Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

प्रचारापासून कलाकार चार हात लांबच

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

महापालिका निवडणुकीचा प्रचार शेवटच्या टप्प्यात आला असताना तारे-तारका मात्र, त्यापासून दूर राहिल्याचे यंदा दिसून आले आहे. 'आपला माणूस' हा शिक्का टाळण्यासाठी कलाकारांनी स्वत:ला नाटकाचे प्रयोग आणि चित्रिकरण यांत गुंतवून घेतले आहे. त्याचवेळी मालिकांमधील कलाकारांचे मुखवटे वापरून प्रचार करण्यात येत आहे. त्यासाठी कलाकारांची परवानगी घेतली नसल्याने तीव्र नाराजी पसरली आहे.
पदयात्रा, जाहीर सभा आणि रोड शो अशा विविध माध्यमांतून निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचला आहे. चित्रपट तारे-तारका मात्र या प्रचारापासून दूरच आहेत. राजकीय पक्षांशी संबंधित अभिनेत्यांचा अपवाद वगळता अन्य कलाकार चित्रिकरण आणि नाटकांचे प्रयोग यामध्ये व्यग्र असल्याचे दिसून आले आहेत. प्रचारात सहभागी झालो तर आपला माणूस हा शिक्का बसण्याची धास्ती कलाकारांना वाटत आहे. रोड शोच्या वेळी प्रभाव टाकण्यासाठी अनेक उमेदवार तारे-तारकांना निमंत्रित करतात. रोड शो किंवा जाहीर सभेच्यानिमित्ताने कलाकारांना पाहण्यासाठी मतदार गर्दी करतात. कलाकार सहभागी होत नसल्याने परवानगी न घेता त्यांच्या 'इमेज'चा फायदा करून घेण्याची शक्कल राजकीय पक्षांनी लढवली आहे. कलाकारांचे मुखवटे वापरून प्रचार करण्याचा ट्रेंड सोशल मीडियावर जोरात आहे.
‘श्री राजा शिवछत्रपती’ मालिकेमध्ये शिवाजी महाराजांची भूमिका करणारे डॉ. अमोल कोल्हे, ‘होम मिनिस्टर’फेम आदेश बांदेकर, नाट्य-चित्रपट कलाकार शरद पोंक्षे शिवसेनेच्या प्रचारात सक्रिय आहेत. कोल्हे यांच्याकडे शिवसेनेच्या जिल्हा संपर्कप्रमुखपदाची जबाबदारी आहे. तर, बांदेकर मुंबईमध्ये शिवसेनेचे प्रचारक आहेत. महेश मांजरेकर, भरत जाधव, आनंद इंगळे, विनय येडेकर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे समर्थक म्हणून ओळखले जातात. मात्र, ते यंदा फटकून राहिल्याचे दिसत आहे. काँग्रेस पक्षाच्या प्रचारामध्ये सुरेश कलमाडी हे चित्रपटसृष्टीतील तारे-तारकांचा रोड शो करीत असत. यापूर्वी काँग्रेसच्या प्रचारासाठी गोविंदा, जॅकी श्रॉफ, मूनमून सेन, अनिल कपूर, डिम्पल, नगमा, रझा मुराद असे कलाकार सहभागी झाले होते.
यंदाच्या निवडणुकीमध्ये प्रचारासाठी कालावधी कमी उरला आहे तसेच व्यग्रतेमुळे कलाकार प्रचारासाठी उपस्थित राहू शकत नसल्याचे निरीक्षण ‘संवाद’ संस्थेचे सुनील महाजन यांनी नोंदविले. मानधनाचे गणित जुळल्याशिवाय कलाकार प्रचारात सहभागी होण्याची शक्यता नाही, असे मनोरंजन संस्थेचे मोहन कुलकर्णी यांनी सांगितले.

मानधन कोणी द्यावे
लोकसभा, विधानसभा निवडणुकीच्या वेळी उमेदवाराकडूनच वातावरण निर्मितीसाठी कलाकारांची मागणी केली जाते. लोकप्रियतेनुसार संबंधित कलाकाराचे मानधन ठरते. आता एका प्रभागात चार सदस्य असल्याने कलाकाराला निमंत्रित करायचे तर, मानधन कोणाकडून मिळणार याची शाश्वती नसल्याने कलाकारांनी प्रचारातून अंग काढून घेतले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


संगीताचा अनुभवला मिलाफ

$
0
0

गानसरस्वती महोत्सवाला मोठ्या थाटात सुरुवात

म. टा. प्रतिनिधी, पुणे

भारतीय संगीत या शब्दांमध्ये काय ताकद आहे...? भारत या महाकाय देशातील तितक्याच महान संगीत परंपरेचे अवकाश या दोन शब्दांमध्ये सामावले आहे. भारत म्हटले की विविधतेत एकता हे जसे ओघाने येते तसेच भारतीय संगीत म्हटले की विविध संगीत परंपरांचा मिलाफ येथे होतोच. हिंदुस्थानी, कर्नाटकी संगीत तसेच विविध घराण्यांचा गुणसम्मुचय अनुभवण्यास येतो. अशा विभिन्न शैलीचा असाच सुरेख संगम शुक्रवारी झाला आणि हिंदुस्थानी, कर्नाटकी अशा संगीताच्या विविध भिंती गळून पडल्या. भारतीय संगीत म्हणून जे काही आहे ते कानसेनांनी खऱ्या अर्थाने अनुभवले.
गानसरस्वती किशोरी अमोणकर यांच्या भारतीय शास्त्रीय संगीतातील अलौकिक योगदानाला मानवंदना देण्यासाठी नाट्यसंपदा प्रतिष्ठानतर्फे आयोजित गानसरस्वती महोत्सवाला राजाराम पुलाजवळील महालक्ष्मी लॉन्स येथे शुक्रवारी सुरुवात झाली. या महोत्सवातून रसिकांना संगीत मिलाफाची अनुभूती आली. महोत्सवाची सुरुवात प्रसिद्ध त्रिचूर बंधू यांनी आपल्या कर्नाटक शैलीतील गायनाने केली. श्रीकृष्ण आणि राममोहन यांनी कर्नाटक शैलीतून सुखद क्षण रसिकांना दिले. राग नटसुरुचीमध्ये सिद्धिविनायकम, राग शब्दमुख प्रिया , शिव वंदना, राग यमुना कल्याणी, शंकर शंकर करुणाकरा अशा रचनांनी रसिकांना स्वरतालाची अनुभूती दिली. व्हायोलिनवर एल. रामकृष्णन, मृदुंगमसाठी मोहन त्रिचूर, घटमसाठी टी.व्ही.व्यंकटसुब्रमण्यम यांनी सुरेख साथसंगत केली.
किशोरीताईंच्या शिष्या आणि जयपूर घराण्याच्या गायिका स्वर्णिमा गुसैन यांचे गायन रंगले. त्यांनी राग भीमपलास सादर केला. जा जा रे अपने मंदिरवा आणि किशोरीताईंची रचना असलेल्या म्हारो प्रणामने वातावरणाचा नूर पालटला. तबल्यावर भरत कामत, हार्मोनियमवर सुयोग कुंडलकर, तानपुरा ओंकारदास बैराग आणि अश्विनी पुरोहित यांनी साथसंगत केली. यानंतर धृपद गायकीसाठी प्रसिद्ध असलेल्या गुंदेचा बंधू यांचे गायन झाले. कल्याण रागातील त्यांची मूरत मन भावे ही रचना रसिकांना भावली. संत कबीर यांची झिनी झिनी चदरिया या रचनेने रसिकांना मंत्रमुग्ध केले. पहिल्या दिवसाचा समारोप तबलानवाज उस्ताद झाकीर हुसेन यांच्या तालाविष्काराने झाला. त्यांच्या अदभुत तालाविष्काराला रसिकांनी डोक्यावर घेतले. हार्मोनियमची लहेरा साथसंगत अजय जोगळेकर यांनी केली.

‘पुणेरी पगडीचा अभिमान’
'गानसरस्वती किशोरी अमोणकर पुरस्कार' ज्येष्ठ मृदंग वादक उमयालपुरम शिवरामन यांना किशोरीताईंच्या हस्ते प्रदान करण्यात आला. तबलानवाज उस्ताद झाकीर हुसेन यांनी त्यांना पुणेरी पगडी परिधान केली. शिवरामन यांच्या ज्येष्ठत्त्वाचा मान राखून हुसेन यांनी व्यासपीठावर आसनस्थ होण्याचे टाळले. बाजूला उभे राहून त्यांनी शिवरामन यांच्याप्रती आदर व्यक्त केला. 'पुणेरी पगडीमुळे मी जुन्या काळात गेलो. स्वातंत्र्य पूर्व काळातील न्या. रानडे व गोपाळ कृष्ण गोखले यांची आठवण झाली. पगडीने माझ्या संगीताच्या कारकिर्दीला मुकुट प्राप्त झाला आहे. पुण्यात कला सादर करायला मला आवडेल. बोलावल तर मी नक्की येईन,' अशी भावना शिवरामन यांनी व्यक्त केली. पं. रघुनंदन पणशीकर या वेळी उपस्थित होते.

आज महोत्सवात

उस्ताद शाकीर खान यांचे सतारवादन
पं. शौनक अभिषेकी यांचे गायन
विदुषी शोभना यांचा भरतनाट्यम नृत्याविष्कार डॉ. एन. राजम यांचे व्हायोलिन वादन

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भाजप करतेय गुंडांची ‘धुलाई’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी खडकी /पिंपरी

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षात अनेक गुंडांचा प्रवेश झाला. भाजप वॉशिंग मशिन असून, वॉशिंग पावडर असलेले हे सरकार आहे. या पक्षात आलेल्या प्रत्येकाला धुवून स्वच्छ केले जाते. भाजपचा अगदी ‘पारदर्शी’ कारभार सुरू आहे, अशी कोपरखळी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी शुक्रवारी मारली.
पुणे महापालिकेतील औंध-बोपोडी (प्रभाग क्रमांक आठ) आणि पिंपरी चिंचवड महापालिकेचे (प्रभाग क्रमांक २६) पिंपळे निलख या ठिकाणी आयोजित प्रचार सभेत चव्हाण बोलत होते. या प्रसंगी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील, हुसेन दलवाई, विश्वजित कदम, शहराध्यक्ष रमेश बागवे, दत्तात्रय गायकवाड तसेच दोन्ही प्रभागातील सर्व उमेदवार उपस्थित होते.
‘भाजप आणि शिवसेनेमध्ये सध्या सुरू असेलले भांडण हा दिखावा असून, मुंबई महानगरपालिकेतील लोण्याचा गोळा खाण्यासाठी हे सर्व चालले आहे. निवडणुका संपल्यानंतर यांचे भांडणही थांबेल आणि हे दोघे पुन्हा गळ्यात गळे घालून फिरतील,’ असा दावाही चव्हाण यांनी केला. भाजप सरकारने गेल्या अडीच वर्षांत राज्याची आणि देशाची काय अवस्था केली ती सर्वजण पाहत आहेत. महागाई, नोटाबंदी, खोटी आश्वासनांनी जनता त्रस्त झाली आहे. भाजपने गेल्या अनेक वर्षांपासून मंदिर, मशिदीचा मुद्दा उपस्थित करून दोन धर्मांमध्ये तेढ निर्माण केली आणि सत्ता मिळवण्याचा प्रयत्न केला. आताही तोच प्रयत्न सुरू आहे. सध्याचा त्यांचा नारा आहे की, ‘मंदिर वही बनाएंगे; लेकीन तारीख नही बताएंगे’. शिवसेनेचे नेते खिशात राजीनामा घेऊन फिरतात, मात्र देत नाहीत. त्यांचेही भाजपसारखेच ‘राजीनामा हम देंगे; लेकीन तारीख नही बताएंगे,’ असे धोरण आहे, असेही चव्हाण यांनी नमूद केले.

‘युतीच्या भांडणावर कर लावा’
शिवसेना आणि भाजपच्या भांडणामुळे चांगले मनोरंजन होत असून, त्यावर कर लावण्याची वेळ आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि अजित पवार यांनी भाजपला मदत करणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. भाजप-शिवसेनाला सरकार चालवता येत नसेल, तर त्यांना सत्तेत राहण्याचा काहीही अधिकार नाही. त्यांना महानगरपालिका काय चालवता येणार आहे, असा सवाल चव्हाण यांनी उपस्थित केला. या फेकू सरकारला बाजूला सारून काँग्रेसच्या उमेदवारांना विजयी करा, असे आवाहनही चव्हाण यांनी केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

निवडणूक आखाड्यात डावपेचांना चढली धार

$
0
0

प्रस्थापितांना रोखण्यासाठी विरोधात बळ देण्याची रणनीती

म. टा. प्रतिनिधी, पुणे

महापालिका निवडणुकीसाठी मतदानाची तारीख जवळ येत चालल्याने राजकीय आखाड्यात अनेक ‘डाव-प्रतिडाव’ रंगण्याची चिन्हे दिसत आहेत. एखाद्या प्रभागात पक्षाचा उमेदवार नसेल, तर तेथील प्रस्थापितांना रोखण्यासाठी विरोधी पक्षाच्या उमेदवाराला बळ देण्याची रणनीती आखली जात असून, त्याचा सर्वाधिक फटका भारतीय जनता पक्षाला बसण्याची भीती आहे. तर, काही ठिकाणी सत्ताधाऱ्यांच्या तुल्यबळ उमेदवाराच्या विरोधातही इतर सर्व विरोधकांची एकजूट होताना पाहायला मिळत आहे.
मतदानासाठी चारच दिवस उरले आहेत. विधानसभा निवडणुकीप्रमाणे महापालिकेमध्येही सर्व पक्ष स्वबळावर लढणार असल्याने सर्वांकडून जय्यत तयारी सुरू आहे. भाजप-शिवसेना स्वतंत्ररित्या लढत असून, राष्ट्रवादी-काँग्रेस यांच्यात काही प्रभागांमध्ये आघाडी झाली आहे. निवडणुकीचे चित्र आता बऱ्यापैकी स्पष्ट झाले असून, बऱ्याच ठिकाणी अवघ्या दोन किंवा तीन उमेदवारांमध्येच प्रमुख लढत होणार आहे. अशा ठिकाणी मतविभाजनाचा फायदा भारतीय जनता पक्षाच्या उमेदवाराला मिळू नये, याकरिता काँग्रेस-राष्ट्रवादीने किंवा शिवसेना आणि मनसेनेही त्या ठिकाणच्या तुल्यबळ उमेदवाराला पूर्ण ताकद द्यायचे ठरवले आहे.
मध्यवस्तीतील एका प्रभागात राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराचा अर्ज बाद झाला. त्यामुळे, या ठिकाणी भाजपच्या उमेदवाराला आव्हान देण्यासाठी मनसेच्या महिला उमेदवाराला पूर्ण पाठिंबा देण्याचे राष्ट्रवादी-काँग्रेसने जाहीर केले. गेल्या निवडणुकीत भाजपच्या पारंपरिक बालेकिल्ल्यातून मनसेच्या नगरसेविकेने बाजी मारली होती. आता, इतर सर्व पक्षांची मदतही मिळाली, तर भाजपसमोर संपूर्ण पॅनेल निवडून आणण्याचे आव्हान असेल. मध्य भागातीलच आणखी एका महत्त्वाच्या प्रभागातही अशाच पद्धतीने सर्व विरोधक एकत्र आले आहेत. या ठिकाणच्या उमेदवाराला पक्षाचे अधिकृत चिन्ह मिळाले नसले, तरी सर्वजण भाजपच्या प्रस्थापित उमेदवाराचा पराभव करण्यासाठी एकत्र झाले आहेत. भाजपच्या उमेदवाराचा पराभव करण्यासाठी सर्व विरोधकांची एकजूट झाली, तर त्यांच्यासमोरील अडचणींमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे.

भाजपविरुद्ध सर्वपक्षीयांची मोट
शहराच्या पूर्व भागात काँग्रेसच्या एका उमेदवाराचा पाडाव करण्यासाठी तेथील सर्वपक्षीय विरोधकांनी एकत्र मोट बांधत एका उमेदवाराच्या पाठीमागे सर्व शक्ती पणाला लावली आहे. मध्यवस्तीप्रमाणे शहराच्या उपनगरांतील काही प्रभागांमध्ये याच पद्धतीने भाजपच्या विरोधातील तुल्यबळ उमेदवाराला सर्व प्रकारची रसद पुरविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. काही ठिकाणी उलट चित्रही दिसून येत आहे. म्हणजेच, त्या-त्या भागांत अनेक वर्षांपासून काम करत असूनही स्थानिक लोकप्रतिनिधींबाबत नाराजी आहे. ही नाराजी मतपेटीतून व्यक्त करण्यासाठी विद्यमान सत्ताधाऱ्यांच्या विरोधातही अशाप्रकारे स्थानिक विरोधक एकत्र आल्याचे चित्र दिसून येत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

माजी सैनिकाने मागितली खंडणी

$
0
0

पोलिसांनी केले गजाआड; पावणे दोन किलो सोने जप्त

म. टा. प्रतिनिधी, पुणे

बांधकाम व्यावसायिकाला २५ लाखाची खंडणी मागितल्याच्या आरोपावरून अटक केलेला आरोपी राष्ट्रीय सुरक्षा दलातीचा (एनएसजी) माजी कमांडो असल्याचे समोर आले आहे. या गुन्ह्यात तिघांना अटक करून त्यांच्याकडून पावणे दोन किलो सोने आणि परवानाधारक पिस्तूल असा पन्नास लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
नवनाथ बाजीराव मोहिते (वय ३१), त्याचा भाऊ रघुनाथ मोहिते (वय २९) आणि किसन चव्हाण (वय ४०, सर्व. राहणार नेवासा, जि. अहमदनगर) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. या प्रकरणी व्यावसायिक कल्पेश ओसवाल (वय ३४, रा. मार्केट यार्ड) यांनी तक्रार दिली आहे. नवनाथ नऊ वर्षे सैन्यदलात शिपाई म्हणून कार्यरत होता. त्यापैकी चार वर्षे तो ‘एनएसजी’मध्ये कार्यरत होता. २००९ मध्ये त्याने लष्कराची नोकरी सोडली. त्यानंतर तो भावासह कॉन्ट्रॅक्टर म्हणून काम करत होता. तर, चव्हाण खासगी शाळेत मुख्याध्यापक म्हणून काम करत आहे, अशी माहिती गुन्हे शाखेचे पोलिस उपायुक्त पी. आर. पाटील आणि सहायक आयुक्त सुरेश भोसले यांनी दिली.
तक्रारदार यांच्याकडे मोहिते बंधू चार वर्षांपासून कॉन्ट्रॅक्टर म्हणून नोकरी करतात. त्यामुळे त्यांचा दोघांवर विश्वास बसला. ओसवाल यांनी त्यांची काही महत्वाची कागदपत्रे आणि दोन किलो ७०० ग्रॅम सोने त्यांच्याकडे ठेवण्यासाठी दिले. काही दिवसांनी त्यांनी सोने आणि कागदपत्रे मागितल्यानंतर त्यांना धमकी देण्यास सुरुवात झाली. सोने पाहिजे असल्यास २५ लाख रुपयांची मागणीही करण्यात आली. पैसे न दिल्यास परवानाधारक पिस्तुलातून गोळ्या घालून जीवे मारण्याची धमकीही देण्यात आली. त्यानंतर ओसवाल यांनी तत्काळ खंडणी विरोधी पथकाकडे तक्रार दिली. वरिष्ठ पोलिस निरीक्षक लक्ष्मण बोराटे, सहायक निरीक्षक सुनील गवळी, कर्मचारी संदीप दळवी, नीलेश देसाई यांच्या पथकाने आरोपींना अहमदनगर जिल्ह्यातून अटक केली. मोहिते याने स्वतःच्या आणि नातेवाइकांच्या घरी ठेवलेले सोने पोलिसांनी जप्त केले. मोहितेचे परवानाधारक पिस्तुल आणि ११ काडतुसेही जप्त करण्यात आली आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मुळा-मुठा ही काय नद्यांची नावे आहेत का?

$
0
0

पुणे : ‘मुळा-मुठा ही काय नद्यांची नावे आहेत का? नदीचे नाव उच्चारता येईल असे हवे. बॉम्बेचे मुंबई केलेत, तशीच या नद्यांची नावेही बदला,’ असा अजब आणि अतार्किक सल्ला देऊन केंद्रीय नगरविकास मंत्री व्यंकय्या नायडू यांनी शुक्रवारी वाद निर्माण केला. हा सल्ला अनेकांना खटकला असून, अन्य राजकीय पक्षांनी नायडूंवर टीकेची झोड उठवली.

महापालिका निवडणुकीच्या प्रचारासाठी शहरात आलेल्या नायडू यांनी नगरविकास विभागामार्फत सुरू असलेल्या विविध योजनांची जंत्री मांडली. त्याच वेळी, पुण्याचे प्रकाश जावडेकर पर्यावरणमंत्री असताना, शहरातील नद्यांमध्ये होणारे प्रदूषण रोखण्यासाठी एक हजार कोटी रुपयांचा प्रकल्प मान्य केल्याचे त्यांनी नमूद केले. या वेळी नायडू यांना मुळा-मुठा या नद्यांची नावेच आठवली नाहीत. भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी नाव सांगितल्यावर नायडू यांनी, ‘ही काय नावे आहेत का,’ असे विधान केले. दोन्ही नद्यांचा उगम पुण्याजवळ झाला असल्याने त्यांची नावे अशी असल्याचा पालकमंत्री गिरीश बापट यांनी खुलासा केला; मात्र ‘नद्यांची नावे सहज उच्चारता यायला हवीत,’ असे सांगून नायडू यांनी ‘नद्यांची नावेही बदलता येतात का ते पाहा,’ अशी सूचना केली.

नायडू यांच्या विधानावर मोठ्या प्रमाणावर नाराजी पसरली आहे. ‘पुण्याच्या नद्यांना मोठा इतिहास आहे. ज्या इतिहासाचे आपल्याला आकलन नाही, त्याविषयी असे अनुदार उद्गार काढण्याचा हक्क कोणी दिला,’ अशा शब्दांत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शहराध्यक्ष हेमंत संभूस यांनी नायडूंवर टीका केली. राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष अशोक राठी यांनीही नायडू यांच्या वक्तव्यामुळे पुणेकरांचा स्वाभिमान दुखावला गेल्याची टीका केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गर्दीअभावी मुख्यमंत्र्यांची सभा रद्द

$
0
0

मटा ऑनलाइन वृत्त । पुणे

पुण्यात भरदुपारी आयोजित केलेली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सभा गर्दीअभावी गुंडाळण्याची नामुष्की आज भाजपवर आली. मुख्यमंत्री सभास्थळी दाखल झाले होते, पण मैदानातील ९० टक्के खुर्च्या रिकाम्या असल्याने ते व्यासपीठावर गेले नाहीत. मुख्यमंत्र्यांनी १५ मिनिटं थांबून गर्दीचा अंदाज घेतला आणि सभास्थळ सोडून पिंपरी चिंचवडमधील सभेसाठी ते निघून गेले.

पुण्यातील सदाशिव पेठेत आज दुपारी २ वाजता मुख्यमंत्र्यांची सभा आयोजित करण्यात आली होती. सभेला येणाऱ्या लोकांसाठी संपूर्ण मैदानात खुर्च्या मांडण्यात आल्या होत्या. मुख्यमंत्र्यांच्या सभांना अन्य ठिकाणी जसा चांगला प्रतिसाद मिळत आहे तसा प्रतिसाद पुण्यातही मिळेल, अशी भाजपला खात्री होती. त्यातही प्रचाराचा शेवटचा दिवस असल्याने ही सभा यशस्वी व्हावी, असे भाजपच्या मंडळींना वाटत होते, पण ऊनाच्या तडाख्याने भाजपच्या सभेचा पुरता विस्कोट झाला.



सभेला अगदीच तुरळक लोक आल्याने मुख्यमंत्र्यांनी सभास्थळी येऊनही व्यासपीठावर हजेरी न लावता पिंपरी चिंचवडची वाट धरली. पालकमंत्री गिरीष बापट आणि भाजप शहराध्यक्ष योगेश गोगावले व्यासपीठावर होते. मात्र मुख्यमंत्री निघाल्यानंतर काही वेळेतच ही सभा गुंडाळण्यात आली.

मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली दिलगिरी

मुख्यमंत्री फडणवीस यांनी एक ट्विट करून पुण्यातील सभा रद्द झाल्याबद्दल दिलगिरी व्यक्त केली आहे. सभेच्या वेळेबाबत योग्य समन्वय होऊ न शकल्याने मी माझी पुण्यातील सभा रद्द केली आहे, असे फडणवीस यांनी या ट्विटमध्ये नमूद केले आहे.


मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

​ पदाधिकाऱ्यांच्या हट्टामुळे सभेची ‘शाेभा’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

प्रचाराच्या अखेरच्या टप्प्यात मुख्यमंत्र्‍यांची सभा हवी, असा आग्रह पक्षाच्या अनेक उमेदवारांनी धरला असला, तरी दुपारी दोनची वेळ पुढे आली, त्यावेळी ‘सभा नको’, अशी भूमिका मांडण्यात आली. तरीही शहरातील पदाधिकाऱ्यांनी दुपारच्या सभेचा हट्ट कायम ठेवला अन् शनिवारी दुपारी गर्दीअभावी सभा रद्द झाल्याने पक्षासह मुख्यमंत्र्‍यांच्या नाचक्कीचा डाग शहर भाजपच्या नियोजनावर लागला. मुख्यमंत्र्‍यांच्या सभेचे निरोपच वेळेवर पोहोचवण्यात आले नसल्याची टीकाही काही उमेदवार आणि कार्यकर्त्यांनी केली.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गेल्या सोमवारी बाणेर, कोथरूड, सातारा रोड आणि हडपस अशा चार ठिकाणी सभा घेतल्या होत्या. रविवारी प्रचाराची सांगता होण्यापूर्वी पुन्हा मुख्यमंत्र्‍यांची सभा घेण्यासाठी बऱ्याच उमेदवारांकडून पाठपुरावा केला जात होता. तसेच, पक्ष नेतृत्वाचेही त्यादृष्टीने प्रयत्न सुरू होते. अखेर, शनिवारी दुपारी सभेसाठी वेळ देण्यात आली. पुणे, पिंपरी-चिंचवड, नाशिक, मुंबई अशा सर्व ठिकाणी मुख्यमंत्र्यांना सभा घ्यायचा असल्याने पहिल्या सभेसाठी दुपारी दोनची वेळ निश्चित करण्यात आली. त्याची पूर्वकल्पना दिल्यानंतर दुपारी दोनच्या उन्हात सभा नको, थोडी उशिराने घ्या, अशी एकमुखी मागणी बहुतेकांनी केली. मात्र, सभेसाठी हीच वेळ उपलब्ध होऊ शकेल, असे स्पष्ट झाल्यानंतर शहर नेतृत्वाने त्याला संमती दिली.
न्यू इंग्लिश स्कूल, टिळक रोडचे मैदान मोठे आहे. तरीही, कसबा मतदारसंघात सभा होणार असल्याने या ठिकाणी त्याला नक्की प्रतिसाद मिळेल, असा विश्वास सर्वांना होता. उमेदवारांनी सकाळच्या टप्प्यातील प्रचार संपल्यानंतर थेट मुख्यमंत्र्‍यांच्या सभेसाठी यावे, अशा सूचना सर्वांना देण्यात आल्या होत्या. त्यामुळे, दुपारी सभा असली, तरी मोठ्या संख्येने कार्यकर्ते येतील, ही अपेक्षा पूर्णतः फोल ठरली. प्रचारात अडकल्याने पक्षाचे अनेक नगरसेवक, उमेदवार आणि महत्त्वाचे पदाधिकारी या सभेला वेळेवर उपस्थित राहू शकले नाहीत. कार्यकर्त्यांना विश्वासात न घेता, परस्पर मुख्यमंत्र्‍यांची सभा ठरवण्यात आल्याची नाराजी अनेकांनी व्यक्त केली. तर, चुकीच्या पद्धतीने सभेचे नियोजन केल्याने मुख्यमंत्र्‍यांची आणि पक्षाचीही नाचक्की झाल्याचा आरोपही काही कार्यकर्त्यांनी केला.

मुख्यमंत्र्यांनी पदाधिकाऱ्यांना झापले
मुख्यमंत्र्‍यांच्या सभेची वेळ दुपारी दोनची असल्याचे पक्षातर्फे देण्यात आलेल्या जाहिरातींमध्ये प्रसिद्ध झाले होते. त्यामुळे, सव्वादोनच्या सुमारास मुख्यमंत्री सभेच्या ठिकाणी दाखल झाले. गर्दी नसल्याने मुख्यमंत्र्‍यांचा चेहरा उतरला अन् ते व्यासपीठावर गेलेच नाहीत. ‘हे आहे का तुमच्या सभेचे नियोजन’, अशी विचारणा करून त्यांनी पालकमंत्री आणि शहराध्यक्षांना चांगलेच फैलावर घेतले.

करवतीने तारले
नवी पेठ-पर्वती या प्रभागात मुख्यमंत्र्‍यांची सभा होती. या प्रभागात पक्षाचे तीन उमेदवार असून, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या (आरपीआय) उमेदवाराला भाजपने पुरस्कृत केले आहे. मुख्यमंत्र्‍यांच्या सभेसाठी आरपीआयच्या उमेदवाराने मोठ्या संख्येने कार्यकर्ते आणले होते. ‘करवत’ चिन्हाचे फलक घेऊन आलेले हे कार्यकर्ते भाजपच्या कार्यकर्त्यांपेक्षा अधिक होते. त्यांच्यामुळे, मैदानाचा एक कोपरा तरी किमान भरल्याची चर्चा रंगली होती.

सभेपूर्वीच खुर्च्यांची आवराआवर
न्यू इंग्लिश स्कूल, टिळक रोडवर मुख्यमंत्र्‍यांच्या सभेमुळे मोठ्या प्रमाणात खुर्च्या लावण्यात आल्या होत्या. सभेला सुरुवात होण्यापूर्वी रिकाम्या खुर्च्यांची संख्या मोठी दिसत असल्याने आयोजकांच्या सूचनेवरून मागील बाजूच्या खुर्च्यांची आवराआवर सुरू केली गेली. एखादी सभा सुरू होण्यापूर्वीच खुर्च्यांची आवराआवर करण्याची दुर्मिळ घटना उपस्थित तुटपुंज्या नागरिकांना अनुभवायला मिळाली.

निरोपच दिले नाहीत
मुख्यमंत्र्‍यांची सभा घेण्याचे निश्चित झाल्यानंतर शहर कार्यालयाकडून सर्व उमेदवारांना त्याचे निरोप दिले जाणे गरजेचे होते. दुर्दैवाने, शिस्तीचा टेंभा मिरवणाऱ्या भाजपकडून याबाबत दिरंगाई झाली. त्यामुळे, अनेक उमेदवार आपापल्या प्रभागात रॅलीमध्ये व्यस्त होते. ही संपूर्ण शहराची सभा आहे, की कसबा-पर्वतीची हेच अखेरपर्यंत सांगण्यात आले नाही. मुख्यमंत्र्‍यांची सभा असूनही शहरातील आठपैकी केवळ चारच आमदार या सभेला उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


सीएमच्या सभेला मोठी गर्दी

$
0
0

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची कोपरखळी

म. टा. प्रतिनिधी, पिंपरी

‘राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या सभेला पुण्यात प्रथमच एवढी गर्दी झाली होती, याचे आश्चर्य वाटते. त्यामुळे पुण्यात भाजपची स्थिती काय आहे, हे दिसून आले,’ अशी कोपरखळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी शनिवारी मारली.
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या निवडणुकीत प्रचारासाठी आयोजित सभांमध्ये पवार बोलत होते. शहराध्यक्ष संजोग वाघेरे आणि अन्य पदाधिकारी-उमेदवार या वेळी उपस्थित होते. ‘पुण्यात शनिवारी मुख्यमंत्र्यांची मोठी सभा झाली, असे मी ऐकले. सभेसाठी प्रचंड गर्दीही झाली होती. राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या सभेला प्रथमच एवढी गर्दी झाली होती, याचे आश्चर्य वाटते. मुख्यमंत्री आले गाडीतच बसले आणि अर्ध्या तासाने लोक जमलेच तर, तुम्ही भाषण करा असे बापटांना सुनावून निघून गेले. त्यामुळे पुण्यात भाजपची काय स्थिती आहे, हे दिसून आले,’ अशी कोपरखळी पवारांनी मारली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली. ‘सध्याचे केंद्रातील आणि राज्यातील सरकार स्मार्ट सिटीबद्दल बोलते. मात्र, आजही दिल्लीमध्ये विकासकामांबाबत चर्चा होते तेव्हा खरा विकास बघायचा असेल तर पिंपरी चिंचवडमध्ये जाऊन बघा, असे लोक म्हणतात. पुर्वी पुण्यात पाहुणे आले तर, ते पुणे दर्शन करायचे मात्र, आज पुण्यात आलेले देशविदेशातील पाहुणे पिंपरी चिंचवड शहर बघायला येतात. याला म्हणतात खरा विकास. या शहराचा विकास करताना सुरवातीला कुस्तीचे आखाडे, उद्याने, ज्येष्ठ नागरिकांसाठी विरंगुळा केंद्र, पोहण्याचे तलाव आदी सुविधा दिल्या. उद्योगनगरी म्हणून शहराचा विकास केला,’ असे पवार यांनी नमूद केले.

‘ सत्तेसाठी पळाले’
शहरात अनेकांना अजितने कार्यकर्त्यांच्या सांगण्यावरून विविध पदे दिली. त्यांना नेते बनवले. पण, आज सत्ता बदलली आणि हे सत्तेसाठी पळाले. मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांचा मध्यंतरी एक फोटो पाहिला. त्यामध्ये त्यांच्या एका बाजूला आम्ही स्थायी समिती सभापती बनविलेला होता आणि दुसऱ्या बाजूला महापौर. यांना अनेक पद दिल्यानंतर देखील केवळ सत्तेसाठी हे गेले. भोसरीची परंपरा कुस्तीची आहे. पण येथून पळपुटेच दिसले. मला माहित नव्हते की येथे कुस्तीबरोबर पळायची शर्यत देखील जोरात चालते, अशा शब्दात शरद पवार यांनी आमदार महेश लांडगे, लक्ष्मण जगताप आणि आझम पानसरे यांचे नाव न घेता टीका केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘पुणेकरांनीच गाजर दाखविले’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

‘राज्यात सत्ता स्थापन करुन अडीच वर्षे‍ झाल्यानंतरही राज्य सरकारने प्रत्येक वेळी केवळ आश्वासने दिली. सरकारच्या कारभारला नागरिक आता कंटाळले आहे. प्रत्येक वेळी फक्त घोषणा करणाऱ्या मुख्यमंत्र्यांच्या सभेला शनिवारी अनुपस्थित राहून पुणेकरांनी गाजर दाखविले,’ अशा शब्दात माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली.
भाजपचा बालेकिल्ला अशी ओळख असलेल्या कसबा विधानसभा मतदार संघात मुख्यमंत्र्यांच्या सभेला असा प्रतिसाद मिळत असेल तर, पुणेकर किती नाराज आहेत हे समजून घेतले पाहिजे, असा टोलाही पवार यांनी लगावला. सिंहगडरोड भागातील प्रभाग क्रमांक ३३ आणि ३४ मधील उमेदवारांच्या प्रचारार्थ माजी उपमुख्यमंत्री पवार यांची जाहीर सभा झाली. पक्षाच्या शहराध्यक्षा खासदार वंदना चव्हाण, महिला शहराध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्यासह पक्षाचे उमेदवार या वेळी उपस्थित होते. विकासाच्या नावाखाली केवळ आश्वासने देण्याचे धोरण राज्यात सत्ताधारी असलेल्या मंडळींनी स्वीकारले आहेत. प्रत्येक वेळी केवळ पोकळ घोषणा करत वेळ मारुन नेण्याचे काम भाजप करत आहे. त्यामुळेच मुख्यमंत्र्यांच्या जाहीर सभेला अनुपस्थित राहून पुणेकरांनी आपली नाराजी व्यक्त केली आहे, असे पवार म्हणाले. पाचवेळा ज्या मतदारसंघातून पालकमंत्री गिरीश बापट विजयी झाले, त्यांच्याच मतदारसंघात अशा पद्धतीने नागरिकांकडून नाराजी समोर येत असेल तर पालकमंत्री बापट यांच्यासह मुख्यमंत्री फडणवीस यांनी याचे ‘आत्मचिंतन’ करण्याची गरज असल्याचा सल्ला पवार यांनी दिला.

पालकमंत्री असमर्थ
पालकमंत्री म्हणून जबाबदारी स्वीकारल्यानंतर शहराच्या विकासासाठी ठोस निर्णय घ्यावे लागतात. जे पालकमंत्री पुणेकरांच्या पाण्याचे नियोजन करू शकत नाही, त्यांच्याकडून नागरिकांनी काय अपेक्षा ठेवायची. पालकमंत्री बापट यांची प्रशासनावर पकड नसल्याची टीका पवार यांनी कोथरूड येथील सभेत केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सतारीच्या झंकाराने सायंकाळ भारावली

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

गानसरस्वती किशोरी अमोणकर यांच्या भारतीय शास्त्रीय संगीतातील अलौकिक योगदानाला मानवंदना देण्यासाठी नाट्यसंपदा प्रतिष्ठानतर्फे आयोजित गानसरस्वती महोत्सवात शनिवारी रसिकांना शाकीर खान यांचे सतारवादन, पं. शौनक अभिषेकी यांचे गायन, शोभना यांचे भरतनाट्यम आणि अखेरीस डॉ. एन. राजम यांचे व्हायोलिनवादन अशी ही संगीताची परिपूर्ण मेजवानी अनुभवायला मिळाली.
डॉ. राजम यांचे अभिजात व्हायेलिनवादन म्हणजे तृप्ततेची झालरच... व्हायोलिनमधून निघणारा आणि व्याकूळ करणारा एक-एक स्वर कानात साठवून घ्यावा आणि मनात कोरून घ्यावा असाच होता. दुसऱ्या दिवसाच्या मैफलीची सुरुवात प्रसिद्ध सतारवादक उस्ताद शाकीर खान यांनी सतारीच्या झंकारातून केली. राग यमन सादर करून त्यांनी खिळवून ठेवले. तान, जोड, आलाप, झाला अशा अंगाने त्यांचे वादन बहरत गेले. सतारीच्या तारांतून अलगदपणे प्रकटणारी मिंड रसिकांच्याच मनाची तार छेडत होती. द्रुत लयीत स्वरतालाविष्कारातून झालेला समारोप संगीताची उंचीच दर्शविणारा होता. सत्यजित तळवलकर (तबला), श्रीया नूरकर (तानपुरा) यांनी त्यांना सुरेख साथसंगत केली. त्यानंतर आग्रा - जयपूर घराण्याचे प्रसिद्ध गायक पं. शौनक अभिषेकी यांनी राग पुरीयाने आपल्या गायनाला सुरुवात केली. त्यांनी झुमरा, ख्याल याबरोबरच उस्ताद हुसैन खाँसाहेबांची रचना, पारंपरिक द्रुत बंदिश व तराणा सादर केला. विलंबित एकताल, द्रुत तीनतालातील बंदिशी व आडा चौतालातील ख्याल अशा गायकीने पं. अभिषेकी यांनी आपल्या भारदस्त गायकीची अंगे उलगडली.
मंगेश मुळ्ये (तबला), सुयोग कुंडलकर (संवादिनी), राज शाह व सत्यजित बेर्डेकर (तानपुरा) यांनी साथ संगत केली. सुप्रसिद्ध भरतनाट्यम नृत्य कलाकार विदुषी शोभना यांचा नृत्याविष्कार रसिकांना सुखावणारा होता. कल्याण रागात त्यांनी कीर्तन व खमाज रागातील रचना सादर केली. रागमालिकेतील दशावतारम या रचनेने रसिकांची वाहवा मिळवली. एका विशिष्ट उंचीवर पोहचलेली नृत्याविष्काराची मैफल संपूच नये अशी रसिकांची भावना होती. अनंता आर कृष्णन, राधाकृष्णन, श्रीविद्या रामचंद्रन, कौशक चंपकेशम यांच्या साथीने शोभना यांचे नृत्य बहरले.
डॉ. एन. राजम यांच्या अप्रतिम व्हायोलिन वादनाने सांगता झाली. राजम यांची नात रागिणी शंकर हिने सहवादन केले. अजित पाठक यांनी तबल्याची साथ केली. आपल्या अनवट वादनातून राजम यांनी राग बागेश्री खुलवला आणि रात्रीच्या मंद वातावरणाला सूर्योदयाची आस लागली.

आज महोत्सवात
गानसरस्वती किशोरी अमोणकर यांची प्रातःकालीन मैफल ( सकाळी ९)
पं. प्रवीण गोडखिंडी यांचे बासरीवादन ( दु.४ पासून) पं. रघुनंदन पणशीकर यांचे गायन
ख्यातनाम गायिका विदुषी गिरीजा देवी यांचे गायन

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पॅनेल निवडून आले तरच पालिकेत पद

$
0
0

मानापमान नाट्यानंतर मुख्यमंत्र्यांचा उतारा

म. टा. प्रतिनिधी, पुणे

‘प्रभागातील सर्व उमेदवार निवडून आणले तरच पक्षातील, पालिकेतील महत्वाचे पद मिळेल,’ या शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांचे कान टोचले आहेत. तिकीटवाटपानंतर झालेल्या मानापमान नाट्यानंतर उमेदवार पाडण्याची स्पर्धा लागू नये, यासाठी मुख्यमंत्र्यांनी ही उपाययोजना केल्याचे सांगण्यात येत आहे.
पक्षातील नाराजांकडून पक्षाच्या उमेदवारांना पाडण्याचे प्रयोग होऊ नयेत, यासाठी मुख्यमंत्र्यांनी सर्वांनाच चांगली तंबी दिली आहे. महायुतीचा धर्म पाळण्याच्या स्पष्ट सूचनाही त्यांच्या असल्याचे पक्षातील ज्येष्ठ नेत्याकडून सांगण्यात आले आहे. भाजपने पुण्यात अनेकांची तिकिटे कापली, इतर पक्षातील अनेक जण भाजपमध्ये दाखल झाले. निष्ठावंतांना तिकिटे न दिल्याची टीकाही मोठ्या प्रमाणात झाली. तसेच, पक्ष सत्तेत आला तर आपल्याला चांगले पद मिळवण्यासाठी पक्षार्तंगत प्रतिस्पर्ध्याला पाडण्याचे प्रकार घडू नये, यासाठी मुख्यमंत्र्यांनी पदे मागण्यास येणाऱ्यांना चांगलीच आचारसंहिता घालून दिली आहे.
प्रभागातील चारही उमेदवार निवडून आणले तरच, सत्तेच तसेच पक्षात चांगली पदे मिळतील. चारही उमेदवार निवडून आले नाहीत किंवा भाजपमधील उमेदवारांना पाडण्यात पक्षातील उमेदवारांचा, नेत्यांचा हात असेल तर त्यांना पदे मिळणार नाहीत, अशा स्पष्ट सूचना फडणवीस यांनी दिल्याचे सूत्रांनी सांगितले. भाजपमध्ये बाहेरून पक्षात आलेल्या उमेदवारांची संख्या लक्षणीय आहे. तसेच, पक्षांर्तगत स्पर्धेतून एकमेकांचे उमेदवार पाडण्याचे प्रकार घडू शकतात. यावर उपाययोजना करण्यासाठी प्रभागातील चारही उमेदवार निवडून आणण्याच्या मुख्यमंत्र्यांच्या स्पष्ट सूचना आहेत.
पुण्यात तिकीट वाटपानंतर मोठ्या प्रमाणात मानापमान नाट्य झाले होते. काही निष्ठावंताची तिकिटे कापली गेल्याने पक्षातील नाराजीचा सूर वाढला होता. यावर उपाययोजना करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी चारही उमेदवार निवडून आणण्याचा उपाय शोधला. प्रत्येक प्रभागामध्ये एक उमेदवार मातब्बर देण्यात आला आहे. या मातब्बर उमेदवाराकडून इतर तीन उमेदवारांना निवडून आणण्यासाठी तेवढेच प्रयत्न केले पाहिजे, अशी मुख्यमंत्र्यांची अपेक्षा आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सहा हॉस्पिटलांमध्ये थाटली मतदान केंद्रे

$
0
0

निवडणूक विभागाचा अजब कारभार

म. टा. प्रतिनिधी, पुणे

महापालिका निवडणुकीच्या मतदानासाठी सहा हॉस्पिटलमध्ये मतदान केंद्र उभारण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. या निर्णयामुळे ही हॉस्पिटल २० आणि २१ फेब्रुवारीला बंद राहणार आहेत. महापालिकेकडे शहरातील हजारो मिळकती मोकळ्या असतानाही निवडणूक विभागाने हॉस्पिटलमध्येच मतदान केंद्र उभारण्याचा निर्णय घेतल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
महापालिकेच्या निवडणुकीसाठी येत्या मंगळवारी (२१ फेब्रुवारीला) मतदान होत आहे. शहरातील विविध भागात यासाठी ३,४१० मतदान केंद्रे निश्चित करण्यात आली आहेत. मतदान केंद्र उभारताना अत्यावश्यक सेवांना अडचण येऊ नये, असा निवडणूक आयोगाचा निकष आहे. मात्र त्याकडे दुर्लक्ष करून निवडणूक विभागाने मतदान केंद्र म्हणून पालिकेच्या सहा हॉस्पिटलची निवड केली आहे. त्यामध्ये गाडीखाना येथील मालती काची प्रसृतीगृह, भवानी पेठ येथील चंदू मामा सोनवणे प्रसृतीगृह, दत्तवाडी येथील आनंदीबाई गाडगीळ दवाखाना, मित्रमंडळ चौकातील शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे दवाखाना, येरवडा गंगाराम कर्णे दवाखाना आणि धायरी येथील मुरलीधर लायगुडे दवाखाना आदींचा समावेश आहे. त्यामुळे ही सर्व हॉस्पिटल दोन दिवस बंद ठेवण्याचा निर्णय प्रशासनाने घेण्यात आला आहे.
या निर्णयामुळे सर्वसामान्य नागरिकांची मोठी गैरसोय होणार आहे. राज्य सरकारने निवडणुकीसाठी शासकीय सुट्टी जाहीर केलेली असली तरी, अत्यावश्यक सेवांना मात्र कोणतीही सुट्टी नाही. अत्यावश्यक सेवांमध्ये काम करणाऱ्यांना मतदानासाठी दोन तासांची सवलत दिली जाणार आहे. मात्र, असे असताना मतदान केंद्राच्या नावाखाली आता हॉस्पिटलच बंद ठेवण्याचा घाट घालण्यात आला आहे. मतदानासाठी हॉस्पिटल बंद ठेवण्यात आल्याने या हॉस्पिटलमधील कर्मचारी, अधिकारी मात्र चांगलेच खूश झाले आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पुण्यातील प्रचारात काळी जादू

$
0
0

मटा ऑनलाइन वृत्त । पुणे

महापालिका निवडणुकांचं मतदान दोन दिवसांवर आल्यानं प्रचार शिगेला पोहोचला असून प्रतिस्पर्धी उमेदवाराला जेरीस आणण्यासाठी वाट्टेल ते मार्ग अवलंबले जात आहेत. आरोप-प्रत्यारोपांपर्यंत मर्यादित असलेला प्रचार आता काळ्या जादूपर्यंत येऊन ठेपला आहे. पुण्यात एका महिला उमेदवाराविरोधात काळी जादू केली जात असल्याचं उजेडात आल्यानं खळबळ उडाली आहे.

पुणे जिल्ह्यातील पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या प्रभाग क्र. ३ मधील भाजपच्या उमेदवार शैला मोळक यांच्याविरोधात काळ्या जादूचा प्रयोग झाला आहे. त्यांच्या घरात तसंच, जिथं-जिथं त्यांनी बूथ लावण्याची तयारी केली आहे, तिथं काळ्या बाहुल्या टाकण्यात आल्या आहेत. त्यामुळं तर्कवितर्कांना उधाण आलं आहे.

मोळक या पिंपरी-चिंचवड भाजपच्या महिला आघाडीच्या अध्यक्षा आहेत. सुरुवातीला त्यांचं तिकीट कापण्यात आलं होतं. त्यामुळं मोळक समर्थकांनी आमदार लांडगे यांच्याविरोधात निदर्शनं केली होती. मात्र, नंतर त्यांना तिकीट देण्यात आलं. आता त्या भाजपच्या अधिकृत उमेदवार असल्या तरी पक्षातील एका गटाचा त्यांना विरोध आहे. अधिकृत उमेदवार असूनही इतर तीन उमेदवार त्यांच्यासोबत प्रचार करताना दिसत नाहीत. अशा स्थितीत हे काळ्या बाहुल्यांचं प्रकरण घडल्यानं वेगळीच चर्चा सुरू झाली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वांगी, गाजर, कैरी, शेवगा स्वस्त

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

सध्या निवडणुकीची धामधूम सुरू असून मंगळवारी मतदान आहे. त्यामुळे शेतमाल बाजारात आणणे अशक्य असल्याने मार्केट यार्डात रविवारी फळभाज्यांची मोठी आवक झाली. आवक वाढल्याने लसणासह दोडका, वांगी, फ्लॉवर, कोबी, शेवगा, गाजरासह तोतापुरी कैरी स्वस्त झाली आहे. त्याशिवाय मेथी, कोथिंबीरचे दरही आवाक्यात आहेत.

मार्केट यार्डात परराज्यासह स्थानिक भागातून फळभाज्यांची मोठी आवक झाली. १७० ते १८० ट्रक फळभाज्यांची आवक झाली. परराज्यातून पंजाब, इंदूरहून मटारची ५ ते ६ ट्रक, गुजरात, कर्नाटकातून ५ ते ६ ट्रक कोबीची आवक झाली. कर्नाटकातून ५ ते ६ टेम्पोची तोतापुरी कैरीची आवक झाली. आंध्र प्रदेश, तामिळनाडूतून शेवग्याची ५ ते६ टेम्पो, कर्नाटक, गुजरातमधून हिरवी मिरचीची १४ ते १५ टेम्पोची आवक झाली आहे. राजस्थानमधून ९ ते १० ट्रक गाजराची आवक झाली आहे.

स्थानिक भागातील आल्याची साताऱ्याहून १५०० ते १६०० गोणींची आवक झाली आहे. पुणे विभागातून टोमॅटोची साडेपाच हजार पेटीची आवक झाली आहे. हिरवी मिरचीची ५ ते ६ टेम्पोची आवक झाली. फ्लॉवर आणि कोबीची प्रत्येकी १५ ते १६ टेम्पोची आवक झाली आहे. सिमला मिरची ८ ते १० टेम्पो, गाजराची ६ टेम्पोची आवक झाली. पुरंदर, वाई, सातारा भागातून मटारची ५० गोणींची आवक झाली आहे.

कांद्याची सव्वाशे ट्रक, बटाट्याची आग्रा, इंदूर, तळेगावहून ६० ट्रक तर मध्यप्रदेशातून लसणाची साडेपाच हजार गोणींची आवक झाली आहे. मेथीची सव्वा लाख तर कोथिंबीरची दोन लाख जुडीची आवक झाली आहे.

काही फळभाज्या स्वस्त झाल्या असल्या तरी सिमला मिरची, हिरवी मिरची, मटारची आवक घटल्याने त्याचे दर थोडेसे वाढले आहेत.

डाळिंबासह कलिंगडला वाढली मागणी

उन्हाच्या झळा लागल्याने आता बाजारात कलिंगड, डाळिंबाच्या फळांना मागणी वाढली आहे. बाजारात आवक ही मात्र मागणीच्या तुलनेत कमी आहे. त्यामुळे त्यांच्या दरात थोडीशी वाढ झाली आहे. कलिंगडची २५ ते ३० टेम्पोची आवक झाली असून किलोमागे दोन रुपयांनी दर वाढ झाली आहे. खरबूजाची आवक अद्यापही कमीच आहे. डाळिंबाची २० ते २५ टन एवढी आवक झाली असून त्याच्या दरात १० ते २० टक्क्यांनी वाढ झाली आहे. लिंबाची साडेचार हजार गोणींची आवक झाली. मोसंबीची ४० टन, संत्र्यांची ३० टन आवक झाली आहे. बोरांची पाचशेहून अधिक गोणीची आवक झाली. तर स्ट्रॉबेरीची सहा ते सात टन एवढी आवक झाली आहे. द्राक्षांची सातारा, तासगाव, सांगली येथून ७० ते ७५ टन एवढी आवक झाली आहे. सफरचंदाची दोन हजार पेटींची आवक झाली.

फुलांचे दर उतरले

निवडणुकांचे वातावरण, मंगळवारी मतदान त्यामुळे फूल उत्पादक शेतकऱ्यांनी रविवारी मोठ्या प्रमाणात फूल बाजारात फुले आणली. त्यामुळे आवक वाढल्याने फुलांच्या दरात घसरण आली. गेल्या आठवड्याच्या तुलनेत फुलांचे ४० टक्क्यांनी दर उतरले आहेत. मागणीत मात्र कोणतीही घट झालेली नाही. गुलछडीला १४०ते १८० रुपये असा दर मिळाला तर गुलाबाच्या १२ नगाच्या गड्डीला १० ते २० रुपये दर मिळाला.झेंडूला ६० ते१०० रुपये दर असून मोगऱ्याला एका किलोसाठी ३०० ते ५०० रुपये दर आहे.

आवक घटल्याने मासळीचे दर उतरले

सध्या निवडणुकीची धामधूम असतानाही मासळीची बाजारात आवक कमी आहे. मागणी अधिक असली, तरी आवक कमी असल्याने त्याच्या दरात पाच टक्क्यांनी घसरण झाली आहे. आंध्रहून रहूची १० टन एवढी आवक झाली आहे. खोल समुद्रातील मासळीची ७ ते ८ टन एवढी आवक झाली. तर खाडीची मासळीची ३०० ते ४०० किलो तर नदीच्या मासळीची ३०० ते ४०० किलोची आवक झाली आहे. मासळीला मागणी अधिक नसली तरी चिकनला अधिक मागणी झाली आहे. मागणीत २० टक्क्यांनी वाढ झाल्याचे चिकनच्या विक्रेत्यांनी सांगितले.

गहू, ज्वारीत मंदी, तांदळाची तेजी कायम

गहू, ज्वारीची नव्याने आवक होऊ लागल्याने त्याच्या दरात क्विंटलमागे प्रत्येकी १०० रुपयांची घट झाली आहे. तर, तांदळाची अपेक्षित आवक घटल्याने त्याच्या दरातील तेजी अद्यापही कायम आहे.

मार्केट यार्डातील घाऊक भुसार बाजारात नोटाबंदीनंतर आता निवडणुकीचा थोडासा परिणाम दिसून आला. त्यामुळे ग्राहकांकडून फारशी मागणी नाही. खाद्यतेल, पोहे, रवा, आटा, मैदा, मिरची, डाळी, कडधान्ये, मुरमुरे, गोटा खोबरे या वस्तूंच्या दरात कोणताही बदल झालेला नाही. त्यांचे सर्व दर स्थिर आहेत.

गव्हासह ज्वारीची नव्याने मोठ्या प्रमाणात आवक होण्यास सुरुवात झाली आहे. आवक फारशी होत नसली तरी त्याचा परिणाम म्हणून गव्हासह ज्वारीच्या दरात क्विंटलमागे प्रत्येकी १०० रुपयांनी दर उतरले आहेत. तूरडाळीचे उत्पादन वाढल्याने क्विंटलमागे २०० रुपयांनी दर उतरले आहेत. त्यामुळे तूरडाळ पुन्हा ७० रुपयांच्या आत त्याचे दर आले आहेत. नारळाची आवक वाढल्याने शेकड्यामागे ५० रुपयांनी दर उतरले आहेत. अन्य डाळींचे दर स्थिर आहेत. परंतु, बेसनाच्या दरात थोडीशी घसरण झाल्याचे व्यापारी सांगतात.

तांदळाची आवक गेल्या काही महिन्यांपासून घटत आहे. आवक वाढणे अपेक्षित असताना सुद्धा तांदळाची आवक न झाल्याने त्याचे दर तेजीत आहेत. त्यामुळे दरातील तेजी कायम आहे.

वस्तूंचे दर (क्विंटलमध्ये)

गहूः

लोकवान मिडियम २३५० ते २४५०

लोकवान बेस्ट २५०० ते २७००

लोकवान एक्स्ट्रा २८०० ते ३०००

ज्वारीः

गावरान बेस्ट ३२५० ते ३४००

मिडियम २७०० ते २८००

मिडियम बेस्ट ३००० ते ३२००

नारळः (शेकडा)

नवा माल ११२५ ते ११५०

पालखोल १३०० ते १४००

मद्रास २३०० ते २५००

कवठासह रताळी बाजारात

महाशिवरात्रीच्या उपवासासाठी गुलटेकडी मार्केट यार्डात कवठासह रताळ्यांची बाजारात आवक झाली आहे. निवडणुकीच्या वातावरणाचा कवठांच्या विक्रीला फटका बसला असून फारशी मागणी नसल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.

‘पाथर्डी, औरंगाबाद, बीड येथून सुमारे १००० ते १२०० पोती कवठांची आवक रविवारी बाजारात आवक झाली. दोन दिवस ही आवक सुरू राहील. आणखी आवक वाढण्याची शक्यता आहे. दुष्काळामुळे या वर्षी आवक कमी झाली आहे. तरीही, शेकड्याला २०० ते ३०० रुपये असा दर मिळाला आहे. त्यात सध्या निवडणुकांमुळे मागणी नसल्याने त्याचा फटका आम्हाला बसत आहे. आवक वाढली नाही, तर जादा दर मिळू शकतात. पण, आवक वाढल्यास दर खाली येतील,’ अशी शक्यता पाथर्डी तालुक्यातील कोरडगाव येथील शेतकरी दादा करंजावणे यांनी व्यक्त केली.

रताळ्याचीदेखील कर्नाटक, कराडमधून आवक झाली आहे. कर्नाटकच्या रताळ्याच्या १० किलोला १२० ते १३० रुपये, तर कराडच्या रताळ्यास १६० ते १८० रुपये दर मिळाला आहे. दोन्ही मिळून पाचशे ते सहाशे पोतींची बाजारात आवक झाली आहे. महाशिवरात्रीनिमित्त रताळ्यालादेखील मागणी होऊ लागल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले.

रामफळाची आवक बाजारात

बाजारात पुणे जिल्ह्यातील भागातून रामफळाची दोन टन एवढी आवक झाली आहे. त्याच्या एका किलोसाठी ४० ते १५० रुपये दर मिळाला आहे. रामफळाला सध्या गोव्यातून अधिक मागणी आहे. त्या पाठोपाठ मुंबई आणि पुण्यातील ज्यूस विक्रेत्यांसह फळ विक्रेत्यांकडून मागणी होत आहे.

लसणाची फोडणी झाली स्वस्त

प्रत्येक भाज्यांमध्ये फोडणीला टाकण्यात येणाऱ्या लसणाची फोडणी आता स्वस्त झाली आहे. मध्य प्रदेशातून मोठ्या प्रमाणात लसणाची आवक झाल्याने त्याचे दर कोसळले आहे. परिणामी, त्याचा फटका शेतकऱ्यांना बसण्याची चिन्हे आहेत. गेल्या आठवड्याच्या तुलनेत १० किलोमागे सुमारे ३०० रुपयांची घट रविवारी झाली आहे.

मध्य प्रदेशातून लसणाची साडेपाच हजार गोणींची आवक झाली. घाऊक बाजारात १० किलोला २०० ते ६०० रुपये दर मिळाला आहे. गेल्या आठवड्यात ४०० ते ९०० रुपये दर होता. आवक वाढल्याने त्याच्या दरात घट होत आहे. दर कोसळण्याच्या भीतीने शेतकरी मोठ्या प्रमाणात लसूण बाजारात आणत आहेत. या वर्षी गेल्या वर्षीच्या तुलनेत मध्य प्रदेशात लसणाचे लागवडीचे क्षेत्र दीड ते दोन टक्क्यांनी वाढले आहे. त्यामुळे आवक वाढण्यास मदत झाली आहे, अशी माहिती मार्केट यार्डातील लसणाचे व्यापारी विलास रायकर यांनी दिली.

सध्या लसणाला पुण्यासह शहरी ग्रामीण भागातून मागणी होत आहे. फोडणी स्वस्त झाल्याने दक्षिण भारतातातून देखील मागणी वाढली आहे. बाजारात सध्या येणारा लसूण ओला आहे. त्यामुळे त्याची निर्यात करता येत नाही. ओल्या लसणाचे वजन अधिक भरत असले, तरी बाजारात सुकलेला लसूण येत नाही तोपर्यंत निर्यात सुरू होणार नाही, अशी शक्यता व्यापारी व्यक्त करीत आहेत. सध्या उन्हाचा चटका वाढत आहे. त्यामुळे लसूण सुकण्यास मदत होणार आहे. दुसरीकडे त्याचे दर कमी मिळत आहेत. लसणाचा माल जागेवर पडून राहिल्यास गोणीचे वजन घटत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना दर कमी मिळणे आणि वजन कमी भरण्याचा दोन्ही प्रकारे तोटा सहन करावा लागत असल्याने त्याचा फटका बसत आहे, असे रायकर यांनी स्पष्ट केले.

राजस्थानातून लसणाची आवक

मध्य प्रदेशानंतर आता राजस्थान येथून लसणाची आवक होण्यास सुरुवात होण्याची शक्यता आहे. सध्या राजस्थानात लसूण काढणीचे सुरू आहे. त्यामुळे अल्प प्रमाणात आवक सुरू आहे. येत्या काही दिवसांत आवक वाढण्याची शक्यता आहे. दीड ते दोन हजार गोणींची आवक होण्याची शक्यता आहे. मध्य प्रदेश, राजस्थान दोन्ही ठिकाणची आवक वाढल्यास दर वाढतील की घटतील अशी शंका व्यापाऱ्यांना येऊ लागली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


नाशिकच्या कामाचा जनतेवर प्रभाव

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

‘राज्यातले दोन सत्ताधारी पक्ष एकमेकांमध्येच भांडत आहेत. त्यांच्या भांडणात जनतेला रस उरलेला नाही. याउलट महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने नाशिकमध्ये करून दाखवलेल्या कामाचा जनतेवर प्रभाव पडलेला आहे. त्यामुळे यंदाही सक्षम पर्याय म्हणून महाराष्ट्र नवनिर्माण सेना लक्षणीय यश मिळवेल,’ असा दावा पक्षाच्या शहराध्यक्षांनी केला आहे.

गेल्या तीन चार दिवसांपासून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह आहे. पक्षप्रमुख राज ठाकरे यांच्या सभेनंतर पक्षाला नवचैतन्य मिळाले आहे. प्रभाग मोठा असला, तरी कार्यकर्त्यांनी, पदाधिकाऱ्यांनी प्रभाग पिंजून काढत सर्व मतदारांपर्यंत पोहोचण्यात यश मिळवले आहे. त्यातच राज यांच्या पॉवर पॉईंट प्रेझेंटेशनच्या सभेमुळेही वातावरण बदलल्याचा फायदा पक्षाला मिळेल, अशी भावना मनसैनिक व्यक्त करत आहेत.

युती तुटल्यानंतर गेले काही दिवस सत्ताधारी शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष एकमेकांवर चिखलफेक करत आहेत. त्यामुळे ही निवडणूक या दोन पक्षांच्या भांडणांमुळेच गाजते आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेना मात्र, त्यांच्या नगरसेवकांनी पुण्यासह नाशिकमध्ये केलेल्या विकासकामांचे सादरीकरण करत आहे. आश्वासने देणाऱ्यांपेक्षा ज्यांनी करून दाखवले अशा मनसेला साथ देण्याचे आवाहन पक्षाकडून केले जात आहे.

यंदाच्या निवडणुकीसाठी करण्यात आलेले प्रभाग प्रचंड मोठे आहेत. मात्र, योग्य नियोजन करत कार्यकर्त्यांनी पदयात्रा, वैयक्तिक गाठी-भेटी, पत्रके, अहवाल यांच्या माध्यमातून सर्वांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला आहे. गेल्या पाच वर्षांत मनसेने काय केले, नाशिकमध्ये काय केले, याची माहिती जनतेला झाली आहे. शिवसेना आणि भाजपमधील भांडणाला जनता कंटाळली आहे. मनसेबाबत नागरिकांना विश्वास वाटत असून तो ते मतपेटीतून व्यक्त करतील, असे पक्षाचे शहराध्यक्ष हेमंत संभूस यांनी सांगितले.

गेल्या काही दिवसांपासून मनसेच्या कार्यकर्त्यांनी प्रभाग पिंजून काढले आहेत. घरोघरी मनसेच्या कार्यअहवालाची माहिती पोहोचली आहे. राज ठाकरे यांच्या सभेमुळे वातावरण बदलले आहे. दोन सत्ताधाऱ्यांच्या भांडणाला वैतागलेल्या जनतेला मनसे हा सक्षम पर्याय वाटत आहे. त्यामुळे मनसेला निश्चितच मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळेल, असे शहराध्यक्ष अजय शिंदे यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘राष्ट्रवादीला बहुमत मिळणारच’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

‘मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शनिवारी फ्लॉप झालेल्या जाहीर सभेतून पुणेकरांनी आपला कौल दिलेला आहे. महापालिकेत सत्ताधारी म्हणून काम करताना गेली दहा वर्षे शहराच्या विकासासाठी जी कामे करून हातभार लावला, त्याच्या जोरावर या निवडणुकीत पुणेकर राष्ट्रवादी काँग्रेसला स्पष्ट बहुमत देतील,’ असा विश्वास राष्ट्रवादीच्या शहराध्यक्षा वंदना चव्हाण यांनी रविवारी व्यक्त केला.

महापालिका निवडणुकीच्या प्रचाराची सांगता रविवारी झाली. यानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत चव्हाण यांनी राष्ट्रवादीला स्पष्ट बहुमत मिळेल, असा दावा केला. महापौर प्रशांत जगताप, राष्ट्रवादीचे प्रवक्ते अंकुश काकडे, उपाध्यक्ष अशोक राठी या वेळी उपस्थित होते. महापालिकेच्या निवडणुकीला सामोरे जाताना गेल्या दहा दिवसांच्या कालावधीत निवडणूक प्रचारात राष्ट्रवादी पक्ष आघाडीवर राहिला आहे. सोशल मीडिया, शहर विकासाचा जाहीरनामा, कोपरासभा, पथनाट्ये, याबरोबरच एलइडी‌ व्हॅन सारख्या माध्यमांचा चांगला उपयोग करून घेतल्याने पक्षाने प्रचारात आघाडी घेतल्याचे चित्र पाहायला मिळाले. महापालिकेत सत्ताधारी म्हणून काम करताना गेल्या दहा वर्षात शहराच्या विकासासाठी जी कामे केली, त्याचा लेखाजोखा नागरिकांसमोर मांडून आमची भूमिका मतदारांपर्यंत पोहचविण्यात आम्ही यशस्वी झालो आहे.

निवडणुकीचा प्रचार करताना कोणावरही खालच्या पातळीची टीका न करता; तसेच कोणाच्याही भावना न दुखावता संपूर्ण प्रचार करण्यात आला. पक्षाच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ काढण्यात आलेल्या रॅली, कोपरा सभा याबरोबरच सार्वजनिक सभांच्या माध्यमातून प्रचार करताना कोणत्याही हीन पातळीचा प्रचार पक्षाने केला नाही. या उलट भारतीय जनात पक्षाकडून आधी गुंडांना पक्षात प्रवेश देत आणि नंतर त्यांच्या मंत्र्यांकडून मतदारांवर दबावाची भाषा वापरत प्रचार केला गेला. पुण्यात प्रचारासाठी आलेल्या भाजपच्या केंद्रीय मंत्र्यांनी शहराच्या इतिहासाचा अभ्यास न करता थेट ‘मुळा, मुठा’ ही काय नदीची नावे आहेत, ही नावे बदला अशी सूचना करत पुणेकरांचा स्वा‌भिमान दुखावला. जाहीरातीलच्या नावाखाली कोट्यवधी रुपये भाजपने खर्च केले, मात्र हा पैसा आला कुठून याचा काहीही खुलासा त्यांनी केला नाही. मात्र पुणेकर सुज्ञ असून त्यांना चांगले वाईट नक्कीच कळते. गेल्या दहा वर्षात राष्ट्रवादीने पुणेकरांच्या हिताचे महत्त्वपूर्ण निर्णय घेतले. या विकासाच्या जोरावरच पुणेकर नागरिक आम्हाला स्पष्ट बहुमत देतील असा ठाम विश्वास खासदार चव्हाण यांनी व्यक्त केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘काँग्रेसला मिळणार चाळीस जागा’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

काँग्रेस पक्षाने राष्ट्रवादी काँग्रेससोबत आघाडी करून ९६ जागा लढवल्या आहेत. त्यातील नऊ उमेदवार हे पुरस्कृत असून या निवडणुकीत काँग्रेसला ४० जागा मिळतील, असा दावा काँग्रेसचे शहराध्यक्ष रमेश बागवे यांनी केला.

दरम्यान, भारतीय जनता पक्षाने (भाजप) या निवडणुकीत २२०० कोटी रुपयांच्या जाहिराती दिल्या असून नोटाबंदी असताना हे पैसे आले कोठून, याची चौकशी झाली पाहिजे, अशी मागणीही बागवे यांनी या वेळी केली. काँग्रेसतर्फे प्रचाराच्या सांगता प्रसंगी पत्रकार परिषदेत प्रचारातील रणनीतीची माहिती देत आढावा घेण्यात आला. या वेळी माजी आमदार मोहन जोशी, दिप्ती चवधरी, अजित दरेकर, गोपाळ तिवारी, रमेश अय्यर, काका धर्मावत उपस्थित होते.

भाजपच्या बालेकिल्ल्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची शनिवारी सभा होती. या सभेला नागरिकांनी पाठ फिरवल्याने मुख्यमंत्र्यांना सभा रद्द करावी लागली. मतदार मतदानापूर्वी ४८ तासांच्या कालावधीत कोणाला मतदान करायचे, याचा निर्णय घेतात. सभेला पाठ फिरवून नागरिकांनी निर्णय घेत भाजपला धक्का दिला आहे, अशी टीका बागवे यांनी केली.

काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांनी १० फेब्रुवारी रोजी संविधान वाचवण्यासाठी भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुणे स्टेशन येथील पुतळ्याला अभिवादन करून शपथ घेतली. त्याच दिवशी माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्या हस्ते प्रचाराचा नारळ वाढवण्यात आला. त्यानंतर पक्षाचा जाहीरनाम्याचे प्रकाश, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, अशोक चव्हाण, विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, ज्येष्ठ अभिनेते रझा मुराद यांच्या सभांचा झंझावत शहरात झाला, असे बागवे म्हणाले. काँग्रेसने प्रचार काळात कोपरा सभा, गाठी भेटी घेत शहरातील मतदारांना मतदान करण्याचे आवाहन केले आहे.

चव्हाण यांनीही व्यापारी मेळाव्यात शिवसेना आणि भाजपमध्ये सुरू असलेल्या भांडणाला दोन बोक्यांच्या भांडणाची उपमा देत टीका केली होती. लोणी खाण्यासाठी हे बोके भांडत आहेत. भाजपने सामाजिक सलोखा उद्धवस्त केला आहे, असे बागवे म्हणाले. भाजपने पुणेकरांची दिशाभूल केली आहे. भाजपचे केंद्रातील मंत्री पुण्यात येऊन विकासाबाबत भाष्यही करत नाहीत. केवळ काँग्रेसवर टीका करण्यात त्यांचा वेळ जातो, अशी टीका गोपाळ तिवारी यांनी केली.

काँग्रेस-राष्ट्रवादीचा एकत्र प्रचार

पुण्यात काँग्रेस-राष्ट्रवादीच्या ज्येष्ठ नेत्यांची एकत्र जाहीर सभा झाली नसल्याबाबत बागवे म्हणाले, ‘दोन्ही पक्षांच्या नेत्यांना राज्यभर प्रचारदौरे होते. त्यांच्या एकत्रित वेळा जुळून आल्या नसल्याने जाहीर सभा होऊ शकली नाही. मात्र, राष्ट्रवादीच्या शहराध्यक्षा वंदना चव्हाण, प्रवक्ते अंकुश काकडे यांच्यासमवेत काँग्रेसने एकत्र प्रचार करत उमेदवारांना निवडून आणण्यासाठी मतदारांना आवाहन केले आहे.’

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पुणेकरांची शिवसेनेला पसंती

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

‘भारतीय जनता पक्षाने शहरासाठी काहीही केलेले नाही. केंद्र व राज्याकडून कोणताही मोठा प्रकल्प आणला नाही. भाजपचे शहरातील आठ आमदार, एक खासदार, राज्य सरकारमधील दोन मंत्री आणि एक केंद्रीय मंत्री हे निष्क्रिय राहिले. तर, दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि काँग्रेसच्या २५ वर्षाच्या कारभाराला पुणेकर कंटाळले आहेत. त्यामुळे शिवसेनेच्या स्वच्छ चारित्र्याच्या, दूरदृष्टी, जिद्द असणाऱ्या आणि पारदर्शी कारभार करणाऱ्या उमेदवारांना पुणेकरांची पसंती राहील,’ असा दावा शिवसेना शहरप्रमुख विनायक निम्हण यांनी रविवारी केला.

राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसने पुणे शहराचा विकास करण्याऐवजी ते स्वतःचा विकास करण्यात गुंतले आहेत. तसेच, त्यांच्यामध्ये दूरदृष्टीचा अभाव आहे. त्यामुळे पुणेकर त्यांना निश्चित दूर ठेवतील. शिवाय भाजप पक्ष गुंडांचा पक्ष म्हणून ओळखला जाऊ लागला आहे. त्यामुळेच जनता त्यांच्यापासून दूर गेली आहे. शिवसेना हा एकमेव पक्ष दूरदृष्टीने पारदर्शीं कारभार करणारा पक्ष आहे. हा एकमेव पर्याय पुणेकरांपुढे उपलब्ध आहे, असे निम्हण यांनी सांगितले.

शिवसेनेचा वचननामा येत्या पाच वर्षांत १०० टके अंमलात आणला जाणार आहे. त्याद्वारे शिवसेना शहराला खऱ्या अर्थाने नागरी समस्या मुक्त व सुखी शहर करेल. शिवसेना हा केवळ निवडणुकीपुरता कार्यरत राहणारा पक्ष नसून नागरिकांच्या प्रश्नांसाठी सातत्याने आंदोलने करून, त्यांना मिळवून देणारा एकमेव पक्ष आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे पुणे महापालिकेवर भगवा फडकविण्याचे स्वप्न पुणेकर पूर्ण करतील, अशी अपेक्षा निम्हण यांनी व्यक्त केली.

हिंदूंचे संघटन करणारा आणि हिंदूंचे हित जपणारा शिवसेना हा एकमेव पक्ष उरला आहे, ही भावनादेखील पुणेकरांना शिवसेनेला मतदान करण्यासाठी उद्युक्त करेल. पुणेकरांचे सगळे पक्ष अजमावून झाले, आता या वेळेस शिवसेनेला संधी द्या, असे आवाहनही त्यांनी केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भाजपला मिळणार निर्विवाद बहुमत

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

‘महापालिकेतील सत्ताधारी राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या कारभाराला पुणेकर वैतागले असून, पुण्याच्या निवडणुकीत ते भारतीय जनता पक्षाला संधी देऊन निश्चित परिवर्तन घडवून आणतील,’ असा ठाम विश्वास पालकमंत्री गिरीश बापट यांनी रविवारी व्यक्त केला. पुणे महापालिकेत भाजपला निर्विवाद बहुमत मिळेल आणि एकहाती सत्ता स्थापन करता येईल, असा दावा बापट यांनी केला.

महापालिका निवडणुकीसाठी पक्षाच्या संपूर्ण प्रचार यंत्रणेचा आढावा घेतानाच बापट यांनी शहराच्या संपूर्ण विकासाकरिता भाजप कटिबद्ध असेल, अशी ग्वाही दिली. लोकसभा, विधानसभा, नगरपालिका निवडणुकांनंतर सलग चौथ्यांदा महापालिकेच्या निवडणुकीतही मतदार भाजपला आशिर्वाद देतील, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

सातत्याने सत्ता हातात असूनही शहरातील पायाभूत सुविधांच्या विकासाकरिता राष्ट्रवादीने कोणतेही प्रयत्न केले नाहीत. त्यामुळे, पुण्याचा विकास खुंटला. मेट्रोसारख्या महत्त्वाचा प्रकल्पालाही आघाडीने कधीच चालना दिली नाही, असा आरोप बापट यांनी केला. आगामी काही वर्षांत शहराच्या सर्वच भागांत मेट्रोचे जाळे तयार केले जाणार आहे. निगडी, कात्रज, हडपसर, सिंहगड रोड असे शहरातील सर्व महत्त्वाचे भाग मेट्रोने जोडले जातील, असे त्यांनी सांगितले.

शहराच्या सर्व भागांत २४ तास पाणीपुरवठा करण्याचे भाजपचे प्रमुख उद्दिष्ट असेल. तसेच, सांडपाण्यावर प्रक्रिया करून शेतीसाठी वाढीव पाणी उपलब्ध व्हावे, यासाठी सरकारकडून पालिकेला सर्व मदत केली जाईल. राजकीय इच्छाशक्तीअभावी पुणेकरांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करण्याची सवय सत्ताधाऱ्यांना लागली होती. भाजपच्या हातात पालिकेची सत्ता आल्यानंतर त्यामध्ये निश्चित बदल दिसून येईल, असे त्यांनी नमूद केले.

शहराच्या बहुतेक सर्व प्रभागांमध्ये ‘हजारी यंत्रणा’ कार्यान्वित करण्यात पक्षाला यश आले. त्याचबरोबर, पक्षाचा संपूर्ण शहराचा जाहीरनामा आणि प्रभागनिहाय जाहीरनामा शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवण्यात आला. केंद्र आणि राज्य सरकारच्या बहुतांश योजना महापालिकेमार्फत राबवल्या जात असल्याने भाजपला साथ देण्याची मतदारांची भूमिका असल्याचे चित्र दिसून येत आहे, असा दावा त्यांनी केला. झोपडपट्टी पुनर्वनसाची नवी नियमावली लवकरच प्रसिद्धी केली जाईल, असेही त्यांनी सांगितले.

कारभारी बदला

भारतीय जनता पक्षाकडून महापालिकेतील कारभारी बदला, अशा जोरदार जाहिराती केल्या जात आहेत. त्यामुळे, कारभारी नक्की कोण असेल, अशी विचारणा केली असता ‘राष्ट्रवादी-काँग्रेसला बदला आणि भाजपला आणा’ असा त्याचा अर्थ होतो, असे स्पष्टीकरण पालकमंत्री गिरीश बापट यांनी दिले. तर, भाजपमध्ये एक व्यक्ती कोणताही निर्णय घेत नाही. कोणाच्या नावावर किंवा व्यक्तीवर पक्ष चालत नाही. सामूहिक नेतृत्वच योग्य निर्णय घेईल, असा खुलासा शहराध्यक्ष योगेश गोगावले यांनी केला.


भाजपला अनुकूल वातावरण

शहरातील वातावरण पक्षाला सर्वाधिक अनुकूल असल्याचा दावा खासदार संजय काकडे यांनी केला. शहरातील २१ प्रभागांत सर्वांत चांगली संधी असून, या ठिकाणांहून पक्षाचे सर्वाधिक नगरसेवक निवडून येतील. त्याखालोखाल १० प्रभागांमध्ये कडवी झुंज अपेक्षित असून, भाजपला चांगले यश मिळेल. काही मोजक्याच प्रभागात आम्ही थोडे मागे पडलो असून, तेथे अधिक ताकद लावण्यात येईल, असे सांगत पक्षाच्या ९० जागा निवडून येतील, याचा पुनरूच्चार काकडे यांनी केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images