय काढण्याची प्रक्रिया होणार होती. परंतु, तांत्रिक कारणास्तव ते करता आले नाही. त्यावेळी पेशंटचे मूत्रपिंडासह यकृताचे दान करण्यात आले. त्यानंतर ससून हॉस्पिटलमध्ये हृदय ‘रिट्रायव्ह’ करण्याच्या प्रक्रियेला गुरुवारी मुहूर्त मिळाला.
‘एकाच वेळी दोन पेशंटना ब्रेनडेड म्हणून घोषित करण्यात आले. त्यातील एका महिलेचे हृदय काढण्यात आले. हृदय काढण्याची प्रक्रिया रात्री आठ वाजता करण्यात आली. दोनपैकी एक मूत्रपिंड ससून हॉस्पिटलमधील ज्येष्ठ पेशंटला देण्यात आले. ससूनमध्ये पहिले मूत्रपिंड प्रत्यारोपण रात्री उशिरापर्यंत सुरू होते. तसेच, दुसऱ्या एका ब्रेनडेड व्यक्तीचे यकृत आणि दोन मूत्रपिंड काढण्यात आले. हृदय काढण्याची प्रक्रिया करणारे ससून हे राज्यातील पहिले सरकारी हॉस्पिटल ठरले. तसेच पहिले मूत्रपिंड प्रत्यारोपण करण्यात यश मिळाले आहे,’ अशी प्रतिक्रिया ससून हॉस्पिटलचे अधिष्ठाता डॉ. अजय चंदनवाले यांनी व्यक्त केली.

‘प्रत्यारोपणाला गती येईल’
दरम्यान, ‘१९८७मध्ये ससून हॉस्पिटलमध्ये पहिले मूत्रपिंड प्रत्यारोपण करण्यात आले. त्यानंतर सुमारे १३ मूत्रपिंड प्रत्यारोपण ससूनमध्ये कऱण्यात आले. परंतु, १९९३ नंतर काही कारणास्तव प्रत्यारोपण ससूनमध्ये होऊ शकले नाही. २४ वर्षानंतर ससून हॉस्पिटलमध्ये हे पहिले मूत्रपिंड प्रत्यारोपण करण्यात आले आहे. त्यामुऴे प्रत्यारोपणाच्या प्रक्रियेला गती येईल,’ असा विश्वास मूत्रपिंड प्रत्यारोपण तज्ज्ञ डॉ. सुरेश पाटणकर यांनी 'व्यक्त केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आजपासून पुन्हा उचलणार कचरा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

देवाची उरुळी येथील कचराडेपोला लागलेली आग आटोक्यात आणण्याचे काम अद्याप सुरू असून आज, (शुक्रवार) २१ एप्रिलपासून डेपोमध्ये कचरा टाकण्यास सुरुवात होण्याची शक्यता आहे. कचरा डेपोत लागलेल्या आगीनंतरही शहरातील कोणत्याही भागात कचरा साठू दिलेला नाही. बहुतेक भागातील कचरा दररोज उचलण्यात येत असल्याचा दावा प्रशासनाने केला आहे.
उरुळी, फुरसुंगी येथील कचरा डेपोला लागलेल्या आगीमुळे गेल्या सहा दिवसांपासून डेपोत कचरा टाकणे बंद करण्यात आले आहे. त्यामुळे शहरातील काही भागात कचराकुंड्या भरून वाहत असल्याचे चित्र पहायला मिळत आहे. डेपोला लागलेली आग अजून पाच ते सहा दिवस तरी आटोक्यात येणार नसल्याचे अग्निशमन दलाने सांगितले. त्यामुळे या दोन्ही गावच्या ग्रामस्थांनी पालिकेच्या कचरागाड्या येऊ देणार नाही, अशी भूमिका घेतली आहे. मात्र कचराडेपोत कचरा टाकण्यास सुरुवात करणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले असल्याने शहरातील कचरा उचलला जाण्याची शक्यता आहे.
दरम्यान, शहरातील कचरा उचलला न गेल्यास आक्रमक भूमिका घेण्याचा इशारा काँग्रेस, राष्ट्रवादीसह शिवसेनेने दिला. बुधवारी सर्वसाधारण सभेत पक्षांनी आंदोलन करून प्रशासनाला वेठीस धरले होते. या पार्श्वभूमीवर महापौर मुक्ता टिळक आणि सभागृहनेते श्रीनाथ भिमाले यांनी घनकचरा व व्यवस्थापन विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक घेऊन कचरा उचलण्याबाबत सूचना केली. त्यामुळे शुक्रवारी सकाळपासून सर्व भागांतील कचरा उचलणार असल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रसिकांनी भरभरून दिले

$
0
0

ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी यांची भावना; जीवनगौरव प्रदान

म. टा. प्रतिनिधी, पुणे

‘आयुष्यात अनेक सुख-दुःखाचे प्रसंग आले, पण हरलो नाही. मेहनतीच्या जोरावर टेम्पो चालकापासून अभिनेत्यापर्यंतचा प्रवास अनुभवला. या संपूर्ण प्रवासात रसिकांनी भरभरून दिले, त्यांच्यासारखे अन्नदाते आहेत म्हणून मी आहे,’ असे सांगून ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी यांनी आपल्या भावनांना वाट करून दिली. आपल्या मिश्कील शैलीत दिलखुलास गप्पा मारून त्यांनी रसिकांची भरभरून दादही मिळवली.
निमित्त होते राजा परांजपे प्रॉडक्शन्सतर्फे आयोजित राजा परांजपे महोत्सवाच्या समारोप सोहळ्याचे... भरत नाट्य मंदिर येथे पार पडलेल्या या कार्यक्रमात जोशी यांना महापौर मुक्ता टिळक यांच्या हस्ते जीवनगौरव पुरस्काराने गौरविण्यात आले. लेखक, दिग्दर्शक प्रवीण तरडे, भारत देसडला, अजय राणे, अर्चना राणे, राजा परांजपे यांच्या कन्या नीला कुरूलकर आदी या वेळी उपस्थित होते. पुरस्कार वितरणानंतर प्रवीण तरडे यांनी जोशी यांची मुलाखत घेतली.
‘रसिकांनी आजवर भरभरून दिले आहे. ते नसते तर काहीच नसते. स्वामी समर्थांच्या भूमिकेमुळे काही रसिकांनी तर मला देवत्व बहाल करून टाकले. आजही अनेकदा लोक येऊन पाया पडतात तेव्हा अंगावर काटा येतो,’ असे सांगून जोशी यांनी देऊळबंद चित्रपटाच्या आठवणींवर प्रकाश टाकला. ‘आर या पार’ असा माझा स्वभाव आहे. एकदा ठरवले की करून सोडतो. त्यामुळेच अनेक कलाकार मला नावे ठेवतात. पण मी जे करतो ते रसिकांसाठी आणि कलाकारांसाठी करतो. मग त्यातून कोण दुखावते याची पर्वा करत नाही,’ असेही जोशी यांनी सांगितले.
मुक्ता टिळक म्हणाल्या, ‘एक उत्तम आणि दिग्गज कलाकाराच्या नावाने दिला जाणारा पुरस्कार तितक्याच ताकदीच्या व्यक्तीला दिला जात आहे. लहानपणी राजा परांजपेंचे चित्रपट मी आवर्जून बघायचे. त्यांनी आपला काळ खऱ्या अर्थाने गाजवला.’ कार्यक्रमाच्या उत्तरार्धात ‘लाखाची गोष्ट’ हा राजा परांजपे यांच्या चित्रपटातील गाण्यांचा कार्यक्रम झाला. रवींद्र खरे यांनी सूत्रसंचालन केले.

मुलाखत नक्की कुणाची?
ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी यांची मुलाखत घेण्याची जबाबदारी लेखक आणि दिग्दर्शक प्रवीण तरडे यांच्यावर होती. मुलाखतीला सुरुवात झाली. एकामागून एक प्रश्न विचारले जात होते. परंतु, ते प्रश्न इतके मोठे होते की जोशींना बोलायला पुरेसा वेळच उरत नव्हता. मध्येच तरडे एखाद्या आठवणीत रमून जात होते. त्यामुळे, मुलाखत नेमकी कुणाची सुरू आहे, अशी चर्चा सभागृहात रंगलेली पहायला मिळाली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


अवयवदानामुळे पाच जणांचा पुनर्जन्म

$
0
0

मंगेशकर, सह्याद्री, ससून हॉस्पिटलमधील पेशंटना अवयवदान

म. टा. प्रतिनिधी, पुणे

ससून हॉस्पिटलमधील दोन ब्रेनडेड पेशंटमुळे पुण्यातील ज्येष्ठ व्यक्तीसह पाच जणांना जीवदान मिळाले. आणखी दोन गरजू पेशंटचा मूत्रपिंड प्रत्यारोपणासाठी प्रादेशिक प्रत्यारोपण समन्वय समितीकडून रात्री उशिरापर्यंत शोध सुरु होता.
‘अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील ३५ वर्ष महिला पाण्याचे हंडे भरून डोक्यावरून घेऊन जाताना पडली. तिच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली, असता उपचारासाठी तिला १५ ए​प्रिलला ससूनमध्ये आणले. उपचारादरम्यान २० एप्रिलला तिला ब्रेनडेड म्हणून घोषित करण्यात आले. तिचे हृदय, यकृत आणि दोन मूत्रपिंडे काढण्यात आली. त्यापैकी एक हृदय रुबी हॉस्पिटलमधील पेशंटसाठी देण्यात आले. ससूनमधील प्रतीक्षा यादीतील एका पेशंटला तर नाशिकमधील अपोलो हॉस्पिटलमधील पेशंटला मूत्रपिंड देण्यात आले. तसेच यकृत हे दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमधील पेशंटला देण्यात आले,’ अशी माहिती प्रादेशिक प्रत्यारोपण समन्वय समितीच्या समन्वयक आरती गोखले यांनी दिली.
दरम्यान, मूत्रपिंडासाठी आणखी दोघा गरजू पेशंटचा रात्री उशिरापर्यंत शोध सुरू होता. त्यामुळे आतापर्यंत दोन ब्रेनडेड पेशंटमुळे पाच जणांना जीवदान मिळाले, असेही त्यांनी स्पष्ट केले.
मंचरमध्ये झालेल्या अपघातात ३३ वर्षीय पेशंट तात जखमी झाला होता. त्याला उपचारासाठी ससूनमध्ये १६ एप्रिलला आणण्यात आले होते. त्याला उपचारादरम्यान २० एप्रिलला ब्रेनडेड म्हणून घोषित करण्यात आले. या पेशंटचे एक यकृत आणि दोन मूत्रपिंड अवयवदान कऱण्यात आले. त्यापैकी यकृत सह्याद्री हॉस्पिटलमधील पेशंटना पाठविण्यात आले, असे ससूनचे अधिष्ठाता डॉ. अजय चंदनवाले यांनी सांगितले. ससूनमधील ब्रेनडेड पेशंटच्या नातेवाइकांनी अवयवदान करावे यासाठी सामाजिक कार्यकर्ते अर्जुन राठोड, एम. बी. शेळके यांनी परिश्रम घेतले. नातेवाइकांनी संमती दिल्यानंतर अवयवदानाच्या प्रक्रियेला गुरुवारी रात्री सुरुवात झाली. मूत्रपिंड प्रत्यारोपण तज्ज्ञ डॉ. सुरेश पाटणकर, डॉ. अभय सदरे, डॉ. दिलीप कदम, डॉ. राजेश श्रोत्री, डॉ. भालचंद्र कश्यपी, डॉ. निरंजन आंबेकर, डॉ. किरण जाधव, डॉ. हरीष टाटिया, डॉ. इब्राहिम अन्सारी यांनी प्रत्यारोपण प्रक्रिया यशस्वी केली.
‘ससूनमधील पेशंटचे काढलेले हृदय ग्रीन कॉरिडॉरद्वारे अवघ्या अडीच मिनिटांत रुबी हॉस्पिटलला पोहोचले. पावणेनऊ वाजण्याच्या सुमारास हृदय प्रत्यारोपणाला सुरुवात झाली. मार्केट यार्डात नोकरी करणाऱ्या ५१ वर्षाच्या एका व्यक्तीला कार्डिओमायोपॅथीचा आजार झाला होता. चार महिन्यांपासून ते हृदयाच्या प्रतीक्षा यादीत होते. अखेर त्यांना हृदय मिळाल्याने जीवदान मिळाले,’ असे रुबी हॉस्पिटलच्या वैद्यकीय सामाजिक कार्यकर्त्या सुरेखा जोशी यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रूपबंध ग्रंथाला यंदाचे कोठावळे पारितोषिक

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

केशवराव कोठावळे पारितोषिक समितीने यंदा ’केशवराव कोठावळे पारितोषिका’साठी सुप्रसिद्ध लेखक एस. डी. इनामदार यांची ‘रूपबंध : कला समीक्षा’ या ग्रंथाची निवड केली आहे. १५,१५१ रुपये आणि मानचिन्ह असे या पारितोषिकाचे स्वरूप आहे, अशी माहिती पुरस्कार समितीचे निमंत्रक अशोक कोठावळे यांनी दिली.
येत्या ५ मे रोजी सायंकाळी ६.३० वाजता डीपी रोडवरील मॅजेस्टिक बुक गॅलरीच्या शेजारील सिनेट हॉल येथे होणाऱ्या कार्यक्रमात सुप्रसिद्ध लेखिका माधुरी पुरंदरे यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. पुरस्कारविजता ग्रंथ प्रतिमा प्रकाशनने प्रसिद्ध केला आहे. या ग्रंथात पाश्चिमात्य आधुनिक दृक कलेतील विविध प्रवाह व त्यांच्या तत्त्वप्रणाली यांचा चित्रकला व शिल्पकला यांच्या अनुषंगाने ऐतिहासिक आढावा घेतला आहे.
सोळाव्या शतकापासून विसाव्या शतकाच्या उत्तरार्धापर्यंतच्या काळातील काही प्रमुख चित्रकार व शिल्पकार यांचे जीवनचरित्र, तत्कालीन राजकीय-सामाजिक-सांस्कृतिक पर्यावरण तसेच कलावंतांच्या गाजलेल्या कलाकृतींचा परिचय लेखकाने समीक्षेसह करून दिला आहे. एका कलाप्रवाहातून दुसरा प्रवाह कसा निर्माण झाला, याचा रंजकपद्धतीने आढावा पुस्तकात घेतला आहे. प्रा. प्रतिभा कणेकर, संजीवनी खेर आणि चंद्रकांत भोंजाळ यांच्या निवड समितीने ही निवड केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

संमेलनाआधीच मानापमान नाट्य

$
0
0

Chintamani.Patki@timesgroup.com
@chintamanipMT
पुणे ः उस्मानाबाद येथे नाट्य संमेलनाचा पडदा आज, शुक्रवारी उघडणार असताना यानिमित्ताने राजकीय मानापमान नाट्याला आधीच सुरुवात झाली आहे. संमेलनाचे उद्घाटक म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे नाव जाहीर झाल्यानंतर ते आता संमेलनाला जाणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यांच्याऐवजी सांस्कृतिककार्य मंत्री विनोद तावडे, परिवहन मंत्री दिवाकर रावते व दुग्धविकास मंत्री महादेव जानकर ही मंडळी संमेलनाला हजेरी लावतील, असे सांगितले जात आहे. प्रत्यक्षात जानकर वगळता अन्य एकाही मंत्र्याचा कार्यक्रम निश्चित नसल्याने संमेलन राजाश्रयाशिवाय होणार का, अशी चर्चा नाट्यनगरीत रंगली आहे. संमेलनाला भाजप विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस अशी स्थानिक वादाचीही किनार लाभली आहे.
९७ वे अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलन आजपासून रंगणार आहे. संमेलनाची तयारी पूर्ण झाली असून, दुपारी साडेचार वाजता राम मंदिर ते संमेलन स्थळ अशी दिंडी निघणार आहे. यामध्ये लोककलांचा आविष्कार असेल. मुख्य रंगमंच असलेल्या तुळजाभवानी क्रीडा संकुल येथे सायंकाळी संमेलनाचे उद्घाटन होणार असून ते नेमके कोणाच्या हस्ते व कोणाच्या उपस्थितीत होणार, हे पाहाणे औत्सुक्याचे ठरणार आहे. संमेलनाचे स्वागताध्यक्ष व विधानपरिषदेतील भाजपचे आमदार सुजीतसिंह ठाकूर यांनी मुख्यमंत्र्यांना निमंत्रण दिले होते. प्रत्यक्षात मुख्यमंत्र्यांनी शब्द व वेळ दिली नसल्याची चर्चा आहे. नाट्यनगरीत उत्साह राहावा म्हणून उद्घाटन मुख्यमंत्र्यांच्याच हस्ते होणार, असे सांगितले जात होते. नाट्य संमेलनाची घटिका समीप आलेली असताना मुख्यमंत्री नाहीत, तर किमान तावडे, रावते व जानकर यांनी यावे यासाठी प्रयत्न सुरू आहेत.
नाट्य संमेलनाला स्थानिक राजकारणाच्या वादाचीही किनार लाभली आहे. उस्मानाबादचे आमदार राणा जगजितसिंह पाटील यांचा सहभाग आत्तापर्यंत दिसून आलेला नाही. त्यामुळे त्यांच्यासह त्यांचे पिताश्री व राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते डॉ. पद्मसिंह पाटील संमेलनात सहभागी होणार का, अशी चर्चा नाट्यनगरीत सुरू आहे. संमेलन भाजपमय झाल्याचे बोलले जात आहे. या वादविवादांच्या पार्श्वभूमीवर नागरिकांमध्ये उत्साह जाणवत असून संमेलन, पूर्व कार्यक्रम व नाटक या मेजवानीचा नागरिक आस्वाद घेत आहेत.
सरकारला महत्त्व साहित्य संमेलनाचे!
साहित्य संमेलनाच्या तुलनेत नाट्य संमेलनाकडे सरकारचे दर वर्षीच दुर्लक्ष होते, हे यंदाच्याही संमेलनाने स्पष्ट झाले आहे. साहित्य संमेलनाला महत्त्वाचे नेते आवर्जून हजेरी लावताना दिसतात; तसेच संमेलनाचे २५ लाख रुपयांचे अनुदानही वेळेवर जमा होते, तर नाट्य संमेलनाकडे दर वर्षीच नेते पाठ फिरवताना दिसतात. २५ लाख रुपयांसाठीही संघर्ष करावा लागतो. यामुळे साहित्य संमेलन व नाट्य संमेलन यामध्ये दुजाभाव का केला जातो, सरकारला साहित्य संमेलनच अधिक महत्त्वाचे वाटते का, असे प्रश्न नाट्य परिषदेच्या पदाधिकाऱ्यांसह नाट्य कलाकारांना पडले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पिंपरीत राष्ट्रवादीचे ४ नगरसेवक निलंबित

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पिंपरी
शास्तीकराच्या मुद्द्यावरून पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत गुरुवारी मोठा गोंधळ झाला. सभागृहात गैरवर्तनाचा ठपका ठेवून महापौर नितीन काळजे यांनी विरोधी पक्षनेते योगेश बहल यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसच्या चार नगरसेवकांचे पुढील तीन सभांसाठी निलंबन केले. त्यामुळे भारतीय जनता पक्ष विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस-शिवसेना असे जोरदार घोषणायुद्ध रंगले.

अनधिकृत बांधकामांना शास्तीकर माफी आणि सवलतीच्या सरकारी निर्णयाच्या अंमबजावणीचे परिपत्रक अवलोकन करण्याचा प्रस्ताव आयुक्त दिनेश वाघमारे यांनी सर्वसाधारण सभेपुढे ठेवला होता. त्यानुसार १२ जानेवारी २०१५ पर्यंतच्या ६०० चौरस फुटापर्यंतच्या निवासी बांधकामांना शास्तीकर नसावा, ६०१ ते एक हजार चौरस फुटापर्यंतच्या बांधकामांना प्रतिवर्षी मालमत्ता कराच्या ५० टक्के दराने शास्ती आकारावी आणि एक हजार एक चौरस फुटापुढील बांधकामांना दुप्पट शास्ती (सध्याच्या दराने) आकारण्यात यावी, असे प्रस्तावात नमूद केले होते. एक हजार चौरस फुटापर्यंतच्या अनधिकृत बांधकामांना शास्तीकर माफ करावा, या उपसूचनेसह सबंधित प्रस्ताव भाजपने स्पष्ट बहुमताच्या जोरावर मंजूर केला; परंतु या निर्णयाचा लाभ जानेवारी २०१५ ऐवजी २० एप्रिल २०१७ पर्यंतच्या बांधकामांना मिळावा आणि सर्व प्रकारच्या अनधिकृत बांधकामांवरील शास्तीकर सरसकट माफ करावा, अशी जोरदार मागणी राष्ट्रवादी काँग्रेसने केली. त्याकडे दुर्लक्ष करून सभागृहाचे पुढील कामकाज चालू ठेवल्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेसच्या सदस्यांनी महापौरांच्या आसनाकडे धाव घेतली. या पक्षाचे नगरसेवक दत्ता साने यांनी महापौरांच्या आसनाशेजारील शोभेच्या झाडांची कुंडी उचलून आपटण्याचा प्रयत्न केला. विरोधाच्या जोरदार घोषणा दिल्या. सुरक्षा रक्षकांनी अटकाव केला तरी गोंधळ वाढत असल्याचे पाहून महापौरांनी सभा दहा मिनिटांसाठी तहकूब केली. त्यानंतर कामकाज पूर्ववत होताच साने यांच्यासह विरोधी पक्षनेते योगेश बहल, मंगला कदम आणि मयूर कलाटे यांच्यावर निलंबनाची कारवाई केली.

विरोधासाठी विरोध

सभेचे कामकाज चालू असताना सर्वांना बोलण्याची संधी दिली होती. विषय मंजूर झाल्यानंतर त्यावर बोलू देणे योग्य नाही. महापालिकेत राष्ट्रवादी काँग्रेसची सत्तेची खुर्ची गेली आहे. त्यांना पराभव सहन होत नाही. केवळ स्टंट म्हणून ते आंदोलनाचा पवित्रा घेत आहेत. सभागृहात गैरवर्तन केल्याच्या कारणावरून चार नगरसेवकांना पुढील तीन सर्वसाधारण सभांसाठी निलंबित केले आहे. ते मागे घेणार नाही. सत्तेत असताना शास्तीकराचा प्रश्न ते सोडवू शकले नाहीत. आता केवळ विरोधासाठी विरोध करीत आहेत.
- नितीन काळजे (महापौर)

भाजपचा डाव

शास्तीकर सरसकट रद्द करा, अशी राष्ट्रवादी काँग्रेसची मागणी होती; परंतु चार नगरसेवकांचे निलंबन करण्यात आले. महापौरांना सभागृहात रिमोट कंट्रोलच्या दबावाखाली निर्णय घ्यावे लागतात. या दादागिरीचा आम्ही निषेध करतो. सभागृहात नियमांची पायमल्ली केली जात आहे. भाजपमधील काही नगरसेवक लाटेमध्ये निवडून आले. त्यांना महापालिकेच्या धोरणाबाबत माहिती नाही. सूडबुद्धीने निलंबनाची कारवाई करून सभागृहात बजेटवरील चर्चेपासून आम्हाला रोखण्याचा भाजपचा डाव आहे.
- योगेश बहल (विरोधी पक्षनेते)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सिंहगड इन्स्टिट्यूटवर सीबीआयचे छापे

$
0
0

७५ कोटींच्या अफरातफरीचं प्रकरण

मटा ऑनलाइन वृत्त । पुणे

सिंहगड टेक्निकल इन्स्टिट्यूटच्या सर्व कार्यालयांवर सीबीआयने शुक्रवारी छापे मारून महत्वाची कागदपत्रे ताब्यात घेतली आहेत. पुण्यातील सिंहगड रस्ता, हडपसर, पुणे मुंबई रस्ता आदी ठिकाणी असलेल्या कार्यालयांत छापे टाकण्यात आले आहेत.

सिंहगड इन्स्टिट्यूट आणि संस्थापक मारुती नवले यांच्याविरुद्ध सेंट्रल बँकेकडून घेतलेले ७५ कोटी रुपये बेकायदेशीरपणे अन्यत्र वर्ग करून फसवणूक केल्याप्रकरणी सीबीआयने गुन्हा दाखल केला होता. शुक्रवारी सीबीआयच्या पथकाने छापे मारून महत्वाची कागदपत्रे ताब्यात घेतली. नवले यांच्या घराची झडती घेण्याचे कामही सध्या सुरू आहे. त्यांची बॅंक खाती आणि लॉकर्सचीही तपासणी करण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विकास हा भाजपचा अजेंडा नाही

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
‘जातियवादी आणि धर्मांध शक्तींना राज्यघटनेनुसार देश चालवायचा नाही. त्यांना त्यांचे विचार जबरदस्तीने लोकांवर थोपवायचे आहेत. जातियवादी आणि धर्मांध लोक राज्यघटनेचे लचके तोडून आपले विचार पेरत आहेत,’ अशी घणाघाती टीका माजी खासदार व अर्थतज्ज्ञ डॉ. भालचंद्र मुणगेकर यांनी गुरुवारी केली. ‘संघपरिवार आणि भाजपच्या सरकारकडून एका धर्मावर आधारित राष्ट्रनिर्मिती अशक्य आहे. विकास हा भाजपचा अजेंडा नसून मुस्लिमविरोध हाच आहे. यांना माणसांपेक्षा गाय महत्त्वाची आहे,’ असा हल्ला त्यांनी चढवला.
समता अभियान संघटनेच्या पुणे विभागीय परिषदेचे उद्घाटन डॉ. मुणगेकर यांच्या हस्ते झाले, त्या वेळी ते बोलत होते. ज्येष्ठ साहित्यिक डॉ. नागनाथ कोत्तापल्ले, महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटन सोसायटीचे डॉ. पी. ए. इनामदार, सामाजिक कार्यकर्त्या रझिया पटेल, बी. एन कांबळे, राजन कदम, डॉ. नामदेव कस्तुरे, खलील देशमुख, गंगाधर आंबेडकर, डॉ. विलास आढाव यावेळी उपस्थित होते.
‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या राज्यघटनेमध्ये देशाच्या एकत्मतेचे बीज आहे. सध्याच्या राज्यकर्त्यांना जाती आणि धर्मावर आधारित देश निर्माण करायचा आहे. त्यामुळे इतर एकधर्मी राष्ट्राप्रमाणे देशाची वाटचाल सुरू आहे; पण एका धर्मावर भारताची उभारणी होणार नाही,’ असे टीकास्त्र मुणगेकर यांनी सोडले. ‘ज्या देशांची उभारणी एका धर्मावर झाली त्या ठिकाणी लोकशाही कोलमडून पडत आहे; परंतु विविधता असूनही भारताची संसदीय लोकशाही राज्यघटनेमुळे अबाधित आहे,’ याकडे त्यांनी लक्ष वेधले.
‘देशात कायद्याचे राज्य असताना तथाकथित संस्कृतीरक्षकांकडून हत्या आणि मारहाण सुरू आहे. आपली राज्यघटना धर्मनिरपेक्ष असल्यामुळे एक धर्मावर राष्ट्रनिर्माण करणे शक्य नाही. काही नेते एका मंत्रिपदासाठी चळवळ आणि जनतेला त्यांच्या दावणीला बांधले गेले आहेत,’ अशी टिप्पणी त्यांनी केली.
डॉ. कोत्तापल्ले म्हणाले, ‘राजकीय आणि प्रशासकीय यंत्रणेवर अंकुश ठेवणारे विचार निर्माण केले पाहिजे. विद्वेषाची बंदूक वापरून राज्य करणारे उद्या आपल्यावरही गोळी झाडतील, याचा प्रत्येकाने विचार केला पाहिजे.’ सतीश घोडके यांनी सूत्रसंचालन केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शिक्षणामुळे जगभर संधी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
‘शिक्षणामुळे जगात विविध प्रकारच्या रोजगाराच्या संधी उपलब्ध होतात. तुम्ही जीवनात ज्या ध्येयांच्या पूर्णत्वाचे स्वप्न पाहिले आहे ते पूर्ण करण्यासाठी शिक्षण घेणे महत्त्वाचे आहे. शिक्षणासोबतच उत्तम रोजगार हवा असेल आणि त्याचबरोबर तुमचे राहणीमान उंचवायचे असेल तर न्यूझीलंडमध्ये तुमचे स्वागत आहे,’ असे आवाहन क्रिकेटपटू आणि न्यूझीलंड एज्युकेशनचा ब्रॅन्ड अॅम्बेसेडर स्टिफन फ्लेमिंग याने गुरुवारी विद्यार्थ्यांना केले आणि विद्यार्थ्यांनी त्याला उत्तम प्रतिसाद दिला.
न्यूझीलंड एज्युकेशन आणि सिम्बायोसिस आंतरराष्ट्रीय विद्यापीठातर्फे ‘किवी कोशंट’ कार्यक्रम झाला. या वेळी स्टीफन बोलत होता. अभिनेत्री सोहा अली खान, न्यूझीलंड एज्युकेशनचे प्रादेशिक संचालक जॉन लेक्सॉन, सिम्बायोसिस संस्थेच्या प्रधान संचालिका डॉ. विद्या येरवडेकर, डॉ. राजीव येरवडेकर, डॉ. अनिता पाटणकर या वेळी उपस्थित होते. विद्यार्थ्यांना न्यूझीलंडविषयी किती माहिती हे जाणून घेण्यासाठी ‘किवी कोशंट’ स्पर्धा झाली. या स्पर्धेत स्टिफन आणि सोहाच्या संघात प्रश्नोत्तरे झाली. यामध्ये स्टिफनच्या संघाने सोहाच्या संघावर मात केली.
स्टीफन म्हणाला,‘माझे शिक्षण न्यूझीलंडमधून झाले असून मी पदवीधर आहे. न्यूझीलंडमधील शिक्षणव्यवस्था ही मजबूत आणि दर्जात्मक आहे. गेल्या काही वर्षांमध्ये ही शिक्षणव्यवस्था अधिक सक्षम झाली आहे. न्यूझीलंडमध्ये उत्तम विद्यापीठे निर्माण झाली आहे. त्यातून उत्तम शिक्षण देण्यात येत आहे. त्यामुळे तेथे अधिकाधिक भारतीय विद्यार्थ्यांनी शिकण्यासाठी यावे. देशाची लोकसंख्या कमी, राहण्यासाठी उत्तम आणि सुरक्षित शहरे आहेत, रोजगाराच्या संधी भरपूर आहेत अशी विविध वैशिष्ट्ये न्यूझीलंडबद्दल सांगता येईल. त्यामुळे या देशात उत्तम शिक्षणासोबतच चांगला रोजगार मिळेल यात शंका नाही. तुमचे एकूणच समाजिक आणि आर्थिक राहणीमान उंचवायचे असल्यास न्यूझीलंडमध्ये उत्तम सुविधा आणि संधी आहेत.’ लेक्सॉन म्हणाले, ‘या उपक्रमात विद्यार्थी आणि पालक यांना योग्य अभ्यासक्रम, प्रवेश प्रक्रिया याबद्दल माहिती दिली जाते. यंदाही विद्यार्थ्यांसाठी सस्टेनेबिलिटी चँलेज, फॅशन सिंम्पोसियम, न्यूझीलंड एक्सलन्स अवार्ड, शिष्यवृत्ती आदी उपक्रम राबवण्यात येत आहेत. न्यूझीलंडमध्ये जागतिक दर्जाचे विद्यापीठ असल्याने शिक्षणासाठी आलेल्या भारतीय विद्यार्थ्यांचे प्रमाण फेब्रुवारी गेल्या वर्षात ५३ टक्क्यांनी वाढले आहे.’

शिक्षण वाया जात नाही : सोहा
मी जरी नवाबांच्या कुटुंबातून असले तरी माझे शिक्षण सामान्यांप्रमाणेच झाले. परदेशात उच्चशिक्षण घेतल्यानंतर मी नोकरी केली. त्यानंतर काही वर्षांनी बॉलीवूडमध्ये आले. बॉलीवूडमध्ये यायचे होते तर शिक्षण का घेतले, यावर मला भरपूर विचारणा झाली. तेव्हा मी ठामपणे सांगितले आणि आताही सांगते, की शिक्षणामुळे व्यक्तीचा विकास होतो. समाजात कसे राहावे, बोलावे, आपल्याला जीवनात काय करता येईल, अशा असंख्य गोष्टी समजतात. आपण घेतलेले शिक्षण कधीच वाया जात नसून ते नेहमी उपयोगी पडते, असे सोहाने सांगितले.



मी क्रिकेटर झालो. मला एक मुलगा आणि मुलगी आहे. मात्र, माझ्या मुलांनी क्रिकेटर व्हावेच असा काही नियम नाही. मी शिक्षणाचे महत्त्व जाणतो आणि म्हणूनच माझ्यासाठी त्यांचे शिक्षण महत्त्वाचे आहे.
- स्टीफन फ्लेमिंग, माजी क्रिकेटपटू, न्यूझीलंड

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


मी गझलेच्या प्रेमात

$
0
0

तुमचा गझलेशी संबंध कधीपासून आला?

- माझी आई उत्तम गाणे ऐकणारी. वडिलही छान गायचे. त्यामुळे मला गझलेची आवडच आठव्या–नवव्या वर्षापासून निर्माण झाली. माझ्या या आवडीला वडिलांनी खूप मोठा आधार दिला. सुरुवातीला गुलाम अली, अनुप जलोटा यांची भजने, मेहदी हसन वगैरे ऐकायचो. पदवीनंतर देवगडहून पुण्यात आलो. ललित कला केंद्र येथे डॉ. विकास कशाळकर यांच्याकडे शास्त्रीय गायन आणि रवी दाते यांच्याकडे गझल शिकलो. वडिलांनी माझा गझलेसंदर्भातील कल पाहून मला सुरुवातीपासूनच काही सूचना द्यायला सुरुवात केली होती. ते म्हणाले, ‘गझलेचा मूळ गाभा फक्त शब्द आहे. कविता पेश करतोयस, हे डोक्यात ठेवूनच काहीही कर.’ आज ३० वर्षे झाली. मी गझलच करतोय.

0 इतर शायरांच्या गझलेपासून स्वतःच्या संगीत रचनांपर्यंतचा प्रवास कसा झाला?

- काही गझल किंवा नज्म अशा असतात ज्या आधीच कुणा मोठ्या गायकाने गायल्या असल्या, तरी आपण याच गझलेसाठी आणखी एखादी वेगळी चाल देऊ शकतो, असे वाटते. त्यातूनच आशा भोसले यांनी गायलेली ‘करू याद मगर किस तरह भुलाऊ उसे’ आणि गुलाम अली यांनी गायलेली ‘तमाम उम्र तेरा इंतजार’ या गझलांना मी माझ्या पद्धतीने संगीत दिले आहे. ‘दिल- ए नादान तुझे हुआ क्या है’ या गझलेला तर अनेकांनी त्यांच्या पद्धतीने संगीत दिले असेल. गझल ही शब्दप्रधान असल्यामुळे त्याचा प्रत्येकासाठीचा अर्थ वेगवेगळा असू शकतो. अगदी आठवी- नववीत असताना मी अनूप जलोटा यांचीच भजने गायचो. वडिलांनी मला तुझ्या तोंडी ‘महबुबा’ वगैरे शब्द शोभणार नाहीत, असे सांगितले. वाढत्या वयानुसार मग कॉलेजमध्ये वगैरे मी हळूहळू प्रेम आणि शृंगारविषयक गझलाही गायला लागलो.

0 गझल ही अनुभवानुसार बदलत जाते?

- मुळात अनुभव घेत गेल्यानंतर हळूहळू कविताच बदलत जाते. काही वेळा संबंधित गझलकारांविषयी वाचल्यानंतर, त्यांच्या गझलेवर असलेला तत्कालिन सामाजिक, राजकीय परिस्थितीचा अभ्यास केल्यावर किंवा त्यांचे बालपण, त्यांची पार्श्वभूमी जाणून घेतल्यानंतरही त्यांच्या रचनांतील अर्थाच्या गाभ्यापर्यंत जायला मदत होते. ‘रंजिश ए सही’ ही पाकिस्तानच्या लोकशाहीला उद्देशून असलेली गझल आहे. ‘अब के हम बिछड़े तो शायद कभी ख़्वाबों में मिले, जिस तरह सूखे हुए फूल किताबों में मिले’ ही गझलही फाळणीच्या संदर्भातील आहे. हे अहमद फराज यांच्यासंबंधी वाचल्यावर जास्त योग्य पद्धतीने कळते.

0 हिंदी- उर्दूचा काही विशेष अभ्यास केलात का?

- सतत कवितेत राहणे, कविता वाचत राहणे, चांगले काय हे कळणे आणि मग कवितेच्या गाभ्यापर्यंत पोहोचणे जमले पाहिजे. सातत्याने तुम्ही गझलेच्या अर्थाच्या शोधात राहणे गरजेचे आहे. अर्थ समजून घेतल्याशिवाय चाल लावण्यात अर्थ नाही. गझलकार आणि त्याचा अर्थ किती उमजतो, ते महत्त्वाचे. मी अभ्यास म्हणून गालिब, जावेद अख्तर, फातिमा हसन, हफीज होशियारपुरी असे अनेक वाचले; पण अलीकडे मला अहमद फराज यांच्या गझलेतील अॅटिट्यूड आणि उपहासात्मकता आवडते.

0 ‘महफिल’चे वैशिष्ट्य काय?
- ‘सबरंग’ आणि ‘शाम ए गझल’ यांसारख्या कार्यक्रमात मी इतर संगीतकारांनी संगीतबद्ध केलेल्या गझला सादर करायचो. ‘महफिल’मध्ये मी स्वतः संगीतबद्ध केलेल्या ‘दिल ए नादान’ किंवा ‘कहा था किसने तुझे आबरू गवाने जा’ यांसारख्या १२ ते १३ गझल सादर करणार आहे. बहुतांशी यात अहमद फराज, गालिब, सरदार अंजुम, फातिमा हसन यांसह वैभव जोशीच्या गझलांचाही समावेश असेल.

0 गझल सोडून इतर कुठल्या कार्यक्रम, रेकॉर्डिंग किंवा सिनेमांसाठी तुम्ही संगीत दिले आहे?
- सतीश मनवर दिग्दर्शित ‘गाभ्रीचा पाऊस’मधील आणि सर्वोत्कृष्ट सामाजिक विषयासाठीचा राष्ट्रीय पुरस्कार मिळवलेल्या ‘तुह्या धर्म कोंचा’ सिनेमातील ‘खुरखुरा कसा ना मनमा’ ही गाणी मी संगीतबद्ध केली आहेत. बेला शेंडेने गायलेल्या या गाण्यासाठी तिला राष्ट्रीय पुरस्कारही मिळाला आहे. मी ‘ललित’मध्ये असताना जवळपास २० नाटकांना संगीत दिले आहे. त्यात वगनाट्याप्रमाणेच ‘सीता स्वयंवर’, प्र. के. अत्रे यांचे ‘एकच प्याला’ यांचा समावेश होता.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भाजपचे काम संकुचित

$
0
0

भाजपवर खासदार वंदना चव्हाण यांची टीका
म. टा. प्रतिनिधी, पुणे
‘महापालिकेच्या निवडणुकीत बहुमताच्या जोरावर सत्ताधारी ठरलेला भारतीय जनता पक्ष पालिकेत संकुचित मनोवृत्तीने काम करत आहे,’ अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसच्या शहराध्यक्षा खासदार वंदना चव्हाण यांनी शुक्रवारी केली. गेली दहा ते पंधरा वर्षे पालिकेत काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता होती. मात्र सत्ताधारी म्हणून काम करताना आम्ही विरोधी पक्षांना एकत्र घेऊनच कारभार केल्याचे चव्हाण यांनी सांगितले.
पालिकेत ९८ जागांचे बहुमत मिळाल्याने याचा चुकीचा अर्थ काढून भाजप विरोधी पक्षांना विश्वासात न घेता परस्पर निर्णय घेत आहे. कात्रज-कोंढवा रोडच्या कामाची ३५ टक्के जादा दराने आलेली निविदा चार महिन्यांपूर्वी अमान्य केलेली असतानाही निवडणुकीनंतर केवळ बहुमताच्या जोरावर भाजपने हा ठराव मान्य करून घेतला. यामुळे पुणेकरांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान होणार असल्याचे त्यांनी सांगितले. सभागृह नेते श्रीनाथ भिमाले यांनी जाहीर केल्याप्रमाणे केंद्र सरकारच्या निधीतून कात्रज ते फुरसुंगी या बाह्यवळण रस्त्याचे काम होत असेल, तर राष्ट्रवादी त्याला पाठिंबा देऊन त्याचे स्वागतच करेल, अशी भूमिका त्यांनी मांडली. महापालिकेचे विरोधी पक्षनेते चेतन तुपे या वेळी उपस्थित होते.
पालिकेत सत्ताधारी म्हणून काम करणाऱ्या पक्षांनी सर्वांना एकत्र घेऊन शहरहिताचे निर्णय घेतले पाहिजे. गेली दोन टर्म पालिकेत सत्ताधारी म्हणून काम करताना राष्ट्रवादीने विरोधी पक्षांना बरोबर घेऊन सभागृह चालविले आहे. मात्र, नुकत्याच सत्ताधारी झालेल्या भाजपला याचा विसर पडला आहे. विरोधी पक्षांना विश्वासात घेणे तर दूरच राहिले. सभागृहात बसण्याच्या जागांचे वाटप, सभागृहात विरोधी पक्षांच्या सभासदांना बोलण्यास मज्जाव करणे, अशा वृत्तीचे दर्शन भाजपकडून घडत आहे. यामुळे शहराच्या विकासाला खीळ बसेल, अशी भीती त्यांनी व्यक्त केली.

शहरासमोर अनेक महत्त्वाचे प्रश्न आहेत. वाहतूक, कचरा समस्या, पाणीप्रश्न असे अनेक विषय आहेत. यावर मार्ग काढण्यासाठी महापौर, सभागृह नेते यांनी पुढाकार घेत सर्वांना एकत्र घेऊन तोडगा काढण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. विरोधकांना एकत्र घेऊन बैठका घेतल्यानंतरच सत्ताधाऱ्यांना प्रशासनावर अंकुश ठेवता येइल. स्वीकृत सभासदांचे अर्ज भरण्यावरून पालिकेत झालेल्या हाणामारीचा कडक शब्दात खासदार चव्हाण यांनी समाचार घेतला. एकाच पक्षांचे पदाधिकारी अशा पद्धतीने पालिकेत हाणामारी करत असतील तर शहरात ‘गुंडाराज’ आल्याचे दिसते. या प्रकारातून भाजपने आपले खरे रूप दाखविले असल्याची टीका त्यांनी केली.
००
कात्रज चौकात सोमवारी आंदोलन
कात्रज कोंढवा रोडच्या कामासाठी ३५ टक्के जादा दराची निविदा बहुमताच्या जोरावर मान्य करून भाजपने पुणेकरांवर शंभर कोटी रुपयांचा वाढीव बोजा टाकला आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी हा रस्ता करण्याची तयारी दाखविल्याची माहिती सभागृह नेते भिमाले यांनी सभागृहात का नाही दिली? असा प्रश्न खासदार चव्हाण यांनी उपस्थित केला. कात्रज चौकातील वाहतुकीच्या कोंडीकडे प्रशासना जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याने या विरोधात स्थानिक नगरसेविका अमृता बाबर, पक्षाचे कार्यकर्ते नमेश बाबर या चौकात २४ एप्रिलला आंदोलन करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दहावी, बारावी झालेले तज्ज्ञ?

$
0
0

स्वीकृत सभासदपदी पक्षाच्या कार्यकर्त्यांना प्राधान्य
म. टा. प्रतिनिधी, पुणे
महापालिकेत स्वीकृत सभासद म्हणून डॉक्टर, वकील, प्राचार्य, इंजिनीअर अशा तज्ज्ञांना संधी द्यावी, अशी तरतूद कायद्यात असतानाही त्याकडे दुर्लक्ष करून सर्वच राजकीय पक्षांनी सामाजिक संस्थांच्या नावाखाली आपल्याच पदाधिकाऱ्यांना स्वीकृत सदस्यासाठी प्राधान्य दिले आहे. विशेष म्हणजे स्वीकृत म्हणून घेण्यात आलेली बहुतांश मंडळी ही फक्त दहावी, बारावी उत्तीर्ण असल्याने हे तज्ज्ञ कधीपासून झाले? असा प्रश्न विचारला जात आहे. प्रशासनाकडे आलेल्या अर्जांची माहिती महाभिवक्त्यांकडे पाठवून मार्गदर्शन मागवावे, अशी मागणी स्वयंसेवी संस्थांनी पालिका आयुक्तांकडे केली आहे.
महापालिकेचा कारभार अधिक सक्षम व्हावा, यासाठी समाजातील विविध घटकातील मान्यवरांना स्वीकृत नगरसेवक म्हणून सभागृहात संधी दिले जाते. नाराज कार्यकर्त्यांचे पुनवर्सन करण्यासाठी राजकीय पक्षांकडून ही पदे भरली जातात. स्वीकृत नगरसेवक म्हणून कोणाला घेतले पाहिजे, याची तरतूद महाराष्ट्र महानगरपालिका कायद्यात करण्यात आली आहे. स्वीकृत सभासदाची पात्रता आणि निकष काय असावे, याची माहिती २०१२ च्या कलम ४ आणि ५ मध्ये स्पष्ट करण्यात आली आहे. या निकषांनुसार पालिका आयुक्तांनी सक्षम अशा व्यक्तींना स्वीकृत नगरसेवक म्हणून प्राधान्य द्यावे, अशी मागणी सजग नागरिक मंचाचे विवेक वेलणकर यांनी काही दिवसांपूर्वी पालिका आयुक्त कुणाल कुमार यांच्याकडे केली होती. ‘महानगरपालिका कायद्यातील तरतुदीनुसार डॉक्टर, वकील, प्राचार्य, प्राध्यापक याबरोबरच सीए, इंजिनीअर यांना स्वीकृत नगरसेवक म्हणून काम करण्याची संधी द्यावी,’ असे वेलणकर यांनी म्हटले होते.

तीन दिवसापूर्वी पालिकेत स्वीकृत सभासदासाठी अर्ज दाखल केले. ज्या उमेदवारांची शिफारस स्वीकृत सभासदासाठी राजकीय पक्षांनी केली आहे. ते सर्व पक्षांचे माजी नगरसेवक आणि पदाधिकारी आहेत. तसेच, यातील बहुतांश सभासद हे केवळ नववी ते बारावी उत्तीर्ण असल्याचे त्यांनी पालिकेकडे सादर केलेल्या अर्जात स्पष्ट केले असल्याचा आरोप मनसेच्या माजी नगरसेविका रूपाली पाटील यांनी केला. ‘चुकीच्या पद्धतीने निवड करणे हीच भाजपची ‘पार्टी विथ डिफरन्स’ ची संस्कृती का? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. आयुक्तांनी चुकीच्या पद्धतीने स्वीकृत सभासद न निवडता प्रशासनाकडे आलेले अर्ज राज्याचे महाभिवक्ता यांच्याकडे पाठवून मार्गदर्शन घ्यावे, त्यानंतर ही निवड करावी,’ अशी मागणी वेलणकर यांनी केली आहे.
०००
पालिका आयुक्तांनी लक्ष घालण्याची मागणी
पालिकेत स्वीकृत नगरसेवक म्हणून डॉक्टर, इंजिनीअर, निवृत्त प्राध्यापक, प्राचार्य यांना घेण्याची तरतूद पालिका कायद्यात आहे. विविध क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तींना स्वीकृत सभासद म्हणून घेतल्यास पालिकेच्या कारभारात त्याचा मोठा उपयोग होईल. ही मंडळी आपल्या क्षेत्रातील महत्त्वाचे मुद्दे प्रभावीपणे आणि अभ्यासपूर्ण मांडू शकतील. यामुळे पालिकेचा कारभार सुधारण्यास मोठी मदत होईल, असे मत हायकोर्टानेही नोंदविले आहे. त्यामुळे पालिका आयुक्तांनी याचा गांभीर्याने विचार करावा, अशी मागणी केली जात आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शिक्षण मंडळाची मुदत १४ मार्चली संपली

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, पुणे
महानगरपालिकेच्या शिक्षणमंडळाची मुदत गेल्या महिन्यात १४ मार्चलाच संपली असल्याची कबुली महापालिका प्रशासनाने दिली आहे. मंडळाची मुदत संपली असतानाही मंडळाच्या सदस्यांकडून आर्थिक अधिकारांसह इतर प्रशासकीय अधिकारांचे सर्रास वापर केला जात आहे. यामुळे लाखो रुपयांचा गैरव्यवहार झाल्याची धक्कादायक बाब सभासदांनी सर्वसाधारण सभेच्या निदर्शनास आणून दिली. मात्र, यानंतर देखील त्यांच्यावर कारवाई काय करणार याचा कोणताही खुलासा पालिकेचे प्रभारी आयुक्त राजेंद्र जगताप यांना करता आला नाही. प्रशासनाच्या पाठिंब्यानेच मुदत संपल्यानंतरही प्रशासनाचा कारभार सुरू ठेवण्यात आल्याची चर्चा पालिकेत सुरू झाली आहे.
महापालिकेच्या शिक्षणमंडळात मोठ्या प्रमाणात चुकीची कामे सुरू असून, अर्थसंकल्पात तरतूद नसतानाही मंडळाने ४७ लाख रुपयांची वाढीव बिले दिल्याची बाब काँग्रेसचे गटनेते अरविंद शिंदे यांनी शुक्रवारी सर्वसाधारण सभेत निदर्शनास आणली. मंडळाचे सदस्य आणि प्रशासनाच्या चुकीच्या कारभारामुळे झोपडपट्टीमधील मुलांच्या शिक्षणाची वाताहात होत असल्याचे त्यांनी सभागृहात सांगितले. मंडळाची मुदत संपली आहे का? प्रशासकीय अधिकाऱ्यांची नियुक्ती नियमानुसार झाली आहे का, अशी विचारणा त्यांनी सभागृहात केली.
सभासदांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना पालिकेचे प्रभारी आयुक्त राजेंद्र जगताप म्हणाले, की नवीन शिक्षण अधिनियमानुसार मंडळाची मुदत १४ मार्चला संपली आहे. त्यामुळे पालिकेला नवीन ‌शिक्षण समिती स्थापन करण्याचा अधिकार असून, पुढील सर्वसाधारणसभेपूर्वी शिक्षण समिती स्थापन करण्याची माहिती नगरसचिव कार्यालय तसेच महापौर यांना कळविली जाईल. शिक्षणमंडळात झालेल्या अनियमितता प्रकरणी संबंधित अधिकाऱ्यांकडे खुलासा मागविण्यात आला असून, दोषी आढळल्यास कारवाई केली जाईल, असे जगताप यांनी स्पष्ट केले. मंडळाची मुदत संपून महिना झाल्यानंतरही सभासद आर्थिक अधिकार कसे वापरतात, याचे कोणतेही उत्तर जगताप यांना देता आले नाही.

आयुक्तांनी लपविली माहिती
शिक्षण मंडळाची मुदत १४ मार्च रोजीच संपल्याची माहिती काही दिवसांपूर्वी पालिका आयुक्त कुणाल कुमार यांनी प्रसारमाध्यमांना दिली होती. मात्र, त्यानंतर रात्री उशिरा आपल्या वक्तव्यात बदल करत कुमार यांनी आपण ही माहिती दिली नसल्याचे स्पष्ट करत मुदत संपल्याची ‘अफवा’ असल्याचे स्पष्टीकरण दिले होते. पालिकेच्या विधी खात्याने शिक्षण समिती नेमावी, असा अभिप्राय देऊनही त्यावर आयुक्त कुमार यांनी आजपर्यंत स्वाक्षरी न केल्याने मंडळातील पदाधिकाऱ्यांना फायदा व्हावा, यासाठीच आयुक्त कुमार यांनी लपवाछपवी सुरू केल्याची चर्चा पालिकेत सुरू झाली आहे. आयुक्त कुमार सध्या परदेश दौऱ्यावर असल्याने त्यांची प्रतिक्रिया मिळू शकली नाही.

वाहन, कार्यालयाचा वापर बिनदिक्कत सुरू
शिक्षणमंडळाची मुदत गेल्या महिन्यातच संपली असल्याने कायद्यातील तरतुदीनुसार नवीन शिक्षण समिती अस्तित्वात येणे आवश्यक होते. मंडळाची मुदत संपल्याने सर्व सभासदांनी कार्यालय, पालिकेचे वाहन याचा वापर बंद करणे आवश्यक होते. तसेच कोणत्याही आर्थिक निर्णयात हस्तक्षेप करता येणार नसल्याचे स्पष्ट झाले होते. मात्र, मुदत संपल्यावरही सध्या अस्तित्वात असलेले पदाधिकारी निर्णय प्रक्रियेत सर्रास सहभाग घेत असून, मंडळाचे वाहन तसेच कार्यालयही वापरत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे मुदत संपल्यानंतर या सदस्यांवर झालेल्या खर्चाला जबाबदार कोण असा प्रश्न विचारला जात आहे. मात्र, याची कोणतीही उत्तरे पालिका प्रशासनाकडे नाहीत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अपघातानंतर पाच दिवसांनी झाली उपरती

$
0
0





म. टा. प्रतिनिधी, पुणे
बाणेर रस्त्यावरील दुभाजकावरील अपघातामध्ये मायलेकींचा दुर्दैवी अंत होऊन पाच दिवस उलटल्यानंतर महापालिकेतील नगरसेवकांना याची आठवण झाली. शुक्रवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत शहरात चुकीच्या पद्धतीने उभारण्यात आलेले दुभाजक, गतिरोधक याबरोबरच पादचाऱ्यांना रस्ता ओलांडताना होणारा त्रास याचा पाढा वाचत सर्वपक्षीय सभासदांनी प्रशासनाला धारेवर धरले. अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे हा दुभाजकावरील अपघात झाला असून यामध्ये दोषी असलेल्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी सभागृहात करण्यात आली.
बाणेर येथील दुभाजकावर रस्ता ओलांडण्यासाठी उभ्या असलेल्या एका चिमुरडीला तसेच तिच्या आईसह आणखी दोन जणांना अशा चार जणांना एका कारने उडविले होते. या अपघातामध्ये चिमुरडीसह तिच्या आईचा दुर्दैवी अंत झाला. या घटनेनंतर गेल्या चार दिवसांपासून वेगवेगळ्या क्षेत्रातून प्रचंड हळहळ व्यक्त केली जात होती. मात्र गेल्या चार दिवसांपासून पालिकेच्या सभागृहात यावर एकाही सभासदाने चकार शब्द काढला नाही. या घटनेला पाच दिवस उलटल्यानंतर शुक्रवारी अचानक पालिकेच्या सर्वसाधारण सभेत शहरात चुकीच्या पद्धतीने उभारण्यात आलेले दुभाजक, गतीरोधक हे विषय चर्चेला आले. बाणेर, बालेवाडी, पाषाण या भागातील स्थानिक नगरसेविका ज्योती कळमकर यांनी सभेला सुरुवात होताच औचित्याच्या मुद्याद्वारे (पाँइंट ऑफ इन्फर्मेशन) हा विषय चर्चेला आणला. पाच दिवसांपूर्वी बाणेर भागातील दुभाजकामुळे झालेल्या अपघातानंतर प्रशासनाने नक्की काय केले, असा प्रश्न उपस्थित करत नागरिकांच्या तसेच पादचाऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी प्रशासन दुर्लक्ष करत असल्याचा आरोप त्यांनी केला.
शहरातील अनेक रस्त्यांवर चुकीच्या पद्धतीने दुभाजक उभारण्यात आले असून, प्रत्येक भागात वेगवेगळ्या उंचीचे दुभाजक आहेत, यामुळे नागरिकांना आपला जीव गमवावा लागत असल्याची टीका अर्चना मुसळे, वर्षा‍ तापकीर यांनी केली. दुभाजक तसेच जागोजागी केले जाणारे गतिरोधक यांच्यासाठी प्रशासनाची काही नियमावली आहे की नाही? मनमानी पद्धतीने प्रशासन काम करत असल्याची टीका माजी महापौर चंचला कोद्रे, मंजुश्री खर्डेकर, अनिल टिंगरे, राजश्री शिळीमकर यांनी केली. चुकीच्या पद्धतीने रस्ते दुभाजक तसेच गतिरोधकांची कामे करून निष्पाप नागरिकांच्या मृत्यूला कारणीभूत ठरलेल्या अधिकाऱ्यांवर कारवाई करावी तसेच शहरातील दुभाजक आणि गतीरोधक यांचे टेक्निकल ऑडिट करावे, अशी मागणी सभागृहात करण्यात आली. याबाबतचा सविस्तर अहवाल लवकरच सभागृहासमोर सादर केला जाईल, असे पथ विभागाचे प्रमुख राजेंद्र राऊत यांनी सांगितले.

नागरिकांच्या मागणीकडे प्रशासनाचे दुर्लक्ष
बाणेर, बालेवाडी रस्त्यावर नागरिकांना सुरक्षितपणे रस्ता ओलांडता यावा, यासाठी या ठिकाणी पादचारी मार्ग करण्याची मान्यता द्यावी, अशी मागणी गेल्या वर्षभरापासून पोलिसांकडे करत असल्याचे नगरसेवक बाबूराव चांदेरे यांनी सांगितले. तसेच, या भागात होत असलेल्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर येथे गतिरोधक करण्यासाठी पथ विभागाच्या अधिकाऱ्यांकडे गेले सहा महिने पाठपुरावा करून देखील केवळ दुर्लक्ष झाले असल्याची टीका चांदेरे यांनी केली. प्रशासन नगरसेवकांच्या मागणीकडे गांभीर्याने पाहत नसल्याचेही त्यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images