Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

नयनाच्या पतीची साक्ष विश्वासार्ह

$
0
0

विशेष सरकारी वकिलांची कोर्टाला माहिती

म. टा. प्रतिनिधी, पुणे

नयना पुजारीच्या डोक्याच्या उजव्या बाजूला मार लागला असला तरी, तिची ओळख पटू शकत होती. तिचे कपडे, मंगळसूत्र, जोडव्यांवरून पती अभिजित पुजारी यांनी तो मृतदेह तिचाच असल्याचे ओळखले असून, त्यांची साक्ष विश्वासार्ह असल्याची माहिती सरकार पक्षातर्फे सोमवारी कोर्टात युक्तिवादादरम्यान देण्यात आली. विशेष न्यायाधीश एल. एल. येनकर यांच्या कोर्टात ही सुनावणी सुरू आहे.
सॉफ्टवेअर इंजिनीअर नयना पुजारीचे अपहरण करून तिच्यावर सामूहिक बलात्कार करण्यात आला. त्यानंतर तिचा खून करण्यात आला. या खटल्याची न्यायालयात सुनावणी सुरू असून सरकार पक्षातर्फे अंतिम युक्तिवाद सुरू आहे. विशेष सरकारी वकील अॅड. हर्षद निंबाळकर यांच्यातर्फे युक्तिवाद करण्यात येत आहे.
‘अभिजित पुजारी यांनी साक्षीमध्ये नयनाचा दिनक्रम सांगितला. घटनेच्या दिवशी नयना रात्री आठ वाजता कंपनीतून बाहेर पडल्यावर काय झाले, याची माहिती दिल्याचे अॅड. निंबाळकर यांनी कोर्टात सांगितले. नयनाचा शोध घेतल्यानंतर दुसऱ्या दिवशी पहाटे अडीच वाजता त्यांनी येरवडा पोलिस ठाण्यात ती हरविल्याची तक्रार दिली होती. त्यानंतर सकाळी आणि दुसऱ्या दिवशी नयनाच्या खात्यातून एटीएममधून पैसे काढल्याची माहिती येरवडा पोलिसांनी दिली. खेड येथील जरेवाडी येथे मृतदेह सापडला असल्याची माहिती मिळाल्यावर अभिजित पुजारी आपल्या नातेवाइकांसह तेथे गेले. तेथील शवागारात त्यांनी नयनाचा मृतदेह ओळखला. आरोपीकडून पोलिसांनी जप्त केलेल्या सर्व वस्तू ओळखल्या. तिच्या पर्समध्ये तिचे आयकार्ड, तिचा एक फोटो आणि त्यांचा एकत्रित फोटो आणि घड्याळ होते. या वस्तूही त्यांनी ओळखल्या. त्यावरून नयनाचे पती सर्वांत योग्य साक्षीदार ठरतात,’ असा युक्तिवाद अॅड. निंबाळकर यांनी केला.
आरोपीने लपवून ठेवलेली एक बांगडीही पोलिसांनी नंतर जप्त केली. तीही अभिजित यांनी ओळखली. उलटतपासणीत बचाव पक्षालाही काहीही उत्तर मिळविता आले नाही की, ज्यातून त्यांची साक्ष विश्वासार्ह ठरू नये, असे अॅड. निंबाळकर म्हणाले. पुढील युक्तिवाद १७ फेब्रुवारी रोजी होणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


शेकडा पाच महिला ‘पीएमडीडी’ने ग्रस्त

$
0
0

प्रभाव वाढल्यास आत्महत्या करण्यास प्रवृत्त

म. टा. प्रतिनिधी, पुणे

मासिक पाळी येण्यापूर्वी ‘सेक्स हार्मोन्स’मध्ये होणाऱ्या चढउतारांमुळे (प्रीमेन्स्ट्रुअल डायस्फोरिक डिसऑर्डर) महिलांना नैराश्य, दु:ख, मानसिक आदी स्थितींमधून जावे लागते. या स्थितींचा प्रभाव वाढल्यास महिला आत्महत्या करण्यासाठी प्रवृत्त होतात. जगभरातील प्रति १०० महिलांपैकी पाच महिलांना या स्थितीतून जावे लागत असल्याचे नुकतेच एका संशोधनातून समोर आले आहे.
राष्ट्रीय कोशिका विज्ञान केंद्राच्या (एनसीसीएस) संशोधक नीलिमा दुबे यांनी हे संशोधन केले असून, विविध देशांमधील आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये त्याचे सादरीकरण केले आहे. ‘एनसीसीएस’तर्फे आयोजित पत्रकार परिषदेत दुबे यांनी संशोधनाची माहिती दिली. त्यांनी २०११ ते २०१६ दरम्यान अमेरिकेतील वॉशिंग्टनमध्ये संशोधन पूर्ण केले. त्या दरम्यान श्रीमती दुबे यांनी ४० सर्वसाधारण आणि ४० संबंधित आजार असणाऱ्या महिलांचा सुमारे वर्षभर अभ्यास केला.
‘प्रीमेन्स्ट्रुअल डायस्फोरिक डिसऑर्डरमुळे (पीएमडीडी) महिलांना मानसिक तणाव आणि नैराश्य येते. तसेच, या काळात महिला सर्वाधिक दु:खी असतात. या महिलांची मासिक पाळी सुरू होण्यापूर्वी त्यांच्यात अॅस्ट्रोजन आणि प्रोजेस्टेरॉन या दोन ‘सेक्स हार्मोन्स’चे चढउतार होत असतात. त्यामुळे महिलांची शक्ती या बदलांना सामोरे जाताना कमी पडते. त्यामुळे त्यांच्यात नैराश्य, दु:ख, मानसिक आदी स्थितींचा प्रभाव अधिक असल्याचे जाणवते त्यामुळे महिला नैराश्याच्या इतक्या गर्तेत जातात की त्यांना आत्महत्या करावीशी वाटते,’ असे दुबे यांनी नमूद केले.
औषधांच्या वापरामुळे ‘सेक्स हार्मोन्स’मुळे मानसिक स्थितीमध्ये होणारे बदल थांबवता येतात. मात्र, औषधांचा वापर थांबल्यावर ते बदल पुन्हा सक्रिय होतात. त्यामुळे महिलांना नैराश्य, दु:ख, चिडचिड अशा स्थितीतून जावे लागते. या परिस्थितीत महिलांना सामान्य आयुष्य जगावेसे वाटत नाही. त्यामुळे त्यांच्यात आरोग्याच्या विविध समस्या निर्माण होऊ शकतात. हा आजार असणाऱ्या महिला इतर महिलांच्या तुलनेत सेक्स हार्मोन्समुळे होणाऱ्या बदलांना सहज सहन करू शकत नाहीत, असे निरीक्षणही दुबे यांनी नोंदवले.

‘औषध निर्माण करणे शक्य’
संशोधनाच्या कालावधीत ४० सर्वसाधारण आणि ४० आजार असणाऱ्या महिलांचा वर्षभर अभ्यास केला. त्यात आजारी महिलांचे रक्त काढून प्रयोगशाळेत तपासणी करण्यात आली. रक्तातील पेशींवर प्रक्रिया करण्यात आली. त्यानंतर त्याचे रूपांतर न्यूरॉनमध्ये करून विविध चाचण्या करण्यात आल्या, दुबे यांनी सांगितले. या संशोधनामुळे वरील मानसिक स्थितीवरील औषधचा शोध लावणे शक्य होईल, असेही दुबे यांनी नमूद केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ऊस शेतीसाठी राज्यवृक्षांची कत्तल

$
0
0

महाराष्ट्र राज्य शेती महामंडळाच्या रत्नपुरी मळ्यातील प्रकार

संतराम घुमटकर, बारामती

ऊस शेती करण्याच्या हव्यासापोटी महाराष्ट्र राज्य शेती महामंडळाच्या अंतर्गत रत्नपुरी मळ्यातील जवळपास २५० हून अधिक राज्यवृक्षांची (आंब्याच्या झाडांची) कत्तल झाल्याचा प्रकार नुकताच उघडकीस आला आहे. राज्यवृक्षांच्या झालेल्या प्रकाराबाबत अधिकाऱ्यांनी कानावर हात ठेवले आहेत.
महाराष्ट्र राज्य शेती महामंडळाच्या अखत्यारीत ७ जिल्ह्यांत १४ स्वमालकीचे ऊस मळे असून, एकूण ८४ हजार एकर शेतजमीन होती. त्यांपैकी खंडकऱ्यांना वाटून ५२ हजार एकर क्षेत्र शिल्लक असल्याचे प्रशासनाने ‘मटा’ला सांगितले आहे. रत्नपुरी मळ्यातील गट क्रमांक ७५५/७५६ येथे १९८४ मध्ये हापूस आंब्याची लागवड करण्यात आली होती. त्यानंतर २००७ पासून स्थानिक व्यवस्थापक आणि अधिकाऱ्यांनी तांत्रिक बाबी पुढे करून वृक्षांना पाणी देणे बंद केले. त्यामुळे पहिली तीन ते चार वर्षे आंबा उत्पादनात कोणताही फरक पडला नसल्याचे स्थानिक कर्मचाऱ्यांनी सांगितले. आर्थिक हव्यासापोटी झाडांच्या नंबर टाकण्याच्या नावाखाली फांद्यावर साल काढून मोठ्या प्रमाणात वृक्षांची हानी होईल असे कृत्य केले. त्यामुळे अनेक वृक्ष निकामी झाले आहेत. प्रत्यक्षात मात्र, एकही झाड वाळून गेले नसल्याचा दावा पर्यावरण तज्ञांनी केला आहे.

रत्नपुरी मळ्यातील वृक्ष तोडीसंदर्भात परवानगी दिली आहे.
श्रीकांत पाटील, तहसीलदार, इंदापूर.

राज्यवृक्षांच्या इतक्या मोठ्या प्रमाणातील तोडणीस परवनागी देणे चुकीचे आहे. तत्काळ ही वृक्ष तोड थांबवावी, दोषींवर कठोर कारवाई करावी आणि संबंधित क्षेत्र अभयारण्य म्हणून घोषित करावे.
– डॉ. महेश गायकवाड, पर्यावरण तज्ञ

शिंदीची झाडे पेटवली.
ऊस लागवडीसाठी मोठ्या प्रमाणत क्षेत्र निर्माण करण्याच्या हेतूने शिंदीची झाडे तोडून ती जाळण्यात आल्याचे चित्र तालुक्यात पाहण्यास मिळत आहे.


मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शिवसेनेची डरकाळी फक्त गुहेतच

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

‘शिवसेनेचा वाघ फक्त गुहेतच डरकाळी फोडतो; पण भारतीय जनता पक्षाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘सर्जिकल स्ट्राइक’च्या माध्यमातून पाकिस्तानात जाऊन वाघाच्या डरकाळीचा आवाज काय असतो, हे दाखवून दिले आहे,’ अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी शिवसेनेच्या नेतृत्वावर जोरदार हल्ला चढवला. ‘आम्हाला तत्त्वांची भाषा शिकवणारे राज्याच्या वेगवेगळ्या भागांत इतर पक्षांबरोबर ‘सेटिंग’ आणि ‘फिक्सिंग’ करत आहेत,’ आरोप करून ‘पुण्याच्या परिवर्तनासाठी भाजपला महापालिकेत एकहाती सत्ता द्या,’ असे आवाहन फडणवीस यांनी केले.

पुणे महापालिकेतील उमेदवारांच्या प्रचारासाठी फडणवीस यांनी सोमवारी शहरात चार सभा घेतल्या. बाणेर, कोथरूड, सातारा रोड आणि हडपसर या ठिकाणी झालेल्या सभांमध्ये त्यांनी शिवसेनेच्या नेतृत्वाकडून भाजपवर सुरू असलेल्या हल्ल्यांना जोरदार प्रत्त्युत्तर दिले. तसेच, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसवरही निशाणा साधला.

‘मुंबईपासून परभणी, लातूरपर्यंतच्या अनेक ठिकाणी शिवसेनेने कुठे राष्ट्रवादी काँग्रेस, तर कुठे काँग्रेसशी ‘सेटिंग’ आणि ‘फिक्सिंग’ केले आहे. आतापर्यंत ज्यांच्याविरुद्ध लढलो, त्यांच्याशीच हातमिळवणी करण्याची गरज काय,’ अशी विचारणा फडणवीस यांनी केली. ‘राज्यातून शिवसेनेचे १८ खासदार कोणाच्या जिवावर निवडून आले, हे एकदा ताडून पाहा; मग बोलण्याचा अधिकार तरी आहे का, हे उमगेल,’ असा टोलाही त्यांनी लगावला.

मुख्यमंत्री म्हणाले, ‘महापालिका निवडणुकांमध्ये विकासाच्या मुद्द्यावर, शहराच्या भवितव्याच्या दृष्टीने चर्चा व्हायला हवी. नागरिकांच्या आशा-अपेक्षा, आकांक्षा यांच्याबद्दल बोलले पाहिजे. परंतु या निवडणुकांमध्ये कोणी नोटाबंदीवर बोलत आहे, तर कोणी इतर कशावर बोलत बसले आहेत. विकासाची स्पष्ट दिशा दाखवून त्याकडे वाटचाल करण्याची क्षमता फक्त भाजपमध्ये आहे.’

‘केंद्रात नरेंद्र मोदी यांचे सरकार सत्तेवर येण्यापूर्वी अनेकदा पाकिस्तानच्या सैनिकांनी आपल्या सैनिकांवर हल्ला केला होता. त्या वेळी फक्त निषेध व्यक्त केला जायचा किंवा ‘खबरदार, आम्ही तोडीस तोड उत्तर देऊ,’ असे इशारे देशाच्या नेतृत्वाकडून दिले जायचे. भारतीय सैनिकांमधील कणखरपणाला पाठिंबा देऊन शत्रूवर हल्ला करण्याचे सामर्थ्य फक्त पंतप्रधानांनी दाखवले,’ अशा शब्दांत फडणवीस यांनी मोदींच्या निर्णयाचे समर्थन केले.

‘पुण्यात काँग्रेसचे अस्तित्वच शिल्लक राहिलेले नाही, तर राष्ट्रवादी काँग्रेससाठी सभा घेण्यास अजितदादाच इच्छुक नाहीत, असे कळले. ‘सभा घेणार का,’ असे विचारले, तर ते म्हणतात, ‘सभा नको, रोड शो घेतो,’ अशी उपरोधिक टिप्पणी करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवार यांनाही लक्ष्य केले.

पालकमंत्री गिरीश बापट, खासदार अनिल शिरोळे, खासदार संजय काकडे, शहराध्यक्ष योगेश गोगावले यांच्यासह संबंधित भागांतील आमदार, पदाधिकारी आणि पक्षाचे उमेदवार या वेळी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

​ही ‘राष्ट्रवादी’ची ‘बी टीम’

$
0
0

उद्धव ठाकरे यांची भाजपवर टीका

म. टा. प्रतिनिधी, पिंपरी

‘माझा कलानींबरोबर कधीही फोटो दिसणार नाही,’ अशा शब्दांत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सोमवारी टोला लगावला. ‘भाजप ही राष्ट्रवादी काँग्रेसची ‘बी टीम’ आहे,’ अशीही टीका ठाकरे यांनी केली. पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीला उभ्या राहिलेल्या शिवसेनेच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ उद्धव ठाकरे यांनी सोमवारी आकुर्डी येथे सभा घेतली. त्या वेळी त्यांनी भाजपवर सडकून टीका केली.

या वेळी जलसंपदा मंत्री विजय शिवतारे, शिवसेनेचे संपर्कप्रमुख डॉ. अमोल कोल्हे, खासदार शिवाजीराव आढळराव, श्रीरंग बारणे, आमदार गौतम चाबूकस्वार, नीलम गोऱ्हे, शहरप्रमुख राहुल कलाटे, अर्जुन डांगळे, कीर्ती फाटक आदी उपस्थित होते. ‘‘ना भय ना भ्रष्टाचार’ची घोषणा देत ते गावगुंड गोळा करत सुटले आहेत. युतीत असताना यांना अशा लोकांची गरज नव्हती. कारण शिवसैनिक यांची पालखीतून मिरवणूक काढत होते. आता शिवसैनिक राहिला नाही, कार्यकर्ते नाहीत, मंत्रिपद असो वा इतर उमेदवार, यांच्याकडे कोणीच नाही. त्यामुळे सरतेशेवटी या लोकांनी गुंडपुंड गोळा करण्यास सुरवात केली आहे. परंतु त्यांनी आमच्या आया-बहिणींना त्रास दिला तर शिवसैनिक अशांचे हातपाय काढून तुमच्या हातात देतील हे विसरू नका,’ असे ठाकरे यांनी सुनावले.

‘पिंपरी-चिंचवडमधील शास्तीकराचा प्रश्न सुटल्याचे भाजपचे नेते सांगत आहेत; मात्र राज्य सरकार आणि महापालिकेकडे याची माहितीच नाही. सरकारी कार्यालयातील देवदेवतांचे फोटो काढण्याचा सरकारचा आदेश संपूर्ण महाराष्ट्रात पोहोचला; मग शास्तीकराचा आदेश कसा पोहोचला नाही,’ असा सवाल ठाकरे यांनी उपस्थित केला. ‘महाराष्ट्र दोन वर्षांपूर्वीच जन्माला आल्याचे भाजपच्या नेत्यांना वाटत आहे. भाजपचे लोक लोकसभा, विधानसभा आणि महापालिका निवडणुकीसाठीही नरेंद्र मोदी यांचा फोटो वापरत आहेत. त्यामुळेच मी मोदी यांच्यावर टीका करत आहे,’ असे सांगून ठाकरे म्हणाले, ‘सीमेवर जवान शहीद होत असताना पंतप्रधान आणि मुख्यमंत्री प्रचारासाठी फिरत आहेत. ‘भाईयों’ आणि ‘मित्रों’ म्हटले की लोक आता घाबरायला लागतात. सभास्थळ सोडून जातात इतकी भीती लोकांमध्ये आहे.’

‘भाजपचे लोक आमच्या कुंडल्या काढण्याची भाषा करतात. तुम्ही आमच्या कुंडल्यांना हात लावलात, तर तुमच्याही कुंडल्या तयार आहेत. शिवसेनाप्रमुख तुमच्या पाठीमागे नसते, तर तुम्ही आज कुठे असतात हे कुणालाही कळले नसते. भाजपने शपथ घेण्याचे नवे फॅड आणले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारमध्ये ६५ हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याचे वक्तव्य पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांनी केले होते. गिरीश बापट खरे बोलून गेले आहेत. शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी देण्याची शिवसेनेची मागणी आहे. मुख्यमंत्री शेतकऱ्यांची कर्जमाफी करणार असतील तर मी त्यांना कायमस्वरूपी पाठिंबा देईन,’ असेही उद्धव ठाकरे म्हणाले.

‘डोंबिवली येथील साहित्य संमेलनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे काळे झेंडे दाखवून स्वागत केले. सत्ता असूनही मुख्यमंत्री विश्वासाचे नाते तयार करू शकले नाहीत. कल्याण-डोंबिवलीच्या महापालिका निवडणुकीत त्यांनी साडेसहा हजार कोटी देण्याचे आश्वासन दिले होते. ते पूर्ण न केल्यामुळे काळे झेंडे दाखवून त्यांचे स्वागत करण्यात आले. त्यामुळे तेथील जनतेला दिलेली आश्वासने आधी पूर्ण करा आणि मग पिंपरी-चिंचवडकरांना फसवी आश्वासने द्यायला या,’ असा टोलादेखील उद्धव ठाकरे यांनी लगावला.

.........

गाजरांचा पाऊस

‘मला सभास्थळी येण्यासाठी उशीर झाला. कारण मी पुण्यामार्गे आलो आणि पुण्यात गाजरांचा पाऊस पडतोय. कारण तिथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत. अख्खे पुणे गाजरमय झाले आहे,’ अशी टिप्पणी शिवसेनेचे खासदार शिवाजीराव आढळराव यांनी केली. त्यांचे हे बोलणे ऐकून सभास्थळी हशा पिकला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विक्रमी उड्डाणासाठी उलटगणती सुरू

$
0
0

मयुरेश प्रभुणे, चेन्नई

तब्बल १०४ उपग्रहांना घेऊन अवकाशात उड्डाण करण्यासाठी सज्ज असणाऱ्या ध्रुवीय उपग्रह प्रक्षेपकाच्या (पीएसएलव्ही सी ३७) उलटगणतीला मिशन रेडीनेस रिव्ह्यू (एमआरआर) कमिटीने सोमवारी हिरवा कंदील दाखवला. उड्डाणापूर्वी सर्व यंत्रणांची तपासणी करणारे आणि प्रक्षेपकाला अवकाशात झेपावण्यासाठी सज्ज करणारे काउंटडाउन मंगळवारी पहाटे पाच वाजून २८ मिनिटांनी सुरू होणार असून, ‘पीएसएलव्ही’चे विक्रमी उड्डाण उद्या, बुधवारी सकाळी नऊ वाजून २८ मिनिटांनी श्रीहरिकोटाच्या सतीश धवन अवकाश केंद्रातून होईल.

भारतीय अवकाश संशोधन संस्थेच्या (इस्रो) वाटचालीतील ‘पीएसएलव्ही सी ३७’चे उड्डाण ऐतिहासिक ठरणार आहे. एकाच उड्डाणातून अधिकाधिक उपग्रह वाहून नेल्यास प्रत्येक उपग्रहामागील उड्डाणाचा खर्च अत्यंत कमी होतो. एकाच उड्डाणातून इतक्या मोठ्या प्रमाणात विकसित देशांचे उपग्रह व्यावसायिक तत्त्वावर इस्रो प्रक्षेपित करत असल्यामुळे जगभरातील अवकाश कंपन्यांचे ‘पीएसएलव्ही’च्या उड्डाणाकडे विशेष लक्ष आहे.

अवकाश क्षेत्रातील महासत्ता मानल्या जाणाऱ्या अमेरिकेतील खासगी कंपन्या आपले उपग्रह नासा किंवा अमेरिकी कंपन्यांऐवजी ‘इस्रो’च्या माध्यमातून प्रक्षेपित करणे किफायतशीर समजत आहेत, यातच येत्या काळात भारतासाठी उपलब्ध होणाऱ्या व्यावसायिक संधीची झलक दिसून येते. एका उड्डाणातून याआधी अमेरिकेने सर्वाधिक २९, तर रशियाने ३७ उपग्रह अवकाशात पाठवले आहेत. भारतानेही एका उड्डाणातून दहा आणि वीस उपग्रह अवकाशात पाठवले आहेत; मात्र शंभराहून अधिक उपग्रह एकाच वेळी अवकाशात पाठवण्याचा इतिहासातील हा पहिलाच प्रयत्न असल्यामुळे या उड्डाणाला जागतिक महत्त्व प्राप्त झाले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पिंपरी की भोसरी; मुख्यमंत्र्यांची सभा रद्द

$
0
0

मटा ऑनलाइन वृत्त । पुणे

शतप्रतिशत सत्ता मिळविण्यासाठी भाजपच्या उधळलेल्या वारूला पक्षांतर्गत साठमारीनं लगाम बसला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सभा पिंपरीत घ्यायची की भोसरीत या वादामुळे अखेर पिंपरी-चिंचवडमधील मुख्यमंत्र्यांची सभाच रद्द करण्याची नामुष्की भाजपवर ओढवली आहे.

पुणे महापालिका निवडणुकीच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुण्यात आले होते. पुण्यात आल्यानं पिंपरी-चिंचवड महानगर पालिकेसाठीही मुख्यमंत्र्यांची सभा लावण्याचे नियोजन करण्यात आले होते. त्यासाठी वेळ आणि ठिकाणही ठरविण्याचे आदेश देण्यात आले. त्यामुळे कार्यकर्ते कामालाही लागले. पण मुख्यमंत्र्यांना आपल्याच भागात आणण्याच्या दृष्टीनं नियोजन सुरू झाले. एका गटानं मुख्यमंत्र्यांची सभा पिंपरीत लावण्याचा आग्रह धरला. तर दुसऱ्या गटानं भोसरीत सभा घेण्याचा हट्ट धरला. हा तिढा सुरू असतानाच सभा दुपारी घ्यायची की संध्याकाळी यावरही मतभेद सुरू झाले. या दोन मुद्द्यावर भाजपत दोन गट पडले. वाद इतके विकोपाला गेले की भाजपच्या शिस्तप्रिय पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांची सभाच रद्द केली. त्यामुळे भाजपतील दोन गटांमधील भांडणेही चव्हाट्यावर आली आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मला गोळ्या घातल्या तरी मी बोलणारचः ओवेसी

$
0
0

मटा ऑनलाइन वृत्त । पुणे

सध्या निवडणुकींची धामधूम सुरू असताना माझ्या सभेला परवानगी नाकारली जाते. माझ्या भाषणामुळे समाजात फूट पाडण्याचा माझ्यावर आरोप केला जातो, पण हे सर्व चुकीचे आहे. भारतीय संविधानाने मला बोलण्याचा अधिकार दिल्याने मी बोलतच राहणार आहे. मी काही वाईट बोलत असेल तर मला तुरुगांत डांबा, माझ्यावर गुन्हा दाखल करा, माझ्यावर गोळ्या घाला, परंतु मी बोलणे थांबवणार नाही, कुणाला भीक घालणार नाही, असे आयएमआयचे खासदार असदुद्दीन ओवेसी आज पुण्यात एका सभेत बोलताना म्हणाले.

उत्तर प्रदेशात जाऊन मी अनेक सभेत बोलून आलो. परंतु त्या ठिकाणी मला पोलिसांनी कोणतीच नोटीस दिली नाही. मला बोलण्यापासून कोणी अटकाव केला नाही. परंतु महाराष्ट्रात प्रत्येक वेळी मला टार्गेट केले जाते. माझ्या भाषणामुळे समाजात फूट पडते असा आरोप केला जातो. दरवेळी मला नोटीस दिली जाते. माझ्या भाषणामुळे काही वाईट होत असेल तर माझ्यावर कायदेशीररित्या गुन्हा दाखल करा. परंतु येथे असे केले जात नाही. पुण्यात येण्यापासून मला नेहमीच रोखले जाते. मला ज्याप्रमाणे नोटीस दिली जाते त्याप्रमाणे उद्धव ठाकरे, देवेंद्र फडणवीस, शरद पवार, अजित पवार यांना नोटीस देण्याची पोलिसांमध्ये हिंम्मत आहे का?, असा सवालही त्यांनी यावेळी विचारला. देशात कुठेही जाण्याचा, भाषण करण्याचा संविधानने मला अधिकार दिलेला असताना माझा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला जात आहे. परंतु माझा आवाज कुणी दाबू शकत नाही. माझा आवाज तेच लोक दाबू शकतील ज्यांनी कलबुर्गी, पानसरे, दाभोळकर यांच्यावर गोळ्या झाडल्या तेच लोक माझ्यावर गोळ्या झाडतील. मला त्याची चिंता नाही. मी त्यालाही भीत नाही. जर माझा आवाज बंद करायचा असेल तर माझ्यावर गोळ्या घाला, परंतु मी बोलतच राहणार आहे, असे ओवेसी म्हणाले.

मी हिंदूच्याविरोधात आहे असा प्रचार केला जातो परंतु तो चुकीचा आहे. पुणे कुणाचे जहागिरदारी नाही. मी पुण्यात येणारच. मला कोणीच रोखू शकत नाही. दरवेळी मला नोटीस देऊन पुण्यात येण्यापासून जो काही अटकाव केला जातो. तो चुकीचा असून माझ्या सहनशीलतेचा अंत पाहू नका, असे ओवेसी म्हणाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


आंतरराष्ट्रीय मेट्रो सिटीचे आश्वासन

$
0
0

राष्ट्रवादी काँग्रेसच्या जाहीरनाम्याचे प्रकाशन

म. टा. प्रतिनिधी, पिंपरी
पिंपरी-चिंचवडला आंतरराष्ट्रीय मेट्रो सिटी बनविण्याचे आश्वासन राष्ट्रवादी काँग्रेसने प्रसिद्ध केलेल्या जाहीरनाम्यात दिले आहे. याशिवाय शहराचा पाणीपुरवठा ७०० दशलक्ष लिटरपर्यंत वाढविणार, सर्व झोपडपट्ट्यांमध्ये मोफत वाय-फाय सुविधा, सर्व शाळांमध्ये ई-लर्निंग सुविधा, देहू-आळंदी आणि हिंजवडीसह सात गावांचा महापालिकेत समावेश आदी आश्वासनेही देण्यात आली आहेत.

ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या निवासस्थानी राष्ट्रवादी काँग्रेसच्या जाहीरनाम्याचे प्रकाशन करण्यात आले. महापौर शकुंतला धराडे, पक्षाचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे-पाटील, माजी आमदार विलास लांडे, अण्णा बनसोडे, उपमहापौर प्रभाकर वाघेरे, योगेश बहल, हनुमंत गावडे, निवृत्ती शिंदे या वेळी उपस्थित होते.

‘आम्ही हे केले आणि आम्ही हे करणार’ या दोन टप्प्यांत जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. काल-परवापर्यंत पुण्यात राहायचे आणि नोकरी व्यवसायाला या शहरात यायचे, अशी पूर्वी मानसिकता होती. ती आता मागे पडली असून, आम्ही पिंपरी-चिंचवडमध्ये राहतो, असे अभिमानाने सांगता येण्यासारखी परिस्थिती निर्माण केली आहे, असे राष्ट्रवादी काँग्रेसने नमूद केले आहे. त्यामुळे इतर महानगरांसाठी ‘पिंपरी-चिंचवड’ परवलीचा शब्द बनल्याचा दावा करण्यात आला आहे.

पुन्हा सत्तेवर आल्यानंतर प्रमुख कामांबरोबरच अन्य विकासकामांची यादी जाहीरनाम्यात नमूद केली आहे. यामध्ये कचरा संकलनाचे शंभर टक्के उद्दिष्ट ठेवून शहर कचराकुंडीमुक्त करणार, घनकचरा व्यवस्थापनासाठी पुनावळेतील ६२ एकर शासकीय जमीन ताब्यात घेण्यासाठी पाठपुरावा करणार, तळवडे येथे ९० एकर गायरान जमिनीवर आंतरराष्ट्रीय दर्जाचे उद्यान आणि प्राणीसंग्रहालय उभारणार, मुळा नदीवर नवीन पूल बांधून बोपखेलपासून खडकीकडे जाणारा रस्ता विकसित करणार, बोपखेलवासीयांसाठी ५० कोटी रुपये खर्चाच्या नवीन पूलाचे काम हाती घेणार, हिंजवडीमध्ये बीआरटीएस टर्मिनल उभारणार, पंतप्रधान आवास योजनेअतंर्गत पाच वर्षांत सहा हजार ५३० घरे बांधणार, बचत गटांसाठी ऑनलाइन बजारपेठ उपलब्ध करून देणार, वायसीएममध्ये नाइट शेल्टर उभारणार, सिंगापूरच्या धर्तीवर अॅक्वेरिअम उभारणार, उद्योगनगरीचा प्रवास सांगणारे औद्योगिक संग्रहालय उभारणार, नदी काठांचे रूपांतर रिक्रिएशन सेंटरमध्ये करण्यासाठी दोन्ही बाजूंनी पादचारी आणि सायकल मार्ग तयार करणार या आश्वासनांचा समावेश आहे.

प्रमुख आश्वासने

- शहराचा पाणीपुरवठा ७०० दशलक्ष लिटरपर्यंत
- शहरातील सर्व मोठे चौक सिग्नलविरहीत
- ध्वनीप्रदूषण टाळण्यासाठी शहर ‘हॉर्नमुक्त’
- सर्व झोपडपट्ट्यांमध्ये मोफत वाय-फाय सुविधा
- महापालिकेच्या सर्व शाळांमध्ये ई-लर्निंग सुविधा
- देहू, आळंदी, हिंजवडीचा महापालिकेत समावेश
- भोसरी ते चाकण बीआरटीएस सेवा
- चिखलीत जगद्गुरू संत तुकाराम महाराज संतपीठ

पिंपरी-चिंचवडला सुखी, शांत आणि समृद्ध बनवून आंतरराष्ट्रीय मेट्रो सिटी करणार आहे. हे स्वप्न साकारण्यासाठी महापालिकेवर पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता येणे गरजेचे आहे. त्यासाठी पक्षाच्या प्रत्येक कार्यकर्त्याने एकजुटीने आणि एकदिलाने काम करणे गरजेचे आहे.
- शरद पवार, अध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस

पिंपरी-चिंचवडला गोजिरे रूप आणण्यासाठी मनापासून झटलो आहोत. दिलेल्या प्रत्येक शब्दाला जागलो आहोत. कागदावरचे नियोजन प्रत्यक्षात उतरविले आहे. विकासाची ही पालखी पुढे नेण्याच्या दिंडीमध्ये शहरवासीय भक्तिभावाने यापुढेही सहभागी होतील, असा विश्वास वाटतो.
- अजित पवार, माजी उपमुख्यमंत्री

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

माहिती देण्यासाठी अधिकारी नेमणार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
‘निवडणुकीच्या कामाकाजाबाबत प्रसारमाध्यमांना आवश्यक ती माहिती तातडीने उपलब्ध करून देण्यासाठी प्रत्येक क्षेत्रीय कार्यालयाने स्वतंत्र वरिष्ठ अधिकाऱ्याची नेमणूक त्वरित करावी,’ असे आदेश महापालिका आयुक्त कुणाल कुमार यांनी सर्व क्षेत्रीय कार्यालयातील निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना दिले आहेत. ‘प्रसारमाध्यमांना आवश्यक ती माहिती या अधिकाऱ्याने अल्प कालावधीत उपलब्ध करून देण्याबरोबरच नागरिकांनी विचारणा केलेली माहिती देण्याची व्यवस्था करावी,’ असे आदेशामध्ये म्हटले आहे.

महापालिकेच्या निवडणुकीसाठी महापालिकेच्या वतीने विविध उपाययोजना केल्या जात असून मतदानाची टक्केवारी वाढावी, यासाठी वेगवेगळे प्रयत्न केले जात आहेत. प्रत्येक प्रभागातील मतदान केंद्र कुठे असतील याची सविस्तर यादी क्षेत्रीय कार्यालय स्तरावर तयार करण्यात आलेली आहे. मात्र याबाबतची सविस्तर माहितीच प्रसारमाध्यमांना दिली जात नसल्याची तक्रार वारंवार केली जात होती. निवडणुकीच्या कारभारात अधिकाधिक पारदर्शकता यावी, यासाठी संपूर्ण माहिती माध्यमांना देऊन नागरिकांच्या शंकाचे समाधान करावे, अशा सूचना निवडणूक आयोगाने दिल्या आहेत. मात्र या सूचनांना केराची टोपली दाखवित प्रसारमाध्यमांना जाणीवपूर्वक दूर ठेवले जात होते. याच्या तक्रारी थेट महापालिका आयुक्त कुणाल कुमार यांच्याकडे करण्यात आल्या होत्या. क्षेत्रीय कार्यालयातील निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडून मिळत असलेल्या वागणुकीचा प्रत्यय पालिका आयुक्त कुमार यांनाही आल्याने निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांबरोबर झालेल्या बैठकीत आयुक्तांनी माहिती देण्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्याची नेमणूक करण्याचे आदेश त्यांनी दिले.

मतदान केंद्रावर आवश्यक ती व्यवस्था, मतमोजणीसाठीची संपूर्ण नियोजन करून त्यादृष्टिने अधिकारी, कर्मचारी यांची नेमणूक करावी, अशा सूचना या बैठकीत आयुक्त कुमार यांनी दिल्या. निवडणुकीसाठी पालिकेने किती कर्मचाऱ्यांची नेमणूक केली आहे. पोलिस यंत्रणा किती आहे, याची सविस्तर माहिती त्यांनी निवडणूक अधिकाऱ्यांना दिली. मतदान करण्यासाठी आलेल्या अंध, अपंग, ज्येष्ठ नागरिक तसेच आजारी व्यक्ती, महिला यांच्यासाठीची व्यवस्था, तसेच प्रत्येक मतदान केंद्राबाहेर उमेदवाराच्या माहितीचे फलक, पोलिंग एजंटचे नियोजन, टपाली मतदानाचे नियोजन याबाबतचे मार्गदर्शन कुमार यांनी केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महाकोषनिधीच्या विश्वस्तांची अदलाबदल

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
महाराष्ट्र साहित्य परिषदेतर्फे साहित्य महामंडळाच्या महाकोषनिधीवर नेमलेल्या विश्वस्तांची अचानक अदलाबदल करण्यात आली आहे. महाकोषनिधीच्या विश्वस्त डॉ. कल्याणी दिवेकर यांना कोणतीही पूर्वकल्पना न देता त्यांच्या जागेवर राजन मुठाणे यांची निवड परिषदेने केली आहे. डॉ. दिवेकर यांनी विश्वस्तपदाचा राजीनामा दिलेला नाही किंवा त्यांच्याकडे राजीनाम्याची मागणी झालेली नाही. विश्वस्तांची निवड पाच वर्षे की घटक संस्थांची विद्यमान कार्यकारिणी असेपर्यंत हा संभ्रम त्यामुळे निर्माण झाला आहे.
अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे साहित्य संमेलन, उपक्रम आणि अन्य बाबी यासाठी वेळोवेळी सरकारकडे हात पसरायला लागू नये, यासाठी महाकोषनिधीची संकल्पना अस्तित्वात आली. महाकोषनिधीच्या समितीवर महामंडळाच्या महाराष्ट्र साहित्य परिषद, मराठवाडा साहित्य परिषद, मुंबई साहित्य संघ व विदर्भ साहित्य संघ या घटकसंस्थांचे प्रत्येकी दोन पदाधिकारी विश्वस्त म्हणून नेमले जातात.
साहित्य महामंडळाचे कार्यालय साहित्य परिषदेकडे तीन वर्षांसाठी असताना परिषदेने डॉ. कल्याणी दिवेकर व राजन लाखे यांनी महाकोषनिधीचे विश्वस्त म्हणून निवड केली होती. साहित्य महामंडळाचे फिरते कार्यालय आता विदर्भ साहित्य संघाकडे गेले आहे. पदाधिकाऱ्यांची निवड पाच वर्षांसाठी असल्याने महामंडळाचे कार्यालय नागपूरला गेले असले, तरी पद कायम राहणे अपेक्षित आहे. पण पाच वर्षे पूर्ण होण्याआधीच डॉ. दिवेकर यांच्या जागी मुठाणे यांची निवड करण्यात आली आहे. दिवेकर या सध्या परिषदेच्या पदाधिकारी नाहीत. लाखे हे सध्या साहित्य परिषदेचे पदाधिकारी असून त्यांचे विश्वस्तपद कायम ठेवण्यात आले आहे.

‘मी विश्वस्तपदाचा राजीनामा दिलेला नाही किंवा माझ्याकडे कोणी राजीनामा मागितलेला नाही,’ अशी प्रतिक्रिया दिवेकर यांनी दिली. परिषदेने केलेल्या या अदलाबदलीने साहित्य महामंडळाच्या अध्यक्षांनी कानावर हात ठेवले आहेत. परिषदेकडून आलेल्या नावांना विश्वस्त म्हणून मान्यता दिल्याची सारवासारव महामंडळाच्या अध्यक्षांनी पत्रकारांशी बोलताना केली. साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांनी या मुद्द्यावर बोलण्याचे टाळले.

डॉ. कल्याणी दिवेकर या महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या कार्यकारिणीच्या माजी सदस्य आहेत. जे सदस्य असतात, त्यांचीच निवड विविध पदांवर करणे हा संकेत आहे. दिवेकर कार्यकारिणी सदस्य नसल्याने त्यांचे नाव वगळून राजन मुठाणे यांची निवड करण्याचा निर्णय कार्यकारिणीने घेतला आहे. जबाबदारीतून मुक्त करत आहोत, असे पत्र दिवेकर यांना सौजन्याचा भाग म्हणून पाठवायला हवे होते.
- प्रकाश पायगुडे, प्रमुख कार्यवाह, महाराष्ट्र साहित्य परिषद

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘ऑनलाइन’सेवा नावापुरत्या

$
0
0

पुणे : महापालिकेची सेवा नागरिकांना एका ‘क्लिक’वर उपलब्ध व्हावी, यासाठी अधिकाधिक सेवा ऑनलाइन पद्धतीने देण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला आहे. या सेवा सुरू करताना त्याची अंमलबजावणी होते की नाही, याकडे मात्र दुर्लक्ष केले जात आहे. महापालिका प्रशासनाबरोबरच राजकीय पक्षांची मंडळी याकडे फारसे गांभीर्याने पाहत नसल्याने ऑनलाइन सेवा केवळ नावापुरती सुरू केली जात आहे. नागरिकांना ऑनलाइन पद्धतीने जन्म-मृत्यूचे दाखले देण्याची घोषणा पालिकेने केली होती. मात्र अद्यापही नागरिकांना या दाखल्यांसाठी पालिकेच्या क्षेत्रीय कार्यालयांचे उंबरे झिजवावे लागत आहेत. अनेक सेवा ऑनलाइन उपलब्ध करून दिल्या, तरी ‘एक ना धड भाराभर चिंध्या’ अशीच अवस्था या सेवांची झालेली आहे.
केंद्र सरकारच्या स्मार्ट सिटीत स्पर्धेत पुणे शहराचा देशात दुसरा क्रमांक आल्याने महापालिकेच्या वतीने पुरविल्या जाणाऱ्या सेवा, सुविधा, ऑनलाइन पद्धतीने देण्याचा निर्धार करत अनेक योजना ऑनलाइन पद्धतीने सुरू करण्यात आल्या आहेत. शहराचा सर्वांगीण विकास करण्यासाठी गेले वर्षभर महापालिकेने अनेक योजना राबविल्या आहेत. नागरिकांना चांगल्या पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी विविध विभागांमार्फत यापूर्वीच कामे सुरू करण्यात आली आहेत. सुमारे शंभर प्रकारच्या सेवांचा यामध्ये समावेश समावेश आहे. जन्म-मृत्यू दाखले, विवाह नोंदणी, प्रॉपर्टी टॅक्स, फायर एनओसी, झोन दाखला, प्रॉपर्टी टॅक्स नो ड्युज सर्टीफिकेकट, भोगवटा पत्र याबरोबरच मिळकतकर नाव बदल दाखला, अशा अनेक सेवा ऑनलाइन देण्याचा निर्धार पालिका प्रशासनाने केला होता. मात्र यातील ऑनलाइन प्रॉपर्टी टॅक्स वगळता इतर कोणत्याही सेवा पुणेकरांसाठी सुरू करण्यात पालिकेला यश मिळालेले नाही, ही वस्तुस्थिती आहे.
ऑनलाइन पद्धतीने प्रॉपर्टी टॅक्स भरण्याची सुविधा उपलब्ध करून दिल्याने डिसेंबर महिन्यातच मिळकतकरामधून तब्बल एक हजार कोटी रुपयांचे उत्पन्न मिळविण्यास पालिकेला यश आले आहे. प्रॉपर्टी टॅक्सची सुविधा पालिकेने नागरिकांसाठी दिली असली, तरी त्यामध्ये अनेक त्रुटी असल्याने आजही अनेक छोट्या छोट्या कारणांसाठी नागरिकांना पालिकेत हेलपाटे मारावे लागत आहेत. पालिकेच्या वतीने दहावी-बारावीच्या परीक्षेत ८० टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांना पालिकेच्या वतीने स्कॉलरशिप दिली जाते. ही स्कॉलरशिप पालिकेच्या वतीने दिली जात असली, तरी पालिकेच्या वतीने दिले जाणारे धनादेश हे संबंधित भागातील माननीय ताब्यात घेऊन त्याचे वाटप करतात. यामध्ये नगरसेवकांना श्रेय मिळत असल्याने यापूर्वी अनेकदा पालिकेच्या वतीने दिली जाणारी स्कॉलरशिपची रक्कम थेट विद्यार्थ्यांच्या खात्यात जमा करण्याचे धोरण प्रशासनाने स्वीकारले असतानाही नगरसेवकांकडून यासाठी विरोध केला जातो, याकडेही दुर्ल‍क्ष करून चालणार नाही.
बांधकाम करण्यासाठी आवश्यक ती परवानगी घेण्यासाठी लागणारा वेळ कमी करण्यासाठी पालिकेच्या बांधकाम विगागाने काही महिन्यांपूर्वी पुढाकार घेऊन ‘पुणे अर्बन’ हे अॅप तयार केले. मोबाइलच्या माध्यमातून हे अॅप वापरता येणार असल्याने पालिकेच्या विविध भागांतील झोन दाखले, बांधकाम परवानगीची फाइल, शहरातील सर्व्हे क्रमांकाचे आरक्षण, तसेच प्रत्येक भागातील बांधकाम निरीक्षक यांची सविस्तर माहिती नागरिकांना काही मिनिटांमध्ये मिळणार आहे.
महापालिकेच्या बांधकाम विभागाच्या कारभारात अधिकाधिक पारदर्शकता यावी, तसेच नागरिकांना छोट्या कामांसाठी पालिकेत खेटे घालावे लागू नयेत, यासाठी हे अॅप्लिकेशन तयार करण्यात आले असून स्मार्ट फोनच्या माध्यमातून हे अॅप डाउनलोड करून नागरिकांना वापरता येणार आहे. या अॅपमध्ये राज्य सरकारच्या इतर शासकीय सेवांशी जोडण्यात आले असून त्यात आपल्या भागातील रेडीरेकनरचे दर, तसेच राज्यभरातील कोणत्याही जागेचा सातबारासुद्धा नागरिकांना सहज मिळणार आहे.
बांधकाम करण्याची परवानगी मागण्यासाठी कोणती कागदपत्रे जोडणे आवश्यक आहे. आपल्या भागात सुरू असलेले बांधकाम अधिकृत आहे की अनधिकृत, कोणत्या भागात आरक्षण आहे. टीडीआरसाठी सादर करण्यात आलेल्या अर्जाची सद्यस्थिती नक्की काय आहे; तसेच प्रत्येक भागात कोणता अधिकारी कार्यरत आहे, अशा विविध गोष्टींची माहिती या अॅपच्या माध्यमातून अगदी सहज उपलब्ध होणार आहेत. याबरोबरच डॅश बोर्ड, पुणे कनेक्ट, पुणे डाटा स्टोअर, अशी नागरिकांना उपयोगी पडणारी अनेक नवीन ‘मोबाइल अ‍ॅप्स’ पालिका विकसित करीत आहे. यामुळे घरबसल्याही किंवा आपल्या भागातील किराणा मालाच्या दुकानातूनही नागरिकांना मिळकतकर भरता येणार आहे. पालिकेच्या सर्व सुविधा ऑनलाइन झाल्यास पालिकेचे कर्मचारी नागरिकांना अपॉइंटमेंट देऊन त्यांच्या घरी जाऊनदेखील या सुविधा देतील. फक्त यासाठी काही प्रमाणात अधिकचे शुल्क नागरिकांना भरावे लागणार आहे. नागरिकांना पालिकेच्या सेवा घरबसल्या मिळाव्यात, यासाठी पालिकेने ऑनलाइन तसेच मोबाइल अॅप, सुरू केली असली तरी जोपर्यंत त्याची ठोस अंमलबजावणी केली जाणार नाहीत, तोपर्यंत नागरिकांचे हेलपाटे संपणार नाहीत, हे वास्तव आहे.

पक्षांची भूमिका
राष्ट्रवादी काँग्रेस
- पुणे शहर २०२० पर्यंत देशातील पहिले ‘डिजिटल साक्षर शहर’ करणार
- पर्य‍टन विकासासाठी विशेष मोबाइल अॅप, वेबसाइट तयार करणार
- पालिका शाळातील सर्व ग्रंथालये डिजीटल करणार

काँग्रेस
- शहरातील विविध भागांत मोफत वायफाय सेवा देणार

भारतीय जनता पक्ष
- ‘मेक इन इंडिया’, ‘मेक इन महाराष्ट्र’च्या माध्यमातून विविध योजना राबविणार
- शासनाच्या नव्या माहिती तंत्रज्ञान धोरणाचा लाभ शहराला मिळवून देणार
- शहर वायफाय करण्यासाठी कृती कार्यक्रम राबविणार

शिवसेना
- पालिकेच्या संबधित ४६ विविध परवानग्या ई-गव्हर्नन्सद्वारे कालमर्यादेत देणार
- नागरिकांच्या तक्रारी कमीत कमी वेळेत सोडविण्यासाठी प्रयत्नशील राहणार

मनसे
- पाणीपुरवठा, कचरा व्यवस्थापन याबरोबर इतर प्रश्न सोडविण्यासाठी डिजिटल यंत्रणेचा वापर करणार
- शहरातील महत्त्वांच्या संस्थांची माहिती एकत्रित करून ही माहिती उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करणार
- डिजिटल पालिका होण्याच्या दृष्टीने पावले उचलणार

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

प्रत्येक गटासाठी वेगळे इव्हीएम देणे अशक्य

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
महापालिका निवडणुकीसाठी प्रत्येक गटातील उमेदवारांसाठी स्वतंत्र ‘इलेक्ट्रॉनिक्स व्होटिंग मशिन’ (इव्हीएम) देण्याची राजकीय पक्षांची मागणी अपूर्णच राहणार आहे. प्रत्येक गटासाठी स्वतंत्र मशिन देणे अशक्य असल्याचे राज्य निवडणूक आयोगाने कळविले आहे. त्यामुळे उपलब्ध असलेल्या मशिनवर एकापेक्षा अधिक मतपत्रिका बसविण्याचे नियोजन महापालिका प्रशासनाने केले आहे. निवडणूक आयोगाने दाखविलेल्या असमर्थतेमुळे मतदानाच्या दिवशी शहरातील काही मतदान केंद्रांवर गोंधळ निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
प्रत्येक नागरिकाने आपला मतदानाचा हक्क बजावावा, यासाठी निवडणूक आयोगाच्या वतीने विविध उपाययोजना केल्या जात आहेत. नागरिकांना मतदान करता यावे, यासाठी राज्य सरकारने २१ फेब्रुवारीला सार्वजनिक सुट्टी जाहीर केली आहे. यंदा होणारी पालिकेची निवडणूक चार सदस्यांच्या प्रभाग पद्धतीने होणार असून प्रत्येक प्रभागात अ, ब, क आणि ड असे गट तयार करण्यात आले आहे. या निवडणुकीसाठी प्रत्येक मतदाराला चार मते द्यावी लागणार असल्याने मतदानासाठी येणाऱ्यांमध्ये गोंधळ निर्माण होऊ नये, यासाठी प्रत्येक गटासाठी एक अशा पद्धतीने प्रत्येकी प्रभागात चार इव्हीएम मशिन द्यावीत, अशी मागणी काँग्रेस, राष्ट्रवादीसह अनेक राजकीय पक्षांनी महापालिका आयुक्त कुणाल कुमार यांच्याकडे केली होती. राजकीय पक्षांकडून आलेल्या मागणीनुसार महापालिकेच्या मतदानासाठी साडेपंधरा हजार मशिन उपलब्ध करुन द्यावीत, अशी मागणी आयुक्त कुमार यांनी आयोगाकडे केली होती. मात्र, सध्या मतदानासाठी पालिकेला उपलब्ध करून देण्यात आलेल्या ११ हजार व्होटिंग मशिनपेक्षा अधिक मशिन देणे शक्य नसल्याचे स्पष्टीकरण देऊन आयोगाने असमर्थता दाखविल्याने उपलब्ध झालेल्या मशिनवर एकापेक्षा अधिक गटातील उमेदवारांची नावे समाविष्ट करून मतपत्रिका तयार करण्याचे काम प्रशासनाने सुरू केले आहे.
महापालिकेच्या निवडणुकीसाठी चार सदस्यांचा प्रभाग झाल्याने मतदानासाठी आवश्यक असलेली मशिन गोळा करण्याचे मोठे आव्हान पालिकेसमोर होते. १० जिल्ह्यातील ३० तालुक्यांमधून ही सर्व मशिन गोळा करण्यात आल्याचे पालिकेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले. प्रत्येक प्रभागात चार गटांसाठी मतदान होत असले तरी दोन किंवा तीन व्होटिंग मशिनवर ही सर्व नावे बसविण्यात आली आहे. मतदारांनी केलेल्या मतांची नोंदणी करण्यासाठी जवळपास चार हजार बॅलेट युनिट पालिकेकडे उपलब्ध असून दहा टक्के इव्हीएम मशिन राखीव ठेवण्यात आली आहेत. मतदान करताना नागरिकांना याचा त्रास होऊ नये, यासाठी प्रात्यक्षिके दाखविली जाणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले.
...
पालिकेच्या ४१ प्रभागातील १६२ जागांसाठी सुमारे १०९० उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. ३४३२ मतदान केंद्रांवर मतदान होणार आहे. निवडणूक आयोगाकडून उपलब्ध झालेल्या मशिनची संख्या लक्षात घेता शहरातील ४१ प्रभागांपैकी केवळ २ प्रभागात चार मशिन वापरली जाणार आहेत. येरवडा (प्रभाग क्रमांक ६) आणि खडकमाळआळी महात्मा फुले पेठ (प्रभाग १८) या दोन प्रभागात मतदानासाठी चार मशिनचा वापर होणार आहे. तर २२ प्रभागांमध्ये ३ आणि १७ प्रभागांमध्ये २ मशिनवर चार गटांच्या मतदानाचे नियोजन करण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मतदार यादीत पदाधिकाऱ्यांच्या नावातही घो‍ळ

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
वारंवार अर्ज देऊन मतदार यादीत नावाचा समावेश न होणे, कधी पहिले नाव, कधी अडनाव बदलणे तर एकापेक्षा अधिक याद्यांमध्ये नाव येणे... मतदारांच्या याद्यांमधील हे घोळ सर्वसामान्यांच्या बाबतीतच होतात, असा गैरसमज दूर करा. पुण्यातील मोठ्या पक्षांमधील पदाधिकाऱ्यांच्या नावातही अशा चुका असून वारंवार फेरबदल करून अपेक्षित बदल न झाल्याने लोकप्रतिनिधी वैतागले आहेत.
पुणे इंटरनॅशनल सेंटरने आयोजित केलेल्या पुणे महापालिका निवडणूक या परिसंवादामध्ये मतदार याद्यांना वैतागलेल्या लोकप्रतिनिधींचे किस्से ऐकण्याची संधी उपस्थितांना मिळाली. प्रश्नोत्तराच्या सत्रात एका महिलेने मी तीन वेळा मतदार यादीसाठी प्रयत्न करून माझे नाव यादीत आले नाही, मग मतदान कसे करायचे, प्रश्न विचारल्यावर व्यासपीठावरील नेते हसले.
भारतीय जनता पक्षाचे शहराध्यक्ष योगेश गोगावले हे तत्काळ माइक घेऊन म्हणाले, ‘अहो केवळ मतदार नाही, तर लोकप्रतिनिधी देखील या समस्येला सामोरे जात आहेत. मी सदाशिव पेठेतून दुसऱ्या ठिकाणी राहायला जाऊन अनेक वर्ष झाली, तरी आजतागायत माझे नाव पेठेच्या मतदार यादीमध्ये येते आहे. सर्व प्रकारचे अर्ज भरून झाले तरी निवडणूक यंत्रणेने माझा पत्ता बदलेला नाही.’
काँग्रेसचे शहर सरचिटणीस अभय छाजेड यांनीही मतदार याद्यांमधील गोंधळाबद्दल स्वानुभव सांगितला. ‘गेल्या पंधरा वर्षांपासून मतदार यादीमध्ये माझे दोन वेळा नाव येते आहे. प्रत्येक निवडणुकीपूर्वी मी आवश्यक कागदपत्रे देऊन एक नाव कमी करण्याचे आवाहन केले आहेत. याचे सगळे पुरावे माझ्याकडे आहेत. तरी देखील यंदा पुन्हा माझी दोन नावे प्रसिद्ध झाली आहेत. लोकप्रतिनिधींच्या बाबतीत असे प्रकार घडत असतील तर किती सर्वसामान्य नागरिक आज मतदानाच्या हक्कांपासून वंचित आहेत, याचा प्रशासनाने गांभीर्याने विचार केला पाहिजे. मतदारांची यादी अद्ययावत करण्याची सदोष यंत्रणा बदली पाहिजे,’ असे छाजेड यांनी सांगितले. दोघांचे अनुभव ऐकल्यावर सभागृहामध्ये हशा पिकला आणि कार्यक्रम संपल्यावर श्रोत्यांमध्ये राजकीय पक्षांच्या जाहीरनाम्याऐवजी मतदार यादीतील चुकांचे किस्से रंगले.
.....................
‘गेल्या पंधरा वर्षांपासून मतदार यादीमध्ये माझे दोन वेळा नाव येते आहे. प्रत्येक निवडणुकीपूर्वी मी आवश्यक कागदपत्रे देऊन एक नाव कमी करण्याचे आवाहन केले आहेत. याचे सगळे पुरावे माझ्याकडे आहेत. तरी देखील यंदा पुन्हा माझी दोन नावे प्रसिद्ध झाली आहेत.
- अभय छाजेड, शहर सरचिटणीस, काँग्रेस

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

राज्यातील महापालिकांवर भाजपचे वर्चस्व

$
0
0

सह-प्रभारी खासदार राकेश सिंग यांनी व्यक्त केला विश्वास
म. टा. प्रतिनिधी, पुणे
केंद्र आणि राज्यातील भारतीय जनता पक्षाच्या सरकारने केलेल्या विकासाच्या कामांमुळे पुण्यासह राज्यातील सर्व महापालिकांमध्ये पक्षाला बहुमत प्राप्त होईल, असा ठाम विश्वास राज्याचे सह-प्रभारी खासदार राकेश सिंग यांनी मंगळवारी व्यक्त केला. भाजपसाठी वातावरण अनुकूल असल्याने इतर पक्षांचे आव्हानच आमच्यासमोर नाही, अशी भूमिका मांडताना हा अहंकार नाही, तर आत्मविश्वास असल्याचा दावा त्यांनी केला.
राज्यातील महापालिका निवडणुकांच्या रणधुमाळीमध्ये राकेश सिंग यांनी मंगळवारी पुण्यातील कार्यकर्त्यांशी संवाद साधला. त्यानंतर, त्यांनी ‘निवडणूक निकालानंतर भाजपला इतर कोणत्याही पक्षाची मदत घेण्याची गरज भासणार नाही,’ असे भाकित त्यांनी वर्तवले.
शहरातील सर्वसामान्य जनतेसाठी केंद्र आणि राज्य सरकारतर्फे बऱ्याच योजना राबविण्यात येत आहेत. काँग्रेस-राष्ट्रवादीच्या आघाडी सरकारच्या काळात ठप्प झालेल्या विकासाला पुन्हा गती प्राप्त झाली असून, त्याच बळावर नागरिक पुन्हा महापालिकेमध्येही भाजपला आशीर्वाद देतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
शिवसेना सातत्याने भाजपवर टीका करत असून, राज्य सरकारमधून बाहेर पडण्याचा इशारा देत आहे. त्याबद्दल विचारले असता, फडणवीस सरकार पाच वर्षांचा कार्यकाल पूर्ण करेल, असे त्यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


रेश्मा भोसले भाजप पुरस्कृत उमेदवार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
पुणे विद्यापीठ-वाकडेवाडी (क्र ७) या प्रभागातून ‘कमळ’ चिन्ह नाकारण्यात आल्याने अपक्ष म्हणून निवडणूक लढवावी लागणाऱ्या रेश्मा अनिल भोसले यांना अखेर भारतीय जनता पक्षाने पुरस्कृत उमेदवार म्हणून घोषित केले आहे. पालकमंत्री गिरीश बापट आणि शहराध्यक्ष योगेश गोगावले यांच्या उपस्थितीत मंगळवारी त्यावर शिक्कामोर्तब झाले.
राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अनिल भोसले यांच्या पत्नी रेश्मा भोसले यांनी अखेरच्या दिवशी भाजपकडून अर्ज भरला होता. परंतु, छाननीमध्ये त्या भाजपकडून निवडणूक लढवू शकणार नाहीत, हे स्पष्ट झाले. हायकोर्ट, सुप्रीम कोर्टापर्यंत धाव घेऊनही भोसले यांना अपक्ष म्हणूनच निवडणूक लढवावी लागणार, हे कोर्टाने स्पष्ट केले. त्यामुळे, मंगळवारी भाजपच्या निवडणूक कार्यालयात रेश्मा भोसले या पक्षाच्या पुरस्कृत उमेदवार असतील, असे जाहीर करून पालकमंत्री बापट आणि शहराध्यक्ष गोगावले यांनी त्यांचे स्वागत केले. भोसले यांच्यासह रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे कसबा पेठ-सोमवार पेठ (प्रभाग क्र १६) आणि नवी पेठ-पर्वती (प्रभाग क्र २९) या प्रभागातील अनुक्रमे छाया वारभुवन आणि सत्यभामा साठे हे दोन उमेदवारही भाजप पुरस्कृत असतील, असे बापट यांनी जाहीर केले.
‘नवी पेठ-पर्वती प्रभागात सरस्वती शेंडगे यांचा अर्ज ‘डमी उमेदवार’ म्हणूनच भरला होता. ते माघार घेतील, असे ठरले होते. त्यांनी वेळेत माघार घेतली नाही. तरीही, भाजपच्या पुरस्कृत उमेदवार साठे याच असतील. या प्रभागात तीन कमळ आणि एक करवत घेऊन आम्ही मतदारांसमोर जाऊ’, असे बापट यांनी सांगितले. कसबा पेठ-सोमवार पेठ प्रभागातील आरपीआयच्या उमेदवारांचे चिन्ह कपबशी असेल.
..............
राष्ट्रवादीचे मंगेश गोळेही भाजपमध्ये
वडगाव शेरी परिसरातील राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे माजी अध्यक्ष मंगेश गोळे यांनीही मंगळवारी पालकमंत्री गिरीश बापट यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला. गोळे यांच्यासह त्यांच्या अनेक कार्यकर्त्यांनाही प्रवेश देण्यात आला. या वेळी शहराध्यक्ष योगेश गोगावले, स्थानिक आमदार जगदीश मुळीक उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शाश्वत विकासासाठी कटिबद्ध

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, पुणे
वेगाने विकसित होत असलेले पुण्याची कीर्ती जागतिक पातळीवर पोहोचली असून आगामी काळातही शहराचा शाश्वत विकासाच्या दिशेने प्रवास व्हावा, यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत, असे मत सर्वच राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींनी व्यक्त केले. वैयक्तिक पक्ष म्हणून शहर आणि नागरिकांच्या प्रगतीसाठी निश्चित केलेल्या धोरणाचीही माहिती या वेळी त्यांनी दिली.
पुणे इंटरनॅशनल सेंटर आणि जनवाणी तर्फे आयोजित परिसंवादामध्ये ‘पुणे महापालिका निवडणूक २०१७’ या विषयावर शहरातील प्रमुख पक्षांच्या प्रतिनिधी सहभागी झाले होते. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शहराध्यक्षा खा. वंदना चव्हाण, भारतीय जनता पक्षाचे पुणे शहर अध्यक्ष योगेश गोगावले, शहर काँग्रेसचे सरचिटणीस अभय छाजेड, शिवसेना शहर समन्वयक श्याम देशपांडे, मनसेचे शाखा अध्यक्ष हेमंत संभूस या परिसंवादामध्ये सहभागी झाले होते. ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ आणि पीआयसीचे उपाध्यक्ष डॉ. विजय केळकर हे परिसंवादाच्या अध्यक्षपदी होते. डॉ. दीपक शिकारपूर यांनी समन्वय साधला. पुणे इंटरनॅशनल सेंटरचे मानद संचालक प्रशांत गिरबने व जनवाणीच्या किशोरी गद्रे याही या वेळी उपस्थित होत्या.
चव्हाण म्हणाल्या, ‘वाढते शहरीकरण हा पुण्यासाठी महत्त्वाचा प्रश्न आहे. इतर देशांच्या तुलनेने आपण नियोजनबद्ध विकासाकडे आणखी लक्ष दिले पाहिजे. आमचा पक्ष शहरातील अनेकविध समस्यांकडे आव्हान म्हणून नव्हे तर संधी म्हणून पाहतोय. आज अनेक जण केवळ ‘स्मार्ट पुणे’ अशा घोषणा देत आहेत. सामान्य नागरिकांना आरोग्यदायी, सुरक्षित आणि आनंदी पुणे हवे आहे. यासाठी आश्वासनांची नाही तर कृतीची अपेक्षा आहे.’
गोगावले म्हणाले, ‘महापालिका चालविण्यासाठी सक्षम लोकप्रतिनिधींची गरज आहे. घोषणा नाही अंमलबजावणी आज गरज आहे. देशात आणि राज्यात सामाजिक परिवर्तन झाले आहे, त्याच धर्तीवर परिवर्तनाच्या वाटेवर ‘स्मार्ट पुणे’ ध्यास आम्ही घेतला आहे. शहराच्या पायाभूत सोयीसुविधांवर भर देऊन त्या सक्षम करण्यासाठीसुद्धा काम करू.’
‘केंद्र सरकारच्या योजनांची स्थानिक पातळीवर योग्य पद्धतीने अंमलबाजावणी करण्याची गरज आमच्या पक्षाने ओळखली आणि शहराच्या विकासाला गती मिळाली. मेट्रो, उड्डाणपूल, पाणी आणि सांडपाणी व्यवस्था हे आणि यांसारखे अनेक मुद्दे घेऊन आमच्या काँग्रेस पक्षाने काम केले आणि त्याचा फायदा नागरिकांबरोबरच शहरालाही झाला आहे,’ असे मत छाजेड यांनी व्यक्त केले.
संभूस यांनी राजकीय अनास्थेकडे लक्ष वेधले आणि या अनास्थेमुळे सामान्य नागरिकांचे होत असलेले हाल अधोरेखित केले. केवळ ‘विरोधाला विरोध’ ही भूमिका बाजूला ठेवून राजकीय पुढाऱ्यांनी एकत्र येऊन शहराच्या विकासासाठी काम करावे अशी अपेक्षाही त्यांनी या वेळी व्यक्त केले. शिवसेनेच्या श्याम देशपांडे यांनी पक्षाची भूमिका विषद करताना ‘शहरातील ई-गव्हर्नन्स आणखी सक्षम करण्याकडे, वाहतूक व्यवस्थेच्या सुधारणेकडे आम्ही प्राध्यान्याने लक्ष देऊ,’ असे आश्वासन दिले. या चर्चासत्रानंतर सामान्य नागरिकांनी विचारलेल्या प्रश्नांनाही उत्तर देण्यात आली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मतदानाची माहिती अद्ययावत तंत्रज्ञानाद्वारे

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
मतदारांना मतदान केंद्रांची नेमकी माहिती व्हावी, यासाठीची माहिती देणाऱ्या स्लिपांसाठी प्रत्येक निवडणुकीत नवनव्या तंत्रज्ञानाचा शोध लागत आहे. काही वर्षांपूर्वी कार्यकर्त्यांकडून हाताने भरून दिल्या जाणाऱ्या स्लिपा कम्प्युटराइज्ड झाल्या होत्या. तर, आता त्यापुढचे नवे तंत्र विकसित झाले असून, ‘व्होटर स्लिप प्रिंटिंग मशिन्स’द्वारे थेट मतदारांच्या हाती मतदान केंद्रांची माहिती पोहोचवली जात आहे. ‘कंडक्टर’च्या हातात असणाऱ्या मशिनप्रमाणे दिसणाऱ्या या स्लिप मशिन्सला यंदा सर्वच प्रभागातील उमेदवारांकडून मोठी मागणी आहे.
महापालिकेतर्फे मतदार याद्यांचे सुरुवातीच्या टप्प्यात प्रभागनिहाय विभाजन होते, तर नंतर मतदान केंद्रनिहाय विभाजन केले जाते. प्रभागातील मतदारांना नेमके मतदान केंद्र कोणते, याची माहिती व्हावी, यासाठी प्रत्येक राजकीय पक्षाकडून मतदारांचा ‘व्होटर स्लिपा’ दिल्या जातात. या स्लिपांवर मतदान केंद्र, अनुक्रमांक याची माहिती असतेच; त्याशिवाय संबंधित पक्षाच्या उमेदवाराचे नाव आणि मतदान यंत्रांवरील क्रमांकही दिला जातो. परंपरागत पद्धतीने लिखित स्वरूपात दिल्या जाणाऱ्या स्लिपा २१ व्या शतकात कम्प्युटराइज्ड झाल्या. लोकसभा-विधानसभेप्रमाणे महापालिकेच्या निवडणुकांमध्येही या स्लिपांचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो.
यंदाच्या निवडणुकीत स्लिपांसाठी पुन्हा नव्या तंत्राचा वापर केला जात आहे. ‘व्होटर स्लिप प्रिंटिंग मशिन’ अशा नावाने बाजारात आलेल्या यंत्राची मागणी सर्व उमेदवारांकडून केली जात आहे. स्थानिक प्रभागातील मतदारांचा संपूर्ण डेटा या ‘मशिन’मध्ये भरला, की मतदारांना थेट जागच्या जागी स्लिप देता येणार असल्याची माहिती युनिटी इन्फोटेकच्या स्वप्नील दरेकर यांनी दिली. एसटी बस-पीएमपी बसचे तिकीट किंवा डेबिट-क्रेडिट कार्ड स्वाइप केल्यानंतर येणाऱ्या पावतीप्रमाणे या मशिनमधून एका पांढऱ्या कागदावर मतदारांचे नाव, मतदान केंद्र आणि अनुक्रमांक अशी सर्व माहिती क्षणार्धात मिळत आहे. यापूर्वीच्या स्लिपांप्रमाणे उमेदवाराचे छायाचित्र टाकण्याची सोय या स्लिपांवर नसली, तरी पक्षाचे चिन्ह टाकण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. यंदा, प्रभागाचा विस्तार झाला असल्याने या स्लिप मशिनला सर्व उमेदवार पसंती देत आहेत.
साधारणतः १२ ते १४ हजार रुपयांमध्ये सध्या ही मशिन्स उपलब्ध होत आहेत. काही प्रभागांमध्ये उमेदवारांनी चार ते पाच मशिन्स खरेदी केली आहेत; तर काही प्रभागांमध्ये चारही उमेदवारांनी मिळून एकदम ५० ते ८० मशिन्स खरेदी केल्याचे दिसून येत आहे. शहरासह उपनगरांतील उमेदवारांकडूनही या नव्या तंत्राचा वापर केला जात असल्याचे दिसून येत आहे.
.................
ब्ल्यू-टूथ मशिनही उपलब्ध
स्थानिक भागांत काही उमेदवार किंवा त्यांच्या प्रतिनिधींकडे मोबाइलवर मतदान केंद्रनिहाय मतदारांची यादी उपलब्ध असेल, तर स्मार्ट फोनवरील ब्ल्यू-टूथचा वापर करून प्रिंटिंग स्लिप काढण्याचे मशिनही उपलब्ध आहे. त्यामुळे, यंदाच्या निवडणुकीत व्होटर स्लिपांसाठी अत्याधुनिक तंत्राचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जाण्याचे स्पष्ट दिसून येत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भाजपमध्ये प्रवेशासाठी लागली गुंडांची रांग

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, येरवडा

‘खून, खुनाचा प्रयत्न, खंडणी आणि गंभीर गुन्हे दाखल असलेल्या गुंडांना भारतीय जनता पक्षात प्रवेश दिला जात आहे. भाजपमध्ये प्रवेश करण्यासाठी राज्यातील अनेक गुंडांची रांग लागली आहे. खुद्द राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्यांचे स्वागत करून त्यांना पवित्र करतात. यापूर्वी पुण्याच्या नानाचे काम ऐकून होतो, आता फडणवीस ते काम करतात,’ अशा शब्दांत मुख्यमंत्र्यांवर टीकास्त्र सोडून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी फडणवीस यांची तुलना नाना फडणवीसांबरोबर केली. ‘राज्याचे प्रश्न सोडवण्याऐवजी फडणवीस आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे एकमेकांवर चिखलफेक करू लागले आहेत. त्यामुळे राज्याच्या विकासावर परिणाम होऊ लागला आहे,’ असे पवार यांनी सांगितले.

पुणे महापालिका निवडणुकीतील वडगाव शेरी मतदारसंघातील प्रभाग एक ते सहामधील राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी पवार यांची मंगळवारी येरवाड्यातील गेनबा मोझे विद्यालयाच्या मैदानावर सभा झाली. त्या वेळी ते बोलत होते.

पवार म्हणाले, ‘राज्यात सत्ता स्थापन केलेल्या भाजप आणि शिवसेनेने महापालिका निवडणुकीच्या तोंडावर युती तोडून एकमेकांवर जाहीर आरोप-प्रत्यारोप करणे चालू केले आहे. भाजप हा गुंडांचा पक्ष असल्याचे उद्धव ठाकरे सांगतात, तर शिवसेना हा खंडणीखोरांचा पक्ष असल्याची टीका फडणवीस करतात. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीदेखील राज्यात पंधरा वर्षे सत्तेत होती. काही गोष्टींवर आमच्यातही मतभेद होते; पण आम्ही कधीही एकमेकांवर जाहीर टीका आणि चिखलफेक केली नाही. भाजप आणि सेनेच्या या वागण्यामुळे राज्याच्या विकासावर परिणाम होण्याची भीती आहे.’

............

‘राष्ट्रवादीमुळेच स्मार्ट’

‘केंद्राने घोषित केलेल्या ‘स्मार्ट सिटी’साठीच्या यादीत पुणे आणि पिंपरी-चिंचवड या शहरांचा समावेश झाला आहे. या दोन्ही शहरांत राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता असल्यानेच त्यांचा यादीत समावेश झाला आहे,’ असा दावा पवार यांनी केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

निवडून आलो तर नाट्यगृह

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

पुणे महानगरपालिकेच्या रणधुमाळीने सध्या कळस गाठला आहे. प्रत्येक पक्षाने वचननामे जाहीर करून मतदारांना आश्वासनांची खैरात वाटली आहे. सांस्कृतिक पार्श्वभूमी असलेल्या पुणे शहरात सांस्कृतिक चळवळ वाढवण्यासाठी ‘निवडून आलो तर नाट्यगृहे उभारू’, असे आश्वासन अनेक पक्षांच्या उमेदवारांनी दिले आहे. मात्र, सध्याच्या नाट्यगृहांची झालेली अवस्था पाहता, नवी नाट्यगृहे ही राजकीय सोयीसाठी तयार होणार का, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

भाजप, राष्ट्रवादीसह सर्वच पक्षांनी त्यांच्या जाहीरनाम्यामध्ये पुण्यातील सांस्कृतिक चळवळ अधिक सदृढ करण्याचे आश्वासन दिले आहे. त्यामध्ये नाट्यगृहांची उभारणी, उद्यानांमध्ये कवी कट्टा, सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन, अशी अनेक आश्वासने देण्यात आली आहेत. काही विद्यमान नगरसेवकांनी हे उपक्रम सुरूही केले आहेत. मात्र, त्यांचे आयोजन नियमितपणे केले जाते का, याबद्दल साशंकता आहे. अनेक विद्यमान नगरसेवकांनी त्यांच्या वैयक्तिक कार्यअहवालात पुणे शहरात नाट्यगृहे बांधणार असल्याचे सांगितले आहे. त्यातील काही नगरसेवकांच्या प्रयत्नाने नाट्यगृहे उभारली देखील आहेत. पण त्या व्यासपीठांचा नाटकांव्यतिरीक्त इतर कार्यक्रमांसाठीच अधिक वापर केला जातो, ही वस्तुस्थिती आहे.
शहरात सध्या बालगंधर्व रंगमंदिर आणि यशवंतराव चव्हाण नाट्यगृह ही दोन नाट्यगृह नाट्यचळवळीच्या केंद्रस्थानी आहेत. याशिवाय गेल्या दोन वर्षांमध्ये औंध येथे पं. भीमसेन जोशी नाट्यगृह, सातारा रस्त्यावरील अण्णा भाऊ साठे नाट्यगृह, वानवडी येथील महात्मा फुले नाट्यगृह, सहकारनगरमधील विजय तेंडुलकर नाट्यगृह, गंजपेठेतील सावित्रीबाई फुले नाट्यगृह, अशी सभागृहे तयार करण्यात आली. मात्र, काही अपवाद वगळता त्या ठिकाणी नाट्यचळवळ उभी राहू शकलेली नाही. याउलट सामाजिक संस्था आणि राजकीय कार्यक्रमांकरीताच त्याचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जात आहे. याशिवाय पुण्यात हडपसर, वडगाव-धायरी येथे आणखी नवी नाट्यगृहे प्रस्तावित आहेत. यशवंतराव चव्हाण नाट्यगृहाच्या परिसरातदेखील एक छोटे नाट्यगृह साकारले जात आहे. पुणे शहराचा पसारा वाढला आहे. नागरिकांना उपनगरांमधून नाटकांसाठी येणे शक्य होत नाही, हे जरी मान्य केले तरीही अद्याप नाट्यचळवळीचा केंद्रबिंदू बालगंधर्वच आहे. उपनगरांमध्ये उभारलेल्या नाट्यगृहांमध्ये अजूनही दर्जेदार नाटकांची वानवा आहे.

तांत्रिक अडचणी कायम
सध्याच्या सर्वच नाट्यगृहांचा विचार केला तर नाट्यगृहामंध्ये असलेल्या सोयीसुविधा दर्जेदार नाहीत, काही ठिकाणी अनेक तांत्रिक अडचणी तयार होतात, बऱ्याचदा प्रयोग थांबतात. तांत्रिक अडचणी सोडवणारा तांत्रिक वर्गाची नियुक्तीही फारशी करण्यात आलेली नाहीत. नाट्यगृहातील अनेक उपकरणे बंद राहतात. प्रयोग करताना कलाकारांना अनेक समस्यांना तोंड देत सादरीकरण करावे लागते. याची सुधारणा अद्याप महापालिकेने केलेली नाही. त्यामुळे, नवीन नाट्यगृहे जरी उभारली तरी तिथे सुसज्ज सुविधा आणि नाट्यचळवळीसाठी अनुकूल वातावरण असणे गरजेचे आहे, अन्यथा पुण्याच्या सांस्कृतिक वैभवात भर पडण्याऐवजी राजकीय वैभवात भर पडेल, यात शंका नाही.
------------------
सध्या असलेल्या नाट्यगृहांमधील सोयी-सुविधा सुसज्ज करणे, यावर लक्ष केंद्रीत करणे गरजेचे आहे. नवी नाट्यगृहे उभारण्यापेक्षा उपनगरांमध्ये छोटी नाट्यगृहे उभारली, तर त्याचा चित्रपट आणि नाटक दोन्ही दृष्टीने उपयोग करता येईल. शिवाय प्रायोगिक आणि बालरंगभूमीच्या विस्तारासाठी त्याचा उपयोग होईल. उद्यानांमध्ये कट्ट्यांना नाव देऊन साहित्य कट्टा करण्याऐवजी त्याच ठिकाणी योग्य नियोजन करून ओपन थिएटरची संकल्पना राबवणे गरजेचे आहे.
- योगेश सोमण, लेखक दिग्दर्शक

महापालिकेने सांस्कृतिक धोरण केल्याशिवाय नाट्यचळवळीचा विकास होणार नाही. सांस्कृतिक धोरणामुळे नाट्यगृहांमधील राजकीय कार्यक्रमांवर नियंत्रण आणता येईल. बालरंगभूमीसाठी नाट्यगृहांची शहरात वानवा आहे. त्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. त्यामुळेच टोलेजंग नाट्यगृहे उभारून पांढरे हत्ती पोसण्यापेक्षा सांस्कृतिक धोरणाच्या आधारे चळवळ बळकट करण्यावर भर द्यायला हवा.
- सुनील महाजन, अध्यक्ष, कोथरूड नाट्य परिषद

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images