Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

​ आता मला संधी द्या : राज ठाकरे

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

‘अनेक वर्ष सत्ता उपभोगूनही ज्या पक्षांनी काहीही काम केले नाही, निर्लज्जासारखे ते वर्षानुवर्षे नागरिकांच्या समोर जात आहेत. नागरिक त्यांना प्रश्न विचारत नाहीत. ही लोकशाही मला कळतच नाही, अशी अविकसित शहरे त्यांनाच लखलाभ,’ या शब्दात राज ठाकरे यांनी आपली हतबलता व्यक्त केली. त्याचवेळी ज्यांनी कामे केली नाहीत, त्यांना मते दिलीत आता मलाही संधी द्या, असे भावनिक आवाहनही त्यांनी पुणेकरांना केले.
पुण्यातील जाहीर सभेत राज ठाकरे यांनी पहिल्यांदाच पॉवरपॉइंट प्रेझेंटशनद्वारे मनसेची सत्ता असलेल्या नाशिक महापालिकेतील विकासकामांचे सादरीकरण केले. त्याचबरोबर पक्षाच्या पुण्यातील नगरसेवकांनी केलेली काही कामांचेही त्यांनी सादरीकरण केले. नाशिकमधले रस्ते, बोटॅनिकल गार्डन, कचरा प्रकल्प, मुकणे धरण पाइपलाइन आदी कामांचे दाखलेही त्यांनी दिले. पुण्यात सत्ता दिल्यास नाशिकच्या गोदापार्कच्या धर्तीवर पुण्याच्या नदीकाठाचा विकास करण्याची ग्वाहीही त्यांनी दिली.
‘शिवसेना आणि भाजपकडे राज्याबरोबरच मुंबई महापालिकेची सत्ता आहे. शिवसेनेने तर मुंबईत पाच वेळा सत्ता राखली आहे. गेल्या अनेक वर्षात त्यांनी काय कामे केली? त्यांना फक्त पैसे लाटण्यातच रस आहे. दरवेळी निवडणुकांच्या आधी तेच प्रश्न घेऊन निर्लज्जासारखे हे मतदारांसमोर जातात. विकासकामांच्या नावाखाली वारेमाप शब्द देतात,’ असेही ठाकरे म्हणाले. मतदारांनी सुशिक्षित नव्हे तर सुजाणही व्हायला हवे, असे सांगून ठाकरे म्हणाले की, ‘शहर अधिक चांगले कसे होईल, याचाच विचार माझ्या मनात असतो. तीच माझी पॅशन आहे. आपल्या शहराचे भवितव्य काय, आपल्या भावी पिढ्या इथे कशा जगणार, असा विचारही हे नागरिक प्रस्थापित पक्षांना, नेत्यांना करत नाहीत. तेव्हा ज्या अवस्थेत त्यांना शहरे मिळतात, ती त्यांनाच लखलाभ.’'

ठाकरे निवेदकाच्या शैलीत
राज ठाकरे म्हणजे मनसेची मुलुखमैदानी तोफ. आवेशपूर्ण भाषण करत उपस्थितांवर गारूड करण्याची राज ठाकऱ्यांची शैली. मात्र, गुरुवारच्या सभेत ठाकरे यांची शैली पूर्णतः वेगळी होती. एका निवेदकाच्या भूमिकेत शिरून ठाकरे यांनी आपल्या शिलेदारांनी केलेली कामे सादरीकरण्याच्या माध्यमातून उलगडली आणि अशाच पद्धतीने पुण्यातही काम करण्याची संधी देण्याची विनंतीही केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


कमळ गोठवून चिन्ह गाजर करा : मुंडे

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

नरेंद्र मोदी सरकारने देशातील जनतेला ‘अच्छे दिन’चे स्वप्न दाखविले. सरकारला तीन वर्षे पूर्ण होत आली तरी अद्याप अच्छे दिन आलेले नाहीत. सामान्यांच्या खात्यात पंधरा लाख रुपये जमा होतील, महागाई कमी होईल असे आश्वासनांचे गाजर दाखवणाऱ्या भारतीय जनता पक्षाचे कमळ चिन्ह गोठवून ते गाजर करा, अशी खरमरीत टीका विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केली.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ मुंडे यांच्या गुरुवारी वडगाव शेरी, कात्रज आणि धनकवडी येथे सभा झाल्या. मुंडे म्हणाले की, ‘मोदींना घरदार नसल्याने ते मनातील गोष्टी सांगण्यासाठी मन की बात कार्यक्रम घेऊन मन हलके करतात. मतदार या निवडणुकीत मतदान करण्यासाठी चुकले तर, भाजर सक्तीने नसबंदीचा निर्णय घेईल.’ वडगांव शेरीतील प्रभाग क्रमांक पाचमधील उमेदवार नारायण गलांडे, प्रकाश गलांडे, शिल्पा गलांडे आणि अलका कांबळे यांच्या प्रचारासाठी मुंढे यांची टेम्पो चौकात जाहीर सभा झाली. या प्रसंगी माजी आमदार बापू पठारे ,पंढरीनाथ पठारे, प्रभाग क्रमांक चारचे उमेदवार महेंद्र पठारे, भैयासाहेब जाधव, संजीला पठारे आणि सुमन पठारे आदी व्यासपीठावर उपस्थित होते.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामुळे राज्यातील मराठा, धनगर आणि मुस्लिम आरक्षण मंजूर झालेले नाही. पुणे शहराची मेट्रो सर्वप्रथम मंजूर होऊनही देखील नागपूर मेट्रोचे काम आधी सुरू झाले. पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरात राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाची सत्ता असल्यामुळेच स्मार्ट सिटीत या दोन शहरांचा समावेश झाला, असा दावा मुंडे यांनी केला.

स्थानिक आमदार निष्क्रिय
तालुका युवा अध्यक्ष होण्याचीही लायकी नसताना माझ्यामुळेच आमदार जगदीश मुळीक भाजपाचे युवा अध्यक्ष बनले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लाटेत विधानसभा निवडणुकीत आमदार म्हणून निवडून आले. ते निष्क्रिय आमदार असल्यानेच वडगांव शेरी मतदारसंघाची वाट लागली आहे, अशी टीका मुंढे यांनी केली .

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

काँग्रेस-राष्ट्रवादीला सत्तेवरून खाली खेचा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

‘जनतेऐवजी केवळ स्वतःचा विचार करण्याची सवय झालेल्या काँग्रेस-राष्ट्रवादी यांना शिक्षा करण्याची वेळ आली असून, त्यांना सत्तेवरून बाहेर फेकण्याची हीच योग्य संधी आहे’, या शब्दांत केंद्रीय नगरविकासमंत्री वेंकय्या नायडू यांनी गुरुवारी पालिकेतील सत्ताधाऱ्यांवर हल्ला चढवला. संसदेपासून ते स्थानिक स्वराज्य संस्थांपर्यंत सर्व ठिकाणी एकाच पक्षाची सत्ता असेल, तर विकास अधिक गतीने होईल, असा दावा करीत त्यांनी भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांना विजयी करण्याचे आवाहन केले.
कोरेगाव पार्क-घोरपडी (प्रभाग क्र २१) भागातील भाजपच्या उमेदवारांसाठी आयोजित सभेत नायडू बोलत होते. समाजकल्याण राज्यमंत्री दिलीप कांबळे, शहराध्यक्ष योगेश गोगावले, खासदार अनिल शिरोळे, खासदार संजय काकडे आणि प्रभागातील नवनाथ कांबळे, लता धायरकर, मंगला मंत्री आणि उमेश गायकवाड हे उमेदवार या वेळी उपस्थित होते.
‘स्मार्ट सिटी, मेट्रो, नदीसुधारणा प्रकल्प यासारख्या अनेक योजनांसाठी केंद्र आणि राज्याकडून मोठ्या प्रमाणात निधी प्राप्त होणार आहे. या निधीचा योग्य विनियोग करण्याची जबाबदारी महापालिकेवर असून, त्यासाठीच संसदेपासून ते पालिकेपर्यंत एकाच पक्षाची सत्ता हवी,’अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. केंद्रात नरेंद्र, राज्यात देवेंद्र आणि पुण्यात भाजपचा महापौर असेल, तर पुण्याची प्रगती अधिक वेगाने होऊ शकेल असेही ते म्हणाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतलेल्या विविध योजनांचा पाढा त्यांनी उपस्थितांसमोर मांडला. या प्रभागात तेलगू भाषिकांची संख्या जास्त असल्याने त्यांनी अधूनमधून तेलगूतूनही संवाद साधला.

शिवसेनालाही चिमटा
मोदी यांनी घेतलेल्या नोटाबंदीच्या निर्णयाबाबत विरोधकांकडून घेतल्या जाणाऱ्या आक्षेपांचे नायडू यांनी खंडन केले. काँग्रेस-राष्ट्रवादी तर त्याविरोधात बोलतच असतात; पण आजकाल शिवसेनासुद्धा त्यांच्यासोबत मिळाली आहे, अशा शब्दांत त्यांनी शिवसेना नेतृत्वाला चिमटा काढला. तसेच, प्रत्येक पक्षाचा सध्या ऱ्हास होत असून, शिवसेनेतून आणखी एक नवनिर्माण सेना तयार झाल्याचे निरीक्षण त्यांनी नोंदवले.

सभेच्या जागेवरून वाद
नायडू यांची सभा बी. टी. कवडे रोडवरील बालाजी मंदिरालगतच्या जागेवर होणार होती. संबंधित जागेच्या दोन मालकांनी सभा घेण्यास अनुमती दिली असली, तरी तिसऱ्या जागामालकाने आक्षेप घेतला. राज्यमंत्री दिलीप कांबळे आणि संबंधित जागामालक हर्षद बोराटे यांच्यात बाचाबाची झाली. अखेर, ऐनवेळी सभेच्या ठिकाणात बदल करण्यात आला आणि महापालिकेच्या मैदानावर ही सभा घेण्यात आली.

काकडेंची पवारावर टीका

भारतीय जनता पक्षाने गुंडांना तिकिटे दिलेले नाहीत. राष्ट्रवादी काँग्रेसनेच सर्वाधिक गुंडांना तिकीट दिल्याचे एका पाहणीमध्ये आढळले आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा आहेत, अशी टीका खासदार संजय काकडे यांनी केली. पुणे महापालिकेत वर्षांनुवर्षे राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसची सत्ता आहे. त्यांनी निवडणुकीच्या प्रचारात केलेला विकास सांगणे अपेक्षित असताना शरद पवार यांच्यापासून अजित पवार भाजपवर गुंडांना तिकीट दिल्याचा चुकीचा आरोप करत आहेत, असेही ते म्हणाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

उमेदवारांच्या प्रचाराची जबाबदारी एजन्सीवर

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

निवडणुकीच्या साहित्यापासून कार्यअहवालापर्यंत, सोशल मीडियावरील हायटेक प्रचारापासून ते कार्यकर्त्यांच्या टी शर्टपर्यंत उमेदवाराचे सर्वप्रकारचे ब्रँडिंग करण्याचे काम एकाच ब्रँडिंग एजन्सीमार्फत केले जात आहे. या नव्या ट्रेंडमुळे निवडणूक काळात अनेक तरुणांना रोजगाराची चांगली संधी उपलब्ध झाली आहे.
२०१४मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये सर्वच पक्षांनी निवडणुकीच्या ब्रँडिंगसाठी अनेक कंपन्यांची नेमणूक केल्याची चर्चा होती. आता महापालिका निवडणुकीतही या कंपन्या उमेदवारांना अपेक्षित सर्व प्रकारचे ब्रँडिंग करून देत असल्याने यंदाचा प्रचार अधिक हायटेक झाला आहे. गेल्या निवडणुकीत महापालिकेच्या उमेदवारांना पत्रके, टी शर्ट, ऑडिओ क्लीप, सोशल नेटवर्किंगचे व्हिडिओ यांसह कार्यअहवाल, प्रचार साहित्य अशा सर्व गोष्टींसाठी वेगवेगळ्या लोकांचा शोध घ्यावा लागत होता. आता मात्र, काही लाखांचे कंत्राट द्या आणि सगळा प्रचार हायटेक करा, असा एक ट्रेंड तयार झाला आहे. बहुतांश उमेदवारांनी निवडणुकीचे व्यवस्थापन करणाऱ्या कंपन्यांना पाचारण केले असल्याने, निवडणूक व्यवस्थापनाचा व्यवसाय सध्या तेजीत आहे.
गेल्या वर्षभरापासूनच विद्यमान नगरसेवक आणि इच्छुक उमेदवारांनी निवडणुकीची तयारी सुरू केली. त्यामध्ये सणावारांना कार्यक्रम घेण्यापासून ते मतदारांना कामाचा अहवाल पोहोचवण्यापर्यंत सर्वप्रकारचे ब्रँडिंग करण्यासाठी कंपन्यांची माणसे मेहनत घेत होती. निवडणुकीच्या प्रचाराच्या सुरुवातीच्या टप्प्यात उमेदवाराचा प्रचार करणाऱ्या ऑडिओ आणि व्हिडिओ क्लीप याच कंपन्यांमार्फत व्हायरल करण्यात आल्या. त्यानंतर प्रत्यक्ष प्रचारात लागणारे साहित्य, प्रचार फेऱ्यांची आखणी, कोपरा सभांचे व्यवस्थापन या कंपन्यांमार्फत करण्यात येत आहे. त्यामुळे, निवडणुकीला सामोरे जाणाऱ्या उमेदवाराच्या डोक्यावरील ताण कमी झाला आहे.
निवडणुकीत उमेदवारांचे ब्रँडिंग करणाऱे अमन अलकुंटे म्हणाले, की ‘निवडणुकीचे काम निवडणुकीपूर्वी, निवडणूक जाहीर झाल्यावर आणि मतदानाचा दिवस अशा तीन टप्प्यांमध्ये चालते. त्यामध्ये निवडणूक पूर्व काळात कार्य अहवाल पत्रके, प्रचार साहित्य, सोशल मीडियाचा प्रचार, पथनाट्य, फ्लॅशमॉबचे आयोजन, मतदानाच्या स्लिपांचे वाटप असे कार्यक्रम आखले जातात. मतदानाच्या दिवशी पोलिंग बुथची व्यवस्था केली जाते.’

शिस्तबद्ध नियोजनावर भर
आतापर्यंतच्या निवडणुकांमध्ये कार्यकर्ते नोकरी व्यवसाय सांभाळून प्रचाराची जबाबदारी पेलत होते. त्यामुळे त्यात गडबड, गोंधळ उडत असे. आता मात्र, व्यावसायिक कंपन्या ही कामे करीत असल्याने साचेबद्ध नियोजन केले जात असल्याने प्रचार व्यवस्थित होत आहे. प्रचाराच्या अनेक क्लृप्त्या ब्रँडिंग कंपन्यांकडून वापरल्या जात असल्याने उमेदवारही खूष आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पोलिस बंदोबस्ताची ‘कसोटी’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

महापालिका आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या मतमोजणीच्या दिवशी शहर आणि जिल्ह्यात शांतता राखण्याचे आव्हान समोर असतानाच भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यातील कसोटी सामन्यासाठी पोलिसांकडे बंदोबस्ताची मागणी करण्यात आली आहे.
आधीच निवडणुकीसाठी मनुष्यबळ कमी असताना आता सामन्यासाठी आणखी कर्मचारी कोठून आणावेत, असा प्रश्न पोलिसांना पडला आहे. पुण्यात गहुंजे येथील स्टेडियमवर येत्या गुरुवारी (२३ फेब्रुवारी) भारत-ऑस्ट्रेलियादरम्यान पहिला कसोटी क्रिकेट सामना खेळविण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनने (एमसीए) प्रेक्षक आणि खेळाडूंच्या सुरक्षिततेसाठी पोलिसांकडे बंदोबस्ताची मागणी केली आहे. महानगरपालिका, जिल्हा परिषदेच्या निवडणूक बंदोबस्तासाठी अगोदरच बाहेरून पोलिस बोलावण्याची वेळ पुणे पोलिसांवर आली असतानाच त्यात पुन्हा पुरेसे मनुष्यबळ सामन्यासाठी देताना दुहेरी कसरत करावी लागणार आहे.
पुणे, पिपरी चिंचवड महानगरपालिका आणि जिल्हा परिषदेसाठी येत्या २१ फेब्रुवारीला मतदान आणि २३ फेब्रुवारीला मतमोजणी होणार आहे. त्याच दिवशी खेळविल्या जाणाऱ्या कसोटी सामन्यासाठी भारत आणि ऑस्ट्रेलियाचे संघ तीन ते चार दिवस आधी पुण्यात दाखल होणार आहेत. त्यांचा मुक्काम हिंजवडी येथील पंचतारांकित हॉटेलमध्ये असणार आहे. गहुंजे येथील सामन्याच्या सुरक्षितेतसाठी ‘एमसीए’ने ग्रामीण पोलिसांकडे तर, खेळाडूंचा मुक्काम पुणे शहर पोलिसांच्या हद्दीत असल्यामुळे शहर पोलिसांकडे बंदोबस्त देण्याची मागणी केली आहे. दोन महापालिकांच्या आ​णि जिल्हा परिषदेच्या निवडणुका आणि त्यातच क्रिकेट सामन्याचे आयोजन केल्याने सगळीकडे मनुष्यबळ कसे पुरवायचे असा प्रश्न पुणे पोलिसांपुढे पडला आहे. राज्यात अनेक ठिकाणी निवडणुकांचा हंगाम सुरू असल्याने बाहेरूनही कमीच बंदोबस्त मिळण्याची शक्यता आहे.

‘एमसीए’ने चर्चा करायला हवी होती
या गोंधळावर प्रतिक्रिया देताना एक वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने क्रिकेट सामन्याचे नियोजन करताना एमसीएने पोलिसांसोबत एकदा तरी चर्चा करण्याची आवश्यकता असल्याचे नमूद केले. निवडणुकीच्या काळात पुरेसा बंदोबस्त करणे, खूपच कठीण होते. सर्व पोलिस ठाणे, विशेष शाखा येथील कर्मचारीही निवडणूक बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आले आहेत. या अडचणीच्या परिस्थितीत ‘एमसीए’ने कसोटीच्या पहिले काही दिवस खासगी सुरक्षारक्षक नेमावेत, अशा सूचना आम्ही केल्या आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

त्यांना पैसा आणि सत्तेतच रस : राज

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

‘भारतीय जनता पक्षाचा आलेख आता खाली येत आहे. भाजपने ५० लाख, एक कोटी रुपये देऊन उमेदवार पळवले. शिवसेनेला पाठिंबा काढायचा होता, तर तो आधीच का काढला नाही? या दोन्ही पक्षांना पैसा आणि सत्तेतच रस आहे,’ अशा शब्दांत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुरुवारी पुण्यात भाजपबरोबरच शिवसेनेवरही हल्ला चढवला.

महापालिका निवडणुकीतील उमेदवारांच्या प्रचारासाठी न्यू इंग्लिश स्कूलच्या मैदानावर सायंकाळी त्यांची सभा झाली. त्या वेळी पक्षाचे नेते बाळा नांदगावकर, अनिल शिदोरे यांच्यासह प्रमुख पदाधिकारी, उमेदवार उपस्थित होते. पक्षाच्या ‘निश्चयनामा’ या जाहीरनाम्याचे प्रकाशनही या वेळी ठाकरे यांच्या हस्ते झाले.

‘भाजपची स्थापना जनसंघाच्या रूपात १९५२ मध्ये झाली. त्यानंतर इतकी वर्षे लोटूनही भाजपला उमेदवार मिळत नाहीत. पैशाची पाकिटे पोहोचवून त्यांनी माणसे फोडली. भाजपची पुण्यातील उमेदवार यादी एका बिल्डरने ठरवली. निष्ठावंत कार्यकर्त्यांना तिकिटे दिली गेली नाहीत. नाशिक, पुणे, मुंबईत सराईत गुन्हेगारांना तिकिटे देण्यात आली. यामुळे भाजपचा खरा चेहरा समोर येत आहे. त्यामुळेच भाजपचा आलेखही आता खाली येतोय,’ असे ठाकरे म्हणाले.

‘भाजप आणि शिवसेनेच्या सभा आहेत, की आखाडे हेच समजत नाही,’ असे सांगून राज म्हणाले, ‘दोन्ही पक्षांच्या भांडणाचा जनतेशी काहीही संबंध नाही. लक्ष आपल्यावरच केंद्रित राहावे, यासाठी हे सर्व ठरवून चालले आहे. निकालानंतर दोन्ही पक्ष पुन्हा एकत्र येतील. कल्याण-डोंबिवली महापालिका आणि विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळीही असेच झाले होते. जनतेला मूर्ख बनवण्याची खेळी दोन्ही पक्ष खेळत आहेत.’

‘शिवसेनेला सत्तेतच रस आहे. छत्रपती शिवरायांच्या स्मारकाच्या भूमिपूजनावेळी नरेंद्र मोदी यांनी उद्धव ठाकरे यांच्याकडे ढुंकूनही पाहिले नाही. आणखी किती अपमान होण्याची वाट पाहताय,’ अशा शब्दांत त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर शरसंधान साधले.

...

अजित पवार यांचा रोड शो

माजी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी गुरुवारी शहरात ‘रोड शो’ काढला. त्यांनी शहराचा सर्व भाग पिंजून काढला आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांना विजयी करण्याचे आवाहन मतदारांना केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

'सामना'वर बंदीची शक्यता नाही!: नायडू

$
0
0

मटा ऑनलाइन वृत्त । पुणे

शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या दैनिक 'सामना'वर बंदीची शक्यता केंद्रीय नगरविकासमंत्री व्यंकय्या नायडू यांनी आज फेटाळून लावली. 'कोणी काय लिहावं यावर बंधनं लादता येणार नाहीत. त्यांच्या लिखाणाचा फटका त्यांनाच बसेल. जनता योग्य तो निर्णय घेईल,' असं स्पष्ट करत त्यांनी 'सामना'वर बंदीची मागणी करणाऱ्या भाजपच्या नेत्यांनाही कानपिचक्या दिल्या.

पुण्यातील निवडणुकीच्या प्रचारासाठी आलेल्या नायडू यांनी पत्रकारांशी संवाद साधताना शिवसेनेच्या बदललेल्या भूमिकेवरही भाष्य केले. 'गेल्या अनेक वर्षांपासून आमच्यासोबत काँग्रेस-राष्ट्रवादीविरोधात लढणाऱ्या शिवसेनेला आजकाल हे पक्ष अधिक जवळचे का वाटू लागले आहेत? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. 'राज्य सरकार नोटीस पीरियडवर असून, शिवसेना केव्हाही सरकारचा पाठिंबा काढून घेऊ शकते, हे इशारे म्हणजे निव्वळ ‘जर-तर’च्या बाता आहेत. आम्हाला अद्याप कोणतीही नोटीस मिळालेली नाही,' असे त्यांनी स्पष्ट केले.

‘सरकारमध्ये एकत्र काम करत असताना एकमेकांवर दोषारोप करणं योग्य नाही. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका असल्या तरी दोन्ही पक्षांनी भाषेवर नियंत्रण ठेवायला हवे’, असेही त्यांनी दोन्ही पक्षांतील नेते-कार्यकर्त्यांना सुनावले. सर्व देशात भाजपचा जनाधार वाढत असल्याने शिवसेना दुःखी, निराश असणे स्वाभाविक आहे आणि त्यातूनच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपवर हल्ला केला जात असल्याचे निरीक्षण त्यांनी नोंदविले.

यूपीए सरकारने जेएनएनयूआरएमच्या माध्यमातून कोट्यवधी रुपये शहराच्या विकासाकरिता दिले; पण मोदी सरकारच्या स्मार्ट सिटीतून शहराला मिळणारी रक्कम अपुरी असल्याचा आरोप केला जातो. त्याचा समाचार घेताना, ‘केंद्र सरकारने दिलेले हे कोट्यवधी रुपये गेले कुठे? या निधीचा योग्य विनियोग झाला असता, तर पुण्याला स्मार्ट सिटीमध्ये सहभागी होण्याची गरजच पडली नसती’, असा टोमणा त्यांनी लगावला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘त्या’ डॉक्टरांकडे ३० कोटींचे घबाड

$
0
0

पुणे : प्राप्तिकर विभागाने शहरातील निवडक प्रतिष्ठित डॉक्टर्सचे नुकतेच केलेले ‘ऑपरेशन’ चांगलेच यशस्वी ठरले आहे. या ऑपरेशन दरम्यान टाकण्यात आलेल्या धाडींमध्ये दागिन्यांसह तब्बल ३० कोटींहून दडवलेल्या अधिक संपत्तीचे ‘निदान’ झाले आहे. या डॉक्टर्सकडेे मोठ्या प्रमाणावर रोख रक्कम, दागिने आणि अन्य संपत्ती उघड झाली आहे. अजूनही त्याची मोजणी सुरू असल्याने त्याचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.

प्राप्तिकर विभागाच्या अन्वेषण विभागातर्फे पुण्यासह राज्यातील प्रतिष्ठित डॉक्टरांच्या क्लिनिक, तसेच घरांवर गेल्या शनिवारी (११ फेब्रुवारी) छापे टाकण्यात आले होते. या धडक कारवाईत पुण्यातील नऊ डॉक्टरांवर छापे टाकले गेले. त्यात काही दाम्पत्यांचा समावेश होता. डॉक्टरांकडून उत्पन्न दडविल्याच्या संशयावरून हे छापे टाकण्यात आले होते. राज्यात अशा स्वरूपाची डॉक्टरांवरील ही पहिलीच कारवाई असल्याने मोठ्या प्रमाणात वैद्यकविश्वात खळबळ उडाली होती.

प्राप्तिकर विभागातील वरिष्ठ सूत्रांनी ‘मटा’ला ही माहिती दिली. वैद्यकविश्वात सुरू असलेल्या कट प्रॅक्टिससह, डॉक्टरांच्या परदेश वाऱ्या, दररोजच्या पेशंट्सची संख्या व त्यांच्याकडून घेण्यात येणारी फी तर त्याचबरोबर अन्य काही माहितीच्या आधारे प्राप्तिकर विभागातर्फे या धाडी टाकण्यात आल्या होत्या. डॉक्टरांचे निवासस्थान आणि सर्व क्लिनिकवर एकाचवेळी धाडी टाकण्यात आल्या होत्या.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार धाडी टाकलेल्या डॉक्टरांपैकी प्रसिद्ध हृदयरोगतज्ज्ञाने सातत्याने परदेशवाऱ्या केल्याचे उघड झाल्याने ते प्राप्तिकर विभागाच्या रडारवर आले होते. फ्रान्सचा दौरा केल्यानंतर अवघे दोन दिवस भारतात येऊन या डॉक्टरने पुन्हा जर्मनीत दौरा केला होता. त्याचबरोबर त्यांनी इतर काही देशातही दौरे केले होते.

तसेच उत्पन्न व मालमत्ताही दडवल्याचे नोंदीतून स्पष्ट झाले आहे. आयुर्वेदिक क्षेत्रातील नामवंत तज्ज्ञाकडे सुमारे ८० लाखांच्या आसपास वैध चलनातील रोख रक्कम आढळली आहे. तर व्यंधत्व निवारण क्षेत्रातील एका प्रसिद्ध महिला डॉक्टरकडे मोठ्या प्रमाणावर दागदागिने सापडले आहेत. दागिन्यांच्या या दर्शनाने या अधिकाऱ्यांचेही डोळे दिपले आहेत. उर्वरित डॉक्टरांकडेही बेहिशेबी मालमत्ता आढळून आली असून, त्याची तपासणी सुरू आहे.

प्राप्तिकर विभागाने या डॉक्टरांची गेल्या सहा वर्षांतल्या प्राप्तिकर विवरणपत्रांची छाननी केली आहे. त्यामध्ये त्यांनी मोठ्या प्रमाणावर संपत्ती दडविल्याचे समोर आले आहे. नुकत्याच टाकलेल्या धाडीमध्ये आढळलेली रक्कम, दागिने व अन्य संपत्तीच्या नोंदींआधारे त्यांची चौकशी करण्यात येईल. व त्यानुसार कारवाई केली जाईल, असे सूत्रांनी स्पष्ट केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


अजित पवारांच्या गाडीची तपासणी

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, बारामती
जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने स्थापन केलेल्या भरारी पथकाकडून राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या गाड्यांची बारामतीत तपासणी करण्यात आली. गाडी तपासणी करण्यासाठी भरारी पथकातील अधिकाऱ्यांनाही पवार यांनी सहकार्य केले.
जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकीच्या राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी पवारांनी सर्व तालुका पिंजून काढत विविध ठिकाणी जाहीरसभा घेत मतदारांना भावनिक आव्हान केले. शुक्रवारी सकाळी साडेअकराच्या दरम्यान गुणवडी येथील सभा संपून अजित पवार सांगवी येथील सभेसाठी जात असताना बारामतीत गुणवडी-मळद रोडवर भरारी पथकाने त्यांच्या गाडीची कसून तपासणी केली. अजित पवार यांनीही भरारी पथकाला सहकार्य केले. तपासणी दरम्यान काहीही संशयास्पद वस्तू आढळून आली नाही.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शिवनेरीवरील शिवछत्रपतींचे अभिवादन मुख्यमंत्र्यांसाठी यंदा आव्हान

$
0
0


धर्मेंद्र कोरे,जुन्नरशिवजयंतीला
किल्ले शिवनेरीवर हेलिकॉप्टर उतरवण्यासाठी पुरातत्व विभागाने प्रतिबंध केला असल्याने यंदा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे किल्ले शिवनेरीवर येणे आव्हानात्मक ठरणार आहे. हेलिकॉप्टरमध्ये काही यांत्रिक बिघाड झाल्यास किंवा काही अपघातजन्य परिस्थिती उद‍्भवल्यास राष्ट्रीय स्मारक असलेल्या शिवजन्मस्थळांवरील वास्तूंना हानी पोहचू शकते. त्यामुळे शिवनेरी गडावरील हेलिपॅडची जागा अन्यत्र हलविण्यात यावी, असे पत्र मुंबईतील पुरातत्व विभागाच्या कार्यालयाने नुकतेच जिल्हाधिकाऱ्यांना पाठवले आहे. तसेच, किल्ले शिवनेरीवर हेलिपॅडसाठी जागा उपलब्ध नसल्याने गडावर हेलिकॉप्टरचे लॅँडिंग करता येणार नाही, असे तांत्रिकदृष्ट्या स्पष्ट झाल्यामुळे किल्ले शिवनेरीच्या पायथ्याशी असलेल्या हेलिपॅडवर हेलिकॉप्टर लॅँड करून, पायरी मार्गाने अभिवादनासाठी मुख्यमंत्री येणार का हा प्रश्न उपस्थित झाला आहे.
केंद्र आणि राज्यात भाजपचे सरकार येण्यापूर्वी, मुख्यमंत्री त्यावेळी भाजपचे प्रदेशाध्यक्ष असताना किल्ले शिवनेरीवर ते शिवजयंती सोहळ्यासाठी पायरी मार्गाने चढून आले होते आणि शिवछत्रपतींचे आशीर्वाद घेतले होते. त्यानंतर दुसऱ्याच वर्षी मुख्यमंत्रिपदाची माळ त्यांच्या गळ्यात पडली होती. हा योगायोगच समजायचा असेल तर राज्यात सध्या भाजप- शिवसेनेतील निर्माण झालेल्या दुराव्याच्या पार्श्वभूमीवर सरकार पडणार का, अशा अनेक शक्यता अशक्यता वर्तवल्या जात असताना, मुख्यमंत्र्यांना मुख्यमंत्रिपदाची खुर्ची टिकविण्यासाठी शिवछत्रपतींचे आशीर्वाद घेण्यासाठी मुख्यमंत्र्यांना शिवजयंतीला शिवनेरीवर येणे क्रमप्राप्त आहे, असे बोलले जात आहे. त्यामुळे शिवजयंती सोहळ्यासाठी मुख्यमंत्री गडाच्या पायरी मार्गाने चालत जाणार का, हे पाहावे लागणार आहे.

शिवऋण प्रतिष्ठानने घेतला होता आक्षेप
किल्ले शिवनेरीवरील हेलिकॉप्टर लॅँडिंग कोणत्याही अधिकृत परवानगीशिवाय आतापर्यंत होत होते. ही बाब जुन्नरच्या शिवऋण प्रतिष्ठानच्या वतीने प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिली गेली. त्याचा संदर्भ घेऊन शिवनेरीवरील राष्ट्रीय स्मारक असलेल्या वास्तूंना धोका होऊ शकतो. त्यामुळे शिवनेरीवर हेलिकॉप्टर उतरविण्यास परवानगी देऊ नये, अशी मागणी प्रतिष्ठानने पुरातत्व विभागाकडे केली होती. त्याचा संदर्भ घेऊन राष्ट्रीय स्मारक असलेल्या शिवजन्मस्थळ तसेच अन्य वास्तूंच्या सुरक्षेच्या हेतूने यंदा शिवनेरीवरील हेलिपॅडची जागा अन्यत्र हलविण्यात यावी असे निर्देश देत शिवनेरीवर हेलिकॉप्टर उतरविण्यास पुरातत्व खात्याने प्रतिबंध केला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मंत्र्यांचे घोटाळे सिद्ध न झाल्यास फाशी द्या : धनंजय मुंडे

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, कात्रज

‘भारतीय जनता पक्षाच्या (भाजप) सरकारमधील ११ मंत्र्यांचे घोटोळे आम्ही बाहेर काढले आहेत. यातला एकही आरोप चुकीचा निघाला तर मला कुठल्याही चौकात फाशी द्या,’ असे आव्हान विरोधी पक्षनेते धनजंय मुंडे यांनी राज्य सरकारला दिले आहे. दरम्यान, ‘भाजप हा गुंडाचा पक्ष बनला असून, गुंडाचा पक्षप्रवेश करून त्यांना पवित्र केले जात आहे. जेलमधील गुंडही पवित्र होण्यासाठी वाराणसीला जाण्याची गरज नसल्याचे म्हणत आहेत,’ अशी खोचक टिप्पणही त्यांनी केली.
धनकवडी येथे प्रभाक क्रमांक ३९मधील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार विशाल तांबे, किशोर धनकवडे, आश्विनी भागवत व श्रद्धा परांडे यांच्या प्रचारसभेत मुंढे बोलत होते. भ्रष्टाचार, महागाई व काळा पैसा या तीन मुद्यांवर मोदी सरकार सत्तेत आले. राज्य सरकारमधील ११ मंत्र्यांचे घोटाळे आम्ही बाहेर काढले असून, त्यातील एकही आरोप चुकीचा निघाला तर मला कुठल्याही चौकात फाशी द्या,’ असे आव्हान मुंडे दिले.
या प्रसंगी माजी मंत्री बाळासाहेब शिवरकर, प्रवक्ते अंकुश काकडे, बापूसाहेब धनकवडे, ह.भ.प भाऊमहाराज परांडे, नगरसेवक अप्पासाहेब रेणुसे, भालचंद्र जगताप, नाना शिंदे, शंकरराव पाटील, आबा आणेराव, मधुकर नवले, श्रीरंग आहेर, अप्पा परांडे, सागर भागवत आदी उपस्थित होते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘स्मार्टसिटी’ची संकल्पना मांडली. देशातील शंभर शहरांमधून पुण्याचा दुसरा क्रमांक आला. पुणे शहर शरद पवार यांच्या नियोजनबद्ध विकासामुळे स्मार्ट झाल्यामुळे पुण्याचा दुसरा क्रमांक आला. जगात पुणे हे पाचव्या क्रमांकांचे ‘आयटी हब’ झाले असून, हा विकास राष्ट्रवादी काँग्रेसने केला आहे. आघाडी सरकारने पुणे आणि नागपूर मेट्रोला एकाचदिवशी परवानगी दिली. मात्र, पुण्याची मेट्रो नागपूरच्या तुलनेत तीन वर्षे उशिराने सुरू झाली. भाजपने पुण्याला सापत्न वागणूक दिली आहे,’ अशी टीकाही त्यांनी केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘द लंडन गॅझेट’मध्ये आढळला छत्रपतींचा उल्लेख

$
0
0




म. टा. प्रतिनिधी, पुणे
मराठी इतिहासाचा डंका शिवछत्रपतींमुळे साता समुद्रापार पोहोचला. छत्रपतींच्या कर्तृत्वाची दखल जगाने सोळाव्या शतकातच घ्यायला सुरुवात केली होती. या गोष्टीला पुष्टी देणारे शिवरायांशी संबंधित लंडनमधील ३४५ वर्षं जुने कागदपत्र मिळाले आहे. वर्तमानपत्रांच्या इतिहासात पहिले वर्तमानपात्र म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ‘द लंडन गॅझेट’ची दुर्मिळ आणि अस्सल आवृत्ती युवा इतिहास अभ्यासक मालोजी जगदाळे यांनी मिळवली आहे. विशेष म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरतेवर टाकलेल्या दुसऱ्या छाप्याची बातमी या दैनिकात २० फेब्रुवारी १६७२ या दिवशी पहिल्या पानावर प्रसिद्ध झाली होती. या दैनिकची मूळ प्रतच आता पुण्यात पाहता येणार आहे.
शिवरायांशी संबंधित परदेशात असणाऱ्या वस्तूंचा शोध घेत असताना अमेरिकेतील एका संग्रहकाकडे ही ‘लंडन गॅझेट’ची ३४५ वर्षं जुनी आवृत्ती असल्याची माहिती मालोजी यांना मिळाली. औपचारिक बाबींची पूर्तता करून ही दुर्मिळ प्रत सत्यता प्रमाणपत्रासह (Certificate of Authenticity) मागविण्यात आली आहे. स्वराज्य विस्तार तसेच मोगलांना जबरदस्त हादरे देणाऱ्या शिवछत्रपतींचे नाव युरोपातही घेतले जात होते. सूरतेवर त्यांनी दुसरा छापा घातला तेव्हा त्याची बातमी ‘द लंडन गॅझेट’ या दैनिकाने पहिल्या पानावर प्रसिद्ध केली होती. हे संशोधन अभ्यासक सायली दातार यांनी २००८ मध्ये प्रसिद्ध केले होते. एरवी लंडनच्या संग्रहालयात पाहायला मिळणारी ही दुर्मिळ वर्तमानपत्राची प्रत आता पुण्यात आल्याने इतिहास अभ्यासक आणि शिवप्रेमींना प्रत्यक्षात पाहायला मिळणार आहे.
महाराजांच्या सुरतेवरील स्वारीची माहिती सुरतेत असणाऱ्या इंग्रजी अधिकाऱ्यांनी त्या दैनिकाच्या प्रतिनिधीला पत्र स्वरूपात पाठवली होती. ती जशीच्या तशी छापताना ‘द लंडन गॅझेट’च्या संपादकांनी महाराजांचे भारतातील राजकीय महत्त्वही उघडपणे मान्य केलेले दिसते. बातमीच्या पहिल्याच परिच्छेदात ‘शिवाजी, एक क्रांतिकारी (रेबेल) ज्याने मोघलांना अनेक लढायांत चारीमुंड्या चीत केले आहे. तो आता जवळजवळ संबंध देशाचा शासनकर्ता बनलेला आहे.’ असे म्हटले आहे. ‘द लंडन गॅझेट’ हे राजाचे अधिकृत मान्यता असलेले वृत्तपत्र होते. या वर्तमानपत्राला (The Crown’s Official Mouthpiece) असेही म्हटले जाते. ‘लंडन गॅझेट’मधील बातम्या सर्वांपर्यंत पोहोचाव्यात म्हणून ते युरोपातील इतर शहरे, उत्तर अमेरिका आणि आशियातल्या इंग्रज वसाहतींकडे पाठवण्यात येत असे. त्या काळात ब्रिटनमधली शहरे तसेच गावांच्या चौकात सभा घेऊन सरकारी निवेदक हे वृत्तपत्र वाचून दाखवत असे. यात जगभरातील अतिशय महत्त्वपूर्ण असणाऱ्या घडामोडीच छापल्या जात असत. या सर्व गोष्टी लक्षात घेता शिवरायांची बातमी पहिल्या पानावर आणि पहिल्या रकान्यात येणे याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. शिवरायांच्या कट्यार, तलवार अशा वस्तू तसेच अस्सल चित्रे, कागदपत्रे असा मोठा ठेवा आजही परदेशात आहे जो पुन्हा शिवरायांच्या भूमीत आणणे गरजेचे आहे, अशी भावना मालोजी जगदाळे यांनी व्यक्त केली.

वर्तमानपत्रांच्या इतिहासातील मैलाचा दगड
सोळाव्या शतकातले ‘द लंडन गॅझेट’ हे आधुनिक पद्धतीने दोन कॉलममध्ये नियमितपणे छापले जाणारे पहिले वृत्तपत्र म्हणून ओळखले जाते. १६ नोव्हेंबर १६६५ रोजी प्रथम प्रकाशित झालेले ‘ऑक्सफर्ड गॅझेट’ हे पहिले शासनाधिकृत इंग्रजी नियतकालीक जन्माला आले. प्लेगच्या साथीमुळे ते लंडनऐवजी ऑक्सफर्डहून प्रकाशित झाले होते. ऑक्सफर्ड गॅझेटचे तेवीस अंक निघाल्यानंतर चोविसाव्या अंकास ‘लंडन गॅझेट’ असे नाव देण्यात आले. हे गॅझेट सरकारचे अधिकृत बातमीपत्रक म्हणून आठवड्यातून दोनदा प्रकाशित होत असे. अद्यापही ते अस्तित्वात असून, इसवी सन १६६५ पासून सलग प्रकाशित होणारे हे एकमेव वृत्तपत्र आहे. ‘लंडन गॅझेट’नंतर चाळीस वर्षांनी म्हणजे इसवी सन १७०४ मध्ये अमेरिकेत ‘बोस्टन न्यूज लेटर’ हे पहिले वृत्तपत्र सुरू झाले; तर ‘लंडन गॅझेट’ नंतर तब्बल १२० वर्षांनी इसवी सन १७८० मध्ये भारतात बंगाल गॅझेट हे पहिले वृत्तपत्र सुरू झाले, असेही संशोधक जगदाळे यांनी नमूद केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

परवान्यासाठी ‘संमतिपत्र’

$
0
0

पाल्यांच्या अपघातासाठी पालकांना ठरवणार दोषी

पुणे : ‘मी माझ्या मुलाच्या वाहन चालनाचे उत्तरदायित्व घेतो. त्यास आपणाकडून वाहन चालविण्याचा शिकाऊ परवाना (लर्निंग लायसन्स) देण्यात यावा,’ अशा आशयाचे संमतीपत्र पालकांनी प्रादेशिक परिवहन कार्यालयाला (आरटीओ) सादर केल्यानंतरच संबंधितांना लायसन्स दिले जाणार आहे. हे संमतीपत्र लर्निंग लायसन्सच्या फॉर्मवरच प्रसिद्ध करण्यात आले आहे. या द्वारे पाल्यांच्या वाहन चालविण्याला पालकांना जबाबदार धरण्यात येणार आहे.

देशात दर वर्षी सरासरी पाच लाख रस्ते अपघात होऊन त्यामध्ये लाखो जणांना प्राण गमवावे लागतात. या पार्श्वभूमीवर रस्ते वाहतूक सुरक्षित व्हावी, वाहने जबाबदारीने चालविली जावीत आणि रस्ते अपघातांतील जखमी आणि मृतांना न्याय तसेच भरपाई मिळावी यासाठी मोटार वाहन कायद्यात दुरुस्ती करण्याच्या विधेयकास केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिली. त्यानुसार केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग बांधणी मंत्रालयाने नुकत्याच प्रसिद्ध केलेल्या अध्यादेशात पालकांच्या संमतीपत्राबाबतचा मसुदा प्रसिद्ध करण्यात आला आहे. या बाबत सूचना आणि हरकतीही मागविण्यात आल्या आहेत.

केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिलेल्या प्रस्तावामध्ये पालकांच्या नावावर असलेले वाहन अल्पवयीन अपत्याने चालवून अपघात केल्यास पालकांना जबाबदार धरण्यात येणार आहे. त्याबद्दल त्यांना तीन वर्षांची कैद आणि २५ हजार रुपये दंड ठोठावण्यात येणार आहे. शिवाय संबंधित वाहनाची नोंदणी कायमस्वरूपी रद्द करण्याची तरतूद आहे. नुकत्याच प्रसिद्ध केलेल्या अध्यादेशात अल्पवयीन पाल्यांना अर्थात, १६ ते १८ वयोगटातील पाल्यांना लर्निंग लायसन्स देताना पालकांचे संमतीपत्र बंधनकारक करण्यात आले आहे.

लर्निंग लायसन्सच्या अर्जावरील संमतीपत्रावर पालकांनी स्वाक्षरी करून, तो अर्ज सादर करावयाचा आहे.‘ आरटीओ’ने प्राधिकृत केलेल्या अधिकाऱ्याच्यासमक्ष स्वाक्षरी करायची आहे. संमतीपत्रावर स्वाक्षरी करून पालक पाल्याच्या वाहन चालनाचे उत्तरदायित्व स्वीकारण्यास तयार नसतील, तर त्यांनी आरटीओकडे तसे लिखित स्वरूपात कळविणे बंधनकारक आहे. दरम्यान, या अध्यादेशाबाबत हरकती व सूचना मागविण्यात आल्या आहेत.

ऐच्छिक अवयवदान

देशात केंद्र तसेच राज्य सरकारने अवयवदानाची मोहीम हाती घेतली आहे. अवयवदानामुळे हजारो नागरिकांच्या आयुष्यात आशेचा किरण निर्माण होऊ शकतो. त्यामुळे केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालयाने लायसन्सच्या अर्जावरच अर्जदारांकडून त्याबाबतची परवानगी घेण्याचेही ठरविले आहे. अवयवदानाचा विषय ऐच्छिक आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

फार्मसीला मागणी वाढली

$
0
0

नवीन इंजिनीअरिंग कॉलेजांसाठी फक्त तीन अर्ज

म. टा. प्रतिनिधी, पुणे
राज्यात इंजिनीअरिंग कॉलेजमध्ये पदवी अभ्यासक्रमाला (बीई) प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थी मिळत नसल्याने तंत्र शिक्षण संचालनालयाकडे (डिटीई) नवीन इंजिनीअरिंग कॉलेज सुरू करण्यासाठी केवळ तीन अर्ज आले आहेत. यात पुणे विभागातून एकाही अर्जाचा समावेश नाही. मात्र, असे असतानाच ‘फार्मसी’च्या पदवी अभ्यासक्रमाला (बीफार्म) प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थ्यांचा ओढा वाढत असून नवे कॉलेज सुरू करण्यासाठी १८ अर्ज आले आहेत.

राज्याच्या तंत्र शिक्षण विभागाने येत्या शैक्षणिक वर्षात (२०१७ -१८) इंजिनीअरिंग, फार्मसी, आर्किटेक्चर, व्यवस्थापन आदी विद्याशाखांमध्ये नवे कॉलेज सुरू करण्यासाठी अर्ज मागविले होते. यामध्ये राज्यातून केवळ तीन शिक्षण संस्थांनी इंजिनीअरिंग कॉलेज सुरू करण्यासाठी अर्ज केले आहेत. अशातच राज्यात आर्किटेक्चर कॉलेज सुरू करण्यासाठी पाच ते सात अर्ज आले आहेत, अशी माहिती डिटीई वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली. व्यवस्थापन शाखेत नवीन कॉलेज सुरू करण्यासाठी अद्याप किती अर्ज आले, याची माहिती उपलब्ध होऊ शकली नाही.

या परिस्थितीतच देशात व जगात ‘फार्मसी’ क्षेत्राशी संबंधित असणाऱ्या विविध व्यवसायांना मागणी वाढल्याने आणि रोजगारांच्या विविध संधी मोठ्या प्रमाणात निर्माण होत असल्याने फार्मसी अभ्यासक्रमांना (बीफार्म व डिफार्म) प्रवेश घेणाऱ्यांची संख्या वाढत आहे. त्यामुळे फार्मसीमध्ये बीफार्म अभ्यासक्रमाचे नवे कॉलेज सुरू करण्यासाठी १८ अर्ज आले आहेत. तसेच, सरकारने मेडिकलमध्ये औषधांची विक्री करणारा व्यक्ती बीफार्म किंवा डीफार्म असणे आवश्यक केले आहे. त्यामुळे डीफार्म अभ्यासक्रमाला प्रवेश घेणाऱ्यांची संख्या वाढत आहे. या कारणाने पदविकेचे कॉलेज सुरू करण्यासाठी मोठ्या प्रमाणात अर्ज आले आहेत. गेल्या वर्षी बीफार्म आणि डीफार्ममध्ये प्रवेश घेण्यासाठी प्रवेशक्षमतेच्या तिप्पच विद्यार्थ्यानी अर्ज केले होते.

तंत्र शिक्षणच्या पुणे विभागातून डीफार्म अभ्यासक्रम सुरू करण्यासाठी ११ कॉलेजचे, तर बीफार्म कॉलेज सुरू करण्यासाठी पाच कॉलेजचे प्रस्ताव आले आहेत, अशी माहिती विभागाचे सह संचालक डॉ. डी. आर. नंदनवार यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रेड झोनचा प्रश्न सोडवू

$
0
0

संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांचे आश्वासन

म. टा. प्रतिनिधी, पिंपरी
‘गेली अनेक वर्षे प्रलंबित असलेला रेड झोनचा प्रश्न कायद्याच्या चौकटीत लवकरच सोडवू,’ असे आश्वासन संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांनी शुक्रवारी येथे दिले.

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाच्या प्रचारार्थ तळवडे-त्रिवेणीनगर येथे झालेल्या सभेत ते बोलत होते. खासदार अमर साबळे, आमदार महेश लांडगे, महेश कुलकर्णी, बाबू नायर या वेळी उपस्थित होते. रेड झोनच्या प्रश्नाविषयी केंद्र सरकारची भूमिका जाणून घेण्याविषयी याच भागात पर्रीकर यांच्या सभेचे आयोजन करण्यात आले होते.

इच्छुक उमेदवार आणि व्यासपीठावरील वक्त्यांच्या भावना लक्षात घेऊन पर्रीकर म्हणाले, ‘रेड झोनची हद्द कमी करण्यासाठी दारूगोळा ठेवण्याची पद्धत विकसित करावी लागणार आहे. त्या अनुषंगाने आमचे प्रयत्न चालू आहेत. आधुनिक पद्धतीचा वापर केल्यास कायद्यानुसार रेड झोनचा प्रश्न सुटण्यास मदत होणार आहे. त्यासाठी नागरिकांनी स्थानिक पातळीवरही भारतीय जनता पक्षाला साथ द्यावी.’

पर्रीकर म्हणाले, ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारमुळे देशात चैतन्य निर्माण झाले आहे. अमेरिका, रशिया, चीन, ब्रिटन, जर्मनी या देशांमध्येही भारताविषयी स्वतंत्र स्थान निर्माण झाले आहे. राज्यात शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे किंवा माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाजपवर कितीही टीका केली तरी फरक पडणार नाही. नवी मुंबई आणि पिंपरी-चिंचवडमध्ये भविष्यात वाईट दिवस येतील, या भीतीने ते टीका करीत आहेत.’

पंधरा वर्षे काय केले?

गल्लीतलं पोरगं दिल्लीतील रेड झोनचा प्रश्न कसा सोडविणार, या शिवसेनेचे खासदार शिवाजीराव आढळराव-पाटील यांच्या टीकेचा आमदार महेश लांडगे यांनी समाचार घेतला. ते म्हणाले, ‘मी लहान असल्यापासून रेड झोनच्या प्रश्नाविषयी ऐकतो आहे. गेली १५ वर्षे हे खासदार आहेत. त्यांनी काय केले, याचे उत्तर द्यावे. संरक्षणमंत्री पर्रीकर यांनी सहा बैठका पुण्यात घेतल्या. प्रश्न मार्गी लागले. रेड झोनचा प्रश्नही अंतिम टप्प्यात आहे.’

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


आरपीआयचे प्रदेशाध्यक्ष थुलकर पदावरून निलंबित

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
भारतीय जनता पक्षाच्या कमळ चिन्हावर निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची बाजू घेऊन त्यांना विजयी करण्याबाबत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे प्रदेशाध्यक्ष भुपेश थुलकर यांनी घेतलेली भूमिका थुलकर यांना महागात पडली आहे. पक्षाच्या विरोधात काम केल्याचा ठपका ठेवून पक्षाने थूलकर यांना निलंबित केले आहे. पक्षाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष सुमंतराव गायकवाड यांनी ही माहिती दिली‌.
मुंबई वगळता राज्यातील इतर महापालिकांमध्ये निवडणुकीला सामोरे जाताना आरपीआयच्या उमेदवारांनी पक्षाच्या चिन्हावर निवडणूक लढवावी, जे आरपीआयचे उमेदवार भाजपच्या ‘कमळ’ चिन्हावर निवडणूक लढवतील त्यांना पक्षातून निलंबित करण्याचा इशारा पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार रामदास आठवले यांनी दिला होता. मात्र, याकडे दुर्लक्ष करून आरपीआयच्या अनेक उमेदवारांनी कमळ चिन्ह घेतले. अशा उमेदवारांना पक्षाने निलंबित केले आहे. पक्षाने केलेल्या या कारवाईमुळे आरपीआयच्या कार्यकर्त्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण होते. गुरुवारी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष थुलकर यांनी पुण्यात जाहीर पत्रकार परिषद घेऊन हा वाद मिटल्याचे सांगितले होते. निवडणूक असल्याने निवडणुकीच्या निकालानंतर यावर पुढील कारवाई केली जाईल, असे थुलकर यांनी स्पष्ट करत कमळ चिन्हावर निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांना विजयी करा, असे आवाहन केले होते.
थुलकर यांनी पक्षविरोधी भूमिका घेऊन ‌पक्षाच्या शिस्तीचा भंग केला असल्याचा ठपका ठेवत, शुक्रवारी त्यांना पक्षातून निलंबित करण्याचा निर्णय घेण्यात आला. पक्षाचे अध्यक्ष खासदार आठवले यांच्या आदेशानुसार थुलकर यांना रिपाइंच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष पदावरून निलंबित करण्यात आले आहे, असे रिपाइंचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष माजी आमदार सुमंतराव गायकवाड यांनी स्पष्ट केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पिंपरीचे शांघाय करणार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पिंपरी

पिंपरी-चिंचवडमध्ये उत्तम आरोग्य सुविधेबरोबरच प्रत्येक नागरिकाचा तीन लाखांपर्यंतचा विमा, मोफत वाय-फाय सुविधा, इस्त्राइलच्या धर्तीवर शाळा, हिंजवडी ते चाकण मेट्रो, शहर टँकरमुक्त या प्रकारची आश्वासने भारतीय जनता पक्षाच्या जाहीरनाम्यात देण्यात आली आहेत. शहराला शांघाय करू, असे आश्वासनही देण्यात आले आहे.

महापालिकेच्या निवडणुकीसाठी भाजपच्या जाहीरनाम्याचे प्रकाशन पालकमंत्री गिरीश बापट यांच्या हस्ते शुक्रवारी करण्यात आले. या वेळी पक्षाचे शहराध्यक्ष आमदार लक्ष्मण जगताप, खासदार अमर साबळे, अॅड. सचिन पटवर्धन, उमा खापरे, सदाशिव खाडे, महेश कुलकर्णी, रवी लांडगे या वेळी उपस्थित होते.

निवडणूक प्रचाराच्या अखेरच्या टप्प्यात पक्षाने जाहीरनामा प्रसिद्ध केला. त्यामध्ये २७ प्रकारची आश्वासने देण्यात आली आहेत. आरोग्य, शैक्षणिक, वाहतूक, सुरक्षितता या अनुषंगाने प्रमुख आश्वासनांबरोबरच अन्य बाबींना जाहीरनाम्यात स्थान दिले आहे. यामध्ये सरकारी अभियंत्रिकी, वैद्यकीय आणि नामांकित कॉलेज सुरू करणे, शहराच्या प्रत्येक भागात आणि रस्त्यांच्या कडेला सार्वजनिक स्वच्छतागृहे उभारणे, क्रीडांगणे आणि उद्याने विकसित करणे, सुसज्ज भाजीमंडई, कचरा व्यवस्थापनात बदल, सांडपाण्याचा पुर्नःवापर आणि त्यातून वीजनिर्मिती, प्रत्येक प्रभागात सांस्कृतिक कलामंचची उभारणी, नद्यांचे संवर्धन या कामांचा समावेश आहे.

महापालिकेच्या स्थापनेपासून आजतागायत ३० वर्षांत हजारो काेटींचा निधी उपलब्ध असताना केवळ मलिदा खाण्याचे काम सत्ताधाऱ्यांनी केल्याचा आरोप जाहिरनाम्यातील प्रास्ताविक मनोगतात करण्यात आला आहे. भ्रष्टाचाराची पाळेमुळे उखडून काढण्यासाठी आणि पारदर्शक कारभारासाठी सर्वसाधारण सभा आणि स्थायी समितीचे कामकाज थेट प्रक्षेपित करण्याचा मानस व्यक्त करण्यात आला आहे. केंद्रात, राज्यात आणि महापालिकेतही भाजपची एकहाती सत्ता देऊन विकासाचा त्रिवेणी संगम साधू या, असे आवाहन करण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

झाकीर हुसैनच्या तालावर येरवड्याचे कैदी मंत्रमुग्ध

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, येरवडा

येरवड्याच्या कारागृहात शुक्रवारी कैद्यांनी तबल्याच्या तालावर ठेका धरला होता. निमित्त होते प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसैन यांचा तबलावादनाचा कार्यक्रमाचे. कारागृहात विविध गुन्ह्यांत शिक्षा भोगणारे कैदी मुक्त झाल्यानंतर समाजात मुख्य प्रवाहात आणण्यासाठी गेल्या वर्षभरापासून भोई प्रतिष्ठानच्या वतीने ‘प्रेरणापथ’ उपक्रम राबविला जात आहे. त्यामुळे कैद्यांच्या मानसिकतेत बदल घडावा, असा उद्देश आहे. कारागृहात प्रसिद्ध तबलावादक झाकीर हुसेन येणार असल्याचे समजताच कैदी उत्साहित झाले होते. सुमारे साडेतीन हजार कैदी कार्यक्रमाला हजर होते.

कैद्यांनी चांगला गोष्टींचा आणि साधनांचा वापर करून जीवन सुधारले पाहिजे. भविष्यात आपले तबलावादन या कैद्यांनी कारागृहात न ऐकता बाहेर ऐकावे, अशी इच्छा प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसैन यांनी व्यक्त केली. येरवडा कारागृहात तबलावादन करताना कैद्यांच्या प्रतिसादावरून एखाद्या महोत्सवात कार्यकम करत असल्यासारखे आपल्याला वाटले, असेही हुसैन यांनी सांगितले. या कार्यक्रमासाठी सातारा कारागृहातून आलेल्या तेजश्री पवार या महिला तुरुंगाधिकारीने तबलावादन करून उपस्थिती कैदी आणि अधिकाऱ्यांसह झाकीर हुसेन यांचीही दाद मिळवली, तर एका गायक कैदीने महंमद रफींचे गाणे गाऊन रंगत आणली. त्यानंतर झाकीर हुसेन यांनी सुमारे वीस मिनिटे तबलावादन करून सर्वांना मंत्रमुग्ध केले. जगप्रसिद्ध तबलावादकाचे वादन प्रत्यक्ष पाहत असल्याचा आनंद कैद्यांचा चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होता. कार्यक्रम संपल्यानंतर हुसैन यांनी कैद्यांजवळ जाऊन त्यांच्याशी हस्तांदोलन करून फोटो काढले.

येरवडा मध्यवर्ती कारागृह, भोई प्रतिष्ठान आणि आदर्श मित्र मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसैन यांचा तबलावादनाचा कार्यक्रम कैद्यांसाठी आयोजित करण्यात आला होता. उपमहानिरीक्षक स्वाती साठे, सी. एच. वाकडे, अधीक्षक यू. टी. पवार, उपअधीक्षक कौस्तुभ कुर्लेकर, वरिष्ठ तुरुंगाधिकारी प्रदीप जगताप, दिलीप वासनिक, सहायक आयुक्त राजेंद्र जोशी, भोई प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. मिलिंद भोई, उदय जगताप आणि हजारो कैदी उपस्थित होते. उपमहानिरीक्षक वाकडे यांच्या हस्ते हुसैन यांचा पुणेरी पगडी घालून गौरव करण्यात आला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

​नव्या कारभाऱ्यांच्या ‘बाजारात तुरी’

$
0
0

भाजपकडून ‘कारभारी बदला’चे फलक

म. टा. प्रतिनिधी, पुणे

पालिका निवडणुकीत पुण्यात गाजलेल्या ‘कारभारी बदला’च्या घोषणेने यंदाही खळबळ उडवून दिली आहे; मात्र या निवडणुकीत ही घोषणा देणाऱ्या भारतीय जनता पक्षातच सत्ता आल्यास नवा कारभारी कोण, यावरून चढाओढ सुरू आहे. संपूर्ण शहरात भाजपकडून राज्यातील नेतृत्वाचे फलक लागले असताना, काही ठराविक भागांत शहराचे नेतृत्व करणाऱ्यांनी ‘कारभारी बदला’च्या आवाहनाचे फलक लावले गेल्याने याबाबत चर्चा सुरू आहे. पालकमंत्री गिरीश बापट आणि खासदार संजय काकडे यांच्या समर्थकांत यासाठी जोरदार आघाडी उघडल्याचे दिसून येत आहे.

केंद्र आणि राज्यातील सत्तेनंतर महापालिकेवर झेंडा फडकवण्यासाठी भाजपने गेल्या अनेक महिन्यांपासून निवडणुकीची तयारी केली असून, जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांना आता महापालिकेचे ‘कारभारी’ बनण्याची इच्छा आहे. दहा वर्षांपूर्वी माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी ‘कारभारी बदला’ अशी साद पुणेकरांना घातली होती. त्या वेळी महापालिकेची सूत्रे काँग्रेसच्या सुरेश कलमाडी यांच्याकडून राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार यांच्याकडे आली. आता सत्ताधारी ‘राष्ट्रवादी’च्या ताब्यातून पालिका ताब्यात घेण्यासाठी पालकमंत्र्यांनी सुरुवातीपासून पुढाकार घेतला आहे.

महापालिका निवडणुकांपूर्वी जाहीर झालेल्या पक्षाच्या कार्यकारिणीत पालकमंत्र्यांशी संबंधित अनेक कार्यकर्त्यांना संधी मिळाली होती. त्यानंतर उमेदवारी निश्चित करण्याच्या संपूर्ण प्रक्रियेमध्ये त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. कसबा विधानसभा मतदारसंघात अनेक धक्कादायक निर्णय घेताना त्यांनी विद्यमान नगरसेवकांना घरी बसवले. भाजपच्या हक्काच्या जागांवर तेथील तुल्यबळ उमेदवारांऐवजी काही जवळच्या कार्यकर्त्यांना तिकीट दिल्याने नाराजी पसरली होती. एवढेच नाही, तर पालकमंत्र्यांनी इतर आमदारांच्या मतदारसंघांतही कुरघोडी करून काही खास कार्यकर्त्यांना उमेदवारी देण्यामध्ये पुढाकार घेतला.

शहरात पक्षाने लावलेल्या बहुसंख्य होर्डिंगवर केंद्र-राज्यातील नेतृत्वाचा चेहरा झळकत असताना, काही ठराविक होर्डिंगवर मात्र पालकमंत्र्यांची छबी झळकत आहे. ‘कारभारी बदला’ असे आवाहन करणारे फलक जागोजागी दिसून येत आहेत.

पालकमंत्री गिरीश बापट यांची नव्या कारभारीपदासाठी तयारी सुरू असतानाच दुसरीकडे खासदार संजय काकडे यांनीही जोरदार आघाडी उघडली आहे. विविध पक्षांतील अनेक नेत्यांना पक्षात घेण्यात त्यांनी पुढाकार घेतला होता. त्यापैकी अनेकांना उमेदवारीही मिळाली आहे. साहजिकच पक्षामधील त्यांचे वजन वाढले असून, या निवडणुकीच्या प्रचाराच्या दरम्यान झालेल्या सभांमध्ये मुख्यमंत्र्यांपासून प्रदेशाध्यक्षांपर्यंत सगळ्यांनीच खासदार काकडे यांना महत्त्व दिल्याने कार्यकर्तेही आता त्यांच्याकडे जात असल्याचे चित्र आहे. उमेदवारी जाहीर झाल्यानंतर काकडे यांच्या घरी पन्नासहून अधिक उमेदवारांनी हजेरी लावल्याने कार्यकर्त्यांमध्ये त्याची जोरदार चर्चा आहे.

नव्या महापालिकेत कोणत्या नेत्याचे किती समर्थक विजयी होणार, त्यावर शहराचा पुढील कारभारी कोण, हे ठरणार आहे. साहजिकच आता पालकमंत्री आणि खासदार या दोघांमध्ये आपले सर्वाधिक नगरसेवक निवडून यावेत या दृष्टीने व्यूहरचना सुरू आहे. त्यामुळे पुण्याचा कारभारी बदलला, तरी तो नक्की कोण असणार याबद्दलची चर्चा आतापासूनच सुरू झाली आहे, हे नक्की.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

यंदाही रंगणार ‘मटा मैफल’

$
0
0

२५ ते २७ फेब्रुवारीदरम्यान होणार साहित्यसोहळा

म. टा. प्रतिनिधी, पुणे

साहित्यरसिकांसाठी पर्वणी ठरलेली ‘महाराष्ट्र टाइम्स’ची ‘मटा मैफल’ यंदाही रंगणार आहे! साहित्य क्षेत्रातील दिग्गजांपासून नवोदित कवी-लेखकांपर्यंत, समीक्षकांपासून भाष्यकारांपर्यंत अनेक मान्यवर २५ ते २७ फेब्रुवारीदरम्यान स. प. महाविद्यालयात ही मैफल सजवणार असून, गेल्या वर्षीप्रमाणे यंदाही या निमित्ताने कथा स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.

मराठी साहित्याच्या क्षेत्रातील नव्या प्रवाहांची दखल घेऊन त्यावर चर्चा घडवण्यासाठी, नव्या दमाच्या साहित्यिकांशी संवाद साधतानाच ज्येष्ठ साहित्यिकांशी चर्चा करण्यासाठी, आपल्या कविता ऐकवण्यासाठी आणि दुसऱ्यांच्या ऐकण्यासाठी, कथा-कादंबऱ्यांपासून अनुवादापर्यंतच्या विविध साहित्य प्रकारांच्या लेखनाबाबत जाणकारांकडून मार्गदर्शन घेण्यासाठी ‘महाराष्ट्र टाइम्स’ने ‘मटा मैफल’ हे व्यासपीठ दोन वर्षांपूर्वी सुरू केले आहे. साहित्य आणि संस्कृतीवरील आस्वादक मैफलीला रसिकांनी गेले दोन वर्षे भरभरून प्रतिसाद दिला आहे. दिग्गज साहित्यिकांची भाषणे, साहित्यावरील परिसंवाद, कवीकट्टा, अभिवाचन, मान्यवरांच्या मुलाखती, लेखन कार्यशाळा असा भरगच्च कार्यक्रम ‘मटा मैफल’मध्ये असून, त्याचा तपशील ‘महाराष्ट्र टाइम्स’च्या अंकातून यथावकाश प्रसिद्ध होईल.

.........

कथा, कविता पाठवा

यंदाच्या कथा स्पर्धेत दोन विभाग करण्यात आले आहेत. गूढकथा आणि प्रेमकथा या दोन विभागांमध्ये पाचशे ते दोन हजार शब्दांपर्यंत कथालेखन करता येणार आहे. लघुत्तम कथेसाठी दीडशे शब्दांची मर्यादा आहे. तिन्ही गटांतील विजेत्यांना ‘मटा मैफल’च्या समारोपात प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते पारितोषिके देण्यात येणार आहेत. कवीकट्ट्यात भाग घेण्यासाठी कविता पाठवायच्या आहेत. पाठवलेल्या कवितांपैकी ज्या कवितांची निवड होईल, त्या कवींना कवीकट्ट्यावर सादरीकरणाची संधी मिळेल.

...........

स्पर्धेत सहभागी होण्यासाठी...

कथा, लघुकथा आणि कविता २१ फेब्रुवारीपर्यंत पाठवाव्यात. त्यासाठीचा पत्ता : महाराष्ट्र टाइम्स, टाइम्स हाउस, दुसरा मजला, गोपाळकृष्ण गोखले पथ (एफसी रोड), शिवाजीनगर, पुणे. लिफाफ्यावर कथा/लघुत्तम कथा स्पर्धा वा कविता असा स्पष्ट उल्लेख करायला हवा. ई-मेलद्वारेही लेखन स्वीकारण्यात येणार असून, त्यासाठीचा मजकूर वर्ड आणि पीडीएफ फाइल अशा दोन्ही स्वरूपांत पाठवावा. लेखकाने आपला पूर्ण पत्ता आणि फोन क्रमांक द्यायला हवा; तसेच छायाचित्रही जोडायला हवे. लेखन पाठवण्यासाठी ई-मेल आयडी : mataamaifalpune@gmail.com

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images