Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

गणेश घोषसह २५ जणांवर गुन्हा

$
0
0



म. टा. प्रतिनिधी, पुणे
स्वीकृत नगरसेवकपदासाठी संधी नाकारल्याच्या रागातून भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी महापालिकेत धुडगूस घालत तोडफोड केल्याप्रकरणी अखेर शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान केल्याप्रकरणी तसेच दंगल माजवल्याप्रकरणी गणेश घोष आणि त्यांच्या २५ कार्यकर्त्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पालिकेचे सुरक्षा अधिकारी रमेश कादबाने यांनी दिलेल्या तक्रारीनुसार हा गुन्हा दाखल करण्यात आला होता. शहर सरचिटणीस गणेश घोष आणि त्यांच्या समर्थकांनी महापालिकेतील पक्षाच्या कार्यालयात तुफान तोडफोड करून पक्षाच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनाच चोप दिला. पक्षाच्या कार्यकर्त्यांचा हा अवतार पाहून संपूर्ण महापालिका अवाक झाली होती. महापौर मुक्ता टिळक यांनी या घटनेची चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश मुख्य सुरक्षा अधिकारी संतोष पवार यांना देण्यात आले होते.
पवार यांनी अवघ्या चोवीस तासांच्या आत या घटनेचा अहवाल सादर केला आहे. तसेच, पवार यांनी शिवाजीनगर पोलिस ठाण्याला पत्र पाठवून या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची सूचनाही केली होती. त्यानुसार कादबाने यांनी तक्रार दिली असून, त्यानुसार घोष आणि त्यांच्या २५ कार्यकर्त्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
दरम्यान, पवार यांच्या अहवालानुसार घोष यांचे नाव स्वीकृत सदस्याच्या यादीतून वगळण्यात आल्याने ही घटना घडल्याचे निदर्शनास आले असल्याचे म्हटले आहे. मुख्य सुरक्षा अधिकारी आणि सुरक्षा विभागातील कर्मचाऱ्यांनी वेळीच सतर्कता दाखवल्याने कार्यकर्त्यांच्या अंसवेदनशीलतेला आळा घालणे शक्य झाले आणि मोठा अनर्थ टळला. तसेच, मुख्य सुरक्षा अधिकारी यांनी वेळीच पोलिसांना पाचारण करून स्थितीवर नियंत्रण आणले, असा दावा पवार यांनी आपल्या अहवालात केला आहे.
पोलिसांनी या घटनेचे ‘सीसीटीव्ही’ फुटेज पोलिसांना देण्यात आले आहेत. त्यामध्ये लॉबीमधील फोडतोड कैद झाली आहे. पोलिसांनाही प्राथमिक अहवालानुसार २५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. तपासाअंती घोष यांच्या​बरोबर कोण-कोण कार्यकर्ते होते, याची माहिती घेण्यात येईल आणि त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात येईल, असे शिवाजीनगर पोलिसांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


‘मरणापेक्षा जगण्याबद्दल विचार करा’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

‘आज सर्वत्र अनाचार आणि नकारात्मक गोष्टी दिसून येत असून असे का होत आहे, याचा विचार व्हायला हवा. आत्महत्या आणि खून या दोन गोष्टी हल्ली खूप प्रसिद्ध झाल्या आहेत. तरुणांनी मरणापेक्षा जगण्याबद्दल अधिक विचार करायला हवा,’ अशी सूचना शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी केली. ‘आत्महत्येच्या मानसिकतेमधून बाहेर येऊन आनंदी जीवन जगण्यासाठी स्थायी भाव आणि सकारात्मक दृष्टी आवश्यक आहे,’ असेही ते म्हणाले.

अनंत बाबूराव नाईक लिखित ‘मज जगण्यात जगणे जमेना, सामाजिक विचारसरणीची वैफल्यग्रस्त वाटचाल’ या पुस्तकाचे प्रकाशन पुरंदरे यांच्या हस्ते झाले. त्या वेळी ते बोलत होते. डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष डॉ. शरद कुंटे, भोई प्रतिष्ठानचे डॉ. मिलिंद भोई, नगरसेवक संतोष कांबळे, सामाजिक कार्यकर्ते शिरीष मोहिते, इक्बाल दरबार, लेखक अनंत नाईक, शोभा नाईक, मनोज दंतकाळे, हर्षल ढोरे, अमोल नाईक, दिलीप परदेशी उपस्थित होते.

पुरंदरे म्हणाले, ‘छत्रपती शिवाजी महाराजांवरदेखील आत्महत्या करण्याची परिस्थिती तीन वेळा आली होती, परंतु प्रत्येक वेळी त्या परिस्थितीतून ते पुढे गेले. आपल्याला नक्की काय हवे आहे, याचा विचार व्हायला हवा. त्यामुळे चांगले संस्कार नव्या पिढीवर व्हायला हवेत आणि ते योग्य वेळीच व्हायला हवेत.’

‘समाजातील समस्या अभ्यासपूर्ण रीतीने मांडल्या जाव्यात. समाजातील लोकांच्या व्यथा दूर करण्यासाठी आणि मानसिकता खंबीर करण्यासाठी प्रयत्न होणे गरजेचे आहे. आपल्याला आनंदी होण्याची देखील सवय आपल्याला व्हायला हवी. दु:खापासून दूर जाऊ नका, त्यातही आनंद शोधण्याचा प्रयत्न करा. आत्महत्येच्या विचारापासून लांब राहण्यासाठी आंतरिक आणि मानसिक शक्ती निर्माण व्हायला हवी,’ असे कुंटे यांनी सांगितले. प्रिया निघोजकर यांनी सूत्रसंचालन केले. किरण कासरूंग यांनी प्रास्ताविक केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पीएमपी कर्मचारी संघटनांच्या नियमांना ‘कात्रजचा घाट’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
पुणे महानगर परिवहन महामंडळात (पीएमपी) कार्यरत असणाऱ्या कर्मचारी संघटनांपैकी एकही कर्मचारी संघटना कामगार कायदा व शासन प्राधिकृत प्राधिकाऱ्याकडून मान्यताप्राप्त संघटना नाही. त्यामुळे या सर्व संघटनांनी प्रशासनाशी कोणत्याही प्रकारचा पत्रव्यवहार करू नये. त्यांच्या पत्रव्यवहाराची दखल घेतली जाणार नाही. तसेच, मान्यताप्राप्त नसलेल्या संघटनांनी कर्मचाऱ्यांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केल्यास त्यांच्यावर कायदेशिर कारवाई केली जाईल, असा आदेश पीएमपी प्रशासनाने काढला आहे.
पुणे म्युन्सिपल ट्रान्सपोर्ट व पिंपर-चिंचवड म्युन्सिपल ट्रोन्सपोर्टचे एकत्रीकरण करून पुणे महानगर परिवहन महामंडळ लिमिटेड (पीएमपीएल) या कंपनीची स्थापना केली आहे. ‘पीएमपी’ हे सरकार निर्मित महामंडळ आहे. त्यामुळे नियमानुसार पीएमपी प्रशासनाने कर्मचाऱ्यांचे प्रश्न, मागणी, औद्योगिक तडजोडी याबाबत मान्यताप्राप्त संघटनेशी चर्चा किंवा वाटाघाटी करणे अपेक्षित आहे. पीएमटी कामगार संघटनेसहित (इंटक) सर्वच कामगार संघटना या कामगार कायदा व शासन प्राधिकृत पदाधिकाऱ्यांकडून मान्यताप्राप्त संघटना नाहीत. त्यामुळे या मान्यता नसलेल्या संघटनांनी पत्रव्यवहार न करण्याचा आदेश दिला आहे.
पीएमपीच्या अध्यक्षपदाची सूत्रे तुकाराम मुंढे यांनी स्वीकारल्यानंतर कर्मचाऱ्यांवर कारवाईचा तीव्र बडगा उगारला आहे. तसेच, कामाच्या वेळेत बदल, रात्रपाळीत काम, निलंबन आणि दंडात्मक कारवाई, हजेरी न भरलेल्या कर्मचाऱ्यांवर बडतर्फीची कारवाई करण्याचे आदेश त्यांनी दिले आहेत. त्यामुळे पीएमपीमधील काही कामगार संघटनांनी कंपनी कायदा आणि कामगार कायद्याचा आधार घेत मुंढे चुकीच्या पद्धतीने काम करत असल्याचे निदर्शनात आणून दिले होते. तसेच, त्यांच्या या मनमानी कारभाराविरोधात औद्यगिक न्यायालयात दाद मागण्याचा इशाराही दिला होता. मात्र, मुंढे यांनीच नियमांचा आधार घेत या कर्मचारी संघटनांना कात्रजचा घाट दाखविला आहे.
पीएमटी कामगार संघाला (इंटक) औद्योगिक न्यायालयाची मान्यता आहे. कोणत्याही संघटना मान्यताप्राप्त आहे की नाही, हे ठरविण्याचा अधिकार संबंधित कोर्ट किंवा यंत्रणेला असतो. त्यामुळे तुकाराम मुंढे यांना पीएमपीमधील एकही संघटना मान्यताप्राप्त नाही, हे ठरविण्याचा अधिकार कोणी दिला? गेल्या दहा वर्षांपासून पीएमपीमध्ये स्टॅडिंग ऑर्डर, सेवा ज्येष्ठत्ता, बढती योजना राबविलेली नाही. या योजना राबविण्यास सुरुवात करायची असून या कारभारात कोणाचाही हस्तक्षेप नको, यासाठी संघटनांना मान्यताप्राप्त नाही, असे मुंढे म्हणत आहेत. यापुढेही पीएमपीमधील कर्मचाऱ्यांच्या हक्कासाठी लढा देणार असून वेळ पडल्यास औद्योगिक न्यायालयात जाऊ, असे पीएमटी कामगार संघाचे (इंटक) सरचिटणीस नरुद्दीन इनामदार यांनी स्पष्ट केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

फुटाणे, सबनीसांच्या कोपरखळ्यांची आतषबाजी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

सबनीस म्हणजे ‘येडी बाभळ’ अशी सडकून टीका करणाऱ्या ज्येष्ठ वात्रटिकाकार रामदास फुटाणे यांनी सोमवारी त्यांची तलवार अखेर म्यान करून माजी संमेलनाध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांच्यावर कौतुकाचा वर्षाव केला. तर दुसरीकडे ‘फुटाणेंनी कधी सांस्कृतिक अस्पृश्यता पाळली नाही’, असे म्हणून सबनीस यांनीही वादावर अलगद पडदा टाकला. मसापच्या पटवर्धन सभागृहात झालेल्या या कार्यक्रमात दोघांनी केलेल्या कोपरखळ्या आणि खोचक टिप्पण्यांना रसिकांनी दाद दिली.

निमित्त होते संस्कृती प्रकाशनातर्फे आयोजित संस्कृती पुरस्कार सन्मान सोहळ्याचे. कार्यक्रमात ज्येष्ठ ग्रामीण साहित्यिक प्रा. व. बा. बोधे यांना वाङ्मय सेवा पुरस्काराने डॉ. सबनीस यांच्या हस्ते गौरविण्यात आले. तसेच, साहित्यिक कलावंत प्रतिष्ठानला वाचन संस्कार पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. संस्थेचे अध्यक्ष नगरसेवक दिलीप बराटे व सचिव वि. दा. पिंगळे यांनी पुरस्कार स्वीकारला. मसापच्या कोषाध्यक्ष सुनीताराजे पवार, प्रकाश पायगुडे, किसनराव पवार आदी या वेळी उपस्थित होते. डॉ. सबनीस आणि रामदास फुटाणे यांनी त्यांच्या वादावर पडदा टाकून आणि एकमेकांवर कौतुकाचा वर्षाव करून एका नव्या मैत्रीची नांदी केली. फुटाणे यांनी अमृतमहोत्सवी वर्षात पदार्पण केल्याबद्दल सबनीस यांच्या हस्ते त्यांचा सत्कारही करण्यात आला.

‘डॉ. श्रीपाल सबनीस यांनी मोदींवर केलेली टीका मला अजिबात रुचली नाही. त्यामुळे, मी त्यांच्यावर टीका केली. पण, डोंबिवलीच्या संमेलनातील त्यांचे भाषण वास्तवाला धरून होते. ते ऐकल्यानंतर मी स्वतःहून त्यांना कौतुकाचा फोन केला. सध्या साहित्यिकांच्या डोक्यात हवा जात आहे. मग ते कधी जमिनीवर येतच नाहीत. सबनीसांचे तसे नाही. ते वास्तवाला धरून असतात,’ असे फुटाणे यांनी सांगितले. त्यावर बोलताना सबनीस म्हणाले ‘येडी बाभळ’ म्हणून नानांनी (फुटाणे) मला डिवचले. आता त्यांना उपरती झाली. नानांनी सांस्कृतिक अस्पृश्यता पाळलेली नाही. डोंबिवलीच्या भाषणानंतर त्यांनी माझे कौतुक केल्याने समाधान लाभले. माझे आत्मकथन वाचू नका त्यात तुमच्याबद्दलही बरेच काही लिहिले आहे,’ अशी कोपरखळी करताच सभागृहासह फुटाणेंनाही हसू आवरले नाही.

व. बा. बोधे म्हणाले, ‘खेड्यापाड्यातील सर्व समस्या या जाती व्यवस्थेमुळे आणि अर्थिक परिस्थितीमुळे तयार होत आहेत. शेतातून बक्कळ पीक मिळावे, यासाठी कृत्रिम खत घालणारे, जनावरांना भरघोस दूध मिळावे, यासाठी खुराक देणारे लहान मुलांच्या सांस्कृतिक जडणघडणीसाठी पुस्तके का देत नाही, असा प्रश्न पडतो. जे चांगले काम करत आहेत. समाजाने त्यांची दखल घ्यायला हवी.’ दिलीप बराटे आणि वि. दा. पिंगळे यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. सुनीताराजे पवार यांनी प्रास्ताविक केले व आभार मानले.

…तर पवार कधी सत्तेत येऊ नयेत.

‘शरद पवार हे सध्या सत्तेत नसल्याने अनेक सांस्कृतिक कार्यक्रमांना हजेरी लावतात तिथे वेळही देतात, अनेकदा खरे बोलतात. त्यामुळे राजकीय व्यासपीठापेक्षा सांस्कृतिक व्यासपीठावर त्यांचे विचार अधिक रुचतात. असे असेल तर पवारांनी पुन्हा कधी सत्तेतच येऊ नये,’ असे डॉ. सबनीस यांनी सांगताच सभागृहात एकच हशा पिकला. व्यासपीठावर असलेल्या राष्ट्रवादीचे नगरसेवक दिलीप बराटे यांनाही या वेळी हसू आवरले नाही.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘स्वाइन फ्लू’ने तिघांचा बळी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
स्वाइन फ्लूच्या संसर्गाने शहरात आणखी तीन महिलांचा बळी गेल्याची नोंद आरोग्य विभागाने केली आहे. आतापर्यंत पुण्यात स्वाइन फ्लूमुळे झलेल्या मृतांची संख्या ३८ झाली आहे; तर राज्यात १२७ पर्यंत पोहोचली आहे. तसेच, ६४४ जणांना लागण झाली आहे.

स्वाइन फ्लूची लक्षणे आढळल्याने बारामती तालुक्यातील एका ३२ वर्षांच्या महिलेला उपचारासाठी खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. सर्दी, खोकल्यास तापाची त्यांना लक्षणे होती. त्याशिवाय एप्रिलच्या पहिल्या आठवड्यापासून श्वास घेण्यात त्रास होत होता. त्यांच्या घशातील द्रवाची चाचणी केली असताना त्यांना स्वाइन फ्लूचा संसर्ग झाल्याचे निदान झाले. उपचार सुरू असताना त्यांची प्रकृती खालावली. त्यातच मंगळवारी त्यांचा मृत्यू झाला. नगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील ४७ वर्षांच्या एका महिलेला लागण झाल्याचे तीन दिवसांपूर्वी निदान झाले. काही लक्षणे दिसत असल्याने नियमित उपचार घेण्यास सुरुवात केली. त्या दरम्यान जुलाब सुरू झाले आणि श्वास घेण्यास अडचण होऊ लागली. उपचारादरम्यान न्यूमोनिया होऊन श्वसनविकारासह स्वाइन फ्लूने त्यांचा बुधवारी पहाटे खासगी हॉस्पिटलमध्ये मृत्यू झाला.



जुन्नर तालुक्यातील आणखी एका ३५ वर्षांच्या महिलेला स्वाइन फ्लूची लागण झाल्याचे राष्ट्रीय विषाणू संस्थेने निदान केले. त्यांच्या लक्षणांची तीव्रता वाढल्याने त्यांचा बुधवारी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास मृत्यू झाला. त्यांना न्यूमोनिया, श्वसन विकाराबरोबर सेप्टीक शॉक झाल्याने मृत्यू झाल्याचे कारण आरोग्य विभागाने अहवालात दिले आहे. शहरात आणखी १४ जणांची प्रकृती चिंताजनक असून, राज्यात ६४४ जणांना लागण झाली आहे. तसेच, १२७ जणांचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे. त्यातील ४११ पेशंट उपचारानंतर बरे होऊन घरी गेले आहेत. तर १०६ जणांवर अद्याप विविध हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. पैकी २० जणांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ग्रंथविक्री करणाऱ्यांचा ‘मसाप’तर्फे सन्मान

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

स्वतःच्या मालकीचे किंवा भाड्याचे पुस्तकाचे दुकान नसताना, साहित्य संमेलनातल्या ग्रंथप्रदर्शनात गाळा नसताना, संमेलनातील पुस्तकविक्रीच्या कोटीच्या कोटी उड्डाणांशी दुरान्वयानेही संबंध नसतानाही गेल्या अनेक पिढ्यांपासून जुन्या पुस्तकांची विक्री करणाऱ्यांचा सन्मान महाराष्ट्र साहित्य परिषदेतर्फे करण्यात येणार आहे. शनिवारी, २२ एप्रिलला सायंकाळी ६.३० वाजता मसापच्या पटवर्धन सभागृहात हा कार्यक्रम होणार आहे.

मसाप आणि स्वायत्त मराठी विद्यापीठ यांच्यातर्फे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून समीर अब्दुलगनी कलारकोप, प्रभाकर रामचंद्र सांळुखे, पोपट महादेव वाबळे, लक्ष्मी पोपट वाबळे, प्रशांत खंडेराव कदम, राजेंद्र मल्हारी लिंबोरे, धनंजय जयंत आठवले या जुन्या पुस्तक विक्री करणाऱ्या ग्रंथसेवकांचा सन्मान कार्यक्रमात करण्यात येणार आहे. भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्थेचे सचिव डॉ. श्रीकांत बहुलकर यांच्या हस्ते हा सन्मान होणार आहे.

वर्षातीले बाराही महिने ही मंडळी ‘ना नफा ना तोटा’ या तत्त्वावर जुन्या पुस्तकांची विक्री करतात. अनेक दुर्मिळ पुस्तकांना या विक्रेत्यांनी नवसंजीवनी दिली आहे. रा. चिं. ढेरे यांच्यासारख्या अनेक संशोधकांना या विक्रेत्यांनी मौल्यवान पुस्तके पुरवली आहेत, असे मसापचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांनी सांगितले.

प्रा. जोशी म्हणाले, ‘साहित्य व्यवहाराच्या नकाशावर ज्यांना स्थान नाही तरीही ज्यांचे काम साहित्यव्यवहारासाठी पोषक ठरले आहे, अशा ग्रंथसेवकांचा सन्मान करणे हे परिषदेसारख्या संस्थेचे आद्य कर्तव्य आहे. नव्या पुस्तकांच्या निर्मिती आणि विक्री इतकेच मौल्यवान अशा जुन्या पुस्तकांच्या जतनाचे आणि वितरणाचे कामही तितकेच महत्त्वाचे आहे. ते काम ही मंडळी सर्व प्रकारच्या असुविधांवर मात करून पुढे नेत आहेत. म्हणून या ग्रंथाळलेल्या हातांच्या सन्मानाचा अनोखा कार्यक्रम परिषदेने पुस्तकदिनाच्या निमित्ताने आयोजित केला आहे.’ कार्यक्रमाला मसापचे प्रमुख कार्यवाह प्रकाश पायगुडे, कोषाध्यक्ष सुनीताराजे पवार, स्वायत्त मराठी विद्यापीठाचे संस्थापक श्याम जोशी, सल्लागार रवींद्र गुर्जर आदी उपस्थित राहणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

लोकसेवा आयोगाच्या गोंधळामुळे विद्यार्थी अडचणीत

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, पुणे
स्पर्धा परीक्षांमध्ये एका गुणावरून विद्यार्थ्यांची संधी हुकत असताना महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या गोंधळामुळे राज्यातील विद्यार्थी अडचणीत आले आहेत. आयोगातर्फे पंधरा दिवसांच्या अंतराने घेण्यात आलेल्या परीक्षांच्या उत्तरतालिकेत एकाच प्रश्नाची दोन उत्तरे देण्यात आली आहेत. प्राथमिक उत्तरतालिकेत बरोबर असलेले उत्तर अंतिम उत्तरतालिकेत बदलण्यात आले आहेत. त्यामुळे अचूक उत्तर देऊनही विद्यार्थ्यांना सव्वा गुण गमवावा लागणार आहे.
आयोगातर्फे १५ जानेवारी रोजी तांत्रिक सहायक गट ‘कर’ या पदासाठी परीक्षा घेण्यात आली होती. तर विक्रीकर निरीक्षक पूर्व परीक्षा' २९ जानेवारी रोजी घेण्यात आली. तांत्रिक सहायक पदाच्या परीक्षेच्या प्रश्नपत्रिकेत प्रश्न क्रमांक १२९ आणि विक्रीकर निरीक्षक पूर्व परीक्षेच्या प्रश्नपत्रिकेतील प्रश्न क्रमांक ४६ बाबत विद्यार्थ्यांनी आक्षेप घेतला आहे. तांत्रिक सहायक पदासाठीच्या प्रश्नपत्रिकेत अ) महाराष्ट्रात सर्वात जास्त लोकसंख्येचे स्थलांतर ग्रामीण भागाकडून नागरी भागाकडे होते. ब) ग्रामीण ते नागरी स्थलांतर केवळ रोजगारासाठी होते. क) स्थलांतराचा परिणाम संबंधित ठिकाणांच्या आर्थिक, सामाजिक व सांस्कृतिक स्थितीवर होतो, अशी तीन विधाने देण्यात आली होती. त्यामध्ये फक्त अ व क बरोबर आहेत, असे उत्तर उत्तरतालिकेत देण्यात आले होते. व ते बरोबरही होते. त्यामुळे विद्यार्थ्यांनी याबाबत आक्षेप नोंदवला नाही.
त्यानंतर विक्रीकर निरीक्षक पूर्व परीक्षा २९ जानेवारी रोजी झाली. यामध्ये प्रश्न क्रमांक ४६ हा गाळलेल्या जागा भरण्यासाठी होता. त्यात महाराष्ट्रात सर्वात जास्त स्थलांतर ----- पासून --- होते. या विधानातील गाळलेल्या जागा भरायच्या होत्या. त्यासाठी चार पर्याय देण्यात आले होते. याचे अचूक उत्तर ग्रामीण क्षेत्राकडून नागरी केंद्राकडे होते, असे होते. व प्राथमिक उत्तर तालिकेतही तसेच दाखविण्यात आले होते. मात्र, अंतिम उत्तरतालिका जाहीर करताना याचे उत्तर ग्रामीण क्षेत्राकडून ग्रामीण क्षेत्रांकडे असे देण्यात आले. आयोगाकडून ही चूक अंतिम उत्तरतालिका जाहीर करताना झाल्यामुळे विद्यार्थ्यांना त्यावर आक्षेप नोेंदवणेही शक्य नाही. त्यामुळे अचूक उत्तर देऊन एक गुण मिळण्याऐवजी आयोगाच्या चुकीमुळे सव्वा गुण गमविण्याची भीती विद्यार्थ्यांना आहे. आयोगाने त्वरित या चुकीची दखल घेऊन त्यानुसार विद्यार्थ्यांना गुण द्यावेत, अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे.
विक्रीकर निरीक्षक पूर्व परीक्षेतील सात प्रश्न महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने नुकतेच रद्द केले. तर सहा प्रश्नांची उत्तरे बदलल्याचेही जाहीर केले. एका परीक्षेसाठी आयोगाकडे मोठा कालावधी व तज्ज्ञ असतानाही आयोगाकडून अशा चुका कशा होतात, असा सवाल विद्यार्थ्यांनी उपस्थित केला. एकेका गुणामुळे गुणवत्ता यादीत फरक पडून नोकरीच्या संधीवर परिणाम होतो. त्यामुळे आयोगाने विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळू नये, असे आवाहनही विद्यार्थ्यांनी केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सुजाता श्रॉफवर मनुष्यवधाचा गुन्हा

$
0
0

जामीन मिळाल्याप्रकरणी पोलिस ठरले होते टीकेचे धनी

म. टा. प्रतिनिधी, पुणे

भरधाव कारने पाच जणांना उडवून मायलेकीचा मृत्यू झाल्याप्रकरणी कारचालक सुजाता जयप्रकाश श्रॉफ यांच्यावर अखेर बुधवारी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला. चतु:शृंगी पोलिसांनी या गुन्ह्यात जामीनपात्र कलमे लावल्यामुळे श्रॉफ अटक केल्यानंतर अवघ्या काही तासांत जामीन मिळाला होता.
श्रॉफ यांना जामीन मिळाल्याबद्दल सर्व स्तरातून टीका करण्यात येत होती. या संदर्भात विविध सोशल माध्यमांवर निषेधाच्या प्रतिक्रिया व्हायरल होत होत्या. श्रॉफ यांना वाचविण्याच्या हेतूने पोलिसांनी त्यांच्यावर जामीनपात्र कलमे लावली असल्याची टीका होत होती. अखेर, बुधवारी श्रॉफ यांच्यावर सदोष मनुष्यवधाचे कलम लावण्यात आले.
सोमवारी दुपारी बाणेर येथे सुजाता श्रॉफ यांनी बेदरकारपणे कार चालवून रस्ता ओलांडण्यासाठी दुभाजकावर थांबलेल्या पाच जणांना उडवले. त्यामध्ये ईशा ही तीन वर्षांची मुलगी आणि तिची आई पूजा अजयकुमार विश्वकर्मा यांचा मृत्यू झाला. अपघाताचा गुन्हा दाखल करताना पोलिसांनी ३०४ (अ)२७९, ३३८ कलमे लावली होती. श्रॉफ यांना मंगळवारी सकाळी साडेनऊच्या दरम्यान अटक केल्यानंतर दुपारी लगेचच कोर्टात जामीन मंजूर झाला.
पाच जणांना कारने उडवून दोघांचा जीव घेऊनही अवघ्या काही तासांतच श्रीमती श्रॉफ यांना जामीन मिळाल्याने पोलिसांवर सर्वच स्तरातून टीका झाली. अखेर श्रॉफ यांच्यावर कडक कारवाई व्हावी यासाठी ३०४(अ) कलम काढून ३०४ हे सदोष मनुष्यवधाचे कलम लावण्यात आले. त्यांचा जामीन रद्द व्हावा यासाठी चतु:शृंगी पोलिसांनी कोर्टात अर्ज केला असून, त्यावर २२ एप्रिलला सुनावणी होणार आहे.

सुरुवातीला गुन्हा दाखल करताना साक्षीदारांचा जबाब घेण्यात आला नव्हता. बुधवारी साक्षीदारांचा जबाब घेतल्यानंतर ३०४ (अ) कलम काढून ३०४चा अंतर्भाव करण्यात आला. श्रीमती श्रॉफ यांचा जामीन रद्द व्हावा अशी मागणी न्यायालयाकडे केली आहे.
दयानंद ढोमे, वरिष्ठ निरीक्षक, चतु:शृंगी पोलिस ठाणे

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


कैद्यांसाठीही ‘टेलिमेडिसीन’

$
0
0

पलायन रोखण्यासाठी ससून हॉस्पिटलचा उपक्रम

म. टा. प्रतिनिधी, पुणे

उपचाराच्या निमित्ताने येणाऱ्या कैद्यांच्या पळून जाण्यात वाढ होत असल्याच्या पार्श्वभूमीवर ससून हॉस्पिटलतर्फे कैद्यांसाठीही ‘टेलिमेडिसीन’ सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. अशाप्रकारचा हा राज्यातील पहिलाच प्रयोग ठरणार आहे.
येरवडा कारागृहात चार हजार कैदी आहेत. उपचाराच्या निमित्ताने त्यांना वेळोवेळी ससून हॉस्पिटलमध्ये दाखल केले जाते. उपचारासाठी येणारे कैदी पोलिसांची नजर चुकवून पळून जात असल्याचे प्रकार वाढले आहेत. त्यामुळे ससून हॉस्पिटलबरोबर येरवडा कारागृह प्रशासनाच्या डोकेदुखीत वाढ झाली होती. उपचारासाठी येणाऱ्या कैद्यांच्या ‘दिमती’ला कारागृहाचे मनुष्यबळ तसेच पोलिस यंत्रणा राबवावी लागत होती. त्यामुळे पैसा आणि मनुष्यबळ खर्च करावा लागत होता.
राज्यातील सर्व वैद्यकीय महाविद्यालयांच्या सुरक्षा समितीचे अध्यक्ष आणि माजी पोलिस महासंचालक प्रवीण दीक्षित यांनी यासंदर्भात सूचना केल्या होत्या. त्यानुसार दररोज कैद्यांवर विविध विभागानुसार उपचार करण्यात येणार आहेत. आजाराच्या प्रकारानुसार आठवड्यातील दिवस राखीव ठेवण्यात आले आहेत. टेलिमेडिसीनमुळे ससून हॉस्पिटलचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. अजय तावरे, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. नितीन हिवाळे, डॉ. विश्वनाथ कुलकर्णी, डॉ. अभिजित झिणे आणि तारा राठोड यांनी या उपक्रमात सहभाग घेतला.
दरम्यान, ‘येरवडा कारागृहात चार हजार कैदी आहेत. त्यांना टेलिमेडिसीनटद्वारे उपचार मिळण्यास सुरुवात झाली आहे,’ असे कारागृहाचे महानिरीक्षक भूषणकुमार उपाध्याय यांनी सांगितले.

कैद्यांना उपचारासाठी दाखल करण्यासाठी ससून हॉस्पिटल, पोलिस, कारागृह प्रशासनाचा वेळ आणि पैसा खर्च होत होता. टेलिमेडिसीनद्वारे बुधवारी ११ पेशंटची तपासणी करण्यात आली. त्यामुळे कैद्यांचा फायदा होणार आहे.
डॉ. अजय चंदनवाले, अधिष्ठाता बी. जे. मेडिकल कॉलेज

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

उन्हाळ्याच्या सुट्टीत सिंथेसायझर शिका

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

उन्हाळ्याच्या सुट्ट्यांचे निमित्त साधून पुणेकरांसाठी महाराष्ट्र टाइम्स कल्चर क्लबतर्फे सिंथेसायजर प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. लहान मुलांसह, तरूण-तरूणी आणि ज्येष्ठांनाही कार्यशाळेत सहभागी होता येणार आहे.
महाराष्ट्र टाइम्स कल्चर क्लब आणि केदार भागवत म्युझिक अॅकॅडमी यांच्या संयुक्त विद्यमाने एप्रिल आणि मे महिन्यात ही कार्यशाळा होणार आहे. लॉ कॉलेज रस्त्यावरील केदार भागवत म्युझिक अॅकॅडमी मध्ये २४ ते २८ एप्रिल दरम्यान सकाळी १० ते १२ किंवा संध्याकाळी ४ ते ६ या वेळात पहिली बॅच घेतली जाणार आहे. सलग पाच दिवस रोज दोन तास असा कार्यशाळेचा कालावधी असणार आहे. ज्यांनी यापूर्वी या वाद्याचे प्रशिक्षण घेतलेले नाही अशांनाच विशेष मार्गदर्शन करण्यात येणार आहे.
कार्यशाळेत सिंथेसायझरची रचना, वाद्य वाजवण्याची योग्य पद्धत, स्वर व ताल यांची ओळख, नोटेशन्सचे लिखाण, वाचन, गाणी कशी ऐकावीत आणि वाजवावीत याबद्दल मार्गदर्शन केले जाईल. सिंथेसायझर वाजवताना दोन्ही हातांचा यथायोग्य वापर आणि कॉर्डस याबद्दल प्राथमिक मार्गदर्शन केले जाईल. कार्यशाळेसाठी वयाची कोणतीही अट असणार नाही. कोणत्याही वयोगटातील व्यक्तींना सहभागी होता येणार आहे. कार्यशाळेसाठी प्रवेश मर्यादित असून, त्यासाठी नावनोंदणी करणे आवश्यक आहे. महाराष्ट्र टाइम्स कल्चर क्लबच्या सदस्यांना कार्यशाळेसाठी विशेष सवलत देण्यात येईल. नावनोंदणीसाठी संपर्क : ९८५००७२५५

सिंथेसायझर प्रशिक्षण कार्यशाळा - केदार भागवत म्युझिक अॅकॅडमी, लॉ कॉलेज रस्ता पहिली बॅच - २४ ते २८ एप्रिल, वेळ - सकाळी १० ते १२ किंवा संध्याकाळी ४ ते ६ नावनोंदणीसाठी संपर्क - ९८५०००७२५५

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आपल्या भाषांच्या संवर्धनाची गरज

$
0
0

आध्यात्मिक गुरू श्री श्री रविशंकर यांचे आवाहन

म. टा. प्रतिनिधी, पुणे

‘संस्कृत आणि तमिळ भाषेतून देशातील अन्य भाषांची निर्मिती झाली आहे. मात्र, सध्या सर्वच भाषांवर इंग्रजी भाषेचे अतिक्रमण झाल्याचे दिसत आहे. त्यामुळे मूळ भाषेचा आत्मा हरवत चालला आहे. चीन, जपान, फ्रान्स, जर्मनी या देशांनी भाषा संवर्धनासाठी आणि संरक्षणासाठी सर्व साहित्य आपल्या भाषेत आणले. त्यामुळे त्यांच्या भाषा आणि महत्त्व टिकून आहे. आपणही भाषांना जिवंत ठेवण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत,’ असे आवाहन श्रीश्री रविशंकर यांनी बुधवारी केले.
विश्व हिंदी साहित्य परिषदेच्यावतीने विश्व वागेश्वरी सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी ते बोलत होते. माजी राष्ट्रपती प्रतिभा पाटील, पालकमंत्री गिरीश बापट, महापौर मुक्ता टिळक, पं. दीनदयाळ ट्रस्टचे संचालक विनोद शुक्ल, विश्व हिंदी साहित्य परिषदेचे अध्यक्ष आशिष कंदवे, विश्व हिंदी साहित्य परिषदेचे कुलाधिपती एच. सी. गनेशिया, माजी प्रशासकीय अधिकारी आय. जे. गोयल आदी या वेळी उपस्थित होते.
डॉ. के. एच. संचेती, डॉ. बिंदेश्वर पाठक, सुप्रीम कोर्टाच्या निवृत्त न्यायाधीश ज्ञानसुधा मिश्रा, लेखिका-कवयित्री डॉ. अरुणा ढेरे, शिक्षण क्षेत्रातील जयश्री पेरीवाल, साहित्य क्षेत्रातील डॉ. हरीश नवल, रंगकर्मी संजय भारद्वाज, ज्योतिषी मुकेश भारद्वाज, तेजेंद्र शर्मा आणि संस्कृती विश्वविद्यालयाचे कुलगुरू सचिन गुप्ता यांना पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
साहित्यिकांनी हिंदी भाषेला समृद्ध केले असून, त्यांनीच भाषेचा प्रसार केला. आपल्या हिंदी भाषेवर संस्कृतचा प्रभाव आहे. परंतु, काही दशकांमध्ये हिंदीतून संस्कृत बाहेर पडले असून, त्यात इंग्रजीचा प्रवेश झाला आहे. त्यामुळे नागरिकही मूळ भाषा सोडून मिश्र भाषा बोलताना दिसतात, अशी खंत पाटील यांनी व्यक्त केली.

भारतीय भाषा आणि संस्कृती या दोन्ही गोष्टी अध्यात्माशी जोडल्या आहेत. अध्यात्मामुळे जसे आपण जवळ येतो, तसाच अनुभव भाषांमुळे येतो. अन्य भाषांचा भारतीय भाषांवर होणार परिणाम आपण रोखू शकत नाही. पण, त्या भाषांमुळे आपल्या भाषेचा स्वभाव बदलणार नाही याची तसदी आपण घेतली पाहिजे‍.
- श्री श्री रविशंकर

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

'आत्महत्या रोखण्यासाठी सत्संगाचीही गरज'

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

‘मन शरीराचे नियंत्रण करते. शरीर बलदंड असले, तरी मन कमजोर असेल तर त्या शरीराचा उपयोग होत नाही. भारताला ध्यान, योगासने, प्राणायामाची परंपरा, दैवी देणगी लाभली आहे. या माध्यमातून सर्वांचे आत्मभान जागवणे आवश्यक आहे. शेतकरी केवळ कर्जापोटीच नव्हे तर आत्मविश्वासाच्या अभावामुळेही आत्महत्या करत आहेत. शेतकरी आत्महत्या थांबविण्यासाठी केवळ कर्जमुक्तीचीच नव्हे तर सत्संगाचीही गरज आहे,’ असे मत आध्यात्मिक गुरू श्री श्री रविशंकर यांनी बुधवारी व्यक्त केले.

‘आर्ट ऑफ लिव्हिंग’तर्फे आयोजित ‘जीवनसरिता’ या नद्यांच्या जलशुद्धीकरणाशी संबंधित कार्यक्रमात ते बोलत होते. केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री प्रकाश जावडेकर, आमदार मेधा कुलकर्णी, महापालिकेच्या स्थायी समितीचे अध्यक्ष मुरलीधर मोहोळ, बांधकाम व्यावसायिक अनिरुद्ध देशपांडे आदी या वेळी उपस्थित होते. आर्ट ऑफ लिव्हिंगच्या इको इन्झाइम सोल्युशनच्या माध्यमातून मुळा-मुठेसह ११ नद्यांचे नैसर्गिक पद्धतीने जलशुद्धीकरण करण्यात येणार आहे. त्यांचे जलपूजन या वेळी करण्यात आले.

‘सर्वच कामे पैशाने होत नाहीत, त्यासाठी प्रेरणेचीही आवश्यकता असते. व्यक्ती जेव्हा तणावमुक्त असतो, तेव्हाच त्याला सत्कार्याची प्रेरणा मिळते. जो व्यक्ती नियमित योगासने, ध्यानधारणा, प्राणायाम करतो, त्याला उत्साह आणि स्फूर्तीचा लाभ होतो. जपानसारखा देश सर्वसंपन्न असला, तरी तिथे युवकांच्या आत्महत्येचे प्रमाण प्रचंड आहे. कारण तेथील युवकांमध्ये आत्मविश्वासाचा अभाव आहे. भारतीय युवकांमध्ये आध्यात्मिक लहर जागृत करून त्यांचा आत्मविश्वास वाढविणे आवश्यक आहे,’ असे रविशंकर म्हणाले.

तिसरे महायुद्ध झाले तर ते पाण्यावरूनच होईल. पाणी हेच जीवन आहे. जलसंवर्धऩ आणि जलशुद्धीकरण सर्वांचेच कर्तव्य आहे. नद्यांच्या शुद्धीकरणातून खूप काही साध्य होईल. आर्ट ऑफ लिव्हिंगही शास्त्रशुद्ध मार्गाने नदीशुद्धीकरणासाठी काम करत आहे, असेही ते म्हणाले.

पंतप्रधानांनी फक्त गंगाच नव्हे तर सर्वच नद्यांच्या शुद्धीकरणाला प्राधान्य दिले आहे. लहानपणापासून मी मुळा-मुठेच्या शुद्धीकरणाची चर्चाच ऐकत होतो. आता जायका प्रकल्पाच्या माध्यमातून मुळा-मुठा नद्यांच्या सुधारणेसाठी हजार कोटी रुपयांचा निधी उपलब्ध होणार आहे, असे जावडेकर म्हणाले.

ज्ञानेश्वरांच्या रचनेने शेवट

रविशंकर यांनी उपस्थितांना २० मिनिटे ध्यान करायला लावले. या काळात ३०-४० हजारांच्या गर्दीतही अगदी टाचणी पडली तरी आवाज यावा, अशी शांतता होती. ध्यान झाल्यानंतर पसायदान झाले. त्यानंतर रविशंकर यांनी ‘पैल तोगे काऊ कोकताहे’ या ज्ञानेश्वरांच्या रचनेला सुरुवात केली आणि टाळ्यांच्या कडकडाटात सर्वांचा निरोप घेतला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘त्याच्या’ अवयवदानामुळे दोघांना मिळाला पुनर्जन्म

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

पुण्यातील पंचवीस वर्षीय ब्रेनडेड युवकाच्या यकृतासह मूत्रपिंडाचे दान केल्याने गुजरात आणि पुण्यातील दोघांना बुधवारी जीवनदान मिळाले. त्यामुळे यकृताचा कॅन्सर झाल्यानंतर प्रत्यारोपणामुळे प्राण वाचविले जाऊ शकतात, असा निष्कर्ष वैद्यकीय तज्ज्ञांनी काढला आहे.

वाघोलीजवळ काही दिवसांपूर्वी युवकाचा अपघात झाला. उपचारासाठी त्याला सोमवारी डेक्कन येथील सह्याद्री हॉस्पिटलमध्ये आणण्यात आले. मेंदूमध्ये प्रचंड रक्तस्त्राव झाल्याने त्याच्यावर ऑपरेशन कऱणे अशक्य होते. त्यानंतर तो ब्रेनडेड झाला. युवकाच्या भावाचे अवयवदानासाठी समुपदेशन कऱण्यात आले. अवयवदानास संमती दिल्यानंतर गुजरातमधील ६२ वर्षीय आणि पुण्यातील ५४ वर्षीय व्यक्तीला अनुक्रमे यकृत आणि मूत्रपिंड देण्यात आले. प्रत्यारोपणानंतर या दोघांची प्रकृती सुखरूप आहे,’ अशी माहिती सह्याद्री हॉस्पिटलचे यकृत प्रत्यारोपण तज्ज्ञ डॉ. बिपीन विभुते यांनी दिली.

युवकाच्या हृदयाचा दाब कमी होता तसेच, एक मूत्रपिंड जन्मापासूनच लहान आकाराचे होते. त्यामुळे ते काढण्यात आले नाही. गुजरातमधील व्यक्तीला यकृताचा कॅन्सर झाला होता. हा आजार . कॅन्सर लिव्हरपर्यंत होता. कॅन्सर यकृताच्या बाहेर पडून शरिरात पसरला असता तर, पेशंटचा जीव धोक्यात आला असता. परंतु, कॅन्सर यकृतापुरताच मर्यादित असल्याने यकृताचे प्रत्यारोपण करण्यात आले, असेही डॉ. विभुते म्हणाले.

दरम्यान, यकृताबरोबर मूत्रपिंडाचे प्रत्यारोपण कऱण्यात आले. शहरातील ५४ वर्षीय व्यक्तीला मूत्रपिंड खराब झाल्याने डायलिसिस करावे लागत होते. मूत्रपिंड प्रत्यारोपणाची त्यांना गरज होती. त्यामुळे युवकाचे मूत्रपिंड त्यांना बसविण्यात आले. डॉ. बिपीन विभुते, डॉ. राहुल सक्सेना, डॉ. अभिजित माने, डॉ. राहुल तांबे यांनी यकृताचे प्रत्यारोपण केले. मूत्रपिंडाचे प्रत्यारोपण तज्ज्ञ डॉ. अतुल सदगुरे, डॉ. केतन पै, डॉ. गौरव गुप्ता यांनी प्रत्यारोपण यशस्वी केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कोर्टाने सुनावली समाजसेवेची शिक्षा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

सोसायटीची नोंदणी करण्यात आल्यानंतरही मूळ जागा नावे करून न दिल्याच्या प्रकरणात दाखल करण्यात आलेल्या दाव्यात कोर्टाने संबंधित बांधकाम व्यावसायिकाला कॅन्सरग्रस्त लोकांसाठी वर्षभर समुपदेशन आणि प्राणायाम शिबिरे आयोजित करण्याची शिक्षा दिली आहे.

संबंधित व्यावसायिकाने सिप्ला पॅलिटेटिव्ह केअर सेंटर, वारजे येथे किंवा अन्य कोठेही शिबिरे आयोजित करावीत तसेच त्याचा अहवाल सादर करावा असेही निकालात नमूद करण्यात आले आहे. या व्यावसायिकाचे वय ८० असून, ते लष्करातून १९८५ मध्ये निवृत्त झाले आहेत. त्यांनी बांधकाम व्यवसाय १९९५ मध्ये बंद केला. ते सध्या सामाजिक कार्य करतात. त्यांच्याविरुद्ध दाखल दाव्याचे स्वरूप लक्षात घेता त्यांना वरिलप्रमाणे शिक्षा सुनावण्यात येत असल्याचे निकालात नमूद केले आहे.
या प्रकरणी सॅनकुणी पुष्कर्णा (वय ५४ रा. अजिंक्यतारा को- ऑपरेटीव्ह सोसायटी, मोहनवाडी, येरवडा) यांनी फिर्याद दाखल केली होती. फिर्यादीतर्फे अॅड. ए. के. जांभळी यांनी कामकाज पाहिले.

फिर्यादींनी टिळक असोसिएट्सचे प्रोपायटर अशोक रामचंद्र टिळक ( रा. चिंतामणी बंगला, मंगलवाडी सोसायटी, सेनापती बापट रोड) यांच्याविरुद्ध दावा दाखल केला होता. या प्रकरणात एकाची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. फिर्यादी यांनी टिळक यांच्याकडून येरवडा येथे उभारण्यात येत असलेल्या इमारतीतील दोन फ्लॅट खरेदी केले होते. बांधकाम पूर्ण झाल्यानंतर फिर्यादीला ताबा देण्यात आला होता. संबंधित इमारतीची नोंदणी करण्यात आली. नोंदणीनंतर बिल्डरतर्फे मूळ जागा नावे करून देण्यात आली नाही. महाराष्ट्र ओनरशिप फ्लॅटस (रेग्युलेशन ऑफ प्रमोशन ऑफ कन्स्ट्रक्शन सेल, मॅनेजमेंट अँड ट्रान्स्फर) अॅक्ट नुसार हा दावा करण्यात आला होता. या प्रकरणात कोर्टाने टिळक यांना समाजसेवेची ​शिक्षा सुनावली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

साहित्यिक प्रा. रामनाथ चव्हाण यांचे निधन

$
0
0

मटा ऑनलाइन वृत्त । पुणे

दलित चळवळीतील आघाडीचे लेखक-संशोधक व नाटककार रामनाथ चव्हाण यांचे आज सकाळी ​ दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात अल्पशा आजाराने निधन झाले. ते ६५ वर्षे वयाचे होते. रामनाथ चव्हाण यांचा दलित साहित्य आणि सामाजिक परिवर्तनाच्या चळवळीतील महत्वाचे लेखक म्हणून उल्लेख केला जातो. त्यांच्या पश्चात पत्नी शीला, मुले सागर व समीर असा परिवार आहे.

त्यांनी कथा, कादंबरी, नाटक, एकांकिका, व्यक्तिचित्रे, भटक्या-विमुक्तांच्या संदर्भातले संशोधनात्मक लेखन असे विविध साहित्य प्रकार हाताळलेले आहेत. संशोधनपर लिखाण, नाटक, कादंबरी, कथा, एकांकिका आणि व्यक्तिचित्रे या साहित्यप्रकारांत त्यांनी मौलिक योगदान दिले आहे. 'भटक्या-विमुक्तांची जातपंचायत' हे पाच खंडात प्रसिद्ध झालेले त्यांचे लिखाण हा मराठीतील महत्त्वाचा दस्तावेज आहे. 'जाती व जमाती' हेही त्यांचे एक महत्त्वाचे पुस्तक आहे. या पुस्तकाचा जपानी भाषेतही अनुवाद झाला आहे. याचबरोबर भटक्या विमुक्तांचे अंतरंग, पारध, बिनचेहऱ्याची माणसं, गावगाडा : काल आणि आज, घाणेरीची फुलं, जगण्यासाठी, निळी पहाट, पुन्हा साक्षिपुरम, वेदनेच्या वाटेवरून, दलितांचा राजा : डॉ. बाबासाहेब आंबेडकर हीही त्यांची पुस्तके प्रसिद्ध झालेली आहेत.

भटक्या विमुक्तांचे जग व त्यांचे जीवन हा त्यांच्या अभ्यासाचा मुख्य विषय होता. तब्बल ३० वर्षाहून अधिक काळ त्यांनी या विषयासाठी अविचल निष्ठेने स्वतःला वाहून घेतले होते. त्यासाठी महाराष्ट्र आणि महाराष्ट्राबाहेर त्यांनी पदरमोड करून भरपूर भटकंती केली. भटक्या-विमुक्तांच्या पालावर, तांड्यांवर आणि वस्त्यांवर प्रत्यक्ष भटकून त्यांच्याशी जवळीक निर्माण करून त्यांच्या मुलाखतींतून, भटकंतीतील निरीक्षणांतून या जमातींविषयी भरपूर माहितीचे संकलन केले. भटक्या जमातींचा पूर्वेतिहास, त्यांच्या लोककथा, पुराणकथा, रूढी-परंपरा, देव-देवता, उत्सव, सण, विवाह संस्कार, काडीमोड व इतर न्यायनिवाडे, अंत्यविधी, व्यवसाय, भाषा, त्यांची जातपंचायत, काळानुसार या सगळ्यात झालेले बदल, त्यांचे प्रश्न याविषयी त्यांनी शक्य तितक्या तपशीलात माहिती गोळा केली. त्याच विपुल माहितीतून त्यांचा 'भटक्या-विमुक्तांची जातपंचायत' हा दस्तावेज पाच खंडात प्रसिद्ध झाला. भटक्या विमुक्तांचे वेगळे जग समजून घेण्यासाठी सर्वसामान्य वाचकांबरोबरच या विषयाच्या संशोधक-अभ्यासकांसाठी, सामाजिक कार्यकर्त्यांसाठी मराठीतील हा एक महत्त्वाचा दस्तावेज ठरला. पुण्याच्या देशमुख आणि कंपनी या प्रकाशन संस्थेने हे खंड प्रकाशित केले आहेत.

उत्कृष्ट साहित्यनिर्मितीबद्दल राज्य शासनाच्या सहा पुरस्कारांसह अनेक पुरस्कार त्यांना मिळाले होते. पुणे विद्यापीठातील अण्णाभाऊ साठे अध्यासनाचे प्रमुख म्हणूनही त्यांनी काही काळ काम पाहिले होते. महाराष्ट्र शासनाच्या विविध समित्यांवर सदस्य म्हणून देखील त्यांनी काम पाहिले होते. दलित चळवळीतही त्यांचा महत्त्वाचा सहभाग होता.

रामनाथ चव्हाण यांचे साहित्य :-

आधारस्तंभ (नाटक), पारख (नाटक), भटक्या-विमुक्तांचे अंतरंग, जाती-जमाती, भटक्या-विमुक्तांची जातपंचायत (खंड १ ते ४), घाणेरीची फुले , वेदनेच्या वाटेवरून

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


सामाईक प्रवेश परीक्षा येत्या ११ मे रोजी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
राज्य तंत्रशिक्षण संचालनालयाकडून (डीटीई) इंजिनीअरिंग आणि औषधनिर्माणशास्त्र पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी घेण्यात येणारी सामाईक प्रवेश परीक्षा (सीईटी) ११ मे रोजी होत असून, त्यासाठी राज्यातून तब्बल ३ लाख ८९ हजार ३९६ विद्यार्थ्यांनी अर्ज केले आहेत. एवढ्या मोठ्या प्रमाणात अर्ज करण्याची ही पहिलीच वेळ आहे.
तंत्रशिक्षण विभागाचे सहायक संचालक राजेंद्र गायकवाड यांनी ही माहिती दिली. सीईटीसाठी ऑनलाइन अर्ज करण्याची मुदत ३० मार्च रोजी संपली होती. मात्र, अनेक विद्यार्थी अर्ज करण्यापासून वंचित राहिले होते. त्यामुळे राज्याच्या प्रवेश परीक्षा कक्षाने त्यांना संधी देण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार विद्यार्थ्यांना अर्ज करण्यासाठी १० एप्रिलपर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती. त्यामुळेच यंदा अभियांत्रिकी व औषधनिर्माणशास्त्र प्रवेशासाठी सर्वाधिक अर्ज आले.
सीईटीसाठी पुणे विभागामधून सर्वाधिक ९२ हजार ८८४ विद्यार्थ्यानी अर्ज केले. मुंबई विभागातून ८० हजार ३०४ तर सांगली विभागातून ३२ हजार ३७७ विद्यार्थ्यांनी अर्ज केले.नाशिक विभागातून ४६ हजार १८७, औरंगाबाद विभागातून ३२ हजार ९०१ तर नांदेड विभागातून २७ हजार ११९ विद्यार्थ्यांनी अर्ज केले. अमरावती विभागातून ३२ हजार १५८ आणि नागपूर ४५ हजार ४६६ अशा एकूण आठ विभागांमधून ३ लाख ८९ हजार ३९६ विद्यार्थ्यांनी अर्ज केलेले आहेत. पुणे विभागाच्या अंतर्गत येणाऱ्या पुणे, सोलापूर, सातारा, अहमदनगर ही शहरे आहेत. या शहरांमधून परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी पुण्यात १०२, सोलापूरमध्ये ३८, साताऱ्यात ३१ आणि अहमदनगरमध्ये ६७ अशा एकूण २३८ केंद्रावर परीक्षा होणार आहे.
००
हॉलतिकीट लॉग इन आयडीवर मिळणार
विद्यार्थ्यांची परीक्षा येत्या ११ मे रोजी सकाळी १० वाजता सुरू होणार असून, गणित विषयाचा पहिला पेपर १० वाजता तर भौतिकशास्त्र व रसायनशास्त्राचा दुसरा पेपर १२.३० वाजता सुरू होईल. तसेच, जीवशास्त्राचा पेपर दुपारी ३ वाजता होणार आहे. विद्यार्थ्यांना त्यांचे हॉलतिकीट त्यांच्या नोंदणीकृत लॉग इन आयडीवर येत्या २४ एप्रिलपासून ११ मे पर्यंत उपलब्ध होणार आहे. विद्यार्थ्यांना लॉग इन आयडी आणि पासवर्ड टाकून हॉलतिकीट डाउनलोड करता येईल, अशी माहिती तंत्रशिक्षण संचालनालयाने दिली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गोंधळ, निलंबन आणि घोषणायुद्ध

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पिंपरी
शास्तीकराच्या मुद्यावरून पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या गुरुवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत गोंधळ, निलंबनाची कारवाई आणि जोरदार घोषणायुद्धाचे विदारक चित्र लोकशाहीच्या मंदिरात पाहावयास मिळाले. सत्तारूढ भारतीय जनता पक्ष आणि विरोधी राष्ट्रवादी काँग्रेस यांनी एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडत तोंडसुख घेतले.
शास्तीकर माफीच्या निर्णयाचा लाभ सरसकट सर्व अनधिकृत बांधकामांना मिळावा तसेच या निर्णयाची अंमलबजावणी जानेवारी २०१५ ऐवजी २० एप्रिल २०१७ पासून व्हावी, अशी जोरदार मागणी करीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या सदस्यांनी केली. त्यावरूनच गोंधळाला प्रारंभ झाला. तो सुमारे दोन तास चालू होता.
शास्तीकरासंदर्भात ६०० चौरस फूट, ६०१ ते एक हजार चौरस फूट आणि एक हजार एक चौरस फुटांवरील अनधिकृत निवासी बांधकामांना आकारणीच्या शासनाच्या परिपत्रकाचे अवलोकन करण्याचा प्रस्ताव सभागृहासमोर मंजुरीसाठी होता. शहरात ६०० चौरस फुटांपर्यंतची ३० हजार ३५६ अनधिकृत बांधकामे आहेत. तर, ६०१ ते एक हजार चौरस फुटांपर्यंतच्या अनधिकृत बांधकामांची संख्या १७ हजार ४५२ आहे. एक हजार एक चौरस फुटांवरील अनधिकृत बांधकामांची संख्या १६ हजार ३८० आहे. या सर्व बांधकामांना सरसकट शास्तीकर माफ करावा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेच्या सदस्यांनी केली. तर, एक हजार चौरस फुटांपर्यंतच्याच अनधिकृत बांधकामांना शास्तीकर माफ करावा, अशी उपसूचना भाजपच्या माई ढोरे यांनी केली. उपसूचनेसह विषय मंजूर झाल्याचे महापौर नितीन काळजे यांनी जाहीर करताच गोंधळाला सुरुवात झाली.
विरोधी पक्षनेते योगेश बहल यांच्यासह मंगला कदम, दत्ता साने, मयूर कलाटे यांना पुढील तीन सर्वसाधारण सभांसाठी निलंबन केल्याचे महापौरांनी जाहीर करताच राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सदस्यांनी सभात्याग केला. सभागृहाच्या प्रवेशद्वारासमोर ठिय्या आंदोलन ‘नहीं चलेगी, नहीं चलेगी, दादागिरी नही चलेगी’, ‘लोकशाहीचा अपमान करणाऱ्या भाजपचा धिक्कार असो’, ‘निलंबनाची कारवाई रद्द झालीच पाहिजे’ अशा घोषणा दिल्या. त्याला प्रत्युत्तर म्हणून भाजपच्या सदस्यांनीही ‘चले जाव, चले जाव राष्ट्रवादी चले जाव’, ‘राष्ट्रवादी हाय हाय’, ‘भारतीय जनता पक्षाचा विजय असो’ अशा घोषणा दिल्या. सुमारे अर्धा तास हे घोषणायुद्ध चालू होते.
निलंबनाच्या कारवाईवर ठाम असल्याचे महापौरांनी पुन्हा एकदा स्पष्ट केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसने तीव्र निषेध व्यक्त केला. शिवसेनेचे गटनेते राहुल कलाटे, मनसेचे गटनेते सचिन चिखले यांनीही भाजप हुकूमशाही पद्धतीने कारभार करीत असल्याचा आरोप केला.

सभेतील अन्य महत्त्वाचे निर्णय
सभेसाठी सदस्यांची बायोमेट्रीक पद्धतीने हजेरी घेण्याचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला. स्मार्ट सिटीसाठी ‘एसपीव्ही’ स्थापनेचा प्रस्ताव आणि नाशिक फाटा ते मोशी इंद्रायणी नदीपर्यंत आणि किवळे-मामुर्डी ते वाकड मुळा नदीवरील पुलापर्यंत हे सार्वजनिक बांधकाम विभागाकडील दोन प्रमुख रस्ते पालिकेकडे हस्तांतरण हे दोन्ही प्रस्ताव तहकूब ठेवण्यात आले. क्षेत्रीय कार्यालयांच्या पुनर्रचनेत सहाऐवजी आठ क्षेत्रीय कार्यालयांना सभेने मंजुरी दिली.

सभेचे कामकाज चालू असताना सर्वांना बोलण्याची संधी दिली होती. विषय मंजूर झाल्यानंतर त्यावर बोलू देणे योग्य नाही. महापालिकेत राष्ट्रवादी काँग्रेसची सत्तेची खुर्ची गेली आहे. त्यांना पराभव सहन होत नाही. केवळ स्टंट म्हणून ते आंदोलनाचा पवित्रा घेत आहेत. सभागृहात गैरवर्तन केल्याच्या कारणावरून चार नगरसेवकांना पुढील तीन सर्वसाधारण सभांसाठी निलंबित केले आहे. ते मागे घेणार नाही. सत्तेत असताना शास्तीकराचा प्रश्न ते सोडवू शकले नाहीत. आता केवळ विरोधासाठी विरोध करीत आहेत.
- नितीन काळजे (महापौर)

शास्तीकर सरसकट रद्द करा, अशी राष्ट्रवादी काँग्रेसची मागणी होती. परंतु, चार नगरसेवकांचे निलंबन करण्यात आले. महापौरांना सभागृहात रिमोट कंट्रोलच्या दबावाखाली निर्णय घ्यावे लागतात. या दादागिरीचा आम्ही निषेध करतो. सभागृहात नियमांची पायमल्ली केली जात आहे. भाजपमधील काही नगरसेवक लाटेमध्ये निवडून आले. त्यांना महापालिकेच्या धोरणाबाबत माहिती नाही. सूडबुद्धीने निलंबनाची कारवाई करून सभागृहात बजेटवरील चर्चेपासून आम्हाला रोखण्याचा भाजपचा डाव आहे.
- योगेश बहल (विरोधी पक्षनेते)

कौतुक अन् धिक्कारही....
शास्तीकराचा प्रलंबित प्रश्न मार्गी लावल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आमदार लक्ष्मण जगताप आणि महेश लांडगे यांच्यावर सभागृहात भाजपच्या सदस्यांनी कौतुकाचा वर्षाव केला. विरोधी राष्ट्रवादी काँग्रेसनेही मुख्यमंत्र्यांचे अभिनंदन केले. परंतु, विरोध नोंदविला नाही म्हणून विरोधी पक्षाच्या सदस्यांनी भाजपचा धिक्कारही केला. हुकूमशाही पद्धतीने भाजप कारभार करीत राहिल्यास भविष्यात राजकीय संघर्ष अटळ आहे, असा इशाराही राष्ट्रवादी काँग्रेसने दिला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

डॉ. पी. ए. इनामदार यांना शिक्षा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
जागेच्या वादातून कोर्टात दावा दाखल केल्याच्या रागातून एकाला ऑफिसमध्ये बोलावून मारहाण करून धमकी दिल्याप्रकरणी महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटन एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष डॉ. पी. ए. इनामदार यांना एक महिना साधी कैद व एक हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी योगेश पुजारी यांच्या कोर्टाने हा निकाल दिला.
या प्रकरणात सबळ पुराव्याअभावी इतर दोघांची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. या प्रकरणी जावेद महंमद हुसेन सैय्यद (३८, रा. कोंढवा) यांनी लष्कार पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती.
फिर्यादी सैय्यद यांनी लक्ष्मीनगर कोंढवा येथील जागेवर डॉ. पी. ए. इनामदार (५९, रा. दौलत बिल्डिंग, नाना पेठ) यांच्या मुस्लिम को. ऑफ बँकेच्या कॅम्प शाखेतून २९ एप्रिल २००४ रोजी कर्ज घेतले होते. ती जागा बँकेचे वसुली अधिकारी अब्दुल कादर अब्दुल सत्तार (५५, रा. म. हौ. बोर्ड, येरवडा) यांनी परस्परपणे इब्राहिम शेख भाईजान (५२, रा. भवानी पेठ) यांना १६ जुलै २००७ रोजी विकली. त्यामुळे सैय्यद यांनी बँकेचे वसुली अधिकारी अब्दुल सत्तार यांच्या विरोधात कोर्टात दावा दाखल केला होता.
या कारणावरून डॉ. पी.ए. इनामदार यांनी जावेद सैय्यद यांना एक नोव्हेंबर २०११मध्ये आझम कॅम्पस येथील कार्यालयात बोलावून घेतले. त्यानंतर सैय्यद यांना डॉ. इनामदार आणि इतर दहा-बारा जणांनी शिवागाळ करून मारहाण केली. तसेच त्यांना जीवे मारण्याची व खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी दिली.
सैय्यद यांनी डॉ. पी. ए. इनामदार, अब्दुल सत्तार व इब्राहिम शेख यांच्या विरोधात लष्कर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती. लष्कर पोलिसांनी घटनेचा तपास करून कोर्टात आरोपपत्र दाखल केले. सरकारी वकील किरण बेंडभर यांनी या खटल्याचे कामकाज पाहिले. त्यांनी या खटल्यात एकूण आठ साक्षीदार तपासले. पोलिस नाईक प्रदीप कडूसकर यांनी त्यांना मदत केली. कोर्टाने पी. ए. इनामदार यांना एक महिन्याच्या साध्या कैदेची शिक्षा सुनावली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रत्नागिरी आणि देवगड हापूसला मिळाले जीआय

$
0
0

परिसरातील शेतकऱ्यांना मिळाला दिलासा
म. टा. प्रतिनिधी, पुणे
फळांचा राजा म्हणून भारतबरोबरच संपूर्ण जगात नावलौकिक मिळविणाऱ्या रत्नागिरी आणि देवगड हापूस आंब्याच्या शिरपेचात आणखी एक तुरा खोवला गेला आहे. रत्नागिरी आणि देवगड हापूस आंब्याला मानाचे ‘जीआय’ (भौगोलिक उपदर्शन) हे गुणवत्तेचे मानांकन गुरुवारी मिळाले. त्यामुळे हा हापूस आंबा ‘जीआय’ टॅगचा वापर करून केवळ रत्नागिरी आणि देवगड परिसरातील शेतकऱ्यांनाच विकता येईल. तसेच, रत्नागिरी आणि देवगड हापूस सांगून इतर कोणत्याही ठिकाणचा आंबा विकणाऱ्यांना यापुढे अशा प्रकारे आंब्यांची विक्री करता येणार नाही. यामुळे ग्राहकांना अस्सल हापूस आंब्याची चव चाखायला मिळणार आहे.
cरत्नागिरी आणि देवगड हापूस आंब्याला मानाचे ‘जीआय’ मानांकन मिळण्यासाठी केळशी आंबा उत्पादक संघ रत्नागिरी आणि देवगड आंबा उत्पादक संघ या दोन संस्थेतर्फे सुमारे साडेचार वर्षांपासून हा लढा सुरू होता. संघातर्फे अजित गोगटे यांनी बाजू लावून धरली. अखेर केंद्र सरकारच्या वाणिज्य मंत्रालयाच्या भौगोलिक उपदर्शन विभागाने हापूस आंब्याबाबत सर्व प्रकारचे दावे ऐकून आंब्याला ‘जीआय’ मानांकन दिले आहे. त्यामुळे आता रत्नागिरी आणि देवगड परिसरात हापूस आंब्याचे उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांना दिलासा मिळाला असून या आंब्याला जगात अधिक महत्त्व प्राप्त होणार आहे, असे संस्थेतर्फे लढा देणारे प्रा. गणेश हिंगमिरे यांनी सांगितले.
जीआय टॅग हा त्याच परिसरातच येणाऱ्या विशिष्ट फळाला किंवा एखाद्या उत्पादनाला दिला जातो. फळाच्या अथवा उत्पादनाच्या बौद्धिक संपदा, उत्तम गुणवत्ता आणि दर्जाहून हा जीआय टॅग देण्यात येतो. देशात आतापर्यत कृषी क्षेत्राशी निगडीत असणाऱ्या ८७ उत्पादनांना जीआय मानांकन देण्यात आले आहे. त्यापैकी २३ उत्पादने राज्यातील आहेत. रत्नागिरी आणि देवगड हापूस आंब्याला जीआय मानांकन मिळाल्याने या आंब्यांना उत्पादनाचा जागतिक दर्जा मिळाला आहे. आंतरराष्ट्रीय व्यापार संघटनेच्या कायद्यानुसार जीआय मानांकन हे आंब्याच्या विविध देशांमध्ये निर्यातीसाठी शेतकऱ्यांना उपयोगी पडणार आहे.
‘रत्नागिरी आणि देवगड हापूस आंब्याला जीआय मानांकन मिळाल्याने या आंब्याच्या नावाखाली कर्नाटक हापूस आंबा विकणाऱ्यांना यापुढे असे प्रकार करता येणार नाही. त्यामुळे ग्राहकांची देखील बाजारपेठेत फसवणूक होणार नाही. तसेच, त्यांना हापूस आंब्याची चव चाखायला मिळणार आहे. दरम्यान, भौगोलिक उपदर्शन विभागाकडून याबाबतची कारवाई पूर्ण करण्यासाठी तीन महिन्यांचा कालावधी लागेल. या हंगामात देखील शेतकऱ्यांना याचा फायदा होईल. मात्र, पुढच्या हंगामापासून शेतकऱ्यांना प्रभावीपणे या जीआय मानांकनाचा वापर करता येईल,’ असे प्रा. हिंगमिरे यांनी सांगितले.
..............
शेतकऱ्यांना काय करता येईल
रत्नागिरी आणि देवगड हापूस आंब्याचे उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांना जीआय टॅग असणाऱ्या पेट्या तयार करून त्यामध्ये आंबे भरून पाठवता येईल. तसेच, आंब्यावर लहान आकाराचे टॅग लावता येईल आणि विक्रीसाठी बाजारपेठेत पाठवता येईल. बाजारपेठेत व्यापाऱ्यांना देखील हे आंबे फेरफार न करता ‘जैसे थे’ परिस्थितीत विकायचे आहे. या आंब्यांच्या बाबतीत व्यापाऱ्यांनी फेरफार केल्यास त्यांच्यावर कायदेशीर कारवाई होऊ शकते. त्यामुळे यापुढे शेतकरी आणि ग्राहकांना फायदाच होणार असल्याची माहिती प्रा. हिंगमिरे यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘कायदे करताना संशोधन करण्याची गरज’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
‘स्त्रियांवरील अत्याचार रोखण्यासाठी नवीन कायदे येत असले, तरी त्यात संशोधन करण्याची गरज आहे. पीडित महिलांना फिर्याद देताना पोलिस ठाण्यात, न्यायदंडाधिकारी यांच्यापुढे व नंतर साक्ष देताना कोर्टात असा तीन वेळा अत्याचार कथन करावा लागतो. ही पद्धत बदलून व्हिडिओ चित्रीकरणाने जबाब नोंदविला पाहिजे,’ असे स्पष्ट मत विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी गुरुवारी व्यक्त केले.
अहिल्याराणी महिला विकास व शैक्षणिक संस्थेतर्फे ‘बेटी बचाओ बेटी पढाओ, महिला सुरक्षा कायदा नियम मार्गदर्शिकेचे’ प्रकाशन अमृता फडणवीस यांच्या हस्ते झाले. त्या वेळी निकम बोलत होते. महापौर मुक्ता टिळक, खासदार अनिल शिरोळे, माजी पोलिस महासंचालक डॉ. प्रवीण दीक्षित, उद्योजक कृष्णकुमार गोयल, मिस इंडिया नवेली देशमुख तसेच आयोजक नीलिमा तपस्वी व मनोहर चव्हाण उपस्थित होते. ‘लिज्जत पापड’च्या सुमन दरेकर, पोलिस निरीक्षक ज्योत्स्ना रासम, स्वाती संतोष महाडिक यांना पुरस्कारांनी गौरविण्यात आले.
‘पूर्वी महिलांची ओळख आई, पत्नी, मुलगी अशी होती. आता तिने शिखर गाठले आहे. सांस्कृतिकतेने समाज घडविण्यात तिचा मोठा वाटा असतो. कुटुंब सांभाळत नोकरी, व्यवसायामध्ये ती आव्हान स्वीकारते. समाजाची दृष्टी बदलल्याशिवाय पोलिस, कायदा, यंत्रणा यांच्या कार्याचा उपयोग होणार नाही. आपण मुलीचा जन्म साजरा करतो का, यातच समाजाची मानसिकता दिसून येते,’ याकडे फडणवीस यांनी लक्ष वेधले. ‘स्त्रियांना हक्कांची लढाई लढावी लागते. तिच्याकडे स्वतंत्र विचारशील व्यक्ती म्हणून पाहिले जात नाही तर वस्तू म्हणून पाहिले जाते,’ असे टीकास्त्र फडणवीस यांनी सोडले. सूत्रसंचालन सुधीर गाडगीळ यांनी केले.

मुलीचे भ्रूण ते वयोवृद्ध महिला असुरक्षित?
राज्याचे माजी पोलिस महासंचालक व ‍विशेष सरकारी वकील यांच्यामध्ये एका मुद्द्यावरून मतभेद दिसून आला. ‘पोटात असलेले मुलीचे भ्रूण ते वयोवृद्ध महिला राज्यात सुरक्षित आहेत, असे म्हणणे धाडसाचे ठरेल,’ अशी कबुली देत ‘महिलांवर पुरुषांसह महिलाही अत्याचार करतात. केवळ चर्चा निष्फळ आहे. कडक कायदे आहेत; पण डोळ्यासमोर होणारे अत्याचाराचे प्रकार थांबविण्यासाठी लोकांनी पुढे यायला हवे,’ अशी टिप्पणी डॉ. प्रवीण दीक्षित यांनी केली. उज्ज्वल निकम यांनी सुरक्षिततेचा मुद्दा खोडून काढत ‘स्त्रियांवर अत्याचार वाढत असले तरी कायद्याची अंमलबजावणी होत नाही, हे खरे नाही. समाजाने सजग असले पाहिजे,’ यावर बोट ठेवले.

लक्ष्मी रोडवरील सौदामिनी हँडलूमतर्फे आयोजित विणकाम महोत्सवाचे उद्घाटन अमृता फडणवीस यांच्या हस्ते गुरुवारी झाले. या वेळी महापौर मुक्ता टिळक, अनघा घैसास, डॉ. सुचेता परांजपे उपस्थित होत्या.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images